श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ मनातल्या मनात मी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
मनातल्या मनात मी मना तुलाच बोलतो
तुझ्यामुळे कितेकदा तुझाच मार्ग चालतो
जगायला जरूर ते हवे नको बघायचे
कवेत सूर्य घ्यावया उगा कशास नाचतो
कळेल का कधी मला तुझ्यात ला खुळेपणा
म्हणून मी इथे तिथे तुलाच रोज शोधतो
जगातली हरेकबाब नेमकी हवी तुला
असा कसा भिकार तू कुणास काय मागतो
गुलाम देह जाहला तुझ्या पुढे कधी कसा
बनून दास का तुझा तुझ्या पुढेच राबतो
गुन्हा मना नसे तुझाअसे तुलाच वाटते
सजा तुला मिळायची खुशाल देह भोगतो
निवांत शांत ही धरा निसर्ग खूप देखणा
सभोवताल केवढा तुला सुखात ठेवतो
इथेच देव नांदतो मिळून माणसात या
हवे नको असेल ते तुझे तुलाच दावतो
निवांत भेट तू तुला विचार प्रश्न सारखे
हळूच येवुनी तुला तुझाच देव भेटतो
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈