☆ पसारा…लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
शेजारणीने आवाज दिला म्हणून बायको कुकर लावून शेजारी गेली ….
.. म्हणाली ३ शिट्या झाल्या की बंद करा गॅस .. वर टाकीतही पाणी भरतंय, लक्ष असू द्या .. मोटर बंद करा वेळेत … मी म्हटलं हो ..
इतक्यात नळाला पाणी आलं .. लगेच धावत जाऊन बादली नळाखाली धरली धावताना शेंगदाण्याचा डबा उपडी झाला .. शेंगदाणे जमा करीतच होतो, इतक्यात कुकरची पहिली शिटी झाली .. अचानक झाली त्यामुळे दचकलोच ..
झटकन मागे गेल्यामुळे दळून आणलेल्या पिठाची पिशवी कलंडली , आणि त्या सांडलेल्या पीठात कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, भाज्या, गोऱ्यापान झाल्या ..
काय करावं ? सुचेना ….
परत नळाखाली भरत असलेल्या बादलीची आठवण झाली. लगबगीने बादलीकडे गेलो तर अजून बादली भरली नव्हती …
पुन्हा शिटी झाली … पटकन गॅस बंद केला. नंतर लक्षात आलं … दुसरीच शिटी होती ती ..
लाईटरने गॅस पेटवायला भीती वाटते .. मग माचीस घेतली .. १, २, ३ श्या ! माचीस काड्या फुकट गेल्या .. मग काय आधी कंटाळा केला ते केलं .. पंखा बंद केला … गॅस पेटवला ..
आता सांडलेले पीठ उचलू, की पसरलेले शेंगदाणे भरू.. बादली भरत आली ते पाहू.. की वर पाण्याची टाकी किती भरली ते पाहू ..
…. मी हैराण …काय करावं ? सुचेना
आवाजावरून लक्षात आलं .. पाणी वाहून जातंय .. बादली भरून सांडत होती ..
भरलेली बादली काढून दुसरी लावतोय .. तोच तिसरी शिटी झाली ..
तसं धावत येऊन पंखा लावला .. मनात म्हटलं माझं डोकं फिरलंय नक्कीच ..
सगळं सोडून आधी गॅस काढला .. इतक्यात पाणी वाहून जातंय असा आवाज .. वरची टाकी ओव्हर फ्लो … मोटर बंद केली ….
पण या नादात पंखा जरा उशिराच बंद केला ..
वाऱ्याने पीठ चांगलंच पसरलं, त्यात माझे ओले पाय … लादी चिकट.. बाप रे ..
व्हायचा तो पसारा झालाच .. आता बायको ओरडणार, हे मनात आलं तोवर बायको ही आलीच दारात.. काय करावं ? सुचेना
झाला पसारा पाहून आता ही मला झापणार .. म्हणेल “ काय हो, किती हा पसारा ?”
पण ती मात्र एकच म्हणाली.. “ अहो, तुम्ही या बाहेर. मी आवरते सगळं. तुम्ही तुमचं काम करा.”
एक टप्पा बॉल सारखा .. मी तडक किचनमधून हॉल मध्ये .. पण ह्या उडीत ही ओट्यावरची तेलाची बाटली कलंडलीच .. मी पुन्हा किचनमध्ये प्रवेश करणार तोच..
बायको पुन्हा त्याच स्वरात .. “राहू दे मी आवरते.”
मी सोफ्यावर शांत … चिडीचूप काय करणार ..?
…. पसारा का होतो याचे उत्तर मिळाले होते ना ……..
(किती तो पसारा असं बायकोला कितीतरी वेळा ठणकावून विचारून नवरेशाही गाजवणाऱ्या त्या सर्व नवरोबांसाठी)
☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-1 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆
(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…)
माणूस वस्त्याच्या रूपाने एकत्रित येऊन स्थिर झाला. त्यातून वाड्या, गावे यांची निर्मिती झाली. त्यातून गावगाड्याची निर्मिती झाली. या गावगाड्याकरिता प्रमुखाची गरज निर्माण झाली. त्यातून विविध पदांची निर्मिती झाली. पुढे माणूस स्थिर स्थावर झाल्यावर नोंद ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अशा रीतीने गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा झाली. त्याला वतनदार, जहागीरदार, जमीनदार, बलुतेदार या संज्ञा प्राप्त झाल्या.
प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकारते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुला, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.
वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असून वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो- वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. कारभा-यांना गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल त्या व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय. ते धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. यासोबत इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे एकाच संकल्पनेत मोडतात. महाराष्ट्रातील वतनदारांचा दर्जा आणि त्यांना करावी लागणारी कर्तव्ये पुढीलप्रमाणे-
पाटील : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली.
१) पोलिस पाटील
२)मुलकी पाटील.
गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुरव हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले… उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा.
चौगुलाम्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत (गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वत:हून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा.
गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती – त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे याला पण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकर्ण्यांच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले.
‘बोलण्याची शक्ती’ हे निसर्गाने फक्त मानवालाच दिलेलं वरदान आहे. आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे ते एक साधन आहे. तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातला खरेपणा, प्रामाणिकपणा, समोरच्याबद्दल आदर, आपुलकी सारं काही बोलण्यातून कळतं. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आहेत! हे इतके महत्त्वाचे असूनही आपण ते अधिक चांगले करण्यासाठी प्रयत्न करत नाही.
‘आहे हे असं आहे’,
‘माझा आवाजच मोठा आहे’,
‘मला अशीच सवय आहे’
असं म्हणत आपण स्वतःचं समर्थन करतो.
बोलणं शिकावं लागतं आयुष्यभर.
‘कौन बनेगा करोडपती’ मी फक्त अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पाहिले आहे. शब्दोच्चार, आवाजाचा चढ – उतार शिकायचं असेल तर हा आवाज अभ्यासायलाच हवा. आवाजाची, बोलण्याची साधना, तपस्या म्हणजे अमिताभ बच्चन! काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरं कोणी करू शकत नाही, हे हळूहळू कळत जातं.
शब्द जगलेला माणूस तो शब्द उच्चारतो, त्यावेळेस शब्दांचा उच्चार ज्या ताकदीने येतो, त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.
बोलण्याचा आवाज हा आतून येतो! माणसाच्या चेतनेला स्पर्श करून, त्यामुळे शेवटी माणूस म्हणून आपण जितके घडत जातो, तितका आवाजही सुंदर होत जातो.
आशाताईंचं बोलणं गाण्याइतकंच सुश्राव्य आहे. जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे.
एक प्रयोग केला होता.,
सुंदर शब्दांची यादी वाचणं. प्रामाणिक, सत्य, अद्भुत, शक्ती… अशा सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल तशी मोठ्याने वाचायची. वाढवत जायचे हे शब्द. हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. बोलणं चांगलं होतंच, पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावंसं वाटत नाही, इतका अभिरुचीचा दर्जा वाढत जातो! संगत बदलते.
आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. शब्द जसे असतील, तशा घटना, तशा व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. मग शब्द बदलून आयुष्य बदलता येईल, हेही तितकंच खरं!
सावकाश बोलणं, स्पष्ट बोलणं, शक्यतो हळू बोलणं या सवयी मुद्दाम लावून घ्याव्या लागतात.
वाचनाने विचार स्पष्ट, मुद्देसूद होतात. नेमकं मोजकं बोलता येतं. कविता वाचत शब्द समजून घेता घेता बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि हृदयाशी संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी वाचन, काव्यवाचन महत्त्वाचं ठरतं .
कानात प्राण आणून ऐकावं अशी माणसं या जगात आहेत! फक्त शोधता – ऐकता आली पाहिजेत.
या बोलण्यातली सर्वांत टाळायची गोष्ट, म्हणजे पाल्हाळ लावणे, संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ बोलणे. वेळ ही संपत्ती असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये?
फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.
आपल्या माणसांशी बोलण्याने ताण हलका होतो.
बोलणं म्हणजे निव्वळ शब्द थोडेच असतात? न बोलता शांत सोबतही बोलणंच असतं.
वेळात वेळ काढून घराघरात संवाद झाले पाहिजेत. माणसामाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते. मनातले गैरसमज बोलून दूर करता येतात; पण त्याआधी कसं बोलायचं, ते या जगाच्या शाळेत शिकावंच लागतं.
बाकी हा जगण्याचा प्रवास अवघड आहे. शेजारी कोणी बोलणारं मिळालं, की प्रवास सोपा होतो.
तात्पर्य : ज्याच्या वाचेमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, दुनिया त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीस अशक्य गोष्टी शक्य होतात..
संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
स्वप्न नुसता शब्द जरी वाचला तरी कितीतरी विचार मनात रुंजी घालायला लागतात. कारण प्रत्येकाचे काही ना काही स्वप्न असतेच आणि ते कोणी बोलून दाखवले नाही तरी ते पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू असते.
स्वप्नांची सुरुवात जन्मल्यापासूनच होते. लहानपणी पाळण्यात बाळ झोपलेले असताना झोपेत बाळ गोड हसते किंवा झोपेतच दचकून एकदम रडायला लागते तेव्हा आजी किंवा घरातील मोठ्या व्यक्ती म्हणतात स्वप्न पाहिलं असेल. सटवाई बाळांना स्वप्न दाखवते.
नंतर मुल जसजसे मोठमोठे होऊ लागते तसतशी त्याची स्वप्ने पण बदलत जातात. आणि शक्यतो बदललेली स्वप्ने ही त्या त्या काळानुरूप त्याला योग्य वाटतील अशी असतात आणि लहान वयातील स्वप्ने बहुतांशी पूर्ण झालेली असतात म्हणून मग त्या आत्मविश्वासाने मोठी स्वप्ने पाहिली जातात.
अब्दुलजी कलाम यांनी म्हटलय छोटी स्वप्ने पाहणे हा अपराध आहे. स्वप्ने मोठी पहा त्याचा पाठपुरावा करा आपोआप ती पूर्ण होतील.
या बाबत ते असेही म्हणतात की स्वप्ने अशी नसावीत की जी झोपेत पाहिली जातात स्वप्ने अशी असावीत की जी झोपूच देत नाहीत.
साधारणपणे मुली ज्या असतात त्या बहुतांशी आपल्या सुखी संसाराचे असे एकच स्वप्न पहातात. त्यासाठी त्या झटत असतात. आणि अगदी १००% नाही तरी काही अंशी त्या त्यामधे यशस्वी होतात. पण मुलांची स्वप्ने मात्र वेगवेगळी असतात.
पण नेमके स्वप्न म्हणजे काय? तर स्वप्न म्हणजे ध्येय म्हणता येईल. जे गाठण्यासाठी ज्याची त्याची धडपड चालू असते. हीच गोष्ट त्याच्या जगण्याचे कारण बनते .लहानपणी आई वडिल किंवा मोठे सांगतात ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे वाटून पाहिलेले स्वप्न नंतर महत्व पटल्यावर चांगला अभ्यास करण्याचे स्वप्न नंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या नोकरीचे स्वप्न नंतर आपले संसार करण्याचे स्वप्न आणि मग संसारतील व्यक्तींना सुख देण्याचे स्वप्न या स्वप्नचक्रात माणूस अडकलेला असतो.
काहीजण कला जोपासण्याचे त्यात नाव कमावण्याचे स्वप्न पाहतात . किंवा काही जण वेगळे काही करून दाखवण्याच्या ईर्षेने पेटलेले दिसतात.
पण म्हणून सगळ्यांनाच महत्व प्राप्त होत नाही. स्वप्ने जी इतरांपेक्षा वेगळी असतात त्यात इतरांचेही हित सामावलेले असते जे सोपे नसते हे सगळ्यांना माहित असते पण असे स्वप्न जेव्हा कोणी पाहतो आणि ते पूर्ण करतो तेव्हा त्याचे नाव झालेले आपण पाहतो.
तर अशी ही स्वप्ने. पण यातूनही स्वप्नाचा खरा अर्थ समजत नाहीच. आपल्याला आश्चर्य वाटेल पण स्वप्नाचा आणि अध्यात्माचा जवळचा संबंध आहे.
कसा? अध्यात्म सांगते मी पणा सोडा. सगळे चांगले होईल. तसेच हे स्वप्न••• स्व पणा नसलेल••• पहा एखादे स्वप्न पूर्ण करणारा स्वत:ची तहान भूक विसरून किंवा बाकीचे जग विसरून अर्जूनाच्या लक्ष्याप्रमाणे फक्त स्वप्नाच्या पाठीमागे असतात. यामधे कुठेही स्व पणा अर्थात मी पण पर्यायाने अहं नसतो म्हणून ते स्वप्न.
सगळ्यांची स्वप्ने ही मी पणाशी निगडीत असतात म्हणून त्याला महत्व प्राप्त होत नाही. पण मोठी स्वप्ने ज्यामधे इतरांचेही हित सामावलेले असते अशी स्वप्ने पाहणारी माणसे वेगळीच असतात त्यामुळे अशी स्वप्ने पाहणार्याचे नाव होते आणि त्याचे अप्रुप वाटू लागते.
म्हणूनच चला ‘मी’पणा सोडून देऊ. सर्व समावेशकतेचे स्वप्न पाहू आणि घर शहर देश नव्हे सर्व जग सुखी करण्याचे स्वप्न पाहू
मला माणसांशी बोलायला, त्यांच्याशी संवाद साधायला फार आवडतं आणि खरं सांगायचं तर ते जमतंही पटकन ! माणसं मनातल्या गाठी माझ्याजवळ उकलतात हे मात्र खरं. त्यादिवशी दवाखान्यात नुसतीच बसले होते. मनात दुसरेच विचार घोळत होते. इतक्यात एक बाई दवाखान्यात शिरली. मी नीट बघितलं तर ती एक तृतीयपंथी व्यक्ती होती.
“ दीदी,आप मुझे दवाई दोगी क्या? पेटमें बहुत दर्द हो रहा है “. ती कळवळून सांगत होती. मी तिला टेबलवर घेतले आणि नेहमीप्रमाणे तपासले. ‘ माझ्याजवळच्या गोळ्या लगेच घ्या ‘असं सांगितलं आणि घरी घ्यायला दोन दिवसाचं औषधही दिलं. पाण्याचा ग्लास पुढं केला आणि ‘ गोळ्या घ्या ‘ असं म्हटलं. तिने त्या गोळ्या घेतल्या आणि मी म्हटलं,” थोडा वेळ बसा इथं खुर्चीवर.अर्ध्या तासानंतर जा.बघूया किती कमी होतं ते हं.” मी तिला बसवलं आणि वाचनात गुंगून गेले.अर्धा तास सहज झाला. ती संकोचून म्हणाली, “दीदी मला खूप बरं वाटायला लागलंय. खूप थांबलंय पोट दुखायचं. थँक्स दीदी “.ती स्वच्छ मराठीत माझ्याशी बोलत होती. “अहो,तुमचं नाव काय? कुठं रहाता? ” – “ दीदी, इथंच तर रहाते मी ! तुम्ही रोज स्कूटरवरून त्या शॉर्टकटने येता ना, मी रोज बघते तुम्हाला. आज खूप त्रास व्हायला लागला ना, म्हणून तुमची आठवण आली. नाहीतर कोणी डॉक्टर आम्हाला तपासायला तयार होत नाहीत. तुमचे खूप आभार ! “
मी म्हटले “ नाव काय म्हणालात तुमचं? ”
“ राणी “ किती सुंदर होती राणी . नीट बघितल्याशिवाय समजणारही नाही हिच्यात असं काही कमी आहे.
“ दीदी,किती पैसे झाले? “
मी म्हटलं “ राहू द्या हो !मग बघू.”
” असं नको !आहेत माझ्याकडे.” ती संकोचून म्हणाली.
मी म्हटलं, “ पुढच्या वेळी द्या नक्की. आज राहू दे. “
राणी खुशीनं हसली .तिचे अगदी एक ओळीत असलेले पांढरेशुभ्र दात चमकले. हळूहळू राणी माझी नेहमीची पेशन्ट झाली. माझ्या दवाखान्यात बाकावर बसलेल्या इतर पेशन्टनाही तिची सवय झाली होती. किती अदबशीर वागणं होतं तिचं ! आपला नंबर येईपर्यंत ती टेबलावर ठेवलेली मासिकं वाचायची. माझ्या चौकस स्वभावानुसार मी हळूहळू तिची माहिती विचारायला लागले.
राणीचं कुटुंब पुण्यातलंच ! मी जिथून शॉर्टकटने येते त्या वस्तीत तिची आई भाऊ त्याची बायका मुले सगळे एकत्रच रहातात. राणीचा भाऊ सिक्युरिटी गार्ड आहे. भावजय एका मॉलमध्ये नोकरी करते. राणी खरं तर एस.एस.सी.झालीय, पण आपल्या इथले दुर्दैव ! तिला कुठेही नोकरी मिळाली नाही. पण राणी फार उत्तम शिवण शिवते. तिच्याकडे वस्तीतल्या सगळ्या बायका कपडे शिवायला टाकतात. निरनिराळे फॅशनेबल ब्लाउज राणी इतके सुंदर शिवते की बस. वस्तीतल्या बायका तिच्याशी अगदी मैत्रिणीसारख्या वागतात.
सहज एकदा तिला विचारलं, “ किती ग मिळतात महिन्याला पैसे?”
” मिळतात की सहज दहा हजार रुपये ! “ ती म्हणाली. मी हे ऐकून गारच पडले. तशी राणी हसून म्हणाली, “ दीदी,तसं नाही. माझं शिवण बघून कॅम्पमधला एक माणूस मला शोधत आला. मला बघून म्हणाला, ‘अरे बापरे, तूच का ती राणी ?” मी म्हणाले, “ हो मीच ! नेमकं काय काम आहे तुमचं माझ्याकडे ? “ तो म्हणाला, “ तुमचं शिवण फार छान आहे. मी तुम्ही शिवलेले ब्लाउज बघितले आहेत, माझ्या एका गिऱ्हाईकाने घातलेले ! तिने तुमचा पत्ता दिला ! पण ….” आणि तो माणूस क्षणभर काहीच बोलला नाही. मग अवघडत म्हणाला .. “ पण तुम्हाला माझ्या दुकानात नोकरी नाही देऊ शकणार मी ! “ मग मीच आपणहून त्यांना म्हटलं .. “भय्या, तुम्ही मला कटिंग करून आणून द्या, मी तुम्ही सांगाल तसे देईन शिवून. माझी ऍक्टिवा गाडी आहे. मी आणून पोचवीन की दुकानावर.” मी त्यांना नमुन्याचे ब्लाउज आणि ड्रेस शिवून दिले. तो इतका खूष झाला. आता माझ्याकडे त्याचे खूप काम असते. मला सहज दहा हजार रुपये मिळतात त्याच्याकडून. दीदी, मी आता फॅशन डिझाइन मशीनही घेतली आहे मागच्या वर्षी ! “ किती अभिमानाने राणी सांगत होती.
मला राणीचं अतिशय कौतुक वाटलं. मी दवाखान्यात जातायेता राणी दिसायची. रस्त्यावरच घर होतं त्यांचं ! राणी भांडी घासताना, केर काढताना दिसायची. तिची आई, शेजारणी, गप्पा मारताना दिसायच्या. राणी बाहेर टाकलेल्या खाटेवर बसून तिच्या भाचरांचा अभ्यास घेतानाही दिसायची कधीकधी. मला मोठं कुतूहल आणि कौतुक वाटायचं या कुटुंबाचं. मी राणीच्या आईला हळूहळू बोलतं केलं. राणीच्या आई फार साध्या, अगदी गरीब स्वभावाच्या होत्या. मी बिचकतच विचारलं, “ राणीच्या आई, असं मूल झाल्यावर तुम्हाला काय वाटलं हो? राग नाही ना आला माझा? नाहीतर नका देऊ उत्तर.” — “ नाही हो बाय ! कसला राग आणि काय ! पहिला मुलगा माझा एकदम छान हो. त्याच्या पाठीवर हे बाळ झालं. आम्ही घाबरूनच गेलो असलं मूल बघून. तो डॉक्टर म्हणाला, “ देऊन टाका याला कोणत्यातरी आश्रमात. तुमचं आणि त्याचं जिणं हराम होईल बघा.” पण माझा जीव नाही झाला हो असं करायला. म्हटलं मी वाढवीन याला. कसाही असला तरी माझ्या पोटचा आहे ना हा. चार वर्षे होईपर्यंत मी मुलगा म्हणूनच वाढवला याला. पण मग मोठं झाल्यावर तो मुलाचे कपडे घालीचना. बहिणींचे फ्रॉक, स्कर्ट घालायचा. दिसायलाही किती सुंदर आहे तुम्ही बघताच की ! मग मी त्याला मुलींसारखा वाढवला. लै हाल काढलं लेकरानं शाळेत. पण झाला बघा एसएससी. पण नोकरी कोण देणार हो याला… पण देवानं बघा कशी कला ठेवली हातात. मस्त पैसे मिळवते राणी. आम्ही मोठ्या भावाचं लग्न करताना हेही सगळं आपणहूनच सांगितलं. त्या मुलीला याला भेटायला पण सांगितलं. तीही पोरगी इतकी गुणांची बघा, म्हणाली, ‘ मला आवडल्या राणीताई. मी एकत्र राहीन तुमच्या सगळ्यांबरोबरच. आणि बघा आता, आज किती वर्षे झाली, मोठ्या भावाला दोन लेकरं झाली. अजूनही आम्ही सगळे गुण्या गोविंदानं राहतोय बघा. तेवढं व्यंग सोडलं तर काय कमी आहे हो माझ्या राणीत? बायकांना मागं सारील अशी कामं करती माझी राणी. वस्तीत पण सर्वांना आवडती बघा. धावून जाती मदतीला लोकांच्या. तिचा मोठा भाऊ म्हणायचा, ‘राणीला सिग्नलला टाळ्या वाजवून पैसे मागताना नाही बघायची आपल्याला. तिला पायावर उभी करू आपण.’ कोणी चेष्टा केली तर हा धावून जायचा अंगावर. खूप केलं त्यानं राणीसाठी ! आता वस्ती धड वागती… पण आधी? जिणं हराम केलं व्हतं आम्हाला याच लोकांनी. पण राणीनं सगळं निमूट सोसलं. आपल्या गोड स्वभावानं जिंकून घेतलं लोकांना. म्हणून आज उभी आहे मानानं. भाऊ भावजयीचा भक्कम आधार आहे तिला.” राणीच्या आई सांगत होत्या. क्षणभर थांबल्या आणि आवंढा गिळत म्हणाल्या, “ काय सांगू डाक्टरबाई, पन्नासवेळा आले हिजडे, आमचं आहे हे मूल, आम्हाला देऊन टाक. तिच्या भावाने मग पोलीस कम्प्लेन्ट केल्यावर गेले बघा. खूप दिलाय त्रास त्यांनी पण हो. पण आता सगळं छान आहे. काळजी वाटतं हो की हिचं पुढचं आयुष्य कसं जाईल. पण भाऊ भावजय सांभाळतील नीट. खूप चांगले आहेत दोघे.” राणीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणाल्या,” असतात तुमच्यासारखी देवमाणसं पण जगात. तुम्ही नाही का, कोणत्याही चौकश्या न करता औषध दिलं त्या दिवशी ! राणी लै नाव काढती बघा तुमचं.”
त्या दिवाळीला मी माझ्या मुलींचे दोन ड्रेस राणीकडे शिवायला टाकले. राणी दवाखान्यात आली. म्हणाली, “ ताई,दोघींचे ड्रेस शिवून तयार आहेत. पण एक विचारू? मला तुमच्या घरी बोलवाल का? मला खूप आवडेल तुमच्या मुली, घर हॉस्पिटल बघायला. बोलवाल का?’ माझ्या पोटातच तुटलं. किती साधी अपेक्षा यामुलीची ! मी म्हटलं, “ अग त्यात काय ! ये की या रविवारी. मला सुट्टी असते ना तेव्हा.”
ठरल्या दिवशी राणी आपल्या आईला घेऊन ऍक्टिव्हावरून ऐटीत आली. छान साडी, माफक मेकअप. माझ्या सगळ्या नर्सेस,आया बघतच राहिल्या. मी राणीला हॉस्पिटल दाखवलं, सगळ्या स्टाफशी ओळख करून दिली. राणी वर घरात आली. माझ्या देवघरात तिने डोक्यावर पदर घेऊन देवांना नमस्कार केला. माझ्या मुलींना जवळ बोलावलं आणि म्हणाली, ‘ बघा ग पोरीनो… आवडले का मावशीनं शिवलेले ड्रेस?” त्यांनी तिला ते लगेच घालून दाखवले. काय सुरेख शिवले होते आणि किती सुंदर एम्ब्रॉयडरी केली होती राणीनं ! केवळ अप्रतिम ! माझ्या मुलींची अलाबला घेऊन म्हणाली, “ सुखात रहा ग पोरीनो. आई कसली, देवी आहे देवी तुमची आई ! माझी पण आईच आहे हो ही.” माझ्या बाईने केलेले पोहे ,लाडू आनंदानं खाल्लं दोघीनी. मी राणीला सुंदर भारी साडी आणि तिच्या आईलाही साडी दिली. डोळ्यात पाणीच आलं दोघींच्या. “ कशाला हो बाई? आमच्याशी इतकं चांगलं कुणीपन वागलं नाही हो आजपर्यंत ! तुम्ही खूप वेगळ्या आहात बाई ! देव तुम्हाला काही काही कमी नाही पडू देणार ! “ राणीच्या आईनी म्हटलं. “ अहो त्यात काय एवढं? माझ्या मैत्रिणींना नाही का मी देत? तुम्हीही नाही का माझ्या मैत्रिणी? आणि राणी लहान मैत्रीण !” राणीनं माझं हॉस्पिटल हिंडून नीट बघितलं. पाळण्यातली लहान बाळं बघितली. आमच्या नर्सेस, आयांशी गप्पा मारल्या आणि हसतमुखाने गेली सुद्धा.
सगळा स्टाफ हळहळला तिच्यासाठी ! “ बया,द्येव तरी कसा बाई अन्याय करतो हो एखाद्यावर ! किती हो गुणांची आहे तुमची राणी !” आमची सिस्टर मनापासून कळवळून म्हणाली.
याही गोष्टीला खूप वर्षे लोटली. नंतर राणीच्या भावाने ती जागा सोडली आणि ते मुंबईला गेले असं ऐकलं मी. अजूनही मला राणीची आठवण येते. कोणी तृतीयपंथी सिग्नलवर पैसे मागताना दिसला तर सांगावेसे वाटते……
…… “ अरे,त्या राणीचं उदाहरण घ्या रे ! बघा किती सन्मानाने जगतेय ती आयुष्य. देवानं एवढा अन्याय करूनही कधी तिने त्याला दोष नाही दिला.” …… अजूनही वाटतं कधीतरी ….. राणी अशीच समोर येऊन उभी राहील आणि विचारील, “ बाई, बऱ्या आहात ना? राणीला विसरला नाहीत ना?” आणि माझे डोळे माझ्याही नकळत पाणावतात राणीसाठी !
‘घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच,’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो.
आमच्याकडे व्यसनाधीनतेच्या काउंसेलिंगसाठी मुख्यतः फोन येतात. पण काही वेगळ्या कारणांसाठीही येत आहेत. ‘घरातली भांडणं’ हा देखील महत्वाचा विषय झाला आहे.
परवाच पत्नीबरोबरच्या सततच्या भांडणाला वैतागलेल्या एका गृहस्थांचा फोन आला. ते म्हणाले “तुम्ही काउंसेलर आहात तर ही भांडणं थांबवण्याचा उपाय सांगा”.
मी त्यांना म्हटलं, “भांडणं पूर्ण थांबवता तर येणार नाहीत. पण तुम्ही भांडणाचे नियम पाळले, तर त्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल”.
‘भांडणाचे नियम’ हे माझे शब्द ऐकताच त्यांना आश्चर्य वाटलं. पण हे नियम समजून घेण्याची त्यांना उत्सुकता होती.
म्हणून मी त्यांना विचारलं, “नुकत्याच झालेल्या भांडणाविषयी सांगा”.
ते म्हणाले, “कालच हिने मला अजिबात न आवडणारी भाजी केली. माझी चिडचिड झाली. मी तिला बोललो. ती ही बोलली आणि आमचं मोठं भांडण झालं.”
हे ऐकताच मी त्यांना म्हटलं, “भांडणाचा पहिला नियम आहे भांडणाचा विषय बदलायचा नाही. ज्या विषयावर भांडण सुरू होतं, त्याच विषयावर भांडायचं. म्हणजे भांडण पराकोटीला जात नाही.”
त्यांना हे फारच पटलं. ते म्हणाले, ” भाजी वरून भांडण सुरू झालं. मग ती चिडली. माझ्या घरचे लोक, आईने मला कसं लाडावून ठेवलं वगैरे बोलायला लागली. मग मीही तिच्या घरच्या पद्धतींवर बोलायला लागलो. लग्नात जेवायचा मेनू त्यांनी चांगला ठरवला नव्हता. ती आठवण करून दिली. मूळ विषयापासून आम्ही फारच भरकटलो. पण आता मात्र आम्ही तुमचा हा भांडणाचा नियम पाळणार”.
त्या गृहस्थांची बोलल्यावर मला हे नियम सगळ्यांनाच सांगावेसे वाटायला लागले. आपण सगळ्यांनी हे नियम पाळले तर भांडणं झाली तरी नातेसंबंध बिघडणार नाहीत.
१) भांडणाचा विषय बदलू नका. ज्या विषयावर भांडण सुरू झाले, त्याच विषयावर भांडा. विशेषतः पती-पत्नींनी भांडतांना ‘सासर- माहेर’ मुळीच मध्ये आणू नका.
२) भांडणाला टाईम लिमिट ठेवा. काही घरांमध्ये भांडण झालं की २-३ दिवस ते सुरू रहातं. नंतर अबोला असतोच. सर्वांनी मिळून एक वेळेची मर्यादा ठरवता येईल. अर्धा तासाची ठरवली तर अर्धा तास झाल्यावर स्टॉप म्हणून लगेच सर्वांनी गप्प बसायचं. (खरंतर पहिला नियम पाळून विषय बदलला नाही. तर जास्त वेळ भांडता येतच नाही. एकाच विषयावर काय काय बोलणार !)
३) तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडू नका. दोघंच असताना भांडा. तिसरी व्यक्ती समोर असेल तर अपमान वाटतो. मनं दुखावतात. मुलांसमोर तर भांडण अजिबात नको. त्यांना असुरक्षित वाटतं.
४) एक व्यक्ती चिडली असेल तर दुसऱ्याने गप्प बसा. दोघंही एकदम चिडले तर भांडण विकोपाला जाऊ शकतं. त्यामुळे आपली जवळची व्यक्ती चिडली असेल तर तिला समजून घ्यायला हरकत नाही.
५) स्वतःच्या भावना ओळखा. शांतपणे व्यक्त करा. थकवा, भूक, टेन्शन अशी रागाची वेगवेगळी कारणं असतात. चिडचिड होत असेल तर ती कशामुळे हे शोधून काढून, लोकांवर चिडण्यापेक्षा त्यांना आपण कारण सांगू शकतो. आमच्या घरात ज्याची चिडचिड होत असेल,तो सांगतो की मला थोडा वेळ माझी स्पेस हवी आहे आणि आतल्या खोलीत जाऊन बसतो. अशावेळी त्याच्या मागे लागण्यापेक्षा आम्ही त्याच्या स्पेसचा आदर राखतो.
६) टोमणे मारु नका. टोमणे मारणे, उपहासात्मक बोलणे हे नातेसंबंधावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी संवादातून काढून टाकलेल्याच बर्या.
७) भडकू नका. काही वेळा मुद्दाम आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण चिडावं, असा त्या व्यक्तीचा उद्देश असतो. तो सफल होऊ देऊ नका. शांत रहा. आपल्या परवानगीशिवाय कोणीच आपल्याला भडकवू शकत नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असेल तर हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. आपण बिचारे म्हणून गप्प बसणार नाही. तर आपण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत म्हणून गप्प बसणार आहोत. कारण बोलण्यापेक्षा गप्प बसायला जास्त शक्ती लागते.
८) मध्यस्थाची मदत घ्या. भांडणं कमी होतच नसतील तर जवळच्या मित्र-मैत्रिणी किंवा काउंसेलरची मदत घेता येईल.
मला आठवतील तेवढे नियम मी लिहिले. तुम्ही यात भर घालू शकता.
चला तर मग…
भांडा सौख्यभरे!
लेखिका :सौ.मुक्ता पुणतांबेकर
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ प्रतिमेच्या पलिकडले : आईस्फ्रूट… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“ ए आये घी ना त्यो आईसफ्रुटचा लाल लाल गोळा… मला पाहिजी म्हंजं पाहिजीच.. लै दात शिवशिवालया लागल्यात बघ…गाडी सुटायच्या आदुगर मपल्याला हानून दी.. ती बाकिची पोरास्नी त्याचं आई बा कसं घेऊन देत्यात बघं तिकडं.. ती पोरं माझ्याकडं बघून तोंड वाकडं करूनदावत खिदळतात बघं.. तुला न्हाई तुला न्हाई म्हनून चिडीवित्यात… आये तू बापसा संग भांडान काढूनशान निघालीस माहेराला… मला अंगावरच्या फाटक्या बंडीवर तसच उचलून.. खाली चड्डी तरी हाय काय नाय ते बी तूझ्या ध्यानात नाही… तापलेल्या इंजिनावनी डोस्कं तुझं संतापलेलं.. उन्हानं कावलेली एस.टी. पकडली…तापलेली सीट,झळा मारणारा वारा जीवाची लाही लाही करत,फारफुर फारफुर करत उर धपापत वेगानं धावणारी ती एस. टी…आतल्या माणसांना बेजार करत रस्ता कापत निघालेली.. सोताच्या इचाराच्या गुंतवळयात आडकलेली .माझी बी खबर घेईनास तू.. बा पोरं भुकेज्याल़ं असलं.. तहान लागली असलं काय बी कळंना तूला… म्या सारखं आये आये म्हनून कवाधरनं मागं लागलूया परं.. तू गप. बैस किरं मुडद्द्या.. बापावानीच छळतूया मेला म्हनून माझयावरच ढाफरतीस… मी तुझ्याच पोटचा गोळा हायं नव्हं मगं मला दि की त्यो गोळा …न्हाईतर हि खिडकीची दांडीच कडाकडा मोडून खातो बघ… मगं दात तुटलं तरं बेहत्तर… नि बा ला माघारी बोलवायला आल्यावर तुला लै रागवायला सांगतो का न्हाई बघ !..” .
… दोनच अक्षरी साधा शब्द ‘ मन ‘ ! पण या शब्दाची व्याप्ती मात्र अमर्याद. त्याचा आकार तरी कसा वर्णावा बरे? तेही अवघड काम —- कधी मन खसखशीएवढंं, तर कधी त्याहून सूक्ष्म अणुरेणूएवढं सुद्धा बनतं. तर कधी अगदी त्या विशालकाय आकाशातही मावणार नाही इतकं प्रचंड रुप धारण करु शकतं.
मन इतकं लहरी असतं की कोणी त्याचा हातच धरु शकणार नाही. कधी मन स्वच्छंदीपणे विहरतं, तर कधी हळवं होतं, कधी विचारी बनतं. कधी हेच मन घमेंडखोर बनतं नि बढायांना गोंजारु लागतं. कधी-कधी हेच मन उत्साही बनतं नि नवनिर्मिती करु पाहतं. कधी ते लाडीक बनतं, प्रेयसीला, सवंगड्यांना हाकारु पाहतं, तर काही वेळा तुसडं बनून सर्वांनाच दूर-दूर लोटू पाहतं. मन स्वप्नाळु बनतं नि दिवास्वप्न रेखाटू पाहतं. तर कधी दु:खी बनून अश्रू साठवीत राहतं.—- .असं हे बहुरंगी भावार्थ साठविणारं मन त्याविषयी बोलावं तेवढं थोडंच. .म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामीसुद्धा करुणाष्टकात म्हणतात _
अचपळ मन माझे नावरे आवरिता
तुजविण शीण होतो,धाव रे धाव आता ||
खरच हे अचपळ मन ताब्यात ठेवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत, कारण असं म्हणतात की ” मन जिंकी तो जग जिंकी |”
मनावर चांगले संस्कार होण्यासाठी आपण लहानपणापासून घरात शुभंकरोती, देवाची स्तोत्रे,परवचा म्हणत असतो. कुठलीही गोष्ट प्रथम मनात आली तरच तिचा विचार होऊन कृती घडते. म्हणूनच आपण जर मनावर सुसंस्कारांचे धडे बिंबवले तरच या समाजात सहृदय, संवेदनशील व्यक्ती निर्माण होतील.
एकनाथ महाराजांची एक गोष्ट सांगितली जाते—गंगेच्या पाण्याने भरुन आणलेली कावड त्यांनी तहानलेल्या गाढवाच्या मुखी सोडली नि त्याला तृप्त केले. अशा गोष्टी जर बालपणी मुलांना सांगितल्या तर भूतदया कशी दाखवावी हे या उदाहरणावरून चांगल्या प्रकारे लक्षात येतं. त्यामुळे मन चांगल्या संस्कारानी लहानपणीच समृद्ध केलं तर भावी पिढी सुशील,सदवर्तनी नि सेवाभावी बनेल. श्री समर्थ रामदास स्वामींनी
‘मनाचे श्लोक‘ रचले आहेत, त्यामागे मन भक्कम बनविणे हाच मुख्य हेतू आहे. म्हणूनच आपलं मन स्वच्छ,शुद्ध, पारदर्शक ठेवून योग्य विचार मनात आणले तर आपली प्रगती योग्य दिशेने, योग्य प्रकारे होईल यात शंकाच नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कोणत्याही वयात मनावर योग्य नियंत्रण ठेवलं पाहिजे. सकारात्मक विचारातूनच मनाची उत्तम मशागत होते नि योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतो.
चला तर, प्रत्येक गोष्ट मनापासून करु या. मग ते चित्र रेखाटन असो, रांगोळी असो की परीक्षेसाठी उत्तम तयारी करणे असो. कोणतही मोठ्ठं अवघड काम सुद्धा आपण मनावर घेतलं तर आपण निश्चितच पुरं करु शकतो.
आपल्या संस्कृतीत सोळा श्रृंगार सांगितले आहेत, त्यातील एक साडी परिधान करणे हा आहे. मग साडी म्हटलं की ओघाने पदर येणारच•••
पण राज्य बदलले की साडी तीच रहाते पण पदर घ्यायची पद्धत बदलते. कोणी डाव्या खांद्यावर घेतो कोणी उजव्या खांद्यावरून पुढे घेतो, कोणी त्याला चावीचा गुच्छा बांधून दुसर्या खांद्याच्या मागे सोडतो कोणी डोक्यावर घेतो कोणी दोन खांद्यावर कोणी डोक्याच्याही पुढे चेहर्यापर्यंत ओढतात तर कोकणी स्त्रिया चक्क कमरेला गुंडाळतात. कसेही कोणत्याही प्रकारचे पदर घेतलेले हे स्त्रीचे रूप नेहमीच मनाला मोहवित आले आहे.
पण या पदराची किमया त्याच्यापुढे लावलेल्या क्रियापदामुळे कृष्णलीला वाटतात. या पदराच्या लीला काही पाहिलेल्या काही अनुभवलेल्या काही ऐकलेल्या एकत्र वाचायला नक्कीच मजा येईल.
दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेली उषा आईला म्हणाली आई हीच साडी तू घे. अगं पदर बघ किती छान आहे . युनिक आहे युनिक.
नुकताच पदर आलेल्या म्हणजे पदरेकरीण झालेल्या आपल्या लेकीचं ज्ञान पदरात पडलं आणि तीच साडी आईने घेतली.
जरी पदरेकरीण झाली असली तरी आईचा पदर धरून चालणे तिची सवयच होती. आईने पदर खोचून दिवाळीची सफाई केली.
दिवाळीच्या वेळेस आईने लक्ष्मी पुढे पदर पसरला म्हटली सगळ्या चुका पदरात घे आणि सगळ्यांचे सुख आरोग्य पदरात टाक गं आई. माझ्या पदरी निराशा नको येऊ देऊ.
आईचा जरतारी पदर भरून पावला होता जणू. पदरात मावेल एवढे दान मिळाल्याचा भास तिला झाला होता पण पदरात न मावेल एवढा आनंद उत्साह चेहर्यावरून ओसंडत होता.
त्याच उत्साहात दिवाळी संपली आणि आई उषाला म्हणाली आता पोरी तू मोठी झालीस. आता आईच्या पदरामागे लपणे, आईच्या पदराला तोंड पुसणे, शेंबुड पुसणे असे करायचे नाही. आता आपल्या पदराला आपणच जपायचे . पदर ढळू देऊ नकोस. पण जर कोणी पदराला हात घालू पाहील त्याला पदर झटकून वठणीवर आणायचे आणि मानानं पदर डोईवर घ्यायचा .
हे काही पदरचं सांगत नाही. अगं समाजाची रीत आहे ही.
आईच्या संस्कारामुळे उषाच्या जीवनाला पदर लाभत होते.एक एक पदर छान सुटून येत होते. दोघींचाही पदर फाटका नाहीये हे समजत होते.
स्वाभिमानाची शिकवण देताना आई म्हटली अंगी असेल ते काम अन् पदरी पडेल तो दाम करण्याची तयारी हवी. अगं पोरी पदरचे खावे पण नजरचे खाऊ नये. नेहमी पदरचे खावे अन चौघात जावे उषा अजून मोठी झाली. तिच्यावर प्रेम करणारा तिच्या आयुष्यात आला आणि ती नकळत पदराशी चाळे करू लागली.आईच्या नजरेतून हे सुटले नाही. आई म्हटली आता त्याची तुझ्या पदराशी गाठ बांधली की होईल बाई जबाबदारीतून सुटका. जरा पदर फडकायला मोकळा होईल.
तू तुझ्या मनाने त्याला निवडलं आहेस तर छान पदर अंथरून स्वागत कर त्याचं. त्याचे काही चुकले तरी शक्य तेवढे सावरून घेत ‘ पदरी पडलं अन पवित्र झालं ‘ म्हणायचं . एकमेकांचे होऊन रहाताना पदरी पडली झोड हसून केली गोड म्हणत गुण्यागोविंदाने रहायचे.
आईचे पाठ , शिकवण यातुन सुसंस्काराने न्हाऊन उषाच्या पदराशी त्याची गाठ पडली एकदाची. आयुष्याचा हा पदरही चांगला असल्याने ती कधी पदराची चवरी करून त्याची रिद्धी तर कधी पदराने वारा घालून त्याची सिद्धी होत होती. जरी सुखवस्तु कुटुंबात पडली असली तरी पदरपेशी होऊन जगणं तिला जमतच नव्हते तिला समजून घेणारा तिच्या पदरचा माणूस ; तिचा नवरा तिला काही कमी पडू देत नव्हता म्हणून गरजूंना ती पदरमोड करून मदत करत होती. चांगल्या मनाने केले तर पदरास खार पडणार नाही हे तिला माहित होते. पदर खर्च करून जणू स्वत:च्याच पदरात पुण्याचे माप घालत होती.
त्यामुळे पदर गमावण्याचा प्रश्न नव्हताच. ती क्षम्य चुकांवर हसत पदर घालत होती. आईने सांगितल्या प्रमाणे पदर सावरत “ पदरचे द्यावे मग सांगावे “ या धोरणाने मदत करत जीवन जगत होती. सासरच्या कुत्र्याला सुद्धा अहो म्हणायचे या संस्कारातून ती कधीच एक पदरावर येत नव्हती. शिवाय आपला पदरही पाडत नव्हती. त्यामुळे नियतीच पदरचं घालायला तिच्यापुढे ठेपली तेव्हा दैव आले द्यायला अन पदर नाही घ्यायला अशी तिची गत झाली नाही. तोंडाला पदर आणि गावाला गजर तिच्या बाबतीत घडले नाही. कायम पदराची शुद्ध जपत पदरास खाच न पाडता ती समाधानाने रहात होती. म्हणूनच उषाच्या जीवनात सुवर्णपहाट येण्याची चाहूल तिला लागली होती. ती आई होणार होती. सातव्या महिन्यात ओटी पदरात भरून ती आईकडे बाळंतपणासाठी आली होती.
आता ती सुखरूप प्रसूत झाली होती आणि चिमुकले बाळ तिचा पदर ओढत होते आणि त्या कान्ह्याला पदराखाली घेताना तिला पदराची महती समजली होती आणि असा श्रीमंत पदर लाभण्याचे भाग्य आपल्या पदरी आहे या जणिवेने तिच्या डोळ्याचे पदर ओलावले.
जीवनाच्या चिरोट्याचा एक नाजूक पदर खुलला होता तो हृदयाच्या एका पदरात तिने लपेटून घेतला होता.
☆ “घोडं दिसलं की पायी चालू वाटत नाही—” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆
” फ्लाईटनेच जायचं गं आई , ट्रेन मधे बोअर होतं मला “
आता सुट्टीत काकाकडे दिल्लीला जायचं अन् सिमला मनाली ट्रिप करून यायचं , असं ठरवत असताना , दुसरीतल्या सईने ठणकावून आपलं मत सांगितलं. “ अगं आज्जी आजोबांना ट्रेन बरी वाटते अन् राजधानी आहे ती चांगली .. एका रात्रीत पोचूही ..” चारूता सारं सांगत राहिली तरी काही पटले नाही सईला ..
“ मागे केरळला मग फ्लाईटने का गेलो ? ते रेल्वे स्टेशन किती घाण असतं .. नाही म्हणजे नाहीच , फ्लाईटनेच जायचय मला .. “
“ओरडायला हवं होतं मी तेंव्हाच खरं .. ” रात्री चैतन्यला चारू सांगत होती. “ ओरडायला हवं होतं का रे ? पण खरं सांगू , कळतच नाहीये , चूक तिची कि आपली ? मागण्या आता वाढतच चालल्या आहेत तिच्या .. फ्लाईटने जाणं किती सहज साध्य वाटतय तिला .. बोर्नव्हिटा नसेल तर दूध नको , गाडी नसेल तर प्रवास नको , हाँटेलात गेलो तर चायनिजच हवं अन् माँलमधलं सारं काही घरी यायलाच हवं.. एक ना दोन .. जास्तच लाड करतोय का आपण ?” चारूताच्या विचारांनी परत एकदा उचल खाल्ली.
“ हमम .. खरंय तुझं ..” नेहमीप्रमाणे कुस बदलत एवढच म्हणत चैतन्य झोपून गेला.
पन्नास पैशाच्या लिमलेटच्या गोळीचं आकर्षण असायचं आपल्याला .. कोणी कधी शाळेत वाढदिवसाचं वगैरे म्हणून चाँकलेट दिलंच तर घरी येऊन अर्ध अर्ध करून खायचो .. गरीब वगैरे काही कधी नव्हती परिस्थिती, पण पैसा असा इतका सहज संपवत नव्हतो , आता मध्यमवर्ग असा काही राहिलाच नाही की काय ..?. .. मुबलकता आली .. पगार वाढले .. जाहिरात क्षेत्राने व्यापूनच टाकलंय आयुष्य अवघं .. जाहिरातींचा मारा होत राहतोय .. पगार त्याकडे वळत राहतोय ..
आधी दिवाळीलाच कपडे घ्यायचो नवे .. आणि एखादा वाढदिवसाला .. जुने झालेले ड्रेस आधी घरात वापरले जायचे अन् मग पायपुसणं बनून पायाखाली यायचे..
— आणि परवा साडेसातशे रूपयांचा नाईट ड्रेस घेतला आपण .. सहज .. आवडला म्हणून .. आणि मग.. सईला काय म्हणा .. आपणच बदललो नाहीयोत का ?
संध्याकाळी खेळून आल्यावर भूक लागली तर केळं, दूध पोहे, गेला बाजार पोळीचा लाडू, असंच काहीसं हातावर ठेवायची आई .. सई पाहतही नाही अशा खाण्याकडे आता .. ह्या सवयी तिला कुणी लावल्या ? बिस्किटं , वेफर्स नी तत्सम खाण्याने भरून वाहतायत डबे आता ..
आत्ता आठवतय की …आत्याचं घर किती लांबं होतं.. पण चालतच न्यायचे आजोबा .. त्यांचं काय नातीवर प्रेम का नव्हतं ? पण चालणं हेच फार स्वाभाविक होतं…..पुढे सायकल हातात आल्यावर चालत जायला कंटाळायला लागले मी तेव्हा आजी म्हणत असे ..” घोडं दिसलं कि पायी चालू वाटत नाही !!!”
— पण सुरवात सारी इथुनच झाली का ? पुढे शिक्षण झालं , नोकरी लागली तशा मागण्या वाढल्या माझ्या .. ड्रेसचा कप्पा वाढला ..चपलेचे जोड वाढले .. “ अगं राखून ठेव पैसा हाताशी,आहे म्हणून संपवू नये ..” आई म्हणायची तेंव्हा ‘ हो गं ‘ …म्हणत फणकाऱ्याणे निघून जायचे मीही .. यथावकाश लग्न झालं , नवरा IT तला .. सहा आकडी पगार त्याचा .. मोठ्ठं घर हवं म्हणून कर्ज काढलं, तेंव्हाही आजोबा म्हणाले होते ..” अगं प्रायव्हेट नोकऱ्या तुमच्या, एवढालं ते लोन काढताय .. अंथरूण पाहून पाय पसरावेत बयो ! “
पण कुठेसं ऐकलेला डायलाँग घोळवायचे मी तेंव्हा .. “ तोकडं पडलं तर अंथरूण वाढवा ना .. सदा पायच का आखडून घ्यायचे आपण ? “
स्टीलची ताटं नको म्हणून डिनर सेट आणले ..एकेक करत नॉनस्टिकच्या भांड्यांचे सेट झाले .. फ्रिज , टिव्ही लहान वाटायला लागला .. सोफ्यावाचून हाँल सुनासुना भासायला लागला … दिरानं अन् ताईने घेतली गाडी तशी मग आपणही घेतलीच .. बसचा प्रवास अगदीच दुर्मिळ झाला मग .. उपभोगत आलो सारं .. आमचा स्तर आम्हीच वाढवला …. आणि मागची पिढी खर्चिकच म्हणत आली आम्हांला ..
कोकणातल्या मूळ गावी जायला लाल डब्ब्याखेरीज दुसरी सोय नव्हती .. गाडी अजून घेतलेली नव्हती .. तेंव्हा जाणारच नाही म्हंटलं नाही, पण तरी नाकं मुरडायचेच मी जाताना .. सासरे म्हणतच मग .. “ तुम्हांला थेट गाडी आहे आता. किती बरय .. आम्ही ST , बोट , पायी असं करीत करीत पोहोचत असू कित्येक तासांनी ..”– मला एशियाड हवीशी वाटे .. तसंचं लेकीला विमान हवं आहे आता …. आपल्याच विचारांची धारा पुढे चालवतेय लेक .. काय ओरडणार आहोत आपण तिला ..
असेच विचार करता करता कधीतरी झोप लागली .. दुसऱ्या दिवशी रविवार .. जरासं आळसावतच चारू बसली तोवर कामवाल्या मावशी आल्या .. चांगल्या कपबशा नि चांगल्या चांगल्या बेडशिट्सनी भरलेली पिशवी त्यांच्या हातात .. म्हंटलं “ काय हो हे .. आत्ता कसली केलीत खरेदी ? “.. तर म्हणाल्या .. “ अहो खालच्या मजल्यावरच्या ताईंनी दिलं .. जास्तीचं सामान सगळं काढून टाकून गरजेपूरतच ठेवायचं ठरवलंय त्यांनी म्हणे ..”
— खालच्या ताई म्हणजे चारूची मैत्रीणच – मेधा .. चारूला हे समजेना तेंव्हा तिने मेधाला फोन लावला ..
“अगं मिनिमलीझमच्या मुव्हमेंटबद्दल वाचलं मधे नेटवर .. म्हणजे आवश्यक त्या वस्तूंचाच फक्त संचय करायचा .. अनावश्यक फाफटपसारा टाळायचा .. काय काय उगाचच जमवत राहतो आपण .. मला फारच पटलं ते .. म्हणून ठरवलय जमेल तितकं करूया .. त्याची ही सुरवात .. “
कुठेतरी उत्तर मिळाल्यासारखं वाटलं चारूला .. ‘ आज रविवार आहेच तर आपणही आज हे निवांत वाचूया .. आणि बघुया आपल्याला पटतय अन् जमतय किती नि कसं ..’ असं ठरवत ती स्वयंपाकघराकडे वळली .. तशी मावशी म्हणाल्या ..” बरं झालं की हो , खालच्या ताईंनी कपबश्या दिल्या ते .. पोरांना आता स्टीलचं भांडं चालत नाही .. रंगीत डिझाईनचा कपच लागतो .. आम्ही तर करवंटीतून प्यायचो चहा .. पण तक्रार नाही केली बघा कधी .. काय करावं .. जनरीतच आहे झालं ……
“ घोडं दिसलं की चालू वाटत न्हाई माणसाला .. !!! ”
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈