मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पंढरीची वारी — ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

??

☆ पंढरीची वारी…  डॉ.सोनिया कस्तुरे ☆

पंढरीच्या वारीला सातशे / आठशे वर्षांपासूनचा इतिहास आहे. कोरोनाचा काळ सोडला तर यात खंड पडलेला आपल्याला दिसत नाही. काय असेल पांडुरंगाकडे? का जातात इतकी लाखो माणसं पंढरीच्या वारीला? इतकी धाव, इतकी ओढ का दिसते माऊलीच्या भेटीसाठी? पंढरीचा पाडुरंग भेटल्यावर खरंच समाधानी होतात का हे भक्त? ही भक्ती खरंच, खरी असते का? 

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, 

चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू || 

विठ्ठलाचे नाव घेवू होऊनि निसं:ग 

नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || 

इतकं निस्संग, निर्मळ, स्वतःला हरवून विठ्ठलात लीन होऊन जगता येते?  बुद्धाच्या मते जीवन हे दुःखमय आहे. न शमणारी तृष्णा हे दु:खाचे मूळ कारण आहे. दुःख निवारणासाठी त्यांनी अष्टांग मार्ग आणि पंचशील सांगितले. दुःख आणि वेदनेचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत असतोच. सामान्य माणसाने वारी हे दु:ख निवारणार्थ साधलेला एक मार्ग तर नसेल..! वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत वाटते का? असे अनेक प्रश्न मला विद्यार्थी जीवनात पडायचे..

आई म्हणायची, 

सखू निघाली पंढरपूरा 

येशी पासूनी आली घरा ! 

घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखंदुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत, एकमेकांना नमस्कार करत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तन-मन-भान विसरुन पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. देहभान विसरुन मनाच्या आनंदाचा वारकऱ्यांनी साधलेला हा परमोच्च क्षण असावा.

“पुंडलिक वर दे हरी विठ्ठल,

श्री ज्ञानदेव तुकाराम 

पंढरीनाथ महाराज की जय !” 

असा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मीणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्या सारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा समतेचा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.

माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दूसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडीलांना संकष्टी सुद्धा करु द्यायची नाही. फक्त एकादशी करायची असा तिचा आग्रह. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होते. पण आम्ही वेगवेगळ्या पदार्थाच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरा केले जायचे. माझ्या आईने स्वाक्षरी  करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. ती कधी शाळेत गेली नव्हती. पण माझी आई म्हणजे लहानपणीची शाळा आणि मोठेपणीचे जीवन विद्यापीठ होते. सगळे अभंग तिला तोंडपाठ असायचे. तीचे बालपण कर्नाटकातले. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडीओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थीत करेल. हा तिचा विश्वास होता. वडील तलाठी नंतर सर्कल म्हणून प्रमोशन मिळाल्यावर नोकरी निमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची. संतांचे अभंग हाच तिच्या ज्ञानाचा झरा होता. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचे त्यावेळी मंदिरात आणि घरी वाचन व्हायचे, ते ऐकायला ती जात असे. वडीलही तिच्या सोबत भजनात रमून जायचे. त्याच्या जगण्या वागण्यात बोलण्यात भक्तीचा सुगंध दरवळत राही. भजनी मंडळात अनेक जाती धर्माचे लोक होते. ते खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगत होते. पांडुरंगाच्या भक्तीने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणले होते एका पातळीवर आणले होते. हा खूप मोठा आनंदाचा भाग होता. वारीने सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना सामावून घेतले आहे. त्यामुळे आमच्या लहानपणी आम्हाला मानवता हा एकच धर्म माहीत होता.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ 

तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे 

अशाच भावनेची कालची वारी होती. आजचीही वारी भक्ती या एकच भावनेने एकत्र चालते असे माझे मत आहे. अशा भक्तिमय वातावरणातले माझे बालपण. 

आईचे सगळे लक्ष अभंगाकडेच असायचे. ती बऱ्याचदा मला विणा घेऊन भजनाला बसवायची.

तुकोबा म्हणतात तसे

“आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे” 

अगदी अशीच होऊन जगायची माझी आई…

तुकोबांच्या अभंगानी तिला नवे विचार मिळाले. तीने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला आठवत नाही. एवढेच काय ती चालत वारीला कधीच गेली नाही. मुलाबाळांना मागे ठेवून जाणे तिला मान्य नव्हते. मुलाबाळांना गर्दीत घेऊन जायला नको म्हणून आम्हाला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पंढरपूरला घेऊन जायची. वडील सोबत असायचे. आम्ही दोन दिवस तिथे मुक्काम करुन मनसोक्त दर्शन घेऊन परतायचो. 

जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला पांडुरंग आपल्याला बळ देईल किंबहुना तोच संकटाना सामोरे जाण्याचं बळ देतो असे तिला वाटायचे.

सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी 

देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी 

हे तीचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र यापैकी काहीच तिला माहित नव्हते. पण तिला जगणं, माणसांना समजून घेणं, आणि मनाचा समतोल साधणं माहित होते. म्हणूनच विवेकाच्या पातळीवर जाऊन अयोग्य वागणाऱ्या स्वतःच्या पोटच्या मुलाला घरातून बेदखल करणं तिला शक्य झाले असेल. सगळी सुखंदुःखं तुळसीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती..! हे मी पाहिले आहे. आज तीच्या या श्रद्धारुपी निष्ठेचे मला राहून राहून आश्चर्य आणि कौतुक वाटते. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिला संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली काम सुद्धा ती न डगमगता, न कंटाळता आनंदाने करायची. तीच्या तोंडी सतत अभंग. ती काम करत अभंग गुणगुणायची.

“कांदा, मुळा,भाजी अवघे विठाई माझी.”

असे म्हणत तिची कामं चालू असायची. मला आठवतंय जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा एक गाणं ती नेहमी म्हणायची… 

 कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो 

 हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो. 

बहिणाबाईची कविता तिला माहित होती.

अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर 

आईला कविता पाठ होती. रेडीओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची ! आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विठोबा किंवा पांडुरंग म्हणजे आपण आपल्या जगण्या वागण्यात मनाशी केलेला एक उत्तम, निस्पृह, निर्मळ, विवेकी संवाद व निश्चय आहे. असे मला माझ्या आईच्या भक्तीतून जाणवले.

विज्ञानाने शरीरा बरोबर मनाच्या अगणित प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आणि योग्य उपचार पद्धती विकसित करण्यात यश मिळविले आहे. विज्ञानाकडून उत्तर मिळाले असले तरी विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांना पूरक आहेत. येथे कर्मकांडाला अजिबात थारा नाही. हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घातली तर आपल्याही मदतीला विठोबा/ पांडुरंग नक्की येईल. म्हणूनच

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण 

एकवीसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नव्हते. असे होणे शक्य नाही असे मला वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसामागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. यात स्त्रीयांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची ओपीडी , hospitals तुडूंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ/ मानसविकार तज्ञ संख्येने तसे खूपच कमी आहेत. 

माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी, समतेचा आग्रह धरणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. माणसाना बोलत करणं, प्रसंगी त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेणं. त्यांच्या मनातील वादळांना वाट करून देण्याची नितांत गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच असतो. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थीत होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याने मन मोकळं करण्यासाठी, मन हलकं करण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून सांगितलेली गोष्ट त्यांच्या माघारी दूसऱ्या कुणाला सांगू नये. एवढे मोठे मन प्रत्येकाकडे असायला हवे. मनोविकारांना मात्र औषधोपचारीची गरज असते. हे विसरून चालणार नाही. शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे. माणसा माणसातील प्रेमभाव मैत्र भाव टिकून राहणे त्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे.

माणसांच्या मनात भक्तीचा मळा फुलावा. जो जे वांच्छील तो ते लाभूदे ! आणि मानवी जगणे सुखाचे होऊदे. हीच मागणी माणसातल्या पांडुरंगाकडे.

माणूस जेव्हा एक पायरी वर चढतो तेव्हा तो देव होतो. माणूस जेव्हा एक पायरी खाली उतरतो तेव्हा तो राक्षस होतो.

आई , तू नाहीस हे माहित आहे तरीही..

।। भेटी लागी जीवा। लागली से आस ।। 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

आजही माझ्या स्वप्नात तेच घर येतं. एक मजली, खालच्या पायरीवर पाण्याचा नळ असलेलं,  वर जाण्यासाठी एक लाकडी जिना,  उजवीकडे दरवाजा,  मधल्या भागातलं छोटसं लँडिंग,  दरवाजा लाकडाचा आणि घरात जाताना ओलांडावा लागणारा लाकडी उंबरठा. दरवाजाच्या बाहेरच्या,वरच्या  भागावर लटकणारी एक लोखंडी साखळी.  बाहेर जाताना ती साखळी अडकवायची आणि त्यात लोखंडी कुलूप लावायचं.  जाताना दोन वेळा कुलूप ओढून बघायचं.  आता हे आठवलं की वाटतं त्यावेळी अशा कुलपातलं बंद घर कसं काय सुरक्षित राहायचं?  आता आपण घराला दोन दोन दरवाजे, एक जाळीचा,  एकाला पीप होल,  अत्याधुनिक कुलुपे, गुप्त नंबर असलेली,  शिवाय कॅमेरे, सीसीटीव्ही आणि असेच बरेच काय काय… तरीही आपलं घर सुरक्षित राहील का? याविषयी शंकाच असते.

तो काळच वेगळा होता का? स्वप्नात जेव्हा जेव्हा मला ते घर दिसतं तेव्हा तेव्हा मी मनोमन त्या वास्तुदेवतेस  मनापासून नमस्कार करते.  कारण याच वास्तुदेवतेने माझी जडणघडण केली. इथेच मी खरी मोठी झाले आणि आयुष्यातले असंख्य आनंदाचेच नव्हे तर अनेक संमिश्र भावनांचे क्षण वेचले.

४/५ शा.मा. रोड, धोबी गल्ली, टेंभी नाका ठाणे.

या पत्त्याला माझ्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण माझं बालपण याच गल्लीत गेलं.  बालपणीचा तो रम्य काळ आणि धोबी गल्ली याचं अतूट नातं आहे. या गल्लीचं आजही माझ्या मनात अस्तित्व आहे.  ती जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येते, हळूहळू आकारते आणि चैतन्यमय होते. अरुंद पण लांबलचक असलेली ती गल्ली,  एकमेकांना चिकटून समोरासमोर उभी असलेली काही बैठी,काही एक मजली घरं.. त्या सर्व घरांची दारं मनातल्या मनात फटाफट उघडली जातात आणि माझे ते बाल सवंगडी माझ्या भोवती नकळत गोळा होतात. चित्रा,चारू, बेबी, दिलीप, सुरेश, अशोक, लता, रेखा, अरुण, शरद, आनंद कितीतरी आणि मग आमचे खेळ रंगतात.

डबा ऐसपैस, लगोरी, सागरगोटे, कंचे, लंगडी, खो-खो, अगदी क्रिकेट सुद्धा! आरडाओरडा,  गोंगाट, धम्माल!

पद्धतशीर क्रीडा साहित्य म्हणजे काय याच्याशी आमची ओळख ही नव्हती.  खरं म्हणजे आम्हाला त्याची जरुरीच भासली नाही.  धुणं धुवायच्या धोपटण्याने आम्ही क्रिकेट खेळलो. असमान उंचीच्या मिळेल त्या  काठ्यांनी आम्ही यष्टी रचली. गद्र्यांचं घर ते सलाग्र्यांचं  घर ही आमची विकेट आणि त्यापलीकडे चौकाराच्या, षटकाराच्या रेषा. समोरासमोर असलेल्या पायऱ्यांवर उभे राहून फिल्डींग  व्हायचं आणि असं आमचं गल्ली  क्रिकेट जोरदार रंगायचं. रडी खडी सगळं असायचं पण मुल्हेरकरांचे नाना आमचे थर्ड अंपायर असायचे.  नाना तसे काही फारसे खिलाडू वृत्तीचे नव्हते. आम्हा खेळणाऱ्या मुलांचा खूप राग राग करायचे. चुकून त्यांच्या गॅलरीत आमचा बॉल गेला तर ते परतही द्यायचे नाहीत. 

“मस्तवाल कार्टी! रविवारी सुद्धा शाळेत पाठवा यांना.  नुसता गोंगाट करतात, दुपारची वामकुक्षीही  घेऊ देत नाहीत.” पण तरीही आम्ही खेळत असताना गॅलरीच्या धक्क्याला टेकून उभ्याने आमचा खेळही बघत असत आणि त्यांना अंपायरचा मान दिला की मात्र ते खूष व्हायचे. आम्ही पोरंही काही साधी नव्हतो बरं का! चांगले चतुर, लबाड, लुच्चेच होतो आणि प्रचंड मस्तीखोरही. आज जेव्हा मी पाठीवर पुस्तकांनी भरलेली बॅग पॅक घेऊन स्कूलबसच्या रांगेत आजी किंवा आजोबांचा हात धरून उभं असलेलं बाल्य बघते ना तेव्हा पोटात कळवळतं कुठेतरी.  हरवलेलं, बॅकपॅक मध्ये कोंबलेलं ते बालपण माझं काळीज चिरून जातं. 

धोबी गल्लीतली ती घरं म्हणजे नुसत्या चुना मातीच्या भिंती नव्हत्या. या भिंती बोलक्या होत्या. या भिंतींच्या आत आणि पलीकडे असलेल्या जगाचा एक सुंदर बंध होता. एक रक्ताचा आणि दुसरा सामाजिक. घरात असलेली नाती आणि भिंतीच्या पलिकडची नाती बांधणारा तिथे एक अदृश्य पूल होता आणि या पुलावरच मी घडले.  त्या वातावरणात मी वाढले, तिथे माझ्यावर असंख्य वेगवेगळे संस्कार झाले.

माझी संस्कारांची व्याख्या आणखी थोडी निराळी आहे.  सर्वसाधारणपणे संस्कार म्हणजे मोठ्यांचा मान ठेवणे, रीती, परंपरा,  देवधर्म पाळणे,  नेहमी खरे बोलणे,  नम्रता, शालीनता, सुहास्य, सुभाष्य वगैरे वगैरे खूप काही. संस्कार म्हणजे एक आदर्श तत्वांचं भलं मोठं गाठोडच म्हणा ना!  ते तर आहेच. ते नाकारता येणारच नाही पण त्या पलिकडे जाऊन मी म्हणेन संस्कार म्हणजे स्वतः केलेलं निरीक्षण. आजूबाजूच्या वातावरणातून मिळालेली अनेकविध चांगली वाईट भलीबुरी टिपणं आणि या सगळ्या तुकड्या तुकड्यांमध्ये मी कोणता तुकडा हे योग्य रितीने शोधणं,  ते शोधता येण्याची क्षमता असणं म्हणजे संस्कार.

धोबी गल्लीत माझं बालपण फुलत असताना कळत नकळत अनेक चांगल्या वाईट भावभावनांचं, प्रसंगांचं नकळत मेंदूत झालेलं रजिस्ट्रेशन आजही डिलीट झालेलं नाही.  बालपणी हसताना, खेळताना, भांडताना, बागडताना, बघताना फारसे प्रश्न पडले नसतील किंबहुना प्रश्न विचारण्याची क्षमता तेव्हा नसेल पण पुढच्या आयुष्यात जगताना आणि मागे वळून पाहताना अनुभवलेल्या या प्रसंगांनी आपल्याला किती शिकवण दिली याची जेव्हा जाणीव होते ना तेव्हा संस्काराची व्याख्या व्यापक  होते.

धोबी गल्ली म्हणजे माझ्यासाठी बालभारती होती.

धोबी गल्लीतलं जग लहान होतं.  काही थोड्याच लोकसंख्यांचं होतं.  फार तर दहा-बारा  घरं असतील  पण आता विचार केला तर वाटतं जग लहान किंवा मोठं नसतं. जे जग तुम्हाला किती दूरवर नेऊ शकतं  किंवा किती दूरवरचे दाखवते,  किती विविधतेत तुम्हाला वावरायला लावते त्यावरून त्याचं क्षेत्रफळ ठरत असतं.

धोबी गल्ली तशी होती.

ते एक निराळं जग होतं.  लहान— थोर सर्वांचंच. या गल्लीत जितकी  एकजूट आणि एकोपा अनुभवला तितक्याच मारामाऱ्या आणि आणि भांडणही पाहिली.  जिथे देवांच्या आरत्या ऐकल्या, म्हटल्या तिथे प्रचंड शिवराळ भाषेचाही भेसूरपणा अनुभवला.

मुळातच या धोबी गल्लीचे दोन भाग होते. एक इकडची गल्ली आणि एक तिकडची गल्ली.  दोन्ही भागातलं जग निराळं होतं, दोन्ही भागातली संस्कृती वेगळी होती.  आम्ही मुलं इकडच्या गल्लीतली होतो.  कुटुंबात सुरक्षितपणे वाढत होतो. आम्ही शाळेत जात होतो, अभ्यास करत होतो, गृहपाठ, परीक्षा.. सहामाही— वार्षिक यांचा तणाव बाळगत होतो, परवचा, शुभंकरोती प्रार्थना  म्हणत होतो.  मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्टीत मुक्तपणे धांगडधिंगा घालत होतो. घरातल्या मोठ्या माणसांचा दमही खात होतो आणि प्रत्येक जण कधी ना कधी, लपून-छपून गुन्हेही करत होते. गुन्हा शब्द फार मोठा वाटेल पण त्यावेळी घंटीच्या गाडीवर जाऊन बर्फाचा गोळा खाणे, कुणाच्या परसदारात जाऊन झाडावरच्या कैऱ्या नाहीतर जांभळं तोडणे, बटुबाईच्या कोंबड्यांना पळवणे, नाहीतर तिकडच्या गल्लीत राहणाऱ्या एबी आणि रोशन या बहिणींशी गप्पा मारायला जाणं वगैरे अशा प्रकारचे  मोठ्यांचे अज्ञाभंग करणारे गुन्हे असायचे. 

इकडच्या गल्लीतलं पहिलं घर होतं मथुरे यांचं आणि शेवटचं दिघ्यांचं. त्यामुळे मथुरे ते दिघे हे आमचं जग होतं पण पलीकडच्या म्हणजेच तिकडच्या धोबी गल्लीतलं जीवन फार वेगळं होतं. तिथे राहणारी माणसं, त्यांचे व्यवसाय, त्यांचे आचार विचार वागणं अगदी त्यांचा आर्थिक स्तर, जात धर्म यांतही भेद होते. हे अंतर , हा भेद त्यावेळी का राखला गेला, का बाळगला  गेला किंवा तो का पार करता आला नाही हे सारे प्रश्न आता मनात येतात पण त्यावेळी मात्र माझं बालपण या दोन भिन्न विश्वात नकळतपणे विभागलं गेलं होतं.

बाकीचं फारसं आठवत नाही पण एबी आणि रोशन या ईस्रायली बहिणींबद्दल मात्र मला खूप कुतूहल होतं हे नक्कीच.  त्या दोघी अतिशय सुंदर होत्या.  त्या काळात त्या हिंदी सिनेसृष्टीतल्या समूह नृत्यांगना होत्या. त्यांच्याकडे नृत्य शिकवायला कोणी कोणी येत.  खरं म्हणजे आम्हाला त्यांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती पण त्या दोघींना त्यावेळी मस्त फॅशनेबल कपडे घालून, आता आपण ज्याला मेकअप म्हणतो पण त्यावेळी रंगवलेल्या चेहऱ्याने त्यांना गल्ली ओलांडताना मी अनेकदा माझ्या घराच्या खिडकीतून  पहायची आणि खरं सांगू मला त्या दोघींबद्दल खूप आकर्षण वाटायचं.  त्याही वयात वाटायचं की यांच्याशी आपण का नाही बोलायचं? का नाही त्यांच्याशी मैत्री करायची?

त्या उदरनिर्वाहासाठी सिनेमात गेल्या. त्यांच्यावर घर चालवण्याची जबाबदारी होती. रोशन तर साधारण माझ्याच वयाची होती. एबी थोडी मोठी होती.

उदरनिर्वाह,घर चालविणे यातलं गांभीर्य तेव्हा मला कळतही नव्हतं. इतकंच कळत होतं आपल्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत.

काही वर्षांनी ते सारं कुटुंब पॅलेस्टाईनला स्थलांतरित झाले.

अशा या पार्श्वभूमीवर आजही ती धोबी गल्ली मला एखाद्या स्थितप्रज्ञा सारखी भासते.  तिथल्या घराघरांमध्ये घडणाऱ्या घटनांची खरी साक्षीदार वाटते. सर्व धर्म आचार विचार समावेशक वाटते. 

तो एक अथांग जीवन प्रवाह होता आणि माझं बालपण त्याच प्रवाहात वल्ही मारत  घडत होतं.

 – क्रमशः भाग १. 

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चूल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ चूल… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

होय, 

मी चूल! 

अलीकडच्या काळात नामशेष झालेली मी चूल! अजूनही कुठे कुठे माझं अस्तिव आहेच! तस ते जगाच्या इतिहासात कोणत्या ना कोणत्या प्रकारे राहील यात तिळमात्र शंका नाही! फार पूर्वीच्या काळापासून  अस म्हणण्या पेक्षा मी यावत चंद्र दिवाकर! जगाच्या अस्तित्वातच मी आहे!  माझं रूप अग्नी महाभूता पासून झालेलं!  सूर्य नारायण हेच त्याच प्रतीक! अवकाशात माझं प्रतिबिंब! 

तस धरतीच्या पोटात असलेला तप्त लाव्हारस हे पृथेवरच प्रतीक! मी कुठे नाही ? चराचरात माझं अस्तित्व आहे ते अग्नी महाभूताच्या  रुपात! पाण्याच्या थेंबात पण मी आहेच! काळ्याजर्द मेघात घर्षण झाले की मी रुपेरी सौंदमीनीच्या रुपात मी भूतलावर अवतरते! माझं उष्ण दाहक रूप हे मानवाच्या हितकरता! माझ्याशिवाय जीवनाची भट्टी पेटत नाही! मी आहे म्हणूनच आयुष्य आहे! 

।।अहं ही वैश्वानरो देवो प्राणिनांम देह आश्रिता ।।

।। प्राण आपनो समयुक्तम पश्चमन्यांम चतुर्वीधम ।।

मीच तो अग्नी तुमच्या शरीरात राहून प्राण व अपान वायूचे पोषण करतो व तुम्ही घेतलेल्या चतुर्वीध अन्नाचा पचन करतो! शरीर पोषण म्हणजेच जीवन यापन पण करतो.

ऋषीमुनींची मी आवडती! त्यांनीच मला प्रथम ह्या पृथ्वीवर पचारण केल!  माझ्या आयुष्याचा अग्नी तृप्त करण्यासाठी मला वेळोवेळी समिधा अर्पण केल्या! व माझी भूक भागवली! 

होम यागादी कृत्यात मी प्रथम प्रविष्ट झाले! ते नन्तर मग प्रत्येक प्राणिमात्रांची भूक भागवण्याचे श्रेय व काम माझ्याकडे जस आले, तसा माझा जन्म झाला! मला चूल म्हणून नामकरण करण्यात आलं! 

तसे कित्येक आकारात मी असले तरी, माझा मूळ आकार त्रिकोणीच!  तीन दगडाची चूल!!  माझा अवतार हा मूळ आदी मायेचा! विश्व साकारण्यासाठी माझी उत्पत्ती!  तीन कोन तीन दगड!  त्रिगुणात्मक माझी रचना! सत्व रज तम! 

तिन्ही गुणांचा समन्वय साधण्यासाठी अग्निरूपी इंधनाची तजवीज पण करून ठेवली! 

अग्निप्रधान महाभूताचे प्रतीक असलेल आदिमायेच रूप म्हणजेच मी!!! माझ्या शिवाय आयुष्य हे अपूर्ण! 

प्रचंड ज्वाळा उत्पन्न करण्याची क्षमता! वेदनेची धग उष्णता चटके सोसण्यासाठी मला त्रिकोणी आकारात बंदिस्त व्हावं लागलं! एकदा  मी पेटले की  

कुणाचेही ऐकत नाही! येईल ते इंधन, मग ते कोणत्याही झाडाचं, असो त्याला भस्म सात करण्याची शक्ती मला देवांनी दिली!  मला शमविण्यासाठी ऋषी मुनीनी

दूध ह्या पूर्ण अन्न निवडले! 

राखेच्या आड मी  धगधगत असतेच! 

चुलीच्या बंदिस्त वातावरणात, माझं काम योग्य होत असावे अस विश्वकर्म्यला वाटले असावे . 

माझा अन स्त्रीचा सम्बन्ध फार जुना आहे! सक्ष्यात अन्नपूर्णा देवीनेच मला प्रगट केलं .  भगवान शंकराला ज्यावेळी भूख लागली, त्यावेळेस मला पाचारण करून बोलवलं! त्यावेळी पासूनच काम आजपर्यंत सतत चालूच आहे! 

भूख ही मानवी प्राण्यांची गरज लक्ष्यात घेऊन, शाक पाक सिद्ध करण्याची जबाबदारी एकदम  मला व पार्वती अन्नपूर्णेवर आली . हेच जगाच्या उत्पत्ती चे मूळ कारण असावे! 

भूक भागवण्यासाठी प्रत्येक्षात शंकर म्हणाले होते

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ।।

ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्ष्यां देही च पार्वती ।।

माता च पार्वती देवी पिता देवो माहेश्वरा ।। 

भगवान शंकर म्हणतात ज्ञान व वैराग्य मिळवण्यासाठी मला भिक्षा वाढ! मला सर्वज्ञान मिळू दे!  विश्व दर्शन पण होऊ दे व ते फक्त तुझ्यामुळे शक्य आहे .

जगाच्या संगोपनाची शक्ती, भूख भागवण्यासाठीची युक्ती फक्त माझ्यात व स्त्रीत्वात आहे!  मानवीय म्हणा किंवा पक्षी वा पशूंची म्हणा भूख ही अनेक प्रकारची आहेच . स्त्रीला चूल व मूल हे कधी चुकले आहे का ? मग ती स्त्री अडाणी असो वा शिकलेली असो, त्यातच तर जीवनाचे गुपित दडले आहे . 

स्त्री काय किंवा मी काय, आमच्या दोघीत साधर्म्य आहेच म्हणूनच आमची निर्मिती ईश्वरीय आहे. आज माझं रुपडच बदलुन टाकलं आहे! बर्शन ची शेगडी, इलेक्ट्रॉनिक शेगडी, सौर ऊर्जेची शेगडी, वाटर हिटर, मोठया पावाच्या भट्ट्या, तंदुरी, टर्बाईन,  ही सर्व माझीच रूपे! 

आहेत  आणि सदैव राहतील! फक्त  मानवाची गरज भागविण्यासाठी!!!

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ नेमकं जगावं कसं ? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नेमकं जगावं कसं ?  तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं…! 

तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही….! 

आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत… आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची…! 

चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच…. परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं….,! 

“पुढे चला… पुढे सरका….” असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस….

खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच… 

पण कुणावर विशेष लोभ नाही…

कोणावर राग तर मुळीच नाही… 

कुणाचा द्वेष नाही… 

कुणाचा तिरस्कार नाही… 

आपला संबंध फक्त तिकिटापुरता… ! 

कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही… 

कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही… 

दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं… 

येईल तो येऊ दे…. जाईल तो जाऊ दे…

मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते…. 

प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं …. 

आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं…. 

पण त्या गावात अडकायचं नाही…. 

आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या “ठेसनावर” जायचं….

“शिंगल” बेल मारली की थांबायचं… “डबल” मारली की निघायचं…. बास, इतके साधे नियम पाळायचे…. आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही…! 

हा शेवटचा स्टॉप आहे….समद्यानी उतरून घ्या… असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की “आपल्या घरी” निघून जायचं…. ! 

उद्या कुठे जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल…. ? हे ठरवणारा वेगळा असतो… 

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही… ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही…. सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही…

शाश्वत एकच आहे… तो म्हणजे प्रवास…! 

आपण असू तरी, आणि आपण नसू तरीही… प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही… प्रवास सुरू राहणारच आहे…. निरंतर आणि निरंतर…! 

वैद्यकीय

  1. नेहमीप्रमाणेच या महिन्यात सुद्धा रस्त्यावर अनेक लोक असे सापडले, ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली, अक्षरशः हात किंवा पाय कापावे लागले,अनेक गंभीर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं…. पाण्याबाहेर माशाला काढल्यानंतर तो जसा तडफडेल, तसे तडफडणारे लोक पाहिले… कागद फाटतो तसा, गाल फाटलाय… गळा कापलाय… नारळ फुटतो, तसं डोकं फुटलंय… आणखी हि बरंच काही दिसतं…!

डॉक्टर असून सुद्धा, हे पाहताना माझी चलबीचल होते… शेवटी मी सुद्धा माणूसच आहे…! 

माझ्याही पेक्षा जास्त, तुम्ही सर्व संवेदनशील आहात आणि म्हणून मी असे कोणतेही फोटो / व्हिडिओ शेअर करत नाही…! 

असो… 

पण हि माझी माणसं कालांतराने बरी होतात… रानफुलं हि…. यांना ना पाणी लागत… ना खत लागत… ना मशागत….! 

“प्रेमाचं” आणि “मायेचं” टॉनिक यांना पुरतं…!!! 

जवळपास दोनशे किलोचं साहित्य मी माझ्या गाडीवर आणि बॉडीवर घेऊन रोज फिरत असतो दिवसभर…. पण आतली गोष्ट सांगतो…. माझ्याकडे कोणतंही औषध नसतंच मुळात… ! 

मी फक्त “प्रेमायसिन” आणि “मायामायसिन” हे दोनच टॉनिक घेऊन फिरत असतो…!

हिच दोन औषधे, सर्वच्या सर्व रोगांवर जालीम इलाज आहेत…. !

अं… हं…. !  मेडिकलमध्ये मिळणार नाहीत हि औषधे…  

तुम्ही “तुमचा कप्पा” खोला…  प्रेमायसिन आणि मायामायसिन…  आधीपासूनच निसर्गाने आपल्याला भरभरून दिली आहेत… ती तुम्हाला या कप्प्यात मिळतील….

गरज आहे; ती हि औषधे मनापासून वापरण्याची … !!! 

या औषधांना एक्सपायरी डेट नसते…. कधीही कुठेही ही औषधे वापरता येतात… कोणताही साईड इफेक्ट नाही…. 

झालाच तर फक्त फायदा आणि फायदाच होतो … देणाऱ्यालाही आणि घेणाऱ्यालाही…! 

Try करके देखो, अच्छा लगता है …!!!

भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी

  1. एक प्रौढ महिला…. घरात सर्व लोक असूनही, मुलाबाळांनी तिचा गोडवा पातेल्यात काढला,या गोडव्याचा आमरस करून खाऊन झाल्यानंतर, तिला कोय म्हणून उकिरड्यावर फेकून दिलं ….
  2. म्हाताऱ्या सासू सोबत जगणारी, एक तरुण महिला; आपल्या मुलांना घेऊन जगण्याची लढाई लढत आहे… नवरा नावाचा प्राणी”बेधुंद” असतो…मुलं आणि सासूला जगवण्यासाठी थोडा वेळ हि ताई काम करते…. थोडा वेळ सासूसह भीक मागते…! (हिच्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी आपण घेतली आहे)
  3. चुकून मार्ग चुकलेला एक तरुण… !

आपणही आडवाटेवर खूपदा चुकून चुकतो… चुकायची इच्छा कुणाचीच नसते, परंतु परिस्थिती रस्ता चुकायला लावते… मग एखाद्याची आपण वाट पाहतो… कोणीतरी येईल आणि मला रस्ता दाखवेल…

आपण रस्त्यावरच्या एखाद्याला पोटतिडकीनं पत्ता विचारतो…. तेव्हा एखादा “तो”, तोंडातली तंबाखूची गुळणी आवरत, पण अगदी मनापासून आपल्याला सांगतो…”आता सरळ जावा… मंग दोन फाटे फुटतील, तिथं डाव्या हाताला वळा…. थोडं फुड गेला की एक चौक लागंल… चौकातनं उजव्या हाताला वळा… तीतं मारुतीचं मंदिर लागंल… मारुतीच्या मंदिराला वळसा घातला की मंग आलं तुमचं ठिकाण…!”

भेटलेला “हा” आपल्या आयुष्यातला वाटाड्या…!!!

पत्ता सोपाच असतो, परंतु कोणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही…! 

जेव्हा आपण चुकलेलो असतो, तेव्हा एखाद्या अशा पत्ता सांगणाऱ्या “वाटाड्याची” मात्र गरज असते…

आपणा सर्वांच्या मदतीने या तरुणाचा मी वाटाड्या झालो… ! 

या तिघांनाही आपण स्वतंत्रपणे तीन हात गाड्या घेऊन दिल्या आहेत… 

यावर ते भाजीपाला विकतील, लिंबू सरबत विकतील किंवा भंगाराचा व्यवसाय करतील…. काहीही करोत… पण माणसं म्हणून जगतील…!

रस्ता वर्षानुवर्ष तिथेच होता….पोचायचं ठिकाण सुद्धा वर्षानुवर्ष तिथंच जवळच होतं… ते वाट चुकले होते… मी फक्त तुमच्या साथीने;  “वाटाड्या”  होऊन त्यांना वाट दाखवली…. बाकी माझं काहीही कर्तुत्व नाही…. !!! 

4. जिला कुणीही नाही अशी एक मावशी, दोन लहान मुलं पदरात असणारी एक विधवा ताई…. फरशीवर पाणी सांडल्यानंतर ते अस्ताव्यस्त जसं कुठेही दिशाहीन फिरतं तसाच दिशाहीन फिरणारा एक तरुण….!

तिघेही गटांगळ्या खात होते…. फक्त एका काडीचा आधार हवा होता… आपल्या सर्वांचे वतीने तिघांनाही हा काडीचा आधार दिला आहे. 

 तिघांनाही छोटे छोटे व्यवसाय करण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीने आर्थिक मदत केली आहे. 

वरील सहा जणांच्या आयुष्याविषयी जर लिहायचं ठरवलं तर सहा स्वतंत्र पुस्तक होतील….! 

तुटून फुटून गेली होती ही माणसं…. पण हरकत नाही, आयुष्याला आकार द्यायला स्वतःला तोडून फोडूनच घ्यावं लागतं…! 

भीक न मागता यांना काम करायला सांगितलं आहे… त्यांना हे सुद्धा सांगितलं आहे की, फक्त नशिबावर विश्वास ठेवू नका… निसर्गाने सुद्धा हाताच्या रेषांआधी प्रत्येकाला बोटं दिली आहेत…. ती काम करण्यासाठी… मेहनत करण्यासाठी… भविष्य बघण्यासाठी नव्हे…! 

शैक्षणिक 

दुसरी- तिसरी -पाचवी, सातवी- बीबीए – कम्प्युटर सायन्स – यूपीएससी… आमची मुले या इयत्तांमध्ये शिकतात…! 

या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत…! 

माझ्या आयुष्यावर जे पुस्तक लिहिलं आहे…. ते आपण विकत घेतलं आणि म्हणून मी या मुलांच्या फिया भरू शकलो…! 

जी मुलं राहिली असतील त्यांच्या फीया जूनच्या पहिल्या आठवड्यात भरणार आहोत…! 

ज्यांना या अगोदर शाळाच माहीत नव्हती, अशा सर्व मुला मुलींना मॉडर्न स्कूल, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन देत आहोत. 

यातला एक जाणता मुलगा परवा रागाने मला म्हणाला, ‘असल्या भिकारी आई बापाच्या घरात माझा जन्म झाला म्हणून माझं आयुष्य वाया गेलं… चांगल्या घरात जन्मलो असतो तर माझ्या आयुष्याची अशी वाट नसती लागली… मला जर वरदान मिळालं; तर मी पहिल्यांदा आई बाप बदलेन…’ 

त्याला फक्त इतकंच सांगितलंय…. ‘आतापर्यंत भर समुद्रात जे जहाज तुला घेऊन आलंय त्या जहाजाला विसरू नकोस… या जहाजाविषयी कृतज्ञता बाळग… नाहीतर इथपर्यंत सुद्धा आला नसतास…. वादळ आलं; की दिशा बदलायची असते बाळा… जहाज नव्हे…! 

डोळे तपासणी

ज्यांना डोळ्यांचे काही त्रास आहेत, अशा सर्वांना आपण महिन्यातील एका दिवशी, एका ठिकाणी जमा करतो आणि त्या सर्वांना एकत्रितपणे घेऊन डोळे तपासणी / ऑपरेशन साठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. तिथे एक तर त्यांना चष्मा मिळतो किंवा डोळ्यांचं ऑपरेशन होतं. 

परंतु आमच्याकडे असे अनेक लोक आहेत, ज्यांना इतके शारीरिक त्रास आहेत की, त्यांना आमच्याबरोबर, आमच्या गाडीत बसून तिथं येणं सुद्धा जमत नाही… ऑपरेशन आणि तपासणी तर दूरच…

अशांसाठी आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे. रस्त्यावरच डोळे तपासणी करून आम्ही रस्त्यावरच आता त्यांना चष्मे द्यायला सुरुवात केली आहे. 

जवळपास अंधत्व आलेल्या माझ्या या लोकांना जेव्हा दिसू लागतं… तेव्हा माझ्या नजरेत नजर घालून माझ्याशी ते मायेनं बोलतात… आणि त्या प्रत्येक डोळ्यात मला मग सूर्य दिसतो…. ! 

सुरकुतलेले खरबरीत हात मग किरण होऊन माझ्याकडे झेपावतात…. आणि हे किरण, माझ्या मस्तकाचे, गालाचे आणि हाताचे मुके घेतात…! 

आणि मग सुर्य आकाशात नाही… तो आपल्या आई – बाबा,आजी आणि आजोबाच्या डोळ्यात आपल्याच घरी आहे हे उमगतं…! 

कोण म्हणतं सूर्याजवळ जाणं अशक्य आहे…? आपले बाबा आणि आजोबा यांच्या जवळ एकदा मनापासून जाऊन बघा… सूर्य तिथे भेटेल…! 

चंद्रावर जाण्यासाठी कोणत्याही यानाची गरज नाही… आईचे / आजीचे पाय एकदा मांडीवर घेऊन बघा…. चंद्र तिथे भेटेल…!!

जे काही थोडंफार करू शकलो तुमच्या साथीनं, त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून आनंदाश्रू गालावर ओघळले… 

अश्रूंचा हा खारट स्वाद कोणत्याही मिठाई पेक्षा कमी नव्हता…! 

माझ्या आयुष्यातील हे आनंदाचे क्षण केवळ तुम्हा सर्वांमुळे आले आणि म्हणून या महिन्याचा लेखाजोखा आपल्या सर्वांच्या पायाशी सविनय सादर…!!! 

प्रणाम  !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं…??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सुख म्हणजे नक्की काय असतं…???  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

सोहम ट्रस्टचे हितचिंतक आणि माझे मित्र यांनी एके दिवशी व्हाट्सअप वर एका कुटुंबाची माहिती दिली आणि यांच्या संदर्भात काही करता यईल का ? असं विचारलं.  दि 14 मे 2024 रोजी मी या कुटुंबाला भेटायला त्यांच्या घरी गेलो. 

घर कसलं ? दोन इमारतींमध्ये एक मोकळी जागा… तिथे या कुटुंबाने संसार मांडला होता…! 

एक चिमणा…एक चिमणी… चिमण्याची वृद्ध आई आणि चिमणा चिमणीची दोन लहान पिल्लं एवढा हा संसार…! 

चिमणा धडधाकट होता, तो रिक्षा चालवायचा…  बाहेर जाऊन, वृद्ध आई आणि लहान पिल्लांसाठी दाणे गोळा करून संध्याकाळी घरी परत यायचा….! 

चिमणी सुद्धा चिमण्याला मदत करायची… तिच्या परीने संसाराला हातभार लावायची…. 

चिमण्याची वृद्ध आई घरट्यात दिवसभर एकटी असायची…. पिल्लं शाळेतून घरी आली की त्यांना पंखाखाली घेऊन गोष्टी सांगायची….

एकंदर सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं चाललं होतं…. आणि एके दिवशी खरंच दृष्ट लागली…

काही वैद्यकीय परिस्थितीमुळे चिमण्याचा डावा पाय अक्षरशः खुब्यातून कापून काढावा लागला…

घरचा कर्ता पुरुष खाटेवर असहायपणे पडून होता… खंबीर नवऱ्याची असहाय्य अवस्था पाहून, खांबा आड लपून चिमणी मनसोक्त रडून घ्यायची…

चिमण्याच्या वृद्ध आईचा डावा डोळा पूर्ण निकामी, त्याही अवस्थेत ती पिलांना धीर द्यायची….होईल बाळांनो, सगळं व्यवस्थित काळजी नका करू, चला तुम्ही अभ्यासाला लागा….! ती धीर द्यायची. 

अभ्यासाचं नाटक करत पिलंही मग पुस्तकाच्या आड लपून पोटभर रडून घ्यायची…

आपण खचलो नाही, हे नाटक दिवसभर म्हातारी उत्तम वठवायची…. पण रात्री सर्व सगळे झोपले की पाय तुटलेल्या पोराकडे पाहून हिला जोरात रडावसं वाटायचं…. पण रडायचीही चोरी…. कारण ती जर रडली तर बाकीचे सगळे तुटून जातील….!

मण्यांना जोडणारा आपण धागा आहोत…. हा धागा तुटला तर मणी निखळतील, याची म्हातारीला पुरेपूर जाणीव होती….

एक डोळा अधु …तरीही ही म्हातारी धडपडत चाचपडत दाराची कडी हळूच काढून घराबाहेर जायची… बाहेर रस्त्यावर एकही माणूस नसायचा….  

बेवारस कुत्री, मांजरं, अगोदरपासूनच आकाशाकडे तोंड करून कोणालातरी ओरडून त्यांच्या भाषेत काहीतरी सांगत असायची… ही भाषा करुण असते…. 

म्हातारी मग त्यांच्याच आवाजात आवाज मिसळून त्यांच्यातलीच एक व्हायची…

जनावर आणि माणूस यांच्यात मग फरकच उरायचा नाही…! 

दुःखाला जात पात धर्म लिंग काहीही नसतं…! 

कुत्र्या मांजराच्या साथीने रडून घेऊन ती मन मोकळं करायची …. हळूच घरात येऊन चिमण्याच्या डोक्यातून हात फिरवायची… जिथून पाय तोडला आहे, त्या जखमांवरच्या पट्ट्यांवर खरबरीत हात फिरवायची… 

वेदनेनं तळमळत असलेल्या चिमण्याला झोप तरी कशी यावी ? तो जागाच असायचा…

तो आईला विचारायचा , ‘आई इतक्या रात्री दिसत नसतानाही बाहेर कुठे गेली होतीस ?? 

‘अरे बाळा, आज दिवसभर नळाला पाणीच आलं नाही…. आता रात्री तरी पाणी येतंय का ? हे बघायला बाहेर नळावर गेले होते… तू झोप !’

तो इतक्या त्रासातही गालात हसायचा आणि विचारायचा, ‘नळाला पाणी येतंय की नाही, हे बघायला दोन तास लागतात आई ?’ 

‘अरे तसं नव्हे, आपल्या दारासमोर इतकी कुत्री मांजरं रडत होती…  मलाही झोप येईना, मग बसले त्यांच्याच सोबत जरा वेळ….’ 

‘त्यांच्यासोबत तू सुद्धा रडत होतीस ना आई ?  कुत्र्या मांजरांच्या आवाजाबरोबर मिसळलेला मला तुझा आवाज सुद्धा कळतो की गं आई …’

कापलेल्या पायाच्या वेदनेपेक्षा, डोक्यात उठलेली ही सणक जास्त वेदनादायी होती….! 

म्हातारी तेवढ्यातून सुद्धा हसायचं नाटक करत म्हणायची, ‘मला मेलीला काय धाड भरली रडायला… भरल्या घरात ?’ 

एक डोळा नसलेल्या आजीचा, दुसरा डोळा मात्र यावेळी दगा द्यायचा… या दोघांचं संभाषण ऐकून…. तो स्वतःच पाणी पाणी व्हायचा …

आणि हेच पाणी मग चिमण्याच्या गालांवर अभिषेक करायचे…. म्हातारीच्या नकळत….! 

चिमणा मग तोडलेल्या पायाच्या पट्ट्यांवर दोन्ही हात ठेवून वेदनेनं कळवळत आईला म्हणायचा, ‘आई बहुतेक नळाला पाणी आलंय बघ आत्ता…’ 

हो रे हो, म्हणत म्हातारी पुन्हा धडपडत घराबाहेर जायची आणि दोन तास घरात परत यायचीच नाही…!

दिवसभर थांबवून ठेवलेलं पाणी, आता मध्यरात्री कोसळायचं एखाद्या धबधब्यासारखं…! 

घराबाहेर नळाला पाणी येत असेलही… नसेलही…. परंतु चिमण्याची उशी मात्र रोज सकाळी ओली चिंब भिजलेली असायची…. कशामुळे काही कळलं नाही बुवा ! 

हा मधला काळ गेला…. या काळामध्ये चिमणीने आणि वृद्ध आजीने घरटं सांभाळलं…. 

काही काळानंतर, हा सुद्धा जिद्दीने उठला…. म्हणाला, ‘फक्त डावाच पाय कापला आहे…. रिक्षा चालवायला अजून माझे दोन हात शिल्लक आहेत…. रिक्षाचे ब्रेक दाबायला उजवा पाय लागतो,  तो ही माझ्याकडे शिल्लक आहे…. इतकं सगळं शिल्लक आहे, तर मग मी गमावलंच काय… ?

त्याच्या या वाक्यावर आख्य्या घरात चैतन्य पसरलं…! 

याही परिस्थितीत काही काळ सुखाचा गेला…. पण, अशी काही परिस्थिती उद्भवली की त्याच्या चिमणीला गुडघ्याचे आजार उद्भवले आणि ती कायमची अपंग झाली….! 

स्वतःचा पाय कापला जाताना जितका तो व्यथित झाला नसेल, तितका तो चिमणीला अपंग अवस्थेत पाहून व्यथित झाला…. कोलमडला…. ! 

एक पायाचा चिमणा आणि दोन्ही पाय असून नसलेली चिमणी…. दोघांच्याही डोक्यावर घरटं सांभाळण्याची जबाबदारी….! 

नळाला पाणी आलंय का बघते म्हणत, म्हातारी मात्र रोज रात्र रात्रभर घराबाहेर राहू लागली…. उश्या भिजतच होत्या… पुस्तका आड दोन्ही पिलांचे डोळे सुजतच होते…. 

याही परिस्थितीत तो खचला नाही… नेहमी तो म्हणायचा, ‘माझे दोन हात आहेत आणि उजवा एक पाय आहे मी काहीही करू शकतो….!’ 

ज्यांच्याकडे सर्व काही आहे आणि तरीही ज्यांना काही करायचं नसतं, अशांसाठी ही चपराक आहे ! 

या सर्व अवस्थेत या जिद्दी कुटुंबाने परिस्थितीशी सामना केला…. जुळवून घेतलं….! 

परंतु आता मात्र या परिस्थितीला सुद्धा खरोखर दृष्ट लागली….

चिमण्याच्या हाताला काहीतरी इन्फेक्शन झालं …. 

ते वाढलं…. आणि डॉक्टरांनी उजवा हात कापावा लागेल असं सांगितलं….! 

या वाक्याबरोबर मात्र पहिल्यांदाच चिमणा कोसळला आणि त्यानंतर म्हातारी….! 

चिमणीला तर पायच नव्हते, ती खाटेवरच पडून होती…. म्हणून तिच्यावर कोसळायची वेळ आलीच नाही… पण आता मात्र ती पूर्णतः ढासळली….!

दोन्ही लहान पिलं आजीच्या थरथरत्या पंखाखाली निपचित पडली…. ! 

हीच ती वेळ…. माझ्या मित्राने मला सांगितले या कुटुंबासाठी काही करता येईल का ते बघ…. 

आणि म्हणून आज मी इथे होतो….! 

गेले तीन तास मी इथे आहे…. आयुष्यातले चढ उतार रोज बघायची मला सवय आहे… 

तरीही चिमणा चिमणी आणि म्हातारीच्या वेदना ऐकून…. एक फोन येतोय हं… असा बहाणा करत, मी किती वेळा घराबाहेर आलो असेन याची गणती नाही….! 

इतक्या वेळा घराबाहेर आलो, पण म्हातारीच्या घराबाहेर मला कुठेही नळ मात्र दिसला नाही…. ! 

म्हातारीच्या मनातला तो नळ, मला किती वेळा भिजवून गेला…. कसं सांगू…? 

शेवटी चिमण्याला आणि म्हातारीला हात जोडून म्हणालो, ‘आम्ही तुम्हाला काय मदत करू ?’ 

ते स्वाभिमानी कुटुंब यावेळी निःशब्द झालं… आणि मला माझीच लाज वाटली…. ! 

‘चिमण्या, जोपर्यंत तू “समर्थ” होत नाहीस तोपर्यंत किराणा भरून देऊ…?’ मी निर्लज्जपणे विचारलं. 

‘नको माऊली’, चिमण्या अगोदर म्हातारी हात जोडत बोलली. 

‘पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ ?’ 

‘नको काका; आम्हाला दोघांनाही स्कॉलरशिप मिळते त्यात आमचं शिक्षण होतं…’  मोठी पोरगी चिवचिवली…

खाटेवर अगतिकपणे पडलेल्या ताईकडे मीच पाय तुटलेल्या माणसासारखा गेलो आणि तिला म्हणालो, ‘अगं ताई, तुझ्या उपचारांचा खर्च करूया का आपण…?’

ती म्हणाली, ‘नको दादा माझा सगळा उपचार ससून मध्ये सुरू आहे, तिथं काही पैसे लागत नाहीत… शिवाय ससून मध्ये एक समाजसेवी संस्था आहे ती आम्हाला मदत करते आहे….’ 

शेवटी पाय ओढत, चिमण्याकडे गेलो आणि म्हणालो, ‘अरे बाबा, तू तरी सांग, आम्ही कशी मदत करू तुम्हाला…?’ 

माझे जोडलेले हात हाती घेऊन डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, ‘डॉक्टर, माझा उजवा हात कापला जाऊ नये इतकीच प्रार्थना करा… 

‘मी परत रिक्षा चालवून माझं संपूर्ण कुटुंब पुन्हा चालवू शकेन, इतकीच प्रार्थना करा…’ 

‘मी आणि माझं कुटुंब कोणावर सुद्धा अवलंबून राहणार नाही इतकीच प्रार्थना करा…’

‘आणखीही काही दुःख मिळाली तर ती सहन करण्याची ताकद मला मिळो, इतकीच प्रार्थना करा….’  

‘बस आणखी तुमच्याकडून दुसरं काहीही नको…!!!’

त्याने नमस्कारासाठी हात जोडले…

त्याच्या या वाक्यावर मला रहावलं नाही…. आपोआप त्याच्या खांद्यावर मी डोकं टेकवलं आणि माझा बांध फुटला… 

त्याचा खांदा माझ्या अश्रूंनी भिजला…. 

या उपरही माझ्या खांद्यावर हात थोपटून तोच म्हणाला, ‘काळजी करू नका डॉक्टर… सगळं काही होईल व्यवस्थित…. !!! 

कोण कोणाला मदत करत होतं …हेच कळत नव्हतं…! 

यानंतर म्हातारी लगबगीने उठून बाहेर जायला निघाली…. अस्तित्वातच नसलेल्या नळाला पाणी येतंय की नाही, हे बघण्यासाठी म्हातारी कदाचित बाहेर गेली असावी… आता ती दोन तास येणार नाही, हे मला माहीत होतं….!!! 

एका गरीब कुटुंबाला मदत करायला गेलेलो मी, तिथून बाहेर पडताना आज मीच खूप श्रीमंत झालो… 

सुख म्हणजे नक्की काय असतं, हे मलाही आजच समजलं… !!! 

(अत्यंत महत्त्वाची टीप :  हे स्वाभिमानी कुटुंब स्वतःच्या तोंडाने काहीही मागत नसलं, तरी सुद्धा यांच्या घराला छप्पर नाही, फाटकी ताडपत्री आहे, येत्या पावसाळ्यात ही फाटकी ताडपत्री आणखी फाटून घराचा चिखल होणार आहे.  घरात दोन अपंग व्यक्ती, वृद्ध आई आणि दोन लहान मुलं राहतात…. सबब या कुटुंबाने काहीही मागितले नाही तरी आपण त्यांच्या घराला पत्रे लावून देणार आहोत. बघू.  त्याच्या घरून निघताना तो माझ्या खांद्यावर थोपटून म्हणाला होता, ‘डॉक्टर, काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित…. त्याच्या याच शब्दांवर माझाही विश्वास आहे ….!!!) 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-२ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-२  ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 

(भावनेच्या भरात हा “वेडा माणूस” स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती.) – इथून पुढे 

याच प्रेमाच्या भावनेतून, 2023 साली मी यांच्याकडे ऑर्डर दिली नाही, आप्पा बळवंत चौकातील दुसऱ्या एका नामांकित दुकानातून मी साहित्य विकत घेण्यासाठी ऑर्डर दिली.

लिस्ट नीट लिहून आणायची, अक्षर तुमचं तुम्हाला तरी कळतंय का ? बाजूला थांबा जरा, बाकीची गिऱ्हाईकं बघू देत … वेळ किती लागेल म्हणून काय विचारता ?  इतकं एकच काम आहे का ? सामान काय आहे ते आत्ताच मोजून घ्या, पुन्हा कटकट करायची नाही…

ए यांना मराठी भाषा कळत नाही, दुसऱ्या भाषेत सांग रे यांना जरा….  असा स्वतःचा पाणउतारा करून घेतला…

यानंतर कॅरीबॅगचे सुट्टे पैसे देईपर्यंत आमच्या वस्तूंना त्यांनी आम्हाला हात सुद्धा लावू दिला नाही… !

हरकत नाही… जगात सगळेच कटारिया साहेब जन्माला आले तर मग अनुभव कसा मिळणार ?

असो… हा प्रकार पुढे कटारिया साहेबांना कसा कोण जाणे पण कळला

एके दिवशी शंकर महाराज मठाजवळ भीक मागणाऱ्या लोकांना मी तपासत असताना ते तावातावाने आले.

चेहऱ्यावरचा मृदुभाव आणि ओठांवरची मृदू वाणी यावेळी लुप्त झाली होती.

‘डॉक्टर तुम्ही स्वतःला समजता काय ?  सेवा करण्याचा मक्ता काय तुम्हीच घेतला आहात का ?  थोडीफार सेवा आम्ही करत होतो, आमच्या हातून हि सेवा काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?’

सेवा करणे हा माझा अधिकार आहे आणि तो तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

मी तुम्हाला माफ नाही करणार…

ते रागानं थरथर कापत बोलत होते…

या जमदग्नीपुढे मी नतमस्तक झालो… पायावर डोकं टेकवलं… आणि त्यांच्या प्रेमाचा राग माझ्या झोळीत मनसोक्त भरून घेतला !

तुम्हाला ऑर्डर न देण्यामागे माझी पण काय भावना आहे, हे सर्व मी त्यांना उलगडून सांगितले, क्षणात या जमदग्नीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले… !

स्वतःचे अधिकार मिळवण्यासाठी लोक आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करतात… सेवा करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी हा माणूस आज माझ्याशी… माझ्याशी ??? भांडला… !!!

यानंतर पुढे दोन-तीन वेळा मोघम भेटी झाल्या.

आता साल उजाडले 2024.

यावर्षीची शैक्षणिक ऑर्डर “चॉईस” मध्ये देण्याशिवाय मला दुसरा कोणताही “चॉईस” नव्हता…!

मी 13 जून 2024 ला कटारिया साहेबांच्या फोनवर फोन केला. पलीकडून आवाज आला हॅलो मी चिराग बोलतोय… !

चिराग हे कटारिया साहेबांचे सुपुत्र, चार्टर्ड अकाउंटंट आहेत !

‘हॅलो चिराग सर, कटारिया साहेब कुठे गेले त्यांना फोन द्या ना..’

‘सर बाबा गेले’ पलीकडून मंद आवाज आला.

आमचा हा माणूस कोणालातरी मदत करण्यासाठी, कोणाच्यातरी पाठी धावतच असतो, सतत फिरत असतो, हे मला माहित होतं. त्याच भावनेने मी बोललो…

‘अच्छा गेले का ?  बरं पुन्हा कधी येतील ?’ मी हसत बोललो.

‘बाबा गेले सर… परत ते पुन्हा कधीही येणार नाहीत … तुम्हाला माहित नाही ?’

माझ्या पायाखालची जमीन सरकली… मी सुन्न झालो… मी काय ऐकतोय यावर माझा विश्वास बसेना…

भानावर आलो, तेव्हा मात्र या माणसाची मला भयंकर चीड आली…

पलीकडच्या चौकात जाताना सुद्धा घरात आपण सांगून जातो… मग इतक्या मोठ्या प्रवासाला जाताना साधं आम्हाला सांगण्याची, निरोप घेण्याची सुद्धा तुम्हाला गरज वाटली नाही ?

भांडून सेवेचे अधिकार मागता आणि असं बेजबाबदारपणे सोडून जाता ?

आमच्या पोरांना पोरकं करून जाण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ?

हे…हे… असं… काउंटरवर तबला वाजवत आम्हाला आशा का दाखवलीत ?

कटारिया साहेब, आता मी सुध्दा तुम्हाला माफ नाही करणार…!

‘सर काही काम होतं का ?’ फोन अजून चालूच होता, पलीकडून चिराग सरांचा आवाज आला.

‘शैक्षणिक साहित्याची ऑर्डर द्यायची होती…’ मी शांतपणे बोललो.

‘ठीक आहे सर, दोन दिवसात पाठवतो.’ तितक्याच शांतपणे उत्तर आले.

दोन दिवसांनी सामान आले, मी बॉक्स खोलले.

आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होते, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या…

मी चिराग सरांना फोन केला, म्हणालो, ‘चिराग सर, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे… हि आमची लिस्ट नव्हे, काहीतरी चूक झाली असावी !

चिराग सर म्हणाले, ‘सर मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आकड्यांच्या खेळात मी चुकत नाही, तुम्ही दिलेले सामान मी अत्यंत काटेकोरपणे मोजून मापून स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरलं आहे, चूक होणार नाही माझी…!’

‘अहो पण, चिराग सर… एका वस्तूच्या बदल्यात पाच पाच वस्तू आल्या आहेत आम्हाला…’

‘अच्छा… हां… हां…. त्या एक्स्ट्रा वस्तू का ?  त्या मी नाही… बाबांनी पाठवल्या असतील कदाचित सर …’

फोन कट झाला …!!!

इतका वेळ धरून ठेवलेला बांध आता फुटून गेला… !

कटारिया साहेब चिरंतन प्रवासाला निघून गेले…

पण जाताना आपल्या विचारांची एक पणती मागे ठेवून गेले.

या पणतीला नाव सुद्धा काय दिलं आहे… ?  चिराग… व्वा…!!!

यानंतर 15 जून 2024 ला सर्व चिल्ल्यापिल्लांना बोलावून शैक्षणिक साहित्य दिले.

नवीन वही, नवीन पुस्तक, नवीन दप्तर, नवीन कंपास पेटी पाहून या सर्व चिमण्या आनंदाने चिवचिवल्या… !

या चिवचिवणाऱ्या चिमण्यांना आता कोणत्या तोंडाने सांगू ….

बाळांनो, आज खऱ्या अर्थानं तुम्ही पोरके झालात रे….

आणि तुमच्या बरोबर मी सुद्धा… !!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “धावा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “धावा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

जनार्दन महाराजांच्या दिंडी बरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली. त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या.त्यांनी सांगितले,

” पहाटे  पवणेपाच  वाजता सारसबागेच्या दारात या”..

अदल्या दिवशीच मी बहिणीकडे रहायला गेले.

बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दीनानाथ मधून घरी आला होता. म्हणून तिची सुन डॉक्टर दीप्ती पुजारी  पहाटे साडेचार  वाजता आम्हाला गाडीने सोडायला  निघाली. रस्त्यावर निरव शांतता होती. अगदी कोणी सुद्धा नव्हतं .

परत जाताना ती एकटी कशी जाईल याची  मला  चिंता वाटली. पण बहीण अत्यंत विश्वासाने म्हणाली,

“अगं पंढरीराया नेईल  तिला सुखरूप घरी .काळजी नको करू.”

अरे खरचं की…त्याच्यावर सोपवलं की मग सोपच होतं…

तिथे गेलो तर  ट्रक ऊभा होता.स्टुल ठेवले होते. त्यावरून ट्रकमध्ये चढलो. पहिल्यांदाच ट्रक मध्ये  बसलो  होतो .त्याची पण गंमत वाटत होती.

ट्रक निघाला..शैलाताईंनी

 

“पाऊले चालती पंढरीची वाट

सुखी संसाराची सोडुनीया गाठ..”

 

म्हणायला सुरुवात केली..आम्ही पण त्यात सुर मिसळला..आनंदाची वारी सुरू झाली..

 

ट्रकने आळंदीच्या अलीकडे सहा  सात किलोमीटर ला सोडले. तिथून वाहनांना बंदी होती. अनेक जण पायी चालत होते .आम्ही पण चालायला लागलो .

 

पुढे जाता जाता एकदम ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा  सजवलेला रथ लांबूनच दिसला. अलोट गर्दी होती .जागेवर ऊभ राहुनच  दर्शन घेतलं. शैलाताई म्हणाल्या

 

“गर्दी कमी झाली की आपल्याला दर्शन मिळेल तेव्हा आपण घेऊ.”

नंतर आमचे शांतपणे छान दर्शन झाले.  आमची दिंडी वारीत सामील झाली.

अभंग ,ओव्या ,आरत्या म्हणत, टाळ वाजवत अत्यंत आनंदात मार्गक्रमण सुरू होते.

कधी पाऊस, वारा, ऊन चालूच होते. पण मजा येत होती . मध्येच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसुन  नाश्ता झाला.

नंतर मात्र भराभर चालायला सुरुवात झाली . दीड वाजता जेवणासाठी थोडा वेळ थांबलो .थोडसंच खाऊन घेतलं आणि पुढे निघालो.

 

आम्ही सगळे पासष्ठच्या पुढच्या वयाचे  होतो. पहाटेच उठलो होतो. तीन वाजल्यानंतर  चालण्याचा वेग थोडा मंदावला.प्रथमच ईतकं पायी चालत होतो.  काही वेळानी पुढच्या आणि  आमच्या दिंडीत अंतर पडले.आम्हाला ते समजत होते.पण पाय  आता जरा दमले होते.

शैलाताई समोर येऊन म्हणाल्या..

 

” आता आपल्याला धावा करायचा आहे”

धावा ?…

आम्हाला काहीच कळेना.

मग त्यांनी नीट  समजावून सांगितले. दिंडीचे दोन भाग केले .मध्ये जागा थोडी मोकळी ठेवली .चालत चालत एका गटाने म्हणायचे..

“आमचा विठोबा “दुसऱ्या गटानी म्हणायचे “आमची रुखमाई”

मग  काय झाली की धमाल सुरू…

 

आधी खालच्या आवाजात म्हणत होतो .नंतर आवाज चढवत चढवत वर नेला .अचानक एका क्षणी शैलाताई म्हणाल्या

“धावा “…..

 

शैलाताईंनी पळायला सुरूवात केली.त्यांच्यामागे आम्ही सर्वजण असलेल्या सर्व  शक्तीनिशी पळायला लागलो.

त्या आवाजाचा,जल्लोषाचा, वातावरणाचा, भक्तीचा ,असा काही परिणाम झाला होता की कित्येक वर्षात न पळालेलो आम्ही धावत सुटलो…..

पुढची दिंडी गाठली आणि उंच आवाजात..

 

” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल

पंढरीनाथ महाराज की जय

ज्ञानदेव महाराज की जय”

असा जयजयकार करीत वारीत सामील झालो. अपार आनंद झाला. थकलेल्या दमलेल्या मनाला उभारी आली.

परमेश्वराची मनापासून आळवणी केली आणि त्याचा धावा केला की तो जवळ येतोच….याची प्रचिती आली.

विठोबा ही आमचाच आणि रखुमाई पण   आमचीच…..

आज हे  सगळे आठवले …

मग  लक्षात आले की..

प्रत्यक्ष जीवनातही  कधीतरी हे घडते.

आपण रेंगाळतो, थोडे बेसावध होतो, थकतो आणि मग मागे पडतो… जीवनाला संथपणा कंटाळवाणेपणा येतो .

आपल्या अंगात शक्ती असते पण काय आणि कसं करायचं हे सुचत नसते.

” आमचा विठोबा आणि आमची रुखुमाई ”  हे साधे शब्द नव्हते  ते म्हणताना ताईंनी आधी आमच्या मनातले चैतन्य जागवले होते.  चेतवले होते  हे आत्ता लक्षात येते.

प्रेरणा देणारं  असं कोणीतरी समोर येतं …आपल्याला शिकवतं, सांगतं, शहाणं करतं…

कधीतरी ते आपलं अंतर्मन सुद्धा असतं .मात्र प्रयत्न आपल्याला कसून सर्व शक्ती पणाला लाऊन  स्वतःलाच करावे लागतात. मग ती गोष्ट साध्य होते.

आतून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची आस मनापासून हवी.

मानस श्रेयस असावे ..

त्यात पाऊले पांडुरंगाच्या वाटेने चालत असतील तर मार्गक्रमण अजून  सोपे होते .

वारीत आपल्या आसपास असलेल्या लोकांना नुसतं बघायचं वृद्ध लोक, म्हाताऱ्या बायका आनंदाने हसत खेळत चाललेल्या असतात . डोक्यावर तुळशी वृंदावन,गाठोडं  ,नाहीतर पिशवी काखेत कळशी , खांद्याला शबनम याचे त्यांना भान नसते…

अधीरपणे ते पुढे पुढे जात असतात त्यांच्या पांडुरंगाला  भेटायला..

अर्थात आपला पांडुरंग कोणता… हे ज्याने त्याने  मनाशी ठरवायचे …

आणि वारकऱ्यांसारखे त्या मार्गाने निघायचे….

मग तो भेटतोच…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अशी पाखरे येती…!!! – भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(श्री अजय कटारिया सर यांना सादर समर्पित) 

पुण्यामध्ये आप्पा बळवंत चौकाचं नाक जिथून सुरू होतं, तिथे चॉईस नावाचं पुस्तकाचे दुकान आहे. दुकानाच्या मालकांचे नाव आहे श्री अजय कटारिया. 

बरोबर सहा वर्षांपूर्वी एका स्नेह्यांच्या माध्यमातून यांची आणि माझी ओळख झाली. 

बोलता बोलता ते म्हणाले, ‘माझे पुस्तकाचे दुकान आहे, कधी काही लागलं तर या…!’

भीक मागणाऱ्या अनाथ मुलांना आपण दत्तक घेऊन, त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. दरवर्षी मला खूप शैक्षणिक साहित्य लागतेच. 

कटारिया साहेबांच्या चॉईस दुकानात गेलो; तर थोडी सूट मिळेल आणि चांगल्या क्वालिटीचे साहित्य मिळेल, हा स्वार्थी विचार करून मी त्यांना चार-पाच वर्षांपूर्वी प्रथमच, सर्व शैक्षणिक साहित्याची लिस्ट दिली. 

त्यानंतर दोन दिवसांनी सर्व साहित्य आले.

बॉक्स उघडून पाहिला, आम्ही दिलेल्या लिस्टपेक्षाही सामान जास्त होते. 

आम्ही एक वही मागितली तिथे पाच वह्या होत्या, एक दप्तर मागितले तेथे पाच दप्तरे होती, पाच कंपास पेट्या मागितल्या तिथे 25 होत्या…

मी त्यांना फोन करून म्हणालो, ‘कटारिया साहेब, बहुतेक हा दुसऱ्यांचा बॉक्स आमच्याकडे आला आहे… हि आमची लिस्ट नव्हे ! 

ते हसून म्हणाले, ‘असू द्या हो डॉक्टर, अनाथ पोरांना शिकवताय… थोडं इकडे तिकडे चालणारच…  पोरं आहेत… 

घ्या आमच्याकडून डोनेशन समजून…’ 

एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना देणगी म्हणून पावती दिली, त्यांनी ती हसत खिशात ठेवली. 

पुढच्या वर्षी म्हणजे साधारण 2021 ला त्यांना पुन्हा लिस्ट दिली… पुन्हा पाचपट सामान जास्त होते… मी पुन्हा तोच फोन केला… पुन्हा त्यांचे तेच उत्तर आले… एक्स्ट्रा सामानाची मी त्यांना पुन्हा पावती दिली… ही पावती हसत त्यांनी पुन्हा खिशात ठेवली…! 

एकावर एक फ्री… हि बिझनेस स्ट्रॅटेजी मी समजू शकतो, पण एकावर पाच फ्री… ??? 

मग 2022 साल उजाडले… 

यावेळी सामानाची लिस्ट घेऊन मी स्वतः दुकानात गेलो. दुकानात भरपूर कर्मचारी आहेत, परंतु माझ्याकडची लिस्ट घेऊन त्यांनी स्वतः सामान बांधायला सुरुवात केली. 

मी बारकाईने पाहत होतो, माझ्या लिस्ट पेक्षा पाचपटीने जास्त गोष्टी ते स्वतःच्या हाताने बॉक्समध्ये भरत होते. 

मी त्यांना म्हणालो साहेब, आपण आपले नुकसान का करून घेता ? माझ्या लिस्ट प्रमाणेच मला सामान द्या…

यावर ते माझ्याकडे न बघता, स्टूल घेऊन, वरच्या कप्प्यातले सामान काढता काढता म्हणाले, ‘डॉक्टर भरगच्च भरलेल्या ताटामधून दोन घास चिमण्यांना टाकले म्हणजे आपलं काही नुकसान होत नाही हो …! 

ए त्या चौथा कप्प्यातला, नवीन माल काढ… त्यांचं सगळं लक्ष बॉक्स भरण्याकडे….

तरीही मी माझं बोलणं रेटत म्हणालो,  पण हा आपला व्यवसाय आहे साहेब, मला साहित्य देणे म्हणजे आपला तोटा आहे …! मी आवंढा गिळत म्हणालो. 

तितक्याच उत्स्फूर्तपणे बॉक्समध्ये साहित्य टाकत ते म्हणाले, ‘साहेब धंदा म्हणा, व्यवसाय म्हणा, कारभार म्हणा, कारोबार म्हणा…. जे काही करायचं ते नफ्यासाठी… मी पक्का व्यापारी आहे, तोट्यामध्ये कधीच व्यापार नाही केला मी … 

‘आत्ता बी मी तोट्यामंदी नाहीच, नफ्यामंदीच आहे…’ चष्म्या मागून डोळे मिचकावत ते बोलले. 

मागितलेल्या गोष्टीपेक्षा, पाचपटीने भरलेल्या बॉक्स कडे बघत ‘ हे कसं काय बुवा ?’ हा प्रश्न मला त्यांना विचारायचा होता…

माझ्या बावळट चेहऱ्यावर त्यांना तो दिसला असावा… ! 

‘छोटू, आपल्याकडच्या दुरेघी वह्या संपल्या का रे ?  शेजारच्या दुकानातून दहा डझन मागव आणि घाल या बॉक्समध्ये…. !’ हात झटकत ते बोलले. 

माझा बावळट चेहरा अजून तसाच असावा. 

नफा तोट्याचा त्यांनी मग उलगडा केला… 

‘डॉक्टर तुमी कितीबी नाय म्हणले तरी जास्तीचा सामान पाहून तुम्हाला आनंद होतो का नाही ? तो माझा नफा…. 

दहा पोरं नाही, आता तुम्ही 50 पोरांना सामान देऊ शकता, त्या पोरांना आनंद होतो की नाही…? तो माझा नफा…

कटारिया काका कोण ? हे पोरांना कधीच कळणार नाही… पण 50 पोरं शिकत आहेत,  याचा मला आनंद होणार का नाही ? तोच माझा नफा… 

जलमाला येऊन आपण कोणाच्या उपयोगी नाही पडलो, हा खरा तोटा… ! 

“तोटा” या शब्दावर जोर देत , डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली…! 

आपून तोट्यात धंदाच करत नाही सायेब, पक्का व्यापारी आहे मी …’

काउंटर वरच्या टेबलावर बोटांनी तबला वाजवत ते म्हणाले, ‘ए चाय सांगा रे डॉक्टरला…!’  

तोट्याची शेती करून, आनंदाची बाग फुलवत; नफ्याची फुलं वेचणाऱ्या या माणसापुढे मी मनोमन नतमस्तक झालो ! 

चहाचा घोट घेऊन मी त्यांना म्हणालो, ‘सर पण हे नुकसान किती आहे तुमचं, यात विनाकारण खर्च खूप आहे…’ 

ते पुन्हा हसत म्हणाले, ‘डॉक्टर पोरगं तुमचं असो, माझं असो किंवा आणखी कोणाचं असो, पोराच्या शिक्षणावर झालेला खर्च मी खर्च समजतच नाही, पोरांच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हा भविष्यामध्ये भरभक्कम परतावा देणारी गुंतवणूक असते

गोरगरिबांची पोरं शिकतील तोच माझा परतावा… मंग खर्च झालाच कुठे ? 

आलतू फालतू स्कीम मध्ये अपुन पैसा गुतवतच नाही… सांगितलं ना ? पक्का व्यापारी आहे मी… ! 

मी खर्च केला नाही सायबा… फक्त गुंतवणूक केली… माझ्या पोरांवर गुंतवणूक केली… बघा भरभक्कम परतावा येणारच… 

“येणारच” म्हणताना पुन्हा डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताने त्यांनी जोरात टाळी मारली…! 

मी भारावून म्हणालो या अनाथ मुलांसाठी तुम्ही किती करत आहात… ? 

अनाथ कशानं हो… पालक म्हणून तुम्ही आहे…  मी आहे…. काय डॉक्टर तुम्ही सुद्धा…! 

‘चहा संपवा तो…’ म्हणत, टेबलावर पुन्हा त्यांनी हसत तबला वाजवला… 

तो तबला होता ? की माझ्या हृदयाची धडधड ?? माझं मलाच कळलं नाही…!

शर्टाच्या बाहीला डोळे पुसत कटारिया साहेबांची नजर चुकवत मी बाहेर पडलो !  

सर्व साहित्य घेऊन मी आलो… दहा ऐवजी 50 मुलांना ते वाटले… तरीही कुठेतरी अपराधीपणाची भावना होती. 

भावनेच्या भरात हा “वेडा माणूस” स्वतःचं खूप नुकसान करून घेत आहे, याची मला मनोमन जाणीव होती. 

– क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – २ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

??

☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – २ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सुमारे दहा वर्षं तिचा आवाजच गेला होता, तो तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण, पण त्याचवेळेस तिला आणि आम्हा कुटुंबीयांनाही खूप काही शिकवून गेलेला असा काळ होता. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेली आई वेगळीच होती. त्या दहा वर्षांच्या कालखंडात ती एकटीच होती. साथीला कुणीही नसायचं, ना कुणी शिष्य, ना इतर कुणी. त्या वेळेस तिचं अखंड चिंतन सुरू होतं. विभा पुरंदरे यांनी त्या कालखंडात आईला जी साथ दिली त्याला तोड नाही. त्या कॉलेज संपल्यानंतर यायच्या रोज. आई काय पुटपुटते आहे ते समजून तिच्याशी संवाद साधायच्या. त्यांचे ऋण आहेत आम्हा कुटुंबीयांवर. वैद्य सरदेशमुखांकडे तीन र्वष आईचे उपचार सुरू होते. दर शनिवारी आईसोबत पुण्याला औषधोपचारासाठी जायचो. तेव्हा जाताना ती आईच असायची अनेकदा. पण तिला बोलता यायचं नाही. उपचारादरम्यान, तिने जे सहन केलंय ते दररोज पाहत होतो. फार कळण्याचं वय नव्हतं, पण जे पाहिलं त्याचा अर्थ आणि मोल नंतर कळत गेलं. त्या वेळेस तिने भरपूर वाचन आणि चिंतन केलं. ‘स्वरार्थरमणी’ हे तिचं पुस्तक त्याच काळातील चिंतनाचं संचित होतं. एक मात्र होतं की, ती चिंतनात आहे किंवा दु:खात आहे म्हणून घरात संवादच झालेला नाही, असं कधीच झालं नाही. घरात ती छान स्वयंपाकही करायची. शेवयाची खीर मला आवडते म्हणून अनेकदा करायची. मला केव्हा ती खीर हवीहवीशी वाटायची हे तिला नेमकं कळायचं. स्वयंपाक मनापासून आवडायचा. माईपासूनच ते परफेक्शन तिच्याकडे आलेलं असावं. तिने चिरलेली भेंडी तुम्ही व्हर्निअर स्केल लावून तपासलीत तरी त्याच आकाराची असतील एवढं ते परफेक्शन होतं. वाटाणे सोलतानाही कधी सोललेले वाटाणे इकडे तिकडे पळताहेत असं झालेलं मी आजवर पाहिलेलं नाही. तिला चित्रकला, भरतकाम, वीणकाम सारं काही आवडायचं. तिचं वीणकामही पाहिलं आहे. त्यातदेखील एकही टाका तिरका जात नसे. गेलाच तर पूर्ण उसवून ती पुन्हा सारं नेमकं करायची. नातवांसाठी तिने स्वेटर्स वेळ काढून कधी विणली कळलंही नाही. साधं कामंही वेगळ्या पद्धतीनं करण्याची शक्ती तिच्यात होती. ईश्वरावर गाढ श्रद्धा होती. म्हणून जप किंवा पूजा करताना आम्ही तिला कधीच डिस्टर्ब होऊ दिलं नाही. ती खूप कौेटुंबिक होती. संगीतात जशी तिने कधी घराणी मानली नाहीत, तशीच तिने जातपातही नाही मानली. त्यामुळेच आमच्या घरात सर्व लग्नं आंतरजातीय झालेली दिसतील. माझं, भावाचं, आमच्या मुलांची. आमची लग्नं झाल्यावर आलेल्या सुना तिच्या मुली झाल्या होत्या आणि आम्ही जावयासारखे झालो होतो. सुनांवर तिने मुलांसारखंच प्रेम केलं. परफेक्शनच्या मागे एवढी असायची, की एकदा जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कार्यक्रम तिच्या मनासारखा झाला नाही म्हणून परत एकदा जाऊन कार्यक्रम केला, त्याचे पैसे घेतले नाहीत.

वर्षांतून एकदा तिच्या वाढदिवशी मात्र आई वेगळी दिसायची. कारण एरवी तिचा थोडा धाक आम्हाला आणि शिष्यांनाही असायचा. मात्र आईच्या वाढदिवशी आम्ही सगळे एकत्र घरातच छोटा कार्यक्रम करायचो. त्यात नाच-गाणीही असायची. त्या दिवशी मात्र ती काहीच बोलायची नाही किंवा कदाचित आम्हीच तिला काही बोलू द्यायचो नाही. आई मुळात चांगली क्रीडापटूही होती, हे फार कमी जणांना माहीत आहे. ती उत्तम टेबलटेनिस खेळायची. ‘किस’ प्रकारात मोडणारी सव्‍‌र्हिस ती अप्रतिम करायची. चेंडूचा पहिला टप्पा आपल्या बाजूस टेबलाच्या कोपऱ्यावर आणि दुसरा टप्पा थेट प्रतिस्पध्र्याच्या भागात टेबलच्या कोपऱ्यावर! हा अप्रतिम प्रकार आम्ही अनेक वर्षांनंतर थेट ओरिसाला अनुभवला. मुरलीधर भंडारी ओरिसाचे राज्यपाल असताना ओरिसा येथील विद्यापीठाने आईला डी. लिट्. देऊन सन्मानित केलं, त्या वेळेस राजभवनावर टेबलटेनिसचं टेबल पाहून आईचे हात शिवशिवले आणि आम्ही पुन्हा एकदा ती सव्‍‌र्हिस अनुभवली.

एकदा आईची शिष्या नंदिनी बेडेकर बसली होती. भूप गात असताना तिने स्वरमंडल बाजूला सारलं आणि डोळ्यांतून अश्रूधारा सुरू झाल्या. ते आनंदाश्रू होते. ती म्हणाली, आज गायलेला भूप वेगळा होता, तो आजवर असा कधीच जाणवला नव्हता. आज वेगळा साक्षात्कार झाला. त्यानंतर अगदी अलीकडे तिला आनंदी पाहिलं ते नवी दिल्लीला झालेल्या तिच्या अखेरच्या मैफिलीनंतर. तिने त्या दिवशी स्वत:हून माझ्या पत्नीला, तिच्या सुनेला, भारतीला फोन केला आणि सांगितलं की, ‘‘आज मी खूश आहे, मी खूप छान गायले.’’ हा आमच्या सर्व कुटुंबीयांसाठी मोठाच धक्का होता. कारण ‘मी आज खूप छान गायले’ असे शब्द आईच्या तोंडून एवढय़ा वर्षांत कधीच ऐकल्याचं स्मरणात नव्हतं. ती मैफल, गाणं छान झालं तर मी तुला साडी देईन, असंही ती सुनेला आधी म्हणाली होती. तिचा फोन हा आनंदाचा धक्का होता.

याआधी तिला आनंद झाला होता तो माझी मुलगी तेजश्री हिने शास्त्रीय संगीताला वाहून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा. तिने आमच्यापैकी कुणावरही या मार्गाने येण्यासाठी जोरजबरदस्ती केली नाही, ना कधी साधं बोलून दाखवलं. पण काहीही न करता तेजश्रीने घेतलेल्या निर्णयाचं तिला समाधान होतं. जे मला सांगायचं आहे व अपेक्षित आहे ते कळण्याची व समजून घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे, असं मात्र ती सतत सांगायची. आता आजीच्या असामान्य कर्तृत्वासमोर उणे न पडण्याचं आव्हान तेजश्रीसमोर आहे. आई गेली त्या दिवशी ती पूजाघरात बसून होती. मी तिला सावरण्यासाठी गेलो तेव्हा ती इंग्रजीत म्हणाली, ‘आय डोन्ट वॉन्ट टू सी हर’ पण मी चुकून ‘सिंग’ एवढंच ऐकलं आणि हातपायच गळून गेले होते. म्हणून तिला पुन्हा विचारलं त्या वेळेस ती स्पष्ट म्हणाली की, त्या अवस्थेत तिला पाहावत नाही. तिच्या अंत्यसंस्कारासाठी निघालो तेव्हा तिने आईची मैफिलीची साडी व शाल कपाटातून काढली. ती म्हणाली, मैफिलीत जशी जायची त्याच वेशात तिला निरोप देऊ या. हा संपूर्ण कुटुंबासाठी अतिभावुक असा क्षण होता. अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी दादरच्या चौपाटीवर तिच्या अस्थी विसर्जित केल्या, त्या वेळेस एरवी कचरा भरलेल्या त्या किनारपट्टीवर कचऱ्याचा मागमूसही नव्हता. भरती होती, लाटा वेगात येत होत्या. त्या वेळेस मी तेजश्रीला म्हटलं की, ‘‘गानसरस्वती’च्या स्वागतासाठी सारा आसमंत बघ कसा स्वच्छ झालाय. कारण तिला सारं स्वच्छ आणि नेटकं लागतं याची त्यालाच तर कल्पना असणार!’’ अस्थी हातात घेतलेल्या अवस्थेत माझा भाऊ निहार तिला म्हणाला, ‘‘हे सारं भौतिक आहे, नश्वर आहे. जे नश्वर नव्हतं ते ईश्वरी सूर तिने तुला दिले आहेत. ते तुझ्यात सामावलेयत ते आता आपल्यासोबत असतील!’’

आंबा म्हणजे आईचा जीव की प्राण. माईंचे यजमान भाटिया हयात असताना माईने खूप सुख अनुभवलं. नंतर परिस्थिती कठीण झाली. पण आईनेही ते सुख काही काळ अनुभवलं होतं. ती म्हणायची. आंबा म्हणजे ढीग पडलेला असायचा. आंबा म्हणजे तिच्यासाठी स्वर्गसुख असावे, असे अनेकदा जाणवायचे. मग आम्हीही मार्केटमध्ये पहिला आंबा आला की तिच्यासाठी घेऊन यायचो. आंबा खाताना ती जग विसरायची. फेर्नादिन आणि मानकुराद हे दोन गोव्यातील आंब्याचे प्रकार तिच्या भारी आवडीचे. हे अनेकदा पावसाळ्यात येतात. आंब्यासारखंच प्रेम तिने निसर्गावरही केलं. बकुळीची फुलं तिला प्रचंड आवडायची. माझं निसर्गप्रेम बहुधा तिच्या रक्तातूनच आलेलं असावं. निसर्गाबद्दल आईशी होणारा संवाद अनेकदा अमूर्त प्रकाराचा असायचा. ती फक्त व्यक्त व्हायची, मी समजून घ्यायचो. निहारकडे निसर्गाबद्दल फार कमी बोलणे व्हायचं. कलाकार असल्यामुळे माझ्याशी ते सूत जुळलं असावं. तिच्या गावचा किस्सा तिने एकदा सांगितला होता : कुर्डीला नदीकाठी घरं होतं. तिथे नदीकाठी वाढणारी बॅरींग्टोनिया रेसिमोसाची झाडं खूप होती. या झाडाला माळांसारखी फुलं येतात. काहीशी बारीक असलेल्या केसांसारखी दिसणारी. आई बसलेली असायची नदीकाठी आणि वारा आल्यावर ती फुलं खाली नदीच्या पाण्यात पडायची व वाहायची. आई म्हणाली होती, फुलांचं ते वाहणं पाहून आयुष्यात प्रथम ऱ्हिदम काय असतो ते कळला. निसर्गातही ती बहुधा संगीताचाच शोध घेत असायची!

– समाप्त –

लेखक : श्री बिभास आमोणकर 

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – १ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

??

☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – १ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली. पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता.

आपली आई ही इतरांसारखी हाडामांसाची आई असली तरी ती इतर आईंपेक्षा खूप वेगळी आहे, याची जाणीव आम्हा दोन्ही भावांना अगदी लहानपणापासून न कळत्या वयातही होतीच. सामान्यपणे आई शाळेत सोडायला वगैरे येते तसं आमच्याबाबतीत कधी घडलं नाही. ठरावीक पातळीपर्यंत ती आमची आई असायची आणि नंतर ती इतरांसाठी बरंच काही असायची. लहानपणी आयुष्यात प्रथमच चित्रकलेसाठी बक्षीस मिळालं तेव्हा ते नेऊन आईला दाखवावं अशी खूप इच्छा होती, धावत घरी गेलोदेखील, पण नंतर लक्षात आलं आई कानपूरला गेलीय मैफिलीसाठी, ती नाहीये घरात, मग मावशीला दाखवलं. अनेकदा मावशी आणि माई म्हणजेच आजी मोगुबाई कुर्डिकर याच आमची आई झाल्या होत्या. त्यांनी आमची जबाबदारी घेतली होती. आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली, पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता. शिवाय कळायला लागल्यापासून ती जे काही करते आहे ते एकाच वेळेस अद्भुत आणि दुसरीकडे रसिकांना परब्रह्माची अनुभूती देणारं आहे, याचीही प्रचीती आम्हाला येतच होती. त्यामुळे ती आम्हाला इतर आईंसारखी फार वेळ नाही देऊ शकली याचं आम्हा दोघाही भावांना कधीच वैषम्य नाही वाटलं. उलट आपणही तिच्या या साधनेच्या कुठे तरी कामी यायला हवं, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आमचाही खारीचा का असेना पण वाटा असावा, असं सारखं वाटायचं. ती जे काही करते आहे त्याला तोड नाही, याची कल्पना होती. समजू उमजू लागल्यापासून तर तिच्या त्या कर्तृत्त्वाचा अभिमान वाटायचा. अर्थात, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आम्ही करण्यासारखं काहीच नव्हतं; तिला त्रास होणार नाही किंवा तिच्या रियाझामध्ये खंड पडणार नाही अशा प्रकारे घरातला वावर असावा, हेच आमच्या हाती होतं. ते आम्ही परोपरीने राखण्याचा प्रयत्न केला इतकंच!

आई मैफिलीच्या दौऱ्यावरून परत येण्याच्या दिवशी आम्हीही इतर मुलांप्रमाणे तिची वाट पाहत बसायचो. त्या वेळेस मुंबईत फार कमी टॅक्सीज होत्या. आमच्या घराच्या दिशेने टॅक्सी येताना दिसली, की कोण आनंद व्हायचा. मग आमच्याकडचा रामा बॅगा घ्यायला खाली उतरायचा आणि आम्ही मात्र बॅगा काढून झाल्या, की त्याच टॅक्सीत बसून केम्प्स कॉर्नरच्या त्या खेळण्यांच्या दुकानात तिला घेऊन जायचो. ती दौऱ्यावरून थकून भागून आलेली असेल, दौऱ्याचे काय कष्ट असतात ते समजण्याचं ते वयच नव्हतं. आम्ही तिच्याकडून मग खूप लाड करून घ्यायचो. केम्प्स कॉर्नरचे दुकान असल्याने खेळणी महाग असत. पण बहुधा आम्ही काही गोष्टींना मुकलोय याची जाणीव तिलाही असायची आणि मग सारं काही विसरून तीही आमच्यात मूल होऊन रमायची त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवसापासून आई परत वेगळी असायची. नंतर मोठे झाल्यानंतर आम्हाला आईच्या दिवसाचं मोल अधिक कळलं होतं!

बाबांच्याच शाळेत म्हणजे गिरगावात राममोहनमध्ये असलो तरी अनेकदा राहायला माईकडे (मोगुबाई) गोवालिया टँकला आणि कधी वरळीला मावशीकडे असायचो. सुट्टीच्या दिवशी आईला भेटायचो. मे महिन्यात अनेकदा मावशीकडेच असायचो. इतर घरांमध्ये अनेकदा आई मुलांना घेऊन शिकवायला बसते. तसं आमच्याकडे कधीच झालं नाही. आई शिकवायला बसली असती तर थेट संगीतकारच झालो असतो. पण आईच्या वागण्याबोलण्यातून नकळत झालेल्या संस्कारांमुळे खूप काही शिकलो. भाऊ निहार तबला शिकला, पण मी काही संगीताकडे वळळो नाही. नाही म्हणायला टाइमपास म्हणून तबल्यावर बसायचो. दोनच ताल जमायचे- सवारी आणि योगताल! पंधरा आणि साडेपंधरा मात्रांचे हे ताल फार कमी वाजवणारे आहेत. ते बहुधा आईच्या पोटातूनच आलेल्या अभिजात संगीताच्या संस्कारामुळे साध्य झालं असावं. माई तेव्हा आईला म्हणाली होती, बिभासची लय हलत नाही. ती बहुधा आईचीच देण होती. संगीताचं शिक्षण नसल्यानं सूर नाही ओळखता येत, पण त्याचा रंग सांगता येतो. सुरांच्या रंगांचं एक पॅरामीटर असतं. ते कळतं. ते युनिव्हर्सल स्केल आहे. त्यासाठी जो कान असावा लागतो, तो आईमुळे जन्मापासूनच तयार झाला असावा.

आईच्या प्रत्येक कृतीत परफेक्शन असायचं. काम करत असतानाही तिच्या मनात बहुधा ते संगीतच रुंजी घालत असावं. बॅक ऑप द माइंड तेच सुरू असायचं हे जाणवायचंही. जेव्हापासून, म्हणजे जन्मापासून ऐकू येतंय तेव्हापासून सतत आयुष्यात परफेक्ट सूरच ऐकत आलोय. मग ते आजीचे म्हणजेच माईचे सूर असतील नाही तर आईचे. त्यामुळे संगीताचं व्याकरण सांगता आलं नाही तरी चुकलेलं कळतं आणि कुठे चुकलंय तेही नेमकं कळतं. तिने केलेली प्रत्येक गोष्ट नेमकी व परफेक्टच असायची. मग ती तिने काढलेली रांगोळी का असेना. आईला रांगोळी प्रचंड आवडायची. ती सुंदर रांगोळी काढायची, तीदेखील चार फूट बाय चार फूट अशी मोठय़ा आकारात. दीनानाथ दलालांची चित्रं आईने रांगोळीत साकारलेली आम्ही अनेकदा पाहिली आहेत. तिने काढलेली रांगोळीची रेषाही रेखीव असायची. तिच्यासारखी रेखीव रांगोळी नाही जमली काढायला कलावंत असूनही. आधी कार्डबोर्डवर चित्र चितारायची आणि मग रांगोळीत. कदाचित कार्डबोर्डवरचा तो तिचा रियाझ असावा चित्रकलेचा. आई कविताही छान करायची. त्या कवितेतील शब्दही तेवढेच जपून वापरलेले आणि नेमके असायचे. त्या शब्दांमध्ये खोलीही आहे. पण या कविता आम्हा केवळ घरच्यांनाच माहीत आहेत. बाहेर कुणाला याची गंधवार्ताही नाही.

घरात असताना आई नेहमी तिच्याच जगात असायची. रात्री अनेकदा उशिरा झोप, सकाळी साधारण चार-पाच तासांचा रियाझ. अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही हे चुकले नाही. अलीकडे तर लोक विचारायचे, ‘आता या वयात कशाला रियाझ?’ त्यावर ती म्हणायची, ‘हा माझा श्वास आहे. ज्या दिवशी गाणार नाही त्या दिवशी या जगात नसेन!’ रात्री उशिरा झोपायची. अनेकदा दीड- दोन वाजायचे. त्यामुळे दुपारची झोप तिच्यासाठी महत्त्वाची असायची. कधी फार भेट झाली नाही तर खोलीत फक्त डोकावायचं. गानसमाधी लागलेली असताना तिला काहीच कळायचं नाही. पण कुणाला शिकवत असेल तर तिला लक्षात यायचं, मग बाहेर येऊन आवर्जून विचारपूस करायची. ती काही मिनिटांची तिची भेटही आमच्यासाठी खूप काही असायची.

आम्ही आईसाठी काय त्याग केला याहीपेक्षा आईने संगीतासाठी किती त्याग केला ते अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही ते सारं जवळून पाहिलंय. अप्पा जळगावकर आईच्या मैफिलीच्या वेळेस साथ करायचे. त्या काळी अनेकदा त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून रेल्वेप्रवास केलेला असायचा. कार्यक्रमही अनेकदा मोफतच केलेला असायचा, एखाद्या संस्थेसाठी धर्मादाय म्हणून. हे असं तिने अनेकदा धर्मादाय कार्यक्रम करणं आवडायचं नाही. तिला आम्ही नाराजीही अनेकदा सांगायचो, पण तरीही ती ते करायची. अनेकदा ती रागीट वाटायची किंवा मानी. पण विमानतळावर विमानाला उशीर झाल्यानंतरही व्हीआयपी लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर तिने कधी तमाशा नव्हता केला. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिने कधी मिरवले नाहीत. तिच्यासाठी ‘गानसरस्वती’ हाच सर्वात मोठा बहुमान होता. कधी तिने स्वत: तापाने फणफणत असताना कार्यक्रम केले आहेत, तर कधी आम्ही तापाने फणफणत असतानाही जाऊन कार्यक्रम केले. हे कार्यक्रम मिरवण्यासाठी नव्हते तर ती तिच्यासाठी अमृताची पूजा असायची, याची आम्हालाही कल्पना होती. पण याची कल्पना नसलेले रसिक मग ताई साडेनऊ वाजले तरी स्टेजवर नाही म्हणून कागाळी करायचे. कधी तिला मनासारखी वाद्यं लागलेली नसायची, तर कधी इतर काही कारण असायचं. ती परफेक्शनिस्ट होती. त्यामुळे कधी वेळ व्हायचा. हे सारं मी जवळून पाहिलं आहे.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री बिभास आमोणकर 

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares