मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-२… लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देताना सामाजिक प्रवर्तकांना हेच अपेक्षित होतं का? समाजातल्या व्यावसायिकांना अशाप्रकारे लुटणं अपेक्षित होतं का? याची उत्तरं कुणी मागायची आणि या प्रकारांवर अंकुश कोण आणणार? याचं ठोस उत्तर समाजाला हवं आहे. 

सार्वजनिक उत्सव हे अशा गोष्टी राजरोसपणे करण्यासाठीचं हक्काचं निमित्त आहे का? माणसांना जे एकट्याला किंवा स्वतंत्रपणे करता येणार नाही, नेमक्या त्याच गोष्टी अशा मोठ्या गर्दीचा फायदा घेऊन केल्या जातात का? यातलं तथ्य शोधण्याकरिता सामाजिक संशोधनाची आवश्यकता आहे. 

सार्वजनिक मिरवणुकीचं गणितच फार निराळं आहे. दहा दिवसांकरिता प्रतिष्ठापित केलेला देव नवव्या दिवशी दुपारीच मांडवाबाहेर काढायचा, आदल्या दिवशी रात्रीच त्या पूजेतल्या देवालाच थेट रस्त्यावर नंबरासाठी रांगेत उभं करायचं, पण अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर नंबर लागत नाहीच. मग या रांगेत उभ्या असलेल्या गणपतींचा अनंत चतुर्दशीची सकाळ ची पूजा, आरती, नैवेद्य आणि संध्याकाळची पूजा-आरती-नैवेद्य होतो का? शोडषोपचार होतात का? रांगेत गणपती उभा केला की, त्याची पूजाअर्चा माणसं पार विसरूनच जातात. त्यांना मिरवणुकीचे वेध लागलेले असतात. (त्यातही “वाट पाहे सजणा, संकष्टी पावावे” अशांचीच संख्या जास्त. अनेकांना तर तेवढंही येत नसतं. मग आरती आणि मंत्रपुष्पांजली सुद्धा स्पीकर वरच लावली की काम ओके !) 

कार्यकर्त्यांची मिरवणुकीची हौसच मोठी दांडगी. 

ते गणपतीच्या रथासमोरच रस्त्यावरच जेवतात, तिथंच झोपतात. डीश, द्रोण, पत्रावळी, चमचे, पाण्याच्या (आणि अन्य सर्व प्रकारच्या द्रव पदार्थांच्या) बाटल्या वगैरे तिथंच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. गणपती बाप्पा सकाळ होण्याच्या प्रतिक्षेत रथावरच बसून असतात. 

अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पारोश्या अवस्थेतच मिरवणूक सुरू होते, आंघोळही न केलेले सो काॅल्ड भक्त मोठ्या भक्तिभावानं शीला की जवानी, बोल मैं हलगी बजावू क्या, पोरी जरा जपून दांडा धर अशा गाण्यांवर नाचत राहतात. हे कुठल्याच शुचितेत किंवा पावित्र्याच्या व्याख्येत बसत नाही. 

राष्ट्रीय सणांच्या दिवशी शोभायात्रा निघतात, त्यात केवळ देशभक्तीपर गाणीच वाजवली जातात. पण मग देवाच्या मिरवणुकीत आयटम साॅंग्ज कशी काय लावली जातात? अशा सर्व कार्यकर्त्याकरिता एखाद्या वेगळ्या दिवशी डीजे नाईट आयोजित केली तरी काम होऊन जाईल, त्याकरिता गणेशोत्सवाचंच निमित्त कशाला हवं? 

कित्येक ठिकाणी तर निवडलेल्या दुर्वांच्या जुड्या नसतातच. त्याऐवजी उपटून आणलेलं गवतच वाहिलेलं असतं. म्हणजे तेही महत्वाचं वाटत नाही. मग याकडे धार्मिक उत्सव म्हणून कसं पहावं? आणि का पहावं? 

दहाच्या दहा दिवस अंडी किंवा मांसाहारी पदार्थ खुशाल खायचे, व्यसनं करायची, मनसोक्त अपेयपान,धूम्रपान करायचं आणि ‘हा बघा आमचा हिंदूंचा प्रिय उत्सव’ असं वरून पुन्हा आपणच म्हणायचं, हा कुठला अजब प्रकार? एकूणच सवंगपणा, आचरटपणा, छचोरपणा, स्वत:च्या मनातल्या असामाजिक कृती करण्यासाठी गणेशोत्सव आणि मिरवणुका यांचा व्यवस्थित वापर केला जातोय, यामागची सामाजिक मानसिकता जाणली पाहिजे. 

लोकमान्य टिळक, न.चिं.केळकर अशा मान्यवरांनी पुढाकार घेऊन हा उत्सव उभा केला आहे. मिरवणुकीची सांगता मान्यवरांच्या भाषणांनी होत असे. यांची शिस्त तर इतकी करडी होती आणि सामाजिक जरब अशी होती की, त्यांचा शब्द मोडण्याची कुणी प्राज्ञा करू शकत नसे. आज तशीच शिस्त पुन्हा लावण्याची आवश्यकता नाही का? की उत्सवातला आनंद आम्ही लुटणार आणि गैरप्रकार किंवा तत्सम गोष्टी घडल्या की त्याची जबाबदारी प्रशासन-पोलिस यांच्यावर ढकलणार?  याचा विचार आपल्या मनात आहे की नाही? 

सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची कोणती विशेष आचारसंहिता किंवा चौकट आहे का? आजवर ती नसेल तर, ती असायला नको का? उत्सवाचं नियोजन, आखणी, खर्चाची सोय, मूर्तीचा आकार किंवा तपशील, देखाव्यासंबंधी मार्गदर्शक तत्वे, मिरवणुकीसंबंधी चे मार्गदर्शक नियम, उत्सव संपल्यानंतर रथ किती दिवस रस्त्यात तसाच ठेवायचा, मांडव किती दिवस ठेवायचा, आॅडीट कुणाकडून करून घ्यायचं, उत्सवासाठी शिस्तपालन समिती कशी नियुक्त करायची याविषयी आजवर कुणीही पुस्तिका काढलेली नाही. १२५ वर्षांपेक्षा अधिक काळ चाललेल्या उत्सवाविषयीचं असं मार्गदर्शनच असू नये, ही केवढी मोठी तृटी आहे? 

प्रत्येक कार्यकर्ता सूज्ञ असतोच, असा आपला समज आहे का? असा सरकारचा समज आहे का?असा धर्मादाय आयुक्तांचा समज आहे का? आपण सर्वांनाच जन्मत:च सूज्ञ, समंजस, समजूतदार, विवेकी असं समजण्याची चूक करतो आहोत का? उत्सव हा उत्सवासारखाच झाला पाहिजे याविषयी सर्वांचं एकमत असेलच, पण मर्यादांचं भान सुटणाऱ्यांविषयीचं कारवाईचं पाऊलही तितक्याच कठोरपणे टाकलं पाहिजे. समाजाला प्रबोधनाची आवश्यकता नेहमीच असते, ही गोष्ट नाकारण्यात अर्थच नाही. पण जेव्हा समाजच आम्हाला कुणीही अक्कल शिकवण्याची गरज नाही असं एकमुखानं म्हणायला लागतो तेव्हा काय समजावं? 

उत्सवाला परिवर्तनाची गरज नाही, उत्सव पुन्हा त्याच्या मूळ सात्विक रूपाकडे नेण्याची खरी गरज आहे. 

– समाप्त – 

लेखक : डॉ. मयुरेश डंके

मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य– ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य– ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी निमसे पाटील होते. १८४० साली  महात्मा ज्योतिराव फुले या थोर समाजसुधारकांसोबत, सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय नऊ वर्ष तर, ज्योतिरावांचे वय तेरा वर्षे होते. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाज सुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते.

सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावसआत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले.     सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या.    तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. (यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. 

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी –  ” धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. पण असे अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही, अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत… जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.  सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या भयंकर साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. आणि दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेगमुळेच  दि. १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एक कडवट सत्य… — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ एक कडवट सत्य… — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एके काळी आम्ही लालबागला रहाणारे अणि मुंबईतील इतरही सर्व मंडळी अगदी सहकुटुंब रात्रभर फिरत लालबागचे गणपती पहायला जायचे….

चिंचपोकळी लेन, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान …. मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर…. पेटीत पैसे टाका, चमत्कार बघा. कांबळी, फाटक, पेडणेकर यांची चलत् चित्र प्रदर्शने हे त्यावेळचं मुख्य आकर्षण असायचं.

मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरु झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला …. पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण वाढलं …. अगदी बाप्पांचा आकारही वाढला …. काळ बदलला, समजलच नाही, काळाच्या ओघात कांबळी, फाटक, पेडणेकर लुप्त झाले, त्यांची प्रदर्शने लुप्त झाली.

सगळं बदललं, पण भाविक बदलले नाहीत. आज कुणाला मार्केटचा गणपती दाखवायला जायचे म्हणजे मोठा विचार पडतो.

साधी रांग, नवसाची रांग, व्ही.आय.पी रांग …. पायाचं दर्शन, पडद्याचं दर्शन, जवळून दर्शन, दुरून दर्शन …. प्रत्येक दर्शनाचा भाव (भावना नव्हे) निराळा….

आम्हाला आजही आठवतं, कोणे एके काळी त्या बाप्पाची दुपारची  आरती पण होत नसे, परिसरातली लहान मुले दुपारी शाळा सुटली की जायची आणि आरती करायची. आता बाजूला रहिवाशांनाही तिकडे जाता येत नाही ….

श्रद्धा तेवढीच राहीली, पण पेटी आणि किर्ती मोठी झाली. आम्हाला त्या देवाची आठवण येते, पण त्या देवाला आमचा चेहरा आठवत नाही का …. ?

नसेल कदाचीत, कारण आता “राजा” अंबानी, तेंडुलकर, बच्चन, फडणवीस आणि सेलिब्रिटीज मध्ये व्यस्त आहे, “VIP” झाला आहे बाप्पा ….

आता आम्ही लालबागकर तमाम गणपतींना घरच्या गणपतीत शोधतो …. आमची सर्व श्रद्धा घरच्या गणपतीच्या पायावर ठेवतो …. “राजा”ला इथूनच साष्टांग दंडवत. हात येथूनच जोडतो.

” देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग । पायी आलो दर्शनाला, आत कसा येऊ सांग ?

देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती । बंदुका रे आम्हावरी, त्यांचे रक्षक रोखती.

देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी । कुठे लपवावी सांग गूळ-खोबऱ्याची वाटी.

देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे । माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे.

देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना । समजेल का तुला, माझी उपाशी वेदना.

देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट । तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट.

देवा तुझ्या मंदिराची वाट जुनी ही सोडतो । तुला ठेवतो हृदयी, हात येथूनच जोडतो …. !!

|| गणपती बाप्पा मोरया ||

लेखक : अज्ञात  

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(…अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत?)

लताने गायलेली माझी आवडती गाणी आठवण्याचा प्रयत्न केला असता, हातातून बहुमोल मोती घरंगळून जावेत असेच होत होते. त्यातील कांही पेश करायचा मोह अगदीच आवरत नाही. मला लताचा १९५० ते १९५५ चा अगदी कोवळा आवाज फारच प्रिय आहे. म्हणून गाणी तशीच… ‘उठाए जा उनके सितम’ – (चित्रपट – ‘अंदाज’, १९४९, मजरूह सुल्तानपुरी – नौशाद), ‘सीने में सुलगते हैं अरमाँ’ – (चित्रपट – ‘तराना’, १९५१, प्रेमधवन – अनिल बिस्वास), ‘साँवरी सूरत मन भाई रे पिया तोरी’ – (चित्रपट – ‘अदा’, १९५१, प्रेमधवन – मदनमोहन), ‘ये शाम की तनहाइयाँ’ – (चित्रपट – ‘आह’, १९५३, शैलेन्द्र – शंकर जयकिशन), ‘जाने वाले से मुलाकात ना होने पायी’ -(चित्रपट – ‘अमर’ – १९५४, शकील बदायुनी – नौशाद). अर्थात प्रत्येकाच्या आवडीला कांही परिमाण नाही हेच खरे!

कानांत प्राण एकवटून ऐकत राहावे असे हे आनंदघन बरसतात अन मन चिंब होते, कितीही भिजले तरी परत ते मखमली अन नर्म मुलायम स्वरतुषार झेलावेसेच वाटतात. अमृतलता असेल तर जितके अमृतपान करा, तितकी अतृप्ती वृद्धिंगत होतच जाते. मित्रांनो! ही अतृप्ती शाश्वत आहे, कारण लताचा ॐकारस्वरूपी स्वरच मुळी चिरंतन आहे, त्याचे अनादी अनंत रूप अनुभवल्यावर स्वाभाविकपणे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती!’ मला आचार्य अत्रेंचे लताविषयीचे एक वाक्य फार आवडते, ‘सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नुपूरांची रुणझुण नि कृष्णाच्या मुरलीचा नाद, हे सर्व एकवटून विधात्यानं लताचा कंठ घडविला असला पाहिजे.’ 

आचार्य अत्रे यांनीच लताला २८ सप्टेंबर १९६४ साली (अर्थात तिच्या वाढदिवशी) ‘दैनिक मराठा’ या त्यांच्या वृत्तपत्रात अजरामर झालेले असे त्यांचे मानपत्र अर्पण केले होते! संपूर्ण लेखच वाचनीय आहे, पण त्याची झलक म्हणून लताच्या अद्भुत, अनमोल अन अनुपम स्वराविष्काराचे वर्णन करतांना अत्र्यांनी किती नाजूक आणि मखमली शब्दांची आरास उभारली आहे बघा, ‘स्वर्गीय स्वरमाधुर्याचा मूर्तिमंत अवतार असलेल्या लताचे केवळ लोखंडाच्या निफातून उतरलेल्या शाईच्या शब्दांनी, वृत्तपत्राच्या जाड्याभरड्या कागदावर, अभिनंदन करणे म्हणजे स्वरसम्राज्ञीच्या स्वागतासाठी तिचा चरणाखाली जाड्याभरडया गोणपाटांच्या पायघड्या अंथरण्याइतकं विशोभित आहे. लताच्या कंठातील अलौकिक कोमलतेला साजेसं अभिवादन करायचं तर त्यासाठी प्रभातकाळची कोवळी सुवर्णकिरणं दवबिंदूमध्ये भिजवून बनवलेल्या शाईने, कमलतं तूच्या लेखणीने आणि वायूलहरीच्या हलक्या हातानं, फुलपाखरांच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र गुलाबकळीच्या करंड्यातून तिला अर्पण करायला हवं!’

इतके मानसन्मान, प्रसिद्धी, ऐश्वर्य आणि चित्रपटसृष्टीतला झगमगाट हे सर्व असूनही तिचा रियाज चुकला नाही अन पाय जमीनीवर होते ते तिथंच राहिले. जागतिक कीर्तीच्या प्रतिष्ठित अल्बर्ट हॉल मधील तिला आंतरराष्ट्रीय गायिका म्हणून प्रस्थापित करणाऱ्या कार्यक्रमाची तारीफ करावी की, सर्वश्रेष्ठ असे दादासाहेब फाळके अन भारतरत्न पुरस्कार मिळाले तरी लताची विनम्रता कमी कशी झाली नाही याचे नवल करायचे?

स्वरलता या विषयावर रकान्यांवर रकाने, ऑडिओ, विडिओ, पुस्तके, सर्व कांही भरभरून उपलब्ध आहेत. पण आपण सागराला त्याच्याच जलाने अर्ध्य देतो ना, तसेच माझे हे अर्ध्य आहे! या स्वरदेवतेने स्वरसुमने भरभरून दिलीत! ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी अवस्था झालीय, ओंजळ कवाच भरली फुलांनी, डोळे बी भरले पाण्यानी, अन हृदय भरलं ‘हृदया’ च्या (लताचे हे नाव मला अतिप्रिय) स्वरमौक्तिकांनी! आता ‘हेचि दान देगा देवा’ की, फक्त लताचा निर्मोही, निरंकारी अन निरामय स्वर असावा, तिच्या सप्तसुरांच्या चांदण्यांच्या पायऱ्या चढत जावे आणि पारलौकिक संगीतअवकाशातील ध्रुव ताऱ्यासमान चमकणारी आमची लाडकी स्वरलता अनुभवावी फक्त तिच्या स्वरलहरींतून, अगदी याचि देही अन याचि जन्मी!  प्रिय वाचकांनो, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशा लताच्या स्वराविष्काराला तूर्तास विराम देऊन या अजरामर स्वरशारदेच्या चरणी नतमस्तक होते!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

प्रश्न अनेक, पण उत्तरांचा पत्ताच नाही !” – भाग-१ … लेखक : डॉ. मयुरेश डंके ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

रात्री लक्ष्मी रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका चना जोर गरम वाल्याकडून सात-आठ जणांच्या टोळक्यानं भेळ घेतली. पैसेच दिले नाहीत. त्यानं पैसे मागितले तेव्हा सगळेजण त्याच्या अंगावरच धावून गेले आणि त्या पन्नाशीच्या वयाच्या माणसाला दमदाटी केली, एक-दोन टोलेही दिले. तो माणूस बिचारा घाबरून गेला, जागेवर थरथर कापायला लागला. ती पोरं त्या माणसाची टर उडवत, हसत खिदळत निघून गेली. जाताना त्याच्याकडची चुरमुऱ्याची पिशवीच उचलून घेऊन गेली. आता चुरमुरेच गेले म्हटल्यावर याचा धंदाच संपला ! 

पंधरा-वीस जणांच्या टोळक्यानं रात्री साडेतीन-चारच्या सुमारास एका मिल्कशेक वाल्याला धरलं. त्याच्याकडून पंधरावीस मिल्कशेक घेतले. पैसे मागितल्यावर दमदाटी केली, धक्काबुक्की केली. हपापाचा माल गपापा ! थोड्याफार फरकानं असे अनेक प्रसंग काल डोळ्यांसमोर घडताना दिसत होते. 

गर्दीचा फायदा घेऊन मुली आणि स्त्रियांच्या जवळ जाऊन स्पर्श करण्याचे आणि छेड काढण्याचे तर अक्षरश: शेकडो प्रकार घडत होते. ढोल-ताशांच्या ठेक्यावर काही मुली नाचू लागल्या. लगेच बाजूला चार-पाच पोरं जमा झाली. नाचता-नाचता मुलींच्या अगदी जवळ जाऊ लागली. बेसावध मुलगी बघून तिच्या कानात कर्कश पिपाणी वाजवणे, तिचं लक्ष नसल्याचं पाहून हळूच तिच्या चेहऱ्यावर सिगारेटचा धूर सोडणे, जळती सिगारेट हातावर टेकवणे, ओढणी किंवा वेणी ओढणे, तरूण मुली किंवा स्त्रियांच्या जवळ जाऊन मुद्दामच घाणेरड्या शिव्या देणे असे विकृत प्रकार तर अनेक पाहिले. “विनाकारणच धक्काबुक्की करून पोरीबाळींना त्रास देण्याची हक्काची जागा म्हणजे मिरवणुकांचे रस्ते !” असाच समज समाजानं करून घेतलेला दिसतो. हा समज की गैरसमज याचं उत्तर कुणाकडे आहे?

अत्यंत गर्दीच्या ठिकाणी आपण कोणते कपडे घालावेत किंवा कसं वावरावं याचं भान युवतीच काय पण स्त्रियांनाही नव्हतं, हे दुर्दैवानं आणि खेदानं नमूद करावंसं वाटतं. स्त्रियांविषयीच्याच अश्लील आणि द्वैअर्थी गाण्यांवर स्त्रियांनीच बेभान होऊन नाचावं, म्हणजे कमाल झाली ! 

दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांचा तर सुळसुळाट झालेला होता. रस्त्यावरच खुलेआम बसून मद्यप्राशनाचे कार्यक्रम सुरू होते. नीलायम टाॅकीज जवळ तीन-चार मुलं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाक्यांची तोडफोड करत होती. त्यांनी आठ-दहा गाड्यांचं प्रचंड नुकसान केलं. रस्ते बंद करण्यासाठी वापरलेले बांबूचे तात्पुरते अडथळे तर लोकच मोडून टाकतात, हा दरवर्षीचाच अनुभव आहे. पण बंद दुकानांची शटर्स तंबाखू, गुटख्याच्या  पिंका टाकून रंगवणे, फ्लेक्स फाडणे, दुकानांच्या बाहेरचे दिवे काढून ते फोडणे, चारचाकी-दुचाकी गाड्यांना स्क्रॅचेस मारणे, आरसे फोडणे असे उद्योग सर्रास घडत होते. 

डुकराच्या ओरडण्यासारख्या आवाजाच्या पिपाण्या वाजवत रस्त्यावर मोकाट फिरायचं, तऱ्हेतऱ्हेचे विचित्र प्राण्यांचे आणि कवट्यांचे मुखवटे तोंडाला लावून मोकाट फिरायचं, मक्याची कणसं किंवा पाण्याच्या रिकाम्या बाटल्या पायानं टोलवत टोलवत फिरायचं… या गोष्टी सामाजिक एकात्मता, देवभक्ती, देशभक्ती, हिंदू धार्मिक परंपरांविषयीचं प्रेम-आस्था-आपुलकी, मंगलमय पवित्र वातावरण यापैकी नेमकं काय करतात? याचं खरंखुरं उत्तर कुणी देऊ शकेल का? 

हा काही आजचाच प्रकार आहे असं नाही. २००६-०७ साली मी पुण्यात काॅट बेसिसवर राहत होतो तेव्हाची गोष्ट. गणपती उत्सव जवळ आलेला. संध्याकाळी दारावरची बेल वाजली. दार उघडलं, एकदम चार-पाच माणसं थेट घरातच घुसली. दोन जणांनी सगळं घर फिरून पाहिलं. किती जण राहता वगैरे चौकशी केली. आणि चौघं राहताय ना, मग प्रत्येकी ३००/- प्रमाणे १२००/- रूपये द्या असं म्हणून बसून राहिले. शेवटी खूप अर्जविनंत्या करून प्रत्येकी १५०/- प्रमाणे ६००/- रूपये घेतले आणि गेले. हाच प्रकार २०१८ सालीदेखील सुरू आहे. 

सातारा रोडवरच्या एका हाॅटेलमध्ये ऐन गणेशचतुर्थीच्याच दिवशी रात्री जवळपास ३०-४० माणसं पावतीपुस्तक घेऊन आली. काऊंटरवर जोरदार बाचाबाची सुरू होती. यातली बरीचशी पोरं पंचविशीच्या आतलीच. इकडे हात घाल, तिकडे हात घाल असे उद्योग सुरू होते. एकदोघांनी ज्यूस काऊंटरवरची फळंच उचलून नेली. एकजण पावभाजी काऊंटरवरचे टोमॅटो-काकडीचे काप खात उभा होता. एकाने तर कहरच केला. आॅर्डर घेऊन जाणाऱ्या वेटरला अडवलं आणि त्याच्या ट्रे मधल्या तीन-चार मसाला पापडच्या डिश काढून घेतल्या. तिथंच खात उभा राहिला. मग इतरांना जरासं धैर्य आलं. मग कोल्ड्रींक्सचा फ्रीज उघडून बाटल्या काढून घेऊ लागले, एकानं चीज क्यूब्ज चा बाॅक्सच उचलला. हा सगळा प्रकार अर्धा तास सुरू होता. काऊंटरवरचा माणूस मला म्हणाला, “व्यवसाय करायचा असेल तर हे सगळं सहन करावं लागतंच. नाहीतर तोडफोड करतात, नुकसान करतात, आमच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात, मारहाण करतात. पंचवीस हजार मागत होते, दहा हजारात फायनल होतंय बहुतेक.” 

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. मयुरेश डंके

मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(फोटो मोठा करून पाहिल्यास त्यातील सौंदर्य स्पष्ट दिसू शकेल.)

☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

वरील चित्रातली ही मूर्ती एकाच दगडात कोरून बनवलेली आहे असे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही. ती कशी बनवली गेली हे एक तो देव, नाहीतर तो मूर्तिकारच जाणे असे आश्चर्याने म्हटले जाते.

हे आहे “ नाग वासुकी मंदिर ” प्रयाग. 

पाहिल्यापाहिल्या हा एक वटवृक्ष आहे असेच वाटते. पण नाही. हे सर्व नक्षीकाम भल्यामोठ्या दगडावर कोरून केले गेलेले आहे. 

आपल्या भारतात प्राचीन काळातल्या अशा अनेक सुंदर आणि आश्चर्यकारक वाटणाऱ्या गोष्टी अजूनही बघायला मिळतात, ज्या पाहून, त्या कशा बनवल्या असतील याचे आश्चर्यमिश्रित कौतुक बघणाऱ्या प्रत्येकालाच वाटल्याशिवाय रहात नाही. पण त्या कशा बनवल्या असतील हा प्रश्न एखाद्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा वाटत रहातो. 

अशी अविश्वसनिय कलाकारी बघायची असेल तर अशा स्थळांना आवर्जून भेट द्यायला हवी. 

लेखक : अज्ञात 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मोरया… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ मोरया…  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

“काय आली का सगळी “

एस्.डी. इंडस्ट्रीच्या मालकाच्या घरून आलेल्या गणपतीने विचारलं. लगेच दुसरा म्हणाला “थांबा थोडा वेळ ! झोपडपट्टीतला छोटा गुंड्या मोरयाला सोडतच नाहीय सारखा मोरयाला मिठी मारून  ” नको ना जाऊस,” म्हणून  जोरजोरात रडतोय. त्यामुळे मोरयाचाही पाय निघत नाहीय.येईलच आता तो. संध्याकाळ होत आली.आता  आलच पाहिजे त्याला. तेवढ्यात मोरया गुंडा भाऊला सोडून कसाबसा धावत आला. त्याचे डोळे भरून आले होते. गळ्यात हुंदका दाटून आला होता.सगळ्यानी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याचं सांत्वन  केलं.

“चला रे चांगला मोठा गोल करा” आज विसर्जन झालेले सर्व  गणपती एकत्र आले होते.”आता शिदोरी सोडा बरं!” प्रथम मोरयाच्या सुचनेनुसार सगळ्यानी आपापली शिदोरी सोडली.

प्रथम आलेला मोरया म्हणाला.आणि हो! आपापला अनुभव पण सांगा बरं.

सगळ्यांनी गोल करून आपापली शिदोरी सोडली.तळलेले मोदक तर सगळ्यांच्याचकडे होते.पण प्रत्येकाला आलेला अनुभव मोदकांच्या सारणासारखा गोड होताच,असं नाही.शेवटी पदार्थ  करणारीच्या  भावना पदार्थात उतरतातच नाही का! 

प्रथम आलेला मोरया म्हणाला मीच पहिल्यांदा माझा अनुभव सांगतो.

एस्. डी  इंडस्ट्रिजच्या मालकाकडचा मी दीड  दिवसाचाच पाहुणा होतो.घर कसलं भलामोठा बंगलाच होता तो.जागोजागी श्रीमंती ओसंडून वहात होती. मला बसायला मऊ मखमली आसन.समोर थुईथुई उडणारं कारंज.त्यात पोहणारे हंस.माफक प्रकाश योजना.दारातच चेहर्‍यावर  वैतागलेला भाव असलेल्या,खूप नटलेल्या बाईनं जरा घाईघाईतच माझं स्वागत केलं.तिचं तिच्या नवऱ्याबरोबर  भांडण झालं असावं.केवळ नाईलाज म्हणुन  मला यानी घरी आणलंय असं मला वाटलं.ना कुणी “गणपती बाप्पा, मोऽऽरऽया” अशी आरोळी ठोकली, ना दणक्यात आरती  ना घसघशीत नैवेद्य.ती बया नोकराना  सारख्या सूचना करीत होती.”अगदी नैवेद्यापुरतंच करा .आम्ही दोघेही गोड खाणार नाही.” खरं सांगू का, माझातर मूडच गेला. दुसरे दिवशी  घरच्या स्वयंपाकीणीनेच  चांदीच्या ताटात नैवेद्य दाखवला.तो नैवेद्य माझ्या उंदराचंही पोट भरु शकला नसता.एवढुसाच होता .अगदी बाराच्या ठोक्याला माझ्या हातावर दही ठेवून बोळवण झाली सुद्धा.  शिदोरी म्हणून चॉकलेटचे मोदक, विकत आणलेले मला दिले. हे पहा. हा दीड दिवसाचा पाहुणा म्हणजे मी  केव्हा एकदा परत जातो असं घरातल्यांना झालं होतं. कामाच्या बायका स्वच्छता टापटीप करत होत्या. स्वयंपाकीण  नैवेद्याचे पदार्थ करत होती. नुसतं  पाणी फिरवून फक्त नैवेद्य दाखवायलासुद्धा  मालकिणीला वेळ नव्हता. अगदी कोरड्या डोळ्यांनी माझी पाठवणी केली रे. फक्त एवढंच गाडीतून गेलो आणि गाडीतून परतलो.बस्स इतकंच .

प्रत्येकाला आपण गेलेल्या घरातला संवाद आठवत होता.

भल्या मोठ्या फोर बीएचके मध्ये राहणाऱ्या गोळे आजी-आजोबांना  हौस दांडगी.  शरीर साथ देत नव्हते तरीसुद्धा त्यांनी परंपरा सांभाळायची आणि आवड म्हणून म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव केला. दरवर्षीप्रमाणे  आजीनी  माझ्यासाठी नवीन कुंची शिवून त्यावर  मोती लावून ठेवलेली होती. घरात नैवेद्यासाठी डिंकाचे, बेसनाचे, रव्याचे,बुंदीचे, तिळाचे असे विविध प्रकारचे लाडू तयार  केलेले होते.अत्यंत हंसतमुखानी त्यांनी माझं स्वागत केलं.  मी घरी गेल्यावर मला कुठे ठेवू नी काय काय करू असं त्यांना झालं होतं.गोळेआजी  रोज माझी फुलांनी  दृष्ट काढायच्या. आजी  गजरा घालून छान नटायची.तिच्या नटण्यापेक्षा तिच्या चेहर्‍यावरचं हंसूच मला जास्त विलोभनीय वाटायचं.आरामात लोडाला टेकून आजी आजोबांचे खुसखुशीत संवाद ऐकताना मला मोठी मजा यायची. आरतीसाठी  आपार्टमेंट मधल्या  सगळ्या  बाळ गोपाळांना जमा करून दणक्यात  आरती करायचे. केवळ खाऊ मिळतो म्हणून हे बाळ गोपाळ जमायचे. ना त्यांना आरती यायची ना मंत्रपुष्प. देवघरातली घंटीसुद्धा  मुलाना  वाजवायची माहित नव्हती.  

आजी आजोबानी मनापासून केलेला पाहुणचार मला फारच आवडला. सकाळी सकाळी आजोबा माझ्यासाठी व आजीसाठी चहा करायचे. चहा काय फक्कड करायचे माहिती आहे!.मला चहाचा नैवेद्य दाखवून म्हणायचे.”गणराया,बघ जमलाय का चहा.अरे पृथ्वीवरचं अमृत आहे हे. तिथं स्वर्गात नाही मिळायचं.बघ..

आणखी एक कप हवा का?”आणि खळखळून हसायचे. मग मला नाश्ष्टा त्यानंतर सुग्रास जेवण. असं दोन्ही वेळेला मिळायचं. दोन्ही वेळची आरती अगदी सुगंधी फुलं अत्तर लावून असायची. फार फार आवडलं मला. येताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझा  पाय काय घरातून निघेना. मोठ्या प्रेमानं शिदोरी म्हणून  21 तळणीचे मोदक, गुळाचा खडा,पाणी देऊन  हातावरास  गोड दहीसाखर देऊन त्यानी माझी बोळवण केली.  “तझा प्रवास सुखकर होवो.पार्वती मातेला महादेवाना आमचा नमस्कार सांग ” असा आशीर्वादही दिला.ही गोड शिदोरी मी कायम लक्षात ठेवीन . त्यांची मुलं अमेरिकेत ना! मग मलाच मुलगा म्हणून त्यांनी खूप प्रेम दिलं .वाईट इतकंच वाटते की मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही.

द्रौपदी आजीच्या घरी गेलेला गणपती म्हणाला द्रोपदी आजीना तीन नातीच आहेत. सगळ्या हुशार  चटपटीत,आपापल्या कामात एकदम हुशार . द्रौपदी आजी आपल्याला  नातू नाही म्हणून त्या नातींचा राग राग करायच्या. त्यांच्याबरोबर माझाही त्यांनी राग राग केला.

म्हणाल्या परंपरा सांभाळायच्या म्हणून तुला आणला. मला एखादा नातू  द्यायला तुला काय झालं होतं रे,?  नाईलाजाने करतीय मी हे सगळं, लक्षात ठेव!.उद्या कोण बघेल हा संसाराचा पसारा”? मी मनात म्हंटलं आजीबाई “आपण गेलं,जग बुडलं” ही म्हण माहीत नाही का? जे नाही त्यासाठी का रडायचं? तरीही नातीने केलेली सेवा पाहून मला खूप छान वाटलं.

कुलकर्णी कडून आलेला गणपती म्हणाला, “अगदी ऐसपैस स्वागत झालं हं माझं.” सगळ्या जावा भावा एकत्र येऊन माझा उत्सव साजरा करत होत्या. अगदी गोकुळात गेल्यासारखा वाटलं मला.काय तो आग्रह…. जेवायला बोलावलेले गुरुजी जेवून तिथेच कलंडले तरी आग्रह संपेना.झोप म्हणून दिली नाही मला. भजन,पारंपरिक खेळ, हास्यविनोद आणि आरती सुद्धा दणक्यात हो. एक नाही चांगल्या दहा दहा आरत्या म्हटल्या जायच्या. त्यामुळे मला खरोखर झोपायला सुद्धा वेळ मिळाला नाही . त्यांची मोलकरीणसुद्धा  खुष होती बर का! सणाचं  जादा काम पडणार म्हणून कुलकर्णी वहिनींनी आधीच गणपतीसाठी म्हणून तिला एक हजार रुपये  जादाचे दिले होते.मोठ्ठ घर तसं मन ही मोठ्ठ आहे हो त्यांच.त्याही आनंदाने काम करत होत्या.  प्रेमाने माझ्याकडे बघायच्या माझी अलाबला घ्यायच्या.  खूप खूप मजा आली.

गोखले आजींच्या कडे गेलेला  गणपती म्हणाला गोखले आजीना  दोन नातीच पण कोण कौतुक त्यांना. दोघी हुशार अभ्यासात तर हुशार आहेतच  शिवाय गायन, वादन, नृत्य यातही त्या पारंगत  आहेत. काय सुरेख नृत्य केलं त्यांनी. क्षणभर मलाही वाटले की आपणही त्यांच्याबरोबर नृत्य करावं.

पंत वाड्यातून परतलेला गणपती थोडा उदास होता शिसवी महिरपीचा खास गणपतीचा भला मोठा कोनाडा  त्यासमोर फळांचा मांडव. चांदीच्या समया पासून सगळ्या वस्तू चांदीच्या. भल्या मोठ्या वाड्यात दोनच व्यक्ती  राहतात . मुलं, सुना, नातवंडं  सगळी परदेशात. त्यामुळे वाडा अगदी उदास दिसत होता. त्यांनी माझा आगत स्वागत खूप चांगलं केलं, पण उदास वातावरणानं मलाही उदास वाटायला लागलं.घर कायम भरलेलं हवं असं मला वाटलं.

शांतीनगर मधून आलेला गणपती आला तोच मुळी कानात बोटं घालून. आल्या आल्या डोळे मिटून  शांत बसून राहिलेला होता. तो म्हणाला  काय तो कर्कश आवाज. ते गलीच्छ नाच.ते पाहून केव्हा एकदा आपण आपल्या घरी जातो असं वाटलं मला.कैलासाची,पार्वती मातेची मलाखूप  आठवण आली.

एक मोरया म्हणाला मी खरंच भाग्यवान बरं का! खाऊनपिऊन सुखी असलेल्या  मध्यमवर्गीय रोकडेंकडे  गेलो होतो मी.तिथे बाप लेक  अगदी मित्रासारखे वागत होते. सुना हंसतमुख होत्या.नातवंड आजी आजोबांबरोबर दंगा मस्ती करत होते.शुभंकरोती,रामरक्षा म्हणत होती. संध्याकाळी मला नमस्कार करून वडीलधार्यानाही नमस्कार करत होती. फारच छान वाटलं मला.त्या आजी माझ्याशी तासनतास बोलायच्या.नातवंडांना माझ्यासमोर उभं करून म्हणायच्या “मुलानो  पाहुण्यांपाशी बसा जरा.बोला त्याच्याशी.कसा आहेस तू,तुला घरची आठवण येते का विचारा त्याला.झोपण्यापूर्वी  त्या एकट्या माझ्याशी बोलायला बसायच्या.कुठं दुखतं खुपतं सांगायच्या.मग तोंडभर हंसून आपणच म्हणायच्या “मी कांही मागत नाही हो तुला! मी कुणापुढं बोलणार सांग ना!तेवढंच मन मोकळं झालं . तू सुखी रहा.बरं का म्हणजे आम्हालाही सुखी ठेवशील.हो ना!” 

गंमत म्हणून  विचारते.  आमच्या घरासाठी आम्ही तुझी निवड केली.खूष आहेस ना तू?  का तुला अमिताभ बच्चनच्या, तेंडुलकरच्या, आमदार,खासदारांच्या  घरात जावंस वाटत होतं??? आम्ही माणसं ना खूप सुंदर ,सुंदर  स्वप्नं पाहतो. ती पुरी होणार नाहीत हे माहीत असतं पण ” वचने कीं दरिर्द्रता  ”  हो की नाही?.स्वप्नंच ती. मग मोठी बघितली म्हणून  कुठं बिघडलं?  खूप हसायच्या त्या.मला भरपूर शिदोरी दिलीय.मी निघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले.खूप मस्त वाटलं मला. 

पहिला मोरया म्हणाला. खूप छान अनुभव सांगितले सगळ्यानी.असं वाटतं आपण प्रत्येकाची इच्छा पूर्ण  करावी.पण प्रत्येकाचं प्राक्तन असतं ना!त्यात  आपण देव असूनही ढवळाढवळ करू शकत नाही. 

सगळ्यात छोटा आवेकरांकडचा गणपती गंमतीनं  म्हणाला.आपलं प्राक्तनतरी कुठं चुकलंय.कुणाच्या घरी आपण जायचं हे आपण थोडच ठरवलं होतं?तसं असतं तर सगळेच लालबागचा राजा झाले असते.यावर एकच हंशा पिकला.  

आपण दरवर्षी विविध रुपात पृथ्वीवर  जातो.माणसाना आपल्या येण्याने थोडाफार आनंद मिळतो. त्यांचं सुखदुःख   ऐकतो.त्यात  सामिलही होतो.आपण परत येताना ते म्हणतात.” पुढल्यावर्षी लवकर या “.  आपणही एवढंच म्हणूया ….  

सर्वे सुखिनः सन्तु……

आणि पुढच्या वर्षाची वाट पाहू या.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ गाये लता, गाये लता, गाये लता गा! भाग -१ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

२८ सप्टेंबर १९२९ चा अत्यंत मंगलमय दिवस! या दिवशी घडलेली ‘न भूतो न भविष्यति’ अशी घटना! गंधर्वगायनाच्या पल्याड असलेले ‘लता मंगेशकर’ नामक सात अक्षररुपी चिरंतन स्वरविश्वाचे मूर्तरूप जन्माला आले.  अक्षय परमानंदाची बरसात करणारी स्वरशारदा लता आज संगीताच्या अक्षय अवकाशात ध्रुव ताऱ्यासारखी अढळपदी विराजमान झाली आहे. तिचे सूर अवकाशात असे कांही विखुरलेले आहेत की, ती या नश्वर जगात नसल्याचे जाणवतच नाही. ‘शापित गंधर्व’ दीनानाथ मंगेशकरांचा वारसा घेऊन लता आयुष्याचा प्रत्येक क्षण काटेरी वाटचाल करीत संगीताला समर्पित करूनच जगली. एखादी मूर्ती घडत असतांना टाकीचे घाव सहन करते, तसेच तिच्या आयुष्याची सुवर्णसांगता होण्याआधी तिने अगणित घाव सहन केले.  तिच्या संगतीने काम करणाऱ्या गायक, संगीतकार, गीतकार, सिनेसृष्टीतील अनेक व्यक्ती आणि बाबासाहेब पुरंदरे तसेच गो नी दांडेकरांसारख्या दिग्गजांच्या सहवासाने तिच्या व्यक्तिमत्वाला अन मखमली स्वरांना दैवी सुवर्णकांती प्राप्त झाली. लता आयुष्यभर एक अनोखी अन अनवट सप्तपदी चालली, सप्तसुरांबरोबर! 

मंगेशकर भावंडे म्हणजे आजच्या भाषेत मी म्हणेन, ‘मंगेशकर ब्रँड’ याला अन्य नसे उपमान! अन्य नसे पर्याय! दीनानाथ आणि माई (शेवंती) मंगेशकरांचे हे पंचप्राण होते, प्रत्येकाचा गुणविशेष निराळा.             लताच्या या साफल्याचे रहस्य होते लहानपणापासून आपल्या पित्याकडून, अर्थात मराठी संगीत नाटकांचे प्रसिद्ध गायक अभिनेता ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ यांच्याकडून वारसाहक्काने आणि शिक्षणातून आलेली संगीतविद्या, तिची स्वयंस्वरप्रज्ञा आणि कठोर स्वरसाधना! अजाणत्या वयापासूनच लताचे हे संगीतज्ञान तिच्या पिताला जाणवले होते. तेव्हांपासूनच त्यांनी तिच्या गायकीला समृद्ध केले. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच ती रंगमंचावर गायला लागली. १९४२ मध्ये त्यांचा अकाली मृत्यु झाला तेव्हां लता केवळ १३ वर्षांची होती. या कोवळ्या वयापासूनच ती भावंडांचा आधारवड झाली! संघर्षांची मालिका समोर होती, पण त्यांतूनच तिने हे काटेरी मार्गक्रमण केले.

प्रथम प्रसिद्धी मिळाली ती ‘महल'(१९४९) चित्रपटातील ‘आएगा आने वाला’ या गाण्याला! तेव्हा लता वीस वर्षांची होती आणि या चित्रपटाची नायिका मधुबाला होती सोळा वर्षांची. या चित्रपटामुळे या दोघींची कारकीर्द बरोबरच बहरली, एक स्वरसम्राज्ञी अन दुसरी सौंदर्यसम्राज्ञी! गंमत म्हणजे या गाण्याच्या रेकॉर्डप्लेअरवर गायिका म्हणून नाव होते ‘कामिनी’ (तेव्हा रजतपटावर गाणे साकार करणाऱ्या पात्राचे नाव लिहीत असत)! नंतर लतानेच संघर्ष करून रेकॉर्डप्लेअर वर नावच नव्हे तर रॉयल्टी, तसेच गायक गायिका यांना वेगवेगळे फिल्मफेअर पुरस्कार इत्यादी मिळवून त्यांना त्यांचे श्रेय मिळवून दिले! लता आणि सिनेसृष्टीची अमृतगाथा समांतर म्हणायला हरकत नाही. १९४० पासून ते अगदी २०२२ पर्यंत जवळपास ८० वर्षांची असलेली ही सांगीतिक सोबत. तिच्या सोबतचे गायक, गायिका, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, तंत्रज्ञ, वादक, दिग्दर्शक, निर्माते असे हजारोंच्यावर लोक तिच्या बरोबर मार्गक्रमण करते झाले, कोणी अर्ध्या वाटेवर सोडून गेलेत. आता तर तीही त्यांच्या सोबत गेली आहे. आता हा स्वरामृताचा वेलू गगनाला भिडलाय!

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचं गाणं इतकं ऐकलं तरी असं कां होतं? ‘अगंबाई, अरेच्चा, हे सुंदर गाणे आजवर ऐकले कसे नाही! आई शप्पथ, हे असं कसं मिस झालं!’ मंडळी, ही कथा प्रत्येक रसिकाचीच असावी, इतके हे स्वरभांडार विशाल आहे. आणिक एक वेगळीच गंमत आहे हिच्या जादुई स्वरांत! ऋतूबदलाप्रमाणे आपल्या बदलत्या मूडनुसार आपल्यासाठी लताच्या आवाजाचे पोत बदलल्याचा आपल्याला भास होतो. खरे पाहिले तर एकदा ऐकून हा स्वरानंद आपल्या हृदयात झिरपत नाही असे असावे! बघा ना, आज जर माझा मूड ऑफ आहे, तर या अमुक गाण्यात लताचा आवाज मला जास्तच शोकविव्हल लागलाय असा फील येतो. काय म्हणू या बहुरंगी, बहुढंगी, फुलपाखरी आवाजाच्या कळांना, या स्वरांबद्दल बोलायचे तर संत तुकारामांची रचना आठवली, ‘कमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीतसे’! तिला काय माहिती की, तिने आमचे आयुष्य किती अन कसे समृद्ध केले ते! तिच्या आवाजाने समृद्ध झालेल्या ३६ भाषांपैकी कुठली बी भाषा असू द्या, या एकाच आवाजात ती भाषाच धन्य होईल अशी गाणी, एकदम ओरिजिनल लहेजा आणि स्वराघात! लता तू वरून काय घेऊन आलीस अन इथे काय शिकलीस, याचा अचेतन हिशोब करणे म्हणजे तारे मोजण्यापेक्षा दुष्कर. त्यापेक्षा सच्च्या रसिकांनी एक ऍटिट्यूड (वर्तमान संदर्भात नव्हे) ठेवावा, ‘आम खाओ, पेड मत गिनो’. फक्त तिच्या गाण्यावर फिदा व्हायचे, की विषय तिथंच आटोपला!

तिने दयाबुद्धीने कांही प्रांत अगदी तिच्या आवाक्यात होते तरी सोडले, शास्त्रीय संगीत अन नाट्यसंगीत. (यू ट्यूब वर आहेत मोजके)! दत्ता डावजेकर यांनी नमूद केल्याप्रमाणे जिच्या नांवातच लय आणि ताल आहे, जिच्या गाण्याने ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतात, जिने ‘आनंदघन’ या नावाने मोजक्याच (चार) चित्रपटांना संगीत देऊन तमाम संगीतकारांवर उपकार केलेत, जिने शास्त्रीय संगीताचे उच्चशिक्षण घेऊन, त्यात प्राविण्य संपादून देखील व्यावसायिकरित्या शास्त्रीय संगीताच्या बैठकी सजवल्या नाहीत (प्रस्थापित शास्त्रीय गायकांनी देखील तिचे याकरता जाहीररीत्या आभार मानलेले आहेत!), तिच्याबद्दल संगीतकार वनराज भाटिया म्हणतात, ’she is composer’s dream!’ कुठल्याही संगीतकाराची गाणी असोत, खेमचंद प्रकाश, नौशाद, अनिल बिस्वास, ग़ुलाम मोहम्मद, सज्जाद हुसैन, मदनमोहन, जमाल सेन यांच्यासारख्या दिग्गजांची कठीण चालींची, सलिलदा किंवा सचिनदांच्या लोकसंगीतावर आधारित असलेली, वसंत देसाई, सी. रामचंद्र, रोशन अन शंकर जयकिशन यांच्या अभिजात संगीताने नटलेली, की आर डी, ए आर रहमान, लक्ष्मी प्यारे, कल्याणजी आनंदजीची आधुनिक गीते असोत, त्या गाण्याला लताचा परीसरुपी स्वरगंधार लाभला की, त्याची झळाळी नवनवीन सुवर्ण उन्मेष घेऊन रसिकांच्या कलेज्याचा ठाव घ्यायची. अतिशय कठीण अन घनगंभीर चाली रचून लताकडून असंख्य रिहर्सल करून घेणारा संगीतकार सज्जाद हुसैन तर म्हणायचा, ‘फक्त लताच माझी गाणी म्हणू शकते!’

ही स्वरवल्लरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षा वरचढ! कुठलाही रोग असू देत, हिच्याजवळ गाण्याच्या रूपात औषध हाजिर है! बरे यात ‘औषध मजला नलगे’ चे बहाणे अजिबात चालायचे नाहीत. लहान मुलीचे ‘बच्चे मन के सच्चे’, १६ वर्षांच्या नवयौवनेचे ‘जा जा जा मेरे बचपन’, विवाहितेचे ‘तुम्ही मेरी मंजिल’, समर्पितेचे ‘छुपा लो यूं  दिल में प्यार मेरा’, तर एका रुपगर्वितेचे, ‘प्यार किया तो डरना क्या’, एका मातेचे ‘चंदा है तू’, एका क्लब डांसरचे (आहे मंडळी) ‘आ जाने ना’ एका भक्तिरसाने परिपूर्ण अशा भाविकेचे, ‘अल्ला तेरो नाम’, एका जाज्वल्य राष्ट्राभिमानी स्त्रीचे, ‘ऐ  मेरे वतन के लोगों’! अशी ही किती म्हणून लताच्या मधुमधुरा स्वरमाधुरीची बहुरंगी स्त्रीरूपे आठवावीत? 

क्रमशः…

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “डीजेवाले बाबू … मला अंध नका करू…” – लेखक : डॉ. गणेश भामरे / डॉ. सचिन कासलीवाल ☆ प्रस्तुती – डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ “डीजेवाले बाबू … मला अंध नका करू…” – लेखक : डॉ. गणेश भामरे / डॉ. सचिन कासलीवाल ☆ प्रस्तुती – डॉ. प्राप्ती गुणे ☆

कालच अनंत चतुर्दशी आनंदात पार  पडली आपल्या लाडक्या गणरायाला आपण आनंदात विसर्जित केलं. ढोल ताशा आणि हा … आत्ता सध्या  D  J च्या   ट्रेण्डिंग  गजरात आपण नाचत, थिरकत गणपती बाप्पाला निरोप दिला !

दुसर्‍याच दिवशी मी नेहमीप्रमाणे ओपीडी मध्ये नेत्ररोगाचे रुग्ण पाहू लागलो. थोड्या वेळात एक विशीतला तरुण काल अचानक दिसायला कमी झालं म्हणून आला. प्राथमिक तपासणी करून बघितली तर त्याची नजर खूपच कमी झाली होती.  मग डोळ्याचे pressure घेऊन त्याला नेत्रपटल तपासणीसाठी घेतले.  बघतो तर काय त्याच्या नेत्रपटलावर खूप मोठे रक्त साखळले होते आणि नेत्रपटलावर भाजल्यासारख्या जखमा आढळल्या. 

नेहमीप्रमाणे वाटणारा हा आजार नव्हता याची मला जाणीव झाली. मग फेर हिस्टरी तपासणीत त्याला विचारलं की काही मार लागला होता का?  किंवा तू काही ग्रहण बघितले का? की कुठे वेल्डिंग बघितले? तर यातील काहीच पॉझिटिव्ह नव्हते . खोलवर विचार केल्यावर त्याने सांगितलं की काल मिरवणुकीत नाचलो आणि D J वर लेसर शो बघितला.  

मग मनात पाल चुकचुकली आणि लेसर शोचा लेसर बर्न रेटिना वर असल्याची खात्री पटली. मग रेटिनाचा O C T स्कॅन करून माझं निदान कन्फर्म केलं. पुढील दोन तासात असेच जून दोन रुग्ण आलेत.  त्यांना पण रेटिनावर याच प्रकारचे चित्र दिसले. मग मात्र मी आमच्या नेत्ररोग संघटनेच्या माध्यमातून विचारपूस केली असता अजून दोन हॉस्पिटलला असेच रुग्ण आहेत असे निदर्शनात आले.

बापरे ! म्हणजे ५ च्यावर तरुण एकाच दिवशी DJ लेसर शोचे शिकार झालेले पाहिले. यातील बरेच जण अजून कदाचित रिपोर्ट झालेले नसतील किंवा दुसऱ्या डिस्ट्रिक्टचे असतील. हा आकडा याहून जास्त प्रमाणात असावा .. नेत्रपटलावर आम्ही या प्रकारचे लेसर बर्न क्वचितच बघितले असावेत. 

हा काहीतरी भलताच प्रकार समोर आला आणि जनजागृतीसाठी हा पत्रप्रपंच केला. मग प्रश्न पडला की, ठराविक लोकांनाच असे का झाले. याचा खोलवर अभ्यास केला आणि कळाले की या green लेसरचे frequency खूप जास्त होती आणि जे युवक त्या लेसर च्या frequency च्या फोकल लेंग्थवर आलेत किंवा त्यांचे नेत्रपटल आले, त्यांनाच हे प्रकार घडले. आपण लहानपणी भिंग घेऊन ज्याप्रमाणे उन्हात कागद पेटवायचो तसाच  प्रकार या लेसरने या तरुणाईवर केला होता.

असल्या लेसर वापरावर बंदी आणण्याची गरज आहे. नाहीतर याचे भयंकर परिणाम पुढील नवरात्र आणि दिवाळीत दिसतील आणि कित्येक निष्पाप लोकांची नजर यात जाईल. आपल्याकडच्या भाऊ ,दादा आणि राजकारणी चमकोगिरीसाठी वापरण्यात येणाऱ्या DJ लेसरचा इतका वाईट परिणाम सामान्य नागरिकांवर होईल याची यत् किंचित कल्पना पण करवत नाही. 

या सगळ्या तरुणांना आणि तरुणींना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या करियरसाठी किती भयावह असेल?  यातील बरीच मंडळी उच्च शिक्षण घेणारी होती. 

प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि वेळीच हा प्रकार थांबवावा. नाहीतर लातूरच्या अनंत चतुर्दशीच्या भूकंपाप्रमाणे अंधत्वाचा भूकंप आपली वाट बघत आपल्या तरुण पिढीचा घास घेईल.

लेखक : 

डॉक्टर गणेश भामरे (रेटिना स्पेशालिस्ट )

डॉक्टर सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ज्ञ )

 जनहितार्थ : नाशिक नेत्ररोग तज्ञ संघटना ) 

संग्राहिका –  डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्याचे वैभव समजली जाणारी ‘ महात्मा फुले मंडई ‘ ही १४२ वर्षे पूर्ण होऊन १४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 

इ. स. १८८० साली पुण्याची लोकसंख्या ९०,००० होती.  पुण्यात बंदिस्त जागेत एक मोठी मंडई उभी झाली पाहिजे, म्हणून सन १८८२ साली पुणे नगर पालिकेत एक ठराव झाला.  त्याला महात्मा फुले व चिपळूणकरांनी विरोध केला होता. पण बहुमताच्या जोरावर तो ठराव पास झाला. 

सरदार खासगीवाले यांची बाग-वजा ४ एकर जागा ही ४०,०००रुपयांना खरेदी केली गेली होती  व त्यावेळेचे बांधकाम अभियंते वासुदेव बापूजी कानिटकर यांनी केले होते. या कामासाठी ३ लक्ष रुपये खर्च आला होता. 

या कामासाठीचा  वाहतूक खर्च कमी व्हावा म्हणून पिंपरी चिंचवड येथून सिमेंट, चुना, बेसॉल्ट दगड आणले गेले होते. ह्यावरील खांबांवर ग्रीक पानांची नक्षी आहे. रोमन शैलीमध्ये हे बांधकाम केले गेले. ते अष्टकोनी असून मध्यभागी कळस आहे, जो ८० फूट उंचीचा आहे. 

१ ऑक्टोबर १८८६ रोजी  मुंबईचे गव्हर्नर जनरल रे यांच्या हस्ते या मंडईचे उद्घाटन झाले होते. त्यांच्याच नावावरून या मंडईला तेव्हा “ रे मार्केट “ हे नाव दिले गेले होते. पुढे सन १९३९/४० मध्ये आचार्य अत्रे यांनी तिचे “ महात्मा फुले मंडई “  असे नामकरण केले.

मंडईला ‘ मंडई विद्यापीठ ‘ हे नाव काकासाहेब गाडगीळ यांनी दिले,  कारण इथे खरेदी करायला येणारा असो की व्यवसाय करणारा असो,  कुणीच कधीच व्यवहारात चुकत नाही, अशी तेव्हा या मंडईची ख्याती होती. नंतर बऱ्याच वर्षांनी ही इमारत अपुरी पडायला लागल्याने या मूळ इमारतीच्या शेजारीच आणखी एक मोठी जागा घेऊन तिथेही भाजी बाजार भरायला सुरुवात झाली, ज्याला सुरुवातीला ‘ नवी मंडई ‘ असे म्हटले जात असे. 

या जागेला लागूनच असलेल्या एका प्रशस्त जागेत गेली अनेक वर्षे सार्वजनिक मंडई मंडळाचा गणपती ठेवला जातो. आणि श्री शारदेसह झोपाळ्यावर बसलेली ही मोठी गणेश मूर्ती हे अनेक पुणेकरांचे एक श्रद्धास्थान आहे, जिथे गणेशोत्सवात दर्शनासाठी पुणेकर प्रचंड गर्दी करतात. 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares