मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शेक्सपिअरचं स्ट्रॅटफोर्ड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “शेक्सपिअरचं स्ट्रॅटफोर्ड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच खरं ! २०१४ ते २०१९ या पाच वर्षात आमची चार वेळा इंग्लंड भेट झाली; पण शेक्सपिअरच्या गावाला भेट द्यायचा योग आला तो २०१९ सालीच ! प्रत्येक भेटीत माझ्या मुलाला, आशिषला स्ट्रॅटफोर्ड अपऑन ॲव्हॉनला नेण्याविषयी सांगायचो; पण काही ना काही कारणानं जमत नव्हतं. मात्र, या वर्षी त्या दोघांनी तिथं जाण्याचा चंगच बांधला आणि योग आणलाच.

ॲव्हॉन नावाच्या नदीवरील स्ट्रॅटफोर्ड हे शेक्सपिअरचं जन्मगाव…साउथ वार्विक शायरमधील हे गाव. इथं ज्या इमारतीत शेक्सपिअरचा जन्म झाला त्या वाड्यावजा इमारतीत ‘शेक्सपिअर जन्मस्थान ट्रस्ट’ नं उत्तमरित्या त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. मुळात इंग्रज हा परंपरावादी, त्यामुळेच त्यांनी या जगप्रसिध्द नट, लेखक आणि थिएटर मॅनेजरची १६/१७ व्या शतकातली, त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं अनुभवलेली जीवनविषयक माहिती जतन करून, प्रदर्शनाव्दारे त्याची आजच्या पिढीला ओळख करून दिली आहे. या संग्रहालयाने शेक्सपिअर आणि त्यांच्या कुटुंबानं अनुभवलेल्या प्रसंगावंर टाकलेल्या प्रकाशामुळे, हा एक मोठा माणूस आणि लेखक, म्हणून आपणास जास्त समजू शकतो.

शेक्सपिअरच्या वयाच्या ३७ व्या वर्षी, म्हणजे १६०१ मध्ये ही जन्मस्थानची जागा त्याला वडिलांकडून मिळाली. मुळात शेक्सपिसरला राहायला भरपूर जागा असल्यानं त्यानं वडिलांकडून मिळालेल्या जागेतून काही पैसे कमवावेत असा विचार केला आणि त्यानं ती जागा एलिझाबेथ फोर्ट नावाच्या बाईला हॉटेलसाठी भाड्यानं दिली. एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर १८४६ मध्ये इमारत विक्रीला काढली गेली. तेव्हा ‘शेक्सपिअर जन्मस्थळ ट्रस्ट’ नं ती विकत घेऊन हे संग्रहालय उभं केलं. आजही त्या जन्मस्थळाची देखभाल ते करत आहेत. हे संग्रहालय उभं करण्यात आणि असे राष्ट्रीय स्मारकामध्ये अंतर्भूत करण्यासाठी जी चळवळ उभारली गेली, त्यात डिकन्सचा सहभाग महत्त्वाचा होता. त्यानं १८३८ मध्ये या जन्मस्थळास भेट दिली होती आणि त्यापासूनच त्याला स्फूर्ती मिळाली. शेक्सपिअरच्या जन्माच्या खोलीत एका खिडकीच्या काचेवर प्रेक्षक आपली आठवण म्हणून नावं लिहून ठेवत. त्यात प्रसिध्द स्कॉटिश लेखक वॉल्टर स्कोंट, तत्त्ववेत्ता थॉमसर कार्लाईल, चार्ल्स डिकन्स, शेक्सपिअरच्या काळातील दोन महान नट एलन टेटी आणि हेन्नी आयर्विंग यांचा समावेश आहे. या संग्रहालयातील वस्तूंवर म्हणजे कपडे, बिछाने आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरून शेक्सपिअरची माहिती मिळते.

शेक्सपिअर ३७ नाटके, १५४ सुनीते (sonnets), ५ पदविधारी काव्यं (titled) लिहू शकला आणि आपल्यासाठी अक्षरशः लाखो शब्दांमधून विचारांचा अमूर्त ठेवा ठेवून गेला. त्याची नाटकं शाळा, विद्यापीठे, नाट्यगृहे, बागा आणि तुरुंगातही सादर केली जातात. शेक्सपिअरचा हा अमूल्य साहित्यिक ठेवा जतन करण्याचं कार्य ट्रस्टनं केलं असलं, तरी इंग्लंडमधील एका दैनिकात आलेली बातमी वाचून मन विषण्ण होतं. ती बातमी म्हणते, की ‘ विद्यार्थ्यांसाठी शेक्सपिअर खूप कठीण आहे! ‘डिजिटल टेक्नॉलॉजी ॲडॉब’ ने २००० साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, २९ टक्के विद्यार्थ्यांना असं वाटतं, की शेक्सपिअरची नाटकं आधुनिक तंत्रात बसवली, तर ती चटकन समजतील. शेक्सपिअर चांगला समजायचा असेल, तर व्हिडिओ आणि ॲनिमेशनचा उपयोग करायला हवा असेही काहीजण म्हणतात.’  असो. मी मात्र माझं १९७० सालापासूनचं स्वप्नं पूर्ण झाल्यानं आनंदात होतो.

©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भारतात होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा…” लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल ☆ सुश्री हेमा फाटक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भारतात होळी साजरी करण्याच्या विविध परंपरा…” लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल ☆ सुश्री हेमा फाटक ☆ 

होळी हा रंगांचा सण आहे. रंगांशी खेळण्यासाठी आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो. होळी हा भारतातील महत्त्वाचा सण असल्याने तो उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी हा सण एकच असला तरी तो सर्वत्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण भारतातील लोक उत्तर भारतातील लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. एकूणच, एकच सण साजरे करण्याची ही मनोरंजक विविधता भारताला विविधतेचे प्रतीक बनवते.  भारतातील होळी साजरी करण्याच्या विविध विचित्र आणि परंपरां.ज्या जाणून आपण  देखील आश्चर्यचकित व्हाल.

लाठमार होळी, बरसाना

बरसाणे यांची लाठमार होळी खूप प्रसिद्ध आहे. या निमित्ताने लोकांनी इथे यावे आणि लोक या परंपरेचे पालन कसे करतात ते पहावे. हे ठिकाण मथुरेपासून २७ किमी अंतरावर आहे. येथे होळी केवळ रंगांनीच नाही तर काठ्यांनीही खेळली जाते. असे म्हटले जाते की बरसाना येथे भगवान कृष्णाने राधाचा पाठलाग केला, त्यानंतर तिच्या मित्रांनी भगवान कृष्णाचा काठीने पाठलाग केला. तेव्हापासून येथे महिला पुरुषांचा काठीने पाठलाग करतात

योसांग, मणिपूर

मणिपूरमध्ये होळीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. जो यावल शुंग या नावाने ओळखला जातो. या दिवशी लोक भगवान पखंगबाला वंदन करतात. सूर्यास्तानंतर, लोक यासोंग मैथबा नावाची झोपडी जाळण्याच्या विधीसह या उत्सवाची सुरुवात करतात. हे नाकथेंग परंपरेचे पालन करते, जिथे मुले घरोघरी देणगी गोळा करतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मुली दान मागतात. तर चौथ्या आणि पाचव्या दिवशी एकमेकांना रंग लावून अनोख्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो.

होला मोहल्ला, पंजाब

पंजाबमध्ये होळीनंतर एक दिवस शीख धर्मीयांकडून होला मोहल्ला साजरा केला जातो. दहावे शीख गुरु गुरू गोविंद सिंग यांनी समुदायातील युद्ध कौशल्य विकसित करण्यासाठी होला मोहल्ला उत्सव सुरू केला. ती येथे योद्धा होळी म्हणून ओळखली जाते. येथे योद्धे आपले पराक्रम दाखवण्यासाठी स्टंट करतात.

मंजुल कुली, केरळ

दक्षिण भारतात होळी हा सण उत्तर भारतात तितक्या धूमधडाक्यात साजरा केला जात नसला तरी काही समुदाय हा सण साजरा करतात. केरळमध्ये होळीला मंजुळ कुली म्हणून ओळखले जाते. येथील गोसारीपुरम तिरुमाच्या कोकणी मंदिरात रंगांचा हा सण साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी लोक मंदिरात जातात आणि दुसऱ्या दिवशी सर्वजण एकमेकांवर हळदीचे पाणी शिंपडतात आणि लोकगीतांवर नाचतात.

शिग्मो, गोवा

गोवा हे खुद्द मौजमजेचे शहर आहे. होळीचा सणही येथील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. येथील लोक पारंपारिक लोकनृत्य आणि पथनाट्य सादर करून या उत्सवाचा आनंद घेतात. शिग्मो उत्सवाचे दोन प्रकार आहेत. धतोक शिग्मो आणि वडलो शिग्मो. ग्रामीण लोक धतोक शिग्मो साजरे करतात तर सर्व वर्गातील लोक वडलो शिग्मो साजरा करतात.

रंगपंचमी, महाराष्ट्र

महाराष्ट्रात रंगपंचमीची धूम असते. महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळी बनवली जाते. खासकरुन मासेमारी करणाऱ्यांच्या वस्तीत या दिवशी होळी साजरी केली जाते. नाचणे-गाणे अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही ठिकाणी माठ फोडण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं जातं. मासेमारी करणारा समाजात हा दिवस लग्न ठरवण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

महाराष्ट्रात होळी खूप वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने साजरी केली जाते. होलिका दहनानंतरच्या दुसऱ्या दिवशी या उत्सवाला रंगपंचमी म्हणतात. या दिवशी लोक एकत्र येतात आणि एकमेकांना गुलाल लावतात. या दिवशी इथल्या प्रत्येक घरात पुरणपोळी खास बनवली जाते. या काळात तुम्ही इथे असाल तर नक्कीच त्याचा आस्वाद घ्यावा.

लेखक : प्रा. डॉ सुधीर अग्रवाल      

मो ९५६१५९४३०६

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पळसफुलांचा शृंगार…” ☆ श्री हेमंत देशपांडे ☆

? विविधा ?

☆ “पळसफुलांचा शृंगार…”  ☆ श्री हेमंत देशपांडे ☆

संक्रांत संपून गेलेली असते.

दिवस तिळातिळाने वाढत असतो.  सबंध वातावरणात भरुन असलेली गोड-गोड गुलाबी थंडी आता विरळ होऊ लागलेली असते.  हिवाळाभर पसरुन राहिलेल्या शिशिर ऋतूचा सोहळा आणिक काही कालावधीनंतर संपून जाणार असतो.  आभाळभर पसरलेली शुभ्र धुक्याची वेल सूर्याच्या प्रखर दाहाने वितळायला लागलेली असते.  एखाद्या लोखंडी गोळ्याला उष्णता दिल्यावर तो जसा खदिरांगारासारखा दिसतो तशी अवस्था भास्कराच्या उष्णतेने येणार असते.  पण तशाही अवस्थेत तो आभाळगोल आपला उष्ण प्रवास निरंतर सुरु ठेवत असतो.

होळीचा सण हा शिशिरातला सण!  शिशिरात कसं मस्त-मस्त वातावरण असतं!  जंगलांनी पळसाचे लालसर केशरी रंग आपल्या अंगाला माखून घेतले असतात.  एखाद्या लावण्यवती प्रमदेनं मत्त शृंगार करुन आपल्या प्रियकराशी भेटायला आतुर व्हावं, तशी ती पळस झाडं आपल्याच फुलांचा शृंगार करुन हजार रंगांनी रंगोत्सुक होणाऱ्या होळीच्या सणाला भेटायला आतुर झालेली असतात, उत्सुक झालेली असतात.  रंगात रंग नि भांगेत भांग मिसळवून टाकण्याचा हा क्षण नि सण असतो.  आणिक सोबतीला शिशिरातलं हवंहवंसं, मिश्किलसं वातावरण खुलत असतं.

पळसफुलांचा रंग एकमेकांच्या अंगावर बरसवून आपण प्रेमाची देवाणघेवाण करत असतो.  आणिक जंगलात पळसाची झाडं आपल्या फुलांचा रंगमय शृंगार पाहून कृतकृत्य झालेली असतात.  झाडांच्या मनी दुःख असतं ते केवळ आपली फुलं खुडली गेली याचं.  फुलांना जन्म देणाऱ्या सर्वच झाडांचं तसं असतं.  एखाद्या नवसौभाग्यवतीच्या अंगावरचा दागिना हरविल्यावर तिनं व्याकुळ नजरेनं तो दागिना इतस्ततः शोधण्याचा प्रयत्न करावा, तशी ती फुलं खुडलेली झाडं करत असतात.  आपल्याच खुडल्या गेलेल्या फुलांना पुन्हा-पुन्हा शोधत असतात.  मला याचंच सगळ्यात जास्त दुःख होतं.  झाडांचं आणिक फुलांचं दुःख मी नाही पाहू शकत.  त्यापेक्षा हजार फुलांचे घाव आपल्यावर व्हावेत असं वाटू लागतं नि नेमकं तसं घडत नसतं.

आपली फुलं माणसांच्या हवाली करुन अश्रू ढाळणारं जंगल पाहायला एकदा मी धावतच जंगलात गेलो होतो.  आताशा नुकतीच कुठं शेंदरी रंगाची फुलं पळस झाडाला लागली असतील नसतील, पण ती लागतात नं लागतात तोच त्या फुलांवर ‘मानवी गिधाडं’ तुटून पडलीत, असा आर्त दुःखाचा भाव जंगलाच्या चेहऱ्यावर मी स्पष्टपणे वाचला.  आपल्या सभोवार फुललेल्या पळसफुलांची आरास माणसांनी विस्कटून टाकली म्हणून जंगल जणू रडत होतं नि जंगलाचं रडू पाहून मलाही रडू येत होतं.

माथ्यावरचा मार्तंड खूप तापला.  सर्वांगाला खूप चटके बसले.  मी भानावर आलो नि माझं रडू थांबलं.  मग मला सूर्याचा मनस्वी संताप आला.  वाटलं, हा आभाळगोल स्वतःला देव म्हणवतो ना!  पौषातल्या रविवारी आईच्या पूजेच्या ताटात हा सूर्य येऊन बसतो ना!  मग तरीही हा देव खोटा का?  खरा देव तर कृपाळू असतो.  साऱ्या पृथ्वीवर वैशाखवणवा पेटवून देणारा हा सूर्य म्हणजे एक महाराक्षस आहे.  जंगलातील फुलं माणसांनी तोडून नेल्याचं दुःख नि माझ्या प्रियतम जंगलावर आग ओकणाऱ्या सूर्याचा राग मनात मावेनासा झाला तेव्हा प्रेयसीच्या रसिल्या ओठांवर प्रियकरानं ओठ टेकावेत तसे आभाळाच्या ओठांवर सूर्याने आपले ओठ टेकवले नि हळूहळू सूर्य आकाशाच्या मिठीत विलीन झाला.

© श्री हेमंत देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

२०२२ च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच लिखाण बंद करून मॅरेथॉनसाठी धावायचा सराव चालू केला. एक महिन्यापूर्वीच डेंगू आजारातून बाहेर आल्याने धावतांना जरा अशक्तपणा जाणवत होता. सुरवातीला खूपच कठीण वाटत होते. लिखाणासाठी रात्रीचे जागरण करायची सवय झाल्याने पहाटे पाच वाजता उठून धावायला जाणे जरा कठीणच जात होते, धावायला सुरवात केल्यावर जरा २०० मिटर ते ३०० मिटर धावल्यावर दमायला होत होते. पहिला आठवडा जरा तणावातच गेला. १६ फेब्रुवारी २०२० ला ठाण्यामध्ये ठाणे हिरानंदानी ही शेवटची २१.०२ किलोमीटर ची मॅरेथॉन धावलो होतो, त्यांनतर मार्चपासून लॉकडाऊन चालू झाले आणि आणि पुढची अडीच वर्षे म्हणजेच नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकही मॅरेथॉन झाली नाही आणि मॅरेथॉन नसल्याने धावायची सवयही गेली होती. ह्या लॉकडाऊन काळात खूप लिखाणआणि चालणे झाले, तरी धावणे मात्र बंद झाले होते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला, २० नोव्हेंबर २०२२ ला नेव्ही मॅरेथॉन मुंबईचा मेसेज आला आणि डोक्यात परत मॅरेथॉन धावायचे चक्र चालू झाले. मनात मॅरेथॉन धावायचे येणे आणि प्रत्यक्षात मॅरेथॉन धावणे ह्यातले अंतर कितीतरी कोसाचे आहे.  तरीही दुसऱ्याच दिवशी पहाटे ५ वाजता उठून साडेपाचला धावण्याच्या सरावाला सुरवात केली. वाटले होते तेवढे सोप्पे नव्हते. जरा धावलो तरी थकायला होत होते. धावायचा सराव नसल्याने सगळेच अवघड वाटत होते. सुरवातीचा आठवडा असाच, नुसते सकाळच्या चालण्यातच गेला.

रोज डोळ्यासमोर आधी मिळालेली मॅरेथॉन मेडल्स दिसत होती. वयाच्या ५४  व्या वर्षी धावायला सुरवात करून डिसेंबर २०१४ ला गोव्याला १० किलोमीटर धाऊन मिळालेले माझे पहिले मॅरेथॉन मेडल मला खुणावत होते. त्याच्या बाजूला असलेले जानेवारी २०१५ ला स्टॅंडर्ड चार्टर्ड २१ किलोमीटर धावलेले मेडल मला स्फूर्ती देत होते. गेली दोन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा झाल्या नसल्यातरी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळालेली सगळी मिळून ४६ मेडल्स आणि दोन ट्रॉफी ह्यांचे प्रत्येकाचे एक स्वतःचे वजन होते, स्वतःचा संघर्ष होता, स्वतःची अशी एक गोष्ट होती. त्या प्रत्येक मेडल्सनी त्यांच्यासाठी मी घेतलेली मेहनत जवळून नुसती बघितली नव्हती तर त्यांनी माझ्या बरोबर ती अनुभवली होती आणि माझ्या प्रत्येक सेलिब्रेशनला माझ्या गळ्यात राहून मला साथ दिली होती. ती मेडल्स मला जोशात सांगत होती, “थांबू नकोस, हार मानू नकोस अजून ४ मेडल्ससाठी मेहनत घे म्हणजे आमचा ५० चा अर्ध शतकाचा टप्पा गाठल्याचे आम्हांला समाधान मिळेल.”

मोठ्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी धावायला निघालो पण गती काही मिळत नव्हती. एखादे किलोमीटर धावलो तरी थकायला होत होते. ऑक्टोबर २०२२ महिन्याच्या मध्यावर आलो तरी मनासारखे धावणे होत नव्हते. २० नोव्हेंबरला आता एकच महिना उरला होता. २१ किलोमीटर मॅरेथॉन न करता १० किलोमीटर धावावे आणि एक मेडल घेऊन यावे असे मनात आले होते पण त्याच वेळी एकदा का १० किलोमीटर धाऊन  खालच्या पायरीवर आलो तर परत २१ किलोमीटर धावणे कधीच जमणार नाही ह्याची भीती होती आणि… आणि शक्य होईल का नाही ह्याचा काहीही विचार न करता, जो वेड्यासारखा विचार, वयाच्या ५४ व्या वर्षी २०१४ ला केला होता त्याचेच पुन्हा अनुकरण करून नेव्ही मॅरेथॉन २१ किमी धावण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. आता काहीही झाले तरी २१ किलोमीटर धावयाचेच असे मनाशी पक्के केले आणि दुसऱ्या दिवशीपासून जोमाने सरावाला सुरवात केली. 

२०१४ ला धावणे जसे चालू केले होते तसेच म्हणजे हळूहळू दर दोन दिवसांनी, एक तर किलोमीटरमध्ये एक एक किलोमीटरची वाढ करायची किंवा किलोमीटर सारखे ठेवून,  कमी वेळेत ते पार करायचे. असे करत पुढच्या १५ दिवसांत मी १० किलोमीटर पर्यंत पोचलो आणि माझा २१ कि मी धावण्याचा हरवलेला आत्मविश्वास मला परत मिळाला. पहिल्यासारखे जलद धावणे जमत नसले तरी २१ कि मी मॅरेथॉन मी पुरी करू शकतो ह्याची मला खात्री आली. 

२० नोव्हेंबरला २०२२ नेव्ही मॅरेथॉन मुंबई, मी २१ कि मी धावायला सुरवात केली. सुरुवातीचे काही कि.मी. मी जोरात न पळता मध्यम गतीने धावत होतो. शक्तीचा जोर लाऊन धावायचे मी टाळत होतो. १५ किलोमीटर पर्यंत मला कसलाही त्रास नव्हता. थकायला झाले होते पण जिद्दीने मी स्वतःला पुढे नेत होतो पण १६ व्या कि मी नंतर अंगातली शक्ती गेली आणि पुढचा ५ कि मी चा रस्ता मला खुप कठीण गेला. कसे बसे मी २१ किलोमीटरची अंतिम रेषा गाठली तेव्हा वेळ नोंदवली गेली,  २ तास ५५ मिनिट्स. आत्तापर्यंतच्या माझ्या मॅरेथॉन धाऊन नोंदविलेल्या वेळेचा तो नीचांक होता. माझे ४७ वे मॅरेथॉन मेडल माझ्या गळ्यात घातले गेले. ह्या ४७ व्या मेडलचे महत्व माझ्यासाठी, माझ्या २०१४ च्या पहिल्या मेडल सारखेच होते, फरक फक्त वयाचा होता आणि वयानुसार मिळालेल्या टायमिंगचा होता. माझे पहिले २१ कि मी मॅरेथॉन मी २ तास १४ मिनिटात पुरे केले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण कसे धावतो ह्याला महत्व नसते तर तेथे जायचे, धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्नाटकी कशिदा… डाॅ.निधी पटवर्धन ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्नाटकी कशिदा… डाॅ.निधी पटवर्धन ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पुण्याहून आलेल्या माझ्या एका मैत्रिणीला मुद्दामून कारवारी जेवण खाऊ घालावे म्हणून कानडी मैत्रिणीकडे गेले. चित्रान्न (विशिष्ट प्रकारचा कानडी तिखट भात), केळय़ाच्या गोड पोळय़ा, तमळी (बेलाची कढी), कच्च्या पपईची मूगडाळ घातलेली कोशिंबीर, एकही थेंब तेल नसलेलं लोणचं असं बरंच काही तिने खाऊ घातलं आणि आपली व्यथा व्यक्त केली, ‘‘ मला स्वच्छ मराठी बोलता येत नाही याचं वाईट वाटतं ! मला लोक अजूनही मी ‘कानडी’ आहे म्हणून पाहतात. माझे मराठी हेल कानडी येतात. त्यांनी मला ओळखता कामा नये, मी मराठीच वाटले पाहिजे ’’.

आश्चर्याने केळय़ाच्या पोळीचा घास माझ्या हातातच राहिला. तुम्ही जन्माने कानडी आहात तर तसंच ओळखलं गेलात तर वैषम्य कसलं? तुमचे कानडी हेल ही तर श्रीमंती आहे. तसं तर संवादाच्या गरजेतून अनेकदा इतर भाषकांनी केलेले मराठी बोलण्याचे प्रयत्न हा मराठी भाषेचा एक आगळावेगळा साज आहे. त्या त्या भाषिकांच्या मातृभाषांचा गंध त्या त्या प्रदेशाचे हेल आणि उच्चार घेऊन आलेली मराठीची ही रूपं मला तरी श्रीमंत वाटतात!

कानडी घरात लग्न होऊन गेल्यावर मराठी स्त्रिया किती काळात कानडी शिकतील याचा अंदाज घेतला तर दोन-चार वर्षांत माझी बहीण, मैत्रीण शिकलेय असं पाच-सहा जणांनी सांगितले. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या, खेडय़ापाडय़ातल्या कानडी स्त्रिया मराठी हळूहळू शिकतात आणि सहज बोलू लागतात हा मात्र सर्वाचा अनुभव आहे. भाषेचा जन्म संवादाच्या गरजेतून झाला आहे. अशा इथं आलेल्या, या मातीशी एकरूप झालेल्या स्त्रिया हळूहळू का होईना मराठी शिकतात, हे किती अनमोल आहे. त्यांची मुलं दोन भाषा शिकतात, ही आणखी जमेची बाजू !

भले तुकाराम महाराजांनी ‘कानडीने केला मराठी भ्रतार एकाचे उत्तर एका न ये’ असा अभंग रचला असला तरी सुरुवातीचा हा काळ सरल्यावर ही कानडी स्त्री कर्माने मराठी होतेच की! गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमांचा सहवास मराठी भाषेला आहे. स्वाभाविकपणे त्या त्या सीमावर्ती महाराष्ट्रात जी मराठी बोलली जाते त्यात या भाषाभगिनींचा प्रभाव जाणवणारच.

जी. ए. कुलकर्णीच्या साहित्यातून कानडी शेजार डोकावतो. तसेच प्रकाश नारायण संत यांचा लंपन या भाषेतील अनेक शब्दांची ओळख आपल्याला करून देतो. ‘तो मी नव्हेच’मधील निपाणीचा व्यापारी लखोबा लोखंडे त्याच्या कानडी-मराठीने आपल्या लक्षात राहिलेला आहे. कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात ‘श्री चावुण्डराये करवियलें..’ हे वाक्य आढळलेले आहे.

मराठी भाषेला किमान सात-आठ शतकं झपाटून टाकणारी व्यक्तिरेखा कानडी आहे असं सांगितलं तर काय वाटेल? पण तसं खरंच आहे. मराठी संतकाव्याची सत्त्वधारा ज्या भक्तीपात्रातून वाहते तिच्या उगमस्थानी तर एक थेट ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु’ असा कानडी माणूस निघाला ! नुसता माणूस नव्हे तर थेट राजाच ! तोही पंढरीचा ! ‘भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. तुमच्या कानडी जेवणाइतकीच मधुरता तुमच्या बोलण्यात आहे.’ असे त्या कारवारी मैत्रिणीला सांगितल्यावर ‘मुद्दुली चिन्ना’ म्हणून तिने माझ्यावर जे प्रेम केले ते मला मराठीइतकेच गोड भासले.

लेखिका : डॉ. निधी पटवर्धन 

[email protected]

संकलक :  नितीन खंडाळे, चाळीसगाव

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सत्संग म्हणजे काय — ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  सत्संग म्हणजे काय — ✨ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

एकदा नारद मुनींनी श्रीकृष्णांना सहज विचारले- — ” देवा सत्संग सत्संग म्हणतात त्याचा एवढा काय हो महिमा?”

यावर देवांनी त्यांना काही एक उत्तर न देता एका कीटकाचा निर्देश करून सांगितले की तो कीटक तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल. नारद मुनी त्या कीटकाला शोधत नरकापर्यंत गेले आणि त्यांनी त्या कीटकाला विचारले-

“सत्संगाचे काय फळ आहे तुला माहित आहे का?”

—कीटकाने त्यांचेकडे एक कटाक्ष टाकला आणि तो मृत झाला.

प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने ते पुन्हा श्रीकृष्णाकडे आले, म्हणाले, “ देवा तो कीटक तर काही बोलल्याविनाच मृत झाला. आता तुम्हीच उत्तर सांगा.”

देवांनी नारदांचे म्हणणे ऐकून घेतले, आणि ते म्हणाले, ” तेथे पहा त्या समोरच्या झाडावर घरट्यात एक नुकतेच जन्मलेले पोपटाचे पिलू आहे. ते तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.” नारदमुनी त्या पोपटाचे पिलाजवळ गेले आणि त्यांनी त्यालाही तोच प्रश्न विचारला. पोपटाचे पिलाने एकदा डोळे उघडून त्यांचेकडे पहिले आणि त्याने डोळे मिटले ते कायमचेच. 

नारदमुनी मनाशीच विचार करू लागले ‘ काय सत्संग करण्याचे फळ मृत्यू आहे. कारण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न केला? ते मृत्यू पावले.’ 

अत्यंत दु:खी होऊन ते पुन्हा श्रीकृष्णापाशी आले. म्हणाले, “देवा आपल्याला सांगायचे नसेल तर नका सांगू.  पण मी ज्यांना ज्यांना हा प्रश्न विचारतोय ते मृत होत आहेत – अजून किती जणांच्या हत्येच्या पापाचे धनी मला करणार आहात ?”

तेव्हा देव त्यांना म्हणाले, ” त्याची चिंता तू करू नकोस. तुला खरेच जर या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर ते पहा, नुकताच तिथे एका गाईने बछड्याला जन्म दिलाय.. तो बछडा तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईल.”

दु:खी अन्त:करणाने नारदांनी तेथे जावून त्या बछड्याच्या कानाशी लागून त्यालाही तोच प्रश्न केला. त्यानेही नजर वळवून त्यांचे कडे पहिले आणि ते तेथेच लुढकले.

नारद मुनी घाबरून देवांकडे कडे परत आले.  तथापि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित करून श्रीकृष्ण म्हणाले, “राज्यात नुकताच एक राजपुत्र जन्माला आला आहे.  त्याचे कडून तुम्हाला निश्चित या प्रश्नाचे उत्तर मिळेल.” 

नारदांनी विचार केला, ‘आतापर्यंत कीटक, पोपट, व बछड्याच्या मृत्यूने माझ्यावर काही आपत्ती आली नाही.. पण राजकुमाराचे जर काही बरे वाईट झाले तर माझे प्राणही संकटात येवू शकतात.’ 

तथापि देवाचे भरवश्यावर ते राजकुमाराकडे गेले आणि त्यांनी धाडस करून राजकुमाराला मांडीवर घेतले आणि पापा घेण्याचे निमित्त करून हळूच त्याचे कानात विचारले – “ सत्संगतीत राहिल्याने काय लाभ होतो? “

प्रश्न ऐकून राजकुमार हसू लागला आणि म्हणाला, “  मुनिश्रेष्ठ अजून आपण नाही समजलात ?

अहो आपण पहिल्यांदा मला भेटला तेव्हा मी कीटक होतो..आपण मला हा प्रश्न विचारला 

आणि मी मेलो आणि पोपट झालो. नंतर आपल्या दर्शनाने मी घरट्यात मेलो आणि मला बछड्याचा देह प्राप्त झाला. पुन्हा आपले दर्शन घडले आणि बछड्याचा देह पडून  सर्व देहामध्ये श्रेष्ठ असा हा मनुष्य देह प्राप्त झाला — आणि पुन्हा आत्ताच्या दर्शनाने मला पूर्णत्व प्राप्त झाले. हे सर्व आपल्यासारख्या संतांच्या दर्शनाचेच फळ आहे. ज्यांना आपल्या सारख्या संतांचा सहवास मिळतो ते धन्य आहेत.” 

— नारदांना त्यांचे प्रश्नाचे उत्तर मिळाले व सत्संगाचा महिमाही कळला. 

“नारायण नारायण” म्हणत ते देवांकडे आले आणि म्हणाले,  ” देवा जशी आपली लीला अगाध

तशीच आपली समजावून देण्याची पद्धतही दिव्य आहे “

 

******म्हणून मित्रांनो जीवन जगताना संगत ही खूप महत्वाची आहे

**बाभळीच्या झाडाशेजारी केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. 

**या उलट चंदनाच्या झाडाशेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. 

**ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला. 

**श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. 

**याउलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म, कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्याचा नाश झाला. 

***** आपण ज्या सोबत रहातो त्याच्या विचारांचा,रहाणीचा, वागणीचा, अंमल हा आपल्यावर होत असतो.

**संगतीने विचार श्रेष्ठ अथवा दूषित होतात . संगत कशी हवी याचा विचार करावा…

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गंगूताई हनगल…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “गंगूताई हनगल…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

(पाच मार्च- जन्म दिनानिमित्त)

श्रीमंती म्हणजे नेमकं कायं ह्या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या त-हेने देऊ शकतील.मला विचारलं तर मी म्हणेन आपल्याकडे वेगवेगळ्या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या व्यक्ती म्हणजे आपली श्रीमंती.आणि म्हणूनच आपला भारत देश हा मला वाटतं ह्या अर्थाने एक खूप जास्त श्रीमंत राष्ट्र असावं. 

ह्या अनुभवी,जेष्ठ मंडळींबद्दल तर आपल्या प्रत्येकाच्या मनात नितांत आदर हा असतोच. म्हातारं वयानं असणं आणि म्हातारपणं येणं ह्या दोन निरनिराळ्या संकल्पना आहेत हे ह्या निमीत्ताने मला नव्यानेच उमगलं.म्हातारपण येण्यात खरतरं वयाचा संबंध नसून त्या मनोवृत्तीचाच खरा संबंध असतो हे अगदी मनोमन पटलं.कित्येक वयानं वयस्कं झालेल्या लोकांमधील तरुणाईला सुद्धा लाजवेल अशी कामाची आवड,चपळता,हौस, सकात्मकता, एनर्जी बघायला मिळते तर कित्येक तरुण व्यक्तींमध्येही कित्येकदा कमालीची विरक्ती,आळस,कामाची नावड,नकारात्मकता, औदासिन्य बघायला मिळतं.अशावेळी खरचं कळतच नाही म्हातारपणं हे कोणत्या मापदंडाने मोजावं.ही म्हातारपणातील तरुणाई आणि तरुणाईतील म्हातारपणं बघितले की चटकनं ती चवनप्राश वाली जाहिरात आठवते, “सोला साल के बुढ्ढे ओर सौ सालके जवान”वाली जाहिरात.

5 मार्च.आज अशाच एका अगदी कापसासारख्या म्हाता-या होऊन गेलेल्या पण शेवटच्या श्वासापर्यंत तरुणाई टिकवून ठेवणा-या व्यक्तीची जयंती. ही व्यक्ती संगीत क्षेत्रातील असून हे क्षेत्र प्रिय असणाऱ्या व्यक्तींसाठी तर ह्या दैवतच.ह्या व्यक्ती म्हणजे हिंदूस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका गंगूताई हनगळ.

ह्यांचा जन्म 5 मार्च 1913 ला धारवाड येथे झाला. संगीताचे प्राथमिक धडे ह्यांनी दहाव्या वर्षी स्वतःच्या आईकडून घेण्यास सुरवात केली आणि वयाच्या अकराव्या वर्षी 1924 साली बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी महात्मा गांधी,नेहरुजी, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनीदेवी नायडू ह्यांच्या उपस्थितीत स्वागतगीत गाऊन वाहवा मिळविली. काही काळ त्या कथ्थक नृत्य शिकल्या.मग 1938 पासून सवाई गंधर्व म्हणजेच रामचंद्र कुंदगोळकरांकडे किराणा घराण्याची गायकी पंधरा वर्षे साधना करून प्राप्त केली. त्यांना भिमसेनजी जोशी ह्यांचीही संगत लाभली.

सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह हुबळी येथील वकील व्यावसायिक गुरुराज कौलगी ह्यांच्याशी झाला. कौलगींना संगीताची जात्याचं खूप आवड असल्याने ग़गूताईंची संगीतसाधना ही शेवटपर्यंत टिकली,जोपासल्या गेली. त्यांचे संगीतसाधनेतील कारकीर्द आणि लोकप्रियतेचे टप्पे बघितले की खरचं अचंबीत व्हायला होतं. त्यांच्या जाहीर कार्यक्रमांची सुरवात 1931मध्ये

त्यांची एच.एम.व्ही.कडून गाण्याची पहिली तबकडी 1932 मध्ये तर आकाशवाणी वर पहिला कार्यक्रम 1933 मध्ये झाला.

कुठल्याही व्यक्तीला एखाद्या गोष्टीचा ध्यास असला तर ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती कितीही आणि कोणतेही अडथळे पार करु शकते.फक्त इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन सुद्धा गंगूताई आपल्या संगीतसाधनेच्या जोरावर धारवाड विद्यापीठाच्या मानद संगीत प्राध्यापक झाल्यात.त्यांनी परदेशात अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत.संगीताच्या कार्यक्रमांमुळे त्या अमेरिका, इंग्लंड, कँनडा, नेपाळ,नेदरलँड, पाकिस्तान, जर्मनी, फ्रान्स व बांगलादेश इ.ठिकाणी जाहीर कार्यक्रम करण्यासाठी गेल्या.

भारतसरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण ह्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी गौरविले.त्यांना पन्नास पेक्षाही जास्त मानाचे पुरस्कार मिळालेत.त्यांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी शाळा,महाविद्यालयातून सुमारे 200 जाहीर कार्यक्रम केलेत.त्यांना गानरत्न, गानसरस्वती,रागरागेश्वरी ह्या सारख्या उपाध्या मिळाल्यात.हुबळीमधील त्यांचे “गंगालहरी” नावाचे घर सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.हुबळीला सुमारे पाच एकर जागेत अद्ययावत संगीत गुरुकुल उभारण्यात आले.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंगूताईंनी त्यांचा तब्बल दीड तास चाललेला शेवटचा जाहीर गाण्याचा कार्यक्रम वयाच्या अवघ्या 89 व्या वर्षी दणदणीत पार पाडला. वयाच्या 96 व्या वर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी शेवटचे गायन केले.त्या दिवशी त्या दहा मिनीटे सलग गायल्या.खरचं आहे नं हा तरुणाईला लाजवणारा उत्साह, मेहनत, साधना अशा ह्या थोर,अख्ख आयुष्य संगीतसाधनेला वाहून घेणाऱ्या गंगूताई हनगळांनी 21 जुलै 2009 रोजी अखेरचा श्वास घेतला.खरचं अशा थोर विभुती बघितल्या की नतमस्तक व्हायला होतं हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर 

माणसाचे नाव आणि माणसाचा पोशाख ही त्या व्यक्तीची पहिली ओळख असते.  केवळ पोशाखावरूनच त्याची जात, भाषा, प्रांत राष्ट्रीयत्व तसेच जीवन पद्धतीचाही अंदाज बांधता येतो.

 भारतामध्ये विविध पोशाख  परिधान केले जातात. पुरुषांचे वेगळे, स्त्रियांचे वेगळे. सदरा लेंगा किंवा धोतर आणि नऊवारी साडी म्हटलं की लगेच पारंपारिक महाराष्ट्रीयन स्त्री— पुरुष नजरेसमोर येतात. सलवार-खमीस, घागरा—ओढणी,  उलट्या पद्धतीची गुजराती साडी, दाक्षिणात्य पद्धतीचे विशिष्ट पोशाख, काठीयावाडी, राजस्थानी कितीतरी प्रकार!  अनेक रंगी, कलाकुसरींचे.   वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख.पोशाख हा नुसता कपड्यांपुरताच मर्यादित नसतो, तर त्या त्या पोशाखावर साजेसे असे अलंकारही त्यानिमित्ताने घातले जातात.  आणि त्यामुळे अंगावर घातलेल्या कपड्यांची शोभा, लज्जत ही वाढते.  अशा परिपूर्ण पोशाखातील व्यक्ती ही आकर्षक, प्रसन्न भासते.  नीटनेटक्या पोशाखातल्या व्यक्तीचा सामाजिक प्रभाव हा लक्षवेधी असतो. 

कुणी कुठला पोशाख घालावा याबद्दलही आपले अगदी पूर्वापार संकेत आहेत. नेत्यांचा वेश, समाजसेवकांचे कपडे, कलाकारांचे कपडे, संगीतकाराचा पोशाख, कचेरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेश, क्वचित  कधीतरी ड्रेस कोड,(शर्ट,पँट,टाय किंवा पारंपारिक पोशाख),शेतकरी,गुराखी,  सणासमारंभाचे पोशाख, शाळेत जाणाऱ्या मुलांचे गणवेष हे सारे ढोबळ मनाने ठरलेलेच असतात.  आणि सर्वसाधारणपणे याच प्रकारची वेशभूषा सामाजिक स्तरावर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, परिधान केली जाते. 

पोशाख आणि वय याचाही संबंध आहेच.कुमारवय, तरुण, वृद्ध अशी विभागणी पोशाखाच्या बाबतीतही होतेच. आणि व्हायलाही हवी.  जे कपडे तरुणपणी शोभतात ते म्हातारपणी अशोभनीय वाटू शकतात.  सहजच आपण बोलतोच की “असे कपडे वापरताना जरा वयाचा तरी विचार करायचा ना? 

काहीजण मात्र बिनधास्त, बेलाशक पणे भडक, चित्रविचित्र कपडे घालण्यास मागेपुढे पहात नाहीत. वयाचा विचार करत नाहीत.  पण कधी कधी या लोकांना अशाच वेशात बघण्याची, बघणाऱ्यांना ही सवय होऊन जाते.

खरोखरच विशिष्ट पोशाखावरून माणसाची एक विशिष्ट प्रतिमाही निर्माण होत  असते. जागतिकीकरणामुळे मात्र आता “ड्रेसेस” या विषयात प्रचंड उलथापालथ झालेली आहे.        

पाश्चिमात्य कपड्यांचा दिमाख, सुटसुटीतपणाच्या नावाखाली सर्रास दिसू लागला आहे.  बदलत्या काळा नुसार, जीवनपद्धतीनुसार पोशाखातला बदलही तसा स्वीकृतच आहे.  पण त्यात केवळ अनुकरण नको.  जो वेश आपण घालू, तो तितकाच सहजपणे आपल्याला निभवताही  आला पाहिजे याचेही भान ठेवायला हवे. 

स्त्रियांमध्ये   पारंपारिक नऊवारी साडी हा आता कधीतरी हौसेने, खास प्रसंगी नेसण्याचाच प्रकार उरला आहे.  फार कशाला?.. साडीची जागा सलवार-कमीसने अगदी सहजपणे बळकावली आहे. टाॅप आणि जीन्स वरचढ झालेत.

आजकाल विनोदी ,हसवणुकीचे कार्यक्रम म्हटले की पुरुषांनी स्त्रियांच्या वेशातच पेश होणे. हे विडंबनही नकोसेच वाटते.विकृत,अतिरंजीत ,अश्लील वाटते.

पोशाखातले विविध बदल आता समाजाच्या अंगवळणी पडूच लागलेत.  त्याविषयी हरकत घेण्याचे ही काही कारण संभवत नाही.  पण गैर एका गोष्टीचं वाटतं— ज्यात केवळ परदेशी अनुकरण आहे, ते म्हणजे उद्युक्त करणारे, लांडेबांडे, तोकडे, शरीर प्रदर्शन करणारे अपुरे पोशाख!  कितीही डोळे झाक करायची म्हटली तरीही यामुळे आपल्या संस्कृतीतले काहीतरी घसरत चालल्यासारखे वाटते या पोशाखांमुळे.  “शेवटी ज्याची त्याची निवड”,” ज्याची त्याची मर्जी” किंवा “उगीच काकू बाईचा शिक्का नको बसायला”  म्हणून हट्टाने केलेला उपद्व्याप असेही असेल.  दृष्टीचा ही दोष असेल. ज्या पोशाखात, आपण एखाद्या युरोपियन स्त्रीला बघू शकतो तर भारतीय नारीला का नाही?   असा प्रश्न येऊच शकतो. कशासाठी या संस्कृतीच्या भिंती?—-

 —— पण तसं नाही. या नुसत्याच संस्कृतीच्या भिंती नाहीत, तर ती सभ्यतेची कवच कुंडले ही आहेत. 

नेहमीच दूरचे डोंगर साजरे दिसतात का?

मी अमेरिकेत असताना तिथली एक तरुणी मला म्हणाली होती,

” आंटी ! मला तुझ्यासारखी साडी नेसायला शिकवशील का? मला तुझा हा ड्रेस (साडी) फार आवडतो.  तू यात किती सुंदर दिसतेस !”

 —- नेमकं मला हेच म्हणायचे आहे. कपडे घाला कोणतेही ! पण समोरच्या व्यक्तीने अगदी सहज, मनापासून म्हटलं पाहिजे,

——–” तू किती सुंदर दिसतेस!”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उरलेलं अन्न… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ उरलेलं अन्न…  ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर‌ त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !

साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंटमध्ये राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे. अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधूनमधून भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव…. 

..

— शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सूचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.

असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.

..

मग जरा आजूबाजूला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहिलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळूहळू निघून गेला. मलाही हातून एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.

..

पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातून बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.

..

मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.

..

मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं. 

..

ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजूंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.

..

ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)

..

“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.

..

माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला. 

..

माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.

हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो की निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो– “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”

..

माझ्या चांगुलपणापायी झालेली ही शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे

..

ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ हा माझा मार्ग एकला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ हा माझा मार्ग एकला… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

हा माझा मार्ग एकला.. आता  तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढच्या प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला. आपुलाच संवाद आपुल्याशी,आत्मसंवाद. करेन सारीच उजळणी गत आयुष्याची, काय मिळविण्यासाठी किती दयावे लागले याच्या जमाखर्चाची. हाती उरले ते काय आणि सोबत नेतोय काय याच्या खातरजमेची. मागे आता माझे उरले आहे इतिहासातले फक्त पिकलेले पान..तुमच्या नव्या पिढीच्या शिलेदारांना दिलाय मी जीवनाचा मंत्र  खरा.. ज्यात मिळेल फक्त सात्त्विक समाधान तोच राजमार्ग धरा..तेच  मला गवसले  म्हणून तर या एकलेपणाच्या पथावर मन:शांतीचे दिप उजळले.. या निर्जन एकांतात देखिल मनास भीतीचा लवलेशही स्पर्शून जात नाही… आणि मनही कशातही गुंतून राहिले नाही.. सगळे काही आलबेल नव्हते जीवनात, संघर्षाविना सहजी नव्हते नशिबात.षडरिंपूच्या मातीचच देह होता माझा,  भोवतालच्या माया , ममता, माणूसकिच्या  संस्काराने प्रोक्षळला गेला तो.. मग मी ही त्यात वाटत चालत होतो. खारीचा माझा  वाटा मी पण माणूसच होतो तर मी कसा राहावा एकटा.. परंपरेची भोयी खांद्यावर घेऊन संसाराची पालखी  मिरविली. कष्टाचे उद धूप जाळले  संसारा बरोबर समाजाचे मंदिरही उजाळले. नैवैधयाची भाजी भाकरी महाप्रसाद म्हणूनी वाटली..जो जो आला भेटला तोषविले त्याला त्याला..तृप्तात्मयाच्या आर्शिवादाने भरून गेली झोळी.. सुख शांतीचा बुक्का लागला कपाळी.. तोच विठूरायाने दिली वारीची हाळी.. हा मग मी निघलो सर्व संग परित्याग करुनी.हा वेड्यानो अश्रू नका आणू नयनी…हा माझा मार्ग एकला.. आता  तुम्ही कुणीच येऊ नका माझ्या सोबतीला. घेतलीय काठी माझ्या आधाराला. येथून पुढचा प्रवासात मीच ऐकेन माझ्याच संवादाला.. .

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares