मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग तिसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : रोजची प्यायची वेळ झाली, तशी दगड्याची तब्येत बिघडत चालली.  दादल्याने त्याला सांभाळलं, सावरलं…..)

आतापर्यंतच्या आयुष्यात दगड्या कोणाच्या खिसगणतीतही नव्हता. आताही काही कमवत नसल्यामुळे उठताबसता त्याचा उद्धार व्हायचा.

त्यामुळे आज अचानक सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं आणि घरचे, बाहेरचे सगळे आपल्याला भाव द्यायला लागले, म्हटल्यावर दगड्याला नशाच चढली आणि ती दारूपेक्षाही कितीतरी मोठी, पॉवरबाज होती.

हळूहळू शेजारच्या गावांतही हे मारुतीचं कळलं.मग आपापल्या समस्या घेऊन तिकडचेही लोक यायला लागले.

रात्री लोक घरी गेल्यावर म्हातारीने दगड्याला जेवायला वाढलं.

उभं राहून राहून दगड्याचे पाय दुखत होते. पण त्याची रोजची वेळ झाली होती.

“मी जरा भायेर जावून येतो,”तो म्हणाला.

पण म्हातारीने अडवलं त्याला,”आरं, येडा का खुळा तू ? द्येव आंगात यिवून बसलाय आणि हा चाल्ला पियायला. मारुतीचा क्वोप झाला तं गदा हाणील त्यो डोस्क्यात.”

“व्हय भावजी. हुबं ऱ्हाऊन ऱ्हाऊन दमलायसा.गरम गरम ज्येवण ज्येवून झोपा आता निवांत. उद्या सकाळपासून लोकं येयाला लागतील. मग परत हुबं ऱ्हावं लागणार.”

चिमीला एवढं गोड बोलताना पाहून दगड्यालाच नव्हे, तर म्हातारीलाही नवल वाटलं.

जेवताजेवता म्हातारीलाआठवण झाली, “आरं दादल्या, भावड्याला कळवाया होवं. मारुतीरायाच्या पाया पडून जा, म्हणावं.”

हात- तोंड धुतल्यावर दादल्याने मुंबईला भावड्याला फोन लावला, “आरे, आपल्या घरात चमत्कार झालाय. दगड्याच्या आंगात मारुतीराया आलाय. त्याचा चेहरा बघितलास, तर दगड्या म्हणून वळखूच येईत न्हाय. द्येवच दिसतोय. तवा तू ताबडतोब निघून ये.”मग त्याने भक्तांची गर्दी वगैरे सगळं सांगितलं.

“पण मला लगेच निघायला नाय जमणार. उद्या सकाळी डॉक्टरसायबांना सांगतो, दुसऱ्या कंपाउंडरची सोय करतो आणि मग निघतो.”

रात्री पांघरायला दगड्याला घरातली स्पेशल वाकळ मिळाली.

भावड्याने फोन ठेवला, तेव्हा तो विचारात पडला,’मारुतीला यायचं होतं, तर तो दादल्याच्या अंगात आला असता. या बेवड्याच्या अंगात कशाला येईल तो?’

त्याला मध्यंतरी दवाखान्यात आलेल्या पेशंटबाईची आठवण झाली. तिच्या ओठाभोवतालचा भाग सुजला होता. ती सेम मारुतीसारखी दिसत होती. मग डॉक्टरांनी औषध देऊन तिला बरं केलं. तोंडाची सूज उतरली  आणि ती नॉर्मल झाली. आता उद्या डॉक्टरांनाच विचारूया, असं ठरवून भावड्या झोपला.

सकाळी डॉक्टर म्हणाले, “बरोबर आहे, तू म्हणतोस ते. मारुतीला अंगात यायचंच असतं, तर तो मोठ्या भावाच्या अंगात आला असता ना. या दारुड्याची निवड का केली असती त्याने?त्या बाईंसारखी यालाही ऍलर्जी झाली असणार. हे बघ. मी गोळ्या देतो त्याला. पण बरं होईपर्यंत त्याला अजिबात दारू पिऊ देऊ नकोस.दुसरं म्हणजे तुझ्या घरची माणसंपण ‘मारुती, मारुती ‘ करताहेत. त्यांना हे ऍलर्जी -बिलर्जी, गोळ्या-बिळ्या काही सांगू नकोस. तूच त्याला गुपचूप, कोणाच्या नकळत औषधं देत जा.”

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : दगड्याच्या अंगात मारुती आला, म्हणून म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्या घाबरला, म्हातारी म्येलीबिली का काय?…..)

पण तेवढ्यात म्हातारी उठून बसली आणि पुन्हा डोळे विस्फारून  दगड्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांत नेहमीसारखा राग, तिरस्कार नव्हता. तिचे डोळे भक्तीने तुडुंब भरलेले होते. आणि हात जोडलेले होते.

‘आर तिच्या! आयेबी ढोसाया लागली का काय?’ दगड्याच्या मनात आलं,’येका परीन बरंच हुईल की ते. आपल्या मागची ‘पिऊ नगस’ची कटकट तरी टळंल. पयशे मागत बसाया नको.तीच भरंल.’

म्हातारीच्या चेहऱ्यावरून भक्तीभाव तसाच वाहत होता. आणि ती हात जोडून उभी होती.

“आये, काय गं?”

“मारुतीरायाss, माज्या घरात आलास तू. क्येवढी किरपा झाली रं तुझी. तुझ्यापुढे साखर ठिवते थोडी.”

तिने मारुतीरायाला साखरेचा निवेद दाखवला.

शेजारी कळण्याचा अवकाश, बघताबघता हीs गर्दी गोळा झाली. कोणीतरी समई आणली, कोणी तेल आणलं, कोणी फुलं आणली. म्हातारीच्या घराचं देऊळ झालं.

मग प्रत्येकजण मारुतीपुढे लोटांगण घालून रुपया -दोन रुपये ठेवू लागला.. कोणी नैवेद्याला दूध आणलं. कोणी साखर आणली. कोणी केळी आणली. चिमी खुश झाली. पटापटा सगळं भांड्यात ओतून वाट्या परत करू लागली.

दगड्याला दूध आणि साखरेत रस नव्हता. तो पैसे मोजत होता. दोन -पाच -दहा…… पन्नासपर्यंत मोजले. पुढे जमेना झालं. ‘आयला, त्ये मास्तूर शिकवत होतं साळंत, तेव्हा लक्ष द्याया हवं होतं.’

दादल्याने सगळे पैसे उचलून बाजूला ठेवले.

काल संध्याकाळपासून म्हादेवाची म्हैस सापडत नव्हती. त्याने मारुतीला दंडवत घालून साकडं घातलं, “द्येवा, म्हस गावू दे. दोन नारळ फोडीन तुझ्या पायाशी.”

काय बोलावं, ते दगड्याला सुचेना. तो टकामका बघत राहिला.

गर्दीतलं कोणीतरी बोललं, “म्हादेवा, तुजा सौदा मान्ने नाय द्येवाला. दोन नारळावर पैसं बी दे.”

“बरं, बरं. दोन नारळ फोडीन, वर धा रूपे दीन.”

तेवढ्यात दगड्याला सुचलं. मग मोठ्यांदा श्वास घेत, धापा टाकत तो बोलायला लागला, “म्हस बांधतुयास, त्यो खुंट गोठ्यातून भायेर काढ. अंगणात हुबा कर. ज्या दिशेला पडंल, त्या दिशंला म्हस गेलीया.”

म्हादेवाचं समाधान झालं. तो गेला.

तेवढ्यात नाम्या आला पुढे. “मारुतीराया, माझा पोर शिकलाय थोडाफार. तुला ठाऊकच असेल. पर त्येला नोकरी लागत न्हाय.आज ग्येलाय एका ठिकाणी…..”

“लागंल,लागंल,”दगड्याने उगीचच उत्तर दिलं.

नाम्याने खुश होऊन पाच रुपये ठेवले.

दगड्याला एकदम मस्त आयडिया सुचली, ‘गावातली समदी लोकं येतायत. गुत्तंवाला म्हमद्या बी यील. त्येला सांगायचं -माज्या भक्ताला, या दगड्याला जलमभर फुकटमंदी पियायला द्ये. तुज्या धंद्यात बरकत हुईल.’

जसजसा दिवस उतरत चालला, तसं दगड्याला गरगरायला लागलं. उभा राहिला होता, तो होडीत असल्यासारखा डुलायला लागला. दादल्याच्या लक्षात आल्याबरोबर त्याने लगेचच दगड्याला धरून खाली बसवलं. “द्येवा, सकाळपासून हुबंच हायेसा, जरा खाली बसा.” मग त्याने चिमीला लिंबूसरबत बनवायला सांगितलं आणि स्वतःच्या हाताने दगड्याला पाजलं.

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मारुती – भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ मारुती – भाग पहिला ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

दगड्या नेहमीसारखाच हलतडुलत, लटपटत, झोके खात घरी परतला. कुठे वाटेत न पडता घर आलं, म्हटल्यावर त्याला जग जिंकल्याचा आनंद झाला.

तसा उशीर खूपच झाला असावा. सगळी गपगार झोपली होती. दगड्या आला काय, नाय आला काय, वाटेतच कुठे झिंगून पडला काय, कोणालाच सोयरसुतक नव्हतं.

अचानक दगड्याला पोटात पडलेल्या प्रचंड खड्ड्याची जाणीव झाली. भुकेचा तो खड्डा एवढा प्रचंड होता, की चुलीपर्यंतचं चार पावलांचं अंतरही त्याला चार कोसांचं वाटलं.

जेमतेम दोन मुदी भात आणि गाडग्याच्या तळाला गेलेलं कालवण….. दगड्याचं पोट अर्धंमुर्धंही भरलं नाही. म्हातारीला उठवून जेवण बनवायला लावावं आणि पोटभर जेवावं,मग तिने शिव्या घातल्या तरी चालतील, असं त्याच्या मनात आलं. पण त्याच्यात तेवढंही त्राण नव्हतं. मग रागाने शिव्या घालत तो उठला. जेमतेम हात बुचकळून म्हातारीला ढकलून तो तिच्या बाजूला पटकुरावर आदळला. म्हातारी झोपेतच जराशी  कण्हली . दादल्या, त्याची बायको चिमी चिप्प झोपली होती.

 

“ए मुडद्या, ऊठ की रं. सूर्य डोईवर आला. कामाबिमाला जायचं सोडून आयतं गिळायला जल्म घेतलाय. म्हातारीने या वयात जमत नसताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मरायचं आणि या म्हाराजानं निसतं ढोस ढोस ढोसायचं. चार मानसं काय खातील, इतकं हा एकटाच गिळतोय. दादल्या आणि चिमी तर तुला भायेर काढाया टपल्येयत. मी आणि भावड्या कसंबसं थोपवतोय त्यास्नी. आता दारू जरा कमी कर, मसन्या आणि कामाचं बघ.”

मजुरीवरून परत आलेल्या म्हातारीची तणतण ऐकून दगड्याची झोपमोड झाली. तो जाम वैतागला.

“चा हाय का तय्यार? चाचा प्येला भरला की मगच मला उठीव.”

 

फुर्रर्र फुर्रर्र चहा पिणाऱ्या दगड्याकडे लक्ष गेलं मात्र, म्हातारी एकदम दचकली.

“प्येला खाली ठ्येव. प्येला खाली ठ्येव की रं मुड…..”

पण दगड्याने पेला पुरा रिकामा झाल्यावरच खाली ठेवला. म्हातारी डोळे फाडून त्याच्याकडे बघतच राहिली.

“काय गं म्हातारे, भूत दिसल्यावाणी काय बघतीस?”

म्हातारीच्या तोंडून शब्दच फुटेना झाला. ती आपली टकाटका बघतच राहिली दगड्याकडे.

 

झालंच तर होतं तसं.त्याचे ओठ तोंडल्याच्या दुपटीने टरटरले होते. नाक फुललं होतं. गालाचा तर जाम फुगाच झाला होता.

“मारुती. व्हय. मारुतीच झालाय रं  माझा दगड्या.”

किती वर्षांनी म्हातारीने आपल्याला ‘माझा’ म्हटलं, म्हणून दगड्या फुशारून गेला.

म्हातारीचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. खरंच. दगड्या थेट मारुतीसारखाच दिसत होता. म्हणजे मारुती आला का काय दगड्याच्या अंगात?

म्हातारीने दगड्यापुढे लोटांगण घातलं. दगड्याने डोळे विस्फारून म्हातारीकडे पाहिलं. आये, आणि नमस्कार घालतेय आपल्याला!रात्री ढोसलेल्या दारूची नशा आता जास्तच चढली का काय!पण म्हातारी खरंच झोपली होती, त्याचे पाय धरून.मग मात्र तो घाबरला, म्येलीबिली का काय ही?

क्रमश: ….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्केच – भाग पहिला ☆ श्री शरद दिवेकर

श्री शरद दिवेकर

?  विविधा ?

☆ स्केच – भाग पहिला ☆ श्री शरद दिवेकर ☆

रोजच्यासारखीच धावपळ करत कसंबसं रेल्वे स्टेशन गाठलं आणि ट्रेनचा हाॅर्न वाजला. जिवाचा आकांत करून समोरच निघण्याच्या तयारीत असलेल्या ट्रेनचा आमचा नेहमीचा डबा गाठला आणि डब्यात शिरलो. तेवढ्यातच ट्रेन सुटली. हाशहुश करत आमचा सहा मित्रांचा कंपू असतो तेथे पोहोचलो. ऑफिसची सॅक रॅकवर टाकली आणि पंख्याखाली उभा राहिलो. असंच रोज घडायचं. सकाळी 08.43 च्या कल्याण – सीएसटी डबल फास्टमध्ये मी कल्याणपासूनच बसून प्रवास केला असं क्वचितच घडायचं. पण एक मात्र बरं होतं की सुरेश, रमेश आणि प्रकाश ट्रेन प्लॅटफॉर्मवर  येण्यापुर्वीच हजर असायचे. त्यामुळे आमच्या तीन सीट्स तरी शुअर असायच्या आणि गाडी घाटकोपरला पोहोचली की उरलेले आम्ही तिघे त्यांच्या सीट्सवर अगदी हक्काने बसायचो सीएसटी येईपर्यंत. पण आज मात्र मी ठरवलं की ही स्वतःच्या जीवाची लावचड आपण थांबवायला हवी. उद्यापासून थोडं लवकर  उठून लवकर घर सोडायचंच, म्हणजे अशी धावपळ करावी लागणार नाही.

दुस-या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि भरभर आवरून स्टेशन गाठलं. ट्रेन्स थोड्या लेट असल्याने आमची ट्रेन आली नव्हती. त्यामुळे धावती ट्रेन पकडून सीट पकडायचा प्रयत्न करता येणार होता. तसा प्रयत्न केला देखील मी आणि विंडो सीट नाही आणि दुसरी सीट देखील नाही पण तिसरी सीट मिळवली मी. नंतर उरलेले तिघंही आले आणि गप्पा, चेष्टा, मस्करी करत करत आमचा प्रवास सुरू झाला.

आज एक वेगळी गोष्ट घडली. नेहमी ट्रेन कल्याण स्टेशनमध्ये शिरताना आमच्या समोरच्या सीट्स रिकाम्या असायच्या. पण आज उलट्या बाजूच्या विंडो सीटवर डाऊन करून आलेला माणूस बसला होता. बसला नव्हता. चक्क झोपला होता बसल्या बसल्या. घाटकोपर स्टेशन आलं आणि आम्ही तिघंही उभे राहिलो आणि आमच्या सीट्स आमच्या मित्रांना दिल्या. थोड्या वेळाने माझी नजर त्या उलट्या बाजूच्या विंडो सीटवर बसून आलेल्या माणसाकडे गेली. आता तो झोपला नव्हता. जागा होता. त्याच्या हातात होती एक वही आणि पेन्सिल. बाहेरच्या हवेच्या झोताने त्याच्या वहीचं पान फडफडलं आणि माझ्या नजरेला पडलं आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या सुरेशच्या स्केचकडे. त्या माणसाने ते स्केच जवळपास पुर्ण केलं होतं. त्याच वेळी त्या माणसाने ती वही बंद केली आणि ती वही आणि पेन्सिल त्याने त्याच्या पिशवीत भरली आणि तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या. सीएसटी आल्यावर आम्ही सगळे ट्रेनमधून उतरून आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

संध्याकाळी ऑफिस सुटण्यापुर्वीच प्रकाशचा फोन आला आणि समजले की सुरेश गेला. मी एकदम उडालोच. जेमतेम पस्तीशीचा हा सुरेश आणि त्याला एवढ्या कमी वयात हार्ट अ‍ॅटॅक आला आणि तो गेला ! सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी आवरून घरी पोहोचायला मध्यरात्र होऊन गेली होती. दुसर्‍या दिवशी उशीराच उठलो आणि मूडच नव्हता ऑफिसला जाण्याचा. त्यामुळे ऑफिसला दांडी मारली.

असेच दिवस चालले होते. आता माझी एक सीट तरी शुअर असायचीच. विंडो सीट नाहीच मिळायची मला ! पण तरीही पुर्वीपेक्षा सुखावह प्रवास व्हायचा रोज. सुरेश जाऊन साधारण महिना झाला असावा आज. आजही आमची ट्रेन सुटली आणि सहजच लक्ष गेलं समोरच्या विंडो सीटला बसलेल्या त्या माणसाकडे, तोच माणूस, स्केच काढणारा. तो माझ्या चांगलाच लक्षात राहीला होता. नेहमीप्रमाणे घाटकोपर आल्यावर उभा राहिलो आणि कुतुहलाने त्या माणसाकडे पाहिलं. तर त्याच्या हातात होती आजही तीच वही आणि पेन्सिल सुध्दा. त्यामुळे मुद्दामच त्या वहीत डोकावून पाहिलं. तर काय ! त्या माणसाने आत्ताच विंडो सीटवरून उठलेल्या रमेशचे स्केच काढले होते. खुपच सुंदर स्केच काढले होते त्याने. वेळ चांगला जात असेल त्या माणसाचा. तेवढ्यात त्या माणसाने आपली वही बंद केली आणि वही आणि पेन्सिल पिशवीत ठेवून तो उठला आणि दाराकडे जाऊ लागला. सीएसटी आल्यावर आम्ही गाडीतून उतरलो आणि आपापल्या ऑफिसेसकडे रवाना झालो.

त्या दिवशी दुपारीच माझा मोबाईल वाजला. प्रकाशचाच फोन होता. फोन ठेवला आणि माझ्या हातापायातील शक्तीच निघून गेली. रमेशला हार्ट अ‍ॅटॅक आला होता आणि तो गेल्याचे सांगण्यासाठीच प्रकाशने फोन केला होता. पुन्हा एकदा तीच धावपळ, तेच सगळे सोपस्कार आणि अंत्यविधी. एका महिन्यात आम्ही दोन मित्र गमावले होते.

दुसर्‍या दिवशी सुट्टी होती. सहज कॅलेंडर पाहिलं तर काल अमावास्या होती. प्रकर्षाने आठवण झाली सुरेश आणि रमेश यांची. सहजच कॅलेंडरचं मागच्या महिन्याचं पान पाहिलं आणि लक्षात आलं की सुरेश गेला त्या दिवशी देखील अमावास्याच होती. काय योगायोग होते हे !

असेच काही दिवस गेले. आता आमची चौकडीच उरली होती. आज पिठोरी अमावास्या. वाढदिवस असतो माझा तिथीने. माझी पत्नी आठवणीने लक्षात ठेवते हा दिवस. त्यामुळे माझ्या देखील लक्षात असतो. पण मूडच नव्हता आज. सकाळी प्लॅटफॉर्मवर आलो. ट्रेन अजून यायची होती आणि त्रिकुटही आलं नव्हतं अजून. त्यामुळे मला आज चक्क विंडो सीट मिळाली आणि एकदम खुश झालो. तेवढ्यात त्रिकुट अवतरलं आणि त्यापैकी दोघांनी उरलेल्या दोन सीट्स पटकावल्या. लगेचच ट्रेन सुरू झाली आणि वा-याचा झोत अंगावर आला आणि आणखीनच खुश झालो मी. पण समोरच्या सीटवर पाहिलं आणि मला दरदरून घाम फुटला. समोर तोच माणूस बसला होता आणि त्याच्या हातात होती तीच वही आणि पेन्सिल.

क्रमशः ….

©  श्री शरद दिवेकर

कल्याण

मो 70457 30570, ईमेल – [email protected]

 

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 6 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहेले – आम्ही या वाड्याचे आश्रित होतो. तू मालक झालास. सुहासने मग घराचे नाव ठेवले, आनंदघर. आता इथून पुढे )

एक दिवस आपला पहिला पगार आईच्या हातात ठेवताना सुहास म्हणाला,  `आई, आता तुझं लघुउद्योग केंद्र बंद.’

`म्हणजे?’

`ते पापड,  कुरडया,  पुरणाच्या पोळ्या… आणि झबली,  दुपटी,  सलवार,  कुडते…’

`अरे पण…’

`पण नाही नि बीण नाही. बंद म्हणजे बंद.’

`पण माझा वेळ कसा जायचा?’

`वेळ गेला नाही,  तर आपल्या ओळखीच्यात –नात्यात हवं असेल ते, त्यांना फुकट करून दे, पण आता पैशासाठी ही कामे तू करायचीनाहीस. मी कॉलेजमध्ये असताना तू मला आणि स्मिताला पॉकेट मनी द्यायचीस. आता दर महिन्यालामी तुला आणि आप्पांना पॉकेटमनी देत जाईन. आणि इतके दिवस तुम्ही दोघांनी तुमच्यासाठी काहीच केलं नाहीत. केलं ते आमच्यासाठी. आता तुम्ही दोघे तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. फिरायला जा. नाटक-सिनेमला जा. प्रवचन-कीर्तनाला जा. जवळ-लांब फिरून या. असं करतो,  पुढच्या महिन्यात तुमचं चार धाम यात्रेचं बुकींग करतो.’

मग पुढची दोन वर्षे दोघेही भरपूर फिरले. किती तरी वर्षं घर एके घर आणि काम एके काम यातच सरली होती. नंतरच्या दोन-तीन वर्षात ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर ते भारतभर फिरून आले. मालतीला वाटलं, आपण आयुष्यात जे कष्ट सोसले होते,  त्यामुळे जो शिणवठा आला होता,  तो सगळा दूर झाला.

एक दिवस सुहास किरणला  घेऊन घरी आला. `आई ही तुझी सून’ तो म्हणाला. किरण त्याच्याच कंपनीत व्यवस्थापन विभागात होती. किरण सावळीच, पण चेहर्‍यावर अतिशय गोडवा. मालतीला बघताक्षणीच ती आवडली. नंतर मालतीला तिची बाकीची माहिती कळली. ती एका धनवंत गुजराथी व्यापार्‍याची मुलगी होती. श्रीमंतीत आणि लाडा-कोडात वाढलेली होती. बुद्धिमान होती. मालती सुहासला म्हणाली, `आपल्या घरच्या परिस्थितीची कल्पना दिलीस का तिला? तिच्या घरचं वातावरण वेगळं. आपल्या घरचं वेगळं. दोन्ही संस्कृतीतही फरक. नाकापेक्षा मोती जड नको व्हायला. ‘

`तसं काही होत नाही आई! आपलंही नाक मोठं झालय आता. मोती फिट्ट बसेल त्यावर. आणि तू काळजी नको करू. मी आपल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना दिलीय तिला. तुझ्या कष्टाचीसुद्धा. तिला घरच्या खानदानी श्रीमंतीपेक्षा, तू कष्टाने आम्हाला वाढवलंस, मोठं केलंस,  याचं महत्व जास्तवाटतंय.

किरणच्या आईने थोडी नाराजी व्यक्त केली. एक तर दुसर्‍या  समाजात मुलगी द्यायची आणि दुसरं म्हणजे संबंधी आपल्या तोला-मोलाचे नाहीत. पण केशुभाई म्हणाले, `पैसा नंतरही मिळू शकेल. बुद्धिमत्ता नाही मिळू शकणार. आपलं लग्नं झालं, तेव्हा माझी परस्थिती कशी होती? गोपाळदासांच्या दुकानात कापड दाखवायचं काम करत होतो. आता आपली तीन तीन दुकानं आहेत.’ तिलाही मग ते पटलं. गडगंज पैसा सोडला, तर जावयात नावं ठेवण्यासारखं काहीच नव्हतं.

नंतर रीतसर मंगनी,  तीलक,  म्हणजे साखरपुडा झाला. थाटामाटात लग्नंही झालं. शहांची किरण सुखदा बनून सुरेशच्या घरात आणि जीवनात आली. तिचं सुखदा नाव मालतीनंच सुचवलं होतं. माप ओलांडून तिने गृहप्रवेश केला आणि जमलेल्यांनी तिला नाव घेण्याच आग्रह केला. तशी नाव घ्यायचं म्हणजे काय, तिने विचारलं. मग सासुबार्इंनी,  मार्इंनीच नाव घेऊन दाखवलं. `मनोहर-मालतीच्या घरात,  सुहासचे हास्य सदा विलसत रहावे. सुहासच्या सुखदाने सर्वांसाठी सुखदा व्हावे. तिच्या या उखाण्याला सर्वांनी,  अगदी सुखदाच्या माहेरच्यांनीसुद्धा दाद दिली.

मालतीची सुनेकडून जशी अपेक्षा होती,  तशीच सुखदा निघाली. दुधात साखर, केशर विरघळावी, तशी त्यांच्या घरात विरघळून गेली. माई आणि आप्पांनी कष्टाने मिळवलेल्या वैभवाचा आणि आत्मसन्मानाचा तिला नेहमीच अभिमान वाटतो. पुढे मिहीर आणि मीरा झाले. सहास-सुखदाचा संसासर वाढला. आप्पा-मार्इंकडे मुलांना सोपवून दोघेही निश्चिंतपणे आपापल्या कामाला जात. माईला आताशी वाटतं, आपली मुलं कशी वाढली, कळलंच नाही. आपल्याला त्यांच्यासाठी वेळ देता आला नाही, की त्यांच्या बाललीलांचा आनंद घेता आला नाही. तेव्हा वेळच मुळी नव्हता. पण आता नातवंड मोठी होताना आपल्याला वेळच वेळआहे. परमेश्वरानं सुखाचं राहिलेलं ते मापही भरभरून आपल्या पदरात घातलय. एवढ्या वेळात मालतीचा आपल्या सगळ्या गत जीवनाचा मागोवा घेऊन झाला होता.

मिहीर आता कीर्तनाच्या समारोपाकडे आला होता. `तेव्हा श्रोते हो, वसुंधरेची कथा आपल्याला  काय सांगते? अं…’  असं म्हणत त्याने स्वर लावला, `कष्ट करी रे कष्टापोटी । समृद्धीचीफळेगोमटी।।’ शोभा, मिराने या ओळी उचलल्या. मग मिहीरने हात पसरून त्यांना थांबा अशी खूण केली. `तर अशा तर्‍हेने आपल्या आख्यानाच्या, कथानायिकेच्या,  वसूच्या संसारात आता `आनंदाचे डोही आनंद तरंग उठले.’

वसुचं आख्यान ऐकताना श्रोत्यांना डोळ्यापुढे मालतीच दिसत होती. मालतीचीच कथा-गाथा महेशने नाव-गाव बदलून आणि थोडाफार बदल करून कीर्तनात बसवली होती.

`…तर श्रोते हो, वसुंधरा आता देवाकडे एकच मागणे मागते…’ असं म्हणत त्याने मागणं मागायला सुरुवातकेली, `हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा। तुझा विसर न व्हावा । तुझा विसर न व्हावा।।

श्रोत्यांना वंदन करून मिहीरने आपले कीर्तन संपवले. श्रोते भारावून गेले होते. मिहीरने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होते.

आपण सर्वांनी रुचकर कीर्तनाचा आनंद घेतलात,  आता रुचकर भोजनाचाही आनंद घ्या, अशी सुखदाने माईकवरून अनाउन्समेंट केली, तेव्हा सारे भानावर आले आणि जेवायला उठले.

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 5 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिलं- आता या ऑर्डर्स इतक्या वाढू लागल्या,  की त्या त्या वेळी तिघी-चौघींना मदतनीस म्हणून तिला घ्यावं लागे. आता इथून पुढे )

 एक दिवस मनोहर म्हणाला, `रतिलाल विचारत होते, तुमच्या मिसेस गाऊन शिवून देतील का? ‘ रतिलालचे तयार कपड्यांचे दुकान होते. शिवाय त्याचा होलसेलही होता. ती तत्परतेने हो म्हणाली. मनोहर कापड आणून द्यायचा. ती गाऊन शिवून द्यायची. मग एकदा ती म्हणाली, `त्यांना विचारा. मी लहान मुलांचे कपडे, सलवार, कुडते वगैरेही शिवून देईन.  तेही काम तिला मिळालं. नुसतंच मिळालं नाही,  तर बघता बघता वाढलं. आता तिला शिवणासाठीही मदतनिसांची गरज भासू लागली. ती मग  त्यासाठी आपल्या क्लासमध्ये शिकलेल्या आपल्या विद्यार्थिनींनाच बोलवू लागली. ती फक्त कटिंग करून देई. तिच्या देखरेखीखाली मुली शिवत.

दुसरी मुलगी झाली,  तेव्हा तिने कुटंब नियोजनाचे ऑपरेशन करून घेतले. तिने मुलीचे नाव ठेवले स्मिता. मुलं मोठी होत गेली, वाढत गेली, तसा तिचा कामाचा व्यापही वाढत गेला. सामान आणणं, तयार वस्तू पोचवणं, जरुरीप्रमाणे मुलांना शाळेत पोचवणं-आणणं, त्यांची  देखभाल करणं,  या गोष्टी मनोहर मनापासू नकरी. मालतीला नेहमीच वाटतं,  लोक म्हणतात,  तसं कर्तृत्व आपल्या एकटीचं नव्हेच. दोघांचं आहे. मनोहरला त्या काळात कामाची योग्य दिशा सापडली नव्हती,  हेच खरे. ती नंतर मिळाली .

मुले हुशार निघाली. स्कॉलरशीपवर शिकली. मालती-मनोहर एस.एस.सी.सुद्धा नव्हते. मालतीला नेहमीच वाटायचे,  इतर मुलांच्या तूलनेत आपली मुलं मागे नको पडायला. त्यांना शिकवण्या लावू या. पण मुलंच म्हणाली, `आम्हाला शिकवणीची गरज आहे, असं वाटेल, तेव्हा आम्ही तुला सांगू.’ दहावीपर्यंत त्यांनी कुठलेही क्लास वा शिकवण्या न लावता चांगले मार्क्स  मिळवले. स्मिता बी. कॉम झाली आणि एम.बी.ए. व सेक्रेटरिअल प्रॅक्टिसचा कोर्स करून चांगल्या कंपनीत नोकरीला लागली. तिचं लग्नं तिनंच ठरवलं. मुलगा सी.ए. होता. मराठा जातीचा होता, एवढीच अडचण येईल, की काय, असं स्मिताला वाटत होतं. पण जातीचा कीस न पाडता मुलाचं कर्तृत्व बघून मनोहर-मालतीने लग्नाला संमती दिली आणि थाटात लग्न करून दिलं.

मालती देवाचे नेहमीच आभार मानते. दोन्ही मुले बुद्धिमान, कर्तृत्ववान निघाली आणि रुपाने बाबांसारखी झाली. सुहास उत्तम मार्काने दहावी उत्तीर्ण झाला. घरची परिस्थिती बघून त्याने प्रथम डिप्लोमा करायचे ठरवले. डिप्लोमाला तो केंद्रात पहिला आला. दहावीपासूनच त्याला विविध विषयातले, एकूण गुणवत्तेचे अनेक पुरस्कार मिळाले. शिवाय त्याला शैक्षणिक कर्जही मिळाले. दहावीनंतरच्या त्याच्या शिक्षणाची झळ आई-वडलांना बसली नाही. डिप्लोमा झाल्यावर त्याने डिग्रीला प्रवेश घेतला. त्याच वेळी डप्लोमाच्या मुलांच्या शिकवण्याही केल्या.

डिग्री मिळवता मिळवता त्याने कॉम्प्युटरचे काही कोर्सेसही केले. कॅंपस इंटरव्ह्यूच्या वेळी तो नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्ट झाला. मालतीला सुहास शेवटच्या वर्षाला असताना सारखं वाटायचं,  परस्थिती बरी असती,  तर मुलाला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवलं असतं. आपल्या गरिबाच्या घरात जन्म झाल्याने त्याच्या हुशारीचं व्हावं तेवढं चीज झालं नाही. तसं ती बोलूनही  दाखवायची. सुहास म्हणायचा,  `तसं काही नाही माई! बुद्धी आणि कर्तृत्व असलं, की त्याचं चीज होतंच.’ त्याचं म्हणणंही खरंच होतं, याचा मालतीलाही प्रत्यय आला. चार-सहा महिन्यातच एका नव्या प्रोजेक्टसाठी कंपनीने त्याला सहा महिने अमेरिकेला पाठवलं. त्यानंतर ज्या ज्या देशात नवीन प्रोजेक्ट सुरू करायचे, त्या त्या देशात सुरुवातीला कंपनी त्यालाच पाठवे. प्रोजेक्टसाठी कोणती माणसं निवडायची,  त्याचे स्वातंत्र्य कंपनीने त्याला दिले. जर्मनी, इंग्लंड,  स्वित्झर्लंड,  दुबई,  कुवेत,  मलेशिया अशा किती तरी ठिकाणी गेल्या चार पाच वर्षात तो हिंडून आला.

मनोहरचे आत्या आणि आत्तोबा एव्हाना देवाघरी गेले होते. त्यांच्या शेवटच्या दिवसात आप्पा आणि मार्इंनी त्यांची खूप सेवा-शुश्रुषा केली होती. आत्या तर दोन वर्षं हांतरुणाला खिळून होत्या. शी-शूपासून त्यांचं सगळं करावं लागे. मनोहर-मालतीने दिल्या जागेच्या उपकाराला जागून  आणि एकूण कनवाळू स्वभाव म्हणूनही सगळं काही मनापासून केलं. मुलं नोकरीची. राहून राहून किती दिवस राहणार? मुलांनी आपापल्या नोकरीच्या जागी आपापल्या वास्तू उभ्या केल्या. मनोहर-मालती अजूनही आत्याच्याच वाड्यात राहत होते. सुहासने मग  आत्यांच्या मुलांना सध्याच्या चालू किमतीत वाडा विकत मागितला. मुलांनी आनंदाने दिला. आपल्या आई-वडलांचं याच दोघांनी केलय,  हे मुलंही विसरली नव्हती. वाडा ताब्यात होताच. रीतसर कागदपत्र झाल्यावर सुहास म्हणाला, वाडा पाडून बंगला बांधू या. पण मनोहर-मालतीच्या किती तरी आठवणी त्या वाड्याशी निगडित होत्या. ती दोघेही वाडा पाडायला नको म्हणाली. सुहासनेही त्यांच्या शब्दांचा मान ठेवत वाडा न पाडता त्याचे रिन्युएशन केले. वाड्यात जेवढ्या म्हणून सोयी-सुविधा करता येतील,  तेवढ्या केल्या. वाडा साजिरा-शोभिवंत झाला. मनोहर-मालतीलाखूप आनंद झाला. आम्ही या वाड्याचे आश्रित होतो. तू मालक झालास. सुहासने मग घराचे नाव ठेवले, आनंदघर.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण बघितलं – बरं का श्रोते हो,  एक अहिराणी ओवी आहे. माहेर कशासाठी? .. तर… `पावलीनी चोळी, एक रातना विसावा… आता इथून पुढे’)

 मालतीला वाटलं, वसूच्या कथेतून आपलाच जीवन प्रवाह वाहतो आहे. त्यावेळी मनोहर म्हणाला होता, `दुसरी सोय होईपर्यंत तरी राहू दे.’  पण मालती म्हणाली,  `नको. आता इथं राह्यलाच नको.’ इंदूतार्इंनी तिची रुखवताची भांडी तिच्यापुढे आणून आपटली. भांडी, आपले कपडे घेऊन दोघे निघाली. तेव्हा महेश तिला ‘`घरी चल’’ म्हणाला होता आणि तिने त्याला अगदी असंच उत्तर दिलं होतं.

`वसूने मग एक लहान खोली भाड्याने घेतली. भाड्याच्या बदल्यात मालकिणीची पडेल ती कामे करायचं कबूल केलं तिने. मग या श्रमलक्ष्मीचे हात घरात आणि घराबाहेर राबू लागले. खोली लहानच खरी. पण तिची कळा बदलली. ती शोभिवंत,  साजिवंत झाली. बघा… थोरा-मोठ्यांनी म्हंटलंच आहे, `यत्न तो देव जाणावा । देव तेथेचीपहावा।। ‘ खमाजमध्ये बांधलेल्या या ओळींना शोभा-मिरानं उचलून धरलं. मिहीर क्षणभर विश्रांतीसाठी थांबला.

मालतीचं मन भूतकाळात गेलं. घरातून बाहेर पडल्यावर मनोहर म्हणाला, `आत्याबार्इंकडे जाऊन पाहू या. दुसरी जागा मिळेपर्यंत तिथे राहतो,  म्हणू या. त्यांचा वाडा आहे. रहायची जागा मोठी आहे. शिवाय दोघेच तिथे असतात. दोन्ही मुलींची लग्नं झालेली आहेत. मुलांचीही लग्नं होऊन ती आपापल्या नोकरीच्या गावी आहेत.’ निदान त्यांना विचारून तरी पाहूयात, असं म्हणत दोघेही मनोहरच्या सुशीला आत्याकडे गेली. आत्याबार्इंची पासष्ठी,  तर आत्तोबांची,  भाऊसाहेबांची सत्तरी उलटलेली. आत्याबार्इंना बरंच वाटलं. सोबतही होईल, आणि गरजेला उपयोगीही पडतील. आत्याने त्यांना अडगळीची खोली रिकामी करून दिली. भाड्याऐवजी मालतीने त्यांचं स्वैपाक-पाणी करायचं काम कबूल केलं.

मालतीचं आणि आत्यांचं  गूळ-पीठ चांगलं जमलं. एकदा ती आत्यांना म्हणाली, `तुमच्या ओळखीत कुणाला शेवया,  पापड,  कुरडया,  पुरणाच्या पोळ्या हव्या असतील, तर विचारा. मी करून देईन. हळू-हळू त्याच्या ऑर्डर्स येऊ लागल्या. तिच्या हातांना काम मिळालं. पैसेही मिळाले. ऑर्डप्रमाणे बाजारातून सामान आणणं,  तयार वस्तू पोचवणं, ही कामं मनोहर करू लागला.

एके दिवशी मनोहर म्हणाला, `तयार धोतर जोड्यांचं पिशव्यात भरून पॅकिंग करायचं काम मिळतय. शंभर नगाच्या पॅकिंगचे दहा रुपये मिळतील. करायचं? ‘

`करू या.’  मालती म्हणाली. मग मनोहर सकाळी जाऊन शंभर धोतरजोड्या व पिशव्या घेऊन येऊ लागला. रात्री सगळी कामे आवरली,  की दोघेजण मिळून पॅकिंग करू लागली. दुसर्‍या दिवशी पॅकिंग पोचवायचं आणि नवीन काम आणायचं,  असं सुरू झालं. असं मिळेल ते काम ती करत राहिली आणि पैसा पैसा जोडत राहिली.

मिहीरने फटका सुरू केला,

 `श्रमलक्ष्मीचे हात राबती, घरी-दारी,  इथे-तिथे।

कष्टावाचून जीवनी या, सौख्य कुणाला कधीमिळते?’      

 तर श्रोते हो, वसुंधराची परिस्थिती बघता बघता सुधारू लागली. ‘

मालती-मनोहरचा आता जम बसत चालला. रोजी-रोटी इतके मिळून थोडे-फार शिल्लकही पडू लागले. पण एवढंच मिळवून भागणार नव्हतं. संसार वाढणार होता. बाळाची चाहूल लागली होती. सातव्या महिन्यात महेश घरी बोलवायला आला, पण मालती म्हणाली, `बाळंतीण झाल्यावर येते.’  पोटात कळा येईपर्यंत ती काम करत राहिली. बाळंतीण झाल्यावर हॉस्पिटलमधून थेट माहेरी गेली. भाऊ-भावजयीनेही  मोठ्या मायेने तिचे बाळंतपण केलं.

मालतीने विचार केला,  मध्यंतरीच्या काळात तुटलेले सासरचे संबंध या नमित्ताने पुन्हा जोडूयात. आताशी मालतीला वाटू लागलं होतं, सासूबार्इंचं तरी काय चुकलं? कुठून त्या तिघांच्या पोटाला घालणार होत्या?  नणंदा लग्न होऊन आपापल्या घरी. दीर पोटापाण्याच्यामागे नोकरीच्या गावी. आपला संसार संभाळून देणारा उचलून तरी किती देणार?

मालतीने बारसं थाटात केलं. त्या निमित्ताने तिने दीर-जावा,  नणंदा, सासुबार्इंना बोलावलं. त्यांचे मान-पान केले. पैशाची जुळणी तिने आधीच करून ठेवली होती. सासरच्यांनीही चांगला बाळंतविडा केला. इंदूताई आता त्या दोघांना पुन्हा घरी चला, म्हणायला लागल्या. त्यावेळी आपलं चुकलं,  निराशेच्या भरात आपण काय बोलत होतो, तेच कळत नव्हतं,  असंही म्हणाल्या. सगळ्यांच्या पुढे हात जोडून माफी मागितली,  पण मालती म्हणाली, `तुम्ही हात नका जोडू. तेव्हा तुम्ही थोड्या कठोर झालात,  म्हणूनच आम्ही हात-पाय हलवायला लागलो. कुणाची लाचारी न पत्करता स्वाभिमानाने सुखाचे चार घास खाऊ लागलो.’ ती पुन्हा त्या घरात मात्र गेली नाही. सासुबार्इंना म्हणाली, `तुम्हाला जेव्हा नातवाला बघावं-भेटावंसं वाटेल,  तेव्हा तुम्हीच येत चला.’ तिने बाळाचे नाव सुहास ठेवलं. तिला वाटलं,  बाळाच्या नावाप्रमाणे त्याला बघताक्षणी सर्वांना प्रसन्न वाटू दे.

सुहास सहा महिन्याचा झाला, तेव्हा केव्हा तरी शिवण-कर्तनाच्या टिचर्स डिप्लोमाची जाहिरात मालतीच्या वाचनात आली. तिला शिवण येतच होतं. पण हा डिप्लोमा केला,  की सरकारी शिवणाचे वर्ग तिला घेता येणार होते. मनोहरने क्लासच्या वेळात बाळाला संभाळायची जबाबदारी स्वीकारली आणि ती शिवणवर्गाला जाऊ लागली. फस्र्ट क्लासमध्ये ती परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर पुढे दोन वर्षे तिने शिवणाचे सरकारी वर्ग घेतले. तोपर्यंत दुसर्‍या बाळाची चाहूल लागली. मग मात्र तिने ते वर्ग बंद केले. बाकी शिवण शिवून देणं,  आणि पदार्थ करून देणं,  ही तिची कामे चालूच होती. पदार्थांच्या आर्डर्स खूपच वाढू लागल्या होत्या. दिवाळीचे पदार्थही ती मागणीप्रमाणे करून द्यायची. मोदक,  पुरणपोळ्या,  सुरळीच्या वड्या,  चकल्या हे पदार्थ म्हणजे तर तिची खासियत होती. आता या ऑर्डर्स इतक्या वाढू लागल्या,  की त्या त्यावेळी तिघी-चौघींना मदतनीस म्हणून तिला घ्यावं लागे.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं – या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला. आता इथून पुढे)

त्याला पहिलंबक्षीस तर मिळालंच, पण त्यानंतर जो घरी येईल, त्याच्या पुढे मिहीरचा कीर्तनाचा लाईव्ह शो सुरू झाला. त्याच्या महेश मामानी जेव्हा हा शो पाहिला, तेव्हा त्याच्या मनात आलं, यंदा मे महिन्याच्या सुट्टीत पोराकडून अध्र्या-पाउण तासाचं कीर्तन बसवून घेतलं पाहिजे. पण मग हा कार्यक्रम ठरला, मग मामाला वाटलं,  या कार्यक्रमासाठीच त्याचं कीर्तन बसवून घ्यावं. कार्यक्रमात एक वेगळेपणा.

महेश,  मालतीचे वडील काळेबुवा प्रख्यात कीर्तनकार. त्यांचे घराणेच कीर्तनकाराचे. गावोगावी कीर्तन करत ते फिरायचे. घरची थोडी शेतीही होती. उत्सव, जत्रा-यात्रांच्या वेळी त्यांना कीर्तनासाठी खूप निमंत्रणे यायची.

काळेबुवांना पाच मुले. चार मुली आणि महेश एकटाच मुलगा. तो बारावी पास झाला आणि त्याने डी.एड. केलं. मग गावातल्याच प्राथमिक शाळेत नोकरीला लागला.  शाळेत नोकरी करत करत त्याने गावातल्या शेतीतही लक्ष घातले आणि घराण्याची कीर्तनाची परंपराही जपली. त्याने वडलांसारखं पूर्ण वेळ कीर्तनाला वाहून घेतलं नसलं, तरी अनेक वेळा, अनेक निमित्ताने तो कीर्तन करी. याशिवाय गावात असेल तेव्हा दररोज रात्री सात ते आठ या वेळात कीर्तन करी. कीर्तनाची जुनी परंपरा त्याने जपली असली,  तरी त्याने कीर्तनाचा बाज मात्र बदलला होता. अर्थात् कीर्तनातील रसवत्ता त्याने कायम ठेवली होती. त्याच्या कीर्तनाचे विषय आधुनिक असतात. अंध:श्रद्धा निर्मूलन,  पर्यावरण, राष्ट्रीय समस्या,  सामाजिक प्रश्न इ. विषयांवर तो कीर्तन करतअसे. आपल्या भाच्याची,  मिहीरची गायन आणि वक्तृत्वातील गती पाहून त्याने त्याला या कलेत तरबेज करायचे ठरवले. मालती भावंडात सगळ्यात लहान. उत्तम गुणाची पण सुमार रुपाची. मोठ्या तिन्ही बहिणींची लग्ने झाली. बेताच्या रुपामुळे तिच्या लग्नात, म्हणजे पसंत पडण्यातच अडचणी येत होत्या. मोठ्या बहिणींची लग्ने झालेली. घरचं सगळं तीच बघायची. घरचं संभाळून शाळेतही जात होती. ती एस. एस. सी. ला बसली आणि कुणा मध्यस्थाने मनोहरचं स्थळ सांगितलं. मुलगा कापडाचा व्यापार करतो, असं त्यांना कळलं. मालतीला त्यांनी होकार दिला. मग काळेबुवांनी मुलाची फारशी चौकशी केली नाही. तिची परीक्षा झाली आणि त्यांनी तिचं लग्न करून टाकलं. मुलीच्या जबाबदारीतून ते रिकामे झाले. यात्रा-जत्रा करायला  मोकळे  झाले.

मालतीचं लग्न म्हणजे एक प्रकारची तडजोड होती. मनोहर दिसायला सुरेख,  म्हणून तर त्याचं नाव मनोहर ठेवलं. त्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी. तो भावंडात मोठा. बाकीची भावंड त्याला आप्पा म्हणत. मग बाकीचेही त्या आप्पाच म्हणत. बाकीचे भाऊ चांगले शिकले, पण मनोहर मात्र फारसा शिकला नाही. स्वभावाने गरीब. लोकं सांगतील ती कामं करायचा. इतरांच्या मदतीला धावायचा. पण शालेय शिक्षणात मात्र त्याला गती नव्हती. बाकीचे भाऊ शिकेशिकेपर्यंत वडील गेले. पुढे ती भावंड नोकरीला लागली. आपापल्या नोकरीच्या गावी निघून गेली. त्यांची लग्न-कार्य झाली. मनोहर काहीच मिळवत नव्हता. घरची इस्टेटही नव्हती. मग याचं लग्नं कसं करायचं? तोपर्यंत कुणी तरी त्याला एका कापड विक्रेत्याकडे नोकरी मिळवून दिली. त्याने बाजारच्या दिवशी रस्त्यावर याला कापड व तयार कपडे विकायला बसवलं. विक्री होईल, तसे पैसे. जवळपासच्या ज्या गावचा बाजार असेल, तिथे तो कपड्यांची गाठोडी घेऊन जायचा आणि बाजारात विकायला बसायचा. आता अशा मुलाला मुलगी तरी कोण देणार? काळेबुवांच्या कीर्तनाला येणार्‍या एका कापड व्यापार्‍याने त्यांना मनोहरचं स्थळ सांगितलं. मालती त्यावेळी एस. एस. सी. ला बसली होती. मनोहरच्या आईला वाटलं, मुलगी सुमार रुपाची असेना का, एस. एस. सी. होईल. नोकरी करेल. मुलाचा संसार मार्गी लागेल. त्यांनी सामान्य रुपाची मालती पसंत केली आणिमनोहरचं लग्न लावून दिलं. पण त्यांची मनिषा काही पूर्ण झाली नाही. मालती पास झाली नाही. पुन्हा आक्टोबर, पुन्हा मार्च ती परीक्षेला बसली,  पण गणित, इंग्रजीनं तिच्या यशाचा मार्ग रोखून धरला, तो धरलाच. इंदूतार्इंचा हिरमोड झाला. आता त्यांना प्रत्येक कामात मालतीच्या चुका दिसू लागल्या. त्या` ‘वेंधळी’  म्हणूनच तिला हाक मारत. त्या आरडा-ओरडा करायला लागल्या,  की ती आणखीनच गोंधळून जाई. खरं तर लग्नाच्या आधीही घरात ती सगळं करायची. पण इंदूतार्इंना तिचं काहीच पसंत पडत नसे. नावडतीचं मीठ आळणी म्हणतात ना! मनोहरची कमाई खात्रीची नव्हती. एक दिवस इंदूतार्इंनी दोघांना घराच्या बाहेर काढलं. `तुमचं तुम्ही मिळवा आणि तुमचं तुम्ही खा.’ त्या म्हणाल्या.

`पण आई आम्ही जायचं कुठे?’ मनोहर म्हणाला.

`कुठेही जा. दाही दिशा मोकळ्या आहेत तुम्हाला. नाहीच कुठे थारा मिळाला तर मष्णात जा.’  मालतीच्याबाबतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. त्याचं वैफल्य जहरी शब्द घेऊन बाहेर पडत होतं. `साधं एस.एस.सी. होता नाही आलं तुला.’

आता मात्र मालतीदेखील चिडली. शब्दाने शब्द वाढले. वादाचं भांडणात रुपांतर झालं.

मालती म्हणाली, `मी एस. एस. सी. पर्यंत तरी आले.  तुमच्या मुलाला सातवीच्या पुढे ही जायला जमलं नाही. मुलगा व्यापार करतो,  म्हणालात. रस्त्यावर बसतो, नाही म्हणालात. फसवलंत तुम्ही आम्हाला.’

`आणि एक दिवस…’ मिहीरचं निरुपण चालू होतं. वसूची कथा तो आख्यानातून ऐकवत होता. `एक दिवस त्या महामायेने,  त्या कडकलक्ष्मीने, वसूच्या सासूने, वसुंधरेला हाताला धरून घरातून बाहेर काढलं…. पण वसू डगमगली नाही. भावाला जेव्हा हे कळलं,  तेव्हा तो वसूला म्हणाला, `घरी चल. अर्धी, तिथे चतकर भाकरी खाऊ, पण एकमेकांना धरून राहू.’  त्यावर वसू म्हणाली, `भाऊराया, मला माहीतआहे,  मला ठेच लागली,  की तुझ्या डोळ्यात पाणी येतं. पण अरे,  माहेर किती  दिवसांचं? ‘ वसू पुढे म्हणाली, `असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली’… माहेर सुखाचं खरं, पण किती काळ? `क्षणभरी पहुडाया अनंताने हंतरली.’  बरं का श्रोते हो, एक अहिराणी ओवी आहे. माहेर कशासाठी? .. तर… `पावलीनी चोळी, एक रातना विसावा…’

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिल  – `मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून. आता इथून पुढे -)

आप्पा-मार्इंसाठी ते आता रहस्य राहिलं नव्हतं. मालती म्हणाली, `मी चार सहा जणींना ताखीली घेऊन स्वैपाक करते. पुरणपोळ्या करू.?’

`काहीतरीच काय आई! तू म्हणजे कमाल करतेस हं! म्हणजे तुला हवा तर पुरणपोळ्यांचा बेत करू, पण तू काहीही करायचं नाहीस. येणारे-जाणारे तुला भेटायला येणार! तू आणि आप्पांनी एकदम  फ्री राहिलं पाहिजे.’

 रोज काही तरी नवीन सुचत होतं. फोनवरून आमंत्रणं दिली जात होती. त्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय, जेवायला काय, मेन्यू ठरत होते. बदलत होते. सकाळपासून काय काय करायचं, कार्यक्रम ठरत होते. बदलत होते.

अखेर तो वीक एंड आला. सुहास कुटुंबीय आदल्या दिवशीच फार्म हाऊसवर रहायला गेले होते. सकाळचे  साडे नऊ वाजले. नातेवाईक, निमंत्रित जमू लागले. इडली-वडा, सँडवीच असा नाश्त्याचा प्रबंध होता. नाश्ता झाल्यावर बागेतून, फुलांच्या ताटव्यातून, गप्पा मारत,  हिंडत-फिरत मोठ्यांनी त्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेतला. मुले खेळत,  उड्या मारत, उंडारत होती.

बरोबर साडे दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. हॉलमध्ये एका भिंतीवर रेशमी निळा पडदा लावला होता. त्यावर थर्मोकोलची `जीवेत्शरद: शतम्’ अशी मोठी अक्षरे त्याखाली, मनोहर (आप्पा), मालती (माई) अशी नावे. बाकीचा पडदा छोट्या छोट्या फुलांनी सजवलेला. उत्वमूर्तींसाठी मखमलीने वेढलेल्या बसायच्या खुर्च्या सगळा माहोल काहीसा भारदस्त आणि भारावलेलाही. नेपथ्य प्रकाशचे. त्याने फार्मचीही खूप काळजी घेतलेली दिसत होती. मीरा आणि तिची मामेबहीण शोभा यांनी भरतनाट्यातून गणेशवंदना सादर केली. गेली दोन वर्षे त्या नृत्य शिकताहेत. त्या इतक्या सुरेख नाचल्या, की बघणार्‍याना आपल्या डोळ्यांचं पारण फिटलं, असं वाटलं. त्या नंतर सुहासने स्वागत केलं. सगळी जमली,  म्हणून आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, `आज मी जो काही आहे, तो केवळ माझ्या माई-आप्पांमुळे आहे. त्यांनी सोसलेल्या अपार कष्टातून माझं हे वैभव उभं राहीलं आहे.’ त्यानंतर त्याला इतकं  भरून आलं,  की त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. शेवटी त्याच्या महेश मामाने त्याला धरून खुर्चीवर बसवलं. नंतर अनेक जण आप्पा मार्इंबद्दल बोलले. विशेषत: मार्इंचा कष्टाळूणा, त्यांची दूरदृष्टी,  त्यांचा लोकसंग्रह,  दुसर्‍याच्या  उपयोगी पडण्याची वृत्ती,  असं खूप काही…नंतर कुणी गाणी म्हंटली. कुणी विनोद संगितले.   

सगळ्यात शेवटी मिहिर कीर्तन करायला उभा राहिला. कीर्तनाच्या पारंपारिक वेषभुषेतील या बालकीर्तनकाराने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तो म्हणाला, `प्रथम जगदीश्वर,  नंतर माझे जनक-जननी आणि माझे पितामह व मातामह यांना वंदन करून मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. ‘ त्याने आपल्या आई-वडलांकडे अणि नंतर आप्पाआणिमार्इंकडे पाहून हातजोडला आणि नमनाच्या श्लोकाला सुरुवात केली. 

`वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा’

एरवीच्या कीर्तन परंपरेतल्या श्लोकांपेक्षा हा श्लोक जरा हटकेच होता. तसंच त्याचं कर्तनदेखील नेहमीच्या कीर्तन परंपरेतल्या कीर्तनापेक्षा जरा हटकेच होतं. त्यानंतर त्याने श्रोत्यांची आळवणी केली. एकाग्रतेने, सावध चित्ताने आख्यान ऐकायची विनवणी केली. `तुम्ही लक्षपूर्वक, शांत चित्ताने कीर्तन ऐका,  म्हणजे या कथेत तुम्हाला गोडी वाटेल…’ तो म्हणाला आणि त्याने भजनाला सुरुवात केली, `जय जय राम कृष्ण हारी…. जय जय राम कृष्ण हारी…. ‘  त्याने सर्वांनाच आपल्याबरोबर भजन म्हणायला सांगितले. सगळेच भजनात एकरूप झाले, तशी त्याने दोन्हीहात बाजूला नेऊन श्रोत्यांना थांबण्याची खूणकेलीआणि निरुपणाचा अभंग गायला सुरुवातकेली. आजचा निरुपणाचा अभंग चोखोबांचा होता, `ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। वरलिया रंगा।।’

मिहीरचा आवाज सुरेलआणिखडा होता. तो गायलालागला, की मालतीला आपले वडीलच गाताहेतसं वाटायचं. त्याचं वक्तृत्वही अस्खल्लि तहोतं. वक्तृत्व आणि गायनात गेली तीन-चार वर्षं तो शालेय आणि आंतरशालेय स्पर्धेत बक्षिसे मिळवत होता. यंदा तो सातवीत आहे. सुहास अधूनमधून म्हणतोदेखील, ‘आता गाणं-बोलणं पुरे. थोडा थोडा अभ्यासही करा.’  त्यावर मालती म्हणते, `पुरे झालं तुझं! तू एक पुस्तकातला किडा होतास. त्याला नको बनवूस तसं. सगळ्यातला आनंद घेऊ दे त्याला. मोठा झाल्यावर आहेच,  अभ्यास… अभ्यास… आणि अभ्यास…’

आज मिहीरच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठरवला, त्यालाही एक स्पर्धाच कारणीभूत झाली होती. शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती. काय करावं? कोणती वेशभूषा करावी, यावर बोलता बोलता,  माई एकदम म्हणाली, `तू र्कीतनकार हो! तिने नमनाच्या अभंगाच्या दोनओळी  व चार-पाच वाक्याचं निरुपण त्याच्याकडून  बसवून घेतलं. एका दिवसात कीर्तनकाराची वेशभूषा शिवून तयार केली. या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तडजोड – भाग -2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? जीवनरंग ❤️

☆ तडजोड – भाग – 2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

भाईसाहेबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“”विकीदादा,निरज,–तुम्ही दोघांनी हे मान्य केलेत याचा खुप आनंद झाला.निरज,कारखान्यात  तुमची जबाबदारी वाढली ,आता घराकडे लक्ष द्यायला होणार नाही.अन् सुप्रियाची जबाबदारी तुमच्यावरच आहे.त्यांच्या लग्नाचा  विचार केंव्हा करणार?”

त्याचबरोबर, सुप्रिया आणि भाईसाहेबांनी चमकुन एकमेकांकडे पाहिले. वहिनीसाहेबांच्या नजरेने ते बरोबर हेरले.२,३ वर्षे त्या दोघांचे सुरु असलेले प्रकरण त्यांना समजले होते.

 नवर्‍याचे वयाने एवढ्या लहान मुलीबरोबर संबंध —-त्या पार कोलमडल्या होत्या.अगदी जीव द्यायचेही मनात आले.

पण मुळ स्वभाव विचारी असल्याने त्यांनी मनाचा तोल अजिबात ढळु दिला नाही.आपल्या जीव देण्याने ,बंटी पोरका होईल.आपल्या वैयक्तिक सुखदःखासाठी त्याचे आयुष्य वाया घालवणे योग्य नाही.

उच्चशिक्षण घेतले नसले तरी व्यावहारिक अनुभव ,आणि साधकबाधक विचार प्रवृती होती.त्यांची निर्णयक्षमता जेवढी जबरदस्त,,नियोजनही तेवढेच प्रभावी होते.त्यामुळे निर्णयाच्या याबाबत कोणाच्याही मनात शंका नसे..

किंचित हसुन ,””निरज,तुम्ही करु नका निष्कारण विचार.आम्ही केला आहे त्याला हो म्हणा.”

सगळेच त्यांच्याकडे बघु लागले.

भाईसाहेबांना रहावेना ,””काय ठरवलेत ?निरजला न विचारता?'”

वहिनीसाहेब शांतपणे,””हो,ज्यात सगळ्यांचेच हित आहे असेच ठरवले. निरज, विकीदादांना तुम्ही जवळुन पाहता,.त्यांच्यावर आलेल्या संकटातुन बाहेर काढण्यासाठी तुम्ही खुप मदत केलीत.तुमच्या मनात  त्यांच्याविषयी चांगल्या भावना आहेत.म्हणुनच, विकीदादांच्या साठी आम्ही सुप्रियाचा हात मागतो.—“

त्यांचे बोलणे ऐकुन एवढा वेळ शांत बसलेले विकीदादा,””पण,वहिनी —-तुम्हाला माहित—-नाही”.

वहिनीसाहेब,हात दाखवुन ,विकीदादांचे बोलणे थांबवून ,धीम्या पण करारी आवाजात,” हो ,आम्हाला सगळ माहित आहे.निरज हे लग्न होणार,.अगदी लवकर चांगला मुहुर्त बघुया,.कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहेच.विकीदादा आणि सुप्रिया, —दोघेजण शेताची,गावाकडची पुर्ण जबाबदारी घेतील,पण त्याआधी ,शेती संबंधी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी दोघेही,२ ,वर्षे परदेशात रहातील .आम्ही त्यासंबंधी चौकशी केली आहे.”

सुप्रियाला कड्यावरून ढकलून दिल्यासारखे वाटले, शब्द तोंडातच थिजले तर डोळ्यातले पाणी लपवणे अवघड झाले.

भाईसाहेबांची अवस्था तर काहीही बोलण्याच्या पलिकडे गेली.”सौदामिनी,एवढे घाई कशाला? त्यांना जरा विचार करु दे”. हे तोंडाशी आलेले शब्द त्यांनी मुकाटपणे गिळले.

   एवढा वेळ जाणूनबुजून दुर्लक्षित केलेल्या सुप्रियाचा हात हातात धरुन “”चला,आपण खाली जाऊया,तुम्ही पण सर्व खाली देवघरात या”.वहिनीसाहेब. देवासमोर तिला बसवुन ,चांगली भारीतली साडी ,अन् सोन्याचा नेकलेस देऊन ,पाच फळांनी ओटी भरली, तिच्या डोळ्यातले पाणी पुसत, 

“”हे सर्व ठरवणे आम्हालाही सोपे नव्हते.पण पुढील वाताहात टाळण्यासाठी —-  हा निर्णय घेतला. लहान वयामुळे तुम्हाला आता मान्य होत नसेल पण स्विकारावे लागेल. –आयुष्याशी करावी लागणारी तडजोड समजुन.”

*  समाप्त  *

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print