मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “प्रेमाची शिक्षा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “प्रेमाची शिक्षा” ☆ श्री मंगेश मधुकर

विकीनं तोंडावर दार बंद केल्यावर मायाच्या डोळ्यात पाणी आलं. पुन्हा पुन्हा विनंती केली पण दार उघडलं नाही. गर्दी व्हायला लागल्यावर माया परत फिरली.

“विकी, हा काय प्रकार?,” राजा.

“मरु दे तिला, पार डोक्याची मंडई झालीय. जा दारू घेऊन ये. अजून प्यायचीय”

“आधी मला सांग. कोण होती ती?”

“गप बोललो ना. तो विषय नको. ”

“चांगल्या घरातली दिसत होती. एकदम श्रीमंत कॅटेगरी”

“पंधरा पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे”

“आणि तू तिला शिव्या घातल्या, हाकलून दिलं आणि तिनंही गप ऐकलं. नक्की भानगड काय?”

“ऐकून घेतलं म्हणजे उपकार नाही केले. तशी मातीच खाल्लीयं ना” बोलताना विकीच्या डोळ्यात विखार होता.

“म्हणजे” 

“हिच्यामुळेच बरबाद झालो ना”

“तुमचं लफडं होतं”

“नाही रे”

“मग”

“आमच्या गावातल्या सर्वात श्रीमंत माणसाची लेक, सगळा गाव त्यांच्याच तालावर नाचणारा. कुठंच बरोबरी नाही म्हणून आम्ही दहा हात लांब राहायचो. सावलीला सुद्धा फिरकायचो नाही.”

“मग ही बया कुठं भेटली”

“कॉलेजमध्ये भेटली अन माझी साडेसाती सुरू झाली. तेव्हा आतापेक्षा जास्त सुंदर दिसायची. कॉलेजची पोरं पार फिदा पण कोणी हिंमत करत नव्हते आणि प्रेम-बीम यासाठी लागणारा पैसा, वेळ आणि इच्छा या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या. खूप शिकायचं अन मोठा अधिकारी व्हायचं एवढं एकाच स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होतो. पहिला नंबर कधीच सोडला नाही ना शाळेत ना कॉलेजमध्ये. दिसायला बरा त्यात व्यायामची आवड त्यामुळे तब्येत कमावली. अभ्यास सोडून दुसरं व्यसन नव्हतं. ” 

“आता तुझ्याकडं बघून, सांगतोयेस ते खरं वाटत नाही”

“माझी पर्सनॅलिटी आणि हुशारी बघून ही प्रेमात पडली. सगळा एकतर्फी मामला.”

“भारीच की.. एवढी चिxx पोरगी फिदा म्हणजे..”

“डोंबलाची चिxx! !तिच्यामुळेच वाट लागली. इतकी पागल झाली की थेट प्रपोज केलं पण मी नकार दिला. माझ्यासाठी करियर जास्त महत्वाचं आहे असं सांगितलं पण तिच्या डोक्यात शिरलं नाही.”

“एकदम पिक्चर सारखं वाटतयं”

“खरंय!! आयुष्याचा पार पिक्चरच झाला. स्पष्ट नकार दिल्यावर सगळं थांबेल असं वाटलं पण झालं भलतंच. आपल्यासारख्या सुंदर, श्रीमंत मुलीला एक पोरगा चक्क नकार देतोय यानं तिचा ईगो हर्ट झाला. ”

“मग रे!!”

“हट्टाला पेटली. वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न सुरू केले. दबाव टाकत होती. नापास करण्याची धमकी दिली. हरप्रकारे प्रयत्न केले पण मी नकारावर ठाम होतो. कॉलेजची परीक्षा संपण्याची वाट बघत होतो कारण त्यानंतर आमचे मार्ग वेगळे होणार होते मात्र शेवटचा पेपर संपल्यावर कँटिनमध्ये तिनं जबरदस्तीनं थांबवत पुन्हा विचारलं. मी काहीच बोललो नाही तेव्हा विणवण्या करायला लागली तेव्हा अजून प्रकरण वाढू नये म्हणून तिथून जाऊ लागलो तेव्हा राग अनावर होऊन तिनं खाडकन माझ्या कानफटात मारली. आवाज ऐकून आजूबाजूच्या सर्व नजरा वळल्यावर भावनेच्या भरात केलेली चूक तिच्या लक्षात आल्यावर स्वतःला वाचवण्यासाठी एकदम वेगळा पवित्रा घेतला. जोरजोरात रडायला लागली आणि सगळ्यांना सांगितलं की मीच तिला त्रास देतोय. सारखं सारखं प्रपोज करतोय. तिचा अनपेक्षित “यू टर्न” माझ्यासाठी धक्कादायक होता. ”

“बाsबो, मग पुढं??”राजा 

“एका क्षणात व्हिलन झालो. कॉलेजच्या पोरांनी संधी साधली. कसाबसा जीव वाचला. संध्याकाळी तिचे वडील, भाऊ आणि नातेवाईक घरी. पुढचे पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि दोन महीने हात गळ्यात. ”

“तू खरं का सांगितलं नाहीस”

“हजारदा सांगितलं पण कोणीच विश्वास ठेवला नाही उलट परत असं काही बोललास तर घरादारा सकट जाळून टाकू अशी धमकी मिळाली. झकत गप्प बसलो. आईवडिलांनी तिच्या बापाचे पाय धरले. गयावया केल्या म्हणून जिवंत राहिलो पण गाव कायमचा सोडावा लागला.”

“डेंजर आहे रे बाई!!एवढं सगळं झालं तरी ती खरं बोल्ली की नाही. माफी बिफी…”

“अं हं!!कुठल्या तोंडानं बोलेल. करून सावरून नामानिराळी झाली. मी मात्र बदनाम झालो. स्वप्नाचा चक्काचूर झाला. दिशाहीन जगण्यामुळे हताश, निराश झालो. सैरभैर भटकताना बाटलीच्या नादी लागलो. ”

“पण तुझी काहीच चूक नव्हती. पोलिसांकडे का गेला नाहीस. ”

“झाला तेवढा तमाशा बास होता. प्रकरण वाढवून काहीच उपयोग होणार नव्हता. जिवावर आलेलं गाव सोडण्यावर निभावलं असं समजून नशीब नेईल तिकडं जात राहिलो. ”

“इतकं सारं सोसलसं. कधी बोलला नाहीस. ”

“बरबादीची कहाणी सांगून काय फायदा? आधी फक्त अभ्यासाचं व्यसन आणि आता!!” विकी भेसूर हसला. त्या हसण्यातली वेदना राजापर्यंत पोचली. विकीच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला“जे झालं ते झालं. सोडून दे. आयुष्यात ती पुढं गेली. लग्न करून मोकळी झाली अन तू अजूनही तिथंच आहेस. स्वतःला संपवतोयेस. ”

“मग काय करू. कशासाठी जगायचं. पोराच्या आयुष्याचे धिंडवडे पाहून आई-वडीलांनी हाय खाल्ली अन झुरून झुरून गेले. आता तर पार एकटा उरलोय. वाट बघतोय. “विकीच्या आयुष्याची परवड ऐकून राजाच्या डोळ्यात पाणी आलं.

—-

*बेदम पिण्यानं विकीची तब्येत बिघडली. सरकारी दवाखान्यात भरती केलं. अवस्था पाहून डॉक्टरांनी ‘फक्त वाट बघा’ असं स्पष्ट सांगितलं.

*पश्चाताप आणि अपराधीपणाच्या भावनेनं मायाला नैराश्य आलं कायम शून्यात नजर, खाण्या-पिण्याकडं दुर्लक्ष, त्यामुळं हॉस्पिटलमध्ये भरती केलं. परिस्थिती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं. तेव्हा बायकोवर जीवापाड प्रेम करणारा कैलास मनानं खचला.

मायानं एकतर्फी, हट्टी प्रेम केलं. त्याचे परिणाम ती, विकी आणि कैलास तिघांनाही भोगावे लागले आणि काहीही चूक नसताना त्या प्रेमाची शिक्षा विकी, कैलासला मिळाली. एकाचं आयुष्य तर दुसऱ्याचा सुखी संसार भरडला गेला.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ बाप्पु…” ☆ सुश्री साधना काळबांडे ☆

सुश्री साधना काळबांडे

अल्प परिचय
शिक्षिका
छंद… वाचन, लेखन
पुस्तके प्रकाशित... पाऊलखुणा (काव्यसंग्रह), कातोळा (काव्यसंग्रह), कोचम (कथासंग्रह)

 

🔆 जीवनरंग 🔆

☆ “बाप्पु…” ☆ सुश्री साधना काळबांडे ☆

(वऱ्हाडी भाषेतली कथा) 

जनार्दन बाप्पु शाळेत गुरुजी होते. गुरुजी म्हतले की लय धावपय करा लागे. शाळेत लेकराईले खीचळी शिजोया पासून त त्याईले लशीं द्या लोकू. शाळेत गेल्या गेल्या सरकारचा काय कागद इन काई सांगता येना. हे माईती द्या अन् ते माईती द्या. आज राती गुरुजीले काई झोप लागेना. या कळावून त्या कळावर होत. तशी जनी त्याईची बायको जनाबाई संतापली.

“आज जागरन करा लागते वाटते. झपा मुकाट्यानं”.

तशी सकावून झाली. हाती धोतराचा सोगा घेतला अन् निगाले. तसा त्याईच्या बायकोन आवाज देला…

“माय बाई सकावून सकावून कुठी चालले. च्या पानी घ्या लागत नाई काय आज?. तसेत च्या घेतल्या शिवाय कुठी जात ना… आज लय घाई झाली तुमाले. “

गुरुजीन ते आयकल. अन् जरासेक थांबले.

“बिचारे सकावून सकावून टोकू नको मले.. खिचळी शिजोयाले इधन आन्याले चाललो. लय घोर आय माल्या मांग.

गुरूजी बंडीत इधन घिऊन शाळेत गेले. चुल पेटून तांदुई टाके लोकु चुली जोळ बसले. भातान गदगद केल अन् गुरूजी आ पिसात गेले. पायतात त काय सरकारचा एक नवा कागद टेबलावर दिसला. त्याइन तो वाचला अन् डोकंक्ष्याले हात लावला.

“घेंव्व पंधरा दिवसात सरकारले कुटुंब नियोजनाची केस द्या लागते. आता एवळ्या लवकर कुठि भेटीन मले… सारी चिंता जीवाले “

गावात याले त्याले इचारल. जो तो म्हने… “गुरुजी मांगल्या वर्षीच केल राज्या”… अन् कोनी म्हने गुरुजी मले आठ दा दिवसात लेकरु होते पन म्या दुसऱ्याले हो म्हनेल आय… हजार रुपये पयलेच घेतले म्या. दुसरी बाई म्हने हजार रुपयाच्या खाली एक खळकु घेत नाई.

गुरूजी ईचारातच घरी गेले.

तसा त्याईच्या डोक्ष्यात लाईट लागला. त्याईन बायकोले अवाज देला.

“ओ ओम्याची माय इकळे ये व”.

तशी जनाबाई आली.

“तुह्या बयनीले किती लेकर आयत “.

“कोन कमलीले… तीले काय सात पोरी… अन् आठव आता पोटात आय… दा पंधरा दिवसात होईल आता बायतीन ते… आता बाया म्हनत आठवां किस्ना होते तिले पन तुमी काऊन इचारून रायले “.

“मले तिची लय आठोन आली “.

“माय बाई… माल्या बयनीची तूमाले आठोन येते लागे… काई काम अशीन तीच्या संग… “

गुरूजीन जनाबाई जोळ मनातली गोष्ट सांगतली….

“बिचारे सरकारच एक पत्र आलं… पंधरा दिवसात मले एक तरी अपरेशनची सरकारले केस द्या लागते. गावात ईचारल…. कोनी हो म्हनुन नाई रायल.. कमलीले इचार बर अप्रेशन करते काय आठव लेकरु झाल्यावर “.

तसी जनाबाईन बयनीले भेट्याले गेलीं.

“कमले बायतपन जोळ आल तुव…. मी कऱ्याले तयार आव… पन तुले अपरेशन करा लागीन अन् तुया बाप्पूले केस द्या लागीन… सारा खर्च करतात ते. तुले निवून दिऊन आनुन द्या लोकु. “

कमलीन ईचार करुन सांगतो म्हने अन् दोन दिवसात तीन हो म्हतल. गुरूजीले हरिक झाला. त्याईन कमलीच्या हरेक गोष्टीले हो म्हतल. कमली म्हने बाप्पु मले अँटो सईन होत नाई. जीप घिउन या. तसे गुरुजी जीप घीऊन साईले आन्याले गेले. सायीच्या सात पोरी संगच होत्या. त्यातल्या एका पोट्टीन मोठा कल्ला केला… तशी सायी बोलली.

“बाप्पु जीप उभी करा.. हे लायनी पोट्टी वकतो म्हंते. आता तीच पोट रिकाम होईन. हटेलीतून तीले काई खायाले घेजा. एखाद्या किलो चिवळा अन् जिल्ब्बी घिउन या. “

गुरुजीन जीप थांबोली. पोट्टी वकेलोकु हटेलीत गेले अन् खायाले आनल. तेवळ्यात एका पोट्टीन पाय घासन सूरू केल.

“आता ईले काय पायजे बापा कमले”

“बाप्पु तिले पेळे आवळतात.. जिल्ब्बी खात नाई ते. पावंक किलो पेळे आना अन् या शीलीले पापळी आवळते अन् या चौथ्या नंबरच्या पोट्टीले बुंदीचे लाळू आ वळतात. लय दिवस झाले तीन खाल्ले नाईत. “

गुरुजीन डोकश्याले हात मारला. मनात आल… आता पुळे काय काय मांगतात देव जाने. थांबत थांबत जीप घरालोकू पोहोचली. गुरूजी घरात गेले. तशी जनाबाई मांगच आली.

“लय उशीर लावला. पोट्ट्याइन तरास देला वाटते रस्त्यात.. तुमी त लयच सोकले. “

तशी कमली साऱ्या पोट्ट्या घिऊन दनदन घरात आली.

“बाई माल्या साऱ्या पोरीले खायाले दे. सारी भुक लागली. वकु वकू थकल्या माल्या पोरी. बाप्पु बिस्कीट मिस्किटचे पुळे आना डझनभर “.

गुरूजी दुकानात गेले अन् पोरीले खायाले आनल. आता सायीच पोट कदी दुखते याची रोज वाट पायत. पन सायीन त्याईले सांगातल..

“हे पा बाप्पु जर मले आठवी पोरगी झाली त मी अपरेशन करनार नाई. सांगून ठेवतो तुमाले. माल्या नवऱ्याचा निरोप म्या तुमाले सांगतला नाई अजून. ते म्हनत.. जर आपल्याले आता पोरगी झाली त दोन तीन पोरी तुह्या बाप्पुले वागोयाले लावजो. एवळ्या जनाचां खर्च आपल्याकुन होनार नाई. “

हे आयकुन गुरुजींच्या डोयाले डोया लागेना. अन् शाळेत मन लागेना. ते एकच देवाजोळ म्हनत… “देवा सायीले पोरग हु दे “.

दिवस उगयला. गुरूजी सायीले घिऊन दवाखान्यात गेले. तीले पोरग झालं. तिच्या पेक्षात गुरूजीले हरिक झाला. तीच कुटुंब नियोजनाच अपरेशन झालं अन् गुरूजीले केस भेटली. सरकार दरबारी केस सादर केली. त्याईच्या जीवात जीव आला. दवाखान्यातून सायीले घिऊन घरी गेले. पायतात त काय… घरासमोर दोन तीन मोठे अँटो उभे. घर पावन्याईन सट्ट भरेल. सायीच पोरग पाह्याले तिचा नवरा, सासु, जेठानी, जेठ आलत  चुलत सारे दा वीस जन हजर अन् जनाबाई त्याईचा सयपाक करुन राह्यली होती. गुरूजीन डोकशाले हात मारला. तेवळ्यात जनाबाई त्याईच्या जोळ आली.

“तुमाले तिकळे कोनाची अपरेशनची केस भेटली नाई… माल्या भवती पा आता कसा घोर झाला. माल्या अजुन तीन चार ब यनी याच्या राह्यल्या कमलीच पोरग पाह्याले. रोज चुमळीभर दयन लागते आता. “

गुरूजी जनाबाईले म्हनत.. “आता उखयात मुंडक घातल त रट्टे सईन करा लागतीन पावू काय होते पूळे “

सारे पावने दोन दिवसांत गेले पन कमलीचा नवरा काई गेला नाई. सट्ट खाये अन् मस्त पसरे. रोज कमलीचा पोरगा पायाले पावने येतं. दोन मयने झाले तरी कमली घरी जायाच नाव घेना. एकदिवस ते जनाबाई जोळ आली.

“मी काय म्हनतो तु माली मोठी बयीन आयस. तुये जवाई म्हंनतात की सातव्या पोरीवर आपल्याले पोरग झालं. तुह्या बाप्पुले पोराचं बारस कऱ्याले लाव. त्या शिवाय काई आमी अठून जात नाई. “.

गुरूजी शाळेतून आले अन् जनाबाइन त्याईले बयनीचा निरोप सांगतला. तसे गुरुजी मटकन खाली बसले.

“अव मले दुसऱ्या बाईची अपरेशची केस हजार रुपयात भेटत होती. म्या घेतली नाई. मले वाटल तुही बयीन फुकटात पळीन. माला मांगल्या मयन्याचा सारा पगार खलास झाला. उसने पासने घेतले. आता बारश्याले कुठून पैसा आनु. “

कमली घरी जायाच नाव घेना. म्हनुन गुरुजीन बारस कऱ्याच ठरोल. तसा जनाबाई दुसरा निरोप घिऊन आली.

“अव कमली काय म्हनते.. तिच्या पोराले सोन्याचा बायतीळा पायजे. गयात सोन्याचा ओम, हातात सोन्याचे मनी, आंगठी, कानात सोन्याचे डुल पायजात. अन् दोन तीन डीरेस पोराले अन् सातई पोरिले फराक पायजात. “

आता त गुरुजीले गस आली. सोनत लय महाग झाल. एवळा पैसा कुठून आनाव. साठ सत्तर हजाराचा गच्चू अन् खिशाले चाट बसते आता. तेवळ्यात जनाबाई आली.

“अजुन एक कमलीचा निरोप आय. ते म्हंते मले सादी साळी पायजे नाई. म्या बाप्पुच मोठ काम केलं. मले पैठनी पायजे अन् माल्या बॉले कपळे पायजात. बा रश्यात माल्या बॉच्या साऱ्या बयनी, जवाई, सगेसोयरे बलावा. नाईत राग भरतीन ते. माल्या सासूच्या इकळले सारे मायेरचे बलावा. ज्यादा नाई शंभरक होती न. पंगतीत साजर सूजर कऱ्याले लाव. शेव, बुंदीचे लाळु, वरन, भात, पातोळीची भाजी, तोंडी लाव्याले लुंजी ठेवा पंगतीत “.

सारं आयकुन गुरुजीले वाटे. हे धरनी फाटाव अन् त्यात आपून गायप व्हावं. पन इलाज न्होता. तशी सायी घरी तिच्या जात नाई म्हने. कमलींन साऱ्या पोरी गुरूजीच्या मागं कपळे घ्याले लावून देल्या. गुरुजीन साऱ्याइले कपळे लत्ते घेतले. सोन नान आ नल. लिस्ट तयार केली त दोनशे जन बारश्यासाठी झाले. दारात मंडप टाकला. वाजंत्र सांगतल. पंगत ठेवली. दोनशे म्हनता म्हन ता येटायातले सारे, ज्याईले बलावल नाई तेई आले. काई म्हनत गुरूजीले आठोन नशीन रायली बलाव्याची चाला जेव्याले नाईत राग इन.. सारं गावं जेव्याले उलटल. सारं सरत सरत आल. डबल सयपाक करा लागला. गुरुजी हन्याशी आले. पंगता उठता उठता संध्याकाय झाली. शेवटी गुरुजी अन् जनाबाई जेव्याले बसले. ताटात फक्त पोई अन् भाजीच उरली. दुसऱ्या दिवशी गुरुजीले वाटल सायी जाईन. त्याईन जनाबाईले बलावल.

“काव आता ई तूही बयीन जात नाई काय?”

“जातो म्हनते पन तीले पाच दा हजार संग पायजात अन् गवाच एखांद पोत, तुरीची, उळदाची, मुगाची दाय अन् स्पेशल जीप करून पायजे. “

आतात गुरुजींच्या डोयाले धारा लाग्याच्या रायल्या.

गुरुजीन सायीले जीप करुन देली. तिच्या सात पोरी, आठवा पोरगा नवरा तिचं सामान, दायदाना सारं देलं अन् मोठा स्वास बाईर टाकला. जीप दुर जाये लोकु गुरुजी पायत रायले. जनाबाई अन् गुरुजी घरात आले.

“ठेव बर जरासाक च्या. मंग मी हिसोब करतो”.

तसा जनाबाईन च्या ठेवला. दोघाईन च्या घेतला. गुरुजीन हिसोबाची वयी हातात घेतली अन् थंडेच पळले. कुटुंब नियोजनाच अपरेशन लाखाच्या घरात पळल होत. गुरुजीले घेरीच आली. याच्या पेक्षा दुसऱ्या बाईले अपरेशनसाठी हजार रुपये द्याले पुरत होते. सायीच अपरेशन फुकटात पळीन असं वाटल. झाल उलटच. तेवळ्यात शेजारच पोट्ट पयत आल.

“गुरूजी तुमचे पावने गेले ना ते जीप आमच्या वावरा जोळ बंद पळली. त्यातल्या पोरी लय लळुन रायल्या. तुमाले अँटो घीउन बलावल. “

गुरुजींच्या कानाचे जसे परदे फाटले. ते जागीच थंडे पळले. आंगात हिव धसल. खलखल हा लले अन. आंगावर वाकय घिऊन झपून रायले.

© सुश्री साधना काळबांडे

अकोट जि. अकोला पिन. 444101 मो. 9767993827

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

(स्त्रीशिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्री ला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्या करता काय वेगळं करतो ? बहुतेकांकडून उत्तर येईल – काहीच वेगळं करत नाही.)

इथून पुढे – – 

मेघना : प्रत्येक घरात स्त्री ही आई म्हणून रोल करत असते, बायको म्हणून रोल करत असते, सून म्हणून रोल करत असते आणि बाहेर नोकरी, व्यवसाय हे पण करत असते. असे असूनही, घरातले सगळे जण हिला “टेकन फॉर ग्रंटेड” म्हणून घेत असतात. घरातलं सैपाक पाणी / आवराआवर / मुलांचे डबे भरणे / मुलांची शाळेची तयारी / किराणा आणणे / भाजी बाजार आणि सगळी अवांतर कामे, ह्या सगळ्या तिच्याच जबाबदाऱ्या असतात. ती घरात असतांना सगळे जण, हे कुठे आहे / ते कुठे आहे / हे दे / ते दे, असा तगादा तिच्या मागे लावत असतात. सकाळी ऑफिसला जातांना मोबाईलसकट सगळे साहित्य आपल्या हातात यावे अशी नवऱ्याची बायकोकडून अपेक्षा असते. मग नोकरीला जाणाऱ्या स्त्रीने नवऱ्याकडून अशी अपेक्षा का करू नये.

मनवा : मुलगा आणि सून दोघेही ऑफिस ला निघतांना डबा, पाणी, मोबाईल असे सगळे त्यांच्या हातात देणारे सासू / सासरे कुणाच्या बघण्यात आहेत का ? 

मी : कधी ऐकण्यात नाही. किंवा कुठल्या टीव्ही सिरीयल मधे पण नाहीत 

मनवा : किती नवरे घरी जातांना बायकोकरता प्रेमानी गजरा घेऊन जातात / बायको ऑफिस मधून आल्यावर तिच्या ऑफिस च्या कामाबद्दल चौकशी करतात / तू दमली असशील, जरा गाणी वगैरे ऐक, मी चहा करतो / कुकर लावतो / वगैरे, असे म्हणतात. कितीजण तिला सैपाकघरातून तिचा हात धरून सोफ्यापर्यंत घेऊन जातात आणि प्रेमानी खाली बसवतात ? आणि हातात चहाचा कप देतात ! उत्तर येईल बोटावर मोजण्याइतपतच. आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आजची डब्यातली पालक – पनीर भाजी एकदम हटके होती, किंवा आज डब्यात पुऱ्या आणि श्रीखंड मुळे मजा आली, एवढं बायकोचं कौतुक पण खरंतर पुरेसं असत. घरातले किती जण असं कौतूक करतात !.

मेघना : किती सासवा सून ऑफिसमधून आल्यानंतर तिच्या हातात खाण्याची डिश देतात / चहा देतात. उत्तर येईल अगदी एखादी.

मनवा : सुनेची विचारपूस करणे, हा बहुतेक घरात सासऱ्यांच्या प्रांतच नसतो. सुनेला मदत करण्याची जेंव्हा गरज असते तेव्हा ते त्यांच्या कट्ट्यावर गप्पा मारायला गेलेले असतात किंवा घरात मेडिटेशन करत असतात.

या सगळ्याला अपवादात्मक मंडळी नक्कीच आहेत, किती आहेत, हे मोजायला मात्र आपली हाताची बोटे पुरेशी आहेत.

मी : तुम्ही दोघी म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण काही बाबतीत, स्त्रियांचे पण चुकत असते. घरातली सगळी कामे स्वतःवर ओढून घेण्याची त्यांची सवय त्यांनी बदलायला पाहिजे. धकाधकीच्या जीवनात आनंदी आणि हेल्दी राहणे पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण गरजेचे आहे. आणि याकरता रोज एक ते दीड तास प्रत्येकाने स्वतः करता राखून ठेवलाच पाहिजे असेच जाणकार सांगतात.

मनवा : काका, आपने सही फर्मया है. स्त्रियांना जर असा वेळ काढायचा असेल तर घरामधल्या कामाची विभागणी हि करायलाच पाहिजे. आणि त्याकरता कोण काय म्हणेल, याला गौण महत्व द्यायला शिकले पाहिजे.

मेघना : सकाळचा चहा / खाणे, संध्याकाळचे खाणे पिणे, घरातली अवांतर कामे, थोडी आवराआवर, मुलांचे अभ्यास घेणे ह्या कामात सासू सासरे नक्कीच हातभार लावू शकतात. इतर कामे नवऱ्याबरोबर शेअर करता यतात. ध्येय एकच, कि घर चालवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि मला पण माझ्या हॉबी जपायला, व्यायाम करायला, वगैरे वेळ मिळालाच पाहिजे आणि मी तो मिळवणारच.

मनवा : थोडक्यात काय ? तर स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करणे, याला पहिली प्रायोरिटी दिलीच पाहिजे.

मेघना : आता मजा बघा, स्त्री आणि पुरुष हि नक्कीच दोन वेगळी रसायने आहेत. त्यामुळे एकमेकांना समजण्यात थोडे अंतर पडू शकते. पण घरामधली सासू आणि सून यांचे स्त्री रसायन तर एकच असते. तरीपण कुठल्याही स्त्री च्या मागे सासू हे शीर्षक लागलं, की त्यांचं सून या स्त्री च्या बाबतीत वागणे कां बदलते, सुनेला आपलीच मुलगी असे मनापासून समजून तिच्यावर त्या प्रेम का करत नाहीत ? आणि स्त्रीच स्त्रीची दुश्मन कां व्हावी, हे एक न उलगडणारे कोडेच आहे.

मी : मला वाटतं सासू या शब्दामधेच ती मेख आहे. लग्न झाल्यानंतर जर नवर्याच्या आईचे सासुऐवजी मावशी असे नामकरण केले, तर हे न उलगडणारे कोडे सहज सुटेल.

मनवा : काका मावशीचं का बरं

मी : मावशी या नात्यात एक वेगळेच प्रेम आहे. आपल्याकडे म्हण आहे – माय मरो पण मावशी जगो. म्हणून मावशी असं नामकरण करायचं.

मनवा आणि मेघना : काका, एकदम जालीम उपाय आहे. आम्ही नक्कीच आमच्या ग्रुप वर टाकतो आणि घरी गेल्यावर सासूबाईंना आपल्या गप्पांचा संदर्भ देऊन मावशी म्हणायला सुरुवात करतो.

बाजूला चहा पित उभा असलेला ग्रुप : काका कल्पना आवडली. संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला सांगतो, की, आईला आता मावशी म्हणत जा. पुढच्या भेटीत तुम्हाला फीडबॅक देतो.

मी : पुरुष आणि स्त्रिया यांना सर्वच बाबतीत अगदी तंतोतंत समान हक्क आणि आनंदाच्या समान उपलब्धी हव्या असतील, तर मात्र आपल्याला ब्रह्मदेवाकडे पण थोडे साकडे घालावे लागणार आहे. सृष्टीच्या निर्मितीमध्ये पुरुष आणि स्त्री ही निर्मिती आखतांना, देवाचे पण थोडे चुकलेच आहे, असे मला वाटते. त्याने पुरुषाला थोडे झुकतेच माप दिले आहे. मासिक धर्म, बाळंतपण, मोनोपॉझ या गोष्टी त्यानी फक्त स्त्रियांच्या पदरी टाकल्यामुळे, या काळातली शारीरिक दुखणी आणि त्रास फक्त स्त्रियांना भोगावा लागतो. पुरुष नामोनिराळे असतात. संध्याचे कलियुग संपल्यानंतर पुढच्या अपग्रेडेड सृष्टीची निर्मिती करतांना, स्त्रियांचा हा शारीरिक त्रास दूर करावा किंवा समसमान करावा अशी आपण ब्रम्हदेवाकडे प्रार्थना करूया.

मनवा : काका, नक्कीच. देवांनी जर हे मान्य केलं तर सगळ्याच स्त्रिया खुश होतील आणि तुम्हाला दुवा देतील.

मेघना : काका, तुम्ही आल्यामुळे गप्पा मस्त रंगल्या, काही छान उपाय पुढे आले, मजा आली. चला आम्हाला ऑफिसला निघायला पाहिजे.

तेवढ्यात चहावाल्या दादांनी चहाचा दुसरा ग्लास आमच्या हातात दिला. चहा पिणारा बाजूचा ग्रुप दादांना उद्देशून : दादा इनका ये बिल हमारे बिल मे ऍड करना.

आम्ही सगळ्यांना बाय केले आणि आपापल्या मार्गाला लागलो.

– समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

संत श्री. एम. मुळे वृंदावनचा फार जवळून संबंध आला. अनेक वेळा, अनेक दिवस वृंदावनला राहता आले. श्री. एम. मुळेच खूप सारे मित्र मिळाले. त्या मित्रांमध्ये वृंदावनमध्ये राहणारे राजेश तिवारी यांची खूप छान मैत्री झाली. अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून तिवारी यांच्या नजरेने वृंदावन पाहिले. कृष्णभक्ती, अद्वितीय प्रेम आणि वृंदावन हा माणसाने एकदा तरी अनुभवावा असा अनोखा संगम आहे. त्या दिवशी राजेश यांचा फोन आला आणि मला म्हणाला, ‘संदीप, माझे लग्न ठरले आहे. तुला यायचे आहे’. मला राजेशच्या लग्नाला जाणे गरजेचे होते. कारण राजेशचे लग्न आमच्या सर्वांची मैत्रीण यूएसची श्रीकृष्णभक्त रुसीसोबत होणार होते. रुसीने पाच वर्षांपासून वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केले आहे.

रुसी आणि राजेशच्या लग्नाला वृंदावनात गेलो. दोन दिवस वृंदावनला मुक्काम होता. वृंदावनात फिरणे, तिथल्या माणसांशी बोलणे, यात जो आनंद मिळतो, तो अन्य कशातच नाही. लग्न लागल्यावर वृंदावनला फिरण्यासाठी बाहेर पडलो. वृंदावनात प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव मिळतो. वृंदावनमधील मंदिर परिक्रमा हा माझा आवडता विषय.

मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. प्रेम- मंदिरापासून थोडे दूर गेल्यावर जप करत बसलेले एक जोडपे दिसले. दोघांचे लांब केस, दोघांमध्ये एक आसन, एकच पाण्याची बाटली, एकच बॅग, सारे काही दोघांत एकच होते. ते मी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हे एक जोडपे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून मला वाटले, आपण यांच्याशी बोलले पाहिजे. मी त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होतो. आत्ता जागे होतील, नंतर जागे होतील, याची मी वाट पाहत होतो. खूप वेळ झाला, पण ते काही त्यांच्या साधनेतून बाहेर यायला तयार नव्हते. मी तिथून निघणार, इतक्यात ते दोघेही जागे झाले.

मी त्यांना नमस्कार केला. त्यांना मी म्हणालो, ‘तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून ब-याच वेळापासून थांबलो आहे’.

त्या दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. त्यातली महिला मला म्हणाली, ‘सांगा ना काय बोलायचं आहे तुम्हाला? 

‘तुम्ही जी साधना करताय, तुम्ही जी ध्यानधारणा करताय, त्यातून तुम्हाला खरंच ईश्वराची भेट होते का? या साधनेने तुम्हाला समाधान मिळते का? का तुम्ही अन्य कुठल्या कारणास्तव ध्यानधारणा करताय?’ त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहत आणि स्मितहास्य करत मला उत्तर दिलं. त्या जोडीमधला तो पुरुष मला म्हणाला, ‘अहो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहेच. तुम्ही ध्यानधारणा करा, तपस्या करा अथवा करू नका. त्याची आणि तुमची भेट होतच असते. मन एकाग्र ठेवून श्रीकृष्णाला भेटण्याची आस ठेवली, तर तो भेटतोच भेटतो’.

मग काय मी प्रश्न विचारत गेलो आणि ते उत्तर देत गेले. ते कुठे राहतात, ते काय करतात, ते कधीपासून साधू बनलेत, इथपासून ते त्यांचं पूर्वायुष्य मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आल्यावर त्या दोघांनी साधूच्या वेशात राहणं पसंत केले. ते दोघेही आयटी इंजिनियर साधू का बनले? त्या दोघांची खूप करुण कहाणी मी ऐकली आणि माझं मन एकदम सुन्न झालं.

प्रेमिला शर्मा आणि सिद्धार्थ अवस्थी हे दोघेही अगदी जवळचे नातलग. लहानाचे मोठे ते उत्तर प्रदेशात झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथून दोघेही आयटी इंजिनियर झाले. दोघेही मुंबईत काम करू लागले. एकमेकांची ओळख होती. त्या ओळखीतून दोघांचे प्रेम झाले आणि ते प्रेम लग्नाजवळ येऊन थांबले.

प्रेमिलाला वडील नाहीत. प्रेमिलाची आई तिच्या एका बहिणीला घेऊन उत्तर प्रदेशात राहते. प्रेमिलाने जेव्हा सिद्धार्थचा विषय तिच्या आईला सांगितला, तेव्हा प्रेमिलाच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रेमिलाचा लग्नाविषयीचा निर्णय आईला अजिबात मान्य नव्हता. ज्या दिवशी प्रेमिलाने आईला लग्नाचा विषय सांगितला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आईने उत्तर प्रदेशातून निघून थेट मुंबई गाठली. प्रेमिलाला पकडून तिने गावाकडे आणले. तिच्या लग्नाची इतर ठिकाणी बोलणी सुरू झाली. प्रेमिलाला तर सिद्धार्थबरोबरच लग्न करायचे होते. आईच्या ठाम नकारामुळे ते लग्न होणार नाही, हे निश्चित होते. प्रेमिलाने घरातल्या घरात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीही तिची आई तिचे ऐकायला तयार नव्हती.

एकदा भांडणांत बोलता बोलता आई प्रेमिलाला म्हणाली, ‘तू कुठेतरी एखाद्या मंदिरावर साध्वी म्हणून जा, पण मी त्या मुलासोबत तुझे लग्न करू शकत नाही. तो माझ्या अशा नात्यातला आहे की, त्या नात्यांत तुमच्या दोघांचं नातं नवरा-बायकोचं होऊच शकत नाही. बहीण-भावाचे होते. तुम्ही लग्न केलं, तर मी लोकांना काय तोंड दाखवू? समाजात माझी इज्जत राहणार नाही. तुझ्या लग्नाला कोणी येणार नाही. तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही. त्यावर प्रेमिला म्हणाली, ‘ठीक आहे. मी मंदिरात साध्वी म्हणून राहते’. प्रेमिलाच्या आईला वाटले, प्रेमात पडलेली ही तरुण मुलगी थोडीच मंदिरात साध्वी म्हणून राहणार आहे? एकीकडे प्रेमिलाची आई तिचं लग्न कुठं जमेल का, या विवंचनेत होती, तर दुसरीकडे प्रेमिला साध्वी बनण्यासाठी दीक्षा कुठे घ्यायची? त्याची काय काय नियमावली असते? कोणाकडे जावे लागते? याची सगळी माहिती काढून ठेवत होती.

एके दिवशी प्रेमिलाने तिच्या आईला सांगितले की, मी आता साध्वी म्हणून मंदिरामध्ये बसणार आहे. प्रेमिलाच्या आईला प्रेमिलाचा निर्णय ऐकून एकदम धक्काच बसला, पण प्रेमिला तिच्या निर्णयावर ठाम होती. आत्महत्या, सामाजिक प्रतिष्ठा, आईचे मत, नातेवाईकांचे मत, सिद्धार्थला धोका या सगळ्या शक्यतांवर मात करायची असेल तर, आईने रागात का होईना मला सुचवलेला साध्वी बनण्याचा पर्याय जिवंत राहण्यासाठी योग्य मार्ग ठरू शकतो. त्यातून मला आवडणाऱ्या श्रीकृष्णाची भक्ती करता येईल. सिद्धार्थच्या प्रेमाचे पावित्र्यही मला जपता येईल, या भावनेतून प्रेमिलाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही प्रेमिलाची आई ‘मी सिद्धार्थशी लग्न लावणार नाही’, या मतावर ठाम होती.

प्रेमिलाला मुंबईवरून गावी नेताना प्रेमिलाची आई तिला सोबत घेऊनच सिद्धार्थला भेटली. तिने सिद्धार्थला तंबी देत मारहाण केली आणि बजावून सांगितलं की, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण तुझ्यासोबत तिचं लग्न करणार नाही. तुझ्या आईवडलांनी गावाकडे काय प्रताप केलेत, हे माहिती आहे ना? तुझे आणि हिचे नाते काय आहे हे माहिती आहे ना? यानंतर प्रेमिलाशी बोलायचा किंवा भेटायचा प्रयत्न केलास, तर मी तिचा मुडदा पाडेन. मीही आत्महत्या करीन आणि त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर असेल’.

सिद्धार्थला वाटलं, काहीही झालं, तरी प्रेमिलावरचं आपलं प्रेम कमी होणार नाही. तिच्याशिवाय आपण इतर कोणावर प्रेम करू शकत नाही. तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. ती जिथे कुठे असेल तिथे सुखी राहावी, या भावनेतून मोठ्या जड अंत:करणाने सिद्धार्थने प्रेमिलाला समंजसपणे निरोप दिला.

तिकडे वृंदावनमध्ये जाऊन प्रेमिला साध्वी बनली. सिद्धार्थच्या प्रेमाचं पावित्र्य राखण्यासाठी तिनं हा निर्णय घेतला होता. ही गोष्ट प्रेमिलाच्या मैत्रिणीकडून बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थला कळली. सिद्धार्थने खूप शोध घेतल्यावर त्याला प्रेमिला भेटली, ती साध्वीच्या वेशात. घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला. ‘तू तुझे आयुष्य आनंदाने जग. आता मी हा निर्णय कायम ठेवून आयुष्यभर श्रीकृष्णाचं ध्यान करत या वृंदावनमध्येच राहणार आहे’, असं प्रेमिलानं सिद्धार्थला सांगितलं.

सिद्धार्थ प्रेमिलाला म्हणाला, ‘माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही. आपलं प्रेम काही विसरून जाण्यासाठी नव्हतं किंवा काहीतरी मिळवण्यासाठीही नव्हतं. आपलं प्रेम हे जन्मोजन्मीच्या गाठी आयुष्यभर कायम राहाव्यात यासाठी झालं होतं. तू जो साध्वी बनण्याचा निर्णय घेतलेला आहेस, तसाच मीही साधू बनण्याचा निर्णय घेतो. साधू आणि साध्वी बनून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत राहू. नवरा-बायको होऊ शकलो नाही तर काय झाले? श्रीकृष्णाचे भक्त म्हणून सोबत राहू.

दोन-चार दिवस प्रेमिलाने सिद्धार्थची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ काही ऐकायला तयार नव्हता.

शेवटी सिद्धार्थने साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या चार वर्षांपासून हे दोघे जण साधू-साध्वी बनून वृंदावनमध्ये तपस्या करत असतात. चार ठिकाणी भिक्षा मागतात. पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं खातात. रात्री वृंदावनच्या श्रीकृष्ण आश्रमात मुक्काम करतात. साधू आणि साध्वीचे पावित्र्य त्या दोघांनीही जपले आहे.

प्रेमिला म्हणाली, ‘मी लहानपणापासून कृष्णभक्त आहे. श्रीकृष्णच आपल्यासाठी सर्व काही आहे, या भावनेने मी आयुष्याची बावीस वर्षे काढली. अपघाताने का होईना मी पूर्णवेळ कृष्णभक्त होईन, असं कधी वाटलं नव्हतं. मी सिद्धार्थमध्येसुद्धा श्रीकृष्ण पाहायचे. सिद्धार्थच्या मला जपण्याच्या पद्धतीत मला श्रीकृष्ण दिसायचे. दुर्दैवाने सिद्धार्थ माझा होऊ शकला नाही, पण माझी श्रीकृष्णभक्ती सिद्धार्थच्या सहवासाने आणि माझ्या समर्पणाने कायम राहिली.

सिद्धार्थ म्हणाला, ‘अहो, जगण्यासाठी लागते तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही सुखी आहात का? हे खूप महत्त्वाचे आहे. मी आयटी इंजिनियर होतो. ती आयटी इंजिनिअर होती. आमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय काय होतं? ते एकमेकांसोबत खूश राहायचं. मुंबईत राहिलो असतो, तर मोठ्या इमारतीमध्ये राहिलो असतो. आलिशान गाडीत फिरलो असतो. त्या सर्वांतसुद्धा सुख शोधणे हेच महत्त्वाचे ध्येय राहिले असते. इथे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये सुख शोधायची गरजच भासत नाही. सुख हे आपोआपच मिळत जाते. माझे आणि प्रेमिलाचे प्रेम हे तेव्हाही होते, आताही आहे. तेव्हा त्या प्रेमात चांगुलपणाच्या आणाभाका घेत आकाशाला गवसणी घालणारे भौतिक सुखाचे स्वप्न पाहिले होते. आता त्या आणाभाका कायम आहेत. फरक इतकाच की, आता श्रीकृष्णाच्या भक्तीत विलीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या मार्गाने वाटचाल सुरू आहे’.

ते दोघेजण माझ्याशी बोलत असताना मी विचारले, ‘तुमच्या नातेवाईकांचे काय झाले? सिद्धार्थच्या घरच्यांनी विरोध केला नाही का?’ प्रेमिला म्हणाली, ‘जसं माझ्याकडे झालं, तसं त्याच्याकडेही झालं’. डोळ्यात अश्रू आणत, प्रेमीला म्हणाली, ‘एका वर्षानंतर माझी आई वारली. बहिणीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आईकडे फार काही नव्हतं. जे काही होतं, ते मी विकलं आणि आनंदात बहिणीचं लग्न केलं. सिद्धार्थला आई-वडील नव्हते. त्यानं त्याच्या मोठ्या भावाच्या नावावर त्याची सगळी मालमत्ता करून दिली आणि अगदी सहजतेनं, आनंदात माझ्यासोबत येऊन भगवे वस्त्र परिधान केले’.

मी त्या दोघांनाही अजून एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही हे सगळं आपल्या प्रेमासाठी केलं का श्रीकृष्णासाठी?’ त्या दोघांचेही उत्तर अतिशय समर्पक होते. ते म्हणाले, ‘आम्ही जगत होतो श्रीकृष्णासाठी. आमचं प्रेमही श्रीकृष्णासारखं होतं आणि आम्ही आताही जे काही करतो ते श्रीकृष्णासारखं आणि श्रीकृष्णासाठीच करतो’.

सिद्धार्थ आणि प्रेमिला या दोघांचाही खूप छळ झाला होता. नियतीने आणि नातेवाईकांनी त्यांच्या अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या होत्या. त्या सगळ्या परीक्षांमध्ये सफल होता होता त्या दोघांनी प्रेमासाठी जे काही केलं ते अतुलनीय असंच होतं.

मी त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो. निघताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की, अजूनही किती सामाजिक प्रतिष्ठेच्या रेखा प्रेमाच्या आड येतील? त्यातून जे घडते, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तुमच्या अवतीभोवती असेच प्रेम करणारी अनेक जोडपी असतील. त्यांचे प्रेम अगदी राधा-मीरा श्रीकृष्णासारखं असेल. अशा जोडप्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आपण निश्चितपणे मदत करणार ना?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

मी नेहेमीच बायकोला खुश करण्याची संधी शोधत असतो. आणि मी तर म्हणीन कि सगळ्यांनीच अशा संधींच्या शोधात राहायला पाहिजे. बायको खुश असेल तर काय काय मज्जा येते – ये तो सभी जानते है. आज अनायसे अशी संधी चालत आली होती. सकाळी चहा घेतांना बायकोला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विचार केला, बायकोला घेऊन जरा बाहेर फिरून यावं. तेवढ्यात बायकोला मैत्रिणीचा फोन आला. बायकोनी मला खूण करून सांगितले – तुम्ही जाऊन या, मला वेळ लागेल. आज बऱ्याच गॅप नंतर सकाळी नेहेमीच्या रस्त्यानी फिरायला बाहेर पडलो होतो.

एकटाच असल्यामुळे इधर उधर बघत बघत फिरणे सुरु झाले. मनात सहज विचार आला – अरे, आज जागतिक महिला दिवस आहे, आणि आज नेहेमीच्या ठिकाणी मेघना आणि मनवा या मैत्रिणी भेटल्या तर काय मज्जा येईल, त्यांना शुभेच्छा देता येतील आणि त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघता येईल. फिरण्याच्या रस्त्यावर डावीकडे एक मारुती मंदिर आहे. तिथे नेहेमी मी थांबतो, नमस्कार करतो, आणि पुढे जातो. तिथे बाहेर एक फळा आहे, त्यावर मराठी / इंग्रजी / हिंदी मधे सुविचार लिहिलेले असतात. आजचा सुविचार होता – Strong will will always result in reality. माझी आताची इच्छा आहे मेघना आणि मनवा भेटाव्या. मी नमस्कार केला, will थोडी अजून strong केली आणि पुढे निघालो.

मृत्युंजय मंदिराच्या जवळच्या चहाच्या दुकानापर्यंत पोहोचलो आणि ओळखीचा म्हणजे मेघना आणि मनवा यांचा आवाज आला – काका, आहात कुठे ? कित्येक महिन्यात भेट नाही. आमचं काही चुकलं कां ? वगैरे, अशी प्रश्नांची सरबत्ती माझ्यावर सुरु झाली.

मी – सांगतो, सांगतो, असे म्हणेपर्यंत –

चहावाले दादा : काका, हमसे या हमारी चाय से कुछ नाराजी हो तो बतावो. आज शक्कर थोडी जाडा डालू क्या, या अद्रक जादा डालू.

मी : सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे, पण आधी माझं ऐका 

मी : आज एक खास दिवस आहे – जागतिक महिला दिवस. मेघना आणि मनवा तुम्हाला जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मैत्रिणींना पण शुभेच्छा द्या.

मेघना आणि मनवा : काका, धन्यवाद. आज पहिल्या शुभेच्छा तुमच्याकडूनच मिळाल्या, मजा आली.

चहावाल्या काकांना मी बाहेर बोलावलं. त्यांनी पण शुभेच्छा दिल्या.

आणि गम्मत म्हणजे आजूबाजूला उभे असणाऱ्या चहा पिणाऱ्या सगळ्यांनीच मेघना आणि मनवा यांना शुभेच्छा दिल्या.

मेघना आणि मनवा एकदम खुश झाल्या. त्यांनी सगळ्यांना थँक्स दिल्या.

तेवढ्यात आमच्या हातात गरमागरम चहाचे ग्लास आले.

चहावाले दादा : आजकी चाय मेरी तरफसे. बहोत दिनोके बाद आप तीनोको साथ देखकर मजा आ गया. आम्ही दादांना थँक्स दिले आणि चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरु झाल्या.

मनवा : काका, आजच्या दिवसामागची हिस्ट्री काय आहे, ते माहित आहे का ?

मी : नक्कीच. बाहेरची कामे करतांना पुरुष आणि स्त्रिया यांना समान हक्क मिळावेत म्हणून पूर्वी जगभर आंदोलने झाली / निदर्शने झाली आणि स्त्रियांना त्यात यश मिळाले. आणि हा आनंद साजरा करण्याकरता ८ मार्च १९१७ या दिवशी “जागतिक महिला दिन” चा जन्म झाला. जगातल्या बहुतेक सगळ्याच देशांमध्ये हा दिवस साजरा होतो. काही देशात या दिवशी सुटी पण असते.

मेघना : पूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे स्त्रियांचा खरंच खूप फायदा झाला आहे. आता बहुतेक देशात स्त्रियांना समान हक्क मिळाले आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आज कार्यरत आहेत. काही ठिकाणी त्या उच्च पदांवर काम करत आहेत आणि काही ठिकाणी तर त्या सर्वोच्य पदांवर पण कार्यरत आहेत.

मनवा : मैदानी खेळांमध्ये पण स्त्रिया पुढे आहेत. राजकारणात पण पुढे आहेत. या क्षेत्रात तर पंतप्रधान / राष्ट्रपती या पदांपर्यंत पण आपल्या आणि जगभरातल्या महिला पोहोचल्या आहेत. ही नक्कीच सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटावा अशीच बाब आहे. आता तर मंगळावर उतरणारी पहिली व्यक्ती हा बहुमान स्त्रीला मिळणार आहे, असे सांगतात.

मेघना : कला क्षेत्रामधे, जसे चित्रकला, गाणी, नृत्य, साहित्य, सिनेमा वगैरे मधे पण स्त्रिया आघाडीवर आहेत.

मी : खरंच अभिमान वाटावा असंच आहे. पण सिनेमा / टीव्ही या क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्याकरता त्यांनी निवडलेली अंगप्रदर्शनाची वाट मात्र मनाला खटकते. पैशांकरता आणि / किंवा ग्लॅमर करता अगदी खालच्या थरापर्यंत अंगप्रदर्शन पोहोचले आहे. सिनेमा आणि टीव्ही वरचे ग्लॅमर बघून घराघरातल्या स्त्रिया याचे अनुकरण करत आहेत आणि अगदी लहान लहान मुलींना या ग्लॅमर मध्ये ओढत आहेत. आता लहान मुलींना बाहेर पडतांना फॅशनेबल तोकडे कपडेच पाहिजे असतात. आया लिपस्टिक, आयब्रो, आयलायनर, परफ्युम असे सगळे त्यांना लावून त्यांचे कौतुक करत असतात, थोड्या थोड्या वेळानी या सगळ्यांवर पुन्हा पुन्हा हात फिरवत असतात, आणि त्यांचे निरनिराळ्या अँगल मधून सारखे फोटो काढत असतात. यामुळे कळत नकळत लहान वयातच मुलींमध्ये मॉडर्न फॅशन चे विषारी बीज पेरल्या जात आहे. परदेशी संस्कृतीचे असे अनुकरण आपल्या संस्कृतीला कुठपर्यंत घेऊन जाईल, हे काळचं ठरवेल.

मनवा : तुमचे म्हणणे एकदम मान्य. पैशापुढे माणूस बुद्धी गहाण ठेवतो, हे जागतिक सत्य आहे, पण ग्लॅमर पुढे स्त्रिया पण बुद्धी गहाण ठेवतात हे न रुचणारे सत्य आहे. स्त्रिया या बाबतीत बदलतील अशी शेजारीच असलेल्या देवळा मधल्या देवतेला आपण प्रार्थना करूया..

मी : नक्कीच 

मेघना : जागतिक महिला दिन सुरु करण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो आता पूर्ण होऊनही बरीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे सध्यातरी या दिवसाचं महत्व फक्त शुभेच्छांची देवाणघेवाण करणे इतपतच राहिलं आहे, आणि जागतिक दिवस आहे, या नावाखाली, काही सत्कार समारंभ, कुठे रॅली, असे ओघानी येतेच.

मी : बाहेरच्या जगामधे समान हक्क मिळालेल्या स्त्रियांना आपल्या घरांमध्ये पण समान हक्क आहेत कां ?

मनवा : सगळ्या स्त्रियांनी जर मनापासून याचं उत्तर दिलं, तर ‘नाही’ असेच त्यांचं उत्तर येईल. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांना नुसत्या “हॅपी महिला दिन ” अशा शुभेच्छा देऊन त्या घरामधे आनंदित होतील का ? स्त्रीशिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्री ला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्या करता काय वेगळं करतो ? बहुतेकांकडून उत्तर येईल – काहीच वेगळं करत नाही.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सापाचा दंश – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सापाचा दंश – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(यावेळी एका सुटकेसमध्ये वरखाली भेटजींचे सदरे, पंचे ठेवून मध्ये शेठजींचे पार्सल होते. शेठजीनी भटजीना दहा हजार दिले. नेहेमीप्रमाणे भिवा स्टॅन्डवर त्याना गाडीत बसवून गेला. ) – इथून पुढे 

यावेळी गाडीत गर्दी नव्हती. गाडी सुटल्यावर बाकी प्रवासी डुलक्या घेऊ लागले, तसे भटजीनी सोबतच्या किल्लीने बॅग उघडली… आपले कपडे बाहेर घेतल्यावर त्याना भले मोठे पुडके दिसलें.. त्यानी ते हळूहळू उघडले तर आत नोटांची बंडले होती. भटजीचे हात थरथरू लागले… त्यानी परत ते पुडके बांधले.. एव्हडीमोठी रक्कम आपल्या ताब्यात.. आणि काय झाले तर? कोणी चोरले तर? कुणी इनकमटॅक्सवाल्याला तक्रार दिली तर?

रात्रभर भटजी झोपले नाहीत.. टक्क जागे होते..

सकाळी उतरताच ते बहिणीकडे गेले आणि अर्ध्यातासात भुलेश्वरला पोचले आणि त्यानी ती रक्कम शेटजीच्या साडूकडे दिली… साडू खूष झाले, त्यानी पाच हजार भटजींच्या खिशात ठेवले.

परत येताना साडूनी दिलेले पार्सल त्यानी ब्यागेत ठेवले आणि ते एसटीत बसले… त्याना कुतूहल होत, साडू काय पाठवतात शेठजीना… त्यानी गाडी सुरु असताना हळूच उघडले, आत कसलीतरी पावडर होती. कसली पावडर असावी ही.. त्यानी हुंगून पाहिली.. त्यानी कुठेतरी वाचले होते, ते आठवले.. ही नशा देणाऱी पावडर असावी. त्यान्च्या लक्षात येईना.. शेठजीची आहे सोन्याची पेढी, त्यान्च्या साडूची पण.. मग ही नशापावडर? म्हणजे शेठजी आणि साडू, सोन्याच्या आडून हा गुपचूप धंदा करत असणार… आपल्याला हे समजले हे कुणाला कळवायचे नाही.

भटजी परत नेहेमीप्रमाणे पूजा करू लागले परंतु त्याना स्वास्थ मिळेना. एकतर त्यान्च्या कन्येचे तिच्या आतेशी जमेना. दुसरे त्यान्च्या कन्येचे गुरु बनारसला गेले त्यामुळे तिचे शिक्षण अर्धवट राहिले, त्यामुळे ती गावी आली. आपल्या कन्येचे संगीतशिक्षण हे अंतूभटजीचे आशा स्थान होते, पण त्यालाच हादरा बसला होता.

अंतूभटजीना अलीकडे वाटू लागले होते, आपले या गावात तरी काय आहे? ना जमीन ना नातेवाईक ना सगेसोयरे.. या पेक्षा सरळ बनारसला जावे… गंगाकिनारी रहावे.. काशीविश्वेश्वराची पूजा करावी, पण कसे?

बनारसला त्यान्च्या कन्येचे गुरु पण रहात होते, त्यान्च्या आश्रमात निवासी पद्धतीने संगीताचे शिक्षण दिले जायचे. तिची पण इच्छा होती, बनारसला जाऊन गुरूंच्या आश्रमात राहून संगीत विद्या शिकायची.

शेटजीच्या पार्सलात काय असते हे कळल्यापासून भटजी मुंबईत जायचे नाव काढत होते, तशात एका सिनेमानटाच्या मुलाच्या खिशात गांजा सापडला, त्याला पोलिसांनी अटक करून तुरुंगात घातल्याची बातमी त्यानी ऐकली होती. परदेशातून आलेली चरस NCB (नार्कोतिक सेंट्रल ब्युरो)च्या अधिकाऱ्यांनी पकडली आणि एका उद्योगपतीला दहा वर्षे खडी फोडायला पाठविले, हे त्यानी वाचले होते. त्यामुळे अशी पावडर आपल्यकडे सापडली तर शेठजी लांब रहातील पण आपण तुरुंगात सडून मरू आणि आपली मुलगी उघड्यावर येईल, हे त्याना माहित होते.

पण एकदिवस शेठजीचे बोलावणे आलेच..

“गुरुजी, एक काम होत तुमच्याकडे.

आमच्या साडूंना बॅग पोचवायची होती.

“नको सावकार, मला नाही जमणार.. दुसऱ्या कुणाला तरी सांगा..

“का? इतक्या वेळा गेला की घेऊन.. आणि आता काय? वीस हजार देतो की..

“नाही जमायचे, तुम्ही पैशाची बंडले देता बहुतेक माझ्याबरोबर.. मला माझ्या जीवाची भीती वाटते… मला कुणी हटकले तर.. चोरले तर पैसे? 

“कुणी चोरत नाही तुमची पिशवी.. आम्हाला तुमची खात्री आहे.. तुम्ही सोमवारी निघा..

“नाही जमायचे शेठजी..

शेठजीचा संताप अनावर झाला, त्याना कुणी नकार दिलेला चालत नसे. त्यानी “भिवा ‘म्हणून हाक मारली, तसा भिवा त्याचेंसमोर हजर झाला.

“भिवा, हे गुरुजी मुंबईतला जायचे नाही म्हणत्यात..

भिवाने डोळे लाल केले.

“भटा, शेटजीस्नी न्हाई म्हणत्यास, तुजी पोरगी हाय न्हवं.. कधी तिला उचलीन कळायचं बी नाय.. गुमान पिशवी घेऊन जायचं..

आपल्या मुलीचा विषय निघाल्याने भटजी गप्प झाले, घाबरले.. आपले काही झाले तरी चालेल, आपल्या मुलीला काही होता कामा नये..

आणि हा तर भिवा भिल्ल.. काय करील कोण जाणे?

अंतूभटजीनी मान खाली घातली आणि “बर शेटजी, सोमवारी जातो मी.. बॅग तयार ठेवा ‘असं म्हणून घरी गेले.

अंतूभटजी मनातून अस्वस्थ झाले.. या शेटजीना आयतें आपण सापडलो.. सुरवातीला वाटले नुसते खाऊ असेल म्हणूंन.. पण यांचे काळे धंदे… ही माणसाला नासवणारी आणि बरबाद करणारी पावडर.. त्यात अमाप पैसा.. सोन्याच्या वीसपट.. पैशासाठी हे असले चोरटे धंदे.. त्यात त्यांचा साडू मोठा भिडू असणार. दोघेही चोर. काय करावे? याच्यातून मान कशी सोडवावी.

शनिवारी अंतूभटजीची मुलगी मुंबईला गेली. सोमवारी सायंकाळी भटजी शेटजीकडे गेले. शेटजीनी भली मोठी बॅग तयार ठेवली होती, त्यात भटजीचे कपडे वरखाली घातले, बॅगेला कुलूप लावले आणि किल्ली भटजीकडे दिली.

नेहेमी जायचे त्या बसमध्ये भटजी बसले. भिवा गाडी सुटल्यावर लांब झाला. प्रवासात भटजी टक्क जागे होते.

दुसऱ्या दिवशी भटजी बॅग घेऊन उतरले. बहिणीकडे बॅग ठेवली आणि फोर्ट मधील NCB कार्यालयात शेटजीचे साडू आणि शेटजी, हे चरस, गांजा स्टॉक करतात, असा रिपोर्ट दिला.

एका तासात भुलेश्वरला आणि शेटजीच्या घरी, गोडाऊन मध्ये NCB चे अधिकारी पोलीसफाटा घेऊन पोचले. चरसचा स्टॉक पकडला आणि शेटजी, त्त्यांचा मुलगा, भुलेश्वरचे साडू, त्त्यांचा मुलगा यांना पोलिसांनी अटक केली..

सगळीकडे खळबल माजली.. सोन्याचा मोठा धंदा करणारे व्यापारी ड्रुग्सच्या धंद्यात..

टीव्हीवर मोठंमोठ्याने बातम्या दिल्या जात होत्या.. सायंकाळ पेपरनी पहिल्यापानावर बातमी छापली होती, त्याचवेळी.. त्याचवेळी 

 अंतूभटजी आपल्या कन्येसह बनारसच्या रेल्वेत बसले होते… काल शेठजीनी दिलेली पन्नास लाखाची बॅग सांभाळत.

 आता या पैशानी त्याना भविष्याची काळजी नव्हती.. शेपटीवर पाय पडल्याबरोबर नागाने दंश केला होता.

— समाप्त 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सापाचा दंश – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सापाचा दंश – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

अंतूभटजी शेठजीच्या बंगल्याच्या पायऱ्या चढून हॉलसमोरील देवखोलीकडे गेले. देवचंदशेठजी तिथेच खुर्चीवर बसुन त्त्यांची वाट पहात होते. त्यानी भटजीकडे पाहून स्मित केले. अंतूभटजी देवघरात गेले आणि नेहेमीप्रमाणे देवांना स्नान घालून, फुले अत्तर चढवून स्तोत्रे म्हणू लागले. रामरक्षा, श्रीसूक्त, अथर्वशिष्य वगैरे. शेटजी रोजच त्त्यांची पूजा मनापासून डोळे बंद करून ऐकत मग मान हलवत. पूजा संपली की भटजीना मसालादूध आणि फळे दिली जात. मग शेटजी न्याहारी करत आणि आपल्या पेढीवर जात.

देवचन्दशेठजीची त्या परिसरातील सर्वात मोठी सोन्याची पेढी होती, त्यान्च्याकडून त्या जिल्ह्यातील सोनार सोने खरेदी करत शिवाय शेठजीची तयार दागिने विकण्याचा शोरूम पण होता, त्या ठिकाणी त्त्यांचा मुलगा बसे. दिवसभर त्या शोरूममध्ये गिर्हाईकांची गर्दी असे.

अंतूभटजी घरातून बाहेर पडतापडता शेठजीना म्हणाले 

“शेठजी, चार दिवसाची रजा हवी होती..

“कुठे जाताय?

“मुलगी असते मुंबईला.. गाणे शिकते, माझ्या बहिणीकडे रहाते.. तिला पाहून यावं म्हणतो..

“बर, घरी कोण असत तुमच्या?

“मी एकटाच, मंडळी गेली दहावर्षांपूर्वी.. ही एक मुलगी पाठी ठेऊन.

शेटजीना काहीतरी आठवले.. त्यानी विचारले 

“बहीण कोठे रहाते तुमची मुंबईत?

“गिरगांवात, काळाराम मंदिराच्या बाजूला.. चाळीत.

“बरे, माझे एक काम करा.. जाताना एक पिशवी देतो ती आमचे साडू आहेत भुलेश्वरला… त्त्यांची मोठी पेढी आहे. त्याना द्या आणि तुम्ही येताना परत त्याचेकडे जा आणि ते एक पिशवी देतील, ती घेऊन या..

“बरे, परवा जाईन म्हणतो.. पिशवी तयार ठेवा.

“हो, एसटीने जाणारं ना? आमचा भिवा घेऊन येईल स्टॅन्डपर्यंत..

“बरे.. येतो..

अंतूभटजी अजून काही पूजा होत्या, त्या घरी गेले.

जायच्या दिवशी भटजीनी आपण आज मुंबईला निघणार असे शेटजीना सांगितले.. शेटजीनी त्याना पेढीकडे यायला सांगितले.

सायंकाळी भटजी शेठजीच्या पेढीकडे गेले. शेठजी त्त्यांची वाटच पहात होते. एक पुडक त्यान्च्या पिशवीत भिवाने ठेवले. अंतूभटजी बाहेर पडले तसे भिवा पण त्याचेंसमवेत चालू लागला, त्याला सोबत पाहून भटजी म्हणाले 

“अरे तू का सोबत? मला काय स्टॅन्ड माहित नाही?

“तुमास्नी सार मायती हाय, पर शेठजी बोल्ले, त्यसानी गाडीत बशीव आणि मग परत फिर..

भटजी काही बोलले नाहीत पण भिवा हा शेठजीनी पोसलेला गुंड त्याना आवडत नसे. काही न करता तो पेढीवर बसलेला असे कदाचित कुणाची हाडे मऊ करायची असतील, तर ते काम ते करत असावा.

अंतूभटजी गाडीत बसले.. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचले.

गिरगांवात बहिणीकडे जाऊन त्यानी मुलीला पाहिले आणि दुपारी भुलेश्वरला शेठजीच्या साडूकडे गेले आणि शेठजीची पिशवी त्यानी त्यान्च्या हातात दिली. साडू खूष झाले.. त्यानी थंडगार पियुष भटजीसाठी मागवलं. मग मोडक्या तोडक्या मराठीत बोलू लागले..

“तुमच्या देवचंदशेठजीनचा फोन अल्ला व्हता.. बर हाय.. परत कवा जनार गावला?

“सोमवारी.

“बर हाय.. शेटजीसाठी एक थैल्ली देतो, ती घेऊन जयचं.. तयार ठेवतो.

“बर.. म्हणत अंतूभटजी उठले आणि बहिणीच्या घरी गेले.

यावेळी भटजी आपल्या मुलीला गावी नेणार होते, त्यामुळे सोमवारी ते मुलीसह पेढीवर गेले आणि शेटजीच्या साडूनी दिलेली पिशवी घेउंन एसटीत बसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी भटजी एसटीतुन उतरले आणि सरळ शेटजीच्या बंगल्यावर गेले आणि त्यानी साडूनी दिलेली पिशवी त्यान्च्या हातात दिली.. पिशवी पाहून शेठजी खूष झाले.. त्यानी त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलींसाठी मसाला दूध मागविले आणि खिशातून पाचशेच्या दोन नोटा भटजीच्या हातात कोंबल्या.

“अरे काय हे, कशाला.. कशाला हे पैसे?

“अरे असू दे ना.. आणि ही कोण तुमची छोकरी काय?”

“होय.. गाणे शिकते मुंबईत.. उत्तरेकडील बनारसचे गुरु आहेत तिचे.. “

“अरे व्वा.. छान छान..

“काही लागलं तर सांगा आणि उद्यापासून पूजा सुरु करा..

“हो हो.. म्हणत भटजी बाहेर पडले.. एवढ्याश्या कामासाठी एक हजार मिळाल्याने ते खूष झाले.

आठ दिवसांनी भटजीना कन्येला मुंबईला पोहोचवायचं होत, यावेळी पुन्हा शेठजीनी मागीलवेळेपेक्षा मोठे पार्सल दिले आणि पिशवीत ते पार्सल खाली आणि त्यावर भटजींचे पंचे, बंडी वगैरे स्वतः शेठजीनी ठेवले. मागील वेळा सारखा भिवा स्टॅन्डपर्यत पोचवायला आला आणि गाडी सुटल्यावरच मागे फिरला. मुंबईला पोचल्यानंतर भटजी भुलेश्वरला गेले.. ते पार्सल त्यानी शेठजीच्या साडूकडे दिले.. साडूनी त्यान्च्यासाठी पियुष मागवून दिले आणि दोन हजार खिशात ठेवले. परत येताना शेटजीसाठी पार्सल दिले, ते त्यानी शेठजीना दिले.. शेठजी खूष झाले.. त्यानी पाचशेच्या दोन नोटा भटजीच्या खिशात कोंबल्या.

अंतूभटजी विचार करू लागले.. मुंबईत दोन हजार मिळाले आणि इथे एक हजार.. एवढे पैसे का देतात आपल्याला? काय असावे त्या पुडक्यात? नुसते खाऊ असल्यास, एवढे पैसे?काही तरी गडबड आहे निश्चित.

भटजींच्या मुलीचे कार्ड आले -क्लासची पंधराहजार फी भरायची आहे चार दिवसात.. अंतूभटजी घाबरले.. एवढे पैसे उभे करायचे, ते पण चार दिवसात.. त्याचेकडे शेठजीनी दिलेले पाच हजार होते, मग अजून दहा हजार..

भटजीनी धीर करून शेठजीकडे दहाहजरांची मागणी केली.

“देऊ.. दहा हजार कर्ज नव्हे, तुम्हाला देऊ.. फक्त आमचे एक पार्सल भुलेश्वरला पोहोचवा..

भटजी घाबरले.. पण पैसे तर हवे होते, धीर करून म्हणाले 

“काय असत त्या पार्सलात..

“त्याची चिंता तुम्हाला नको… तुम्ही फक्त तुमच्यासोबत न्यायचे.

“पण काही अघटित..

“काही होत नाही.. तुमच्या कपड्याकडे पाहून कोणी तपासत नाही.. काळजी करू नये..

शेवटी भटजी तयार झाले.. यावेळी एका सुटकेंसमध्ये वरखाली भटजींचे सदरे, पंचे ठेवून मध्ये शेठजींचे पार्सल होते. शेठजीनी भटजीना दहा हजार दिले. नेहेमीप्रमाणे भिवा स्टॅन्डवर त्याना गाडीत बसवून गेला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सायकल… ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

 

? जीवनरंग ?

☆ सायकल… ☆ श्री दीपक तांबोळी

नवीकोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दुर खेळत असलेली सायली धावतच तिच्या जवळ आली. “माझी नवी सायकल, माझी नवी सायकल” सायकलवरुन हात फिरवता फिरवता सायली उद्गारली.

नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदम फुलून आला होता. समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली. पार्वती आपल्या लेकीकडे कौतुकाने पहात होती. लोकांची धुणीभांडी करुन साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता. दोन वर्षांपूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा अपघातात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं. सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता.

दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असतांना सायली सायकल घेऊन शाळेत गेली. अर्थात सायकल घरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता. सात दिवस सगळं व्यवस्थित सुरु होतं. आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली. पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं सागितलं. पार्वतीच्या काळजात धस्स झालं. पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेने तिला रडू कोसळलं. शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरत्रही तिचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही.

कुणीतरी तिला सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईला सोबत घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेली. “साहेब सायकल चोरीला गेली त्याची कंम्प्लेंट द्यायची होती” ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून भितभितच ती बोलली. त्याने एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहीलं आणि जोरात खेकसून तो म्हणाला “कशाची चोरी झालीये?”

त्याच्या खेकसण्याने सोबत असलेली सायली आईला बिलगली आणि मुळूमुळू रडू लागली.

“सायकल साहेब. सायकलची चोरी झाली”

“खरेदीची पावती आहे का?”

तिनं पावती दिली. त्याने एक रजिस्टर काढलं. “व्यवस्थित शोधली का सगळीकडे? खोटी कंप्लेंट चालणार नाही” त्याने दरडावून विचारलं.

“हो साहेब. सगळीकडे शोधली. पण नाही सापडली”

“ठिक आहे. सांगा आता. “

पार्वतीनं सायकलीचं आणि कधी, कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सागितलं. त्यानं लिहून घेतलं. तिचा पत्ता, मोबाईल नंबर घेतला. सही घेतली.

“जा आता घरी. सायकल मिळाली की कळवू तुम्हाला” तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोळू लागला.

त्याचा रुक्षपणा पाहून पार्वती स्तब्ध झाली. तीच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात कुजबुजली. “ताई आपण साहेबांना भेटू. हा मेला काहीच करणार नाही. ” 

पार्वतीलाही ते पटलं. धीर धरुन ती त्या पोलिसाला म्हणाली, “साहेब आम्हांला मोठ्या साहेबाला भेटायचंय. “

त्यानं एकदम डोळे मोठे केले. जोराने ओरडून तो म्हणाला, “ए चल. निघ इथून. साहेबाला भेटायचं म्हणे. साहेब भेटणार नाही. साहेब बिझी आहेत. लिहीली ना कंप्लेंट? जा आता घरी. ” 

तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलिस बाहेर आला. बहूतेक तोच साहेब असावा. “काय आरडाओरड चालवलीय पाटील. काय झालं?” 

“साहेब ते…. ” पाटील तंबाखू लपवू लागला. तेवढ्यात साहेबाची नजर पार्वती आणि सायलीवर पडली. तो काय समजायचं ते समजला असावा. “या बाई तुम्ही आतमध्ये. ” तिघीही भितभित चेंबरमध्ये शिरल्या.

“हं, सांगा आता काय झालं ते!”

पार्वती परत एकदा सांगू लागली. तेवढ्यात साहेबाचा फोन वाजला. फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता. सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते. फोनवर बोलणं झाल्यावर त्यानं पार्वतीकडे पाहून विचारलं. “तुम्ही काय करता?”

“साहेब मी लोकांची धुणीभांडी करते. त्यातुन मिळालेल्या पैशातूनच ती सायकल घेतली होती.. “

“आणि तू गं मुली? तू शाळेत जातेस का?” पार्वतीचं बोलणं पुर्ण होऊ न देताच साहेबाने सायलीला विचारलं.

सायलीने मान हलवली.

“कितवीत आहेस?”

“पाचवीत “हलक्या आवाजात तिनं सांगितलं. तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात गढून गेला. पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं. बराच वेळाने साहेबाचं बोलणं संपलं. त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला. “ठिक आहे. या तुम्ही. मी बघतो काय करायचं ते. “

“पण साहेब…. ” ती काही बोलण्याच्या आतच दोन तीन माणसं चेंबरमध्ये घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावं लागलं. इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षात आलं आणि दुःखाने तिचं मन भरुन आलं.

घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खुप रडली. एकुलती एक पोर. खुप समजदार होती. आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडिल नाहीत याची तिला पक्की जाण होती. तिनं कधी हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती. पार्वतीचं ती सर्वस्व होती त्यामुळे परिस्थिती नसतांनाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती.

दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जातांना बघून पार्वती च्या काळजाला असंख्य भोकं पडली. चार हजाराची सायकल तर गेलीच होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनोमन वाईट वाटत होतं. पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायला वर्ष दोन वर्ष सहज लागणार होती. आणि त्याच विचारांनी पार्वतीचे डोळे वारंवार भरुन येत होते.

पोलिस कंप्लेंट करुन एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही. पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही सोयरसुतक नव्हतं. ती दोनतीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्तरांनाही भेटून आली. शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसतेय का याचाही तिने शोध घेतला. पण सायकल कुठेच सापडत नव्हती.

पोलिस तक्रार करुन पंधरा दिवसही उलटूनही जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा पार्वती समजून चुकली की आता सायकल मिळणं शक्य नाही. आजुबाजुचे शेजारीही तिला तेच समजावत होते. पण मन मोठं वेडं असतं. कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल, “ताई तुमची सायकल सापडली” असं तिला वाटत रहायचं.

विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं. तिनं उघडलं. बाहेर एक पोलिस उभा होता. “पार्वताबाई तुम्हीच का?”

“हो. “

“या बाहेर. ” 

तिचं ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं. बाहेर पोलिसांची व्हँन उभी होती. व्हँन पाहून शेजारपाजारचे जमा झाले. पोलिस व्हॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोरी सायकल घेऊन बाहेर आला.

“ही घ्या तुमची सायकल. “

“साहेब पण ही आमची सायकल नाही. “

“ते मला माहीत नाही. साहेबांनी पाठवलीये. तुम्ही साहेबांना भेटा. त्यांनी बोलावलंय तुम्हाला. “

व्हॅन निघून गेली. पार्वतीभोवती गर्दी जमा झाली. ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलीपेक्षा सुंदर आणि आधुनिक दिसत होती. सात-आठ हजाराची असावी. बरेच जण तिच्याकडे असूयेने बघत होते. सायलीची तर नजर हटत नव्हती. ती सारखी सायकलवरुन हात फिरवत होती. “आई, ही सायकल आपल्याला दिली?”

“बेटा आपली सायकल नाहीये ती. उद्या जाऊन साहेबाला विचारु आपण. “

जमलेल्या बायका वेगवेगळे तर्क लढवत होत्या. एका बाईने तर हद्द केली. पार्वतीवर साहेबाची वाईट नजर असेल म्हणून तर त्याने एवढी महागडी सायकल पाठवली असेल म्हणे. ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणींचं म्हणणं पडलं. ते ऐकून पार्वती अस्वस्थ झाली. सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरली. रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय अशी स्वप्नं पडत होती.

दुसऱ्या दिवशी ती कामं आटोपून सायलीला घेऊन पोलिस स्टेशनला गेली. नशिबाने साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता. “या ताई, बसा” मनमोकळेपणाने हसत त्याने पार्वतीचं स्वागत केलं. त्याच्या ताई म्हणण्याने तिच्या मनातलं किल्मिश बरंच कमी झालं.

“साहेब तुम्ही जी सायकल पाठवलीत ती आमची नाहीये. ” तिनं विषयाला हात घातला.

“हो. बरोबर. मला कल्पना आहे. तुमच्या सायकलचा आम्ही बराच शोध घेतला, पण ती मिळाली नाही. आणि ती मिळणारही नव्हती. चोरणाऱ्याने तिचे पार्ट्स वेगवेगळे करुन एका तासात विकूनही टाकले असतील. “

“पण मग साहेब, ही नवी सायकल….. “

“कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते! पोलिसांना काय गरज पडलीये चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची? असंच ना? ही सायकल मी माझ्यातर्फे दिलीय. आणि ती का दिली आहे ते पण सांगतो. ” 

टेबलावरची बेल वाजवून त्याने शिपायाला बोलावलं, “या ताईंकरीता एक चहा आणि या मुलीकरता एक कॅडबरी घेऊन ये. तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात. तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाचीची आठवण आली. ती माझ्यामागे सायकल घेऊन देण्याकरीता हट्ट करायची, पण तिचं घर हायवे जवळ असल्याने रिस्क नको म्हणून मी तिला टाळत होतो. दुर्दैव बघा, ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्या रिक्षालाच अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यु झाला. सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचली असती, कदाचित नाही. पण तिच्या मृत्युनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो.

तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली. तुम्हांला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं. भाचीची इच्छा पुर्ण करु नाही शकलो. कमीतकमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूने मी हे सगळं केलं. खुप मोकळं वाटतंय आता. ” 

एक श्वास सोडून त्याने सायलीला जवळ बोलावलं. तिला जवळ घेऊन म्हणाला, “बेटा, ती सायकल माझ्याकडून तुला गिफ्ट. आणि हो, कधी काही अडचण आली तर या मामाला सांगायचं बरं का!”

“साहेब तुमचे आभार…. “

“नाही ताई, आभार नका मानू. मीही गरीबीतूनच वर आलोय. गरीबाचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो. माझ्या आईनं मोलमजूरी करुनच मला मोठं केलंय. तुम्हीही तुमच्या मुलीला खुप शिकवा. मोठं करा. “

पार्वतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(“निरु, माझं ऐक. आता तू खरोखर छान दिसते आहेस. आजपासून रात्री थोडं जेवायला सुरवात कर बाळा. अगदी चार घास तुला आवडेल ते खायला लाग. मी तुला मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या देते त्या घ्यायला लाग. म्हणजे तू हेल्दीही रहाशील. एक महिन्याने हिला घेऊन या केतन.”) – इथून पुढे.

अनुराधा तिची आतुरतेने वाट बघू लागल्या. , न राहवून त्यांनी मधेच केतनला फोन केला.

केतन म्हणाला, “ डॉक्टर, तिने तुमचं काहीही ऐकलं नाहीये. बळजबरी केली तर ती अन्न ओकून टाकते. तिला घेऊन मी आजच येतो तुमच्याकडे. ”

केतन निरुपमाला घेऊन आला. वजनाच्या काट्यावर तिला उभं केलं. काटा तिचं वजन 42 किलो दाखवत होता. ही बाब फार गंभीर होती. ताबडतोब अनुराधाने निरुपमाला चांगल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. तिला सलाईन लावलं. त्यात सर्व शक्तिवर्धक औषधे घातली. तिला सकाळी ब्रेडची स्लाईस आणि दूध दिलं. तिने ते खाल्लं आणि लगेच उलटी करून ते काढून टाकलं.

अनुराधा म्हणाल्या, “ याला ब्युलिमिया म्हणतात. आपलं वजन वाढू नये म्हणून असले अघोरी उपाय करणारे लोक अमेरिकेत मी बघितले आहेत. केतन, निरु नीट ऐका. मी एका हॉस्पिटलला भेट दिली. तिथे असल्या मुली होत्या. भडक मेकप केलेला, पार खंगलेल्या, हाता पायाच्या अक्षरश:काड्या झालेल्या. आई त्या मुलीला व्हीलचेअरवर बसवून ढकलतेय. मुलीचं वजन झालं होतं पंचवीस किलो. सगळ्या व्हायटल सिस्टिम्स निकामी झालेल्या. ओव्हरी गर्भाशय पूर्ण आक्रसलेले. ही मुलगी आता कशी नॉर्मल होणार? अजूनही तिचं शरीर अन्न नाकारतच आहे. असे मुलगे मुली मी बघितले आणि त्यांचे हताश आईवडील. निरुपमा, तुला असं जगायचं आहे का? नाही ना, मग मरायचं आहे का? असं होत राहिलं तर तू त्याच दिशेने जाताना मला स्पष्ट दिसते आहेस. अजून वेळ गेलेली नाहीये. या उपर तू आणि तुझं नशीब. ”

डॉ. तिथून निघून गेल्या. त्या पंधरा दिवसात निरुपमाचं वजन दोन किलो वाढलं. तिला मऊ भात खीर पचायला लागलं. हॉस्पिटल मधून जयाताईंनी निरुला त्यांच्या घरी नेलं.

निरुपमा आता थोडं थोडं खायला लागली. तिच्या अंगावर जरा तुकतुकी आली. आई तिला अगदी थोडं थोडं नवनवीन करून खायला घालायला लागली. निरु आता केतनच्या घरी गेली.

आता निरुपमाचं वजन नीट वाढायला लागलं. तिला अन्न पचायला लागलं. तिचं 42 किलो वजन हळूहळू करत 60 किलो पर्यंत आलं. निरुपमा पूर्वीसारखीच हसती खेळती आणि तेजस्वी दिसायला लागली.

या गोष्टीलाही सहज चार वर्षे झाली. डॉ. अनुराधांनी दवाखान्याचा व्याप कमी करत आणला.

त्या आता बऱ्याच वेळा परदेशात आपल्या मुलाकडे असत.

त्यादिवशी त्या अमेरिकेहून परत आल्या आणि कारची वाट बघत बाहेर थांबल्या होत्या. त्यांचा ड्रायव्हर कार घेऊन आला आणि त्यांची कार फूड मॉल जवळ थांबली. अनुराधा फ्रेश होऊन आल्या आणि एका टेबल जवळ बसून कॉफी पीत होत्या. समोरूनच एक मध्यमवयीन मुलगा आणि त्याच्या बरोबर एक मध्यम वयाची मुलगी त्यांच्याच दिशेने येताना त्यांना दिसले.

“ हॅलो डॉ अनुराधा. मला ओळखलं का? “

डॉक्टर जरा विचारात पडल्या आणि मग म्हणाल्या, “तुम्ही केतन मराठे का? ” 

प्रश्नार्थक नजरेने त्यांनी केतनबरोबरच्या मुलीकडे बघितलं.

केतन म्हणाला, “ हो. मी केतनच. बाई, तुम्ही डिस्पेन्सरीत कधी येणार आहात? मला तुम्हाला भेटायचं आहे.

हे माझं कार्ड बाई. डिस्पेनसरीत आलात की नक्की नक्की फोन करा. खूप काही बोलायचं आहे मला तुमच्याशी. ” 

बाई पुण्याच्या दिशेने निघून गेल्या आणि केतन मुंबईच्या.

जरा प्रवासाचा थकवा कमी झाल्यावर अनुराधा दवाखान्यात आल्या.

दुसऱ्या दिवशी त्यांनी केतनला फोन केला.

“ बाई, मी भेटायला उद्या येऊ का? ” त्याने विचारलं.

“ या की. या उद्या संध्याकाळी. ”

दुसऱ्या दिवशी केतन त्यांना भेटायला आला.

“ बाई, तुमच्याशी खूप बोलायचं होतं. पण समजलं तुम्ही इथे नाही. परदेशात गेला आहात. पण परवा अचानक भेट झाली आपली. मी काही कामासाठी मुंबईला गेलो होतो म्हणून तर अचानकच आपली भेट झाली” केतन म्हणाला.

“ ते जाऊ दे. निरुपमा कशी आहे? ठीक आहे ना सगळं? ”

केतन गप्प झाला. ”तेच सांगायचं आहे डॉक्टर तुम्हाला. आपण सगळ्यांनी अथक प्रयत्न केले, तुम्ही तिला त्या एक प्रकारच्या मानसिक आजारातून बाहेर काढले. नंतरचे काही महिने खूप छान गेले आमचे. निरु पुन्हा चांगली झाली, छान रहायला लागली. पुन्हा तिचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला आणि वजन झालं 80 किलो. पुनः ती त्या वजन कमी करण्याच्या दुष्ट चक्रात सापडली. यावेळी तिने खाणेपिणे सोडले आणि ब्यूलीमियाने तिच्या मनाचा ताबा घेतला. मला तिची अवस्था बघवेना. तिला आम्ही अनेक वेळा ऍडमिट केले, पण तिची परिस्थिती गंभीरच होती. तिचं वजन तर आता 30 किलो झालं. उठता बसता येईना. हाता पायांच्या काड्या. सर्व रिपोर्ट्स अगदी वाईट होते हो तिचे. खूप प्रयत्न करूनही डॉक्टरांना तिला जगवता आलेच नाही. शेवटी म्हणायची, ‘ माझ्या हाताने मी माझा नाश करून घेतला. मला जगायचंय केतन. मला वाचवा. मला मरायचं नाहीये. ’ 

तीस हे कोणाचं मरायचं वय असू शकतं का हो डॉक्टर? बघवत नव्हती निरुपमा शेवटी. सगळे केस गळले, डोळे बाहेर वटारल्यासारखे दिसत. व्हील चेअर वर बसून असायची ती. खाणे तर जवळ येऊ सुद्धा द्यायची नाही. शेवटी मी तिला घरी आणलं. मग तर पाणीही पचेना तिला. हाल हाल होऊन मग गेली निरुपमा. आम्हा सगळ्याना अतिशय वाईट होते ते दिवस. तरणीताठी सून व्हील चेअरला खिळलेली. वाटेल ते बोलायची ती आम्हाला. ‘ मी इथे मरतेय आणि तुम्ही सगळे जेवा पोटभर. काहीही वाटत कसं नाही माझ्या समोर बसून हे खाताना? माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. ’ बरं ती समजावून सांगण्याच्या पलीकडे गेली होती आता. काय वाटेल ते बोलायची ती. माझ्या आईवडिलांना, तिच्या आईला. ती गेली तेव्हा वाटलं, ती आणि आम्हीही सुटलो यातून. डॉक्टर, मीही तरुण आहे. फार फार सोसलं मी आणि आमच्या कुटुंबाने सुद्धा. तिच्या मृत्यूनंतर सैरभैर झालो मी. पण मग मला ही निकिता भेटली. तिनं सावरलं मला.

फार चांगली आहे निकिता. मी लग्न केलं तिच्याशी. परवा बघितलीत तुम्ही तिला. दिसायला ती निरु इतकी सुंदर नाही पण मला आता नकोच हो ते सौंदर्य आणि ती फिगर. मी सुखात आहे अगदी. हे सगळं सांगून मला खूप बरं वाटलं डॉक्टर. तिच्या आजाराच्या तुम्ही साक्षीदार आहात. “

अनुराधाने केतनच्या पाठीवर थोपटले. “ केतन, उत्तम केलंत तुम्ही लग्न केलंत. निरुपमासाठी आपण शक्य होतं ते सर्व केलं. पण हे लोक त्यातून फार कमी वेळा बाहेर पडतात. त्याच त्याच चक्रात पुन्हा पुन्हा अडकतात. निरुपमाचं तसंच झालं. ठीक आहे. तिचं आयुष्य तेवढंच होतं म्हणू या. ” 

… केतन त्यांचा निरोप घेऊन गेला आणि डॉ अनुराधाला हकनाक आयुष्याला मुकलेल्या निरुपमाबद्दल अतिशय वाईट वाटलं.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ अन्न तारी.. अन् अन्न मारीही… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

कालच अगदी उत्साहाने जयाताई अनुराधाच्या दवाखान्यात शिरल्या. बरोबर त्यांची मुलगी निरुपमा होती.

“बाई हे घ्या पेढे. आमची निरु आता एमबीए झाली बरं. तिच्या इच्छेप्रमाणे केलं पूर्ण हो तिने एमबीए. आता मनासारखी नोकरी मिळाली की गंगेत घोडं न्हायलं एकदाचं. ” जयाताई हसून सांगत होत्या.

जयाताई अनुराधाच्या फार पूर्वी पासूनच्या पेशंट. त्या, त्यांच्या मुली, सगळं कुटुंब येत असे डॉ अनुराधाकडे. ती त्यांची फॅमिली डॉक्टरच होती.

“ वावा. निरुपमा, खूप खूप अभिनंदन हं. ” पेढा तोंडात टाकत अनुराधाने निरुपमाचं कौतुक केलं.

“ थँक्स ताई. मला बहुतेक मिळेल नोकरी. आलेत काही ठिकाणाहून इंटरव्ह्यू साठी कॉल. ”

…. निरुपमा जयाताईंची मोठी मुलगी. दिसायला छान, हुशार आणि अगदी साधी मुलगी.

सहाच महिन्यांनी जयाताई पुन्हा दवाखान्यात आल्या.

“ डॉक्टरीणबाई, आमच्या निरुचं भाग्यच उजळलं हो. अहो, तिच्या कंपनीतल्याच केतन मराठेला ही फार आवडली आणि मागणीच घातली बघा त्याने. नाव ठेवायला जागा नाही हो या स्थळात. बघा ना, देवाच्या मनात असलं की किती सरळ होतात ना गोष्टी. ”

जयाताई अगदी आनंदून गेल्या अनुराधालाही खूप आनंद झाला. निरुपमा होतीच गरीब स्वभावाची आणि समंजस शांत. कोणतीही तोशीस न पडता खरोखरच दारात जावई चालत आला आणि निरुपमाचं भाग्यच उजळलं. सोन्याच्या पावलांनी निरुपमाने केतनच्या घरात पाऊल ठेवलं.

मराठ्यांच्या घरी सगळे लोक अगदी सडसडीत. फिटनेस फ्रीक. अगदी निरुच्या सासूबाई सुद्धा रोज योगासनाच्या क्लासला जायच्या. सासरे टेनिस खेळायला जायचे. केतनही उत्तम टेनिसपटू होता. त्या मानाने निरुपमा चांगली भरलेली होती पण सुरेख होती तिची फिगर.

…. निरुपमा अगदी रुळून गेली सासरी. सासरी माहेरी लाड करून घेत आणि वर्षसण, दिवाळसण करत मस्त मजेत होती निरु केतनची जोडी. निरुपमाची नोकरीही चालू होती आणि सासरी नोकरचाकराना काही कमी नव्हतं.

मध्यंतरी डॉ अनुराधा त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला चार महिने गेल्या होत्या. लेकाकडे जाऊन, जमेल तेवढी अमेरिका बघून अनुराधा चार महिन्यांनी दवाखान्यात आल्या.

दवाखाना उघडा दिसताच त्यांचे नेहमीचे पेशंट्स आलेच भेटायला. अनुराधाने आठवणीने आणलेली तिकडची चॉकलेट्स येतील त्यांच्या हातावर ठेवली. तिचा नेहमीचा दवाखाना सुरू झाला. जवळजवळ सहा महिन्यांनी निरुपमा त्यांना भेटायला आली. तिला बघून आश्चर्यचकित झाल्या अनुराधा.

…. चवळीच्या शेंगेसारखी सडसडीत निरु केवढी जाड म्हणजे लठ्ठच झालेली दिसत होती. मान रुतली होती जणू खांद्यात.

निरुपमाने खुर्चीत बसकण मारली. , ” डॉक्टरबाई, हादरलात ना मला बघून? अहो गेल्या वर्षभरात माझं अतिशय वजन वाढलंय. काय करू काही समजत नाहीये. ब्लड रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आहेत. मी डाएट केलं, जिम लावला, टेकडी चढायला जाते. थोडं कमी होतं की पुन्हा आहे तिथेच येतो काटा. ” अगदी निराश होऊन निरुपमा सांगत होती. “ आता मात्र मला काळजीच वाटायला लागलीय माझी. या लठ्ठपणामुळे माझा पिरियड वेळेवर येत नाही. अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. काय करू मी? ” निरुपमाच्या डोळ्यात पाणी होतं.

अनुराधाने नीट चौकशी केली. निरुपमा आणि केतनची लाईफ स्टाईल याला कारणीभूत होती.

पण मुळात केतनची शरीर प्रवृत्ती लठ्ठ होण्याकडे नसल्याने त्याचे वजन काहीही खाल्ले तरी अजिबात वाढत नसे. समाजातले तीस टक्के लोक या सुदैवी गटात मोडतात. पण निरुपमाचं वजन मात्र झपाट्याने वाढलं ते वाढतच गेलं.

केतन तिला बजावू लागला. ” निरु, जरा मनावर घे आता डाएट करायचं. तुला बरोबर घेऊन जायची आता लाज वाटायला लागलीय मला. “

…. निरुपमाला हे ऐकून अतिशय राग यायचा आणि मग त्याचं भांडणात रूपांतर व्हायचं. असं झालं की निरुपमा डबे उघडून ते सगळं फ्रस्ट्रेशन खाण्यावर काढायची. परिणामी महिन्याला आणखी दोन किलो वजनाची भर.

…. एक दिवस तिची जिवलग मैत्रीण तारा तिच्या घरी भेटायला आली. तारा तिचं लग्न झाल्यावर अमेरिकेला कायमचीच गेली होती. ताराने निरुला बघितलं आणि म्हणाली, ” अग काय हे. दुप्पट वजन वाढलं आहे तुझं. किती अफाट लठ्ठ आणि बेढब झाली आहेस निरु. कुठे पूर्वीची सुंदरी निरु आणि आत्ताची वारेमाप अस्ताव्यस्त वाढलेली निरु. ”

निरुपमा रडायला लागली. “ तूच शिल्लक होतीस आता हे म्हणायची. काय करू मी? ”

तारा म्हणाली. “ मी करते तसं करशील का? महिन्यातले आठ दिवस फक्त वॉटर डाएट करायचं. नंतर सुद्धा फक्त एकदा दुपारी जेवायचं. रात्री एक फळ खायचं. बघ करून.”

निरुपमाला हे सोपे वाटले. तिने निश्चय केला. त्या पूर्ण आठ दिवसात ती फक्त गरम पाणी पीत राहिली.

वजनाचा काटा चक्क तीन किलोने खाली आलेला दिसला. निरुला आनंदाश्चर्याचा धक्काच बसला.

अरे. आठ दिवस आपण फक्त पाणी पिऊन राहू शकतो? म्हणजे निश्चय केला तर हे सहज शक्य आहे तर.

निरुपमाने आता मनावर कंट्रोल करायचं ठरवलं. त्या दिवसापासून ती फक्त गरम पाणी पिऊन रहायला लागली.

सगळे जेवायला बसले की निरुपमा म्हणायची ‘ मला आत्ता भूक नाहीये. मी नंतर जेवते. ’

निरुपमाने रात्रीही जेवण सोडलं. त्या महिन्यात तिचं एकंदर सात किलो वजन कमी झालं.

केतनने कौतुक केलं. “ निरु, छान दिसायला लागलीस ग. काय करतेस हल्ली? नीट जेवतेस ना? अति डाएट करू नकोस हं. वाईट परिणाम होतात त्याचे. ”

“ नाही रे. मी अगदी नीट जेवते. तू काळजी करू नकोस. ” निरुपमाने केतनला खोटं सांगितलं.

एकदा सासूबाई म्हणाल्या, ”आज तू आमच्या बरोबरच जेवायला बसायचं आहेस. ये. आम्ही तुझी जेवणाच्या टेबलवर वाट बघतोय. ”

निरुपमाचा नाईलाज झाला. ती त्यांच्याबरोबर जेवायला बसली खरी. पण गेले दोन महिने तिच्या पोटात फक्त पाण्याशिवाय काहीही नव्हते. ते अन्न बघून तिला मळमळू लागलं आणि न जेवता ती उठून बाथरूम मध्ये जाऊन भडभडून ओकली. सासूबाई हे बघून अत्यंत घाबरून गेल्या. त्यांनी हा प्रकार केतनच्या कानावर घातला. केतनने निरुपमाला बळजबरीने भात खायला लावला.

“ नको रे, माझं वजन पुन्हा वाढेल “.. असं म्हणत निरुपमा बेसिन वर गेली आणि तिने तो ओकून टाकला.

आठ महिने झाले आणि 75 किलो वजन असलेली निरुपमा 50 किलो वर आली. निरुपमाला आता अन्नच नकोसे झाले. तिचं शरीर अन्न नाकारुच लागलं. केतन निरुपमाला घेऊन डॉ अनुराधांच्या डिस्पेनसरीत आला.

डॉ अनुराधा निरुला बघून हादरल्याच. खोल गेलेले डोळे, भकास चेहरा, अंगात अजिबात ताकद नाही. लटपटत होती ती चालताना. अनुराधाने केतनला बाहेर थांबायला सांगितलं.

“ निरु, आता नीट आणि सगळं खरं खरं सांग. या आठ दहा महिन्यात आरशात बघितलं आहेस का कधी? काय दशा करून घेतली आहेस अग? असा करतात का कोणी वेट लॉस? मूर्ख मुलगी. सांग बघू तू काय खातेस सकाळपासून सगळं सांग. ”

निरुपमा हसायला लागली. “ डॉक्टर, मी फक्त गरम पाणी पिते. गेले आठ महिने हेच अन्न आहे माझं. बघा. कोण म्हणेल आता मला जाड? दिसतेय ना मी पूर्वीची चवळीची शेंग?”

… अनुराधाला इतका संताप आला की या मूर्ख मुलीच्या दोन थोबाडीत ठेवून द्याव्यात. त्यांनी मुश्किलीने आपल्या रागावर ताबा ठेवला.

“ निरु, माझं ऐक. आता तू खरोखर छान दिसते आहेस. आजपासून रात्री थोडं जेवायला सुरवात कर बाळा. अगदी चार घास तुला आवडेल ते खायला लाग. मी तुला मल्टीव्हिटॅमिन्सच्या गोळ्या देते त्या घ्यायला लाग. म्हणजे तू हेल्दीही रहाशील. एक महिन्याने हिला घेऊन या केतन.”

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares