श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ साथ सोबत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
उंबरठा ओलांडून घरात येणं,
तुला सोप नव्हतं.
जसं,
उंबरठा तोडून घर सोडणं
मलाही अवघडच.
तुझं सोप अवघड झालं.
माझं अवघड सोप झालं.
जेंव्हा आपले अशक्त हात,
आपण हातात घेतले.
काळ समजून घेण्यासाठी,
एक नाळ तोडावी लागतेच नं अं.
…
दहा बाय आठच्या खोलीलाही
एक छोटी खिडकी होती.
भाड्याच्या घरातही,
चंद्राची मालकी होती.
…
तेंव्हा पाऊस कोसळायचा,
पाणी गळायचं..
भिंतीतून मनापर्यंत,
ओल झिरपायची.
…
जीवनकलहाची झळ होती,
तुटलेपणाची कळ होती.
थोडीथोडी गरिबी होती.
गरिबीतही श्रीमंती होती.
तुझी साथ समर्थ होती.
तुझी सोबत संपन्न होती.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈