बा.भ.बोरकर
कवितेचा उत्सव
☆ सोस तू माझ्या जिवा रे ☆ बा.भ.बोरकर ☆
(बालकृष्ण भगवन्त बोरकर (30 नोव्हेम्बर 1910- 8 जुलाई 1984))
सोस तू माझ्या जिवा रे,सोसल्याचा सूर होतो,
सूर साधी ताल तेव्हा भार त्याचा दूर होतो.
दुःख देतो तोच दुःखी जाणता हे सत्य मोठे,
कीव ये दाटून पोटी दुःख तेणे होय थोटे.
या क्षमेने सोसले त्या अंत नाही पार नाही,
त्यामुळे दाटे फळी ती पोळणा-या ग्रीष्मदाही.
त्या क्षमेचा पुत्र तू हे ठेव चित्ती सर्वकाळी
शीग गाठी दाह तेव्हा वृष्टी होते पावसाळी.
त्या कृपेचे स्त्रोत पोटी घेऊनी आलास जन्मा,
साद त्यांना घालिता तू सूर तो येईल कामा.
फळी=फळात
शीग= कमाल मर्यादा
– बा.भ.बोरकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈