मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ४७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ४७ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – ‘आपला… समीर… परत… आलाय… ‘ आरतीचा हा चार शब्दांचा निरोप निखळ समाधान देणारा असला तरीही हे आक्रीत घडलं असं यांची उकल मात्र झालेली नाहीय हे माझ्या गावीच नव्हतं. पंधरा वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतर अगदी अकल्पितपणे ही उकल झाली आणि त्या क्षणीचा थरार अनुभवताना माझ्या मनातल्या ‘त्या’च्या पुढे मी मनोमन नतमस्तक झालो.. !!)

तो थरार कधी विसरुच शकणार नाही असाच होता! समीर नवीन बाळाच्या रुपात परत आलाय याच्यावर ध्यानीमनी नसताना पंधरा वर्षांनंतर अचानक शिक्कामोर्तब व्हावं आणि तेही तोवर मला पूर्णत: अनोळखी असणाऱ्या एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून हे अतर्क्यच होतं माझ्यासाठी.. !

ते सगळं जसं घडलं तसं आजही जिवंत आहे माझ्या मनात.. !

नकळतच बाळाचं नाव ठेवलं गेलं ते ‘समीर’ची सावली वाटावी असंच. ‘सलिल’! सलिलचा जन्म ऑगस्ट १९८० चा. आणि पुढे बराच काळ उलटून गेल्यानंतर जुलै १९९४ मधे एका अगदीच वेगळ्या अशा अस्थिरतेत माझ्या मनाची ओढाताण चालू असताना ‘समीर’ आणि ‘सलिल’ या दोघांमधील एक अतिशय घट्ट असा रेशीमधागा स्पष्टपणे जाणवून देणारा तो प्रसंग अगदी सहज योगायोगाने घडावा तसाच घडत गेला होता. तो जन्म आणि मृत्यू यांच्यामधल्या परस्परसंबंधांची उकल करणारा जसा, तसाच समीर आणि सलिल या दोघांमधल्या अलौकिक संबंधांची प्रचिती देत सप्टे. १९७३ मधे आम्हाला सोडून गेलेल्या आमच्या बाबांनी आम्हा मुलांवर धरलेल्या मायेच्या सावलीचा शांतवणारा स्पर्श करणाराही!!

ही गोष्ट आहे जून-जुलै १९९४ दरम्यानची. सलिल तेव्हा १४ वर्षांचा होता. सांगली(मुख्य) शाखेत ब्रॅंच मॅनेजर म्हणून मी कार्यरत होतो. इथे माझी तीन वर्षे पूर्ण होताहोताच नेमकं पुढच्या प्रमोशनचं प्रोसेस सुरु झालं. माझा इंटरव्ह्यू झाला आणि हायर ग्रेड प्रमोशनसाठी मी सिलेक्टही झालो. सुखद स्वप्नच वाटावं असं हे सगळं अचानक फारफार तर महिन्याभरांत घडून गेलं आणि सगळं सुरळीत होतंय असं वाटेपर्यंत अचानक ठेच लागावी तसा तो सगळा आनंद एकदम मलूलच होऊन गेला!

 कारण पोस्टींग कुठे होईल ही उत्सुकता असली तरी माझ्या पौर्णिमेच्या नित्यनेमात अडसर येईल असं कांही घडणार नाही हा मनोमन विश्वास होता खरा, पण अनपेक्षितपणे तो विश्वास अनाठायीच ठरावा अशी कलाटणी मिळाली. प्रमोशनची आॅफर आली की ती आधी स्वीकारायची आणि तसं स्वीकारपत्र हेड ऑफिसला पाठवलं की मग पोस्टिंगची ऑर्डर यायची असंच प्रोसिजर असे. मला प्रमोशनचं ऑफर लेटर आलं आणि पाठोपाठ

‘ यावेळी प्रमोशन मिळालेल्या सर्वांचं ‘आऊट ऑफ स्टेट’ पोस्टिंग होणार ‘ अशी अनपेक्षित बातमीही. मेरीट लिस्ट मधे असणाऱ्यांची प्रमोशन पोस्टींग्ज प्रत्येकवेळी त्याच रिजनमधे आणि इतरांची मात्र ‘आऊट आॅफ स्टेट’ अशीच आजवरची प्रथा होती. त्याप्रमाणे आधीची माझी प्रमोशन पोस्टींग्ज सुदैवाने कोल्हापूर रिजनमधेच झालेली होती. पण यावेळी धोरणात्मक बदल होऊन सर्वच प्रमोशन पोस्टींग्ज ‘आऊट ऑफ स्टेट’ होतील असं ठरलं आणि त्यानुसार माझं पोस्टींग लखनौला होणार असल्याची बातमी आली!!

नोकरी म्हंटलं कीं आज ना उद्या असं होणारंच हे मनोमन स्वीकारण्याशिवाय पर्याय होताच कुठं? मी हे स्वीकारलं तरी माझे स्टाफ मेंबर्स मात्र ते स्वीकारु शकले नाहीत. मला आता प्रमोशन नाकारावे लागणार असं वाटून ते कांहीसे अस्वस्थ झाले.

तो दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी कस्टमर्सची गर्दी ओसरली तसे त्यातले कांहीजण माझ्या केबिनमधे आले. सर्वांच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट दिसत होती. दर तीन वर्षांनी होणारी अधिकाऱ्यांची बदली हे खरंतर ठरुनच गेलेलं. पण निरोप देणाऱ्या न् घेणाऱ्या दोघांच्याही मनातलं दुःख हा आजवर अनेकदा घेतलेला अपरिहार्य अनुभव माझ्यासाठी अतिशय क्लेशकारकच असायचा. यावेळी तरी तो वेगळा कुठून असायला?

” साहेब,तुम्ही प्रमोशन अॅक्सेप्ट करणार नाहीये का?” एकानं विचारलं. वातावरणातलं गांभीर्य कमी करण्यासाठी मी हसलो.

” अॅक्सेप्ट करायला हवंच ना? नाकारायचं कशासाठी?” मी हसतंच विचारलं. पण त्या सर्वांना वेगळाच प्रश्न त्रास देत होता.

” पण तुम्ही लखनौला गेलात तर दर पौर्णिमेला नृ. वाडीला कसे येऊ शकणार?”

हा प्रश्न मलाच कसा नव्हता पडला? लखनौच्या पोस्टींगची बातमी आली न् पहिला विचार आला होता तो पुन्हा घरापासून इतक्या दूर जाण्याचाच‌‌. तोच विचार मनात ठाण मांडून बसलेला. आरतीच्याही मनाची आधीपासून तयारी व्हायला हवी म्हणून मी हे घरी फक्त तिलाच सांगितलं होतं. सलिलला आत्ताच नको सांगायला असंच आमचं ठरलं. पण मग त्यानंतर पुढचं सगळं नियोजन कसं करायचं यावरच आमचं बोलणं होतं राहिलं. जायचं हे जसं कांही आम्ही गृहितच धरलं होतं. खरंतर मी स्वीकारलेला नित्यनेम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा असं मलाही वाटायचंच कीं. असं असताना माझ्या सहकाऱ्यांना पडलेला हा प्रश्न माझ्या मनात कसा निर्माण झाला नाही? माझं एक मन या प्रश्नाचं शांतपणे उत्तर शोधत राहिलं. सारासार विचार केल्यानंतर त्याला गवसलेलं नेमकं उत्तर.. ‘जे होईल ते शांतपणे स्वीकारायचं!’.. हेच होतं!

मी त्या सर्वांना समोर बसवलं. मनात हळूहळू आकार घेऊ लागलेले विचार जमेल तसे त्यांच्यापर्यंत पोचवत राहिलो.

” मी प्रमोशन नाकारलं समजा, तरीही मॅनेजमेंट नियमानुसार आहे त्या

पोस्टवरही माझी ‘आऊट ऑफ स्टेट’ ट्रान्स्फर कधीही करू शकतेच की. जे व्हायचं तेच होणार असेल तर जे होईल ते नाकारुन कसं चालेल? मी नित्यनेमाचा संकल्प केला तेव्हा ‘आपली कुठेही,कधीही दूर बदली होऊ शकते हा विचार मनात माझ्या मनात आलाच नव्हता. तो नंतर आईने मला बोलून दाखवला, तेव्हा तिला मी जे सांगितलं होतं तेच आत्ताही सांगेन….

“माझा हा नित्यनेम म्हणजे मी केलेला नवस नाहीये. तो अतिशय श्रद्धेने केलेला एक संकल्प आहे. हातून सेवा घडावी एवढ्याच एका उद्देशाने केलेला एक संकल्प! माझ्याकडून दत्तमहाराजांना सेवा करून घ्यायची असेल तितकेच दिवस हा नित्यनेम निर्विघ्नपणे सुरू राहिल. त्यासाठी समजा मी प्रमोशन नाकारलं तरीही एखाद्या पौर्णिमेला आजारपणामुळे मी अंथरुणाला खिळून राहिलो किंवा इतरही कुठल्यातरी कारणाने अडसर येऊ शकतोच ना? त्यामुळे समोर येईल ते स्वीकारून पुढे जाणं हेच मला योग्य वाटतं. शेवटी ‘तो’ म्हणेल तसंच होईल हेच खरं!”

यात नाकारण्यासारखं कांही नव्हतं तरीही त्यापैकी कुणालाच ते स्वीकारताही येईना.

त्यांच्यापैकी अशोक जोशी न रहावून म्हणाले,

” साहेब, या रविवारी तुम्ही मिरजेला आमच्या घरी याल? “

” मी? येईन.. पण.. कां?कशाकरता?”

” साहेब, माझे काका पत्रिका बघतात. त्यांना मी आज घरी गेल्यावर सांगून ठेवतो. तुम्ही या नक्की.. “

मी विचारात पडलो. अशोक जोशींचा उद्देश प्रामाणिक असला तरी मला ते योग्य वाटेना.

” खरं सांगू कां जोशी? तुमच्या भावना मला समजतायत. पण यामुळे प्रश्न सुटणाराय कां? प्रमोशन आणि ट्रान्स्फर याबाबतची सेंट्रल ऑफिसची पॉलिसी माझ्या एकट्याच्या जन्मपत्रिकेवरुन ठरणार नाहीये ना? मग या वाटेने जायचंच कशाला? म्हणून नको. “

अशोक जोशी कांहीसे नाराज झाले.

” साहेब, माझे काका व्यवसाय म्हणून हे करत नाहीयेत. त्यांचा सखोल अभ्यास आहे. व्यासंगही. ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रिटायर झालेत. तेही दत्तभक्त आहेत. ते गरजूंना योग्य तो मार्ग दाखवतात फक्त. सल्ला देतात. त्याबद्दल कुणाकडूनही पैसे घेत नाहीत. तुम्हाला नाही पटलं, तर त्यांचं नका ऐकू. पण एकदा भेटायला काय हरकत आहे?”

जोशींच्या बोलण्यातली तळमळ मला जाणवली. त्यांना दुखवावंसं वाटेना.

” ठीक आहे. येईन मी. पण तुम्ही कशासाठी मला बोलवलंयत ते त्यांना सांगू मात्र नका. ते आपणहोऊन जे सांगायचं ते सांगू देत. ” मी म्हणालो. ऐकलं आणि जोशी कावरेबावरेच झाले. त्यांना काय बोलावं समजेचना.

” साहेब, मी.. त्यांना तुमची बदली लखनौला होणाराय हे आधीच सांगितलंय. पण म्हणून काय झालं? पत्रिका बघून त्यांचं ते ठरवू देत ना काय ते. ” जोशी म्हणाले.

मी जायचं ठरवलं. लखनौला होणाऱ्या बदलीपेक्षा अधिक धक्कादायक माझ्या पत्रिकेत दुसरं कांही नसणारंच आहे याबद्दल मला खात्री होतीच. पण…. ?

माझं तिथं जाणं हे ‘त्या’नंच ठरवून ठेवलेलं होतं हे मला लवकरच लख्खपणे जाणवणार होतं आणि मला तिथवर न्यायला अशोक जोशी हे फक्त एक निमित्त होते याचा प्रत्ययही येणार होता.. पण ते सगळं मी तिथे गेल्यानंतर.. ! तोवर मी स्वत:ही त्याबद्दल अनभिज्ञच होतो!

 क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फाल्गुन—- होळी… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

🔅 विविधा 🔅

फाल्गुन—- होळी☆ सौ शालिनी जोशी

फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. कांही ठिकाणी हा सण प्रत्येकाच्या घरी, तर काही ठिकाणी गावकरी मिळून साजरा करतात. एरंडाच्या रोपाभोवती लाकडे व गोऱ्या यांची मांडणी करतात. त्याभोवती रांगोळी घालतात व त्याचे दहन करतात. वैयक्तिक सण असेल तर दुपारी अंगणात होळी पेटवून तिची पूजा आरती करतात. प्रदक्षिणा घालतात व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. सार्वजनिक होळी ही साधारणपणे संध्याकाळी पेटवितात. पूजा करून नारळ नैवेद्य अर्पण करतात. दुसऱ्या दिवशी त्या राखेचे गोळे करून मुले खेळतात. खरे पाहता हे अग्निदेवतेचे पूजन आहे.

हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. हिरण्यकश्यपु नावाचा एक असुर राजा होऊन गेला. तो घमेंडी, ताकदवान व अहंकारी होता. त्याला देवाचे नाव घेतलेले आवडत नसे. त्यात विष्णूचा तो जास्तच द्वेष करीत असे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. ही गोष्ट राजाला आवडत नव्हती. कितीही राजाने सांगितले तरी प्रल्हादाने विष्णू भक्ती सोडली नाही. तेव्हा राजाने प्रल्हाद याला दहन करून मारण्यासाठी आपली बहीण ‘होलिका’ हिच्या मांडीवर बसवले. कारण तिला ‘अग्नीपासून भय नाही’ असे वरदान होते. तिने प्रल्हादासह अग्निप्रवेश केला. पण वेगळेच घडले. विष्णू कृपेने होलिकेचे दहन झाले. आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. अशाप्रकारे असत्यावर सत्याचा विजय झाला. तेव्हापासून होळी हा सण साजरा करतात. वाईट जाळून चांगले आत्मसात करावे हे सांगणारा हा सण. वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. होलिकेच्या दहनाचा दिवस म्हणून होलिकोत्सव.

कोकणातील हा मोठा सण. याला ‘शिमगा’ म्हणतात. हा शेतकऱ्यांचा निवांतपणाचा काळ. शेतीची भाजावळ झाल्यापासून पावसाची वाट बघण्याचा हा काळ. या दिवसात देवांच्या पालख्या गावभर मिरवतात. लोक रांगोळ्या काढून त्यांचे स्वागत करतात. नृत्य गाण्याचा आनंद घेतात. काही ठिकाणी गावकरी वेगवेगळी सोंगे धारण करून लोकांचे मनोरंजन करतात. कधी पुरुष स्त्रीवेश धारण करतात. स्पर्धा होतात. मर्दानी खेळ खेळतात. कोळी लोक होडक्याची पूजा करून पारंपारिक नृत्य करतात. आदिवासीही सामुदायिक नृत्य करतात. गावानुसार प्रथा बदलते.

एकमेकातील वादविवाद, द्वेष, राग विसरून सर्व समाजाला एकत्रित आणणारा असा हा सण. भ्रष्टाचार, अत्याचार, चोऱ्या या आत्ताच्या काळातील होलिका आहेत. त्यांचा नाश करून सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश हा सण देतो. सर्व अशुद्ध भस्मसात करून शुद्ध वातावरण करणारा हा सण. म्हणून ही अग्नीची पूजा.

होळी म्हणजे वसंतऋतुच्या स्वागताचा उत्सव असेही म्हणायला हरकत नाही. जुने दुःख विसरून नवचैतन्याकडे वाटचालयाला शिकणे हाच होळीचा अर्थ.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभू…संग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

पक्षी जाय दिगंतरा… कवयित्री : कै. डॉ. मीना प्रभूसंग्राहक : डॉ. शेखर कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

काय मरण मरण – मला नाही त्याची भीती

होते सामोरी घेऊन – पंचप्राणाची आरती 

माझं मरण मरण – त्याने यावं अवचित 

त्याच्या शुभ्र पंखावरी – झेपावीन अंतरात 

दवओल्या पहाटेस – त्याचे पाऊल वाजावे

उषा लाजता हासता – प्राण विश्वरूप व्हावे.

माध्यान्हाच्या नीलनभा – जाई गरुड वेधून 

त्याच्यापरी प्राण जावे – सूर्यमंडळा भेदून 

किंवा गोरज क्षण यावा – क्षण यावा आर्त आर्त

जीवितास काचणारी – हुरहुर व्हावी शांत

शांत रजनी काळोखी – घन तिमिर निवांत 

शंकाकुल द्विधा मन – विरघळो सर्व त्यात 

वैशाखीच्या वणव्यात – एक जीव अग्नीकण 

शांतवेल होरपळ – जेव्हा वरील मरण 

जलधारांचा कोसळ – होता सृष्टीचे वसन 

जीव शिवाला भेटावा – बिंदू सिंधूचा होऊन

गारठली पानं सारी – हिमवार्‍याशी झोंबत 

देठी सहज तुटता – न्यावे मलाही सोबत 

नको चुडा मळवट – नको हिरे, मणी, मोती

नका सजवू देहाला – नाही आसुसली माती 

नको दहन दफन – नको पेटी वा पालखी 

मंत्र, दिवा, वृंदावन – मला सगळी पारखी 

नको रक्षा हिमालयी – गंगा अस्थी विसर्जन 

धुक्यात जावी काया – आसमंती झिरपून 

पंच भूतांनी बांधला – देह होता एक दिनी 

पंचतत्वी तो विरावा – नकळत जनांतूनी

खरे सांगू माझे निधन – झाले कार्तिक संपता 

आज त्याची जनापुढे – घडे निव्वळ सांगता 

जाता जाता एक ठेवा – उरी पोटी जो जपावा 

माझ्या कार्तिकची बट – फक्त हृदयाशी ठेवा.

त्याच क्षणी समस्तांची – स्मृती जावी निपटून 

मागे ऊरू नये माझी – भली बुरी आठवण 

स्मृतींची त्या ढिगातून – आठवांचे ढग येती 

डोळा इवला प्रकाश – वेडी आसवे गळती 

नको सोस आता त्यांचा – जीव सत्यरूप झाला 

कशासाठी कष्टी व्हावे – ओघ पुढती चालला.

दुवा मागल्या पिढीचा – पुढचीशी जुळवून 

माझे बळदले काम – सार्थ आता निखळून

असे अब्ज अब्ज दुवे – आजवर निखळले 

विस्मृतीच्या पंखाखाली – दुवे त्यांचेच जुळले 

 दुवे त्यांचेच जुळले… 

या कवितेच्या शेवटी कवयित्रीने लिहिलंय – 

‘सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार आणि माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मन:पूर्वक क्षमायाचना आता तुमची नसलेली, मीना.’ 

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू

प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे १ मार्च २०२५ रोजी दु:खद निधन झाले. पेशाने भूलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते. मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख होती ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. त्यांनी याद्वारे मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.

कै. मीना प्रभू यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचे मनोगत वरील कवितेतून व्यक्त करून ठेवले होते ही गोष्ट अचंबित करणारी आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

संग्राहक – डॉ. शेखर कुलकर्णी 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डोंगल ते वाय फाय (बालपण)… भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी  ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

? मनमंजुषेतून ?

डोंगल ते वाय फाय (बालपण) भाग – ४ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

दुष्काळ पडायच्या आधीची  दोन वर्षे मजेत गेली. त्यावेळी फारतर आम्ही पाचवी सहावी इयत्तेत होतो.वरील    कालावधीत आमच्या गावात सिद्ध पुरुष आणि त्यांची टीम दाखल झालेली होती. आम्ही त्यावेळी खूप लहान  विद्यार्थी. आमचं कुतूहल कायम जागृत आमच्या गल्लीतील आम्ही बारा तेरा जण त्या सिद्ध पुरुषाच्या मागे. त्यांना काही मदत लागल्यास हजर. त्यांची राहण्याची सोय शिव मंदिरात. तस गाव दहा हजार लोकवस्ती असलेल्.

पटवर्धन संस्थांनाचं गाव कागवाड. गावात पोलीस पाटील, कुलकर्णी, खोत आणि इतर बारा बलुतेदार शेतकरी, कष्टकरी समाज. ते दिवस खूपच सुखाचे. वेळेवर चार महिने पाऊस आणि पावसावर कसलेली शेती अमाप धनधान्य समृद्धी देणारी. काहीजणाच्या शेतात विहिरी व मोट ह्यांची व्यवस्था पण असल्यामुळे तुरळक बागायतदार होतेच. 

आमची शाळा सकाळी आठ ते अकरा दुपारी दोन ते पाच. बऱ्याच वेळा जाग न आल्याने दुपारची शाळा तुडुंब भरत होती. कारण रोज दुपारी चार वाजता मधु गद्रे येऊन कांद्याचे उप्पीट करत असे. संध्याकाळी पाच नन्तर शाळेतचं वर्तमान पत्राच्या कागदावर उप्पीट वाढलं जात असे. शाळेच्या तुकडया बऱ्याच ठिकाणी विखूरलेल्या. कारण शाळेला स्वतःची इमारत नव्हती. त्यामुळे खोताच्या वाड्यात, काटेच्या वाड्यात. तर काही मारुतीचे देऊळ, आणि तालमीत सुद्धा आमच्या तुकडया होत्या. दुपारी चार नन्तर उप्पीटचा वास चहूकडे पसरत असे. त्यामुळे आमचं मन तिकडेच. गुरुजी सुद्धा हे ओळखून होतेच.म्हणून ते पांढ्यांची उजळणी, कविता म्हणणे असा बदल तिथे करीत असत.  शाळेपेक्षा आमचा कल उडाणटप्पूपणा करण्यात गुंग. त्यात सिद्ध पुरुष आल्याने व त्यांची योग्य व्यवस्था व्हावी म्हणून आमची नियुक्ती! हे पथ्यावर पडलेलं.

हे सिद्ध पुरुष म्हणजेच गदग मठाचे “श्री स्वामी मल्लिकार्जुन ” त्यावेळचा काळ धनधान्य समृद्ध असलातरी पैसे कोणाकडे नव्हतेच. 

बाजारात किराणा सामान आणायला ज्वारी, किंवा कापूस,गहू घेऊन जायचे त्याबद्दल्यात वाण सामान भरायचे. भाजी बाजारात गेले तरी ज्वारी कापूस धान्य देऊन खरेदी करायची. असे ते दिवस. घरी भिक्षा मागायला आला तरी त्यांना सुपातून धान्य दिले जायचे. त्यासाठी घरातील पडवीत एक पोत ज्वारी ठेवली जायची. भिक्षा मागणारे पण ज्यास्त परगावचे असायचे. वेळप्रसंगी भाजी भाकरी दिली जायची. गावात एक मात्र चिंता होती ती म्हणजेच प्यायचं पाणी आणि खर्चाचे पाणी दिवस रात्र भरावे लागे.

अश्या परिस्थितीत श्री मल्लिकार्जुन स्वामी गावात आले आणि त्यांनी ठाण मांडले. रोज रात्री आठ ते दहा प्रवचन सोबत तबला आणि झान्ज वाजवणारे शिष्य. सकाळी त्यांचे आन्हीक कर्म आटोपून झाल्यावर त्यांची रोज प्रत्येकाच्या घरी पाद्य पूजा व भोजन होतं असे. सोबत त्यांचे शिष्यगणं पण असायचेच. 

एके दिवशी काय झाले त्यांनी मठाच्या नावावर जमीन मागितली. व लगेच गावच्या लोकांनी माळरानावर दोन एकर जमीन दिली. तेथून खरा खेळ चालू झाला. रोज पाद्य पूजा झाल्यावर हातात झोळी घेण्यासाठी आम्हा मुलांना बोलवले जायचे . व हातात भगव्या धोत्राचे टोक चार मुले धरून घरोघरी भिक्षा मागायला सांगितले जायचे . आमच्या पुढे टाळ आणि पखवाज वाजवणारा वाद्यवृंद पण होताच. जेणेकरून लोकांना कळावे की भिक्षा यात्रा चालू आहे. हे कार्य रोज वर्षभर तरी चालू झालेल होतं . झोळीत दोन, तीन, पाच पैसे, चार अणे आठ अणे क्वचित रुपया पडत असे. तो आम्ही स्वामीजींच्या कडे सुपूर्द करून दुपारी शाळेत हजेरी लावत होतो. शाळा पण बुडत नव्हती व संध्याकाळी उप्पीट पण चुकत नव्हतं.

रोज स्वामीजी प्रवचनात दान करण्यासाठी उद्युक्त करत होतेच. पैसे,धान्य इतर सामग्री पण गोळा होतं होती. गावातील रस्त्यावर पडलेले दगड, गटारातील दगड गोळा करण्याचे काम चालू झाले. व ते बैल गाडीतून माळावर पोहचवण्यात येतअसे बैलगाडी स्वखुशीने शेतकरी देत असतं . बऱ्याच दानशूर लोकांनी वाळू,दगड,किंवा रोख पैसे देत असतं.

आणि एक दिवशी शिवानंद महाविद्यालयाचे बांधकाम चालू झाले. चुना खडी वाळू रगडली जाऊ लागली. बांधकाम मजुरांनी पण आठवड्यातील एक दिवस स्वामी चरणी अर्पण करून पुण्य कामावले. इमारत वर वर येऊ लागली तसे पैसे कमी पडू लागले. त्यातून पण स्वामींनी शक्कल लढवत लॉटरीची योजना राबवली. लॉटरीत प्रपंचांची भांडी कुंडी, सायकल रोज उपयोगी येणाऱ्या वस्तू ठेवल्या. व त्याचे प्रदर्शन पण मांडण्यात आले. लॉटरी तिकिटाची किम्मत होती एक रुपया. त्यावेळी एक रुपया म्हणजे भली मोठी रक्कमचं! 

स्वामीचे रोज प्रवचन चावडीत होतं असे. चावडी गावच्या वेशीत. हा हा म्हणता पंचक्रोशीतील भक्तगण मिळेल त्या वाहनातून येत . त्यावेळी बैलगाडी हेच मोठे वाहन होते. बरेच जण घोड्यावर किंवा सायकल वरुन पण येऊ लागले. श्रावणात तर जर सोमवारी भंडारा पण होऊ लागला. लॉटरीची तिकीट परत छापवी लागली. आणि बघता बघता आमच्या डोळ्यासमोर शिवांनंद महाविद्यालय उभे राहिले.

आम्ही तर रोज झोळी धरून फिरत होतोच. रोज संध्याकाळी परत इमारत कुठवर उंच झाली आहे,हे बघण्यासाठी आतुर असायचो. दिवस सरले .. कॉलेज प्रांगणातचं लॉटरीची सोडत पण झाली. त्यावेळी शिवानंद कला महाविद्यालय पूर्ण बांधून झाले होते.

त्या सिद्ध पुरुषाचे व महाविद्यालयाचे आम्ही पूर्ण साक्षीदार होतो, हे आमचे भाग्यच. 

ह्याच सिद्ध पुरुषांचे श्री सिद्धेश्वर स्वामीजी विजापूर मठाचे प्रमुख पट्ट शिष्य होते. हे दोन्ही गुरु आमचे मार्गदर्शक ठरले, यात तिळमात्र शंका नाही. दिवस कसे सरत होते ते कळत नव्हतं. फक्त आम्ही दिलखुलास जीवन जगत होतो. बालपण म्हणजे काय हे देखील आम्हाला त्यावेळी माहित नव्हते. श्रावण महिना तर आमच्या साठी पर्वणी. सणांची रेलचेल. नागपंचमी ला तर घरोघरी झोपळा टांगलेला असायचा. त्यात एकेक पोत ज्वारीच्या लाह्या घरी तयार केलेलं असतं. फोडणीच्या लाह्या, लाह्याचे पीठ दूध गूळ, हे आमचे त्यावेळेस स्नॅक्स! शाळेत जाताना चड्डीच्या दोन्हीही खिश्यात लाह्या कोंबलेल्या असतं. त्यात शेंगदाणे पण मिसळलेलं. लाह्याचा सुशला. बघता बघता पंधरा ऑगस्ट पण जोडून येई. गावभर भारत माता की जय म्हणत, मिरवणूक होई. शेवटी ती गावाबाहेरच्या हायस्कुल मैदानात विसर्जित होई. तिथे भाषण विविध गुण दर्शन असा कार्यक्रम होऊन त्याची सांगता होई.

झोपाळा पुढे महिना भर लटकत असे. गोकुळ अष्टमी आली की त्याची तयारी वेगळीच. विठ्ठल मंदिरात एका टेबलवर कृष्णाची मूर्ती सजवून ठेवलेली. प्रतिपदे पासून त्या मूर्ती समोर निरंतर पहारा चालू होई. पहारा म्हणजे प्रत्येकी एका जोडीने एक तास उभारून पारा करायचा. एकाच्या हातात वीणा तर दुसऱ्याच्या हातात टाळ. मुखाने नामस्मरण. जय जय राम कृष्ण हरी. प्रत्येकाला घड्याळ लावून दिवसा व रात्री पहारा करायला उभे केले जायचे. त्यात आमच्या गल्लीतील टीमचे सगळेच भिडू सामील. कारण शाळेला दांडी मारली तरी चालत असे.

माझ्या समोर पक्या असायचा त्याला झान्ज द्यायचो व वीणा मी घ्यायचो. कारण पक्या थोड्या वेळात पेंगत असे. एक दिवशी तो असच पेंगत होता. मुखाने जप चालू होता. मी मुद्दाम ग्यानबा तुकाराम तुमचं आमचं काय काम असं त्याला भारकटवल. तो तसाच म्हणायला नेमक त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आले. मी साळसूद होऊन जप केला. पक्याचे तुमचं आमचं काय काम चालू होतं. अध्यक्ष आले आणि त्याला खडकन थोबाडीत मारली. तस ते भेळकंडत खाली पडला. त्याला जाग आल्यावर घाबरलं. रडायला लागलं. लगेच माझा भिडू बदलला गेला. 

रोज दुपारी महाप्रसाद चालू होताच. रोज नवीन नैवेद्य असायचा. रोज बरेच लोक हजर असतं. शेवटच्या दिवशी आम्ही भलं मोठं मातीच गाडगे घेउन दोन तीन गल्ल्या फिरून दूध दही लोणी लाह्या लोणचं असे सगळे प्रसाद गोळा करून शेवटी ते गाडगे श्रीकृष्णाजवळच ठेवत, पहाऱ्याची सांगता होई. श्रावण कृष्ण नवमीला ते गाडगे उंच झाडावर टांगले जाई. संध्याकाळी आमचा गट बालचमू येऊन एकमेकांना खांद्यावर धरून तो बुरुज तयार करून ते गाडगे फोडलं जाई. त्यासाठी रोज आम्ही सराव पण करीत असू.

कोणत्याही खेळाची साधने उपलब्ध नसताना, बरेच गावठी खेळ खेळण्यात मजा येत होती व रंगत पण वाढत होतीच. मध्येच केव्हातरी आलावा उर्फ मोहरम सण येत असे. चार पाच ठिकाणी पीर बसवत असतं. आम्ही मुस्लिम मित्रांना घेउन तिथे पण धुमाकूळ घालण्यात मजा येई. आमच्या चावडी जवळच असलेल्या मसूदीत लहान आकाराचे अकरा पीर बसत. सगळेच पीर संध्याकाळी बाहेर पडत. आम्ही त्यांना घेण्यासाठी चढओढ पण लागतं असे. मुल्ला लोक ओळखीचे लगेच लहान पीर आमच्या खांद्यावर देत असतं.ते घेउन आम्ही पटांगणात नाचत असू. आमच्या अंगावर खोबरे खारीक अभिर पडत असे. अभिर कधी कधी डोळ्यात पण जाई त्यावेळी पिरांची खांदे पलटी होई. 

खाणे पिणे शाळेत जाणे, दंगा मस्ती करणे. परीक्षा पास होणे. असे करता करता सातवी पास कधी झालो ते कळलंच नाही. अधून मधून घरी पाहुणे येत, त्यांची बाड दस्त ठेवणे. त्यांना स्टॅण्डवर पोहचवणे. बस येईपर्यंत तेथेच राहणे, त्यांनी देऊ केलेले पैसे नको नको म्हणत, ते घेणे. घरातून जाताना त्यांचा आशीर्वाद घेणे. वाढ वडिलांची आज्ञा पाळत बालपण पुढे सरकत होते. बऱ्याच गोष्टी मिळत नव्हत्या. आहे त्यात समाधान असणे ही त्यावेळची संकल्पना होती.

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर – लेखक :  श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ तिसऱ्या स्फोटाच्या उंबरठ्यावर – लेखक :  श्री अच्युत गोडबोले ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते, याची चुणुक जगाला दिसू लागली आहे.

या तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ म्हणवले जाणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी त्याविषयीची भीती व्यक्त केली आहे. ‘एआय’ काय आहे, ते विनाशक का होऊ शकते याविषयी…

‘कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी (एआय) मी जे काम केले, त्याबद्दल मला थोडा खेदच वाटतो, ’ हे उद्गार आहेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचे ‘गॉडफादर’ असे बिरूद लाभलेले डॉ. जेफ्री हिंटन यांचे.

‘‘एआय’, त्या तंत्राच्या भयावह शक्यता यांविषयी बोलताना नोकरीमध्ये असताना मर्यादा येतील, म्हणून राजीनामा देत आहे, ’ असे त्यांनी ‘गूगल’ सोडताना सांगितले.

मी याला ‘तिसरा स्फोट’ म्हणतो. सन १८९६च्या आसपास ‘डायनामाइट’चा शोध लावणाऱ्या आल्फ्रेड नोबेलचा स्फोट पहिला. सन १९४५मध्ये ‘मॅनहॅटन प्रोजेक्ट’मधील अणुबॉम्बचा शोध लावणारा ओपेनहाइमरचा स्फोट दुसरा. आल्फ्रेड नोबेलच्या भावाचे निधन झाल्यानंतर, आल्फ्रेडचेच निधन झाले आहे असे समजून एका वृत्तपत्राने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याचे निधन’ अशी बातमी छापली.

आपण मेल्यावर जग आपल्याला कसे ओळखेल, आठवेल याविषयीची ‘याची देही याची डोळा’ जाणीव झाल्यानंतर उपरती झालेल्या आल्फ्रेडने, पापक्षालनासाठी ‘नोबेल पारितोषिका’ची घोषणा केली.

गंमत म्हणजे याच नोबेल पारितोषिकासाठी १९४६, १९५१, १९६७ असे तीन वेळा नामांकन मिळालेल्या; परंतु पुरस्कार मिळू न शकलेल्या रॉबर्ट ओपेनहाइमरने अणुबॉम्ब बनवला. त्याचा स्फोट ‘डायनामाइट’पेक्षा कित्येक पट विध्वंसक होता. त्यानंतर त्या संशोधनाच्या विनाशक शक्तीमुळे, ओपेनहायमरने खेद व्यक्त केला होता.

आताचा डॉ. जेफ्री हिंटन यांचा राजीनामा आणि त्यानंतरची खेदयुक्त काळजी हा ‘एआय’ तंत्राच्या अजूनही अव्यक्त; पण नजीकच्या भविष्यातील महास्फोटाची जणू नांदीच!

इतकी वर्षे ‘गूगल’मध्ये कार्यरत असूनही, त्याने आत्ताच राजीनामा देण्याची मला तीन कारणे वाटतात. पहिले म्हणजे, ‘एआय’मुळे नजिकच्या काळात जवळजवळ ६० ते ८० टक्के नोकऱ्या कमी होण्याचे भाकित वर्तविले जात आहे; त्यामुळे प्रचंड सामाजिक अस्थैर्य निर्माण होईल. दुसरे म्हणजे, अलीकडेच ‘चॅट जीपीटी’ आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ने (एलएलएम) घातलेला धुमाकूळ आणि तिसरे म्हणजे, या अत्यंत प्रगत ‘एआय’मुळे तयार होत असलेल्या विध्वंसक शस्त्रांची भीती.

‘स्वार्म तंत्रज्ञान’, म्हणजे अनेक छोटे ड्रोन एकत्रित काम करतात. एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र दिल्यास हे सारे छोटे ड्रोन एकत्र काम करून त्या व्यक्तीला ठार करू शकतात. या हल्ल्यातून बचाव होणे शक्य नाही. ही तिन्ही कारणे ज्या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली, त्यात डॉ. हिंटन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

‘चॅट जीपीटी’ आणि ‘डीप फेक’ तंत्रज्ञानासारख्या गोष्टींमुळे सोशल मीडियावर बनावट छायाचित्रे, व्हिडिओ, मजकूर यांचा अनिर्बंध सुळसुळाट होण्याची नुसती शक्यताच नव्हे, तर अनेक शास्त्रज्ञांना खात्री वाटते. हे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वाईट हेतू असणाऱ्या, आसुरी महत्त्वाकांक्षेने प्रेरीत लोकांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश अटळ आहे, याबाबतही त्यांच्यात एकवाक्यता आहे.

याच्याही पुढे जात, जगाचा विनाश ‘होईल का’, यापेक्षा ‘कधी होईल’ एवढेच विचारणे आपल्या हातात आहे, अशी भीतीही अनेक विचारवंत व्यक्त करीत आहेत. याच प्रकारची विधाने, काळजीयुक्त भाषणे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि प्रसिद्ध तंत्रज्ञ-उद्योजक इलॉन मस्क, बिल गेट्स करीत आहेत.

आपण ती ऐकत, वाचत आहोत. व्हाइट हाउसने नुकतेच ‘गूगल’चे सुंदर पिचाई आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे सत्या नाडेला यांना ‘एआय’चा जबाबदारीपूर्वक वापर व त्यासाठीचा आराखडा करणे यासंबंधी बोलावले होते. त्या बैठकीत ‘ओपन एआय’च्या (‘चॅट जीपीटी’ची जनक कंपनी) सॅम आल्टमनबरोबरच अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिसही उपस्थित होत्या. ‘विश्वासार्ह एआय’साठी व्हाइट हाउसने १४ कोटी डॉलर जाहीर केले आहेत.

‘एआय’ची उपशाखा असणारी ‘न्यूरल नेटवर्क’ खूप जुनी आहे. ‘न्यूरल नेटवर्क’ अतिप्रगत करण्यात, तिचे २०१२मध्ये ‘डीप लर्निंग’मध्ये रूपांतर करण्यात डॉ. हिंटन यांचे मोलाचे योगदान आहे. या ‘डीप लर्निंग’ प्रकारामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. डॉ. हिंटन म्हणतात, की हे तंत्रज्ञान मानवापेक्षाही पुढे जाईल, अशी शक्यता आहे आणि ती भयावह आहे.

काही दिवसांपूर्वी ‘सॅमसंग’ कंपनीने ‘चॅट जीपीटी’च्या वापरावर बंदी घातली. वॉरन बफे या गुंतवणूक क्षेत्रातील अग्रेसर सीईओने तर ‘एआय’ला ‘दुसरा अणुबॉम्ब’ म्हटले आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे ६० ते ८० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, ते बेरोजगार होतील, याचा अनेक पाऊलखुणा दिसत आहेत.

‘रायटर्स गिल्ड’ या अमेरिकेतील लेखकांच्या संघटनेने नुकत्याच काढलेल्या मोर्चाने हे दाखवून दिले. ‘चॅट जीपीटी’ कथा, पटकथा लिहून देणार असेल, तर लेखकांना कोण मानधन देणार?

परवाचीच बातमी आहे, की ब्रिटनमध्ये गुंतवणूक तज्ज्ञांच्या सल्ल्यापेक्षा ‘चॅट जीपीटी’ने गुंतवणुकीवर अधिक परतावा दिला. ‘सोनी’च्या छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक जाहीर झालेल्या जर्मन छायाचित्रकाराने ते नम्रपणे नाकारले; कारण ती ‘एआय’ची कलाकृती होती.

‘एआय’, ‘बिग डेटा’, ‘क्लाउड’ इत्यादींचा समुच्चय असणारी, २०१३मध्ये अस्तित्वात आलेली चौथी औद्योगिक क्रांती म्हणजेच ‘इंडस्ट्री ४. ०’ किंवा ‘आय ४’. याला मागे टाकत, दहा वर्षांत ‘इंडस्ट्री ५. ०’ उदयाला आली आहे. यामध्ये मानव आणि यंत्र-तंत्र-रोबो एकत्र काम करतील. याला ‘कोबॉट’ म्हणतात. ‘कोबॉट’मुळे जीवन सुखावह (की आळशी?) झाले, तरी असंख्य नोकऱ्यांवर गदा येऊन, सामाजिक अस्थैर्य वाढेल.

प्रख्यात मानववंश शास्त्रज्ञ युवल हरारी (‘सेपियन्स’चा लेखक) याने एका ‘टेड टॉक’मध्ये म्हटले आहे, की ९० टक्के लोकांना भविष्यात काही कामच नसेल.

यावर काहीसा उपाय म्हणून बिल गेट्स यांनी ‘एआय एथिक्स ग्रुप’ सुचवला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की एखाद्या उद्योगाने लोकांना काढून रोबोंना काम दिले, तर त्यांना ‘रोबो कर’ लावण्यात यावा.

‘एआय’वरील संशोधन सहा महिने थांबवावे, असे अनेक तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, विचारवंत सुचवत आहेत. तंत्रज्ञानाने केलेली कलाकृती वा काम आणि मानवाने केलेले काम यांत फरक करता आला नाही, तर त्याला ‘ट्युरिंग टेस्ट’ म्हणतात. ‘कोबॉट’ या ‘इंडस्ट्री ५. ०’मधील तंत्रज्ञानात आपण तेथपर्यंत पोहोचलो आहोत. डॉ. जेफ्री हिंटन हे ‘ट्युरिंग पुरस्कार’ विजेते आहेत.

एवढे सामाजिक अस्थैर्य, विध्वंस होणार असेल, तर ‘एआय’ करायचेच कशाला, असा प्रश्न मनात उद्भवू शकतो. शेवटी ती मानवाचीच निर्मिती आहे. त्याचे उत्तर दडले आहे लोभीपणात.

‘एआय’मध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या भागधारकांना उत्तम परतावा देऊन स्वत:ची तुंबडी भरायची आहे. जगात अस्थैर्य निर्माण होईल वगैरे तात्त्विक गोष्टींत त्यांना रस नसून, त्यांच्यात ‘एआय’मधील अग्रणी होण्याची उघडी-नागडी स्पर्धा आहे, हे नि:संशय.

या स्पर्धेत आपण टिकून राहण्यासाठी शिक्षणपद्धतीत शिक्षकांनी ‘गूगल’ व्हावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’. म्हणजेच शिक्षकांनी ‘गूगल’पलीकडचे ज्ञान द्यावे आणि विद्यार्थ्यांनी ‘चॅट जीपीटी’चा वापर करावा; पण त्यावर पूर्ण अवलंबून न राहता स्वत:चा तरतम भाव वापरावा.

या पुढे आपली स्पर्धा ‘एआय’शी असणार आहेच; त्याहीपेक्षा ती ‘एआय’बरोबर काम करणाऱ्या मानवांशी अधिक असेल.

लेखक : श्री अच्युत गोडबोले

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईचे महात्म्य… ☆ श्री उद्धव भयवाळ

श्री उद्धव भयवाळ

? विविधा ?

☆ आईचे महात्म्य… ☆ श्री उद्धव भयवाळ  

जगातील प्रत्येक धर्म आईचा अपार महिमा सांगतो. प्रत्येक धर्मात आणि संस्कृतीत ‘ आई’च्या अलौकिक गुणांचे आणि रूपांचे विलक्षण वर्णन आहे. आई’ या दोन अक्षरी या शब्दाचा महिमा सारं विश्व व्यापून आहे. मराठी साहित्यात आईचे मोठेपण वर्णन करणाऱ्या साहित्यकृतींमध्ये ‘श्यामची आई’ ही सर्वश्रेष्ठ आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. सानेगुरुजींच्या सिद्धहस्त सृजनशील लेखणीतून साकारलेली ही साहित्यकृती रसिकवाचकांना अतिशय उत्कटतेने मातृमहिमा सांगून मंत्रमुग्ध करते

‘आई’ हा तो अलौकिक शब्द आहे, ज्याच्या नुसत्या स्मरणाने हृदय फुलून जाते, भावनांचा अंतहीन सागर हृदयात आपोआप साठवला जातो आणि मन आठवणींच्या समुद्रात बुडून जाते. ‘आई’ हा अगम्य मंत्र आहे, ज्याच्या केवळ पठणाने प्रत्येक वेदना नष्ट होतात. आई’चे प्रेम शब्दात वर्णन करता येत नाही, ते फक्त अनुभवता येते. बाळाला नऊ महिने पोटात ठेवणे, प्रसूती वेदना सहन करणे, स्तनपान करणे, बाळासाठी रात्रभर जागे राहणे, त्याच्याशी गोड गोड बोलणे, त्याच्यासोबत खेळणे, बोट धरून चालायला शिकवणे, प्रेमाने फटकारणे, त्याला सुसंस्कारित करणे, सर्वात मोठ्या आव्हानाला धैर्याने सामोरे जाणे या सगळ्या गोष्टी फक्त आईच करू शकते.

आपले वेद, पुराणे, तत्वज्ञान, स्मृती, महाकाव्ये, उपनिषदे इत्यादी सर्वच ‘आई’ च्या अगाध महात्म्याने आणि स्तुतीने परिपूर्ण आहेत. अनेक ऋषी, तपस्वी, पंडित, महात्मे, विद्वान, तत्त्वज्ञ, साहित्यिक या सर्वांनी आईविषयी निर्माण होणाऱ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकं सगळं असूनही ‘आई’ या शब्दाची संपूर्ण व्याख्या आणि त्याचा असीम महिमा आजपर्यंत कोणीही शब्दात मांडू शकलेलं नाही.

आपल्या भारत देशात आई हे ‘शक्ती’चे रूप मानले जाते आणि वेदांमध्येसुद्धा आई ही प्रथम पूजनीय आहे, असे म्हटले आहे.

 पुढील श्लोकातही प्रमुख देवतेला प्रथम ‘ माता’ असे संबोधले आहे.

त्वमेव माताच, पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या, द्रविणम् त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव।

ऋग्वेदात मातेचा महिमा अशाप्रकारे सांगितला आहे की, ‘ हे उषेसारख्या जीवाची माता! महान मार्गावर चालण्याची प्रेरणा द्या. तुम्ही आम्हाला कायद्याचे पालन करणारे बनवा. आम्हाला कीर्ती आणि अथांग ऐश्वर्य द्या. ‘

सामवेदात एक प्रेरणादायी मंत्र सापडतो, ज्याचा अर्थ आहे, ‘हे जिज्ञासू पुत्रा! आईच्या आज्ञेचे पालन करा. तुमच्या गैरवर्तनाने आईला त्रास देऊ नका. आईला जवळ ठेवा. मन शुद्ध करून आचाराचा दिवा लावा.

प्राचीन ग्रंथांमध्ये अनेक औषधांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांची तुलना मातेशी करण्यात आलेली आहे. एका प्राचीन ग्रंथात, अमलाला ‘ शिव ‘ (कल्याणकारी), ‘ वैस्थ ‘ (राज्याचे रक्षणकर्ता) आणि ‘ धात्री ‘ (मातेप्रमाणे संरक्षक) म्हटले आहे. राजा बल्लभ निघंटू यांनीही ‘ हरितकी’ (हरडा) च्या गुणांची तुलना एके ठिकाणी आईशी केली आहे.

 यस्य माता गृहे नास्ति, तस्य माता हरितकी ।

म्हणजे ज्या घरात आई नसते त्याठिकाणी हरितकी (हरडा) मानवाला त्याच्या आईसमान हितकारक असते.

श्रीमद् भागवत पुराणात नमूद केले आहे की, मातेच्या सेवेतून मिळालेले वरदान, सात जन्मांचे दु:ख आणि पाप दूर करते आणि तिची भावनिक शक्ती मुलांसाठी संरक्षणाची ढाल म्हणून काम करते. यासोबतच श्रीमद् भागवतात ‘आई ’ ही मुलाची पहिली गुरू आहे, असे सांगितले आहे.

रामायणात श्रीराम आई’ला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ मानतात. ते म्हणतात-

‘जननी जन्मभूमीश्च स्वर्गदपि गरियसी ।’,

(म्हणजे आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत.)

महाभारतात यक्ष धर्मराजा युधिष्ठिराला विचारतो, ‘जमिनीपेक्षा भारी कोण? ‘ तेव्हा युधिष्ठिर उत्तरतो- ‘माता गुरुतरा भूमे:’ म्हणजे, ‘आई या भूमीपेक्षा खूप भारी आहे. ‘

महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्म म्हणतात, ‘भूमीसारखे दान नाही, मातेसारखा गुरू नाही, सत्यासारखा धर्म नाही आणि दानासारखे पुण्य नाही. यासोबतच महाभारत महाकाव्याचे लेखक महर्षी वेद व्यास यांनी आई बद्दल लिहिले आहे-

 ‘नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः।

नास्ति मातृसमं त्राण, नास्ति मातृसमा प्रिया।।’

(म्हणजे आईसारखी सावली नाही, आईसारखा आधार नाही. आईसारखा रक्षक नाही आणि आईसारखी प्रिय वस्तू नाही.)

तैत्तिरीय उपनिषदात ‘ आई ‘ बद्दल पुढीलप्रमाणे उल्लेख आहे-

‘मातृ देवो भवः।’

(अर्थात, आई देवासमान आहे.)

‘आई’च्या चरणी स्वर्ग आहे, असे संतांचेही स्पष्ट मत आहे. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनी ‘सतपथ ब्राह्मण’ या स्तोत्राचा त्यांच्या ‘ सत्यार्थ प्रकाश’ या ग्रंथाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पुढीलप्रमाणे उल्लेख केला आहे-

अथ शिक्षण प्रक्रिया:

मातृमान् पितृमान आचार्यवान् पुरुषो वेद:

(म्हणजेच, जेव्हा तीन उत्तम शिक्षक असतील, म्हणजे एक आई, दुसरा पिता आणि तिसरा शिक्षक, तेव्हाच माणूस ज्ञानी होईल.)

‘चाणक्य नीती’मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘ मातेसारखी कोणतीही देवता नाही. आई ही सर्वोच्च देवी आहे. ‘

मराठी वाड्मयामध्येसुद्धा माधव ज्युलियन, भास्कर दामोदर पाळंदे, कवी यशवंत आणि अलीकडील काळातील फ. मुं. शिंदे या आणि इतर कवींनी आपल्या कवितांमधून आईची महती सांगितली आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीतही आईवर आधारित अनेक चित्रपट आणि गाणी बनवली गेली आहेत. अनेक गाणी इतकी हृदयस्पर्शी झाली आहेत की, ती ऐकून माणूस पूर्णपणे भारावून जातो.

हिंदू धर्मात देवींना ‘माता’ असे संबोधले जाते. धार्मिक परंपरेनुसार, संपत्तीची देवी ‘ लक्ष्मी माँ’, विद्येची देवी ‘सरस्वती मां’ आणि शक्तीची देवी ‘ दुर्गा माँ’ आहे. नवरात्रात आईची नऊ वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते.

ख्रिश्चन धर्मातही आईला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे. ख्रिश्चनांच्या पवित्र ग्रंथात स्पष्टपणे लिहिले आहे की, आईशिवाय जीवन नाही. यासोबतच प्रभु येशूची आई मदर मेरी हिला सर्वोच्च मानले जाते. बौद्ध धर्मात, महात्मा बुद्धांच्या स्त्री रूपातील तारा देवीची स्तुती केली गेली आहे. ज्यू लोकही ‘ आई’ला सर्वोच्च स्थानी ठेवतात

थोडक्यात, देश कोणताही असो, संस्कृती किंवा सभ्यता कोणतीही असो आणि भाषा, बोली कोणतीही असो’ मातेबद्दल अतूट आणि अपार आदर आहे.

****

© श्री उद्धव भयवाळ

संपर्क – १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी, गादिया विहार रोड, शहानूरवाडी, छत्रपती संभाजीनगर -४३१००९

मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९४२११९४८५९ इमेल: ukbhaiwal@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ या ‘ डे ‘ ची खरंच गरज आहे??… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ या ‘ डे ‘ ची खरंच गरज आहे??… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

प्रेमासारख्या नाजुक विषयाचा बाजार मांडायला हया फिरंग्यांना सांगायला नको. ह्यांच्या व्हँलेंटाईन डे वरून मला गझलनवाज भाऊसाहेब पाटणकर यांचा एक शेरवजा किस्सा आठवला.

एकदा एक मूर्ख शायर सूर्यास म्हणतो की

“भास्करा, कीव मजला येऊ लागते कधी मधी,

रात्र प्रणयाची तू रे पाहिली आहे कधी?”

तेव्हा सूर्य उत्तर देतो,

“आम्हासही या शायराची कीव येऊ लागते,

याच्या म्हणे प्रणयास रात्र यावी लागते”.

प्रेम हे काय दिवस ठरवून व्यक्त करायची चीज आहे?

आपलं मराठी-हिंदी साहित्य एवढं समृद्ध आहे की प्रेम व्यक्त करायच्या किती विविध शैली आपणांस ठाऊक होतात. प्रेम ही खरं तर नजरा-नजरेची परिणती आहे.

गदिमा म्हणूनच गेलेयत 

“प्रथम तुज पाहता,

जीव वेडावला… “

यांचं प्रेम सुद्धा एवढं हळुवार की गिरगांव चौपाटीवर भेटूया असे DIRECT न म्हणता ती खाली मान घालून शालीनतेने पी. सावळारामांच्या काव्यात म्हणते की 

“जिथे सागरा धरणी मिळते

तेथे तुझी मी वाट पहाते”

मग एकदाची परतीच्या भेटीची वेळ ठरते. हा कावरा-बावरा झालाय, ती लाजेनं चूर झालीय. सगळं कसं शांत शांत!

ही कोंडी शेवटी तो फोडतो, (सोबतीला पाडगांवकर, खळे आणि हृदयनाथ या त्रयीला घेऊन.) 

“लाजून हांसणे अन्

हांसून ते पहाणे,

मी ओळखून आहे,

सारे तुझे बहाणे! “

भेट झाल्यावर मात्र हृदयात एक अनाहूत हुरहुर सुरू होते. मग परत गदिमा मदतीला येतात,

“हृदयी प्रीत जागते, जाणता अजाणता”

 तोही आपल्या विश्वात नसतोच!

“होशवालों को खबर,

बेखुदी क्या चीज है,

इश्क किजे, फिर समझिये,

बंदगी क्या चीज है! “

प्रेमात ती ठार वेडी झालीय,

म्हणतेय काय 

“मी मनांत हंसता प्रीत हंसे,

 हे गुपीत कुणाला सांगू कसे?”

त्याचे “बहाणे” ती सुद्धा “ओळखून” आहे. तिच्या पाठीशी अस्सल कोंकणी सारस्वत (आरती प्रभू) आहेत, ती म्हणते,

“नाही कशी म्हणू तुला विडा मी दुपारी,

परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी! “

ह्याचे बहाणे थांबायची चिन्हे नाहीत. मग तीच म्हणते,

“ये मुलाकात इक बहाना है,

 प्यार का सिलसिला पुराना है! ” 

शैलेंद्रच्या काव्यातच सांगायचे तर 

“घडी घडी मेरा दिल धडके,

हाय धडके, क्यू धडके”

ह्याची खात्री पटलीय पण खुंटी हलवून घट्ट करू पाहतोय.

“कहना है, कहना है,

आज तुमसे ये पहली बार,

तुम ही तो लायी, हो जीवन में मेरे

प्यार, प्यार, प्यार… “

ती त्याच्या “हरकतीने” मोहरून गेलीय.

तृप्त झालीय.

“धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना,

 शब्दरूप आले, मुक्या भावनांना “

आणि मग “झाडांची पाने हलतांत”. तो खूष.

“जेव्हां तिची नी माझी, चोरून भेट झाली,

झाली फुले कळ्यांची, झाडे भरांत आली” आणि तिनं चक्क “होय” म्हटलं!

हा गडाबडा लोळायचा बाकी!

“तुम क्या जानो, मुहब्बत क्या है… “

” कोकिळ कुहूकुहू बोले,

 तू माझा तुझी मी झाले.. “

दोघांत एवढं अद्वैत निर्माण झालं की ती म्हणते

” तुज्ये पायान् रूपता काटां,

माज्ये काळजान् लागतां घांव “

आपण दोघांचे एक कधी झालो हे त्यांना कळलंच नाही. हृदये जरी दोन असली तरी अंतर्मन मात्र एकच होतं.

“दो लब्जों की है बस ये कहानी”

या हृदयीचे त्या हृदयी कधी झाले, ते ह्या युगुलाला कळलेच नाही.

” आज तू डोळ्यांत माझ्या,

 मिसळूनी डोळे पहा,

 तू असा जवळी रहा,

 तू अशी जवळी रहा “

प्रेमाची भावना इतक्या हळुवारपणे व्यक्त करणा-या या कविता ज्या साहित्यात आहेत त्या मराठी भाषेला व्हॅलेन्टाईन डे च्या बाजारू आणि उथळ स्वरूपाकडे बघण्याची गरजच काय?

लेखक : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंद पेरीत जातांना…” – कवी : श्री दयानंद घोटकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “आनंद पेरीत जातांना…” – कवी : श्री दयानंद घोटकर ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

एका पालकांनी विचारले “काय सर आज तुम्ही सावरकरांचा पुतळा आणून शाळेत कार्यक्रम केला” मी म्हणालो होय 26 फेब्रुवारी म्हणजे सावरकरांची पुण्यतिथी, आणि मराठी राजभाषा दिन असतो 27 फेब्रुवारीला, आणि 28 फेब्रुवारीला असतो विज्ञान दिन, यावर दुसरे पालक म्हणाले “सावरकरांसारखे क्रांतिकारक तयार करायचा विचार दिसतोय तुमचा” का हिंदुत्ववादी विचार मुलांच्या माथी मारणार आहात??? “

त्यांना काय म्हणायचंय, हे मला नेमकं कळलं होतं मी म्हणालो, स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय आपण बाजूला ठेवूया एक समाजसेवक सावरकर आणि मराठी भाषेसाठी आपले योगदान देणारा मराठी प्रेमी हा विचार आपण लक्षात घेऊया 

अहो, पुण्यातील शिक्षण तज्ञ डॉक्टर प्र. ल. गावडे यांनी सावरकर या विषयांमध्ये पीएचडी केली आणि त्यांनी आम्हा काही विद्यार्थ्यांना सावरकरांच्या प्रतिभेची ओळख करून दिली. जयस्तुते आणि ने मजसी ने याच्याही पलीकडे अनेक गीत रचना करणार हा महाकवी यांनी छत्रपती शिवाजी आणि बाजीप्रभू यांच्यावर पोवाडे लिहिले आहेत शिवरायांची आरती’ ही लिहिली आहे संन्यस्त खडग मध्ये नाट्यगीते लिहिली आहेत. हिंदू एकता गीत लिहिले आहे प्रबोधन पर लावण्याही लिहिले आहेत आणि रत्नागिरीला तर पतित पावन मंदिर स्थापन करून त्यांनी सामाजिक एकतेसाठी केलेले कार्य हे सारं पुढच्या पिढीला कळायला हवं ना!! जे आमच्यापाशी आहे ते आम्हाला माहित आहे ते सर्व विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे ना!! एक साहित्यिक सावरकर त्यांची प्रतिभा आणि प्रतिमा शक्ती आणि मायबोलीवर असलेलं त्यांचं प्रेम मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान अनेक इंग्रजी भाषेतील शब्दांना सावरकरांनी मराठी मध्ये प्रतिशब्द दिले आहेत याची माहिती घ्या असेही मी मुलांना सांगितले. एखादा देशभक्त देशसेवा करीत असतानाच समाजसेवा, स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म, इत्यादींचा विचार किती वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि नुसता विचार नाही तर त्याप्रमाणे आचार आणि कृतीही करतो जसे लोकमान्य टिळकांनी मंडा लेच्या तुरुंगात गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिला, डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा फुले, सर्वच समाजसेवकांनी लेखन साहित्य केलेले आहे, ते सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांपर्यंत पोहोचवणं. हे आमचं काम आहे, आता ही नववी दहावीतली मुलं थोडी मोठी झाली आहेत. त्यांच्यामध्ये थोडी वैचारिक प्रगल्भता आली आहे, म्हणून त्यांच्यासाठी सावरकर हा विषय आहे. पाचवी सहावी मध्ये साने गुरुजी, आठवीमध्ये लोकमान्य टिळक, याप्रमाणे जशी इयत्ता वाढत जाते त्याप्रमाणे महापुरुषांचे विचार मुलांसमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांवर देश प्रेमाचे संस्कार करायचे असतील आणि मायबोलीची गोडी लावायची असेल मातृभाषेसाठी आपल्याला काही करायचं असेल तर अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमधूनच थोर कर्तृत्ववान माणसांचा इतिहास त्यांचा चरित्र सांगणं हे आमचं कर्तव्य आहे असं मी सर्व पालकांना सांगितलं आता सारे पालक शांत झाले एक जण हळूच मला म्हणाला “माफ करा सर जरा आमचा गैरसमज झाला” लगेच दुसरे पालक म्हणाले हो “जरा गैरसमज झाला” दुसरे म्हणाले “होय, जरा आधी माहीत करून घ्यायला हवी होती” मी म्हणालो घरी आल्यावर आपल्या मुलांची संवाद साधा, त्यांना विचारा आज काय काय झालं? ? शाळेत कोणता कार्यक्रम होता? ? आणि आता एक काम करा सावरकरांचे विज्ञान विषयक विचार त्यांचीही पुस्तक आहेत ही तुम्ही स्वतः वाचा आणि मग मुलांना वाचायला द्या घरामध्ये जसं कपड्यांचा कपाट आहे ना तसे एक पुस्तकांचेही कपाट तयार करा पुस्तकांची खरेदी करा आणि त्यामध्ये सावरकरांची ही पुस्तकं ठेवा लोकमान्य टिळकांचे पुस्तक ठेवा महात्मा फुलेंची पुस्तके ठेवा सुंदर सुंदर चरित्र जेव्हा मुलं वाचतील तेव्हाच त्यांना प्रेरणा मिळेल असे म्हणून मी माझे मनोगत संपवले. पालकांना माझे विचार पटले होते. एक चांगलं सत्कार्य केल्याचे समाधान मला मिळाले होते.

मराठी भाषेसाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम!!!

लेखक : श्री दयानंद घोटकर, पुणे

 (मराठी भाषा गौरव दिनानिमित्त)

मो.  ९८२२२०७०६८

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘चौकटीबाहेरची माणसं…’’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘चौकटीबाहेरची माणसं’ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

डॉ. राहुल मराठे

चौकटीबाहेरची माणसे……

डॉ. राहुल मराठे हे कीटकतज्ज्ञ असून मित्रकिडा बायोसोलुशन्स आणि मित्रकिडा फौंडेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. गेली ३० वर्षे ते कीटकांचा अभ्यास करत आहेत. निसर्गामध्ये असणाऱ्या कीटकांमधील सुप्त गुणांचा वापर करून आपल्यापुढील अनेक समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. ते कीटकांविषयी शास्त्रीय सल्ले देतात, तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक व्याखाने, कीटक माहिती शिबिरे घेतली आहेत आणि या विषयावर अनेक लेख लिहिले आहेत. आपल्या निसर्गामध्ये अतिशय महत्वाची भूमिका असणाऱ्या कीटकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि कीटकांचे संरक्षण आणि संवर्धन करणे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याची माहिती त्यांच्याच शब्दांत इथे देत आहे.

—– 

स्फोटके शोधणारी झुरळे –

माझ्या संशोधनात मी झुरळांचा वापर या कामासाठी केला. झुरळांच्या जनुकांमध्ये पुनरावृत्ती करणारे घटक असतात. ती खूप लवकर नवीन गोष्टी शिकतात. त्यांच्याकडे घ्राणेंद्रिये आहेत, जी इतर कीटकांपेक्षा दुप्पट आहेत. त्यांच्याकडे गंधकण शोधणाऱ्या ग्रंथी आहेत, ज्या कडू पदार्थही शोधू शकतात. यावरून स्पष्ट होते की झुरळे अतिशय बुद्धिमान आहेत. या प्रयोगासाठी तीन ते चार झुरळांचे गट तयार केले. प्रत्येक गटाला त्या-त्या स्फोटकाचे प्रशिक्षण देण्यात आले. काही दिवसांतच ही झुरळे त्यांना शिकवलेली स्फोटके शोधू लागली. या झुरळांसाठी एक विशेष उपकरण तयार करण्यात आले. त्यामुळे झुरळांना कुठेही मोकळे सोडण्याची गरज नाही. ती एका जागी बसून आपले काम अचूकपणे पार पाडू शकतात.

दारुगोळ्याचे विघटन – 

माझ्या प्रयोगशाळेत मी वॅक्स मॉथ (wax moth) नावाच्या पतंगवर्गीय कीटकांच्या अळ्यांचा वापर केला. त्यांनी अतिशय सहजपणे त्या टणक इंधनातून विशिष्ट घटक खाऊन टाकले आणि ते इंधन निरुपयोगी केले. या अळ्यांपासून प्रेरणा घेऊन मी एक यंत्र विकसित केले. या यंत्राद्वारे टणक प्रोपेलंटचे विघटन केले जाते. आजपर्यंत या यंत्राद्वारे मी सुमारे हजारो किलो प्रोपेलंटचे विघटन केले आहे, ज्यात तीन ब्रह्मोस रॉकेटचाही समावेश आहे. कीटकांच्या वापरामुळे अनेक फायदे होतात – प्रोपेलंट हाताळताना होणारे अपघात टाळता येतात, नैसर्गिक पद्धतीने विघटन होत असल्याने पर्यावरणीय धोका कमी होतो, आणि विघटन जलद होत असल्याने वेळेची व त्यानुसार पैशांचीही बचत होते.

विमान वाचवणारे मित्रकीटक –

विमानांना पक्ष्यांमुळे होणारे अपघात ही एक गंभीर समस्या आहे. पक्षी विमानतळावरील गवतात आढळणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी येतात. पक्षी अनपेक्षितपणे विमानासमोर आल्यास होणारे परिणाम भीषण असू शकतात. पक्षी विमानांना धडकू नयेत यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. या उपायांवर लाखो रुपये खर्च होतात. तरीही पक्षी धडकण्याचे प्रमाण कमी होत नाही. हे सर्व यांत्रिक उपाय असल्याने पक्ष्यांना त्याची कालांतराने सवय होते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मी ट्रायकोग्रामा या मित्रकीटकाचा वापर केला. एक मिलिमीटरपेक्षा लहान असलेल्या या माशीची मादी इतर कीटकांच्या अंड्यांमध्ये स्वतःची अंडी घालते. यामुळे अळीवर्गीय कीटकांची संख्या कमी होते आणि खाद्याअभावी पक्ष्यांचे येणेही कमी होते. मी ही पद्धत अशा प्रकारे विकसित केली की स्थानिक परिसंस्था अजिबात विस्कळीत होत नाही आणि विमानेही सुरक्षित राहतात. हा यशस्वी प्रयोग आता अनेक विमानतळांवर नियमितपणे वापरला जातो. मी हे मित्रकीटक भारतीय वायुदल, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि नागरी विमानतळांवर नियमितपणे पाठवतो आणि पक्षी नियंत्रणात आणतो.

प्लास्टिक खाणाऱ्या अळ्या –

जगभरात प्लास्टिकचे व्यवस्थापन आणि विघटन या समस्येवर संशोधन सुरू आहे. एक साधी कॅरी बॅग नैसर्गिकरित्या विघटित होण्यासाठी हजारो वर्षे लागतात, ही चिंताजनक बाब आहे. प्लास्टिकचे विविध प्रकार असतात, त्यापैकी सर्वांत मोठी समस्या म्हणजे २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक – उदाहरणार्थ आपण दैनंदिन वापरात आणणाऱ्या कॅरी बॅग्ज. मी विविध प्रजातींच्या अळ्यांचा अभ्यास केला आणि शोधून काढले की वॅक्स मॉथ या पतंगाच्या अळ्या प्लास्टिक खाऊन पचवू शकतात. या अळ्या विशेषतः कमी जाडीच्या प्लास्टिकचे विघटन करू शकतात आणि त्या इतर पदार्थही खाऊ शकतात. प्लास्टिकव्यतिरिक्त थर्माकोल, लॉकडाउन काळातील पीपीई किट्स, फोम शीट अशा अनेक पदार्थांचे विघटन या कीटकांकडून होऊ शकते.

अन्नाचे जलद विघटन करणारे कीटक –

पुण्यातील बॉम्बे सॅपर्स या सैन्य तुकडीमध्ये माझ्या मार्गदर्शनाखाली एक नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पात ब्लॅक सोल्जर फ्लाय (मराठीत ‘काळा शिपाई’) या माशीच्या अळ्यांच्या मदतीने दररोज २०० किलो ओल्या कचऱ्याचे विघटन केले जाते. कचरा विघटन झाल्यानंतर या अळ्यांचा वापर मासे आणि कुक्कुटपालन व्यवसायात खाद्य म्हणून केला जातो. अशा प्रकारे एक चक्रीय अर्थव्यवस्था (circular economy) तिथे विकसित झाली आहे. याच ब्लॅक सोल्जर फ्लायचा वापर करून मी भारतीय सैन्यासाठी सियाचीनसारख्या दुर्गम प्रदेशांमध्येही प्रयोग करत आहे. तिथे या माशीच्या साहाय्याने अन्नाचे विघटन यशस्वीरीत्या करण्यात आले आहे. आता विविध ठिकाणी हे युनिट स्थापित करण्याचे काम सुरू आहे.

सियाचीनमधले किडोशौचालय 

सियाचीनसारख्या अतिशय थंड प्रदेशात, जिथे आपले सैन्य तैनात आहे, तेथे मलविघटन ही एक मोठी समस्या आहे. अत्यंत कमी तापमानात हे विघटन कसे शक्य होईल याचा विचार करून मी बर्फात जगणाऱ्या कीटकांचा अभ्यास केला आणि त्यातून एक नवीन किडोशौचालय विकसित केले.

कीटकांपासून प्रेरणा घेऊन तयार केलेले हे शौचालय उणे ४० अंश सेल्सिअस तापमानातही कार्यक्षम राहू शकते. कोणतीही महागडी साधने न वापरता, कमी वेळात उभारल्या जाणा-या या शौचालयांना विजेची आवश्यकता नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात बर्फ जमत नाही. मला सांगताना अतिशय आनंद होतो की सध्या सियाचीन बेस कॅम्पमध्ये आपले सैनिक हे शौचालय वापरत आहेत आणि अल्प कालावधीत मलविघटन होत आहे. आता आणखी एक किडोशौचालय आपल्या सैन्याच्या अशा एका चौकीवर बसवले जाणार आहे, जिथे तापमान नेहमीच शून्याखाली असते. पहिल्यांदाच असा अभिनव प्रयोग सैन्यदलात होत आहे.

—– 

काळाप्रमाणे गरजा बदलत जातात. या बदलत्या गरजा ओळखून नव्या प्रकारच्या क्षेत्रात संशोधन करुन समाजपयोगी कार्य करणाऱ्या या ‘ चौकटीबाहेरच्या माणसा ‘ चं मनापासून कौतुक!

 

लेखक : श्री भूषण कटककर

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सुखांत…’ ☆ माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘सुखांत…‘ ☆ माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

(अंत्यसंस्कार केंद्र) 

जरा विचार करा, कुठे चालला आहे आपला समाज?

भारतातील मानवी मूल्यांना लाजवेल असे एक विशेष प्रदर्शन… 

ही कंपनी अंतिम संस्कार करणार आहे. कंपनीचे सदस्यत्व शुल्क रु. 37500/- आहे. ज्यात सावकार, पुजारी, न्हावी, खांदा देणारा, तुमच्या सोबत चालणारा, रामाचे नाव घेऊन सत्य बोलणारा, हे सर्व संगतीचेच असतील. शिवाय, कंपनी स्वतःच अस्थिकलश विसर्जन करेल.

हा देशाचा एक नवीन स्टार्ट अप म्हणून देखील गणला जाऊ शकतो, ज्याने आधीच 50 लाख रुपये नफा कमावला आहे. परंतु भविष्यात त्याची उलाढाल 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कारण कंपनीला माहीत आहे की…

… भारतात संबंध टिकवायला आता कोणालाच वेळ नाही… ना त्याच्या मुलाशी, ना त्याच्या भावासोबत, ना इतर नातेवाईकांशी… 

माहिती प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares