मराठी साहित्य – विविधा ☆ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग पहिला) ☆ डॉ अभिजीत सोनवणे

? विविधा ?

?‍⚕️ डॉक्टर फॉर बेगर्स (भाग पहिला) ?‍⚕️ डॉ अभिजीत सोनवणे ☆

 (हृदयस्पर्शी अनुभव ) – जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!

प्रिय बाबा,

साष्टांग नमस्कार !

बाबा…. अहो बाबा… झोपलात की जागेच आहात ? 

अहो,  मी इकडुन बोलतीये आईच्या पोटातून….

मला माहितीये, रात्र खुप झालीये आणि आई आणि तुम्ही जागेच राहून विचार करताय, मला जन्माला घालायचं की… मला जन्माला न घालताच देवाघरी पाठवायचं… ?

बाबु…. बाबा मी तुम्हाला प्रेमानं बाबु म्हणु…. ?

म्हणुद्या की हो… बाबु… !

बाबु, खरं सांगू मला यायचंय हो तुम्हाला भेटायला….  इतके दिवस आईच्या पोटात झोपले आता बाबु, तुमच्या कुशीत झोपायचंय मला… मला ना, श्‍वास घ्यायचाय हो बाबा.. फक्त एक श्वास…. !

बाबा परवाचं आईबरोबरच तुमचं बोलणं मी ऐकलंय…. मुलगा जन्माला आला तर त्याच्यासाठी मऊ मऊ गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहात तुम्ही…. आणि मुलगी जन्माला आली तर ?

बाबु…  नकोय मला गादी… मी तुमच्या मांडीवरच  झोपेन ना…. नवा फ्रॉक पण नको मला, खेळणी पण नकोत मला… मी खेळेन बाई तुमच्याशीच बाबा…

बाबड्या, मी कधीच तुमच्याशी गट्टी फू करणार नाही बरं… बाबु… तुम्ही गालावर पापी घेताना दाढी टोचेल बरं मला… पण दाढी टोचली तरी मी अज्जिबात रागावणार नाही…

बाबुड्या, संध्याकाळी तुम्ही कामावरुन घरी आलात ना, की दारामागुन मी भ्भ्वाँव करीन हां तुला… पण तुम्ही घाबरायचं हां बाई…

नायतर आमी नाय खेळणार ज्जा…

आई चहा करुन आणेस्तोवर मी तुमच्या कपाळाला बाम लावून देईन हां…

बाई गं… कपाळावरचे केस कुठं गेले बाबुड्या…. ?

टकलु हैवान झाले आहात नुसते… !

आँ… आईग्ग्ं…. गालगुच्चा नाही घ्यायचा हां आमचा… गाल दुखतात आमचे…. नाहीतर मी पण कान ओढेन तुझे ससोबासारखे…. बघा मग ह्हां… सांगुन ठेवते… !

आणि हो, बाबा…  परवा माझ्या  मैत्रिणींसमोर सारख्खं  ठमाकाकु…  ठमाकाकु म्हणुन चिडवत होतात ना मला…. ?

थांबाच आता, तुमच्या  आॕफिसातले लोक घरी आले ना की, त्यांच्यासमोर मी पण तुम्हाला ढेरीपाॕम….  ढेरीपाॕम… म्हणुन चिडवेन….

ढोलुराम पळायला जात जा की जरा… !

काय म्हणालात… ?

हो, मी मुलगी म्हणुन जन्मले तरी तुमची आई म्हणुनच जगेन…. !

पण मला जन्माला तरी येवु द्या बाबा….

बाबा तुम्हाला वेणी घालता येते का हो ? नाही….?

कसा रे तू बाबड्या….!

बरं भांडीकुंडी तरी खेळता येतात का… ? नाही….???

बाई गं….  काहीच कसं करता येत नाही तुम्हाला… ???

मग ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही करता तरी काय…?

आता लंगडी घालता येते का म्हणून अज्जिबात विचारणार नाही मी या ढेरीपाॕमपाॕमला… ढोलुराम कुठले… !

भातुकली तरी  खेळता येते का बाबा तुम्हाला…. ???

क्रमशः…. 

© डॉ. अभिजित सोनवणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जो आवडतो सर्वाना तोचि—- ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? विविधा ?

⭐ जो आवडतो सर्वाना तोचि—- ⭐सौ.शशी.नाडकर्णी-नाईक ⭐

” चि.नथू , वाढदिवसाच्या —अरे  मी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा काय देते ? कसला वाढदिवस? आज तर तुझी जयंती तू आम्हाला सोडून गेलास हे मन मानतच  नाही.”

नथू, हे व्यक्तिमत्व असचं होतं ना त्याचं माझं काही नातं ना गोतं. माझ्या बॅकेत एक साधा शिपाई .पण तो माणूस म्हणून  फार चांगला. त्याचं आणि माझं नातच वेगळंच.त्या नात्याला  काही लेबल नव्हते.

सतत  हसतमुख ,कामसू कोणतेही काम करण्याची तयारी .कोणत्याही कामाबद्ल कमीपणा नाही.सगळ्यांशी आपुलकीने बोलणं मग तो स्टाफ असो की कस्टमर . कोणाशी कधी भांडणं साधा वाद पण घातलेला आठवत नाही.

फार कष्टाळू एका लहानशा खेड्यातून आलेला.नौशीर सारख्या देवमाणसाची गाठ पडली.आणि आयुष्यच बदलून गेले.

नौशीरची ,त्याच्या पत्नीची खूप सेवा केली .बँकेची इमाने इतबारे वयाच्या 60  वर्षापर्यंत सेवा केली.लायकी,क्षमता असूनही का कोणास ठाऊक पण प्रमोशन घेतलं नाही.काय वाघासारखं काम करायचा?मोदीजीच्या नोटा प्रकरणाच्या काळात एखाद्या हेडकॅशियरला लाजवेल असं काम त्यानी केलं.कुठे त्याचा गवगवा नाही की कौतुकाची अपेक्षा नाही.

मधल्या काळात मला रिक्शाचा अपघात झाला.माझ्या घराकडून बॅकेत जायला एकच सोयीचे वाहन रिक्शा.पण अपघातामुळे मला रिक्शाचा धस्का, मनांत भिती बसली होती. तेव्हा हे महाशय मला स्कूटर वरुन घरी सोडायचे.”तू अजिबात घाबरू नकोस मी स्लो चालवतो जेव्हा  तुला भिती वाटेल .तेव्हा सांग मी पाय टेकवून स्कूटर थांबवीन. इतकं माझ्यासाठी करुन त्याबद्दल कशाची ,साध्या कौतुकाची आशा ,अपेक्षा  पण नाही.26जुलै2005 च्या त्या भयानक पावसांत पण त्यानी आम्हाला तीन लेडीज स्टाफला हळूहळू चालत घरी सोडले.???

फार मेहनती. त्याला अर्धागिनीची कविताची साथ पण तशीच मिळाली. ती पण कायम हसतमुख प्रेमळ आतिथ्यशील. हौशी जोडपं दरवर्षी गणपती आणायचे. मोठी मूर्ती. भव्य आरास. गौरीच्या दिवशी जेवणं पंगती.आमच्या कुटुंबाला आग्रहाचे कवितांचे आमंत्रण.  मला non veg आणि माझे मिस्टर गणपतीच्या दिवसात veg खातात म्हणून त्याना veg.माझा मुलगा नाही गेला तर कविता त्याच्या साठी डब्बा भरुन द्यायची. काय संबंध ? नाही नातंगोतं, नाही जातीचे पातीचे. पण संबंध जिव्हाळ्याचे  आपुलकीचे.

   कधी रविवारी सकाळी वरसोव्यावरुन फिश आणं .कधी d mart चं सामान. करोनाच्या काळात गेल्या वर्षी आंबे आणून आम्ही वाटून घ्यायचो.

सकाळी बॅकेतले काम करून दुपारी कवितांना केलेले टेलरिंगचं काम मोठ्या थैल्या भरुन टेलरला नेऊन देणं .परत दुस-या दिवशी साठीं त्याच्याकडून काम आणणं.  सुपारीच्या खांडाच सुध्दा व्यसन नाही.म्हणून तर एक शिपाई असून गावाला घर बांधलं.मुलाला MBA केलं.मुलाला two bhk घ्यायला आर्थिक मदत केली.मुलगा पण हुशार,सुस्वभावी बापासारखाच गुणी.सून सुध्दा छान हुशार MBA आतिथ्यशील .एक गोड नातू.आणखी एक लहान मुलगा .सुंदर दृष्ट लागण्यासारखं. हो दृष्टीच लागली. आणि करोनाच्या भयानक एका सकाळी पुजाचा,सूनेचा मला फोन आला.

“मावशी, पप्पा इज नो मोर” मी अर्धवट झोपेत. मी फोन ठेवला. माझ्या डोक्यापर्यंत पोहोचलचं नाही. परत मी तिला फोन लावला. तर परत तीच न्यूज .

करोनाने त्याचा आठ दिवसाच्याच कालावधीत घास घेतला. मुलांनी सुनेने खूप धावपळ केली. पण शेवटी आलं देवाजीच्या मना  तिथे कोणाचे चालेना.

एक निर्व्यसनी,ना बी.पी., ना डायाबिटीस. धट्टाकट्टा माणूस. नुकताच रिटायर्ड झालेला,आता शांतपणे जगण्याची बायकोला घेऊन भारतभर फिरण्याची स्वप्न  बघणारा .स्वतः एकटाच  स्वर्गात फेरफटका मारायला गेला. गेला नाही नेला देवाने.

.!!जो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला !!

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नात्यातील  वीण… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ नात्यातील  वीण… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

नात्यातली वीण  ” “नाते”दोनच अक्षरी शब्द.मनामनांना जोडणारा. स्नेह, प्रेम, आपुलकी,  जवळीक दर्शविणारा. जन्मल्याबरोबर आई-वडिलांबरोबर रक्ताच्या नात्याचे बंध निर्माण होतात. त्यानंतर मूल जसजसे मोठे होत जाते तसतसा त्याचा/तिचा भाऊ, बहिण, आजी आजोबा,  काका-काकू, मावशी, आत्या इ. अनेक नात्यांशी परिचय होऊ लागतो. आईच्या स्पर्शातून मायाच पाझरते. म्हणूनच आपण मोठे झालो तरी ठेच लागली किंवा काही दुखले-खुपले तरी “आई ग” असेमहणतो. राव रंक सर्वांसाठी हे नातेसमान असते. पिता कठोर असतो तर दोघेही अपत्याच्या भल्यासाठी झटतात. आई वडिलांच्या संस्कारांची शिदोरी घेऊन आपण वाटचाल करतो.

बंधुप्रेमाचे उदाहरण घ्यायचे झाले तर राजसिंहासनावर श्रीरामांच्या पादुका स्थापून स्वतः पर्णकुटीत राहणारा भरत आठवतो. राखीचा एक धागा  बहिणीने बांधला कि भाऊराया  तिच्या प्रेमात बद्ध होतो. तिचा रक्षणकर्ता होतो, पाठीराखा बनतो.रक्ताचे नाते नसले तरीही काही वेळा हे नाते मनाने स्वीकारलेले असते. महाभारतात श्रीकृष्ण दौपदीशी असाच जोडलेला दिसतो. इतका कि वस्त्रहरणाच्या बाक्या प्रसंगी त्याने  तिचे नव्हे तर समस्त स्त्रीजातीचे लज्जारक्षण केले असे म्हणावे वाटते.

 समाजात वावरताना जेंव्हा परस्परांची. वेव्हलेंग्थ दोघांना आक्रुष्ट करते तेव्हा प्रियकर प्रेयसीचे नाते निर्माण होते.हे आगळेच. संमती ने किंवा संमतीशिवाय ही ते दोघे पती पत्नीत रुपांतरित होतात. नि वीण घट्ट बनते.

.. परंतु काही वेळा रक्ताच्या नात्याच्या पलिकडचे असे एक जिवाभावाचे नाते आपण पाहतो, अनुभवतो. ते नाते म्हणजे मैत्रीचै. म्हणूनच” पसायदानात” ज्ञानेश्वर माउली म्हणतात भूतां परस्परे जडो। मैत्र जीवाचे।

इथं भूत म्हणजे फक्त कुटुंबिय नाहीत तर परिसरातील किंबहुना अखिल विश्वातील पशु; पक्षी, प्राणी, वनस्पती यांच्याशी सुद्धा आपण मैत्र साधले पाहिजे. “वसुधैव कुटुंबकम्” म्हणजे हे विश्वचि माझे घर अशी भावना असली तरच आपण नातेसंबंध टिकवु शकतो. शुद्ध हवा, शुद्ध पाणी देणारा नि अन्न ,वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करणारा निसर्ग हा आपला सर्वात जवळचा मित्र आहे. संत तुकाराम म्हणतात “व्रुक्ष वल्ली आम्हां सोयरे वनचरे.”

सर्वात शेवटी यम्हणावे वाटते कि मानवतेचे अर्थाने माणुसकीचे नाते सर्वश्रेष्ठ आहे. गुरू-शिष्य, रुग्ण-डॉक्टर हे मानवतेच्या नात्याने जोडले आहेत.

इथं विश्वासाची गरज असते. म्हणूनच असे हे परस्परांना जोडणारे नाते संबंध स्नेहबंध ठरतात नि म्हणावे वाटते

मनामनांचे प्रेम जपते ते नाते।

परस्परांचा स्नेह वर्धिते ते नाते।।

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

भ्र. 9552448461

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चला कपाट आवरु या ! ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ चला कपाट आवरु या ! ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

वर्षातील ५२ रविवार पैकी कुठल्याही  एका रविवारी हे वरील वाक्य एखाद्या घरात म्हणले गेले नसेल असे मला तरी वाटत नाही. रविवार अशा साठी की जरा निवांत, सुट्टीचा दिवस म्हणून. कुटुंबातील सदस्यांनी मिळून कपाट आवरणे हा एक छान कौटुंबिक सोहळा आहे असे माझे स्पष्ट म्हणणे.

म्हणजे बघा अश्विनी ते रेवती अशी २७ नक्षत्र आहेत. पूर्वी ‘अभिजीत ‘ नावाचे पण नक्षत्र मोजत पण आता हे नक्षत्र धरत नाहीत. नक्षत्र पुस्तकात प्रत्येक नक्षत्राची माहिती देताना या नक्षत्रावर एखादी गोष्ट हरवली तर ती मिळण्याचे ठोकताळे दिलेले आहेत. अभिजित नक्षत्रावर ही माहिती अर्थातच नाही. पण पूर्वी समजा या नक्षत्राची कुठे माहिती दिली असेल त्यात या नक्षत्रावर करायच्या कामात

‘कपाट आवरणे ‘ हे नक्की असावे असे माझे मन सांगतय.

अश्विनी ते रेवती नक्षत्रावर केंव्हाही तुमची गोष्ट हरवली असेल आणि तेंव्हा अगदी याच कपाटात, इथल्या ड्राँवर मधे, कप्प्यांमधे कितीही वेळेला तुम्ही शोधली असली तरी आजच्या ‘चला कपाट आवरु या ‘ अभिजात मुहूर्तावर मात्र ही मिळण्याची खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच शक्यता असते.

मंडळी, मोकळं केलंत सगळं कपाट,  अवती भोवती मस्त पसारा जमलाय ना?  

तर अधून मधून असं कपाट आवरणं हे  जरी शास्त्र असले तरी

मागच्या वर्षी कपाट आवरताना नाही हे राहू दे, टाकू या नको  म्हणून ठेवलेल्या गोष्टी या वर्षी कपाट आवरताना कच-याच्या ढिगात टाकणे ही एक मोठी कला आहे

कपाट आवरताना हातात आलेले मित्राने दिलेले वाढदिवसाचे ग्रिटींग बघून, छान स्माईल करुन परत त्याच जागी ठेवणे हा ” मैत्री धर्म ”  आहे.

लहानपणीची ‘फोटो गँलरी’ आपलं

‘ फोटो अल्बम’ हातात आल्यावर चहाचा कप बाजूला ठेऊन शेवट पर्यतचे फोटो बघणे आणि कपाट आवरण्याच्या कार्यक्रमाला थोडा ब्रेक घेणे  ही “नैतिक जबाबदारी” आहे.

गधडे/ गधड्या  आँन लाईन क्लासला  मिळत नव्हती ना  ही वही  ? कपाटात नीट बघ म्हणलेलं, शोधली नीट?  नाही,  आत्ता कशी मग आली?  नीट बघायचंच नाही,  हे माय लेकींचे / माय लेकांचे ( बर का मित्रों, आपण अशावेळी परत एकदा फोटो अल्बम बघायला काढायचा) संवाद हे “आवश्यक कर्तव्य ” आहे.

ती वही  उघडताच आत मधे  मिळालेली १०० रुपयाची नोट घेऊन आईला देऊन संध्याकाळी भेळ/ पाणीपुरी/  शेव पुरी  ( छे असल्या गोष्टी संकष्टीलाच आठवतात नेमक्या)  रुपी ‘अर्थपूर्ण सेटलमेंट’ आहे.

मागच्या वर्षी आवश्यक वाटणारी गोष्ट पण  यावर्षी अचानक   अनावश्यक कच-यात  टाकून कपाट मस्त आवरलयं आता.  एकदिवस संगणक, मोबाईल रुपी कपाटातील पण कचरा साफ करायचा आहे असाच. विनाकारण सेव्ह केलेल्या फाईल, फोटो,  अँप सगळं साफ करायचं आहे

बघू सवड मिळाली तर याच पद्धतीने मनातील कपाटातील ही काही  अनावश्यक कप्पे,  विनाकारण सेव्ह केलेले विचार, पूर्वग्रह वेगैरे साफ करता आले तर!

प्रयत्न करायला काय हरकत आहे

( प्रयत्नवादी ) अमोल ?

वैशाख. कृष्ण ३

२९/५/२१

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – त्यांच्या ‘ऋतु हिरवा ऋतु बारवा’ कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘सजणा का धरीला परदेश’, अशी किती तरी गीतं आपल्या कानात रुंजी घालू लागतात. आता इथून पुढे…..)

मेघदूत आणि त्रिवेणी

शांताबाईंच्या कवितांचा विचार त्यांच्या काव्यानुवादाच्या विचारांशीवाय अपुरा राहील. त्यांनी कालिदासाच्या ‘मेघदूता’चा आणि गुलजार यांच्या ‘त्रिवेणी’चा सुंदर अनुवाद केला आहे. अनुवाद करणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यातून काव्यानुवाद अधीकच दुरापस्त. केवळ आशयच नव्हे, भावाच्या सूक्ष्म छटा, त्याच्या रूपरंगपोतासहित दुसर्‍या भाषेत आणणं अवघड असतं. त्या भाषेच्या संस्कृतीशी ते समरसून जावं लागतं. शांताबाईंना हे छान जमून गेलय, याची प्रचीती मेघदूत आणि त्रिवेणी वाचताना येते.

मेघदूत

‘मेघदूत’ या खंडकाव्याची अनेकांप्रमाणे शांताबाईंना मोहिनी पडली. अनेकांनी ‘मेघदूता’चा मराठीत अनुवाद केलाय. अनेकांनी त्यावर गद्यातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या सार्‍याचं वाचन, आपण अनावर ओढीनं केलं असं शांताबाई सांगतात. तरीही ‘मेघदूता’चा अनुवाद त्यांना करून बघावासा वाटला. या अनुवाद पुस्तकाच्या प्रारंभी त्या म्हणतात, ‘अनुवाद करून बघणे, हा माझा आनंद व छंद आहे. अनुवाद करून बघणे, हा मूळ कलाकृतीचा अधीक उत्कटतेने रसास्वाद घेण्याचा एक सुंदर मार्ग आहे.’ अशी आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केलीय. वेगळं काही करायचं म्हणून नव्हे, कलाकृती अधिक समजून घेण्यासाठी त्यांनी हा अनुवाद केलाय. त्यांनी अपेक्षा केल्याप्रमाणे अतिशय ललित, मधुर असा हा अनुवाद, वाचकाच्या मनात मूळ संस्कृत काव्याचे वाचन करण्याची उत्सुकता निर्माण करणारा आहे. ही उत्सुकता निर्माण झाल्यावर, वाचकाला मूळ काव्यासाठी शोधाशोध करायला नको. अनुवादाच्या वर मूळ श्लोक दिलेलाच आहे.

त्रिवेणी

गुलजार हे हिंदीतील प्रतिभावंत लेखक, कवी. त्यांनी ‘त्रिवेणी’ हा कवितेचा एक नवीन रचनाबंध निर्माण केला. यात पहिल्या दोन पंक्तींचा गंगा-यमुनाप्रमाणे संगम होतो. आणि एक संपूर्ण कविता तयार होते पण या दोन प्रवाहाखालून आणखी एक नदी वाहते आहे. तिचे नाव सरस्वती. तिसर्‍या काव्यपंक्तीतून ही सरस्वती प्रगट होते. पहिल्या दोन काव्यपंक्तीतच ती कुठे तरी लपली आहे. अंतर्भूत आहे. शांताबाईंनी या ‘त्रिवेणी’चा अतिशय अर्थवाही, यथातथ्य भाव प्रगट करणारा नेमका अनुवाद केलाय. जीवनाचे, वास्तवाचे, यथार्थ दर्शन, चिंतन त्यातून प्रगट होते. त्यांची एक रचना जीवनावर कसे भाष्य करते पहा.

‘कसला विचित्र कपडा दिलाय मला शिवायला

एकीकडून खेचून घ्यावा, तर दुसरीकडून सुटून जातो

उसवण्या-शिवण्यातच सारं आयुष्य निघून गेले’

किंवा   

‘चला ना बसू या गोंगाटातच, जिथे काही ऐकायला येत नाही

या शांततेत तर विचारही कानात सारखे आवाज करतात.

हे कंटाळवाणे पुरातन एकाकीपण सतत बडबडत असते.’

प्रियकर – प्रेयसीची नजारनजर त्यांचे एकटक बघणे आणि त्याच वेळी लोकं बघातील म्हणून तिला वाटणारा चोरटेपणा किती मनोज्ञपणे खाली व्यक्त झालाय.

‘डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकात

मोठ्या आवाजात बोलू नका ना माझ्याशी

लोकांना माझे नाव ओळखू यायचे कदाचित’

अशीच आणखी एक कविता-

‘सांजेला जळणारी मेणबत्ती बघत होती वाट

अजून कसा कुणी पतंग आला नाही

असेल कुणी सवत माझी जवळच कुठे जळत’

या अशा कविता. त्यांच्यावर वेगळं भाष्य नकोच. वाचायच्या अन मनोमनी उमजून घ्यायच्या. जीवन-मृत्यूच्या संदर्भातले एक प्रगल्भ चिंतन पहा.

‘मोजून – मापून कालगणना होते वाळूच्या घड्याळात

एक बाजू रीती होते, तेव्हा घड्याळ पुन्हा उलटे करतात.

हे आयुष्य संपेल तेव्हा तो नाही असाच मला उलटे करणार?’

खरोखर शांताबाईंचा अनुवाद हा केवळ अनुवाद नसतोच. अनुसृजन असते ते!

गुलजारांनी ‘त्रिवेणी’ शांताबाईंना समर्पित करताना लिहिलय –   

‘आप सरस्वती की तरह ही मिली

और सरस्वती की तरह गुम हो गई

ये ‘त्रिवेणी’

आप ही को अर्पित कर रहा हूँ।’

एका विख्यात, प्रतिभावंत कवीने शांताबाईंना ‘सरस्वती’ची उपमा दिली, ती काही केवळ सरिता- काव्यसरिता या मर्यादित अर्थाने नव्हे! नाहीच! सरस्वती विद्या कला यांची अधिष्ठात्री देवता. या सरस्वतीने आपला अंश शांताबाईंच्या जाणिवेत परावर्तित केलाय, असं वाटावं, इतकी प्रसन्न, प्रतिभासंपन्न कविता शांताबाईंची आहे. रसिक वाचकाला तिचा लळा लागतो. स्निग्ध जिव्हाळा जाणवतो.

समाप्त

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून कसा उत्कटतेने प्रगट झालाय……  आता इथून पुढे …..)

परतुनि या हो माझ्या जिवा

शांताबाईंची गीते ही त्यांच्याच कवितांचे लोभसवाणे रूप आहे. शब्दातून प्रकट होणार्‍या अनुभूतीला इथे सुरांची साथ मिळते. अनेकदा आधी तयार केलेल्या सुरावटीवर त्यांनी शब्द बांधले आहेत. पण तालासुराच्या चौकटीत त्यांनी शब्द कोंबले आहेत, ते फरफटले आहेत, विकृत झाले आहेत, असं कुठेच झालं नाही. स्वर आणि शब्द तिथे एकरूप होऊन येतात. स्वरनिरपेक्ष ती रचना जरी वाचली, तरी चांगली कविता वाचल्याचा आनंद ती देते. ‘तोच चंद्रमा’ नभात या गीतात, ‘त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा’ यातून व्यक्त झालेले वास्तव… नित्याचे झाले की ती उत्कटता लोपते, हा नेहमीचा अनुभव किती उंचीवर नेलाय कवयित्रीने. ‘हे श्यामसुंदर’ मध्ये राजासा, मनमोहना, करत त्याची केलेली विनवणी, पावरीचा सूर ऐकताच स्वत:चे हरवलेपण.. खरं तर ते आतून हवेच आहे, पण

‘पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका थरथरे बावरे मन, संगती सखी नच कुणी‘

यातून व्यक्त झालेले भय… ही द्विधावस्था या गीतात कशी नेमकेपणाने प्रकट झालीय.

‘गहन जाहल्या सांजसावल्या पाऊस ओली हवा माझ्यासांगे सौधावरती एकच जळतो दिवा. आज अचानक आठवणींचा दाटून आला थवा परतुनि या हो माझ्या जिवा’ या हळुवार लोभासतेने शांताबाईंच्या लावण्या लावण्यामयी झाल्या आहेत.

उत्कृष्ट लावण्प्रमाणेच शांताबाईंनी वेधक द्वंद्वगीते आणि अनुपम भावगीतेही लिहिली आहेत. आपल्याला आवडलेल्या हिंदी, गुजराती, बंगाली गीतांच्या चालीवर आराठीत गीतरचना करण्याचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. वृत्तबद्ध आणि छंदोबद्धकाव्याचे संस्कार त्यांच्यावर बालपणापासून झालेले आहेत. त्यातूनच त्यांची गीतरचना सहज आणि सफाईदार झाली आहे.  ‘कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’ या आपल्या गीतसंकलनाच्या प्रस्तावनेत त्या म्हणतात, ‘कविता आणि गीत‘ या दोहोंमागच्या प्रेरणा भिन्न असतात. तशीच त्यांची कलात्मक मागणीही भिन्न प्रकारची असते. गूढता, सूचकता, अल्पाक्षरत्व आणि संपूर्ण व्यक्तिगत अनुभवामुळे येणारी पृथगात्मता हे कवितेसाठी आवश्यक असते. उलट, सोपेपणा, सहजता, नाट्यमयता, चित्रदर्शित्व, ऐकताक्षणी मनात उलगडत जाईल अशी शब्दकळा ही गीताची गरज असते.’ शांताबाई यशस्वी गीतकार आहेतच, पण त्यापुढे जाऊन, त्यांनी आपल्या गीतांना स्वत:चे असे खास परिमाण दिले आहे. त्या म्हणतात, ‘चांगले गीत ही चांगली कविताही असते.’ शांताबाईंच्या गीतांबद्दल हे खात्रीपूर्वक म्हणता येईल. त्यांच्या मते गीत हे कवितेप्रमाणे स्वतंत्र आणि आपले अंगभूत चैतन्य घेऊन प्रगटते. त्यांच्या ‘ऋतु हिरवा ऋतु बारवा’ कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’, ‘सजणा का धरीला परदेश’, अशी किते तरी गीतं आपल्या कानात रुंजी घालू लागतात.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन) – भाग 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात – केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे,  ‘तो माज गमले विभूती माझी  स्फुरत पसरली विश्वामाजी’  शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं. आता इथून पुढे…..)

‘हे सख्या निसर्गा!’

सहजता, पारदर्शकता, आत्मरतता या बरोबरच चित्रमयता हेही शांताबाईंच्या काव्याचं महत्वाचं वैशिष्ट्य. निसर्गाशी त्यांचं निकटचं नातं अनेक काव्यातून, गीतातून लक्षात येतं. निसर्गाच्या विविध विभ्रमांचं, रंगरूपाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन त्यांनी आपल्या कवितांधून केलय. मात्र बालकवींप्रमाणे निव्वळ, निखळ निसर्ग वर्णन त्या करत नाहीत. त्यांच्या निसर्गवर्णनाला त्यांच्या भावनेचं अस्तर असतं. त्यांच्या निसर्गवर्णनात त्यांच्या प्रीतीचे, आसक्तीचे, विरह –वेदनेचे, भक्ती-विरक्तीचे, एकाकीपणाचे जरतारी रेशीम धागे विणलेले दिसतात. ‘मूक सांत्वन’ मध्ये त्या म्हणतात, ‘हे सख्या निसर्गा! कोण तुझ्यावाचून आमची अनामिक दु:खे घे जाणून’ काळ्या राती अवसेला भयभीत झाली असताना ‘पिंपळ’ तिला धीर देतो. निसर्गातील अनेक घटक त्या ‘पिंपाळा’सारखे शांताबाईंच्या कवितेत दृश्यमान होतात. ‘आला ग वसंत’ किंवा ‘ऋतु हिरवा…. ऋतु बरवा’ या गीतातील निसर्गाचे वर्णन किती सुखद आहे. ‘दरवळत डोलू लागतात’, या कवितेतील निसर्गवर्णन कसं प्रत्यक्षदर्शी आहे पहा,

‘माळरानावरून सरकत येणार्‍या ढगांच्या सावल्या

क्षितिजाआड फिकट गुलाबी संधीप्रकाश

गवतात मलूल उन्हाची संथ फिरणारी बोटे

ओल्या गार हवेत घननीळ भास-आभास’

आपले एकाकीपण त्यांनी, ‘मावळतीला’, ‘दु:खाचे हिमकण’ अशा किती तरी कवितातून सांगितलय. ‘लोट’मध्ये गवसलेलं श्रेय हरपल्याचं वर्णन, ‘क्षणभर मिटल्या मुठीत, फिरूनी उडून गेला रावा’ या शब्दातून अतिशय हृद्यपणे केले आहे.

‘प्रकाशतार्‍यांचे संदिग्ध संदर्भ’मध्ये त्या म्हणतात,

‘अशी मी सदाची, भरतीची परतीची

काही आभाळाची, बरीचशी धरतीची

सांजेचा घनदाट प्रत्यय असा’

निसर्ग शांताबाईंच्या भावस्थितीशी असा एकरूप होऊन येतो. त्यांना जीवनातील सौंदर्याची, आनंद मिळवण्याची असोशी आहे. वृत्ती भावुक, स्वप्नाळू आहे. पण स्वप्नसृष्टी आणि सत्यसृष्टी यात अंतर पडत जातं. मग मनावर औदासिन्याचं, नैराश्याचं सावट पसरतं. ‘दु:खाचे हिमकण’, ‘शेवट’, ‘रंग मातीचा आभाळाला’, ‘दिवस गतीने फिकाच पडतो’ आशा किती तरी कविता उदासीनतेची गडद छाया चित्रित करतात. याची परमावधी तमात, काळोखात होते. संध्याकाळ वेढीत जाणारा काळोख आणि या काळोखात अनुभवावं लागणारं एकटेपण, यांचे उल्लेख शांताबाईंच्या कवितेत जागोजागी येतात. ‘प्रदीर्घ’मध्ये त्या लिहितात, ‘घेरीत येतो काळा करडा संदिग्ध काळोख आणि गिळतो पायापुढला उजेड पसाभार’. ‘काळोख’ कवितेत त्या म्हणतात, तो सारे भेद, रंगरूपाचे वेगळेपण मिटवून टाकतो. तो आत्मलीन आणि आपले गाणे गाणारा असतो.

सूर्य, अरण्य, वाळवंट, आभाळ, पाणी, वारा, जमीन, पूर या प्रतिमा शांताबाईंच्या कवितांमधून पुन्हा पुन्हा येतात. त्यातून त्यांच्या मनाच्या आशा-निराशेचे हिंदोळे झुलू लागतात.

‘पाऊस कोसळत रहातो   घोंघावत येतो पूर

वाजू लागतात अज्ञात घंटा   आयुष्यापलीकडचे संदिग्ध सूर’

कोसणारा पाऊस आणि घोंघावत येणारा पूर याच्या पार्श्वभूमीवर अज्ञात घंटानाद कारूण्याची लय साकारतो. ‘हिरण्यगर्भ’सारखी कविता मात्र यापेक्षा वेगळे सूर आळवते. शिशाच्या पत्र्यासारखे काळे करडे आभाळ गच्च दाटून येत. आणि दिशा भस्म फसल्यासारख्या राखाडी होतात, पण त्यांना खात्री आहे,

‘या सार्‍यांपालीकडे खचितच असतील   

 झळाळती हिरण्यगर्भ उन्हे-

जी ढग फाडून येतील आवेगाने बाहेर      

आणि अनावर बरसतील या माळावर, या झाडावर

कुणी सांगावे? कदाचित माझ्याहीवर’

‘ढळणार सूर्य कधीतरी ’  

चिंतांनाशीलता हे शांताबाईंच्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य. ‘नाती’ कवितेत त्या म्हणतात.

वाटते, तितके नसतो आपणही एकाकी निराधार

अर्थात तेवढ्याने काळोख उजळत नसला तरी’

‘कुठे तरी आपल्यासाठी कुणी तरी असते फुलत जळत’, ही जाणीव आत आत कुठे तरी आश्वस्त करते. जीवन पुढे सरकत रहाते. ‘कळते आता गेला क्षण नाही पुन्हा हाती गवसत’. असं किती आयुष्य सरलं. त्यातून हाती काय लागलं?

‘वर्षांचा ढीग इथे साठला किती?     मातीतून त्या मलाच खणत राहिले’

‘ढळणार सूर्य कधीतरी’ याची त्यांना जाणीव आहे पण त्या सूर्यास रोखणार तरी कसे? ‘तम’ तेवढाच खरा, याची खात्री पटली आहे, तोपर्यंतचे जगणे कसे?

‘कैसे जीवन हे इथे जर आम्ही मृत्यूच श्वासितो.’

भूतकाळ सरत, मिटत चाललाय. अदृश्य भविष्याच्या दिशेने होणारी वाटचालही सरत आल्याचे ‘सूर’ इथे कातर, विषण्ण करून जातात. शांताबाईंचे चिंतन, त्यांचा आत्मशोध ‘जीवलगा’सारख्या गीतातून अति उत्कटतेने प्रगट झालाय. 

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शांता शेळके..एक शब्द-झरा! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ शांता शेळके..एक शब्द-झरा! – भाग 3 ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 ‌शांताई म्हणजे काव्याचा सतत वहाणारा एक झरा!

शब्द पाण्याच्या थेंबासारखे ओघळत येणारे प्रवाही! असं कुठलं गाण्यातलं क्षेत्र नव्हतं जिथे त्यांच्या शब्दांचा ओघ वाहिला नाही! भक्तीगीते, भावगीते, भजन, देशभक्तीपर गीतं सगळ्या क्षेत्रात ही गंगा वहात राहिली! स्वभावाने अतिशय नम्र तरीही हुशारी चे तेज त्यांच्या काव्य रचनेत लपत नव्हते!’ भस्म विलेपित रूप साजिरे… ‘ सारखे भक्तीगीत असो वा ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे…’ सारखे विरहगीत ‌असो तितक्याच ताकदीने त्यातील भाव उभे करण्याचे कसब त्यांच्या गीतात होते. बाबूजींकडे त्यांनी चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिली. आणि ‘तोच चंद्रमा नभात..’ सारखे अजरामर गाणे आपल्याला मिळाले.लहानपणापासून संस्कृत श्लोक, ‘काव्य प्रकाश’ चे वाचन, मनन,  चिंतन केले होते, त्यांचा सुसंस्कार त्यांच्या गीतातून दिसून येतो. ‘शालू हिरवा, पाचू न् मरवा, वेणीत पेडी घाल आता..’  गाण्यातून दिसणारा आनंद व्यक्त होतो तर ‘रेशमाच्या तारांनी, लाल काळया धाग्यांनी कर्नाटकी कशिदा…’ हे गाणं लिहिताना त्यांचा लावणीचा बाजही तितकाच उत्कट तेथे दिसून येतो. भालजी पेंढारकर यांनी शांताबाई ना कोल्हापूर ला बोलावून घेतले आणि काव्य लिहून घेतले. अनेक संगितकारांनी शांताबाईंच्या गीतांना चाली लावून अजरामर गाणी मराठी सिनेमा ना दिली. हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर यांनी त्यांच्या गीतांना योग्य न्याय मिळवून दिला!

शांताबाई या मागच्या पिढीतील अतिशय सुसंस्कृत, हुशार, चतुरस्त्र लेखन करणार्या कवयित्री होत्या.बहिणाबाई चौधरी, सरोजिनी बाबर, शांता शेळके या सारख्या कवयित्री नी आपल्या मराठी भाषेला जे लेणं दिलं आहे, ज्याचे मोल करता येणं अशक्यच आहे !

शांताबाईंच्या स्मृतीला मन:पूर्वक अभिवादन!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

?  विविधा ?

☆ कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक – शांताबाई शेळके – भाग-2 ☆ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

(जन्म:१२ ऑक्टोबर १९२२ – मृत्यू : ६ जून २००२)

आपल्या ओघवत्या भाषेचं श्रेय त्या आचार्य अत्रेंना देतात. ‘ शब्दांचा सोस असला तरी बोलण्यातील ओघ आपल्या लेखनात पाहिजे’; हे अत्रे यांचं वाक्य त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्रचूर भाषाशैली बदलली. जीवन अनुभव घेताना कोणताही प्रसंग, एखादे दृश्य, ऐखादं चित्रं, एखादं मनात कोरलं गेलेलं वाक्य, निसर्गाची विविध रूपं कविता सुचायला कारणीभूत झाले आहेत.

शांता शेळके यांची ‘ पैठणी ‘ ही कविता…. मनात खोलवर रुजलेली पण अजुनही मायेची उब व आधार देणारी ही कविता, ‘प्रत्येक स्त्री चा थोडा वेगळा असला तरी असाच एखादा अनुभव तिच्या मनात नक्कीच असणार———

‘पैठणी’—फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली आजीची एक ‘पैठणी’ जपून ठेवली आहे.कवयित्री लिहिते —–

कधीतरी ही पैठणी

मी धरते ऊरी कवळून

मऊ रेशमी स्पर्शामध्ये

आजी भेटते मला जवळून

त्यांची शोध ही कविता—— आजही स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारी कविता आहे. हा स्वतः च्या अस्तित्वाचा शोध पूर्वीही होता आणि आजही तसाच आहे. शोध या कवितेतील या ओळी पहा….

‘माहीत नव्हते मला माझे बळ,

माझी दुर्बलता   सतत मला वेढून बसलेली

माझी  भिरुता’

आणि पुढे त्या लिहितात—-

आत आतल्या आत मी.   

आहे उलगडत

 क्षणोक्षणी विस्तार पावत.

 पोहचते आहे जाऊन—

 अंतरंगाच्या कानाकोपऱ्यात.

 मी चकीत होत आहे.

 स्तिमित होत आहे.

दुखावत आहे आणि सुखावतही’

‘असा बेभान हा वारा’, ‘ किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह —अनेक सूक्ष्म, तरल,  वेगवेगळ्या भावना, संवेदना यातून जाणवतात.

चित्रपटातील गाणी जशी लोकप्रिय तशी चित्रपटातील ‘लावणी’ ही.

मराठा तितुका मेळवावा हा  ‘चित्रपट’; या चित्रपटातील लावणी. ‘ आनंदघन’ ह्या नावाने लताबाईंचं संगीत आहे.

‘ *रेशमाच्या रेघांनी

लाल काळया धाग्यांनी

कर्नाटकी कशिदा मी  काढीला        

हात नका लावू माझ्या साडीला’*

‘सोनियाची पाऊले’ पवनाकाठचा धोंडी’, ‘     ‘मंगळसूत्र’ हे लावण्यामुळे गाजलेले चित्रपट.

तसेच  चित्रपटातील त्यांची द्वंद्वगीतेही तितकीच लोकप्रिय झाली.

प्रसिद्ध कवयित्री सरोजिनी बाबर यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे काम केले. साहित्यातील विविध क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

आळंदी येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला.

निसर्गीची त्यांना विलक्षण ओढ होती.त्यांचे मन तासनतास तेथे रमे, हे धूळपाटी या त्यांच्या आत्मचरित्रात लक्षात येते.

म्हणून त्या म्हणतात_———

असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे’

कवयित्री शांता शेळके यांची काही प्रसिद्ध पुस्तके——

१. ‘चिमुकल्यासाठी गाणी —अकुबाई बकुबाई ‘हा  बालकविता संग्रह         

२.’ जन्म जान्हवी’

३. ‘तोच

काही अनुवादित पुस्तके—–

 ६. काॅनरॅड रिझ्टर यांचे अनुवादित पुस्तक —-  ‘गवती समुद्र’

७. लुईसा हे अल्काॅट ( मूळ इंग्रजी लेखिका)

    यांच्या लिटल वुमन पुस्तकाचा अनुवाद — ‘चौघीजणी’

८. द हेलन केलर ह्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद —  ‘आंधळी’

९.  मूळ लेखक वेद मेहता यांच्या पुस्तकाचा अनुवाद — ‘आंधळ्याचे डोळे’   

१०. कविता संग्रह —

      १. ‘असा बेभान वारा’

      २. ‘किनारे मनाचे’

      ३. ‘अनोळख’

११. ‘धूळपाटी’ हे आत्मचरित्र    

 

©️ सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

कवयित्री शांताबाई शेळके विशेषांक

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभला (एक आस्वादन ) – भाग 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(मागील भागात –  मनाच्या पैलपार बोलले जाणारे गहन गूढ, त्या बोलीचा अर्थ, त्याचे रहस्य जाणून, ते नामक्या शब्दात व्यक्त करणे शांताबाईंना सहजपणे जमून गेलय…. आता इथून पुढे)

‘हृदया, गात रहा नीज गीत’

सहजता हा शांताबाईंच्या काव्यलेखनाचा स्थायीभाव आहे.  जुन्या जमन्यातील अनागर सस्कृतीतील बहिणाबाई म्हणते,

अरे घरोटा घरोटा, तुझ्यातून पडे पिठी

तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी.

आजच्या जमानातल्या शांताबाई जुन्या जमन्यातील या बहिणाबाईचाच वारसा सांगतात जणू! ‘अंतरीचे स्व-भावे धावे बाहेरी’ या संतवचनाप्रमाणे जे जे अंतरात उचंबळलं, मनाला भावलं, ते ते काव्यरूपात बाहेर आलं. भोवतालच्या निसर्गाचा त्यांच्यावरचा प्रभाव, त्यांची प्रीतभावना, विरहावेदणा, त्यांचं एकाकीपण, चिंतन-गूढगुंजन, आत्मसंवाद सार्‍यांचंच प्रगतीकरण त्यांच्या कवितेत अगदी सहजपणे येतं॰

‘सांज काजळत आली   हाका येतात दुरून

आई ठेव ना आता    खेळ सारा आवरून’

किंवा  ‘मीच निर्मिली होती ती मायानगरी

          क्षणभर माझा जीव खुळा रमवाया

          जे जे होईल, व्हावे म्हटले होते

          त्याची केवळ करात आली छाया ‘

किंवा   होते इथे माझ्यासवे, होते सदा जे भोवती,

        आता कुठे गेले बरे, गेले कुठे ते सोबती

किती म्हणून उदाहरणे द्यावी?त्यांची प्रत्येक कविता सहजपणे साकार झाली आहे. त्यांच्या कवितेतील सहजपणाचे कारण, त्या ‘नीज गीत’ गात राहिल्या. ‘हृदया, गात रहा नीज गीत’ म्हणत राहिल्या. आपल्या हृदयाची स्पंदने व्यक्ता करत राहिल्या. ती व्यक्त करताना म्हणत राहिल्या, ‘ज्ञात जगाच्या पैलतीरावरि, असेल कोठे रसिक कुणीतरी, प्रांजळ तूझिया बोलावरती, जाडेल त्याची प्रीत’ 

‘वर्षा’ या शांताबाईंच्या पाहिल्याच काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत, शांताबाईंच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगताना रा. श्री. जोगांनी ‘सहजता आणि प्रसन्नता’यांचा उल्लेख केलाय. हीच वैशिष्ट्ये त्यांच्या पुढच्या, रूपसी, गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी इ. काव्यसंग्रहातही दिसून येतात. फक्त पुढच्या काळात त्यांची कविता त्यांची कविता सखोल, अर्थगंभीर, परिपक्व आणि विकसित होत गेली असं डॉ. प्रभा गणोरकर म्हणतात.

शांताबाईंच्या रचनेतील सहजता त्यांच्या कवितेइतकीच गीतरचनेतूनही जाणवते.किंबहुना आशा सहज, सुंदर रचनेमुळेच त्या उत्तम गीतकारही होऊ शकल्या. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे आधी बांधलेल्या चालींवर ज्या गीतरचना शांताबाईंनी केल्या, त्यातही ही सहजता उणावली नाही.

शांताबाईंचा प्रतिभा पक्षी त्याला वाटलं, तेच गात राहिला. त्याचे स्वत:चे सूर…. म्हणून ते सच्चे सूर वाटतात. त्यात कृत्रिमता, गारागिरी, उसनेपणा कुठेच नाही. शांताबाई स्वत:च म्हणतात, मी जे लिहिले, ते अगदी मनापासून लिहिले. त्यात उणिवा असतील, दोष असतील, पण अप्रामाणिकपणा यत्किंचितही नाही. एका कवितेत त्या म्हणतात,

‘नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा

एक सूर खरा लागो, उंच चढवून गळा’

नव्या वळणाचा दृश्य प्रभाव त्यांच्यावर खूप कमी आहे. त्यांची कविता नवतेबरोबर भरकटत गेली नाही. स्वत:च्या जाणिवा आणि त्यांची अभिव्यक्ती याबाबत ती स्वत:शी अत्यंत प्रामाणिक राहिली’ असं डॉ. प्रभा गणोरकर आवर्जून सांगतात.

शांताबाईंची कविता आत्मारत आहे पण ती आत्मकेंद्रित नाही. कुसुमावती देशपांडे यांनी ‘रूपसी’च्या प्रस्तावनेत ती ‘आत्मलक्षी’ असल्याचा उल्लेख केलाय. त्यांच्या कवितेत ‘भेदक आत्मविश्लेषण’ आणि ‘शांत प्रामाणिकपणा’ आहे, असेही त्या म्हणतात. ती केवळ स्वत:शीच बोलत नाही. ‘ग्रेस’सारखी ती केवळ स्वत:तच मश्गुल रहात नाही. ‘ग्रेस’ची कविता वाचताना वाटतं, हा कवी एका भारलेल्या रिंगणाच्या आत उभा आहे. त्यात सहजपणे दुसर्‍याला प्रवेश करता येणार नाही. त्यासाठी ‘तिळा उघड’ सारखा एखादा मंत्र माहीत असायला हवा. शांताबाईंचे तसे नाही. त्या स्वत:शी बोलतात. स्वत:शी बोलता बोलता त्या रसिकांशीही संवाद साधतात. केशवसुतांनी एका कवितेत म्हंटले आहे,

‘ तो माज गमले विभूती माझी  स्फुरत पसरली विश्वामाजी’

शांताबाईंच्या भावा-भावना, चिंतन-शोधनही असंच सर्वव्यापी होतं.

क्रमश: ….

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares