☆ ‘Admiral’ कान्होजी राजे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर ‘Pirate’ म्हणजे ‘ समुद्री डाकू ‘ म्हणून येत आहे. याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नावाच्या description खाली pirate लिहिलेले होते.
मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा, याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो. ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राजांनी त्यांना चांगला ‘सडकवून’ काढला होता.
कान्होजी राजांच्या भयामुळे अनेक हल्लेखोर त्यांच्या भागात यायचा विचार सुद्धा करत नव्हते ! कान्होजींच्या शौर्याच्या कथा खूप आहेत. कालांतराने, १९५१ साली मराठा नौदलाचे ‘Admiral’ कान्होजी राजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘INS ANGRE’ या नावाने एका ‘Stone Frigate’ ला नाव देण्यात आले.
कान्होजी राजांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका-नायकाला ‘Pirate’ म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. याकरिता आपण एक काम करू शकतो.
गुगल वर जाऊन ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !
नावापुढे दिसणारे तीन डॉटवर क्लीक करून ‘send feedback’ वर क्लिक करा ! आणि ‘Pirate’ या शब्दाच्या बाजूच्या एडिट बटणावर क्लिक करा.
नवीन Window Open झाल्यावर तिथे ‘Inappropriate’ किंवा ‘Incorrect’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’ असे लिहून सेंड करा !
जास्ती जास्त संख्येने ही गोष्ट करा ! आणि लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा ! कारण हा इतिहास लोकांना माहित असायलाच हवा. सन्मान क्वचित होतो, पण बदनामी मात्र सहज केली जाते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
लेखक : अज्ञात
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पंचाऐंशी वर्षाच्या आईला पन्नाशी पार लेक फोन करते. खरंतर भरपूर वाचन वगैरे करणारी आई, तरीही वय बोलायचं ते बोलणारच. फोन केला आणि काय म्हणतेस विचारलं, तर आई फक्त “चाललंय चाललंय” असं उदास स्वरात म्हणत राहते. क्वचित काही तब्येतीचं छोटंमोठं.
कधीतरी अचानक फोन करत लेक विचारते, “अगं कोकणात केळीच्या पानावर दशम्या करायचे बघ किंवा मेथांबा केला पण तुझ्यासारखा नाही झाला….. त्याची रेसिपी सांग ना जरा , आज फार आठवण आली त्या चुलीची आणि चुलीवरच्या दशम्यांची , ‘ तुझ्यावाल्या ‘ मेथांब्याची.” इथे ‘ तुझावाला ‘ या शब्दाला वेगळंच वजन मिळतं.
वास्तविक लेकीचा मेथांबा अप्रतिम झालेला असतो.
तर…. तिकडे आईच्या डोळ्यात आलेली चमक इकडे लेकीला आतून जाणवते. दिसत नसतं तरी लेकीला जाणवतं आई उदासपणा टाकत सरसावून बसलेली…..
आई तिच्या सवयीप्रमाणे अगदी बेसिक पासून सुरु करते— ” तांदूळ धुवून स्वच्छ फडक्यावर, घरातल्या घरात सावलीत वाळवायचे ……. ”
— रेसिपी चालूच राहते. ठाऊक असलेल्या गोष्टी, लेक हं हंss , अच्छा अच्छा म्हणत ऐकत राहते. ओठांवर मंद हसू खेळत राहतं. मेथांब्याच्या भांड्याकडे बोट दाखवत नवरा खूणेनं विचारतो, ” मेथांबा झालाय ना, मग हा फोन कशाला?” ती त्याला खूणेनं गप्प करते. फोन चालू असतो.
चुलाण्याचा सुगंध आणि दशम्यांची चव , मेथांब्याचा जमून आलेला पिवळट काळसर केशरी रंग तन मन भरून व्यापून राहतात.
लेकीला स्वतःच्या घरात पडलेली पन्नास कामं दिसत असतात, पण हे एक्कावनावं त्याहून फार मोठं, मोलाचं.
— आई बोलते …. आई बोलत राहते.
— लेक शांत झालेली असते.
लेक आईची आई होऊन जाते. फार मोठ्ठं चमकदार काहीच घडलेलं नसतं.. फक्त एक फोनकॉलच तर असतो.
छोट्या गोष्टीही अशा आभाळ भरून टाकतात —–
संग्रहिका : सुश्री हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हवीहवीशी वाटणारी थंडी आणि उत्साहवर्धक वातावरण ही डिसेंबर ची खास वैशिष्ट्य. डिसेंबर मध्ये रानमेव्याची सुद्धा लयलूट असते . त्यामुळे भाजीपाला आणि फळफळावळ ह्यांची पण चंगळ असल्याने हा काळ खूप संपन्न वाटतो. बोरं,गाजरं,हरबरा, ऊस,वाटाणा, वाल,अंबाडीची बोंड,भरताची वांगी ह्यांनी जेवणाचे चार घास जरा जास्तच जातात आणि मग ह्या अशा सकस घरी केलेल्या पदार्थांवर ताव मारल्याने जरा थोडसं वजन हे वाढतंच आणि त्या वाढत्या वजनाचा दोष मात्र आपल्या माथी येतो.बरं एकदा हिवाळ्यात वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी होईल अस म्हणता का, तर अजिबात तसूभरही वजन कमी होण्याचं मुळी नावच घेत नाही.
डिसेंबर महिना अजून एका गोष्टीसाठी आवडतो. दत्तजयंती ! उत्साहात साजरा होणारा एक उत्सव. जसजसं आयुष्य पुढेपुढे जातं तसतसे नवनवीन अनुभव गाठीशी लागत असतात. काही भले तर काही बुरे. भले अनुभव लक्षात ठेवावे आणि बुरे अनुभव तेथेच विसरून सोडून द्यावे. दरवर्षी संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जाणे व्हायचे नाही फक्त दत्तजयंती ला मात्र न चुकता मंदिरात जायचे. ह्यावर्षी मात्र हा संपूर्ण सप्ताह दत्तमंदिरात जावसं आपणहून वाटलं. त्यामुळे रात्री बँकेतून आल्यावर दत्तगुरुंच्या दर्शनासाठी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात जायचे. दिवसभराचा सगळा शीण,मरगळ ह्या दर्शनाने कुठल्याकुठे गायब व्हायची.त्या मंदिराच्या शांत,पवित्र वातावरणाच्या परिसरात रात्री भक्तीसंगीताचे सुमधुर सूर कानात साठवत दोन घटका तेथे टेकल्यानंतर एका अतीव शांत, समाधानी वृत्तीची अनुभूती मिळायची.
ह्यावेळी दररोज झिरी येथील दत्तमंदिरात काही काळ घालवतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दत्ततत्वाने भारलेल्या परिसरात आपण वास्तव्य करतांना आपोआप एक प्रकारचा अलिप्तपणा,निर्मोही वृत्ती मनात ठसायला लागते. मोह,लालसा काही क्षण का होईना मनातून हद्दपार झाल्यागत वाटतं.जणू कमळाच्या पानावरील दवबिंदू आपल्यात वास करीत असल्याचा अनुभव येतो. जसं कमळा च्या पानावरील थेंबाच अस्तित्व तर असतं पण तो थेंब मात्र कुठल्याही गोष्टी ला न चिकटता अलिप्त होऊन जगतो.
ह्या महिन्यात बहुतेकांचे आराध्य दैवत, श्रद्धास्थान असलेल्या श्री.दत्तगुरुंची जयंती.मार्गशीर्ष पोर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर श्री दत्तगुरुंचा जन्म झाला. आपले प्रमुख चार अवतारी दैवत असलेल्या दैवतांपैकी श्री दत्तगुरुंचा जन्म संध्याकाळी सहाचा तर शक्तीचे दैवत मारुतीरायांचा जन्म पहाटे सहाचा, श्रीरामचंद्रांचा जन्म दुपारी बारा तर कृष्ण जन्म रात्री बाराला साजरा केल्या जातो.
दत्तजयंती ला “दत्ततत्व”हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने अधिक कार्यरत असते.म्हणून ह्या दिवशी दत्तगुरुंची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो अशी आख्यायिका आहे.दत्तात्रयांच्या हातातील जपमाळ ब्रम्हदेवाचे शंखचक्र श्री विष्णूंचे,तर त्रिशूळ डमरू हे भगवान शंकराचे प्रतीक समजल्या जातं.दत्तजन्माच्या सात दिवस आधीपासूनच गुरुचरीत्राचे पारायण करायला सुरवात केली जाते.
श्री दत्तगुरुंच्या प्रमुख अवतारांपैकी पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ,दुसरा अवतार नृसिंह सरस्वती तर तिसरा अवतार श्री स्वामी समर्थांचा मानला जातो.
आपल्या भागातील जागृत देवस्थांनां विषयी आपल्या मनात काकणभर श्रद्धा जरा जास्तच असते त्यामुळे मला अमरावती जवळील कारंजा आणि झिरी ही दोन्ही ठिकाणं जरा जास्तच जवळची आपली वाटतात.
बडने-या जवळच दोन किमी. वर “झिरी”नावाचे दत्तगुरुंचे जागृत देवस्थान आहे. काही ठिकाणं,काही स्थानचं अशी असतात की प्रत्यक्ष परमेश्वर तेथे वास करीत असतील असं आपल्याला मनोमन जाणवतं.झिरी येथील पवित्रता परमेश्वराच्या अस्तित्वाची ग्वाही देत निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं झिरीचे दत्तमंदिर हे मानसिक स्वस्थता, शांतता,तृप्ती, व समाधान देणा-या स्थानांपैकीच एक.ह्या मंदिरातील शांत,हसरी,तेजस्वी मुर्ती आपल्याला सकारात्मक ऊर्जा, संकटातही तारुन नेणारे पाठबळ आणि कितीही संपन्नता असली तरी जमिनीवर दोन पाय घट्ट रोवण्यासाठी आवश्यक असलेली थोडी विरक्ती शिकविते.ह्या मंदिराजवळच एक भव्य असे श्रीराममंदिरही आहे.दोन्ही मंदिरांचा परिसर हा जवळपास सव्वाशे ते दिडशे वयाच्या वटवृक्षांनी घेरलेला आहे. हे धीरगंभीर वटवृक्ष आणि त्याच्या पारंब्या आपल्याला चांगल्या सकारात्मक गोष्टी ह्या चिरंतर वा शाश्वत असतात हे शिकवून जातात.
मन ओढ घेऊन दर्शनासाठी जावे असे उद्मेगून वाटणारे दुसरे ठिकाण म्हणजे अमरावती जवळ चाळीस किमीवर असलेले श्री नृसिंह सरस्वतींचे कारजांलाड येथील जागृत देवस्थान. ह्या मंदिरातील प्रसन्न, मानसिक स्थैर्य सकारात्मक ऊर्जा देणारे. ते स्वामींचा प्रत्यक्ष वास असल्याची जाणीव देणारे ते सभागृह.ह्या मंदिरात उपनयन संस्कार करण्यासाठी शुभवेळ
शुभदिवस, शुभघडी हे काहीही बघण्याची गरजच नसते असा समज,अशी श्रद्धा आहे.स्वामींच्या नजरेच्या समोर झालेले उपनयन संस्कार आयुष्यात खूपकाही देऊन जातात असा ब-याच भक्तांचा अनुभव आणि श्रद्धा आहे.
दत्तजयंती च्या निमीत्ताने झिरीला दर्शनासाठी गेल्यावर मंदिराच्या पवित्र वातावरणात आपल्याला आलेले अनुभव आठवतात, आस्तिकता जागृत होते आणि आपोआपच त्याची महती आपल्याला अजून पटायला लागते.आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपली कार्यक्षमता, सकारात्मकता, उत्साह वाढून आपल्यात चुकून शिरलेल्या नकारात्मकतेला पिटाळून लावण्यात होतो.
☆ एक वादळ —-जमादार बापू लक्ष्मण लामखडे ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
नुकतंच मी एका वादळाविषयी वाचलंय…
अनेक हिंदी चित्रपटांतून देशातील, विशेषतः विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेल्या मुंबईतील अंडरवर्ल्ड जगतातील अनेक पैलू दाखवले जातात. अनेक स्मगलर्स ,गॅन्गस्टर्स – त्यांच्या कामाच्या पध्दती, डावपेच दाखवून कुणीतरी हिरो किंवा प्रामाणिक पोलीस ऑफिसर ते कसे उधळून लावतो हे दाखवले जाते.अर्थात यात रंजकतेचा भाग मोठा असतो. यातील कथानक काल्पनिक असते. असे चित्रपट लोकप्रिय झाले. पण मुंबईतील गँगस्टर्स,स्मगलर्स यांना सळो की पळो करून सोडणारा एक खंदा वीर आपल्या देशात होऊन गेला,आणि त्याने एकेकाळी दैदिप्यमान इतिहास निर्माण केला होता. हा वीर आणि त्याने घडवलेला इतिहास आज कुणाला फारसा माहीत नाही.
२०२२ हे या वीराचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने व्हाट्सअप वर एक पोस्ट वाचली आणि त्यातून या कर्तृत्वाची माहिती झाली, आणि माझ्या शब्दात ती सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटते आहे.
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा या वीराचे नाव आहे- जमादार बापू लक्ष्मण लामखडे. २ जुलै १९२२ रोजी जुन्नर तालुक्यातील (जि.पुणे) मंगरूळ पारगाव इथं एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्लेगच्या साथीत वडिलांचे निधन झाले होते. मोठा भाऊ मुंबईतील गोदीत कामाला होता. गावी आपल्या आईची करडी शिस्त, आणि रानात शेळया चारताना आजूबाजूच्या निसर्ग यांच्या सान्निध्यात बापू लहानाचा मोठा झाला. त्याची शरीरयष्टी मजबूत बनली. पुढे त्याने चरितार्थासाठी मुंबईच्या गोदीत कामाला सुरुवात केली.
१९४४ मध्ये मुंबई कस्टममध्ये शिपाई म्हणून तो रूजू झाला. कसलेले शरीर, धाडसी स्वभाव, तीक्ष्ण नजर या जोरावर बापूने कस्टममध्ये अजोड काम केले. १९६०-७० हे दशक हा मुंबई अंडरवर्ल्डचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक स्मगलर्स आणि गॅन्गस्टर्सनी देशात धुमाकूळ घातला होता. सामाजिक अशांतता आणि अस्थैर्याचे वातावरण निर्माण केले होते. दारू,मटका, स्मगलिंग, यामधून देशाला वेठीस धरले होते.अशा अनेकांवर बापूंनी वचक बसवला होता. अनेक तस्करांना पकडून त्यांच्याकडून त्यांनी त्यावेळी लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. आपले असेच कर्तृत्ववान, धाडसी सहकारी आणि वरिष्ठांच्या सहाय्याने बापूंनी त्याकाळी अनेक गुन्हेगारांवर वचक बसवला होता. त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि धाडसी यशाच्या अनेक कहाण्या मुंबई कस्टमच्या इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत.
बापूंना पुढे जमादार पदावर बढती देण्यात आली. त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९६४ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाने गौरविण्यात आले. बापू लामखडे यांचे जीवनकार्य हा देशप्रेमाचा धगधगता आविष्कार होता. सततची जागरणं आणि धावपळीचा परिणाम बापूंच्या शारीरिक स्थितीवर होऊन ते आजारी पडले आणि त्यांचे निधन झाले. ‘ बापूंनी आपल्या धाडसाने मुंबई कस्टमच्या इतिहासात एका कर्तृत्ववान पाठ कायमचा लिहून ठेवला आहे,’ असा उल्लेख मुंबई कस्टमने केला. त्यांना दुसर्यांदा मरणोत्तर राष्ट्रपती पदक बहाल करण्यात आले. मुंबईतील कस्टम ऑफिसच्या चौकाला, ” जमादार लक्ष्मण बापू चौक ” असे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या जन्मगावी त्यांचा ब्राॅन्झचा पुतळा उभारण्यात आला आहे.
जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांचे जीवनकार्य हे साऱ्या भारतीयांसाठी देशाभिमानाचे जाज्वल्य प्रेरणास्रोत आहे.
… आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता; तुमच्या मनालाच तो नकोय….
… काय आहे बाळा, जमणं – न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं. आणि क्षमता जाणीवपूर्वक डेव्हलप करायची असते..! …….. “
जगता आलं पाहिजे… मरता केव्हाही येतं, पण जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं, पण दुःख पचवता आलं पाहिजे. रंग सावळा म्हणून काय झालं, कर्तृव उजळता आलं पाहिजे. रंग गोरा असला म्हणून काय झालं, मनावरील काजळी काढता आली पाहिजे. यशानं माणूस उंच जातो तेव्हा पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजेत. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं, पण पुण्य करता आलं पाहिजे. ताठ काय कोणीही राहतं, पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. ठेच जीवनात लागतेच, सहन करता आली पाहिजे. मलमपट्टी करून तिला, पुन्हा चालता आलं पाहिजे. शहाण्याचं सोंग घेऊन, वेडं होता आलं पाहिजे. कशाला बळी न पडता, आनंदी जगता आलं पाहिजे. जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल, ती उणीव भरता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूचा मिलाप करून. फक्त समाधानी राहता आलं पाहिजे…….
आयुष्य खूप सुंदर आहे… भरभरून जगता आले पाहिजे……
लेखक : अज्ञात
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पंढरपूर तीर्थक्षेत्र सर्वांना ज्ञात आहे. ते एक पवित्र धाम तर आहेच.पण ते शाश्वत धाम आहे. प्रलय कालात सुद्धा धाम नष्ट होत नाहीत. त्यापैकी पंढरपूर एक आहे.चंद्रभागा नदीला पूर्ण पंढरपूर बुडून जाईल इतके पूर अनेक वेळा आले.तरीही पंढरपूर होते तसेच आहे. आता उजनी धरणामुळे जास्तीचे पाणी रोखले जाते पण धरणात पाणी जास्त प्रमाणात असेल तर नदीपात्रात सोडले जाते.तेव्हा पंढरपूरला अजूनही वेढा पडतोच.
पंढरपूरचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण देवाचे चरणस्पर्श करू शकतो. ते अन्यत्र कुठेही नाही. कित्येक संतांना देवाने आलिंगन दिले होते यांचेही पुरावे अभंगात व इतर संतसाहित्यात आहेत. म्हणजे उराउरी भेट, आणि चरणस्पर्श फक्त श्री विठ्ठल रखुमाईलाच भक्त करू शकतात. मुख्य गाभाऱ्याच्या समोर गरूडखांब आहे. त्याला आलिंगन देण्याची प्रथा आजही आहे.
पंढरपूर जवळ पूर्वी दिंडीर नावाचा राक्षस मातला होता. देवाने त्याला ठार केलं. पण देवाच्या हातून मरण आले म्हणून स्वतःला धन्य समजून त्याने देवाला वरदान मागितले की या क्षेत्राला माझ्या नावाने ओळखले जावे. म्हणून पंढरपूर परिसर दिंडीरवन या नावाने प्रसिद्ध होता. देवावर रूसून रूक्मिणी माता याच दिंडीरवनात येऊन राहिली.अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत.
रूक्मिणीच्या पाठोपाठ देव दिंडीरवनात आले. ( विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते.) इतर ठिकाणी भक्त भगवंताच्या भेटीला जातात. पण पंढरपूरला भगवंत भक्तांची वाट पहात विटेवर उभा राहिला आहे.कटीवरती हात आणि समचरण हे इथे देवाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्ष संत नामदेव महाराजांना देवाने दृष्टांत दिला होता की मी इथे तुमच्यास्तव उभा आहे. आषाढी , कार्तिकी एकादशीला तरी मला भक्त भेटावेत.
इतर सर्वत्र देव अलंकारविभूषित व शस्त्रे धारण केलेले दिसतात.पण देवशयनी एकादशीला देव गोपवेषात असतात. विनाअलंकृत आणि तुळशीमाळा धारण केलेले देवाचे स्वरूप असते.
पंढरपुरातली ही विठ्ठल मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, जो ही मूर्ती घडविलेली आहे असे म्हणेल त्याला पाप लागेल. संत कधीच कुणाला दूषणे देत नाहीत. तरीही तुकाराम महाराज असे म्हणतात कारण ही मूर्ती खरोखरच स्वयंभू आहे.
त्या काळात लोक इतके गरीब होते की त्यांनाच खायला अन्न नसायचे. मग ते देवाला नैवेद्य कशाचा दाखविणार ? पंढरपुरात लोक ताकात पीठ कालवून तो नैवेद्य देवाला दाखवीत असत.अशी आख्यायिका आहे. पश्चिम द्वारा जवळ एका गल्लीत हे ताकपिठे विठोबा मंदिर आजही अस्तित्वात आहे. दहा वर्षापूर्वी सरकारी निकालानुसार बडवे आणि उत्पात यांचे देवाच्या पूजेचे व उत्पन्नाचे अधिकार काढून घेतले गेले. त्यानंतर पंढरपूरला बडवे मंडळींनी विठोबाचे एक मंदिर दुसऱ्या ठिकाणी बांधले आहे. तसेच उत्पात मंडळींनी रूक्मिणी मातेचे मंदिर बांधले आहे.
विठ्ठल हे श्रीकृष्णाचेच रूप मानले जाते कारण पंढरपूरला त्याच मंदिरात रूक्मिणी मातेचे मंदिर आहे. त्याच्या जवळच देवाच्या पत्नी राही, सत्यभामा यांच्या मूर्ती असलेले गाभारे देखील आहेत. श्रीविष्णूंनी वेंकटेश अवतार घेतला,ते वेंकटेश मंदिर ही मुख्य मंदिराच्या आवारात आहे.इतरही अनेक देव देवतांचे दर्शन तिथे घडते.
गोपाळपूर येथे दोन्ही वाऱ्या झाल्यानंतर गोपाळकाला होतो. तिथे श्रीकृष्ण मंदिर आहे. जवळच विष्णुपद मंदिर आहे. देव प्रथम पंढरपूरला आले, ते विष्णुपद मंदिर परिसरात आले. त्यांचे पाऊल इथे एका दगडावर उमटले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात हे मंदिर आहे. दर मार्गशीर्ष महिन्यात देव इथेच येऊन राहतात,असे मानतात. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात लोक होडीतून किंवा चालत इकडे दर्शनासाठी आणि सहलीसाठी येतात.मार्गशीर्ष अमावस्येला पालखीतून मिरवणूकीने ,वाजत गाजत देवांच्या पादुका पुन्हा मुख्य मंदिरात आणल्या जातात.
चंद्रभागा नदी हीच गंगा नदी आहे .असे म्हटले जाते. विष्णुपदाजवळ चंद्रभागेला पुष्पावती नावाची नदी येऊन मिळते. तीच यमुना आहे असेही मानतात.
मातीची माती करणं थांबवशील का रे माणसा ? संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆
दररोजचं सकाळचं फिरणं आटपलं की पाच ते दहा मिनिटे काळ्या मातीत पडून शवासन करणे हा माझा शिरस्ता आहे. रोजच्याप्रमाणे शवासनात डोळे मिटून शांत पडलो होतो. तेवढ्यात कानात काहीतरी कुजबुज ऐकू आली. हळूच एक डोळा उघडून पाहिलं, भोवताली कुणीच नव्हतं. आवाज तर येतच होता. मग दोन्ही डोळे उघडून पाहिले, तरीही कोणी दिसत नव्हतं.आवाजाचा भास आहे असं समजून दुर्लक्ष करून पुन्हा डोळे मिटून पडणार एवढ्यात थोडा चढलेला स्त्री स्वर कानी पडला. “ अरे भोवताली काय बघतोस ? कानाजवळ बघ. मी माती बोलतेय. तुला निसर्गाची हाक ऐकू येते म्हणून तुझ्याशी बोलायचे आहे.”
… आणि ती पुढे बोलू लागली. मी फक्त ऐकत होतो.
“ जमिनीचा सर्वात वरचा थर म्हणजे माती. थोड्याशा जाडीचा आमचा थर तयार व्हायला हजारो वर्षे लागतात. पण आम्हाला नष्ट व्हायला तुफान पाऊस ,वादळीवारा पुरेसा आहे. ही संकटं कधीतरी येतात, त्यामुळे आम्हाला त्याची फारशी चिंता वाटत नाही. पण तुम्हा मानवाने सुरू केलेले पिकाऊ जमिनीत बांधकाम, सततचं उत्खनन व रासायनिक औषधी खतांचा अतिरेकी वापर यांमुळे जीव अगदी नकोसा झाला आहे. खरं तर मी बोलणारच नव्हते.
मीसुद्धा तुमच्या माणसातल्या स्त्री जातीसारखीच…
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
😂 चं म त ग ! 😅 🥪 नवकोट नारायणाचे सँडविच ! 🥪 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“घ्या पंत, तुम्हाला आवडत म्हणून कोपऱ्यावरच्या सँडविचवाल्या कडून मस्त बटर आणि चटणी जादा मारके असं सँडविच आणले आहे, घ्या खाऊन घ्या.”
“मी सँडविच सोडल आहे.”
“काय झालं, तुमच्या नात्यात कोणी गेल…. “
“काहीतरी बोलू नकोस. माझे सगळे नातेवाईक अगदी ठणठणीत आहेत.”
“नाही, तुम्ही सँडविच सोडल असं म्हणालात आणि कोणीतरी गेल्यावरच त्याच्या आवडीचा एक…… “
“तू मला अक्कल शिकवू नकोस. तुला एकदा सांगितले ना की माझे सगळे नातेवाईक ठणठणीत आहेत म्हणून.”
“मग सँडविच सोडल असं का म्हणालात आणि कधी पासून सोडलंत ?”
“आत्ता पासून.”
“पण मग सँडविच सोडायला काही वेगळे कारण घडले का ?”
“होय, अरे ती बातमी वाचली आणि मी या पुढे सँडविचला आजन्म हात लावणार नाही अशी बटर आणि चटणीच्या देखत शपथ घेतली.”
“कोणती बातमी ?”
“अरे भारतीय वंशाच्या एका नवकोट नारायणाने ज्या बँकेत तो काम करतो, त्याच बँकेच्या कॅन्टीन मधून सॅन्डविच चोरले आणि…. “
“काय सांगता काय पंत ? आणि नवकोट नारायण हे…. “
“त्याचे नांव अजिबात नाही. त्याला वर्षाला ती बँके नऊ कोटी वीस लाख रुपये पगार देत होती म्हणून मी त्याला नवकोट नारायण म्हटले. त्याचे खरे नांव…. “
“बापरे, काय सांगता काय पंत? ही बातमी तुम्हाला…. “
“कोणी दिली असच ना ? अरे नेट बिट बघतोस ना? मग तुला अजून ही बातमी कळली नाही म्हणजे नवलच आहे. अरे खरं तर तूच मला ही बातमी….. “
“अहो वाचलीच नाही तर काय सांगणार आणि तुम्ही त्याला पगार मिळायचा असं का म्हणालात …… “
“अरे बँकेने त्याला ताबडतोब निलंबित केले आहे म्हणून पगार मिळायचा असे मी म्हटले.”
“माझा अजूनही या बातमीवर विश्वास बसत नाहीये. पण तुम्ही म्हणता…. “
“मी म्हणतो म्हणजे काय? मी माझ्या मनांत येतील तशा बातम्या तयार करतो, असे तर तुला… “
“नाही पंत, पण तुम्ही मला खरं खरं अगदी मनापासून सांगा, तुमचा या बातमीवर, वाचल्या वाचल्या लगेच विश्वास बसला, का तुमच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली ?”
“अरे सुरवातीला खरच वाटेना, पण बातमी नावानिशी, अगदी बँकेचे नांव, तो कुठल्या पदावर होता, आधी कुठल्या बँकेत किती वर्ष होता, हा सगळा तपशील वाचल्यावर मला…. “
“विश्वास ठेवणे भाग पडले, असच ना?”
“हो, नाहीतर त्या नवकोट नारायणाने अब्रुनुकसानीचा दावा नसता का ठोकला त्या बातमी देणाऱ्यावर ?”
“पंत, पण मी तुम्हाला सांगतो हा गडी त्या आरोपातून सहीसलामत सुटणार बघा.”
“हे कसं काय बुवा तू छातीठोकपणे सांगतोस ?”
“सांगतो, सांगतो. काही काही लोक खरच सज्जन असतात, पण त्यांना आपल्या मनांत नसतांना, उगीचच एखाद्या गोष्टीची चोरी करावी असे वाटते आणि ते आपल्याच नकळत ती चोरी करतात त्याला….. “
“क्लेप्टोमनिया म्हणतात हे मला ठाऊक आहे रे, पण अशी गोष्ट खरच अस्तित्वात आहे यावरच माझा विश्वास नाही, त्याचे काय ?”
“तुम्हाला मेगन फॉक्स ही हाँलिवुडची प्रसिद्ध नटी माहित्ये ?”
“इथे मला बॉलिवूडच्या नट नट्यांची नावे माहित नाहीत, तिथे तू हॉलिवूडच्या त्या मेगन का फेगन च्या काय गोष्टी करतोयस !”
“बर, बर कळलं. तर या मेगनला पण तिकडे अनेक वेळा असे हस्तलाघव करतांना कितीतरी मॉलमधे रंगे हात पकडले होते. एव्हढेच कशाला, वॉलमार्ट या जगप्रसिद्ध स्टोरने तर तिच्यावर आजन्म बंदी घातली आहे, आता बोला.”
“मी काय बोलणार, पण ही बंदी का आणि कशासाठी ?”
“अहो या अब्जाधीश बयेला त्या मार्ट मधे लीप ग्लॉसची चोरी करतांना पकडले, ज्याची किंमत होती फक्त सात डॉलर.”
“काय सांगतोस काय ?”
“अहो पंत खरे तेच सांगतोय. पण नंतर ती या रोगाची शिकार आहे असा बचाव तिच्या वकिलांनी कोर्टात केला होता तिच्या सुटकेसाठी.”
“कळलं, कळलं मला तुला काय म्हणायचे आहे ते. दे आता ते सँडविच मला. “
“पण पंत तुम्ही तर सँडविच सोडल…. “
“होत आत्ता आत्ता पर्यंत, पण आत्ताचे तुझे बोलणे ऐकून मी ते सँडविच कधी एकदा फस्त करतोय असे झाले आहे मला.”
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
‘सर्वधर्मपरिषद’ ही मानवजातीच्या धार्मिक इतिहासातली सर्वात महत्वाची घटना. ही परिषद म्हणजे आपल्याला वाटेल की नेहमी संस्थांच्या होतात तशीच काहीशी ही परिषद असणार. शिकागोला सुरूवातीलाच स्वामी विवेकानंद यांनी ज्या भव्य औद्योगिक प्रदर्शनला भेट दिली होती, ते प्रदर्शन एका महत्वाच्या निमित्तानं भरवलं गेलं होतं. त्याला पार्श्वभूमी आहे. कोलंबस अमेरिकेत उतरलेल्या घटनेला चारशे वर्ष पूर्ण झाली म्हणून अमेरिकेत प्रचंड मोठा महोत्सव होत होता. त्या निमित्ताने जागतिक पातळीवरील अनेक परिषदा आणि प्रदर्शने आयोजित केली गेली होती. हे औद्योगिक प्रदर्शन त्याचाच एक भाग होता. म्हणून यात मनुष्याच्या भौतिक क्षेत्रातली प्रगती आणि अमेरिकेबरोबरच जगातल्या सुधारलेल्या तसेच, अनेक रानटी समाजाचे दर्शन घडवणार्या माणसांचे पूर्ण पुतळे, त्यांचे पोशाख, त्यांची अवजारे व हत्यारे, त्यांची खाद्यसंस्कृती, याची माहितीपर मांडणी केली होती.
त्याचप्रमाणे मानवाने केलेली बौद्धिक ज्ञान शाखांची आणि विचारांची वाटचाल याचाही विचार व्हायला पाहिजे असे आयोजकांच्या लक्षात आले. म्हणून १५ ते २८ ऑक्टोबर १८९३ अशा पाच महिन्यांमध्ये वीस परिषदांचं नियोजन करण्यात आल होतं .त्यात अर्थशास्त्र, संगीत, वृत्तपत्रांचे कार्य, महिलांची प्रगती, औषधे आणि शस्त्रक्रिया, व्यापार आणि अर्थव्यवहार, राजव्यवहार आणि कायदा सुधारणा, यांच्या परिषदा झाल्या.
या परिषदेत जगातल्या त्या त्या विषयांचे तज्ञ सहभागी झाले होते. पण मानवाचे वैचारिक क्षेत्र याची उणीव राहिली असे आयोजकांना वाटून, त्यांनी धर्म आणि तत्वज्ञान या विषयांचे जगातले तज्ञ एका व्यासपीठावर येऊन वैचारिक देवाण घेवाण करतील तर ते तुलनेने व्यापक ठरेल.या दिशेने विचार सुरू झाला . प्रसिद्ध वकील, विचारवंत चार्ल्स कॅरोल बॉनी यांना ही कल्पना सुचली. सर्वांनी ती उचलून धरली.
यासाठी १८९० ला एक समिति स्थापन करण्यात आली. अध्यक्षपद अर्थातच बोनी यांच्याकडे आले. जगात असणारे धर्मपीठं, पंथ, संप्रदाय यांची माहिती गोळा करण्यात आली. सर्व प्रमुखांना पत्रे आणि पत्रके पाठवली. या अडीच वर्षांच्या काळात दहा हजार पत्र आणि चाळीस हजार परिपत्रके पाठवण्यात आली. जगभरात सल्लागार समित्या स्थापन करण्यात आल्या. त्याच तीन हजार समित्या होत्या. या आकडेवारीवरून आपल्याला ही परिषद किती मोठ्या प्रमाणावर होती ते लक्षात येत.
आपला भारत देश यात असणारच, होय होता. प्रचंड भारतातली विविधता, धर्म पंथ संप्रदाय पण कितीतरी. तरी भारताला एकच समिती होती. या समितीत सामाजिक सुधारणा पुरस्कर्ते आणि रूढी व परंपरांना विरोध करणारे, मद्रासच्या हिंदू वृत्तपत्राचे संपादक जी एस अय्यर, ब्राह्म समाजाचे मुंबईचे बी बी नगरकर व कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजूमदार हे होते. इथे हे लक्षात येते की एव्हढी मोठी धर्म परिषद पद्धतशिरपणे आखणी करून केलेली होती.
नियोजन करताना जगातल्या सर्व धर्माच्या प्रवक्त्यांना एकत्र आणणे,सर्व धर्मात मानी असलेली आणि शिकवली जाणारी समान तत्वे लक्षात घेऊन त्यावर अभ्यासकांची व्याख्याने ठेवणे, कोणत्या धर्माचे काय वैशिष्ट्य आहे त्याचा शोध घेणे, एका धर्म कडून दुसर्या धर्माला काय घेता येईल अशा गोष्टी शोधून आणि त्याच बरोबर शिक्षण ,श्रम, संपत्ति, दारिद्र्य मद्यपान निषेध अशा चालू असणार्या समस्या सोडवण्यासाठी मार्ग सुचविणे जगत शांतता नांदण्यासाठी ,राष्ट्रीय बंधुभावाच्या आधारे सर्वांना एकत्र आणणे या उद्देशाने ही परिषद भरवली जात होती. यामुळे परस्पर सामंजस्य वाढेल. समाज एकमेकांच्या जवळ येतील, असे त्यांना वाटत होते. खरच या परिषदेचा हेतु किती छान व उपयोगी होता. पण यावर उलट सुलट प्रतिक्रिया येत राहिल्या.
कोणाला वाटत होते, ही परिषद म्हणजे ख्रिस्त धर्मविरोधी कट आहे, तर कोणी म्हणे ख्रिस्त धर्माच्या तत्वांना हरताळ फासला जाईल, कोणी म्हणे जगात सर्वश्रेष्ठ धर्म ख्रिस्त धर्म आहे, मग इतर धर्मांबरोबर परिषद कशाला हवी? अशी अनेक मते होती. मात्र संयोजकांचा हेतु चांगलाच होता. जगातली जी जी राष्ट्र समृद्ध प्रगत आणि सामर्थ्यसंपन्न होती ती राष्ट्र ख्रिस्त धर्मियांची होती. पण धर्माचे श्रेष्ठत्व नुसते भौतिक प्रगतीवर आणि समृद्धीवर न ठरता माणसाच्या मनाचे सुसंस्कृत, सदाचरणाने व्यापक असलेले सामर्थ्य यावर पण असते, तेच त्याचे सामर्थ्य असते.असा विचार यामागे होता. त्यामुळे काही विरोध असतांनाही परिषद होऊ घातली होती.
ही सर्वधर्म परिषद शिकागो मधील आर्ट इंस्टिट्यूट च्या भव्य अशा इमारतीत भरली होती. कोलंबस आणि वॉशिंग्टन ही दोन भव्य सभागृह या इमारतीत होती. आजूबाजूला तीस लहान मोठ्या खोल्या होत्या. इथे सत्र दिवस परिषदेचे काम चालले होते. विषया नुसार गट पाडण्यात आले होते.कोलंबस सभगृहात चार हजार जण मावतील अशी आसन व्यवस्था होती. तर मोकळ्या जागेत एक हजार प्रेक्षक उभे राहू शकत होते एव्हढी जागा होती. याशिवाय उरलेले तेव्हढेच प्रेक्षक शेजारच्या वॉशिंग्टन सभागृहात बसून राहत आणि त्यांच्यासाठी तीन दिवसांनंतर कोलंबस मध्ये होणारा प्रत्येक कार्यक्रम पुन्हा होत असे.
११ सप्टेंबर १८९३ उजाडला. सकाळचे दहा वाजले. आर्ट इंस्टिट्यूट च्या आवारात भल्यामोठ्या घंटेचे दहा टोले वाजले. हे दहा टोले म्हणजे, जगातील दहा धर्माच्या वतीन दिले गेले होते. बोनी यांनी जगातल्या प्रमुख दहा धर्मांची निवड केली होती. हा घंटानाद झाला आणि जगातून आलेले सर्व धर्माचे प्रतींनिधी मिरवणुकीने सभागृहकडे निघाले. या मिरवणुकीत सर्वात पुढे अमेरिकेतील चर्चचे मुख्य पदाधिकारी कार्डिनल गिबन्स आणि परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स कॅरोल बॉनी, त्यामागे कोलंबियन एक्स्पोझिशन च्या महिला अध्यक्षा मिसेस पॉटर पामर व उपाध्यक्षा मिसेस चार्ल्स एच. हेंरोटीन आणि त्यामागे सर्व प्रतींनिधी या क्रमाने मिरवणुकीत सहभागी झाले होते. यातून जागतिक सर्वधर्माचे, अनेकरंगी विविधतेचे दर्शन होत होते.चार ते पाच हजार लोक उपस्थित होते तरी निस्तब्ध शांतता पसरली होती. सर्वांच लक्ष वेधून घेणारे ते दृश्य होतं. सर्वांच्या मनात कुतूहल आणि उत्कंठा होती. मिरवणूक सभागृहात प्रवेशली. सभागृहात पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा दोन प्रमुख गटात प्रतींनिधींना बसण्याची व्यवस्था केली होती. हे व्यासपीठ पन्नास फुट लांबीचे आणि दहा फुट रुंदीचे होते.
भारतातून आलेले इतर प्रतींनिधी होते, बुद्धधर्माचे धर्मपाल,जैन धर्माचे विरचंद गांधी, ब्राह्म समाजाचे प्रतापचंद्र मुजूमदार व बी. बी. नगरकर, थिओसोफिकल सोसायटीच्या डॉ. अॅनी बेझंट व ज्ञानचंद्र चक्रवर्ती.
सर्वजण आसनास्थ झाले. सभागृहात ऑर्गनचे गंभीर सूर उमटले आणि सर्वांनी उभं राहून प्रार्थना व श्लोक म्हटले. एका सुरात जणू सर्वजण जगन्नियंत्याची प्रार्थना करत होते, हा ऐतिहासिक क्षण होता.
पहिला दिवस उद्घाटन कार्यक्रमाचा होता.सुरूवातीला सर्व धर्म प्रतींनिधींचे स्वागत करणारी भाषणे झाली. एमजी त्याला उत्तर देणारी प्रतिनिधींची आठ भाषणे झाली. विवेकानंद हे सारं वातावरण भारलेल्या मनाने पाहत होते अनुभवत होते. विशाल जंसमूह पद्धतशिरपणे आखलेला एक सुंदर कार्यक्रम त्यांना प्रथमच पाहायला मिळत होता. याचवेळी त्यांना आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव झाली होती. नाव पुकारल्या नंतर एकामागून एक वक्त्यांची भाषणे होत होती .उत्तम प्रतिसाद मिळत होता.
विवेकानंद पुरते गोंधळून गेले होते, आत्मविश्वास वाटेना, आपण बोलू शकू का? घसा कोरडा पडला . छाती धडधडत होती. शब्द फुटेना. कारण ते काहीच तयारी करून आले नव्हते. सर्वजण तयारीने आले होते . दोन तीन वेळा नाव पुकारले तर आता नको म्हणून ते उठले नव्हते. ते अनेक वेळा असे बोलले असतांनाही भीती वाटत होती कारण आताचा प्रेक्षक वेगळा होता,
शिकागो शहरातले उच्च विद्याविभूषित श्रोते समोर होते. ख्यातनाम विद्वान होते. विचारवंत होते, पत्रकार होते. सार्या जगातून आलेले प्रतींनिधी विद्वान प्रवक्ते तर होतेच, पण ते अधिकृत प्रतिनिधी होते. त्यांच्या मागे त्यांची संस्था उभी होती. आपल्या मागे तर कोणीच नाही. म्हणून विवेकानंद यांचा धीर सुटला होता एका क्षणी. पण अचानक उपनिषदातील ‘अहम ब्रह्मास्मि’ हे वचन मनात चमकले आणि त्याच क्षणी त्यांच्या हृदयात सामर्थ्य संचारले.
दुपारच्या सत्रात चार प्रतिनिधींची भाषणे झाली. आता पुन्हा विवेकानंदांचे नाव पुकारले गेले. तेंव्हा त्यांच्या शेजारी बसलेल्या फ्रेंच प्रतींनिधी जी.बॉनेट मॉवरी त्यांना म्हणाले, ‘आता थांबू नका, बोला! तेंव्हा विवेकानंद आसनावरून उठले, विद्येची देवता सरस्वतीचे मनोमन स्मरण केले. समोरील प्रेक्षकांवरुन दृष्टी फिरवली आणि म्हणाले,
“अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधुनो” या पाहिल्याच वाक्याला कंठाळ्या बसणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. अनेकांच्या भाषणाला टाळ्या पडल्या होत्या पण पाहिल्याच संबोधनाला असा प्रतिसाद नव्हता मिळाला, त्यांनाही आश्चर्य वाटले. टाळ्या थांबण्याची वाट पाहत विवेकानंद थांबले होते. शांतता झाल्यावर पुन्हा बोलायला सुरुवात केले. “सुंदर शब्दांमध्ये जे आपले स्वागत केले गेले आहे त्याबद्दलचा आनंद अवर्णनीय आहे. जगातील सर्वात प्राचीन असा हिंदू धर्म, त्यातील सर्वसंगपरित्यागी संन्याशांची परंपरा यांच्या वतीने मी जगातील सर्वात नवीन अशा अमेरिकन राष्ट्राला मन:पूर्वक धन्यवाद देतो”. त्यांनी परिषदेच्या आयोजकांचे आभार मानले. आधी बोललेल्या वक्त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रत्येक मताबद्दलची सहिष्णुता आणि सर्व जगातील धर्म विचारांच्या बाबतीतली स्वीकारशीलता हे हिंदू धर्माचे वैशिष्ठ्य आहे असे सांगून, पारशी लोक आपल्या जन्मभूमीतून बाहेर फेकले गेल्यानंतर त्यांनी भारताचा आश्रय घेतला. त्यांना निश्चिंत पणे राहण्यासाठी आसरा मिळाला. ही ऐतिहासिक घटना सांगून, अशा देशातून आपण आलो आहोत आणि अशा धर्माचा मी प्रतींनिधी आहे याचा आपल्याला अभिमान वाटतो. सार्या जगातून इथे आलेल्या सर्व धर्म प्रतिनिधींच्या स्वागतासाठी आज सकाळी जी घंटा वाजवली गेली, ती सर्व प्रकारच्या धर्म वेडेपणाची मृत्युघंटा ठरेल, लेखणी किंवा तलवार यांच्या सहाय्याने केल्या जाणार्या मानवाच्या सर्व प्रकारच्या छळाच्या तो अंतिम क्षण असेल आणि आपआपल्या मार्गाने एकाच ध्येयाच्या दिशेने चाललेल्या मानवांपैकी कोणाविषयीही कोणाचाही कोणत्याही प्रकारचा अनुदार भाव यानंतर शिल्लक राहणार नाही. असा मला पूर्ण विश्वास आहे”. असे पाच मिनिटांचे आपले भाषण विवेकानंदांनी थांबवले. आणि पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
हे छोट भाषण उत्स्फूर्त आविष्कार होता. विवेकानंदांनी परिषदेच्या उद्दिष्टालाच स्पर्श केला होता. स्वागतपर भाषणाला उत्तर म्हणून अशी चोवीस भाषणे झाली त्यात विवेकानंदांचे विसावे भाषण होते. अजून खरा विषय तर मांडला जायचा होता. ही परिषद सतरा दिवस चालू होती. रोजतीन तीन तासांची तीन सत्रे होत.
पहिल्याच दिवशीच्या प्रतिसादाने आणि एव्हढ्या अडचणी पार पाडून झालेल्या सहभागाने विवेकानंद खर तर शिणले होते पण रात्री अंथरुणावर पडल्यावर झोप न लागता डोळ्यासमोर समृद्ध अमेरिका आणि आपली दीन दरिद्री मातृभूमी यामधलं प्रचंड अंतर बघून आपल्या देशबांधवांच्या विषयी त्यांच्या मनात करुणा दाटून आली, अस्वस्थ होऊन डोळ्यातून अश्रु वाहू लागले. सकाळच्या यशानंतर पण ते हुरळून नाही गेले तर, जगन्मातेला त्यांनी म्हटले, “माझ्या देशबांधवांचं अपार दारिद्र्य दूर होणार नसेल तर हे नाव आणि किर्ती घेऊन मला काय करायचं आहे? कोण जाग आणेल भारतातल्या सर्व सामान्य जनतेला? जगन्माते कृपा कर, ते कसं करता येईल याचा मला काही मार्ग दाखव”.
☆ मेरा देश सहीमे बदल रहा है… लेखक – श्री हेमंत केळकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
आज भुसावळ ते गोवा जातांना रेल्वे मध्ये आलेला सुखद अनुभव..
अचानक मित्राच्या 2 वर्षाच्या मुलाला ताप आला.. जवळ कसल्याही औषधी नाहीत.. डेस्टिनेशन मडगाव पोहचायला 7 तास अवधी.. विचार आला पुढच्या स्टेशन ला उतरू आणि एकदा डॉक्टरला दाखवू मग पुढचा प्रवास बाय रोड करू.. सहज म्हणून ट्रेन मध्ये सामान विकणाऱ्याला म्हटलं आम्हाला काही औषधी हव्या आहेत.. पुढच्या स्टेशन ला व्यवस्था करून दे, तुला खर्च पाण्याला 500 रुपये देतो.. तो विक्रेता म्हणाला काही गरज नाही TC ला भेटा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल.. TC ला लगेच भेटलो.. सरकारी नोकरांची तत्परता उभ्या आयुष्यात मी इतकी कधीच अनुभवली नव्हती.. हातातलं काम सोडून त्याने समोर फोन लावला.. आमचा सीट नंबर आणि मेडिकल कंडिशन नोट केल्यात आणि आम्हाला सीट वर जायला सांगितलं… समाधानाची अपेक्षा नव्हती.. पुढच्या स्टेशन वर उतरून माझ्या मित्राच्या मुलाला दवाखान्यात दाखवून बाय रोड च आम्ही प्लॅन केलाच होता.. आम्हाला वाटल एखादा मुलगा येईल पेपर मध्ये गुंडाळून गोळ्या देईल..पण पुढच्या स्टेशन ला अक्षरशहा डॉक्टर त्यांचा असिस्टंट सोबत आमच्या सीट वर हजर.. सोबत TC सुद्धा होते.. तपासल्या नंतर लगेच त्यांनी Assistant ला आम्हाला काही सिरप च्या बॉटल द्यायला लावल्या.. कसं घ्यायचं हे सांगून लगेच TC ला सांगितलं कि ह्यांना पॅन्ट्री मधून मीठ पाठवा.. TC ने लगेच फोन लावला.. मिठाच्या पाण्याच्या पट्टी कपाळावर फिरवायला सांगितलं आणि निघून गेले.. आम्ही आवाज देऊन किती पैसे झाले म्हणून विचारलं तर हे सगळं विनामूल्य होतं..आश्चर्य च्या धक्क्यातच सीट वर पोहचलो तोपर्यंत पॅन्ट्री वाला मीठ घेऊन हजर..
मेरा देश सहीमे बदल रहा है..
काय करायचं राव — त्या पेट्रोलला काय पिऊन घ्यायचं का……
अशी होत असलेले सुधारणा हे मिडीया / पेपर वाले दाखवत नाही. बदल होत आहे.आपणसुद्धा आपल्या नातेवाईकांना व मित्रमंडळींना कळवावे. वेळ लागेल, पण आपण झालेला व होत असलेला बदल अनुभवत आहोत.
लेखक : हेमंत केळकर
संग्राहक : माधव केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈