मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंगीची गोष्ट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मुंगीची गोष्ट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

एका रविवारी सकाळी, एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता, तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले.  मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली  होती.

त्या माणसाने तासाभराहून अधिक काळ ते पाहिलं.  त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला विराम घेतल. वळसा घेतला.

आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली.

एका क्षणी या चिमुकल्या जीवालाअवघड जागग आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती.ती थोडावेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले, पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला.

मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला.  त्या घटनेने माणूस घाबरून गेला आणि त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले.

त्याच्या डोळ्यांसमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता.

थोड्या वेळाने मनुष्याने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला आहे – जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमीगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते.

आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली —- ते मोठे पान  मुंगी लहान छिद्रात कसे वाहून नेईल? 

— ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही ! 

तो छोटा प्राणी मुंगी — खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून, वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून, आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली.

मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते.

त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे.

आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे.

— फक्त सोडून देण्याची चिंता नाही. 

आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत.  आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही….

कथा पुढे चालू ठेवत आहे…तुम्हाला याचा आनंद मिळेल…

तो श्रीमंत माणूस जरा अधीर झाला. अजून थोडा वेळ थांबला असता तर त्याने काहीतरी वेगळं पाहिलं असतं…

मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली. आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले.

बोध:

१.  हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाहीत !

२.  एक संघ म्हणून एकत्र, अशक्य काहीही नाही. 

३.  कमावलेली वस्तू तुमच्या भावांसोबत शेअर करा. 

४.  (सर्वात महत्त्वाचे!) तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्यानंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल.  तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा.

—  मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासूनही आपण किती शिकू शकतो.

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

??

☆ बोलू कौतिके… अर्थात  Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆

कौतुक, प्रशंसा, स्तुती हे एकाच वर्गातील पण जरा वेगवेगळ्या भावच्छटा असलेले शब्द आहेत. कौतुक हे मनापासून असतं, प्रशंसा लोकांसमोर, जरा वाजत गाजत करायची असते पण ती खरीच असते,  तर स्तुती ही केवळ समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या पुढे पुढे करण्यासाठी करण्यात येते व त्यामागे स्तुतिपाठकांचा बरेचदा सुप्त हेतू ( hidden agenda) असतो. पण आत्ता आपण केवळ कौतुकाविषयीच बोलणार आहोत. एखाद्याच्या achievement बद्दल मनापासून खरं खुरं कौतुक वाटणं आणि ते वाटत असल्याचं आपण शब्दातून किंवा कृतीतून त्या व्यक्तीपर्यंत पोचवणं. मग ते कौतुक शब्दात असेल, नजरेत असेल, कृतीत किंवा पाठीवर दिलेल्या शाबासकीत व्यक्त केलेलं असेल. पण ते व्यक्त होणं महत्वाचं! 

बरेच वेळा आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीने काहीतरी वाखाणण्याजोगी कामगिरी करून दाखवलेली असते आणि ही गोष्ट इतकी सोपी नाही किंवा कदाचित ती आपल्यालासुद्धा जमणार नाही, ही गोष्ट आपल्याला मनातून खरंच पटलेली असते. पण तरीही आपण त्या व्यक्तीला मनापासून, भरभरून दाद देत नाही,  आपल्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेरच पडू शकत नाहीत.

असं का होत असावं? 

याचा जर नीट विचार केला, तर याचं उत्तर मनाच्या कोपऱ्यातच कुठेतरी दडून बसलेलं असतं. कदाचित आपण समवयस्क असू, नाहीतर मग समव्यावसायिक असू…कदाचित  ती व्यक्ती आपल्याहून वयाने, अनुभवाने लहान असेल आणि तिचं हे अनपेक्षित यश आपल्या अहंकाराला थोडासा धक्का देऊन गेलं असेल. पण मग आपण जर मनातून असं ठरवलं, की हा आपला अहंकार जरा वेळ बाजूलाच ठेवून द्यायचा आणि त्या व्यक्तीचं अगदी मनापासून, दिलखुलासपणे कौतुक करायचं..आणि आपण जर  खरोखर तसं केलं, तर त्याचा आपल्या आयुष्यावर फार मोठा, अगदी दूरगामी परिणाम दिसून येतो. 

पहिलं म्हणजे तुमच्याकडून अनपेक्षितपणे आलेल्या त्या  कौतुकाच्या शब्दांमुळे त्या व्यक्तीला अतिशय अप्रुप वाटतं, दोन मनं जवळ येतात आणि तुमच्यात व त्या व्यक्तीमध्ये एक अतूट नातं निर्माण होतं. दुसरं म्हणजे आपणच निर्मळ मनाने दुसऱ्या व्यक्तीचं जे appreciation केलेलं असतं त्यामुळे आपल्या मनाला आपलंच कौतुक वाटतं. आपण आपला अहंकार क्षणभर बाजूला ठेवू शकलो, दुसऱ्याच्या आनंदात निरामय वृत्तीने सामील होऊ शकलो, ह्याचा आनंद फार मोठा असतो. 

माझ्या मनोवृत्तीत बदल घडायला असाच एक प्रसंग घडला आणि मला त्यातून एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीची एक होती. वयाने माझ्यापेक्षा तरुण, हुशार, स्मार्ट, कॉन्फिडन्ट, लोकप्रिय.. तिच्या सहवासात येणाऱ्या इतर स्त्रियांना नक्कीच न्यूनगंड निर्माण होईल, असंच तिचं व्यक्तिमत्व होतं. मीही त्या गोष्टीला अपवाद नव्हते. आमची दोघींची मैत्री होणं शक्यच नव्हतं. 

पण एक दिवस एक वेगळीच गोष्ट घडली.

तिने एका स्पर्धेत स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, त्या स्पर्धेची मी नेमकी एकमेव परीक्षक होते.  परीक्षण गुप्तपणे करायचं असल्यामुळे तिला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. अपेक्षेप्रमाणेच ती या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरली होती. इतर स्पर्धकही तसे तुल्यबलच होते. थोडक्यात सांगायचं, तर मी त्या स्पर्धेत तिला डावलून दुसऱ्याची निवड केली असती, तरी या कानाचं त्या कानाला कळलं नसतं. स्पर्धेचा निकाल ऐकल्यावर तिचा तो कॉन्फिडन्स, तो नखरा किंचित उतरला असता, ते सुंदर धारदार नाक जरातरी खाली झालंच असतं. केवढी संधी माझ्याकडे आयती चालून आली होती.

काय करू? मीच परीक्षक असून तो मला माझ्या परीक्षेचा क्षण वाटला. मी स्वत:शी भांडले आणि अखेर माझ्या विवेकाने मला हरवलं. मी माझ्या सारासार विवेकाला म्हणाले, “ तुझं खरंय. आज मी जर नि:पक्षपातीपणाने निर्णय दिला नाही, तर मीच माझ्या मनातून उतरेन. मला माझ्या वागण्याची लाज वाटेल आणि मी स्वत:ला कधी माफ करू शकणार नाही. त्यामुळे आज मी तिचा जाहीर हिरमोड करण्याची ही संधी सोडून देते आणि तिला तिच्या पात्रतेनुसार या स्पर्धेत प्रथम क्रमांक देऊन टाकते. 

यथावकाश स्पर्धेचा निर्णय जाहीर झाला. तिने मोठ्या दिमाखात मला फोनवर ती बातमी कळवली. मी तिचं मोजक्या शब्दात अभिनंदन केलं. बक्षीस समारंभाला मी हजर राहू शकले नाही, म्हणून माझं मनोगत लिहून संयोजकांकडे पाठवून दिलं. अखेर त्या समारंभात तिला त्या स्पर्धेचं  परीक्षक कोण होतं ते समजलं. दुसऱ्या दिवशी तिचा परत माझे आभार मानायला फोन आला. मी म्हटलं, “माझे कशासाठी आभार? You deserved it, so you got it.” 

नंतर ती मला तिच्या बक्षिसाची पार्टी द्यायला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. मीही तिला एक छानशी गिफ्ट घेऊन गेले. त्या स्पर्धेचा आणि परीक्षणाचा विषय निघालाच नाही, पण आमच्या चांगल्या ३-४ तास गप्पा रंगल्या. त्या दिवशी मला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. आमची सुमारे वीस वर्षापूर्वी झालेली मैत्री अजूनही तेवढीच घट्ट आहे. तिची मुलगी माझी लाडकी भाची आहे आणि मी तिची  फेव्हरिट मावशी. एकमेकींच्या आयुष्यातील सुखदु:खांच्या क्षणाच्या आम्ही साक्षीदार झालो आहेत. 

आपल्या मनातल्या सतत वर डोकं काढू पाहाणाऱ्या  अहंकाराला जर आपण दडपून गप्प बसवू शकलो, तर आपल्याला जन्मभर पुरेल एवढी प्रेमाची, मैत्रीची शिदोरी प्राप्त होते, हा माझा अनुभव आहे. पुढील आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, पण प्रत्येकवेळी मी मनातल्या अहंकाराला बाजूला ठेवून मनात उमटलेले  योग्य ते कौतुकाचे शब्द त्या त्या व्यक्तींपर्यंत पोचवू शकले.

गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना मला तिथे एक मैत्रीण म्हणाली, “ आमच्या इथल्या वर्तुळात खूप हेवेदावे, गटबाजी चालते. तुमच्या पुण्यात तसं काही आहे की नाही?”

त्यावर मी म्हटलं, “तसं पुण्यात आहे की नाही, याची मला खरं तर कल्पनाच नाही, कारण ना मला कुणाचा हेवा वाटतो, ना माझा कुणी हेवा करतं. आपला कुणी हेवा करावा असं  माझ्याकडे काहीच नाही आणि मला कुणाचा हेवा वाटावा, असं दुसऱ्या कुणाकडे नाही. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’, हा सुखी जीवनाचा मंत्र मी अंगिकारलेला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने खरंच स्पृहणीय कामगिरी केली असेल, तर आपण कौतुक करण्यात आखडता हात कशासाठी घ्यायचा? तुम्हाला काय वाटतं… ?

लेखिका : ## लीना सोहोनी

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आहारबोली… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ आहारबोली… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेण्याचे अनेक मार्ग आहेत . 

हस्ताक्षर,सही,दिसणे, काही लकबी वगैरे.पण कधीकधी असे वाटते की पंगतीत ताट वाढल्यावर जेवताना,जेवण्याच्या आधी / नंतर त्याची जी प्रतिक्रिया असते, त्यावरूनही त्याच्या स्वभावाचा थोडा अंदाज येऊ शकतो.

म्हणजे बघा …..

समोर जेवणाचे ताट वाढून झाले आहे आणि आता खायला सुरुवात करायची आहे, तेव्हा तो पहिला पदार्थही त्याच्या स्वभावाला अनुसरून उचलतो.जसे की पुरण किंवा त्याबरोबरचे गोड पदार्थ पहिल्यांदा उचलणारी माणसे स्वभावाने पण गोड असतात.

तळण,पापड उचलणाऱ्या माणसांचा पापड लवकर मोडतो.त्यांच्यात patience कमी असतो.

वरणभात पहिल्यांदा खाणारी माणसे त्याप्रमाणेच साधी सरळ असतात ,ती कुठेही, कोणत्याही परिस्थितीत राहू शकतात.

भजी उचलणारी माणसे भज्यासारखीच कुरकुरीत,नर्मविनोदी आणि गप्पात प्रसन्नता आणणारी असतात.यांच्या सोबत असताना कधी कंटाळा येत नाही.

जेवणाची सुरुवात खिरीपासून आणि शेवट दहीभाताने करणारी नियम पाळणारी, आणि बऱ्यापैकी निरोगी असतात.

लोणचे कुठले आहे ? आंब्याचे, लिंबाचे का मिक्स हे पाहणारे आंबटशौकीन असतात.

काही लोक सगळ्या पदार्थाची थोडी थोडी चव घेऊन बघतात. ते लोक अतिचिकित्सक असतात.

यात आणखी दोन उपप्रवाह आहेत.

पहिला जेवणाच्या आधी काही reactions असणारे आणि दुसरा जेवणानंतरची reaction असणारे.

जेवणाच्या आधी ताटे ,भांडी घ्यायला सुरुवात झाली, की भांडे स्वच्छ आहे का नाही हे बघणार आणि ताट वाढून झाल्यावर किंवा आधी पाणी चांगले आहे का नाही, हे बघून त्याची चर्चा करणार.

हे लोक जेवणाचा आनंद घ्यायचा सोडून यावरून मूड बिघडवून घेतात .

अशी माणसे कटकट्या स्वभावाची आणि जुळवून न घेणारी असतात.अशांना मित्रमंडळी कमी किंवा नसतीलच. मित्र असलेच तर तेही याच catagory तील असतात.

पंगतीत ताटे वाढणे सुरु आहे,

अशा वेळेला समोरच्याच्या पानात अमुक आहे… माझ्या पानात नाही… आत्ताच हवे म्हणून लोक वाढप्याला (चार चार वेळेला) बोलावून वाढून घेतात ,भले त्यांना तो पदार्थ जाणार असो वा नसो. हे लोक jealous असतात.सतत त्यांना स्वतःची तुलना इतरांशी करायची सवय असते .

गोड पदार्थ वाढणारा मुख्य स्वयंपाकी ते वाढत असतानाच,”मी काय म्हणालोे, अहो बासुंदीच आहे ,म्हणजे 160 रुपये ताट, स्वस्त पडले,”असा डायलॉग मारणारे एकतर लग्नात मुलाकडचे असतात किंवा अत्यंत व्यवहारी , कंजूष मनोवृत्तीचे असतात.

जेवणाच्या आधी आणि जेवताना सुद्धा जे लोक

‘बाकी सगळे ठीक होते ,पण टॉयलेट काही नीट स्वच्छ नव्हते,”असं म्हणत राहतात, ते  अत्यंत निगेटिव्ह मनोवृत्तीचे असतात .

समोर चांगले ताट वाढले आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून असले काहीतरी फालतू विषय काढून ते स्वतःची जागा दाखवून देतात.

ताट वाढल्यावर त्यावर यथेच्छ ताव मारून मस्त ढेकर देणारे एकतर खवय्ये असतात किंवा स्वभावतःच आनंदी!

या सर्वांपलिकडे एक विशेष catagory आहे .

सगळे जेवण झाल्यावर

“ताक आहे का ?”

म्हणून विचारणार आणि नाही  म्हणल्यावर

” अरेरे! ताक असते ना, तर मजा आली असती “

असा शेरा मारणारे … किरकिरे.  

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हरवत चाललंय बालपण… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ हरवत चाललंय बालपण… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

सिग्नलचे हिरवे लाल पिवळे दिवे नियमाने बंद चालू होत या धावणाऱ्या जगाला शिस्त लावत उभे आहेत.आपल्याच तालात शहरं धावताहेत .सुसाट धावणाऱ्या शहरात पोटासाठी धावणारी माणसंही रस्त्यारस्त्यावर धावताहेत .जगणाऱ्या पोटाला भूक नावाची तडफ रस्त्यावर कधी भीक मागायला लावते तर कधी शरीर विकायला लावते.कितीतरी दुःख दर्द घेऊन शहरं धावताहेत.त्यात सिग्नलवरचं हे हरवत चाललेलं बालपण वाढत्या शहरात जिथं तिथं असं केविलवाण्या चेहऱ्यानं आणि अनवाणी पायांनी दिसू लागलंय .

जगण्याच्या शर्यतीतलं हे केविलवाणं दुश्य मनात अनेक प्रश्नांच मोहोळ होऊन भोवती घोंघावू लागलंय.तान्हुल्या लेकरांना पोटाशी धरून सिग्नल्सवर पाच दहा रुपयांची भिक मागत उन्हातान्हात होरपळत राहणाऱ्या माणसातल्याच या जमातीला येणारे जाणारे रोजच पाहताहेत .गाडीच्या बंद काचेवर टक टक करणाऱ्या बाई आणि लेकरांना कुणी भिक घालत असेलही कदाचित पण अशा वाढणाऱ्या संख्येवर कुणी काहीच का करू शकत नाही असा अनेकांना प्रश्नही पडत असेल.बदलेल्या जगात हा झपाट्याने बदलत जाणारा पुण्यामुंबई सारखा हा बदल आता सवयीचा बनू लागलाय असं प्रत्येकाला वाटत राहते .

शाळकरी वय असणारी कितीतरी बालकं आता सांगलीतही अशी सिग्नल्सवर काहीतरी विकत आशाळभूत नजरेने येणाऱ्या जाणाऱ्याकडे हात पसरून विनवण्या करताना दिसत आहेत .

आजही अशीच एक चिमुकली कॉलेज कोपऱ्याच्या सिग्नलवर हातात गुलाबी रंगाचे त्यावर Love लिहलेले फुगे  विकत असताना नजरेस पडते .मागच्या महिन्यात प्रजासत्ताक दिन साजरा झाला.आठवडाभर हिच मुलं बिल्ले,स्टिकर्स आणि झेंडे विकत होती. त्यानंतर पेन्स विकू लागली.आता व्हेलेंटाईन डे येतोय.प्रेमानं जग जिंकायला निघालेल्या तरुणाईच्या हातात हे गुलाबी फुगे आशाळभूत नजरेने विकताना या चिमुकल्यांच्या भवितव्याकडे खरंच कोण पाहील काय ?

धावणाऱ्या जगाला याचं काय सोयरसुतक ते आपल्याच तालात धावतंय.सांगली मिरज कुपवाड शहराच्या बाहेर अशी कितीतरी माणसं माळावर पालं ठोकून आनंदात नांदताहेत . मिरजेला जाताना सिनर्जी हॉस्पिटलच्या पुढं त्यांचं अख्खं गाव वसलंय .पोटासाठी शहरं बदलत जगणारी ही अख्खी पिढी भारतातल्या दारिद्रयाची अशी रंगीबेरंगी ठिगळं लावून भटकंती करतेय. त्यांचं जग निराळं ,राहणीमान निराळं आणि एकंदर जगणंही निराळंच .

शहराच्या पॉश फ्लॅटच्या दारोदारी भाकरी तुकडा मागत वणवण फिरणारी ,सिग्नल्सवर हात पसरणारी,जिथे तिथे लहान सहान वस्तू विकत भटकणारी आणि रस्त्यावर भिक मागत ही लहान लहान पोरं आपलं बालपण हरवत चाललीएत. ना शिक्षणाचा गंध,ना जगण्याची शाश्वती,ना कोणतं सोबत भविष्य. सोबत फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जगण्यासाठी धावण्याची कुतरओढ. त्यांचे पालकही असेच. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन जगणाऱ्या या वस्त्या अनेक प्रश्न घेऊन जगताहेत.आणि तिथे वाढणारी,भारताचं भविष्य असणारी बालकं अशी रस्त्यावर भटकत आपलं बालपण हरवत चाललीएत.सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती नेमकी होतेय तरी कुठे ? खरंच कुणी सांगेल का ?

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “प्रेमाचा सप्ताह…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ 🌹 प्रेमाचा सप्ताह 🌹 ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चौदा फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रेमाच्या सप्ताहातील शेवटचा पण सगळ्यात महत्वपूर्ण दिवस.व्हँलेंटाईन डे . हा दिवस सगळी मनाने आणि वयाने तरुण असणारी मंडळी कुणी उघडउघड तर कुणी मनोमन साजरा करतोच.

प्रेमात पडायला ना वयं लागतं ना रंगरुप. प्रेमात पडतेवेळी सगळीकडे ,सर्वत्र,चारोओर सदाबहार वातावरणच भासतं.तारुण्य हवचं असं काहीही नसतं,वयानं नसलं तरी मनानं चालतं.रंगरुपाची तर बातच सोडा कारण प्रेमात पडलेल्यांना सगळचं सुंदरच दिसतं.

प्रेम ह्या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी हो. प्रेम शब्द उच्चारल्यावर लगेच भुवया उंचावल्या जाण्याचं सहसा आपल्याकडे वातावरण. पण प्रेमात पडणं म्हणजेच काय तर ज्या व्यक्तीवर, गोष्टीवर,वस्तुवर आपण मनापासून प्रेम करतो म्हणजे ती गोष्ट आपल्याला मनापासून आवडणं

जवळपास अवतीभवती सतत हवीहवीशी, वावरावीशी वाटणं,तिचं अस्तित्व कायम मनाच्या कप्प्यांमध्ये सुरक्षित असणं,कुठलाही निर्णय घेतांना सल्ल्यासाठी त्या व्यक्तीची हटकून आठवण येणं.पावलोपावली त्या व्यक्तीला आतल्या आवाजाने मनापासून पुकारणं अथवा आपल्या व्यक्तीने आवर्जून घातलेल्या सादेला अगदी समरसून प्रतिसाद देणं,इतकी साधीसोप्पी प्रेमाची परिभाषा असतांना आपणचं त्याला वेगळं वळणं देऊन जरा क्लिष्ट आणि आडवळणाचं बनवतो बघा.

प्रेम म्हणजे प्रेम असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही काहीतरी वेगळेपण त्यात असतचं ।।

 

प्रेम म्हणजे काहींच्या मते त्यागात,

तर काहींच्या मते उपभोगात असतं,

असं हे प्रत्येकाचचं वेगवेगळं गणित असतं.।।

 

प्रेम हे काहींच्या मते अपेक्षा करण्यात असतं,

तर काहींच्या मते ते अपेक्षा पुरविण्यात असतं,

हे करणं वा पुरवणं दोन्हीही तसं रास्तच असतं,

असं हे प्रेमाचं समीकरणचं वेगवेगळं असतं.।।

 

प्रेम हे रोजच्या देखभालीत असतं,

तसचं ते लांबून काळजी घेण्यातही असतचं,

देखभाल असो वा काळजी करणं हे

वेगवेगळ्या त-हेनं शेवटी जीव लावणचं असतं।

 

प्रेम हे काहींच्या मते जवळीकेत असतं,

कधी प्रेम दुरून अनुभवण्यात पण असतं,

प्रेम हे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्येत बसतं।

 

काहींच्या मते प्रेम हे घेण्यात असतं,

तर काहींच्या मते मनापासून ते देण्यातच असतं,

अश्या ह्या देवाणघेवाणीचं तंत्रच वेगळं असतं.।

 

म्हणून खरचं प्रेम हे प्रेमच असतं,

जरी तुमचं आमचं सेम असतं,

तरीही प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून ते वेगवेगळं

भासतं, कधी वेगवेगळं पण भासतं।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

??

☆ मी व्हायोला हाउसिंग सोसायटी बोलतेय… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

माननीय महापौर,

महानगरपालिका… 

स.न.वि.वि.

को.हा.सोसायटीच्या प्रगतीकरता व विकासासाठी आपण जे निरनिराळे उपक्रम राबवता, मार्गदर्शन करता, प्रोत्साहन देता त्याकरता प्रथम मी आमच्या सोसायटी तर्फे आभार मानते.

प्रस्तुतच्या उपक्रमात आपण निरनिराळ्या सोसायट्यांची  स्पर्धा आयोजित केली त्यानिमित्त, मी व्हायोला सोसायटी, माझी ओळख व वैशिष्ट्ये, या परिसरातील माझे स्थान याविषयी माहिती सांगणार आहे.

मुंबई पुणे महामार्गाला लागून जो सर्व्हिस रोड आहे त्याला लागुनच माई मंगेशकर हॉस्पिटल पासूनची चौथी जी टोलेजंग इमारत आहे, ती माझीच बरे. माझ्या कपाळावर ठसठशीत कुंकू वापरल्याचे असणारे माझे नाव झळकते आहे. त्यामुळे माझे कपाळ उठून दिसत आहे. मी उंच असल्यामुळे खूप दूरपर्यंत दिसू शकते. मुख्य प्रवेश दारापाशी मी सर्व लोकांचे स्वागत करण्याकरता मोठ्या आनंदाने हात जोडून उभी असते.

… ‌माझा जन्म १९९८साली झाला. पण माझे नामकरण २०००साली झाले. तेव्हापासून या भागाचे प्रमुख आकर्षण व भूषण म्हणून माझी ओळख आहे

प्रवेश दारातून आत आल्यावर उजवीकडे छोटे लॉन आपले स्वागत करते. विविध वृक्षांनी हे लॉन वेढलेले आहे. निरनिराळे विविध रंगी पक्षी येथे मंजूळ गाणी गात असतात. रात्रीच्या वेळी रंगीबेरंगी दिव्यांची आरास खूप छान दिसते. झाडांना विविध आकारांनी सजविले आहे. सकाळी लोक हिंडायला येतात. संध्याकाळी बच्चे कंपनी हुंदडत असते. जाणाऱ्या येणाऱ्याची चहल पहल असते. मी हर्षाने न्हात असते.

मी माझ्या आठ विंग मध्ये विभागली आहे. एकूण १७० सदनिका आहेत. प्रथम दर्शनी एच विंग ३बी.एच.के दिमाखात उभे आहे. त्याच्या बाजूला २बी एच.के विराजमान आहे. व त्यानंतर १बी.एच.के.आहे. या सर्व सदनिका अत्याधुनिक सुखसोयींनी युक्त आहेत .प्रत्येक इमारतीच्यामध्ये एक छोटासा साजिरा,गोजिरा बगिचा आहे. दोन्ही इमारतींची शान वाढविण्याचे काम हा बगिचा करतो. येथेच झेंडा वंदन व इतर राष्ट्रीय कार्यक्रम होत असतात.

ई. इमारतीजवळ वनश्रीने नटलेला एक सुरेख व सुबक स्विमिंग पूल आहे. निळेशार पाणी त्यात खुलुन दिसते. विशेषतः उन्हाळ्यात रसिकांची गर्दी उसळते. लहानापासून तो मोठ्यापर्यंत जलतरण करण्याकरता उत्सुक असतात.

माझ्या लोकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी जीमची व्यवस्था केली गेली आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र playground ची व्यवस्था केली आहे. लहान मुले नाचत बागडताना पाहिले की मी आनंदाने बेभान ‌होते.

निरनिराळे उपक्रम येथे राबविले जातात. जसे वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, स्वच्छता मोहीम ‌इत्यादि.माझे सर्व रहिवासी गुण्यागोविंदाने राहतात. ‘United we all, divided we fall ‘ हे तत्व त्यांना माहित आहे. माझा कारभार सुव्यवस्थित होण्यासाठी सक्षम कार्यकारी मंडळ योजले आहे. मी विविधतेने नटलेली असले तरी एकतेच्या धाग्यात गुंफलेली आहे.

साहेब, मी आतापर्यंत खूप बोलले. मला वाटतं की स्पधेर्च्या दृष्टीने ही माहिती पुरेशी आहे. असेच नवनवीन स्पर्धा वे उपक्रम घेत जावे, व आम्हाला  संधी देत जावे  ही विनंती.

– एक स्पर्धक

व्हायोला को.हा.सो.

©  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रैवन पक्षी… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

☆ रैवन पक्षी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एक पक्षी गरुडाला चोच मारण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणजे रैवन पक्षी..

हा गरुडाच्या पाठीवर बसून मानेवर / गळ्यावर आपल्या चोचीने प्रहार करत असतो. परंतु गरुड ह्याच्या क्रियेला एकदाही प्रत्युत्तर देत नाही की, रैवन बरोबर झटापटी देखील करत नाही, म्हणजेच गरुड रैवनच्या कृतीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असतो. गरुड स्वतःचा वेळ आणि ऊर्जा रैवन बरोबरच्या लढाईत वाया घालवत नाही. गरुड स्वतःचे पंख  उघडून हवेत उंच उंच उडत राहतो. गरुड जसजसे उंच जातो तसतसे रैवनला श्वास घेण्यास त्रास होतो आणि शेवटी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रैवन स्वतःहून खाली पडतो. 

म्हणूनच कधीकधी सर्वच लढायांना उत्तर देण्याची गरज नाही. लोकांचे युक्तिवाद, फालतूचे प्रश्न किंवा त्यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देण्याची काही एक गरज नाही.

 

मित्रहो.,

आपली प्रतिमा उंचवा.

समाज उपयोगी काम करीत राहा.

समोरचे स्वतःहून खाली पडतील…

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ~ मानसिक डाएट ~ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ~ मानसिक डाएट ~ ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

ही कन्सेप्ट जरा नवीन आहे,पण ती तुम्ही समजून घ्याल, ही खात्री आहे.

 

“तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो.”  मनाला सुद्धा डाएटिंगची तेवढीच गरज आहे का?बघू या.

मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल..

 

स्वतःचं अवघं आयुष्य बदलून टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.

मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीच असते.

तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं?

तर आपले विचार अधिकाधिक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा.

 

तेलकट-तूपकट म्हणजे फडतूस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही.

 

अति-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसऱ्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

 

दररोज एकातरी व्यक्तीला  आपण एक छान स्माईल देऊन खूश करु.

 

दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावून मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकून देऊ.

 

आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ.

 

या अशा मूल्यशिक्षणाबरोबरच महत्त्वाचं आहे, ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक ओळखून स्वत:ला “रीझनेबल” बनवणं,

दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं, दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालू ठेवणं,

मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,

एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवणं आणि बरंच काही.

 

या सगळ्यातला समतोल हरवला ना,

की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारच

आणि मग नीट डायग्नोसिसच झालं नाही,

म्हणून मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळू शकते.

 

माणूस आहे,

मनपण थकतं हो कधीकधी,

त्याला इंस्टंट एनर्जी मिळते, ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने.वाह ताज !!!

 

सगळ्यात महत्त्वाचं

की,आपल्या डाएटचे साईड इफेक्ट्स खूप मस्त असतात.

 

लोक प्रेमातपण पडू शकतात तुमच्या.

तुमच्या चेहर्‍यावरचा ताण कमी होतो,

तुम्ही यंग वाटू लागता, टेन्शन्स कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्नइतकं हलकं होतं.

वास्तविक, मन ओके असेल

तरच लाईफ ओके असतं, नाही का?

 

असं ह्या डाएटचं व्रत

हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मध्ये एक संजीवनी देईल हे नक्की.

 

साध्या आणि ताज्या विचारांचं सॅलड आपली नक्की काळजी घेईल.

 

शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.

बदल हा नेहमीच चांगला असतो.

 

असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकत आहे ना ?

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

परिचय  

उमेश मुरलीधर सूर्यवंशी, कोल्हापूर.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समिती याच्या मार्फत होणा-या सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रिय सहभाग.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रचे तीन वर्षे सहसंपादक म्हणून काम केले आहे. वाचकांचा पत्रव्यवहार या सदरातून 500 हून अधिक पत्रे प्रकाशित. सोशल मिडियावर विविध विषयांवरील 22लेखमाला प्रसिद्ध. तसेच विविध विषयांवरील व्याख्याने देऊन समाज प्रबोधन चालू आहे.

राजर्षी, निर्भय, बाईपण, विचार शलाका, एकटा ही पुस्तके प्रकाशित.

? विविधा ?

☆ पुस्तके जपा-आयुष्य जपा ☆ श्री उमेश सूर्यवंशी 

शब्दांच्या महाजालात खूप काही गहिरे अर्थ दडलेले असतात. त्या अर्थाचा पायपोस देखील आपल्या जीवनात अथवा वर्तनात घडत नाही ही शोकांतिका आहे. शब्दाच्या अर्थाची जाणीव झाली तरच तो शब्दार्थ व्यवहारात उमटवण्याची ऊर्मी मनांत जागू शकते. हे शब्द एकत्रित व व्यवस्थित एका दिशेने बांधून एका ठराविक चौकटीत तयार होते ते असते ” पुस्तक “. मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे ..पुस्तक .

पुस्तक ….बहुतांशी हातात आयुष्यात एकदा तरी कोणते ना कोणते पुस्तक पडलेले असते. भले ते अभ्यासक्रम असणारे पुस्तक असेल अथवा एखादे रद्दीत टाकलेले किंवा अडगळीत पडलेले पुस्तक असेल. अभ्यासक्रम मधील पुस्तक जितके महत्त्वाचे असते तितकेच रद्दी अथवा अडगळीत पडलेले पुस्तक दुर्मिळ असू शकते. त्या पुस्तक नावाच्या घटकाची मुल्यता ठरते ती त्यामधील आशयावर. तो आशय ज्यांना समजतो त्यांना पुस्तक समजले . पुस्तक वाचण्याची क्रिया ही केवळ आनंददायी नसते तर ज्ञानदायी असते. आनंद + ज्ञान ….म्हणजे पुस्तक . केवळ अभ्यासक्रमातील पुस्तकात रमलेली व्यक्ती भले जीवनात भौतिकदृष्ट्या यशस्वी होईल देखील पण अवांतर पुस्तकाचे वाचन नसेल तर त्या यशस्वी व्यक्तीच्या माणूस बनण्याची प्रक्रिया नक्कीच थांबली आहे असे निखालस समजावे. मनुष्य व प्राणी यांच्यामध्ये काही मुलभूत फरक आहेत. मनुष्य पुस्तक वाचू शकतो, आनंद घेऊ शकतो, वेगवेगळ्या ज्ञानकक्षा कवेत घेऊ शकतो. प्राण्यांना हे शक्य नसते. याचकरीता ” पुस्तके वाचतो तोच मनुष्य ” अशी व्याख्या करणे अतिशयोक्ती ठरु नये. पुस्तकांचे जग हे सर्वाधिक विश्वासाचे जग आहे….त्या जगात आयुष्य शोधता आले पाहिजे .

पुस्तके नसतीत तर ?…केवळ या कल्पनेनेच मानवी जीवनातील रसहिनतेची, अज्ञानपणाची जाणीव तयार होते. पुस्तक हाती धरणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे ते पुस्तक समजून घेऊन आपल्या मेंदूमध्ये त्या पुस्तकीय जाणीवा विकसित करत राहणे अत्यावश्यक असते. “वाचाल तर वाचाल ” या वाक्याचा अर्थ तसाच घ्यावा . “पुस्तके जपा…आयुष्य जपा ” हा सुसंस्कृत मानवी जीवनाचा नवा मंत्र आहे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ पर्यटनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

२०१८च्या जून महिन्यात मी बाली इथं एका परिषदेत भाग घेण्यासाठी, तर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या एका परिषदेत सहभागी होण्यासाठी माॅरिशसला गेलो होतो. परिषदांमध्ये सहभागी होऊन मी माझे रिसर्च पेपर सादर केले. परिषदांच्या कामकाजानंतर दोन्ही देशांत साधारणत: एक एक आठवडा मुक्काम झाला. आयोजकांनी तिथल्या विविध सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील  अनेक संस्थांना आमच्या भेटी घडवून आणल्या. भरपूर साईट सिईंगही केले.निसर्गरम्य समुद्रकिनारे, रंगीबेरंगी मनमोहक फुलांच्या बागा,श्रममहात्म्याने विकास पावलेले समाज,सामाजिक सौदार्ह आणि शांतता असं  बरंच काही चांगलं पाहिलं..आपल्याकडं ज्या नाहीत, त्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी पाहून भारावून जायला नक्कीच झालं. रहाण्याची व्यवस्था, खाणंपिणं, प्रवास हेही नियोजनबद्ध आणि सुरेख होतं.

माझी मुलगी  इंग्लंडला एका नावाजलेल्या हाॅस्पीटलमध्ये डाॅक्टर आहे. तिच्याकडं जायचं खूप दिवस चाललं होतं. पण माझ्या नोकरीच्या  काळात ते शक्यच झालं नाही. त्यात मधले काही दिवस कोरोनामुळे जमलंच नाही. जगभर सगळीकडंच सारं ठप्प झालं होतं. सप्टेंबर २०२१ ला मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालो.आणि  पत्नीबरोबर  इंग्लंडला जायचं आम्ही ठरवलं. त्यात अनेक अडचणीही आल्या. सेवानिवृत्त होऊनदेखील बरेच दिवस पेन्शन आणि इतर आर्थिक बाबी मिळण्यास खूपच उशीर झाला. अनेक शारीरिक व्याधींनी मी त्रासून गेलो. तशाही अवस्थेत अनेक संबंधित ऑफिसांत जाऊन मी पायपीट करत होतो. “तुम्ही लवकर या” असा मुलीचा  लकडा चालूच होता.आम्हा दोघांचे पासपोर्ट हातात आले. इंग्लंडचा व्हिसा कित्येक दिवस झाले तरी मिळाला नाही. दिवसांमागून दिवस जात होते. इंग्लंडला जायचं नियोजन धूसर दिसत चाललं. रशिया- युक्रेन युद्धामुळं हा वेळ लागतो,असं सांगितलं गेलं. जाण्याची जय्यत तयारी करून आम्ही व्हिसाची वाट पहात बसलो.

असाच एक दिवस सायंकाळी मोबाईलवर मेसेज आला की,आम्हा दोघांचे पासपोर्ट तयार असून ते घेऊन जावेत. इंग्लंडला जायचा मुहूर्त एकदाचा मिळाला.

मुलीशी  फोनवरून बोलून जाण्याची आणि परत भारतात येण्याचीही तारीख ठरवली. व्हिसा मिळायला उशीर झाल्यामुळे फक्त दोन महिने तिच्याकडं रहाता येणं शक्य होतं. विमानाची तिकिटं तिनंच काढली.  १९ जूनला आम्ही मुंबईहून डायरेक्ट विमानाने इंग्लंडच्या हिथ्रो विमानतळावर पोहचलो. तेव्हा तिथं सायंकाळ झाली होती.

विमानतळावरून बॅगा घेऊन बाहेर आलो. हा सिझन तिथं तर उन्हाळ्याचा होता. पण तिथली थंडी सहन होत नव्हती. बाहेर रिमझिम पाऊसही पडत होता. जर्किन आणि कानटोपी चढवून छत्रीही उघडली. एका टॅक्सीनं आम्ही  लंडनच्या जवळ असलेल्या मुलीच्या फ्लॅटवर पोहोचलो.  पुस्तकांतून,  चित्रपटांतून दाखवलं जातं तसं जाताना अनुभवलं. खड्डे नसलेले सुबक रस्त्यावरून जाताना इतस्तत: सगळीकडं जाणवेल इतकी स्वच्छता होती. सगळं काही आखीव रेखीव होतं. रस्त्यावरून अनेक वाहने भरधाव वेगाने जात होती. पण तीही ट्रॅफिकचे नियम पाळून. आमच्या वास्तव्यात इंग्लंडमधील लंडन, केंब्रिज अशा अनेक शहरांत आम्ही जाऊन बरंच पाहिलं. लहानपणापासून मला  क्रिकेटची खूप आवड. गावी  मी खूप क्रिकेट खेळलो होतो. मला आठवतं एकदा तीन गावांची क्रिकेटची टुरनामेन्ट होती. त्यात मी सलग तीन विकेट घेऊन हॅटट्रिक केली होती.

लंडनमधील लाॅर्डसच्या ग्राऊंडला ‘क्रिकेटची पंढरी ‘म्हणतात. ते पहाण्याची संधी मला मिळाली. ते मला सोनेरी स्वप्नच वाटलं .या क्षणांना मी कवितेत गुंफले — 

पाहिलं मी लाॅर्डसचं  मैदान…

विस्तीर्ण रस्त्यांच्या महिरपींनी नटलेलं,

इंद्रधनु स्वप्नांसारखं, परिकथेतील सुंदर,

पाहिलं मी लाॅर्डसचं मैदान—

कपिलदेवसोबतच अनेक भारतीयांच्या तसबीरींनी आणि

विक्रमगाथांनी इथल्या ड्रेसिंगरूम सजल्या होत्या, 

सचिनचे प्रेरक शब्द तिथली एक भिंत अभिमानाने मिरवत होती,

१९८३ मधल्या भारताच्या विश्वविजयाचा प्रुडेनशीयल चषक 

तिथल्या म्युझियममध्ये पाहिला, आणि … 

बघता बघता लाॅर्डसचं मैदान शतपटींनी उजळून निघालं…

आपल्याकडं जत्रेत जसे पाळणे असतात तसाच एक अतिविशाल पाळणा थेम्स नदीकाठावर आहे.त्यातून लंडनमधील अनेक गोष्टी दाखवल्या जातात. त्याला ‘लंडन आय ‘म्हणतात. या लंडन आयमधून अनेक   सुंदर सुंदर बाबी आम्हाला दाखवल्या. नंतर पायी चालत लंडनमधून जाताना, लंडन आयमधून  जे दिसलं नव्हतं, त्या ब-याच बाबी पहायला मिळाल्या. हेही मी शब्दात मांडलय — 

दर्शन…

अतिभव्य पाळण्यावरच्या लंडन आयनं,

लंडनचं मनोहारी दर्शन मला दिलं ,

आकाशातल्या सूर्यकिरणांनी

चमचमणारे पाणी मला दाखवलं,

भव्य ब्रिटिश संसदेचे आणि युरोपातल्या अतिऊंच इमारतीचे 

दर्शन मला घडवलं,

जगाला भूषणावह अनेक विक्रमांच्या साक्ष असलेल्या टोलेजंग  इमारती दाखवल्या ,

त्या इमारतींच्या भवतालच्या पाचूंच्या बागांतून उमललेली रंगीबेरंगी फुलं दाखवली,

टाॅवर ब्रिजसकट अनेक सुंदर पूल दाखवले,

निखळ आनंदाने हसणारी, खिदळणारी माणसं दाखवली;

लंडनच्या रस्त्यावरून जाताना पाहिलं,

ठिकठिकाणी बोकाळलेले जुगारांचे बाजार,

खाऊन पिऊन झाल्यावर त्याचे रिकामे कागद रस्त्याच्या कडेला फेकून देणारी माणसं,

येणा-या जाणा-यांना गुलाबाची फुलं देऊन पैसे उकळणाऱ्या बायका

आणि– 

“हेल्प मी,गाॅड मे ब्लेस यू ” या पाटीआड डोकं खुपसून बसलेला मळलेल्या  कपड्यातला एक याचक— 

जगावर राज्य केलेल्या इंग्लंडमधील स्वच्छता, टापटीप, निटनेटकेपणा हे जितके भावले, त्याचबरोबर तिथल्या  समाजातील औपचारिकता मला मानवी जीवनातील कोरडेपणा जाणवून गेली. आपल्या समाजात अनेक उणिवा आहेत. त्या स्वीकारूनही इंग्लंडमधील  कुटुंबसंस्था ही मला चिंतेची बाब वाटली.आपल्या आणि इंग्लंडमधल्या समाजरचनेची तुलना करता आपल्याकडं सगळं आबादीआबाद आहे असं मला म्हणायचं नाही. तरीपण एक सांगावसं वाटतं….. आपल्याकडं प्रबोधन आणि परिवर्तनाच्या अनेक चळवळी   झाल्यात. अनेक कारणावरून त्या अनेकदा खंडितही झाल्या. या अधिक गतिमान केल्या तर — आपल्याकडील न्यूनता नक्कीच कमी होईल.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares