सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ एकुलती -भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(पूर्वार्ध :केतकी आणि कार्तिकचं कडाक्याचं भांडण चाललेलं होतं. तेवढ्यात केतकीच्या फोनची रिंग वाजली.  आता पुढे….)

“हॅलो, अगं, काय झालं, आई? रडतेयस कशाला?”

“………”

“घाबरू नकोस. मी येते आत्ता. डॉक्टरना फोन केला की करायचाय?”

“………”

“हो, हो. तो आहे इकडेच.”

खरं तर केतकी कार्तिकला काही सांगणारच नव्हती. पण तिचं बोलणं ऐकून त्यानेच विचारलं, “बाबांना बरं नाहीय का?”

“हो. तिच्या सांगण्यावरून तरी पॅरॅलिसिसचा अटॅक आल्यासारखं वाटतंय. मी जाते.”

“थांब. मीही येतो.”

केतकी त्याला ‘नको ‘ म्हणाली नाही.

वाटेत केतकीने पुष्करादादाला फोन केला. “काकांना एवढ्यातच काही बोलू नकोस… मी तिथे पोचल्यावर डॉक्टर काय म्हणतात, ते तुला सांगते. गरज पडली तर तू निघ.”

“……….”

“तो आहे माझ्याबरोबर.”

“……….”

“बरं. ये मग.”

मध्येच कार्तिकने गाडी थांबवली आणि तो एटीएममधून कॅश काढून घेऊन आला.

बाबांची अवस्था बघितल्यावर केतकीला रडूच आलं.

“स्वतःला कंट्रोल कर, केतकी. नाहीतर ती दोघं अजूनच घाबरतील,”  कार्तिक तिच्या कानात कुजबुजला.

‘म्हणे कंट्रोल कर. ह्याच्या वडिलांना असं झालं असतं तर?….. पण बरोबरच आहे ना, तो म्हणतोय ते,’ केतकीच्या मनात आलं.

तेवढ्यात डॉक्टर आले.त्यांनी ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं. तशी नोटही दिली.

पुष्करदादा आणि शीलूताईही आले.

आईला हॉस्पिटलमध्ये यायचं होतं. पण कार्तिकने सांगितलं, “ते अलाव नाही करायचे सगळ्यांना. तुम्ही येणार असाल, तर केतकी थांबेल घरी.”

“नको, नको. तिलाच जाऊदे. मी थांबते घरी.”

मग आईच्या सोबतीला शीलूताई थांबली. आणि ही तिघं बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.

ऍडमिशनच्या वेळी कार्तिकने कधी सूत्रं हातात घेतली, ते केतकीला कळलंच नाही. अर्थात कळलं असतं, तरी ती वादबिद घालायच्या मन:स्थितीत नव्हती.

दिवसा केतकी, शीलूताई, वहिनी आळीपाळीने थांबायच्या. अधूनमधून आई यायची.

रात्री मात्र कार्तिकच राहायचा तिकडे.

“थँक्स कार्तिक. मी खरंच आभारी आहे तुझी. आपल्यात काही रिलेशन राहिलं नसूनही तू माझ्या वडिलांसाठी……..”

यावर कार्तिक काहीच उत्तर द्यायचा नाही.

हळूहळू बाबांच्या तब्येतीला उतार पडला.

“एक-दोन दिवसात डिस्चार्ज मिळेल, असं डॉक्टर म्हणाले, आई. तू अजिबात काळजी करू नकोस. मी रजा घेते आणि तिकडेच राहायला येते. ब्युरोला फोन करून अटेंडंटची व्यवस्था करते.”

“बरं होईल गं, तू असलीस तर. मला एकटीला सुधरणार नाही हे. पण कार्तिकच्या जेवणाखाण्याचं काय? त्यालाही बोलव आपल्याकडेच राहायला.”

‘खरं तर त्या निमित्ताने आईकडे राहायला सुरुवात करता येईल. मग त्या कार्तिकचं तोंडही बघायला नको,’ केतकीच्या मनात आलं.

“त्यापेक्षा तुम्हीच या आमच्याकडे थोडे दिवस. आमच्याकडून हॉस्पिटल जवळ आहे. शिवाय तुमचा तिसरा मजला. लिफ्ट नाही. आमच्याकडून फॉलोअपसाठी न्यायलाही  सोईस्कर पडेल,” कार्तिकने सुचवलं.

“बरोबर आहे, कार्तिक म्हणतोय ते.आणि केतकीकडे स्वयंपाकाला   वगैरे बाई आहे. त्यामुळे काकीचीही धावपळ नाही होणार,”शीलूताईने दुजोरा दिला.

हे दोन्ही मुद्दे तसे बिनतोड होते.

‘ही कार्तिकची कॉम्प्रोमाईज करण्याची चाल तर नाही ना?’ केतकीला वाटलं, ‘पण तो म्हणाला, ते खरंच तर होतं. शिवाय स्वयंपाकाची बाई वगैरे सर्वच दृष्टींनी आपल्या घरी राहणं, आपल्यासाठी सोयीचं होतं. त्यातल्या त्यात नशीब म्हणजे कार्तिकने स्वतःहूनच हे सुचवलं होतं.’

क्रमश:….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments