सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ याला जीवन ऐसे नाव… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
☆
रोजचाच हा प्रवास, रोजची गर्दी,
सांग सखी, कार्यालयी पोचशील कधी?
*
तोच प्लॅटफॉर्म, तोच लेडिजचा डबा,
फर्स्ट क्लास, सेकंड क्लास फरक कोणता,
इंच इंच लढवूनी, प्रवेश ना तुला,
पाय ठेवण्यास देई, जागा ना कुणी,
सांग सखी, कार्यालयी पोचशील कशी?
रोजचाच हा प्रवास..
*
रोजच्या सरावाने, तरबेज तू जरी,
अंग आकसूनी, गर्दी भेदिसी खरी,
तसू-तसूने सरकूनी, तू आत घुसशी,
सीट मिळण्याची आशा, नाहीच मनी,
सांग सखी कामावर पोचशील कशी?
रोजचाच हा प्रवास…
*
वेळापत्रकानुसार गाड्या ना कधी,
रोजचीच रडगाणी ऐकेना कुणी,
कधी हसून, कधी चिडून, वैतागिसी,
रोज नव्या जोमाने, खिंड लढविसी,
सांग सखी, कार्यालयी, पोचतेस कशी!
रोजचाच हा प्रवास…
*
तुझ्या उत्साहाची दाद द्यावी ती कशी,
त्रास सारा साहुनिही, हसत राहसी,
हळदीकुंकू, केळवणं, करिसी साजरी,
स्नेहबंध जोडूनी तू, राखी टवटवी,
सांग सखी, किमया ही साधसी कशी?
*
रोजचाच हा प्रवास, रोजची गर्दी,
सांग सखी कार्यालयी पोचशील कधी?
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
दिनांक.. १९/०३/२०२५
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈