मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ट्रॅव्हल लाईट ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ट्रॅव्हल लाईट ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

नव्या प्रवासाची तयारी चालू झाली होती.

व्हिसा,विमानाची तिकिटं,प्रवासाची रूपरेषा… प्रवास कंपनीने सारं पाठवलं…तळटीप होती.. या वर्षापासून विमान कंपनी फक्त १५ कि. वजनच नेऊ देणार. मनामधे घालमेल चालू झाली. आता माझे नवे ड्रेस, गरम कपडे, accessories …कसं मावणार? बॅगेचंच वजन किती असतं! त्यात खाऊचं पॅकेट ..प्रवास कंपनीचं… चिडचिड झाली, विचारांचं वादळच आलं. पूर्वी किती छान होतं.

आता प्रवासी वाढले, विमानाचं आकारमान तेच राहिलं. नियम लागू होणारच.

स्वतःला शांत करताना लक्षात आलं. आपण मनाचा, आपल्या ह्रदयाचा विचार असा कधी करतो का? आता जीवनशैली बदलली आहे. प्रत्येकाचे ताणतणाव वाढताहेत. रक्तदाब वाढण्याची मर्यादा ओलांडली जातेय. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींनी मधुमेह वाढतोय..ताणतणावांनी,

मानापमानाच्या चुकीच्या कल्पनांनी वाहिन्यांमधे अडथळे निर्माण होताहेत. विमा कंपन्यांच्या भरभराटीला आपणच जबाबदार. तो एव्हढासा मेंदू आणि मूठभर ह्रदय कसं सांभाळणार हे सगळं? आपण विचारच करत नाही.

चला travel light सारखं live light शिकूया.

मनातले नको ते विचार, अति महत्वाकांक्षा, हव्यास,राग, लोभ… सार्‍यांना हळूहळू तिलांजली द्यायला लागूया. कारण एकदम थोडंच जमणार आहे.विचारांनीच हलकं वाटायला लागलंय मग प्रत्यक्षात…

travel light…live light चा मंत्र जपत घराबाहेर पडले…

लेखिका :डाॅ. माधुरी ठकार.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “खरेदीचे साइड इफेक्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “खरेदीचे साइड इफेक्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

साइड इफेक्ट बऱ्याचदा औषधांचे, तेलाचे, क्रिमचेच असतात आणि ते नंतर दिसतात किंवा जाणवतात अस काही नाही. त्याचा त्रास ते घेणाऱ्याला होतो हे खरंय. पण लागोपाठच्या आणि सततच्या खरेदीचे सुद्धा साइड इफेक्ट असतात आणि ते आपल्या वागण्यात दिसतात अस लक्षात आल. आणि त्याचा त्रास समोरच्याला होतो.

खरेदी करायला कोणाला आवडत नाही… पण पुरुषांना सगळ्याच खरेदीत तेवढाच उत्साह असतो अस नाही. काही खरेदीत तो असतो… तर काहीवेळा तो आणावा लागतो. बायकांच्या बाबतीत खरेदी म्हणजे नशाच असते. उतरल्याच जाणवतच नाही. खरेदी जेवढी जास्त तेवढी ती चढतच जाते. मग आपली स्वतःची नसली तरीही.

आमच्याकडे एक कार्य होत. मग काय? खरेदीचा सुळसुळाट आणि उत्साहाचा महापूर आला होता. महापुरात सगळीकडे पाणीच पाणी दिसत. तसच या सुळसुळाटात आणि उत्साहात हातात पिशव्या आणि खिशात यादीच सापडत होती. याशिवाय अनेक सुचना होत्या त्या वेगळ्या. कुठे जायच, काय घ्यायच, तिथे काय घ्यायच नाही. भाव किती असेल. भावाच्या बाबतीत तुम्ही बोलू नका. त्यातल तुम्हाला काही कळत नाही. (नाहीतरी कशातल कळतंय….. अस पण हळूच बोलून होत होत.) सामान उचलण्याची घाई करू नका. हल्ली सामान घरपोच देतात. या आणि अनेक. या सुचनांमुळे काहीवेळा सुचेनासे होत.

घरचा माणूस म्हणून जवळपास सगळ्याच ठिकाणी माझी उपस्थिती अगदी प्रार्थनीय नसली तरी हवी होती. निदान गाडी घेऊन तरी चला…….. बाकीच आम्ही पाहून घेऊ. असे सांगत प्रार्थनीय उपस्थिती असणाऱ्यांची सोय झाली होती. गरज होती ती गाडीची आणि त्यांच्या सोयीच्या वेळेत. (याला म्हणतात काॅन्फिडन्स…….)

कार्यासाठी दागिने खरेदी करतांना यातच पण वेगळी डिझाईन, हिच डिझाईन पण वजनाला यापेक्षा थोड कमी किंवा जास्त. थोड लांब किंवा अखूड. दोन पदरी किंवा मोठं पेंडेंट. असा संवाद सारखा कानावर पडत होता. सोनं पिवळंच असल्याने त्यात वेगळा रंग मागायची सोय नव्हती. पण ती रंगाची कमी आम्ही दागिन्यांवर लावलेल्या खड्यांच्या रंगात आणि आकारात उभ्या उभ्या म्हणजे खडेखडेच शोधत होतो. घडणावळ जास्त आहे, हे वाक्य. आणि मधे मधे कॅरेट हा शब्द होताच. रेट मात्र फिक्स होता.

सोन्याच्या दुकानात भाव करण्याची सोय नसते. पण त्या विकणाऱ्याल्याच एक दोन दिवसात भाव काही कमी होण्याची शक्यता आहे काहो?…… अशीही विचारणा होत होती… कमी नाहीच पण वाढण्याची शक्यता आहे….. असे तो चेहऱ्यावरचे भाव न बदलता सांगायचा. त्याच बोलणं मनाला बरं वाटतं होतं. एकतर आज थोड स्वस्त मिळेल याचा आनंद. नाहीतर दोन दिवसांनी याच तिकीटावर हाच खेळ परत करायला लागेल याची काळजी.

इतर खरेदित या रंगात, त्या डिझाईन मध्ये, आणि त्या प्रकारात अशी विचारणा हातरुमाल, पर्स, पिशव्या, साड्या, पॅन्ट आणि शर्ट पिस, चप्पल, बुट अशा शक्य त्या सगळ्या वस्तुंच्या बाबतीत झाली. डिस्काउंट वर घसघशीत घासाघीस झाली.

किराणा मालातील साबण आणि पेस्ट या सारख्या काही वस्तू सोडल्या तर तांदूळ, पोहे, रवा, डोक्याला लावायचे तेल, चहा या सारख्या वस्तू सुद्धा सुटल्या नाहीत. रवा जाड हवा. पोहे जास्त पातळ हवे, किंवा नको. वेगवेगळ्या नावाचे पण पोहे असतात हे मला याचवेळी समजले. चहा मिक्स हवा, ममरी नको, हे माझ्या मेमरीत फिट्ट बसले. तांदूळ बासमतीच हवा, चिनोर, कोलम नको. तुकडा चालणार नाही. असं पाहतांना एक एक वस्तू आणि त्यांची खरेदी याचा तुकडा पाडला जात होता. म्हणजे खरेदी संपत नसली तरी काही प्रमाणात आटोपत होती.

त्यामुळे प्रकार, रंग, डिझाईन, भाव, डिस्काउंट या गोष्टी त्या काही दिवसात पाठ झाल्या होत्या. पाठ म्हणजे इतक्या पाठ की त्या पाठ सोडायला तयार नव्हत्या.

पण या सगळ्या खरेदीचा साइड इफेक्ट कार्य संपल्यावर जाणवला. नंतर परत बॅंकेतून पैसे काढण्यासाठी गेलो तेव्हा कॅशीयरला सुध्दा सांगितले. सगळ्या एकाच प्रकारच्या नोटा देऊ नका. वेगवेगळ्या द्या.  त्यावर त्याने सुद्धा विचारले. काही कार्यक्रम आहे का?… हे झाले पैशाचे.

सलून मध्ये पण असंच झालं. कटिंग करायला बसल्यावर त्याने विचारले. कसे कापू? जास्त की साधारण?…..  मी विचारल पैसे दोघांचे सारखेच लागतील नं? त्यावर त्याने ज्या नजरेने माझ्याकडे पाहिल ते त्याच्या आरशात मला दिसल…..

कार्याची दगदग झाल्यावर नंतर तब्येत थोडी नरमगरम वाटली. डाॅक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासून तीनचार गोळ्या व एक बटलीतले औषध लिहून दिले.

औषधाच्या दुकानात तोच प्रकार. अरे या पॅकिंगमध्ये गोळ्या कशा आहेत ते दिसत नाही. जरा आकार आणि रंग दिसणाऱ्या दाखवा ना…… बाटलीत यापेक्षा वेगळा आणि लहान आकाराच्या नाही का?… किमतीत काही कमी जास्त…… गोळ्या यातच लहान नाही का?…. गिळायला बऱ्या असतात.

मी अस विचारल्यावर औषध विकणाऱ्याने चेहरा खाऊ का गिळू असा केला. पण साइडने त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोलण्याचा झालेला इफेक्ट मला दिसलाच…..

माझ्या लक्षात आलं. सतत रंग, डिझाईन, वजन, लहान, मोठ अस विचारत  केलेल्या सततच्या खरेदीचा हा साइड इफेक्ट आहे……

असच एक कार्य बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्याचसाठी घडवून आणल होत. त्याही कार्याचे काही साईड आणि वाईड इफेक्ट आता दिसायला लागले आहेत. पण त्यावर नंतर बोलू.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आंबटगोड नातं…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆

श्री व्यंकटेश देवनपल्ली

? जीवनरंग ❤️

☆ आंबटगोड नातं…– भाग- १ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली

कुलकर्णी साहेबांचा पंचाहत्तरावा वाढदिवस आणि त्याचबरोबर त्यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा योग एकत्र जुळून आला. साहेबांच्या मुलांनी त्या निमित्ताने सूरज प्लाझा हॉलमध्ये एका समारंभाचं आयोजन केलं होतं. साहेबांच्याबरोबर मी चार वर्ष एकत्र काम केलं आहे. ते मला धाकटा भाऊच मानतात. आमचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. मला सपत्निक येण्याचे निमंत्रण नव्हे तर आज्ञा होती.

आम्ही उभयता समारंभाच्या आदल्या दिवशीच हजर झालो. त्यांची मुले विदेशाहून दहा दिवस अगोदरच ठाण्याला येऊन दाखल झाली. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी, रात्रीचं जेवण केटररकडून मागवलेलं होतं. साहेबांचे जवळचे नातेवाईक आणि इतर भावंडे बऱ्याच दिवसांनी एकत्र जमल्याने वारेमाप गप्पा सुरू होत्या. मध्येच कुणी तरी म्हणालं, “आपण गाण्याच्या भेंड्या खेळूयात का?”

सगळ्यांनी एकमुखाने कल्ला केला. आपोआप दोन गट पडले. साठ सत्तरच्या दशकातील सदाबहार गाणी एकेकाच्या पोतडीतून बाहेर निघत होती. सुरेख मैफल सजली होती. रात्र होत चालली होती तसा खेळ रंगत चालला होता. शेवटी गाण्याचे तेच अक्षर रिपीट व्हायला लागले. साहेबांच्या ग्रुपला ‘क’ अक्षर आलं. माझ्याकडे पाहून डोळे मिचकावत साहेबांनी गायला सुरूवात केली. ‘कहे ना कहे हम बहका करेंगे…’ सुधावहिनीनी आक्षेप घेतला. ‘ चिटींग करताय. रहें ना रहें.. असं आहे.’  मग सुधावहिनींनी ते गाणे गायलाच पाहिजे म्हणून सगळ्यांनी आग्रहच धरला. सुरूवातीला आढेवेढे घेत, सुधा वहिनीनी ‘रहें ना रहें हम, महका करेंगे बन के कली, बन के सबा, बाग-ए-वफ़ा में…..’  कित्ती गोड गायलं होतं की, व्वा !..  ‘ए’ अक्षर आल्यावर, सुधावहिनींच्याकडे पाहत साहेब गायला लागले, ‘ऐ मेरी जोहराजबीं, तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसीं और मैं जवॉं तुझपे क़ुर्बान मेरी जान, मेरी जाँ ये शोख़ियाँ, ये बाँकपन जो तुझमें है, कहीं नहीं….’ साहेबांचा रोमॅंटिक सूर लागला होता त्यांना कुणी टोकलं नाही. तेच शेवटचं गाणं ठरलं. रात्र बरीच झाली. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता. लगेच पांगापांग झाली. 

लॉनच्या मध्यभागात छानपैकी मांडव सजवलेला होता. साहेब आणि वहिनी नवदांपत्यासारखे नटले होते. अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. सनई चौघडे याचं छान कर्णमधुर संगीत वाजत होतं. साहेबांची कन्या कार्यक्रमाचे संयोजन करीत होती. उभयतांनी टाळ्यांच्या कडकडाटात एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. जणू साहेबांचा आणि सुधा वहिनींचा पुन्हा एकदा विवाहसमारंभच होता. 

रविवारी दुपारी समारंभ असल्याने साहेबांच्या जवळपासची शंभर एक माणसे अगत्याने आली होती. पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंच्या बॉक्सेसचा नुसता ढीग लागलेला होता. मुलं, सुना आणि नातवंडे प्रफुल्लित वातावरणात समरसून गेली होती. जेवणाच्या मेन्यूत मोजकेच पण दर्जेदार आणि चविष्ट पदार्थ ठेवलेले होते. कार्यक्रम अतिशय सुरेख संपन्न झाला. कार्यक्रम झाल्यानंतर दोन दिवस साहेबांच्या मुलांची खरेदी चालू होती. मित्रांना भेटणे सुरू होते. 

त्या दिवशी दिवसभर तापत राहिलेली सूर्याची किरणे आपला पसारा आवरत परत पावली जाण्याच्या तयारीत होती. संध्याकाळ धूसर होत चालली होती. मी आणि साहेब बाल्कनीत खुर्च्या टाकून बसलो होतो. आकाशात पक्ष्यांच्या झुंडी चिवचिवाट करत आपापल्या घरट्याकडे परतत होती. गेले आठ दहा दिवस गजबजत राहिलेलं साहेबांचे घर आज रिकामं होणार होतं. आपापल्या मुक्कामाकडे जाण्यासाठी मुलं, नातवंडं सामान पॅकिंग करण्यात गुंतलेली होती. सुधावहिनी मुलांना काय काय बांधून देता येईल यात गुंतलेल्या होत्या. एक एक करत दोन्ही मुले, कन्या नातवंडे “आई बाबा काळजी घ्या. येतो आम्ही.” असं म्हणून नमस्कार करीत टॅक्सीत बसून एअरपोर्टकडे निघत होते. सुट्या संपल्या होत्या. मुलांच्या शाळा होत्या. मुलां-नातवंडाना उभयतांनी हसत हसत निरोप दिला.

आपली मुलं विदेशात राहतात म्हणून मी साहेबांना कधी कुरकुरताना पाहिलं नाही. उलट ते म्हणायचे की आईवडिलांचं नातं हे मुलांच्या पायातली बेडी बनू नये. दरवर्षी साहेब आणि वहिनी दोघेही न चुकता दोन्ही मुलांच्याकडे आणि मुलीकडे जाऊन येतात. आम्हा दोघांना आणखी दोन दिवस मुक्कामाला राहण्याचा साहेबांचा प्रेमळ आदेश होता. मुले निघून जाताच, जड मनाने साहेब मला म्हणाले, “ वसंता, चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ या.” 

आम्ही बाहेर पडणार होतो त्याआधी साहेबांनी सुधा वहिनींची परवानगी मागितली, “अहो, वसंताला बाजारात जायचंय म्हणे, मला या म्हणतोय. आम्ही जाऊन येऊ काय?” 

“बघा, जणू हे माझ्या परवानगीशिवाय कुठेच जात नाहीत ते. मी नाही म्हटलं तर जणू थांबणारच आहेत. या जाऊन.” 

साहेबांनी बुक केलेली टॅक्सी बघता बघता दामिनी साडी सेंटरच्या समोर येऊन थांबली. दुकानात शिरल्यावर साहेबांनी एका पैठणीकडे बोट दाखवून तिथल्या सेल्समनला सांगितलं, “ती साडी पॅक करून द्या.”  मी सहज विचारलं, “साहेब, कार्यक्रम तर संपला आहे. आता कुणासाठी घेताय ही पैठणी?” 

ते हसत हसत म्हणाले, “अरे, ही पैठणी तुझ्या वहिनींसाठीच घेतोय. काय झालं, गेल्या आठवड्यात दोन्ही सुनांच्यासाठी आणि कन्येसाठी साड्या घ्यायला आलो होतो, तेव्हा तिने ही पैठणी पाहिली होती. किंमत पाहून तिने ती तशीच ठेवून दिली आणि सुनांसाठी घेतलेल्या वाणाचीच एक सिल्क साडी स्वत:साठी घेतली. दुकानातून निघताना ती त्याच पैठणीकडे पाहत होती, ह्यावर माझं लक्ष होतं. लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तिला सरप्राईझ द्यायचं ठरवलं आहे. काय वाटतं तुला?” मी काय बोलणार? साहेबांचे पेमेंट करून झाल्यावर आम्ही घराकडे परतलो. 

चहा घेऊन आम्ही टीव्हीवर बातम्या पाहत बसलो होतो. किचनमधून भांड्यांचा आवाज येत होता. जणू आदळआपटच चालली होती. मी बायकोला म्हटलं, “ सविता, बघून येतेस काय, काय झालं ते? ”  

 “अहो वहिनी, तुम्ही आत जाऊ नका. थोड्या वेळात सगळं शांत होईल. मी तिला गेल्या पन्नास वर्षापासून ओळखतोय. आज मुलं निघून गेली आहेत ना, त्याचं दु:ख ती असं आदळआपट करून लपवू पाहतेय. ती आपलं मनातलं कधी कोणापुढे बोलेल तर ना?”..  साहेबांनी शांतपणे सांगितलं. खरंच थोड्या वेळानं सगळं शांत झालं.

थोड्या वेळानंतर, साहेबांनी वहिनींना हाक मारली, “अहो मॅडम, तुमचं काम झालं असेल तर एक मिनिट बाहेर येता काय? थोडंसं काम होतं.”

सुधावहिनी पदराला हात पुसत बाहेर आल्या. “ हं, बोला काय काम आहे? मला अजून सगळं घर आवरायचं आहे, रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. लवकर सांगा.”

साहेबांनी हळूच पिशवीतून पैठणी काढून वहिनींच्या हातात दिली आणि मिश्किलपणे म्हणाले, 

“ पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा…… ही घे आपल्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाची तुला खास भेट !. आताच्या आता ही पैठणी नेसून ये. आज आपल्या चौघांना बाहेर जेवायला जायचं आहे.”

‘अहो, चला काही तरीच काय?’ असं म्हणत त्या चक्क लाजल्या. पैठणी न घेताच त्या आत गेल्या आणि थोड्याच वेळेत पदराआड लपवून आणलेलं एक बॉक्स साहेबांना देत म्हणाल्या, ” हे घ्या. तुम्हाला पुस्तकं वाचण्याचा छंद आहे ना? माझ्याकडून तुम्हाला हा घ्या किंडल रीडर !. मी पैजेतून जिंकलेल्या आणि माझ्या बचतीच्या पैशातून घेतला आहे, बरं का !” असं म्हणून पैठणी घेऊन वहिनी आत गेल्या. 

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री व्यंकटेश देवनपल्ली.

बेंगळुरू

मो ९५३५०२२११२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-१ ☆ श्री सतीश मोघे ☆

श्री सतीश मोघे

? मनमंजुषेतून ?

☆ स्पेस आणि बॅकस्पेस… भाग-१ ☆ श्री सतीश मोघे

संगणक वापरतांना आणि अलीकडे कुटुंबात वावरतांना एक गोष्ट नेहमी द्यावी लागते, ती म्हणजे ‘स्पेस’. संगणकावरील लिखाणात दोन शब्दात स्पेस दिल्याने वाक्याचा अर्थ समजणे सुकर होते तर कुटुंबात स्पेस दिल्याने नाती राखणे सुकर होते. ‘स्पेस’ या मराठीत रुळलेल्या इंग्रजी शब्दाचा शब्दकोशातला अर्थ अवकाश, अंतर, प्रदेश, जागा असा आहे. पण नात्यांमध्ये हा शब्द वापरतांना तो उसंत, वेळ, मोकळीक, स्वस्थता, सवलत, सूट अशा अनेक भावछटांच्या अभिव्यक्तीसाठी उपयोगात आणला जातो. 

‘मला स्पेस हवी’, ‘मला थोडी स्पेस द्या’ अशी मागणी अलीकडेच  मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे,हे खरे असले तरी  स्पेस देण्याघेण्याची ही क्रिया पूर्वापार चालत आली आहे. फक्त तेव्हा स्पेस मर्यादेत व ठरलेल्या वेळी, आई-वडील जेव्हढी देतील तेव्हढीच घेतली जायची. कुटुंबात स्वत:चे व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे अधोरेखित करण्याची वृत्ती नव्हती. डब्यांमध्ये ठरलेले अंतर ठेऊन कुटुंबाची ‘समझोता एक्सप्रेस’ ठराविक वेगात, ठराविक वेळेत धावत असायची. स्पेस मागायला जागाच नसायची आणि स्पेस मागायची वेळही यायची नाही. कारण छोटी घरे आणि भरपूर कामे. छोट्या घरांमुळे याची रुम वेगळी, त्याची वेगळी असे शक्यच नसायचे. एकाच खोलीत आजी-आजोबा, तिथेच बाबा, तिथेच मूले. स्पेस घ्यायची म्हटली तरी दुसरी मोकळी जागा उपलब्धच नसायची. तसेच भरपूर कामांमूळे स्पेस घ्यायला वेळच नसायचा. पाणी भरा, दळण दळून आणा, भाजीबाजार, रेशनिंग, किराणा, धुणी-भांडी, अभ्यास ही सर्व कामे कुटुंबातील सर्वांनीच विभागून करायची. या कामात संपूर्ण दिवस निघून जायचा. स्पेस घेण्यासाठी वेळही शिल्लक नसायचा. मुलांची धडपड, प्रयत्न, आई वडिलांचे कष्ट कमी करुन आई वडिलांना स्पेस (म्हणजे कष्टातून उसंत) देण्यासाठी तर आईवडिलांची धडपड मुलांनी स्पेसमध्ये (अवकाशात) भरारी घ्यावी म्हणून त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी, याची जाणीव दोघांना असल्यामुळे सर्व व्यवहार हदयाचा. बद्धीचे ‘पण’ ‘परंतू’ हे शब्द शब्दकोशातच नव्हते. त्यामुळे वेगळ्याने “स्पेस हवी…  स्पेस द्या” असे चिडून वैतागून म्हणण्याची वेळ यायची नाही. आईवर कधीतरी हे वेळ यायची. कुटुंबात कामाच्या ओझ्याने दबलेली आईच असायची. तिच्यामागे काही हट्ट, अभ्यासातली शंका यासाठी खूप मागे लागलो की कधीतरी ती म्हणायची, “आता जरा थांब. मला माझे हे काम करु दे”. अर्थात ती देखील  निवांत बसण्यासाठी नव्हे तर हातातले काम वेगाने पूर्ण करण्यासाठी ही स्पेस मागायची.

मध्यमवर्गीय  आणि श्रीमंत कुटुंबात स्पेस घेणे आणि देणे हल्ली अनिवार्य आणि त्याच जोडीला सहज शक्य झाले आहे. कारण मोठी घरे आणि बऱ्यापैकी मोकळा वेळ. प्रत्येकाला वेगळे बेडरुम. मोकळीक हवी असली की आपल्या बेडरुमध्ये शिरायचे की मिळाली स्पेस. घरात धुणी-भांडी,केरकचरा, स्वयंपाकाला  मोलकरणी, किराणा, भाज्या, पीठ इ. सर्व घरपोच. त्यामूळे मुलांना अभ्यास सोडला तर इतर कामे नाहीत,त्यामुळे स्पेस घ्यायला बऱ्यापैकी मोकळा वेळ, असे झाले आहे खरे. याबद्दल तक्रार करण्याचेही कारण नाही. कारण नशिबाने ही सर्व सुखे त्यांना, आपल्याला मिळाली आहेत. ही जरुर उपभोगावीत . पण एव्हढी सुखे आणि भरपूर स्पेस मिळत असूनही जेव्हा कुटुंबातील एखादा सदस्य दुसऱ्याला, “तू माझ्या डोक्यात जातेस/जातोस” असे सरळ तोंडावर बोलून, रागाने पाय आपटत आपल्या खोलीचे दार धाडकन आपटून आपल्या खोलीत जाते आणि बराच वेळ बाहेर येत नाही, तेव्हा या ‘स्पेस’ घेण्यावर आणि त्याला स्पेस देण्यावर विचार करावा लागतो. 

हे असे का घडते? याचा विचार केला तर दिवसेंदिवस कमी होत जाणारी सहनशीलता, हे त्याचे उत्तर म्हणावे लागेल. जीवन म्हणजे सहन करणे आहे. स्वत: ला आणि इतरांनाही. आपण जर संवदेनशील असलो तर आपल्या वागण्यातल्या चुका लगेच समजतात. रागावलो तरी थोड्याच वेळात वाटते, उगाच रागावलो. कुणाला काही हिताचे सांगितले आणि तो नाराज झाला की वाटते उगाच आपण सांगत बसलो. हे असे बऱ्याचदा  घडले की आपलाच स्वभाव आपल्याला सहन होत नाही. थोडक्यात ‘काही करू पहातो, रुजतो अनर्थ तेथे’ , असे होते आणि या नैराश्यात आपलाच आपल्याला राग येऊन आपण कोपऱ्यात जावून बसतो. नको तेवढी स्पेस द्यायला आणि घ्यायला सुरुवात करतो. आपल्याला आपण सहन करू शकत नाही. तसेच इतरांनाही आपण सहन करु शकत नाही. कुटुंब, प्रवास, नोकरीचे ठिकाण आणि जिथे जिथे आपल्याला जावे लागते अशा सर्वच ठिकाणी भिन्न प्रकृतीच्या,स्वभावाच्या व्यक्ती असतात. अशा व्यक्तींना सहन करण्याची आपली क्षमता अत्यल्प असल्याने तिथेही आपण अंतर ठेवून आणि मौन राखून राहायला लागतो. आपण अंतर ठेवले तरी त्या व्यक्ती जवळ यायच्या थांबत नाही.बोलायच्या थांबत नाहीत. अशा व्यक्ती जवळ आल्या,काही बोलल्या की त्या डोक्यात जातात. त्रास आपल्यालाच होतो. हा त्रास कमी करायचा तर स्पेस घेण्याची वृत्ती न वाढविता सहनशीलता वाढविणे आवश्यक आहे.

सहनशीलता ही बाल वयातच वाढू शकते. पूर्वी संस्काराचे वय सोळा वर्षापर्यंत होते. आता ते कमी होऊन सात ते आठ वर्षापर्यंत आले आहे. या वयातील मुलेच तुम्हाला समजून घेण्याच्या, स्वत: त बदल करण्याच्या, सहनशीलता वाढविण्याच्या मनस्थितीत असतात. या वयात त्यांच्यावर योग्य ते संस्कार झाले पाहिजेत. काका-काकू,वडीलधारी पाहुणे मंडळी घरी पाहूणे म्हणून आले तर मुलांना त्यांना नमस्कार करायला सांगितले पहिजे. “त्यांना खाली झोपता येत नाही.त्यांचे गुडघे,पाठ दुखतात. ते तुमच्या बेडरूममध्ये बेडवर झोपतील. तुम्ही हॉलमध्ये गादी घालून खाली झोपा”,असे त्यांना प्रेमाने सांगितलेच पाहिजे. दिलेली स्पेस केव्हा सोडायची, बॅक स्पेसला कधी जायचे, हे त्यांना समजले पाहिले.

या बाबतीत एका मित्राने सांगितलेला प्रसंग खरंच विचार करायला लावणारा आहे. पत्नीचे निधन झाल्यावर त्याचे व्यवसायाचे ठिकाण सोडून मुलाकडे राहण्याची इच्छा त्याने  व्यक्त केली. मुलगा म्हणाला, ” हरकत नाही. पण माझी मुले त्यांचे बेडरुम कुणाला शेअर करू देत नाहीत. तेव्हा तुम्हाला हॉलमध्ये झोपावे लागेल.” मुलांना स्पेस देणाऱ्या या वृत्तीला काय म्हणावे ! बरे मुलांची वयेही ७ वर्षे आणि ९ वर्षे. या वयातच त्यांना स्पेस कधी सोडायची हे शिकविता येते. कारण आई बाबा सांगतात ते योग्यच आहे, अशी ठाम समजूत असल्याने शिकवितांना ते नाराज होण्याची शक्यता कमी असते आणि नाराज झाले तरी वाद न घालता ते कृती करत असतात. तसे न करता आपण त्यांना नको तेवढी स्पेस देवून आपल्या जन्मदात्यालाच बेडरूममधे झोपायला स्पेस नाही, असे म्हणत असू ,तर ही स्पेस नात्याच्या, जिव्हाळ्याच्या, कुटुंबव्यवस्थेच्या विनाशाकडे नेणारी आहे, हे निश्चित.

– क्रमशः भाग पहिला. 

© श्री सतीश मोघे

मो – +91 9167558555

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कॅप्टन  सचिन गोगटे – कॅडेट नंबर ३४५० ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ कॅप्टन  सचिन गोगटे – कॅडेट नंबर ३४५० ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

कॅप्टन सचिन गोगटे यांनी मर्चंट नेव्हीमध्ये अनेक वर्षं काम केलं. साध्या शिकाऊ कॅडेटपासून प्रचंड मोठ्या ऑइलटँकरचे कॅप्टन म्हणून अनेक वर्षं ते कार्यरत होते.  या कार्यकाळातील स्वानुभवांवर आधारीत लेखनातून त्यांनी आपल्याला या वेगळ्या क्षेत्राचा थरारक आणि सखोल परिचय करून दिला आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यावर सचिन यांनी ‘टीएस राजेंद्र’ या भारत सरकारच्या जहाजावर मर्चंट नेव्हीचे प्रशिक्षण घेतले. नंतर काही वर्षं व्यापारी जहाजांवर काम केले.डेक कॅडेटपासून सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास चाळीस वर्षं अव्याहत या क्षेत्रात सजगतेने काम करून  ऑइल टँकरचे तज्ज्ञ कॅप्टन या पदापर्यंत पोहोचला. अनेक परदेशी व्यापारी  जहाजांवर त्यांनी कॅप्टन म्हणून उत्कृष्ट काम केले.तसेच ऑइल टँकर व ऑइल फील्ड्स यातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून  जगभर नाव कमावले. कंपनीच्या विविध जहाजावर जाऊन तिथल्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना आवर्जून बोलाविले जाई. त्यासाठी त्यांना  सततचा विमान प्रवास करावा लागला. त्यांनी जगातल्या १२० देशांना भेटी दिल्या. सहावेळा पृथ्वी प्रदक्षिणा घडली.

एखाद्या परदेशी बंदरात पोचल्यावर पाच सहा तासात तिथले व्यापार-व्यवहार समजून घेणे आणि त्याबद्दल बोटीवरील सहकाऱ्यांना व्यावहारिक प्रशिक्षण देणं त्यांनी महत्त्वाचं मानलं. जहाजाच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं.

इराण- इराक लढाई, अंगोला, सिरीया अशा युद्धक्षेत्रात  काम करताना जीवावरच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. समुद्री चाचेगिरीच्या प्रदेशात सुरक्षित राहणं ही फार महत्त्वाची गोष्ट असते. ही सुरक्षितता कशी मिळवावी याचं प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेकदा सोमालीया, पश्चिम आफ्रिका, इंडोनेशियाच्या प्रदेशात जाऊन काम केलं. ऑइल टँकर्सवर काम करताना तिथल्या सुविधा वापरून जहाजांवरच्या मोठ्या आगींना तोंड देण्याचे प्रशिक्षण त्यांनी बारा वर्षे दिलं.

कॅप्टन सचिन यांनी आधुनिक विज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक  शिक्षण घेऊन स्वतःला सतत काळाबरोबर ठेवलं. त्यामुळे ते अनेक जहाजांचे दूर संपर्काने (रिमोटली) जहाजाच्या ब्लॅक बॉक्सचं विश्लेषण करणे,नेव्हिगेशन ऑडिट करणे अशी कामे करू शकले.

या धाडसी क्षेत्रातला पैसा आपल्याला दिसतो पण त्यासाठी भरपूर शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक कष्ट  करावे लागतात. सलग ३६ तास ड्युटी बऱ्याच वेळा करावी लागते. जमिनीचं दर्शनाही न होता अथांग सागरात अनेक दिवस काढावे लागतात. भर समुद्रात भयानक वादळांना तोंड द्यावे लागते.कुटुंबापासून महिनो महिने दूर राहावं लागतं. अनेकदा सचिन यांनी सागरी चाचेगिरीच्या संकटातून शक्तीने आणि युक्तीने जहाजाला सहीसलामत बाहेर काढले. कुठल्याही व्यापारी जहाजाचा किंवा ऑईलटँकरचा त्या त्या बंदरातील व्यवहार आपल्याला वाटतो तितका सरळ, साधा, सोपा कधीच नसतो. त्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि दहशतवादाचे अनेक पैलू असतात.

सचिन  कॅप्टन असलेल्या सर्व जहाजांवर खूप कडक शिस्त स्वतःसह सर्वांनी पाळावी यासाठी ते  आग्रही असंत. तसेच सहकाऱ्यांच्या आरोग्याची, कुटुंबीयांची योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल यावरही त्यांचे लक्ष असे .स्वतःच्या निर्व्यसनी, निर्भिड,धाडसी वागणुकीमुळे तसेच स्वच्छ चारित्र्यामुळे त्यांचा दरारा होता. बंदराला बोट लागल्यानंतर अनेक गैरव्यवहार  (बाई, बाटली, स्मगलिंग , अमली पदार्थ) होत असतात. सचिन यांनी कुणाकडूनही कसलीही भेट स्वीकारली नाही आणि स्वतःच्या जहाजावर कुठलाही गैरव्यवहार होऊ दिला नाही. यामुळे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर नेहमी खुश असत.

या त्यांच्या साऱ्या प्रवासात त्यांच्या पत्नी मीना यांनी मोलाची साथ दिली. लहानग्या ईशानसाठी आई आणि वडील दोघांची भूमिका समर्थपणे निभावली. निगुतीने संसार केला. सचिन यांना कसल्याही कौटुंबिक अडचणी न कळवता हसतमुखाने पाठिंबा दिला.ईशानचे शिक्षण आणि सर्व आर्थिक व्यवहार, नातेसंबंध उत्तम रीतीने सांभाळले. त्यावेळी आजच्यासारख्या मोबाइल ,इंटरनेट अशा कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या. जेव्हा कधी मीना यांना सचिन यांच्या जहाजावर जाण्याची संधी मिळाली तेव्हा लहानग्या ईशानसह सगळे आंतरराष्ट्रीय प्रवास एकटीने  करून ज्या बंदरात सचिन यांचे जहाज असेल ते बंदर गाठावे  लागे. जहाजावरही कॅप्टनची बायको म्हणून वेगळेपणाने न वागता मीना यांनी जेवणघरातील कूकपासून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवले.

मीना यांना एकदा अशा प्रवासात एका भयानक प्रसंगाला तोंड द्यावे लागले. मीना यांना इजिप्तच्या कैरो या विमानतळावर पोहोचून तिथून प्रवासी गाडीने २२० किलोमीटर प्रवास करून अलेक्झांड्रिया या बंदरात सचिन यांची बोट गाठण्यासाठी जायचे होते. त्यांच्याबरोबर सचिन यांचे एक सहकारी होते. हा प्रवास थोडा आडवळणाचा आणि वाळवंटातील होता. वाटेत रानटी टोळ्यांची भीती असे. म्हणून काळोख व्हायच्या आत अलेक्झांड्रिया इथे पोहोचणे आवश्यक होते. परंतु विमानतळावरील एजंटच्या हलगर्जीपणामुळे प्रवास सुरू व्हायलाच संध्याकाळचे चार वाजले. थोडा प्रवास झाल्यावर ड्रायव्हरने त्यांना वाळवंटातील एका छोट्या हॉटेलमध्ये नेले व रात्र इथेच काढा असे सांगून तो पसार झाला. हॉटेलमधील त्या आडदांड परपुरुषांच्या वखवखलेल्या नजरा त्यांच्यावरून फिरत होत्या. धोका ओळखून त्यांनी  रूममधील सर्व फर्निचर ढकलत नेऊन दाराला टेकवून ठेवले. रात्रभर त्यांच्या दरवाजावर मोठ मोठ्या थापा मारल्या जात होत्या. पण मीना मुलाला कवटाळून गप्पपणे कॉटवर बसून होत्या. सकाळी उजाडल्यावर तो ड्रायव्हर आला आणि त्या कशाबशा अलेक्झांड्रियाला पोहोचल्या. संपर्काचे कुठलेही साधन नसल्यामुळे सचिन खूप काळजीत होते पण मीनाने विलक्षण धैर्याने साऱ्या प्रसंगाला तोंड दिले.

दैवगती खूप अनाकलनीय असते. सचिन एकदा कामासाठी तुर्कस्तानमध्ये इस्तंबूल इथे गेले होते. त्यांना रात्रीचं विमान पकडून सिंगापूर इथे जायचं होतं. संध्याकाळी काहीतरी खायला म्हणून ते रेल्वेस्टेशनकडे निघाले होते तेवढ्यात कानठळ्या बसवणारा स्फोटाचा आवाज आला आणि सचिन उलटे लांबवर फेकले गेले. त्यांच्या नाकातून कानातून रक्त वाहत होते अतिरेक अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटचा त्यांना असा फटका बसला. कसबसे उठून त्यांनी विमानतळ गाठला. सिंगापूरला पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना चालायला खूप त्रास होऊ लागला. हालचालीवर बंधनं आली. त्या रोगाचे निदान एम एन डी (मोटर न्यूरॉन डिसीज) असे झाले. शरीरातील सर्व नर्व्हस सिस्टीम क्षीण होत गेली. कुटुंबीयांसोबत या आजाराबरोबर चार-पाच वर्षे झगडून सचिन यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कर्तृत्वाला मनःपूर्वक नमस्कार 🙏

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मोबाईल नव्हते तरी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

मोबाईल नव्हते तरी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

चष्मा साफ करता करता एक वयस्कर काका आपल्या बायकोला म्हणाले : अगं,आपल्या जमान्यात मोबाईल नव्हते.

काकू : हो ना ! पण बरोबर 5 वाजून 55 मिनिटांनी मी पाण्याचा ग्लास घेवून दरवाजात यायची आणि तुम्ही पोहचायचे.

काका : मी तीस वर्षे नोकरी केली. पण मला आजपर्यंत हे समजलं नाही की , मी यायचो, त्यामुळे तू पाणी आणायचीस की तू पाणी आणायचीस,त्यामुळे मी वेळेवर यायचो.

काकू : हो . आणि अजून एक आठवतं, की तुम्ही रिटायर व्हायच्या आधी तुम्हाला डायबीटीस नव्हता. मी तुमची आवडती खीर बनवायचे, तेव्हा तुम्ही म्हणायचे की आज दुपारीच वाटलं होतं, की आज खीर खायला मिळाली, तर काय मजा येईल. 

काका : हो ना .. अगदी. ऑफिसमधनं निघताना मी जो विचार करायचो घरी आल्यावर बघतो तर तू तेच बनवलेलं असायचं.

काकू  : आणि तुम्हाला आठवतं ? पहिल्या डिलीव्हरीच्यी वेळी मी माहेरी गेले होते, तेव्हा मला कळा सुरू झाल्या होत्या. मला वाटलं, हे जर माझ्याजवळ असते तर ? आणि काय आश्चर्य! तासाभरात  स्वप्नवत तुम्ही माझ्या जवळ होतात.

काका  : हो. त्या दिवशी मनात विचार आला होता, की तुला जाऊन जरा बघूयात.

काकू : आणि तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून कवितेच्या दोन ओळी बोलायचे.

काका : हो. आणि तू लाजून पापण्या मिटवायचीस व मी त्या कवितेला तुझा ‘लाइक’ मिळाला असं समजायचो. 

बायको : एकदा दुपारी चहा करताना मला भाजलं होतं. त्याच दिवशी सायंकाळी तुम्ही बरनॉलची ट्यूब अापल्या खिशातनं काढून बोलले, ही कपाटात ठेव.

काका : हो..आदल्या दिवशीच मी बघितलं होतं, की ट्यूब संपलीय. काय सांगता येतं कधी गरज पडेल ते? हा विचार करून मी ट्यूब आणली होती.

काकू  : तुम्ही म्हणायचे की आज ऑफिस संपल्यावर तू तिथंच ये. सिनेमा बघूयात आणि जेवण पण बाहेरच करूयात.

काका : आणि जेव्हा तू यायचीस, तर मी जो विचार केलेला असायचा, तू अगदी तीच साडी नेसून  यायचीस.

काका काकूजवळ जाऊन तिचा हात हातात घेत बोलले : हो , आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते पण आपण कनेक्टेड होतो.

काकू  : आज मुलगा आणि सून सोबत तर असतात. पण गप्पा नाही, तर व्हाट्सएप असतं. आपुलकी नाही तर टैग असतं. केमिस्ट्री नव्हे तर कॉमेंट असते. लव्ह नाही तर लाइक असतं . गोड थट्टामस्करीच्या ऐवजी अनफ़्रेन्ड असतं. त्यांना मुलं नकोत तर कैन्डीक्रश सागा, टेम्पल रन आणि सबवे सर्फर्स पाहिजे.

काका : जाऊ दे गं! सोड हे सगळं. आपण आता व्हायब्रेट मोडवर आहोत. आपल्या बॅटरीची पण एकच लाइन उरली आहे. अरे ! कुठं चाललीस ?

काकू  : चहा बनवायला.

काका : अरे… मी म्हणणारच होतो, की चहा बनव म्हणून.

बायको  : माहिती आहे. मी अजूनही कवरेज क्षेत्रात आहे आणि मेसेजेस पण येतात.

दोघेही हसायला लागले.

काका : बरं झालं आपल्या जमान्यात मोबाइल नव्हते.

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चांदोबाला अनावृत्त पत्र… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ चांदोबाला अनावृत्त पत्र… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

प्रिय चांदोमामा,

         सस्नेह नमस्कार !

आज आबालवृद्ध भारतीयांना तुझी खूप खूप आठवण येत आहे. तुझ्या प्रत्यक्ष भेटीसाठी आम्ही नेहमीच आतुर राहिलो.आमच्यापासून तू आता फार दूर राहिलेला नाहीस. आमचा दूत चांद्रयान-3 तुझ्या कक्षेत आलाय.

चंदामामा, तुझा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग एकसमान असल्यामुळे तुझी दुसरी बाजू आम्हाला इथून कधीच दिसत नाही.पण आमच्या दूतानं त्याही बाजूची छायाचित्रं आम्हाला पाठवलीत. आजवर आम्ही तुझ्या छातीवर अंकित असलेला ससा पाहिला आणि त्यावरून तुला “शशांक’ असं नावही दिलं. आता तुझी दुसरी बाजूही आम्हाला दिसली आणि तीही तितकीच सुंदर आहे.

तुझं आणि आमचं नातं प्रभू श्री रामरायांपासून आहे.तुझ्याकडे पाहून लहानग्या रामचंद्रांनी तुझ्याशी खेळण्याचा हट्ट केला आणि कौसल्यामातेनं रामचंद्रांच्या हाती आरसा दिला. त्यात तुझं रूप पाहून प्रभू रामचंद्रांची कळी खुलली. तेव्हाच कदाचित राम आणि चंद्र हे शब्द एकत्र येऊन ‘रामचंद्र’ शब्दाचा उदय झाला असावा. तेव्हापासूनच प्रत्येक माता आपल्या बाळाला तुझं रूप दाखवते आणि बाळंही तुझ्याकडे पाहून हरखून जातात.

‘निंबोनीच्या झाडामागे । चंद्र झोपला गं बाई हे’। अंगाई गीत ऐकत येथे बाळ लहानाचं मोठं होतं. ‘चांदोबा, चांदोबा भागलास का? निंबोनीच्या झाडामागे लपलास का?’ हे पिढ्यानुपिढ्या लोकप्रिय बालगीत आजही कायम आहे.’चांदोबाची शाळा’ पाहण्याची उत्सुकता बालमनाला असते.’सुंदर चांदण्या,चंद्र हा सुंदर,चांदणे सुंदर पडे त्याचे’ ह्या प्रार्थनेतल्या ओळींनी शालेय शिक्षणाला सुरुवात होते.’चंदा है तू ,मेरा सुरज है तू’।,’उगवला चंद्र पुनवेचा’, ‘कैवल्याच्या चांदण्याला ,भुकेला चकोर’, ‘चंद्र व्हा हो पांडुरंगा। मन करा थोर।,’ चंद्र आहे साक्षीला’, ‘कोणता मानू चंद्रमा?’, ‘चौदाहवी का चाँद’, ‘हे सुरांनो,चंद्र व्हा।’ अशी कितीतरी गाणी येथल्या मनामनात रुजली आहेत.

प्रत्येक माता तुला मनोमन भाऊ मानते आणि त्यामुळे प्रत्येक बाळाचा तू ‘मामा’ बनतोस. तुझी आणि गणपतीबाप्पांची गोष्ट ऐकून आम्ही लहानाचे मोठे होतो. तरुणपणात तुला साक्षीदार मानून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात. प्रेमात यश मिळो वा अपयश, प्रेमाचं आजन्म स्मरण राहतं ते तुझ्यामुळेच. त्या आठवणी जपत लोक म्हातारे होतात. वयाला ऐंशी वर्षे पूर्ण होतात, तेव्हाही आम्ही ‘सहस्रचंद्रदर्शन’साजरं करतो.

तात्पर्य, जिथल्या प्रत्येक माणसाचा जन्मभर तुझ्याशी संपर्क असतो, अशा भारत देशाचे आम्ही नागरिक आहोत आणि आज तुझ्याशी प्रत्यक्ष संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

आज दि.23 ऑगस्ट 2023 संध्याकाळची 6 वाजून 4 मिनिटं ही वेळ आमच्यासाठी आणि आमचा नातलग असल्यामुळे तुझ्यासाठीही खूप महत्त्वाची आहे.चांद्रयान-3चं ‘विक्रम लॅंडर’ तुझ्या दक्षिण ध्रुवाला स्पर्श करण्यास व्याकूळ झालंय.

अपयशातून बोध घेऊन पुढे जाणाऱ्यांचा हा देश आहे. मागील वेळी अल्गोरिदमच्या अपयशामुळे तुला कवेत घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. हा दोष यावेळी आम्ही दूर केलाय. यशापयशाचा खेळ आजन्म सुरूच असतो; पण आम्ही थकणारी माणसं नाही. तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या “लुना-25′ यानाचा तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि मिखैल मारोव नावाच्या शास्त्रज्ञाला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तुझ्या भेटीची आस किती तीव्र असते, हे एवढ्यावरूनच तू समजून जा!

आम्हा भारतवासीयांचं आणि तुझं नातं तर विज्ञानाच्या पलीकडचं. आमच्या भावविश्‍वात तुझं स्थान अढळ. म्हणूनच ‘विक्रम’ची आणि तुझी भेट होणं हा आमच्यासाठी केवळ ‘विक्रम’नसून, ते भावनिक मिलन आहे, हे ध्यानात ठेव.

शास्त्रज्ञांच्या मते, शेवटची पंधरा मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. शास्त्रीय भाषेत ज्याला ‘सॉफ्ट लॅंडिंग’ म्हणतात, तीच खरी कसोटी. चांदोमामा, ही आपल्या नात्याचीही कसोटी आहे, असं समजून आम्हाला यश दे. रक्षाबंधनाचा दिवस फार दूर नाही. तुझ्या कोट्यवधी भारतीय बहिणींची माया फळाला येऊ दे. तुझे कोट्यवधी भाचे श्‍वास रोखून बसलेत. आम्हा सर्वांसाठी ‘मामाचा गाव’ किती महत्त्वाचा आहे, हे तू जाणतोस. आता तो हाकेच्या अंतरावर आलाय. तुझ्या ‘विक्रम’ला प्रेमानं कुशीत घे.एवढंच आत्मीय मागणं.

विश्वास वाटतो की,तू आमची मनस्वी इच्छा पूर्ण करशील.मामाला भेटण्याची अशी संधी पुन्हा पुन्हा मिळू दे.

बाकी सारे क्षेम.भेटीत अधिक बोलूयाच.

             तुझे लाडके,

तमाम भारतीय बंधू-भगिनी व भाचे मंडळी

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रिय मित्र प्रदीप,… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रिय मित्र प्रदीप,… ☆ श्री सुनील देशपांडे

प्रिय मित्र प्रदीप, 

कालपासून फक्त डोळ्यातून पाण्याच्या धारा वहात आहेत. गळा गदगदून आला आहे. तुझ्याशी बोलण्याची खूप इच्छा होती. तू तिकडे साता समुद्रापार !  कुणास ठाऊक रात्र आहे की दिवस आहे आणि माझ्याही तोंडातून शब्द निघणे अशक्य होते आहे.  टीव्हीवर वर्तमानातील सत्य पाहिल्यानंतर भूतकाळाचा इतिहास नजरेसमोरून सरकत आहे. 

ऊर अभिमानाने भरून आला आहे.  आपण आज जिवंत आहोत हे केवढे मोठे भाग्य ! 

या क्षणी आपले मित्र जे आज हयात नाहीत पण आपल्याबरोबर होते, अशांच्या सुद्धा आठवणी मनात दाटून येत आहेत. बालपणापासून आपल्या परिस्थितीच्या आठवणी येत आहेत,  अर्थात आपली परिस्थिती ही देशाच्या आर्थिक परिस्थितीवरच अवलंबून असणार. त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करता लहानपणी अमेरिकेच्या मदतीचा रेशनवर तासंतास उभे राहून मिळवलेला निकृष्ट प्रतीचा गहू, मिलो, मका असे पदार्थ खाण्याची वेळ मध्यमवर्गीयांवर सुद्धा आली होती. या परिस्थितीतून आपला देश आजच्या परिस्थितीवर आला आहे. लहानपणी दिवाळीसाठी प्रत्येकी ४०० ग्रॅम जादा साखर मिळेल अशी बातमी आज मुलांना, नातवंडांना सांगितली तर त्यांना हसू येते. पण ती वस्तुस्थिती आपण विसरू शकत नाही. या सर्व परिस्थितीतून आपल्या आई-वडिलांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाच्या सोयी व संधी आपल्या स्वतंत्र देशामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या हे आपले केवढे मोठे भाग्य !  महाविद्यालयीन शिक्षणानंतर तू इस्रोमध्ये जॉईन झाल्याचे ऐकल्यानंतर आणि आर्यभट्टच्या शास्त्रज्ञांच्या टीममध्ये तुझी निवड झाल्याचे समजल्यानंतर सर्वप्रथम आमचा उर अभिमानाने भरून आला होता.  आता तुला परत बाळू म्हणून हाक मारून मिठी घालता येईल का हा प्रश्न आम्हाला पडला होता. परंतु त्यानंतरच्या कित्येक  वर्षांनंतर झालेल्या भेटीने तू त्याचे उत्तर दिलेस.  परंतु सुरुवातीच्या काळात पेपरमध्ये आलेल्या बातम्या पाहून मन व्यथित होत होते.  तसेच अभिमानाने भरूनही येत होते. थुंबा स्पेस सेंटरमध्ये सुरुवातीच्या काळात रॉकेटचे पार्ट असेंब्लीसाठी सायकल आणि बैलगाडी मधून नेत असलेले फोटो बघून मन व्यथितही होत असे आणि अभिमानाने भरूनही येत असे. अशा परिस्थितीतून आपण मंगळ आणि चंद्र यांच्या यशस्वी मोहिमा आणि तेही एखाद्या पाश्चिमात्य चित्रपटाच्या बजेटपेक्षा कमी बजेटमध्ये यशस्वी करून दाखवल्या ही आपल्या देशाला आपण ज्या परिस्थितीतून वर आलो त्या परिस्थितीने दिलेली देणगी आहे असे नाही का वाटत ?  हे सर्व आठवून, आठवून डोळ्यातून निघणारे पाणी अजूनही थांबत नाही. मी प्रचंड भावुक झालो आहे. तुला कशा परिस्थितीतून इस्रो वर आली हे जास्त चांगले माहित आहे.  आम्ही फक्त पेपर मधून वाचलेल्या बातम्यांवर मत बनवणारी माणसं.  पण तरीही या सर्व शास्त्रज्ञांनी शून्यातूनच नव्हे तर शून्यापेक्षाही खालून या सर्व गोष्टींना जो उठाव मिळवून दिला त्याबद्दल त्यांना किती वंदन करू हेच समजत नाही. तुम्ही सर्व सुरुवातीच्या टीममध्ये होतात. तुम्ही पायवाट निर्माण केली. आता त्याचा राजमार्ग झाला. नव्हे अंतराळ मार्ग झाला. 

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगामध्ये पहिल्यांदाच पंधरा-वीस मिनिटे का होईना सैर करणारा माणूस  शिवकर बापूजी तळपदे हा भारतीय होता हे आठवल्याशिवाय राहत नाही. त्याच्या आयुष्यावर ‘हवाईजादा’ नावाचा एक चित्रपट निर्माण झालेला आहे.  तो युट्युबवर उपलब्ध आहे. परंतु तोही किती जणांनी पाहिला आहे कुणास ठाऊक ?  ही काल्पनिक गोष्ट नव्हे तर त्याकाळची वस्तुस्थिती आहे, हे सुद्धा कित्येक जणांना माहीत नाही. ब्रिटिश गॅझेट मध्ये त्याचा उल्लेख आहे.  त्या काळच्या केसरीमध्ये त्याबाबतच्या बातम्या आहेत. त्यामुळे हे सत्य नाकारता येत नाही. राइट बंधूंच्या आधी अधांतरी सफर करणारा पहिला भारतीय आज आठवतो आहे.  त्यांनी जे  विमान ‘मरुत्सखा’ नावाने बनवले होते ते सोलर पॉवर वर चालले होते हे सुद्धा विशेष !  कारण आज या अंतराळ मोहिमेत सोलर पॉवरचा खूप मोठा उपयोग केला गेला आहे. 

या सगळ्या स्मृती एकत्र दाटून येत आहेत. 

खरं म्हणजे मला माझ्या भावना नीटपणाने मांडताच येत नाहीत. मनात खूप दाटून आले आहे. खूप बोलायचं आहे. खूप व्यक्त करायचं आहे. परंतु कसं करावं समजत नाही. एखाद्या वेळेस हे ॲब्सर्ड वाटत असेल. पण काय करू ? व्यक्त झाल्याशिवाय राहवतही नाही. भावना समजून घ्याव्यात. अर्थात हे तुला वैयक्तिक नव्हे तर हे जाहीर पत्र आहे. माझ्या सगळ्या मित्रांना….  सगळ्या ओळखीच्यांना या सगळ्या भावना समजाव्यात म्हणून हे तुझे पत्र मी सगळ्यांनाच पाठवीत आहे.  परंतु तुझ्या त्याकाळच्या किंवा इसरोमधील शास्त्रज्ञ मित्रांना ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवाव्यात ही विनंती.  कालच मी यावर एकच पोस्ट टाकली होती ती अशी …. 

“इस्रोच्या सर्व आजी-माजी शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, इंजिनियर्स, जे जे कोणी सर्व तांत्रिक गोष्टी शून्यातून उभे करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.  त्या सर्वांना माझे साष्टांग नमस्कार. मनापासून वंदन, वंदन, वंदन. 

एकच शब्द माझ्या तोंडून फुटत होता या सर्वांसाठी…

नमोस्तुभ्यम!

नमोस्तुभ्यम!! 

नमोस्तुभ्यम!!!.. 

या क्षणी वसंत बापटांची एक कविता आठवते आहे त्याचा उल्लेख करतो,

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

ही वडीलांची वाडी तुमची तुम्हास ती लखलाभ असो

खुशाल फुटक्या बुरुजांवरती पणजोबांचे भूत वसो

चंद्रावरती महाल बांधू, नको आम्हाला जीर्ण गढी ॥१॥

देव्हाऱ्यातील गंधफुलांतच झाकून ठेवा ती पोथी

अशी बुद्धीची भूक लागता कशी पुरेल अम्हा बोथी

रविबिंबाच्या घासासंगे हवी, कुणाला शिळी कढी? ॥२॥

शेषफणेवर पृथ्वी डोले! मेरूवरती सूर्य फिरे!

स्वर्गामध्ये इंद्र नांदतो! चंद्र राहूच्या मुखी शिरे!

काय अहाहा बालकथा या, एकावरती एक कडी ॥३॥

दहा दिशांतून अवकाशातून विमान अमुचे भिरभिरते

अणूरेणूंचे ग्रहगोलांचे रहस्य सारे उलगडते

नव्या जगाचे नायक आम्ही, तुम्ही पुजावी जुनी मढी ॥४॥

गतकाळाची होळी झाली, धरा उद्याची उंच गुढी

पुराण तुमचे तुमच्यापाशी, ये उदयाला नवी पिढी ॥

जुन्या पिढीला वंदन आणि नव्या पिढीला सलाम !  कालच्या चंद्रयान मोहिमेवर बऱ्याचशा राजकीय टिपण्या आज वाचल्या आणि वाईट वाटले.  विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान हे राजकारणाचे विषय नाहीत हे जोपर्यंत आपल्या लोकांना समजणार नाही तोपर्यंत आपल्या दुर्दैवाचे फेरे थांबतील का? असा प्रश्न पडतो. तुमचे राजकीय मत काही असेल तरीसुद्धा वैज्ञानिक मत एकच असते आणि तेच असले पाहिजे.  आपण प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक व्यवहारांमध्ये राजकारण न आणता जगू शकत नाही का ?  अत्यंत वाईट वाटते आणि या राजकीय गोष्टींचा कंटाळाच येऊ लागतो.  असो..  वस्तुस्थितीला आपला इलाज नाही आणि आपल्या मताशी इतर माणसे सहमत असतीलच असेही नाही.  त्यामुळे जे असेल ते स्वीकारत, परंतु या यशस्वितेच्या आनंदात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या या अत्युच्च क्षणाचा साक्षीदार झाल्याच्या आनंदात, भविष्यात केव्हाही आता मृत्यू आला तरी आनंदाने सामोरे जावसं वाटेल यात शंका नाही. 

जय हिंद ! भारत माता की जय !! 🇮🇳

तुझा प्रिय मित्र,  

सुनील

(माझा तिसरीपासून ते कॉलेज पर्यंतचा वर्गमित्र प्रदीप शिंदे, जो पूर्वी इस्रो या संस्थेमध्ये नोकरी करीत होता. त्यास पाठवलेले हे पत्र. सर्वांच्या माहितीसाठी प्रकट करीत आहे)

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रंगलेली (?) मैफिल  ☆ श्रीरंग खटावकर ☆

श्री श्रीरंग खटावकर  

? मनमंजुषेतून ?

रंगलेली (?) मैफिल  ☆ श्रीरंग खटावकर  ☆

काही दिवसांपूर्वी एका मैफिलीला गेलो होतो.  शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या वातावरणात एक प्रकारचा भारदस्तपणा उगाचच येतो. अभिजन, महाजनांची गर्दी, त्यात आमच्यासारखे काही नुसतेच सामान्यजन ! 

मंद सुगंध थिएटर भर पसरलेला, आधीच कार्यक्रम सुरू व्हायला उशीर झालेला…. 

एकदाचा पडदा उघडतो.  दोन तानपुरे, डावीकडे तबला, उजवीकडे पेटी, मधोमध एक किडकिडीत व्यक्ती बसलेली. पडदा उघडल्यावर त्या व्यक्तीने हातानेच साथीदारांना खूण केली, तानपुरे छेडले जाऊ लागले, पण बुवांचे काहीतरी बिनसले, एक तानपुरा स्वतःकडे घेतला, खुंट्या पिळू लागले, हस्तिदंती मणी खालीवर करू लागले, जवारी नीट करू लागले. इथे आमच्यासारख्या अनेकांची चुळबुळ सुरू झाली. 

मला नेहमी हा प्रश्न पडतो, की हे लोक पडदा उघडायचा आधी हे सगळं का करत नाहीत?… बरं पंधरा मिनिटं झटापट केल्यावर सगळं सुरळीत झालं ( असं वाटलं ) आणि तंबोरा मागे दिला. तेवढ्यात तबला वादकानी त्याची हातोडी काढली, गठ्ठे वर खाली करू लागला, मधेच टण टण करू लागला. त्याचं झालं मग बुवांनी गाणं सुरू केलं. ” पायल बाजे मोरे झान्झर प्यारे ” ….. त्यांची पायल वाजायला सुरुवात होत नाही तेवढयात बुवांनी माईकवाल्याशी काहीतरी खाणाखुणा सुरू केल्या. त्यांना मॉनिटरमधून हवा तसा फीडबॅक मिळत नव्हता वाटतं. मग परत ती पायल सुरू झाली. आता पेटीवाला खुणेनेच माईकवाल्याला सांगू लागला की तबल्याचा फीडबॅक कमी कर पेटीचा वाढव.

अरे काय चाललंय काय यार? पडदा बंद असताना पण हे आवाज येत होते की, मग तेव्हा काय याची रंगीत तालीम केली काय?

बरं एवढं सगळं होऊन परत बुवांचा काही मूड नव्हता. त्यांची पायल एकदमच पुचाट वाजत होती. मी हळूच मित्राशी तसं कुजबुजलो तर बाजूचा म्हणाला, त्यांचं तसंच असतं नेहमी ! मी कपाळावर हात मारला. 

का ? का असे लोक अंत बघतात रसिकांचा काय माहीत?  बरं आजूबाजूला बघितलं तर सगळेच आपसात गप्पा गोष्टी करत होते. मग आम्हीही खुसपुसत सुरू झालो, 

” काय रे काल कुठे उलथला होतास रे?” 

“ नान्यानी पार्टी दिली ना, VP  झाला म्हणे ! “

” काय म्हणतोस ? नान्या आणि VP? अजून नीट शेम्बुड पुसता येत नाही ! ” 

” अरे त्याचा बॉस त्याच्याहून शेम्बडा रे ! केला ह्याला VP “

…. मग मन्या, विकी, सुऱ्या, सगळ्यांच्या यथेच्छ उखाळ्या पाखाळ्या झाल्या.

मधेच गाणारे बुवा यायायाया, यायायाया करत एखादी जीवघेणी तान घेत होते ( म्हणजे आमचा जीव जात होता ) लोक टाळ्या वाजवत होते, ते लवकर संपावे म्हणून. पण उलट बुवांना अजूनच चेव येत होता. 

तबला पेटीवाल्याची तर नुसती तारांबळ उडाली होती बुवांना पकडायला.

…. आणि इकडे आम्ही मस्त टवाळक्या करत आमची मैफिल रंगवत होतो. 

अर्थात तुम्ही म्हणाल ‘ तू कोण रे टीकोजी राव लागून गेलास त्यांच्यावर टीका करायला?’

… अरे यार आम्ही तानसेन मुळीच नाही  पण कानसेन नक्कीच आहोत हो !

मला खरं सांगा अशा अनेक मैफिली तुम्हीही रंगवल्या असतील ना?

ह्या मैफिली गाण्याच्याच असल्या पाहिजेत असे नाही. एखादा रटाळ सेमिनार, विशेषतः पोस्ट लंच सेशन ! 

अहाहा ! ते मस्त जेवण, आणि जेवण झाल्यावर ते त्या हॉलचं गारेगार वातावरण, त्या व्याख्यात्याचे मेस्मरायझिंग (डोक्यावरून जाणारे शब्द) बोलणं. काय गाढ झोप लागते म्हणून सांगू ! अगदी दोन जायफळं घालून प्यालेल्या दुधानी पण येणार नाही अशी पेंग येते. किती टाळू म्हंटली तरी टाळता येत नाही. त्यात जर आपली खुर्ची मागची असेल तर विचारूच नका. झोपेच्या, पेंगेच्या लाटांवर लाटा येऊन थडकत असतात डोळ्यावर ! हो की नै ? ….  

…. किंवा एखादा व्यक्ती गंभीरपणे, “अमुक एक करा ..  बघा वैराग्याच्या खांबांवर मनाचा हिंदोळा कसा झुलायला लागेल ” असं काहीबाही बोलत असतो, तेवढ्यात बाजूच्या खुर्चीतून पॉsssss असा भयानक आवाज आणि पाठोपाठ दर्प येतो, आणि एकदम फसकन हसायला येतं. ते हसूही आवरता आवरत नाही. आणि तो आवाज काढणाराही विचित्र नजरेने आपल्याला दटावतो, तेवढ्यापुरतं गप्प बसतो.  पण पुढच्याच क्षणाला परत फस्स्स करून सुरू!

एक माझी मैत्रीण तर नेहमी ते क्रोशा का काय म्हणतात त्याची ती हुकवाली सुई आणि दोऱ्याचे बंडल प्रत्येक मैफिलीला घेऊन जाते, आणि अशी रटाळ मैफिल असली, की क्रोशाची तोरणं, ताटाभोवतालची फुलं, टेबलावर टाकायला काहीतरी असं एकतरी पूर्ण करते. पूर्वी नाही का आज्या कीर्तनात वाती वगैरे वळायच्या तसंच ! 

पण खरं सांगतो अश्या मैफिलीत, सेमिनार, व्याख्याने यात यामुळे माणसांची खूप कामं होतात हो. 

आणि मला सांगा त्यात आपल्याला मरणाचे येणारे हसू, न टाळता येणारी झोप, सुचलेले किस्से, मारलेल्या गप्पा यांच्या मैफिलीला खरंच तोड नसते. .. शिंची अशी झोप कधी घरी लागत नाही.

काय बरोबर ना?

काय हो झोपलात की काय ? का क्रोशाची तोरणं विणताय ? नाही ना? 

मग वाजवा की टाळ्या ….. संपली आमची मैफिल !!!!

© श्रीरंग खटावकर

मो – +91 7039410869

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आजी आजोबा… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  आजी आजोबा…  ☆ प्रस्तुती – सुश्री प्रफुल्ला शेणॉय ☆

आजीआजोबांवर  

सात वर्षे वयाच्या मुलांनी लिहिलेल्या काही गमती जमती…

इतका सुंदर आरसा. आपला चेहरा नव्याने बघायला मजा येते.

– आजी एक बाई व आजोबा म्हणजे एक मनुष्य असतो,ज्यांना स्वतःची लहान मुलं नसतात.

– त्यांना इतरांची छोटी मुलं फार आवडतात.

– ते नोकरी करत नाहीत. त्यांना आईबाबांसारखं स्वतःचं काम नसतं, म्हणून ते माझ्याशी खेळतात.

– ते सारखे झोपतात.

– ते जास्त जोरात धावूपळू वा खेळू शकत नाहीत.

पण मला छान छान खेळ आणून देतात.

– फिरायला गेलं की हे लोक झाडाची पानं नाहीतर किडे बघत बसतात… फोनमधे वाट्टेल त्या गोष्टीचे फोटो काढतात व एकमेकांना दाखवत बसतात.

– फुलांचे रंग नि फळांचे गुण ते मला सांगतात. मला फक्त फळं खायला आवडतात.

– त्यांना कसलीही घाई नसते, म्हणून मलाही ते घाई करत नाहीत. निवांत असतात.

– बहुतेकदा ते जाडे, गुबगुबीत असतात, पण इतकेही जाड नसतात की मला बूट घालून देऊ शकत नाहीत.

– ते चष्मा लावतात व वेगळेच गमतीदार गबाळे कपडे घालतात.

– आजोबांना केस कमी असतात, तरी ते जोरजोरात तेल लावून भांग पाडत बसतात, मग आजी त्यांना हसते.

– आजीचे केस दरवेळी निरनिराळ्या रंगाचे असतात, पण आजोबा तिला हसत नाहीत, कारण त्यांचं तिच्याकडे फारसं लक्ष नसतं. ते पेपरमधे डोकं खुपसून बसलेले असतात. म्हणून ते हुशार असतात.

– आजीआजोबा दात व हिरड्या तोंडातून बाहेर काढू शकतात.

– ते दोघेही खूप स्मार्ट नसतात. तरीही ते गोड दिसतात. कधीकधी आईबाबांना तसं वाटत नाही.

– “देवाचं लग्न झालंय का नाही ?”, “कुत्रे मांजरांच्या मागे का लागतात?”अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना येतात. यायलाच हवीत.

– झोपण्यापूर्वी मला तोंडात टाकायला खाऊ लागतो, हे त्यांना बरोब्बर कळतं.

– ते माझ्याबरोबर श्लोक, पाढे म्हणतात आणि म्हणताना माझं काही चुकलं, तरी माझ्या पाप्याच घेतात.

– आजोबा जगातील सर्वात हुशार व स्मार्ट मनुष्य असतात, कारण ते मला खूपखूप नवीन गोष्टी शिकवतात. मला ते जास्त वेळ मिळायला हवेत.

– आजोबा तर प्रत्येक छोट्या मुलाला हवेच. खासकरून जर आई-बाबा तुम्हाला टीव्ही वा टॅब बघायला देत नसतील तर आजोबा हवेच. ते आपली करमणूक करतात. त्यांना आपल्यासाठी खूप वेळ असतो.

आजीआजोबा नातवंडं नातं युनिव्हर्सली गोडच असतंय. नाही का ?

प्रस्तुती : सुश्री प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares