ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ६ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ६ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

प्रसिद्ध मराठी लेखिका श्रीमती कमला फडके यांचा आज स्मृतिदिन. ( ४/८/१९१६ – ६/७/१९८० ) 

त्या काळचे सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक श्री. ना. सी. फडके यांच्या सुविद्य पत्नी , आणि सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांची धाकटी बहीण , अशी ठळक ओळख असणाऱ्या कमला फडके यांनी स्वतःच्या समृद्ध लेखनामुळे साहित्यविश्वाला स्वतःची “ उत्तम लेखिका “ अशी पूर्णपणे स्वतंत्र आणि तितकीच ठळक ओळख करून दिली होती. 

ना. सी. फडके यांच्या “ झंकार “ या साप्ताहिकात कमलाताईंचे लेख , कथा , मुलाखती हळूहळू प्रसिद्ध होऊ लागल्या, आणि त्यांच्यातली लेखिका वाचकांसमोर आली. पुढे याच साप्ताहिकात इंग्रजी साहित्याचा परिचय करून देणारे त्यांचे एक वेगळे सदर प्रसिद्ध होऊ लागले , आणि लेखिका म्हणून त्यांची खरी ओळख निर्माण झाली. अनंत अंतरकर यांच्या ` हंस ` आणि ` मोहिनी ` या सुप्रसिद्ध मासिकांमध्ये त्यांच्या अनेक विनोदी कथा प्रसिद्ध झाल्या. तसेच इतर कथा ` किर्लोस्कर ` आणि ` स्त्री ` मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या. 

लेखनासोबतच त्यांनी नागभूषण नावाच्या प्रख्यात गुरूंकडून कथक नृत्याचेही शिक्षण घेतले होते. तसेच ना. सी. फडके यांच्या “ जानकी “ या नाटकातली मुख्य भूमिकाही त्यांनी समर्थपणे साकारली होती, ज्याचे चिंतामणराव कोल्हटकरांसारख्या मान्यवरांनी कौतुक केले होते. आणि या दोन्ही गोष्टी विशेषत्वाने सांगण्यासारख्या आहेत.

त्यांचे वैविध्यपूर्ण असे प्रकाशित साहित्य :— 

 १. आसावरी – ही संगीत-विश्वावर आधारित कादंबरी 

 २. ` उटकमंडची यात्रा ` आणि ` त्रिवेंद्रमची सफर ` – ही दोन प्रवासवर्णने 

 ३. एडमार पो यांच्या भयकथा — हा अनुवादित कथासंग्रह 

 ४. जेव्हा रानवारा शीळ घालतो —  कादंबरी 

 ५. थोरांच्या सहचारिणी – लेखसंग्रह 

 ६. धुक्यात हरवली वाट – कादंबरी 

 ७. निष्कलंक – अनुवादित कादंबरी – मूळ लेखक हिल्टन 

 ८. पाचवे पाऊल – एका अणुशास्त्रज्ञाच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

 ९. प्रा. फडके यांची गाजलेली भाषणे – संकलन व संपादन 

१०. बंधन – मिरजेच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका डॉक्टरच्या आयुष्यावर आधारित कादंबरी 

११. भूल – हातून चुकून झालेल्या खुनाची किंमत चुकवणाऱ्या एका पुरुषाची कथा सांगणारी कादंबरी 

१२. मकरंद – कथासंग्रह 

१३. हृदयाची हाक — १९७१ साली जगातली पहिली हृदयरोपणाची शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड यांच्या 

     “ One Life “ या इंग्रजीतील आत्मकथनाचा मराठी अनुवाद 

१४. ओशो, म्हणजेच आचार्य रजनीश यांच्या अनेक इंग्रजी पुस्तकांचे मराठीत केलेले अनुवाद 

–यापैकी “ निष्कलंक “ या त्यांच्या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात खास पारितोषिक देऊन 

गौरविण्यात आले होते. 

असे विविधांगी लेखन करणाऱ्या श्रीमती कमला फडके यांना त्यांच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली . 🙏

☆☆☆☆☆

इतिहास-संशोधक म्हणून अधिकतर प्रसिद्ध झालेले श्री. पांडुरंग नरसिंह पटवर्धन यांचाही आज स्मृतिदिन. 

( ५/१/१८८६ – ६/७/१९२१ ) 

पुण्याच्या ` भारत इतिहास संशोधक मंडळात ` सदस्य म्हणून कार्यरत असतांना श्री. पटवर्धन यांचे त्या मंडळाच्या वृत्तांमध्ये आणि त्रैमासिकांमधून इतिहासविषयक अनेक लेख सातत्याने प्रकाशित होत असत. 

याच्याच जोडीने “ राष्ट्रहितैषी “ नावाचे साप्ताहिकही त्यांनी बराच काळ चालवले होते. 

“ राष्ट्रकुटांचा पुणे ताम्रपट “ हाही त्यांनीच प्रकाशित केला होता. 

त्यांचे विशेषत्वाने सांगायला हवे असे पुस्तक म्हणजे “ बुंदेल्यांची बखर “ हे त्यांनी अनुवादित केलेले पुस्तक —

“ तारिखे दिलकुशा “ हे भीमसेन सक्सेना लिखित एक फारसी हस्तलिखित होते. कॅप्टन जोनाथन स्कॉट यांनी १८७४ मध्ये त्याचा इंग्रजी अनुवाद केला होता. आणि १९२० साली श्री. पटवर्धन यांनी त्याचा मराठीत केलेला अनुवाद म्हणजे हे पुस्तक . 

इतिहास संशोधनासाठी केले जाणारे काम लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने उत्तम लेखन करणाऱ्या श्री. पटवर्धन यांना विनम्र आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ५ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ५ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाबूराव अर्नाळकर

चंद्रकांत सखाराम चव्हाण हे मूळ नाव असलेले प्रसिद्ध मराठी रहस्यकथा लेखक म्हणजेच बाबूराव अर्नाळकर! आयुष्यभर त्यांनी याच टोपणनावाने लेखन केले.

त्यांचे शिक्षण फक्त मॅट्रीक पर्यंत झाले होते.पण वाचकांच्या सर्वख थराला आवडतील अशा 1042 रहस्यकथा लिहून त्यांनी लोकांमध्ये वाचनाची गोडी लावली. ज्या काळात ना.सि.फडके,साने गुरुजी,वि.स.खांडेकर यांचा खूप मोठा वाचक वर्ग होता,त्या काळात अर्नाळकर यांनी आपलाही एक वाचक वर्ग तयार केला होता. विजयदुर्ग किल्ल्यावरून परतताना त्यांना एक कथा सुचली.ती कथा म्हणजे ‘सतीची समाधी’.त्यांची ही पहिली कथा करमणूक मासिकातून प्रसिद्ध झाला.ज्येष्ठ लेखक नाथमाधव यांच्या वाचनात ही कथा आली.त्यांनीच अर्नाळकर यांना रहस्यकथा लिहायला प्रोत्साहन दिले.तेव्हापासून बाबूरावांनी अखेरपर्यंत आपली लेखणी रहस्यकथांसाठी वाहून घेतली.नाथमाधव यांच्याप्रमाणेच त्यांना आचार्य अत्रे,यशवंतराव चव्हाण,अनंत काणेकर,पु.ल.देशपांडे,वि.भि. कोलते यांनी लेखनासाठी प्रोत्साहन दिले.

त्यांनी 1942 च्या चळवळीतही भाग घेतला होता.तसेच स्वा.सावरकरांच्या आवाहनानुसार त्यांनी 1946 ते1948 या काळात सैन्यात काम केले होते.त्या दोन वर्षानंतर त्यांनी पुन्हा लेखन चालू ठेवले.

त्यांच्या कथा पाश्चिमात्य कथांवर आधारित असल्या तरी त्याला मराठी समाजजीवनाचे सुंदर रूप दिलेले असल्यामुळे त्या अस्सल देशीच वाटत असत.त्यांच्या प्रत्येक कथेचा शेवट ‘सत्यमेव जयते’ ने होत असे.

त्यांच्या पाचशे कथांचे लेखन झाल्यावर महाराष्ट्र शासनाने 10,000/रूपये देऊन त्यांचा सन्मान केला होता.

पोलिस अधिकारी आनंदराव, चंद्रवदन उर्फ काळापहाड, कृष्णकुमारी, चारूहास, धनंजय, छोटू, पंढरीनाथ, झुंजार, दर्यासारंग ही त्यांची वारंवार येणारी लोकप्रिय पात्रे !

त्यांच्या कथा लता मंगेशकर, बालगंधर्व यांच्याकडून रसिकतेने वाचल्या जात असत.

त्यांची काही पुस्तके: कृष्णसर्प, काळापहाड, कालकन्या, कर्दनकाळ, अकरावा अवतार, ज्वालामुखी, चौकटची राणी, वेताळ टेकडी, रूद्रावतार, भद्रंभद्र, भीमसेन, मृत्यूचा डाव, राजरहस्य, चोरांची दुनिया इत्यादी.

वयाच्या 90 व्या वर्षी 05/07/1996 ला त्यांचे दुःखद निधन झाले व मराठी रहस्यकथांचे एक पर्व अस्तास गेले.

त्यांच्या स्मृतीस अभिवादन 🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ४ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ४ जुलै – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

र. वा. दिघे

रघुनाथ वामन दिघे (25 मार्च 1896 – 4 जुलै 1980) हे ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडणारे साहित्यिक होते.

ते बी.ए., एलएल. बी. होते. त्यांनी पुणे व पनवेल येथे 16 वर्षे वकिली केली. नंतर ते खोपोलीजवळच्या विहारी येथे राहून लेखन व शेती करू लागले.

 ते हाडाचे शेतकरी होते. कोकणात न पिकणारा गहू आपल्या शेतात पिकवून दाखवल्याबद्दल 1954-55 साली खालापूर तालुका विकास संघाने ‘प्रगतशील शेतकरी’म्हणून त्यांचा गौरव केला.

1940-45 साली र. वां. नी शेतकऱ्यांच्या कळीचे प्रश्न आपल्या लेखनातून मांडले. आता शेतकरी आत्महत्या करत आहेत. हा इशारा र. वां.नी त्याकाळीच दिला होता. ‘फक्त शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी जोडधंदा करा’, ‘ पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे विचार त्यांनी त्याकाळी आपल्या कादंबऱ्यांतून मांडले होते.

त्यांच्या कादंबऱ्या बहुधा ग्रामीण पार्श्वभूमीवरील असत. त्यांचे नायक शेतकरी व वारकरी असत. ते संतांच्या शिकवणीनुसार नैसर्गिक आपत्तींशी झगडा देत.

त्यांच्या साहित्यात नाट्यपूर्ण, साहसी घटना, अद्भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णन, ठसठशीत व्यक्तिदर्शन व ग्रामीण जीवन यांचे प्रत्ययकारी चित्रण आढळते.

र. वां.नी ‘पानकळा’, ‘आई आहे शेतात’, ‘कार्तिकी’, ‘पड रे पाण्या’, ‘निसर्गकन्या रानजाई’, ‘गानलुब्धा मृगनयना’ वगैरे 11 कादंबऱ्या,’सोनकी’, ‘रम्यरात्री’, ‘पूर्तता’ इत्यादी 6 कथासंग्रह, ‘माझा सबूद’, ‘द ड्रीम दॅट व्हॅनिश्ड'(इंग्रजी) इत्यादी 3 नाटके व ‘गातात व नाचतात धरतीची लेकरं’ हा लोकगीतसंग्रह एवढे बहुविध साहित्य लिहिले आहे. त्यांची अपूर्ण राहिलेली ‘हिरवा सण’ ही कादंबरी त्यांचे मित्र ग. ल . ठोकळ यांनी नंतर पूर्ण केली.

त्यांच्या ‘पाणकळा’वर ‘मदहोश’ व ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा मराठी चित्रपट आला.

र. वां.च्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा ‘कादंबरीकार र. वा. दिघे’ हा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर यांनी लिहिला आहे.

डॉ. आनंद यादव यांच्या मार्गदर्शनाखाली र. वा. दिघे यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून ठाकूर यांनी पीएच.डी. मिळवली.

1940 साली जमखिंडी येथील दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांची ‘रणांगण’ व ‘र. वां.ची ‘पाणकळा’ या दोन कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला.

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी र. वां.चा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव केला.

अशा र. वा. दिघेंचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त  त्यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया, अक्षरनामा. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २ जुलै – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

मराठी लेखक, अनुवादक, रूपांतरकार, नाट्यलेखक, निर्माता, दिग्दर्शक, संस्थाचालक, नाट्य-चित्रपटसृष्टीतील अभिनेता , अशी अनेकांगी ओळख असणारे श्री. मधुकर तोरडमल यांचा आज स्मृतिदिन. (२४/७/१९३२ – २/७/२०१७)

श्री. तोरडमल यांच्या अभिनयाची सुरुवात शाळेपासूनच झाली होती. मुंबईतल्या पोद्दार शाळेत पहिल्या दिवशी स्वत:ची ओळख करून देत असतांनाच, आपल्याला नाटकात काम करण्याचा छंद असल्याचे त्यांनी वर्गशिक्षिकेला सांगितले. ते लक्षात ठेवून बाईंनी त्यावर्षीच्या गणेशोत्सवात एका नाटकाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवली, आणि त्यांनी चिं.वि.जोशी लिखित ‘प्रतिज्ञापूर्ती’ हे नाटक बसवले-  दिग्दर्शन आणि अभिनयही त्यांनीच केला… आणि मग शाळेत असेपर्यंत गॅदरिंग किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी नाटक बसवण्याची  जबाबदारी दरवर्षी त्यांच्यावरच सोपवण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आधी मुंबईतच एका कंपनीत कारकूनी केली… आणि तिथून नगरला येऊन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते रूजू झाले….  राज्यनाट्य स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. तेव्हा  ‘एक होता म्हातारा’ या नाटकात साकारलेल्या ‘बळीमामा’ या भूमिकेमुळे, सगळे त्यांना ‘मामा’ म्हणायला लागले आणि तेव्हापासून ते अवघ्या नाट्यसृष्टीचे मामा झाले. — इथूनच पुढे व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचा प्रवेश झाला. प्राध्यापकी आणि नाटक ही कसरतच होती. शेवटी नाटकाला प्राधान्य देत ते पुन्हा मुंबईला आले. आणि नाट्यक्षेत्रात आपला चांगलाच जम बसवला.

‘मामा’ हेच नाव अनेकांच्या तोंडी झाल्याने त्यांनी पुढच्या आयुष्यातल्या आठवणी “ उत्तरमामायण “ या त्यांच्या पुस्तकात सांगितल्या आहेत.

त्यांचं  नाव ऐकताच लगेचच आठवतं ते “ तरुण तुर्क म्हातारे अर्क “ हे नाटक आणि त्यात मामांनी अजरामर करून ठेवलेली प्रो.बारटक्के यांची भूमिका. या नाटकाचे ५००० हून जास्त प्रयोग झाले. सुरुवातीला काही समीक्षकांनी ‘‘ सुशिक्षित-सुसंस्कृत स्त्रियांनी हे नाटक बघू नये ’’ असे जाहीरपणे सांगितले, पण त्याचा परिणाम उलटाच झाला.. रसिकांची उत्सुकता वाढली. तिकिटासाठी रांगा लागायला लागल्या. या एकाच नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग होणे ही आश्चर्यकारक गोष्टच होती. विशेष म्हणजे – त्या  दिवशी सकाळच्या प्रयोगाला श्री. बाळ ठाकरे, दुपारी श्री. ग.दि.माडगूळकर, आणि रात्री वसंत देसाई या दिग्गजांनी सहकुटुंब हजेरी लावली होती.

याचबरोबर तेव्हाच्या सुप्रसिद्ध असणा-या चार नाट्यसंस्थांतर्फे सादर केल्या गेलेल्या अनेक नाटकातूनही  त्यांनी कामे केली. ‘अखेरचा सवाल’, ‘गुड बाय डॉक्टर’, काळं बेट लाल बत्ती’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘मत्स्यगंधा’, ‘मृगतृष्णा’ ही त्यातली काही गाजलेली नाटके होत. त्यांनी स्वत:ची `रसिकरंजन` नावाची नाट्यसंस्थाही सुरू केली होती.

आत्मविश्वास, सिंहासन आणि अशाच काही चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकांनाही रसिकमान्यता मिळालेली होती. ‘संघर्ष’ या दूरचित्रवाणीच्या मालिकेतही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.

र.धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचा आणि अगाथा ख्रिस्ती या लेखिकेच्या २७ इंग्रजी कादंब-यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे. या व्यतिरिक्त, १५ नाटके, “आयुष्य पेलतांना “ ही रूपांतरीत कादंबरी, “ तिसरी घंटा “ हे आत्मचरित्र,  असे विपुल लेखन त्यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाचा २००९-१० साठीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा नाट्यपुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले होते . २००३ ला नगरला झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते उद्घाटक होते .

मामा तोरडमल या अक्षरश: चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी आदरपूर्वक श्रद्धांजली. 🙏

☆☆☆☆☆

नामवंत शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रा. रामचंद्र महादेव तथा राम बापट यांचा आज स्मृतिदिन. (१८/११/१९३१ – २/७/२०१२) .

श्री. राम बापट यांची ख्याती प्रामुख्याने एक मराठी लोकाभिमुख विचारवंत आणि राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक अशी होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींमधील कितीतरी नेते आणि कार्यकर्ते पन्नासहून जास्त वर्षे त्यांच्या सतत संपर्कात होते. त्यातील बऱ्याच चळवळींचे आणि संघटनांचे ते स्वतः सर्वेसर्वा होते. पण पेशाने मात्र ते एक हाडाचे शिक्षक होते. पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विभागात सन १९६५ ते १९९१ इतका प्रदीर्घ काळ ते आधी व्याख्याता म्हणून , मग प्रपाठक म्हणून आणि नंतर विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रं त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यामुळे गाजली होती. त्यांची रसाळ व्याख्याने , आणि त्यातून गुंतागुंतीचे तत्वविचार मांडण्याची त्यांची हातोटी महाराष्ट्राची वैचारिक परंपरा पुढे नेणारी होती असे त्यांच्याबद्दल गौरवपूर्वक म्हटले जायचे. तसेच “ मौखिक परंपरेचे पाईक “ असेही त्यांच्या कार्याबद्दल बोलतांना आवर्जून म्हटले जायचे.

खरं तर एक सच्चा लोकशिक्षक हीच भूमिका मनापासून स्वीकारत त्यांनी “ लोकशिक्षणाचे “ जणू व्रतच अंगिकारले होते असे म्हणणे जास्त उचित ठरेल . समाज-सुधारणांच्या बाबतीत  “ एक समाज-शिक्षक “ म्हणून त्यांचे योगदान फार महत्वाचे होते. विशेषतः दलित ,आदिवासी , मागासवर्गीय समाज आणि त्याचबरोबर पर्यावरण रक्षण , याविषयीच्या चळवळींमध्ये त्यांना जास्त रस होता. त्यांनी अनेकांना नवा विचार करण्याची प्रेरणा तर दिलीच. त्याचबरोबर वैचारिक क्षेत्रात नवनव्या विषयांचा परिचयही लोकांना करून दिला. शिक्षण , मार्गदर्शन , आणि प्रबोधन या माध्यमातून तरुण सामाजिक कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात त्यांचा मोठा आणि मोलाचा सहभाग होता.

याबरोबरच , नाट्यशास्त्र , कला , सौंदर्यशास्त्र , संरक्षणशास्त्र , या विषयांचाही त्यांचा सखोल अभ्यास होता , आणि या संदर्भातही त्यांनी अनेक व्याख्याने दिली होती. त्यांच्या एकूण भाषणांची संख्या हजारातच मोजावी लागेल.

त्यांच्या असामान्य विचारशक्तीचा देशभरात लौकिक होता.

त्यांच्या लिखाणाचा विचार करता त्यांना “ एका वेगळ्या पठडीतले साहित्यिक असंच म्हणायला हवं. त्यांचे प्रकाशित साहित्य असे —-

१) “ परामर्श “ – हा त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकांसाठी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण अशा सहा प्रस्तावनांचा संग्रह आहे, आणि या संग्रहाला “ उत्कृष्ट मराठी गद्य “ म्हणून पुरस्कार दिल गेला आहे.

२) “ राज्यसंस्था  , भांडवलशाही , आणि पर्यावरणवाद “ या पुस्तकात त्यांचे काही लेख आणि व्याख्याने यांचा समावेश केलेल्या आहे.

३) “ भारतीय राजकारण : मर्म आणि वर्म “ १९९७ साली नाशिकमध्ये झालेल्या चौथ्या  “ विचारवेध “ संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

थोर विचारवंत म्हणून ख्यातनाम झालेल्या श्री. राम बापट यांना मनःपूर्वक आदरांजली. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १ जुलै – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

गणेश हरि पाटील 

“कळीचे फूल झालेले पाहणे व लहान मुलांच्या मनाचा विकास झालेला पाहणे यासारखे दुसरे सुंदर व मनोगत दृश्य नाही.”

हे विचार आहेत लेखक व कवी गणेश हरि पाटील यांचे , जे ग.ह.पाटील या नावानेच प्रसिद्ध होते.मुलांचे भावविश्व जाणून घेवून त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे आजही फुलांसारखे ताजे टवटवीत वाटते.देवा तुझे किती सुंदर आकाश,पाखरांची शाळा भरे पिंपळावरती,शर आला तो धावून आला काळ,डरांव डरांव का ओरडता, छान किती दिसते फुलपाखरू या कविता आठवतात ना ? या सर्वांचे कवी आहेत ग.ह.पाटील.

त्यांची काही पुस्तके:बालशारदा,रानजाई,पाखरांची शाळा,लिंबोळ्या,एका कर्मवीराची कहाणी,आधुनिक शिक्षण शाळा,गस्तवाल्याची गीते इ.

ग.ह.पाटील यांचे निधन वयाच्या 83 व्या वर्षी 01/07/1989 ला झाले.त्यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेत त्यांचे स्मरण करू.

☆☆☆☆☆

लक्ष्मण नारायण जोशी

ल.ना.जोशी हे ऐतिहासिक आख्यायिकांचे संग्राहक,लेखक,ग्रंथसंपादक व पत्रकार होते.त्यांनी मॅट्रीक नंतर पशूवैद्यकशास्त्र शिक्षण घेतले.

सुरूवातीला त्यांनी ‘इंदुप्रकाश’ व ‘गुराखी’ या पत्रांतून लेखन केले.त्या काळात केलेल्या लेखनामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला व त्यांना तुरूंगवास भोगावा लागला.त्यानंतर मात्र त्यांनी पूर्णवेळ लेखन सुरू केले.त्यांनी विविध एकवीस विषयांवर सुमारे दीडशे पुस्तके लिहिली आहेत.

त्यांच्या लेखनाची विविधता अशी:

चरित्रलेखन: संत एकनाथ, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, बाजीराव,महाराणा प्रताप इ.

भाषांतरे: अथर्ववेदाचे अन्वयासहित भाषांतर,ऋग्वेदाचे कविताबद्ध रूपांतर,धर्मसिंधु,सार्थ छंदोबद्ध पुरूषसूक्त व शेक्सपियरच्या तीन नाटकांचे भाषांतर. इ

स्वतंत्र लेखन : धंदे शिक्षण,फलाहारचिकित्सा,सचित्र ब्रह्मयोग विद्याशिक्षण,लोकमान्यांचा स्वर्गीय संदेश, विनोदलहरी, शांतिनिकेतनमाला, सुगंधी शिक्षक, वर्णजल चिकित्सा शिक्षक  इत्यादी.

याशिवाय त्यांनी अकरा कादंब-या लिहील्या आहेत.

असे हे चतुरस्त्र लेखक वयाच्या 74 व्या वर्षी 01/07/1947 रोजी निधन पावले.त्यांना जाऊन इतका काळ लोटला असला तरी त्यांच्या समृद्ध लेखनामुळे ते अमरच आहेत.त्यांच्या स्मृतीस वंदन!

☆☆☆☆☆

रामचंद्र चिंतामण ढेरे

रा.चिं.ढेरे हे मराठी इतिहास संशोधक व लेखक होते.प्राच्यविद्या संशोधनात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.सांस्कृतिक इतिहास या विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.त्यांचे अनेक संशोधकांनात्मक लेख प्रसिद्ध झाले आहेत व त्यांना सार्वत्रिक मान्यता मिळाली आहे.समकालीन कागदपत्रांचा संदर्भ पाहून इतिहास संशोधन करावे असे त्यांचे मत होते.त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह प्रचंड होता.त्यात संत साहित्य,लोकसाहित्य,

लोकसंस्कृती अशा विविध विषयांचा व मराठी वाड्मयाचा समावेश होता.हा सर्व संग्रह त्यांनी अभ्यासकांसाठी खुला केला आहे.

साहित्य संपदा :

अमृतकन्या, श्री आनंदयात्री, कथापंचक, कल्पद्रुमाचे तळी, कल्पवेल, गंगाजल, चित्रप्रभा, श्री तुळजाभवानी, त्रिविधा, नाथ संप्रदायाचा इतिहास, नामदेव-एक विजययात्रा, पुण्याई, प्राचीन मराठीच्या लोकधारा, लोकसंस्कृतीचे विश्व, विराग आणि अनुराग, इत्यादी.

माहितीपुस्तिका:

एका जनार्दनी–पैठण

श्रीगुरूंचे गंधर्वपूर–गाणगापुर

श्रीगुरूदेवदत–औदुंबर,नृ.वाडी

श्रीगोदे भवतापहरी-नासिक,त्र्यंबकेश्वर

जागृत जगन्नाथ–जगन्नाथपूरी

क्षिप्रेच्या सोनेरी आठवणी–उज्जैन  इ.क्षेत्रांच्या माहितीपुस्तिका.

पुरस्कार:

साहित्य अकादमी 1987 – श्री विठ्ठल एक महासमन्वय

म.सा.प.चा गं.ना.जोगळेकर 2013

पुण्यभूषण-त्रिदल फाउंडेशन.2010

महर्षि वाल्मिकी पुरस्कार–पुणे म.न.पालिका 2013

अ.भा.यादव महासंघाचा विशेष पुरस्कार2015

साहित्य सेवा सन्मान,पुणे2016

अशा या संशोधक साहित्यिकाचे वयाच्या 86 व्या वर्षी 01/07/2016 ला निधन झाले.

त्यांच्या कार्यकर्तृत्वास विनम्र अभिवादन.🙏

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ :विकिपीडिया, बाइटस् ऑफ इंडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३० जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ ३० जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

बाळ कोल्हटकर

बाळकृष्ण हरी ऊर्फ बाळ कोल्हटकर (25 सप्टेंबर 1926 – 30 जून 1994)हे नाटककार, कवी, अभिनेते व नाट्यदिग्दर्शक होते.

त्यांचा जन्म साताऱ्याला झाला. आर्थिक ओढाताणीमुळे त्यांचे शिक्षण सातव्या इयत्तेपर्यंतच झाले होते.

सुरुवातीला काही वर्षे त्यांनी रेल्वेत नोकरी केली. पेशाच्या बाबतीत त्यांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले.

वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी ‘जोहार’ हे पहिले नाटक लिहिले.

तीन दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी 30हून अधिक नाटके लिहिली.

त्यापैकी ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’, ‘मुंबईची माणसे’, ‘एखाद्याचे नशीब’इत्यादी नाटकांचे हजारांहून अधिक प्रयोग झाले.

‘देव दीनाघरी धावला’, ‘वेगळं व्हायचंय मला’ वगैरे नाटकेही खूप गाजली.

त्यांची नाटके भावनाप्रधान, कौटुंबिक  व मूल्ये जपणारी असत.

त्यांचे संवाद चुरचुरीत व त्यांच्या शब्दप्रभुत्वाची साक्ष देणारे असत.

त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘एखाद्याचं नशीब’ व ‘आकाशगंगा’ यासारखी काही नाटके सोडली, तर त्यांच्या बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी होती.

कोल्हटकर उत्तम कवीही होते.’आई, तुझी आठवण येते’, ‘निघाले आज तिकडच्या घरी’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘उठी उठी गोपाळा ‘ व अशी त्यांनी लिहिलेली बरीच गीते अजूनही लोकप्रिय  आहेत.

अशा या भाषाप्रभूला त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २९  जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २९  जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

शिवाजीराव अनंतराव भोसले (१५ जुलै १९२७ ते २९ जून २०१० )

शिवाजीराव भोसले यांचा जन्म सातारा जिल्हयात कलेढोण इथे झाला. त्यांचे कॉलेजचे शिक्षण पुण्याला वाडिया कॉलेज व कोल्हापूरला राजाराम कॉलेज इथे झाले. राजर्षी शाहू महाराज यांच्या बोर्डिंग स्कूलमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेचाही त्यांनी लाभ घेतला. कायद्याची पदवी त्यांनी पुण्याच्या लॉ कॉलेजमधून घेतली.

फलटणयेथील मुधोजी कॉलेजमध्ये त्यांनी मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि तत्वज्ञान हे विषय शिकवले. अवघड विषय सहज, सोपा करून ते शिकवत. पुढे याच कॉलेजमध्ये त्यांनी प्राचार्यपदाची धुराही संभाळली.

शिवाजीराव भोसले उत्कृष्ट व्याख्याते होते. भारतीय तत्वज्ञान, भारतीय समाजसुधारक, योगी अरविन्द, स्वामी विवेकानंद, छ्त्रपती शिवाजी महाराज इ. विषयांवर ते अभ्यासपूर्ण व्याख्याने देत.  विवेकानंदांचे शिला स्मारक उभारण्याच्या वेळी शिला स्मारक समितीच्या वतीने त्यांनी देशभर व्याख्याने दिली.

शिवाजीराव भोसले यांचे साहित्य

१.    कथा वक्तृत्वाची २. जागर (खंड १ आणि २) ३. दीपस्तंभ, ४. देशोदेशीचे दार्शनिक    ५. मुक्तिगाथा महामानवाची,  ६. यक्षप्रश्न, ७. स्वामी विवेकानंद, ८. हितगोष्टी

पुरस्कार, मान-सन्मान

१.    आदर्श शिक्षक म्हणून राज्य पुरस्कार, २. सातारा भूषण, ३. फलटण भूषण ४. विद्याव्यास पुरस्कार, ५. रोटरीचा जीवन गौरव पुरस्कार, ६. राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, ७. श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार,  ८. भारती विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार ९. चतुरंग प्रतिष्ठान – मानपत्र

शिवाजीराव भोसले – स्मृती पुरस्कार

पुण्याची, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृतीसमिती दर वर्षी १५ जूनला त्यांच्या नावाचा         

स्मृती पुरस्कार देते. आत्तापर्यंत या समीतीतर्फे बाबासाहेब पुरंदरे, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, साहित्यिक द.मा. मिरासदार, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, डॉ. ह.वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांना पुरस्कार मिळाले आहेत.

☆ ☆ ☆ ☆ ☆

दिगंबर बाळकृष्ण मोकाशी – ( २७ नोहेंबर १९१५ – २९ जून ८१)

दि. बा. मोकाशी हे ख्यातनाम मराठी कथाकार व कादंबरीकर होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण इथे झाला. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले व पुण्यात रेडियो दुरुस्तीचा व्यवसाय सुरू केला. लामणदिवा हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९४७ मधे प्रसिद्ध झाला. 

दि. बा. मोकाशी यांचे अन्य साहित्य – कथा

१.    कथामोहिनी, २. आमोद सुनासी आले, ३. वणवा, ४. चापलूसी, ५. एक हजार गायी,  ६. आदिकथा,  ७. माऊली, ८. तू आणि मी हे त्यांचे काही कथासंग्रह 

कादंबरी –१. स्थलयात्रा, २. पुरुषास शंभर गुन्हे माफ, ३. देव चालले, ४ आनंद ओवरी, ५. वात्सायन

 यापैकी आनंद ओवरी व वात्सायन या कादंबर्याप चरित्रात्मक असून त्या अनुक्रमे संत तुकाराम व वात्सायन यांच्या जीवनावरच्या आहेत.

प्रवासवर्णन – पालखी व अठरा लक्ष पाऊले.  या पुस्तकातून प्रवास वर्णनापेक्षा समाज जीवनाचे दर्शन घडवण्यावर अधीक भर दिला आहे.

अर्नेस्ट हेमिंगवे यांच्या ‘फॉर हूम द बेल्स टोल्स’ या सुप्रसिद्ध कादंबरीचा ‘घणाघणती  हा उल्लेखनीय अनुवाद त्यांनी केला आहे.

दि. बा. मोकाशी  यांनी लहन मुलांसाठीही पुस्तके लिहिली.

विविध अंनुभूतीतून माणूस शोधण्याचा प्रयत्न ते आपल्या कथा -कादंबर्यांठमधून करतात. व्यक्तीच्या अंतर्मनाचा शोध  ते घेतात.  भावचित्रणातील नाजुकपणा व हळुवारपणा आणि घटनेतील नाट्य यांचा संगम त्यांच्या कथा –कादंबर्यांतमधून झालेला दिसतो. जीवनानुभवाच्या वेगवेगळ्या पातळीवरून अनुभव घेऊन त्यामध्ये संगती शोधण्याचा प्रयोग त्यांनी आपल्या लेखनातून केलाय.

दि. बा. मोकाशी  यांनी गूढकथा, पिशाच्च कथा,  रहस्य कथा अशा वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या आहेत.

‘संध्याकाळचे पुणे’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक. संध्याकाळच्या पुण्याची जी विविध रुपे त्यांना दिसली, त्याचे लालित्यपूर्ण दर्शन त्यांनी या पुस्तकात घडवले आहे.

पुरस्कार-

महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कलाकृतीचा पुरस्कार दि. बा. मोकाशी यांच्या गुपित, पालखी, स्थलयात्रा, आमोद सुनासी आले, देव चालले, जमीन आपली आई या पुस्तकांना मिळाला आहे.

त्यांच्या आनंद ओवारीचे भाषांतर अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेत यांनी केले आहे. ‘देव चाललेचे भाषांतर प्रमोद काळे ( इंग्रजी) यांनी केले आहे. त्याच प्रमाणे या पुस्तकाचा अनुवाद हंगेरीयन व ओरिया भाषेतही झाला आहे. अमृतानुभव या ललित लेखाचा अनुवाद इंग्रजीत झाला आहे.त्याचप्रमाणे कामसूत्रकार वात्सायन आणि पालखीचाही इंग्रजीत अनुवाद झाला आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर  (18 फेब्रु. 1911 – 29 जून 2000)

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा जन्म पुण्यातील येरवडा इथे झाला. ते भारतीय भूदलात कॅप्टन होते. त्यांनी अनेक ऐतिहासिक कादंबर्यान लिहिल्या.

कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचे प्रकाशित साहित्य

कादंबर्याॅ – १.उधळल्या प्रभा दशदिशा, २. कळस चढवला मांदिरी ३. दख्खनचा दिवा हरपला, ४. घटकेत रोविले झेंडे, ५. नवरत्ने हरपली रणांगणी, ६. पेशवाईतील कर्मयोगी, ७.राघो भरारी, ८. राज्य तो छत्रपतींचे, ९.शर्थीने राज्य राखले, इ. त्यांच्या कादंबर्या  प्रकाशित आहेत.

कथा संग्रह – काळदरीतील वीरगळ

प्रवास वर्णन –  अरुणाचलच्या सीमेवरून

याशिवाय बाहिरी ससाणा (भयकथा), महाभारत एक पर्व, हेर नयन हे नृपतीचे अशी आणखीही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शिवाजीराव भोसले या विद्वान आभ्यासकाचा, श्रेष्ठ वक्त्याचा आणि लेखकाचा आज स्मृतीदिन. त्याचप्रमाणे आज नामवंत लेखक दि. बा. मोकाशी आणि कॅ. वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचाही आज स्मृतीदिन त्या निमित्त या तिघांनाही  भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २८ जून – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

लोकप्रिय कवी व गीतकार श्री. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा आज जन्मदिनही आणि स्मृतिदिनही . 

( २८/६/१९२२ – २८/६/१९९० ) 

पेशाने प्राध्यापक असणाऱ्या श्री खांडेकर यांची प्रेमातल्या विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण करणारी कविता रसिकप्रिय झाली होती हे तर खरेच. पण त्याचवेळी, समाजातील दांभिकता आणि अन्याय, याविरुद्ध बंड पुकारण्याची त्यांची प्रामाणिक प्रवृत्तीही त्यांच्या काव्यामधून अनेकदा दिसून येत असे . 

“ श्लोक केकावली “ , “ संजीवनी : ही काव्ये , तसेच “सं. एकच प्याला “ , “ सं. शारदा “ अशी नाटके यांच्या संहितेच्या संपादनाचे मोलाचे काम श्री. खांडेकर यांनी केले होते.

“ चंद्रप्रकाश “, आणि “ गंधसमीर “ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले होते. 

श्री. भालचंद्र खांडेकर यांना विनम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : विकिपीडिया.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सौ. गौरी गाडेकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २६ जून – संपादकीय – सौ. गौरी गाडेकर -ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

व. पु. काळे

वसंत पुरुषोत्तम काळे (25 मार्च 1932 – 26 जून 2001) हे ख्यातनाम लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.

ते पेशाने वास्तुविशारद होते व मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते.

वपुंनी 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत.त्यांची ‘पार्टनर’, ‘वपुर्झा’, ‘ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’,’आपण सारे अर्जुन’, ‘घर हरवलेली माणसं ‘ वगैरे पुस्तके  विशेष लोकप्रिय आहेत.

त्यांचे कथाकथनाचे 1600पेक्षा जास्त कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून रसिक वाचकांना भेटणारे ते पहिले मराठी लेखक होते.

त्यांच्या कथा- कादंबऱ्यांत जागोजागी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे, प्रेरणादायी विचार आढळून येत.

वपुंवर ओशो रजनीशांचा प्रभाव होता.

वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, पु. भा.भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता.

अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

आज वपुंचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त त्यांना नम्र अभिवादन. 🙏

☆☆☆☆☆

सौ. गौरी गाडेकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना, कऱ्हाड शताब्दी दैनंदिनी, विकिपीडिया 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ जून – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई-अभिव्यक्ती -संवाद ☆ २१ जून -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

द्वारकानाथ माधव पितळे म्हणजेच नाथमाधव  (एप्रिल १८८२ – २१ जून १९२८)

नाथमाधव  यांना अवघे ४६ वर्षांचे आयुष्य लाभले. यातला बराचसा काळ त्यांनी शिवाजीवरील संशोधनात घालवला. स्त्री शिक्षण आणि पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. 

त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. कुलाब्याला ते तोफांचे गाडे बनवण्याच्या कारखान्यात नोकरीला लागले।. शिकारीची त्यांना आवड होती. एकदा सिंहगड परिसरात ते शिकारीला गेले होते. त्यावेळी टेहळणी करताना ते कड्यावरून खाली कोसळलले. या अपघातामुळे त्यांचा कमरेखालचा भाग लुळा पडला. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असताना, त्यांना वाचनाची गोडी लागली. त्यांनी अनेक मराठी, इंग्रजी ग्रंथ या काळात वाचून काढले. यातून पुढे त्यांना लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांची पहिली कादंबरी ’प्रेमवेडा’ १९०८ साली प्रकाशित झाली. त्यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरून ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट तयार करण्यात आला. त्याकाळी हा चित्रपट खूप गाजला. या कादंबरीचे ३ भाग आहेत.

नाथमाधव यांच्या २३-२४ कादंबर्‍या आहेत.  त्यापैकी स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याची स्थापना, सावळ्या तांडेल, वीरधावल, रॉयक्लब अथवा सोनेरी टोळी, मालती माधव, देशमुखवाडी इ. कादंबर्‍या विशेष गाजल्या.

नाथमाधव यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांना आदरांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print