श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ ओढ… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
वृत्त– अनुराग, लगावली
(ललगालगालगागा ललगालगालगागा)
जगणे सुखासुखी या जमले जगात नाही
भलतेच स्वप्न मी ही जपले मनात नाही
दिलदार वागण्याचे ठरले रिवाज होते
तुमचे स्वतंत्र होणे रुचले घरात नाही
निरखून पाहताना हसलाच चंद्र माझा
प्रतिबिंब आज त्याचे दिसले तळ्यात नाही
मज वाटलेच होते घडले तसेच सारे
मनसोक्त मी तरीही भिजलो दवात नाही
उगवेल सूर्य आता विझतील चंद्र तारे
धरतीस जाग आली उरलीच रात नाही
लिहिले अभंग काही सखये तुझ्याच साठी
म्हणतेस तू तरीही रचना सुरात नाही
करतो तुला विनंती समजून घे मला तू
सवता सुभा तुझाही उरला निवांत नाही
बरसात झेलण्याला असतो चकोर वेडा
पण तीच ओढ त्याने जपली मृगात नाही
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈