मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ थेट चीनमधून…डाॅ.अचल श्रीखंडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ थेट चीनमधून…डाॅ.अचल श्रीखंडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे खरं आहे. परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कुठेही नाही. जगभरात दाखवण्यात येतंय तशी काहीही परिस्थिती चीनमध्ये नाही. कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे, अशा आशयाच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या आहेत. 

चीनमध्ये पसरणारा व्हेरियंट हा ओमिक्रॉन आहे. तो वेगाने पसरतो आहे, परंतु अतिशय माईल्ड आहे. तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत.

बहुसंख्य रुग्ण हे असिम्टोमॅटिक आहेत. मी ज्या आंतरराष्ट्रीय रुग्णालयामध्ये काम करतो, तिथेही अशी स्थिती नाही. रुग्णालये रुग्णांनी भरलेली नाहीत. ॲाक्सिजनची कमतरता नाही. लोकांना व्हेंटिलेशनवर जाण्याची गरज पडत नाही. मृत्युदर हा अत्यंत कमी असून तो केवळ ६० वर्षानंतरच्या काही रुग्णांमध्ये आढळतो. क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत, त्यांना सात दिवसांसाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यांवर मोकळे फिरत आहेत. मॉल्समध्ये जात आहेत आणि आनंद घेत आहेत. कोणीही कशाही पद्धतीच्या चिंतेमध्ये नाही.

डोकं दुखणं, नंतर ताप येणं ही सर्वसामान्य लक्षणे असून त्यावर पॅरासिटामॉल देणं हाच उपचार करण्यात येतोय. तीन दिवसांपर्यंत लोक बरे होतात. सातव्या दिवशी पुन्हा कोरोना चाचणी केली जाते आणि ती व्यक्ती कामावर परतू शकते.

चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असून त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत. त्यामुळे भारतीयांनी कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नाही.

– डॉ. अचल श्रीखंडे

शांघाय, चीन येथील भारतीय वंशाचे डाॅक्टर.

(माहितीचा सोर्स : एबीपी माझा)

संग्रहिका : सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ ४ पैसे कमवणे म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

मुलाने काही कमावले तर ४ पैसे घरात येतील

किंवा

४ पैसे मिळवण्यासाठी माणूस रात्रंदिवस काम करतो.

मग या तथाकथित पैशांमध्ये केवळ ४ पैसे का ?

३ किंवा ५ पैसे का नाहीत हा प्रश्न आहे..?

चला तर मग वडीलधाऱ्यांकडून  तपशील जाणून घेऊन ४ पैसे कमवा ही म्हण समजून घेऊ या.

पहिला पैसा

विहिरीत टाकण्यासाठी.

 दुसऱ्या पैसा

कर्ज फेडणे.

तिसऱ्या पैसा

पुढचे देणे भरणे

चौथा पैसा

भविष्यासाठी जमा करणे

या प्रकरणाची गुंतागुंत सविस्तरपणे समजून घेऊ या.

१.  विहिरीत एक पैसा टाकणे.

म्हणजे – स्वतःच्या कुटुंबाची आणि मुलांची पोटे भरण्यासाठी वापरणे.

२. कर्ज फेडण्यासाठी दुसरा पैसा वापरा.

 आई-वडिलांच्या सेवेसाठी..,

 ते ऋण फेडण्यासाठी त्यांनी आमची काळजी घेतली, आमचे पालनपोषण केले आणि मोठे केले.

३. पुढील (मुलांचे) कर्ज फेडण्यासाठी तिसरा पैसा वापरणे.

तुमच्या मुलांना शिक्षित करा, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे मोजा.

 (म्हणजे – भविष्यातील कर्ज)

४.  चौथा पैसा पुढील (पुण्य) ठेवीसाठी वापरणे.

म्हणजे – शुभ प्रसंग, अशुभ प्रसंग, परोपकाराच्या अर्थाने,  गरजवंतांची सेवा करणे आणि असाहाय्यांना मदत करणे, या अर्थाने..!

 तर.. ही ४ पैसे कमावणारी गोष्ट आहे.  आपल्या प्राचीन कथांमध्ये किती उच्च विचार आहेत..!

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – विरजण ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🙊 विरजण ! 🤠 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“नमस्कार, नमस्कार ! बोल आज काय काम काढलस ?”

“थोडं दही हव होत विरजण लावायला.”

“ती वाटी खाली ठेव आणि बस बघु आधी खुर्चीवर.”

“पण पंत विरजण… “

“त्याची कसली काळजी करतोस?  मी सांगतो हिला तुला विरजण द्यायला, पण त्याच्या आधी माझ एक काम आहे तुझ्याकडे.”

“बोला ना बोला पंत, तुम्ही माझ्यासाठी एवढं… “

“जास्त मस्काबाजी नकोय, मला गेल्यावेळेस जसा डोंबिवलीच्या करव्यासाठी ट्रेनचा आवाज टेप करून दिला होतास ना…. “

“त्याच आवाजाची आणखी टेप हव्ये का तुम्हाला, देन डोन्ट वरी, संध्याकाळी ….”

“उगाच गुडघ्याला बाशिंग लावलेल्या नवऱ्या सारखा उधळू नकोस, मी काय सांगतोय ते नीट ऐक.”

“सॉरी पंत, बोला.”

“अरे करव्याला त्या ट्रेनच्या आवाजाच्या टेपचा चांगलाच उपयोग झाला आणि त्याच्या झोपेचा पण प्रश्न सुटला, पण…. “

“पण काय पंत ?”

“अरे नुसता आवाज ऐकून त्याला झोप येईना. मला फोन करून सांगितलन तस.”

“मग ?”

“म्हणाला ‘या आवाजा बरोबर ट्रेन मधे बसल्याचा फिल यायला हवा, तरच झोप येईल’ आता बोल !”

“मग तुम्ही त्यांचा तो प्रॉब्लेम कसा काय सॉल्व केलात ?”

“अरे त्याला सांगितलं, झोपेच्या वेळेस तू नुसती ट्रेनच्या आवाजाची टेप चालू नको करुस, तुझ्याकडच्या रॉकिंग चेअर मध्ये बस आणि मग टेप चालू कर आणि मला सांग, तुला झोप येते की नाही.”

“मग आली का झोप कर्वे काकांना तुमच्या उपायाने?”

“अरे न येवून सांगते कोणाला, दहा मिनिटात त्याची गाडी खंडाळ्याचा घाट चढायला लागली !”

“पंत, पण कर्वे काका घरी रॉकिंग चेअर मधे बसून ट्रेनच्या आवाजाची टेप ऐकत होते ना, मग एकदम त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट कशी काय चढायला लागली ?”

“मी गेल्या वेळेसच म्हटले होत तुला, तुमच्या आजकालच्या पिढीचा आणि मातृभाषेचा काडीचाही……. “

“पंत तुम्हीच तर म्हणालात ना की कर्वे काकांची गाडी…. “

“अरे म्हणजे तो गाढ झोपून घोरायला लागला, आता कळलं?”

“मग त्यांची गाडी खंडाळ्याचा घाट… “

“अरे आमच्या पिढीचे ते मराठी आहे, तुला नाही कळायचं.”

“असं होय, पण आता तुमचं नवीन काम काय ते सांगा आणि मला विरजण देवून मोकळ करा !”

“हां, अरे करव्याचा झोपेचा प्रॉब्लेम मी सॉल्व केल्याची बातमी अंधेरीला राहणाऱ्या जोशाला, कशी कुणास ठाऊक, पण कळली.”

“बरं !”

“अरे त्याचा मला लगेच फोन, मला पण हल्ली रात्री झोप येत नाही, मला पण टेप पाठवून दे !”

“ओके, मी आजच संध्याकाळी ट्रेनच्या आवाजाची टेप… “

“अरे असा घायकुतीला येऊ नकोस, त्याला ट्रेनच्या आवाजाची टेप नकोय, विमानाच्या….. “

“आवाजाची टेप हवी आहे ?”

“बरोबर !”

“पण पंत विमानाच्या आवाजाची टेप कशाला हवी आहे जोशी काकांना ?”

“अरे त्याची अंधेरीची सोसायटी एअरपोर्टच्या फनेल झोन मधे आहे आणि…. “

“फनेल झोन म्हणजे काय पंत ?”

“अरे फनेल झोन म्हणजे, जिथे सगळ्या सोसायटया एअरपोर्ट जवळ असल्यामुळे कमी मजल्याच्या असतात आणि त्यांना दिवस रात्र विमानाच्या आवाजाचा प्रचंड त्रास होतो आणि…….”

“सध्या विमान वाहतूक बंद असल्यामुळे त्यांच्या आवाजा शिवाय जोशी काकांना पण रात्रीच्या झोपेचा प्रॉब्लेम झाला आहे, बरोबर ? “

“बरोबर !”

“ओके, नो प्रॉब्लेम, संध्याकाळीच तुम्हाला विमानाच्या आवाजाची टेप आणून देतो, मग तर झालं ! आता मला या वाटीत जरा विरजण द्यायला सांगा बघु काकूंना.”

“अरे हो, हो, विरजण कुठे पळून चाललंय.  आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेस तर लगेच तुला विरजण देतो, बोल विचारू प्रश्न ?”

“हो, विचाराना पंत.”

“मग मला असं सांग, या जगात कोणी कोणाला प्रथम विरजण दिले असेल ?”

“अरे बापरे, खरच कठीण प्रश्न आहे हा आणि मला काही याच उत्तर येईलसे वाटत नाही.”

“मग तुला विरजण…… “

“थांबा पंत, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि त्याच उत्तर तुम्ही बरोबर दिलेत तर मला विरजण नको, ओके ?”

“मला माहित आहे तू मला तुझ्या बालबुद्धीने काय प्रश्न विचारणार आहेस ते.”

“काय सांगता काय पंत, मग सांगा बघू मी कोणता प्रश्न विचारणार आहे ते.”

“तोच सनातन प्रश्न, कोंबडी आधी की….. “

“चूक, शंभर टक्के चूक !”

“नाही, मग कोणता प्रश्न विचारणार आहेस ?”

“आधी मला प्रॉमिस करा, की तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, तर विरजण द्याल म्हणून !”

“प्रॉमिस, बोल काय आहे तुझा प्रश्न.”

“मला असं सांगा पंत, ज्याने पहिले घड्याळ बनवले, त्याने कुठल्या घड्याळात बघून त्याची वेळ लावली असेल ?”

“अं… अं…. अग ऐकलंस का, याला जरा वाटीत विरजण दे पाहू.”

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग – ५१ – दानशूर जॉन डी रॉकफेलर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग – ५१ – दानशूर जॉन डी रॉकफेलर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

मॅडम कॅल्व्हे  स्वामी विवेकानंद यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचे पुढचे आयुष्य बदलून गेलेले दिसते .कुठल्याही अडीअडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी, दु:खाच्या वेळी माणसाला योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आधार वाटतो आणि त्यातून तो सावरायला मदत होते, बाहेर पडायला मदत होते. एव्हढच काय, सर्व काही चांगलं असताना सुद्धा योग्य दिशा तर हवीच ना? तशी योग्य मार्गदर्शन करणारी, योग्य माणसंही आपल्याला माहिती हवीत. आजच्या काळात ती असायलाही हवीत.  

स्वामीजी शिकागो मध्ये इतर ठिकाणी ही फिरत होते. त्यांच्या संपर्कात वेगवेगळी माणसे येत होती. एव्हाना परिषदेपासून त्यांची चांगलीच प्रसिद्धी झाली होती.स्वामीजींच्या भेटीतून आपल्याला चांगले तत्वज्ञान समजू शकते, त्यांच्या चांगल्या विचारांनी योग्य दिशा मिळू शकते असा विश्वास तिथल्या लोकांमध्ये निर्माण झाला होता.जे जे त्यांना भेटत, त्यांच्या विचारात बदल होत असे.

अशीच एका धनवंताची भेट स्वामीजिंबरोबर झाली. ते होते जॉन डी. रॉकफेलर.( जन्म-८ जुलै १८३९ मृत्यू २३ मे १९३७) मोठे व्यावसायिक होते. तेलसम्राट म्हणून ओळखले जात होते.

रॉकफेलर घराणे हे  प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपतींचे दानशूर घराणे. आधुनिक खनिज तेल उद्योगाचा विकास करण्याचा, त्याचप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणावर परोपकारी व जनहितकारक कृत्ये करण्याचे श्रेय या उद्योगसमूहाला जाते. विशेषत: अमेरिकन वैद्यकशास्त्राला आधुनिकीकरणाचा साज देण्याचे कर्तृत्व या घराण्याचे आहे. जॉन हे या घराण्यातील पहिले उद्योगपती, Standard Oil उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेलउद्योगाचा संस्थापक. शिक्षण पूर्ण केल्यावर १८५९ मध्ये क्लार्क यांच्या भागीदारीत दलालीचा धंदा सुरू केला. १८५९ मध्ये अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया च्या टायटसव्हील मध्ये जगातली पहिली तेल विहीर खोदली गेली. १८६३ मध्ये जॉन यांनी ‘अँड्रूज, क्लार्क अँड कंपनी’ स्थापन करून तेलशुद्धीकरण उद्योग सुरू केला. दोन वर्षांनी ‘रॉकफेलर अँड अँड्रूज कंपनी’ स्थापन केली. १८८२ मध्ये ‘Standard Oil Trust’ या मोठ्या उत्पादनसंस्थेची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या नियंत्रणाखाली अमेरिकेतील ९५% तेलउद्योग, लोहधातुकाच्या खाणी, लाकूड कारखाने, वाहतूक उद्योग यांसारखे अनेक उद्योग होते.

जॉन यांनी १८९५ च्या सुमारास Standard Oil Company चे दैनंदिन व्यवस्थापन आपल्या सहकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास प्रारंभ केला होता. तेलउद्योगातून मिळणाऱ्या प्रचंड नफ्यापैकी बराचसा भाग बाजूला काढून तो लोहधातुकाच्या खाणी व न्यूयॉर्कमधील व्यापारी बँकिंग व्यवसाय या दोन अतिशय विकासक्षम उद्योगांकडे त्यांनी वळविले. मोठ्या प्रमाणावरील लोकोपकारविषयक कार्ये, हे जॉन यांच्या जीवनातील दुसरे मोठे वैशिष्ट्य होते. त्यामुळे ते तेलउद्योगापेक्षा या कार्याबद्दल अधिक ख्यातकीर्त झाले होते. हे किती विशेष म्हटले पाहिजे. आपल्याजवळील अफाट संपत्तीचा काही भाग जनकल्याणार्थ खर्च करणे आवश्यक आहे; नव्हे, ते आपले कर्तव्यच आहे, अशी त्यांची भावना होती. केवळ आपल्या वारसदारांना सर्व संपत्ती मिळणे इष्ट नसल्याचे त्यांचे ठाम मत होते. म्हणून त्यांनी अमेरिकेतील वैद्यकशास्त्र, शिक्षण तसेच संशोधन यांचा विकास व उन्नती यांकरिता लक्षावधी डॉलर खर्च केले. अनेक धर्मादाय संस्था उभारून त्यांचे संचालन सुयोग्य विश्वस्तांच्या हाती ठेवले व त्यांच्या दैनंदिन कार्यवाहीसाठी लोककल्याणाची तळमळ व आस्था असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी नेमले. अशा संस्थांद्वारा जॉन यांनी सुमारे साठ कोटी डॉलर रकमेचा विनियोग केला. अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमधील अतिशय हलाखीची शैक्षणिक अवस्था सुधारण्यासाठी ‘जनरल एज्युकेशन बोर्ड’ हे मंडळ व ‘शिकागो विद्यापीठ’ या दोन्ही संस्था त्यांच्या प्रचंड देणग्यांमधून स्थापन झाल्या.पुढेही शिकागो विद्यापीठास त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत सुमारे आठ कोटी डॉलर देणगीरूपाने दिले.

जॉन यांनी १९०२ मध्ये स्थापन केलेल्या ‘General Education Board’ या शैक्षणिक मंडळाचा अमेरिकेतील शिक्षणाचा वंश, धर्म, जात, लिंग यांचा विचार न करता विकास करणे हे उद्दिष्ट होते. १९५२ अखेर या मंडळाने आर्थिक अडचणीमुळे आपले कार्य थांबविले. पन्नास वर्षांच्या कालखंडात महाविद्यालये व विद्यापीठे, वैद्यकीय शाळा, शैक्षणिक संशोधन प्रकल्प व शिष्यवृत्त्या अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी मंडळाने पैसे खर्च केले. १९०१ मध्ये रॉकफेलर वैद्यकीय संशोधन संस्था न्यूयॉर्कमध्ये स्थापण्यात आली. आरोग्यशास्त्र, शस्त्रक्रिया, वैद्यक व तदनुषंगिक शास्त्रे यांच्या संशोधन कार्यात मदत, रोगांचे स्वरूप, कारणे व निवारण या कार्यात मदत व संशोधन आणि यांविषयी झालेल्या व होणाऱ्या संशोधनाचा व ज्ञानाचा सार्वजनिक कल्याणार्थ प्रसार करणे अशी या संस्थेची उद्दिष्टे होती. पुढे याच संस्थेचे रॉकफेलर विद्यापीठामध्ये रूपांतर करण्यात आले. जगातील मानवजातीच्या कल्याणाचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉकफेलर प्रतिष्ठान या लोकोपकारी संघटनेची १४ मे १९१३ रोजी स्थापना करण्यात आली.

जॉन यांचे सुरूवातीचे दिवस –

खरं तर जॉन अमेरिकेतल्या न्यूयॉर्क जवळील रिचफोर्ड या खेड्यात राहणारा सर्व सामान्य कुटुंबातला मुलगा होता. वडीलही पोटापाण्यासाठी साधं काहीतरी काम करायचे, जॉन मोठा झाल्यावर गावच्या बाजारात भाजी, अंडी असे विकू लागला.मग पुस्तकाच्या दुकानात काम करू लागला. थोडे पैसे साठवून पेनसिल्वेनिया मध्ये जाऊन नगरपालिकेच्या रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरविण्याच काम करू लागला. इथे थोड स्थैर्य मिळालं. इतर गावातही रस्त्यावरील दिव्यांसाठी रॉकेल पुरवण्याचे काम प्रयत्न करून मिळवलं. यातून तेलाचं महत्व ओळखून जॉन बरेच काही शिकला होता आणि भविष्यात ज्याच्याकडे तेल त्याचेच हे जग हे त्याने ओळखले. मग ऑइल रिफायनरीत पैसे गुंतवले. तेल विहीरींचे पीक आले. आणि बुडीत तेलविहीर कंपनी रॉक फेलर ने लिलावात विकत घेतली. ती म्हणजेच स्टँडर्ड ऑइल. आता जॉन च्या हातात सगळ आलं. तेलाच्या ऑर्डर मिळत होत्या. त्याला रिफायनारीची जोड दिली. तेल साठवण्यासाठी पत्र्याचे डबे लागत त्याचाही कारखाना स्वत:च घातला. एका राज्यातून हे डबे वाहतूक करायला स्वत:चे  टँकर्स बनवले. पुढे रेल्वे वॅगन ची गरज होती तेही तयार केले आणि त्या वॅगन, ने आण करण्यासाठी स्वत:चा रेल्वे मार्गही टाकला . इतकी मेहनत करून आपल साम्राज्य त्याने उभ केलं होत. सदैव सैनिका पुढेच जायचे या चालीवर …..  हा जॉन पुढे पुढे जातच होता, प्रगती करत होता.  

 एव्हढं माहिती करून देण्याचं कारण म्हणजे इतका हा प्रगती केलेला, श्रीमंत झालेला माणूस एका हिंदू तत्वज्ञानाच्या संपर्कात आल्यावर त्याचे मन कसे परिवर्तन होऊ शकते त्याचं हे उदाहरण आहे. तेही परदेशात हे विशेष.

रॉकफेलर यांचे एक व्यावसायिक सहकारी मित्र होते, त्यांच्याकडे स्वामीजी राहत असताना ते जॉन यांना आग्रह करीत की, ‘एकदा स्वामी विवेकानंदांना तुम्ही भेटा’. पण जॉन स्वाभिमानी होते, त्यांना कुणी सुचवलेले मान्य होत नसे. पण एकदा अचानक त्यांच्या मनात आले विवेकानंदांना भेटायचे आणि म्हणून, ते स्वामीजींना भेटायला त्या सहकार्‍याकडे पोहोचले. कुठलाही शिष्टाचार न पाळता जॉन सरळ विवेकानंद यांच्या खोलीत गेले. स्वामीजी त्यांच्या खोलीत योग अवस्थेत बसले होते. त्यांनी मान सुद्धा वर केली नाही. पाहिले नाही. जॉन बघतच राहिले. थोडा वेळ गेल्यानंतर, स्वामीजी म्हणाले, “तुम्हाला जी संपत्ती मिळाली आहे, ती तुमची नाही. तुम्ही केवळ एक माध्यम आहात. तुम्ही लोकांचं भलं करावं. इतरांना सहाय्य करण्याची, त्यांचं कल्याण करण्याची संधी तुम्हाला मिळावी, म्हणून ईश्वराने ही संपत्ती तुम्हाला दिली आहे”. हे ऐकून मनातून दुखावलेले रॉकफेलर तडक घरी आले ते हा विषय डोक्यात घेऊनच. एक आठवड्याने पुन्हा ते स्वामी विवेकानंद यांना भेटायला गेले. तेंव्हाही स्वामीजी योग अवस्थेतच बसलेले होते. रॉकफेलर यांनी एक कागद स्वामीजींपुढे टाकला. त्यावर, आपण एका सार्वजनिक संस्थेला भरघोस देणगी देण्याचे ठरविले आहे असे लिहिले होते.आणि म्हणाले,आता यामुळे तुमचे समाधान होईल आणि त्यासाठी तुम्ही माझे आभार मानायला हवेत. विवेकानंद यांनी कागदावरून शांतपणे नजर फिरवली पण वर पाहिले नाही आणि म्हणाले, “ठीक, यासाठी तुम्ही मला धन्यवाद द्यायला हवेत”. मनस्वी असलेले रॉकफेलर यांची ही पहिली मोठी देणगी होती. विशेष म्हणजे, १८९५ पासून त्यांच्या गाजलेल्या कल्याणकारी निधींचा प्रारंभ झाला. म्हणजे एका क्षणी स्वामीजींच्या भेटीत लोकांसाठी आर्थिक सहाय्य करावं या सूचनेचा राग आलेले रॉकफेलर यांनी आता कल्याणकारी निधिला सुरुवात केली हा मोठा बदलच होता. पुढे त्यांच्या मानव सेवा कार्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, “मानवी जीवनात केवळ पैशाचा संग्रह करत बसण्यापेक्षा मोलाचं असं काहीतरी आहे, संपत्ती हा माणसाच्या हातात असलेला केवळ एक विश्वस्त निधि आहे त्याचा त्याचा अयोग्य पद्धतीने वापर करणे हे पाप आहे. जीवनात अखेरच्या क्षणाला उत्तम प्रकारे सामोरं जाण्याची तयारी करणं म्हणजेच सतत दुसर्‍यासाठी जगत राहणं होय आणि ते मी करतो आहे”. हाच होता स्वामीजींच्या संपर्काचा प्रभाव.

रॉकफेलर घराण्याने वैद्यक, शिक्षण, कला, सांस्कृतिक घडामोडी इत्यादी क्षेत्रांना प्रचंड प्रमाणावर आर्थिक साह्य देऊन मानवजातीचे कल्याण व विकास अव्याहत होत राहील यासाठी प्रतिष्ठाने व विविध निधी उभारून दानशूरतेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे.

असे अनेक लोक स्वामीजींना भेटत होते. परिषद संपल्यानंतर पावणेदोन महीने आसपासच्या गावांमध्ये त्यांची व्याख्याने पण झाली. त्यांनी व्याख्यानांसाठी एक करार केला होता. स्लेटन लायसियम ब्यूरो या संस्थेशी तीन वर्षांचं करार केला की त्यांनी व्याख्याने द्यायची त्या बदल्यात स्वामीजींना पैसे दिले जातील. असे केल्यास पैसा जमवून तो भारतातल्या कामासाठी उपयोगी पडेल असे स्वामीजींना पटवण्यात आले होते. दौर्‍यातील पहिले व्याख्यान झाल्यावर स्वामीजींना 100 डॉलर्स देण्यात आले. त्यामुळे असा कार्यक्रम सुरू झाल्याने स्वामीजींची धावपळ, सतत प्रवास, मुक्काम सुरू झाले. दमछाक झाली. करार झाल्यामुळे तो एक व्यापार झाला होता ते अनुषंगुन  काम करणे भाग होते आणि हे आपल्याला शक्य नाही असे अनुभव घेतल्यानंतर स्वामीजींच्या लक्षात आले.

दौरा ठरविणारी ब्यूरो व्यवसाय म्हणून त्याकडे बघत असते. जाहिरात, वृत्तपत्रे प्रसिद्धी, व्याख्यानांचे भित्तिपत्रके असा दिनक्रम स्वामीजींना नकोसा झाला. यावेळी मेंफिस इथं आठवडयाभरचा मुक्काम झाला आणि स्वामीजी सुखावले.१३ ते २२ जानेवारी १८९४ मध्ये ते मेंफिसला थांबले.हयू एल ब्रिंकले यांचे पाहुणे म्हणून ते मिस व्हर्जिनिया मून यांच्या निवासगृहात उतरले होते. त्या नुसते निवासगृह चालवीत नव्हत्या तर गोरगरिबांना सढळ हाताने मदत करणे हे ही काम करत. त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे त्या मेंफिस मध्ये प्रसिद्ध होत्या. इथे त्यांची दोन व्याख्याने झाली. मेंफिसला जरा त्यांना शांतता लाभली. इथे पत्रकारांनी वृत्तपत्रासाठी  मुलाखती घेतल्या, वेगवेगळ्या लोकांच्या घरी भेटी,परिचय, चर्चा झाल्या.  स्वामीजींच्या विचारांनी पत्रकार सुद्धा भारावून गेले होते.

वुमेन्स कौन्सिल मध्ये १६ जानेवारीला मानवाची नियती या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यात ते म्हणाले, “ परमेश्वराची भीती वाटणे हा धर्माचा प्रारंभ आहे. तर त्याच्याविषयी प्रेम वाटणे ही धर्माची परिणती आहे. मानवाचं मूलभूत पाप या सिद्धांतात वाहून जाऊ नका. जेंव्हा अॅडमचा अध:पात झाला, तेंव्हा तो पवित्रतेपासून झाला. त्याच्या पावित्र्याला ढळ पोहोचला,हे पतनाचे कारण. तेंव्हा मूळ आहे ते पावित्र्य. पतन नंतरचं आहे”. हे त्यांचे उद्गार श्रोत्यांची मने हेलावून गेले.मेंफिस च्या आठ दिवसाच्या मुक्कामात कळत नकळत स्वामीजींनी लोकांच्या मनात अध्यात्मिकतेच्या विचारांचे बीज पेरले होते. सर्वांचा प्रेमळ निरोप घेऊन मेंफिसहून स्वामीजी शिकागोला परत आले . तीन आठवडे राहिल्यानंतर, तिथून ते  डेट्रॉईटला आले.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मन ! संस्कृत आणि प्राकृतातही एकच शब्द, काय आहे हो याची व्याख्या ?

“The heart is situated at the left side in the human body“–असं हृदयाबद्दल खात्रीशीर सांगितलं जातं मग मनाचं काय? कुठे असते ते वसलेलं ? हृदयात? हृदयाच्या पाठीमागे ? शरीराच्या उजव्या बाजूस ? मेंदूत ? नेमके कुठे? काहीच सांगता येत नाही ना? 

बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात’. असंच काहीसं मनाचं स्थान आहे. शरीरात कधीच स्थिर नसणारे मन, ठावठिकाणा नसणारे मन, आपल्या शरीरावर ,जीवनावर मात्र प्रभावशाली अंमल करते. हृदयाची जागा खात्रीशीर असून देखील ते कधीकधी कमजोर असते ,नव्हे ते कमजोर असले तरी चालते कदाचित ! त्यावर उपचार करता येतात.. पण मन कमजोर असेल तर? तर मात्र माणूस पूर्ण दुबळा होतो. त्याची जगण्याची दिशा बदलते, त्याची आकांक्षा ,उमेद सर्वच नष्ट होते.

A sound mind in a sound body असं म्हटलं आहे ते उगाच नव्हे ! ‘ मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ‘!! असं तुकारामांनी म्हटलंय; कारण माणसाचे मन शुद्ध असेल तर त्यात सर्व भाव शुद्ध येतात, अन कर्मेही शुद्धच होतात.स्वच्छ पाण्यात सभोवतालचा परिसर स्वच्छच  दिसतो. तसेच मनाचे देखील आहे.  मनापासून केलेले कोणतेही काम मनाला आनंद ,उत्साह ,उभारी देते अन मन प्रसन्न करते. आणि त्यावरच त्या कामाची यशस्वीता देखील अवलंबून असते . वरवर केलेले काम भलेही चांगले दिसले तरी स्वतःस समाधान देत नाही . मन लावून केलेली देवपूजा मन शांत करते ,चित्त प्रसन्न करते. मन लावून धुतलेले कपडे ,घासलेली भांडी कशी स्वच्छ ,चकचकीत होतात ! मन लावून केलेला स्वयंपाक रुचकर होतो अन भूक तृप्त करतो .मनापासून केलेला अभ्यास ज्ञान वाढवतो.  मनापासून गायलेलं गाणं हृदयास भिडते ,असे सर्व काही मनाच्या ओलसर भूमीतून अंकुरते .

  एवढ्याश्या मनाची व्याप्ती मात्र खूप मोठी असते. शक्ती तर कितीतरी पट मोठी असते. म्हणून पंगूसुद्धा हिमशिखरे ओलांडतात, नावेशिवाय नदीचा तीर गाठतात. ‘ मन कधी कधी इतके छोटे होते की चिमटीहून लहान जागेत मावते अन कधी इतके मोठे  होते की त्यात सारे अवकाश सुद्धा समावते ‘….. 

‘मन एवढं एवढं जणू खाकशीचा दाणा 

 मन केवढं केवढं त्यात आभाय मायेना !’

मनोव्यापारावर मानवी देह व जीवन अवलंबून आहे. कधी ते आकाशात स्वैर भरारी मारते तर कधी फांदीवर बसून हिंदोळते. कधी चांदणे बनते तर कधी गच्च काळोख ! कधी भिरभिरते तर कधी स्थिर बसते ! अगदी निमिषार्धात ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाते.आपल्या प्रिय व्यक्तीपाशी पोचते. त्याच्याशी हितगुज करते, कधी रुसते तर कधी हसते, कधी खट्टू होते तर कधी लट्टू !

या जगात सर्वात वेगवान काय असेल तर ते मन ! एवढे मात्र खरे की, मन उत्साही असेल तर जीवन उत्साही प्रवाही राहते. मनाला कीड लागली , आजार लागला तर देह कितीही सशक्त असला तरी कमजोर बनतो, आजारी पडतो .

मन तरुण असेल तर ते म्हातारपणही टवटवीत बनवते, आणि मन म्हातारे असेल तर तारुण्यातही म्हातारपण येते. म्हणूनच मनाला हवे जपायला फुलासारखे ! मग बघा या फुलाभोवती किती रंगीबेरंगी आनंदाची फुलपाखरे रुंजी घालतात अन जीवन मधाळ फुलपाखरी होते !…. फुलपाखरू खरेच  छान किती  दिसते !!

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? विविधा ?

☆ बाहर उजाला, अंदर विराना… ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) 

पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे

मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे

बाहर उजाला है, अंदर विराना

एखाद्या गाण्यातल्या काही ओळी आपल्याला  आतून बाहेरून हादरून सोडतात, तशा या ओळी आहेत. जेव्हा जेव्हा मी या ओळी ऐकतो तेव्हा तेव्हा मी आतून बाहेरून हादरून निघतो. पुन्हा पुन्हा या ओळींचा विचार करतो. सभोवतार काय चालले आहे पाहतो,  वृत्तपत्रातील मथळा वाचतो, टिव्हीवर मुख्य बातम्या ऐकतो आणि पुन्हा या ओळींकडे येतो. अनेकांच्या कहाण्या या ओळींशी मिळत्या जुळत्या सापडतात. अगदी माझ्या आयुष्यातील काही काळ काही क्षण या ओळींशी मिळते जुळते सापडतात.

सुप्रसिद्ध गीतकार गुलझार यांनी लिहिलेले गीत आहे हे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी याला संगीत दिले आहे तर भारतरत्न लता मंगेशकर यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायीकेचा राष्ट्रीय पुरस्कार या गाण्याला मिळाला तर सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्म फेअर पुरस्कार या गाण्याला मिळाला.

आपल्या आयुष्यात असाही काळ येतो जेव्हा कोणीच सोबत नसल्याची भावना होते, अगदी परमेश्वरसुद्धा आपल्यावर रूसून बसला आहे की काय असे वाटू लागते. नेमक्या याच भावनेला गुलझार यांनी शब्दांच्या चिमटीत नेमके पकडले आहे – पैरों में ना साया कोई, सर पे ना साईं रे. या काळात आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. या निर्णयांशी आपण आतून सहमत असतोच असे नाही पण तरीही हे निर्णय घेतोच. याच अवस्थेचे वर्णन करताना गुलझार म्हणतात – मेरे साथ जाए ना, मेरी परछाई रे. म्हणजे माझ्या सावलीनेही आता माझी साथ सोडली आहे.

बरे हे सगळे घडत असताना आजूबाजूचा सर्व समाजच दुःखी असतो का तर नाही. सुख दुःखाचे गणित न्युटनच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे आहे. जेव्हा एक दुःखी असतो, तेव्हा दुसरा कोणी सुखी असतो. काळाचे चक्र फिरत राहते आणि पहिला सुखी होतो तर दुसरा दुःखी होतो. पण या संक्रमणात आपल्या मनात मात्र वादळे उठतात. कारण बाहेर कोणी दसरा दिवाळी करत असताना आपल्या मनात मात्र सुतक चालू असते. या कडव्याचे शेवट याच भावनेतून  गुलझार यांनी केले आहे – बाहर उजाला है, अंदर विराना. बाहेर सगळीकडे उजळलेले आहे, आनंदी आनंद आहे आणि माझ्या आतमध्ये मात्र अंधार आहे, माझा आतमध्ये जणू ओसाड वाळवंट पसरलेले आहे.

तसे पाहिले तर संपूर्ण गाणेच भारी आहे. त्याला हृदयनाथजींच्या संगीताने सोन्याचेकडे लाभले आहे तर लतादीदींच्या स्वरांनी हे गाणे स्वर्गीय केले आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी हे गाणे ऐकलेच असेल. माझ्यासाठी पुन्हा ऐका.

लेखक : म. ना. दे.

(श्री होरापंडीत मयुरेश देशपांडे)

C\O श्री मंदार पुरी, पहिला मजला, दत्तप्रेरणा बिल्डिंग, शिंदे नगर जुनी सांगवी, पुणे ४११०२७

+९१ ८९७५३ १२०५९ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ एक मनोगत…डाॅ.दीपाली घाडगे ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

लिहायला हवंच खरं तर. हा विषय डोक्यात नव्हता. कालपासून ग्रुपवर मेसेज बघितल नव्हते. आत्ता पाहिले,आणि मग राहवलं नाही. मी स्वतःला तसं कधी मानत नाही, पण शेवटी सत्य तेच असतं. म्हणून विचार केला की इतक्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करते, आता विधवांचं देखील करावं.

मुळात मला स्त्रियांमध्ये विधवा, सधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता ,कुमारिका, असा भेद करणं मान्य नाही. सगळ्या पुरुषांच्या नावाच्या आधी श्रीयुत लावलं जातं, मग सौभाग्यवती आणि श्रीमती असा भेद का असावा ? थोडंसं परखड होईल पण पुढील गोष्टीवरुन लक्षात येतं की पुरुषप्रधान संस्कृतीमधील हे जोखड आहे, किंवा आपमतलबी पुरुषांनी तयार केलेली ही संस्कृती आहे.

समस्त स्त्रियांना नटण्याची, छान दिसण्याची आवड असते हा मुद्दा बाजूला ठेवला तरी —– मंगळसूत्र,मांग-टीका,जोडवी, सिंदूर ही आभूषणे काय दर्शवतात? या एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि त्या एका स्त्रीचं झालेलं नाही. फक्त एखाद्या पुरुषाला बघून कळतं का, तो अविवाहित आहे की विवाहित? स्त्रीकडे बघून मात्र लगेच लक्षात येतं आणि अंदाज देखिल बांधले जातात.

आता मुद्दा विधवा स्त्रियांनी ओटी भरून घेणं, हळदीकुंकू लावून घेणं– हे नाकारण्याचे, तिच्यावर हजारो वर्षापासून झालेले संस्कार आहेत, ” तू जर शुभकार्यात पुढे झालीस तर तिथे काही तरी अशुभ होईल.”—- मग कोणाला वाटेल की आपल्यामुळे कोणाचे वाईट व्हावे?—- मी एक स्वावलंबी, सुशिक्षित, पुरोगामी, काहीशी बंडखोर वृत्तीची असून सुद्धा काही वेळा माझ्या मनात असा किंतु क्षणैक का होईना येतो. मग ज्या महिला परावलंबी आहेत, कमवत नाहीत, त्यांच्या मनात भीती असणारच ना आणि सालोसाल चालत आलेल्या संस्कारांचे ओझे झुगारून देणे अजिबातच सोपं नसतं.

कोणत्याही धर्माबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतू = गार्गी मैत्री राहतात पुराणात. वर्तमानात अजूनही माझ्यासारख्या महिलेला ओवसायला जाताना कोणी हाक मारीत नाही, की वडाची पूजा करताना पर्यावरणाचा विचार करून सुद्धा कोणी बोलावीत नाही.—- तुम्ही साऱ्याजणी डॉक्टर आहात विचाराने पुरोगामी आहात. पण समाजातील हे प्रमाण किती टक्के? बहुसंख्य समाज झी मराठी आणि कलर्स प्रमाणे चालतो. तिथले सगळे सणवार हेव्यादाव्यांसह, श्रद्धा-अंधश्रद्धा यासह समाजात साजरे केले जातात.

कधी कधी वाटते, .. फुले, आंबेडकर, आगरकर, शाहू महाराज, यांचा पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का? सुदैवाने माझे सासर, माझ्या सर्व मैत्रिणी अतिशय पुरोगामी आहेत. त्या असा कोणताही भेदभाव करीत नाहीत. पण मला वाटायचे की असे व्यक्त व्हायची गरज का असावी? फक्त एका स्त्रीतत्वाने दुसऱ्या स्त्रीतत्वाचा सन्मान करणं जमू नये का? जसं पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माउली म्हणून भेटतो, त्याचप्रमाणे तू कोणीही अस– विधवा, सधवा, घटस्फोटिता अथवा कुमारी – तुझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्यातलं स्त्रीत्व सन्मान करतंय, आणि म्हणून मी तुला हळदीकुंकवाची दोन बोटं लावते, एवढं साधं आहे. – आणि हे जमू नये हे आपलं दुर्दैव.

बाकी मधु, विषयाला वाचा फोडल्याबद्दल खरंच आभारी आहे आणि सावंतवाडी वैद्य राण्यांमधील सर्व सख्यांचे पण आभार.

लेखिका – डॉ. दिपाली घाडगे, विटा..

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ छान सुंदर सखी – २०२३… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ छान सुंदर सखी – २०२३… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

१. एखादं अतिशय कष्टाचं काम मी आजच पूर्ण करीन अशी खुळी जिद्द कशासाठी, जेव्हा ते काम उद्या दुसरा कोणी तरी करणार आहे !! 

२. आपले कष्ट आणि मेहेनत दुसर्‍या कोणाला ठार मारणार नाहीत हे नक्की. पण उगीच चान्स् कशाला घ्या !!! 

३. आपल्या शेजार्‍यावर खूप प्रेम करा. पण पकडले जाणार नाही याची डोळ्यांत तेल घालून काळजी घ्या !! 

४. ऑफिसमध्ये आरडाओरड करू नका. झोपलेल्यांची झोप डिस्टर्ब करू नका !!! 

५. ग्रंथ अतिशय पवित्र असतात. त्यांना स्पर्श करून विटाळू नका !! 

६. प्राणी आणि पक्षी यांच्यावर प्रेम करा. ते खूपच टेस्टी असतात !! 

७. फळे, सॅलड्स अतिशय पौष्टिक असतात. ती आजारी रुग्णांसाठी राहू द्या. तुम्हाला इतर बरंच काही खाण्यासारखं आहे !!! 

८. आयुष्यात सुख-आनंद म्हणजेच सर्वस्व या भ्रमात राहू नका. लग्न करा !!! 

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “’सलाम’ आणि बरंच काही…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “’सलाम’ आणि बरंच काही…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट☆

प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वयापरत्वे, काळापरत्वे बदलत जातात. वाचन ही आपली प्रमुख आवड असली तरी त्याचे विषय, लेखक हे हळूहळू बदलत जातात. साहित्याची मुळातच आवड असल्याने अशाच वयाच्या एका वळणावर पाडगावकरांच्या कवितांची जबरदस्त फँन होते,नव्हे अजूनही आहेच म्हणा. नुकताच  मंगेश पाडगावकरांचा स्मृतीदिन झाला. त्यांना आणि त्यांच्या साहित्यातील योगदानाला कोटी कोटी प्रणाम.

प्रत्येक भाषा आणि त्या त्या भाषेतील सौंदर्य हे वेगवेगळं असतं.त्या भाषांमधील साहित्याची एकमेकांत तुलनाच होऊ शकत नाही. परंतु सगळ्यात प्रिय म्हणालं नं तर बहुतेक प्रत्येकाला आपली स्वतःची मायबोलीच असते. ह्या मायबोलीलाच मायमराठी म्हणू वा मातृभाषा म्हणू. मला तर ह्या मराठीमधील साहित्य वाचतांना अतीव समाधान, आनंद भरभरून मिळतो.कुठल्याही क्लिष्ट विषयाचे आकलन आपल्याला आपल्या मातृभाषेतून चटकन होतं.आपल्या स्वतःच्या भाषेतील भावना ह्या चटकन जाऊन थेट ह्रदयापर्यंत जावून भिडतात. इतकचं कशाला आपण परप्रांतात गेलो असतांना तिकडे सर्रास दुस-या भाषेचा प्रघात असतांना अचानक कुणी आपल्याशी आपल्या मातृभाषेतून संवाद साधला तर इतकं समाधान,इतका अत्यानंद होतो की अगदी ते “कलेजेमे ठंडक”ह्याचा अर्थ अगदी पुरेपूर समजून येतो.असा अनुभव आम्ही बरेचदा तिरुपती ला गेल्यावर घेतलायं.  

पाडगावकरं ह्यांच्या कवितांनी अक्षरशः मराठी रसिक दर्दी प्रेक्षकांना वेड लावलं होतं, नव्हे वेड लावलं आहे.त्यांच्या कवितांबद्दल बोलतांना अक्षरशः बावचळून जायला होतं. कारण त्यांची अमूक एखादी रचना आपल्याला खूप आवडते अस वाटतं नं वाटतं तोच त्यांची दुसरी एखादी काव्य रचना मनाला अधिक स्पर्शून जाते.परत तिसरीच एखादी कविता हळूवारपणे पणे मनाच्या अगदी आतील कप्प्यात शिरुन बसते तर चौथीच एखादी कविता खदखदून हसायला लावून शेवटी खोल विचारात आणून सोडते.त्यांना त्यांच्या “सलाम” ह्या कवितेसाठी 1980 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, तसेच महाराष्ट्रभूषण व पद्मभूषण हे मानाचे पुरस्कार देखील प्राप्त झालेत. दुबई येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविलं. त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत ह्या दोन भाषांमध्ये एम.ए.केलं.श्री वसंत बापट, वि.दा. करंदीकर व पाडगावकरं ह्या त्रिमूर्ती ने एकत्र काव्यवाचन करण्याची प्रथा सुरू केली. त्यांनी स्वतःची अशी एक आगळीवेगळीच शैली निर्माण केली. वात्रटिका, उपरोधिक कविता, प्रेमाच्या कविता ह्यात त्यांचा हातखंडा होता. पाडगावकरांच्या खूप सा-या आवडणा-या कविता आहेत त्यापैकी काही पुढीलप्रमाणे, “जेव्हा तुझ्या बटांना, उधळी मुजोर वारा, “सलाम”,”चिऊताई चिऊताई दार उघड”,”सांगा कसं जगायचं”,”तुमचं आमचं सेम असतं”,ह्या रचना तर चिरकाल स्मरणात राहणाऱ्या आहेत. “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” ह्या गाण्याने तर कित्येक जणांना नैराशेच्या खाईतून बाहेर काढले आहे.

साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले. ‘थॉमस पेनचे राजनैतिक निबंध’ हा त्यांनी केलेला अनुवाद १९५७ साली प्रकाशित झाला होता आणि २००९-१०मध्ये ‘बायबल’चा अनुवाद प्रकाशित झाला. कमला सुब्रह्नण्यम या लेखिकेच्या मूळ इंग्रजी महाभारताचा पाडगांवकरांनी ‘कथारूप महाभारत’ या नावाचा दोन-खंडी अनुवाद केला आहे. या दीर्घ कालावधीत त्यांनी विविध विषयांवरच्या पंचवीसहून अधिक पुस्तकांचा अनुवाद केला. निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक, इतिहास, चरित्र, आत्मचरित्र असे सर्व साहित्यप्रकार आणि विविध विषय यांत आहेत.

त्यांनी केलेल्या एकूण अनुवादांमधे १७  साहित्यकृतींचे अनुवाद आहेत. याशिवाय जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘Education And The Significance Of Life’ या पुस्तकाचा ‘शिक्षण : जीवनदर्शन’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. निवडक समकालीन गुजराती कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘अनुभूती’ या नावाने प्रकाशित झालेला आहे. मीरा, कबीर आणि सूरदास यांच्या निवडक पदांचे अनुवाद त्यांनी केले आहेत. आणि ‘ज्युलिअस सीझर’, ‘रोमिओ आणि ज्युलिएट’, ‘दी टेम्पेस्ट’ या शेक्सपिअरच्या तीन नाटकांचे ‘मुळाबरहुकूम भाषांतरे’ही त्यांच्या नावावर आहेत. पाडगावकर यांनी या तीनही पुस्तकांना दीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत आणि परिशिष्टांत भाषांतराविषयीची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. अशाच दीर्घ प्रस्तावना ‘कबीर’ आणि ‘सूरदास’ या पुस्तकांनाही आहेत. अनुवादांचा आस्वाद घेताना या प्रस्तावनांमधील विविध संदर्भांचा उपयोग होतो.

पाडगावकरांच्या साहित्यिक कारकिर्दीत ‘मीरा’ या अनुवादित पुस्तकामध्ये मीराबाईंचे चरित्र,जीवन आणि काव्य या विषयी लिहिलेले आहे. मीराबाईचे काव्य पाडगावकरांनीच प्रथम मराठीत आणले असे त्यात म्हटले आहे.

एकदा पाडगावकरांची पावसावरची कविता ‘लिज्जत’ने पाहिली आणि पाडगावकरांना विचारले, ‘आमच्या जाहिरातीत वापरू का ही कविता?’ पाडगावकरांनी आनंदाने परवानगी दिली आणि ती जाहिरात अनोखी ठरली.  पाडगावकरांना लोक गंमतीने पापडगावकर म्हणू लागले.

पाडगावकरांनी मराठी बालकुमार साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन ह्यांचे अध्यक्षपद भुषविले. त्यांना सलाम ह्या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार,महाराष्ट्र भूषण पुरस्कार ,पद्मभूषण पुरस्कार,महाराष्ट्र साहित्य परिषदेचा म.सा.प. सन्मान पुरस्कार प्राप्त झाले होते.

खरंच अशा महान विभूती आपल्यासाठी खूप सारा अनमोल खजिना ठेऊन गेलेत हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा ! लावल तितके अर्थ कमी ! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात !

नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. “रांडेच्या” म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. ” का बे छिनालच्या ” म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि “पोट्ट्या” म्हणलं  की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून ” मी तिथे गेलो” आणि  “ऐकू आलं  म्हणलं  की सांगली !! “काय करून राहिला?” म्हणलं की नाशिक, “करूलाल?” म्हणलं की लातूर आणि ” विषय संपला ” म्हणलं की पुणे !! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि “ळ” चा “ल” केला की कोकणी ! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.

हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. ” हमारी अडवणूक हो रही है ” हे मराठी हिंदी, आणि ” वो पाटी जरा सरपे ठिवो ” ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव ! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.

एकाच गोष्टीला प्रतिशब्द तरी किती ? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटलं, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी—- इत्यादी सगळ्याचा अर्थ एकच– ! “इ” सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द… जसे की “इस्कोट”, “इरड करणे”, “इरल”, “इकनं”. — “ग्न” ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत … लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे “ग्न” बाबत आमच्या मास्तरच ज्ञान !

इदुळा, येरवा, आवंदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला— यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठला हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय !

खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असू द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असू द्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची अवजारे असू द्या, कापडचोपड असू द्या नाहीतर अजून काही,—- मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात … सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातून ५ वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.

माय मराठी… तुझ्यावर लय जीव आहे बाये !!! अशीच उंडारत राहा… वारं पिलेल्या खोंडासारखं !!

लेखक : डॉ. विनय काटे

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares