श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “चल उड़ जा रे पंछी… की अब ये देश हुआ बे़गाना…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“अहो ताई माई आक्का.. आम्हाला तुम्ही बेघर करू नका हो… मी या जंगली प्राणीमात्रांचा राजा या नात्याने तुम्हा माणसांना हात जोडून विनंती करतो… मी एकटाच नाही तर या आमच्या जंगलातील माझी राहणारी विविध प्रकारच्या प्राण्यांच्या रयतेचे प्रतिनिधीचं शिष्टमंडळ सुध्दा तुम्हाला विनम्रपणे विनंती करायला आले आहेत… आम्हाला तुम्ही बेघर करू नका… अहो दाट जंगलामध्ये शांतता होती, पक्ष्यांचे कूजन, वाऱ्याची सळसळ, आणि हिरवळीत मिसळलेला निसर्गाचा श्वास… पण एका दिवसाने सर्व काही बदललं. सरकारी अधिकाऱ्यांचा एक चमू जेसीबी, कुऱ्हाडी आणि नकाशे घेऊन त्या जंगलात उतरला. कारण एकच — विकासाच्या नावाखाली जंगलतोड.
तुम्ही तुमचा विकास का काय ते जरूर साधा बरं पण त्यासाठी या जंगलातील आमच्या घरादारावर तुमचा जेसीबी फिरवू नका… तुम्ही खुशाल तुमच्या जगात जगा आणि आम्हाला आमच्या या दुनियेत जगू द्या..
ताई माई आक्का एक सांगतो तुम्हाला, आम्हाला तुमच्या माणसांचं ना राजकारण कळतं, ना विकासाचे प्रकल्प. आम्हाला फक्त आमचं घर हवं आहे. झाडांच्या आडोशात निवारा, नदीच्या काठावर पाणी, आणि जंगलाचा मुक्त श्वास. आणि जर तुम्ही ते घर उध्वस्त केलं, तर कुठं बरं जायचं आम्ही?
हवंतर आपण सामोपचाराने आपल्यातले काही मतभेद असतील तर सोडवूया… पण आम्हाला नि आमच्या कुटुंब काबिल्याला असं उघड्यावर आणू नका… अहो इथं कुणाची लहान लहान नवजात बाळं अजून आपल्या घरट्यात, गुफेत, गुहेत आहेत.. कुणी आजारी आहेत तर कुणी वयानं म्हातारे कोतारे जराजर्जर असे आहेत.. आमच्या कडील मादी आपल्या कुटुंबाच्या पालनपोषण साठी दिवसरात्र बाहेर भटकतेय.. घरची कर्ती नर मंडळी कुटूबाचं संरक्षण आणि त्याच्या अन्न पाण्याची सोय करण्यासाठी दिवसभर जंगलात वणवण करत हिंडतोय… त्या सर्वांना ठाऊक आहे की या जंगलात सुरक्षितता आहेच शिवाय इथं पोटभर दाणा पाणी ही उपलब्ध आहे… माझी हि जनता आपआपसात गोडीगुलाबीने राहतेय… एकमेकांशी सौहार्दपूर्ण वागतेय.. एक दुसऱ्या साठी वेळप्रसंगी स्वताचं बलिदान ही देतेय पण त्याला उपाशी ठेवत नाही… अश्यावेळी त्या दुसऱ्याला नाईलाजास्तव त्याची शिकार करणं भागं पडतं… पण ते भक्ष्य जर त्याला मिळालं नाही तर त्याच्या जीवनाचा तरणोपाय तरी दुसरा कुठला असणार… हा मनावर आणि हृदयावर दगड ठेवून कठोरपणे हा निर्णय अंमलात आणावा लागतो… आमच्या जंगल कायद्यात हा गुन्हा समजला नाही.. जीवो जीवस्य जीवनम हेच तत्व वापरलं जातं… या जंगलात राहणारे आम्ही सर्व प्राणी जंगली असलो, हिंस्र असलो तरी आम्हाला मन आहे, भावना आहेत.. म्हणून तर निराधार दुर्बल नि अशक्त प्राण्यांचे आम्हीच निगुतीने काळजी सांभाळ करतो…
ताई माई आक्का आता केलेल्या आमच्या निवेदनावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.. आणि ते ही बरोबरच आहे म्हणा कारण आपण दोघे तेव्हढे कधी एकत्र राहिलोच नाही… कायम आपण एकमेकांना आपआपले शत्रू भावनेतूनच बघत गेलोय… त्यामुळे आमच्या जंगलात येऊन तुम्ही कायम आमची शिकार करत गेलात… अश्या तुमच्या अमानवी आणि माणूसकिला काळिमा फासणाऱ्या कृत्याकडे आम्ही गांभिर्याने न बघितल्याने आमची प्रणीमात्रांची संख्या रोडावत गेली. तरीसुद्धा आम्ही तुमच्या विरुद्ध आजपर्यंत कुठलाच संघर्ष केला नाही.. पण जिथं जिथं आमच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतोय असं वाटलं तेव्हा तुम्हाला आमच्या पासून थोडं दूर राहिलात तर बरं हे जाणवून देण्यासाठी कधी कधी तुमच्या मानव वस्तीत अचानक फेरी टाकून जावी लागते… पण हे ही तेव्हढ्या पूरतच झालं… पण तुम्ही आता अशी आणीबाणीची परिस्थिती आमच्या समोर उभी केली आहे की आम्ही आता बेघर होऊन उघड्यावर आलो आहे आणि ते जरं का तसचं घडलं तर ते आमच्या पेक्षा तुम्हालाच जास्त धोकादायक असणार आहे… आमचं जगणं तर आज आहे तर उद्या नाही, पण तुमचं जगणं कायमं मरणाच्या दाढेत असणार हे नक्की… तेव्हा आम्ही आमच्या या निवेदनात एक प्रस्ताव आम्ही मांडला आहे. हवंतर आम्ही तुम्हाला इथे वचननामा लिहून देतो की आताच्या घडी पासून आम्ही आमचा तुम्हा माणसांच्या बाबतीला हिंस्र पणा काढून टाकतो… तुमच्या सगळ्यांशी विनयाने आणि आदराने आम्ही आमचं वर्तन ठेवू… चुकुन माकून कुणी तुमच्या माणसांपैकी कधीही जंगला च्या वाटेवरून जात असेल तर आमच्या पैकी कुणीही त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणार नाही आणि इतरांनाही तो करू देणार नाही… तसंच इथून पुढे आमच्या पैकी कुणीही तुमच्या मानव वस्तीत अचानकपणे येऊन हल्ला वगैरे करणार नाही… तुम्ही तुमच्या मानवांच्या वस्तीत मस्त मजेत जगा आणि आम्ही या जंगलात सुखानं जगतो… म्हणजे तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या… जंगलाचं संरक्षण संवर्धन केल्यानं किती फायदे मिळतात हे मी काही तुम्हाला नव्याने सांगायला पाहिजे अश्यातला भाग नाही…. तुम्हालाही पाऊस पाणी, हवा, अन्न धान्य विपुल नि मुबलक प्रमाणात मिळत राहिलं… आणि इतरही अनेक फायदे तुम्हाला मिळत राहतीलच… पण जर का तुम्ही तुमच्या विकासाचा विघातक विचारच अंमलात आणायचा असेल तर एकवेळ तुमच्या जगण्याला धक्का बसणार नाही. पण जंगलच नाहीसं झालं तर आम्ही प्राणीमात्रांनी कसं जगावं… आमचा कोण तारणहार असेल… मग का आमची तुम्ही अशी ससेहोलपट करू पाहतायं… आमच्या बद्दल थोडी तरी सहानुभूती दाखवा.. तुमच्या मनात आमच्या बद्दल भूतदया जागृत होऊ द्या… जे तुम्ही माणसांमाणसामधे माणूसकी हिनतेने वागत असता ते तसं आमच्या बाबतीत वागू नका… आमच्या पासून तुम्हाला काडी इतकाही उपद्रव आम्ही इथून पुढे देणार नाही हि सगळ्या प्राणी मात्रांच्या वतीने आणि त्यांचा नेता म्हणून ग्वाही देतो…. आणि आमचं नव्हे आपलं हे आणि अशी जी जंगल जिथं जिथं आहेत त्याचं संरक्षण नि संवर्धन करूया…
ताई माई आक्का माझ्या या बोलण्याचा तुम्ही आणि तुमच्या मानवजातीने गांभिर्याने विचार करावा आणि आम्हाला आशवस्त करालं… नुसतं पोकळ आश्वासन नका बरं देऊ जी काही कृती करणार ती विधायक आणि ठोस हवी बरं..
‘चल उडी जा रे पंछी.. कि अब ये देश हुआ बे़गाना’ असं तुम्ही आम्हाला म्हणायला सांगणार नाही हि एव्हढीच माफक अपेक्षा ठेवतो…
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈