मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

??

☆ स्फूर्ती देवता – भाग – 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता)

(वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.) इथून पुढे —

त्यांनी आम्हा भावंडांना अतिशय डोळसपणे खूप चांगले घडवले. वडील कधी पुण्या मुंबईला गेले की तिथून उपयोगी अशा नव्या वस्तू, पुस्तके, गावात जे  मिळायचे नाही ते आवर्जून आणायचे. आपण खेड्यात राहतो म्हणून मुले नवीन गोष्टींपासून वंचित राहू नयेत हा दृष्टिकोनच खूप मोठा होता.

आईवडील अतिशय धोरणी होते. आम्ही कॉलेजला जायच्या वेळेस त्यांनी पुण्यात घर घेतले होते .आम्ही चार भावंडे तिथेच राहू शिकलो. आम्ही दोघी बहिणी घरी स्वयंपाक करायचो. त्यासाठी आई माळशिरसहून सतत मसाले, चटण्या, पीठे, फराळाचे  पाठवायची. या प्रात्यक्षिकामुळे लग्नापूर्वीच आम्ही बहिणी तयार झालो होतो.

आई-वडिलांचे सहजीवन अतिशय आदर्श होते. दोघांनीही एकमेकांना मान देत कायम योग्य आदर केला. त्यांच्यातही मतभेद असतीलच पण ते कधी उघडपणे सर्वांसमोर आले नाहीत. अगदी आमच्या सुद्धा. कधीच टोकाची भूमिका नसायची. जे करायचं ते एकमेकांच्या साथीनंच. तो काळ एकमेकाबद्दलच्या भावनाज बोलून दाखवण्याचा नव्हताच. पण न बोलताच दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत, कौतुक करीत. आईला जेवायला थोडा जास्त वेळ लागायचा तर स्वतःचं जेवण झाल्यावरही वडील तिच्यासोबत गप्पा मारत बसायचे. ती भाजी निवडत असेल तर ते पण निवडू लागत. ह्या गोष्टी जरी लहान असल्या तरी त्यांचं प्रेम यातून दिसून येतं. त्यामुळंच त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्या काळात  घरातल्या बायकांना नुसतं गृहित धरलं जायचं. त्यांचं मत कुणी विचारायचं नाही तर निर्णय सांगितले जायचे. पण वडील प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत आणि ती पण त्यांना योग्य साथ देई. ते कुठे गेले तरी तिला बरोबर नेत आणि ती पण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी टापटिपीत असायची. दोघेही आनंदाचे, सुखाचे सहजीवन  जगले. सुखी संसारासाठी हा आमच्यासाठी वस्तूपाठच आहे.

जिथे जाऊ तिथे आनंद द्यायचा हे धोरण असल्याने आई कधी कुणाकडे मोकळ्या हाताने गेली नाहीच पण तिथे गेल्यावर कामाला हातभार लावायची. हेही अंगीकारण्या सारखेच आहे. आईवडील दोघेही गावातील सार्वजनिक जीवनात एकत्र हिरीरीने भाग घेत असत. गावातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. त्यामुळे दोघेही लोकांमध्ये तितकेच लाडके, हवेहवेसे होते. यानिमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, वक्ते, नेते आमच्या घरी आलेले होते.

दुर्दैवाने वडील अचानकपणे ६६ व्या वर्षी गेले त्यांच्या माघारी २३ वर्षे आईने दोघांचीही भूमिका उत्तम निभावली. सगळी कर्तव्यं पार पाडली. आई एवढी कर्तबगार हिंडती फिरती, आनंदी पण शेवटी तिचे हाल झाले. पडल्यामुळे ऑपरेशन झाले. त्यावेळी एक गुडघा आखडल्याने पुढे ती चालू शकली नाही. बरीच वर्षे एका जागेवरच आली. हे परावलंबित्व स्वीकारणे सुरवातीला खूप जड गेले.पण शेवटी या वास्तवाशी तिने जुळवून घेतलं. कोणते भोग वाट्याला यावेत हे आपल्या हातात नसतं हेच खरं.

आपले आईवडील तर प्रत्येकालाच प्रिय असतात. शिवाय त्याकाळी बऱ्याच अशा कर्तबगार बायका होत्या. मग आईत विशेष काय ? तर तिच्यात अनेक चांगले गुण एकवटलेले होते. तिने ते जाणीवपूर्वक जोपासले होते. ती आदर्श गृहिणी, चांगली कलाकार, हाडाची शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे तिची शिकवणच होती जे काम करायचे ते चांगलंच, सुबक, आखीवरेखीव, परिपूर्ण करायचं. 

आजकाल व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक मार्ग, अनेक साधने उपलब्ध आहेत .पण आई-वडिलांच्या काळाचा विचार करता ही गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळेच त्यांनी जीवनात अनेक गोष्टींमध्ये एक विशिष्ट आदर्श पातळी गाठली होती  ही कौतुकाची गोष्ट आहे. एकेका क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणारे असंख्य असतात. पण सर्वच क्षेत्रात अशी आदर्श पातळी गाठणारे फार कमी असतात. अशाच लोकांपैकी माझे आई वडील होते हे विशेष आहे.

हिऱ्याला जितके जास्त पैलू तितके त्याचे मोल जास्ती. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाला शक्य तितके विकसित करावे. त्यासाठी अनेक कला आत्मसात करणे, अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवणे, सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांचा अभ्यास करणे, जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेणे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी स्वतः ती अंमलात आणलीच पण आम्हालाही ते बाळकडू दिले. आज कोणतीही नवीन गोष्ट करताना त्यांच्या विचारांनी नवीन उभारी मिळते. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते आणि काही अंशी त्यात यशस्वी झाले आहे ही समाधानाची बाब आहे.       

आईवडीलां पैकी फक्त एकाचेच स्वतंत्र कर्तृत्व सांगता येणार नाही. त्यात दुसरा  सहभागी असायचाच इतके त्यांचे जीवन एकमेकांत मिसळून  गेलेले होते. याचा नुकताच आम्ही अनुभव घेतला. २०२२ साली वडिलांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मृतींचे पुस्तक काढले. तर नातेवाईक, स्नेही यांच्या लेखांचा वर्षाव झाला. वडिलांना जाऊन ३४ वर्षे तर आईला जाऊन ११ वर्षे झालीत. पण अजूनही लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या आठवणींचे, सहवासाचे वर्णन वाचून मन भरून आले. सर्वांनीच दोघांबद्दल अगदी भरभरून लिहिले आहे. संत कबीरजींचा एक दोहा आहे,

           कबीरा जब हम पैदा हुए 

           जग हॅंसे हम रोये 

           ऐसी करनी कर चलो 

           हम हॅंसे जग रोये |

या उक्तीप्रमाणे आईवडील जगले आणि आमच्यासाठी मोठा आदर्श घालून दिला आहे.

आज समाजात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत. अशावेळी आई-वडिलांच्या शिकवणीची गरज अधोरेखित होते. म्हणूनच हे स्मरण.

प्रत्येक व्यक्तीमधे अधिक-उणे असतेच. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकांची बेरीज जास्ती तेच आदर्श होतात. म्हणूनच माझी आई माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी प्रेरणादायी व्यक्ती आहे.

              माहेरच्या पायरीला

                 टेकविला माथा 

              जिने जीवनविद्येची

                 शिकविली गाथा ||

— समाप्त —

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘संगमनेरमध्ये सुरु आहे आगळी वेगळी परंपरा …’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

इंग्रजांना झुकवणारी स्त्रीशक्ती . 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे साजऱ्या होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाला आगळं वेगळं महत्त्व आहे. 

या दिवशी या ठिकाणी निघणाऱ्या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना मिळतो.

महिलांना या ठिकाणी मिळणाऱ्या या मानाला ब्रिटीशकालीन इतिहास आहे. ब्रिटीशांनी या रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल १९२९ रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलीस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहता नेते मंडळी घरी गेली. एवढ्यात अचानक २०० ते २५० महिलांनी एकत्र येत रथ ताब्यात घेतला. ब्रिटीशांनी बंदी घातलेल्या रथाला,  बंदी झुगारून शेकडो महिलांनी रथ यात्रा काढली होती. पोलिसांनी महिलांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली. सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला.  पण या आदिशक्ती स्वरूप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार कायम ठेवला.

या गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा रथावर ठेऊन ” बलभीम हनुमान की जय ” चा जयघोष केला, आणि रथयात्रा व्यवस्थितपणे पार पाडली.  तेव्हापासून ही परंपरा आजही सुरु आहे.

आता या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जातो.

माहिती संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ पत्नी कशी असावी ?… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

तो म्हणाला – दिसायला देखणी, गोरीपान, मनमिळाऊ , मला व माझ्या घरच्यांना सांभाळून घेणारी, उत्तम स्वयंपाक बनवणारी, घर स्वच्छ ठेवणारी, मुलांचा सर्व अभ्यास घेणारी, कटकट न करणारी किंवा एखाद्या गोष्टीचा तगादा पाठी न लावणारी, ऐकून घेणारी, नेहेमी आनंदी आणि समाधानी असावी एवढंच !

 

त्याला समजावले. . .

पोरा, एकाच झाडाला गुलाब, मोगरा, जाई, जुई, कमळ, रातराणी, निशिगंध, चाफा लागत नसतात रे !

 

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रॅपीड फायर गेम…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “रॅपीड फायर गेम…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एकदा स्वतःच स्वतःशी रँपीड फायर.गेम खेळत बसले होते. खूप मजा येते ह्या खेळात. स्वतःच्या मनाच्या आतल्या कप्प्यात दडलेल्या गोष्टी अलगद बाहेर येतात, एकदम मोकळं वाटतं आणि मुख्य म्हणजे काही वेळी खूप विचार करुनही न मिळणारी उत्तरं अचानक गवसतात.कधीकधी पटकन उत्तरं बाहेर पडण्याच्या नादात सगळ्यात जास्त महत्वाचं उत्तर राहूनच गेलं ह्याची जाणीव पण अनुभवांतून येते.

ह्या गेम मध्ये मी पहिला प्रश्न केला, सुखं म्हणजे नेमकं काय ? त्यावर चटकन उत्तरं आलं आनंदाची परिसीमा. मग दुसरा प्रश्न, हे नेमके कशामुळे मिळतं ? त्यावर माझं उत्स्फूर्तपणे आलेलं उत्तर आर्थिक स्थैर्य,मनासारख्या घडणाऱ्या घटना.

नंतर लगेच आलेल्या अनुभवाने आपल्या उत्तराचा क्रम चुकलायं हे दाखवून दिलं आणि अनुभवांमुळे लक्षात आलं सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले आरोग्य. सगळ्या सुखकारक गोष्टींची उपलब्धी झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे त्या गोष्टींचा उपभोग आणि हा उपभोग आपण आरोग्यात स्थैर्य असेल तरच घेऊ शकतो. खरंच सगळ्या म्हणी ह्या कमी शब्दांत संपूर्ण आशय देणा-या असतात हे “सर सलामत तो पगडी पचास ” ह्या म्हणीवरुन लक्षात येतच. सहसा कुठलाही आजार हा अकस्मात येत नाही. आपलं शरीर वेळोवेळी आपल्याला तसे संकेत देत असतं ,आपण मात्र त्याकडे विशेष गंभीरपणे न बघता तसंच दामटायला वा रेटायला बघतो. सध्या सगळीकडे व्हायरल इंफेक्शनचा सामना जनताजनार्दनाला करावा लागतोयं. सध्याच्या असमतोल हवामानामुळे हे चढउतार आपल्याला अनुभवावे लागतात. खरतरं एकादिवसाच्या मुलाचं देखील कोणावाचून काहीही अडत नाही. जो जन्माला घालतो तोच सोय करतो ही म्हण खरी असली तरी अशा संकटाच्या काळात मानसिक, शारीरिक भक्कम राहतांना  शेवटी माणसाला माणसाचीच गरज लागते.मग ती कोठल्याही रूपात का असेना,कधी ती गरज आपली जवळची घरची माणसं भागवतात तर कधी आपली जोडून ठेवलेली मित्रमंडळी वा स्नेही भागवतात.आता दोन दिवस सक्तीची विश्रांती घेतल्या शिवाय पर्यायच नाही.

सोमवारी तसं सकाळपासूनच फ्रेश वाटत नव्हतं परंतु कामाला लागलं की आजारपण विसरायला होतं हा नित्य अनुभव त्यामुळे सगळं आवरून बँकेला पळाले मात्र दुपारी सणसणून बँकेतच ताप भरला.तशीच सुट्टी मागून साक्षात आम्हा बडनेरवासियांसाठी व आजुबाजूच्या गावांसाठी धन्वंतरीचे रुप असलेल्या डॉ. राठी ह्यांच्या दवाखान्यात गेले त्यांनी औषधे देऊन कमीतकमी दोन तीन दिवस सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली.न ऐकल्यास अँडमिट करुन घेण्याचा सज्जड दम दिल्यावर  आता दोन दिवस सक्तिची विश्रांती घेणे ओघानेच आले.

औषधांबरोबरच सर्वांगीण आराम,शांत स्वस्थ झोप,डोळ्यांना डोक्याला त्रास होणाऱ्या मोबाईल चा अत्यंत कमी वापर ह्याने लौकर बरं वाटायला लागेलचं. असो शेवटी काय तर “जान है तो जहाँ है”.,”सर सलामत तो पगडी पचास” ही मोलाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवी.

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्फूर्ती देवता – भाग – 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

??

☆ स्फूर्ती देवता – भाग – 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(सार्वजनिक वाचनालय कल्याण तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त निबंध।

निबंधाचा विषयमाझे प्रेरणास्थान “स्फूर्ती देवता)

“माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वा”चा विचार करीत असताना “घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे”  या प्रसिद्ध भावगीताप्रमाणे माझी अवस्था  झाली. माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व घरातच असताना का शोधाशोध करायची ? या व्यक्तिमत्त्वाने माझ्या जन्मापासून माझे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेले आहे.  “जिच्यामुळे माझे अस्तित्व ते प्रभावी व्यक्तित्व” म्हणजे माझी आई माझी. माझी आई ती. मालतीबाई बाळकृष्ण देव ही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील सुप्रसिद्ध वकील श्री. आप्पासाहेब देव यांची पत्नी. आई म्हणजे एक अतिशय कणखर, प्रभावी, हुशार, आदर्श व्यक्तिमत्व होतं. गोरी, उंचीपूरी, लांबसडक केसांचा अंबाडा, त्यावर गजरा किंवा वेणी, चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि मोजके ठसठशीत दागिने घातलेली आई एकदम भारदस्त, रूबाबदार दिसायची‌.

आईचं माहेर दहिवडी. सातारा जिल्ह्यातील नामवंत वकील श्री. बापूराव कुबेर यांची ती सर्वात धाकटी कन्या मुक्ताबाई. ती खूप लहान असतानाच मातृसुखाला वंचित झाली. पण आजोबांनी अतिशय डोळसपणे तिला वाढवले. ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे’त आईचे शिक्षण झाले. गाण्याच्या तीन परिक्षा झाल्या. उत्तम हार्मोनियम वाजवायला शिकली. वस्तीगृहातील कामांमुळे अनेक कौशल्यं शिकत स्वावलंबी बनली.

लग्नानंतर आई  वाईला आली. तिथून दीड-दोन वर्षात १९४८ साली माळशिरसला  बिऱ्हाड केले. आई माहेरी अगदी लाडाकोडात वाढलेली. तिथे खूप सुबत्ता पण होती. तरीही माहेरचं ऐश्वर्य सोडून ती आपल्या संसारात मनापासून रमली. सुरुवातीच्या काळातली दगदग, त्रास, कष्ट तिने आनंदाने सोसले. आनंदी सहजीवनाची ही पायाभरणी होती. हळूहळू संसाराची घडी बसत गेली. गावाजवळच्या  शेतात घरही झाले. पण तिथे लाईट यायला मात्र १९७० साल उजाडावे लागले. तोपर्यंत कंदीलाची सोबत होती. सर्व कामे घरातच करावी लागत. आजच्यासारखे तयार काहीच मिळायचे नाही. जात्यावर दळायचे, चुलीवर स्वयंपाक. दिवसा कामाच्या व्यापातून सवड नाही मिळाली तर रात्री जागून फराळाचे करायचे. आई अतिशय सुगरण. सर्व फराळाचे पदार्थ, रोजचा स्वयंपाक अतिशय उत्तम करायची.

खरंतर आई अतिशय कलासक्त होती. अनेक गोष्टींमध्ये ती पारंगत होती. प्रत्येक गोष्ट  ती अगदी मनापासून करायची. तिला फुलांची खूप आवड होती. गजरा, वेण्या करून सर्वांना देण्याची भारी हौस. स्वतः अंबाड्यावर वेणी घातल्याशिवाय ती कधी बाहेर जायची नाही. आई आणि फुलाचा गजरा हे समीकरण अजूनही सर्वांना आठवते. घरी रवा पिठी काढून  उत्तम शेवया करायची. चिरोटे तर अगदी अलवार व्हायचे. क्रोशाचे विणकाम, मण्याची तोरणं, वायरच्या पिशव्या बनवायची. त्या त्या काळातल्या प्रचलित गोष्टी ती शिकत, करत गेली. पण कोणतीही गोष्ट आखीव रेखीव करण्यात तिचा हातखंडा होता. स्वयंपाक करताना अगदी कोशिंबीर असो, भाजी असो, पोळ्या भाकरी असो नाहीतर पक्वान्न ते अगदी पद्धतशीर निगुतीनेच झाले पाहिजे असा तिचा कटाक्ष असायचा. घाई गडबडीने गोष्टी ‘उरकणे ‘हे तिला मान्यच नव्हते. त्यामुळे स्वयंपाकाची नेहमी पूर्वतयारी सज्ज असायची.  

कोणतीही नवीन गोष्ट  शिकण्याची भारी हौस. वयाच्या ७०व्या वर्षी क्राॅसस्टिचचे विणकाम तर ७५ व्या वर्षी पोतीच्या मण्यांचे दागिने करायला शिकली. अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवली. शेवटपर्यंत तिच्या मनातलं हे उस्फुर्तपण जागं होतं.

शिस्त हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. कसलाही कंटाळा न करता वेळच्यावेळी कामे करी. कोणतीही लहान मोठी गोष्ट गरजेला ऐनवेळी हातात हजर असे. आई कधीच दुर्मुखलेली किंवा अव्यवस्थित नसायची. नेहमी नीटनेटके आवरून उत्साही, आनंदी असायची. सर्व कामे चटाचट उरकून पोथी वाचे, आवडीचे काम करत असे. वर्तमान पत्र वाचून राजकीय, सामाजिक गोष्टींबाबत सजग असायची.

आपल्या बोलक्या स्वभावामुळे तिने खूप माणसे जोडली होती. स्मरणशक्ती चांगली त्यामुळे नावे, इतर संदर्भ लक्षात राही. त्यामुळेच ती वैयक्तिक संवाद छान साधू शके. त्यातूनच जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. कुणाच्याही आनंदात ती चटकन सामील व्हायची आणि दुःखात मदतीला जायची. त्यामुळे लोकंही तिला खूप मानत असत. माणसं जोडण्याची आईची ही कला शिकण्यासारखी आहे.

संसारात तिलाही अडचणी, संकटं आली‌.पण ती कधी  खचली नाही. कायम वडिलांच्या साथीला खंबीरपणे उभी राहिली. वडील सोलापूर जिल्ह्यातले निष्णात वकील होते. पण सुरुवातीचे दिवस खूप दगदगीचे होते. वकिली व्यवसाय वाढवण्यासाठी आईने खूप मदत केली. एसटीची सोय नसल्याने खेडेगावातून आलेले पक्षकार रात्री मुक्कामाला रहात. त्यांना स्वतः बनवून जेवण देई. दिवसाही कुणी ना कुणी पंगतीला असेच. यातूनच अनेकांशी कायमचे ऋणानुबंध जुळले. 

आई वडील श्रद्धाळू, भाविक होते. खूप गोष्टींवरची त्यांची श्रद्धा डोळस होती. गावातल्या मारुतीरायाला अनेकदा तिने दिवे लावण्याचा नेम केला होता. याचे नक्की फळ तिला काय मिळाले हे सांगता येणार नाही. पण तिला मानसिक बळ नक्की मिळायचे. त्यासाठी गावात चालत जाणे, वेळ पाळणे आवश्यक होते. चालण्याने व्यायाम व्हायचा. यामागे काहीतरी नेम केला की हातून देवाची सेवा नियमितपणे होते हे विचार सूत्र होते. यातून मन प्रसन्न राहायचे हे मात्र खरे. 

आई वडीलांची पांडुरंगावर खूप श्रद्धा होती. दोघांनाही वारीची आवड होती. आईने ३०-३२ वर्षे तर वडिलांनी १७ – १८ वर्षे वारी केली. वारीला जाऊन आल्यावर आपला दृष्टिकोन बदलतो. गरजा कमी होतात हे आई वडिलांच्या वागण्यातून जाणवायचे. आईने सुरवातीला ओढगस्त सोसली तशीच अगदी भरभराट पण उपभोगली. पण कसला हव्यास नव्हता. आहे त्यात आनंद मानायची समाधानी वृत्ती होती.

मला गाण्याची आवड लागली ती आई वडीलांमुळेच. दोघांचेही आवाज छान होते. आईच्या तर परीक्षा झालेल्या होत्या. घरी पेटी, तबला, मृदुंग होता. दर गुरुवारी भजन होत असे. दारापुढच्या ओट्यावर रात्री जेवणानंतर आमच्या सगळ्यांच्या गाण्यांनी रंगलेल्या खूप चांदरात्री आठवतात.

यातूनच माझी शब्दांशी, सुरांशी मैत्री झाली. वडीलांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत सर्व भाषा उत्तम अवगत होत्या. प्रचंड पाठांतर होते. त्यांचे वक्तृत्व ओघवते आणि लिखाणात शारदेचा वरदहस्त लाभलेला होता. हीच शब्दांची ओढ, लिखाणाचे थोडे कसब मला त्यांच्याकडून लाभले हे माझे मोठे भाग्य आहे. वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली. 

क्रमशः भाग पहिला 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे… ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

एकदा मारूतीराय आकाशातून जात असता , त्यांचं खाली लक्ष गेलं. त्यांना दिसलं की एका देवळात कीर्तन चालू होतं आणि रामराया मात्र देवळाबाहेर लोकांच्या चपलांचा ढीग होता, त्यावर बसले होते. मारूतीराय लगबगीने खाली उतरले. रामरायांना विचारलं , “असे का चपलांवर बसलात ?”

तेव्हा रामराया म्हणाले, “जाता जाता देवळातून मला ऐकू आलं , ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ,

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

सगळ्यांचं मन बाहेर काढलेल्या चपलांवर होतं , म्हणून मी इथे बसलोय !”

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ जीवनपथ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ जीवन पथ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“.. ये ये असा भांबावलास का? “

“..आणि या वळणावरून पुढे चालता चालता थांबलास का? “

“..हाच आपला मार्ग बरोबर असेल ना ? ही शंका का आली बरं तुला?”

“..इतका मजल दरमजल करीत प्रवास करून मध्य गाठलास आणि आता या वाटेवरून पुढची वाटचाल करण्यास घुटमळतोस का ?.”

“…निर्णय तर त्यावेळी तूझा तूच घेतला होतास! याच वाटेवरून जाण्याचा आपलं इप्सित साध्य इथेच मिळणार असा आत्मविश्वासही त्यावेळी तुझ्या मनात होता की!”

“..ते तुझं साध्य गाठायला किती अंतर चालावे लागेल, त्यासाठी किती काळ ही यातायात करावी लागेल याचं काळ काम नि वेगाचं गणित तूच मनाशी सोडवलं होतसं की! उत्तर तर तुला त्यावेळीच कळलं होतं .”

.”. वाटचाल करत करत का रे दमलास!, थकलास! इथवर येईपर्यंत चालून चालून पाय दमले..आता पुढे चालत जाण्याचं त्राण नाही उरले..”

“..घे मग घटकाभर विश्रांती.. होशील पुन्हा ताजातवाना, निघशील परत नव्या दमाने. काही घाई नाही बराच आहे अवधी .”

“.ही काय कासव सश्याची स्पर्धा थोडीच आहे? अरे इथं कुणी हारत नाही किंवा कुणी जिंकत नाही. कारण हा आहे जीवन प्रवास आदी कडून अंता कडे निघालेला.. “

“..पण पण कुणालाही न चुकलेला. जो जो इथे आला त्याला त्याला याच वाटेवरून जावं लागलंच.. हा प्रवास मात्र ज्याला त्याला एकटयालाच करावा लागतो.. “

.”.साथ सोबत मिळते ना घडीची पण निश्चित नसते तडीची. “

“..तू पाहिलेस की कितीतरी जणांचे चालत गेलेल्यांचे पावलांचे ते ठसे , त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवूनच तू ही चालत निघालास .काही पावलंं तुझ्या बरोबरीने चालली त्यात काही भरभर पुढे निघून गेली तर काही मागे मागेच रेंगाळली.. “

“..पण तू ठरवलं होतसं की आपण चालायचं अथक नि अविरत त्या टप्यापर्यंत..आणि हे ही तू जाणून होतास या वाटेने जाताना चालणे हाच एकमेव पर्याय आहे इथं दुसरं वाहन नाही मुळी. “

.”.आशा निराशेच्या दिवस रात्री दाखवत असतात मैलाचा टप्पा

..सुखाच्या सावलीचे मृगजळ दुःखाच्या उन्हात कायम चमचमते दिसते.. “

“..आल़ं हातात म्हणत म्हणत उर किती धपापून किती घेतेय याचं भान नसतयं.. “

“..दुतर्फा घनदाट वृक्षलता लांबवर पसरत गेलेल्या त्या लपवून ठेवतात संकटानां दबा धरुन बसवतात.. “

“..खाच खळगे प्रतिकुलतेचे नि समस्यांचे दगडधोंडे वाटेवर जागोजागी पसरलेले असतात तुझ्याशी सामना करण्यासाठी डोकं उंचावून..,”

“..कुठे उंच तर कुठे सखल, कुठे वळण तर कुठे सरळ, कुठे चढण तर कुठे उतार.. यावर चालूनच व्हायचं तुला पैलपार.. ही आहे तुझी जीवन वाट .. ”  

 आणि आणि माझी…

“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा माझा मलाच ठावठिकाणा नाही.. “

.”. कशा कशाचंच मला सोयरसुतक नाही… आणि कशाला ठेवू म्हणतो ते तरी.. “

“किती एक आले नि गेले किती एक अजूनही चालत राहिलेत.. आणि उद्याही कितीतरी येणार असणार आहेत… हीच ती एकमेव वाट आहे ना सगळ्यांची.. “

“.. आणि आणि माझा जन्मच त्यासाठी आहे तो सगळयांचा भार पेलून धरण्यासाठी.. “

“कोवळया उन्हाचे किरणाचे कवडसे गुदगुल्या करतात माझ्या अंगावर… दवबिंदूचे तुषार नाचतात देहावर.. ओले ओले अंग होते नव्हाळीचे न्हाणे जसे..चिडलेला भास्कर चिमटे काढतो तापलेल्या उन्हाने… दंगेखोर वारा फुफाटयाची माती उधळून लावतो भंडाऱ्यासारखी.. मग रवी हळूहळू शांत होत केशर गुलाबाच्या म्लान वदनाने मला निरोप देतो.. अंधाराचा जाजम रात्र टाकत येते… चांदण्याच्या खड्यांना चमकवित चंदेरी रूपेरी शितल अस्तर पसरवते..अंधारात बागुलबुवा झाडाझुडपांच्या आडोशाला दडतो… मी मी असाच पहुडलेला असतो.. दिवस असो वा रात्र मला काहीच फरक पडलेला नसतो… कारण मला तर कुठेच जायचं वा यायचं नसतं..” 

“..माझं कामं प्रवाश्यांच्या पदपथाचं असतं. .”

“.. मी आहे हा असाच ना आदी ना अंताचा अक्षय वाटेचा…” 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भाषा…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

श्री उमेश सूर्यवंशी

? विविधा ?

☆ भाषा…— ☆ श्री उमेश सूर्यवंशी ☆

!! शब्दजाणीव !!

जगात मनुष्याने अधिकाधिक घातक अशी शस्त्रे निर्माण करून दाखवलीत. एकापेक्षा एक धारदार , हिंसक आणि थरारक अशी शस्त्रे जगाने आजवर पाहिली आहेत. मानवी समुदायाची मोठी कत्तल या घातकी शस्त्रे चालवूनच झाली. कुणी न्यायासाठी शस्त्र उचलले तर कुणी अन्याय करण्यासाठी शस्त्र पारजले. एकाहून एक अशी ही शस्त्रे बाळगणारी मानवी जमातीकडे आणखी एक महत्त्वाचे शस्त्र उपलब्ध आहे याची फारशी दखल घेतली जात नाही . या शस्त्राची एकच बाजू मोठ्या गौरवाने सांगितली गेली आणि त्याची दुसरी धारदार बाजू दुर्लक्षीत होत गेली. भलेभले चांगले लोक या शब्दाला शस्त्र देखील मानतील का ? माझ्यापुढे प्रश्न आहे.

भाषा ….हे मानवी समाजाकडे उपलब्ध असे शस्त्र आहे. भाषा मनुष्याला जोडण्याचे काम करते, योग्यपणे व्यक्त होण्याचे भाषा हे माध्यम आहे , भाषा मनुष्याच्या विकासात सर्वाधिक महत्त्वाची भुमिका बजावते ही सत्ये कुणीही नाकारणार नाहीच. मात्र भाषा शस्त्र म्हणून जेव्हा वार करते तेव्हा त्या जखमा वर्षानुवर्षे फक्त चिघळत राहतात , राज्य व राष्ट्रे यांचे अवयव कुरतडत राहतात , बहुतांशी वेळा दोन माणसांमध्ये , राज्यांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये देखील जोडण्याऐवजी तोडपाणीचे काम करते ती भाषाच. मानवी समाजात अनेक वेगवेगळ्या विविधतेने भरलेल्या भाषा आहेत. प्रत्येक भाषेला एक गोडवा आहे .इतर काही बलस्थाने आहेत. प्रत्येक मानवी जीवाला त्याची मातृभाषा अत्यंत प्रिय असते हे देखील निखालस नैसर्गिक सत्य आहे. तरीही भाषा शस्त्र म्हणूनच नव्हे तर घातक शस्त्र म्हणून काम करते हे देखील कटूपणाने नोंद करावे लागतेच. भाषेचा वापर ( गैर ? ) करून वर्चस्ववादी वृत्ती आपल्या धारणा शोषीतांवर लादतात. आपलीच भाषा ” प्रमाण ” व शोषीतांची भाषा ” तुच्छ ” अशी घातकी भाषीक मांडणी करून शोषीतांची गुलामगिरी कायदेशीर बनवू पाहतात. जगभर ही अवस्था भूतकाळात होती , वर्तमानात आहे आणि भविष्यात देखील दिर्घकाळ जिवंत असेल हे कटू वास्तव आहे. मग भाषेची नेमकी कोणती जाणीव आपल्याला कळली पाहिजे ? मुद्दा हा आहे. कोणत्याही भाषेला दुधारी धार असते .यापैकी एक विधायक असते आणि दुसरी विघातक. विधायक बाजू वाढवत नेणे हे योग्य .याचवेळी विघातक बाजू संपवत नेणे हे अधिक योग्य असते. स्वभाषेचा रास्त अभिमान जितका योग्य असतो त्याचबरोबर इतर भाषांविषयी आणि त्या भाषा बोलणारे समूहांविषयी देखील रास्त आदरभाव असावा.भाषेचे शुद्ध रुप आणि तथाकथित अशुद्ध रुप ही विभागणी टाळली पाहिजे .

भाषा…बोलण्यात सौम्य पण स्पष्ट , वर्तनात स्वच्छ पण आदरभावी , लिहिण्यात नेमकेपणा पण सच्चेपणा जपणारी असावी. खरा दोष भाषेचा नसतोच…तो असतो भाषावाद्यांचा. हे भाषावादी लोक अत्यंत संकुचित मात्रेने भाषा हाताळतात आणि भाषेची विघातक धार तेज करु पाहतात. अशावेळी जबाबदारी असते ती भाषेच्या संवादाकर्त्यांची. जे संवादकर्ते भाषेची विधायक बाजू अधिकाधिक उजळवीत राहतील आणि मानवी समूहात संवादप्रियता वाढवत राहतील. भाषेचे हे सामर्थ्य जपले पाहिजे .

©  श्री उमेश सूर्यवंशी

मो 9922784065

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काही राहून तर नाही ना गेलं…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ काही राहून तर नाही ना गेलं…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

तीन महिन्याच्या बाळाला  दाईपाशी ठेवून कामावर जाणाऱ्या आईला 

दाईनं विचारलं ~ “ काही राहून तर नाही ना गेलं ?  पर्स, किल्ल्या सगळं घेतलंत ना ?

— आता ती कशी हो, हो म्हणेल ?

पैशापाठी पळता-पळता,  सगळं काही मिळविण्याच्या महत्वाकांक्षेपोटी —

ती जिच्यासाठी एवढा आटापिटा करतेय —  तीच तर राहून गेलीय !

 

लग्नात नवऱ्यामुलीस सासरी पाठवताना –  लग्नाचा हाॅल रिकामा करून देताना 

मुलीच्या आत्यानं विचारलं ~ “ दादा, काही राहून तर नाही गेलं ना ? चेक कर जरा नीट..!

— बाप चेक करायला गेला, तर वधूच्या खोलीत काही फुलं सुकून पडलेली दिसली.

— सगळंच तर मागं राहून गेलंय…. २१ वर्षे जे नाव घेऊन आपण जिला लाडानं हाक मारत होतो,

… ते नाव तिथंच सुटून गेलंय, आणि …. त्या नावापुढे आतापर्यंत अभिमानानं जे नाव लागत होतं, 

— ते नावही आता तिथंच राहून गेलंय.

 

“ दादा, बघितलंस ? काही मागे राहून तर नाही ना गेलं ?”

— बहिणीच्या या प्रश्नावर, भरून आलेले डोळे लपवत बाप काही बोलला तर नाही, 

पण त्याच्या मनात विचार आला~

—  सगळं काही तर इथंच राहून गेलंय .!

 

मोठी मनिषा मनी बाळगून मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं,

– आणि तो शिकून तिथंच सेटल झाला.

नातवाच्या जन्मावेळी मोठ्या मुश्किलीनं तीन महिन्यांचा  व्हिसा मिळाला होता,

– आणि निघतेवेळी मुलानं विचारलं ~ “ बाबा सगळं काही चेक केलंय ना ?—

काही राहून तर नाही ना गेलं ?” 

— काय सांगू त्याला, की आता…. “आता राहून जाण्यासारखं  माझ्यापाशी उरलं तरी काय आहे ..!”

 

सेवानिवृत्तीचे दिवशी पी.ए. नं आठवण करून दिली ~

— “ चेक करून घ्या सर ..! काही राहून तर नाही ना गेलं ?”

– थोडं थांबलो, आणि मनात विचार आला, “ सगळं जीवन तर इथंच येण्या-जाण्यात निघून गेलं.

— आता आणखी काय राहून गेलं असणार आहे?”

 

स्मशानातून परतताना ….. मुलानं मान वळवली पुन्हा एकदा, चितेकडे पाहण्यासाठी …

—   पित्याच्या चितेच्या भडकत्या आगीकडे पाहून त्याचं मन भरून आलं.

—  धावतच तो गेला — पित्याच्या चेहऱ्याची एक  झलक पाहण्याचा असफल प्रयत्न केला….

—  आणि तो परतला…….  मित्रानं विचारलं ~-  “ काही राहून गेलं होतं कां रे ?”

—    भरल्या डोळ्यांनी तो बोलला ~  “ नाही , काहीच नाही राहिलं आता — आणि जे काही राहून गेलंय,

ते नेहमीच माझ्या सोबत राहील !”

 

एकदा… थोडा वेळ काढून वाचा—कदाचित …जुना काळ आठवेल, डोळे भरून येतील, आणि

– आणि आज मन भरून जगण्याचं.. कारण मिळेल   ..

 

मित्रांनो !  कुणास ठाऊक ? केव्हा या जीवनाची संध्याकाळ होईल….. 

 

— असं काही होण्याआधी सर्वांना जवळ घ्या, 

              त्यांच्या पाठीवर हात फिरवा.

              त्यांच्याशी प्रेमानं बोलून घ्या

              जेणेकरुन काही राहून जाऊ नये ..!!!                                      

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “श्री सखी राज्ञी जयति…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “श्री सखी राज्ञी जयति…” ☆ सौ राधिका भांडारकर

युवराज शंभुने कविता लिहिली 

प्राणप्रिय पत्नीसाठी शब्द स्फुरले

 श्री सखी राज्ञी जयति

 ओळीतून या त्यांचे भार्या प्रेम प्रकटले १

 

 स्वराज्याच्या धगधगत्या निखाऱ्याला 

समजून घेत जपले आपल्या पदरात 

कणखर, हळवी ,प्रेमळ सोशिक

 कधी न डगमगली वादांच्या प्रवाहात ..२

 

 पत्नीच असते लक्ष्मी, सखी, राणी 

भावना पतीची आहे गौरवा समान

 या शब्दांच्या अर्थांना जाणले  येसुने

 सदा मानले स्वराज्याचे कर्तव्य महान ..३

 

आज वळून पाहता इतिहासाकडे 

काळाने  दिल्या किती  रणरागिणी

 मूर्तीमंत जणू लखलखत्या तलवारी

 दुःखात हसल्या  या शूर विरहिणी…४

 

 झळकले चार शब्द राजमुद्रेवर

धन्य तो  शिवरायांचा  छावा 

ज्याने केला जय जयकार स्त्रीचा 

शब्द भावनेतून केवळ कसा वर्णवा ?..५

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares