सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अमरकंटक… एक दिव्य तीर्थ ! ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अमरकंटक… जेथे भगवान शिवाने समुद्र मंथना नंतर “हलाहल” पचविण्यासाठी तप:साधना केली होती! अमरकंटक… नर्मदा मातेचं जन्म स्थान ! अमरकंटक … देवतांच्या सहवासाने पवित्र झालेली भूमी ! अमरकंटक … सिद्धांच्या  साधनेने सिद्ध झालेलं सिद्धक्षेत्र ! अमरकंटक… योग्यांना आकर्षित करणारे ऊर्जात्मक ठिकाण ! अमरकंटक … महर्षी मार्केंडेय, महर्षी कपिल ,महर्षी भृगू, महर्षी व्यास, च्यवन ऋषी, जमदग्नी ऋषी, अगस्ती ऋषी,दुर्वासा ऋषी , वशिष्ठ,कृतू,अत्री,मरिची, गौतम,गर्ग, चरक,शौनक… अशा किती तरी महान ऋषी-मुनींनी,योग्यांनी, सिद्धांनी, साधकांनी  जिथे तप केले… साधना केली… ऋचा- मंत्र रचले…ग्रंथांची निर्मिती केली…मानव जातीच्या कल्याणासाठी वैद्यक शास्त्र,रसायन शास्त्र, वास्तु शास्त्र , ज्योतिष शास्त्र अशा अनेक प्रांतांत वेगवेगळे शोध लावले अशी  गुढ-रहस्यमय  भूमी ! अमरकंटक…जिथे  जगद्गुरू शंकराचार्यांचे वास्तव्य देखील  काही काळ होते! खरंच , अमरकंटक म्हणजे अष्टसिद्धी प्राप्त करून देणारे एक तीर्थक्षेत्रच आहे!

अमरकंटक म्हणजे दुर्लभ औषधीय वनस्पतींचे भांडार आहे! चरक संहितेत वर्णन केलेल्या अनेक औषधी वनस्पती फक्त इथेच सापडतात! शेकडो दुर्लभ झाडं, पौधे, वेली, कंदमुळे, फळं, फूलं यांचा इथे खजिना आहे! जगात कुठेही न सापडणारी गुलबकावली केवळ अमरकंटकमधेच फुलते! सुमारे ६३५ औषधीय वनस्पती इथे सापडतात!

अशा या अमरकंटकमध्ये  विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत जेथे एकत्रित येतात, तो उंच डोंगराळ भाग म्हणजेच मैकल पर्वत! येथेच शिवाने साधना केली.योगाभ्यासाद्वारे आणि येथील अगम्य वनौषधींच्या सहाय्याने हलाहलचा प्रभाव कमी  केला! साहजिकच कैलास नंतर शिवाचे आवडते ठिकाण कोणते,तर ते म्हणजे अमरकंटक! याच ठिकाणी नर्मदा मातेचा जन्म झाला ! अनेक प्राचीन ऋषींची अष्टसिद्धी प्राप्तीची तपोभूमी हिच! किंबहुना   अमरकंटक म्हणजे एक प्रकारे त्यांची प्रयोगशाळाच होती! होय प्रयोगशाळा… कारण अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा शोध इथेच लागला! या अमरकंटक मध्ये! 

जमदग्नी ऋषींनी “संजीवनी” विद्या इथेच मिळवली!अश्र्विनी कुमारांनी च्यवन ऋषींसाठी “चवनप्राश” इथेच तयार केले! “वैज्ञानिक विचारांचे जनक” म्हणून ज्यांचा अभिमानाने उल्लेख केला पाहिजे, अशा कपील मुनींनी परमाणू या संकल्पनेवर रचना केल्या, त्यादेखील इथेच! महामृत्युंजय मंत्राचे प्रणेते महर्षी मार्केंडेय यांनी ” मार्केंडेय पुराणा”ची निर्मिती इथेच केली! वैद्यक शास्त्राची देवता आणि आयुर्वेदाचा प्रणेता ” धन्वंतरी ” इथेच अनेक रोगांच्या औषधांची उकल करायचा! इथे कोणी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला. कोणी वास्तुशास्त्रातील शोध लावले.कोणी मंत्र रचले.कोणी  ग्रंथ निर्माण केले.कोणी संहिता लिहील्या .तर कोणी अष्टांग योगाच्या आधारे अष्टसिद्धी मिळविल्या!

कारण हे क्षेत्रच एकप्रकारे भारलेले आहे! अमरकंटकच्या वातावरणांतच  ‘जादू’ आहे! सहसा कुणाच्या लक्षात येत नाही, पण इथे तुम्ही नर्मदा स्नान करा  आणि शांत ध्यानाला बसा. तुमच्या दोन्ही नाड्या समान चालतात! सूर्य नाडी आणि चंद्र नाडी…! कपालभाती करण्याची गरजच नाही. म्हणूनच अनेक सिद्धांचा वास इथे असतो! म्हणूनच मत्सपुराणात अमरकंटकला  कुरुक्षेत्रापेक्षाही पवित्र तीर्थाचा दर्जा दिलेला आहे! पद्मपुराणामध्ये तर नारदमुनी युधिष्ठिराला सांगतात की, अमरकंटकच्या चारही दिशांना कोटी रुद्रांचे प्रतिष्ठान आहे! 

अशा पवित्र  अमरकंटकाचे नाव कधिकाळी ‘अमरकंठ’ असे होते. जे शिवा वरून पडलं होते.  पुढे अमरकंठचे अमरकंटक झाले! स्कंद पुराणात अमरकंटक या नावाची सुंदर फोड केली आहे. पुराणकार म्हणतात, अमर म्हणजे देवता आणि कट म्हणजे शरीर !  जो पर्वत देवतांच्या शरीराने आच्छादीत आहे तो पर्वत म्हणजे ‘अमरकंटक’ पर्वत! 

अशा प्रकारे अमरकंटकचा उल्लेख अनेक पुराणात आहे. रामायणात आहे. महाभारत आहे. अनेक ठिकाणी अमरकंटकचा उल्लेख वेगवेगळ्या नावांने आहे.  शिव पुराणात  

” ओंकारमरकंटके” असा याचा उल्लेख आहे,तर रामायणाने त्याला  “ऋक्षवान पर्वत” म्हटलेलं आहे. त्यावरून नर्मदेला  देखील ‘ऋक्षपादप्रसूता’ म्हटलं गेलं आहे!

महाभारतात  एका ठिकाणी याचा “वंशगुल्म तीर्थ” म्हणून उल्लेख आहे!तर महाभारताच्या वनपर्वात  ” आनर्त देश” असाही उल्लेख आहे!वाणभट्ट याला “चंद्र पर्वत” म्हणून नावाजतो. कोणीतरी याला “महारूद्र” देखील संबोधले आहे!कुठे “अनूपदेश” म्हणून…. तर कुठे “सर्वोदय तीर्थ” म्हणून…. काही ठिकाणी  “स्कंद” “मैकल”असाही उल्लेख आहे! कालीदास तर आपल्या साहित्यात या ठिकाणाचे “आम्रकूट”  नावाने सुंदर वर्णन करतो!  

अमरकंटकला कोणत्याही नावाने ओळखले तरीही यांचे निसर्ग सौंदर्य मात्र अप्रतिम आहे! उंच पर्वत …खोल दऱ्या … घनदाट जंगल…त्यातून वाहणारे झरे…नद्या…लहान- मोठे प्रपात…आकाशाला भिडणारे वृक्ष…वृक्षांवर बागडणारे हजारो पक्षी…त्यांचा किलबिलाट…फळा- फुलांची श्रीमंती…आणि त्याच बरोबर गर्द झाडीत ध्यानस्थ बसलेली प्राचिन मंदिरे! स्वर्ग- स्वर्ग म्हणतात तो हाच!

अशा या  निसर्गरम्य अमरकंटकचा उल्लेख  ज्याअर्थी रामायण – महाभारतात आहे, त्याअर्थी रामायणातील –  महाभारतातील नायक इथे नक्कीच आले असतील! पांडवांनी “नर्मदा पुराण” तर साक्षात मार्केंडेय ऋषींच्या मुखातून ऐकलेले आहे!  

अमरकंटक पासून  वीस एक किलो मीटर अंतरावर लखबरीया नावाचं गाव आहे. इथे लाखो मानव निर्मित गुंफा आहेत. म्हणून या गावाचं नाव “लखबरीया” पडलं आहे! आणि या गुंफा पांडवांनी वनवास काळात निर्माण केल्या होत्या , अशी  इथे  जनकथा आहे!लाखो गुंफा  इथे आहेत म्हणण्यापेक्षा त्या  होत्या असं म्हणणं जास्त  इष्ट ठरेल! कारण काळाच्या ओघात काही गुंफा बुजल्या गेल्या , काही बंद केल्या गेल्या!आज फक्त तेरा गुंफाच पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.वसंत पंचमीच्या दिवशी येथे छान पैकी जत्रा भरते!

रामायण काळातील अनेक जनजमाती आजही येथे सापडतात! इंद्रजिताने मूर्छित केलेल्या लक्ष्मणावर   ऐन युद्धकाळात  योग्य उपचार करणारा सुषेण वैद्य तुम्हाला आठवत असेल. हा सुषेण अमरकंटकच्या परिसरात वाढलेला. निषाद जमाती पैकी एक ! तेव्हाची “निषाद” जमात म्हणजे आजची ” बैगा ” जमात होय!  जी जमात फक्त अमरकंटक क्षेत्रातच जिवीत आहे! अमरकंटकला रामायणामध्ये ऋक्षवान पर्वत म्हटलेलं आहे. याठिकाणचा प्रमुख ऋक्षराज म्हणजेच रामाचा एक सेनापती ” जांबुवंत”!  पर्वत गाथा नावाच्या एका ग्रंथांनुसार तर रावणाने पुष्पक विमानातून अमरकंटक येथे येऊन तपश्र्चर्या केलेली आहे!

अमरकंटक हे शिवाचं प्रिय स्थान असले तरी, इथं शैव संप्रदायासह वैष्णव,जैन, शाक्त,गाणपत्य असे अनेक संप्रदाय आनंदाने नांदले आहेत! त्यामुळेच शेकडो- हजारो वर्षे हे स्थान भारतीयांचे आध्यात्मिक केंद्र राहिले आहे! इथे धार्मिक चर्चा होत असत!  यज्ञ व्हायचे!सत्संगाचे मेळे भरायचे! भारतीय समाजात आणि संस्कृतीमध्ये अमरकंटकचे महत्त्व अधोरेखित आहे!

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments