आज ‘ धनत्रयोदशीचा ‘ दिवस. दिवाळी सणाच्या रुपाने सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे जीवन लाभावे अशी कामना प्रत्येकजणच करतो. त्यासाठी समृद्धीची म्हणजे धनाची पूजा केली जाते. आज संध्याकाळी धने, गुळ, पिवळी फुले वाहून धनाची म्हणजे पैशांची पूजा करतात. आणखी एक गोष्ट म्हणजे संपन्न जगण्यासाठी बुद्धी आणि धन जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यही महत्त्वाचे असते. म्हणूनच आज आरोग्यदेवतेचे सुद्धा पूजन करतात.
समुद्र मंथनातून निघालेले पाचवे रत्न म्हणजे ‘धन्वंतरी’. याच धन्वंतरीला आरोग्याची देवता मानतात. याच धन्वंतरीची आज पूजा करून उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तिची प्रार्थना करतात.
याशिवाय आजच्या दिवशी आणखी एक गोष्ट सांगितली आहे;ती म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमाला म्हणजे मृत्यूच्या देवतेला दक्षिणेकडे तोंड करून दीपदान करावे. पद्म पुराणानुसार अपमृत्युच्या विनाशा करता आणि यमाच्या सत्कारासाठी दीप लावावेत असे सांगितलेले आहे.
याबाबतची एक आख्यायिका सांगतात. हैमराजाला पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राची कुंडली पाहून ज्योतिषांनी भाकीत केले की, त्याच्या विवाहानंतर चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल. तो मृत्यू टाळण्यासाठी राजाने शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण अखेर ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली. राजाला आणि प्रजेला अतोनात दुःख झाले. हे पाहून यमदूतही व्यथित झाले. त्यांनी यमराजाला प्रार्थना केली की, ‘असा अपमृत्यू कोणाच्याही वाट्याला येऊ नये’. यमराज गंभीर झाले आणि त्यांनी असा वर दिला की ‘ दिवाळीचे पाच दिवस जे लोक दीपोत्सव करतील त्यांच्या वाट्याला असं दुःख येणार नाही. ‘
माणूस वृद्धापकाळाने जाणे हा झाला नैसर्गिक मृत्यू. तो कुणालाही चुकलेला नाही आणि चुकविता येतही नाही. पण आजारपणाने, रोगराईने, सर्पदंशाने अवेळी जाणे म्हणजे अपमृत्यू. पूर्वी अशा मृत्यूंचे प्रमाण फार होते. त्यामुळेच असे अपमृत्यू टाळण्यासाठी देवाची प्रार्थना केली जायची.
आज-काल वैद्यक शास्त्र अतिशय प्रगत झालेले आहे. इतरही सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा मृत्यूंचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. पण आज-काल वेगळ्या अपमृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. अपघात, घातपात, आत्महत्या, व्यसनाधीनतेमुळे होणारे मृत्यू खूप वाढलेले आहे. हे सर्व अपमृत्यूच आहेत. शिवाय पूर्वी प्लेग, कॉलरा असे आजार होते. तर आता काविळ, डेंग्यू ताप, स्वाईन फ्ल्यू, कोविड-१९ असे आजार आले आहेत.
पण यातल्या बऱ्याच गोष्टी टाळणे तर आपल्याच हातात आहे. या सणांचा हाच मूळ उद्देश असतो. परिसराची जशी स्वच्छता करायची तशीच मनाची सुद्धा करायची. म्हणजे दुरावा विसरून नाती पुन्हा घट्ट करायची. थोडं आत्मचिंतन, थोडं आत्मपरीक्षण करायचं. व्यसनं दूर सारून, अती राग, द्वेष, अतीवेगावर नियंत्रण करून हे अपमृत्यू नक्कीच कमी करता येतील.
आजच्या दिवशी आरोग्याला घातक व्यसनांचा त्याग करून आरोग्यपूर्ण जीवनाचा निश्चयच आपण सगळ्यांनी केला पाहिजे. सगळ्यांनी या मागचा विचार समजून घेतला पाहिजे म्हणजे, या सणांचा आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे. म्हणूनच आज दीपदान करायचे.
मुळामध्ये दिवाळी हा दीपोत्सव असल्यामुळे दिवा हा केंद्रस्थानीच असतो. म्हणूनच घराघरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारांनी दिव्यांची आरास केली जाते. सारा आसमंत उजळून जातो. मन आनंदाने, उत्साहाने भरून जाते.
हे असे अनेक दिवे मिळतात. ते घरी आणा. . . दारात, खिडकीत, गच्चीत, गॅलरीत लावा. . .
त्यांच्या उजेडाने चैतन्य, आनंद घरभर पसरेल. . . . दिवे हीच तर आपल्या दिवाळीची ओळख आहे. . .
आता यावर्षी अजून एक वेगळा उपक्रम करूया… या दिव्यांबरोबरच अंतरंगात एक ज्ञान दिवा लावूया
नवं काही शिकूया… अगदी फार मोठी गोष्ट शिकायला पाहिजे असे काही नाही…
छोटीशी असली तरी चालेल. . ती पण आनंद देते…
…. एखादी कला आत्मसात करून घेऊया…
…. सामाजिक भान राखून समाजासाठी जमेल तेव्हढे एखादे काम करूया…
… आधुनिक नव विचारांचा. . स्वीकार करूया… हळूहळू त्याची सवय होईल…
… हा संदेश, वारसा पुढच्या पिढीला पण देऊया.
… हा ज्ञान दिवा पेटता राहील. . तो अखंड उजेड पाडेल. . . . आपल्या पुढच्या आयुष्याच्या वाटेवर. . .
त्याच्या प्रकाशात चालणे सुखावह आनंददायी आणि सुरक्षित असेल. . .
मनोनिग्रह, प्रयत्न, सातत्य यांचा अभ्यास, सराव असला की तेवढे तेल या दिव्याला पुरेसे आहे…
दिवाळी संपली तरी सुखावणारा हा ज्ञान दिवा आहे.
अशीच एक… छोटी पणती… आपल्या हृदयात लावूया
… आपलेच अंत:करण उजळणारी शांतपणे तेवणारी. . .
ही दिवाळीच्या चार दिवसांसाठी नाही तर. . . अखंड तेवणारी हवी. .
त्यासाठी जिव्हाळा , दया, माया, प्रेम, आपुलकीची स्निग्धता हवी. . . . मगच ही पणती अखंड जळत राहील. .
कारण हा तेजाचा उत्सव आहे. आपल्याला प्रकाशाची आराधना करायची आहे…. त्यावर काजळी धरू नये म्हणूनही काळजी घेऊया…. आपल्याच शब्दांची …. नाही तरी शब्दांचाच तर सारा खेळ असतो…
” दीपज्योती परब्रम्ह दीपज्योती जनार्दन
दीपेन हरते पापं दीपज्योति नमोस्तुते “
… ह्या दिव्याचं महत्त्व इतकं आहे की या ज्योतीला प्रत्यक्ष परब्रम्ह मानलेले आहे. ती जणू काही परमेश्वर
आहे म्हणूनच तिला नमस्कार करायचा, कारण ती मनातल्या पापाचा आणि अंधाराचा नाश करते. किती विशाल अर्थ सांगितला आहे आपल्या पूर्वजांनी. . . . .
हो. . . पण त्याबरोबर दाराशी अंधारात शांतपणे जळणारी एक मातीची पणती पण असू दे. . . . . तीच तर आपले पाय भक्कमपणे मातीशी जोडून आपल्याला जमिनीवर ठेवते. . . . .
पप्पांचा गणपती आणि आईची गौर अशी या पूज्य दैवतांची आमच्या घरात अगदी सहजपणे विभागणीच झाली होती म्हणा ना आणि ही दोन्ही दैवते अत्यंत मनोभावे आणि उत्साहाने आम्हा सर्वांकडून पुजली जायची. त्यांची आराधना केली जायची.
पप्पांचे मावस भाऊ आणि आमचे प्रभाकर काका दरवर्षी आईसाठी गौरीचं, साधारण चार बाय सहा कागदावरचं एक सुंदर चित्र पाठवायचे आणि मग आगामी गौरीच्या सोहळ्याचा उत्साह आईबरोबर आम्हा सर्वांच्या अंगात संचारायचा.
माझी आई मुळातच कलाकार होती. तिला उपजतच एक कलादृष्टी, सौंदर्यदृष्टी प्राप्त होती. ती त्या कागदावर रेखाटलेल्या देखण्या गौरीच्या चित्राला अधिकच सुंदर करायची. गौरीच्या चित्रात असलेल्या काही रिकाम्या जागा ती चमचमणाऱ्या लहान मोठ्या टिकल्या लावून भरायची. चित्रातल्या गौरीच्या कानावर खऱ्या मोत्यांच्या कुड्या धाग्याने टाके घालून लावायची. चित्रातल्या गौरीच्या गळ्यात सुरेख
गुंफलेली, सोन्याचे मणी असलेली काळी पोत त्याच पद्धतीने लावायची. शिवाय नथ, बांगड्या, बाजूबंद अशा अनेक सौभाग्य अलंकाराची ती सोनेरी, चंदेरी, रंगीत मणी वापरून योजना करायची. या कलाकुसरीच्या कामात मी आणि ताई आईला मदत करायचो. आईच्या मार्गदर्शनाखाली या सजावटीच्या कलेचा सहजच अभ्यास व्हायचा. मूळ चित्रातली ही कमरेपर्यंतची गौर आईने कल्पकतेने केलेल्या सजावटीमुळे अधिकच सुंदर, प्रसन्न आणि तेजोमय वाटायची. त्या कागदाच्या मुखवट्याला जणू काही आपोआपच दैवत्व प्राप्त व्हायचं. गौरीच्या सोहळ्यातला हा मुखवटा सजावटीचा पहिला भाग फारच मनोरंजक आनंददायी आणि उत्साहवर्धक असायचा. एक प्रकारची ती ऍक्टिव्हिटी होती. त्यातून सुंदरतेला अधिक सुंदर आणि निर्जिवतेला सजीव, चैतन्यमय कसे करायचे याचा एक पाठच असायचा तो!
पप्पांचा तांदुळाचा गणपती आणि आईच्या गौरी मुखवटा सजावटीतून नकळतच एक कलात्मक दृष्टी, सौंदर्यभान आम्हाला मिळत गेलं.
घरोघरी होणारे गौरीचे आगमन हे तसं पाहिलं तर रूपकात्मक असतं. तीन दिवसांचा हा सोहळा… घर कसं उजळवून टाकायचा. घरात एक चैतन्य जाणवायचं.
आजीकडून गौरीची कथा ऐकायलाही मजा यायची. ती अगदी भावभक्तीने कथा उलगडायची. गौरी म्हणजे शिवशक्ती आणि गणेशाच्या आईचं रूप! असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया गौरीकडे गेल्या आणि सौभाग्य रक्षणासाठी त्यांनी गौरी कडे प्रार्थना केली. गौरीने असुरांचा संहार केला आणि शरण आलेल्या स्त्रियांचे सौभाग्य रक्षण केले. पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले. ही कथा ऐकताना मला गौरीपूजन ही एक महान संकल्पना वाटायची. मी गौरीला प्रातिनिधिक स्वरूपात पहायची. माझ्या दृष्टीने अबलांसाठी गौरी म्हणजे एक प्रतीकात्मक सक्षम शौर्याची संघटन शक्ती वाटायची.
गावोगावच्या, घराघरातल्या पद्धती वेगळ्या असतात. काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी, कुठे पाणवठ्यावर जाऊन पाच —सात — अकरा खडे आणून खड्यांच्या गौरी पूजतात पण आमच्याकडे तेरड्याची गौर पुजली जायची. पद्धती विविध असल्या तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमी फलित करण्याचाच असतो.
सकाळीच बाजारात जाऊन तेरड्याच्या लांब दांड्यांची एक मोळीच विकत आणायची, लाल, जांभळी, गुलाबी पाकळ्यांची छोटी फुले असलेली ती तेरड्याची मोळी फारच सुंदर दिसायची. तसं पाहिलं तर रानोमाळ मुक्तपणे बहरणारा हा जंगली तेरडा. ना लाड ना कौतुक पण या दिवशी मात्र त्याची भलतीच ऐट! आपल्या संस्कृतीचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. पत्री, रानफुलांना महत्त्व देणारी, निसर्गाशी जुळून राहणारी संस्कृती आपली!
तेरड्यासोबत केळीची पाने, विड्याची पाने, सुपाऱ्या, फुलं, फुलांमध्ये प्रामुख्याने तिळाच्या पिवळ्या फुलांचा समावेश असायचा आणि असं बरंच सामान यादीप्रमाणे घरी घेऊन यायचं. बाजारात जाऊन या साऱ्या वस्तू आणण्याची सुद्धा गंमत असायची. माणसांनी आणि विक्रेत्यांनी समस्त ठाण्यातला बाजार फुललेला असायचा. रंगीबेरंगी फुले, गजरे, हार, तोरणं यांची लयलूट असायची. वातावरणात एक सुगंध, प्रसन्नता आणि चैतन्य जाणवायचं. मधूनच एखादी अवखळ पावसाची सरही यायची. खरेदी करता करता जांभळी नाक्यावरचा गणपती, तळ्याजवळचं कोपीनेश्वर मंदिर, वाटेवरच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन घेतलेलं देवतांचं दर्शन खूप सुखदायी, ऊर्जादायी वाटायचं. जांभळी नाक्यावरच्या गणपतीला या दिवसात विविध प्रकारच्या फुलांच्या, फळांच्या, खाद्यपदार्थांच्या सुंदर वाड्या भरल्या जात, त्याही नयनरम्य असत. देवळातला तो घंटानाद आजही माझ्या कर्णेंद्रियांना जाणवत असतो.
अशा रीतिने भाद्रपद महिन्यातल्या शुद्ध पक्षात, अनुराधा नक्षत्रावर आमच्या घरी या गौराईचं आगमन व्हायचं आणि तिच्या स्वागतासाठी आमचं कुटुंब अगदी सज्ज असायचं. गौराई म्हणजे खरोखरच लाडाची माहेरवाशीण. आम्हा बहिणींपैकीच कुणीतरी त्या रूपकात्मक तेरड्याच्या लांब दांडीच्या मोळीला गौर मानून उंबरठ्यावर घेऊन उभी राहायची मग आई तिच्यावरून भाकरीचा तुकडा ओवाळून, तिचे दूध पाण्याने पाद्यपूजन करायची. तिला उंबरठ्यातून आत घ्यायची. गौर घाटावरून येते ही एक समजूत खूपच गमतीदार वाटायची. गौराईचा गृहप्रवेश होत असताना आई विचारायची,
हा गोड संवाद साधत या लाडक्या गौराईला हळद-कुंकवाच्या पावलावरून घरभर फिरवले जायचे आणि मग तिच्यासाठी खास सजवलेल्या स्थानी तिला आसनस्थ केले जायचे.
घरातली सर्व कामं आवरल्यानंतर गौरीला सजवायचं. तेरड्यांच्या रोपावर सजवलेला तो गौरीचा मुखवटा आरुढ करायचा. आईची मोतीया कलरची ठेवणीतली पैठणी नेसवायची पुन्हा अलंकाराने तिला सुशोभित करायचे. कमरपट्टा बांधायचा. तेरड्याच्या रोपांना असं सजवल्यानंतर खरोखरच तिथे एक लावण्य, सौंदर्य आणि तेज घेऊन एक दिव्य असं स्त्रीरूपच अवतारायचं. त्या नुसत्या काल्पनिक अस्तित्वाने घरभर आनंद, चैतन्य आणि उत्साह पसरायचा. खरोखरच आपल्या घरी कोणीतरी त्रिभुवनातलं सौख्य घेऊन आले आहे असंच वाटायचं.
दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ नक्षत्रावर तिचं पूजन केलं जायचं. आज गौरी जेवणार म्हणून सगळं घर कामाला लागायचं. खरं म्हणजे पप्पा एकुलते असल्यामुळे आमचं कुटुंब फारसं विस्तारित नव्हतं. आम्हाला मावशी पण एकच होती, मामा नव्हताच. त्यामुळे आई पप्पांच्या दोन्ही बाजूंकडून असणारी नाती फारशी नव्हतीच पण जी होती ती मात्र फार जिव्हाळ्याची होती. पप्पांची मावशी— गुलाब मावशी आणि तिचा चार मुलांचा परिवार म्हणजे आमचा एक अखंड जोडलेला परिवारच होता. आमच्या घरी किंवा त्यांच्या घरी असलेल्या सगळ्या सणसोहळ्यात सगळ्यांचा उत्साहपूर्ण, आपलेपणाचा सहभाग असायचा. पप्पांची मावस बहीण म्हणजे आमची कुमुदआत्या तर आमच्या कुटुंबाचा मोठा भावनिक आधार होती. आईचं आणि तिचं नातं नणंद भावजयीपेक्षा बहिणी बहिणीचं होतं. अशा सणांच्या निमित्ताने कुमुदआत्याचा आमच्या घरातला वावर खूप हवाहवासा असायचा. मार्गदर्शकही असायचा. घरात एक काल्पनिक गौराईच्या रूपातली माहेरवाशीण आणि कुमुद आत्याच्या रूपातली वास्तविक माहेरवाशीण असा एक सुंदर भावनेचा धागा या गौरी सोहळ्याच्या निमित्ताने गुंफलेला असायचा.
केळीच्या पानावर सोळा भाज्या एकत्र करून केलेली भाजी, भरली राजेळी केळी, अळूवडी, पुरणपोळी, चवळीची उसळ, काकडीची कढी, चटण्या, कोशिंबीर, पापड, मिरगुंडं, वरण-भात त्यावर साजूक तूप असा भरगच्च नैवेद्य गौरीपुढे सुबक रीतीने मांडला जायचा. जय देवी जय गौरी माते अशी मनोभावे आरती केली जायची. आरतीला शेजारपाजारच्या, पलीकडच्या गल्लीतल्या, सर्व जाती-धर्माच्या बायका आमच्याकडे जमत. त्याही सुपांमधून गौरीसाठी खणा नारळाची ओटी आणत. फराळ आणत. कोणी झिम्मा फुगड्याही खेळत.
हिरव्या पानात हिरव्या रानात गौराई नांदू दे अशी लडिवाळ गाणी घरात घुमत. आमचं घर त्यावेळी एक कल्चरल सेंटर झाल्यासारखं वाटायचं. मंदिर व्हायचं, आनंदघर बनायचं.
या सगळ्या वातावरणात माझ्या मनावर कोरलं आहे ते माझ्या आईचं त्या दिवशीच रूप! सुवर्णालंकारांनी भरलेले तिचे हात, गळा, कपाळावरचं ठसठशीत कुंकू, कळ्याभोर केसांचा अलगद बांधलेला अंबाडा, त्यावर माळलेला बटशेवंतीचा गजरा, नाकात ठसठशीत मोत्यांची नथ, दंडावर पाचूचा खडा वसवलेला घसघशीत बाजूबंद आणि तिनं नेसलेली अंजिरी रंगाची नऊवारी पैठणी! आणि या सर्वांवर कडी करणारं तिच्या मुद्रेवरचं सात्विक मायेचं तेज! साक्षात गौराईनेच जणू काही तिच्यात ओतलेलं!
संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही असायचा. ठाण्यातल्या प्रतिष्ठित बायकांना आमंत्रण असायचं पण आजूबाजूच्या सर्व कामकरी महिलांसाठी हळदी कुंकवाचं आमंत्रण आवर्जून दिलेलं असायचं. पप्पा हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्रिन्सेस स्ट्रीटवरच्या पारसी डेअरी मधून खास बनवलेले केशरी पेढे आणायचे. एकंदरच गौरीच्या निमित्ताने होणारा हा हळदीकुंकवाचा कार्यक्रम थाटामाटात संपन्न व्हायचा. त्यावेळच्या समाज रीतीनुसार हळदीकुंकू म्हणजे सुवासिनींचं, या मान्यतेला आणि समजुतीला आमच्या घरच्या या कार्यक्रमात पूर्णपणे फाटा दिलेला असायचा. सर्व स्त्रियांना आमच्याकडे सन्मानाने पूजलं जायचं. आज जेव्हा मी याचा विचार करते, तेव्हा मला माझ्या आई-वडिलांचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी किती सुंदर पुरोगामी विचारांची बीजं आमच्या मनात नकळत रुजवली होती.
तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन असायचं. भरगच्च माहेरपण भोगून ती आता सर्वांचा निरोप घेणार असते. तिच्यासाठी खास शेवयांची खीर करायची, तिची हळद-कुंकू, फुले— फळे, धान्य, बेलफळ यांनी ओटी भरायची. मनोभावे आरती करून तिला निरोप द्यायचा. जांभळी नाक्यावरच्या तलावात तिचे विसर्जन करताना मनाला का कोण जाणे एक उदासीनता जाणवायचीच पण जो येतो तो एक दिवस जातो किंवा तो जाणारच असतो हे नियतीचे तत्त्व या विसर्जन प्रसंगी प्रकर्षाने जाणवायचं. गौरी गणपती विसर्जनासाठी तलावाकाठी जमलेल्या जमावात प्रत्येकाच्या मनात विविधरंगी भाव असतील. “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या “ या हाकेतल्या भक्तीभावाने मन मोहरायचं.
आजही या सोहळ्याचं याच प्रकाराने, याच क्रमाने, याच भावनेने आणि श्रद्धेने साजरीकरण होतच असतं पण आता जेव्हा जाणत्या मनात तेव्हाच्या आठवणींनी प्रश्न उभे राहतात की या सगळ्या मागचा नक्की अर्थ काय? एकदा आपण स्वतःवर बुद्धीवादी विज्ञानवादी अशी मोहर उमटवल्यानंतर या कृतिकारणांना नक्की कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं? उत्तर अवघड असलं तरी एक निश्चितपणे म्हणावसं वाटतं की या साऱ्या, जगण्याला आकार देणाऱ्या एक प्रकारच्या अॅक्टिव्हिटीज आहेत. त्यात एक कृतीशीलता आहे ज्यातून जीवनाचे सौंदर्य, माधुर्य कलात्मकता टिकवताना एक समाज भानही जपलं जातं. श्रद्धा, भक्ती, विश्वास या पलीकडे जाऊन या सोहळ्यांकडे तटस्थपणे पाहिलं तर मानवी जीवनाच्या संस्कार शाळेतले हे पुन्हा पुन्हा गिरवावेत, नव्याने अथवा पारंपरिक पद्धतीने पण हे एक सोपे सकारात्मक ऊर्जा देणारे महान धडेच आहेत.
एखाद्या घराला दारं-खिडक्या असणं जितकं महत्त्वाचं असतं तितकं माझ्यासाठी वाचन महत्त्वाचं आहे. मानवी बुद्धीच्या दार आणि खिडक्या जितक्या खुल्या असतील तितकं माणसाचं आकाश मोठं होतं. वाचनाचं हे दार उघडलं ना की एका वेगळ्याच विश्वात माझा प्रवेश होतो. तिथं मी आणि पुस्तक या दोघांचचं विश्व असतं. गंमत म्हणजे लेखक जसा लिहिताना त्याच्या लेखनाचा सम्राट असतो तसंच मीही वाचताना वैचारिक विश्वाचं एक सम्राटपण अनुभवत असते. लेखकाचं बोट सोडून हळूहळू कधी मी त्या कथेतील पात्राचं नायकत्व स्वीकारते ते मला कळतही नाही. आणि मग जगण्याचा पैल विस्तारायला लागतो. मी कधीही न गेलेल्या किंवा न जाऊ शकलेल्या प्रदेशात फिरून येते. बरं हे फिरण्याचे अनुभवही किती तऱ्हेतऱ्हेचे असतात. त्यामुळे काही गोष्टी आपोआप घडतात. आवडलेल्या पात्राबरोबर एक नातं जुळतं. आणि ते इतकं हृद्य असतं की माझ्या जगण्यातले प्रश्न भले अनुत्त्तरीत राहिले असतील पण त्या पात्राच्या जीवनातले प्रश्न मात्र माझ्याही नकळत मी सोडवण्याचा प्रयत्न करते.
स्वयंपाक करताना, काम करताना, इतकंच काय बाहेर जाताना देखील हे आवडीचं पात्रं मनात घर करून असतं. त्याचा विरह, त्याचा आनंद, त्याला मिळणारं यश, प्रसिद्धी, त्याची स्वप्नं, त्याच्या इच्छा, त्याच दुरावलेलं प्रेम, नाती आणि क्वचित सारं काही मिळून मोक्ष पदाला पोहोचलेला तो हे सगळं सगळं मी तन्मयतेनं अनुभवते. आणि त्यातल्या प्रसंगात, संवादात माझे अंतरीचे काही मिसळते. मग माझ्या वास्तव जीवनातल्या अनेक पोकळ्या त्या त्या समरसतेनं भरून निघतात. जगण्यातल्या अनेक शक्यता मला सापडतात. कुठतरी तुकड्या तुकड्यात विखुरलेले माझे क्षण, अपुऱ्या इच्छा, नव्यानं गवसू लागलेला जीवनाचा अर्थ मला दिसू लागतो. अनुभवाच्या संचितात भर पडते. आणि जाणवतं की सारं काही मिळणं म्हणजे जगणं किंवा परिपूर्णता नव्हे. क्वचित काही सोडून देणं, निसटून जाणं हे देखील आयुष्याला अर्थपूर्णता देणारं आहे. जीवनाची परिपूर्णता हा एक भास वाटतो. आयुष्याचं रोज नव्याने स्वागत करायला मी तयार होते.
शेवटी मुक्तता, आनंद म्हणजे काय. . घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करणं. . . कशाचंही ओझं न बाळगणं. . . हे सारं सारं वाचन मला देऊ करतं. . .
पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेल सर्जीकल वॉर्ड मधील एका बेडवरून एका आवाजाने माझे लक्ष वेधून घेतलं! वयाच्या सुमारे पन्नाशीत असलेला एक गृहस्थ बेडवरून उठण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच्या सोबत कुणी नव्हतं. त्याच्या डोक्यावरची पगडी तशी सैल पडली होती. अंगावरच्या शर्टची वरची बटणे तुटलेली, पँट गुडघ्यावर फाटलेली होती. एका हाताच्या मनगटावर स्टीलचं कडं होतं, त्याच्या वरच्या भागावर खरचटल्याच्या जखमा होत्या अगदी ताज्या. कोणत्याही शीख बांधवास साजेशी भक्कम देहयष्टी, पण डोळ्यांत खूप आर्जव आणि आवाजात कंप.
मी त्याला धरून स्वच्छतागृहापर्यंत नेले. . . “शर्माईगा नहीं!” मी त्याला सांगितले, त्याने माझ्याकडे भरल्या डोळ्यांनी एकदा पाहिलं. त्याला तिथून परत आणताना त्याच्या चेहऱ्यावर अगतिकतेचे भाव दाटून आले होते!
नाव विचारलं. . अडखळत उत्तर आलं. . “जी, गुरमित. . . गुरमित सिंग!”
सकाळी एका टेंपोवाल्याने त्याला वायसीएम मध्ये आणून इमर्जंसी मध्ये भरती केलं होतं. . . आणि तो भला माणूस निघून गेला होता.
गुरमितचं जवळचं असं कुणी नव्हतं इथं. पुण्याजवळच्या एका औद्योगिक वसाहतीत पोटासाठी कमवायला गुरमित आला होता, काही वर्षांपूर्वी. मराठी समजत होतं, पण बोलता येत नव्हतं. कारखान्यातील काम अंदाजे शिकला आणि आता सीएनसी मशीन व्यवस्थित ऑपरेट करू शकत होता. पंजाबातील एका शहरात जन्मलेल्या या साध्या शेतमजूर माणसाचं लग्न झालेलं होतं, पण पत्नी अकाली निवर्तली होती आणि मूल झालेलं नव्हतं. . . पुन्हा लग्न करायचं त्याच्या मनात कधी आलं नाही. पोटासाठी दिल्ली गाठली, भावाला बोलावून घेतलं, त्याला रोजगाराला लावून दिलं, उपनगरातल्या एका गरिबांच्या वस्तीत जागा मिळवून घर बांधून दिलं पण भावजय आली आणि याला दिल्ली सोडावी लागली. कारण गुरमित आजारी झाला. . . एका वाहनाने धडक दिल्याने पायात रॉड टाकला होता. . . त्याने सगळं आपलं आपण केलं. भावाला उपद्रव नको म्हणून खरडत, रखडत दूर मैदानात शरीरधर्मासाठी जाई. कमाई थांबली होती पण खाण्या पिण्याचे नखरे अजिबात नव्हते. बरे झाल्यावर मजुरीला जाण्याची वाट पाहत होताच. . . पण भावाला जड झाला थोड्याच दिवसांत.
आयुष्याला काही दिशा नव्हती. भावाच्या संसारात मन गुंतवत आयुष्य काढायचं मनात होतं. . आईबाप आधीच देवाघरी गेले होते. गावची शेती अगदी नगण्य. एका ट्रकमध्ये क्लिनर बनून पुण्यात आला. आरंभी मिळेल ते काम केलं आणि नंतर उपनगरात कुणाच्या तरी ओळखीने कारखान्यात हेल्पर झाला. कारखान्यात इतर राज्यातून मजुरीसाठी आलेल्या कामगार मुलांसोबत नाईलाजाने राहावे लागले छोट्या भाड्याच्या खोलीत. हा शीख, ते इतर कुणी. याचा स्वभाव तसा अबोल. व्यसन नाही त्यामुळे कुणाशी देणे घेणे व्यवहार नाही.
कोरोना आला आणि खोली रिकामी झाली. . . गुरमित कुठे जाणार? कारखान्याच्या शेड मध्येच मुक्काम आणि काम. नंतर जवळ एक खोली भाड्याने मिळाली. पैसे शिल्लक पडलेले होते थोडे. अडीअडचणीमध्ये उपयोगी पडावेत म्हणून बँकेत जपून ठेवले होते.
गुरमित टायफॉइडने आजारी झाला. असाच एका संध्याकाळी गोळ्या औषधं आणायला म्हणून गावात निघाला होता. . . रस्त्यावरच्या दगडाला पाय अडखळून पडला. . . तो नेमका उताणा. कमरेला मार बसला आणि त्याचं अंग, विशेषतः संपूर्ण उजवा भाग बधिर झाला आणि सतत थरथरू लागला!
आज गुरमित थरथरत्या देहाने बेडवर पडून होता. रुग्णालयातील सेवाभावी संस्थेच्या लोकांनी गुरमितला मदतीचा हात दिला. त्यावेळी ycm मध्ये सहा बेवारस रुग्ण होते!
संस्थेने गुरमित ची जेवणाची व्यवस्था केली, जेवणाचे पार्सल आणून ठेवले. गुरमितची अवस्था तशी बरी वाटत नव्हती. विविध तपासण्या झाल्या. . रिपोर्ट यायचे होते.
गुरमितने डाव्या हाताने जेवणाच्या प्लास्टिक पिशवीची गाठ कशीबशी सोडवली, भाजी प्लेटमध्ये ओतली. . . उजवा हात आणि आता पायही थरथरू लागले होते. कसाबसा एक घास त्याने तोंडपर्यंत नेला. . . पण त्याला वेळ लागत होता. मी त्याच्या पोळीचा एक तुकडा तोडला, भाजीत बुडविला आणि त्याच्या मुखात घातला. . . . त्याने माझ्याकडे पाहिले. . . “मैं खा लूंगा प्राजी!” तो म्हणाला. . . मी म्हणालो” रहने दो. . . आराम से खाना”
आणखी तीन घास तोंडात घातल्यावर मात्र त्याने मला थांबायला सांगितले. . . संकोच होत होता त्याला. . . एवढा मोठा माणूस लहान मुलासारखा दुसऱ्याच्या हातून जेवतो आहे. . . त्याला कसं तरी वाटत असावं!
वॉर्डातील इतर रुग्णांचे नातेवाईक आणि नर्स आणि वॉर्डबॉय, मामा सुद्धा गुरमितला पाहून हळहळत होते!
दुपारी गुरमित सीरियस झाला! त्याला श्वास घेता येईना! डॉक्टरांनी धावपळ करून त्याला ऑक्सीजन लावला तिथेच. आय सी यू मध्ये बेड उपलब्ध नव्हता त्यावेळी. मग सर्व यंत्रे तिथेच आणून लावली. गुरमित घामाघूम झाला होता. . . . चार तास त्याने दम काढला. . . “लकवा मार गया क्या मुझे?” तो विचारू लागला. एकटा माणूस, अर्धांगवायू म्हणजे काय ते त्याला ठाऊक होते. . . आयुष्यभर परावलंबित्व!
मी त्याचा मोबाईल मागितला. . त्यात अगदी मोजकेच नंबर. छोटू म्हणून एक नंबर सेव्ह होता. . . “वो हमारे लिये मर गया”. . . . त्या भावाने मला उत्तर दिले. . फोन बंद!
एका सेवाभावी संस्थेविषयी गुरमितला वरवर माहिती होती, त्याने सांगितलेल्या गोष्टींवरून मी इंटरनेटवर अंदाजे शोध घेतला. दिल्लीतील एका संस्थेचे नाव, फोटो दिसले. गुरमितने त्या व्यक्तीला ओळखले. . . “उनसे बात करावो”. . . त्याने विनंती केली! पुढे पंजाबी भाषेत झालेल्या संवादात एवढेच समजले की. . ती संस्था फक्त रस्त्यावर बेवारस सापडलेल्या मानसिक रुग्णांवर मोफत उपचार करते!
“ऐसी हालत में जी के मैं क्या करुंगा?” गुरमित त्यांना विचारत राहिला. “प्राजी. . . . मेरी कुछ मदद करो. . बडी मेहरबानी होग्गी”. . . पण पलीकडून सोरी जी. . . एवढंच ऐकू आलं. “आप पुना में ही किसी से बात करो!”
काहीवेळाने गुरमित ची अवस्था आणखी बिघडली. पण तेवढ्यात आय सी यू मध्ये एक बेड उपलब्ध झाला. . . सर्वांनी मिळून गुरमितला स्ट्रेचरवर चढवले आणि त्या वॉर्ड मध्ये नेले!
थोड्यावेळाने समजले. . . सरदारजी सीरियस झाला आणखी. अंतर्गत रक्तस्राव झालाय. . . अवघड आहे! वॉर्डातील लोक हे ऐकून चुकचुकले!
आय सी यू मधील अत्यवस्थ रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ गुरमित पहात होता. . . त्याला त्याचा एकाकीपणा अधिकच टोचू लागला असावा. . . रुग्णाची जगण्याची इच्छा संपली की औषधे उपयोगाची नसतात!
रात्री गुरमित गेला! अशी अफवा पसरली. . . पण लगेच विरून गेली! कोणतेही रक्ताचे नाते नसलेले लोक क्षणभर मनातून हलले होते. . . सिस्टर आणि कर्मचारी त्यांना अशा बाबींची सवय असली तरी त्यांचे चेहरे बदलून गेले होते. . . . पण सरदार अभी जिंदा है! अशी पक्की बातमी आली आणि सर्वांनी दीर्घ निःश्वास टाकले. . . चला, या मरणाच्या खोट्या बातमीने बिचाऱ्याचे आयुष्य वाढू दे. . . एका मावशींनी देवाला हात जोडून म्हटले!
तीन आठवडे झाले. . . आज अचानक गुरमित जनरल वॉर्ड मध्ये पाय मोकळे करण्यासाठी हळूहळू फिरताना दिसला! अर्धांगवायूने त्याला बरीच सवलत दिली होती. . . उजवा हात अजुनही काहीसा बधीर होता, नीट चालता येत नव्हते. . . पण चालता येत होते हे महत्वाचे! डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, मामा, मावश्या सगळे या तगड्या पण निरागस माणसाला काही कमी पडू देत नव्हते!
गुरमितने मला पाहिले आणि त्याचा चेहरा उजळला. . . त्याने नुकतेच त्याचे लांब केस धुतले होते आणि तो पगडी बांधण्याच्या तयारीत होता! त्याने मला मिठी मारली!
“कुछ खावोगे?” मी विचारले. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. ” नहीं, भाईसाब! खाना आताही होगा! ” तो संकोचून म्हणाला!
“पनीर रोटी?” मी म्हणालो तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. . . गावाकडे असताना आईच्या हातची रोटी त्याला आठवली असावी. . . ट्रक वर असताना ढाब्यावर बाजेवर बसून खाल्लेली पनीर रोटी, दाल तडका त्याला नजरेसमोर दिसला असावा!
“पंजाबी हो. . . पनीर रोटी बिना खाना फिका फिका लगा होगा पिछले महिनाभर!”
मी पार्सलची पिशवी त्याच्या हातात दिली. . . . गुरमित ने माझा हात हाती घेतला. . . . आणि त्याच्या चेहऱ्यावर मला सारा पंजाब हसताना दिसला!
मी म्हणालो. . . सत् श्री अकाल. . . गुरमित म्हणाला. . जय महाराष्ट्र!
☆ या प्रकारची औषधे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
या प्रकारची औषधे जगातील कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध नाहीत आणि भविष्यातही मिळणार नाहीत. जर तुम्ही ही औषधे नीट वाचून समजून घेतलीत आणि तुमच्या जीवनात अंमलात आणलीत, तर तुम्हाला बाकीसाठी कोणत्याही गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.
लवकर झोपणे आणि लवकर उठणे हे औषध आहे.
ॐ कारचा आवाज हे औषध आहे.
योग प्राणायाम आणि व्यायाम हे औषध आहेत.
सकाळी आणि संध्याकाळी चालणे हे देखील औषध आहे.
उपवास हा सर्व रोगांवर उपाय आहे.
सूर्यप्रकाशदेखील औषध आहे.
माठातील पाणी पिणे हेदेखील औषध आहे.
शिस्तबद्ध टाळ्या वाजवणे हेदेखील औषध आहे.
अन्न भरपूर चघळणे हे औषध आहे.
अन्नाप्रमाणे पाणी चघळणे आणि पिणे हे देखील औषध आहे.
जेवल्यानंतर वज्रासनात बसणे हे औषध आहे.
आनंदी राहण्याचा निर्णयदेखील औषध आहे.
कधीकधी मौन हे औषध असते.
हास्य आणि विनोद हे औषध आहेत.
समाधान हेदेखील औषध आहे.
मनाची आणि शरीराची शांती हे औषध आहे.
मनातील सकारात्मकता हे औषध आहे.
निस्वार्थी प्रेम, भावनादेखील औषध आहे.
सर्वांचे भले करणे हेदेखील औषध आहे.
कोणाचा तरी आशीर्वाद मिळेल असे करणे हे औषध आहे.
सर्वांसोबत राहणे हे औषध आहे.
कुटुंबासोबत खाणे आणि जोडले जाणे हे देखील औषध आहे.
तुमचा प्रत्येक सच्चा आणि चांगला मित्रसुद्धा पैशाशिवाय एक संपूर्ण मेडिकल स्टोअर आहे.
मस्त राहा, व्यस्त राहा, निरोगी राहा आणि आनंदी राहा. हेदेखील एक औषध आहे.
प्रत्येक नवीन दिवसाचा पुरेपूर आनंद घ्या. हेदेखील एक औषध आहे.
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही सर्व औषधे अगदी मोफत उपलब्ध आहेत आणि ती सर्व कशी आणि कुठे मिळतील याची कल्पना आली की, त्याची अंमलबजावणी करणे हेदेखील औषधासारखेच असते!
निसर्गावर विश्वास ठेवा.
निसर्ग हा सर्वोत्तम उपचार करणारा आहे.
लेखक: अज्ञात
प्रस्तुती:सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आजपासून दिवाळीचा सण सुरू होतो आहे. गेल्या सात-आठ महिन्यातील सणांप्रमाणे दिवाळी सणावर सुध्दा करोनाच्या साथीचे सावट आहे. उत्सवाला धास्तीची किनार आहे. पण सर्व नियम पाळत, स्वच्छता राखत, अगदी साधेपणाने आपण हा सण साजरा करणार आहोत. सामाजिक अंतर राखत पण मनामनातलं अंतर कमी करत नाती जास्त सुदृढ करणार आहोत. कारण प्रत्येक सणाचे हेच तर प्रयोजन असते. हा तर ‘दिवाळीचा सण’
दिवाळी हा फक्त एकच उत्सव नाही बरं का ! तर हे उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. हा फक्त एकाच देवतेचा उत्सव नसून तो लोकव्यवहाराशी जास्ती जोडलेला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकाशाचा उत्सव, नात्यांचा उत्सव, लक्ष्मीचा उत्सव, निसर्गाचा उत्सव, विजयाचा उत्सव असे अनेकरंगी पदर असणारा उत्सव आहे.
अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असे सहा दिवस हा उत्सव साजरा होतो. त्यातला पहिला दिवस म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’. यालाच “वसुबारस ” असेही म्हणतात. आपल्या संस्कृतीत गाय फार पवित्र मानली जाते. लक्ष्मीच्या अंशापासून उत्पन्न झालेली सवत्स धेनु म्हणजे ” सुरभि “. हीच गोमातांची अधिदेवता आहे. दिवाळीत हिचे पूजन केले जाते. एरवी सुद्धा ‘ गो-ग्रास ‘ म्हणून पोळी-भाताचा नैवेद्य काढून ठेवला जातो. वसुबारस तर काय गायींचाच उत्सव त्यामुळे या दिवशी तिचे विशेष कौतुक होते.
यानिमित्ताने प्राण्यांचे रक्षण करणे, निसर्गाच्या प्रती ऋण व्यक्त करणे हा मुख्य संदेश दिलेला आहे. हाच या सणामागचा मुख्य उद्देश आहे. अनेक उपकारक प्राण्यांचे ऋण आपण व्यक्त करतो, त्यातलाच हा एक दिवस. या दिवशी गायींचा गोठा स्वच्छ करून रंगवतात. तिथे पणत्या लावतात. मुख्य म्हणजे गायींना ओवाळून नैवेद्य देतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. ग्रामीण भागात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गायीसमोर गाणी म्हटली जातात. गाण्यांमधून गाईच्या गुणांचे, शेतीच्या कामांचे वर्णन केलेले असते. या गाण्यांमधून एकमेकांना कोडी घालण्याचा खेळ खेळला जातो.
कृतज्ञता व्यक्त करणे हा आपल्या भारतीय संस्कृतीचा स्थायीभाव आहे. वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने निसर्गाचे पूजन करून त्याच्या प्रती ऋण व्यक्त केले जाते. आपला देश हा कृषिप्रधान देश आहे आपल्या संस्कृतीत गाई-वासरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या निसर्गातील प्राणिमात्रांचे रक्षण केले पाहिजे. कोणत्याही कारणाने, कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवायची नाही. ध्वनी-वायू प्रदूषण रोखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण, संवर्धन केलं पाहिजे. हा संदेश या सणातून घ्यायचा आहे. निसर्ग संवर्धन मोहीम, वसुंधरा महोत्सव या अभियानांचे हेच उद्दिष्ट आहे. ” निसर्ग धरतीचे लेणे हो ! त्यांचे रक्षण करणे हो !!” हे कायम स्मरणात ठेवायला हवे.
तेव्हा या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गाच्या जास्ती जवळ जाऊया. त्याच्याशी आपले नाते पुन्हा घट्ट करूया. दिवाळीची सुरुवात आनंदाची करूया.
☆ चांदण्या रात्रीतले ते स्वप्न… ☆ सुश्री सुलभा तेरणीकर☆
कवितेतून, गाण्यांतून नेहमी भेटणाऱ्या चांदण्यांची स्वप्नसृष्टी हलकेच कधी मावळली, ते कळलेच नाही. इतक्या वर्षांत जी स्थलांतरे झाली, स्थित्यंतरे झाली; त्यात तारकांकित आभाळाचे छत्र माथ्यावरून ढळल्याचे समजलेच नाही…..
‘निळ्या नभातून नील चांदणे निथळे मार्गावरी,
स्वप्नरथातून तुज भेटाया आले तव मंदिरी।’
… माणिक वर्मांच्या गाण्यातल्या नील चांदण्याने मन कसे भरून जाई. तर, ‘नक्षत्रांचे देणे’ देणाऱ्या आरती प्रभूंची जीवघेणी भाषा ओढ लावत असे……
‘नक्षत्रांनी गोंधळलेल्या
काळोखातून सौम्य आभाळी
तिचे डोळे.
ती स्वतःच त्या डोळ्यांतील,
किंचित ओले निसर्गचित्र… ‘
तर, साहिरच्या ‘परछाईयाँ’ मध्ये –
‘ जवान रात के सीनेपे दूधिया आँचल ‘ अशी ओळ वाचून वेड लागत असे.
भा. रा. तांब्यांच्या कवितेत तर ‘ रमणिसंगमा हृदयी उत्सुक, जाई अष्टमीकुमुदनायक ‘ अशा अद्भुत नावाची ऐट घेऊन चंद्र येत असे.
ना. धों महानोरांच्या कवितेत-….
‘ये गं ये गं सये, अशी नजिक पहा ना,
आभाळीचा चंद्र घरी येणार पाहुणा… ‘
किंवा … ‘ क्षितिज वाटेत सांडल्या चांदण्या होऊन सोनफुलोरा ‘ अशा कल्पनेने चांदण्यांचे मोहिनीजाल मनावर पसरत असे.
‘चाँदनी रातें, प्यार की बातें’….. चित्रपटांच्या अशा गाण्यांतून चंद्र-चांदणे तर अक्षरशः बरसत असे; मग चांदण्यांची ही ओढणी आपल्यावरून कुणी ओढून घेतली ?
शांत, सुशीतल हवा, शरद ऋतूमधली पूर्ण चंद्राची रात्र असे काही अनेक निरीक्षणांतून, ऋतुचक्रातून शोधून चांदण्यांचा उत्सव, उपवनातून, प्रमोद उद्यानातून, घराच्या अंगणात, गच्चीवर एकत्र जमून करणाऱ्या पूर्वजांच्या काही खुणा तर आपण जपत होतो. साहित्यातून, कलेतून, काव्यातून त्यांची प्रतिबिंबे न्याहाळत होतो. थोडे कवडसे शोधीत होतो.
ज्या ऐसपैस अंगणात खेळायला यायचे; ती गच्ची, अंगण आपणच तर मोडले ना… ?
ज्या तळ्यात चांदणे पसरत असे, त्या तळ्याच्या जलस्रोतांवर इमले उभे केले ना !
ज्या बागांतून, उपवन-उद्यानांतून चंद्रफुले टपटपत ती बागच सुकली ना देखभालीशिवाय?
चांदण्याला, पाण्याला, वाऱ्याला खेळण्यासाठी दुसरी जागा ठेवली का?
मग चांदण्याची रात्रीची स्वप्ने विझणार नाहीत, तर काय होईल……. असा विचार छळत असतो.
कालक्रमाने हे मोडणे, पुन्हा मांडणे सुरू असतेच; पण या परिवर्तनचक्रात निसर्गाशी नाते तोडून टाकण्याचा अविचार कशासाठी?
सुप्रसिद्ध निसर्गलेखक मारुती चितमपल्लींच्या ‘ रानवाटा ‘ पुस्तकात ‘ रानातील घरं ‘ या एका अप्रतिम लेखात ते लिहितात— “ एकदा लिंबाच्या पानोळ्यातून घरट्यावर शुक्राचा तारा चमकताना दिसला. तिकडे मी पाहत होतो, स्वतःचे देहभान हरपून. कुठल्या तरी अज्ञात शक्तीने सारे हृदय हेलावून निघाले. त्या सौंदर्याच्या बोधाने मी पुलकित झालो…” —- किंवा —- “ रात्री इतर झाडांखाली आपल्याला थांबावेसे वाटणार नाही; पण लिंबाची झाडे त्याला अपवाद आहेत. चांदण्या रात्री तर त्या झाडांना अभूतपूर्व सौंदर्य प्राप्त होते, ते देखील नवीन असते. त्या झाडाखाली मला सदैव प्रसन्न वाटते. पानांमधून जमिनीवर पडलेल्या चांदण्यांच्या कवडशांची चंद्रफुले गोळा करायचा खेळ आम्ही मुले खेळत असू…”
चांदण्यांचे साहित्यात पडलेले असे प्रतिबिंब न्याहाळताना तनामनावर सुखाची शिरशिरी येते. देहभान हरपून जावे, असा शुक्रतारा आता मूठभर आकाशात कुठे पाहायचा… ? शहरात नित्य असणारी दिवाळी, पौर्णिमेच्या दिवसाचा विसर पाडते. शहरातले दिवे तर अंधाराची कहाणी सांगतात; बकालपणाची, अस्वच्छपणाची, न संपणारी कहाणी.
पूर्वी पदोपदी भेटणाऱ्या गाण्यांतल्या चांदण्याला कशी नीज आलेली असते !
‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ‘.. किंवा.. ‘ दूरदूर तारकांत बैसली पहाट न्हात ‘ या ओळीने चांदणे आळसावून उठते.
‘चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा
मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा… ‘
आता तर चांदण्यांना जाग येते. अंगण, गच्ची, तळे, बाग नसले; तरी मनात ते हलकेच उतरते. ज्ञानदेवांची शारदीय चंद्रकला प्रकटते. चांदण्यांच्या चाहुलीने ती चंद्रकला कविता लपेटून घेते. त्याच्या आठवाने मनात अतीव सुख दाटून येते…
“सर, तुमच्याकडे जरा काम होतं. घरी कधी भेटता येईल?” माझ्या चांगल्या परिचयाचे एक इंटिरियर डिझायनर आहेत. आमच्या घरची पुस्तकांची कपाटं त्यांनीच डिझाईन केली आहेत. त्यांचा फोन आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी भेटलो. ते म्हणाले, “सर, मला तुमची मदत पाहिजे. माझे एक क्लायंट आहेत. त्यांना तुमची पर्सनल लायब्ररी दाखवायची आहे. तुम्हाला चालेल का?”
“पुस्तकं उसनी मागणार नसतील तर चालेल. ” मी सांगून टाकलं.
पुस्तकांच्या बाबतीतला मुखदुर्बळपणा किंवा भिडस्तपणा मी आता आवरता घेतला आहे. “जरा वाचायला नेतो आणि परत आणून देतो” असं शपथेवर सांगणारे लोकसुध्दा नंतर पुन्हा उगवत नाहीत, हा अनुभव मी शेकडो वेळा घेतला, अनेक उत्तमोत्तम दुर्मिळ पुस्तकं गमावली आणि स्वतःचं नुकसान करुन घेतलं आहे. त्यामुळं, कुणी पुस्तक मागितलं की मी स्पष्ट नकार देतो.
दोन दिवसांनी एका चौकोनी कुटुंबाला घेऊन ते घरी आले. त्यांनी सगळी लायब्ररी पाहिली आणि मला विचारलं, “सर, एखाद्या चांगल्या मराठी घरात कोणकोणती पुस्तकं असावीत, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? आम्ही यादी लिहून घेतो. ” ते क्लायंट गृहस्थ म्हणाले.
“माझं घर हे सुध्दा एक चांगलं मराठी घरच आहे. माणसानं अवश्य वाचावीत अशी हजारों पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. त्यांची आम्हीं वयोगटानुसार यादी केली आहे. ती दाखवतो. ” असं सांगत मी त्यांना यादी दाखवली. त्यांनी फोटो काढून घेतले. आणि चमत्कारिक प्रश्न सुरु झाले –
“फास्टर फेणे की हॅरी पॉटर? तुम्ही काय सजेस्ट कराल?”
“तरला दलाल, संजीव कपूर की रुचिरा?”
“मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी यांच्याशिवाय आणखी ऐतिहासिक पुस्तकं कोणती असावीत?”
“पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे संपूर्ण सेट घेतले तर स्वस्त पडतात का? असे अजून कुणाकुणाचे सेट्स आहेत?”
मी चक्रावून गेलो. त्यांचा मुलगा आणि मुलगी माझ्या लिस्ट मधून “फेमस बुक्स” शोधत होते आणि नावं सापडली की त्या पुस्तकांचे फोटो काढून घेण्यात गुंतले होते. काहीच उमगत नव्हतं. दोन अडीच तासांनी ते सगळे गेले.
साधारण दीड महिन्याने पुन्हा त्यांचा फोन आला. “सर, आम्हीं मागच्या आठवड्यात तुमच्याकडे लायब्ररी बघायला आलो होतो. ”
“बोला”
“तुम्ही आमची लायब्ररी बघायला आमच्या घरी याल का?” त्यांनी विचारलं.
“म्हणजे?”
“म्हणजे तुमची लायब्ररी बघितल्यानंतर आम्हीं आमची पण तशीच लायब्ररी तयार केली आहे. तुम्ही एकदा पाहायला आलात तर फार बरं होईल. ”
“बघतो, प्रयत्न करतो” असं म्हणून मी वेळ मारुन नेली खरी. पण चार पाच दिवस त्यांचें वेळीअवेळी सारखेच फोन यायला लागले. शेवटी रविवारी त्यांच्याकडे गेलो.
प्रशस्त मोठा फ्लॅट होता. अगदी नवा कोरा. बहुतेक ते राहतं घर नव्हतं. काम सुरु होतं. त्यांनी हॉल दाखवला. सेम टू सेम बुक केस, आणि त्यात सेम पुस्तकं.. जवळपास दीड-दोनशे पुस्तकं असतील.
“सर, आतमधून एलईडी लायटिंग केलं आहे, त्याला डीमर बसवला आहे. खास टफन ग्लासचे शेल्फ बसवले आहेत. आणि लाकूड सगळं सागवानच वापरलं आहे. तुम्ही वेगळ्या अर्थानं घेऊ नका, पण तुमच्यापेक्षा भारी मटेरियल वापरलं आहे. ” ते भडाभडा सांगत होते. मी ऐकत होतो.
पाडगावकरांची बोलगाणी स्टीलच्या कपाटात ठेवली काय किंवा उंची फर्निचरमध्ये ठेवली काय, त्यातला आस्वाद बदलणार आहे का? शो केसमध्ये पॉश पोझिशनमध्ये लावल्याशिवाय पु. लं च्या पुस्तकांतून विनोदच खुलत नाही, असं कुठं असतं? पुस्तकं आपल्याला त्यांच्या अंतरंगात रमवण्यासाठी असतात. आपण त्यातून शिकतो, अंतर्मुख होतो, त्यांच्याशी जोडले जातो, प्रभावित होतो. कधी ती हसवतात, कधी रडवतात, कधी प्रेरणा देतात, कधी शहाणपण शिकवतात. पण हे सगळं त्या पुस्तकातल्या आशयावर अवलंबून असतं, पुस्तकं जिथं ठेवतो त्या फर्निचरवर अवलंबून नसतं.
“सर, हा डेस्क बघा. ह्यात काय केलंय, ते आत एक गोल खाच पाडली आहे. त्या खाचेत एक कॉफीमग बरोबर बसतो. म्हणजे वाचताना कॉफी घेऊन बसलं तरी प्रॉब्लेम नाही. कप हिंदकळण्याचा प्रश्नच नाही. ” त्यांनी ते छोटं डेस्क दाखवलं.
तेवढ्यात त्यांच्या मुलीनं दाखवलं, “सर, या अँगलनं इथं खुर्चीत पुस्तक घेऊन बसलं की, फोटो पण परफेक्ट येतो. पुस्तक वाचतानाच्या फोटोंना सोशल मीडियावर ऑल टाईम डिमांड.. “
मी त्या इंटिरियर डिझायनरकडं पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरून अभिमान अगदी ओसंडून वाहत होता.
थोड्या वेळानं मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो, घरी आलो. संध्याकाळी ते इंटिरियर डिझायनर माझ्या घरी पुन्हा हजर..
“सर, तुम्ही पुस्तकांविषयी एवढं गाईड केलं, वेळ दिला, स्वतः साईट व्हिजिट केली. तुमची फी सांगा ना. ”
“कसली फी? कुठली साईट व्हिजिट ?”
“सर, पुढच्या महिन्यात त्या घराचा गृहप्रवेश आहे. ‘एकदम सुसंस्कृत घर’ अशी थीम धरुनच इंटिरियर केलं आहे. त्यांच्यातले कुणीही ही पुस्तकं वाचणारच नाहियत. घरातली माणसं पुस्तकं वाचतात, असा फील देण्यासाठी मोठी बुक केस आणि त्यात ठेवलेली पुस्तकं हा डिझाईन चा भाग आहे. म्हणून तर तुमचा स्पेशल गायडन्स घेतला आणि त्याचे स्पेशल चार्जेस सुद्धा मी क्लायंटच्या बिलात लावलेत. तुम्ही सांगितलेली पुस्तकं मीच खरेदी केली आणि आणून लावली. आता गृहप्रवेशाच्या वेळी सगळ्यांना बघायला मिळेल ना, म्हणून साईट कंप्लीट करुन दिली. ” त्यांनी सरळ सांगून टाकलं.
“सर, घरात पुस्तकं असणं चांगलं असतं, येणाऱ्या लोकांवर इम्प्रेशन पडतं, असं क्लायंटचं म्हणणं होतं. ते म्हणाले, ‘उत्तम बुक केस डिझाईन करा आणि पुस्तकं पण तुम्हीच आणून फिट करा’, त्यानुसार मी तुमचं गायडन्स घेऊन काम केलं. ”
आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नोकरीसाठी बायोडेटा किंवा लग्नाळू मुलामुलींची प्रोफाईल्स वाचताना ‘आवडी निवडी’ असं शीर्षक दिसलं की, हमखास दिसणारी पहिली आवड म्हणजे वाचन.. खरोखरच आवड असो किंवा नसो, सहज खपून जाण्याजोगं एकमेव उत्तर म्हणजे वाचन.. ! त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण मी आत्ता प्रत्यक्ष अनुभवत होतो.
मग त्या घरमालकांच्या संवादातली एकेक गोष्ट उलगडायला लागली. उंची सागवान, एलईडी दिवे, टफन ग्लास, प्रोफाईल डोअर्स, फोटो येईल अशी चेअर सेटिंग… या सगळ्या गोष्टींची लिंक लागली.
आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं आणि खरं सांगायचं तर कीव आली. पैसा ओतून सुसंस्कृत किंवा अभ्यासू असण्याचा आभास निर्माण करण्याचा जो रोग माणसाला जडतोय ना, त्याचं वर्णन चोखोबांनी शेकडो वर्षांपूर्वीच करुन ठेवलंय. “काय भुललासी वरलिया रंगा” असा त्यांचा अभंग जगद्विख्यात आहे.
पूर्वी “तो मी नव्हेच” असं दाखवण्यासाठी माणसं धडपड करायची. आता “असा मी असामी” असा आभास निर्माण करण्यासाठी धडपडतायत, याचं हे एक नवं उदाहरण अनुभवायला मिळालं. आपलं बाह्य रूप विकत घेता येतं, तशी आपली प्रतिमासुध्दा विकत घेण्याचा उद्योग कुठल्या स्तरावर गेला आहे, हे पाहिल्यावर मन ढवळून निघालं. रोज एक पुस्तक धरुन त्या बुक केससमोर खुर्चीत बसायचं आणि फोटो काढून सोशल मीडियावर पोष्टायचा, म्हणजे इमेज क्रिएट होईल ? वा रे लॉजिक.. !
“थ्री इडियट्स” मधला श्यामलदास छांछड आठवतो का? “वाट्टेल ते करा, पण या पोराला माझ्या मुलाच्या नावानं इंजिनियर करा. माझ्या मुलाच्या नावाची इंजिनिअरिंगची डिग्री या भिंतीवर लागली पाहिजे” असा दम देणारा श्रीमंत माणूस आठवला? तीन तासांच्या संपूर्ण सिनेमात हा तीस सेकंदांचा सीन आपण विसरुन जातो. पण वाट्टेल ते करुन स्वतःची प्रतिमा विकत घेण्याच्या मागं लागलेली माणसं सोशल मीडियाचं प्रस्थ वाढायला लागलं, तशी वाढतच चालली आहेत.
लोकांमध्ये, समाजात आपली ईमेज भव्यदिव्य दिसावी म्हणून लोकं काय काय करतात, याचे काही विचित्र नमुने पाहिले तर, कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येते. “मी अमुक अमुक दुकानातूनच भाजी घेते, अमुक अमुक ठिकाणाहूनच आंबे घेते”, इथपासून ते “अमुक अमुक देवालाच मी दर चतुर्थीला जातो” इथपर्यंत सगळ्या जगाला अभिमानानं सांगणारे कितीतरी लोक तुम्हाला दिसतील. “एकवीस हजार रुपये भरुन तिकीट काढून तिरुपतीचं स्पेशल दर्शन घेऊन आलो” असंही सांगणारे लोक आहेत आणि “दरवर्षी काहीही न खाता पिता एकवीस तास रांगेत उभारुन दर्शन घेतो” असंही सांगणारे लोक आहेत.
“आम्हीं अमुक ठिकाणचाच वडापाव खातो”, “मला तर दुसरी कुठली भेळ आवडतच नाही”, “मी एसी शिवाय तर प्रवासच करत नाही”, “मी आणि लाल डब्यातनं प्रवास? बापजन्मात शक्य नाही”, ” रेग्युलर ब्लड शुगर लेव्हल चेक करायला सुद्धा मी तिथं जात नाही, माणूसच घरी बोलावतो. त्याला सांगतो, शंभर रुपये जास्त घे पण तिथं बोलावू नकोस, मला जमणार नाही” असले अनेक तोरे मिरवणारे कितीतरी जण आहेत.
आपल्या गळ्यातली सोनसाखळी मुद्दाम दिसावी असा शर्ट घालणारी जशी माणसं आहेत, तशीच अमुक एखाद्या ग्रंथालयाची मेंबरशिप नुसतीच घेऊन ठेवणारीसुद्धा माणसं आहेत. त्यांना वाचनाचा छंद नसतो पण आपल्या गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेचा मी सभासद आहे, हे सगळ्यांना सांगण्यातच त्यांना खरा रस असतो.
मध्यंतरी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचे पाय धुवायचे आणि पाय धुताना, फुलं वाहताना ढसाढसा रडतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर फिरवायचे, ही एक जबरदस्त ‘तथाकथित इमोशनल’ क्रेझ निर्माण झाली होती. अशी गुरुपूजनं गल्लोगल्लीचे फ्लेक्सजिवी करत सुटले होते. आनंदाच्या क्षणी ओक्साबोक्शी का रडायचं? याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही.
मी जसा आहे तसं दाखवणं कठीणच आहे, माझी ईमेज बिघडेल. म्हणून मग खोटी बेगडी ईमेज पैशाच्या जोरावर विकत घ्यायची, हा रोग बळावतोय. मग ते कपडे असोत, महागड्या वस्तू असोत किंवा मोठाली कर्जं काढून घेतलेल्या गोष्टी असोत.. पण आता छंद आणि आवडी निवडीसुध्दा विकत घेण्यापर्यंत माणसं पोचली ? आणि त्या ईमेज बिल्डिंग साठीसुध्दा स्पेशल कन्सल्टिंग सुरु झालंय? हे लोकांना आणखी खड्ड्यात घालणारं ठरेल.
छंद आणि व्यासंग हे आपल्या व्यक्तीमत्वाच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी असतात. आपलं व्यक्तिमत्त्व उत्तम व्हावं, चांगल्या गुणांचा विकास व्हावा, समाजात आपलं चांगलं स्थान निर्माण व्हावं, अशी इच्छा असणं मुळीच गैर नाही. पण त्यासाठी स्वतःला घडवावं लागतं आणि तसं घडण्यासाठी फार मनापासून, सातत्यानं कष्ट घ्यावे लागतात. ते विकत घेता येत नाही.
स्वतःची ईमेज बिल्ड व्हावी म्हणून कोणत्याही संतवर्यांनी साहित्य निर्मिती केली नाही. जगाला दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी काही केलं नाही. अतिशय साधं, संतुलित, प्रामाणिक आणि समाज प्रबोधनाला वाहिलेलं आयुष्य अशीच त्यांची जीवनपद्धती होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनसुद्धा त्यापासून सतत दूर राहणारी कित्येक माणसं असतात. वास्तविक त्यांच्याकडं ज्ञान असतं, वकूब असतो, यश असतं, कौशल्य असतं, पण तरीही ते त्याचं भांडवल करत नाहीत. स्वतःच्या यशाविषयी स्वतःहून एक अक्षर सांगत नाहीत, पुढं पुढं करत नाहीत, स्वतःचं प्रस्थ तयार करत नाहीत आणि लोकांनाही स्वतःविषयी असलं काही करु देत नाहीत. हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा आणि त्यांच्याकडून आवर्जून घेण्यासारखा सद्गुण असतो.
डॉ. कलाम, स्व. बाबा आमटे, स्व. दाजीकाका गाडगीळ, स्व. श्रीनिवास खळे, उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, अत्यंत साधी राहणी असणारे स्व. मनोहर पर्रीकर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. ही माणसं त्यांच्या अंगच्या गुणांमुळेच लोकांसाठी प्रेरणास्थान बनली, आदर्श बनली. आदर्श होण्यासाठी म्हणून त्यांनी हेतुपूर्वक काही केलं नाही. स्वतःचं प्रस्थ तयार करणं त्यांना अशक्य नव्हतं. पण त्यांनी तो मार्ग जाणीवपूर्वक टाळला.
जसजशी आपली सोशल अकाउंट्स तयार झाली, तसतशी आपली इतरांना दाखवण्याची धडपड सुरू झाली. राहणीमान जगाला दाखवण्याचा पायंडा पडला. खरंखुरं जगण्यापेक्षा नसलेलं दाखवण्याची इच्छा मनात कायमची मुक्कामालाच येऊन राहिली. आणि तीच कृत्रिमता आता गळ्यापर्यंत आली आहे.
लोकांचे डोळे दिपवून टाकून मिळवलेला आनंद किंवा प्रतिष्ठा कशी आणि कितपत टिकेल ? आणि त्यासाठीच सतत जगत राहिलो तर खरं समाधान तरी कुठून मिळणार? खरं समाधान प्रत्यक्ष जगण्यातूनच मिळवायचं की केवळ त्याच्या आभासातच जगत राहायचं, हे आता आपणच ठरवायला हवं.
लोकांवर सतत इम्प्रेशन मारत बसण्याचा शौक कितीही गोड वाटत असला तरीही नंतर त्याची ओझी झेपण्यापलीकडं जातात. आणि ते नाटक फसलं की, खोटेपणा उघडा पडतोच. म्हणूनच, कृत्रिमतेच्या स्टिरॉइड्सचे न परवडणारे साईड इफेक्ट्स टाळायचे असतील तर, जगण्याचं हे शहाणपण जितक्या लवकर आत्मसात होईल, तितकं उत्तम.
☆ “शौर्यसूर्यांवरील डाग !”☆ श्री संभाजी बबन गायके☆
मेजर शैतान सिंग
ही तर आपली खरी पितरे !!!!!!
अगदीच विपरीत परिस्थिती होती. इथले हवामान अगदीच नवीन. या हवामानाशी जुळवून घ्यायला कित्येक महिने लागू शकतात.. आणि या १२४ बहादूर जवानांना इथे पाठवले जाऊन केवळ काहीच दिवस झालेले आहेत. उभ्या आयुष्यात कधी बर्फाचे डोंगर पाहिलेले नाहीत, पावसासारखा बर्फ पडताना पाहिला आणि अनुभवलेला नाही. थंडी या शब्दाचा अर्थ या आधी कधी समजला नव्हता तो आता समजू लागलेला आहे. कपभर पाणी उकळायला काही तास लागताहेत. पायांतले बूट सर्वसाधारण हवामानासाठी बनवलेले. बोटे उघडी राहिली तर गळून जाण्याची शक्यता. तंबूही तसेच…. अगदी साधे.
.३०३ (point three-not-three) रायफली.. एक गोळी झाडल्यावर दुसरी गोळी झाडण्याआधी ती रायफल परत कॉक करावी लागे…. म्हणजे पुढची गोळी झाडायला रायफल तयार करावी लागे…. मिनिटाला फार तर वीस-तीस गोळ्या या रायफलमधून बाहेर पडणार! थंडीपासून बचाव करण्यासाठी हातात हातमोजे घालावेच लागतात.. पण मग या मोज्यामुळे रायफल फायर करण्यासाठी असणारा ट्रिगर (खटका, घोडा) ज्या धातूच्या गोलाकार रिंगमध्ये असतो, त्या रिंगमध्ये बोट नीट आत जात नाही… रायफल तर फायर करायचीच आहे… मग उजव्या हातातील मोजा काढावाच लागतो… आणि भयावह थंडीत उघड्या राहिलेल्या बोटाला हिमदंश होतोच… बोट मृत होऊन गळूनही पडू शकते! एका जवानाकडे फारतर सहाशे गोळ्या. पलटणीकडे असलेली अग्निशस्त्रे अगदीच सामान्य. आणि समोर…. अमर्याद संख्या असलेला लबाड शत्रू ! संख्या किती… तर आपल्यापेक्षा किमान वीसपट. आणि त्यांची हत्यारे आपल्यापेक्षा उजवी…. मिनिटाला पाचशे गोळ्या झाडणारी…. शिवाय ते तोफगोळेही झाडू शकत होते… आपल्या जवानांना आपला तोफखाना साहाय्य करण्याच्या भौगोलिक स्थितीत नाही… कारण तोफखाना आणि आपली युद्धभूमी यांमध्ये उंच डोंगर. आणि तरीही आपली अत्यंत महत्वाची हवाई धावपट्टी राखायची आहे…. अन्यथा शत्रू पुढे सरकरणार… आणि आपला मोठा भूप्रदेश ताब्यात घेणार अशी स्थिती. त्यांची मोठी टोळधाड येणार हे निश्चित होते… आणि त्यांची संख्या पाहता माघार घ्यावीच लागणार हे (तिथे क्वचितच दिसणा-या) सूर्यप्रकाशाएवढे लख्ख होते. दलनायक नावाने शैतान ! पण वृत्तीने देवासारखा… लढाऊ आणि सत्याची बाजू न सोडणारा…. जणू पांडवांचा सारथी… श्रीकृष्ण… मूळचा यादवच. तुम्ही माघारी निघून या… अशी सूचना वरिष्ठ लष्करी अधिका-यांनी दिलेली असताना दलनायक आपल्या जागी ठाम उभा. एकशे चोवीस वीर…. शत्रूला घाबरून माघारी पळून जाणे हे रक्तात नव्हतेच कधी… आताही नाही… कोई भी जवान पीछे न हटेगा !… ठरले ! हे एकशे चोवीस… ते हजारोंच्या संख्येने चालून आले… शत्रूकडे माणसांची कमतरता नव्हती….. आणि शस्त्रांची सुद्धा. आपल्या या १२४ जवानांची शत्रूस मारता मारता मरेतो झुंज सुरु झाली आणि चार तासांत संपली सुद्धा. आपल्या शूरांनी त्या हजारो शत्रूसंख्येतील किमान हजारभर तरी आपल्या. ३०३ रायफली, संगीनी आणि नुसत्या हातांनी यमसदनी धाडले होते. शत्रूने ती लढाई तांत्रिकदृष्ट्या जिंकलेली असली तरी त्यांची हृदयं भारतीय सैन्याच्या मृत्युंजयी पराक्रमाने काळवंडून गेली… ते माघारी निघून गेले… त्यांनी आणखी पुढे येण्याची हिंमत दाखवलीच नाही असे म्हटले जाते… आणि दोनच दिवसांत त्यांच्या बाजूने युद्धविराम जाहीर केला ! या युद्धात इतर कोणत्याही आघाडीवर चीनला एवढ्या प्रतिकाराला सामोरे जावे लागले नव्हते… It was a real Last Stand of Indian soldiers!
११४ सैनिक सहकारी त्यांच्या प्रिय अधिका-यासह.. मेजर शैतान सिंग साहेबांसह, देशाच्या सीमेच्या रक्षणार्थ प्राणांचे बलिदान देऊन बर्फाच्या कड्यांच्या आड, बर्फात, खंदकांमध्ये निपचित पडलेले होते. सर्वांनी छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. एकाने तर तब्बल सत्तेचाळीस गोळ्या उरात सामावून घेतल्या होत्या.. ३०३ रायफल फायर करता यावी म्हणून सर्वांनी हातातले मोजे काढून फेकून दिले होते… एकाच्या हातातील हातागोळा तसाच त्याच्या हातात होता… उभ्या स्थितीतच प्राण गेला होता! वैद्यकीय सहायकाच्या हातात इंजेक्शनची सिरीन्ज तशीच होती… त्याला डोक्यात गोळ्या लागल्या होत्या… तब्बल ११४ देह बर्फात बर्फ होऊन थिजून गेलेले… पण पुन्हा कधीही जिवंत होतील आणि शत्रूवर तुटून पडतील असे वाटावे!
या दिवशी लढाईत उतरलेल्या आठ-दहा जवानांच्या प्राणांवर त्यादिवशी यमदूतांची नजर पडली नसावी… ते बचावले… त्यातील एकाने, रामचंद्र यादव यांनी जबर जखमी झालेल्या मेजर शैतान सिंग साहेबांना स्वत:च्या अंगावर बांधून घेऊन काही अंतरावर वाहून नेले… तशाही स्थितीत मेजर साहेबांनी “छावणीत पोहोचा… आपले जवान कसे शेवटच्या श्वासापर्यंत लढले ते त्यांना सांगा!” असे बजावले. पण साहेबांना असे टाकून माघारी येण्यास त्याने नकार दिला. रात्रीचे सव्वा आठ वाजले होते मेजर साहेबांच्या मनगटी घड्याळात…. काळजाच्या धडधडीवर चालणारे ते पल्स घड्याळ… बंद पडले… साहेबांच्या हृदयाची धडधड बंद पडल्यावर!…. मेजर शैतानसिंग साहेब देवतुल्य कामगिरी बजावून निजधामाला निघून गेले. रामचंद्र यादव यांनी मेजर साहेबांचा देह शत्रूच्या हाती लागू नये असा लपवून ठेवला! जिवंत सापडलेल्या सहा जणांना चीनी सैनिकांनी युद्धकैदी म्हणून पकडून नेले… याट रामचंद्र यादव सुद्धा होते…. रामचंद्र यादव साहेब अंधारात शत्रूची नजर आणि पहारे चुकवून निसटले आणि भारतीय हद्दीत आले… त्यांनी छावणीतल्या मुक्कामात खायला घालून सांभाळलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्यांना आपल्या लष्करी छावणीपर्यंत वाट दाखवली! हा जखमी जवान भारतीय लष्कराच्या ताब्यात आला, त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले गेले. दरम्यान २१ नोव्हेंबर, १९६२ रोजी म्हणजे रेझांग ला (चुशुल) येथे झालेल्या प्रचंड लढाईनंतर चीनने एकतर्फी युद्धविराम जाहीर केला गेला होता….. चीनी जरी जिंकले असले तरी त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले होते….. कदाचित त्यामुळेच त्यांनी युद्धविराम जाहीर केलेला असावा.. असे अनेकांना वाटते. सुमारे १८००० फूट उंचीवर झालेले हे रणकंदन प्रत्यक्षात पाहणारे आणि त्याची कहाणी सांगण्यासाठी जिवंत राहिलेले केवळ सहाजणच होते.. त्यातील चार चीनच्या ताब्यात… त्यातील एक तिथेच मृत्यू पावला. एक जण तिथून निसटला होता.
जो जिवंत परतला होता तो सांगत असलेली युद्धकथा इतकी अविश्वसनीय होती की मोठमोठ्या लष्करी अधिका-यांना ही भाकड कथा भासली… एकशे चोवीस जवान हजारो चिन्यांचा खात्मा करू शकले, हे त्यांच्या पचनी न पडणे साहजिकच होते…. कारण अत्यंत अपु-या साधन सामुग्रीच्या जोरावर अगदी ऐनवेळी अनेक सैनिक तिथे पाठवले गेले होते. जो सैनिक हे सांगत होता त्याला दिल्लीत बोलावले गेले… चुकीचे, खोटे सांगितले तर अगदी कोर्ट मार्शल होईल अशी तंबीही दिली गेली… जवान म्हणाला… ”साहेब, आपण प्रत्यक्ष येऊन बघा… तिथली परिस्थिती समजावून घ्या. मेजर साहेब अजूनही तिथेच बसून आहेत.. त्यांचे रक्ताळलेले हातमोजे त्यांच्या देहाशेजारीच ठेवलेत मी… साहेब तिथेच आहेत… निश्चेष्ट !”
अधिक माहिती घेतली गेली… दरम्यान काही युद्धकैदी भारताच्या ताब्यात मिळाले.. त्यांनी या गौरवशाली लढ्याच्या हकीकतीला दुजोरा दिला ! पण तरीही शंका होतीच…. प्रत्यक्ष डोळ्यांना पुरावा दिसत नव्हता…. प्रत्यक्ष जिथे लढाई झाली तिथपर्यंत जाणे युद्धाच्या वातावरणात शक्य नव्हते !
चिन्यांच्या तावडीतून सुटलेले हे वीर आपल्या मूळ गावी परतले…. आणि सामाजिक बहिष्काराचे बळी ठरले ! जिथे मुळात युद्धाची हकीकतच लष्करी अधिकारी मान्य करायला तयार नव्हते तिथे सामान्य गावकरी का वेगळा विचार करतील? कारण त्यांच्या समाजात युद्धात लढता लढता मरण्याची परंपरा…. हे पाच सहा जणच माघारी आले म्हणजे हे शत्रूला पाठ दाखवून माघारी पळाले असतील ! गावाने यांना वाळीत टाकले.. यांच्या मुलांच्या शाळा बंद केल्या…. भगोडे (पळपुटे) म्हणू लागले सारे यांना ! हे आपेश मात्र मरणाहुनी ओखटे होते…. प्रश्न जवानांच्या हौतात्म्याचा होता… त्यांचा पराक्रम असा संशयाच्या भोव-यात सापडणे किती दुर्दैवाचे होते!
१३, कुमाऊ रेजीमेंट होती ती. कुमाऊ हा उत्तराखंडमधील एक प्रदेश आहे. त्यावरून या रेजिमेंटचे नाव ठेवण्यात आले. राजस्थानात एका लष्करी अधिका-याच्या पोटी जन्मलेले मेजर शैतानसिंग भाटी या सेनेचे नायक होते. त्यांच्या नेतृत्वात ‘आभीर’ (अभिर) अर्थात नीडर, लढाईत शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहण्यात जीवनाचे सार्थक मानणारे ‘अहीर’ या लढाऊ हरयाणा भागातून आलेल्या समाजाचे कित्येक सैनिक होते… हिंदुस्तानात अगणित लढाऊ समाजघटक आहेत… ते सर्व सैन्यात एकमेकांच्या खांद्यास खांदा लावून लढत आहेत…. म्हणून आज देश उभा आहे !
फेब्रुवारी, १९६२. युद्धाविराम होऊन तीन महिने उलटून गेले होते. एक गुराखी आपले याक प्राणी हाकत हाकत तसा चुकूनच रेझांगला (चुशूल) नावाच्या परिसरातल्या त्या बर्फाच्या पहाडावर पोहोचला…. लढाख मधले हे 2. 7 किलोमीटर्स लांब आणि 1. 8 किलोमीटर्स रुंदी असलेले हे पठार ! तेथील दृश्य पाहताच त्याचे डोळे प्रचंड विस्फारले असतील ! तिथे भारतीय सेनेची एक सबंध तुकडी शत्रूच्या प्रतिकारासाठी बर्फात पाय रोवून उभी होती… सर्वांच्या रायफली लोड केलेल्या आणि शत्रूच्या दिशेने तोंड केलेल्या होत्या… शत्रू टप्प्यात येताच… रायफली फायर होणार होत्या… हातातल्या हातबॉम्बची फक्त पिन उपसायची बाकी होती… काहींच्या हातात रायफलच्या संगीनी होत्या… शत्रूच्या छातीत भोसकण्यासाठी सज्ज… फक्त या सेनेतील प्रत्येकाचे डोळे मिटलेले होते… कुडीतून प्राण निघून गेले होते… एका महाप्रचंड युद्धाचे एक शिल्पचित्रच जणू निसर्गाने तिथल्या बर्फात कोरले होते…. त्यात मेजर शैतान सिंग साहेबही होते… प्रचंड जखमी अवस्थेत एका खडकाला टेकून बसलेले…. शांत, क्लांत!… त्या देहात एका क्षणासाठी जरी देवाने पुन्हा चेतना निर्माण केली असती तरी ते म्हणाले असते…. ”.. पीछे न हटना… फायर !”
त्या गुराख्याकडून ही खबर पहाडाखाली आणि तिथून वायुवेगाने दिल्लीपर्यंत पोहोचली…. योजना झाली… पाहणी पथक युद्धभूमीवर पोहोचले…. पाहणा-या प्रत्येकाच्या डोळ्यांत आसवांनी गर्दी केली…. देशासाठी प्राणांचे बलिदान म्हणजे काय याचा बर्फात थिजलेला वस्तुपाठ त्यांच्या समोर होता… आता त्यांच्या हौताम्याबद्दल कसलीही शंका उरली नव्हती….. देहांची मोजदाद झाली… ओळख पटवली गेली…. कित्येक देह सापडलेच नाहीत…. आहेत त्या देहांवर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार झाले ! मेजर शैतान सिंग साहेबांचा देह त्यांच्या जन्मगावी पाठवण्यात आला ! ते जिवंतपणी परमवीर म्हणून लढले.. ते मरणोपरांत परमवीरचक्र विजेते ठरले. त्यांच्या हुतात्मा सहकारी सैनिकांचाही यथोचित गौरव करण्यात आला ! बचावल्या गेलेल्या बहादूर सैनिकांना मानाची पदे बहाल केली गेली. १९४ शौर्य सूर्य आता उजळून निघाले होते… त्यांच्यावरील डाग पुसले गेले होते ! पळपुटे म्हणून हिणवल्या गेलेल्या सैनिकांना देशाने आता वीर म्हणून स्वीकारले….. युद्धभूमीत स्मारक उभारले गेले… १९४ आत्मे शांततेत परलोकीच्या प्रवासास निघून गेले असतील…. ताठ मानेने !
१८ नोव्हेंबर, १९६२.. या दिवशी कृष्ण शुद्ध सप्तमी तिथी होती. या दिवशी आपल्या या पितरांनी हे जग त्यागले होते…. आज पितृपंधरवड्याचा अखेरचा दिवस… सर्वपित्री अमावास्या ! या सर्वपितरांसाठी आज एक घास बाजूला काढून ठेवू !
(काल परवाच भारतीय रेल्वेने आपल्या नव्या इंजिनला ‘ १३, कुमाउ ‘ हे नाव देऊन एक चांगले पाऊल उचलले. त्यावरून हा लेख लिहावासा वाटला. आपल्यासाठी जीवाचे बलिदान दिलेल्या सैनिकांचे स्मरण सतत व्हायला पाहिजे हा ह्या कथा सांगण्यामागील उद्देश ध्यानात घ्यावा. मी काही अभ्यासू लेखक नाही… पण तरीही लिहितो…जय हिंद! 🇮🇳)
(पहिले छायाचित्र परमवीर मेजर शैतान सिंग साहेब यांचे. दुस-या छायाचित्रात युद्धभूमीवर मृत सैनिकांच्या देहांवर अंत्यसंस्कार केले गेले ते दृश्य.. )