डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ निशानाथ गगनी… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मृच्छकटिक या संस्कृत नाटकात ‘उदयति हि शशाङ्‍कः’ असा एक अतिशय सुंदर श्लोक आहे. देवलांनी या नाटकाचे मराठी रूपांतर केल्यावर त्यात या श्लोकाचे ‘रजनीनाथ हा नभी उगवला’ हे अप्रतिम अजरामर गीत केले. मराठी नाट्यगीतात या पदाचे स्थान खूपच वरचे आहे. तरीही हा श्लोक वाचल्यावर माझ्यासारख्या भावगीतकाराला त्यावर भावगीत रचावेसे वाटले; अन् पुढील गीत साकारले.

संस्कृत श्लोक

उदयति हि शशाङ्कः कामिनीगण्डपाण्डुः

ग्रहगणपरिवारो राजमार्गप्रदीपः

तिमिरनिकरमध्ये रश्मयो यस्य गौराः

स्रुतजल इव पङ्के क्षीरधाराः पतन्ति॥

मृच्छकटिकम्- प्रथमाङ्कः।

भावगीत – निशानाथ गगनी

क्षितिजामागुन हळु डोकावी निशानाथ गगनी

रूपगर्विता  देई दर्शन पदरासी सारुनी

दीप भासतो राजपथीचा सजला नक्षत्रांनी

चंद्रकिरण जणु वर्षावत ये क्षीर पङ्ककूपनी ॥१॥

*

अरुण सारथी रविच्या संगे जाई मावळुनी

उषःप्रभेचा अस्त जाहला व्योमा काजळुनी

कातरवेळी संधीप्रकाशे  सृष्टी हिरमुसुनी

सडा शिंपला उत्साहाचा चांदण्यास शिंपुनी ॥२॥

*

सवे घेउनी प्रीतिदेवता शुक्राची चांदणी

काजळास घनघोर उजळवी चांदण्यास उधळुनी

निशासृष्टी निशिकान्त मोहवी चंद्रकिरणा पसरुनी ॥३॥

उधाण आले सागरराजा धुंद लहरी उसळुनी

*

वासरमणिच्या विरहाने सृष्टी उदास झाली

चंद्रचादणे क्षितिजावरती खुदकन गाली हंसली

निशाराणिचे स्वागत करण्या  कटिबद्ध होउनी

अंगांगातुन मुसमुसली चिंब भिजुनी चांदण्यातुनी ।४॥

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments