मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-8 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग- 8 ☆ श्री आनंदहरी

चार दिवस झाले आजोबा बागेत आले नाहीत तेंव्हा स्मार्त आणि अर्थ अस्वस्थ झाले.. गेले तीन-चार महिने आजोबा आले नाहीत असे कधीही झाले नव्हते.

“अर्थ, आजही आजोबा आले नाहीत. का आले नसतील? ते आजारी तर नसतील ना? की त्यांच्या सुनेने त्यांना गावी पाठवून दिले असेल? “

“गावी गेले असते तर आपल्याला भेटून, सांगून गेले असते. कदाचित बरे वाटत नसेल त्यांना म्हणून आले नसतील. ए, आपण त्यांच्या घरी जाऊया का त्यांना भेटायला? आपल्याला अचानक समोर पाहून त्यांना खूप आनंद होईल. “

“हो. आपल्याला त्यांची आठवण येते तशी त्यांना ही आपली आठवण येत असणारच..  चल जाऊया. “

“कुठं राहतात रे ते? त्यांचा पत्ता काय आहे? “

“मला नाही ठाऊक. मला वाटलं तुला असेल माहीत. “

“नाही रे मलाही नाही माहीत. कुठं आणि कसं शोधायचे त्यांना? “

“कुठूनही, कसेही शोधून काढले असते रे, पण आजोबांचं नाव ही नाही माहीत आपल्याला.. “

अर्थ आणि स्मार्त  रावसाहेबांनी वाट पाहत राहिले. रावसाहेब काही आले नाहीत.

स्मार्त, अर्थ दोघेही बागेत येतात. विटीदांडू खेळतात.. बराचवेळ रावसाहेब बसायचे तो बाक रिकामा असतो. रोजच खेळून झाल्यावर अर्थ, स्मार्त तिथे पूर्वीसारखेच त्या बाकावर विसावतात. दोघांच्यामध्ये रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू असतो.. ते दोघे एकमेकांशी गप्पा मारतात बहुतेकवेळा विषय आजोबांचा म्हणजेच रावसाहेबांचा असतो. ते दोघेही रावसाहेबांची वाट पाहत असतात.. आणि बहुदा विटी-दांडूही त्यांचीच वाट पाहत असणार..

‘किती वाजले रे?’ स्मार्त विचारतो, ‘सात वाजून गेले असतील ‘ अर्थ उत्तर देतो.. अर्थचा निरोप घेऊन स्मार्त आपल्या घरी परततो. रावसाहेबांनी दिलेला विटी दांडू घेऊन अर्थ ही आपल्या घरी जातो.. विटी खिशात असते तर आजोबांचं बोट धरावे तसा दांडू धरलेला असतो.

दुसऱ्या दिवशी ते दोघेही पुन्हा विटीदांडूने खेळायला येणारच असतात.. आणि आजोबांची म्हणजे रावसाहेबांची वाट ही पाहणारच असतात.

◆◆◆

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-7 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-7 ☆ श्री आनंदहरी

रात्री जेवणे झाल्यानंतर रावसाहेब आपली मोठी ट्रंक काढून बसले.. या ट्रंकमध्ये राधाबाईंनी मुलाच्या लहानपणाच्या खूप साऱ्या गोष्टी जपून ठेवल्या होत्या.

रावसाहेबांनी ती ट्रंक उघडली आणि त्यातील वस्तू पाहून ते त्यात स्वतःला हरवूनच बसले. एकेक वस्तू म्हणजे अनंत आठवणींचे पोळंच होतं. बराच वेळ ते पेटी उघडून बसले होते. मुलाने जेवायला हाक मारली तेंव्हा ते त्यातून भानावर आले. ट्रंक मध्ये तळाशी असणारी विटी आणि दांडू काढला आणि ट्रंक बंद करून जास्तानी ठेवून जेवायला गेले.

एका पिशवीत विटी-दांडू घेऊन ते बागेत गेले तेंव्हा स्मार्त आणि अर्थला स्मार्तच्या चेंडूने एकत्र खेळताना पाहून त्यांना बरे वाटले.. ते जाऊन नेहमीच्या बाकावर बसले. स्मार्तचे लक्ष त्यांच्याकडे गेले तसे दोघेही रावसाहेबांकडे गेले..

” आजोबा तुम्ही चला न आमच्यासोबत खेळायला.. “

” मी? “

“हो.. तिघे मिळून चेंडूने खेळू.. आज मी टेनिसचा चेंडू आणलाय कॅचने खेळण्यासाठी.. “

“मी पण तुमच्यासाठी गंमत आणलीय “

“आमच्यासाठी गंम्मत? दाखवा बघू आधी. “

स्मार्त आणि अर्थ ला केंव्हा एकदा गंम्मत पाहतोय असे झाले होते.

“हो दाखवतो.. पण त्याआधी हे घ्या “

“खडीसाखर ss ! मला खूप आवडते. माझे आजोबा आले की नेहमी देतात मला..  ते म्हणतात, ‘ चॉकलेट नको खात जाऊस.. त्यापेक्षा ही देशी खडीसाखर खात जा.. खूप चांगली असते’  ते असताना मी कधीच चॉकलेट खात नाही.. पण ते गावी गेले की…”

“बरोबरच आहे आजोबांचं. आता मी आहे ना.. आता रोज खडीसाखर खायची.  आणि ही बघा गंमत विटी-दांडू. “

“पण आजोबा, आम्हांला नाही खेळायला येत विटीदांडू “

दोघेही विटीदांडू पाहून खुश झाले पण दुसऱ्याच क्षणी उदास होत म्हणाले.

“अरे, उदास कशाला होताय.. मी शिकविन ना. “

रावसाहेबांच्या वाक्याने त्यांच्या चेहंऱ्यावरची उदासीनता एका क्षणात नाहीशी झाली. रावसाहेबांना त्यांचे बालपण आठवले. त्यांच्या धाकट्या चुलत्यांनी त्यांना पहिला विटी-दांडू आणून दिला होता आणि शिकवलाही होता. सुरवातीला त्यांना विट्टी टिपता यायची नाही, नंतर दूर जायची नाही.. पण पुन्हा पुन्हा ते चांगले खेळू लागले.. कधी कधी पोरांचा खेळ थांबवून चुलते आणि त्यांचे मित्र विटी-दांडू खेळायचे. चुलते म्हणायचे, ‘दांडू  म्हणजे सुखाचे, धीराचे, आणि धाडसाचेच प्रतीक असते आणि विटी म्हणजे दुःखाचे,  अडचणीचे, संकटाचेच प्रतीक असते.. सुखाने दुःखाला दूर कोलायचे असते.. विटी सतत दांडूला म्हणजे सुखाला टिपायचा प्रयत्न करीत असते.. तिने टिपू नये यासाठीच तिला तडाखा देऊन दूर पिटाळायचे.. हेच धीर आणि अडचणी, धाडस आणि संकट याबाबतही असते ‘

चुलत्यांचे सांगणे त्यावेळी रावसाहेब लहान असल्याने त्यांना उमजले नव्हते पण त्यांचे ते शब्द मात्र मनात पेरले गेले होते.. नंतर कळू लागल्यावर विटी-दांडूचा खरा खेळ त्यांना समजू लागला होता. विटी-दांडूचा खेळ स्मार्त आणि अर्थला शिकवताना. ताना त्यांनी तोच मुद्दा स्पोप्या शब्दांत सांगितला होता.

रावसाहेब, स्मार्त, अर्थ आणि विटीदांडू अशी एक टीमच झाली होती. रावसाहेब त्याच्याएवढे होऊन त्यांच्याशी खेळत होते.. दिवसभर त्यांचे मन संध्याकाळची वाट पहात होते, गावची आठवण येत होती, नाही असे नाही पण आताशा तिथं रमतही होते.

खेळ खेळून झाल्यावर खडीसाखर आणि मग स्मार्त-अर्थ च्या हट्टाखातर गावाकडच्या, लहानपणीच्या गोष्टी. ते तर स्मार्त, अर्थचे आजोबा- मित्र झाले होते.  राधाबाईं गेल्यानंतर एकाकी झालेल्या त्यांच्या मनाला, जगण्याला, आयुष्यात आलेल्या या अनपेक्षित नव्या वळणाने सावरायला मदतच केली होती. खरेतर रावसाहेब, स्मार्त आणि अर्थ वेगवेगळ्या कारणाने, अर्थाने एकटेच होते, एकाकीच होते.. पण ते एकटेपण आता उरलं नव्हतं.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-6 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-6 ☆ श्री आनंदहरी

‘मssम्मी’ म्हणून छोट्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला तसे रावसाहेब विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. त्यांचे लक्ष रडण्याच्या आवाजाच्या दिशेने गेले.. एक मुलगा चेंडूने खेळता खेळता पडला होता. ते बाकावरून झटकन उठले आणि त्या रडणाऱ्या मुलाकडे गेले. तोवर एक त्या पडलेल्या मुलाच्याच वयाचा एक मुलगा दुसरीकडून धावत आला होता.

“कसा पडलास? बघू कुठं लागलंय?”

त्या मुलाकडे अविश्वासाने, संशयाने पहात त्याने उठण्यासाठी पुढे केलेला हात न घेता पडलेला मुलगा आणखीनच रडू लागला होता. रावसाहेब त्याच्या जवळ गेले. गुडघ्याला थोडेसे खरचटले होते.

“अरे, एवढा मोठा शूरवीर  मुलगा तू.. आणि एवढंसं लागलंय आणि रडतोस?”

पडलेला मुलगा त्यांच्याकडेही अविश्वासाने आणि संशयाने पाहू लागला होता. 

“तुला सांगतो माझ्या आईला एक जादूचा मंत्र येत होता… “

रावसाहेबांच्या वाक्क्याने ती दोन्ही मुले त्यांच्याकडे आश्चर्याने आणि उत्सुकतेने पाहू लागली तसे ते म्हणाले,

“लहानपणी आम्ही भावंडे खेळताना धडपडलो, पडलो की आम्हीसुद्धा असेच रडत होतो.. मग आई धावत यायची आणि म्हणायची ‘ खूप दुखतंय ना? थांब हं.. मी जादूने दुखणे गायब करते…’अल्लामत्तीर कोल्लामत्तीर छु ss!’  हा जादूचा मंत्र म्हणून  लागलेल्या ठिकाणी हळुवार फुंकर मारायची…”

“मग.. ? “

रडणे विसरून  पडलेल्या मुलाने विचारले.

“मग काय.. आईच्या जादूच्या मंत्राने दुखणे छु मंतर व्हायचे.. “

“अशी कुठे जादू असते का? “

“असते.. आईजवळ असतेच…पण आपल्यावर माया करणाऱ्या प्रत्येकाजवळही असते. थांब हं!”

रावसाहेबांनी ‘अल्लामत्तीर कोल्लामत्तीर….’ म्हणून त्या मुलाच्या जखमेवर हळूच फुंकर मारली.  फुंकरीने त्याला बरं वाटले.

“आत्ता उठ आणि आपण हळूहळू चालत जाऊन बाकावर बसुया थोडावेळ.. आणखी बरं वाटेल “

“हो चल, मी ही येतो”

पडल्यावर मदतीसाठी धावत आलेला मुलगा उठण्यासाठी त्याच्यापुढं हात करत म्हणाला.

“नाही…”

पडलेला मुलगा अविश्वासाने, संशयाने रावसाहेबांकडे आणि दुसऱ्या मुलांकडे पहात म्हणाला.

“का रे? “

“आईने सांगितलंय अनोळखी माणसांशी बोलायचे नाही, त्यांच्याबरोबर कुठं जायचं नाही. अनोळखी मुलांबरोबर खेळायचे नाही. “

“आईचे बरोबरच आहे पण आपण अनोळखी कुठं आहोत? काही दिवस तर आपण पाहतोय ना एकमेकांना?”

त्याचे बोलणे ऐकून काहीसे आश्चर्य वाटलेले रावसाहेब म्हणाले.

“हो पाहतोय.. आजोबा, तुम्ही तिथं बाकावर बसलेले असता आणि मी इथं एकटा खेळत असतो. पण आपली ओळख कुठं आहे? “

“ते ही खरंच आहे म्हणा.. आयुष्यभर एकत्र राहूनही बऱ्याचदा आपण ओळखू शकत नाही मग चार दिवस पाहिल्याने कसे ओळखणार? “

रावसाहेब स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणाले.

“काय म्हणालात?  “

“काही नाही रे.. हुशार आहेस तू खूप.. तुझे नाव काय रे? “

“स्मार्त. “

“खूप छान आहे नाव… आणि तुझे रे? “

“अर्थ. “

“व्वा ! तुझेही चांगले आहे नाव. स्मार्त, तू आजोबा म्हणालास ना? मग आजोबांशी वेगळी ओळख कशाला लागते रे? चल, थोडा वेळ बाकावर बसूया. तुला बरं वाटेल.. मग पुन्हा खेळ. चल उठ बरं ! अर्थ, हात दे रे त्याला. “

रावसाहेब म्हणताच काहीशा द्विधा मनःस्थितीतच स्मार्त अर्थच्या हाताचा आधार घेत उठला आणि त्यांच्यासोबतच पण मनात काहीसा संशय बाळगून सावधसा बसला.

“अर्थ, तू का खेळत नव्हतास? “

“माझ्याकडे खेळायला काहीच नाही. “

“अरे मग स्मार्त बरोबर खेळायचे?”

“नाही.. माझ्या आईने अनोळखी मुलांबरोबर खेळायचे नाही म्हणून सांगितलंय.. “

स्वतःचा चेंडू पोटाशी घट्ट धरत स्मार्त म्हणाला.

रावसाहेब हसले.

“अरे पण अर्थ आता अनोळखी कुठं राहिलाय? तू पडलास तेंव्हा मदतीसाठी तो धावत आला. तुला उठायला हात दिला. तुझा हात हातात घेऊन तुझी काळजी घेत हळूहळू इथंपर्यंत घेऊन आला. मदतीला धावणारी, काळजी घेणारी अनोळखी कुठं असतात?  तुम्ही दोघे तर आता मित्रच झालात. “

“आजोबा, तुम्ही तर माझ्या आजोबांसारखेच बोलता. “

स्मार्त रावसाहेबांना म्हणाला.

“अरे आजोबाचं आहे मी तुमचा.. आणि काय रे तुझे आजोबा बागेत येत नाहीत.. ?

“ते गावी असतात. एकटे एकटेच राहतात. मला खूप आवडतात ते.. ते कधी कधी येतात.. माझ्याशी खेळतात, मला छान छान गोष्टी सांगतात.. मला तर ते इथंच राहावेत असे वाटतं..  पण ते आले कि थोड्याच दिवसात आई बाबांना म्हणते, ‘ त्यांना काहीही कळत नाही.. ते गावीच असलेले बरे.. माझ्या स्मार्त वर गावाकडचे संस्कार नकोत व्हायला.. ‘ मग एक-दोन दिवसातच ते गावी निघून जातात.. मला त्यांची खूप आठवण येते हो.. “

“बरं झालं मला आजोबा नाहीत ते.. नाहीतर माझ्याही आईने त्यांना असंच गावी पाठवलं असतं कदाचित.. “

रावसाहेब स्मार्त व अर्थला जवळ घेतात.. त्यांच्या केसांवरून हात फिरवतात. स्वतःशीच पुटपुटतात.

“इथं राहून दुर्लक्षित, एकटे एकटे राहण्यापेक्षा गावी एकटे राहिलेले बरेच की.. “

“आजोबा, काही म्हणालात काय? “

“अरे, काही नाही रे.. म्हणले मला शिकवशील का तुझे खेळ? “

“आजोsबा  ! तुम्हांला क्रिकेट नाही येत खेळायला? “

आश्चर्य वाटून स्मार्त व अर्थ एकाच वेळी म्हणाले.

“नाही रे येत ! “

“मग तुम्ही लहान असताना काय खेळत होता? “

“आम्ही विटीदांडू, आट्यापाट्या, कबड्डी, खो खो  असे खूप खेळ खेळत होतो.. तुम्हांला विटीदांडू येतो का रे खेळायला?

“नाही “

“अरे मी तर माझा मुलगा लहान असताना त्याच्यासाठी सुताराकडून तीन विट्या आणि दांडू करून घेतला होता.  दोन विट्या हरवल्या पण मी तो विटीदांडू त्याच्या बालपणाची आठवण म्हणून अजून जपून ठेवली आहे.. “

“आजोबा, माझे आजोबाही खूपदा सांगत असतात, विटीदांडू खेळबद्दल.. तुम्ही उद्या आणाल का तो विटीदांडू? “

“हो.. आणीनही आणि तुम्हाला शिकवीनही..

पण चला आता घरी आई वाट पाहत असेल. “

“आजोबा, किती वाजले? “

“सात.. का रे?”

“अरे बाप रे! सात?  आजोबा पळतो मी.. आईने सांगितलंय सात ला घरात आला नाहीस तर पुन्हा खेळायला जायला परवानगी देणार नाही.. जातो मी.. बाय आजोबा, बाय अर्थ.. “

“सावकाश जा रे.. ! अर्थ तू ही सावकाश जा घरी.. “

“हो आजोबा, बाय ! “

स्मार्त आणि अर्थ घरी गेले तरी रावसाहेब बराचवेळ बाकावरच बसून होते.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-5 ☆ श्री आनंदहरी

सहा महिन्यांपूर्वी राधाबाई रावसाहेबांची अर्धांगिनी वारली. गावाकडे रावसाहेव एकटेच जगत होते. घरा-दारात सर्वत्र राधाबाईंच्या आठवणी वावरत होत्या. . त्या आठवणीसोबतच राहिलेले आयुष्य त्यांना काढायचे होते. मुलगा सोबत घेऊन जाण्यासाठी आला तेंव्हा त्यांना राधाबाईंच्या आठवणींनी भरलेले ते सोडून जायची इच्छा नव्हती पण त्यांचा मुलगा त्यांना तिथे एकटं सोडायला तयार नव्हता.

‘बाबा, आजवर खूप ऐकले तुमचे पण आता नाही. मी काही तुम्हाला एकटे सोडणार नाही इथं… तुम्हांला आमच्यासोबतच राहावे लागेल.’

असे मायेने, काळजीने निक्षून सांगून मुलाने त्यांना आपल्यासोबत आणलेले होते…

पदपथावरून चालता चालता नेहमीप्रमाणेच रावसाहेबांना मुलाचे वाक्य आठवले आणि ‘सोबत’ हा शब्द आठवताच त्यांच्या चेहऱ्यावर उदास हसू तरळुन गेले.

‘सोबत’ याचा अर्थ तरी कळतोय काय त्याला. . ? एकाच छताखाली राहणे म्हणजे सोबत नसते. . त्यांच्या मनात आले आणि त्यांना राधाबाईंची आठवण आली. राधाबाई म्हणाल्या असत्या, ‘अहो, काळ बदललाय.. त्यांचे सगळे राहणीमान बदललंय.. त्यांचे विचार, त्यांच्या सुखाच्या व्याख्या बदलल्यात.. आपण त्यांना समजून घ्यायला नको का?’ 

राधाबाईंचे दुसऱ्याला समजून घेणे  हे नेहमीचेच होते. आधी सासू-सासऱ्यांच्या पिढीला समजून घेतले आणि नंतर सून-मुलाच्या पिढीला. मुलगा जेंव्हा त्याच्याच आयटी क्षेत्रातील  मुलीशी लग्न करतो म्हणाला तेंव्हा रावसाहेबांना वाटले होते राधाबाई काहीसा विरोध करतील पण त्या मुलाला म्हणाल्या होत्या..

‘तुला करावेसे वाटतंय ना मग कर.. कधीतरी वर्षा-सहा महिन्यातून तिला घेऊन चार दिवस इकडे येत जा म्हणजे झाले. आपले गाव, आपले घर, आपली माणसे आपली वाटली पाहिजेत रे…!’  आणि नंतर रावसाहेबांना म्हणाल्या होत्या. ‘आपणच त्यांना समजून घ्यायला नको का?’ 

राधाबाईंचे सगळेच त्यांना पटत होते पण तरीही अलीकडे त्यांच्या मनात उलट सुलट विचार येत होते.

मुलगा हुशार होता. त्याने खूप शिकावे असे त्यांना वाटत होते. . त्यांच्या इच्छेप्रमाणे मुलगा शिकला होता. इंजिनीअर झाला. स्वतःच्या पायावर उभा राहिला. आयटी क्षेत्रात नोकरीही करत होता.  त्यांनी आयुष्यात कधी कल्पनाही केली नव्हती एवढा मोठा पगार त्याला मिळत होता. या साऱ्याचा त्यांना खूप अभिमान होता. पण आज मात्र त्यांच्या मनात खूप वेगळे विचार येऊ लागले होते.. आपण त्याच्या मनात अशा मोठमोठ्या इच्छा, आकांक्षा पेरण्यात चूक तर केली नाही ना? आज मुलगा-सून जे जगतायत त्याला का जीवन म्हणायचे ?  सकाळी जातात ते रात्री कधीही येतात, त्यातही येण्याची निश्चित अशी वेळ नाहीच. ‘दोन डोळे शेजारी आणि भेट नाही संसारी ! ‘म्हणतात तसे यांचे जीवन. एखाद्या मशीन सारखे नव्हे तर अलीकडे रोबोट का काय म्हणतात तसे ते जगतायत. . अगदीच यंत्रमानव होऊन गेलेत. . हे सारे आपल्या संस्काराचेच; खूप शिकावे, मोठे व्हावे या इच्छेचेच फळ आहे काय?

मुलाच्या लग्नानंतर त्याने टू बीएचके फ्लॅट घेतला तेंव्हा राधाबाई सुनेला म्हणाल्या होत्या. . ‘आता नातवंड खेळू दे आमच्या मांडीवर..’ तेंव्हा सून म्हणाली होती, ‘आई, आमचे ठरलंय, कमीतकमी नवा थ्री बीएचके फ्लॅट घेतल्याशिवाय मुलाचा विचार करायचा नाही.. त्याला सगळी सुखे द्यायची आहेत आम्हांला..’ एक स्वप्न पूर्ण झाले की त्याचा आनंद मिळवत राहण्याआधीच पुढच्या मोठ्या स्वप्नाकडे धावायला सुरवात करायची हे का जीवन आहे?

पस्तिशीला आले तरीही अजून मुलाचा विचारही करायला तयार नाहीत ते. . याला काय म्हणायचे?

गेल्या काही दिवसांच्या सवयीने रावसाहेब बागेत येऊन नेहमीच्या बाकावर येऊन बसले तरी त्यांच्या मनातील विचारांचे, आठवणींचे वादळ शमले नव्हते.

राधाबाई गेल्यानंतर ते मुलांसोबत आले होते पण त्यांचे एकाकीपण संपले नव्हते. इथं मुलगा आणि सून स्वतःच्या नोकरीत एवढे व्यस्त होते की त्यांना एकमेकांशी बोलालयलाही वेळ मिळत नव्हता. एखाद्या धर्मशाळेत अनोळखी पांथस्थ मुक्कामाला उतरावेत आणि त्यांच्या जेवढे आणि जसे बोलणे व्हावे तसे किंबहुना त्याहूनही कमीच बोलणे एकमेकांत होत होते. . निवांत बसून एकमेकांशी गप्पा मारणे हा प्रकारच नव्हता. गावाकडे आयुष्य घालवलेल्या रावसाहेबांना ते प्रकर्षाने जाणवत होते, त्या साऱ्याची उणीव जाणवत होती. तशी मुलगा-सून अगदी आपुलकीने, आपलेपणाने जाता येत त्यांची चौकशी करीत होते, त्यांना हवे-नको ते पाहत होते, नाही असे नाही पण गावाकडल्यांसारखा मोकळा वेळ त्यांच्याकडे नव्हता आणि रावसाहेबांकडे न सरणारा मोकळा वेळच वेळ होता. गावाकडे समोरून जाणा-येणारा कितीही घाई-गडबडीत असला तरी हटकून थांबतो. . हाक मारून दोन शब्द बोलून मगच पुढे जातो. . तसला काही प्रकार इथे नव्हता आणि या साऱ्यामुळेच रावसाहेबांचे मन इथं रुजलेंच नव्हते. . त्यांच्या सोबत इथं येऊनही ते काही दिवसातच गावाकडे परतले होते.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

गेल्या काही वर्षात आधीच अनोळखी व्यक्तीबद्दल माणसाच्या मनात काहीशी साशंकता निर्माण केली होती. . कोरोनाने ओळखीच्या व्यक्तीबाबतही साशंकता निर्माण केली. घरांच्या दारे-खिडक्याआधीच मनांच्या दारे-खिडक्या बंद झाल्या. घरात ही सुरक्षित अंतर पाहिले जाऊ लागले. अपवाद वगळता माणसाची स्वयं-केंद्रितता वाढली. कोरोनाने सारे जनजीवनच उध्वस्त करून टाकले होते. 

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बऱ्याचअंशी सुरळीत होता पण तरीही भविष्यातील अनिश्चितता मनाला ग्रासत राहिल्याने संग्राहक वृत्ती वाढली होती. सारी कामे ठप्प झाल्याने हातावरती पोट असणाऱ्यांची उपासमार सुरू झाली होती. . मदतीचे हात होते पण ते ही कमी पडत होते. आभाळच फाटल्यावर ठिगळ तरी कुठं कुठं आणि कसे लावायचे? असे वाटण्यासारखी सारी परिस्थिती निर्माण झाली होती.

काळजी घेणे आणि काळजी करणे हातात हात घालून क्षणोक्षणी प्रवास करत होते. कुणी काही सांगत होते, कुणी काही सुचवत होते.. सूचनांचा तर भडिमार चाललेला होता.. काही पटत होते, काही पटत नव्हते तरीही सारे भीतीपोटी अमलात आणले जात होते. . अवघ्या भवतालात अशाश्वततेचे भय दाटून राहिलेले होते. कोरोना झालाय या भीतीनेच माणसाचे धैर्य खच्ची होत होते.. अचानक अकल्पित बातम्या येत होत्या.. असे काही होईल असे ध्यानी-मनी नसताना नात्यातील, परिचितांतील, माहितीतील व्यक्ती कोरोनाने जग सोडून जात होत्या. हे धक्के पचवणे ही अतिशय अवघड होत होते. फक्त दुरध्वनीनेच दुरच्याच नव्हे तर जवळपासच्या, रोज भेटणाऱ्या शेजारच्याशीही संपर्क होत होता. संवाद होत होता नाही असे नाही पण मन भरत नव्हते. खरंतर व्यक्ती व्यक्तीकडे मोबाईल आल्यापासून चार पावलांवरील शेजाऱ्यांशीही आवर्जून समक्ष भेटणे बऱ्याचअंशी कमीच झालेले होते पण कोरोनामुळे निर्बंध आल्यावर मात्र ती जाणीव आणि प्रत्यक्ष भेटायची, जाण्या-येण्याची उर्मी वाढली होती.

इतरवेळी चार चार दिवस फोन न करणारा मुलगा आणि सून कोरोनाची साथ आल्यापासून आणि प्रामुख्याने निर्बंध  लागू झाल्यापासून रोज एकदा, कधीकधी दोनदाही फोन करून रावसाहेबांची आणि राधाबाईंशी चौकशी करीत होते. त्यामुळे त्या दोघांनाही त्यांची ख्याली-खुशाली कळत होती.

कधी कधी रावसाहेबांच्या मनाला प्रश्न पडायचा… ‘कोरोनामुळे, निर्बंधांमुळे माणसे दुरावली की जवळ आली?  मुलाच्या अपार्टमेंट मध्ये कोरोनाचे पेशंट सापडले.. अपार्टमेंट सील केले गेले. हे कळल्यापासून रावसाहेबांना आणि राधाबाईंना मुलाची आणि सुनेची जास्तच काळजी वाटू लागली होती. दिवसातून एकदा होणारा फोन दोनदा, तीनदा होऊ लागला होता.

दिवस पुढे सरकत होते. . वृत्तपत्रे, टीव्ही सगळीकडे कोरोनाच्याच बातम्या. माणसाच्या मनामधील भीती अधिकाधिक वाढत होती. रावसाहेब आणि राधाबाईंचे स्वतःच्या मनातील भीती लपवत दुसऱ्याला धीर देणे चालू होते. एकेदिवशी राधाबाईंना किंचितसा ताप आला पण त्यांनी ते रावसाहेबांना कळू दिले नाही. एकट्याच मनातील नाना शंका-कुशंकांना तोंड देत वावरत होत्या., दुसऱ्या दिवशी ताप वाढला आणि खोकला ही येऊ लागला तेंव्हा रावसाहेबांच्या लक्षात आले तेंव्हा त्यांनी गावातल्या नेहमीच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरनी नेहमीच्याच स्वरात ‘ काही काळजी करण्यासारखे नाही. . हवामान बदलाचा परिणाम असणार. . पण आपल्या मनात शंका नको म्हणून  कोरोनाची टेस्ट करूया. . ‘ असे धीर देत सांगितले. रावसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली पण त्यांनी राधाबाईंना धीर देत साथ आहे म्हणून टेस्ट करूया म्हणून सांगितले. ‘ डॉक्टरनी फोनवरूनच पाठवलेली औषधांची यादी औषधाच्या दुकानातून घरपोच मागवली.

राधाबाईंना कोरोनाची लागण झाल्याचे टेस्टमध्ये निष्पन्न झाले. तालुक्याच्या कोविड सेंटरची अँब्युलन्स त्यांना घेऊन गेली. जाताना राधाबाईंच्या मनावरचे दडपण चेहऱ्यावरती दिसत होते. रावसाहेब त्यांना धीर  देत होते. आपलीही टेस्ट पॉझिटिव्ह यायला हवी होती असे रावसाहेबांना वाटले. .  इतर कोणता आजार असता तर बरे झाले असते दवाखान्यात सोबत तरी जाता आले असते, राहता आले असते असे रावसाहेबांना वाटत होते.  दोन दिवसातच राधाबाई गेल्या. रावसाहेबांना कळवण्यात आले. मुलाला कळवले पण त्याला येता आले नाही. रावसाहेबांनाही अंत्यदर्शन मिळाले नाही. फक्त त्यांना दूर अंतरावर उपस्थित राहता आले.  राधाबाईंच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. रावसाहेब एकाकी झाले, सुन्न झाले. मुलाचा फोन येत होता पण कुणी कुणाचे आणि कोणत्या शब्दांत सांत्वन करायचे? गावातील लोक, शेजारी भले होते. . पण आजारच असला प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करणारा. . रावसाहेबांनी कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह होती तरी ते आपल्यापासून कुणाला त्रास नको म्हणून दूर रहात होते. शेजारी आले तरी खिडकीतून बोलत होते. शेजारी मात्र त्यांची काळजी घेत होते. चहा- नाश्ता, जेवण देत होते. रावसाहेब एकाकी जगत होते. . काळ जाईल तसे सावरले जात होते.

विशेष बाब म्हणून काही अटींवर पोलीस खात्याकडून  प्रवास करायला परवानगी द्यायला सुरुवात झाली. तेंव्हा मात्र तशी परवानगी काढून मुलगा आला आणि रावसाहेबांना घेऊन गेला. . हळूहळू कोरोनाची साथ आटोक्यात आली. निर्बंध शिथिल होत जनजीवन सामान्य होऊ लागले तरीही प्रत्येकाच्या मनात नकळत काहीशी भीती होतीच पण काहींनी आपल्या स्वकीयांना गमावले होते. . त्याचे दुःख त्यांना होतेच पण सर्वत्र बंधमुक्ततेचा आनंद आणि उत्साह होता. कोरोनाच्या या महाभयंकर वाटणाऱ्या साथीतही आपण सहीसलामत राहिलो, वाचलो. . याचा अनेकांना आनंद झाला होता.  

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

रावसाहेब निवृत्त होऊन फंड-ग्रॅज्युईटीची रक्कम मिळून, निवृत्तिवेतन सुरू होईपर्यंत वर्ष कसे सरले हे समजलेच नाही. निवृत्तीनंतरही सारी कामे सुरळीत पार पडली तसे रावसाहेब, राधाबाई निवांत झाले. त्यांनी मुलाशी चर्चा करून एका चांगल्या यात्राकंपपनीची एक महिन्यानंतर निघणारी उत्तर भारताची सहल निवडली. त्याचे पैसे भरले. दोघेही रोज निवांत वेळी सहलीचीच चर्चा करू लागले. राधाबाईंनी तर सहलीची तयारीही सुरू करायला घेतली तसे रावसाहेब हसले.

” अगं, अजून जवळजवळ महिना आहे. आत्तापासून काय तयारी करतेस? आदल्यादिवशी बॅग भरायची आणि निघायचे. . “

” तुम्ही बॅग भरणार, ? उजेड. . अहो, एकदोन दिवसासाठी तुम्ही कुठं जाणार असला तरी अजूनही मला बॅग भरून हातात द्यावी लागते. . “

राधाबाई हसत म्हणाल्या,

” तू कधी काही करू दिलंयस का मला. . ? तू आल्यापासून सवयच नाही राहिलेली काही काम करायची…नुसता लाडाऊन ठेवले आहेस मला?”

” कशाला काय करू द्यायचे तुम्हांला? एक काम धड कराल तर शप्पथ ! तेच काम मला दुसऱ्यांदा करावे लागणार असेल तर मग तुम्हांला करायला सांगूनही काय फायदा. . त्यापेक्षा आधीच मी केलेलं बरे नाही का? “

खाली मान घालून काम करत करता राधाबाई म्हणाल्या आणि त्यांनी रावसाहेबांकडे पाहिले. . ते काहीसे गंभीर झाल्यासारखे दिसले तसे त्या हसत हसत म्हणाल्या, उगा माझ्या लाडोबाला कशाला त्रास? “

आणि रावसाहेबांकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाल्या,

” हो की नाही रे लाडोबा. . ?”

रावसाहेबांच्या चेहऱ्यावर हसू तरळले. आपण बोलता बोलता नवऱ्याला एकेरी बोललो हे जाणवताच राधाबाईंनी जीभ चावली.

” हळूच. . नाहीतर मला आळणी खावे लागेल? “

” म्हणजे? “

मध्येच आळणी खाण्याचा विषय रावसाहेबांनी  कुठून काढला? हे न समजून राधाबाईंनी विचारले.

” अगं, जीभ जोरात चावलीस तर तुझ्या तोंडाला तिखट लागू देणार नाही पण त्याची शिक्षा बिचाऱ्या  माझ्या जिभेला नाही का मिळणार? “

आपण नकळत एकेरी बोलून गेलो ते रावसाहेबांच्याही लक्षात आलंय हे पाहून राधाबाईनी लाजून खाली मान घातली. त्यांचे लाजणे पाहून रावसाहेब सुखावले. . क्षणभर त्यांच्याकडे पहातच राहिले. . रावसाहेब गप्प झाल्याचे पाहून राधाबाईंनी चमकून वर पाहिले तर रावसाहेबांच्या डोळ्यांत मिश्किलता तरळत होती. . राधाबाई पाहतायत हे पाहून हसत हसत रावसाहेब म्हणाले,

” तशीही तुझी चव जिभेला आवडतेच माझ्या. . आता इतकी वर्षे झाली पण  आवड काही कमी  झालेली नाही. . . . “

रावसाहेबांचे बोलणे ऐकून काहीशा लटक्या रागाने राधाबाई म्हणाल्या,

” चावटपणा पुरे हं… !”

” अगं, चावटपणा काय केला मी. . . तुझ्या हातच्या जेवणाबद्दल म्हणतोय. “

” कळलं हं कळलं. . कहीपे निगाहे. . आणि तुम्हांला मी काही आज ओळखत नाही म्हणलं. बस झाल्या गप्पा. आता जावा बघू आत. काल वाचनालयातून आणलेलं पुस्तक तुमची वाट बघत असेल. मला माझी कामे करू देत जरा. . ” 

रावसाहेब हसत हसत बाहेरच्या खोलीत गेले. पाठमोऱ्या रावसाहेबांकडे पाहत राधाबाईंच्या मनात आले. . ‘ अजूनही यांच्यात खोडकर, खेळकर बालक लपलेला आहे… असा नवरा मला मिळालाय ते माझे भाग्यच…’

सहलीला जायचा दिवस जवळ जवळ येऊ लागला तसे राधाबाईंच्या मनातील अवस्थता वाढत चालली होती. कधी अशा दूरच्या आणि इतक्या दिवसांच्या सहलीला त्या गेल्याच नव्हत्या. ‘सहल नीट पार पडेल ना?’ त्यांना उगाचच धाकधूक लागून राहिली होती. रावसाहेबांना ते जाणवले तसे ते म्हणाले,

” अगं, तुझी खूप इच्छा होती ना सहलीला जायची. आजवर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जायला कधी जमलंच नाही.  आता जमतंय, निघालोय तर त्याचा आनंद होण्याऐवजी तू तर काळजीच करत बसलीयस. . “

” तसे नव्हे हो. . “

” अगं, आपण दोघेच का निघालोय काळजी वाटायला. यात्रा कंपनीतून जातोय, खूप लोक असतात. . अगदी ऐंशीच्या घरातलेही असतात… उगा नको काही विचार करुस.. तिथे यात्रेकरूंची काळजी घेणारे कंपनीचे लोकही असतात. .  काळजी सोड आणि आपल्याला जायला मिळतंय, आपण जातोय याचा आनंद घे. “

” तरी पण…”

” राधे, आता हे काय वय आहे का गं ‘पण’ लावायचं? जेव्हा ‘पण’ लावायचा तेंव्हा बिनबोभाट प्रेमाने माळ घातलीस. . . . हां पण तेव्हा तुझा कोणताही  ‘पण ‘ असता तर मी जिंकलोच असतो बरं का?. .   “

रावसाहेब हसत म्हणाले तसे राधाबाई काहीशा खुलल्या आणि निर्धास्त झाल्या. किती दिवसांनी त्यांनी ‘ राधे ‘ म्हणून संबोधले होते. त्यांचे ते’राधे’ ऐकून त्यांना पूर्वीचे दिवस आठवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर मंदसे स्मित झळकले. राधाबाई खुललेल्या पाहून रावसाहेबांना बरे वाटले.

सहलीची सारी तयारी झाली होती. . चारपाच दिवसांनी पुण्याला जायचे आणि तिथून यात्राकंपनीसोबत उत्तर भारताची यात्रा. मन प्रसन्न झाले होते. कितीक दिवसांचे स्वप्न पूर्ण होणार होते. तशा काही दिवसांपासून कोरोनाच्या बातम्या यायला सुरुवात झाली होती पण भारतातील जनजीवन सुरळीत होते.  शेजारचा बंडू दहावीच्या परीक्षेला बसला होता. रोज पेपरला जाण्याआधी तो नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला यायचा. राधाबाई जाताना त्याच्या हातावर दहीसाखर ठेऊन आशीर्वाद द्यायच्या. त्याचा शेवटचा भूगोलाचा पेपर. राधाबाईंनी वाटीत दहीसाखर तयारच ठेवले होते. रावसाहेब त्याची हॉल मध्ये वाटच पाहत होते. बंडूची येण्याची रोजची वेळ टळून गेली तसे दोघेही अस्वस्थ झाले. ‘ का आला नाही बंडू अजून? ‘ दोघांच्याही मनाला काळजी  पोखरू लागली.

” अहो, बंडू का आला नाही अजून? त्याचा आज शेवटचा पेपर आहे. जरा हाक मारून बघता का? “

रावसाहेबांनी बंडूला हाक मारली तसे त्याचे बाबाच बाहेर आले. रावसाहेबांनी बंडू न आल्याबद्दल विचारताच ते म्हणाले,

” अहो काका, त्याचा पेपर रद्द झालाय. संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झालंय.  बातम्या ऐकल्या नाहीत वाटते तुम्ही? अहो सगळेच बंद. बाहेर पडायचेच नाही घरातून. कोरोनाचे पेशंट वाढायला लागलेत. “

बराच वेळ  बंडूचे बाबा माहिती सांगत होते. रावसाहेब, राधाबाई अस्वस्थ होऊन सारे ऐकत होते.

नेमकं काय झालंय? नेमकं काय घडतंय? काहीच समजत नव्हते. एक प्रकारची अस्थिरता, स्तब्धता, अनिश्चितता आणि अनामिक भय जगण्याला ग्रासून गेले होते.  संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू झाले. सारेच व्यवहार, व्यापार बंद होते. अत्यावश्यक कारण वगळता घरातून बाहेर पडायला बंदी होती. सारे जनजीवनच ठप्प झाले होते.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-2 ☆ श्री आनंदहरी

रावसाहेब म्हणजे सरळमार्गी माणूस. आयुष्यभर नोकरी एके नोकरी केली. आधी वयस्कर आई-वडीलांची सेवा आणि नंतर उशिरा झालेल्या एकुलत्या-एक मुलाचे शिक्षण या साऱ्यांमुळे  स्वतःसाठी, बायकोसाठी असा वेळ देणे जमलेच नाही. . कधी  कुठे जाणे-येणे, फिरणे, सहलीला जाणे जमलेच नव्हते. मुलगा हुशार, चांगला शिकला, आयटी मध्ये चांगल्या पगाराची नोकरी लागली याचा सार्थ अभिमान त्या दोघांनाही वाटत होता. घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याचा, आपण आईवडील आणि मुलगा यांच्याबाबत मुलगा आणि बाप म्हणून असणारी आपली कर्तव्ये आदराने, प्रेमाने आणि योग्यप्रकारे पार पाडू शकलो याचे समाधान हीच आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे, पुंजी आहे असे त्यांना वाटत होते. त्याचाच त्यांना खूप आनंद वाटत होता.

मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला. तसे ते दोघंही त्याच्या लग्नाचा विचार करू लागले. एवढे एक कर्तव्य पार पडले की मग आपण आपले आयुष्य जगू, आयुष्यभर अपूर्ण राहिलेली हिंडण्या-फिरण्याची, तीर्थाटन करण्याची स्वप्ने पूर्ण करू असे ती दोघे एकमेकाला म्हणायची. मुलाजवळ लग्नाचा विषय काढला तसे त्याने त्याच्याच क्षेत्रात काम करणाऱ्या एका मुलीबरोबर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.  रावसाहेब विचारात पडले पण त्यांच्या पत्नीने, राधाबाईंनी एका झटक्यात नकार दिला. रावसाहेबांनी विचार करून राधाबाईंना म्हणाले,  

” त्याचे आयुष्य त्याला त्याच्या इच्छेनुसार जगू दे. . अगं, आपल्या वेळचा काळ नाही राहिलेला आता, आपल्यावेळी आई-वडिलांनी ठरवलेल्या स्थळाशी लग्ने करण्यात. . संसार करण्यात धन्यता मानत होतो. आनंद मानत होतो पण आताच्या तरुण पिढीची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या सुखाच्या कल्पना सारेच वेगळे आहे. आपल्या वेळचे सारे वेगळे होते. . अगदी थोडक्यात सांगू का तुला. . ? अगं, आपले जग वेगळे होते, आहे आणि त्यांचे जग वेगळे आहे. “

” अहो, पण… “

” मला एक सांग, आपल्या पोटचे लेकरू सुखात असावे, राहावे असे वाटते ना तुला? “

” अहो, काहीही काय विचारताय, मी आई आहे त्याची. . आणि प्रत्येक आईला आपले मुल सुखात, आनंदात असावं असं वाटत असतंच…”

” हो ना? मग त्यासाठी त्याला त्याच्या मनाप्रमाणे जगू दे. अगं, अलिकडची पिढी तर लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायचा विचार करत असते. . आपला मुलगा लग्न करायचे म्हणतोय हे ही नसे थोडके… तसे लिव्ह इन सुद्धा वाईट नाही म्हणा. . आपल्यावेळी असते तर. . “

” काय म्हणालात. . ?” 

डोळे वटारून राधाबाईनी विचारले,

” अगं, तुझ्याबरोबरच म्हणतोय मी. . “

हसत हसत रावसाहेब उत्तरले. .

” म्हणजे त्यातही तुमच्याबरोबरच? छे बाई ss ! मग त्याला काय अर्थ आहे. . “

राधाबाई कृतक कोपाने म्हणाल्या आणि हळूच हसल्या.

राधाबाईंचे हे हसणे म्हणजेच मुलाला हवे तसे लग्न करायला संमतीच होती.  

मुलाचे त्याच्या इच्छेप्रमाणे लग्न झाले. ते ही कर्तव्य व्यवस्थित, आनंदाने पार पडले याचे समाधान रावसाहेब आणि राधाबाईंना झाले. काही दिवस मुलाबरोबर त्याच्या फ्लॅट मध्ये राहून, त्याचा संसार मांडून देऊन रावसाहेब आणि राधाबाई गावी परतले.

मुलाचा संसार सुरू झाला होता. रावसाहेबांनाही निवृत्तीचे वेध लागले होते. निवृत्तीनंतर लगेचच दक्षिण भारताची, उत्तर भारताची यात्रा करायची असे दोघांनीही ठरवले होते. अनेक वेळा रावसाहेब-राधाबाईंच्या गप्पांचा तोच विषय असे. राधाबाईंनी वृत्तपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या यात्रा कंपनीच्या जाहिरातींची कात्रणेही कापून संग्रहित ठेवली होती, त्यांचे संपर्क क्रमांकही एका वहीत नोंदवून ठेवले होते. .  

मुलाने स्वतःचा  टूबीएचके फ्लॅट घेतला. मुलाने आपल्याशी विचार-विनिमय करून, आपल्याला बोलावून, फ्लॅट दाखवून फ्लॅट घेतला याचा रावसाहेब- राधाबाई दोघांनाही आनंद झाला. मुलगा-सून स्वतःच्या फ्लॅटमध्ये स्थलांतरित झाल्यावर चार दिवस आनंदात घालवून ते दोघेही समाधानाने परतले.

तिथे असताना राधाबाईं हसत हसत सुनेला म्हणाल्या,

” आता स्वतःचा फ्लॅट झाला नातवंड खेळू दे आमच्या मांडीवर…”

” थोडे थांबा आई ! बाबाही निवृत्त होतील वर्षाभरात. . मग तुम्ही इथेच या दोघेही. . आमचे दोघांचे ठरलंय. . हा सेंकड हॅन्ड फ्लॅट आहे. . तेंव्हा दोनतीन वर्षात आपण लक्झरियस थ्री बीएचके नवा फ्लॅट घ्यायचा आणि तिथ गेल्यावरच तुमचे नातवंडं तुमच्या मांडीवर द्यायचे. “

हसत हसत सुनेने उत्तर दिले. खरे तर राधाबाई मनातून खट्टू झाल्या होत्या. . ते पाहून हसत हसत रावसाहेब म्हणाले,

” किती विचारपूर्वक निर्णय घेते तुमची पिढी. .  आयुष्यभर आम्हाला कुठे सहलीला जाता आले नाही, निवृत्तीनंतर आम्ही दक्षिण भारत-उत्तर भारत जाऊन येणार आहोत हे मी बोललेले तुम्ही अगदी आठवणीत ठेवलेले दिसतंय. . स्वतः आधी आमचा विचार करणारी तुझ्यासारखी सून आम्हांला मिळालीय हे आमचे भाग्यच. . “

रावसाहेबांच्या वाक्याने सून ही सुखावली होती आणि राधाबाईंच्या मनातील खट्टूपणा निवळून त्या हसल्या होत्या.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ विटी-दाडू – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ विटी-दाडू – भाग-1 ☆ श्री आनंदहरी

घड्याळात पाच वाजले तसे हातातले पुस्तक बाजूच्या टेबलवर ठेऊन रावसाहेब उठले आणि किचन मध्ये जाऊन बारीक गॅसवर चहाचे आदण ठेवले. बाथरूममध्ये जाऊन हात-पाय, तोंड धुतले आणि  बेसिनवर अडकवलेला नॅपकिन घेऊन तोंड पुसत गॅसच्या कट्ट्याजवळ आले. चहाला उकळी फुटली होती. त्यांनी फ्रीज मधील दुधाच्या पातेल्यातून अर्धा कप दूध छोट्या पातेल्यात घेऊन दुधाचे पातेले परत फ्रीजमध्ये ठेवले आणि छोटे पातेले गॅसवर ठेवले. . दूध साधारण गरम झाल्यावर त्यात उकळी फुटलेल्या चहाच्या पातेल्यातील अर्धा कप कोरा चहा ओतला आणि चांगला उकळल्यावर कपात गाळून घेऊन ते बाल्कनीत आले. रोजच्याप्रमाणे बाल्कनीतल्या आरामखुर्चीत चहाचे घोट घेत बसून राहिले

नवव्या मजल्यावरील फ्लॅटच्या या बाल्कनीतून समोर, वर पाहिले की फक्त आभाळच दिसायचे. . मावळतीला कळलेला सूर्य दिसायचा. .  ही बाल्कनी त्यांना खूप आवडायची पण ती मुलाच्या मास्टरबेडरूमची बाल्कनी असल्याने ते फक्त याच वेळी बाल्कनीत घडीभर बसायचे. या टू बीएचके फ्लॅट मधील त्यांच्या बेडरूमलाही छोटी बाल्कनी होती. त्यांच्या मुलाने तिथेही त्यांच्यासाठी छानशी आराम खुर्ची आणून ठेवली होती. पण ती बाल्कनी रस्त्याच्या दिशेला होती. समोर दुसरी इमारत झालेली होती अकरा मजल्याची. . त्या बाल्कनीतून खाली बघितले की रस्ता दिसायचा. . वर्दळ दिसायची आणि समोर, वर पाहिले की इमारत. आणखी वर पाहिल्यावर दिसणारे समोरच्या इमारतीच्या वरचे तुटपुंजं आकाश बघायला त्यांना आवडायचे नाही.

त्यांनी चहाचा आस्वाद घेतल्यावर काही वेळाने घड्याळात पाहिलं. सहा वाजत आले तसे ते कप घेऊन उठले. बाल्कनीचे काचेचे सरकते दार लावले. मास्टर बेडरूमचे दार ओढून घेतले. सिंकपाशी येऊन स्वतःचा कप, छोटे पातेले आणि गाळणे स्वच्छ धुवून कट्ट्यावर पालथे घातले. कोऱ्या चहाचे पातेले झाकल्याची, फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित लावल्याची खात्री केली.  रुममध्ये जाऊन दरवाजामागे अडकवलेला विजार- सदरा घातला आणि पलंगाजवळच उभी टेकवून ठेवलेली काठी घेऊन बाहेर पडले. बाहेर पडताच फ्लॅटचे दार ओढून घेतले. . पुन्हा आत ठकलून लॅच लागल्याची खात्री करून घेतली आणि काठीचा हलकासा आधार घेत चालू लागले. साऱ्या गुळगुळीत फरशा. . काठीवर भार द्यावा तर काठीचा आधार मिळण्याऐवजी काठी घसरून पडण्याचीच भीती इमारतीतून चालताना नेहमीच त्यांच्या मनात तरळून जायची. . त्यामुळे ते सावध पावले टाकत चालायचे. . तशीच सावधानता बाळगत ते रोजच्या शिरस्त्यानुसार चालत, लिफ्टमधून खाली येऊन इमारतीबाहेर पडले आणि उजवीकडे वळून पदपथावरून चालू लागले.

रावसाहेब चालत चालत मैदानासमोर आले तसे पदपथावरून रस्त्यावर उतरून दोन्हीबाजूला पाहत रस्ता ओलांडून मैदानाच्या प्रवेशदारातून आत शिरले आणि त्यांनी नेहमीच्या  बाकाकडे पाहिले. तिथे कोणीही बसलेले नाही हे पाहून त्यांच्याही नकळत त्यांना बरे वाटले आणि ते हळूहळू चालत येऊन त्या बाकावर बसले.

मुलांच्या खेळासाठी महानगरपालिकेने विकसित केलेले हे मैदान फ्लॅटपासून जवळच होते त्यामुळे ते रोज संध्याकाळी तिथं येऊन बसत. चार भिंतीबाहेरचा तो मोकळेपणा त्यांना हवाहवासा वाटे. मैदानात एकबाजूला बाग होती. . तिथं लहान मुलांना खेळण्यासाठी जागा होती. . भोवतीने झाडे होती त्याच्या सावलीत बसण्यासाठी बाके होती त्या बागेमध्येच ज्येष्ठाना फिरण्यासाठी वेगळा पथ निर्माण केला होता. तर या बागेला लागूनच मोठ्या मुलांना खेळण्यासाठी मोठं मैदानही होते. तिथे बऱ्याचदा क्रिकेट च्या मॅच ही होत असत. तिथेच हॉलीबॉलचे ग्राउंड ही होते. बाग व मैदान याच्या दरम्यान झुडपांचेच सुंदर कुंपण ही होते. रोजच्यासारखाच मैदानाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या क्रिकेट पिच वर मोठ्या मुलांचा क्रिकेटचा खेळ अगदी उल्हासात, जोशात चालू होता. त्यांचे  फोर, सिक्स, आऊट, क्लिनबोल्ड, रन. . रन असे वेगवेगळे आवाज कधी स्वतंत्र तर कधी संमिश्र ऐकू येत होते.

फ्लॅटच्या चार भिंतीत स्वतःचाही आवाज फारसा न ऐकलेल्या त्यांना मुलांचे ते आवाज ऐकून बरे वाटले. त्यांनी बाकावर बसतानाच हातातील काठी बाजूला टेकून ठेवली आणि अवतीभवती नजर टाकली.  त्यांच्या समोरच काही अंतरावर एक मुलगा एकटाच बॉलने खेळत होता. . दुसऱ्या कोपऱ्यात  त्याच्याच वयाची तीन चार मुले गवतावरच बसली होती. त्यांच्या काहीतरी गप्पा चालल्या असाव्यात. . त्या मुलांच्याच मागच्या बाजूला जवळच असणाऱ्या बाकांवर बहुदा त्या मुलांच्या पालक असणाऱ्या  महिला बोलत बसल्या होत्या.. पण बोलत असतानाही अधून मधून  त्या मुलांकडे लक्ष देत होत्या. . मधूनच कुणीतरी. . ‘ नो नो बेटा. . ‘ असे काहीतरी म्हणत, काहीतरी सुचवत सांगत होत्या.

हे सारे पाहताना त्यांच्या मनात आले ‘, पालकांच्या नजरेच्या पिंजऱ्यात खेळण्याचा किती आणि कसा आनंद मिळत असेल या मुलांना ? वारा पिलेल्या वासरासारखे मुक्त, मोकळे हुंदडणे या मुलांना माहीत तरी असेल का ? ” त्यांना गावाकडच्या मुलांचे खेळणे, हुंदडणे आठवले आणि त्यांच्या मनात गावाकडच्या आठवणी रुंजी घालू लागल्या.

क्रमशः…

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जुने कपडे… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री सुजाता गोखले ☆

? जीवनरंग ❤️

☆ जुने कपडे… अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री सुजाता गोखले  

जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन  भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.

 “नाही ताई ! मला नाही परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या हव्यातच.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून काढून आपल्या हाती परत घेतले.

“अरे भाऊ ! अरे, केवळ एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत..! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशाच तर फार जास्त होतात. केवळ मी म्हणून तुला दोन साड्या तरी देऊ करतेय.”

“राहू द्या, तीन पेक्षा कमी मध्ये तर मला अजिबातच परवडत नाही.” तो पुन्हा बोलला.

आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका वेडसर तरुण महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला आपल्याला कांही खायला द्या म्हणून विनंती केली.

अशा लोकांबद्दल असलेल्या घृणेमुळे  त्या श्रीमंत महिलेनं एकवार जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्‍या महिलेच्या कपड्यांकडे गेली.

जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपलं उमलतं तारुण्य झाकायचा तीचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.

त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर तरुण भिकारणीच्या पात्रात टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं तर मग काय भाऊ! तू काय ठरवलंय ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”

यावर कांही न बोलता भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या, पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला…

विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला उठली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली… तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं  गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला, त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी देत होता.

आता हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार भारी झाल्यासारखं वाटू लागलं होतं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं होतं. घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं  देऊ करायला एकाएकी कां तयार झाला होता याचं कारण  तिला आता चांगलंच उमगलं होतं. आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणिव झाली होती.

कुणाला कांही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं….!!

🙏आपल्यापाशी काय आहे  आणि किती आहे यानं कांहीही फरक पडत नाही. आपली विचार करण्याची पद्धत व नियत शुद्ध असायला हवी.🙏

संग्राहिका – सुश्री सुजाता गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

? विविधा ?

☆ उत्कट…. भाग -१ ☆ श्री अजित देशमुख ☆

भावनातिरेक आणि अश्रुपात या ठरलेल्या समीकरणाची प्रचिती पोलिस अधिका-याला जेवढी येते तेवढी क्वचितच कोणाच्या अनुभवाला येत असेल. सहन होण्यापलीकडील दुःख आणि मन कोळपून टाकणाऱ्या दु:खाची  परिस्थिती बदलण्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अशी व्यक्ती क्षणाक्षणाला हतबल होत जाते .

मुळात ” पोलीस” या संस्थेभोवतीचे प्रवाद , समज आणि संशयाची वलये सर्वसामान्यांच्या मनावर गोंदवल्यासारखी घट्ट असतात. पोलिसातील एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या गुणांबाबत कौतुक करतानाही ”पोलिसात असूनसुद्धा ” हे पालुपद चिकटतं ,  यात सर्व काही आलं .

तक्रार घेऊन आलेली व्यक्ती ही आपले दुःख कमी व्हावे या उद्देशाने  शेवटचा उपाय म्हणून पोलिसांकडे येते . तिची एकमेव अपेक्षा त्याच्या दुःखाच्या समस्येचे तात्काळ निवारण व्हावे अशी असते. पोलीस अधिकारी मात्र तक्रारीच्या स्वरूपाचा  आढावा घेत घेत त्या तक्रारीनुरुप करावयाच्या कायदेशीर प्रक्रियेची मनात जुळवाजुळव करत असतो. त्या त्या प्रत्येक तक्रारीमागील घटनांचे कारण, त्यामुळे होणाऱ्या  परिणामांचे , त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे , नवीन तक्रारीचे स्वरूप   हातातील काम बाजूला ठेवण्या इतपत तातडी निर्माण करणारे असले, तर वरिष्ठांना तात्काळ कल्पना देण्याबाबत असे एक ना  अनेक विचार त्याच्या मनात  गर्दी करून असतात . याचा परिणाम म्हणून कि काय एखादा डॉक्टर जसा पेशंट तपासताना विचलित होत नाही तसाच पोलीस अधिकारी तक्रारी हाताळताना भावनाविवश होत नाही . मात्र यामुळे होते असे की तक्रारदाराच्या मनातील पोलिसाबद्दलची ‘रुक्ष ‘ अशी प्रतिमा अधिक गडद होते . आपली तक्रार आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही असा गैरसमज होऊन वाढलेली तक्रारदाराची  हतबलता  त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत असते.

मात्र पोलिस अशाही प्रसंगाचे साक्षी होतात ज्यामध्ये दु:खाश्रूंची जागा थोड्याच अवधीत आनंदाश्रू घेतात.

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील  एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात.  मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून  धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.

अशा गर्दीचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस ठाण्यामधे, एखादी स्त्री कपड्याचे भान न ठेवता  घाईघाईने पायऱ्या चढत , रडून दमेलेले डोळे शोधक नजरेने फिरवत पोलिस ठाण्यात प्रवेश करते तेव्हा समजावे, हीचे मूल गर्दीत हरवले आहे.

“साहेब माझा मुलगा हरवला आहे हो !” असं बोलून मागोमाग मोठयाने हंबरडा .

हरवलेल्या मुलाचे वडील बरोबर असले तर बाहेर टॅक्सीचे पैसे देऊन मागोमाग पोलीस ठाण्यात येतात. तेही काळजीत असतात परंतू पुरुष असल्यामुळे त्यांचे डोळे वाहात नसतात. बाळाच्या विचाराने आईचे लक्ष कशातच नसते.  तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर काळजी पसरलेली आणि मनात येणाऱ्या नाही नाही त्या शक्याशक्यतांच्या विचारांमुळे तिच्या डोळ्यातून सतत अश्रूंचा पूर लोटत असतो . ड्युटी ऑफिसरने बसायची खूण केली आणि बाळाचे वडील खुर्चीत बसले तरी आई खुर्चीत बसत नाही.

गर्दीत हात सुटून हरवलेली अशी मुले सर्व साधारणपणे अडीच ते चार वर्षाची असतात.

नित्याचा प्रकार असल्याने , ड्युटी ऑफिसर हरवलेल्या मुलाच्या वयाची , त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांची आणि शरीरावरील ओळखीच्या खुणांची तोंडी चौकशी करता करता हातातील लिखाण पुर्ण करत असतो. मुलाच्या आईवडीलांसाठी परिसर सरावाचा नसल्याने नेमक्या

कोणत्या जागेवरून मुलगा हरवला हे त्याना नीट सांगता येत नाही .मग एखादया मोठया दुकानाच्या खुणेवरून वगैरे त्या जागेचा अंदाज येतो.      

बाळाची आई रडत रडत “एक मिनिटांसाठी  घोटाळा झाला हो” हे वारंवार उच्चारत मुलाचा हात सोडल्याबद्दल स्वतःला दोष देत  असते.

एक छोटेसे टिपण करून त्याची  “लहान मुले  हरवल्याबाबतच्या” रजिस्टर मधे आणि पोलिस स्टेशन डायरी मधे नोंद करून, ड्युटी ऑफिसर पोलिस कंट्रोल रूमला घटना कळवतो.

त्याचप्रमाणे आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित क्षेत्रात गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अलर्ट करतो…

क्रमशः…

© श्री अजित देशमुख  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares