श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “हिरवा निर्सग हा भवतीने… जीवन सफर करा मस्तीने…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
ये ये आलास! .. अरे इकडे इकडे बघ वेड्या.. मी बोलवतोय तुला… इतक्या कडकडीत उन्हातान्हातून, धुळवटीच्या फुफाट्यातून तंगडे तोड करुन कुठं बरं निघालास.. बरं निघालास ते निघालास घरी सांगून सवरुन तरी निघालास आहेस ना.. कुठं जाणारं आहेस.. किती लांब जाणार आहेस.. कसा जाणार आहेस.. परत कधी येणार आहेस… घरी विचारलेल्या तुझ्या मायेच्या माणसांच्या प्रश्नांची नीट उत्तरे दिली आहेस ना.. नाहीतर ते उगाच तुझ्या काळजीत पडतील… दिवसभरात दिसलास नाहीस आणि अंधार पडल्यावर घरी परतला नाहीस तर त्यांच्या जीवाला किती घोर लागेल…. बघं मी सुद्धा किती किती प्रश्नांचाच भडिमार करतोय तुझ्यावर नाही का… अरे अजूनही तू उन्हातच का उभा राहिला आहेस… घामाने सगळंच अंग तुझं चिंब झालयं की… आणि चेहरा तर किती क्लांत झालेला दिसतोय… उन्हाच्या तावाने चेहरा लाल लालबुंद झालाय.. जसं काही घरातल्या माणसांवर रागावून चिडून संतापून तडकाफडकी घरा बाहेर पडलेला असावास असाच दिसतोस.. अरे ये रे या माझ्या हिरव्यागार थंड सावलीत येऊन बैस जरा.. हं हं त्या तापलेल्या मातीच्या पायवाटेवर बसू नकोस… या शांत हिरव्यागार कोमल अश्या तृणपातीवर बैस… वाटल्यास जरा पहुडशील… उन्हाच्या कावात चेचले अंगाला जरा थंडावा लागू दे.. वाऱ्याची झुळुकेने घाम सुकून गेला की थोडं तुला हायसं वाटेल.. बाहेरच्या रखरखीने मनात उसळलेल्या रूखरूणाऱ्या काळजी चिंता या इथं बसवल्यावर बघ कशा निभ्रांत होऊन जातील त्या… आणि हो आल्या आल्या तू मला सगळं सांगावासं असं माझं बिल्कुल म्हणणं नाही बरं… मला ठाऊक आहे ते.. तु घरापासून किती लांब आला आहेस.. एकही गोष्ट तुझ्या मनासारखी कुठेच कधीही घडून येत नसल्याने आणि तरीही सगळ्या गोष्टीला तुचं जबाबदार असल्याने.. कारण तुझं उत्तरदायित्त्व तुलाच निभाऊन न्यायला हवं असताना.. काळ किती प्रतिकुल असताना.. सगळंच प्रतिकुल घडत जातयं हे समोर दिसताना आपण किती हतबल आहोत याची जाणीव जेव्हा होते… तेव्हा राग, संताप, अनावर होतो… वादाच्या ठिणग्याने वणवा पेटतो तेव्हाच कुठलाही माणूस डोक्यात राख घालून घराबाहेर पडतोरे पडतोच.. जाउ दे सारे मसणात हाच टोकाचा विचार येतो मनात आणि पाय नेतील तिकडे माणसाचा दिशाहीन प्रवास सुरू होतो.. बाहेरही उन्हाळा आणि मनातही उन्हाळा… या उन्हाच्या लाही लाहीने जीव नकोसा होतो… वाटेत कुणी भेटलं.. का बरं म्हणून विचारलं तरी वाळली चौकशीने सुद्धा जखमेवरची खपली निघाल्यासारखी वाटते.. त्याचा सुद्धा अधिकच त्रास वाटतो… पण तू माझं ऐकलास इथं सावलीत घटकाभर बसलास मलाच फार फार बरं वाटलं बघं… इथं तुला गारव्यानं तनाला नि मनाला विश्रांती मिळाली.. मस्तक नि मनही शांत झालं.. डोळे ही निवले.. आणी संतापलेल्या विचारांचा धूरळाही खाली बसला असच दिसतयं तुझ्या या देहबोलीतून..
आता अविचार सोडून देऊन पुन्हा परतीचा घराकडचा मार्ग धरावास.. संध्यासमय जवळ येत चालला आहे.. आणि तुझ्या येण्याकडे तुझी घरातली सारी तुझी माणसं वाटेला डोळे लावून बसलेत…. कारण त्यांना तू आणि तूच हवा आहेस.. तुझ्या शिवाय त्यांना दुसरा कुठलाच आधार नाही हे तुलाही चांगलचं ठाऊक आहे… तेव्हा तू असाच घरा कडं जा.. आणि पुन्हा म्हणून अविचाराने असं पाऊल उचलू नकोस….
आज मी तुझ्या आजोबांनी लावलेल्या या झाडाने तुझी होत असलेली तगमग ओळखली म्हणून तुला या टोकाच्या निर्णया पासून परावृत्त तरी करु शकलो… तुझ्या आजोबांनी अगदी हाच विचार समोर ठेवून मला म्हणजे झाडाला उभं केलं.. वाढवलं.. त्यांना देखील तसाच अनुभव आलेला असणार… आणि असही वाटलं असणार की पुढे येणाऱ्या प्रत्येक पिढीलाही असाच अनुभव येत राहणार त्यात बदल काही होणार नाही तेव्हा त्या सगळ्यांना शांतता मिळावी विचारात परिवर्तन व्हावं असं वाटून मला इथं वाटेवर उभं करून गेलेत… मगं मी देखील पहात असतो असा कुणी रंजलेला गांजलेला पांथस्थ या वाटेवरून जाताना दिसतो का ते…. पण तू पुन्हा असं केलास आणि दुसऱ्याच रस्याला गेलास तर न जाणो माझ्या सारखं कुठलं झाडं तुला वाटेत भेटेल न भेटेल… पण माझी तुला सतत आठवण रहावी असं वाटंत असेल तर तू मात्र एक करू शकशील या गावाच्या माळरानाच्या वाटेवर माझ्यासारखी कितीतरी झाडं लावू शकशील की जेणेकरून त्याच्या सावलीत हिरव्यागार थंडाव्याने तिथं येणाऱ्या पांथस्थांना सुख समाधानाचा लाभ होईल…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈