मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काय बदललंय?” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “काय बदललंय?” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

ए••• तुला आठवतं? आपण ३५ वर्षापूर्वी कसे चोरून एकमेकांना भेटायचो ते?

कसा विसरेन मी? आणि तुला आठवतं का गं असेच चोरून एका बागेत असताना आपल्याला आपल्याच बॉसने, आपल्या एका कलीगने बघितले ते?

होऽऽऽ आठवतय की. अगदी काल परवाच घडलेय असं वाटावं इतक्या ठळकपणे•••

आता हसू येतय सगळ्याचे. पण मग असे चोरून भेटायलाही नको आणि कोणी पाहिले म्हणून ओशाळायलाही नको म्हणून आपण आपल्या घरच्यांच्या संमतीनेच लग्न केले ना•••

घर दोघांचे आहे समजून त्यासाठी म्हणून तू नोकरी निमित्ताने बाहेर•••

मी पण तुला हातभार म्हणून घरी बसून तरी काय करायचे वाटून नोकरीसाठी बाहेर•••

संध्याकाळी कामाहून आले की दोघांचा मूड एकदम फ्रेश••• 

मग संध्याकाळचा स्नॅक्स बाहेर कुठेतरी फिरताना•••

पण रात्रीचं जेवण तुला माझ्याहातचेच पाहिजे असायचे.

मग घरी येऊन त्या एका वातीच्या स्टोव्हवर संध्याकाळी दमून आलेले असतानाही हसत खेळत वेळेत होत असे.

कधी थोडी कुरबूर कधी रुसवा फुगवा तरी सगळे हवे हवेसे वाटणारे•••

आता संसार वेलीवरचे फूलही चांगले उमलले आहे बहरले आहे•••

पण••••

मी तीच आहे. तू तोच आहे••• मग आपल्यामधे तणाव का?

का छोट्या छोट्या गोष्टींमधूनही चिडचिड होते?

का आपण जरा फिरून येऊ म्हणताच त्यावेळी दोघांपैकी एकाला जमत नाही?

का काही चांगले करावे म्हटले तर नकार घंटा वाजते?

का मनासारखे काहीच घडत नाही वाटून मन मारून उगीच सहन करत रहायचे?

तरीही स्पष्टपणे बोलले तर उगाच राग येईल वाटून एकट्यानेच कुढत रहायचे?

काय बदललय? का बदललय? विचार केलायस कधी?

विचार करायला वेळच कुठे? या प्रश्नातूनही इतके वर्ष मला काहीच करायला वेळ मिळाला नाही हे दाखवून देणारा स्पष्टपणे जाणवणारा एक नापसंतीचा सूर•••

खरय••• एकाच घरासाठी काडीकाडी जमवताना आपण आत्मकेंद्रित कधी झालो हे कळलच नाही गं••• 

मला त्रास नको म्हणून तू तर तुला त्रास नको म्हणून मी काही गोष्टी एकेकट्यानेच सहन केल्या ना?

तेथेच खरे तर आपण चुकलो. त्या सगळ्या क्षणातून आपल्यामधली आपलेपणाची विण सैल होऊन मी पणाची वीण घट्ट कधी झाली कळलेच नाही•••

मग तू तू मै मै आले आणि हळू हळू हे अंतर आपल्याही नकळत वाढले गं.

दोघांच्या आवडी निवडी एकत्र जपण्याऐवजी एकमेकांना सपोर्ट करण्यासाठीच कोणतीही आडकाठी न आणता वेगवेगळ्या जपल्या गेल्या ना••• तेव्हाच एकमेकांचा खोटा आधार आहे वाटून आपापले विश्व वेगळे निर्माण झाले गं•••

आता या दोन विश्वांना कसे एकत्र आणणार? संसाराचा रथ चांगला उभा राहिलेला लोकांना दिसतोय गं••• पण त्याचे दोन घोडे दोन विरुद्ध दिशेने धावू पहाताहेत म्हणून स्थीरच आहे ••• हे कोणाच्या लक्षातही येणार नाही इतके चांगले नाटक करणारे आपण अभिनेते पण झालो आहोत गं•••

खरचं काय बदललय? कसं बदललय हे सगळं?

आता तू रिटायर्ड झालास••• मग पुन्हा तुला ते दिवस खुणावू लागले••• मग थोडा कमीपणा घ्यायचा मोठेपणा सुचला••• मग पुन्हा एकमेकांची स्तुती आणि विरुद्ध दिशेने धावणारे घोडे एक होऊन मुलाच्या संसार रथासाठी सज्ज झाले.

खरचं काय बदललय ग?

छे ऽऽऽ कुठे बदललय रे••••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सोळा सहस्त्र एक शतक वरमाला!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“सोळा सहस्त्र एक शतक वरमाला! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ही तर मोठी दिवाळी!

जन्मदात्री धरित्री आपल्याला कधीही मृत्युशय्येवर निजवणार नाही, याची त्याला पुरेपूर खात्रीच होती. मरेन तर तिच्याच हातून… अन्यथा नाही असा त्याचा प्रण होता. आणि ब्रम्हदेवांकडून तसा वर पदरात पडताच तो स्वर्गातील देवांनाही वरचढ ठरला आणि पृथ्वीवर साक्षात ‘नरक’ अवतरला!

त्याचे अपराध शंभरात नव्हे तर सहस्र संख्येने गणले जाऊ लागले होते… सोळा सहस्र आणि वर एक शतक अधिकचे! त्याचा ‘शिशुपाल’ करण्याची घटिका समीप आली होती. मुरा नावाच्या अधमाला लीलया मातीत घालून तो ‘मुरारी’ झाला! पण नरक अजूनही नांदताच होता… ब्रम्हदेवाच्या वरदानाची कवचकुंडले परिधान करून रणात वावरत होता… चिरंजीव असल्याच्या आविर्भावात. इकडे ही सत्याचे भाम म्हणजे प्रकाश अंगी मिरवणारी रणात निघाली होती आपल्या सुदर्शनचक्रधारी भ्रतारासोबत.. तिला रण अनुभवयाचे होते… आपल्या स्वामींना शत्रूशी झटताना आणि विजयश्री प्राप्त करताना याचि देही.. याचि डोळा तिला पहावयाचे होते! ती फक्त दर्शक म्हणून आली होती… पण प्रत्यक्ष युद्धभूमीत तिच्या स्वामींनी चिरपरिचित नीतीने, ‘माये’च्या रीतीने तिला हाती आयुध घ्यायला उद्युक्त केले! तो पृथ्वीचा पुत्र… रावणाची चिता विझून गेल्यावर जणू त्याचाच कुमार्ग अनुसरण्यासाठी मातेला भार म्हणून जन्मास आलेला. पण ही तर स्वत:च पृथ्वीचा अवतार… म्हणजे त्याची आई…. आणि त्याचे अपराध उदंड झालेले… त्याला दंड दिलाच पाहिजे. तसा तिने तो दिलाही! त्यामुळे तिच्यावरचाच भार गेला.

खेळ तो येणेचि खेळावा.. सारे खेळ त्याचेच.. खेळाडूही तोच.. आपण फक्त दर्शक. स्वामींनी सत्यभामेकडून खेळ खेळवून घेतला!

सोळा हजार शंभर अभागी जीव आता स्वतंत्र झाले होते… नव्हे त्यांना प्रत्यक्ष देवाने सोडवले होते त्या नरकातून. पण मानवी जीवनात मानवाला अतर्क्य घटनांना सामोरे जावे लागते… देव असले म्हणून काय… मानव अवतारात अवतारी देवही अपवाद नव्हते! भगवान श्रीरामांनी संसाराचे भोग भोगले होतेच की. कुणा एकाचे बोल ऐकून प्राणप्रिय पत्नी वनात धाडली होती… रामायणानंतर आणखी एक रामायण घडले होते.

नरक तर आईच्या मृत्यू पावून तसा मुक्त झाला होता… पण त्याच्या बंदिवासातील सोळा हजार शंभर स्त्रिया आता विनापाश झालेल्या होत्या. ज्याने स्त्री संकटातून मुक्त केली त्याचे त्या स्त्रीने दास्य पत्करावे असा संकेतच होता तेंव्हा. त्या म्हणाल्या… देवा… आता आम्ही सर्वजणी तुमच्या आश्रित झालेल्या आहोत… जगाचे आणि आमचे आजवर एकच नाते होते… शरीराचे. आणि आम्ही स्त्री जातीत जन्मलो एवढेच काय ते आमचे पातक. जन्मदात्यांनी आम्ही विटाळलो म्हणून आमचे नाव टाकले… आम्ही कुणाच्याही बहिणी उरलो नव्हतो, कुणाच्या पत्नी होऊ शकत नव्हतो… निसर्गनियमाने आई झालोच तरी कुणाचे नाव सांगायचे बाळाचा पिता म्हणून? तो असुर असला तरी त्याचे नाव तरी होते आमच्या नावात… आमच्या इच्छेविरुद्ध. पण आता आम्ही कुणाच्या नावाने जगावे.. पती म्हणून कुणाला कपाळी रेखावे?

धर्माच्या पुनरुत्थानार्थ संभवलेल्या भगवंतापुढे असे धर्मसंकट यावे? या जीवांना आश्रय देणे तर कर्तव्याच. पण त्यांचा प्रश्न? त्याला व्यवहाराने उत्तर देणे अपरिहार्य होते. स्वत: देव यशोदासूत होते तसे देवकीनंदनही होतेच. वासुदेव होते तसेच नंदलालही होतेच!

“तुम्ही आता या क्षणापासून आमच्या, अर्थात द्वारकाधीश श्रीकृष्ण यांच्या धर्मपत्नी आहात! आणि अखिल जगत या नात्याचा सन्मान करेल.. अशी आमची आज्ञा राहील!

 राजयाची कांता काय भीक मागे.. मनाचिये योगे सिद्धी पावे.. अशी त्या सा-या आत्म्यांची गत झाली. एवढी वर्षे नरक भोगला… पण भगवत्कृपा झाली आणि पावित्र्य अंगा आले. आता प्रत्यक्ष देवाच्या नावाचे कुंकू लेवून जगायचे आणि अहेव जायचे! राजाची मुद्रा उमटवलेले साधे कातडे जरी असले तरी ते व्यवहारात सुवर्णमुद्रेसारखे चालून जाते.. मग आम्ही तर जिवंत देह आहोत.. आमचा धनी, आमचा स्वामी एकच… श्रीकृष्ण! जगताच्या दृष्टीने हे विवाह असतील… या संस्कारातून कामवासनेचा गंध येईलही एखाद्या घ्राणेन्द्रीयास! सर्व भोगांच्यामध्ये राहूनही नामानिराळा राहणारा हा… लांच्छन बरे लावून घेईल? रुक्मणि, जाम्बवन्ती, सत्यभामा, कालिन्दी, मित्रबिन्दा, सत्या, भद्रा और लक्ष्मणा अशा आठ सर्वगुणसंपन्न भार्या असणारा राजस सुकुमार मदनाचा पुतळा आमच्या सारख्या चुरगळलेल्या फुलांची माला का परिधान करेल? देवाच्या चरणावर वाहिलेली फुले कायमची सुगंधी होऊन राहतात.. त्यांचे निर्माल्य नाही होत!

आम्हा सर्वजणींचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याची त्याची हे कृती न भूतो न भविष्यती! मानव्याच्या दृष्टीने ही अलौकिक कृती म्हणजे विश्वाने उदरात सामावून घेतलेल्या सहस्र आकाशगंगाच म्हणाव्यात.

भोगी म्हणून अज्ञानी जीव उपहास करु शकतील हे काय त्यांना ज्ञात नसेल? पण कर्मसिद्धांत सांगणारे हृद्य फलाची चिंता का वाहील? देवाने ज्याला आपले मानले त्याचे इह आणि परलोकीही कल्याणच होते! त्याची “मी स्वामी पतितांचा” ही उक्ती सिद्ध करणारी ही कृती म्हणूनच वंदनीय आणि अनुकरणीय!

मानव की परमेश्वर? या प्रश्नाने त्या युगातही काही शंकासूर ग्रस्त होते आणि या युगातही आहेतच! पण ज्याला कीर्तीचा मोहच मुळी नाही… आम्हा पतितांचे रुदन तो केवळ ऐकत स्वस्थ बसू शकणा-यांपैकी खचितच नव्हता. कर्तव्यासाठी कलंक साहण्याचे सामर्थ्य अंगी असणारा तो एक समर्थ होता. आम्हां पतितांना संजीवन देण्यासाठी त्याने कलंक आदराने ल्याला… हलाहल प्राशन करून देवेश्वर झाला… ज्याने बाल्यावस्थेत धेनू राखल्या… त्याचे हृदय वत्सल धेनूसम असावे, यात नवल ते काय?

कौरवांच्या सभेत याच द्वारकाधीशाने एका द्रौपदीला वस्त्रे पुरवली यात म्हणूनच आश्चर्य वाटत नाही!

(दीपावली दरम्यान येणारी चतुर्दशी लहान दिवाळी म्हणून उल्लेखिली जाते. खरे तर हाच दिवस ख-या दिवाळीचा मानला जावा, असे वाटून जाते. अशी अलौकिक घटना या दिवशी श्रीकृष्णावतारात घडली… समाजबहिष्कृत थोड्याथोडक्या नव्हे, तब्बल सोळा हजार शंभर स्त्रियांना एका सर्वशक्तीमान दैवी अवतारीपुरुषाने पत्नी म्हणून स्विकारणे ही घटना सर्वार्थाने असामान्य! देवाचा माणूस झाला किंवा माणसाचा देव झाला या चर्चेपेक्षा माणसातले देवत्व कर्मातून सिद्ध करणारा मनुष्य देवच! भगवान श्रीरामांचे चरित्र व्यवहारात अनुसरण्यायोग्य आहे, पण भगवान श्रीकृष्ण चरित्र प्रत्यक्षात अनुसरणे केवळ अशक्य आहे, असा मतप्रवाह आहे. पण श्रीकृष्ण परमात्याची पतितोद्धाराची कृती अनुकरणीय नाही का? असो. अधिकाराविना बरेच लिहिले आहे. महान गीतगोविंदकार कवी मनोहर कवीश्वर यांनी ‘माना मानव वा परमेश्वर’ हे खरोखर अप्रतिम रचनेतून प्रत्यक्ष श्रीकृष्ण चारित्र्य नजरेसमोर उभे केले आहे. हे विचार लिहिताना त्यांच्याच शब्दांचा आधार घेतला आहे, हे लक्षात येईलच. यात इदं न मम अशी भावना आहे. जय श्रीकृष्ण.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “आपलं होताना…” – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ “आपलं होताना…” – लेखिका : सुश्री विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

नक्षत्रासारखं लेकीचं लखलखतं रूप काकू खुर्चीतून न्याहाळत होत्या. नवरात्रात पाचव्या माळेला जन्मलेली, ललित पंचमीची… म्हणून तिचं नावही त्यांनी ललिताच ठेवलं होतं.

रूप, शिक्षणानं चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आत्मविश्वास… त्यात सासरही टोलेजंग मिळालेलं. सगळं तिला शोभून दिसत होतं आणि स्वतःजवळ असलेलं मिरवायची कला देखील तिला छान अवगत होती… कौतुक करून घेणं तिला फार आवडायचं. कुणाचं करण्याच्या बाबतीत मात्र‌ हात आखडता असायचा तिचा!

स्वतःभोवतीच फिरणारं तिचं व्यक्तीमत्व हल्ली काकूंना कर्कश वाटू लागलं होतं… आपलीच मुलगी होती, तरीही…!

तिच्या येण्यानं, अखंड ‘मी’ गोवत बोलण्यानं घरातली शांतता ढवळून निघते, असं कधीकधी त्यांना वाटायचं. आपलंच लेकरू… पण तरीही ती बऱ्याच वेळा, सर्वच बाबतीत ‘लाऊड’ आहे, असे न सांगता येण्यासारखे कढ त्यांना दाटून येत.

आजकाल थकल्यामुळं त्या घरातून थोड्या अलिप्त झाल्या होत्या. तिचं मोठेपण तिच्याच तोंडून ऐकायला त्या हल्ली फारशा राजी नसायच्या. कधीकाळी त्यांना तिच्या त्या मोठेपणाचं कोण कौतुक वाटतं होतं पण आजकाल नकोसं व्हायचं.

तिचा वाढदिवस, नवरात्रातलं सवाष्ण, माहेरवाशीण असं सगळं औचित्य साधत काकू तिला ललित पंचमीला जेवायला बोलवायच्याच. ती प्रथाच पडून गेली होती घराची.

काकूंच्या अखत्यारीत असलेला संसार सुनेच्या हातात जाऊनही आता काही काळ लोटला होता… पण सूनबाईंनी या प्रथेत खंड पडू दिला नव्हता. शांत, समंजस… तरीही काहीशी अबोल सून, काकूंना लेकीपेक्षाही कित्येकदा आपलीशी वाटायची. जन्माला घातलेल्या मुलींपेक्षाही ही परक्या घरातून आलेली पोर त्यांच्याही नकळत त्यांच्या जवळची होऊन गेली होती. फारसा संवाद नसायचा दोघींचा, एक तर तिची दिवसभर बॅंकेतली नोकरी आणि उपजतच गोष्टींची तिची समज… न बोलता कुटुंब एकसंध शांततेत नांदत होतं.

अनायसे रविवारच होता, त्यामुळं सूनबाईंनी नणंदेच्या आवडीचा ‘सुरळीच्या वडी’पासून ‘शाही रबडी’पर्यंत सगळा साग्रसंगीत स्वयंपाक केला होता. छानशा मोत्यांच्या महिरपींनी चांदीची ताटवाटी सजली होती. सवाष्ण, त्यात पुन्हा वाढदिवसाची उत्सवमूर्ती… सगळं कसं नेमकं, नेटकं टेबलावर मांडलेलं होतं.

काकांनी देखील आज सगळ्यांसोबत टेबलावर जेवायला बसायचा हट्ट धरला होता. काकू शक्यतो त्यांचं जेवणखाण लवकर आटोपून घेत. एकतर वेळ सांभाळावी लागे आणि दुसरं म्हणजे, थकलेल्या शरीरामुळं हात थरथरत कापत. जेवता जेवता सांड-लवंड होई. त्यामुळं काकू चारचौघात त्यांना जेवायला वाढायचं टाळतच असत.

पण आज मात्र काकांनी लेक, जावई यांच्यासोबतच जेवायचा हट्ट धरला… आणि सूनबाईंनी काकूंना थोपवत त्यांचा हट्ट मान्य केला.

“असू दे आई, जेवू दे त्यांना सगळ्यांसोबत… त्यांचीच तर लेक आहे ना! काही होत नाही… त्यांनाही कधीतरी वाटत असेलच ना, सगळ्यांसोबत जेवावं…! ”

गरम गरम आंबेमोहोराच्या भातमुदीवर पिवळं धम्मक दाटसर वरण येऊन विराजमान झालं… आणि त्याच्या वासानं सगळ्यांची भूक एकदम चाळवली.

लोणकढं तूप आणि लिंबाची फोड… त्या पूर्णान्नानं भरलेल्या ताटाकडे बघताना लेकीच्या चेहऱ्यावर तृप्तीचा भाव ओसंडून वाहिला.

काकू मनापासून आनंदल्या. असं सगळं कुटुंब टेबलाभोवती होतं हे बघून, “सावकाश जेवा…” त्यांनी लेक-जावयाला अगदी प्रेमानं सांगितलं.

थरथरत्या बोटांनी भातावर लिंबू पिळताना काकांच्या हातातून चतकोर लिंबाची फोड उडून टेबलाखाली पडली. सूनबाईंच्या लगेचच लक्षात आलं. तिनं पटकन बाऊलमधली दुसरी फोड घेत त्यांच्या ताटातल्या भाताच्या मुदीवर दोन थेंबात शिंपडली.

“सावकाश जेवा बाबा…” ती त्यांच्या खुर्चीच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली.

जेमतेम दोन घास तोंडांत गेले न गेले तोच… एक जोरात खोकल्याची उबळ काकांना आली आणि तोंडातल्या भाताचे कण चौफेर उडाले… काटकोनात बसलेल्या लेकीच्या अंगावर ही उडाले. ती एकदम चिडली,

“कशाला बसता बाबा सगळ्यांबरोबर जेवायला? तुम्हाला जेवताना नेहमी ठसका लागतो माहितीये ना…! ”

तिचं भरजरी नक्षत्र रुपडं एकदम चिडचिडलं. अंगावर उडवलेली भातशितं झटकत ती बेसीनपाशी‌ गेली.

“अगं सवाष्ण ना तू… उठू नकोस…”

काकूंचे शब्द तोंडातच विरले…

हातात पुऱ्यांची धरलेली चाळणी पटकन खाली ठेवत, सूनबाई धावत काकांच्या जवळ आली. आपली एका तळहाताची ओंजळ त्यांच्या तोंडाशी धरत, ती त्यांच्या पाठीवर हात फिरवत त्यांना म्हणाली,

“गिळू नकात बाबा तो घास. माझ्या ओंजळीत टाका… घशात अडकेल भाताचं शीत! ”

निमिषमात्र अडकलेल्या श्वासामुळं नाका-डोळ्यांतून वाहणारं पाणी मुक्तपणे वाहू लागलं. वाढताना ओढणी मध्ये येऊ नये म्हणून तिनं एका खांद्यावरुन घेऊन तिची गाठ कमरेशी बांधली होती. घाबराघुबरा झालेला त्यांचा चेहरा तिनं तीच ओढणी मोकळी करत पुसला.

सुनेचा आपलेपणानं पाठीवर फिरणारा हात त्यांना दिलासा देऊन गेला. ते हळूहळू शांत होत गेले.

लेकीच्या रिकाम्या खुर्चीकडे बघताना काकूंना त्या क्षणी उलगडलं… लेकीपेक्षा सून आपल्याला का आपली वाटते ते!

रक्ताचं नातं परकेपणाकडे झुकत होतं आणि परकं नातं आपलेपणा जपत होतं…!

परक्या घरी गेलेल्या लेकीचा ओसरत चाललेला आपलेपणा आणि परक्या घरातून आलेल्या सुनेच्या सहवासातून पाझरता ओलावा…!

नाती बदलत जातात… बघता-बघता…!

‘माझं’ असणं आणि ‘आपलं’ होणं…

यात कितीही नाही म्हटलं तरी फरक आहेच.

‘माझं’पण हे जन्मानं येतं, मात्र ‘आपले’पण आपुलकीतूनच निर्माण होत राहतं.

‘माझे’पणाला हक्काच्या मर्यादा आहेत,

तर ‘आपले’पण व्यापक आहे…

आणि व्यापक हे नेहमीच अमर्याद असतं…! ! !

लेखिका : सौ विदुला जोगळेकर

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणी जागृत करणाऱ्या गोष्टी – पत्र ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

आठवणी जागृत करणाऱ्या गोष्टी – पत्र ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

कालच एक पत्र वाचले. म्हणजे चक्क मिळाले. मेसेज करण्याच्या काळात पत्र वाचून मी पण थक्क झाले. आणि आनंद देणारा आश्चर्य वाटणारा एक सुखद धक्का बसला. ज्येष्ठ व आदरणीय लेखकांची पुस्तके व त्या बरोबर त्यांचे स्व हस्ताक्षरातील पत्र मिळाले. पत्र कसे लिहावे व कसे असावे याचा उत्तम आदर्श नमुना वाचायला मिळाला. आणि खूप वर्षे मन भूतकाळात गेले. 

पूर्वी संपर्कासाठी मुख्यत्वे तेच साधन असायचे. आणि कोणते पत्र आहे त्या वरून त्याचे महत्व लक्षात यायचे. म्हणजे साधे पत्र ( ज्यावर मजकूर थोडक्यात व पत्ता लिहायला जागा असायची. ) आम्ही त्याला १० पैशाचे किंवा खाकी पत्र म्हणत असू. ते उघडे असल्याने कोणीही वाचू शकत असे. त्यावर साधारण नापास असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल असायचा. त्याची निकालाच्या आधीच्या दिवशी वाट न बघितली जायची. म्हणजे माझ्या घरात नको यायला असे वाटायचे. वाड्यात किंवा आपल्या भागात पोस्टमन दिसला की पोटात भीतीचा गोळा यायचा आणि पुढचा प्रसाद ( मार ) डोळ्या समोर यायचा. तो पोस्टमन घरासमोरून जायला लागला की हृदय बाहेर पडते की काय असेच वाटायचे. थोडक्यात पण महत्वाचे असे त्यावर लिहिले जायचे. कोणी गावाहून पत्र लिहायचे. ४ वाजता सुखरूप पोहोचलो. काळजी नसावी. वर सुरुवातीला ती. बाबा/आई यांना सादर प्रणाम. व शेवटी आपला आज्ञाधारक असा मजकूर असायचा . आणि काहीही मायना नसलेले पत्र दिसले की निरक्षरांना पण कळायचे, की वाईट बातमी आहे. त्यात फक्त एकच ओळ असायची —- व्यक्तीला देवाज्ञा झाली. आणि तेच पत्र फाडले जायचे. 

दुसरा प्रकार होता निळ्या रंगाचे आंतरदेशीय पत्र. त्यात तीन पाने लिहायला मिळायची. आणि कडा दुमडून ते सिल करता यायचे. म्हणजे आपला मजकूर सुरक्षित. सहज वाचता यायचा नाही. तसे पत्र गोल करून,बाजूची दुमड काढून वाचता यायचे किंवा उघडून परत सफाईने चिकटवता यायचे. हे उद्योग पण बालपणात शिकले होते. अर्थात त्या साठी प्रसाद पण खाल्ला आहे. पण काही संभाव्य धोक्या पासून वाचवले पण आहे. 

अजून सर्वात सुरक्षित प्रकार म्हणजे फिकट खाकी पाकीट ( आम्ही त्याला पिवळे पाकीट म्हणत असू ) असायचे. त्यात मात्र आपलेच कागद लिहून ते एकदम पक्के चिकटवून पाठवता यायचे. त्यात खाजगी सुरक्षितता जास्त होती. आणि असे आपले स्वतंत्र रंगाचे, नक्षीचे पाकीट पाठवता यायचे. फक्त त्याला पोस्टाचे तिकीट लावावे लागायचे. आणि हो, त्यात सुगंधी मजकूर पण पाठवता यायचा. आमच्या घरी जेव्हा असे सुगंधी पाकीट आले होते,त्यावेळी आपल्या ताईची पसंती आली हो… असे ओरडतच पोस्टमन सगळ्यांना समजेल अशी दवंडी देत आला होता. आणि आईला म्हणाला होता. पत्र देतो पण आधी गोड बातमी साठी फक्कड चहा पाहिजे. मग आई गॅस कडे,वडील पत्राकडे आणि छोटी बहीण डोळे विस्फारून आणि वाड्यातील मंडळी कान टवकारून तयारीत होते. मी कोणत्या कोपऱ्यात होते ते मलाही आठवत नाही. पण पाकीट, आतले कागद याचा सुगंध मात्र अजून आठवतो आहे. 

मुख्यत्वे सामान्य लोकांना हे तीन प्रकार परिचित असायचे. बाकीचे रजिस्टर,VP असायचे पण ते फार क्वचित दिसायचे. ही पत्रे पण फार निगुतीने सांभाळली जायची. एक वरच्या बाजूस हुक व खाली कॅरमच्या सोंगटीसारखी सोंगटी असायची. आणि येणारे टपाल दर ८/१५ दिवसांनी तारखेप्रमाणे लावली जायची. अर्थात त्यात बिले,पावत्या पण असायच्या. ती तार वरच्या हुक पर्यंत भरली की त्याचे गठ्ठे करून सुतळीने बांधून ठेवले जायचे. हे काम मला फार आवडायचे. ते सगळे लावताना त्याचे पुन्हा वाचन व्हायचे. अजूनही काही पत्रे जपून ठेवली आहेत. आणि अधून मधून ती काढून वाचून,झटकून,पुसून त्या बॅगेत कापूर घालून ठेवली जातात. 

अशी पत्रे म्हणजे मला एक सुगंधी कुपी वाटते. कडू,गोड आठवणी असतात. आणि त्या वेळचे प्रसंग जिवंत करण्याची त्यात ताकद असते. काही भूतकाळातील वेडेपण,काही शिकवणी,काही उपदेश असे बरेच काही असते. शिवाय त्या व्यक्तीचे हस्ताक्षर असते. त्यातून पण खूप शिकायला मिळते. 

तर आज रमेशचंद्र दादांच्या पत्रामुळे हे सगळे लिहिले गेले. याचे सर्व श्रेय त्यांना व त्यांच्या पत्राला आहे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जरब सिंगापुरी… – लेखिका : संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

??

☆ जरब सिंगापुरी… – लेखिका : संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनवणे ☆

काही स्मृती मनाच्या पाटीवर लिहिल्या जातात, पुसूनही जातात. काही कातळावरच्या शिलालेखाप्रमाणे कोरल्या जातात. एखाद्या वावटळीने त्या भूमिगत पाषाणावरची माती दूर होते आणि लख्ख दिसू लागते.

वीसपंचवीस वर्षांपूर्वीची अशीच एक गोष्ट ! सिंगापूरच्या ट्रिपमधल्या आमच्या लोकल बसमधला गाइड हिंदुस्तानी वंशाचा होता. त्याचे वाडवडील केरळमधले होते. सिंगापूरमध्ये स्थायिक झालेली ही त्यांची तिसरी पिढी.

उत्तम हिंदी- इंग्रजी बोलणाऱ्या या स्मार्ट अमीरशी आमची चांगली गट्टी जमली. लांबच्या रस्त्याने जाताना आम्हा पर्यटकांचे व त्याचे भरपूर सवालजवाब होत असत.

एकदा कुणीतरी आश्चर्य व्यक्त केले की रस्त्यांवर, चौकात, भर रहदारीच्या ठिकाणीही पोलीस कसे दिसत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर देताना अमीरने जी गोष्ट सांगितली त्याने बसमधले आम्ही सर्व भारतीय थरारून गेलो.

अमीर म्हणाला, “माझी बहीण माझ्या घरापासून साधारण चाळीस मिनिटाच्या रस्त्यावर राहाते. ती एका हॉस्पिटल मध्ये नर्स आहे. जेव्हा तिची नाईट ड्यूटी असते तेव्हा माझी आई तिच्या लहान मुलांसाठी रात्री तिच्या घरी जाऊन राहाते. आईचे आवडते टी.व्ही प्रोग्राम संपले की साधारण आठ वाजता ती आमच्या घरून निघते आणि चालत चालत बहिणीच्या घरी जाते. चालत जाण्याचाच तिचा परिपाठ आहे. या बाबतीत ती आमचे ऎकत नाही.

भारतीय स्त्रियांची दागिन्यांची असोशी तर तुम्हाला ठाऊकच आहे. आम्हा बायकांच्याकडे पाहून डोळे मिचकावत तो म्हणाला. माझ्या आईच्या अंगावर पाचसहा तोळे सोनं कायम असतं. पण ना ती बहिणीकडे गेल्यावर ‘पोहोचले हं’ म्हणून फोन करते आणि ना आम्ही ‘पोहोचलीस ना ग?’ असे विचारायला फोन करतो.”

आमच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून अमीर हसला आणि म्हणाला, “आम्ही तिला अशा वेळी एकटीला कसे पाठवतो? इतके निश्चिंत का असतो याचे कारण जाणून घ्यायचे आहे तुम्हाला?”

आमचा जोरदार होकार आल्यावर त्याने खूप वर्षांपूर्वीची एक घटना सांगायला सुरुवात केली.

“१९६५ साली सिंगापूर मलेशियापासून स्वतंत्र झाले. नवी घडी बसवायची सुरुवात झाली. साधारण तेव्हाची गोष्ट!

सिंगापूरमध्ये एकदा एका महिलेची एका बदचलन माणसाने छेड काढली. तिच्या जवळ येऊन काहीतरी चावट बोलला. तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने लगेचच वाटेवरच्या पोलीस स्टेशनवर तक्रार नोंदवली.

पोलिसांनी त्याला धरून चॊकीत आणले. खटला झाला. पंधरा दिवसातच शिक्षा जाहीर झाली. फक्त पंचवीस फटक्यांची ! तो गुंड चांगला उंचापुरा, धिप्पाड, बलदंड शरीराचा होता. शिक्षा ऎकून तो हसला. त्याला हजर केले गेले.

या शिक्षेसाठी एक विशेष, कुशल माणूस बोलावला गेला होता. त्याच्याकडे घोड्याच्या मूत्रात भिजवलेला पातळ फोक होता. त्याचे तांत्रिक कौशल्य असे होते की ज्या ठिकाणी पहिला फटका बसला असेल त्याच जागेवर तो नेमका पुढचा फटका मारीत असे.

तो बलदंड माणूस हसत हसत समोर उभा राहिला. आपल्या शक्तीवर त्याचा प्रचंड विश्वास होता. त्याची पँट काढली गेली आणि त्याच्या पुष्ट पृष्ठभागावर, सट्कन वेताचा एक फटका बसला. त्याला काही कळायच्या आतच नेमक्या त्याच जागेवर दुसरा फटका बसला. कातडे फाटून रक्त वाहू लागले आणि कळवळून तो राक्षसी शरीराचा माणूस धाडकन खाली कोसळला. तो किंचाळत होता. नो नो म्हणत होता.

फटके मारणारा थांबला. मलमपट्टी करून त्या गुन्हेगाराला घरी पाठवले गेले. पण जाताना सांगितले गेले की जखम भरली की पुन्हा चौकीत हजर व्हायचे. पंचवीस फटके पुरे होईपर्यंत त्याची शिक्षा पूर्ण होणार नव्हती.

या सर्व शिक्षाप्रक्रियेचा व्हीडिओ केला गेला. शहराच्या चौकाचौकात पडदे उभारून तो आठवडाभर जनतेला दाखवला गेला. भीती अत्तरापेक्षा वेगाने पसरते.”

अमीर पुढे म्हणाला की “पुढच्या शिक्षेचं काय झालं माहीत नाही. त्या माणसाचं काय झालं ते ही माहीत नाही पण त्याचा परिणाम काय झाला ते माहिती आहे. आमच्या स्त्रिया निर्धास्त झाल्या. माझ्या आईप्रमाणे कित्येक स्त्रिया आज रात्रीदेखील बिनधास्त फिरू शकतात. आपले कामधंदे निर्भयपणे करू शकतात.”

अमीरच्या बोलण्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मला मायदेशातल्या एका कवीची कविता आठवली की, कोर्टाच्या पायरीवर बसलेल्या सत्तरपंचाहत्तर वर्षांच्या एका वृद्धेला विचारले जाते की तुम्ही इथे कशासाठी बसला आहात? तेव्हा आपले पांढरे केस सावरत ती कोरड्या डोळ्यांनी म्हणते की वयाच्या पंधराव्या वर्षी तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या खटल्याचा आज निकाल आहे.

खिडकीतून बाहेर बघत मी सुन्नपणे बसून राहिले. आमच्या प्रश्नाच्या मिळालेल्या उत्तराने मनात कितीतरी प्रश्नांचे मोहोळ उभे राहिले होते. आज त्यातल्या मधमाशा पुन्हा डंख मारू लागल्या आहेत.

लेखिका : सुश्री संजीवनी बोकील.

प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पत्रास कारण की… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ पत्रास कारण की… ☆ श्री सुनील शिरवाडकर

यंदाच्या दिवाळीला मला जावयाने एक पुस्तक भेट दिलं.

त्यांचं नाव..’ पत्रास कारण की..’  अरविंद जगताप त्याचे लेखक आहेत.

झी मराठी वर ‘चला हवा येऊ द्या ‘ नावाचा कार्यक्रम असतो.एकदा अरविंद जगताप यांनी त्या कार्यक्रमात एक पत्र पाठवले.ते त्या कार्यक्रमात वाचून दाखवले. खूप जणांना ते आवडले.अजून एक पत्र लिहा असा त्यांना आग्रह झाला.आणि मग तो सिलसिला सुरू झाला.सागर कारंडे ती पत्र वाचून दाखवायचे. मुळात ती पत्र खूप संवेदनशील..भावनाप्रधान..त्यात सागर कारंडेच्या आवाजाने त्या शब्दांना गहिरा अर्थ प्राप्त व्हायचा.

खूप लोकांचा आग्रह झाला..या पत्रांचे पुस्तक प्रकाशित व्हावं. मग झी मराठीच्या सहकार्याने ग्रंथाली ने हे पुस्तक प्रकाशित केले.खूप विविध विषयांवर लिहीलेली पत्रे त्यात आहेत.

खरंतर पत्रलेखन ही एक कलाच आहे.पण हळूहळू आपण ती विसरत चाललो आहे.पत्र लिहिणं  तर दूरच.. आपण लिहिणंच विसरत चाललो आहे.आता फक्त टायपिंग करणं हेच आपल्याला माहीत आहे.पत्र लिहीण्यात..ते पाठवण्यात आनंद तर होताच..पण पत्राची वाट पहाण्यात पण एक मोठा आनंद होता.आपल्या घरुन आलेली पत्र सीमेवर लढणाऱ्या जवानांना जगण्याचं बळ देत होती.गावाहुन आलेली पत्रे होस्टेलवर शिकणाऱ्या मुलांचा जगण्याचा आधार होती.पोस्टाच्या त्या लाल पेटीकडे  बघुन एक वेगळी भावना मनात निर्माण व्हायची.

बहुतांश निरक्षरता असलेल्या गावांमध्ये पोस्टमन हाच एक जाणता माणूस असायचा. गावकऱ्यांकडे आलेली पत्र तोच उघडायचा..तोच वाचून दाखवायचा.घरातली माणसं तो काय वाचून दाखवतो.. त्याकडे कानात प्राण आणून बसायचे.पोस्टमन हा सगळ्यांच्या घरातलाच एक माणूस होऊन जायचा.

काही काही पत्रे तर ऐतिहासिक ऐवज म्हणुनच जपली गेली.आदर्श राज्यकारभार कसा असावा, याबद्दल शिवाजी महाराजांनी लिहिलेली पत्रे तर आजच्या राजकारण्यांची वाचणं खूपच गरजेचं आहे.पं.नेहरुंनी इंदिरेला लिहीलेली पत्र आवर्जून वाचण्यासारखी आहे.

पत्रे लिहीणे ही कल्पनाच हळूहळू लोप पावत चालली आहे.या पत्र लेखनावरुन मला एक आरती आठवली.खरंतर ते एक भजन आहे.आमच्या गल्लीत नवरात्र उत्सवात आरत्या म्हटल्या जातात.त्यात हे भजन आरतीप्रमाणे म्हटलं जातं.

… हे आहे विठ्ठलाचं भजन.हे भजन म्हणजे पांडुरंगाला पाठवलेले एक पत्रच आहे.पण आमच्या इथे आम्ही देवीचे भक्त देवीला पत्र लिहीत आहे असं समजून आरती म्हणतो.

त्या आरतीची संकल्पना अशी आहे की एक देवीचा भक्त आहे.त्याला असं वाटतं की आपण देवीला एक पत्र लिहावं.आपल्या भावना..आपलं सुख..आपलं दुःख.. सगळं सगळं त्या पत्रात लिहावं.

*मला वाटते एकदा तुला पत्र लिहावे

माया मोह प्रपंचाचे सारे कळवावे*

… असं म्हणून तो पत्र लिहितो.

आता हे एवढं पत्र लिहिले तर आहे..पण ते देवीला पाठवायचे कसे?त्याला थोडीच देवीचा पोस्टल ॲड्रेस माहीत आहे?देवीचं रुप चराचरात भरलं आहे हे तर आहेच..पण पत्रावर पत्ता काय लिहायचा?

*तुजला कसे आठवू

पत्र कोठे पाठवू 

पत्ता तुझा ठाऊक नाहीं गं

अंबे..गाव तुझे माहीत नाही गं*

पत्र लिहिल्यावर तो भक्त अगदी आठवणीने देवीच्या घरच्यांना नमस्कार कळवतो.

*साष्टांग नमस्कार देवी तुझ्या चरणाला

साष्टांग नमस्कार तुझ्या कुटुंबाला*

आणि मग शेवटी देवीला पुन्हा विनवितो..

*एवढे पत्र वाचुन पहावे

त्यांचे उत्तर लवकर द्यावे*

आरती लिहिणाऱ्या कवीनं ते पत्र पाठवले का.. पाठवले तर कुठे हे महत्त्वाचे नाही.देवीला..आपल्या लाडक्या दैवताला पत्र पाठवावं ही कल्पनाच किती सुंदर आहे.मनातल्या भाव भावना तिथे किती नि:संकोचपणानं लिहीता येतील.खरंच..मन मोकळं करण्यासाठी पत्र लिहीणं हा सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग आहे

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ऋणानुबंधाच्या गाठी…’ भाग – २ ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर

(आता उजव्या हातांनी लेखन करणे अशक्य झाल्यावर त्यांनी आपल्या संपादकत्वाचा राजिनामा दिला.) इथून पुढे —- 

आपल्या शिक्षकी पेशातून किती तरी वर्षांपूर्वी अण्णा निवृत्त झाले होते. पण पुढे कित्येक वर्षे अध्यापन, लेखन त्यामुळे ते खर्‍या अर्थाने निवृत्त झाले नव्हतेच. या दुखण्याने मात्र त्यांना निवृत्त केलं. आता ते इतके रिकामे रिकामे झाले,  की मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. बोलता येईना,  त्यामुळे संवाद थांबला. लिहिता येईना, त्यामुळे लेखन थांबलं. लोकसंपर्कही हळूहळू कमी झाला. आपल्यामुळे कुणाला कसला त्रास होऊ नये, म्हणून अण्णा विलक्षण जागरुक असायचे. पण या काळात अण्णांना नेमके काय हवे,  कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन ती गरज भागविण्यासाठी उज्ज्वला आपणहून पुढे आली. वहिनी अर्थात होत्या. पण त्या घर, स्वयंपाक-पाणी, अण्णांचं पथ्यपाणी यात गुंतलेल्या. त्यात त्यांचं वयही सत्तरीच्या जवळपास.

वर्षातून एकदा लांबचा प्रवास करून यायचा, असा अण्णा-वहिनींचा गेल्या ३०-३५ वर्षातील शिरस्ता. मागे एकदा कन्याकुमारीला भेट दिली, तेव्हा विवेकानंद स्मारकाचा विकास झालेला नव्हता. पुन्हा त्या भागात जाऊन ते स्मारक बघून येण्याची इच्छा दोघांच्याही मनात निर्माण झाली. आता अण्णांनी पंचाहत्तरी गाठलेली. वहिनी अडुसष्ठच्या पुढे. त्यात अण्णांची बोलण्याची, लिहिण्याची, घास गिळण्याची समस्या. उज्ज्वलाने यावेळी पुंडलिकाची भूमिका बजावत वयाने वृद्ध पण मनाने तरुण असलेल्या दांपत्याला, शरिराने काही प्रमाणात विकलांग, पण मनाने निरामय असलेल्या आपल्या गुरुला आणि गुरुपत्नीला दक्षिण भारताची मुशाफिरी व विवेकानंद स्मारकाचे दर्शन घडवले.

प्रवासाला गेलं की तिथली माहिती समजून घ्यायची. टिपणे काढायची आणि नंतर अत्यंत रोचक व माहितीपूर्ण प्रवासवर्णन लिहायचं,  हाही अण्णांचा नित्याचा प्रघात. यावेळी उजव्या हाताच्या बोटांना पकड नव्हती. त्यांनी हळूहळू डाव्या हाताने लिहिण्याचा सराव केला. अजून व्यवस्थित लेखन होत नव्हतं,  पण वाचून कळेल इतपत लिहायला जमू लागलं. लेखनाची उर्मी अशी उदंड की लेखन केल्याशिवाय राहवेना. प्रवास संपवून मंडळी घरी आली. अण्णांनी रोज थोडं थोडं जमेल तसं वेड्या-वाकड्या अक्षरात लेखन केलं. उज्ज्वलाने इतरांना समजेल, अशा अक्षरात त्याची मुद्रण प्रत तयार केली. दक्षिण भारताचे सुंदर प्रवास वर्णन पुढे प्रसिद्ध झाले. साधु वासवानी यांच्या विचारांचा इंग्रजीवरून मराठी अनुवाद त्यांनी केला. शालेय मुलांना उद्बोधक अशी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी बजावलेल्या पाश्चात्य कर्तृत्ववान व्यक्तींचा परिचय करून देणारे माहितीपूर्ण लेखन त्यांनी ‘ मानवतेचा दीपस्तंभ ‘ या दोन भागात केले. या सार्‍या लेखनाला वाचनीय अक्षरांचे रूप देण्याचे काम उज्ज्वलाने केले आणि नंतर ती प्रकाशित झाली.

उज्ज्वला अशी मुलीसारखी घरी येत राहिली. मुलीसारखी वहिनींना घरकामात, अण्णांना लेखनात मदत करत राहिली. अण्णांना क्वचित बाहेर त्यांच्या समवयस्क मित्रांकडे घेऊन जाऊ लागली. अण्णांना अर्धांगाचा झटका आल्यापासून वहिनींनी स्वत:च्या जेवणाची आबाळ करायला सुरुवात केली. आपण सवाष्णपणे या जगाचा निरोप घ्यायचा, असा त्यांचा मनोनिग्रहच होता जणू. दवाखान्यातून आल्यावर अण्णांची प्रकृती सुधारली. कारण वहिनी त्यांचे पथ्यपाणी नीट सांभाळत होत्या. वहिनींची प्रकृती मात्र खालावत गेली,  कारण त्यांनी आपल्या प्रकृतीची फारच हेळसांड केली. जुन्या संस्काराचा मनावर पगडा असलेल्या वहिनींनी अहेवपणी जाण्याचा नियतीशी जणू हट्टच धरला. आणि अखेर ती शर्यत जिंकली. त्या १९८९ च्या जुलैमध्ये कालवश झाल्या.

वहिनी गेल्या. नंतर अण्णांची काळजी घेणारे घरात कुणी उरले नाही. त्यांचे धाकटे भाऊ होते  पण ते स्वत:च थोडे अपंग होते. धाकटा मुलगा चाळीशीचा असला, तरी थोडा लाडावलेला. थोडा गतिमंद. त्या दोघांचीही अर्थात लग्ने झालेली नव्हती. मोठा मुलगा नोकरीनिमित्त इंदौरला. तो किती राहणार? यावेळी उज्ज्वलाच आण्णांच्या घरी रहायला आली. अण्णांचे पथ्य सांभाळले. पातळ जेवण करून,  मिक्सरमधून काढून ती ते चमच्याने अण्णांना भरवू लागली. त्यांना गिळता येत नसे. झोपवून चमच्याने ते पातळ जेवण थेट घशात सोडावं लागे. अण्णांची आई बनून तिने त्यांना जेवू घातले.

वर्षभर सगळं ठाक-ठीक चाललं. अण्णांचं जेवण, पातळ खीर, अंबील, मिक्सरमधून पोळी काढून त्यात दूध घालून केलेली पोळीची पेस्ट असं सगळं करून ती शाळेत जाई. हे घर तसं मध्यवर्ती होतं. तिचं स्वत:चंही घर शाळेपासून जवळ होतं. तिला शाळेतून येताना घरी डोकावता येत असे. तिचा मुलगा-मुलगी,  आई-वडील,  भाऊ यांना भेटून येता येत असे. मुलीचे लग्न झाले होते. तिला एक नातही होती. या सार्‍यांची ख्याली-खुशाली विचारून,  घरचं हवं – नको पाहून ती संध्याकाळी अण्णांकडे येऊ शकत असे. पुढे वाड्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. बिल्डरने दिलेली पर्यायी जागा उज्ज्वलाच्या दृष्टीने खूप लांब होती. तिला दोनदा बस बदलून शाळेत जावं लागणार होतं. अण्णा तिला म्हणत, ‘वाडा सोडला, की तू आपल्या घरी जा. साडी, चोळी, बांगडी देऊन माहेरवाशिणीची पाठवणी करतो.’  आण्णा म्हणायचे,  म्हणजे लिहून दाखवायचे. ती म्हणायची, ‘ मग तुमचं कोण करणार? ‘  ते म्हणायचे, `मी दूध वगैरे पेय घेऊन राहीन. बाकीचे नेहमीप्रमाणे डबा आणतील. तू इतक्या लांब येऊ नकोस. तुझी खूप ओढ होईल.’  पण ती म्हणायची,  ‘ मी वहिनींना वचन दिलय,  शेवटपर्यंत तुमची काळजी घेईन. मीही तुम्हा सर्वांबरोबर तिकडच्या घरी येणार !’

उज्ज्वला आता इतकी घरातली झाली होती की आम्ही भाच्या-पुतण्या आण्णांना भेटायला गेलो की तिला इतका आनंद होई, माहेरवाशिणींचं किती कौतुक करू आणि त्यांच्यासाठी घरात काय काय करू, नि काय काय नको, असं तिला होऊन जाई. अण्णांना मुलगी असती, तर तिने तरी त्यांच्यासाठी इतकं  केलं असतं की नाही कुणास ठाऊक? कदाचित् ती देखील आमच्यासारखी आपल्या संसारात गुरफटून गेली असती.

आण्णांचा मोठा मुलगा नोकरीच्या निमित्ताने दूर गावी होता. तो आण्णांना सारखा `तिकडे चला’  म्हणायचा. पण अण्णांना पुणं सोडून कुठेच जायचं नव्हतं. ‘नेत्रदान केलंय.. देहदान केलंय…’ वगैरे सबबी ते सांगायचे. खरी गोष्ट अशी होती की त्यांना अखेरच्या दिवसात, आपली वास्तु,  जी त्यांच्या पत्नीची स्मृती होती आणि आपली कर्मभूमी या गोष्टी सोडून कुठेही जायचं नव्हतं,  हेच खरं. या स्थितीत त्यांच्याजवळ होती,  त्यांची एके काळची विद्यार्थिनी, जी गुरु-ऋण मानून आपलं शिक्षण संपल्यावरही, त्यांच्या गरजेच्या काळात,  त्यांची काळजी घेण्यासाठी आपलं घर,  आई-वडील,  भाऊ,  मुलगा या सार्‍यांपासून दूर आपल्या गुरुजवळ राहिली. आता अण्णा जाऊनही किती तरी वर्षे झाली. पण तिने त्यांच्यासाठी जे केले त्याला खरोखरच तोड नाही. त्या  `ऋणानुबांधाच्या गाठी ‘ होत्या हेच खरं !

– समाप्त –

©  सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिसते तसे नसते… – लेखक – श्री मिलिंद घारपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

दिसते तसे नसते… – लेखक – श्री मिलिंद घारपुरे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

अगदी आजचीच सकाळ ची गोष्ट…. 10 ते सव्वा 10 चा सुमार..

गोडवा.’ .. .. प्रसिद्ध मराठी फूड जॉईन्ट.

 

मी मला हवे असलेले पदार्थ  मागवले तेवढ्यात एक वयोवृद्ध जोडपं माझ्या अगदी समोर येऊन बसले.

पुरुष चांगल्या शर्ट पॅन्टमध्ये तर  बाई साडी नेसलेल्या sleeveless ब्लऊज … बॉबकट केलेल्या 

दोघे जवळपास 75 ते 80 पार केलेले..

 

तो सदगृहस्थ अगदी शांतपणे सगळे करत होता. त्यांची बायको सारखी त्याच्यावर करवादत होती 

साधे पाणी प्या… थंड नको.  काय मागवू ? “ 

त्याने सरळ मेनू कार्ड बायकोच्या हवाली केले 

मिसळ…. झणझणीत त्यांनी हळूच…’ 

काही नको तिखट ..  मग त्रास मला होतो तुम्हाला काय…”

बर मग बटाटे वडा….”

काही नको… साधा उपमा दे रे कमी तिखट आणि पातळसर….. आणि नंतर 2 कॉफी without sugar “.  

त्या बायकोने ऑर्डर सोडली…

बिचारे… मला त्या सदगृहस्थाची दया आली.. बायकोसमोर बिचारा अगदी गलित गात्र… झाला होता 

काहीच बोलू शकत नव्हता.  

त्यांचा उपमा आला… नंतर कॉफी आली… दोघे हळू हळू सावकाश खात होते 

इतक्यात घो घो करत दोन पोलीस van आणि एक जीप त्या ‘ गोडवा ‘ समोर थांबल्या 

धडा धड… तिन्हीमधून कडक ड्रेस घातलेले कितीतरी पोलीस ऑफिसर्स उतरले.  

त्या सदगृहस्थाच्या टेबलं वर येऊन… “ सर कधी आलात आम्हाला सांगायचे नाहीत का ? तुम्हाला कुठे जायचे आम्ही सोडतो… कसे आहात सर…” 

खटाखट पाय जुळवत सॅल्यूट केले गेले… आता ते सदगृहस्थ खडकन उभे राहिले 

त्यांची पत्नी म्हणू लागली… “ चालेल… आम्हाला …  “ 

त्यांनी हात वर केला. बायकोला एका क्षणात गप्प केलं. ठामपणे म्हणाले “ मी जाईन ऑटोने thanks “

…. सिंह परत नखें आणि आयाळीसह परतला होता 

 

काय 5 मिनिटात विलक्षण बदल झाला होता. त्यांनी झाडून सगळ्यांची तपशीलवार चौकशी केली 

आता चौकीवर कोण अधिकारी आहेत ते विचारले … ड्युटी… पेट्रोलिंग.. राऊंड…रायटर आता कोण आहे….. सगळ्यांना पटपट आदेश दिले.  

 

एक इन्स्पेक्टर बिल द्यायला पुढे झाला, त्याला सांगितलं … “ नो इन्स्पेक्टर… I will pay..” 

सगळ्यांना 10 मिनिटात रवाना केले. पैसे दिले. 

..  आता सगळेच त्यांचे हे आगळे रूप पाहून हतबुद्ध झाले होते. कितीतरी जणांनी खाणे तसेच सोडले होते 

वेटरने ऑर्डर घेणे थांबवले होते … घडलेली घटनाच अशी होती 

अर्ध्या तासापूर्वी दिन पतित गरीब वाटणारा…सगळ्यांचा बाप निघाला होता…

 

कोण होते ते माहिती आहे ??… ते नंतर सगळ्यांना समजले 

ते होते महाराष्ट्र राज्याचे “ पोलीस महासंचालक रमाकांत कुलकर्णी “ 

…. आणि त्यांच्या सोबत होत्या त्यांच्या पत्नी सौ. श्वेता रमाकांत कुलकर्णी.

 

निशब्द….

लेखक :  श्री मिलिंद घारपुरे

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?  विविधा ?

लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जाता जाता सहज एक संवाद कानावर पडला. बागेत फिरायला आलेल्या व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. त्या दोन शेजारी राहणाऱ्या शेजाऱ्यांची ओळख बागेत झाली. किती जग पुढे गेले आहे ना (?) 

त्या मानाने आमची पिढी फारच मागास म्हणावी लागेल. कारण आम्ही म्हणजे घरातली भाजी आवडली नाही म्हणून हक्काने शेजारी जाऊन जेवत होतो. आपल्या घरात काय चालले आहे याची माहिती शेजाऱ्यांना असायची. लग्नाच्या मुलीला बघायला पाहुणे येणार असतील तर तिचे आवरणे (मेकअप) शेजारच्या घरात होत होता. आणि जास्त पाहुणे आले तर शेजारी त्यातील काही पाहुणे स्वतःच्या घरी नेत होते. आणि त्यांचा व्यवस्थित पाहुणचार करत होते. हे सर्व वाडा किंवा चाळ संस्कृतीत होत होते. अगदी वाटीभर साखर, चार लसूण पाकळ्या, दोन मिरच्या, दोन कोथिंबीरीच्या काड्या यांची हक्काने देवाण घेवाण चालायची आणि गरम पोहे, भाजी आपुलकीने घरात यायची. सगळी मुले सगळी घरे आपलीच असल्या प्रमाणे वावरत होते. आणि शेजारी हक्काने प्रेम व शिक्षा दोन्ही करत होते. आणि त्यावर कोणाची काहीच हरकत नव्हती. ठराविक वेळेत घराचे दार उघडले नाही तर शेजारी चौकशी करत होते. जर उशिरा उठायचे असेल तर आदल्या दिवशी शेजारी सांगावे लागत होते.

सामान आणायला गेल्यावर दुकानदार हक्काने कोणताही पाढा किंवा कविता म्हणायला लावायचा. आणि काही चुकले तर घरी रिपोर्ट जायचा. आमच्या घरा जवळचे एक दुकानदार दुकानात येणाऱ्या मुलांना पाढे म्हणायला लावायचे आणि पाढा आला नाही तर वस्तू द्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे तो पाढा पाठ करून जावे लागत होते. अशी समाजाकडून प्रगती होत होती.

त्यामुळे बाहेर वावरताना एक धाक होता. आपले काम सोडून कोणी मूल इतरत्र दिसले तर शेजारी हक्काने कान पकडून घरी आणत होते. आणि घरातील व्यक्ती म्हणायच्या असेच लक्ष असू द्या. त्यामुळे मुले बिघडण्याचे प्रमाण खूप कमी होते. प्रत्येक घरात संध्यादीप लागले की शुभंकरोती म्हटले जात होते. सर्व मुले एकत्रित पाढे, कविता म्हणत होते. आणि एखाद्या मुलाला घरी यायला उशीर झाला तर सगळे शेजारी त्याला शोधायला बाहेर पडत होते.

अगदी लग्न ठरवताना वधू किंवा वर यांची चौकशी समाजातील किराणा दुकानदार, न्हावी, शिंपी यांच्याकडे केली जात होती. कारण ती चर्चेची ठिकाणे होती. आणि त्यांनी वधू किंवा वर यांची वर्तणूक चांगली आहे असे सांगितले की, ते लग्न निश्चित ठरायचे. अशा खूप आठवणी आहेत.

पण माणसे प्रगत झाली. शेजारचे जवळचे नेबर झाले. घरे फ्लॅट झाली. शेजारचे काका अंकल झाले. ज्यांची ओळख आपोआप होत होती त्यांची ओळख बागेत होऊ लागली. शेजाऱ्यांच्या घरातील वावर कमी झाला. शेजारी फोन करून घरी आहात का? येऊ का? असे विचारु लागले. दोन घरात एकच भिंत असून मनात दुरावा वाढला. तुम्हाला काय करायचे आहे? किंवा आपल्याला काय करायचे? अशी भूमिका दोन शेजाऱ्यांच्या मनात निर्माण झाली. आणि सर्वांनाच अपेक्षित पण घातक स्वातंत्र्य मिळाले. सध्याच्या काही मुलांच्या बाबतीतल्या घटना बघितल्या की वाईट वाटते. आणि कुठेतरी हे ओढवून घेतलेले स्वातंत्र्य याला कारण असावे असे वाटते. आपुलकीचा शेजार असेल तर नकळत संस्कार होतात. मुलांना थोडा धाक असतो. हल्ली पालक वारेमाप पैसा मिळवतात. आणि मुलांना पुरवतात. कोणाचाच धाक नाही. आम्ही काहीही करु तुम्ही कोण विचारणारे? असे विचार वाढत आहेत. याला कोणते स्वातंत्र्य म्हणायचे हेच कळत नाही.

माझ्या सारख्या शेजाऱ्यांच्या प्रेमात व धाकात वाढलेल्या ( सध्या याला मागासलेले म्हणतील ) व्यक्तीला हे अती स्वातंत्र्य खुपते आणि चिंता वाटते. सगळे माझ्या मताशी सहमत असतील असे नाही. पण मला लुप्त होत असलेले शेजारी आठवतात. आणि आवश्यक वाटतात

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘‘मी गतीचे गीत गाई…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘मी गतीचे गीत गाई…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

श्रद्धेय बाबा आमटे आणि संपूर्ण परिवाराचं कार्य अतुलनीय आहे. जिद्दीचा अंगार पेटवलेल्या बाबांनी वंचितांच्या सुखदुःखाशी, आंतरिक वेदनेनं जोडलं जात असताना, खडकाळ, ओसाड, जमिनीतून आनंदवन नावाचं नंदनवन फुलवलं. यात तपस्वीनी साधनाताईंचे हात बळकट तर होतेच. त्यांची पुढली पिढीही… सर्व आदरणीय.. डॉ. विकासदादा, डॉ. भारतीताई तसंच, डॉ. प्रकाशदादा, डॉ. मंदाताई आणि त्यापुढील पिढीही आनंदाने या कार्यात सामील झाली, हे ईश्वराने मानवाला दिलेलं वरदानच आहे! विकासदादा आणि या कुणाच्याही बाबतीत त्यांच्या कार्याचा गौरव करणं, म्हणजे सूर्याला पणती दाखवणे होय ! मी आज विकासदादांबद्दल एक छोटीशी, पण अविस्मरणीय आठवण सांगणार आहे.

साधारण १५ एक वर्षांपूर्वी, ठाण्याच्या गडकरी रंगायतन सभागृहात विकासदादांचा ‘स्वरानंदवन’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. त्यानिमित्ताने मी स्वतः गाडी चालवत दादरहून ठाण्याला गेले होते.

कार्यक्रम अतिशय रंगला. विकासदादांसह सर्वच जण एकसे एक सुंदर गायले. आश्चर्याने तोंडात बोटे घालावी असे प्रत्येक जण सहजसुंदर गात होते. त्यांचं दैवी गाणं ऐकल्यावर त्यांना ‘differently abled’ कोण म्हणणार? विकासदादांनी संगीताच्या क्षेत्रातही, ही अजोड अशीच कामगिरी केलीय ! विकासदादा स्वतः ही खूप सुंदर गायले. सर्वांचंच मला खूप कौतुक वाटत होतं. ते पाहून त्यांनी मला थोडं गायला आणि भाषण करायलाही सांगितलं.

 कार्यक्रम संपल्यानंतर विकासदादांना माझ्या घरी शिवाजी पार्कला, नव्या घरी येऊन, पायधूळ झाडण्याची मी विनंती केली. सुनीलनेही फोन करून अगत्याने घरी यायचे निमंत्रण दिले. कुठेही आढेवेढे न घेता ते सहजतेनं ‘हो’ म्हणाले आणि माझ्या गाडीत बसले. त्या क्षणी मला काय धन्य धन्य वाटले म्हणून सांगू!

आधीच सर्वांच्या गाठीभेटी घेत उशीर झाला होता. त्यामुळे मी नेहमीप्रमाणे गाडी झूम झूम मजेत हाकली. विकासदादांनीही मोकळ्या रस्त्यावर “पद्मजा, काय सुसाट चालवतेस” म्हणून कौतुक केले. पण काय झाले कोण जाणे ! गाडी सायनजवळ आली आणि अचानक बंद पडली ! त्या मिट्ट अंधारात रस्त्यावर कोणीही मदतीसाठी दिसेना. मोठी पंचाईत झाली ! इतक्या महान व्यक्तीला मी आदराने गाडीत बसवले खरे, पण कधीही बंद न पडणारी गाडी बंद पडली…. आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधारीच आली ! 

इतक्यात विकासदादा गाडीतून उतरले आणि, ” पद्मजा, काही काळजी करू नकोस, ” असं म्हणत त्यांनी गाडी ढकलायला सुरुवात केली. मी गचके देत गाडी सुरू केली… परत गाडी बंद… परत धक्का देणे… असे करत करत पाचव्या मिनिटाला गाडी सुरू झाली, आणि आम्ही सुखरुप घरी आलो. सुनील वाट पाहतच होता. मी विकासदादांचं औक्षण केलं. त्यांनी माझ्या घरी पायधूळ झाडल्याने, माझं घर आनंदाने न्हाऊन निघालं !….. त्याआधी त्यांना गाडीसाठीही पायधूळ झाडावी लागली याची मला खंत आणि लाजही वाटत होती. परंतु त्रासाचा, कटकटीचा किंवा क्लेषाचा लवलेशही विकास दादांच्या चेहर्‍यावर नव्हता. कित्ती सहजपणाचे हे वागणे !

… बाबांसारख्या महान योगी, तपस्व्याचे कार्य पुढे नेणाऱ्या, त्यांच्या आणि साधनाताईंच्या मुशीत घडलेल्या या अत्यंत साध्या, निगर्वी आणि कर्तृत्ववान अशा विकासदादांचे औक्षण करताना बाबांच्याच ओळी मला आठवत होत्या… 

शृंखला पायी असू दे

मी गतीचे गीत गाई…

दुःख उधळायास आता

आसवांना वेळ नाही…

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares