मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ फिन्द्री… सुश्री सुनीता बोर्डे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ फिन्द्री… सुश्री सुनीता बोर्डे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

कादंबरी – फिन्द्री

लेखिका – सुनीता बोर्डे

प्रकाशक – मनोविकास प्रकाशन

किंमत – ३५० रू.

पृष्ठ संख्या – ३०३

…मला ही कादंबरी अशी भावली…वंदना अशोक हुळबत्ते

“फिन्द्री” या नावाचे आकर्षण वाटलं होतं.कोणता विषय,कसा मांडला असेल या कादंबरीत? या उत्सुकते पोटी मी ही कादंबरी वाचायला घेतली.कादंबरी वाचताना मी वेगळ्या विश्वात गेले.जे कथानक कादंबरीत वाचत होते ते सारे कल्पनेच्या पलीकडेचे होते. असं काही आपल्या आसपास घडत असते, ते ही विसाव्या शतकात हे ही पचण्यासारखे नव्हते.

संगीता ही या कादंबरीची नायिका.ही कादांबरी सत्य कथेवर आधारित असावी असे वाटते.तसा कुठे उल्लेख कादंबरीच्या प्रस्तावनेत वा मनोगतात नाही.पण कादंबरीत आलेले वर्णन आणि दाखले या वरून ती कथा सत्य असावी असे वाटते. स्त्री शिक्षणासाठी अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रात, शाहु,फुले, आंबेडकराची परंपरा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षण घेण्यासाठी नायिकेला किती संघर्ष करावा लागला हे या कादंबरीतून अधोरेखित होते.गावाकुसा बाहेरील दलित वस्तीचे,समाज जीवनाचे, जातपातीचे, तिथल्या विचारसरणचे,तिथल्या राहणीमानाचे,तिथली बोली भाषाचे आणि तिथल्या शिव्याचे देखिल यथोचित वर्णन लेखिकेने  केलं आहे.

या कादंबरीतील नायिकेचा बाप,हाच खरा या कादंबरीचा खलनायक आहे.मुले आईबापांच्या छत्रछायेत सुरक्षित असतात.मुलाच्या यशात आई-बाप सुख मानतात.मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे,उज्ज्वल यश मिळवावे असे प्रत्येक आई-बापाला वाटत असते. पण या कादंबरीतील बाप, मुलांना प्रेमच देत नाही.उलट मुलीचा जन्म नाकारतो‌.तिला नकुशी ठरवतो,तिचा दुष्वास करतो,तिच्या शिक्षणात काटे पेरतो,तिचे शिक्षण थांबवण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो.एखादा सुखाचा क्षण कुटूंबात येतोय असे वाटत असतानाच बापच त्यांची माती कशी करतो.त्यांच्या उमेदीवर पाणी कसे फिरवतो.हे सारे प्रसंग लेखिकेने अतिशय ताकदीने मांडले आहे.हे प्रसंग वाचताना समोर घटना घडत आहेत असे वाटते. स्वत:ला घराचा कर्ता पुरुष समजणारा बाप मात्र कोणतेच कर्तव्य पार पाडत नाही. बायको म्हणजे आपली हक्काची वस्तू,रोज तिला दिवस रात्र राबवून घेतो आणि सकारण, विनाकारण रोज बडवतो.हाच त्याचा पुरूषार्थ.ती ही मार निमुट पणे सहन करते तेव्हा तिचा राग ही येतो. बायको आणि जनावर यात त्याला भेद वाटत नाही. इतके हाल करतो तिचे. तिच्या जीवाची पर्वा नाही त्याला. मुले बापाला भितात. भिऊन सश्या सारखी आईच्या पाठीमागे लपतात. तेव्हा बापाच्या माराचा प्रसाद त्यांना ही मिळतो.मुलीच्या शिक्षणात अडथळे आणतो. संगीताने बारावीची परीक्षा देऊ नये म्हणून हा दारूडा बाप तिची पुस्तके विहिरीत टाकतो.तरी ती काॅलेज मध्ये पहिली येते तेव्हा तो तिला मारतो तेव्हा त्या बापाच्या विचारसरणी ची कीव करावीशी वाटते.  अशा बापा कडून मुलांनी प्रेमाची काय अपेक्षा ठेवावी.

मुलीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत पुरूष प्रधान संस्कृतीतील नवऱ्याशी दोन हात केलेल्या एका आईची ही कहाणी आहे.लढा आहे.आपल्या आई विषयी नायिकेला आदर आहे.तीआईला गुरू मानते.आईची शिकवण सांगताना लेखिकेने खुप चांगले विचार मांडले आहेत.ती आईच्या भाषेत म्हणते “कढीपत्याचे झाड बी बाईच्या जातीवाणीच! किती बी छाटा,लगीच धुमारे फुटात्यात त्याला,गरजे पेक्षा ज्यादा वाढायला लागला का फांद्या छाटल्याच म्हणून समजा!निऱ्हे चोखायचं,फेकायचं.खर तर तिच्या शिवाय सवसाराला चव नुसतीच पण तरी तिलाच साम्द्यात आधी फेकायला तयार असतात सारे.”स्त्री जाती विषयीचे एक तत्वज्ञान च सांगितले आहे

“आईच्या डोक्यावरच्या चुंबळी पेक्षा खरे तर तिच्या मनाची चुंबळ जास्त पक्की होती, म्हणूनच आई एकाच वेळी इतकी सारीओझी पेलू शकत असावी.” आई विषयी चे हे निरिक्षण सर्व  स्त्री वर्गाला लागू होते.

लेखिकेने प्रत्येक प्रकरण विचार पुर्वक लिहिले आहे.प्रत्येक प्रकरणातून एक विचार दिला आहे.गोधडी,बाभळीच्या काटा,दात काढणे,हे आणि या सारखे विषय एकेका प्रकरणातून सुंदर मांडले आहेत कुठे ही ओढाताण दिसत नाही. विषय सहज आला आहे.प्रत्येक प्रकरणातून कथानक पुढे जात राहते.वाचताना कंटाळा येत नाही.बोली भाषेतील किती तरी नव्या  शब्दाचा परिचय होतो.

आपण ज्या परिस्थितीत राहून नवराचा अन्याय सहन केला ती वेळ आपल्या मुलीवर येऊ नये म्हणून एका आईने जीवाचे रान कलेली ही कादंबरी आहे.याच कादंबरीत लेखिका म्हणते “खरंच,भाकरी हा असा गुरू आहे.जो धडा शिकवायला ,माणसाला शहाणं करायला त्याचं वय पहात नाही. भुकेची तीव्रता अन् भाकरीची कमतरता या दोन निकषांवर कोणत्याही वयाचा विद्यार्थी भाकरीच्या  विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊ शकतो.”

समाज व्यवस्थेवर,जातीपातीवर विचार करायला लावणारी,पुरूष प्रधान संस्कृती झुगारून देण्यास प्रवृत्त करणारी ही कादंबरी अनेक प्रश्न मनात निर्माण करते. अज्ञान आणि अन्याय हाच विकासातील मोठा अडसर आहे.तो दूर केला पाहिजे हा विचार देणारी ही कादंबरी आहे.दलित समाजातील मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नला या कादंबरीतून वाचा फोडली म्हणून मी लेखिका सौ.सुनीता बोर्डे यांचे हार्दिक अभिनंदन करते.सर्वानी ही कादंबरी वाचावी अशी अपेक्षा करते.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “पाचा ऊत्तरी सफल  संपूर्ण” – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“पाचा ऊत्तरी सफल  संपूर्ण” – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव: पाचा ऊत्तरी सफल  संपूर्ण

लेखिका:उज्ज्वला केळकर 

प्रकाशक:अरिहंत पब्लीकेशन

प्रथम आवृत्ती: १२जानेवारी २०२०

पृष्ठे:१९१

किंमत: रु २९०/—

पाचा उत्तरी सफल संपूर्ण..

उज्ज्वला केळकर यांचं पुस्तक हाती पडलं की ते कधी वाचते असेच होऊन जाते. पाचा ऊत्तरी सफल संपूर्ण हा कथासंग्रह वाचला आणि त्यावर भाष्यही करावेसे वाटले म्हणूनच हा लेखन  प्रपंच!!

या कथा संग्रहात एकूण १४कथा आहेत. विविध विषय त्यांनी या कथांतून हाताळले आहेत. काही हलक्या फुलक्या विनोदी कथाही यात आहेत. हसवता हसवता त्याही विचार करायला लावतात. सामान्य माणसाचे मन, विचार, जीवन याभोवती गुंफलेल्या या कथा खूप जवळच्या वाटतात.

त्यापैकी काही कथांविषयी… 

१. पाचा उत्तरी सफल संपूर्ण.. ही संपूर्ण कथा फ्लॅश बॅक मधे आहे. माई या या कथेच्या नायिका आहेत. मुले, सुना नातवंडं असा सुखाने एकत्र नांदणारा त्यांचा परिवार आहे. एक सुखवस्तु, कष्टकरी सधन सुखी परिवार. माईंना नुकताच, त्यांच्या समाजसेवेची दखल घेणारा प्रेरणा हा पुरस्कार मिळाला आहे. आणि त्या निमीत्ताने त्या गतकाळात, आठवणीत रमत त्यांच्या घटनात्मक आयुष्याचा आढावा घेत ही कहाणी उलगडत जाते.

बालपण, विवाह, सांसारिक जबाबदार्‍या, मुले, शिक्षणं, व्यावसायिक प्रगती अशा साचेबंद आयुष्यात घडणार्‍या अपघात, पतीनिधन, फसवणुकीसारख्या नकारात्मक घटनांचंही निवेदन आहे. आणि या सर्व पार्श्वभूभीवरचे माईंचे कणखर, सकारात्मक, प्रभावी व्यक्तीमत्व .. आणि त्याची ही बांधेसूद, सूत्रबद्ध कथा. सुख आले दारी हे सांगणारी साठा उत्तराची,पाचा उत्तरी सफल संपूर्ण झालेली कहाणी,वाचकाला आनंदच देते…

२.  जन्म पुनर्जन्म..  मरणाला भोज्जा करताना होणारी मानसिक अंदोलने ,उज्ज्वलाताईंनी या कथेत अनुभवायला लावली. जन्म आणि मरण यातले अंतर, त्यांचं नैसर्गिक नातं, ती भोगणारी व्यक्ती आणि भवताल याचं  संतुलन, अत्यंत प्रभावीपणे कथीत केलं आहे. पुनर्जन्माची एक वेगळी वास्तव कल्पना आहे ही. बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच.. त्याविषयीची ही वेगळीच कथा.

३. तृप्त मी कृतार्थ मी.. शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या पती पत्नींची ही कथा सुखद आहे.बाल कीर्तनकाराच्या रुपात नातु आपल्या आजी आजोबांची जीवनकथा त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने कथन करतो.हा या कथेचा साचा. त्यातून सरकत जाणारी कथा वाचकाला गुंतून ठेवते. कथेचा विषय निराळा नसला तरी  मनाला सकारात्मक उर्जा देते..

४. मधु.. कथा तशी लहान पण सकारात्मक. नशीबाचे अनंत फेरे सोसल्यानंतर अखेर चांगले दिवस येतात. मधुचा झालेला कायापालट या कथेत लेखिकेने सुरेख पद्धतीने मांडला आहे.

५. कृष्णस्पर्श.. अतिशय सुंदर कथा. माई— कुसुम यांची ही कथा. कीर्तन हा माईंच्या एकाकी जीवनाचा आधार. अचानक कुसुमसारखी कुरुप वेंधळी बावळट, शून्य आत्मविश्वास असलेली व्यक्ती त्यांच्या नि:संग जीवनात येते. दिव्यत्वाचा साक्षात्कार देणारा सूर मात्र कुसुमच्या गळ्यात असतो. माईंना ती कीर्तनात ती साथ देउ लागते. आणि एक दिवस कृष्ण कुब्जेच्या कथेचं निरुपण करत असताना ही कुरुप कुस्मी संगीताचा स्वर्गीय, दिव्यभक्तीचा असा काही अविष्कार दाखवते की स्वत: माईंनाही कृष्णस्पर्शच झाल्याचे जाणवते. आणि त्या दिवसापासून माईंचे आणि तिचे नातेच बदलते. अतिशय सुरेख, तल्लीन करणारी भावस्पर्शी कथा.

६. हसीना.. काहीशी मनोविश्लेषणात्मक, मनाला चटका लावणारी कथा. हसीना नावाच्या एका रुपवान तरुण मुलीची ही कथा. तिचे बालपण, तिच्या आयुष्यात येणारे पुरुष आणि त्यांच्याभोवती गुंतलेलं तिचं भावविश्व हे वाचकाच्या  मनाला कधी सुखावतं. कधी टोचतं.  हसीनाच्या मनातील अंदोलने लेखिकेने चपखल टिपली आहेत.

७.  सुखं आली दारी.. ही कथा वाचल्यानंतर पटकन् मनात येतं असंही होऊ शकतं. ही कथा मनाला आनंद देते. शिवाय या कथेत जसे योगायोग आहेत तसा एक छुपा संदेशही आहे.

जीवन प्रत्येक टप्प्यावर बदलत असते. सुखी होण्याचे अनेक पर्यायही असतात. अशा पर्यायांचा विचार केला,स्वीकार केला तर आयुष्यातल्या, उणीवा, खड्डे भरुन काढता येतात. विकतचं शहाणपण, स्वर्गलोकात ईलेक्शन, एक (अ)विस्मरणीय प्रकाशन समारंभ या तीनही विनोदी कथा आहेत. थोडी विसंगती, कल्पकता, विडंबन, काहीशी  अवास्तविकता या तीनही कथातल्या वेगवेगळ्या घटनांमधून वाचताना हंसु तर येतेच पण सामान्य माणसाच्या आयुष्यात अनुभवायला येणार्‍या दुनियादारीने धक्केही बसतात.

अशा वेगवेगळ्या रस, रंग भावांच्या या कथा. सुंदर लेखन. हलक्या फुलक्या पण विचार देणार्‍या. सर्वच कथा वाचनीय आहेत. त्यापैकी काही कथांचाच मी या लेखात आढावा घेतला.

सर्वांनी हा पाचा उत्तरी सफल संपूर्ण हा कथासंग्रह जरुर वाचावा आणि दर्जेदार साहित्याचा अनुभव घ्यावा.

उज्ज्वलाताईंचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!!

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ साईड इफेक्ट्स… सुश्री नीलम माणगावे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

?पुस्तकावर बोलू काही?

☆ साईड इफेक्ट्स… सुश्री नीलम माणगावे ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

साईड इफेक्ट्स-Side Effects by Nilam Mangave ...

पुस्तक परिचय 

पुस्तक–“साईड इफेक्ट्स”

लेखिका — सुश्री नीलम माणगावे 

प्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन

पृष्ठे – २९८

किंमत – ३५० रू

“साईड इफेक्ट्स” ही कादंबरी मला अशी भावली……वंदना अशोक हुळबत्ते

नीलम माणगावे यांची ” साईड इफेक्ट्स” ही कादंबरी दोन दिवसात वाचून झाली.एकदा कादंबरी हातात घेतली ती वाचूनच खाली ठेवली.ही ‌कादंबरी एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. कादंबरी वाचताना आपण कादंबरीतील व्यक्तिरेखेचे बोट धरून चालू लागतो.त्यांच्या सुखदुःखात एकरूप होतो.आपण कादंबरी वाचत आहोत हे विसरतो.आपण एक चित्रपट बघत आहोत असा भास निर्माण होतो.कादंबरीच्या प्रस्तावनेत लेखिका सांगतात साधारण १५-२० वर्षांपूर्वी वर्तमान पत्रातून आलेल्या वेगवेगळ्या गावात घडलेल्या दोन बातम्यांनी मी हादरले त्याच वेळी या कथेचे बीज मला सापडले.या कादंबरीशी त्या बातम्यांचा संबंध फक्त निमित्तमात्र आहे. बाकी व्यक्तिरेखा काल्पनिक आहे.पण कादंबरी वाचताना कुठेही या   व्यक्तिरेखा काल्पनिक आहेत असे वाटत नाही.स्त्रियांची होणारी कुचंबणा शहरात काय खेड्यात काय सगळीकडे सारखीच.तिच्या भावनांना, तिच्या मताला, तिच्या म्हणण्याला किंमत असतेच कुठे? ती किती ही  शिकली,तिने नोकरी केली,ती स्वतंत्र असली तरी, तिला पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही.तिचा पाय संसारात, घरात मुलांच्यात, रुढी परंपरेत अडकलेला असतो. स्त्रिया कधी आपलं मत स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. खेड्यात तर तिला घराबाहेर पडताना ही सासू, सासरे ,नवरा ,दीर ,मुले ,यांना विचारावे लागते. स्त्रियांच्या साध्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर अशावेळी लैंगिक सुखाच्या तिच्या कल्पना ती कुणा समोर बोलणार? तिची तळमळ कुणाला समजणार? तिच्या मनाचा, समाधानाचा, विचार कोण करतो ?

सुश्री नीलम माणगावे

या कादंबरीत जयराम या एका पुरूषा सोबत अनेक स्त्रिया राजीखुशीने कशा काय संबंध ठेवतात? हे कृत्य करण्यासाठी त्या का तयार होतात? कश्या तयार होतात? हे लेखिकेने अतिशय ओघवत्या शैलीत  मांडले आहे.

परपुरषाशी विवाहबाह्य संबंध. हा विषय अतिशय संवेदनशील. या बद्दल तोंड उघडून बोलण्याची हिम्मत होत नाही. चार चौघात बोलतानासुद्धा आपल्याला कोणी ऐकत नाही ना? बघत नाही ना ? ऐकले तर काय म्हणतील ? यांची काळजी घेतली जाते अशावेळी या विषयावर उघड उघड कादंबरी लिहिणे म्हणजे शिवधनुष्य पलण्यासारखे होते. सिद्धहस्त लेखिका नीलम माणगावे यांनी हे शिवधनुष्य पेलले. कादंबरीचा विषय बंडखोर आहे.विषय वाचून हा विषय कसा मांडला असेल या बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.

स्त्री मनाची होणारी घुसमट,तिचा एकटेपणा, शारीरिक संबंधांचे आकर्षक, शारीरिक झळ,विवाहबाह्य शरीरिक संबंध हे कादंबरीतील व्यक्तिरेखेच्या मांडणीतून, संवादातून उलगडत जाते. स्त्री मनाची दाहकता समाजासमोर हळुवार पद्धतीने मांडण्यात लेखिकेला यश मिळाले आहे.

गावातील सगळ्या बायका मिळून जयरामला ठेचून मारतात. तेव्हा गावात एकच वादळ उठते. अनेक स्त्रियांचे जयरामशी  संबंध होते हे जेव्हा कुटूंबा समोर आले, समाजा समोर आले.तेव्हा कुटुंबे उध्वस्त झाली. स्त्रियांच्या आत्महत्येचे सत्र सुरू झाले, माणसे कोलमडून पडली, मुलींची ठरलेली लग्ने मोडली, प्रत्येकजण आपल्या घरातील स्त्रीला संशयाने बघू लागला. एका घटनेचे गावात झालेले हे साईड इफेक्ट्स वाचकाला हादरून सोडतात.हे का झाले? कसे झाले? पुढे काय ? यात वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत दिसून येते.

कादंबरीत कुठेही अतताई पण दिसत नाही, कुठे ही आक्रोश दिसत नाही, कुठे ही बंड दिसत नाही. तरी ही सकारात्मक विचार करण्यास ही कादंबरी भाग पाडते लग्न झालेल्या पुरुषांनी अनेक स्त्रियांबरोबर संबंध ठेवले तर त्यात समाजाला काही  वावगे वाटत नाही आणि त्या पुरूषाला माझे काही चूकले आहे,हे लाजिरवाणी जीवन संपवले पाहिजे, मी आत्महत्या केली पाहिजे असे काही वाटत नाही. समाज या गोष्ट स्विकारतो. पण हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत घडली तर  मात्र नवऱ्यापासून समाजापर्यंत सगळे तिला कुल्टा समजतात, तिच्या जगण्याचा अधिकार नाकारता, तिला शब्दांनी टोचून टोचून घायाळ करतात, तिचे जीवन नरक बनवतात,अश्यावेळी आत्महत्ये शिवाय तिच्या पुढे  कोणताच पर्यायच शिल्लक राहत नाही. समाजात पुरुषांना आणि स्त्रियांना वेगळा न्याय का ?

विवाहबाह्य संबंध चांगले नाहीत त्याचे समर्थन लेखिका ही करत नाही पण “आज्ञत्महत्या करण्याएवढी ही मोठी गोष्ट नाही मोठी गोष्ट नाही”हे समजून घेतले पाहिजे. तिला समजून घेतले पाहिजे,तिचा संसार वाचला पाहिजे,ती जगली पाहिजे. हा विचार लेखिकेने कादंबरीत प्रकर्षाने मांडला आहे.यासाठी लोकप्रबोधन  सर्वात महत्त्वाचे आहे.

एखादी  घटना घडली तर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात त्याचे परिणाम जास्त परिणामकारक दिसतात.गावाचे जनजीवन ढवळून निघते.सारा गाव कसा होरपळून निघतो. हे लेखिकेने कादंबरीत दाखवले आहे.

नीलम माणगावे यांचे मी अभिनंदन करते इतका गंभीर विषय किती सहजतेने सोप्या पद्धतीने कादंबरीत मांडला आहे या कादंबरीतील व्यक्तिरेखा, त्यांची भाषा, त्यांचं वावरणं, सारे एका मर्यादेत आहे कुठेही बीभत्सपणा आढळत नाही, प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याचे सामर्थ्य लेखणीत आहे म्हणून कादंबरी सलग वाचली जाते पुढे काय होईल, पुढे काय होईल, ती अशी का वागली, तिचे पुढे काय होणार, हे प्रश्न पडतात आणि ते सोडवण्यासाठी आपण पुढे वाचत राहतो.

प्रिया आणि प्रतिभा ही प्रकरणे या कादंबरीचा गाभा आहे. कोलमडलेले गाव आणि उध्वस्त झालेली मने पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड महत्वाची आहे. जीव अनमोल आहे. जीव वाचला पाहिजे. जगणं महत्त्वाचं आहे हेच या कादंबरीचे सारं आहे असे मला वाटते.

एक वाचक म्हणून मला ही कादंबरी जशी भावली तसे मी माझे मत मांडले.साईड इफेक्ट्स ही कादंबरी ग्रामीण जीवन अधोरेखित करणारी आहे. विवाहबाह्य संबंधा बाबत ग्रामीण महिला कसा विचार करतात हे ही कादंबरीतून स्पष्ट होते. स्त्री माणूस आहे. ती चुकू शकते. तिने नकळत चूक केली तर चूक सुधारण्याची संधी तिला ही मिळाली पाहिजे. हे समाजाने, पुरूष वर्गाने समजून घ्यावे ही प्रांजळ इच्छा लेखिकेने कादंबरीतून मांडली आहे.

ह्या कादंबरी वर चांगला चित्रपट तयार होईल. ही कादंबरी समाजाला एक नवा विचार देईल असे वाटते. तो विचार पचविण्याची ताकद वाचकांच्या असावी म्हणजे झालं.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘शिदोरी’ – सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

पुस्तकाचे नाव :शिदोरी

लेखिका: सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे

किंमत रू.240/-

संपर्क:9423029985

☆ शिदोरी – भावनांच्या मंजि-यांनी बहरलेली काव्य वृंदा – सुहास रघुनाथ पंडित ☆

सौ.उज्वला सहस्त्रबुद्धे यांचे ‘शिदोरी’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बत्तीस ललित लेख व पन्नास कविता आहेत. पहिला विभाग हा लेखांचा आहे व दुसरा विभाग हा कवितांचा काव्य मंजिरी या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. आज आपण काव्य मंजिरी तील कवितां विषयी जाणून घेऊ.

काव्य-मंजिरी हा  काव्यसंग्रह येण्यापूर्वी त्यांनी गद्य व पद्य लेखन केलेले आहे. त्यामुळे लेखनकला ही काही त्यांच्यासाठी नवीन नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छितात. त्यामुळे मनात जसे तरंग उठतील तसे त्यांना शब्दरूप देऊन त्या लेखन करू शकतात. मनाची संवेदनशीलता त्यांना काव्य लिहिण्यास उद्युक्त करते. हे मन एके ठिकाणी स्थिर न राहता सर्वत्र भिरभिरत असते आणि सारे काही टिपून घेते.  मग त्यांच्या कवितेतून निसर्ग फुलतो, कधी भक्तीचे दर्शन होते,कधी कुटुंबवत्सलता दिसून येते, कधी जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त करते, कधी चिंतनशील मनाला मोकळे करते, तर कधी वर्तमानाची दखल घेते.एखाद्या कॅनव्हासवर वेगवेगळे रंग उधळावेत आणि त्याच्या मिश्रणातून एक आकर्षक कलाकृती तयार व्हावी त्याप्रमाणेच या काव्य तुलसीच्या शब्द मंजि-या फुलून आल्या आहेत.

या काव्यसंग्रहात आपल्याला विविध विषयांवरील कविता वाचायला मिळतात. देशभक्ती बरोबरच ईश्वरावरील श्रद्धाही दिसून येते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लिहीलेली ‘स्वातंत्र्यदिनी स्मरण’ ही कविता किंवा तिरंगा, स्व. सावरकर या कविता मनातील देशप्रेमाची साक्ष देतात. तर गणपती, विठूमाऊली यांच्याबरोबरच सांगलीजवळील बागेतील गणपती मंदिराचे त्यांनी केलेले वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करणारे आहे. ‘कृष्ण वेडी’ ही कविता तर भक्तीमय प्रेमकाव्याचा सुंदर नमुनाच आहे.  

वर्तमानात घडणा-या घटनांची नोंदही त्यांनी घेतली आहे. कोरोनाग्रस्त काळामध्ये सहन कराव्या लागणा-या परिस्थितीचे, समस्यांचे यथार्थ वर्णन करून त्यातून बाहेर पडण्याचा आशावादही त्या व्यक्त करतात.

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कवयित्री या जीवनाविषयी आशावादीच आहेत. मनावरची उदासीनतेची काजळी निघून जाईल असा विश्वास त्यांना वाटतो. उगवतीच्या सूर्याकडे पाहून, ठप्प झालेल्या समाजजीवनाला संयम सोडू नकोस असा धीर त्या देतात. श्रावणाची चाहूल लागताच त्यांना खात्री वाटते की ‘एक दिवस नक्की येईल, पूर्ववत होता तसा’. मृत्यूच्या छायेखाली गुदमरणारा श्रावण अनुभवताना त्यांना बालकवींचा श्रावणही आठवतो हे त्यांच्या जीवनावरील श्रद्धेचे प्रतिक आहे.

कवयित्रीच्या हातून स्त्रीसुलभ कुटुंबवत्सलता स्त्रवली नाही तरच नवल! नात्यांच्या रेशीमधाग्यात शब्द गुंफून सजलेल्या त्यांच्या कविता आजी होण्याचा आनंद व्यक्त करतात, आजी आणि नात यांच्या नात्यातील भावविश्व दाखवतात आणि नव्या पिढीबरोबर जुळवून घेण्याची तयारीही दाखवतात. मग ही कविता तीन पिढ्यांची होऊन जाते.

जीवन विषयक भाष्य करणा-या त्यांच्या कविताही वाचनीय आहेत. मनाच्या भोव-याला दैवाची गती मिळत असते. त्यामुळे जगत असताना पराधिनता ही असतेच असे सुचवणारी ‘भोवरा’ कविता असो किंवा ‘माती असशी, मातीत मिसळशी’ या उक्तीची आठवण करून देणारी ‘आयुष्याची उतरंड’ ही कविता असो, जीवनावर केलेले भाष्य हे सात्विक आस्तिकतेतूनच आले आहे हे जाणवते. ‘पिंपळ’ या कवितेतही मनाला दिलेली पिंपळाची उपमा किंवा आठवणींची घरटी या कल्पना नाविन्यपूर्ण वाटतात. याच कवितेतील

आसक्तीची मुळं इतकी

घट्ट रूजली आहेत भूमीत

की त्यांना जाणीव नाहीये

अस्तित्व धोक्यात आल्याची

या काव्यपंक्तीतून मानवी मनाची नेमकी अवस्था त्यांनी सांगितली आहे. ‘भरजरी शालू’ या कवितेतून तर त्यांनी आयुष्याचा आलेखच मांडला आहे.

आत्ममग्नता,चिंतनशिलता हा तर कविचा उपजत गुणधर्म. याच चिंतनशिलतेतून, असं असलं तरी, मन क्षेत्र, विसाव्याचे क्षण, मन तळं यासारख्या कविता जन्माला आल्या आहेत.विचारांच्या मंडलात मती गुंग होत असताना नेमके शब्द सापडले की कविता कशी जन्माला येते हे ही त्यांनी ‘कवितेचा जन्म’ या कवितेतून सांगितले आहे.

रसिक मनाला खुणावणारा,चारी बाजूला पसरलेला निसर्ग कविमनाला स्वस्थ बसू देईल का? अनेक सुंदर निसर्ग कवितांची निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे. केवळ निसर्ग वर्णन न करता त्यांनी काही ठिकाणी त्याचा संबंध मनाशी जोडला आहे. मनरूपी तुळशीला येणा-या विचाररूपी मंजि-या या त्यांच्या भावुक मनाचे प्रतिकच आहेत. ‘ॠतुंची फुलमाला’ ही एक नितांत सुंदर निसर्ग कविता आहे. निसर्गात बहरणारा प्रत्येक ऋतू मनही बहरवून टाकतो हे प्रसन्न मनाचे द्योतक आहे.एकीकडे सागराची साद ऐकताना त्याना समोर साहित्य सागरही दिसू लागतो. साहित्याच्या अथांगतेची जाण असणे म्हणजेच भविष्यकाळात या साहित्य सागरातील मोत्यांचा त्यांना शोध घ्यायचा आहे याची कल्पना येते. उनझळा, पावसास, रंगपंचमी या निसर्ग कविताही सुंदर दर्शन घडवतात. शब्दझरे या कवितेतून निसर्गातील सौंदर्य शब्दातून खुलवून शब्दांचे मोती बनवण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो.

काव्याचा असा रसास्वाद घेताना, सौ. सहस्त्रबुद्धे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी यापूर्वी कविता लेखन केले आहे. आता काव्यसंग्रह काढून पुढचे पाऊल टाकले आहे.संवेदनशीलता आणि भावनाशीलता याबरोबरच त्यांनी काव्याकडे अधिक अभ्यासू वृत्तीने पाहिल्यास त्यांच्याकडून वृत्तबद्ध कविताही लिहून होतील असा विश्वास वाटतो. विषयांची आणि काव्यप्रकारांची विविधता त्यांच्या काव्यलतेला बहर आणत आहे. यापुढील काव्यसंग्रहात त्यांनी नवीन वाटा धुंडाळल्या आहेत याचा अनुभव वाचकांना यावा अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरणार नाही. त्यांच्या साहित्य प्रवासास शुभेच्छा!!.

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ सैनिक हिमालयाचा… कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त) ☆ परिचय – सुश्री अलकनंदा घुगे आंधळे ☆

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ सैनिक हिमालयाचा… कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त) ☆ परिचय – सुश्री अलकनंदा घुगे आंधळे ☆

No photo description available.

कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त)

पुस्तकाचे नाव : “सैनिक हिमालयाचा “

लेखक : कर्नल शरदचंद्र पाटील ( निवृत्त ) 

प्रकाशक : अनुकेशर प्रकाशन 

पृष्ठसंख्या : २२८ 

किंमत :    रु. ३५०/-

(या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक,  “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच  आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..)

तरुणपणी अक्षय कुमारचा सैनिक नावाचा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर बॉर्डर..चित्रपटांमधून सैनिक फक्त गरजेनुसार दाखवला जातो; खरी थीम तर लवस्टोरीच असते.. अलीकडे आलेले सत्य घटनेवरील काही चित्रपट याला अपवाद आहेत. या चित्रपटातून सैनिक मला जितका समजला नाही, तितका परवाच वाचलेल्या एका पुस्तकातून समजला. पुस्तकाचे नाव आहे, ‘सैनिक हिमालयाचा’.. आणि लेखक आहेत निवृत्त कर्नल शरदचंद्र पाटील..

चित्रपट पाहताना एक गोष्ट माईंडमधे सेट असते की, समोरचा सैनिक हा सैनिक नसून फक्त एक्टिंग करतोय. अनेक रिटेक घेऊन त्याने प्रत्येक सीन शूट केलेला असतो. मात्र वास्तवात सैनिकांच्या आयुष्यात त्यांना प्रत्येक सीन एकदाच, एका शॉटमधे ओके आणि सक्सेसफुल करायचा असतो. हाच फरक आहे चित्रपटातून सैनिक बघण्यात आणि प्रत्यक्ष पुस्तकातून सैनिक समजण्यात..

अलीकडेच प्रकाशित झालेले हे पुस्तक नुसते पुस्तक नसून, एका सैनिकाचे आत्मवृत्त आहे. एका सैनिकाने वाचक आणि भारतीय जनतेशी साधलेला संवादच आहे. २६ – २७ वर्षाच्या सैनिकी आयुष्यात लेखकाने दहा अकरा वर्षे हिमालयात घालवली. आजही लेखकाला हिमालय साद घालतो. आणि खरं सांगू का? पुस्तक वाचताना मी ही कित्येक वेळा मनोमन हिमालयात जाऊन आले. इतका जिवंतपणा लेखनातून जाणवला. प्रसंग चांदण्या रात्रीचे असोत, अंधाऱ्या रात्रीचे असोत, हिमवृष्टीचे असोत किंवा हिमस्खलनाचे असोत.. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर जसाचा तसा उभा करण्यात लेखकाने कमालीचे यश मिळवले आहे. बर्फाच्या गुहेत अडकलेला प्रसंग असो किंवा राहत्या बंकरवर कोसळलेल्या महाकाय शिळेचा प्रसंग असो; केवळ नशीब बलवत्तर म्हणून लेखक जिवंत राहतात.. हे वाचून मन विषण्ण होते. कसे राहत असतील हे सैनिक जीवावर उदार होऊन..? सियाचीन हिमनदीसारख्या मृत्यूच्या जबड्यात जाऊन देशसेवा करण्याचे धैर्य या सैनिकांच्या अंगी कुठून येत असेल देव जाणे ..! तीन महिने दाढी न करता, केस न कापता,अंघोळ न करता? बर्फात 24 तास थंडी आणि  हिमवृष्टीशी युद्ध तर चालू असते या सैनिकांचे..!  मी तर आत्तापर्यंत समजत होते, सियाचीन हे नाव चीनच्या नावावरून पडले असेल, पण तसे नाही..तिबेटी भाषेत ‘सिया’ म्हणजे ‘गुलाब’ आणि ‘चेन’ म्हणजे ‘मुबलक’..सियाचेन म्हणजे ‘मुबलक गुलाबांची जागा’.. हे या पुस्तकातूनच उलगडले.. ऑफिसर्स मेस म्हणजे सामान्य जनतेच्या दृष्टीने चैनीची जागा, पण तसे नाही..हवामानाशी जुळवून घेण्याची कला म्हणजे अॕक्लमटायझेशन..अशा कित्येक सैनिकी संकल्पना जाणून घ्यायच्या असल्यास पुस्तक वाचावे..आतापर्यंत दोन दंश माझ्या परिचयाचे होते. एक म्हणजे सर्पदंश आणि दुसरा म्हणजे विंचूदंश.. पण हिमदंश पण असतो हे पुस्तक वाचून कळले.. हाताच्या बोटाचा सतत बर्फाशी संपर्क येऊन बोटांची संवेदनाच निघून जाते. प्रसंगी बोटे कापावीही लागतात. बोटावर निभावले तर ठीक, नाही तर मृत्यूही येऊ शकतो..इतका कठीण असतो हा हिमदंश.. खरेच या आणि अशा कित्येक गोष्टी लेखकाने या पुस्तकात जीव ओतून लिहिल्या आहेत.

कॅप्टन कपूर यांच्या जीवावर बेतलेला हिमस्खलनाचा, त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेला प्रत्यक्ष अनुभव वाचून तर अंगावर काटा उभा राहतो.सिक्कीमच्या जंगलातील जळवांचा हल्ला असो वा हिमालयातील प्रत्येक ठाण्यावर पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत असो; या सैनिकांच्या जिद्द, चिकाटी आणि धैर्याला सलाम करावासा वाटतो..

कश्मीर फाईल्स जर समजून घ्यायची असेल तर एका सैनिकाइतकी ती कोणीच मांडू शकत नाही. त्यासाठी तरी हे पुस्तक अवश्य वाचावे, असे मी म्हणेन..जागोजागी वापरलेली कृष्णधवल आणि रंगीत छायाचित्रे पुस्तकाच्या आशय-विषयाचे सौंदर्य वाढवतात. दारूगोळ्याची साफसफाई, हिमनदी, सफरचंदाच्या बागांची चित्रे खरोखर पाहण्यालायक आहेत..मधेमधे प्रसंगानुरूप लिहिलेल्या गज़ला लेखकाच्या साहित्यिक प्रतिभेची ओळख करून देतात.. खरे तर अशी पुस्तके सैनिकाकडून लिहिणे जाणे आवश्यक आहे, जेणेकरून सैनिकांविषयी सामान्य जनतेच्या मनात आदर निर्माण होईल आणि तरुण वर्ग सैनिक होण्याकडे प्रवृत्त होईल..सैनिक कोणत्या हालअपेष्टातून जातात, ते ही सर्वांना कळेल..आपण विकेंडला मौजमजा करतो, सण,समारंभ साजरे करतो, जन्मदिवस साजरे करतो..तेव्हा हे सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर कुठे तरी सीमेवर देशाचे रक्षण करत असतात.. अशा प्रत्येक सैनिकाला मानाचा मुजरा !

या लेखातून सर्वांना विनंती ..चला थोडे सैनिकांनाही प्रसिद्ध करूया.. कारण खरे हिरो तेच आहेत, चित्रपटातले नव्हे.. लेखकाने पुस्तकात लिहिलेली काही वाक्ये, खूप काही सांगून जातात.. जसे की,

“…संपूर्ण सैनिकी आयुष्यात फाजील आत्मविश्वास चालत नाही. आत्मविश्वास असावा. धाडस असावे, पण नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच ! तसे केले नाही तर कधी मृत्यू झडप घालेल ते सांगता येत नाही ..”

आणखी एका प्रसंगी लेखक म्हणतात, ” पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरचे ज्ञान यात जमीन-अस्मानाचा फरक असतो..” आणि उपसंहारमधे लिहिलेली कविता, ‘त्रिवार वंदन’ तर लाजबाव आहे.

या पुस्तकातून मिळणारा सर्व नफा लेखक,  “आर्मी सेंट्रल वेलफेअर फंड” निधीला प्रदान करणार आहेत, तेव्हा हे पुस्तक खरेदी करून आपण फूल न फुलाची पाकळी या निधीसाठी मदतच करणार आहोत..एक प्रकारे देशसेवाच  आपल्या हातून घडणार आहे. तेव्हा कृपया सर्वांनी पुस्तक खरेदी करून वाचावे..ही विनंती ..

परीक्षण : अलकनंदा घुगे आंधळे

औरंगाबाद

मोबाईलः ९४२२२४३१५९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/सौ. सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆‘अनादिसिद्धा’ – सुश्री भूपाली निसळ ☆ परिचय – श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘अनादिसिद्धा’ – सुश्री भूपाली निसळ ☆ परिचय – श्री आनंदहरी  ☆ 

अनादिसिद्धा

लेखिका : भूपाली निसळ

प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई

पृष्ठे : १३२  किंमत : ₹ ३२०/-

‘अनादिसिद्धा ‘ भूपाली निसळ यांची अनादि वेगळेपण जपणारी सर्वांगसुंदर, लक्षवेधी कादंबरी*

अहमदनगर येथील युवा लेखिका भूपाली निसळ यांच्या ‘कल्लोळतीर्थ’ या पहिल्या कादंबरीचे प्रकाशन ८ मार्च २०२० ला झाले आणि अल्पकाळातच ती उच्चांकी विक्री असणारी कादंबरी ठरली. अपेक्षेप्रमाणे ‘ कल्लोळतीर्थ ‘ या कादंबरीची दुसरी आवृत्ती वर्षाच्या आत प्रकाशीतही झाली. ही घटना मराठी साहित्यविश्वातील आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद अशीच घटना म्हणावी लागेल. वाचकच नाहीत असे म्हटले जात असताना ‘ कल्लोळतीर्थ ‘ ला मिळालेल्या या यशाचे जाणवलेले कारण एकच ‘कल्लोळतीर्थ ‘ च्या विषयाचे वेगळेपण आणि दर्जेदारपणा.  याचा अर्थ एकच ‘साहित्यात आपण काहीतरी वेगळे दिले, वेगळ्या विषयावरील दिले तर त्याचे उत्स्फूर्त स्वागत हे होतेच.’ हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे.

कल्लोळतीर्थ ही  ‘शिल्पकलेवरील’ मराठीतील अपवादात्मक ( कदाचित एकमेव ) कादंबरी. ‘कल्लोळतीर्थ ‘ नंतर लेखिका भूपाली निसळ यांच्याकडून वाचकांच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या अपेक्षांची पूर्ती करणारी आणि लेखिकेकडून आणखी अपेक्षा निर्माण करणारी ‘अनादिसिद्धा ‘ ही दुसरी कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे.

खरेतर आपल्याला सर्वच कलांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. त्यातही लेणी आणि शिल्पांचा तर खूप प्राचीन काळापासून वारसा लाभला आहे पण काही ठराविक लेणी आणि शिल्पे वगळता याची माहिती आणि  अभ्यासक वगळता फारच अल्प लोकांना आहे असे खेदाने म्हणावे लागते. लेणी-शिल्पकला केंद्रस्थानी ठेवून मराठी ललितसाहित्यात म्हणावे असे लेखन झालेले नाही, ते वाचकांपर्यंत आलेले नाही असे म्हणले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. अशा पार्श्वभूमीवर भूपाली निसळ ही युवती लेण्यांचा, शिल्पांचा अभ्यास करते, त्यावर मराठीत कादंबरी लिहिते हे खूपच कौतुकास्पद आहे.

चालुक्यकालीन वातापी येथील लेण्यांच्या, शिल्पांच्या निर्मितीचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन लेखिका भूपाली निसळ यांनी ‘अनादिसिद्धा ‘ही कादंबरी लिहिली आहे. एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन म्हणले की ते बोजड शब्दांतील, कंटाळवाणे असते किंवा असणार हा सर्वसामान्य वाचकांचा असणारा समज लेखिकेच्या ‘कल्लोळतीर्थ ‘ आणि ‘अनादिसिद्धा ‘ या दोन्ही कादंबरींनी खोडून काढला आहे.

‘अनादिसिद्धा ‘ चा काळ आहे तो साधारण सोळाशे वर्षांपूर्वीचा, साधारण सहाव्या शतकातील. आजच्या बदामी आणि तत्कालीन चालुक्यशासीत प्रदेशातील लेण्यांच्या निर्मितीवरील या कादंबरीत आज रूढ नसणारे काही शब्द येतात पण त्या शब्दांचा अर्थ तळटीप लिहून देण्यात आला आहे हे याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य आहे, कादंबरीची सुरवात होते तीच मुळी नाटकासारखी पात्र परिचयाने आणि तिथूनच रसिक वाचक कादंबरीशी जोडला जातो.

तो जसजसा कादंबरी वाचत जातो तसतसा तो वाचक न उरता त्यातील घटनांचा साक्षी बनत जातो, दर्शक बनत जातो.. आणि हे लेखिकेचे शब्दसामर्थ्य आहे.

बदामी परिसरात चालुक्यसाम्राट राजा कीर्तिवर्मा याच्या राजवटीत अनेक मंदिरे, लेणी – गुंफा यांची निर्मिती झाली. त्यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेऊन लेखिकेने ही कादंबरी लिहिली आहे. सम्राटाचा अनुज, सेनापती,   वास्तुविशारद, प्रमुख शिल्पी ( शिल्पकार ), शिल्पी या मंदिरे आणि शिल्प निर्मितीत योगदान असणाऱ्या काही पात्रांबरोबर रेवती, हरिदत्त यांसारखी काही काल्पनिक पात्रेही या कादंबरीत येतात पण वास्तव आणि काल्पनिक यांचे अतिशय सुरेख, मनभावक अद्वैत साधण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

समर्पितता, आदर, आस्था, प्रेम, अहंकार, द्वेष इत्यादी मानवी भावभावनांचे आणि श्रेयवादाचे कादंबरीतील चित्रण कुठेही बटबटीतपणा येऊ न देता अतिशय संयत रूपात या कादंबरीत येते आणि ते वाचताना कादंबरी वाचकाला त्या काळात घेऊन तर जातेच पण त्याचबरोबर ती समकालाशीही  जोडत राहते हे या कादंबरीचे आणि लेखिकेचे अपूर्व यश म्हणावे लागेल.

कादंबरी वाचकांच्या मनाची पकड घेते ती तिच्या आरंभापासूनच .. अगदी कादंबरीच्या अर्पणपत्रिकेपासूनच ! कादंबरी तीन प्रकरणात विभागली असून प्रत्येक प्रकरणाला अतिशय सार्थ, सुंदर, मनभावक आणि चिंतनीय अशी  वेगळी चिंतनीय अर्पणपत्रिका आहे हे ‘अनादिसिद्धा ‘ चे आणखी एक वेगळे वैशिष्ठय आहे.

कादंबरी वाचताना ‘ स्थिरता निर्माणाची स्वप्ने देते, उत्तुंगता देते. ‘ अशी वैश्विकसत्य सांगणारी, जीवनार्थ सांगणारी सुंदर वाक्ये अगदी सहजतेने ,ओघात येतात आणि क्षणभर वाचकाला थबकवतात. काही वाचकांना ती, कादंबरीचे स्वतःचे वेगळेपण अधोरेखित आणि अबाधित ठेवूनही वि.स.खांडेकरांचे आणि त्यांच्या साहित्यातील जीवनचिंतनाचे स्मरण करून देतात. हे लेखिकेच्या लेखनशैलीचे आणि ‘अनादिसिद्धा’ चे वैशिष्ठय म्हणावे लागेल.

‘अनादिसिद्धा ‘ कादंबरीत प्रारंभी दिलेला बदामी परिसरातील शिल्पस्थळांचा नकाशा तसेच संजय दळवी यांचे मुखपृष्ठ छायाचित्र व प्राजक्ता खैरनार यांच्या शिल्पांच्या छायाचित्रे लेखिकेच्या अभ्यासाची ग्वाही देतात आणि वाचकाला वाचनप्रवासात सहाय्यभूत ठरतात,भावूनही जातात.

‘अनादिसिद्धा ‘ ही लेणी-शिल्प निर्मितीवरील, वेगळ्या भवतालाचा वेध घेणारी मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरावी अशी सर्वांगसुंदर कादंबरी आहे हे निश्चित !

पुन्हा पुन्हा वाचण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘अनादिसिद्धा कादंबरीने लेखिका भूपाली निसळ यांच्या साहित्यलेखनाबाबतच्या अपेक्षा आणखी उंचावून ठेवल्या आहेत.’अनादिसिद्धा’ कादंबरी साठी आणि पुढील साहित्यलेखनासाठी भूपाली निसळ यांना खूप खूप शुभेच्छा !

प्रस्तुति – श्री आनंदहरी

इस्लामपूर जि. सांगली

८२७५१७८०९९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आरबूज… श्री रवी राजमाने ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?पुस्तकावर बोलू काही?

☆ आरबूज… श्री रवी राजमाने ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

कथासंग्रह : आरबूज

लेखक–  श्री.रवी राजमाने

प्रकाशक : ललित पब्लिकेशन, मुंबई

“ आरबूज“ —अस्सल गावरान मातीच्या कथा – सौ. सुचित्रा पवार

नुकताच रवी राजमाने सरांचा ‘आरबूज ‘ हा कथासंग्रह वाचला. एकूण १४कथा असलेला, मुलखावेगळ्या अस्सल गावच्या माणसांच्या व्यक्तिचित्रणाचा हा संग्रह वाचनीय आहे.

आरबूज म्हणजेच अफलातून, मुलखावेगळी असणारी माणसे, ज्यांना कधी प्रसिद्धी मिळालेली नसते, कधी पैश्यासाठी हापापलेपण नसते की कधी कुणाकडून कसली अपेक्षा नसते. मात्र ही माणसे समाजोपयोगी असतात, समाजहितासाठी झटत असतात, त्यांच्या दररोजच्या सामान्य जगण्यातून, साधेपणातून, जगापुढे आदर्श ठेवत असतात. मात्र त्यांच्या कार्याची वाहवा कुठेच होत नसते. इतकेच काय गावाची वेस सोडून पलीकडे त्यांची महती सुद्धा कुणाला माहीत नसते.अत्यंत निर्लेप, सालस, गोड शहाळीसारखी असतात. जन्मतात अशीच जगातल्या कुठल्या कुठल्या कोपऱ्यात आणि मरतात सुद्धा अशीच कुठंतरी कोपऱ्यात. जशी जिवंतपणी अदखलपात्र असतात तशीच मृत्यूनंतरही ती कुणाच्या लक्षात रहात नसतात. कधी त्यांचा शेवट सुखांत होतो तर कधी करुण दुःखांत.

सरांच्या परिचयातील अशाच साध्या भोळ्या पण अफलातून, सरांना भावलेल्या माणसांच्या जीवनकथा सरांनी आरबूज मध्ये चित्रित केल्या आहेत.

शाळेच्या आवारात मुलांना भडंग, गुलाबजाम विकणारा महादूमामा मुलांच्या आरोग्यासाठी स्वतःच सर्व पदार्थ घरी बनवतो व विकतो.पोटासाठी राबणाऱ्या महादूमामांचे मन साफ आहे.. दररोज मैलोनमैल सायकल मारत जाऊन  संसाराचा गाडा चालवणारे मामा आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्टच करतात आणि एक दिवस सहजच या जगाचा निरोप घेतात. त्यांच्या प्रेमळ प्रामाणिक वागण्याची दखल जग कधीच घेत नाही.

अंजुम-सायबाची प्रेमकहाणी ही अशीच एकनिष्ठ आहे. आयुष्यभर माहेर तुटलेली सुंदर अंजुम हिंदू सायबाशी एकनिष्ठ राहून पुढं आपल्या मुलांना समाजात त्रास होऊ नये म्हणून निपुत्रिक रहाते, पण समाजाची पर्वा न करता सायबा विवाहित असूनदेखील विनातक्रार आपला पत्नीधर्म निभावते.

असाच ग्रामपंचायत आणि गाव स्वच्छ करणारा चिमा पदरमोड करून छोट्या मुलांना गोळ्या  देऊन खुश ठेवतो.

स्वतःच्या पोटाला कमी पडले तर चालेल पण दारात आलेल्या पक्षांना खाऊ घालणारी सीतामाई पण अशीच भूतदया जपणारी आहे.आयुष्यभर आपले व्रत जपत सहजच झोपलेल्या जागी क्षणात जग सोडून जाते.

स्वतः पालावर भटकंती करत खडतर आयुष्य जगणारा दगड्या गोविंदार्या असो, की पुरुषांच्या बरोबरीने पुरुषी कामे करणारी कल्पनामावशी असो, पोटासाठी राबणारी ही माणसे जगाची पर्वा न करणारी आहेत.दररोजच्या जगण्याच्या प्रश्नाला भिडत आनंदाने दुःख पचवत जगत आहेत.

गांधीवादी विचारसरणीचे, स्वच्छतेचे भोक्ते असणारे,आपल्या तत्वांशी प्रामाणिक, एकनिष्ठ रहात शिक्षणाधिकारी बी.  डी.ओ. बापू एकाकी आयुष्य जगतात आणि एकाकीच मरतात. जगावेगळ्या असणाऱ्या माणसांना जग आपल्यात सामावून घेत नसते हेच खरे.

३० फूट खोल विहीर एकटाच खोदणारा, स्वतःच्या घराचे सर्व सामान दूरवरच्या अंतरावरून सायकलवरून आणून टाकताना स्वतःचे हसे करून घेणारा अरबूज – गुलाब हुसेन भालदार उर्फ बाळू- अचाट ताकदीचा आहे. त्याच्या अचाट ताकदीचा गैरवापर मात्र तो कधीच करत नाही. आपले शेत कसून साधे सरळ जीवन जगत आहे. इतक्या अचाट ताकदीच्या माणसाची खबर कुठल्याच वृत्तपत्राला अथवा टीव्हीलाही नाही !

असाच अचाट ताकदीचा पैलवान परसूदादाही. 

कुटुंबप्रमुख पुरुष कर्तृत्ववान  नसेल तर  कुटुंबाची आबाळ होते, हालअपेष्टा होते. मात्र गृहिणी कर्तृत्ववान असेल तर ती आपल्या कुटुंबाला प्रत्येक अडीअडचणीतून तर सोडवतेच, पण आपल्या मुलाबाळांवर योग्य संस्कार करून, त्याना जीवनाची दिशा देऊन, आपला एक आदर्श निर्माण करणारी गंगू नानी म्हणजेच सरांच्या मातोश्री होत.

मोडलेल्या हाडांचे सांधे जुळवण्याचे कसब अंगी असणारा देवमामा कोणाचेही कसलेही हाड मोडलेले असले तरी आपल्या हातकौशल्याने व कसबीने बिना मोबदला बसवून देतात. खेडोपाडी डॉक्टर ,औषधोपचार मिळेपर्यंत रुग्णाचा आजार बळावायचा, म्हणून लोक देवमामाकडे जाणेच पसंत करत. देवमामा नावाप्रमाणेच देवमाणूस होता. एकदा गावातील एका शेतात धनगराचे पोर बाभळीवरून खाली पडले आणि पाय मोडला. मुलाच्या वडिलांनी त्याला देवमामाकडे आणले. पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या धनगरांकडे शहरात जायला कुठले वाहन आणि पैसे ? तरी पण देवमामाने बिना मोबदला हे काम केले म्हणून एक बकरीचे पिलू तो धनगर देवमामाला देऊ करतो पण देव मामाच्या निःस्वार्थी मनाला ते पटत नाही. म्हणून मामा ते पिलू खांद्यावर टाकून धनगराच्या वस्तीवर चालत नेऊन परत करतात.

साहित्यावर भरभरून प्रेम करणारे ,साहित्य उपासना करणारे, पण प्रसिद्धीपासून नेहमी दूर रहाणारे चंदा जोशी दादा असेच साधे, निगर्वी व्यक्तिमत्त्व.

नेहमीच समाजाच्या  नजरेत तिरस्कृत असणारी, माणूस असूनही समाज जिला जवळ करत नाही असे पायलसारखे कितीतरी शिखंडी आयुष्यभर अवहेलनेच्या आगीत धुमसत रहातात. ना नातेवाईक, ना समाज, कोणीच त्यांना आपलेसे करत नाही की त्यांच्यावर माया करत नाहीत. पायलची कहाणी वाचून खरंच हृदय कळवळून जातं. हा दैवी शाप तर नसेल ना?असे वाटते. पायलसारख्या अनेक उपेक्षितांना माणसात घेणे, त्यांना माणूस म्हणून सहज वागणूक देणे खरेच गरजेचे आहे.

आरबुजच्या माध्यमातून सरांनी आदर्श पण उपेक्षित,अदखल व्यक्तींची दखल आपल्या कथासंग्रहातून घेतली आहे. गावोगावच्या अशा आरबूज लोकांचा सत्कार व सन्मान व्हायलाच हवा.

आरबूज… लेखक – श्री रवी राजमाने

समीक्षक – © सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “गारवा” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “गारवा” – लेखिका सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव – गारवा (काव्यसंग्रह)

कवियत्री – सौ. राधिका भांडारकर, पुणे

प्रकाशक – ॲड. जयमाला भगत, अजिंक्य प्रकाशन, वाशीम

मुद्रक – अजिंक्य एंटरप्राईझेस,वाशीम

अक्षर जुळवणी – अरविंद मनवर

प्रस्तावना – सौ. शोभा अवसरे (+91 98704 94993)

मुखपृष्ठ – कु. सायरा वाघमोडे ॲटलांटा (वय वर्ष्ये ९)

मूल्य – रू.१५०/—

सौ राधिका भांडारकर

माझ्या हातात सौ. राधिका भांडारकर यांचा गारवा हा नवा काव्यसंग्रह आला आणि जसजशी मी एकेक कविता वाचत गेले तसतशी मी त्यांत डुबूनच गेले.

एकूण ३३ कवितांचा हा संग्रह. ह्यात राधिकाताईंनी जीवनातील विविध विषय हाताळले आहेत. त्यात जीवनाविषयीचे तत्वज्ञान आहे, माणसांच्या प्रवृत्तींचे वर्णन आहे, जबाबदार नागरिक म्हणून त्यांची कर्तव्ये आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, आईची माया आहे, बदललेला काळ आहे, ईश्वरी शक्तीचा विश्वासही आहे.

बहुतांशी कविता मुक्त छंदात असल्या तरी काही कविता षडाक्षरी, अष्टाक्षरी, दशाक्षरी, अक्षरछंदातही आहेत. यावरून नियमबद्ध कविता लिहिण्याचाही त्यांना चांगलाच सराव असल्याचे दिसून येते.

भासमय आणि तुझे आहे तुजपाशी ह्या कवितांतून माणसाच्या प्रवृत्ती दिसून येतात. असमाधानी वृत्तीमुळे मृगजळामागे तो कसा धावतो नि त्याची फसगत होऊन नैराश्य पदरी येते हे त्यांनी साध्या सरळ सोप्या भाषेत दाखवून  दिले आहे. त्या लिहितात…..

आपुले आपुल्यापाशी

परि नजर पल्याडी

ऊन पाण्याचाच खेळ

वाट खोटी वाकडी

खरंतर प्रत्येकच कवितेतील त्यांची भाषा सहज सुलभ असल्यामुळे कविता अधिक जवळची वाटते. कुठेही क्लिष्टता नाही, भाषेचे अवडंबर नाही.

ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद शिरावर असल्यानंतर केलेल्या कष्टाचे चीज होऊन सुखासमाधानाचे, आनंदाचे भरभराटीचे दिवस दिसतात हे सांगताना आशीर्वादया कवितेत त्या लिहितात…

आता काही कमी नाही

आयुष्यात कष्ट केले

आनंदाने केले सारे

त्याचे मात्र चीज झाले

आता खरे जाणवते

यशाकडे पाहताना

आशीर्वाद होता त्याचा

मन भरे म्हणताना

पदरया कवितेत पदराची बहुरूपे दाखवून जीवनाची वास्तवता कवियत्रीने वाचकांना सादर केली आहे.

पदर खांद्यावर

पदर डोक्यावर

तो कधी जरतारी

तर कधी ठिगळे लावलेला

सार्‍या संसाराची मदार या पदरावर असते. हलक्या फुलक्या शब्दांतून अतिशय गहन विचार या कवितेत मांडला आहे.

एखादी गोष्ट करायची नसली तर वेळ मिळत नाही ही सोयीस्कर सबब सर्वसाधारणपणे आपण सगळेच देत असतो. वेळच मिळत नाही ह्या कवितेत कवियत्री वेळ मिळत नसतो, तो काढायचा असतो आणि त्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते हा फार मोलाचा संदेश देतात.

मुलगा नसल्याची खंत आज आपण इतके प्रगत असलो तरी पुष्कळच कुटुंबात दिसून येते, किंबहुना समाजालाच त्याची जास्त चिंता असल्याचे दिसून येते. तीह्या त्यांच्या कवितेत राधिकाताईंनी समाजाला सडेतोड उत्तर दिले आहे. त्या लिहितात…

दोन लेकी लेक नाही?

प्रश्न भारी मनमोडी

यांना कसे समजावे

कन्या तिची माया वेडी

राधिकाताईंचा पिंड कथा लेखिकेचा.त्यामुळे त्यांना कथा कशी सुचते,त्याची निर्मीति कशी होते हे त्या सहजपणे त्यांच्या नादखुळा आणि शब्दगंगा ह्या दोन कवितांतून सांगून जातात.

ह्या पुस्तकात तीह्या शिर्षकाच्या दोन कविता आहेत. एक ती कन्या आणि दुसरी ती कविता. दुसर्‍या ती मध्ये साहित्यिक राधिकाताई दिसतात.

एक वादळ आलं

शब्दांच्या लाटा घेऊन

मनाच्या कागदावर फुटलं

आणि मन रितं केलं लिहून

साहित्य निर्मीतीची ही प्रक्रिया असं मन उफाळून आल्याशिवाय होऊच शकत नाही.

दप्तर ही अशीच मनाला चटका लावणारी कविता. कवियत्रीला आईच्या मायेचा ओलावा दिसतो तिच्या जपून ठेवलेल्या फाटक्या दप्तरात.

घरात पाव्हणे रावणे येणं, लेकी बाळी येणं, नातवंडांनी घर निनादून जाणं, ह्यासारखा आनंद कोणता? असे पाहुणे येती आणि क्षण ह्या दोन कविता वाचताना लक्षात येते.

“सारथी”, “धरावी कास”, “असे आणि तसे”, इत्यादी कवितांतून राधिकाताईं माणसांनी कसे जगावे, विवेक, सकारात्मकता, सत्यप्रियता वगैरे गोष्टी सुखी जीवनासाठी किती आवश्यक आहेत ते त्यांच्या सहज सुलभ शैलीतून वाचकांपर्यंत पोहोचवितात, त्यांना अमूल्य संदेश देतात.

धरावी कास या कवितेत सकारात्मक वृत्तीचे महत्व त्या सांगतात……

*अपयशामागून

यश हासते

सामोरी जाता

ओंजळी भरते

अगदी मोजक्या शब्दात किती महान तत्वज्ञान त्या सांगून जातात.

आयुष्यात पती~पत्नी हे नाते अतिशय पवित्र, प्रेमळ असते. पण तरीसुद्धा कधी कधी कसलातरी सल मनाला डाचत असतो. कुठे तरी काही कारणास्तव मन विषण्ण होते. अशीच मनोवस्था दाखविणारी तुकडेही दशाक्षरी काव्यरचना!

स्त्री कितीही शिकली तरी तिला स्वतःला बर्‍याचदा एका चौकटीत बंदिस्त करून घ्यावे लागते हे राधिकाताई त्यांच्या दार या कवितेत वाचकांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतात.

तू असा मी अशी या कवितेत सेवा निवृत्त पती पत्नीचे नाते अगदी सहजरित्या वाचकांपुढे उभे केले आहे. तुझं नि माझं जमेना पण एकमेकांवाचून चालेना अशी गत ह्या सहजीवनात असते. वरवर कविता हलकी फुलकी वाटली तरी ती फार सखोल आहे.

गारवा ही कविता पहिल्या पावसाचे वर्णन करणारी. पावसाच्या आगमनाने हवेत जसा गारवा येतो तसाच तो मनालाही येतो हे भाव व्यक्त करणारी कविता.

आपल्या अवती भवती असणारी माणसं,नात्याचे बंध,जीवनात येणारे विविध अनुभव, कधी आनंदी तर कधी खिन्न असणारे मन, अशा परिस्थितीत ह्या संग्रहातील कविता वाचल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा मिळाल्यासारखे वाटते, शांत वाटते म्हणून हा मनाला भासणारा गारवाच आहे.

सर्वच कविता वाचनीय आहेत, अधिकाधिक लोकांनी वाचाव्यात अशाच आहेत.

राधिकाताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा!त्यांची ही साहित्यसेवा अखंडित अशीच चालत राहो, त्यांनी लावलेला साहित्याचा हा नंदादीप दिवसानुगणिक उजळत राहो.

पुस्तक परिचय – सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “बॅरिस्टर नाथ पै : लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” – संकल्पना – संजय रेंदाळकर ☆ परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “बॅरिस्टर नाथ पै : लोकशाही समाजवादाचा दीपस्तंभ” – संकल्पना – संजय रेंदाळकर ☆ परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

संकल्पना – संजय रेंदाळकर,

संकलन – सुनील कोकणी, संकेत जाधव.

सृजन प्रकाशन, इचलकरंजी. 

प्रथमावृत्ती – 1 मे 2022.

इचलकरंजी येथील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते संजय रेंदाळकर यांच्या संकल्पनेतून सुनील कोकणी आणि संकेत जाधव यांनी खास मुलांसाठी बॅ. नाथ पै यांचे विचार आणि जीवनप्रवास उलगडणारे पुस्तक संकलित केले आहे. 

बॅ. नाथ पै यांना ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हटलं जातं. विरोधकांनाही मंत्रमुग्ध करणारे अलौकिक वक्तृत्व नाथांनी अंगभूत गुणांना प्रयत्नांची जोड देऊन कमावले होते. त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या भाषणातील प्रमुख विचार या पुस्तकात संग्रहीत केलेले आहेत. नाथांचे देशभक्ती विषयक विचार, स्वातंत्र्य आणि लोकशाही बाबतची मते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, कोकणावरील निस्सीम प्रेम, सीमाप्रश्नाबाबतची धडपड, विद्यार्थी व नागरीक यांना केलेले मार्गदर्शन, कलावंतांची केलेली कदर याविषयी त्यांचे विचार या पुस्तकात वाचायला मिळतात. 

“स्वातंत्र्य आणि लोकशाही ही आमची प्राणप्रिय मूल्ये आहेत. या मूल्यांचे जतन करायचे आहे. स्वातंत्र्याची पावन गंगा हिंदुस्तानच्या गावागावात जाईल; आणि मगच आमचे स्वातंत्र्य अजिंक्य होईल, अमर होईल. लोकशक्ती हाच लोकशाहीचा पाया असतो. ती राजशक्तीपेक्षा प्रभावी असते. मतदार हेच राष्ट्राचे खरे पालक आणि संरक्षक आहेत. गीतेप्रमाणेच राज्यघटना हाही माझा पवित्र ग्रंथ आहे,” असे ते म्हणत.

साहित्यिक, कलावंत यांच्याबद्दल त्यांना विशेष अभिमान होता. लेखक, कलावंत हे फार थोर असतात. त्यांचे विश्व हे अविनाशी आहे, असे ते मानत. कोकणातील दशावतार या कलेबद्दल त्यांचे प्रेम हे या ठिकाणी अधोरेखित केले आहे.

‘घटनादुरुस्ती विधेयक’ हा बॅरिस्टर नाथ पै यांच्या संसदीय कार्यकर्तृत्वाचा कळस म्हटला जातो. या विधेयकासाठी नाथांनी आपल्या बुद्धिचातुर्य, अभ्यास आणि तेजस्वी वाणीने जे योगदान दिले त्याबद्दल या पुस्तकात माहिती दिली आहे. बॅ. नाथ पै यांना पदोपदी सहकार्य करणारे राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते वासू देशपांडे सर यांनी नाथ आपणांस सोडून गेल्यानंतर त्यांना उद्देशून लिहिलेले पत्रही या पुस्तकात दिले आहे. नाथांना आपल्या सहका-यांविषयी असणारा जिव्हाळा, स्वतःपेक्षा देशसेवेसाठी झिजण्याची वृत्ती, कोकणावरील प्रेम याविषयी या पत्रात वाचायला मिळते.

“असिधारा व्रताने सेवादलाचे कार्य करूया ” हा नाथांचा संदेशही या पुस्तकात अधोरेखित केला आहे. यांच्याविषयीचे भाई वैद्य, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, जयानंद मठकर, बबन डिसोजा, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक विभूतींचे कौतुकोद्गार येथे संग्रहित केलेले आहेत. 

बॅ. नाथ पै यांच्या जीवनप्रवासातील महत्त्चाच्या घटना तारीखवार देण्यात आल्या आहेत. नाथांच्या जीवनातील दुर्मिळ क्षणचित्रांचाही या पुस्तकात संग्रह करण्यात आला आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर कविवर्य मंगेश पाडगावकर यांची “ ज्यांची हृदये झाडांची ” ही कविता वाचायला मिळते.

या पुस्तकाचे प्रकाशन साने गुरुजी पुण्यतिथी दिवशी बॅ.नाथ पै सेवांगण कट्टा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

पुस्तक परिचय – श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव   आणि शेवटी तात्पर्य(लघुकथा संग्रह)

मूळ लेखिका     हंसा दीप

अनुवाद            उज्ज्वला केळकर

प्रकाशक           मिलिंद राजाज्ञा

पृष्ठे                  १८४

किंमत              रु. ३३०/-

नुकताच,  सौ उज्ज्वला केळकर यांचा, “आणि शेवटी तात्पर्य ..”हा अनुवादित कथासंग्रह वाचनात आला.

यात एकूण १७ कथा आहेत आणि त्यांच्या, मूळ हिंदी लेखिका, कॅनडास्थित डॉक्टर हंसा दीप या आहेत.

डॉक्टर हंसा दीप या मूळच्या भारतातल्याच. त्या आदिवासी बहुल परिसरात जन्मल्या, वाढल्या, शिक्षित झाल्या.  त्यांनी शोषण, भूक, गरिबीने त्रस्त झालेल्या आदिवासींचे, तसेच परंपरांशी झुंजत, विवशतांशी लढणाऱ्या मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून अनुभवले. त्यातूनच या कथा जन्माला आल्या.सृजन व संघर्षाचा अनुभव देणाऱ्या, या सुंदर कथांचं,  नेहमीप्रमाणेच उज्ज्वला ताईंनी केलेले अनुवाद लेखन, तितकंच प्रभावी आणि परिणामकारक आहे, हे या कथा वाचताना जाणवतं.

यातली पहिलीच, शीर्षक कथा ..”आणि शेवटी तात्पर्य ..”वाचताना, एक सहज वास्तव मनाला स्पर्शून जातं.  परदेशातले एक मंदिर आणि तिथे ध्यान धारणेसाठी जमलेली परदेशस्थित, भारतीय तरुण, वृद्ध, मध्यमवर्गीय माणसे. त्यांचे आपापसातले संवाद, चर्चा, आणि एकंदरच, वरवरचं  भासणारं वातावरण. या भोवती मंदिरातल्या पंडितांचही जोडलेलं, पोटासाठीचं भक्तिविश्व. केवळ एक व्यवसाय. आणि या सर्वांचे, शेवटी तात्पर्य काय तर मंदिरात येणारे भाविक आणि पंडित यांचा उथळपणा.

‘आपण काही क्षण तरी नतमस्तक झालो’, इतकेच श्रद्धेचे मापदंड.आणि त्यांच्या भावना एनकॅश करणारे पंडीत.  याचे सहज प्रतिबिंब, या कथेत उमटले आहे.

पोपटी पान पिवळं पान… या कथेत एका वृद्ध असहाय झालेल्या, एकेकाळच्या प्रख्यात डॉक्टरांची, एकाकी मानसिकता, त्याला बेबी सिटिंग च्या निमित्ताने सापडलेल्या, काही महिन्यांंच्या बाळासोबत झालेल्या दोस्तीमुळे, कशी बदलते, याचं अत्यंत भावस्पर्शी, अद्भुत वर्णन वाचायला मिळतं.

प्रतिबिंब…. ही कथा तर अत्यंत ह्रदयस्पर्शी आहे. नातीच्या आणि आजीच्या नात्याची ही कथा अतिशय भावपूर्ण, सहज बोलता बोलता लिहिली आहे.

जी आजी, नातीला लहानपणी  प्रॉब्लेम आजी वाटायची, तीच आजी, नात स्वतः मोठी झाल्यावर तिच्या अस्तित्वात कशी सामावून जाते, या प्रवासाची ही एक सुंदर कहाणी.

रुबाब… ही कथा लहान मुलांच्या विश्वाची असली तरी, माणसाच्या जीवनात पॉवर ही कशी काम करते, आणि त्यातूनच लाचखोरीची वृत्ती कशी बळावते, याचीच सूचना देणारी, काहीशी रूपकात्मक कथा वाटते.

मला नाही मोठं व्हायचंय… या कथेतील शेवटची काही वाक्यं मनाला बिलागतात.  कथेतल्या परीचे बालमन का दुखतं, त्याचं कारण हे शब्द देतात.

“मोठ्या लोकांना कळतच नाही की, जे तिने बघितले आहे,तिला आवडले आहे तेच काम ती करू शकेल ना? तिला पसंत असलेलं प्रत्येक काम ही मोठी माणसं रिजेक्ट का करत आहेत? तिच्या ‘मी कोण होणार’ या कल्पनेला का डावलतात?”

मग तिने मोठे होण्याचा विचारच मनातून काढून टाकला. वरवर ही बालकथा वाटत असली तरी, ती रूपकात्मक आहे, माणसाच्या जीवनाला एक महत्वाचा संदेश देणारी आहे.

छोटुली…  या कथेतल्या बालकलाकारावर, पालकांच्या प्रसिद्धी, पैसा, एका ग्लॅमरच्या मोहापायी होणारा आघात अनुभवताना, मन अक्षरशः कळवळते.

तिचं सामर्थ्य… ही कथा एका शिक्षण संस्थेत असलेल्या, द्वेषाच्या स्पर्धेवर प्रकाश टाकते.मिस हैली,एक प्राध्यापिका, तिच्यावरचे आरोप ती कशी परतवून लावते,आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करते याची ही ऊत्सुकता वाढवणारी  कथा ,खूपच परिणामकारक आहे.

प्रोफेसर …ही कथा फारशी परिणामकारक नसली तरीही प्रोफेसर, विद्यार्थी, शिक्षणाबद्दलची अनास्था, राजकारण आणि या पार्श्वभूमीवर अधिकार आणि कर्तव्य याची, उपरोधिक, उपहासात्मक केलेली उलगड, ही चांगल्या प्रकारे  झाली आहे.

पाचवी भिंत… ही कथा समता सुमन या निवृत्त होणार्‍या,शाळेत प्राचार्य असलेल्या व्यक्तीच्या राजकारण प्रवेशाची आहे. काही धक्के बसल्यानंतर, राजकारण की पुन्हा शांत जीवन, या द्वद्वांत सापडलेल्या मनाची ही कथा खूपच प्रभावी आहे. आणि शेवटी समताने स्वीकारलेले आव्हान, आणि तिचे खंबीर मन, या कथेत अतिशय सुंदररित्या चितारले आहे.

रुपेरी केसात गुंतले ऊन… ही कथा तशी वाचताना हलकीफुलकी वाटली तरी, त्यात मनाच्या गाभाऱ्यातलं एक गंभीर खोल सत्य जाणवतं. आठवणीत रमलेल्या चार वृद्ध बहिणींच्या गप्पा, या कथेत वाचायला मिळतात.

“आतलं दुःख आजच काढून टाकायचं. हसून ,घ्यायचं.”

कुंडीतील सुकलेली फुले, पुन्हा नव्याने ताजी होत होती …..ही काही वाक्यं अंतराचा ठाव घेतात.

बांधाच्या खांद्यावर नदी.. .या कथेत भावनिक आंदोलनात सापडलेली स्त्री, अखेर त्यातून स्वतःच कशी सावरते, याचे एक सकारात्मक भावचित्र रेखाटलं आहे.

मधमाशी…ही कथा उल्लेखनीय आहे. अतिशय तरल भावनेला, बसलेला धक्का,यात अनुभवायला मिळतो.

तिचं हसू …..ही कथा जाणीवा नेणीवांच्या पलीकडची आहे.  या कथेत एका अकल्पित प्रेमाची ओळख होते. चूक की बरोबर या सीमारेषांच्या पलीकडे गेलेली, ही कथा मनाला घट्ट धरून ठेवते.

समर्पण…. या कथेत कोरोनाचा तो एक भयाण असा विनाशकारी काळ ,एका वेगळ्याच मानवतेचं ही दर्शन देतो. एक वृद्ध रुग्ण, स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा, एका तरुण रुग्णाच्या,  संपूर्ण भविष्याचा विचार करून मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होते.

“त्याला या वेंटिलेटरची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. मी माझं आयुष्य जगले आहे. त्याचं जगणं महत्त्वाचं आहे.” असं डॉक्टरांना सांगून ती तिच्या जीवनाचे समर्पणच करते. अतिशय सुंदर कथा!

माझ्या घरच्या आघाडीवर….. ही कथा तशी हलकीफुलकी असली तरी परिवाराच्या सौंदर्याची मेख सांगणारी आहे. स्त्री सवलीकरणाच्या आंदोलनापासून, सुरुवात होणाऱ्या या कथेत, अंदोलनातला रुक्षपणा पटवून देणारी, काही वाक्यं मनाला फारच पटतात.

सविता, नेहा, एलिसिया, आणि यापूर्वी पाहिलेली आजी, आई, यांचा रुबाब सुयशच्या विचारांना नवी दिशा देतात. हे चेहरे त्याला आपले वाटतात. त्यांच्या धमकी भरलेल्या आवाजातही,प्रेम स्त्रवस्त असतं. ते संबंध परिवाराचा अर्थ शिकवतात. हे त्याला जाणवतं.थोडक्यात,या कथेत स्त्रियांच्या अनोख्या शक्तीत घेरलेलाच एक नायक आपल्याला भेटतो.

भाजी मंडई ….या कथेत एक विश्वस्तरीय समारंभात, देश विदेशी साहित्यिकांनी, स्वतःच्या सन्मानासाठी उठवलेला अभूतपूर्व गोंधळ अनुभवायला मिळतो. त्यातून प्रसिद्धीसाठी हापापलेल्यांचे मनोदर्शन अत्यंत वास्तविकपणे उभे रहाते.

अशा विविध विषयांवर हाताळलेल्या या सर्वच कथा मनोरंजना बरोबरच एक प्रकारचं ब्रेन वॉशिंगही करतात. आयुष्यात घडणाऱ्या बिन महत्वाच्या, साध्या, घटनातूनही आशय पूर्ण संदेश देण्याची, लेखिकेची क्षमता, कौतुकास्पद आहे.

आणि शेवटी तात्पर्य काय?.. तर एक अनोखे उत्कृष्ट कथा वाचनाचे समाधान!! उज्ज्वला ताईंची भाषांतर माध्यमांवर असलेली जबरदस्त पकड, याची पुनश्च जाणीव. त्यांचे अनुवादित लेखन, इतकं प्रभावी आहे की कुठेही मूळ कथा वाचनाचा, वाचकाचा आनंद, हिरावला जाऊच शकत नाही.  त्यासाठी आपल्याच संस्कृतीत रुजणाऱ्या कथांची, त्यांची निवड ही उत्तम आणि पूर्ण असते.

वास्तविक या कथा परदेशी वातावरणात घडलेल्या आहेत. पण तरीही त्या तिथल्या भारतीयांच्या आहेत. आपल्या संस्कृतीशी जुळणाऱ्या आहेत. म्हणून त्या वाचकाशी कनेक्ट होतात.

विचारांना समृद्ध करणाऱ्या या कथासंग्रहाबद्दल मूळ हिंदी लेखिका डॉक्टर. हंसा दीप (टोरांटो कॅनडा) आणि अनुवादिका सौ उज्ज्वला केळकर या दोघींचेही आभार आणि मनापासून अभिनंदन!!

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares