मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमरकंटक… एक दिव्य तीर्थ ! ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अमरकंटक… एक दिव्य तीर्थ ! ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अमरकंटक… जेथे भगवान शिवाने समुद्र मंथना नंतर “हलाहल” पचविण्यासाठी तप:साधना केली होती! अमरकंटक… नर्मदा मातेचं जन्म स्थान ! अमरकंटक … देवतांच्या सहवासाने पवित्र झालेली भूमी ! अमरकंटक … सिद्धांच्या  साधनेने सिद्ध झालेलं सिद्धक्षेत्र ! अमरकंटक… योग्यांना आकर्षित करणारे ऊर्जात्मक ठिकाण ! अमरकंटक … महर्षी मार्केंडेय, महर्षी कपिल ,महर्षी भृगू, महर्षी व्यास, च्यवन ऋषी, जमदग्नी ऋषी, अगस्ती ऋषी,दुर्वासा ऋषी , वशिष्ठ,कृतू,अत्री,मरिची, गौतम,गर्ग, चरक,शौनक… अशा किती तरी महान ऋषी-मुनींनी,योग्यांनी, सिद्धांनी, साधकांनी  जिथे तप केले… साधना केली… ऋचा- मंत्र रचले…ग्रंथांची निर्मिती केली…मानव जातीच्या कल्याणासाठी वैद्यक शास्त्र,रसायन शास्त्र, वास्तु शास्त्र , ज्योतिष शास्त्र अशा अनेक प्रांतांत वेगवेगळे शोध लावले अशी  गुढ-रहस्यमय  भूमी ! अमरकंटक…जिथे  जगद्गुरू शंकराचार्यांचे वास्तव्य देखील  काही काळ होते! खरंच , अमरकंटक म्हणजे अष्टसिद्धी प्राप्त करून देणारे एक तीर्थक्षेत्रच आहे!

अमरकंटक म्हणजे दुर्लभ औषधीय वनस्पतींचे भांडार आहे! चरक संहितेत वर्णन केलेल्या अनेक औषधी वनस्पती फक्त इथेच सापडतात! शेकडो दुर्लभ झाडं, पौधे, वेली, कंदमुळे, फळं, फूलं यांचा इथे खजिना आहे! जगात कुठेही न सापडणारी गुलबकावली केवळ अमरकंटकमधेच फुलते! सुमारे ६३५ औषधीय वनस्पती इथे सापडतात!

अशा या अमरकंटकमध्ये  विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत जेथे एकत्रित येतात, तो उंच डोंगराळ भाग म्हणजेच मैकल पर्वत! येथेच शिवाने साधना केली.योगाभ्यासाद्वारे आणि येथील अगम्य वनौषधींच्या सहाय्याने हलाहलचा प्रभाव कमी  केला! साहजिकच कैलास नंतर शिवाचे आवडते ठिकाण कोणते,तर ते म्हणजे अमरकंटक! याच ठिकाणी नर्मदा मातेचा जन्म झाला ! अनेक प्राचीन ऋषींची अष्टसिद्धी प्राप्तीची तपोभूमी हिच! किंबहुना   अमरकंटक म्हणजे एक प्रकारे त्यांची प्रयोगशाळाच होती! होय प्रयोगशाळा… कारण अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा शोध इथेच लागला! या अमरकंटक मध्ये! 

जमदग्नी ऋषींनी “संजीवनी” विद्या इथेच मिळवली!अश्र्विनी कुमारांनी च्यवन ऋषींसाठी “चवनप्राश” इथेच तयार केले! “वैज्ञानिक विचारांचे जनक” म्हणून ज्यांचा अभिमानाने उल्लेख केला पाहिजे, अशा कपील मुनींनी परमाणू या संकल्पनेवर रचना केल्या, त्यादेखील इथेच! महामृत्युंजय मंत्राचे प्रणेते महर्षी मार्केंडेय यांनी ” मार्केंडेय पुराणा”ची निर्मिती इथेच केली! वैद्यक शास्त्राची देवता आणि आयुर्वेदाचा प्रणेता ” धन्वंतरी ” इथेच अनेक रोगांच्या औषधांची उकल करायचा! इथे कोणी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला. कोणी वास्तुशास्त्रातील शोध लावले.कोणी मंत्र रचले.कोणी  ग्रंथ निर्माण केले.कोणी संहिता लिहील्या .तर कोणी अष्टांग योगाच्या आधारे अष्टसिद्धी मिळविल्या!

कारण हे क्षेत्रच एकप्रकारे भारलेले आहे! अमरकंटकच्या वातावरणांतच  ‘जादू’ आहे! सहसा कुणाच्या लक्षात येत नाही, पण इथे तुम्ही नर्मदा स्नान करा  आणि शांत ध्यानाला बसा. तुमच्या दोन्ही नाड्या समान चालतात! सूर्य नाडी आणि चंद्र नाडी…! कपालभाती करण्याची गरजच नाही. म्हणूनच अनेक सिद्धांचा वास इथे असतो! म्हणूनच मत्सपुराणात अमरकंटकला  कुरुक्षेत्रापेक्षाही पवित्र तीर्थाचा दर्जा दिलेला आहे! पद्मपुराणामध्ये तर नारदमुनी युधिष्ठिराला सांगतात की, अमरकंटकच्या चारही दिशांना कोटी रुद्रांचे प्रतिष्ठान आहे! 

अशा पवित्र  अमरकंटकाचे नाव कधिकाळी ‘अमरकंठ’ असे होते. जे शिवा वरून पडलं होते.  पुढे अमरकंठचे अमरकंटक झाले! स्कंद पुराणात अमरकंटक या नावाची सुंदर फोड केली आहे. पुराणकार म्हणतात, अमर म्हणजे देवता आणि कट म्हणजे शरीर !  जो पर्वत देवतांच्या शरीराने आच्छादीत आहे तो पर्वत म्हणजे ‘अमरकंटक’ पर्वत! 

अशा प्रकारे अमरकंटकचा उल्लेख अनेक पुराणात आहे. रामायणात आहे. महाभारत आहे. अनेक ठिकाणी अमरकंटकचा उल्लेख वेगवेगळ्या नावांने आहे.  शिव पुराणात  

” ओंकारमरकंटके” असा याचा उल्लेख आहे,तर रामायणाने त्याला  “ऋक्षवान पर्वत” म्हटलेलं आहे. त्यावरून नर्मदेला  देखील ‘ऋक्षपादप्रसूता’ म्हटलं गेलं आहे!

महाभारतात  एका ठिकाणी याचा “वंशगुल्म तीर्थ” म्हणून उल्लेख आहे!तर महाभारताच्या वनपर्वात  ” आनर्त देश” असाही उल्लेख आहे!वाणभट्ट याला “चंद्र पर्वत” म्हणून नावाजतो. कोणीतरी याला “महारूद्र” देखील संबोधले आहे!कुठे “अनूपदेश” म्हणून…. तर कुठे “सर्वोदय तीर्थ” म्हणून…. काही ठिकाणी  “स्कंद” “मैकल”असाही उल्लेख आहे! कालीदास तर आपल्या साहित्यात या ठिकाणाचे “आम्रकूट”  नावाने सुंदर वर्णन करतो!  

अमरकंटकला कोणत्याही नावाने ओळखले तरीही यांचे निसर्ग सौंदर्य मात्र अप्रतिम आहे! उंच पर्वत …खोल दऱ्या … घनदाट जंगल…त्यातून वाहणारे झरे…नद्या…लहान- मोठे प्रपात…आकाशाला भिडणारे वृक्ष…वृक्षांवर बागडणारे हजारो पक्षी…त्यांचा किलबिलाट…फळा- फुलांची श्रीमंती…आणि त्याच बरोबर गर्द झाडीत ध्यानस्थ बसलेली प्राचिन मंदिरे! स्वर्ग- स्वर्ग म्हणतात तो हाच!

अशा या  निसर्गरम्य अमरकंटकचा उल्लेख  ज्याअर्थी रामायण – महाभारतात आहे, त्याअर्थी रामायणातील –  महाभारतातील नायक इथे नक्कीच आले असतील! पांडवांनी “नर्मदा पुराण” तर साक्षात मार्केंडेय ऋषींच्या मुखातून ऐकलेले आहे!  

अमरकंटक पासून  वीस एक किलो मीटर अंतरावर लखबरीया नावाचं गाव आहे. इथे लाखो मानव निर्मित गुंफा आहेत. म्हणून या गावाचं नाव “लखबरीया” पडलं आहे! आणि या गुंफा पांडवांनी वनवास काळात निर्माण केल्या होत्या , अशी  इथे  जनकथा आहे!लाखो गुंफा  इथे आहेत म्हणण्यापेक्षा त्या  होत्या असं म्हणणं जास्त  इष्ट ठरेल! कारण काळाच्या ओघात काही गुंफा बुजल्या गेल्या , काही बंद केल्या गेल्या!आज फक्त तेरा गुंफाच पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.वसंत पंचमीच्या दिवशी येथे छान पैकी जत्रा भरते!

रामायण काळातील अनेक जनजमाती आजही येथे सापडतात! इंद्रजिताने मूर्छित केलेल्या लक्ष्मणावर   ऐन युद्धकाळात  योग्य उपचार करणारा सुषेण वैद्य तुम्हाला आठवत असेल. हा सुषेण अमरकंटकच्या परिसरात वाढलेला. निषाद जमाती पैकी एक ! तेव्हाची “निषाद” जमात म्हणजे आजची ” बैगा ” जमात होय!  जी जमात फक्त अमरकंटक क्षेत्रातच जिवीत आहे! अमरकंटकला रामायणामध्ये ऋक्षवान पर्वत म्हटलेलं आहे. याठिकाणचा प्रमुख ऋक्षराज म्हणजेच रामाचा एक सेनापती ” जांबुवंत”!  पर्वत गाथा नावाच्या एका ग्रंथांनुसार तर रावणाने पुष्पक विमानातून अमरकंटक येथे येऊन तपश्र्चर्या केलेली आहे!

अमरकंटक हे शिवाचं प्रिय स्थान असले तरी, इथं शैव संप्रदायासह वैष्णव,जैन, शाक्त,गाणपत्य असे अनेक संप्रदाय आनंदाने नांदले आहेत! त्यामुळेच शेकडो- हजारो वर्षे हे स्थान भारतीयांचे आध्यात्मिक केंद्र राहिले आहे! इथे धार्मिक चर्चा होत असत!  यज्ञ व्हायचे!सत्संगाचे मेळे भरायचे! भारतीय समाजात आणि संस्कृतीमध्ये अमरकंटकचे महत्त्व अधोरेखित आहे!

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देव,अल्ला,गाॅड वगैरे… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ देव,अल्ला,गाॅड वगैरे… ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

मानवी जीवनाची कूस बदलवून टाकणारा तो शब्द …अवघ्या चारपाचशे वर्षात पृथ्वीच्या रंगमंचावर दाखल झाला आणि बघता बघता संपूर्ण मानवी आयुष्य व्यापून टाकले. तो शब्द केवळ शब्द नसून मानवी जीवनाची गुरुकिल्ली म्हणावी इतपत तो महत्त्वाचा बनला आहे. त्या शब्दाचे फायदे अगणित आहेत आणि काही तोटे देखील आहेत.   हा शब्द मानवी जीवनात तंत्रज्ञान म्हणून सत्ता गाजवतो मात्र या शब्दाला मानवी जीवनात जेव्हा “मुल्यात्मक” वजन प्राप्त होईल तेव्हा मानवी जीवनाचा संपूर्ण हितवर्धक कायापालट होईल याची नक्कीच खात्री देता येते. संपूर्ण जगाला खेडे बनवण्याची किमया याच शब्दाच्या प्रभावाने घडवून आणली आणि दुसऱ्या टोकावर संपूर्ण जगाचा विनाश करण्याची ताकद देखील याच शब्दाच्या विकृत वापराने मनुष्याच्या वाट्याला आली आहे.हा शब्द आणि त्याच्या योग्य जाणीवा समजून घेऊन मानवी जीवन फुलवले पाहिजे .

विज्ञान …..एक जादुई शब्द आहे. जादुई याकरिता म्हटले की, जादूची कांडी फिरवल्याचा जो परिणाम कल्पनेत दिसून येतो त्याहून अधिक जादुई परिणाम या शब्दाच्या वापराने मानवी सृष्टीत झाला आहे. अवघ्या चारपाचशे वर्षापूर्वी विज्ञान सर्वार्थाने मानवी नजरेत भरले आणि जगाचे स्वरूप आरपार बदलले. मनुष्याच्या प्रगतीच्या वाटा विज्ञानानेच मोकळ्या केल्या आणि आकाशाला गवसणी घालण्याची कल्पना जवळपास प्रत्यक्षात आणून दाखवली. तंत्रज्ञान ही विज्ञानरुपी नाण्याची एक बाजू आहे. या बाजूने आता मानवी जीवनाचा कोपरा न् कोपरा व्यापलेला आहे. मनुष्याने या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाचा अतोनात फायदा उपटला आहे. याचबरोबर या तंत्रज्ञान रुपी विज्ञानाची घातक बाजू म्हणून अण्वस्त्ररुपी विनाशकी हत्यारे निर्माण झाली आणि पृथ्वी विनाशाच्या टोकावर उभी राहीली हे देखील काळे सत्य आहे. विज्ञानाची सृष्टी जेवढी मोहक आहे , उपयोगी आहे त्यापेक्षा अधिक सुंदर व बहुपयोगी आहे विज्ञानाची दृष्टी. ही दृष्टी मानवी वर्तनात व्यवहारात आली की … अंधश्रध्दा, कर्मकांडे, धर्मांधता, जातीयता , भयता , प्रांतीयता , वंशवादता , अलैंगिकता अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. विज्ञानाची दृष्टी म्हणजे विज्ञानाला ” मुल्यात्मक जाणीवेने ” मानवी जीवनात प्रतिष्ठीत करणे. विज्ञानाची नेमकी जाणीव म्हणजे विज्ञान तुमच्या मनांत असंख्य प्रश्न उभे करते आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा मार्ग देखील ” वैज्ञानिक दृष्टिकोन ” ठेवून मिळवता येतो ही सकारात्मक विधायक भावना रुजवते. विज्ञानाची नेमकी जाणीव हीच की , मनुष्याचे पृथ्वीवरील क्षुद्रत्व समोर ठेवते आणि पुन्हा मनुष्याच्या बुध्दीला उत्तेजना देऊन त्याचे प्राणी सृष्टीहूनचे अधिकचे महत्त्व ठळकपणे समोर आणते. विज्ञानाची जाणीव म्हणजे जादूची कांडी फिरवायला देखील योग्य ध्यास व ध्येय असावे ही भावना प्रबळ करून मनुष्यच पृथ्वी जगवू शकतो असा ठाम आत्मविश्वास मानवी मनांत निर्माण करते. विज्ञानाची ठळक जाणीव म्हणजे जोवर विज्ञान मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तोवरच माणसाला शक्तीशाली बनण्याची संधी आहे , आव्हान आहे  आणि त्याचबरोबर समस्त सृष्टीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असल्याचे भानं देखील उपलब्ध आहे. विज्ञान हा शब्द वगळून मानवी जीवनाचा भूतकाळ नाही …वर्तमानकाळ नाही …अन् भविष्यकाळ अजिबात नाही.

विज्ञानाचा नैतिक दबदबा इतका की, धर्म नावाच्या संघटीत क्षेत्राला बाजूला करण्याची हिंमत बाळगून आहे. धर्माला योग्य पर्याय म्हणून विज्ञानवादी असणे ही एक वैचारिक भुमिका मांडली जात आहे. विज्ञानाएवढा ताकदीचा आणि संपूर्ण मानवी समाज व्यापणारा दुसरा शब्दच उपलब्ध नाही . विज्ञानाची ही किमया अफाट आहे, जादूई आहे, प्रगतीशील आहे. फक्त जाणीव हीच राखली पाहिजे की, विज्ञानाच्या सृष्टीबरोबरच विज्ञानाची दृष्टी मानवी समाजात अधिक फैलावली पाहिजे.

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वृध्दाश्रमातील आजी – लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆  वृध्दाश्रमातील आजी – लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆ 

“आजी! काय करताय?”

“काही नाही, थोडी सफाई करतेय पोरा!”

सामजिक सेवा संस्थेत हजर झाल्यापासुन या वृध्दाश्रमात माझी पाचवी फेरी. आमच्या संस्थे मार्फत काही खाण्या पिण्याची पाकिटे या वृध्दाश्रमात घेवुन यायचो. मी जेंव्हा कधी यायचो तेंव्हा या वृद्ध आजी खराटा घेवुन साफ सफाई करतांना दिसत. त्यांचे वय आणि कुबड निघालेल्या त्या शरीरला असं काम करून पाहताना मला मनातल्या मनांत खुपच दुःख होई. त्याच बरोबर त्यांना या परिस्थीतीत सोडणाऱ्या घराच्या सदस्यांबद्दल देखिल प्रचंड चीड येई. खरंच माणुसकी संपलीय असे वाटे.

माझं काम महिन्यातुन एकदा त्या वृध्दाश्रमात खाण्याची पाकिटे देणं. म्हणजे फक्त दहा- पंधरा मिनिटांचं काम, मात्र त्या दहा-पंधरा मिनिटांत मला जे अनुभवायला मिळायचे ते इतके दुःखद आणि वेदनादायी असायचे की, दोन-तीन दिवस मला नीट झोप देखिल लागत नसे. नेहमी  वृध्दाश्रमातील त्या वृद्ध आजी आजोबांचे दुःखी चेहरे दिसत.

आज नेहमी प्रमाणे मी आमच्या संस्थेमार्फत या महिन्यात दान म्हणून दिली जाणारी खाण्याची पाकिटे घेवुन त्या वृध्दाश्रमात माझ्या नेहमीच्या वेळेत गेलो. साधारणतः सकाळचे आठ वाजले असतील.आज देखिल त्या कुबड निघालेल्या आजी झाडु मारताना दिसल्या आणि काळजात चर्रर्रर्र झालं. मी सामान देवून त्या आजीकडे गेलो. “आजी! तुम्ही इतक्या म्हाताऱ्या असुन रोज झाडु का मारता?”

“काय करु पोरा, आता सवय झालीय!”

“आजी तुमच्या घरी कोण कोण आहेत?”

“पोरा! मला दोन मुलं आहेत. एक बाहेर देशात नोकरी करतो आणि दुसरा आपली पालिका आहे ना! त्यांत सगळ्यात मोठा साहेब आहे.”

“आजी! म्हणजे आयुक्त?”

“हो पोरा!”

“म्हणजे आपले समीर गायकवाड साहेब?”

“हो पोरा! तोच तो.”

आजीच्या त्या बोलण्याने मला धक्काच बसला. कारण गायकवाड साहेबांविषयी आजपर्यंत चांगले ऐकून होतो की, त्यांनी फार गरीबीतुन शिक्षण पुर्ण केले. ते खुप संस्कारी, इमानदार वगैरे वगैरे. शेवटी काय, तेही माणूसच.. भले ते चांगले असतील पण त्यांची पत्नी, ती खडूस असेल तर? पण तरिही आयुक्त असुन आपल्या आईला वृध्दाश्रमात ठेवणे हे कितपत योग्य आहे?

ते काही नाही! माझं पालिकेत संस्थेच्या कामानिमित्त जाणं होतेच, तेंव्हा साहेबांना विचारूच! असं मी मनोमन ठरवले. कारण त्या आजीची मला फार काळजी वाटायची.

येथील वृध्द आपल्याच मुलांविषयी काय-काय विचार करत असतील? किती स्वप्न, इच्छा, अपेक्षा ठेवल्या असतील त्यांनी त्यांच्या मुलांकडुन. आणि आज काय वाटत असेल त्यांना? मी विचार करता करता आश्रमाच्या गेट बाहेर पडलो. तोपर्यंत त्या आजी झाडु मारतच होत्या. माझ्या भावनिक काळजावर तो एक आणखी प्रहार होता.

आता तर मी मनाशीच ठाण मांडले की, या बाबत गायकवाड साहेबांना विचारायचेच!

दोन दिवसांनी मला संस्थेच्या कामानिमित्त पालिकेत जायची संधी मिळाली. मी आयुक्तांची भेट मागितली आणि मला ती लगेचच मिळाली, कारण आमची संस्था खुपच नावाजलेली संस्था होती.

“साहेब आत येवू?”

“हो! या बसा!!”

“सर! मी मोहन माळी, आधार सेवा संस्थे मार्फत आलोय!!”

“हा बोला! तुमची संस्था तर समाजात अतिशय चांगले काम करतेय!!  माळी साहेब काय करु शकतो मी आपल्यासाठी?”

“आयुक्त साहेबांचे हे इतके आदरयुक्त बोलणे ऐकून मी अगदी भारावून गेलो. इतके संस्कारी साहेब आपल्या स्वतः च्या आईच्या बाबतीत असं वागू शकतात? काय आणि कसं बोलावं काही सुचत नव्हतं.

“बोला माळी साहेब! काय करु शकतो मी आपल्या संस्थेसाठी?”

साहेबांच्या प्रश्नाने मी भानावर आलो. “काही नाही साहेब जरा पर्सनल होतं !”

“पर्सनल?”

“हो साहेब! कसं सांगु तेच समजत नाही?”

“काय असेल ते स्पष्ट बोला माळी साहेब!”

“साहेब! मी आमच्या संस्थेमार्फत महिन्याच्या चार- पाच तारखेला सदानंद वृध्दाश्रमात जातो. तेथे एक आजी आहेत. त्या झाडु मारत असतात. एक दिवस मी त्यांची विचारपूस केली असता त्या आपल्या आई आहेत असं समजलं!”

माझ्या या बोलण्याने साहेब खुपच गंभीर झालेले दिसले. तश्याच गंभीर आवाजात ते म्हणाले. “काय सांगु माळी साहेब? खरंतर मलाही हे पटत नाही! पण माझा नाईलाज आहे हो!!”

“नाईलाज! कसला नाईलाज?”

“माळी साहेब प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात हो!”

“हो साहेब ! प्रत्येकाच्या अडचणी असतात हे खरं आहे, पण तुम्ही आयुक्त पदावर आहात. तुमच्या आईला एखाद्या नातेवाईकाकडे ठेऊ शकता. सरळ वृध्दाश्रमात?”

माझ्या या प्रश्नावर साहेब बराच विचार करून म्हणाले, “माळी साहेब, तुम्ही आश्रमात किती वेळ थांबता?”

“साधारणतः पंधरा- वीस मिनिटे फार तर अर्धा तास!”

“माळी साहेब, आता पुढच्या वेळेस अजुन एखाद दोन तास थांबा!”

“चालेल गायकवाड साहेब!”

मी साहेबांच्या केबिन बाहेर पडतांना विचार करत होतो की, साहेबांचा नक्की काय नाईलाज असेल? असो! पुढच्या वेळेस मी आश्रमात दुपार पर्यंत थांबतो. कदचित साहेबांचा नाईलाज समजेल!

जून महिन्याच्या पाच तारखेला मी समान घेवुन आश्रमात पोहोचलो. आजही नेहमीचं दृश्य. त्या आजी झाडु मारत होत्या. मी माझं काम आटोपून आजी जवळ गेलो. “कश्या आहात आजी?”

“मला कसली धाड भरलीय, मी बरी आहे पोरा! तु कसा आहेस?”

“मी पण बरा आहे आजी! काही दिवसांपूर्वी मी आपल्या मुलाला, म्हणजे गायकवाड साहेबांना भेटलो आणि तुमच्या विषयी बोललो!”

“असं! मग काय बोलला तो ?”

“काही विशेष नाही. ‘नाईलाज आहे’ असं म्हणाले!”

“वाटलंच मला, तो तसंच बोलणार! आणखी काही बोलला नाही ना?”

“नाही आजी!” मी साहेबांच्या सांगण्याप्रमाणे आज थोडा वेळ थांबण्याचा निर्णय घेतला.

दहा- साडे दहा झाले असतील. आजी झाडु मारून थकलेल्या अवस्थेत झाडाखाली एका बाकड्यावर बसल्या होत्या. मी देखिल त्यांच्या बाजुला जावून बसलो. इतक्यात एक आलिशान गाडी वृध्दाश्रमात येतांना दिसली.

तसं ते नेहमीचं दृश्य होतं, कारण बहुतेक श्रीमंत घरची वृध्द मंडळी आश्रमात जास्त असतात. ज्यांची मुलं परदेशात नोकरीला वगैरे असतात. त्यांच्या अश्या गाड्या असतात.

आता मात्र त्या नेहमीच्या दृश्यात काहीसा बदल झालेला दिसला. ती आलिशान गाडी मी आजी सोबत बसलेल्या बाकड्याजवळ येवुन थांबली व गाडीचा मागचा दरवाजा उघडला तश्या आजी खराटा घेवूनच त्या आलिशान गाडीत बसल्या. ती गाडी तेथेच यु टर्न मारून निघुन गेली. ते पाहुन मी थक्क झालो. हा नक्की काय प्रकार आहे तो मात्र समजला नाही.

शेवटी न रहावून मी अधीक्षकांना भेटलो आणि हा काय प्रकार आहे ते विचारले.

“माळी साहेब! ह्या शांता आजी. आपल्या आयुक्त साहेबांच्या आई आहेत हे अगदी खरं आहे. मात्र त्या आपल्या सदानंद वृध्दाश्रमात राहत नाही तर आयुक्त साहेबांच्या, म्हणजे त्यांच्याच घरी अगदी सुखात आपल्या नातवंडां सोबत राहतात. आधी तर त्या नातवंडांना देखिल आणायच्या. मग त्यांना जाणीव झाली की, त्यामुळे येथील वृद्धांना त्यांच्या नातवंडांची आठवण येते म्हणुन आता आणत नाहीत.”

अधीक्षकांच्या या बोलण्याने मला धक्काच बसला, पण आता मात्र हा सुखद धक्का होता.

“म्हणजे मी समजलो नाही अधिक्षक साहेब?”

“माळी सर, त्याचं कसं आहे नां! शांताबाई आपल्या याच पालिकेत सफाई कामगार होत्या. त्या त्यांचे काम अतिशय इमाने इतबारे करीत. त्यांचे पती गिरणी कामगार होते. तेंव्हा गिरणी कामगारांच्या संपामुळे पतीची नोकरी अध्यात ना मध्यात होती. मात्र अश्या परिस्थीतीत शांताआजीने कुठूंबाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेवून आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पुर्ण केले. त्यांत लहानग्याला विदेशात चांगली नोकरी मिळाली. तर मोठा म्हणजे आपले आयुक्त समीर गायकवाड साहेब.

शांताआजींनी सफाई कामगाराची नोकरी फक्त नोकरी म्हणून नाही तर सेवा म्हणून केली. आणि आज सुद्दा त्यांनी ती सेवा सोडलेली नाही. म्हणून त्या रोज आठ ते दहा या वेळेत येवून साफ सफाई करतात फक्त सेवा म्हणून. खरंतर या वयात शांताआजीने काम करणे गायकवाड साहेबांना अजिबात पटत नाही. मात्र शांताआजींच्या हट्टापुढे त्यांचा देखिल नाईलाज होतो. पण त्यांना घ्यायला व सोडायला ते रोज गाडी मात्र पाठवतात.

त्यामुळे आयुक्त साहेब तर ग्रेट आहेतच पण शांताआजी त्या पेक्षाही  म्हणजे एकदम.. एकदम ग्रेट आहेत़.”

ओ! मला आणखीन एक सुखद धक्का. आता तर माझा देखिल हात आजीला सेल्यूट करण्यासाठी आपोआप कपाळा जवळ आला.

वृध्दाश्रमात आजी दिसल्या म्हणजे त्या येथेच राहत असतील असा गैरसमज झाल्यामुळे मी स्वतःशीच हसलो..

लेखक – श्री चंद्रकांत घाटाळ,

मो 7350131480

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केदारनाथ मंदिर – एक न उलगडलेल कोडं… लेखक – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

केदारनाथ मंदिर – एक न उलगडलेल कोडं… लेखक – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.  अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. 

केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे. 

केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या – मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. – ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. 

ह्या क्षेत्रात फक्त ” मंदाकिनी नदीचं ” राज्य आहे. थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारं पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल. 

“केदारनाथ मंदिर” ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय १००-२०० नाही, तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहीलं असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. 

जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या “Ice Age” कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी “वाडिया इंस्टीट्यूट ऑफ जिओलॉजी, डेहराडून” ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर “लिग्नोम्याटीक डेटिंग” ही टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट ही  “दगडांच आयुष्य” ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की  साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होतं. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही. 

सन २०१३ मध्ये  केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे “सरासरी पेक्षा ३७५% जास्त” पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल “५७४८ लोकांचा जीव गेला” (सरकारी आकडे). “४२०० गावाचं नुकसान” झालं.  तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.

“अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया” यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडिटमध्ये १०० पैकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे.  “IIT मद्रास” ने मंदिरावर “NDT टेस्टिंग” करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.  

दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय “शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक” पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही 

तर “सर्वोत्तम” असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळे वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही, तिकडे हे मंदिर दिमाखात उभे आहे आणि नुसतं उभं 

नाही तर अगदी मजबूत आहे.  ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी, ज्या पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे,  ज्या जागेची निवड केली गेली आहे,  ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे,  त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं, असं आजच विज्ञान सांगतं आहे.

हे मंदिर उभारताना “उत्तर–दक्षिण” असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिरे  ही “पूर्व–पश्चिम” अशी असताना केदारनाथ “दक्षिणोत्तर” बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर  “पूर्व-पश्चिम” असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं. पण ह्याच्या या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही.  मग फक्त कल्पना करा की ते दगड तिथेपर्यंत वाहून नेलेच कसे असतील ?  एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रान्सपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती.  या दगडाची विशेषता अशी आहे की वातावरणातील फरक, तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावरसुद्धा  त्याच्या “प्रोपर्टीजमध्ये” फरक झालेला नाही.  

त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता “एशलर” पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड आणि विटा घळईमधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने 

पाण्याची धार ही विभागली गेली, आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं. पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले, ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं. 

श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती 

टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याचं बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही.  “Titanic जहाज” बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना “NDT टेस्टिंग” आणि “तपमान” कसे सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत, समुद्रसपाटीपासून ३९६९ फूट वर “८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट  रुंद” मंदिर उभारताना त्याला तब्बल “१२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती” देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय. 

आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने “१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचावरचं ” असा मान मिळवणाऱ्या केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण “नतमस्तक” होतो.

वैदिक हिंदू धर्म-संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण आहे, त्याकाळी वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र, अंतराळ शास्त्र, आयुर्वेद शास्त्र, यात आपले ऋषी अर्थात शास्त्रज्ञ यांनी खूप मोठी प्रगती केली होती……. 

म्हणूनच मला मी “हिंदू”असल्याचा अभिमान वाटतो.

|| ॐ नमः शिवाय ||

लेखक : श्री विनीत वर्तक

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रिय वपु, … लेखक – श्री बिपीन कुलकर्णी  ☆ डॉ. ज्योती गोडबोले  ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रिय वपु, … लेखक – श्री बिपीन कुलकर्णी  ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

वसंत पुरुषोत्तम काळे (व पु काळे)

(25 मार्च 1932 – 26 जून 2001)

प्रिय वपु, 

२५ मार्च …. आज तुमचा वाढदिवस. आपल्या समाजात नावाच्या मागे कै. लागले की जयंती म्हणायची पद्धत, पण खरेच तुम्ही गेलात का ? ज्या नियती बद्दल तुम्ही एवढे लिहून ठेवलेत ती नियती अशी का रुसली तुमच्या वर आणि का ? आमच्या पासून केवळ ६८ व्या वर्षी हिरावून घेतले?

६८ हे जाण्याचे वय नक्कीच नाही, पण शेवटी ग.दि.माडगुळकर म्हणून गेले तसेच आहे..  ” पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” …

आज तुम्ही असतात तर आमच्यासारख्या असंख्य चाहत्यांनी, तुमच्या कुटुंबियांनी नक्कीच तुमचे सहस्त्रचंद्र दर्शन केले असते, पण आता या सगळ्या जर तर च्या गोष्टी. तुम्ही कुठे तरी लिहून ठेवले आहे ना ” परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसा पेक्षा, ४ तासाच्या प्रवासात भेटलेली व्यक्ती कधी कधी जवळची वाटू लागते” –  वपु तुमचे आणि आमचे नाते तरी यापेक्षा काही वेगळे आहे का हो ? आम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा तुमचे कुठलेही पुस्तक उघडतो आणि मनसोक्त भेटतो– मग तुम्ही कधी प्रवासात भेटता, कधी घरीच रात्रीच्या वेळी उशिरा भेटता, कधी गाडीत भेटता तर कधी चक्क ऑफिसमध्ये भेटता. तुम्ही जसे आम्हाला भेटता तसे आम्ही पण तुम्हाला प्रत्येक कथेत भेटतोच ना ? तुम्ही प्रत्येक कथा आम्हाला समोर  ठेवूनच लिहित होतात ना… तुम्ही तुमचे मन आमच्या जवळ मोकळे केलेत …. आणि आम्ही आमचे !! हिशोब पूर्ण !!!!

नरक म्हणजे काय ? तुम्ही ‘पार्टनर’ मध्ये किती मस्त एका ओळीत लिहून गेलात — ” नको असलेली व्यक्ती न जाणे म्हणजे नरक” – कसे सुचत होते हो इतकी सोपे लिखाण करायला ?

तसे तुम्ही व्यवसायाने वास्तूविशारद , नोकरी केली मुंबई महानगर पालिकेत आणि नाव कमावले साहित्य विश्वात ! तीनही गोष्टींचा एक दुसऱ्याशी अर्थाअर्थी संबंध नाही, पण वपु तुम्हीच हे करू शकत होतात. 

कदाचित महानगरपालिकेतील नोकरीमुळे तुमचा संबंध समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आल्यामुळे नकळत कथेला विषय आणि खाद्य मिळत गेले…पण याचा अर्थ असा नव्हे की महानगर- -पालिकेमुळे तुम्ही साहित्यिक झालात… नसता मुंबई पालिकेतील प्रत्येक कर्मचारी कथालेखक झाला असता…. तुम्ही म्हणाला होतात न

“कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभरारीचे वेड रक्तात असावे लागते ” … 

तुमच्या प्रत्येक कथेत आदर्श नवरा किंवा बायको डोकावते , आणि संपूर्ण कथा कायम मध्यमवर्गीय  घराभोवती फिरत असते ? काय बरे कारण असावे > —

कदाचित तुम्ही जसे वाढलात त्या वातावरणाचा परिणाम असेल , आणि तुम्हाला सांगतो वपु, त्यामुळेच तुमच्या कथा आमच्या मनाला जास्त भिडल्या. आता हेच बघा न –

“किती दमता तुम्ही ?”  या एका वाक्याची भूक प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला असते”…. या वाक्याचे महत्व कळण्याकरिता तुमच्या कथा वाचाव्या लागल्या?

तुम्ही अजून एक कलाकृती करून ठेवलीत , जे पुस्तक तुम्ही वडिलांवर लिहिलेत. त्याला खरेच तोड नाही.  ” व पु सांगे वडिलांची कीर्ती “…। याला कारण प्रत्येकालाच वडिलांबद्दल भावना असतात, पण किती लोक समर्थपणे त्या जाहीर करतात ? तसेच साहित्य विश्वात वडील या विषयावर लिहिलेली पुस्तके अभावानेच आढळतात…. केवळ त्या एका गोष्टीमुळे पुस्तकाचे महत्व वाढत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वडील ही एक हळवी किनार असते … असंख्य आठवणी आणि भावना असतात. पण त्या तुम्ही कशा मांडता हे फार महत्वाचे…. तुम्ही तर लेखकच–  पण त्याहून जास्त महत्वाचे ते एका लेखकाने एका चित्रकाराचे लिहिलेले चरित्र… 

आपल्या सौ. चे ब्रेन ट्युमरचे आजारपण आणि त्याचा दुखद: शेवट , दिवस रात्र मृत्यूची टांगती तलवार….बायको ही सखी असते असे सांगत तुम्ही आम्हाला नवरा बायको या नात्याची PHILOSOPHY शिकाविलीत…. त्याच नात्याकरिता नियती इतकी निष्ठुरपणे का वागली तुमच्याशी ? कदाचित या अनुभवातून आयुष्याचं सार तुम्ही इतक्या सहज पणे सांगून गेलात – ” प्रोब्लेम कोणाला नसतात ? ते सोडवायला कधी वेळ, कधी पैसा तर कधी माणसे लागतात “

अंत्ययात्रेला जाऊन आल्यानंतर अथवा स्मशानातून परत आल्यावर थकवा येण्याचे कारण काय, किंवा मन सैरभैर का होते याचे उत्तर तुम्ही सहज देवून गेलात – “रडणाऱ्या माणसापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो ” – किती अचूक लिहून गेलात हो तुम्ही !

तुमचे लेखन जसे गाजले तसेच तुमचे कथाकथन गाजले. कथाकथनाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले. 

तुम्ही कथाकथन थेट साता समुद्रापार नेलेत …लंडन, अमेरिका , कॅनडा ला कार्यक्रम झाले …अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले —  कर्तुत्व तुमचे पण मान आमची उंचावली !

महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळाले…तुमचे असंख्य चाहते धन्य झाले.

वपु तुमच्या दृष्टीकोनाला खरंच दंडवत ! आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खरोखरच खूप काही शिकवणारा आहे…. पत्र हे संवादाचे सगळ्यात प्रभावी माध्यम … आणि मुख्य म्हणजे पत्र हे असे माध्यम की ज्यात फक्त दोन लोक संवाद साधतात…. तुम्ही म्हणून गेलाच आहात न की — ” संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात !”—–

— म्हणून हा पत्र प्रपंच ! तुम्ही आमच्यापासून खूप दूर गेलात, पण जिथे असाल तिथे नक्कीच सुखी असाल …तुमची कथा ऐकायला आता साक्षात पु ल , प्र के अत्रे , पु भा भावे,  बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, यासारखी दिग्गज मंडळी प्रेक्षक म्हणून असतील आणि तुम्ही म्हणत असाल —

—आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच आहे .

लेखक – श्री बिपीन कुलकर्णी 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कुरुक्षेत्र आणि जीवनाचे तत्त्वज्ञान ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले  ?

☆ कुरुक्षेत्र आणि जीवनाचे तत्त्वज्ञान ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला.तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते, आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ?

मी जे पाहत होतो, ते खरंच घडलंय का ?’

याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

त्याने चहूदिशांना पहिले, ‘खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?’

“यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले, तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्यातील एक वृद्ध योगी प्रकट झाला!

“मला माहीत आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!” वृद्ध योगी गूढपणे म्हणाला.

 “काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?” संजय तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले की तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

” महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे.”

वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.

“महाराज, आपण मला सांगू शकाल का, काय आहे हे तत्वज्ञान?”

“नक्कीच, ऐक तर,”

वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

“पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, ‘नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?” वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

संजयाने  मानेने नकार दर्शवला.

“कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा  प्रतिकार करू शकता. कसा माहीत आहे?”

संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

“तेव्हाच, जेव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!” 

वृद्ध योग्याचे डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!

“भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही, तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याच्या हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही.”

संजय बावचळून गेला; पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, “महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत, तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?”

वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,

” याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.

तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!

मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे.”

संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, “मग कर्णाबद्दल काय?”

“वा!”

वृद्ध योगी उद्गारला, “वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!”

“कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो  सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!’

संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून…!

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मार्च…महिना परिक्षेचा…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मार्च…महिना परिक्षेचा” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

मार्च महिना हा सगळ्यांसाठीच धावपळीचा, दगदगीचा आणि आव्हानाचा सुद्धा. शिक्षणक्षेत्र आर्थिक क्षेत्र,आणि मुख्य म्हणजे गृहीणी ह्यांच्या साठी तर हा महिना खूप जास्त महत्वाचा.

कँलेंडरवर नजर टाकली तर हा महिना खूप सुट्ट्यांचा दिसतो मात्र खासियत अशी की पेंडींग कामे,टारगेट्स ह्यामुळे ह्या सुट्ट्या नुसत्या दिसायलाच कँलेंडरच्या बाँक्समध्ये विराजमान असतात. कामाच्या रामरगाड्यामुळे एक तर ह्या सुट्ट्या अर्जत नाहीत आणि चुकून मिळाल्यातरी महत्वाची कामे सतत नजरेसमोर येत असल्याने त्या सुट्ट्यांमध्ये घरी मन रमत नाही वा सुट्ट्यांचा मनमुराद आनंदही उपभोगता येत नाही. सुट्ट्या मिळाल्या तरी हे माहिती असतं साठवून ठेवलेली कामे आपल्यालाच करायची असल्याने ही सगळी कामे नजरेसमोर फेर धरून नाचतात आणि त्यामुळे जीवाची तगमग ही होतेच. गृहीणींच्या भाषेत बोलायचं तर नजरेसमोर असतो धुणी, भांडी ह्यांचा घासायला,धुवायला असणारा ढिगारा आणि नेमकं टाकीतील पाण्याचा साठा संपून गेल्यावर जणू “जल बीन मछली “सारखी तगमगती अस्वस्थता.

हा मार्च महिना विद्यार्थ्यांसाठी,शिक्षक प्राध्यापक मंडळींसाठी,  शिक्षणमंडळ आणि विद्यापीठ ह्यामध्ये काम करणा-यांसाठी खूप ताणाचा, कामांचा असतो.

हा महिना राजकारणी मंडळींसाठी पण खूप महत्त्वाचा असतो.कित्येक दिवस खूप अभ्यास करुन मेहनतीनं सत्तेवर असणाऱ्या पक्षाला खर्चाचा ताळमेळ बसवत अंदाजपत्रक सादर करावं लागतं. राज्याच्या ,देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी बसविणं किती कठीण कामं असतं नं.आपल्याला साधं आपल्या घरातील जमाखर्च आणि अंदाजपत्रकाचा ताळमेळ बसवितांना सगळे देव आठवतात. हे तर पूर्ण राज्याचे, देशाचे कामं आणि इतकही करुन कौतुक वाट्याला येत नाही ते नाहीच. विरोधी पक्ष कुठलाही असो तो पक्ष त्यातील फक्त त्रुटी,कमतरता तेवढ्या शोधीत राहणार. माझ्या बघण्यात अजून एकदाही असा प्रसंग आला नाही ज्यामध्ये विरोधी पक्ष हा सत्तेवर असणाऱ्या मंडळींचे कौतुक करतोयं. असो

जणू मार्च महिना हा सगळ्यांची परीक्षा घेण्यासाठीच तयार झालेला महिना असावा. विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षभराच्या केलेल्या कष्टांचे, श्रमाचे मुल्यमापन ह्याच काळात होतं जणू. बँकर्स, सी.ए.,आँडीटर्स, कर भरणारी जनता ह्यांची तर अक्षरशः “निंद हराम” करणारा हा महिना. टारगेट्स पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या साठीचा हा कालावधी.

मार्च महिना हा गृहीणींसाठी पण खूप धावपळीचा आणि दगदगीचा महिना असतो. ह्या महिन्यात धान्य विकत घेऊन, त्याला ऊन दाखवून मग त्यावर कीडनाशक कडूलिंबाचा पाला टाकून ते धान्य साठवणूक म्हणून कोठ्यांमध्ये ठेवण्याचे महत्त्वाचे काम गृहीणींचे असते. त्याचबरोबर वर्षभर बेगमी म्हणून साठा करण्याचे पदार्थ उदा.पापड,कुरडई, लोणची, शेवया,वेफर्स आणि असे अनेक पदार्थ करण्याचं गृहीणींच्या कामाची सुरवात मार्चपासूनच होते.

नुकतीच थंडी गायब होऊन उन्हाळ्याला सुरवात झालेली असते.त्यामुळे ह्या हवामाना मधील बदलांमुळे सगळ्यांना आपल्या तब्येतीची काळजी ही घ्यावीच लागते. तरीही व्हायरल इन्फेक्शन हे हात धुवून मागे लागण्या मुळे डाँक्टर्स आणि पेशंट ह्यांच्यासाठी सुद्धा गर्दीचा काळ.पण खरी परीक्षा ही तब्येतीने धडधाकट असणाऱ्या आपल्या घरच्या मंडळींची असते.

हे आर्थिक वर्ष, आपणा सर्वांना भरभराटीचे जावो ,आरोग्य व्यवस्थित राहो हीच ईशचरणी प्रार्थना.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ संवादु- अनुवादु– उमा आणि मी- भाग २ ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात आपण पाहिले – अनेक पुरस्कार त्यांना मिळत गेले. आता इथून पुढे)

उमाताईंच्या विशेष आवडत्या कादंबर्‍यांमध्ये ‘पर्व’ चा आवर्जून उल्लेख करायला हवा. ‘पर्व’ ही भैरप्पांची कादंबरी. याच्या अनुवादाच्या संदर्भात उमाताईंनी आठवण लिहिलीय, ‘माराठीत व्यासपर्व, युगांत, मृत्युंजय यासारखी चांगली पुस्तके असताना महाभारतावरील कथेचा आणखी एक अनुवाद कशाला करायचा?’, असं त्यांना वाटत होतं, पण विरुपाक्ष त्यांना ही कादंबरी जसजशी वाचून दाखवू लागले, तसतसं त्यांचं मत बदलत गेलं आणि कृष्णावरचा भाग त्यांनी वाचून दाखवल्यावर, त्यांनी या कादंबरीचा अनुवाद करायचा असा निश्चयच केला आणि त्याचा त्यांनी अनुवाद केला. मराठीत तो चांगलाच गाजला. त्याच्या पाच-सहा आवृत्या निघाल्या. पुढे या कादंबरीला १९९९ साली स. ह. मोडक पुरस्कारही मिळाला. मला हे सगळं वाचताना गम्मत वाटली, ती अशासाठी की मलाही सुरूवातीला वाटलं होतं की महाभारतावर मराठीत इतकं लिहिलय आणि आपण वाचलय की त्यावर आता आणखी काय वाचायचं? पण प्रा. अ. रा. तोरो यांच्या आग्रहामुळे मी ती वाचली आणि मला ती इतकी आवडली की पुढे मी अनेक वाचनप्रेमींना ही कादंबरी वाचायला आवर्जून सांगत राहिले. ही कादंबरी वाचल्यावर मला प्रकर्षाने उमाताईंची ओळख करून घ्याविशी वाटली. काय होतं या कादंबरीचं वेगळेपण? या कादंबरीला समाजशास्त्राचा पाया होता. महाभारत काळात समाजातील रीती-रिवाज, प्रथा-परंपरा, विचार-संस्कार यात बदल होऊ लागले होते. या परिवर्तनाच्या काळातील समाजावर यातील कथानकाची मांडणी केली आहे. ‘मन्वंतर’ असा शब्द उमाताईंनी वापरला आहे. स्थीर झालेल्या समाजापेक्षा आशा परिवर्तन कालावर कथानक रचणे अवघड आहे, असे उमाताई म्हणतात. काळामुळे घटना-प्रसंगांवर चढलेली, चमत्कार, शाप-वारदानाची पुटे भैरप्पांनी यात काढून टाकली आहेत. उमाताईंची ही अतिशय आवडती कादंबरी आहे.

उमाताईंनी केवळ अनुवादाचंच काम केलं असं नाही. त्यांनी सभा-संमेलनातून, चर्चा-परिसंवादातून भाग घेतला. व्याख्याने दिली. ड्रॉइंग आणि पेंटिंग विषय घेऊन एम. ए. केलं. भारतीय मंदिर-शिल्पशास्त्रातील द्रविड शैलीची उत्क्रांती विकास आणि तिची कलात्मक वैशिष्ट्ये’ या विषयावर पीएच. डी. केली. त्या निमिताने भरपूर प्रवास केला. प्रवासाचा आणि मंदिराच्या शिल्पसौंदर्याचा आनंद घेतला. त्यांना फोटोग्राफीचाही छंद आहे. जीवनात जमेल तिथून जमेल तितका आनंद त्या घेत राहिल्या.

उमाताईंनी ’केतकर वाहिनी’ ही स्वतंत्र कादंबरी लिहिली. त्यांची मैत्रीण शकुंतला पुंडे यांच्या आईच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी. या कादंबरीवर आधारित पुढे आकाशवाणीसाठी ९ भागांची श्राव्य मालिका त्यांनी लिहिली. त्याही पूर्वी ‘वंशवृक्ष’वर आधारित १४ भागांची मालिका त्यांनी लिहिली होती. त्यानंतर ‘ई’ टी.व्ही. साठी कन्नडमधील ‘मूडलमने’ या मालिकेवर आधारित ‘सोनियाचा उंबरा’ ही ४०० भागांची मालिका लिहिली. या निमित्ताने त्यांनी माध्यमांतर करताना करावा लागणारा अनुवाद, त्यातील, तडजोडी, त्या प्रकारच्या अनुवादाची वैशिष्ट्ये या बाबतचे आपले अनुभव आणि चिंतन मांडलं आहे. हे सारे करताना त्यांना खूप परिश्रम करावे लागले असणार, पण आपल्या आवडीचे काम करताना होणार्‍या परिश्रमातूनही आनंद मिळतोच ना!

‘संवादु- अनुवादु’ हे शीर्षक त्यांनी का दिलं असावं बरं? मला प्रश्न पडला. या आत्मकथनातून त्यांनी अनुवादाबाबत वाचकांशी संवाद साधला आहे. असंही म्हणता येईल की कलाकृतीशी ( पुस्तकाशी आणि त्याच्या लेखकाशी) संवाद साधत त्यांनी अनुवाद केला आहे? त्यांना विचारलं, तर त्या म्हणाल्या, ‘मी इतका काही शीर्षकाचा विचार केला नाही. स्वत:शीच संवाद साधत मी अनुवाद केला, म्हणून ‘संवादु- अनुवादु’.

‘संवादु- अनुवादु’च्या निमित्ताने गतजीवनाचा आढावा घेताना त्या या बिंदूवर नक्कीच म्हणत असणार, ‘तृप्त मी… कृतार्थ मी.’ एका सुखी, समाधानी, यशस्वी व्यक्तीचं आयुष्य आपण जवळून बघतो आहोत, असंच वाटतं हे पुस्तक वाचताना. अडचणी, मनाला त्रास देणार्‍या घटना आयुष्यात घडल्या असतीलच, पण त्याचा बाऊ न करता त्या पुढे चालत राहिल्या. पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये अंजली जोशी लिहितात, ‘या आत्मकथनात तक्रारीचा सूर नाही. ठुसठुसणार्‍या जखमा नाहीत. माझे तेच खरे, असा दुराग्रह नाही. तर शांत नितळ समजुतीने जीवनाला भिडण्याची ताकद त्याच्या पानापानात आहे.’ त्या मागे एकदा फोनवर म्हणाल्या होत्या, ‘ जे आयुष्य वाट्याला आलं, ते पंचामृताचा प्रसाद म्हणून आम्ही स्वीकारलं.’

‘संवादु- अनुवादु’ वाचताना मनात आलं, उमाताईंना फोनवर म्हणावं, ‘तुमची थोडीशी ऊर्जा पाठवून द्या ना माझ्याकडे आणि हो ते समाधानसुद्धा….’ या पुस्तकाच्या निमित्ताने मी उमाताईंना अधून मधून फोन करत होते. त्यातून मध्यंतरीच्या काळात प्रत्यक्ष भेटी न झाल्यामुळे दुरावत गेलेले मैत्रीचे बंध पुन्हा जुळत गेले आहेत. आता मोबाईलसारख्या आधुनिक माध्यमातून हे बंध पुन्हा दृढ होत राहतील. प्रत्यक्ष भेटी होतील, न होतील, पण मैत्री अतूट राहील. मग मीच मला म्हणते, ‘आमेन!’

 – समाप्त – 

©  उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंगीची गोष्ट ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मुंगीची गोष्ट ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

एका रविवारी सकाळी, एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता, तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले.  मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली  होती.

त्या माणसाने तासाभराहून अधिक काळ ते पाहिलं.  त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला विराम घेतल. वळसा घेतला.

आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली.

एका क्षणी या चिमुकल्या जीवाला अवघड जागा आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती.ती थोडावेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले, पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला.

मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला.  त्या घटनेने माणूस घाबरून गेला आणि त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले.

त्याच्या डोळ्यांसमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता.

थोड्या वेळाने मनुष्याने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला आहे – जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमीगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते.

आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली.

मुंगी पान लहान छिद्रात कसे वाहून नेईल? 

ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही! 

तो छोटा प्राणी, खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून, वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून, आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली.

मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते.

त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे.

आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे.

फक्त सोडून देण्याची चिंता नाही. 

आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत.  आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही.. ..

कथा पुढे चालू ठेवत आहे…तुम्हाला याचा आनंद मिळेल…

तो श्रीमंत माणूस जरा अधीर झाला.  अजून थोडा वेळ थांबला असता तर त्याने काहीतरी वेगळं पाहिलं असतं…

 मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली.

आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले.

बोध:

  १.  हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाहीत!

 २.  एक संघ म्हणून एकत्र, अशक्य काहीही नाही..

 ३.  कमावलेली वस्तू तुमच्या भावांसोबत शेअर करा

 ४.  (सर्वात महत्त्वाचे!) तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्या नंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल.  तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा.

मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासूनही आपण किती शिकू शकतो.

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ साठीनंतरचा अलिप्ततावाद  – लेखक : श्री सुहास पानसे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साठीनंतरचा अलिप्ततावाद  – लेखक : श्री सुहास पानसे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

मित्रहो,

बरेचदा ‘अलिप्त असणे’ आणि ‘आत्मकेंद्रित असणे’  या दोन गोष्टींमध्ये आपली गल्लत होते. माझ्यामते अलिप्त असणे म्हणजे  आपल्या आप्तांपासून दूर राहणे नाही, तर अलिप्त असणे म्हणजे आपल्या आसपास घडणारी(विशेषतः आपल्याला न रुचणारी) कुठलीही गोष्ट मनाला लावून न घेता, ती जशी आहे तसा तिचा मनोमन स्वीकार करणे !…

एक लक्षात असावे, माणसाचा स्वभाव सहसा बदलत नाही. स्वभावाला औषध नाही, हेच खरं आहे. सबब, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न न करता, त्या व्यक्तीला आपलं मानणे म्हणजे खरा अलिप्ततावाद !

पटायला अवघड वाटतंय ना? आता हे वाचा…

आपली मुले परदेशी आहेत. त्यांची वरचेवर भेट होणार नाही, प्रत्यक्ष भेट होणं शक्य नाही, हे त्यांच्यावर नाराज न होता आपल्या मनाला पटवून देणे ही अलिप्तता…

मुलं लग्नानंतर किंवा नोकरी व्यवसायाला लागल्यावर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात रमणार, यात गैर ते काय ? ते जर त्यांची कर्तव्ये त्यांच्या पद्धतीने पार पाडीत असतील, त्यांच्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेत असतील तर तक्रारीला जागा नसावी. निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते हे मान्य, पण त्यांनी प्रत्येक बाबतीत आपल्याशी चर्चा करावी, आपलेच ऐकावं असा हट्ट न धरणे ही पण अलिप्तता…

आपण आपली स्थावर-जंगम प्रॉपर्टी खूप  कष्टाने उभी केलेली असते, हे मान्य ! पण त्या सगळ्याचा उपभोग घेण्याची शक्ती कमी झाली असेल, तेव्हा त्या सगळ्याची आसक्ती न बाळगणे ही सुद्धा अलिप्तता…

आपल्या घरामध्ये खूप वस्तू असतात. कधी Marketing tricks मुळे तर कधी कुटुंबियांच्या आग्रहाखातर खरेदी केलेल्या, कधी emotional attachment तर कधी अजून काही. अशा अनेक कारणांनी घरात अनेक वस्तूंची दाटी झालेली असते. अशा वस्तूंमध्ये जीव अडकवून न ठेवता वेळीच त्या गरजू व्यक्तींना आनंदाने देऊन टाकणे, ही देखील अलिप्तता…

काही काळापूर्वी आपल्या विचारांची, आपल्या दृष्टिकोनांची शेजाऱ्यांबरोबर, मित्रांबरोबर, नातलगांबरोबर,  सहकाऱ्यांबरोबर देवाण घेवाण करणे ही अगदी सहज प्रक्रिया होती. आज परिस्थिती बदलली आहे. कोणी कोणाशी फारसं बोलत नाही, चर्चा करत नाही, सल्ला मागत नाही किंवा बरेचदा साधा सुसंवादही घडत नाही. अशावेळी हे सगळं झालंच पाहिजे असा दुराग्रह न धरणे, ही खरी अलिप्तता…

जेथे नाते आहे, तेथे ममत्व आहे. जेथे ममत्व आहे, तेथे आपलेपणा आहे. जेथे आपलेपणा आहे, तिथे भावनिक गुंतागुंत आहे. जिथे भावनिक गुंतागुंत आहे, तिथे राग, लोभ, दुःख हे साहजिकच येणार. पण हे नाते, हे ममत्व, हा आपलेपणा आणि पर्यायाने येणारी भावनिक गुंतागुंत याकडे जssरा दुरून बघता आलं तर ती अलिप्तता…

असं अलिप्त होणे म्हटलं तर अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूच्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा तार्किक अंगाने अभ्यासपूर्ण  विचार केला तर आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने  हे साध्य करणे क्रमप्राप्त आहे, हे सहज पटेल. असा अलिप्ततावाद अंगिकारता आला तर आपल्याच नव्हे तर आपल्या आप्तजनांच्या मानसिक स्वास्थ्यावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल. एवढंच नाही, तर उतारवयात कुटुंबापासून, समाजापासून, मित्रपरिवारापासून आपण तोडले गेलो नसल्याची जाणीवही तुम्हाला आनंद आणि समाधान देऊन जाईल, हे नक्की !

बघा, पटतंय का !

लेखक :श्री सुहास पानसे

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares