मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभाव… श्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

रामरक्षेचा आणि संस्कृत उच्चारांचा प्रभावश्री.संतोष गोविन्द जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

माझे एक मित्र होते, सुनील जोशी. होते म्हणजे दुर्दैवाने आज हयात नाहीत. पण त्यांच्याबाबतीत प्रत्यक्ष घडलेली हकीकत सांगतो.

पूर्वी आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो, त्या रस्त्याच्या सुरूवातीच्याच सोसायटीत ते रहायचे. त्याच सोसायटीच्या तळघरातील एका हाॅलमधे ते आणि त्यांची पत्नी असे दोघेजणं संस्कृतच्या शिकवण्या घ्यायचे. नंतर आम्ही काही काळाकरता गंगापूर रोडला रहायला जाऊन आमचं घर बांधून झाल्यावर परत कामठवाड्यात आलो. तोपर्यंत ते इंदिरानगरला फ्लॅटमधे रहायला गेले होते. त्यामुळे बर्‍याच वर्षांत भेट नव्हती. ५-६ वर्षांपूर्वी आमच्यामागेच श्री. योगेशजी मांडे रहातात, त्यांनी सुनील जोशींना पॅरालिसिसचा अॅटॅक आल्याचे सांगितले. त्यातून ते बरे झाले. मला त्यांना भेटायला जायचे होते, पण कुठे रहातात हे माहिती नसल्याने एक दिवस योगेशजींबरोबरच त्यांच्या घरी गेलो. आता इथून पुढचं काळजीपूर्वक वाचा.

त्यांच्याकडे गेल्यावर आम्हाला दोघांनाही आनंद झाला. एखाद्या आजारातून बरं झालेल्या व्यक्तीला जसं आपण सहज विचारतो की काय झालं, कसं झालं, तसं मीपण विचारलं; तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते असं—-

” मी सकाळी १० च्या सुमारास डिशमधे पोहे खात इथेच बसलो होतो. निम्म्याहून अधिक पोहे खाल्ले असतांना अचानक माझ्या हातातून डिश गळून पडली. पॅरालिसीसचा झटका आला होता. त्यामुळे एक बाजू गळाल्यासारखी झाली होती आणि तोंडही वाकडं व्हायला लागलं होतं. एरवी त्यावेळी घरात कोणीच नसतं, पण नशिबाने मुलाच्या क्लासला सुट्टी असल्याने तो घरी होता. तो लगेच धावत बाहेर आला. त्याला मी कसेबसे माझ्या त्या मित्राला घेऊन यायला सांगितले, ज्याच्याबरोबर नाष्टा झाल्यावर मी कंपनीत जायला निघतो. मुलगा खाली गेला तर तो मित्र रोजच्याप्रमाणे स्कूटरवरून आलाच होता. मुलाने त्याला सांगितल्याबरोबर तो मला घेऊन खाली आला आणि जवळच्याच डाॅक्टरांकडे घेऊन गेला. तिथे तपासणी होईपर्यंत २ वाजले होते. डाॅक्टरांनी ताबडतोब न्युराॅलाॅजिस्टकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी सुचविलेल्या हाॅस्पिटलमधे आम्ही गेलो. तिथे लगेच तपासणी होऊन अॅडमिट केले आणि प्राथमिक उपचार सुरु केले. संध्याकाळी डाॅक्टर येऊन तपासून गेले आणि स्टाफला सूचना देऊन गेले. त्याप्रमाणे आैषधोपचार सुरू झाले. रात्री ८-८॥ च्या बेताला एक फिजिओथिअरपिस्ट भेट ध्यायला आली. मला तपासल्यावर हिला सांगितले की ‘ मी उद्या सकाळी लवकर आठ वाजता येते, तोपर्यंत यांना झोपू देऊ नका. यांच्याशी सतत बोलत रहा आणि जागं ठेवा.’ ती निघून गेल्यावर मला जे काय थोडंफार उच्चार करून बोलता येत होतं, तसं मी आणि ही, आम्ही दोघेजणं संस्कृतमधून गप्पा मारत होतो. (लक्षात घ्या हं, दोघं नवरा-बायको संस्कृतमधूनच एकमेकांशी बोलत होते.) आणि विशेष म्हणजे अधूनमधून मी रामरक्षा म्हणत होतो. अशा रितीने रात्रभर बर्‍याचवेळेस मी रामरक्षा म्हटली.

सकाळी ती फिजिओथिअरपिस्ट जशी आली आणि मला जसं बघितलं, तसे तिचे डोळे विस्फारले गेले. तिने हिला विचारलं की रात्रीतून तुम्ही काय केलं? हिने थोडसं घाबरत सांगितलं की ‘ काही नाही, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ह्यांना रात्रभर जागं ठेवलं.’

त्यावर ती म्हणाली की ‘ नाही. तुम्ही नक्कीच काहितरी निराळं केलं असणार. कारण यांचं तोंड वाकडं झालेलं होतं, त्यासाठी मी माझ्याजवळच्या निरनिराळ्या आकाराच्या लाकडी गोळ्या गालात ठेवण्यासाठी आणल्या होत्या (तोंड सरळ होण्यासाठी फिजिओथिअरपिमधला हा एक भाग असतो), पण यांचं तोंड तर सरळ झालेलं दिसतंय. मला नक्की सांगा तुम्ही काय केलं?’

…….. तेव्हा हिने सांगितलं की ‘आम्ही रात्रभर संस्कृतमधून थोड्या गप्पा मारल्या आणि ह्यांनी बर्‍याच वेळेस “रामरक्षा” म्हटली.’

तिला आश्चर्य वाटल्याचं तिच्या चेहेर्‍यावर दिसत होतं. ती लगेच निघून जातांना म्हणाली की मग आता माझं काही कामच नाही. यासाठीच मी आले होते. (म्हणजे त्या रोग्याच्या तोंडाच्या आकारानुसार योग्य अशा आकाराची लाकडी गोळी जिकडे तोंड वाकडं झालं असेल त्याविरूद्ध गालात काही तास ठेवली जाते, जेणेकरून तोंड सरळ होण्यास मदत होते.)

फक्त रामरक्षा म्हटल्याचा आणि संस्कृत उच्चारांचा शरीरावर काय परिणाम होतो याचं हे माझ्यासमोरचं जिवंत उदाहरण मी पाहिलं. माझ्याशी ते अगदी व्यवस्थित बोलत होते.  

रामरक्षेच्या प्रभावाचा त्यांनी स्वतः घेतलेला अनुभव, जो त्यांनी स्वतः मला सांगितला, तो मनांत ठसला आहे.

लेखक : श्री.संतोष गोविन्द जोशी

माहिती संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माहेर… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ माहेर… अनामिक  ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

आई बाप असतात तिथं माहेर असतंच असं नाही…. 

आणि जिथं माहेर असतं तिथं आई बाप असतातच असंही नाही….. 

माहेर ही खरं तर भावना असते….. जगून घेण्याची,  तर कधी अनुभूती असते काही क्षणांची…

तुम्हाला बरं नसल्यावर अर्ध्या रात्री मोबाईलच्या टॉर्चमध्ये नेमकी गोळी शोधून देणारा नवरा…

तुमचं लेकरू त्रास देतंय म्हटल्यावर हातातलं काम सोडून त्याला तुमच्याआधी पोटाशी घेणारी जाऊबाई…

तुम्ही झोपल्या असाल याचा अदमास घेत हळूच त्यांच्या कामाची वस्तू आवाज न करता, झोप न मोडता घेऊन जाणारे सासरे बुवा…

जास्त न बोलताही तुमच्यावर कायम मोठ्या भावाची सावली धरणारे भाऊजी……

सणाच्या दिवशीही नैवेद्याअगोदर तुम्हाला “आधी तू जेव” म्हणणाऱ्या सासूबाई…

एखाद्याच msg वरून तुम्ही नाराज असल्याचं नेमकं कळणारा मित्र…

” मी कायम आहे ” म्हणत सारं काही ऐकून घेणारी मैत्रीण.. 

आणि तुमच्या आजारपणात तुमचं बाळ हक्कानं घेऊन जाणाऱ्या, त्याला खेळवणाऱ्या, जेवण भरवणाऱ्या स्वैपाकाच्या काकू…

किंवा मग होळीला नवा कोरा ड्रेस बाळाला घालून त्याला घरी पाठवून देणाऱ्या शेजारीण काकू…

ह्या सगळ्या माणसांच्या सहवासात घालवलेल्या कित्येक क्षणांत माहेराचीच तर ऊब असते…

तीच शाश्वती …. तोच गोडवा… तोच विश्वास… ही माणसं आपल्याला एकटी पडू द्यायची नाहीत हे कायम स्वतःला सांगू शकणारे सुदैवी आपण !

आयुष्य खरंच सुंदर आहे……. फक्त हे असं माहेर जपता आलं पाहिजे !

लेखक : अनामिक 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आपलं माणूस…!!! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नुकत्याच भिकेच्या डोहातून बाहेर काढलेल्या एका आजीचं आता कसं करावं ? काय करावं ? हा विचार डोक्यात सुरू होता… ! अशातच वाढदिवसानिमित्त गौरी धुमाळ या ताईंचा मला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला. 

गौरीताई पौड भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वृद्धाश्रम चालवतात. 

सहजच मी या आजीबद्दल गौरीताईंशी बोललो. त्या सहजपणे म्हणाल्या “ द्या माझ्याकडे पाठवून दादा त्यांना…! “

…. त्या जितक्या सहजपणे आणि दिलदारपणे हे वाक्य बोलल्या, तितक्या सहजपणे सध्या हा वृद्धाश्रम त्या चालवू शकत नाहीत याची मला पूर्ण कल्पना आहे. 

गौरीताई रस्त्यावर फिरत असतात…. निराधार आणि बेवारस पडलेल्या आजी-आजोबांना त्या रस्त्यावर आधी जेवू घालतात आणि त्यांना आपल्या आश्रमात कायमचा आसरा देतात. असे साधारण वीस ते बावीस आजी आजोबा सध्या त्या सांभाळत आहेत. 

एका फोटोमध्ये गरीब लोकांना भरपेट खाऊ घालताना त्या मला दिसल्या… मी त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं…. यावर त्या डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, “ दोन-तीन वर्षांपूर्वीचा फोटो आहे तो …. या दोन-तीन वर्षांत माझे हे आजी आजोबा असे भरपेट जेवल्याचे मला आठवत नाही. रोजचं दोन वेळचं जेवण हीच आमच्यासाठी चैन आहे. अनेक बिलं थकली आहेत… कधी कधी वाटतं जग सोडून जावं… पण पुन्हा या आजी-आजोबांचा विचार येतो…. त्यांच्या चेहऱ्यावरचं करुण हास्य बघून दरवेळी मी माघारी फिरते….” —- हे बोलताना गौरी ताईंचा बांध फुटतो…! 

या ताईंना हा वृद्धाश्रम चालवण्यासाठी खरं तर कोणाचीच साथ नाही, सरकारी अनुदान नाही, जे काही थोडेफार डोनेशन मिळत आहे, त्यावर इतक्या लोकांचा संसार चालणं केवळ अशक्य आहे. 

आंबा खाऊन झाल्यावर त्याची कोय जितक्या सहजपणे रस्त्यावर फेकून देतात …. तितक्या सहजपणे आपल्या आई आणि बापाला रस्त्यावर सोडणारी मुले- मुली -सुना – नातवंड आम्ही रोज पाहतो…. 

दुसऱ्याच्या आईबापाला स्वतःच्या मायेच्या पदराखाली घेणारी ही ताई मला खरोखरी “माऊली” वाटते. 

परंतु आज हीच माऊली व्याकूळ झाली आहे…. परिस्थितीपुढे हरली नाही…. पण हतबल नक्कीच झाली आहे… ! 

अशा आई-वडील, आजी – आजोबा यांना आपला मदतीचा हात गौरीताईच्या माध्यमातून देता येईल. 

नळ दुरुस्त करणारा कितीही कुशल असला तरी डोळ्यातले अश्रू थांबवायला आपलं माणूसच असावं लागतं… 

गौरीताई यांच्या माध्यमातून आपणही या अंताला पोहोचलेल्या आजी-आजोबांचं ” आपलं माणूस ” होऊया का ? 

गौरीताई धुमाळ  यांच्याशी 74988 09495 या नंबरवर संपर्क साधता येईल…!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! ) इथून पुढे 

यानंतर पुढच्या दोन दिवसात मला आणखी चार दिव्यांग तरुण भेटले….

यापैकी दोघांचे टेलरिंगचे व्यवसाय होते…. परंतु कोविड  काळात व्यवसाय थांबला… रोजच्या घरखर्चासाठी शिलाई मशीन सुद्धा मातीमोल किमतीने विकाव्या लागल्या…. दोन्ही कुटुंबे उघड्यावर पडली…! 

माणसाने नेहमी झऱ्यासारखं वहात रहावं…. कारण हे वाहणे थांबलं की याच झऱ्याचं डबकं तयार होतं…. झऱ्यावर नेहमी राजहंस येतात…. परंतु डबक्यावर मात्र येतात ते डास आणि घाणेरडे किडे…! …. यांच्याही आयुष्याचं वाहणं थांबलं…. मनामध्ये डबकं साठलं….पुढे अंधार दिसायला लागला…. आणि मग वाईट-साईट विचार या साचलेल्या डबक्यावर घोंघावायला लागले…!

या दोघांनाही शिलाई मशीन द्यायचं आम्ही ठरवलं…! 

श्री. जिगरकुमार शहा सर Upleap Social Welfare Foundation या सामाजिक संस्थेत सक्रिय – सन्माननीय सभासद आहेत.  या संस्थेमार्फत त्यांनी एक शिलाई मशीन आम्हास मिळवून दिले. …… “अर्ध्यावर फाटलेला डाव या मशीनवर शिवायचं आपण आता ठरवलं आहे …!”

उरलेले इतर दोघे…. एका चाळीत राहतात….घरासमोरच्या बोळातच काही न काही वस्तूंची विक्री करून आपलं कुटुंब चालवत होते…! कोविडच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेने दोघांचीही घरं हळूहळू लुटून नेली…! 

“आमच्या वाईट काळात आमच्याच नातेवाइकांनी आमचे पाय खेचले…. आम्हाला गाळात घातलं “  यातला एक जण डोळ्यातून येणारे अश्रू, पालथ्या मुठीने पुसत म्हणाला होता…

“ दुसऱ्याचं घर लुटायला “पोती” घेऊन येतात ती कसली “नाती” मित्रा ? अशा नात्यांचा विचार करू नकोस इथून पुढे….आणि कायम लक्षात ठेव…. आपले पाय खाली खेचणारे लोक नेहमी आपल्या पायाशीच असतात….  असे लोक फक्त आपल्या पायाशीच घुटमळतात ; परंतु ते कधीही आपल्या हातापर्यंत पोहोचू शकत नाहीत….कारण त्यांची “उंची” तितकी नसते…हातात दम आहे तोवर कुणी पाय खेचले तर विचार करू नकोस…!”

या दोघांनाही विक्रीयोग्य सर्व साहित्य देऊन ” पुन्हा त्यांना पायावर उभं करण्याचं ” आपण ठरवलं आहे…!

…. “अर्ध्यावर मोडलेले संसार पुन्हा जोडण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत…!”

यानंतर माझे सहकारी श्री मंगेश वाघमारे आणि श्री अमोल शेरेकर यांना झटपट आवश्यक त्या सर्व सूचना देऊन …. आम्ही सर्वांनी आपापसात कामे वाटून घेतली…. करावयाची कामे आणि हातात असलेला वेळ यांची सांगड घालता; सर्व बाबी एकाच दिवशी, एकाच ठिकाणी १४ एप्रिलला करण्याचे आम्ही ठरवले. माझ्या दोन्ही सहकार्‍यांनी जीवतोड मेहनत घेऊन दोन दिवसात सर्व घडामोडी जुळवून आणल्या. 

१४ एप्रिल रोजी साईबाबा मंदिर, तोफखाना, शिवाजीनगर कोर्ट पुणे जवळ, या सर्वांना एकत्र बोलावलं…. आणि या सर्व गोष्टी श्री. जिगरकुमार शहा साहेब यांच्या हस्ते या सर्व दिव्यांग व्यक्तींना अर्पण केल्या…! 

श्री जिगरकुमार शहा साहेब आणि Upleap Social Welfare Foundation दोहोंचे आम्ही ऋणी आहोत…! 

कोणताही समारंभ नाही, कसलाही गाजावाजा नाही …. रस्त्यावर मी, डॉ मनीषा, श्री जिगर कुमार आणि आमची याचक मंडळी…. यांच्या सहवासात हा हृद्य सोहळा पार पडला…! … नाही म्हणायला दुपारचं कडकडीत ऊन पडलं होतं…. सूर्य आग ओतत होता….पण खरं “तेज” मला या पाचही जणांच्या चेहऱ्यावर झळकत असलेलं दिसत होतं….! जाताना त्यातला एक जण हात जोडत म्हणाला, “ मनापासून आभारी आहे सर…. आम्ही शून्य झालो होतो….तुम्ही आम्हाला जगण्याची…. उभं राहण्याची परत संधी दिलीत…”

त्याने बोललेल्या या वाक्यावर सहज मनात विचार आला… 

प्रत्येक जण शून्यच असतो… पण प्रत्येक शून्याला त्याची स्वतःची एक किंमत असते… या शून्याची किंमत जर आणखी वाढवायची असेल…. तर “कुणीतरी” त्या शून्याच्या शेजारी जाऊन फक्त उभं राहायचं असतं “एक” होऊन…! अशाने त्या शून्याची किंमत तर वाढतेच…. पण किंमत वाढते त्या शेजारी उभ्या राहणाऱ्या “कुणातरी एकची” सुद्धा !!!

या विचारात असतानाच फोन वाजला…. पलीकडून आवाज आला, “अहो सर येताय ना ? आम्ही वाट पाहत आहोत….” मी गोंधळलो…. “कुठे यायचं आहे मी ?“

“अहो सर, आज भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर सरांच्या नावे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आहे ना ? तिथे आम्ही आपली वाट पाहत आहोत, तुम्हाला आणि डॉ मनीषा दोघांनाही आज पुरस्कार आहे, विसरलात काय, मागे मी फोन केला होता …!”

— ओह…. मी या सर्व गडबडीत हे पूर्ण विसरून गेलो होतो…मी संयोजकांची मनापासून माफी मागून….

सकाळ पासून  घडलेल्या सर्व बाबी सांगितल्या…!

संयोजक मनापासून माफ करत म्हणाले…., “ आज खुद्द आदरणीय बाबासाहेब जरी इथे असते, तर ते म्हणाले असते…. ‘ इथे येवून पुरस्कार स्विकारण्यापेक्षा, तिथल्या गोरगरिबांच्या सुख-दुःखात समरस हो…. मला ते जास्त आवडेल….!’  आदरणीय बाबासाहेबांना जे आवडलं असतं…. असेच आज तुम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त वागला आहात…. आम्ही तुम्हाला इथे एक पुरस्कार देणार होतो … पण तुम्ही तिथे राहून ५-५ पुरस्कार मिळवले…. अभिनंदन डॉक्टर…!!! “ हे ऐकून, माझ्या डोळ्यात पाणी तरळलं….! आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या…. या “महावीरांच्या” चरणांशी  मनोमन आम्ही नतमस्तक झालो…! 

यानंतर मग हसणारे पाच चेहरे मनात साठवत…. मी आणि डॉ मनीषा आम्ही गाणं गात निघालो ….

“अर्ध्यावरचा डाव जोडला…. अशी ही गोड कहाणी …!”

— समाप्त —

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

असाच एक सोमवार… पंधरा दिवसातल्या एका सोमवारी मी इथे येत असतो. इथं चौकात समोर जे मंदिर दिसतंय ना? बरोबर त्याच्या समोर एक दृष्टीहीन जोडपं रस्त्यात भीक मागत उभं असतं… या जोडप्याला लॉक डाऊन मध्ये आपण मास्क आणि सॅनिटायझर तथा तत्सम वस्तू विक्रीसाठी दिल्या होत्या. 

हे दोघेही लहानपणापासून शंभर टक्के अंध…. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी की, यांना जी दोन मुलं आहेत ती पूर्णतः व्यवस्थित आहेत…एक लहान मुलगा आणि एक तरुण मुलगी….आणि हे दोघे…. इतकाच चौकोनी संसार !

“ती” आणि “तो” एकमेकांना सांभाळून घेत आयुष्य जगत आहेत… “ती” कधी शक्ती होते तर “तो” कधी सहनशक्ती ! 

त्याच्या लहानपणी आई-वडिलांनी दगड मातीचं घर अर्थात एक निवारा उभारला होता…. इतक्या वर्षात हा निवारा हळूहळू पडत गेला….. एक दिवस तर असा आला की, हे दोघे आपल्या मुलांना घेऊन उघड्यावरच झोपायचे. या दोघांना आणि मुलांना पाहून आसपासच्या अनेक दयाळू लोकांनी यांना पुन्हा निवारा बांधून देण्याचा प्रयत्न केला… तरीही हा निवारा पूर्ण झालाच नाही…. एके दिवशी गोळ्या-औषधं घेता घेता बिचकत तो मला म्हणाला, “डॉक्टर साहेब थोडं काम राहिलंय घराचं… तुम्हाला काही मदत करता येईल का ? मला मदत करा हो….”  तो अत्यंत कळवळून बोलत होता. …. 

कळकळ, तळमळ आणि वेदना या नेहमी डोळ्यात दिसतात … याच्याकडे तर डोळेच नव्हते…

पण ही वेदना आणि तळमळ त्याच्या आक्रसलेल्या चेहऱ्यावरून ओघळून वाहत होती अश्रू सारखी… ! 

तसा हा नेहमी हसत मुख असतो…….. पण म्हणतात ना टेबल जर स्वच्छ आणि टापटीप दिसत असेल तर समजावं, त्याचा ड्रॉवर खचाखच भरला आहे नको असलेल्या गोष्टींनी …! यानेही सर्व वेदना नक्कीच मनातल्या ड्रॉवरमध्ये    लपवून ठेवल्या असतील…. 

मी पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीवर बसलो….. समोर रस्त्याऐवजी त्याचा तो आक्रसलेला चेहरा आणि रात्री रस्त्यावर तरुण मुलगी, एक लहान मुलगा  आणि पत्नीसह असुरक्षित जागी राहणारा त्याचा संसार दिसत होता….!

त्याला खरी काळजी होती त्याच्या तरुण मुलीची….!!! 

या कुटुंबाचं नेमकं काय आणि कसं करावं? हा विचार करतच गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ स्नेह्यांचा मला फोन आला. ते म्हणाले, “ अभिनंदन डॉक्टर, 14 एप्रिल रोजी आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंती निमित्त आपणास ” भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” जाहीर झाला आहे…नक्की या. “

“ होय होय…. धन्यवाद सर “ म्हणत मी फोन ठेवला. 

मनात पुन्हा विचार आला…. आदरणीय बाबासाहेबांना अपेक्षित असणारं गाव / राज्य / देश अजून तरी निर्माण झालंय का ? माझा त्यात हातभार कितीसा आहे ?  इतक्या मोठ्या माणसाच्या नावे पुरस्कार घेण्याची माझी खरंच पात्रता आहे का ? ……. हा विचार सुरू असताना उघड्यावर राहणाऱ्या त्या  कुटुंबातील व्यक्तींचे चेहरे पुन्हा माझ्यासमोर फेर धरून नाचू लागले…. काय करता येईल या विचाराने मी अस्वस्थ झालो…! 

या अस्वस्थतेत पुन्हा फोन वाजला…. मी अनिच्छेने फोन उचलला…. पलीकडे माझे मित्र श्री जिगरकुमार शहा होते. सच्चा दिलदार माणूस ! 

“ काम कसे सुरू आहे ? काय चाललंय ? माझ्याकडून काही मदत हवी आहे का ? “ अशा प्रकारची चर्चा सुरू असताना, फोन ठेवते वेळी ते मला म्हणाले, “ डॉक्टर तुम्हाला तर मदत करतोच आहे…. पण त्यासोबत तुम्हाला जर कोणी अत्यंत अडचणीत असलेली, मदतीची नितांत आवश्यकता असलेली कुणी अंध / अपंग व्यक्ती सापडली, तर मला नक्की कळवा…..  या वर्षात मला अशा एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट मदत करायची आहे…! “

….. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना…. मला वाटलं गाडी चालवत असताना, गोंगाटामुळे मला चुकीचं काहीतरी ऐकू आलं असावं…..जवळपास किंचाळत मी त्यांना पुन्हा विचारलं, “ सर गाडीवर आहे, नीट आवाज आला नाही,  आवाज ब्रेक होतोय…. पुन्हा एकदा बोला शेवटची वाक्ये प्लीज …! “…. मी ऐकलं ते खरं होतं…. त्यांना तेच म्हणायचं होतं ! 

मी गाडी बाजूला घेऊन थांबलो….नुकत्याच भेटलेल्या दृष्टिहीन दाम्पत्याची कर्मकहाणी मी त्यांना सांगितली…. त्यांना डायरेक्ट मदत करण्याविषयी विनंती केली…. अगदी सहजपणे ते म्हणाले…., “ Okk Doc, I don’t have any problem…. तुम्ही सांगताय म्हणजे ती व्यक्ती आणि कुटुंब Genuine असणार याची मला खात्री आहे. आजपासून या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझी.”

जिगरकुमार शहा साहेब नुसतं एवढं बोलून थांबले नाहीत…. तर त्यांनी या दृष्टिहीन दाम्पत्याच्या घराच्या खर्चासह, त्यांच्या मुलामुलीच्या शिक्षणाची आणि त्यांच्या इतर सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली आहे… !… हे सर्व करायला नुसता पैसा असून चालत नाही…. मनामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी करायची “जिगर” असावी लागते…! 

आपल्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा होते ती “वेदना”…. परंतु जेव्हा दुसऱ्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा जी होते ती “संवेदना”…!

….. अशा या संवेदनशील माणसाला मी मनातूनच साष्टांग नमस्कार घातला…. ! हरखून त्यांना म्हटलं, “ सर कधी करूया हे सर्व ? “

ते म्हणाले, “ १४ एप्रिलला मला सुट्टी आहे त्या दिवशी सर्व आटोपून टाकू…चलेगा ??? “ 

“ दौडेगा सर…” म्हणत मी गाडी मागे वळवली आणि त्या कुटुंबाला ही बातमी सांगायला परत निघालो…. 

यानंतर “तिच्या” आणि “त्याच्या” चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाचे चित्र रेखाटण्यास, माझी लेखणी असमर्थ आहे… ! 

उन्हानं…. घामानं आपला जीव कासावीस व्हावा …. घशाला कोरड पडावी…. आणि तेवढ्यात समोर आंब्याचं झाड दिसावं…. या झाडाच्या थंडगार सावलीत आपण टेकावं आणि इतक्यात कुणीतरी येऊन वाळा घातलेल्या माठातल्या थंडगार पाण्याने भरलेला तांब्या आपल्यासमोर धरावा…. घट घट करून, पाणी पीत आपण आपला जीव शमवावा आणि उरलेलं पाणी ओंजळीत घेऊन, चेहऱ्यावर त्याचे शिपकारे मारावेत…. यासारखी तृप्तता नाही…. ! 

…… “त्या “दोघांचे समाधानाने भरलेले चेहरे आणि जिगर साहेबांचा दिलदारपणा याने हीच तृप्तता मला लाभली… ! 

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! 

—–क्रमशः भाग पहिला… 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वप्न… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ स्वप्न… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

“स्वप्नं” किती तरल, हळूवार, अलगद, नाजूक शब्द पण व्याप्ती किती मोठी. स्वप्ने जरूर बघावीत पण स्वप्नरंजन नको. स्वप्नांच्या मागे जरूर लागावे पण तेच अंतिम सुख आहे असे वाटणे नको. कधीकधी स्वप्नांमुळे उत्तुंग यशाचे शिखर गाठता येते, तर कधी ह्याच स्वप्नांच्या ध्यासामुळे आपण निराशेच्या गर्तेतही ढकलल्या जातो. स्वप्नांपेक्षाही वास्तवतेची कास धरा, सकारात्मक व्हा. जास्त अनुभव मिळतो .

मला स्वतःला जी लोकं उत्तुंग, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने बघतात त्यांच्याबद्दल प्रचंड कौतुक, आदर वाटतो. पण मला स्वतःला स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर लहान लहान स्वप्नं बघण्यात जास्त आनंद मिळतो.एकतर लहान स्वप्ने आवाक्यातील असतील तर लौकर पूर्ण होतात आणि अल्प गोष्टीतही समाधान, सुख,आनंद शोधण्याची सवयच लागून जाते कायमची. 

बरेचदा स्वप्ने बघतांना आपण पराकोटीची मेहनत करतो,ही चांगलीच गोष्ट आहे.परंतु ह्याचा दुष्परिणाम जर आपल्या प्रकृतीवर होत असेल तर तीच स्वप्नं आपल्याला महागात पण खूप पडतात. माझ्या मते स्वप्नं ही जिन्याच्या पाय-यांसारखी असतात. त्या एकेका पायरीवर क्षणभर विसावा घेऊन दुसरी पायरी चढावी, म्हणजेच दुसऱ्या स्वप्नाकडे वळावं. एका दमात पूर्ण जिना चढून जाण्याच्या प्रयत्नात ,सगळी स्वप्ने झटक्यात कवेत घ्यायच्या प्रयत्नात, शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचेस्तोवर आपला जोर, दम संपुष्टात येऊन त्याचा स्वाद घ्यायला ना आपल्यात जोर शिल्लक राहतो ना उत्साह. मोठ्या स्वप्नाच्या मागे लागतांना कदाचित आपण लहान लहान आनंदाला पण मुकून जातो.

स्वप्नांचे इमले चढवितांना ध्यास असावा पण हव्यास नको. स्वप्नांची पूर्तता करतांना माणसे तोडण्यापेक्षा जोडण्यालाच नेहमी प्राधान्य द्यावं. स्वप्ने पूर्ण व्हावीत ही इच्छा जरूर असावी पण अट्टाहास नको. शेवटी काय हो सगळ्या मानण्याच्याच गोष्टी. तुकडोजी महाराज म्हणतातच नं ,” राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या.” जशीजशी समज येते,आणि प्रगतीची कास धरावी वाटू लागते तशीतशी माणसाला स्वप्ने बघायची सवय लागत असावी असं वाटतं. अर्थात माणसाला स्वतःची उन्नती करावयाची असेल तर नुसतं स्वप्नं बघून पण भागणार नाही. ती स्वप्नं पूर्णत्वास कशी जातील ह्याचा पण विचार करायला हवा.साधारणतः किशोरावस्था ते अख्खं तरुणपण हा काळ स्वप्नरंजनासाठीच असतो जणू. मग नंतर कुठे वास्तविकतेचं भान येऊन आणि अनुभवाचे टक्केटोणपे खाऊन सत्य परिस्थिती सामोरी आल्यावर खरं भान येते.

स्वप्न हा विषय काल एका गमतीनं सुचला. स्वप्नं बघणं आणि स्वप्नं दिसणं ह्या दोन भिन्न बाबी आहेत. झोपेत ब-याचश्या व्यक्तींना स्वप्नं दिसतात. साधारण आपण दिवसभरात ज्या गोष्टी बघतो, अनुभवतो त्याच्याशी निगडित स्वप्नं पडतात.  परवा एकदा टिव्हीवर बातम्या बघत असतांना एका बड्या व्यक्तीच्या घरं व प्रतिष्ठानांवर “ईडी”ची पडलेली धाड दाखवत होते.आजकाल नवीनच फँड आलंय. एकच बातमी आणि त्याच्याशी निगडीत फुटेज हे मेंदूवर हँमरींग केल्यासारखं वारंवार कित्येकदा दाखवलं जातं. दिवसभर ती ईडीची धाड बघितली. त्या को-या करकरीत नोटांच्या थप्प्यावर थप्प्या आणि सोने,चांदी, हिरे मोती,प्लँटीनम ह्यांचे घरातून निघालेले दागिने बघून मी बँकर असूनही मला चक्कर आल्यागत वाटलं. त्यानंतर होणारी ती झाडाझडती, ते आरोप, ते आपल्याच घरात चोरासारखं बसणं बघून वाटलं आपल्याकडे गरजेपुरतीच संपत्ती आहे हेच छान.

दिवसभर तेच बघितल्यामुळे असेल वा डोक्यात तेच बसल्यामुळे असेल मलाही रात्री माझ्या घरी धाड पडल्याचं स्वप्नात दिसलं. घरी दागिने, नोटांच्या थप्प्या काहीच नसल्याने मी स्वप्नातही नेहमीसारखीच निर्धास्त होते. पण स्वप्न आत्ता कुठे सुरू झालं होतं,आणि मस्त नाँनस्टाँप झोपेची सवय असल्यानं स्वप्नंही सुरुच राहणार होतं. त्या धाड टाकणा-या अधिका-यांनी सर्वप्रथम वाँर्डरोब कुठे आहे विचारले. दागिने, नोटांच्या थप्प्या नव्हत्याचं त्यामुळे त्या सापडण्याचा प्रश्नच नव्हता. त्या अधिका-याने सांगितले की ही ईडीने “साडी”  ला संपत्ती समजून टाकलेली  ” धाड” आहे. आता मात्र माझं धाबं दणाणलं. 

वाँर्डरोब उघडल्याबरोबर माझी ईस्टेट म्हणजे माझ्या साड्यांची गिनती चालू केली. त्या साड्यांच्या थप्प्या ते भराभर उलगडून मोजू लागले. तरी नशीब मला सरसकट बायकांना त्या साड्यांच्या घडीत नोटा ठेवायची सवय असते ती सवय अजिबात नव्हती. नाहीतर अजूनच आफत होती.

त्या एकएक साडीबरोबर त्यांच्या घड्यांसारख्या त्याच्याशी निगडीत एकेक आठवणींचे पदर उलगडायला लागलेत. साड्या हा बायकांचा विकपाँईंट. आईनं, बहीणीनं, वन्संनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी दिलेल्या साड्या मी त्यांना खुलासा म्हणून एक एक प्रसंग ,साडी देण्याचं निमीत्त असलेलं सबळ कारण सांगू लागले. मी सांगतांना थकतं नव्हते पण ते अधिकारी मात्र ऐकतांना घामाघूम होत होते. ते म्हणाले हे बायकांचे एकमेकींना साड्या गिफ्ट द्यायचे फंडे आम्हा माणसांच्या लक्षातच येत नाही. 

त्या अधिक-यांनी घामाघूम होत माझ्या साड्यांचे गठ्ठे मारले आणि एवढ्यात त्यांच्या कार्यालयात फँक्स आला म्हणे. साड्या हे अतिशय कष्टानं जमवलेलं, जीवापाड जपलेलं स्त्रीधन असल्याने त्यावर कुणीच कायद्यानं जप्ती आणूच शकत नाही. तेव्हा परत मनातल्या मनात स्वतःच्या नशीबाला दोष देत त्या अधिका-यांनी माझा जसा होता तसा साड्यांच्या व्यवस्थित घड्यांनी माझा वाँर्डरोब परत नीट लावून दिला.

तेवढ्यात फटफटल्यासारखं वाटलं आणि खडबडून जाग आली. सरावाने उठल्याबरोबर हात मोबाईलकडे वळला आणि बघते तो काय– वन्संनी माझ्यासाठी घेऊन ठेवलेले चार पाच साड्यांचे फोटो व्हाट्सएपवर माझ्याकडे बघून हसत होते. आणि मी सुद्धा परत एकदा वाँर्डरोब उघडून माझी संपत्ती डोळे भरून बघितली आणि रात्री पडलेलं हे एक दुःस्वप्नं होतं हे जाणून कामाला लागले.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

सौ. कल्पना मंगेश कुंभार

? कवितेचा उत्सव ?

☆ आई कल्पतरू… ☆ सौ. कल्पना मंगेश कुंभार ☆

आई– नुसता शब्द जरी उच्चारला तरी रोम रोम शहारते..उत्साहाची एक वेगळीच लहर संपूर्ण शरीरात तयार होते..निर्मात्याने जेव्हा ही जीवसृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक जीवाची काळजी घेणं त्याला शक्य नव्हतं, म्हणूनच की काय…त्याने प्रत्येक प्राणीमात्रासाठी आई निर्माण केली..जी  नवीन जीवाला फक्त जन्म देत नाही तर स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्याचे रक्षण करते..पालन करते..त्याला सुसंस्कारित करते..

मागे एकदा माझी लेक डिस्कव्हरी चॅनल पहात होती..सिंह शिकार करत होता अन् जिराफ आपल्या पिल्लाचं रक्षण करण्यासाठी त्या सिंहाचा प्रतिकार करत होते..ते पाहून लेक  मला म्हणाली, ” जिराफाला समजत नसेल का? सिंहापुढे आपलं काय चालणार नाही..निदान स्वतः चा तर जीव वाचवायचा..” मी फक्त एव्हढंच म्हणाले,” बाळा, आता ती फक्त आई आहे..जिला आपल्या पिल्लाला वाचवायचं आहे..” 

आई..मग ती कोणाचीही असो..जेव्हा तिच्या बाळावर एखादं संकट येतं तेव्हा ती सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करते..फक्त आपल्या बाळासाठी..आई..ही शेवटच्या श्वासापर्यंत  आईच रहाते..पिल्लू मात्र आपल्या भूमिका बदलत जाते..माझी आईही अगदी अशीच आणि मीही भाग्यवान आहे आज मीही एक आई आहे..”आई म्हणायचीच, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा समजेल आई काय असते “. खरंच …आईपण मिळणं हे भाग्यच..

माझ्या प्रत्येक कणावर—आयुष्यातील प्रत्येक क्षणावर— जिच्या संस्काराचा पगडा .. ती माझी आई..माझी सगळ्यात जवळची मैत्रीण..जिच्यामुळे मी आज माणूस  म्हणून आपल्या मातीशी एकरूप झाले आहे..ती माझी आई…विजया.

नावाप्रमाणेच आयुष्यातील प्रत्येक संकटाशी झगडत..त्या त्या क्षणी न डगमगता प्रत्येक संकटावर ती मात करत गेली अन् माणूस म्हणून आम्हाला घडवत गेली. मला अन् दादाला वाढवताना रोज कळतनकळत कधी गोष्टीतून तर कधी स्वतः च्या कामातून..कधी घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण करून..कधी इतिहासातून…  तिने आमच्यावर जे संस्कार केले..त्यामुळेच आज मी व माझा दादा जीवनाचा आनंद घेत आयुष्य कसे जगायचे? ..माणसं कशी जोडायची?..पैशापेक्षा माणूस का महत्वाचा?..हे शिकलो..आज माझा दादा उत्तम डॉक्टर आहे..मी प्राथमिक शिक्षिका आहे केवळ आईवडिलांच्यामुळे..

आजही जेव्हा वयाच्या ६६व्या वर्षीही तिच्यातील उत्साह..चैतन्य पाहिलं की वाटतं..कुठून येते तिच्यात ही एनर्जी ?? आणि खळखळून हसणाऱ्या तिला पाहिलं की वाटतं..तिच्यातील आत्मविश्वास..सकारात्मकता .. जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन..यामुळेच ती वेगळी आहे… अगदी वेगळी .. आयुष्यात इतकी संकटे आली..कित्येक वेळा अगदी एकटी पडली, पण तिच्यातला आत्मविश्वास व सकारात्मकता यामुळेच ती प्रत्येक संकटावर मात करू शकली ..फक्त तिचा चेहरा पाहिला तरी आजही मन प्रफुल्लित होतं..सगळी नकारात्मक भावना दूर पळते अन् मन तिच्या हास्यात आजही गुंतून जातं..आजही आठवतं भाकरी थापताना तिचं अभंग किंवा श्लोक म्हणणं.. स्वयंपाक करताकरता नकळत त्या  रुचकर जेवणात अमृत पेरणं  ..नवीन काही शिकवून जाणं..

माझी आई माध्यमिक शिक्षिका..गणित विषयात तिचा हातखंडा..पण लग्नानंतर शिक्षण घेताना एम .ए .ला इतिहास विषय ठेवल्यामुळे साहजिकच इतिहास विषय शिकवावा लागला..पण तरीही जे असेल ते अतिशय अभ्यासपूर्ण व मनापासून करणं हे तिचं तत्व, जे तिनं निवृत्त होईपर्यंत निभावलं..आज अभिमान वाटतो तिचा जेव्हा तिचे विद्यार्थी अगदी चाळीस /पन्नास वय असलेले, रस्त्यात वाकून नमस्कार करतात..तिची चौकशी करतात..आयुष्यात आणि दुसरं काय हवं..

आज मलाही या लेखातून  तिला सांगायचं आहे ..आज मी जी काही आहे ती फक्त तिच्यामुळेच …तिने दिलेल्या प्रत्येक क्षणासाठी मी कृतज्ञ आहे……. 

आई म्हणजे चैतन्याने सजलेलं अंगण..

आई म्हणजे देवापुढे शांत तेवणारं निरांजन..

आई असतो घराचा श्वास..

तिच्यामुळेच सगळीकडे देवत्वाचा भास..

लेकरासाठी हळवी,मायाळू, प्रसंगी चंडिकाही बनते ती..

घराला सावरताना कित्येक वार झेलते ती..

चुका पोटात घालून पडता पडता सावरते..

बाळासाठी कितीदा तरी दुःखाचे कढ आवरते..

आई …… आत्मारुपी ईश्वर..

तो ज्याला लाभला….. त्याचे जीवन अमृतमय निरंतर…… 

© सौ. कल्पना मंगेश कुंभार

शाळा : हुतात्मा बाबू गेनू विद्यामंदिर क्र 28, इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ अनमोल भाग्य…लेखक – श्री मिलिंद जोशी ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

माझ्या वडिलांचे वय आता ८० च्या जवळपास आहे. त्यांना पार्किन्सनचा आजार आहे. त्यामुळे त्यांचे बोलणेही तोंडातल्या तोंडात येते. चालताना ही वॉकर लागतो. अनेकदा वळताना त्यांचा तोल जातो. कधी कधी ते वॉकर विसरून जातात आणि हळूहळू भिंतीच्या आधाराने चालतात. तोल गेला की पडतात. थोडेफार लागते. मग पुढील दोन तीन तास त्यांना धीर द्यावा लागतो. या गोष्टी खूप सामान्य आहेत हे त्यांच्या मनावर ठसवावे लागते. मनातील भीती कमी झाली की परत पूर्ववत होतात. पण यामुळे आम्हाला कायम त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. बरे आपल्याला कायम घरात राहणे शक्य नसते. त्यामुळे कधी कधी नाईलाजास्तव त्यांना घरात ठेवून बाहेरून कुलूप लावून दीड दोन तासांसाठी बाहेर जावे लागते. त्यावेळी त्यांना सगळे जवळ द्यायचे आणि आपण आपल्या कामाला जाऊन यायचे. 

काका ( मी वडिलांना ‘काका’ म्हणतो ) दुपारी टीव्ही लावतात आणि बसल्या बसल्या झोपून घेतात. त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. मग त्यावेळी आपण काम करताना एकीकडे जुने गाणे लावले की ते खुश. कधी कधी त्यांचे जुने किस्से सांगत बसतात. अनेकदा तर त्यांचे बोलणे आपल्याला समजत नाही. मग आपण फक्त होकार द्यायचा. आपल्या चेहऱ्यावरून त्यांना लगेच समजते, आपल्याला त्यांचे बोलणे काहीच कळलेले नाही. मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते.

त्यांचा एक गुण मात्र घेण्यासारखा आहे. अजूनही ते त्यांना ज्या ज्या गोष्टी शक्य होतील ते सगळे काम करतात. रात्रीचे जेवण झाल्यावर ओट्यावर जितके कप असतील ते विसळून ठेवतात. काही निवडायचे असेल तर निवडत बसतात. ओटा आवरून घेतात. आम्ही त्यांना कितीही सांगितले तरी त्यांना त्याशिवाय होत नाही. आम्हीही मग ‘जे करायचे ते करा’ म्हणून मोकळे होतो. कारण ज्यावेळी ते काही काम करतात त्यावेळी खुश असतात. काहींना पटणार नाही पण अनेकदा घरातील वयस्कर व्यक्तींना आपण काम करू दिले नाही तर ते जास्त चिडचिड करतात असा माझा अनुभव आहे. कारण अनेकदा त्यांना असे वाटते की, त्यांचे घरातले महत्व कमी झाल्यामुळेच आपण त्यांना काम करू देत नाही. 

मध्यंतरी काकांना acidity चा त्रास होत होता. डॉक्टरांनी त्यासाठी गोळ्या दिल्या. इतक्या गोळ्या कशा घ्यायच्या म्हणून त्यांनी दोन दिवस पार्किन्सनच्या गोळ्या घेतल्या नाहीत. परिणाम असा झाला की त्यांना वेगवेगळे भास होऊ लागले. त्यांना कुणी बसलेले दिसायचे. किंवा खालून कुणी खिडकीवर दगड मारताहेत असे वाटायचे. ते दोन दिवस आम्ही जाम घाबरलो होतो. एक दिवस वैतागून मी त्यांना काहीतरी चिडून बोललो. मग काय… फुल झापून काढला त्यांनी मला. संध्याकाळी तायडीचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी लगेच तिलाही सांगितले, ‘मिलिंद आज माझ्यावर चिडला होता.’ मग काय विचारता, तायडीनेही हसत हसत मला कानपिचक्या दिल्या आणि काका खुश. 

एक मात्र अगदी खरे आहे, त्यांच्यासाठी जरी आम्हाला कुणाला तरी कायम घरात राहावे लागते, तरीही ते कधीच आम्हाला ‘जबाबदारी’ वाटत नाहीत. उलट आम्हाला त्यांचा “आधार”च वाटतो. याचे सगळे श्रेय फक्त आणि फक्त काकांनाच आहे. कारण त्यांनी त्यांचे आजारपण आणि त्यानंतरचे त्रास स्वीकारले आहेत. एकदा का माणसाने समोर येणाऱ्या घटनांचा स्वीकार केला की त्याला फारसा मानसिक त्रास होत नाही. ना त्यांची आमच्या बद्दल काही तक्रार आहे, ना जीवनाबद्दल. अनेकदा आम्ही एकमेकांची चेष्टा मस्करी करतो त्यावेळी शेजारच्यांना वाटते, माझे वडील भाग्यवान आहेत. पण मला वाटते, आम्ही मुलं जास्त भाग्यवान आहोत की आम्हाला असे आईवडील मिळाले, जे प्रत्येक गोष्ट समजून घेतात. जो पर्यंत आई होती, तिने कायम आम्हाला वागणुकीचे धडे दिले. आणि वडील अजूनही त्यांच्या वागण्यातून ‘सकारात्मक जीवन कसे जगावे’ याचे धडे देत आहेत. मला वाटते, भलेही आपल्याकडे पुरेशा सुविधा नसल्या तरी आपल्याला समजून घेणारे पालक आपल्या सोबत असतील तर त्यासारखे दुसरे भाग्य नाही.  

लेखिका : श्री मिलिंद जोशी, नाशिक

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप्पा आणि तो… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

बाप्पा आणि तो… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

बाप्पा आलास काय आणि गेलास ही. अगदी आमच्या मुलासारखाच.  तो पण पूर्वी असाच यायचा. शिकायला म्हणून अमेरिकेला गेला आणि तो कायमचा तिकडचा झाला. सुरुवातीला, आला की जरा स्थिरस्थावर होतो ना होतो, तोच  आठ दहा दिवसांत परत जायचा. अगदी तुझ्यासारखाच. आता तू तरी दरवर्षी नित्यनियमाने ठरलेल्या वेळेस न विसरता येतोस. पण त्याचे  तसे नाही. गेले कित्येक वर्षे तो येतो सांगून आला नाही. दरवर्षी तुझ्यासारखीच त्याचीही वाट बघतो पण काही खरं नसतं. येण्याच्या एक दिवस आधी त्याचा फोन येतो. कामानिमित्त त्याला घरी यायला जमणार नाही असे तो सांगतो तेव्हा हिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात आणि नेमक्या त्या माझ्या भुरकटलेल्या डोळ्यांना दिसतात. पण तुझे मात्र तसे नसते. तू येतोस वेळेवर आणि जातोस ही वेळेवर. चटका लावून जातोस पण ठीक आहे. मनाला पुढच्या एक वर्षासाठी उभारी देऊन जातोस. मला आणि हिला जगण्याची एक नवीन उमेद देतोस आणि आशेची नवीन पालवी मनात उभी करतोस. आज ना उद्या तो घरी येईलच ह्याची मनात आशा निर्माण करतोस.

— बाप्पा खरं सांगू, आता आमचीच खात्री नाही रे. अरे आमचेच विसर्जन होते की काय असे वाटू लागले आहे. आता तूच सांग, आमच्या दोघांतील एकाचे विसर्जन झाल्यावर तू किंवा तो आलास तरी आत्तासारखे तुमचे लाड होणार आहेत का ? अरे पुढच्या वेळेला तुम्ही आलात आणि आमच्या दोघांतील एकाचे कायमचे विसर्जन झाले असेल तर तुम्ही आलात काय आणि परत गेलात काय, आम्हाला त्याचे अप्रूप राहील का ? म्हणूनच बाप्पा एक काम कर. तूच त्याचे कान उपट आणि त्याला बुद्धी देऊन आम्हाला भेटायला पाठव. अरे त्याला जरा समज दे आणि सांग, तो लहान असतांना त्याच्या हट्टापायीच आम्ही तुला घरी विराजमान केला होता ना. त्याच्यासाठी म्हणून तुझे सगळे लाड आम्ही पुरवत होतो ना. अरे आता आम्हाला वयानुसार तुझे साग्रसंगीत लाड करायला जमत नाही. पण तो  येईल आणि आल्यावर त्याला सगळे पहिल्यासारखे दिसायला पाहिजे म्हणून आम्ही ते सगळे करतोय. पण आता थकलोय रे आम्ही.

बाप्पा, एक मात्र चांगले आहे. जशी तू पुढच्या वर्षी येण्याची आशा लाऊन जातोस, तसा तो लांब असला तरी कधीतरी येईल ह्याची आशा लागून रहाते. ह्याबाबतीत तरी आमचे नशीब थोर की तो आहे म्हणून, तो कधीतरी परत येईल ह्याची खात्री वाटते.  बाप्पा तो, तुझ्या काय किंवा आमच्या दोघांच्या विसर्जनाला जरी आला नाही तरी त्याला मात्र तू उदंड आयुष्य दे आणि त्याला त्याच्या उतारवयात पोरका मात्र करू नकोस.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी नक्की या.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिक्षक दिन मुबारक… सुश्री संध्या शिंदे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ शिक्षक दिन मुबारक… सुश्री संध्या शिंदे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

वर्गातल्या सगळ्यांना भागाकार करता आला त्या दिवशी कित्येक कोटींची लॉटरी लागल्यागत सुखाची झोप लागणारा प्राणी आहे मी !

“मज्या आईनं विष पेलं रात्री. पण तुम्ही आज मॉनिटर निवडणार,म्हणून आलो शाळेत.मला मॉनिटर व्हयचंय मॅडम!” म्हणत काळीज चिरणारा, केस कापण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हातानेच वेडीवाकडी कटिंग करणारा—- यश …

मी वर्गात चिडचिड केल्यावर जवळ येऊन हळूच “मिष्टर ला भांडून आलात का मॅडम?” म्हणणारी — तेजू…

शाळेच्या मागच्या गेटच्या पायर्‍यांवर बसलेल्या लहान बहिणीच्या जबाबदारी पोटी “बाथरूमला जायचंय” असं मला वारंवार खोटं बोलून वर्गाबाहेर, तिच्याकडे जाण्यासाठी माझा ओरडा खाणारा — माऊली….

केवळ माझ्या गाडीवर फेरफटका मारण्याची लहर आली म्हणून “मला घरी नेऊन सोडा.” असा हट्ट करणारी,आईचा नंबर माहीत असूनही तो न देता मला गावभर उन्हातान्हात फिरवणारी बालवाडीतली  

टुचभर  — सिद्धी….

पडलेला दात कंपासमध्ये जपून ठेवणारी, डोळ्यातलं बुबुळ कुत्र्याने दातांनी ओरबाडल्यावरही आईजवळ  हट्ट करून, तिच्यासोबत शाळेत येऊन चाचपडत मला मिठी मारणारी—- वीरा…..

निसर्गाने आधीच दिलेले टप्पोरे डोळे अजूनच मोठे करून, दोन्ही कमरेवर हात ठेवून ” मी बुटकी आहे, म्हणून तुम्ही मला असं करतात ना?” असा चिमण्या आवाजात बिनाबुडाचे आरोप करणारी, मला पामराला सतत कचाकचा भांडणारी – थाक्ची….

“मला घरी आई नाही, पण शाळेत माझ्या मॅडम माझी आई आहेत.” असं शेवटच्या पानावरच्या निबंधात लिहिणारी  — आकांक्षा….

बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवसांची सुट्टी मिळवण्यासाठी मला साडीचं आमिष दाखवणारा — अर्णव…

मनाविरुद्ध, परिस्थितीसमोर हतबल होऊन आईसोबत ऊसतोडीला गेलेलं व सर्पदंशामुळे मातीआड झालेलं हसरं दुःख.. — सौरभ….

आपल्या बाळाला कडेवर घेऊन धावत धावत येऊन माझ्या वर्गात  शिरलेली , ” माझं नाव या हजेरीत लिहा! “असं पोटतिडकीने म्हणणारी उध्वस्त— संगीता….

माझ्या साडीच्या निऱ्या धरून वर्गाबाहेर फरफटत आणून ” मेरकु चाय पीने का जी…. घरकु जान दो…नै तो तुम पिलाव चाय…तुमको दुवा लगेगी जी! ”  असं जोरजोरात ओरडणारी  डेंजर — अलिजा….

खोडरबरमुळे वहीवर होणारा कचरा साफ करण्यासाठी अब्बूचा दाढीचा ब्रश शाळेत घेऊन येणारी— जोया…

पर्समध्ये झुरळ बघितल्यावर मी किंचाळत टेबलवर चढल्यावर माझी उडालेली तारांबळ, फजिती माझ्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपणारा मॉनिटर—- नयन….

एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याक्षणी डेस्क लागून रक्तबंबाळ झालेला, मला अस्वस्थ अस्वस्थ करून सोडणारा  — विश्वजीत….

काय काय अन् किती सांगू..?  मर्यादा आहेत…

एकोणविसावं वर्ष सुरू आहे…

एकोणवीस बॅचेस…

असंख्य चालत्या फिरत्या जिवंत कादंबऱ्या वाचल्यात मी यादरम्यान……… 

या 19 वर्षांत एकही दिवस, एकही क्षण ह्या लेकरांनी माझ्यातल्या शिक्षकाला मरू दिलं नाही… मरु काय, झोपू दिलं नाही……. झोपूच काय……..  पण साधं पेंगू सुद्धा दिलं नाही…

कुठलंही सिस्टम, वर्क प्लेस  म्हटलं की राजकारण, हेवेदावे, चढउतार हे आलेच.

पण का कुणास ठाऊक? वर्गाच्या चौकटीआत शिरताना ते सगळं सगळं टेन्शन दाराबाहेर ……… 

लेखिका – संध्या शिंदे

(अंबाजोगाई जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका)

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares