सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ नववर्ष — (एक शाश्वत सत्य) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
नववर्षाचा नवदिन आला, गतसालाचा निरोप घेऊन,
नवविचार अन् नवीन आशा, साजही मोहक किती हा लेवून ।।
जुने जाऊ द्या मरणालागून, हीच एक पळवाट असे,
आत्तापासून नवीन आशा– या वाटेने चालतसे ।।
जिथले तिथेच सगळे तरी हा, नवेपणाचा केवळ भास,
थकल्या जीवा नवी उभारी, जगण्याला ही नवीन आस ।।
काल नि आज नि उद्या असे हे, चक्रच नेमे फिरत असे,
नवे कोणते जुने कोणते, ठरवायाला सवड नसे ।।
काल मला तो काळ भेटला, म्हणे कशास्तव माझी गणना,
नव्या – जुन्याची नुसती गल्लत, शाश्वत सत्यही मनात जाणा ।।
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈