मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “माझी टवाळखोरी” –  श्री अमोल केळकर ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार☆

सौ.अस्मिता इनामदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“माझी टवाळखोरी” –  श्री अमोल केळकर ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

 विनोदी साहित्याने जीवन आनंदी होते. टवाळा आवडे विनोद असं जरी रामदासांनी म्हंटले तरी टवाळ हा शब्द रिकामटेकड्या लोकांसाठी त्यांनी वापरला आहे. पण अमोलची – आत्ता हा जरी लेखक असला तरी आम्हाला तो अमोलच आहे – टवाळ खोरी ही टवाळगिरी नाही हे लक्षात घ्यायला हवे. शुद्ध भावनेने केलेले विनोदी लेखन हा या पुस्तकाचा गाभा आहे. हे लेख मनोरंजनाबरोबरच बोधप्रदही आहेत. अमोल उवाच – १ व अमोल उवाच -२ असे दोन भाग या पुस्तकात आहेत. पहिल्या भागात आपण विनोदी आठवणीत रमातो तर दुसऱ्या भागात विडंबन गीते आपल्याला खदखदून हसवतात. विडंबन कसे असावे याचा उत्कृष्ट परिपाठ इथे मिळतो

” कायप्पा ” च्या माध्यमातून आमोलची टवाळखोरी आपल्या समोर आली. कायप्पा हा शब्दही टवाळ खोरीचा मामला आहे. व्हॉटस् ॲप्स चे मराठी भाषांतर त्याने केलेय. काय अप्पा? = कायप्पा. मजा आहे ना ? निखळ आनंदाचा सागर निर्भेळ विनोद घेऊन या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आलाय. यातील प्रत्येक लेखावर बोलायचे झाले तर एक प्रबंधच सादर करता येईल. पहिल्या भागात एकूण ७१ लेख आहेत. दुसऱ्या भागात ४३ विडंबन गीते आहेत.

 अमोल उवाच मधील काही निवडक लेखांचा मी उल्लेख करेन ज्यातून त्याच्या लिखाणाची सुंदर झलक दिसून येईल. सध्या कोरोना मुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. भविष्यात शाळेचा वर्ग कसा असेल हे ” आधुनिक शाळेतील एक दिवस ” यात समजते. या लेखातील शिक्षण पद्धती खरोखरच थक्क करणारी आहे. शाळा आली की अनुषंगाने गुण पत्रिकाही आलीच. त्यावर मस्त खुसखुशीत टवाळखोरी आहे.

भाई अर्थात पु. ल. यांच्या वरचे ५ ही भाग एकदम भन्नाटच आहेत. ते जर  पु. ल. नी वाचले तर तेही छान दाद देतील. या बरोबरच गायकी ढंगातले संगीत रागही आपले अस्तित्व दाखवून जातात. ” शाळा चांदोबा गुरुजींची ” या गीतातून सर्व ग्रह नक्षत्रांची मांदियाळीच भेटते. ” जो उस्ताद तोच वस्ताद ” यातल्या कोपरखळ्या खदखदून हसवतात. ” साप शिडी ” हा वैचारिक लेख आपल्या जीवनावरच बेतलेला वाटतो.

” एक रस्ता आ हा आ हा ” हा एक प्रवासी. प्रवास हा अमोलच्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. प्रवास हा त्याचा छंदच आहे हे त्याच्या स्टेटस वरच्या फोटोने लक्षात येते.

” बदाम सत्ती ” हा एक वैचारिक लेख आपल्याला छान सल्ला देतो. आयुष्यातली अनियमितता किंवा कुठल्याही परिस्थितीत आशावादी राहणे हे या सत्तीकडून शिकायला हवे. ” एक संवाद त्यांचाही ” हा लेख अमोलची अप्रतिम कल्पनाशक्तीच प्रत्ययाला आणून देतो. सगळ्या रेल्वे गाड्या आपापसात जे काही बोलतात याची आपण कधीच कल्पना केलेली नसते. त्या बरोबरच एस टी चा ही संवाद आपल्याला प्रवासाचा आनंद देऊन जातात. ” मराठी भाषा दिन १ आणि २ हे लेख तर नक्कीच आवडण्या सारखे आहेत. मराठी भाषेचा अभिमान सर्वानाच असतो पण त्याबद्दलची अनास्था बघितल्यावर खंतच वाटते. ” इथे साहित्याचे साचे मिळतील ” हा ही लेख भन्नाट आहे. हा जो मॉल दाखवला आहे तो बघून थक्कच व्हायला होतं. त्याच्या मालकांनी तो मॉल बघायला बोलावलं आहे तेव्हा आपण नक्कीच जाऊ.

आता जरा विडंबनाकडे वळूयात. या भागाचे शीर्षकच मार्मिक आहे. ” अशी विडंबन येती आणिक मजा देऊनी जाती ” आठवलं ना ते गाणे ? अशी पाखरे येती…. यातले प्रत्येक विडंबन गाजलेल्या गाण्यावर आधारित आहे. हा साहित्य प्रकार फारसा लोकप्रिय नाहीय. विसंगती पकडणे हा विडंबनाचा मुख्य गाभा आहे, तो सापडला की विडंबन योग्य होते. सर्वच गीतांवर लिहिणे वेळेअभावी शक्य नाही, पण काही लक्षात राहण्यासारखींची शीर्षके सांगते, गाणी तुम्ही ओळखायची. ” खोटी खोटी रूपे तुझी “,

” जिवलगा कधी रे येशील तू ” ” स्विगीची भाकरी “,  ” ही पाल तुरू तूरू “, ” सुंदर ते यान “, ” अजी मोदकाचा दिनू “, ” योगा

योगा अखंड करूया “. ही गाणी प्रत्यक्ष वाचली तरच त्याचा आनंद मिळेल.

जाता जाता एक सांगावेसे वाटते की काही लेखात राजकीय भाष्य केले असले तरी राजकारणातला खवटपणा त्यात अजिबात नाही. अमोलची ही टवाळखोरी मनोरंजनाबरोबरच बौद्धिक विचारांना चालना देणारी नक्कीच आहे.

आता जास्त पाल्हाळ न लावता माझा हा टवाळ लेख इथेच संपवते.

जय टवाळखोरी….

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ अज्ञात… छाया महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ अज्ञात… छाया महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

लेखिका | डॉक्टर छाया महाजन

साहित्यप्रकार | कथासंग्रह

प्रकाशक | मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे

माणसानं कितीही भौतिक प्रगती केली, अगदी चंद्रावर, मंगळावर पोहोचला , किंबहुना प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा ध्यास जरी त्यानं घेतला; तरीही काही गोष्टींपासून तो कायमच अंतरावर राहिला आहे- किंबहुना तो अनभिज्ञच आहे. अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्त्ववेत्ते अशाच काही ‘अज्ञात’ गोष्टींचा शोध घेत असतात. तर संवेदनशील कलाकार, लेखक हे या अज्ञात गोष्टींचा आपल्या कल्पनाशक्तीद्वारे मागोवा घेऊन ते आपल्या कलाकृतीद्वारे, साहित्याद्वारे सादर करतात. अतिशय बोलकं मुखपृष्ठ असलेला लेखिका डॉक्टर छाया महाजन यांचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह हे याचंच एक उत्तम उदाहरण.

‘अज्ञात’ या शब्दाचा पैसच इतका व्यापक आहे की गूढता, रहस्यमयता, असहाय्यता यांचं व्यामिश्र दर्शन यातुन घडतं. आपल्यालादेखील भवतालातल्या अनेक घटनांमधून या अज्ञाताचं अस्तित्व जाणवत राहतं. आणि अशा अज्ञात गोष्टींना आपण आपापल्या परीने अर्थ देण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.  अखेरीस त्यातली अपरिहार्यता स्वीकारून सामोरेही जातो.

अशाच प्रकारे अज्ञाताला सामोरं जाणाऱ्या सर्वसामान्य‌ व्यक्तींच्या व्यथा या कथांच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात. सर्वच कथा उत्तम असून त्या आपल्याला अंतर्मुख करतात, विषण्णताही निर्माण करतात. समाजातल्या अनेक वाईट गोष्टी, चालीरीती या सगळ्यांचा परिणाम तर त्यात दिसतोच. पण मानवी मन आणि भावना यांच्या दौर्बल्याची स्पष्ट जाणीवही या कथांतून होते. वास्तववादी असणाऱ्या या कथा अज्ञाताची दखल घेत असल्या तरी त्यावर कुठलाही उपदेश किंवा पर्याय सुचवण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि हेच या कथांचं खरं बलस्थान आहे, जे संपादण्यात लेखिकेला कमालीचं यश मिळालं आहे. त्यामुळेच या अज्ञाताचं महत्त्व वाचकाच्या मनात नोंदलं जाऊन, पात्रांच्या सुखदुःखाशी  वाचक नकळतच समरस होतो. यातल्या अधिकतर कथा या नायिकाप्रधान आहेत. शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा सर्व स्तरातल्या स्त्रीजीवनाचं भेदक दर्शन त्या घडवतात.

हे दर्शन घडवताना लेखिकेची ओघवती आणि संयत लेखनशैली ही फार मोठी भूमिका पार‌ पाडते. एकूण अकरा कथा असलेल्या या संग्रहातून फक्त कुठल्या एका कथेचा उत्तम म्हणून उल्लेख करणं फार अवघड आहे. आणि तशी तुलना करणंही योग्य नाही, कारण प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे.

अज्ञाताच्या या कथा वाचल्यानंतर मला  जाणवलेली गोष्ट म्हणजे जरी या अज्ञाताचा शोध ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असली तरी त्याला अपरिहार्यपणे तोंड देण्याऐवजी मानसिक सामर्थ्याचं महत्त्व जाणून तत्कालीन सुसंगत कृतीद्वारे तोंड देणं… आणि त्यातून बाहेर पडणं हे आवश्यक आहे. आणि हेच कदाचित या अज्ञाताला उत्तर देण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे.

(तळटीप – आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह. लेखिकेने आणि जाणकारांनी एकांकिकेसाठी या कथासंग्रहाचा जरूर विचार करावा.)

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कुतूहलापोटी” – डॉ. अनिल अवचट ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“कुतूहलापोटी” – डॉ. अनिल अवचट ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

कुतूहलापोटी

पुस्तकाचे नाव … कुतूहलापोटी

लेखक … डॉ. अनिल अवचट

प्रकाशन:  समकालीन प्रकाशन 

पृष्ठे         २००

किंमत      रु  २००/—  

अवचटांचे प्रत्येक पुस्तक म्हणजे विचारांचा खजिनाच असतो. डॉक्टरकी बाजूला ठेऊन इतर गोष्टींत मनापासून रमणारा असा हा अवलिया आहे. नुकतेच त्यांचे मी एक पुस्तक वाचले जे नावापासून आगळे वेगळे आहे. “कुतूहलापोटी” या नावाचेच कुतूहल वाटून मी ते पुस्तक वाचायला घेतले आणि शेवटपर्यंत वाचूनच खाली ठेवले. तस पाहिलं तर या नाहीत कथा ना लेख. पण मांडणी इतकी सुरेख केली आहे की आपल्याच कुतूहलाचे निराकरण कुणीतरी लगेचच केले आहे असे वाटते

यातले प्रत्येक लेख हा लेखकाच्या कुतूहलाचा अनोखा पैलू दाखवतो. रोजच्या जीवनात आपण खूप गोष्टी अनुभवत असतो पण त्या बद्दल आपल्याला कधीच कसले कुतूहल वाटतं नाही.

या पुस्तकात एकूण ११ लेख आहेत, ज्याचे विषय आपण कधीच विचारात घेतलेले नाहीत. निसर्गातल्या गोष्टी मागचे विज्ञान आणि आपले जीवन याची सांगड लेखकाने कशी घातलीय हे समजून घेताना खूप मनोरंजक माहिती आपल्याला मिळते.

फंगस, बॅक्टेरिया, साप, आपले भाऊ म्हणजे निरनिराळे कीटक, मधमाशा, पक्षी, आपले शरीर, रक्त, पॅंक्री (पॅंक्रिआस), कॅन्सर, जन्म रहस्य यावरचे लेख वाचताना अक्षरशः आपण कधीही न केलेल्या विचारांवरचे विवेचन लक्षात येते.

प्रत्येक लेखाचे असं थोडक्यात वर्णन नाही करता येणार, त्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे. ती कल्पना येण्यासाठी या पुस्तकाचा ब्लर्ग मी देते म्हणजे या पुस्तकाची रूपरेषा लक्षात येईल.

आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजिवात किती आश्चर्य दडलेली आहेत बघा. पक्ष्यांच्या हलक्या मऊसूत पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते ? मधमाशा मधावर अशी कोणती प्रक्रिया करतात ज्यातून हजारो वर्ष टिकू शकणारा मध तयार होतो ? कुण्या एका किटकाची अंडी वीस वर्षे सुप्तावस्थेत कशी राहू शकतात ? माणसाला अजूनही न जमलेले सेल्युलोज चे विघटन बुरशी कसं करते ? आपल्या शरीराचेही तसेच. मेंदू पासून र्हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात हे एक कोडेच आहे.  

या आणि अशा प्रश्नांची कोडी लेखकाला पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली, आणि ही कोडी सहज सोप्या भाषेत उलगडून आपल्या समोर ठेवली.

सजीवांच्या जीवन क्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल तर थक्क व्हाल. !!

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “चिऊताईचा फ्राॅक” – लेखिका सुश्री नंदिनी प्रभाकर चांदवले ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆“चिऊताईचा फ्राॅक” – लेखिका सुश्री नंदिनी प्रभाकर चांदवले ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव ..चिऊताईचा फ्राॅक

(बाल कविता संग्रह)

कवयित्री……नंदिनी प्रभाकर चांदवले

प्रकाशन:  यशोदीप पब्लीकेशन्स पुणे आणि निशीगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट संयुक्त विद्यमाने

पहिली आवृत्ती     १८/०१/२०२२

पृष्ठे         २०

किंमत      रु  ३०/—  

चिउताईचा  फ्रॉक – नंदिनी प्रभाकर चांदवले..

बालवाङमय हा साहित्यातला महत्वाचा प्रकार आहे.

वास्तविक वाचनाची आवड लागते ती लहानपणीच,

या बालसाहित्याच्या वाचनाने! मुलांची मने,जाणीवा,

समज, ते कशात रमतात, कशापासून दूर जातात या सार्‍यांचा विचार करुन आणि बालमनावर उत्तम संस्कार करण्याच्या दृष्टीने बालसाहित्याची निर्मीती होत असते. शिवाय भविष्यात जीवनाभिमुख होण्यासाठी एक पाया रचला जातो.  थोडक्यात मुलांच्या मनाला आणि भावनांना आकार देण्याचे काम बालसाहित्य करत असते.   

नंदिनी चांदवले या संवेदनशील व्यक्तीने ,मुलांची मने जाणून चिऊताईचा फ्रॉक हा सुंदर बालकवितांचा संग्रह नुकताच प्रकाशित केला.

सुप्रसिध्द लेखिका, बालसाहित्यकार, समीक्षक, विश्वकोश निर्मीत्या,विजया वाड यांच्या वाचू आनंदे या ऊपक्रमाअंतर्गत, यशोदीप पब्लीकेशन्स पुणे तर्फे तो प्रसिद्ध झाला.

हलवायाचे दुकान हा त्यांचा पहिला बालकविता संग्रह आणि आता चिउताईचा फ्रॉक.

यात एकूण १६ कविता आहेत. बालजीवनाचा विविध अंगाने विचार करुन लिहिलेल्या या आनंददायी कविता वाचताना लहान मुलेच काय  मोठी माणसं  सुद्धा सहज रमतात.

यात मुलांना रुचणारे, त्यांच्या बालपणाशी निगडीत असलेले  विषय त्यांनी हाताळले आहेत. पक्षी प्राणी आहेत.राने वने आहेत. वृक्षवल्ली आहेत.

पर्यावरणाचा बोध देणारी, महत्व सांगणारी काव्ये आहेत. सण आहेत. पाऊस आहे. निसर्गाचे मनभावन दर्शन आहे. या सर्वांशी मुलांची ओळख व्हावी, शिवाय त्यांचं जगणं आनंददायी व्हावं, चौकस, निरिक्षक व्हावं या विचाराने  प्रेरित होउन केलेल्या या कविता आहेत. अर्थपूर्ण  बडबडगीतेही मजेदार आहेत.

चला तर मग यातल्या काही कवितांचा आनंद घेउया.

राजुची धमाल या कवितेत त्या म्हणतात,

 राजुच्या  अंगणात

खूप खूप

गारा पडल्या

राजुने ओंजळीत पकडल्या

आनंदाने खाउन टाकल्या..

घाबरगुंडी ही कविताही अशीच मजेदारआहे.

  कोणी आणले शेंगदाणे

  कोणी आणले फुटाणे

फुटाणे पाहून

माकडाने मारली उडी

मुलांची उडली घाबरगुंडी..

नंदिनीताईंच्या रचनेत इतका जीवंतपणा,चैतन्य जाणवते की ‘माकडाने मारली उडी वाचताना  वाचकही  सहज मनातल्या मनात थरकतोच.

आजोबा. त्यांची काठी आणि ती शोधून आणणारा चिंतु आपल्याच घरातले वाटतात.

मोराविषयी लिहिताना त्या सहजच, मुलांना रंगवत उपयुक्त माहितीही देतात.

मोर बघा मोर

छान छान मोर

निळा निळा रंग

मोरपंखी पंख

हा तर आपला

राष्ट्रीय पक्षी..

झाड हेच आपले खरे मित्र, हे मुलांच्या मनावर  बिंबवताना कवयित्री म्हणतात,

चला चला

वनामधे

झाड लावू अधेमधे

मुले झाली खूप खूष

झाडाने दिली

फळे फुले

खेळण्यासाठी गार सावली

झाड आपला

आहे मित्र

करु त्याला आपण

दोस्त…

या रचनेतून त्या पर्यावरण पोषक संदेश मुलांना देतात.

घड्याळ, चलचल दादा, मैफल, चाहुल, दिवाळी अशा धम्माल कविता वाचतांना मन खरोखरच आनंदाच्या डोहात डुंबते.  साधे सहज,निर्मळ टपटपणारे शब्द.

त्यातली लय ,गेयता अगदी नदीच्या प्रवाहासारखी.

चिऊताईचा फ्राॅक ही शीर्षक कविता तर अत्यंत कल्यनारम्य. मैनाताईने चिऊताईला सापडलेल्या कापडाचा फ्रॉक शिवला.आणि तिला घालायलाही लावला  तेव्हां चिऊताईची प्रतिक्रिया  अगदीच हसवते.

घालून बघते तर काय

शेपटी राहिली ऊघडीच

चिऊताईला आला राग

म्हणाली

नक्कोच मला फ्रॉक.

या सर्वच कविता कल्पना रम्य आहेत. एका आनंदविश्वात त्या घेउन जातात. मुलांना विचार देणारा, समृद्ध करणारा, श्रीमंत करणारा असा हा नंदिनी चांदवले यांचा चिऊताईचा फ्रॉक हा बालकविता संग्रह.लहान थोरांनी वाचावा असा निर्मळ निरागस अनुभव  देणारा..

नंदिनीताईंचे  खूपखूप अभिनंदन!

आणि त्यांच्या साहित्य प्रवासाला खूपखूप शुभेच्छा!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “सूरसंगत” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “सूरसंगत” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव… सूर—संगत

लेखिका : अरुणा मुल्हेरकर

प्रकाशिका : डाॅ. स्नेहसुधा अ.कुलकर्णी, नीहारा प्रकाशन.

मुखपृष्ठ… सौ. सोनाली जगताप

प्रकाशन दिनांक: २१ मार्च २०२२

किंमत: रु. १५०  /—  

सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा सूर संगीत हा संपूर्णपणे संगीत याच विषयावर आधारित लेखांचा, एक छोटेखानी संग्रह पुस्तकरुपाने प्रकाशित होत आहे ही अतिशय आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे.त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि संगीत आणि साहित्याच्या या वाटचालीत त्यांना खूप खूप शुभेच्छा देते…

वास्तविक संगीत,गाणी यांची आवड नसणारी व्यक्ती ही क्वचीतच आढळेल..कारण संगीत हा मानवी जीवनाचा एक महत्वपूर्ण हिस्सा  आहे हे निर्विवाद! जन्मापासून ते मृत्युपर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मानवी जीवनात संगीत हे आहेच…

मात्र संगीताची आवड, त्याचे अस्तित्व, आणि त्याचा सखोल शास्त्रीय अभ्यास या भिन्न बाबी आहेत…

गाणी ऐकायला ,त्यातल्या सूर, ताल शब्दसाहित्याचा आनंद घेणं मला नककीच आवडतं.पण त्यातलं शास्त्र मला ऊमजत नाही .त्यामुळे संगीत एक शास्त्र यावर काही भाष्य करण्याचा मला काही अधिकारही नाही…तो माझा  प्रांतच नव्हे..

पण तरीही, जेव्हां मी अरुणा मुल्हेरकर यांच्या, सूर संगीत या पुस्तकातले लेख वाचायला सुरवात केली, तेव्हां त्यात अक्षरश: बुडून गेले.. ३०लेखांचं हे पुस्तक नकळत मला समृद्ध करत गेलं…

मूळातच या पुस्तकाची भूमिका ही, संगीत विषयावरचं सुरेख शास्त्र हे माझ्यासारख्या अनभिज्ञ व्यक्तींपर्यंतही  पोहचावं ही असावी..इतकं सुबोध,रंजक आणि क्लीष्टता टाळून, माहिती देणारं हे पुस्तक आहे…

यात संंगीताच्या सर्व प्रकारांविषयी अत्यंत सूरमयी रसाळ माहिती आहे.

शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, नाट्यगीत अभंग भजने भारुडं ते भावगीतांपर्यंत सर्वच प्रकारात, संगीत म्हणजे नेमकं काय याची ऊलगड या पुस्तकात नेमकेपणाने केली आहे.

अरुणाताई म्हणतात, संगीत म्हणजे निबद्ध गायन किंवा वादन. तालात बांधलेली स्वररचना. राग, स्वर आणि शब्द, एका तालात बद्ध करुन, त्या तालाच्या खंडाप्रमाणे, सम, टाळ्या काल या आवर्तनातली स्वररचना म्हणजे संगीत…

पाण्याची खळखळ ,वार्‍याची फडफड,समुद्राची गाज,पक्षांचा कलरव,कोकीळेचे कूजन,भ्रमराचे गुंजन हे जर शांतपणे ऐकले तर त्यातही नाद,ताल,लय आहे..याची जाणीव होते.

या पुस्तकात विवीध रागांची माहिती त्यांनी सांगितीक पण सोप्या भाषेत उलगडून दिली आहे.

काफी, खमाज, जौनपुरी, मारवा, पूरिया, बिहाग, बागेश्री, बसंत, बिभास भटियार, मालकंस भैरव अशा अनेक रागांविषयी लिहीतांना, त्यात्या रागांची उत्पत्ती, त्यातील स्वररचना, आणि ते कुठल्या प्रहरी गायला जातात याची अत्यंत सुंदर भाषेत मांडणी केली आहे.

निसर्ग आणि एखाद्या रागातील स्वररचनेचं कसं नातं असतं हेही त्यांनी छान समजावलं आहे… प्रत्येक रागांच्या वृत्ती बद्दल त्यांनी लिहीलं आहे ते मनाला फार भावतं.. खमाज या रागाची वृत्ती  आनंदी आणि खेळकर आहे. पण स्वररचनेतला किंचीत बदल हा रागाची वृत्ती कशी बदलवतो याचं उदाहरण देताना ते एखादं प्रचलीत गाणं घेतात..मग ते नाट्यगीत भावगीत अथवा चित्रपट गीतही असू शकतं..

अशा प्रकारच्या लिखाणामुळे सर्वसामान्य श्रोत्यांचा संगीत ऐकणारा कान तयार होतो.

सूरांची एक दिशा नकळतपणे मिळते.

सूरांचे, वेळ, वृत्ती  अविर्भावाशी असलेलं नातं कळल्यामुळे गाणं ऐकण्यातली मजा दुपटी तिपटीने वाढते…सूर म्हणजे आभास न वाटता त्याचं अस्तित्व जाणवायला लागतं… म्हणूनच हे पुस्तक का वाचावं याचं हे माझं मत.

गाणं कुठलंही असूदे..लावणी असो पोवाडा असो अभंंग असो वा भावगीत असो ते कोणत्या ना कोणत्या रागात स्वरबद्ध असते..अगदी एखादे उडतं किंंवा राॅक ,पॉप जाझ..कुठलंही गाणं..पण त्याला भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आहेच…हे लक्षणीय सत्य अरुणाताईंनी  या पुस्तकात मांडून शास्त्रीय संगीताचं महत्वही पटवून दिलं आहे..

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी रागनिर्मीती वेळच्या काही मनोरंजक घटनाही सांगितल्या आहेत..

चंद्रकंस रागाची अशीच एक कथा त्या सांगतात…

एकदा देवधर मास्तर संवादिनीवर मालकंस वाजवत होते.चुकून त्यांची बोटं कोमल निषादाऐवजी,शुद्ध निषादावर पडली..काहीतरी छान वाजलं याची जाणीव झाली म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा कोमल निषाद न घेता,शुद्ध निषादच वाजवला ..आणि चंद्रकंस रागाचा जन्म झाला…

राग मधुवंती बद्दलही अशीच एक गंमतीदार घटना या पुस्तकात वाचायला मिळते.

कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांच्यात काही  कारणामुळे दुरावा निर्माण झाला..त्यावेळी मनाच्या विमनस्क अवस्थेत वसंतरावांनी कुमारांना, “मै आऊ तेरे  दरवा..” अशा अस्थाईच्या ओळी लिहून पाठवल्या, त्यावर कुमारांनी लगेच,

“अरे मेरो मढ्ढैया तोरा आहे रे.” असा अंतरा लिहून  पाठवला.

तीच पुढे मधुवंतीची बंदीश म्हणून प्रसिद्ध झाली..

हे सर्व वाचकांना सांगण्याचा माझा हेतु असा की संगीत या काहीशा अवघड शास्राचा अभ्यासात्मक लेखनप्रपंच करताना,तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून ही हलकी फुलकी मनोरंजकता फार महत्वाची वाटते…

तसे या पुस्तकाविषयी लिहीण्यासारखे भरपूर आहे… मात्र वाचकांना वैयक्तीक आनंद  मिळावा… नव्हे त्यांनी तो घ्यावा, असा विचार करुन मला ही इतकीच झलक पुरेशी वाटते….

संगीत हा अक्षरश:महान संशोधनाचा विषय आहे.

तो एक अथांग महासागर आहे..

अरुणाताईंनी सूर संगत या पुस्तक रुपी कळशीतून थोडीशी पवित्र गंगा  आपल्याला बहाल केली आहे…ती प्रेमभावे जवळ बाळगूया….

पुन:श्च्च सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचे अभिनंदन आणि खूपखूप शुभेच्छा!!

सौ. सोनाली जगताप यांनी केलेलं मुखपृष्ठही अतिशय बोलकं आणि स्वरमयी आहे.या सुंदर साजाबद्दल तिचेही अभिनंदन…!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गावठी गिच्चा…. श्री सचिन पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?पुस्तकावर बोलू काही?

☆ गावठी गिच्चा…. श्री सचिन पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

गावठी गिच्चा: लेखनभान जपणाऱ्या संयमित कथा – सौ. सुचित्रा पवार

नुकताच ‘गावठी गिच्चा’ हा सचिन पाटील यांचा कथासंग्रह वाचून झाला. एकूणच पूर्वापार शंकर पाटील ग्रामीण कथेचा बाज असणाऱ्या, लेखनभान जपणाऱ्या संयमित अशा एकूण बारा कथा या कथासंग्रहात आहेत. कोणत्याही बड्या लेखकाची प्रस्तावना न घेता लेखकाने स्वतः ‘गावातून फेरफटका मारण्यापूर्वी…’ या शिर्षकाखाली कथासंग्रहाची निर्मिती प्रक्रिया व आज-कालच्या गावाचा आढावा घेतला आहे. ‘गावठी गिच्चा’ म्हणजे हिसका किंवा खोड मोडणे या अर्थाचे संग्रहाचे शिर्षकच ठसकेबाज  आहे.

प्रत्येक कहाणीचे आशय अन् विषय वेगवेगळे आहेत, तसेच प्रत्येक कथा ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. आता गावाचे स्वरूप बदलत असले तरी माणसांच्या मनोवृत्ती मात्र बदलल्या नाहीत असेच काहीसे ग्रामीण वास्तव चित्र आहे.

या कथासंग्रहातील ‘उमाळा’ या कथेतील फटकळ असणारी पुष्पाआक्का रागेरागे भावाकडे येते, शरीराने ती भावाकडे आलीय पण तिचे मन मात्र तिच्या घरातच रेंगाळत आहे, म्हणूनच नातवाची आठवण येताच नातवाच्या काळजीने तिचे मन घराकडे ओढ घेतेय आणि ती लगेचच घरी परतते. बहिणीची तऱ्हा भावाला मात्र न कळल्याने तो चक्रावून जातो पण विहिरीला लागलेला ‘उमाळा’ मात्र आक्काचा पायगुणच समजतो. बहीण-भावाच्या प्रेमाचे दुर्मीळ चित्र उमाळा कथेत आपल्याला दिसते.

‘दंगल’ या कथेत दंगल असूनही आपल्या जीवावर उदार होऊन वेळप्रसंग पाहून अवघडलेल्या रेशमाला आपल्या रिक्षातून शहराकडे सुखरूप बाळंतपणाला नेणारा जेकब रिक्षावाला अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवतो.

ऊस फडावरील खोपटात रात्रभर अब्रूच्या भीतीने गांगरलेली सुली प्रत्येक चाहुलीला घाबरते पण एका क्षणात वीज तळपल्याप्रमाणे तिला स्वतःच शील जपण्यासाठी ‘कोयता’ जवळ आहे याची जाणीव होते व तिची भीती कुठल्या कुठं पळून जाते.

विज्ञानयुग असलं तरी अजून खेडोपाडी करणीबाधेच्या भुताचा लोकांच्या मनावर पगडा आहे. त्यातूनच ‘करणी’ मधील विठाई आपल्या म्हशीची दुरावस्था बघून अंदाजाने, संशयाने आसपासच्या लोकांना शिव्या घालते पण प्रत्यक्ष मात्र तिच्याच मुलाने गोठ्यात मारलेल्या कीटकनाशकाचा अंश म्हशीच्या पोटात गेलेला असतो हे गुपितच रहाते.

अचानक नवरा मेलेली तरुण सुंदर सविता उर्फ सवी पतसंस्थेच्या कर्जाच्या विळख्यातून अब्रूसह चातुर्याने निसटते याचे वर्णन लेखकाने ‘डोरलं’ कथेत तंतोतंत केले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशा द्विधा मनःस्थितीत अडकलेली सवी आपलं डोरलं अर्थात मंगळसूत्र विकून आपला शब्द पाळते व शीलही वाचवते.

‘गावचं स्टँड’ आणि ‘तंटामुक्ती’ या दोन्ही कथा विनोदनिर्मिती करणाऱ्या असल्या तरी त्यातील कथानक हे ग्रामीण भागातील उपहासात्मक वास्तव आहेत.

‘उपास’ या कथेत ज्ञानू पैलवानाची मटण खायची तल्लफ  बायकोच्या संकष्टीच्या उपवासाने न भागताच दिवसभर त्याला कसा उपास घडतो आणि रात्री मात्र राग विसरून तो परत बायकोला माफ करून आनंदाने कसा शाकाहार करतो याचे रसभरीत चित्रण आहे. मात्र मटण न करता शाकाहारी जेवण करून पैलवनाची बायको रत्ना नवऱ्याची समजूत का काढू शकत नाही त्याला उपास का घडवते? हे मात्र कळलेलं नाही.

‘सायेब’ या कथेत लेखकाच्या मित्राच्या जीवनाला एका नापास शिक्क्याने कशी कलाटणी मिळाली याचे वास्तव चित्रण आहे. परंतु कथेचा आशय आजच्या शिक्षण पद्धतीला सुसंगत वाटत नाही.

‘चकवा’ या कथेतील बज्याच्या डोक्यात भुताचा विचार आल्याने  प्रत्यक्ष हव्याहव्याशा माणसाबरोबर बोलायची, एकांत सहवासाची संधी येऊन सुद्धा मनातलं गुपित मनातच ठेवून बाजाराचे सामान देखील कसे रस्त्यातच सोडावे लागते याची सुरस कथा आहे.

अनेक एफ.एम.वर सध्या सुरू असलेल्या फोनइन कार्यक्रमाची खिल्ली ‘टोमॅटो केचप’ या कथेत अगदी रास्त उडवली आहे. कारण खेडोपाडी रेंज नसताना, महत्त्वाचं काम असताना हा रेडिओवाला काळ-वेळ-प्रसंग न बघता समोरच्या माणसाची फिरकी घेतो पण लोक वैतागतात आणि ही फिरकी त्यांना किती महागात पडू शकते याचे ज्वलंत उदाहरण सतीश चव्हाण या व्यक्तीरेखेतून  कळते.

रुसलेल्या बायकोने आपली आज्ञा पाळली नाही म्हणून तिची खोड गमतीदार पद्धतीने मोडणारा शिवा ‘गावठी गिच्चा’ मध्ये आपल्याला भेटतो. नवरा-बायकोतले किरकोळ वाद तिथेच सोडून दिले तरच संसार गोडी-गुलाबीने होतो हे सूत्र या कथेतून लेखक अलवार गुंफतो.

एकंदरीत ‘गावठी गिच्चा’ मधील सर्व कथा ग्रामीण जीवन डोळ्यांसमोर ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत आणि त्या वास्तव जीवनाशी निगडित आपल्या आसपास असणाऱ्या सा…

पुस्तकावर बोलू काही

‘गावठी गिच्चा’ लेखक श्री सचिन पाटील

अभिप्राय – सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ अपरिचित रामायण… दाजी पणशीकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ अपरिचित रामायण… दाजी पणशीकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी  ☆

ऐसे गुरू ऐसे शिष्य !

अर्थात ‘अपरिचित रामायण’

लेखक – दाजी पणशीकर

प्रकाशक – रविराज प्रकाशन

काही दिवसांपूर्वी ‘अपरिचित रामायण’ हे दाजी पणशीकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचनात आलं. हे पुस्तक वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणावर आधारित आहे. यात फक्त रामायणातल्या बालकांडातल्या घटनांचाच समावेश आहे. नंतरच्या घटना प्रामुख्याने सीता हरण, रावण वध यांचा यात समावेश नाही. तर मग आहे काय या पुस्तकात वाचण्यासारखं… असं एखाद्याला वाटू शकतं.

पण पुस्तक वाचल्यावर जाणवतं की रामायणात केवळ सीता हरण आणि रावणाचा वध या दोनच मुख्य गोष्टी नसून इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा युगानुयुगे संपूर्ण विश्वाला विचार प्रवृत्त करणाऱ्या घटना घडतात तेव्हा त्या निव्वळ योगायोगाने घडलेल्या नसतात. त्या मागे निश्चितच काही कार्यकारण भाव, हेतू असतो. तो हेतू काय? आणि रावण वध महत्त्वाचा का? ‘रामराज्य’ म्हणजे काय? रामाचा जन्म दशरथाच्या कुळातच का झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक देतं.

या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे रामजन्मापूर्वीची परिस्थिती, ऐश्वर्याने संपन्न आणि वृत्तीनं रसिक, नीतिमान असलेल्या अयोध्येचं वर्णन वाचून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. स्त्रियांसाठी नृत्यशाळा आणि स्वतंत्र क्रीडाभवने होती यावरूनच स्त्रीचं त्या काळातलं सामाजिक स्थान लक्षात येतं. तसंच रघुकुळातला राज्यकारभार, राजा दशरथ आणि त्याचे अमात्य यांची गुणवत्ता, नितीमत्ता आणि प्रजेतील व्यवहार अशा सर्वच बाबी अचंबित करतात.         

या पुस्तकाचा मूळ गाभा म्हणजे राजपुत्र रामाची ‘प्रभू श्रीराम’ म्हणून होणारी जडणघडण… ही जडणघडण कशी आणि कुणामुळे घडली हे यात सविस्तर सागितलं आहे. ‘प्रभू राम’ घडण्यात सगळ्यांत जास्त महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर तो ‘विश्वामित्र ऋषींचा’ आहे. आजपर्यंतच्या रामायणात पुत्रवियोगाने तळमळणारा दशरथ, शोकमग्न कौशल्या, वनवासाला पतीसोबत जाणारी सीता, बंधू लक्ष्मण… यांचं रामावरील प्रेम, त्यांचं आपापसातलं नातं हे आपण वेगवेगळ्या माध्यमातल्या रामकथांमधून पाहिलं आहे. दुर्दैवाने या सगळ्यांत विश्वामित्र ऋषींचा मात्र ठराविक प्रसंग वगळले तर फारसा महत्त्वपूर्ण उल्लेख येत नाही. पण रामाचं ‘रामपण’ आहे ते विश्वामित्र ऋषींनी गुरु म्हणुन केलेल्या ज्ञानदानात, संस्कारात… कसं ते जाणण्यासाठी हे पुस्तक वाचावं. 

राजा दशरथाकडे जेव्हा विश्वामित्र ऋषींनी राक्षसांचा वध करण्यासाठी रामाची मागणी केली तेव्हा राजा दशरथ त्यांच्यासोबत रामाला पाठवण्यास अजिबात अनुकूल नव्हता. पण तरीही विश्वामित्र ऋषी रामाला नेण्याबाबत ठाम आणि आग्रही राहिले तेव्हा महर्षी वसिष्ठ यांनी, ईश्वरी योजना, संकेत जाणून पुत्र मोहात अडकलेल्या राजा दशरथाला कसं राजी केलं… आणि नंतर विश्वामित्रांनी रामाला अक्षरशः कसं घडवलं… अगदी संध्या कशी करावी ते, आपले नित्यकर्म कशी असावीत इथंपासूनचे प्रसंग, गुरू-शिष्य नातं यात सांगितलं आहे.

एका राजपुत्रापासून ते प्रभू श्रीराम होण्यासाठी जे जे काही रामाच्या आयुष्यात घडलं ते अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीनं यात सांगितलंय. केवळ वाचनप्रेमींनाच नव्हे तर रामायणाच्या अभ्यासूंनाही आवडेल असंच हे पुस्तक आहे. याच्यातलं ‘ताटका वध’ हे प्रकरण मला विशेष भावलं. देव आणि दैत्य यांच्यातलं वैर सांगणाऱ्या या प्रसंगातून प्रभू श्रीरामाच्या आगमाची नांदी आणि मानवजातीसाठी आश्वासक जीवनाची सुरुवातच जणू यातून होते. रामायणात या प्रसंगाचं महत्त्व विशेष आहे आणि ते मांडलं ही छान आहे. हे सारे प्रसंग वाचून गुरूचं आपल्या आयुष्यात नक्की स्थान काय असतं हे आपल्या मनात अधोरेखित होत जातं. असा उत्तम गुरु आणि असा उत्तम शिष्य लाभला तर रामराज्यासारखे चमत्कार खरंच घडू शकतात याची आपल्याला खात्री पटते.

हे पुस्तक वाचल्यावर भारावल्यावस्थेत मला या काही ओळी सुचल्या त्यानं मी या लेखाचा समारोप करते.

नाही राम कौसल्येचा।

नाही राम दशरथाचा।

राम असे विश्वामित्राचा।

जरी सोबत भार्या अन भ्राता।

सदैव तत्पर सेवक हनुमंता।

होई जयघोष जरी रघुकुलाचा।

राम असे विश्वामित्राचा।

षड्रिपूंवर मात करण्या।

दशाननाशी युद्ध लढण्या।

लाभे हस्त हा गुरुकृपेचा।

राम असे विश्वामित्राचा।

नित्यकर्म अन धैर्योपासना करवी।

शस्त्र, अस्त्र, धर्म, यांचे ज्ञान देई।

शुद्धाचरण, सत्याचा मार्ग जो दावी।

तो हा ‘परमगुरू’ ‘परमात्म्याचा’।

राम असे विश्वामित्राचा ।

राम असे विश्वामित्राचा।

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “अरूणोदय” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अरूणोदय” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव – (काव्यसंग्रह) अरुणोदय

प्रकाशन – १५ मार्च २०२२

प्रकाशक – शाॅपीझेन.काॅम

किंमत – रु ४०/—

 

आज मी तुम्हाला सुश्री अरुणा मुल्हेरकर यांच्या शाॅपीझेन या डीजीटल मीडीयावर नुकताच प्रकाशित झालेल्या अरुणोदय या काव्य संग्रहाचा परिचय करुन देणार आहे. या संग्रहात एकूण चाळीस कविता आहेत.

त्यांचे वैशिष्ट्य असे की, यातील एकही कविता मुक्तछंदातील नसून, प्रत्येक कविता नियमबद्ध आहे. त्यामुळे या चाळीस कवितातून चाळीस काव्यप्रकाराची अरुणाताई यांनी ओळख करून दिली आहे.

षटकोळी, कृष्णाक्षरी, शोभाक्षरी, शंकरपाळी, नीरजा, मधुसिंधु, रट्टा वगैरे एकाहून एक सुंदर काव्यप्रकार उलगडत जातात.

प्रत्येक काव्यप्रकाराचे नियम त्यांनी सांगितले आहेत. ओळी, यमक, वर्ण अक्षरं, शब्द यांची संख्या मांडणी याविषयीचे संपूर्ण तपशील यात दिले आहेत. त्यामुळे या सर्व काव्यरचना वाचताना आपोआपच एक लयबद्धता येते. आणि वाचकाला त्या रमवतात.

या सर्व कवितातून त्यांनी विवीध विषयही हाताळले आहेत. निसर्ग आहे.मनातली स्पंदने आहेत. सामाजिक दूषणे आहेत.

नव्या पीढीच्या समस्या आहेत. जीवनातली सुख दु:ख प्रेम यावरचे मोकळे भाष्य आहे. भावनांचे अविष्कार आहेत….

नाते प्रेमाचे या षटकोळी रचनेत त्या म्हणतात,

मधुप आणि कुसुम

धेनु वाढवी वासराला

पाखरे झेपावती नभात

घेत उंच भरारी

कोटरात परतती सांजवेळी

प्रेम आहे चराचरात..

या सहा ओळीच्या रचनेत अत्यंत सहज शब्दांत त्यांनी निसर्गातले प्रेम टिपले आहे.

द्विशब्दी रचनेतले आई विषयीचे दोनच शब्द मनाला भिडणारे आहेत.

आई देई

संस्काराचे आंदण

दारात तिच्या

बागडते अंगण…

मधुदीप काव्यांमधे शब्दांची मांडणी तेवत्या दीपासारखी असते. या कविता वाचताना अक्षरांच्या सुबक चित्राकृतीही खूप आकर्षक आहेत.

संगीताक्षरी.. तीनओळीची अक्षरबद्ध काव्यरचना.

चंदन झिजतसे

सुगंध भरीतसे

सदाकाळ…

लीनाक्षरी हे दोन ओळीचं, २४ अक्षरे असलेले काव्यही अतिशय लोभस आहे.

संकटाशी सामर्थ्याने लढायचे

शांतचित्त समाधान ठेवायचे…

शब्द साधे पण अत्यंत ओलावा असलेले. प्राणमय आणि सजीव. प्रत्येक रचना ही त्या त्या भावनेसकट,विचारांसहित मनाला भिडते. नियमबद्ध असूनही अवघड नाही. रुक्ष नाही. फाफटपसारा नाही. ओढूनताणून केलेली अक्षरांची कसरत नाही. एक सहजता, नाद लय गती.. या कविता वाचताना जाणवते. मन गुणगुणायला लागतं.. अरुणोदय या काव्यसंग्रहाचं हेच वैशिष्ट्य आणि यशही.

अरुणाताईंनी अतिशय अभ्यासपूर्ण असा हा काव्यसंग्रह प्रकाशित करून, नवोदित कवी कवयित्रींसाठी एक दालन उघडले आहे.

साहित्य कला व्यक्तिमत्व मंचाचे प्रमुख, आणि मान्यवर लेखक, कवी गझलकार या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात की या काव्य सरितेत प्रथम मी सहज डोकावलो नंतर त्यात कसा ऊतरलो, पोहू लागलो नि संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर वर येउन पाहतो तर मी एकामहासागरात होतो. अरुणाताईंची प्रतिभा आणि प्रतिमा खूप काही शिकायला ठेवून गेली. तेव्हां रसिकहो आपणही  हा अनुभव घ्यावा. त्यासाठी शॉपीझेन डॉट काॅम या साईटवर जाउन अरुणोदय हा काव्यसंग्रह जरुर वाचावा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नमुना नमुना माणसं… सुश्री मंजिरी तिक्का ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ नमुना नमुना माणसं… सुश्री मंजिरी तिक्का ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी  ☆

नमुना नमुना माणसं

लेखिका | मंजिरी तिक्का

साहित्य प्रकार | अनुभवकथन

प्रकाशक | अक्षरमानव प्रकाशन

सात-आठ वर्षांपूर्वी चक्रम माणसांशी कसे वागावे हे कि.मो. फडके यांनी लिहिलेलं त्रिदल प्रकाशनचं पुस्तक मी वाचलं होतं. यात चक्रमपणाबद्दल व्यवस्थित माहिती दिली होती. त्याची लक्षणं, तीव्रता त्याचे होणारे परिणाम वगैरेंचे किस्से वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, याच्यातली बहुतांशी सौम्य का होईना लक्षणं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कित्येकांमध्ये आढळतात अगदी आपल्यातही. वागण्याची पद्धत किंवा अमुक प्रकारचा स्वभाव हा चक्रमपणात कसा नोंदला जाऊ शकतो किंवा इतरांसाठी तो कसा ठरू शकतो याची जाणीव या पुस्तकातून करुन दिली आहे.

तर मंडळी,

हे सगळं चऱ्हाट लावण्याचं कारण म्हणजे मी नुकतंच वाचलेलं ‘नमुना नमुना माणसं’ हे मंजिरी तिक्का यांचं पुस्तक. एव्हाना नावावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की नमुना नमुना माणसं असं म्हणताना त्यात चक्रमपणा हा हळुच डोकावतोय. अगदी थेट नसला तरी एखाद्या नुकसानकारक गुणाचा अतिरेक हा त्याच्या जवळपास जाणाराच गुण आहे. हेच गुण अंगी असलेल्या माणसांच्या कथा-व्यथा आणि त्यांचे त्याबाबत घडणारे विनोदी किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.

अतिशय साध्या-सोप्या आणि संवादी शैलीत हे किस्से असल्यामुळे क्वचित प्रसंगी आपल्या हातूनही घडलेले असे फजितीचे प्रसंग किंवा आपल्या इतर मित्र-मैत्रिणी, भावंड यांच्यापैकी कोणाच्या तरी बाबतीत घडलेले प्रसंग आठवून आपल्याला खुदकन् हसू येतं. बालपणीच्या आठवणींमध्ये अधिक तर अज्ञानाचा, निरागसतेचा भाव असल्यानं त्यांचं वैषम्य जाणवत नाही. पण मोठेपणी मात्र आपल्या स्वभावामध्ये योग्य त्या प्रकारे बदल करता आला नाही तर त्याचा किती गैरफायदा घेतला जातो हे लक्षात आल्यावर हसू येण्यापेक्षा हळहळायलाच होतं.

मला या पुस्तकाची भावलेली आणखीन एक बाजू म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे जे घडलं ते जसंच्या तसं स्वरूपात मांडल्याचं जाणवतं. त्यात अतिरंजितपणा, पाल्हाळीकपणा, अकारण विनोद निर्मितीचा प्रयत्न, शब्दविक्षेप आढळत नाही. त्यामुळे हे किस्से आपल्या घरातलेच आहेत, किंवा आपल्या समोरच घडताहेत असं वाटतं.

अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये आढळणाऱ्या अतिचिकित्सक, अतिचिकट, अतिस्वच्छतावेड्या, अतिअबोल, अतिवाचाळ, अतिभिडस्त, तारतम्याचा अभाव असलेल्या नमुन्यांचा यात अंतर्भाव आहे. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे नात्यांमध्ये, कामामध्ये होणारा गोंधळ हा अतिशय सहजतेने टिपला आहे. प्रसंगांची मांडणी, किस्से हे जरी विनोदी पद्धतीने सांगितले असले तरी ते वाचून हसता हसता आपण नकळत अंतर्मुख होतो. आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे जास्त जाणीवपूर्वक बघू लागतो, हे खरंतर या पुस्तकाचं यश.

मंजिरी तिक्का यांचं हे पुस्तक जरी पहिलंवहिलं असलं तरी काहीसं स्वशोध घेणारं, स्वतःच्या अंतरंगात डोकवायला लावणारं आहे. त्यांच्यातल्या उत्तम निरीक्षकाची, लेखकाची चुणूक दाखवणारं आहे. शंभरेक पानांच्या या पुस्तकात वाचताना कुठेही कंटाळवाणेपणा जाणवत नाही. मात्र क्वचितप्रसंगी प्रसंग वर्णन करताना पुनरावृत्ती झाल्याचं जाणवतं.

पुस्तकाची महत्त्वाची आघाडी सांभाळणाऱ्या दोन गोष्टी एक मुखपृष्ठ आणि शीर्षक या अतिशय उत्तम जमून आल्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी साकारलेले पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि विषयाला समर्पक असं आहे. माणसाच्या वेगवेगळ्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या चौकटीतल्या व्यंगचित्रातून ‘नमुना नमुना’ माणसाचं उत्तम प्रतिबिंब पाहायला मिळतं. तर नमुना या शब्दाच्या पुनरुक्तीमुळे निर्माण होणारा भाव पुस्तकाच्या चेहऱ्यावर मिश्कील हसू आणतो.

सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या दिवसात एका बैठकीत वाचून संपणारं आणि मनाला प्रसन्नता देणारं हे पुस्तक आवर्जून वाचा. आणि आपल्या आजूबाजूची नमुनेदार माणसं शोधतानाच आपल्यातही लपलेला नमुनेदारपणा शोधून काढा.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गाणा-याचं पोर… राघवेंद्र भीमसेन जोशी ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ गाणा-याचं पोर… राघवेंद्र भीमसेन जोशी ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकाचे नाव- ‘गाणाऱ्याचे पोर’

लेखक – राघवेंद्र भीमसेन जोशी

प्रकाशक- यशोधन पाटील

प्रथम आवृत्ती- 22 नोव्हें. 2013

 

पंडित भीमसेन जोशी, राघवेंद्र यांचे वडील. राघवेंद्र यांच्या आईचे नाव सुनंदा, भीमसेन जोशींची पहिली पत्नी. भीमसेन जोशी यांचे लहानपणी चे वास्तव्य गदग मध्ये गेले. 1944 मध्ये भीमण्णा यांचे लग्न सुनंदा कट्टी यांच्या बरोबर झाले. त्यानंतर त्यांचे गाण्याचे दौरे चालू झाले. कुटुंबाबरोबर घराबाहेर पडून नागपूर येथे  बिर्‍हाड केले. 

औरंगाबादमध्ये  त्यांची वत्सला मुधोळकर यांच्या शी गाठ पडली आणि कार्यक्रम करता करता ते त्यांच्या प्रेमात पडले. वत्सला यांचा उल्लेख राघवेंद्र यांनी ‘त्यांचा’ अशा शब्दात केला आहे. भीमसेनजींचा दुसरा विवाह ही गोष्ट च सर्वांना खटकणारी होती. पहिली पत्नी आणि मुले यांना भीमसेनजीनी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर  वेगळे बिऱ्हाड करून दिले.

भीमसेन जोशीं बद्दल आदर बाळगूनही त्यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. प्रेमळ तितकेच लहरी, बेफिकिरीने राहणारे होते, त्याचबरोबर गाण्यातील तन्मयता अशा अनेक गोष्टी राघवेंद्र यांच्या लिखाणातून दिसून येतात. सवाई गंधर्व महोत्सवातील त्यांची हजेरी हा एक गौरवास्पद प्रसंग असे.  त्यांच्या बादशाहीच्या बोर्डातील घरी पैसे आणण्यासाठी आई ज्यांना पाठवत असे. तेव्हाचे त्यांचे रूप राघवेंद्र यांच्या मनात ठसले होते. ‘भरदार छाती, बलदंड बाहू, असे मर्दानी रूप, कुरळे केस, देहाला एक विशिष्ट देह गंध होता, तो नुसत्या घामाचा वास नव्हता, तर त्यात तुळशी तल्या मातीच्या वासाचाही अंश  आहे असं वाटे.’ अशा शब्दात त्यांनी भीमसेन यांचे वर्णन केले आहे.

त्यांच्या पैशावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा हक्क असे. त्यामुळे त्यांचे पहिले कुटुंब व मुले यांना त्यांचा सहवास मिळून नये असा  ‘त्यांचा’ प्रयत्न असे. राघवेंन्द्र म्हणतात,’ आई-भीमण्णा-त्या-… या त्रिकोणात  पिंगपाॅंग चेंडूसारखी माझी त्रिशंकू अवस्था होई! एकीकडे पैशाची बरसात,तर सुनंदा च्या घरी पैशाची ओढाताण!’असे काही वाचले की मनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाला हा कसला डाग!

एकदा राघवेंद्र यांच्या घरी आई पुरणाच्या पोळ्या करीत असताना भीमसेनजीनी एका बैठकीत चार पाच पोळ्या संपवल्या याचेही राघवेंद्र ना कौतुक! एकदा लहानपणी साखर झोपेत असतानाच तंबोर्‍याच्या सूर राघवेंद्र यांच्या मनात चैतन्य निर्माण करून गेले’ ही बदामीची आठवण अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे!

लहानपणीच्या अनेक आठवणी सांगता सांगतानाच राघवेंद्र भीमसेनजींच्या अनेक गोष्टी व स्वभाव वैशिष्ट्ये सांगत जातात. त्यावरून त्यांचे गाणे, त्यांचे खाणे, कलंदर स्वभाव, गाण्यातील एकतानता, राघवेंद्र स्वामी वरील श्रद्धा अशा अनेक गोष्टी आपल्या ला दिसून येतात. त्यांना कार ड्रायव्हिंग ची खूप आवड होती आणि काय संबंधी सखोल ज्ञान त्यांनी मिळवले होते असे दिसून येते.

भीमसेनजीनी मुलांची शिक्षणं पुण्यात केली.

दुसऱ्या घरी भीमसेनजीनी खूप खर्च केला, पण  पहिल्या कुटुंबाला मात्र गरीबीत ठेवले याची राघवेंद्र यांच्या मनात खूप खंत होती. पण तरीही त्यांनी वडिलांचा मोठेपणा जाणून शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. त्यांची कीर्ती आणि समृद्धी जगभर पसरली होती. मोठा मुलगा म्हणून वडिलांची काळजी घेतली. भीमसेनजीनी आपल्या पहिल्या पत्नीला कधीच मानाने वागवले नाही.

मनात येईल ते करण्याची भीमण्णांची वृत्ती अनेक प्रसंगातून दिसून येते असेच माझे मत झाले. त्यांना पांढराशुभ्र रंग फार आवडे.’ सात स्वर रंग सामावलेला शुभ्र प्रकाश हेच या स्वरभास्कराचे वैशिष्ट्य होते.

राघवेंद्र यांच्या लिखाणातून मला असे जाणवले की सुरांच्या पलिकडे असणारे भीमसेन वेगळेच होते!त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली, त्या प्रसंगाचा फोटो भीमाण्णांनी  त्यांना दिला.

भीमसेन जींचा मुलगा म्हणून राघवेंद्र यांनी स्वतः चा फायदा करून नाही घेतला.  राघवेंद्र नी आपली व्यावहारिक प्रगती स्वतः च केली. पाणी शोधण्याचे तंत्र त्यांना कसे सापडले, धायरीला त्यांनी घर केले, भीमाण्णांनी त्यांच्या’सह नवीन घराला भेट दिली.

भीमाण्णांना  भारत रत्न हा बहुमान मिळाला.

‘त्यांच्या मैफिलींच्या आठवणी काढणे म्हणजे मोत्याची थैलीच  मोकळी सोडण्यासारखे आहे. प्रत्येक मोती गोळा करताना परत मनात तोच आनंद!’ अशा शब्दात राघवेंद्र यांनी भीमसेनजींचा सन्मान केला आहे!

त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्यात राघवेंद्र यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print