श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ आवेग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
कृष्णमेघ पावसाचे,
नभात जमले होते.
इतिवृत्त पावसाचे,
वार्यास ज्ञात होते.
बेबनाव पावसाचे,
पूर्वनियोजित होते.
अंदाज पावसाचे,
माझेच चुकले होते.
वाटेत एकटा मी,
अनभिज्ञ पुरता होतो.
गनिम पावसाने मज,
चाैफेर घेरले होते.
या थरारनाट्यांनी,
मी थिजून गेलो होतो.
आंधळ्या आवेगांनी,
चिंबचिंब भिजलो होतो.
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈