मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नऊ दुर्गा म्हणजे… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ नऊ दुर्गा म्हणजे… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

नऊ दुर्गा म्हणजे नऊ प्रकारच्या आयुर्वेदिक दिव्यौषधी

देवींची नावे आणि औषधे याचे संदर्भासह स्पष्टीकरण.. (संदर्भः मार्तंड पुराण)

दुर्गा कवच

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीतिच।

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

हे दुर्गा कवच ब्रह्मदेवाने मार्कंडेय ऋषींना दिलेले होते. मार्कंडेय ॠषी वैद्यकीय उपचार पद्धतीत ज्या ९ औषधी वनस्पतींना उत्तम स्थान आहे त्या ९ वनस्पतींची नावे या दुर्गा कवचातून आपल्याला पहायला मिळतील ती अशी

प्रथम नवदुर्गा : शैलपुत्री म्हणजे हिरडा.

हिरडा/हरडा ही एक दिव्य औषधी वनस्पती आहे.

पर्यावरण जनजागरणाचा नक्षत्रवनाच्या दृष्टीने विचार केल्यास कुंभ राशीच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा पर्यायी वृक्ष हिरडा आहे.

नास्ति यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी ।।

असे हिरड्याचे महत्त्व आहे.

हे झाड ५० ते ७५ फुटांपर्यंत वाढते. समुद्रस पाटीपासून पंधराशे मीटर उंचीपर्यंत व दाट वनातील महाबळेश्वर, कोयना तसेच मध्य प्रदेशातील नदीचा किनारा अशा प्रकारच्या ठिकाणी चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीत, भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ४६ सेंटीग्रेड पर्यंतच्या तापमानाच्या प्रदेशात हा वृक्ष चांगला वाढतो. तसेच पाण्याचा ताण असेल तरी हा वृक्ष सहन करू शकतो.

या झाडाची जुनी पाने डिसेंबर ते मार्च काळात गळून पडतात व नवीन पालवी तांबूस रंगाची लव असलेली येते. पाने ७. ६ ते १७. ८ सेंटीमीटर लांबीची व ३. ८ ते ८. ९ सेंटीमीटर रुंदीची असतात. हिरड्याची फुले मार्च-एप्रिलमध्ये येतात. ही उग्र वासाची पांढरी पिवळी असतात.

औषधी म्हणून हिरड्याची फळे उपयुक्त असून नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत येतात. फळे साधारण २. ५ ते ३. ३३ सें. मीटर लांब व ३. ८ ते ८. ९ सें. मिटर रुंदीची मध्यभागी फुगीर व ५ शिरा स्पष्ट दिसणारी पिवळट तपकिरी रंगाची गोलसर असतात.

हिरड्याचे प्रमुख तीन प्रकार आहेत

१) हिरड्याचे फळ पक्व होण्यापूर्वी म्हणजेच त्यात बी निर्माण होण्यापूर्वी काही फळे झाडावरून पडतात त्याला बाळहिरडा असे म्हणतात

२) हिरड्याचे फळ जे मोठे होते पण अपरिपक्व अवस्थेत वाढलेले असते त्याला चांभारी हिरडा असे म्हणतात. यामध्ये टॅनीन असते. याचा उपयोग कातडी रंगवण्यासाठी होतो

३) जे फळ पूर्ण परिपक्व होते त्याला सुरवारी हिरडा म्हणतात. हे पाण्यात टाकले कि बुडते. वजनाला २० ग्रॅमपर्यंत असते. हे औषधी फळ होय.

हिरड्याचा आकार व रंग यावरून हिरड्याच्या अजून सात जाती आहेत.

विजया : या जातीची फळे तुंबडी सारखी गोल असतात व सर्व प्रकारच्या रोगावर उत्तम असतात.

पूतना : जातीचा हिरडा मोठा व पातळ असून तो लेप देण्यासाठी वापरतात.

अमृता : यातील बी बारीक, मांसल व भरलेली, रेचन देण्यास उपयुक्त असते.

रोहिणी : हे साधारण गोल फळ व्रणरोपक म्हणून वापरतात.

अभया : या हिरड्यावर ठळक पाच उभ्या रेषा असतात. हा हिरडा नेत्र रोगावर वापरतात.

जीवंती : याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो व सर्व रोगावर उपयुक्त असतो.

चेतकी : याला पाच धारा असतात व चूर्ण करण्यास उपयुक्त असून हा हिरडा भाजून खातात.

हिरड्याचे औषधी म्हणून दात, हिरड्या, प्लिहा, खोकला, आवाज बसणे, उचकी, श्वासनलिका, गर्भाशयासाठी बलदायी तसेच पचनसंस्थेत रेचक असे गुणधर्म आहेत. गर्भवती स्त्रीने हिरडा खाऊ नये. त्रिफळा चूर्ण हे उपयुक्त औषध बनवण्या साठी ३ भाग हिरडा, ७ भाग बेहडा व १२आवळा असे प्रमाण असते. हिरड्याच्या फुलांपासून उत्तम मध मिळतो. यामुळे या झाडावर मधमाशांचे प्रमाण खूप असते जे पर्यावरण रक्षणासाठी फारच उपकारक असते.

द्वितीय नवदुर्गा : ब्रह्मचारिणी या नावाने ओळखली जाते. ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी वनस्पती-

स्मरणशक्ती वाढविणारी ही वनस्पती असल्यामुळे हिला सरस्वती असेही म्हणतात. ब्राह्मीचे तेल प्रसिद्ध आहे. यामुळे शांत झोप लागते व केसांची वाढ उत्तम होते. अर्थातच शांत झोपेमुळे आपले आयुर्मान वाढते. स्मरणशक्ती वाढते. ब्राह्मी रक्तदोषनाशक, स्वरयंत्राला पोषक असून पचनसंस्था व उत्सर्जन संस्था आरोग्य दायी बनविते.

तिसरी नवदुर्गा : चंद्रघंटा म्हणजेच चंद्रशूर, हालीम, चमसूर, –

हालीम ही शरीरास पोषक अशी अत्यंत दिव्य औषधी असून विटामिन सी, ए, इ, प्रोटीन्स, लोह, फायबर देणारी वनस्पती आहे. पालेभाजी म्हणूनही हिची ओळख आहे. ॲनिमिया, हिमोग्लोबिन, सांधेदुखी, हृदय विकार, रक्तशुद्धी, महिलांच्या मासिक पाळीचे विकार, स्त्रीचे अंगावरील दूध वाढविणे, प्रतिकार शक्ती वाढविणे, अशा विविध गुणधर्मांनियुक्त अशी ही पालेभाजी आहे. जी पौष्टिक, कफनाशक, बलवृद्धी करणारी आहे. ही वनस्पती लठ्ठपणा कमी करते, म्हणून हिला चर्महंती असेही म्हणतात. या वनस्पती च्या बिजास हलीम असे म्हणतात. याचे लाडू बाळंतिणीला देतात. आजारी व्यक्तीला ही दिले जातात.

चौथी नवदुर्गा : कुष्मांडा : कोहळा या वनस्पतीचे संस्कृत नाव कुष्मांडा असे आहे

पेठा नावाची मिठाई कोहळ्यापासून करतात. निरोगी आरोग्यासाठी पचन संस्था सक्षम असणे गरजेचे असते. कोहळा आतड्यांस बळ देतो. आतड्यातील अन्नरस शोषून त्याचे रक्तांत रूपांतर होते. या प्रक्रियेत कोहळ्याची महत्त्वाची भूमिका असते. वीर्यवृद्धी, रक्तशुद्धी, मनोबल वाढवण्यासाठी कोहळा उपकारक आहे. कप, पित्त, वात यांचे संतुलन करणारे कुष्मांडा अर्थात कोहळा हे फळ भोपळ्याच्या आकाराचे असते. याचा रस नियमित घेतल्यास वरील सर्व फायदे मिळतात.

पाचवी नवदुर्गा : स्कंदमाता. म्हणजेच अळशी / जवस वनस्पती

अळशी अर्थात जवस ही वनस्पती महिलांच्या सर्व आजारांवर अत्यंत उपयुक्त अशी दिव्यौषधी आहे. यामध्ये ओमेगा ३, ओमेगा ६, प्रोटीन्स, विटामिन सी, इ, के, बी-कॉम्प्लेक्स, कॉपर, झिंक, मॅंगनीज, मॅंगनेजीयम फॉस्फरस, आयर्न असे अनेक घटक द्रव्य असून यामुळे आपल्या शरीराचे वात, पित्त, कफ संतुलित होतात.

विशेष करून महिलांचे सर्व प्रकारचे विकार उदा. गर्भाशयातील गाठी, मासिक पाळीच्या समस्या, सांधेदुखी, पीसीओडी, चेहऱ्यावरील केस, सुरकुत्या, अशा व्याधींचा नाश जवस/ अळशी करते. अळशीमुळे एंड्रोजन हार्मोन्स कमी होतात. आळशी अँटिऑक्सिडंट, ऍंटीकॅन्सर आहे. नियमितपणे अळशी खाल्ल्यास वरील सर्व विकार नाहीसे होतात.

सहावी नवदुर्गा : कात्यायनी म्हणजे अंबाडी पालेभाजी –

अंबाडीची पालेभाजी रक्तदाब नियंत्रित करते. शरीरातील चरबी कमी करते. लो कॅलरीज डायट म्हणून ही भाजी उपयुक्त आहे. यामध्ये विटामिन ई, लोह, झिंक हे डोळ्यांसाठी उपयुक्त असे घटक या मध्ये असतात. भरपूर कॅल्शियम असते त्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टीओपोरोसीसचा आजार होत नाही. अंबाडीची भाजी डियूरॅटीक द्रव्यांनी युक्त असते त्यामुळे लघवीची जळजळ, उन्हाळे लागणे यांवर उपकारी.

तथापि अंबाडीची भाजी ऑक्सेलिक ऍसिडयुक्त असल्यामुळे मुतखडा असणाऱ्यांनी, ऍसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी ही भाजी खाऊ नये.

पित्त, कफाचे तसेच गळ्याचे आजारांवर अंबाडीची भाजी उपयुक्त.

सातवी नवदुर्गा : काळरात्री म्हणजेच नागदवणी वनस्पती-

ही वनस्पती सर्वत्र आढळते. ही अत्यंत थंड वनस्पती आहे. शरीरांतर्गत रक्तस्त्राव, बवासीर, मुळव्याध सारख्या विकारात या झाडाची पाने काळ्यामिरी सोबत खाल्याने रक्तस्त्राव थांबतो. शरीरावर आलेली सूज, अल्सर, आतड्यांचे विकारांवर गुणकारी. लघवीला होणारा त्रास, जळजळ, मुत्र विरोध अशा विकारात गुणकारी. या वनस्पतीची लागवड घराच्या सभोवती केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते. पानांचा चिक (दुध) विषनाशक आहे.

आठवी नवदुर्गा : महागौरी म्हणजेच तुळस

तुळशीचे धार्मिक आणि पर्यावरण विषयक महात्म्य आपणा सर्वांनाच परिचित आहे. घरामध्ये सातत्याने सकारात्मक उर्जेची निर्मिती व वातावरण शुद्धी करण्याचे काम तुळस करते. तुळस अँटीकॅन्सर आहे. विटामिन सी, झिंक, अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरस, मुत्रवर्धक, अशा विविध गुणांनी युक्त अशी तुळस दिव्यौषधी आहे. शरिरातील वाढलेल्या युरिक ऍसिड वर तुळशीचा रस गुणकारी असतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळशीचा काढा प्यावा. सर्दी, पडसे, ताप, त्वचारोग, केसांची गळती, मानसिक आरोग्य अशा सर्व विकारांवर तुळस अत्यंत गुणकारी आहे. रक्तवृद्धी, बलवृद्धी, हृदयाची मजबुती, मज्जा संस्था, स्मरणशक्ती अशा सर्वच बाबतीत तुळस अत्यंत गुणकारी आहे.

तुळशीचे विविध प्रकार आहेत तथापि सर्वच प्रकारची तुळस ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते.

नववी नवदुर्गा : सिद्धिदात्री ; शतावरी वनस्पती –

शतावरी वनस्पती ही दिव्य औषधी आहे. शतावरी या शब्दातच शतावरी चे गुणविशेष आहेत. म्हणजे शेकडो फायदे ज्या वनस्पतीमध्ये आहेत अशी वनस्पती म्हणजे शतावरी !

विशेषतः महिलांच्या बालपणापासून वृद्धावस्थे पर्यंत सर्व विकारांवर शतावरी वरदान आहे.

शतावरीच्या नियमित सेवनामुळे स्मरणशक्ती वाढते. शतावरी हॅप्पी हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे चिडचिडेपणा व ताणतणाव दूर होतात. रक्ताभिसरण, दृष्टीदोष, हृदयाची मजबुती, श्वसनाचे विकार, दमा, पचनसंस्था, आतड्यातील कृमींचा नाश, भूक वाढविणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्तात रूपांतर करणे, बद्धकोष्ठता, अतिसार, बवासीर, मुळव्याध, वजन कमी होणे, चरबी कमी करणे, मधुमेह, कोरडी त्वचा सतेज बनवणे, शरीरावरील फोड, मुरमे यांचा नाश करणे असे असंख्य फायदे शतावरीच्या सेवनाने होतात. अर्थात शतावरी हे शरीराचे कफ, पित्त, वात यांचे संतुलन करून आपली प्रतिकारशक्ती वाढवून बलशाली, वीर्यवान, सुडौल, निरोगी, चिरतारूण असे आरोग्य प्रदान करते. हृदयाला बळ देते.

नवरात्रीचा सण साजरा करीत असताना आपण मार्तंड पुराणातील या दुर्गा कवचाचा सखोल अभ्यास केला की आपल्याला समजते की कोणत्या वनस्पतींमध्ये कोणत्या देवीचा वास आहे. या वनस्पतींची लागवड, संवर्धन, तसेच त्याचा योग्य वापर स्वतःसाठी आणि समाजासाठी करून देणे, वनस्पतीचे औषधी गुणधर्म समाजापर्यंत पोहोचविणे आणि त्यातून निरोगी, बलशाली सदविचारी, समाज निर्मिती करणे यालाच पूजन म्हणावयाचे.

हा संस्कार/ संदेश धार्मिक विधीतून देण्याचा सण म्हणजे नवरात्रौत्सव !! निसर्गाने आपल्याला भरपूर काही फुकट दिलेले आहे, आणि संस्कृतीने प्रत्येक वृक्षवेलीला देवत्व दिलेले आहे. या सर्व गोष्टींचा फायदा आपण आपले जीवन सुखी आणि आनंदी बनविण्यासाठी करूयात का ?

धन्यवाद !

माहिती संकलन : कुलकर्णी गुरुजी पंचवटी – नाशिक (संपर्क : ९९२१७५५४३६)

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हरलेल्या देवीची कहाणी… लेखिका : नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ हरलेल्या देवीची कहाणी… लेखिका : नीला महाबळ गोडबोले  ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम

ऐका.. अष्टभुजा दुर्गादेवी तुमची कहाणी… आटपाट नगर होतं. तिथं एक मुलगी जन्माला आली..

“लक्ष्मी घरात आली, “म्हणून जल्लोश झाला..

तिच्यापाठी पोरगं जन्मलं, तेव्हा कोणी “राम, कृष्ण किंवा गणपती आला” असं नाही बोललं..

त्या पोरीची कुमारिका म्हणून घरोघरी पूजा होऊ लागली. तिला वाटलं, आपण देवीच आहोत..

“तुला सरस्वतीसारखं बुद्धिमान व्हायचंय बरं का ! ” पोरगी दिवसरात्र अभ्यास करू लागली. पोराला मात्रं “तुला गणपतीसारखं व्हायचंय, ” असं नाही कोणी बोललं..

लेकीला “देवी अन्नपूर्णा” बनवण्याचा आईनं चंगच बांधला होता..

सासरी सून “लक्ष्मीच्या” पावलांनी येणारी हवी होती.. मग ती नोकरीही करू लागली…

झालं… लक्ष्मीबाई नारायणाचा हात धरून सासरी गेल्या..

वटपौर्णिमेला “सावित्री ” बनून नव-याच्या दीर्घायुष्याचा वसा घेतला.. व श्रावणात “मंगळागौर” बनून नाच नाच नाचली… पुढच्याच श्रावणात “जिवती” होऊन जिवावर उदार झाली नि बाळाच्या जन्माची, संगोपनाची आणि संरक्षणाची जबाबदारी तिने आनंदाने घेतली.

भाद्रपदात तिनं “गौरीचं” रूप घेतलं नि दिवसरात्र राबली..

नवरात्रीत तर तिला सा-यांनी “अष्टभुजा”च बनवलं..

ती जाम खूश झाली..

आता देवी म्हटलं की दैवी ऊर्जा दाखवण्याची जबाबदारी तिचीच नाही का ? मग काय आठ हातांनी तिने स्वयंपाक, घरकाम, नोकरी, बालसंगोपन, पतीसेवा, आदरातिथ्य, सणवार, शुश्रूषा सारं सारं केलं..

अगदी

करणेषु मंत्री, कार्येषु दासी

भोज्येषु माता, शयनेषु रंभा

झाली…

ती स्वत:ला देवीच समजायला लागली.. सगळीकडे नुसतं गुणगान होऊ लागलं तिचं.. “अन्नपूर्णा”, “लक्ष्मी”, “सरस्वती”, “मातृदेवी”, “अष्टभुजा” या विशेषणांचा तिला कैफ चढला..

आणि हो, बाईनं कसं सालस असावं, सगळ्यांशी मार्दवानं बोलावं, थोरांचा मान राखावा, नव-याशी आदरानं बोलावं, चेहरा नेहमी आनंदी ठेवावा, दुखलं-खुपलं तर कुणाला सांगू नये.

दुर्गामाता, कालिकेचं रूप मूर्तीपुरतंच बरं दिसतं… तिनं हेही सांभाळलं सगळं…

स्वत: शिळं खाल्लं, कितीतरी इच्छा मारल्या… कारण तिला देवी बनायचं होतं…

तसं शिकवलंच होतं मुळी…

मुलं शिकून मोठी झाली.. भुर्रकन उडून गेली. आईची गरज वाटेनाशी झाली… तिचं रूप ओसरलं नि नव-याचं प्रेम विरलं..

दुर्लक्ष झालेल्या शरीरानं असहकार पुकारला.. चार दिवस घरात कौतुक झालं…

ती हुरळली..

पाचव्या दिवशी सासूसास-यांच्या कपाळावर आठी आली.. आईवडील कधीचे सोडून गेलेले.. मुलं दिसेनाशी झालेली.. नव-याला आता तिचं ओझं होऊ लागलेलं..

“रोज मरे त्याला कोण रडे”. त्याचं तिच्याकडं साफ दुर्लक्ष.

आणि खरंच एके दिवशी ती मरून गेली… तिचं नामोनिशाण राहिलं नाही…

“ही निघून गेली, तिनं स्वत:ची काळजी घ्यायला नको होती का ? आता त्याने बिचा-याने कसं जगायचं ?”

हिच्या मरणाचं काहीच नाही; सा-यांना त्याचाच कळवळा आला..

“शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी”

अशी तिची गत झाली..

वर्षभरात नव-यानं तिच्या जागी दुसरी “अष्टभुजा” आणली…

स्वर्गात बसलेल्या तिला खरोखरची “अष्टभुजा” बोलली…

“अशी कशी गं तू वेडी ? तुला सा-यांनी देवी म्हटलं नि तुला ते खरंच वाटलं… राब राब राबलीस… स्वत:कडं दुर्लक्ष केलंस नि इथं येऊन बसलीस… “

तिला ते पटलं… देवीच्या कुशीत शिरून खूप रडली…

तिला देवीनं शपथ दिली..

“उतणार नाही मातणार नाही…

स्वत:कडे दुर्लक्ष करणार नाही..

गोड गोड बोलण्याला भुलून

देवी बनायला जाणार नाही..

मी साधी माणूस आहे

माणसासारखं वागणार

रागवणार चिडणार

भांडणंसुद्धा करणार

मी व्यायाम करणार

विश्रांतीही घेणार

तब्येतीला माझ्या

खरंच मी जपणार

संसार दोघांचा आहे तर

दोघांनी सारखं काम करावं

मी लक्ष्मी व्हायला हवी तर

त्याने नारायण व्हावं… “

हे ऐकून दुर्गादेवी तिच्यावर प्रसन्न झाली..

तशी ती तुम्हा-आम्हावरही होवो !

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण !

लेखिका: श्रीमती नीला महाबळ गोडबोले

प्रस्तुती: श्रीमती दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी कसा आहे..? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ मी कसा आहे..? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. 

*

एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते.

तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. 

“आज कसं येणं झालं..?” उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले.

कामाच्या नादात ते विसरून गेले होते की, समोर त्यांचा घरमालक उभा आहे.

घरमालक विनम्रपणे म्हणाला, “मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहून गेलेलं दिसतं.”

उद्योगपती वरमले आणि म्हणाले, “हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा.”

एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.

घरमालक उद्योगपतींना म्हणाला,” तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता, याचे मला आश्चर्य वाटते.”

यावर उद्योगपती हसले व म्हणाले, “मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे.

माझ्या काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो.” 

घरमालक काही समजला नाही. तो भाडे घेऊन निघून गेला.

हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. 

उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या ऑफिसात गेले.

तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले.. 

तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले, 

“सर, तुम्ही रांगेत का उभे आहात..? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा. तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.”

उद्योगपती म्हणाले, 

“आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही.

“उद्योगपती, हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे.” 

…  एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला.

 

तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले.

रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळत आपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली.

त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत.

सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. 

त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

*

एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते. त्या दिवशी एक प्रसंग घडला.

हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले. त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला. ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली.

तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार..

…. उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, “तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'”

हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, “माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.”

उद्योगपती हसले व म्हणाले, ” पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा, व्हिस्की सांड.”

… उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते. त्याची उत्सुकता चाळवली गेली. 

तो उद्योगपतींना म्हणाला, ” साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते..? आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता?? “

… यावर उद्योगपती म्हणाले, “अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले.  ते मला म्हणाले होते,  ” तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण.. ‘तू कसा आहेस ‘ हे फार महत्त्वाचे आहे. आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा.”… तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की, खरोखरच आपण कोण आहोत’ हे महत्त्वाचे नसतेच. …. ‘आपण कसे आहोत’  यावर आपली किंमत ठरते…. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते.”

या उत्तुंग उद्योगपतीचे नाव ..  रतन टाटा…

खरंच, जगात जेवढी उत्तुंग माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी..  कुठलीही गुंतागुंत नसलेली.. अशी असतात. खरेतर…साधे राहणे हेच कठीण असते.

अशा व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे…

म्हणूनच, “तुम्ही कोण आहात?”   हे महत्वाचे नाही.

“तुम्ही कसे आहात?”   हे महत्वाचे आहे…

सरांना भावपूर्ण श्रध्दांजली 🌹🙏

┉❀꧁꧂❀┉

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘काळजी करणारा माळी…’ – लेखक : श्री रत्नाकर सावित्री दिगंबर  येनजी ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘काळजी करणारा माळी…’ – लेखक : श्री रत्नाकर सावित्री दिगंबर  येनजी ☆ प्रस्तुती– सौ. उज्ज्वला केळकर ☆

एकदा रतन टाटा सुट्टीनिमित्त स्वतःच्याच म्हणजे टाटा ग्रुपमधील रिसॉर्ट मध्ये गेले होते. त्यांना सवय असल्याने नेहमीप्रमाणेच सकाळीच लवकर उठून तेथील गार्डन मध्ये फेरफटका मारत असताना त्यांनी पाहिले पहाटेच्या काळोखात एक वयस्कर माळी मशीन फिरवून लाॅनवरील गवत कापत होता. जवळजवळ सगळेच लाॅन कापून पुर्ण झाले होते. रतनजींना आश्चर्य वाटले ह्या माळ्याने एवढ्या सकाळी आपल्या कितीतरी आधी उठुन हे काम पूर्ण केले. त्याचे गवत कापुन झाल्यावर रतन टाटांनी त्याची आपुलकीने चौकशी केली. घरी कोण कोण आहेत व ते काय करतात हे सगळेच  त्यांनी आपुलकीने विचारले तेव्हा त्यांना कळले की त्यांचे दोन मोठे चिरंजीव माळीकाम करतात व लहानगा इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला आहे. आतापर्यंत त्याने चांगले मार्क्स मिळविले असून सहा महिन्यांनी तो पदवीधर होणार असून तोच कुठेतरी  नोकरीसाठी प्रयत्न करणार आहे. रतन टाटा साहेबांना ते कळल्यावर वाईट वाटले. आपला टाटा समूह जगभर प्रचंड उलाढाल करताना त्याच समूहातील एका दिवसभर मेहनत करणाऱ्या व्यक्तीस स्वतःच्या पदवीधर होणाऱ्या मुलाच्या नोकरीची चिंता वाटते. टाटासाहेब  सुट्टीवरून पुन्हा कार्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांनी स्वतःहुन त्या रिसॉर्ट च्या माळ्यासाठी सहा महिन्यानंतर त्यांच्या चिरंजीवासाठी नोकरीची सोय केली. सहा महिन्यानंतर त्या माळ्याने स्वतःच्या देवघरातील रतन टाटांच्या तसबिरीला स्वतं: फुलवून बनविलेला हार घालून मनोभावाने हात जोडले होते. त्याला त्याचा  देव नवस न करता पावला होता. जसे एखादा माळी स्वतः काम करत असलेल्या बागेतील फुलझाडांची मुलांसारखी काळजी व निगराणी घेतो तसेच रतन टाटासाहेब संपूर्ण समूहातील  कामगारांची स्वतःच्या मुलांसारखीच काळजी घेत असत. ते जेव्हा नवीन उद्योग सुरू करायचे तेव्हा ते प्रथम कामगारांना भविष्यात आपल्या या घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान तर होणार नाही ना याची पुर्ण काळजी घेत असत. भारतातील इतर उद्योजक नवीन कंपनी काढुन स्वतःच्या परिवारास फायदा झाल्यावर त्या कंपनीच्या शेअरच्या किंमती गडगडल्यावर स्वतः निमुटपणे बाजुला किंवा परदेशात पळुन जातात. मुबंईत जेव्हा ताज हॉटेल वर अतिरेकी हल्ला झाला तेव्हा या जगप्रसिद्ध हाँटेलचे प्रचंड नुकसान झाले व आजूबाजूच्या लोकांचे नुकसान झाले त्यात अनेक गरीब लोक म्हणजे हातगाडीवर ज्युस किंवा भेळ विकणारी माणसे होती त्या सर्वांनाच रतन साहेबांनी त्यांच्याशी संबंध नसला तरी त्यांचे झालेल्या  सर्व नुकसानीची भरपाई करुन दिली. 

याच अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून हजारो गाड्याची आलेली  मोठी आँर्डर सरळ नाकारुन त्यांनी स्वतःचे देश प्रेम व्यक्त केले.

ॐ शांती 🌹🙏

लेखक : श्री रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रतन टाटा : भारतीय उद्योग जगतातील प्रेरणास्थान – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆रतन टाटा : भारतीय उद्योग जगतातील प्रेरणास्थान – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

रतन टाटा हे भारतीय उद्योगजगताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या कार्याने केवळ टाटा समूहाला नव्हे तर संपूर्ण भारताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. रतन टाटांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला आणि ते जेव्हा टाटा समूहाचे प्रमुख बनले, तेव्हा त्यांनी त्याचे नेतृत्व अत्यंत कौशल्याने केले.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

रतन टाटांचे पूर्ण नाव रतन नवल टाटा आहे. त्यांचा जन्म टाटा घराण्यात झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांचे पालक विभक्त झाले होते, त्यामुळे त्यांचे बालपण खडतर राहिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झाले. पुढे त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी घेतली आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवस्थापनातील शिक्षण पूर्ण केले.

टाटा समूहातील योगदान

रतन टाटांनी १९९१ साली टाटा समूहाची धुरा सांभाळली. त्यांनी समूहात मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणल्या. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा ताबा घेतला, ज्यात जगप्रसिद्ध Jaguar Land Rover (JLR) आणि Tetley यांचा समावेश आहे. यामुळे टाटा समूह जागतिक पातळीवर एक मोठा उद्योगसमूह म्हणून उभा राहिला.

महत्त्वपूर्ण प्रकल्प

रतन टाटांनी भारतीय सामान्यांसाठी एक स्वस्त वाहन उपलब्ध करण्याचे स्वप्न पाहिले आणि “टाटा नॅनो” या प्रकल्पाची सुरुवात केली. टाटा नॅनो हे जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या प्रयत्नामुळे मध्यमवर्गीय लोकांसाठी कार घेणे सहज झाले.

नेतृत्व आणि उदारता

रतन टाटा हे अत्यंत साधे आणि विनम्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे नेतृत्व कौशल्य, पुढाकार घेण्याची क्षमता आणि ध्येयप्राप्तीसाठी त्यांचा चिकाटीने केलेला प्रयत्न नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. त्यांनी समाजकार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात दान दिले आहे.

सन्मान आणि पुरस्कार

रतन टाटांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारत सरकारकडून २००० साली पद्मभूषण आणि २००८ साली पद्मविभूषण या दोन प्रमुख पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

निष्कर्ष

रतन टाटा हे केवळ एक उद्योगपती नसून, ते एक प्रेरणादायी नेते, समाजसेवक आणि नवोन्मेषक आहेत. त्यांनी उद्योग, समाज आणि मानवता यांना एकत्र जोडण्याचे काम केले आहे. त्यांच्या कार्यामुळे ते लाखो भारतीयांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरले आहेत.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ TCOC : टाटा कोड ऑफ कंडक्ट… लेखक : श्री मंदार जोग ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ TCOC : टाटा कोड ऑफ कंडक्ट… लेखक : श्री मंदार जोग ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

मी शक्यतो वैयक्तिक काहीही समाज माध्यमांवर लिहीत नाही. पण आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत काळा दिवस आहे. म्हणून थोडे लिहितो आहे. मी टाटा जॉईन केल्यावर इंडक्षन नंतर माझ्या बॉस बरोबर कॅफेटेरिया मध्ये बसलो होतो. तेव्हा त्याने एक कानमंत्र दिला. तो म्हणाला “मंदार तू स्किलमध्ये कमी असलास तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे तुला ट्रेन करतील. पण TCOC शी प्रतारणा केलीस आणि तू रतन टाटा देखील असलास तरी तुला नोकरीवरून काढून टाकतील हे विसरू नको!”

टाटा ग्रुपच्या सगळ्या कंपनीज्मध्ये TCOC म्हणजे टाटा कोड ऑफ कंडक्ट नावाची एक नियमावली आहे जी सर्व कर्मचाऱ्यांना लागू असते. तिथे उल्लंघन केल्यास क्षमा नाही. बाकी स्कील सेटमध्ये एव्हरेज .. क्वचित बिलो एव्हरेज असलेले काही लोक टाटांच्या कंपनीत सरकारी सेवेत काम केल्यासारखे वर्षानुवर्ष काम करून आज उत्तम पगार घेत असलेले मला माहीत आहेत! टाटा कर्मचाऱ्यांची काळजी घेतात, त्यांना ट्रेन करतात, त्यांची क्षमता वाढायला वाव देतात. पण कोड ऑफ कंडक्ट बाबत नो कॉम्प्रोमाईज! त्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये टाटा कर्मचारी म्हणून माणसाने कसे वागावे आणि कसे वागू नये ह्याबद्दल अगदी मूलभूत माहिती आहे. कोणतेही जाचक बीचक नियम नाहीत. बेसिकली टाटा समूह ज्या सचोटी, तत्त्व आणि सर्व समावेशन ह्यासाठी ओळखला जातो त्याचे पालन करावे आणि त्यासाठी काय करू नये हे त्यात सांगितलेले आहे. 

इथे फार काही लिहिता येणार नाही. पण एक गंमत सांगतो. एका विभागाने एका विशिष्ट ट्रेनिंगसाठी काही कोटिंचं एक टेंडर काढलं. आम्ही ते बीड केलं. तिथे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही अर्धे पैसे आम्हाला कॅश द्या, मग हव्या त्या किंमतीची ऑर्डर आम्ही तुम्हाला देतो. मग पुढे ती तुम्ही पूर्ण केलीत की नाही हे पण आम्ही विचारणार नाही. टाटा कंपनी असल्याने अर्थात आम्ही नकार देऊन काही लाखांचं होऊ घातलेल्या नफ्याचं नुकसान करून घेतलं. पण सहा महिन्यांनी त्या विभागाचं ऑडिट झाल्यावर ऑडिटरनी त्यांना प्रश्न विचारला की गल्ली बोळात असलेल्या किरकोळ कंपन्यांना तुम्ही  कामासाठी नियुक्त केलं आहे मग टाटा कंपनीला का नाही? मला त्या अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी अडचण सांगितली. आम्ही मात्र एकही पैसा देणार नाही ह्यावर ठाम होतो. त्यांना आम्हाला पूर्ण पैशांची काही लाखांची ऑर्डर अखेर द्यावी लागली! 

बाकी टाटा समूह, त्यांचा दानधर्म, ते टाटा ट्रस्ट मधून करत असलेली अवर्णनीय समाज सेवा ह्याबद्दल माहिती शोधल्यास उपलब्ध आहे. त्यावर वेगळे लिहायची गरज नाही. पण १९९१ मध्ये चेअरमन बनल्यावर ५ बिलियन डॉलर इतकी उलाढाल असलेल्या टाटा समूहाला २०२३-२४ मध्ये  टाटा समूहाच्या त्याच तत्वांवर आणि मूल्यांवर अढळ रहात १६५ बिलियनपेक्षा जास्त उलाढाल आणि १० लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणारा समूह बनवणाऱ्या एका अत्यंत हुशार, तत्त्वनिष्ठ, प्रेमळ, चाणाक्ष, निस्वार्थी आणि अतिशय साधे जीवन जगणाऱ्या उद्योगमहर्षी श्रीयुत रतन टाटा साहेब ह्यांचं आज निधन झालं आहे ! म्हणून हा लेख प्रपंच!

विशेषतः हल्ली आपल्या पैशांनी सरकार विकत घेणारे, भंगार भिकार नशेबाज बॉलीवूड नटनट्या नाचायला बोलावून त्यांच्यासह नाचकामाचे फोटो प्रसारित करून आपल्या भ्रष्ट श्रीमंतीची सूज बाजारात मांडणारे, व्यवस्थेला झुकवून आणि आपल्या दाराला जुंपून भ्रष्ट राजकारणी लोकांशी संगनमताने पैसा कमावणारे “व्यापारी” पाहिले की रतन टाटा ह्यांना(च) “उद्योगपती” म्हणावं अस वाटतं! मग ते सामान्य लोकांसाठी नॅनो सारखी गाडी बनवणे असो, ताज हॉटेलमध्ये हल्ला झाल्यावर तिथले कर्मचारी आणि इतर मृतांसाठी केलेले काम असो, जे आर डी टाटांनी सुरू करून नंतर सरकारने हडपलेली आपलीच एअर इंडिया परत सरकारला पैसे देऊन तिथल्या सरकारी वृत्तीच्या आणि वकुबाच्या स्टाफसकट विकत घेणे असो.. रतन टाटा साहेबांनी ते सर्व केलं. आजही अनेक नवनवीन स्टार्टअप मध्ये त्यांची स्वतःची वैयक्तिक आर्थिक गुंतवणूक आहे!

मी मागेही अनेक लेखांमध्ये उल्लेख केल्यानुसार लता, बाळासाहेब, रतन टाटा, अमिताभ, सचिन ही आमची काही  श्रद्धास्थाने आहेत. बाळासाहेब आणि लता नंतर आज रतन टाटा साहेबही गेले! आमच्या श्रद्धेच्या मंदिरातील आणखी एक मूर्ती भंग पावली! भारताच्या उद्योग जगतातील ध्रुव तारा आज अस्ताला गेला. भारतातील philanthropy च्या कोहिनूरला आज तडा गेला. लाखो करोडोंचा पोशिंदा आज स्वर्गस्थ झाला. सर्वत्र धंदा आणि धंदेवाल्यांचा चिखल दिसत असताना त्यात उगवलेलं सचोटीचं दुर्मिळ कमळ आज कोमेजलं, भारताच्या प्रगतीच्या क्षितीजावरचा तेजस्वी सूर्य आज अस्ताला गेला. आज सर्वार्थाने #भारतरत्न रतन टाटासाहेब गेले! टाटा समूहाचे RNT गेले! आज जणु देवाचाच स्वर्गवास झालाय ! आजचा दिवस देशाच्या आणि माझ्याही आयुष्यातील अत्यंत काळा दिवस आहे!

साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम! ईश्वर तुम्हाला सद्गती देवो हीच प्रार्थना! फार फार वाईट झालंय आज !

.,..

लेखक : श्री मंदार जोग 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रतन टाटा यांची एक अविस्मरणीय मुलाखत ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ रतन टाटा यांची एक अविस्मरणीय मुलाखत ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजिरी येडूरकर ☆

मला तुमचा चेहरा आठवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”

जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेजेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले: “सर, तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला,  ती आठवण सांगाल का”?

रतनजी टाटा म्हणाले: “मी जीवनात आनंदाच्या चार टप्प्यांतून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला.”

पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता. पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही.

मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला. पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवलं.

त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला. तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो. पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही.

चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेअर विकत घेण्यास सांगितले. सुमारे 200 मुले होती. मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हील चेअर घेतली.

पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हील चेअर स्वहस्ते द्यावी . मी त्यांच्यासोबत गेलो. तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या. या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली. मी त्या सगळ्यांना व्हील चेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो..जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती, जणु काही कसलातरी विजयोत्सवच होता तो. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला. मी हळूवारपणे माझा पाय सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले. मी झुकलो आणि मुलाला विचारले: “तुला आणखी काही हवे आहे का?”

मग मुलाने मला जे उत्तर दिले, त्याने मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन पूर्णपणे बदलून टाकला.

मुलाने म्हटले: “मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन.”

वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की, हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्ये सोडल्यानंतर आपली आठवण राहील का?

#कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे, ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते.

भावपूर्ण श्रध्दांजली

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रत्न हरपले !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

रत्न हरपले !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

या नश्वर जगात मृत्यू अटळ आहे, तोच सत्य आहे, हे सर्वांना माहीत आहे, पण कधीतरी हा मृत्यू असू नये असे अगदी मनापासून वाटते. काल आदरणीय रतनजी टाटा यांचे निधन झाले आणि वरील विचार माझ्या मनात आला…!

काही माणसे मरण येत नाही म्हणून जगत असतात, तर काही माणसे जगता येत नाही म्हणून मरणाची वाट पहात असतात…

तर काही माणसे मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा निगुतीने उपयोग करून आपला देह आपल्या देशाच्या प्रगतीसाठी लावत असतात, त्यासाठी कणाकणाने झिजत असतात…

अहो, हे काही पारतंत्र्य काळातील स्वातंत्र्य सैनिकाचे वर्णन नसून आपल्या रतनजी टाटांचे माझ्या अल्पमतीने केलेले वर्णन म्हणता येईल…

टाटा उद्योग समूह!!!!

भारताच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, असा एक मोठा उद्योग समूह. भारताला ज्याची गरज आहे, त्याची निर्मिती आम्ही करतो, असा नुसते न म्हणता प्रत्यक्षात तसे आचरण करणारा (नफा तोट्याची चिंता न करता….!) उद्योग समूह…! देशभक्ती हा या उद्योग समूहाचा ब्रँड झाला असे म्हटले तर वावगे होणार नाही…! 

एकेकाळी तर ५०१ बार पासून ट्रक पर्यंत टाटा अनेक वस्तू बनवत असत…

लिहिण्यासारखे भरपूर आहे…,

असो….

आज प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांच्या कडा भिजल्याशिवाय राहणार नाहीत कारण ज्या पिढीने पारतंत्र्य अनुभवले नाही, त्यांनी आदरणीय रतन टाटांच्या रूपाने खरा देशभक्त कसा असतो, हे पाहीले असे म्हणता येईल…!

रतन टाटांनी सामाजिक बांधिलकी जपत, आपल्या मूल्यांशी किंचितही तडजोड न करता आपला उद्योग व्यवसाय तर वाढवला आणि याच बरोबर आपल्या देशाची शान आणि मान सतत उंच राहील यासाठी आटोकाट प्रयत्न केले…

त्यांचे अलिबाग जवळ घर होते. मांडवा येथे त्यांना अनेकदा पाहण्याचा योग आला आहे. साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असे त्यांचे अगदी थोडक्यात वर्णन करता येईल…

एखाद्या उद्योग समूहाच्या प्रमुखाचा मृत्यू होणे हे अगदी नैसर्गिक आहे, पण जेव्हा तिथे रतनजी टाटा असतात तेव्हा निव्वळ उद्योगपती रहात नाहीत, तर आपल्या घरातील कोणी असतात…! माझ्या सारख्या सामान्य मनुष्याच्या मनापर्यंत त्यांच्या मनातील देशभक्तीची ऊब झिरपते, हेच त्यांच्या जीवनाचे यश आहे असे मला वाटते…

आज भारतमाता सुध्दा दुःखी असेल कारण तिच्या एका सुपुत्राला ती आता पाहू शकणार नाही…

मरावे परि कीर्ती रूपे उरावे…!!!

आदरणीय रतनजी टाटांच्या चरणी माझी ही शब्द सुमनांजली सादर समर्पित!!!! 🌹🙏

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ उंची आभाळाएवढी… पाय मात्र जमिनीवर…  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ उंची आभाळाएवढी… पाय मात्र जमिनीवर…  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

एकदा एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या अतिमहत्वाच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर, एका ठिकाणी तातडीच्या मिटिंगला निघाला होता . . मोठी आलिशान गाडी होती. आणि प्रवास साधारण तीन चार तासाचा होता. सर्वजण सकाळी लवकर निघाले होते.

गाडी वाटेत आल्यावर . . गाडीच्या ड्रायव्हरच्या लक्षात आले की  मागील एक चाक पंक्चर आहे, त्याने ती गाडी एका बाजूला घेतली. आणि सर्वाना उतरायला सांगितले. सर्वजण तसे खुश झाले कारण सगळे सकाळीच निघाल्याने आणि मध्ये न थांबल्याने ब्रेक हवाच होता. मालक आणि बाकी सर्वजण उतरून इकडे तिकडे गेले. कोणी जवळच्या धाब्यावर सिगारेट ओढू लागले. कोणी झुडुपाआड गेले.

अर्ध्या तासाने सर्वजण एका ठिकाणी एकत्र जमले पण सर्व टीम एकत्र आली तरी मात्र मालक नाही दिसले. सगळे जण शोधायला लागले पण कुठे दिसेनात. दहा मिनिटानी सर्वजण जिथे गाडी पंक्चर झाली होती तिथे जमले तर, मालक हातात स्पॅनर घेऊन.. शर्टाचे हात कोपरापर्यंत दुमडून.. घामाघूम होऊन.. चेहऱ्यावर मंद स्मित ठेवून ड्रायव्हरला स्टेपनीचे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले.

आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकाऱ्यांना मिळाला. “थोर व्हायला . . . तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहित असावे लागतात. नुसते आदेश सोडून अधिकारी बनतात… मालक नाही होता येत. “

त्या उद्योगपतीचे.. म्हणजे  मालकाचे नाव.. “श्री. रतन टाटा”.. नाशिक येथे नेल्कोची टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला हा प्रसंग … बरंच काही शिकवून गेलेला. 

संदर्भ : The Habit of Winning

प्रस्तुती : अमोल केळकर 

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आई ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ आई… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

नवरात्र हा सण प्रामुख्याने मातृशक्तीचे जागरण करणारा आहे. त्यानिमित्ताने हा लेख…!

“या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता। 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”‘

खरंतर आईचे वर्णन करायला आई हा एकच शब्द पुरेसा ‘ बोलका ‘ आहे.

आई म्हणजे दया, क्षमा, शांतीचा सागर !!!

आजच्या मंगलदिनी…..

जननीस वंदन !

गोमातेस वंदन !!

भूमातेस वंदन !!!

भारतमातेस वंदन !!!!

गुरुमाऊलीस वंदन !!!!!

‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’,

‘आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही’; 

‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ 

… अशा विविधप्रकारे प्रतिभावंत कवींनी/मुलांनी आपल्या आईचे गुणवर्णन केले आहे. जरी असे वर्णन जरी केले असले तरी ते वर्णन पूर्ण आहे असे कोणताच कवी ठामपणे म्हणू शकत नाही. ज्या प्रमाणे भगवंताचे वर्णन करता करता वेद ही ”नेति नेति’ असे म्हणाले, (वर्णन करणे शक्य नाही), अगदी तसेच आईच्या बाबतीत प्रत्येक मुलाचे / प्रतिभावान कवीचे होत असावे असे वाटते आणि म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत पहिला नमस्कार आईला करण्याचा प्रघात रुजवला असावा.

आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्टीकडे ‘ मातृत्वभावाने पाहण्याचे संस्कार आपल्यावर बालपणीच केले जात असतात, त्यामुळे आपल्याकडे पूर्वीपासून ‘भूमाता’, ‘गोमाता’, ‘भारतमाता’ अशा विविध भावपूर्ण संज्ञा आपल्या मनावर कोरल्या गेल्या. ही पद्धत अकृत्रिम पद्धतीने आचरली जात होती, त्यामुळे ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिकवावी लागत नव्हती की त्याची जाहिरात करावी लागत नव्हती. आईच्या मातृत्वभावामुळे कितीतरी चांगल्या गोष्टी नकळत घडत होत्या आणि त्याचा फायदा सर्व समाजाला, पर्यायाने देशाला होत होता. आज पुन्हा एकदा आईचे ‘आईपण’ ( प्रत्येक गोष्टीतील मातृत्वभाव) जागृत करण्याची गरज जाणवत आहे. “शिवाजी शेजारणीच्या पोटी जन्माला यावा’ ही मानसिकता सोडून ‘मीच माझ्या बाळाची ‘जिजामाता’ होईन” आणि माझ्या लेकरास शिवाजी म्हणून घडवायला जमलं नाही तर किमान शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून तरी घडवेन, असा उदात्त विचार मातृशक्तीत रुजविण्याची गरज आहे असे जाणवते. निसर्गाने दिलेला ‘निर्मिती’च्या नैसर्गिक अधिकाराचा स्त्री शक्तीने उचित उपयोग करून घ्यायला हवा. हा प्रयत्न काही प्रमाणात जरी यशस्वी झाला तरी देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे वाटते.

‘ देवाला सर्व ठिकाणी जाता येत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली’ याची अनुभूती आपण सर्वच जण नेहमीच घेत असतो. सर्व संत मातृभक्त होते. सर्व क्रांतिकारक मातृभक्त होते आणि म्हणूनच अनंत हालअपेष्टा सोसून क्रांतीकारकांनी स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्न केले. आपणही आपल्या आईसाठी यथामती काहीतरी करीतच असतो. आपल्या आईची समाजातील ‘ओळख’ ‘सौ. अमुक अमुक’ न राहता ती अमुक अमुक मुलाची आई आहे’, अशी करून देता आली तर आईप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा या पेक्षा चांगला उपाय नसेल असे मला वाटते..

मी इथे प्रत्येकाच्या मनात असलेली ‘आई’बद्दलची भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चुकभुल माफी असावी.

मातीच्या चार भिंती

त्यात माझी राहे आई

एवढे पुरेसे होई 

घरासाठी….. !!

आदरणीय मातृशक्तीस आणि मातृभावनेने कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांस ही शब्दसुमनांजली सादर अर्पण !!

श्रीराम समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares