मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘पेसी अंकल…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(ही कल्पना मी ताबडतोब मान्य केली कारण मला कमर्शियल आर्टच्या शिक्षणासाठी व पुण्यामध्ये वसतिगृहात राहण्यासाठी खर्च येत असे.) इथून पुढे —

पेसी अंकल हे पाचगणी येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्व असले ,त्यांचा प्रचंड मोठा आठ एकर परिसरातील मेडस्टोन हा वंशपरंपरागत पारंपारिक बंगला असला तरी स्वभावाने मात्र ते अतिशय कंजूष होते .

त्यांच्याकडे खूप आर्थिक संपन्नता असली तरीही कित्येक वर्ष जुनी असलेली फियाट गाडी ते वापरत असत. त्यांना आलेले एकही पत्र ते कधीही फेकून देत नसत.  उलट या पत्र आलेल्या पाकिटाचा भाग असेल तो पूर्णपणे उघडून त्याच्या पाठीमागे ते पत्र लिहित आणि त्याचा उपयोग करत. (आजही त्यातील काही पत्र माझ्याकडे आहेत. ) त्यांच्याकडे येणारे सर्व कामगार अतिशय कमी पगारामध्ये काम करत असत.  त्यांच्या कंजूषपणाचे अनेक किस्से हे कामगार मला सांगत असत .

पेसी अंकल यांना एकूण तीन मुले व एक मुलगी होती.त्यांची तिन्ही मुले उच्च शिक्षण घेऊन इंग्लंडमध्ये स्थायिक झालेली होती. त्यांचे दहा-बारा एकरामध्ये प्रचंड मोठी आलिशान राजवाड्यासारखी घरे होती. पेसी अंकल पावसाळ्यामध्ये कधीकधी तीन-चार महिन्यांसाठी इंग्लंडला जात असत. तेथे वर्तमानपत्र वाचण्यासाठी दोन युरो (2×80=160 रुपये ) लागतात म्हणून ते वर्तमानपत्र अजिबात वाचत नसत.  तिकडची एकही वस्तू घेत नसत. तिकडचे राहणीमान हे भारतापेक्षा खूप महाग आहे हे त्यांच्या मनाने खूप गांभीर्याने घेतलं होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही मुलाबरोबर त्यांचे पटत नसे. शेवटी मी आपला पाचगणीतच बरा आहे आणि शेवटी मी पाचगणीतच मरेन असा निर्वाणीचा इशारा त्यांनी सर्व मुलांना, नातवंडाना दिला होता आणि तो इशारा त्यांनी शेवटपर्यंत पूर्ण केला .

पेसी अंकलने मला पाचगणी आर्ट गॅलरी व पांचगणी क्लब याठिकाणी प्रदर्शन करण्यासाठी खूप मदत केली ,त्याचप्रमाणे वेळोवेळी माझी चित्रकला विकत घेऊन माझ्या शिक्षणासाठी खूप मदत केली. त्यांची काही चित्रकलेची पुस्तके मला दिली. इंग्लडचे विन्सर अँड  न्यूटनचे महागडे रंग चित्रांच्या बदल्यात मला दिले. एकदा राज्यपाल पी.सी अलेक्झांडर, महात्मा गांधी यांनी लावलेल्या गुलमोहराच्या झाडाचे मी काढलेले चित्र घेण्यासाठी विरजींच्या बंगल्यावर आले, त्यावेळी पेसी अंकलचा आनंद गगनात मावत नव्हता.

मात्र एकदा माझे शिक्षण पूर्ण झाले, आणि  त्यावेळी मी पाचगणीला कायमचा राहण्यासाठी आलो होतो. असाच एके दिवशी मला पेसी अंकलचा निरोप आला. त्यांच्याकडे कोणीतरी जर्मनीमधून खास पर्यटक आलेले होते आणि त्यांना मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागचे कृष्णा व्हॅलीचे एक जलरंगातील चित्र हवे होते .मी माझे सर्व चित्रकलेचे साहित्य घेऊन बंगल्याच्या पाठीमागे छानपैकी चित्र रंगवत बसलो होतो. चित्र रंगवत असतानाच माझा छान मूड लागल्यामुळे मी आणखी काही चित्र रंगविण्यास सुरुवात केली. 

पेसी विरजींच्या मेडस्टोन बंगल्याच्या पाठीमागे एक खूप मोठी स्टोअर रूम होती . ती नेहमी उघडीच असे. दुपारच्यावेळी मला एक खुर्ची, व छोटे टेबल चित्र ठेवण्यासाठी पाहिजे होते म्हणून मी त्या स्टोअररूममध्ये गेलो .तेथे सहजपणे माझी नजर एक चित्रकलेची फाईल कोपऱ्यात होती तेथे गेली. मी ती फाईल सहज उघडली तर त्यामध्ये माझी शिकत असताना काढलेली निसर्ग चित्रे होती. ही सर्व चित्रे वेगवेगळ्या पर्यटकांना विकलेली आहेत असे मला पेसी अंकल यांनी सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ही चित्रे पेसी अंकल यांनीच विकत घेतलेली आहेत हे मला समजत होते. व वेळोवेळी त्यांनी त्याचे पैसेही दिले होते. म्हणून पुढच्या क्षणी रागानेच मी ती फाईल घेऊन पेसी अंकल यांच्या ऑफिसमध्ये गेलो. 

अंकल त्यावेळी निवांतपणे पेपर वाचत होते .मी त्यांना विचारले की “ तुम्ही तर माझी चित्रे पर्यटकांना विकली आहेत असे सांगितले, पण चित्रे तर इथेच आहेत.  पण तुम्ही मला पैसे तर सगळे दिले. जर चित्रे विकली नव्हती तर तसं सांगायचे होते मला. असे का केले तुम्ही ? “

… त्यावेळी पेसी अंकल त्यांच्या खुर्चीतून उठले आणि मला त्यांनी कडकडून मिठी मारली आणि म्हणाले … ” सॉरी दिकरा ,तू त्या वेळेस शिकायला आर्ट कॉलेजमंदी पुण्यात होता … आणि तुला पैशांची गरज होती, मी तुला मदत म्हणून पैसे दिले असते तर ते तू घेतले नसते याची मला पूर्ण खात्री होती. पण तुला मदत करणे फार गरजेचं होते. म्हणून मी ही सगळी चित्रे वेळोवेळी पर्यटकांनी विकत घेतलेली आहेत असे मुद्दाम खोटेच सांगितले. आय ॲम रियली सॉरी फॉर दॅट… पण चांगल्या कामासाठी खोटा बोलले तर चालते, हे मला माहित आहे.” 

पेसीअंकल यांचं हे उत्तर ऐकून माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले . कोण ? कुठला मी ? पण माझे शिक्षण पूर्ण व्हावे, मला पैशांची कमतरता जाणवू नये, म्हणून स्वतः पैसे पाठवून गेली चार वर्ष ते मला मदत करत होते. आणि ज्यांनी मला जन्म दिला, ते आणि इतर नातलग म्हणवणाऱ्या मंडळीनी माझी कधीही साधी विचारपूसही केली नाही . नात्यातला हा विरोधाभास कायम लक्षात राहिला.

मला अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो की “ पूर्ण चित्रकलेवर तुमचं जीवन कसं जगलं जातं ? कसं भागलं जाते ?” … 

… आज मला अभिमानाने सांगावेसे वाटते ही कला जिवंत ठेवण्यासाठी अशी पेसी अंकलसारखी माणसे आहेत, ज्यांना कला आणि कलाकार यांच्याविषयी आस्था, आपुलकी, प्रेम व मनापासून मदत करण्याची इच्छाशक्ती आहे, आणि म्हणूनच कलाकार व त्याची कला जिवंत राहू शकते.

१९९५ साली ‘ माझे प्रदर्शन मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये होणार आहे, त्या ठिकाणी उदघाटनासाठी सांस्कृतिक मंत्री येणार ‘  याचा माझ्यापेक्षा पेसी अंकल यांनाच  फार आनंद झाला होता. त्या प्रदर्शनासाठी अंकल आपली तब्येत बरोबर नसतानाही मोठ्या उत्साहाने जहांगीर आर्ट गॅलरीला आले होते. त्या प्रदर्शनांमध्ये व्यावसायिक यश मिळाल्यामुळे त्यांना खूपच आनंद झालेला दिसत होता. आपल्या गावाकडचा एक मुलगा जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन करतो याचे त्यांना फार कौतुक वाटत होते आणि ते सगळ्या लोकांसमोर बोलून दाखवत होते .पाचगणीत कायमस्वरूपी आर्ट गॅलरी करावी अशी त्यांची फार इच्छा होती. आणि मी सुरुही केली, पण कायमस्वरूपी टिकवू शकलो नाही याची खंतही कायम माझ्या मनात राहिली.

पुढे म्हातारपण आल्यामुळे पेसी अंकल पूर्णपणे थकले होते. हळूहळू डायबेटिस व इतर रोगांनी त्यांना पूर्णपणे घेरले आणि त्यातच त्यांचा अंत झाला .त्यांची पूर्ण प्रॉपर्टी आणि संपत्ती त्यांच्या बहिणीची मुलगी गीता चोक्सी हिने ताब्यात घेतली आणि हळूहळू त्यांचे सर्व सामान , फर्निचर, सर्व वस्तू विकून टाकल्या व अंतिमतः ती जागा व बंगला शेजारच्या बाथा स्कूलला मोठया किमतीमध्ये विकून टाकली… आणि माझा, पेसी अंकल व मेडस्टोन बंगल्याबरोबरचा संबंध कायमचा संपवला…

मी मात्र पेसी अंकलची इच्छा माझ्या ‘निसर्ग ‘ स्टुडीओ व बंगल्याची निर्मिती करून माझी बकेट लिस्ट पूर्ण केली आहे… आजही कोणीतरी सहज बोलता बोलता म्हणून जातात की हा तर पारशी माणसाचा बंगला वाटतो, त्यावेळी नकळतपणे माझे डोळे पाणवतात व वाटते पेसी अंकलला हे माझे घर नक्की आवडले असते व मोठयाने टाळ्या वाजवून ते परत परत म्हणाले असते …

” वेल डन माय बॉय, 

” वेल डन माय बॉय .. अॅटलास्ट यु कंम्लीटेड  युअर बकेट लिस्ट . यु डीड इट…” 

आजही मी ज्यावेळी शांतपणे विचार करतो त्यावेळी मला जाणवते की अशी पेसी अंकलसारखी माणसे माझ्या आयुष्यात आली नसती तर हा माझा चित्रकलेचा काटया -कुट्यातला, सदैव अडचणीतला प्रवास फार पूर्वीच संपुष्टात आला असता.

एखादे चांगलं चित्र झाले आणि मी शांतपणे ते चित्र पहात बसलो की आजही मला टाळ्यांचा आवाज येतो… आणि मोठ्या प्रेमाने कौतुकाचे शब्द ऐकू येतात 

” वेल डन माय बॉय, 

” वेल डन माय बॉय ” 

आणि मी मनातच नतमस्तक होऊन माझ्या ” निसर्ग ” बंगल्याच्या गझीबोमध्ये बसलेला असताना पेसी अंकलच्या ” मेडस्टोन ” बंगल्याच्या परिसराच्या  आठवणीत मनसोक्तपणे रमून जातो …

– समाप्त –

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वारी….सौ.आरती शुक्ल ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ वारी….सौ.आरती शुक्ल ☆ प्रस्तुती – सौ.प्रभा हर्षे

आषाढी एकादशीसाठी वारीची लगबग सुरू झाली की मला हमखास आठवतात ते डॉक्टर गोडबोले. मध्यंतरी काही वर्ष माझी बदली पुण्यात झाली होती. तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली होती. डॉक्टर गोडबोले हे पुण्यातील एक प्रथितयश डॉक्टर. कर्वे रोडला त्यांचं हॉस्पिटल होतं. आणि डेक्कनला बंगला. प्रॅक्टिस जोरात चालली होती. आमची ओळख गेल्या चार वर्षातलीच. या भागात राहायला आल्यावर सकाळी फिरायला जाताना आमची ओळख झाली. दोघांना फोटोग्राफीची आवड असल्यामुळे मैत्री जुळायला वेळ लागला नाही. माणूस एकदम उमदा.  एवढा यशस्वी डॉक्टर असूनही अहंकाराचा स्पर्श नाही. एकदम डाऊन टू अर्थ म्हणतात तसा. त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला. 

एकदा आईला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. त्यावेळी या माणसाला अजून जवळून पाहता आलं. हसत खेळत, मिश्किल टिप्पण्या करत, आलेल्या पेशंटचा अर्धा आजार पळवून लावत ते. हॉस्पिटल मध्ये दोन बेड राखीव ठेवले होते. अगदी गरीब रुग्णांसाठी. उगीच महागड्या चाचण्या नाही. अव्वाच्या सव्वा बिलं नाहीत. सगळ्या रुग्णांशी सारख्याच आपलेपणाने वागणारे डॉक्टर बघताना त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. 

वर्षभर काम करणारे डॉक्टर आषाढीच्या वारीसाठी आवर्जून सुट्टी घेत. हॉस्पिटलची जबाबदारी दुसऱ्या डॉक्टर मित्रावर सोपवून ते आपली गाडी, दोन सहाय्यक आणि औषधांचा साठा घेऊन वारीच्या मार्गावर निघत. जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे तिथे जाऊन थांबत. गरजूंवर मोफत उपचार करत. शेवटच्या मुक्कामावरून शेवटचा वारकरी निघाला की पंढरीच्या दिशेने हात जोडून ते परतीच्या प्रवासाला लागत. या दिवसात ते वारकऱ्यांबरोबर राहत. त्यांच्यात बसून जेवण करत. गप्पा मारत. हे सगळं मला त्यांच्या मदतनिसाने सांगितलं. म्हणून यावेळी मी डॉक्टरांबरोबर वारीला जायचं ठरवलं. फोटोग्राफीसाठी येऊ का असं विचारल्यावर त्यांनी चला की म्हणून परवानगी दिली. 

माऊलींच्या पालख्या पुण्यातून बाहेर पडल्यावर आम्हीही गाडीतून निघालो. गप्पांच्या ओघात मी म्हणालो, 

“डॉक्टर तुमचं खरंच कौतुक आहे. इतक्या निस्वार्थ बुद्धीने लोकांची सेवा करायची, तेही स्वतःचे सगळे उद्योग सांभाळून हे सोप्पं नाही. परत या कानाची त्या कानाला खबर नाही. खरंच ग्रेट आहात तुम्ही !” डॉक्टर हसले. म्हणाले, ” यामागे काही कारण आहे. तुला इच्छा असेल तर ऐकवतो.” मी म्हणालो, ” सांगा ना डॉक्टर. मला खूप उत्सुकता आहे.” 

डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. ” दहा वर्षांपूर्वी मी असा नव्हतो. प्रॅक्टिस चांगली चालली होती. भरपूर पैसा कमवत होतो. फार्म हाऊस, फ्लॅट अशा गोष्टींमध्ये गुंतवत होतो. हॉटेलिंग,  परदेश वाऱ्या, मोठ्या गाड्या अशा तथाकथित स्टेटस सिम्बॉलच्या मागे धावत होतो. फोटो काढायचे. त्यांचं प्रदर्शन भरवायचं, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं मिरवायची. आणि आनंद साजरा करायला पार्ट्या करायच्या .. हे आयुष्य होतं माझं. अशातच डोक्यात आलं वारीच्या मार्गावर फोटो काढावेत.  माझा महागडा कॅमेरा घेऊन मी गाडी घेऊन निघालो. रस्त्यात अनवाणी चालणारे, पावसात भिजणारे, मुक्कामाच्या ठिकाणी गप्पा मारत जेवत बसलेले वारकरी, असे वेगवेगळे फोटो काढत होतो. ते वारकरी माझ्याशी गप्पा मारायला बघायचे. मला त्यांच्यात जेवायला बोलवायचे. भजनाला बोलवायचे. पण त्या गरीब फाटक्या माणसांमध्ये मिसळणे माझ्या स्टेटसला शोभणारे नव्हते. मी त्यातल्या त्यात एखादं चांगलं हॉटेल बघून जेवायचो. झोपायचो.” 

“अशाच एका मुक्कामी मला आबा पाटील भेटले. सगळ्या वारकऱ्यांसोबत जेवत, गप्पा मारत, अभंग म्हणत त्यांच्या बरोबरीने पडतील ती कामं करत होते. मी फोटो काढत असताना ते माझ्याजवळ आले. स्वतःचं नाव सांगून मला जेवायचा आग्रह करू लागले. मी झिडकारून लावल्यावरही न रागावता माझ्याशी बोलत राहिले. पण मी फार प्रतिसाद दिला नाही. नंतरही अधून मधून ते भेटत राहिले मला. शेवटच्या वाखरी गावाच्या अलीकडे पोचेपर्यंत धुंवाधार पाऊस सुरू झाला. आणि गावाजवळ माझी गाडी बंद पडली. मी पावसात उभा राहून काही करता येतंय का ते बघितलं. पण गाडी काही सुरू झाली नाही. मी मात्र चिंब भिजलो होतो. शेवटी कॅमेरा गाडीत ठेऊन गाडी लॉक केली आणि धावत गावाकडे निघालो. गावातल्या एका देवळात जाऊन थांबलो. कपडे पूर्ण भिजलेले आणि बॅग गाडीत. त्यामुळे तसाच ओलेता बसून राहिलो आणि व्हायचं तेच झालं. थंडी वाजून ताप भरला.  गावाकडे यायच्या नादात कपडे औषधं सगळंच गाडीत राहिलं. तसाच कुडकुडत बसलो होतो. तेवढयात आबा पाटील देवळात शिरले. माझी अवस्था बघून माझ्याजवळ आले. म्हणाले कपडे तरी बदलून घ्या. म्हटलं गाडीत आहेत. तर म्हणाले चावी द्या घेऊन येतो. पण विचार केला कोण कुठला अडाणी माणूस हा !  याला गाडीची चावी कशी देऊ ? त्यांना माझे विचार कळले असावेत. त्यांनी त्यांच्या गाठोड्यातला सदरा आणि धोतर काढून दिलं. म्हणाले हे घाला. ओले बसू नका. मी नाईलाजाने कपडे बदलले. त्यांनी त्यांच्याकडची तापाची गोळी दिली. मी जेवलो का याची चौकशी केली. मी काही खाल्लं नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याकडच्या शिध्यामधून थोडा तांदूळ काढला. मागच्या बाजूला आडोसा बघून बाकीच्यांनी चूल पेटवली होती. त्यातच विनंती करून थोडी पेज बनवली आणि मला आणून दिली. खाऊन गोळी घेतल्यावर मला थोडं बरं वाटलं. पाटील बाजूलाच बसून राहिले होते.” 

“आता मला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली. कुठे राहता काय करता वगैरे विचारून झाल्यावर म्हणालो ‘किती वर्ष वारी करताय? ‘ तर म्हणाले ‘आई बापाच्या कडेवर बसायचो तेव्हापासून.’  एक वर्षही वारी चुकवली नव्हती त्यांनी. माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्याची मलाच लाज वाटायला लागली होती. त्यांची क्षमा मागून त्यांना म्हणालो, “ मी तुमच्याशी नीट बोललोही नाही आणि तरी तुम्ही न रागावता माझ्यासाठी एवढं केलंत.” ते हसले आणि म्हणाले, “आज साठ पासष्ट वर्ष वारी करतो आहे. अशा कारणांवरून रागावलो तर ही सगळी वर्ष फुकट गेली म्हणायची. वारीला यायचं ते नुसतं पांडुरंगाला भेटायला नाही. ते तर कधीही येऊ शकतो. इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो. माणसं कळायला लागतात. आपण कुठे आहोत तेही समजतं. एकमेकांशी गप्पा करताना लोकांची दुःखं कळतात. मिळून मिसळून एकमेकाच्या मदतीने काम करायची सवय लागते. दुसऱ्याला सांभाळून कसं घ्यायचं हे कळतं. वारी म्हणजे माणुसकीची शाळा असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार गळून जातो. मी कोणीतरी मोठा आहे, खास आहे ही भावना मनात रहात नाही. आणि माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून जायचं असतं ना ! इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात. दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी रहाते. आणि मग आपोआपच नम्रपणा येतो अंगात.” 

त्यांचं हे बोलणं ऐकून मी खजील झालो होतो. आता परत ताप चढायला लागला होता. घरी जाणं गरजेचं होतं. पण गाडी चालवायची ताकद माझ्यात नव्हती. आबांनी खिशातून मोबाईल काढून एक फोन केला. मग मला म्हणाले, ‘ रात्रीपर्यंत व्यवस्था होईल घरी जायची.’  मी आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे बघतोय हे बघून ते म्हणाले, “ माझा मुलगा येतोय गाडी घेऊन.”  मी म्हणालो, “तुमच्याकडे गाडी आहे ?” ते हसायला लागले. म्हणाले, “ तीन आहेत. भली मोठी शेती आहे. फळबागा आहेत. एक मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. गावातच  प्रॅक्टीस करतात. दुसऱ्या मुलाने शेतीचा अभ्यास केला आणि आता शेतात नवेनवे प्रयोग करतो. तो आल्यापासून पिकं जोमदार येतात. फळं पण बाहेरच्या देशात पाठवतो तो ”. माझं तोंड अजूनच वासलं. ‘ एवढं सगळं असूनही तुम्ही या लोकांबरोबर राहता खाता?’ ..  ते म्हणाले, “अहो माझ्यासारखे कितीतरी असतील या वारीत. स्वतःचं मूळ विसरायचं नसेल तर माणसानं वारीला नक्की यावं ”. 

रात्री गाडी आली. मी निघालो तसे तेही माझ्याबरोबर गाडीत बसले. मी म्हणालो, “अहो उद्या तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे पांडुरंगाचं. तुम्ही कशाला येता. वारी अर्धवट राहील तुमची. पांडुरंग रागवेल.” तसे खोखो हसत म्हणाले, “अहो देव आहे तो. रागवायला तो काय माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा? मुलगा गाडी चालवेल. तुम्हाला काही लागलं तर कोण बघेल? म्हणून येतो. आणि दर्शनाचं म्हणाल तर तुम्हाला अडचणीत एकटं सोडून घेतलेलं दर्शन मला आणि माझ्या पांडुरंगालाही आवडायचं नाही. तुम्ही निर्धास्त रहा.” 

मला पुण्याला सोडून माझा फोन नंबर घेऊन ते बाप लेक लगेच घरी निघाले. आग्रह करूनही थांबले नाहीत . दोन दिवसांनी त्यांचा फोन आला. माझ्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले, “ तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला फोन केला. मुलाच्या नव्या शेतात विहीर खोदताना पांडुरंगाची मूर्ती मिळाली. आषाढीलाच. तुम्हाला टोचणी राहील मला दर्शन घेता आलं नाही याची म्हणून सांगायला फोन केला.” मी स्तब्ध झालो. त्या एका वारीनी माझं आयुष्य, माझी मतं संपूर्ण बदलून टाकली. माझ्या विचारांची मलाच लाज वाटायला लागली. तेव्हापासून मी बदललो. आणि दरवर्षी वारीत जाऊन त्या सगळ्या भक्तांमध्ये मिसळायला लागलो. जेवढी जमेल तेवढी लोकांची सेवा करायला सुरुवात केली.” 

… डॉक्टरांची गोष्ट ऐकून मीही भारावलो. नकळत पांडुरंगाला हात जोडले. बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांचा टाळ चिपळ्याच्या तालातला जयघोष कानावर पडला.  विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल !

लेखिका : सौ आरती शुक्ल

प्रस्तुती : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वदेशीचा जादू… भाग – १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ स्वदेशीचा जादू… भाग – १ ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे  

जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा. माझ्या देशातल्या मातीत, पानोपानी सोने आहे. पण त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नसते. चमकणाऱ्या विदेशी वस्तू आम्हाला आकर्षित करतात. पण जे चकाकते ते सगळेच सोने नसते ही गोष्ट आम्ही सोयीस्कर विसरतो. जेव्हा आमच्या हळदीवर, बासमती तांदळावर, कडुलिंबाच्या औषधी उपयोगांवर दुसऱ्या देशांनी पेटंट घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे आम्हाला जाग आली. अन्यथा आपल्या गोष्टींचे महत्व आम्हाला कुठे ? पूर्वी आमच्या दंतमंजनात कोळसा आणि मीठ आहे म्हणून हिणवणाऱ्या विदेशी कंपन्या आज मोठ्या गर्वाने आमच्या टूथपेस्टमध्ये कोळसा, मीठ वगैरे आहे म्हणून टेंभा मिरवतात. तेव्हा आम्हाला त्याचे महत्व कळते. एखादी गोष्ट जोपर्यंत दुसरे लोक सांगत नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याचे महत्व कसे बरे पटावे ? वस्तूंच्या बाबतीतच काय, पण माणसांच्या बाबतीत सुद्धा आम्ही असेच वागतो. स्वामी विवेकानंद जोपर्यंत अमेरिकेतील शिकागो येथे आपले विचार प्रकट करून जगन्मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला सुद्धा त्यांचे महत्व कळत नाही. स्वदेशी वस्तू, स्वदेशी वनस्पती, स्वदेशी खाद्यपदार्थ आणि आमच्याकडील विचार, सेवा आणि बुद्धिमत्ता यांचा वरदहस्त असलेली माणसे या सगळ्यांचे महत्व आम्हाला कधी कळणार ?  

व्होकल फॉर लोकल, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या सगळ्या घोषणांचे म्हणूनच महत्व आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात, म्हणून मी हे म्हणतो असे बिलकुल नाही. हा निर्णय आजच्या काळाला सुसंगत आणि आवश्यक असा आहे म्हणूनच त्याचे महत्व समजून घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवातीला लोकमान्य टिळक आणि नंतर म, गांधी यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. स्वदेशी चळवळीची गरज आजही तेवढीच आहे. फक्त आज संदर्भ बदलले आहेत. त्या काळात तो लढा ब्रिटिश सत्तेविरुद्ध होता. आज आपल्याला आपल्या स्वतःसाठी तो लढायचा आहे. जागतिकीकरण, खुल्या अर्थव्यवस्थेच्या या काळात आपल्याला घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणार नाहीत, पण तारतम्याने विचार करावा लागेल. त्याबाबतचे राजकीय, राष्ट्रीय धोरण राज्य सरकारे, केंद्र सरकार भलेही ठरवील. ते त्यांना ठरवू देत, पण तुम्ही आम्ही आहार विहार, आचार विचाराने स्वदेशी होऊ या. 

स्वदेशीची जादू कोरोना काळात आपण अनुभवली आहे. लोकल उत्पादने, लोकल मार्केट, लोकल सप्लाय चेन या गोष्टींनी आम्हाला त्या वेळी फार मोठा मदतीचा हात दिला आहे. आपल्या मागण्यांची पूर्तता केली आहे. या लोकललाच आपला जीवनमंत्र बनवला पाहिजे. या कोरोना काळातच आपण अनेक अवघड गोष्टी करून दाखवल्या आणि स्वदेशीची जादू पाहिली आहे. कोरोना काळात ज्यांची तीव्रतेने आवश्यकता भासली असे व्हेंटिलेटर आपल्या देशात कितीसे बनत होते ? पण कोरोनाचे संकट आले आणि अनेक कंपन्यांनी यात आघाडी घेवून ते बनवायला सुरुवात केली. मग भारतानेच अनेक देशांना व्हेंटिलेटर पुरवले. त्याच पद्धतीने कोरोना लशींवर भारतीय वैद्यकीय संस्थांनी संशोधन करून विक्रमी वेळेत लशी तयार केल्या. यापूर्वी मिसाईल मॅन आणि आपले माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली आपण स्वदेशीचा वापर करून अण्वस्त्रे तयार केली. आज आपण अनेक उपग्रह, चांद्रयान बनवतो आहे, त्यांचे प्रक्षेपण करतो आहोत.

या सगळ्या गोष्टी अभिमान वाटावा अशा निश्चितच आहेत. पण आमच्या आचार विचारात, जगण्यात स्वदेशी आले आहे का ? आमच्या जगण्याचा तो एक भाग झाला आहे का या प्रश्नाचे उत्तर निश्चितच नकारार्थी द्यावे लागेल. राज कपूरच्या ‘ श्री ४२० ‘ या चित्रपटात एक गाणे आहे. ‘ मेरा जुता हैं जपानी, ये पतलून इंग्लीस्तानी, सरपे लाल टोपी रुसी, फिर भी दिल हैं हिंदुस्तानी ‘ असे गाणे आहे. त्यात त्याच्या वापराच्या सगळ्या वस्तू जरी विदेशी असल्या तरी मन मात्र हिंदुस्तानी आहे. पण यात आता बदल व्हायला हवा. केवळ ‘ दिलच हिंदुस्तानी ‘ असून भागणार नाही, तर वापरातील सर्वच वस्तू स्वदेशी असायला हव्यात. कदाचित आपल्याला माझे म्हणणे पटणार नाही, कोणाला माझा सूर नकारार्थी वाटेल तर अजून कोणी म्हणेल की असे काय आहे त्यात, ज्याबद्दल तुम्ही सांगताय ? पण ज्यावेळी मला काय म्हणायचे आहे हे आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला माझे म्हणणे पटेल. तोपर्यंत स्वदेशीची जादू कळणार नाही. आमच्या आहारातील खाद्यपदार्थ, आमची पेये, आमच्या वनस्पती, झाडे, वृक्ष, वेली, आम्ही घेत असलेली पिके, वापरत असलेली खते, कीटकनाशके, आमचा आयुर्वेद,आमचा योग या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने स्वदेशी हव्यात. कशासाठी ? या सगळ्या गोष्टी आमचे जीवन समृद्ध आणि आरोग्यसंपन्न करणाऱ्या आहेत. 

आपण सुरुवात खाद्यपदार्थांपासून करू. एकदा मी आणि माझे कुटुंबीय एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये पिझ्झापासून ते थालीपीठापर्यंत सर्व पदार्थ उपलब्ध होते. मला तिथले थालीपीठ खाण्याची इच्छा होती. तिथे आलेली तरुणाई मात्र पिझ्झावर ताव मारत होती. आणखी एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो, तिथे विविध प्रकारचे बर्गर्स उपलब्ध होते आणि त्या सोबत पिण्यासाठी पाणी नव्हते तर तिथे दिले जाणारे कोल्ड ड्रिंक घ्यायचे होते. या सगळ्या प्रकारांनी मी विचारात पडलो. हे सगळे पदार्थ कितपत आरोग्यदायी आहेत, यावर माहिती घेऊ लागलो. 

पिझ्झा, बर्गर, नूडल्स, फ्राईज, पॅटिस, पेस्ट्री, कुकीज, मोमोज, चाऊमिन यासारख्या पदार्थांना फास्ट फूड किंवा जंक फूड असे नाव आहे. यातील बरेचसे पदार्थ मैद्यापासून बनलेले असतात. पाव, बिस्कीट आदी सगळे बेकरी प्रॉडक्ट्स सुद्धा मैद्यापासूनच बनतात. मैदा हा पोटाच्या तक्रारी वाढवणारा आणि अजिबात फायबर नसलेला पदार्थ आहे. हे सगळे पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स कधीतरी ठीक आहेत पण वारंवार खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. या पदार्थांमध्ये कॅलरीज आणि अतिरिक्त साखर असते. पौष्टिक तत्वे मात्र नगण्यच असतात ! जास्त फॅट, अतिरिक्त साखर आणि मीठ यामुळे हे पदार्थ चविष्ट तर बनतात पण आरोग्यावर दुष्परिणाम करतात. रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात. या पदार्थानी टाईप टू डायबिटीस, हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. वजनात वाढ होणे, श्वसन संस्थेचे आजार बळावणे असेही दुष्परिणाम होऊ शकतात. 

चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो नावाचा घटक वापरतात. त्याला चायनीज सॉल्ट असेही म्हटले जाते. त्यामुळे खाद्यपदार्थांना एक वेगळी चव येते. तरुणाई विशेष करून या पदार्थांकडे आकृष्ट होते. या पदार्थांची लहान मुलांना लवकर सवय लागते. पण वारंवार असे पदार्थ खाणे आरोग्याला घातक ठरते. आपल्याकडील भाकरी, पोळी, भाज्या, पोहे, थालीपीठ इ देशी पदार्थात भरपूर फायबर्स असतात. आरोग्यासाठी ते उपकारक असतात. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. आपण ते करताना अतिरिक्त साखर, मीठ इ चा वापर करत नाही. त्यामुळे त्यांच्या दुष्परिणामापासूनही दूर राहतो.

क्रमशः… 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग  ४ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील भागात आपण पाहिले –‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळ सोडायला कोणी सांगितल होत? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला.’ अस म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला. आता इथून पुढे)

पाटणकर घाबरले. चव्हाण मॅडम थरथरु लागल्या. कोण मुल आलेली नाहीत याची चौकशी करताना संस्थेच्या सदस्या साळगांवकर मॅडम यांची कन्या आलेली नव्हती. पाच वाजले तरी मुलं आली नाहीत. शेवटी पाटणकरांनी कळंगुट पोलिस स्टेशनला तक्रार दिली. दोघांची नावे आणि फोटो दिले. इन्स्पेटर ने जवळपास कुठल्या बिचवर सतरा-अठरा वर्षाची मुलं समुद्रात बुडाली होती काय ? याची चौकशी केली. सुदैवाने त्या दिवशी संपूर्ण गोव्यात कसलीही  दुर्घटना झाली नव्हती. मग इन्सपेटरनी कळंगुट च्या आसपास सर्व हॉटेल्स, बीअर बार, लॉजेस मध्ये फोटो पाठवून चौकशी करण्याची ऑर्डर दिली. यावेळेपर्यंत गाडीत बसलेल्या मुलांनी आपापल्या घरी ही बातमी कळविली होती. त्यामुळे गावात सगळीकडे ही बातमी पसरली. पाटणकरांना आणि चव्हाण मॅडमना फोनवर सतत फोन येत होते. पण त्यांनी ते न घेण्याचे ठरविले.

पंधरा मिनीटांनी एका बार वाल्याचा मेसेज आला. सव्वा तीन वाजता एक मुलगा आणि एक मुली आपल्या बार मध्ये बीअर पीत बसली होती. मग ते टॅसीच्या शोधात रस्त्यावर फिरत होते. ताबडतोब शहरातील सर्व टॅसीवाल्यांची चौकशी झाली. रात्री आठ वाजता निरोप आला. एका टॅसीवाल्याने दोघांना कर्नाटक सीमेपर्यंत सोडल होत. तेथील आजूबाजूच्या लॉजवर चौकशी केली गेली आणि रात्री नऊ वाजता एका लॉज मध्ये हा मुलगा आणि मुली सापडली.

गावात जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यात साळगांवकर बाईंची मुलगी असल्याने जास्त खमंग चर्चा. एव्हाना गावातून दहा-बारा गाड्या माणसे भरुन कळंगुट पोलिस स्टेशन कडे आल्या होत्या. साळंगावकर बाई आणि तिचा नवरा पोलिस स्टेशनमध्ये आले आणि ते पाटणकरांना शिव्या घालू लागले. रात्री अकरा वाजता पोलिसांनी त्या मुलांना कळंगुट पोलिस स्टेशनवर आले. कळंगुटच्या आमदाराच्या मदतीने सर्व प्रकरण मिटवले आणि पालकांनी मुल आपल्या ताब्यात घेतली आणि रात्री बारा वाजता सहलीसाठी बाहेर पडलेली मुलं, पाटणकर सर, चव्हाण मॅडम आणि गावाकडून आलेल्या गाड्या गावाकडे निघाल्या. पाठीमागुन साळगांवकर मॅडम, साळगांवकर आणि त्यांच्या वाडीतील अनेकजण येत होते. साळगांवकर आणि साळगांवकर मॅडम दात ओठ खात होते. अख्या गावात तोंड दाखवायला जागा नव्हती आणि हे सर्व त्या पाटकरांमुळे. साळगांवकर बाई बडबडू लागल्या. तरी मी चेअरमनांना सांगत होते. ‘त्या मुर्ख माणसाला शाळेत घेऊ नका. पण चेअरमन म्हणाले सहा हजारात या गावात कोण येणार?’

साळगांवकर, शिव्या घालत बोलू लागला. त्या चेअरमनला मग बघतो. आधी या पाटणकराला बघतो. एकतर मुलांना बीचवर एक तास सोडला आणि मग पोलिस तक्रार करतो. केवढी बेअब्रु झाली माझी. नाही या पाटणकरला ठार मारला तर नावाचा साळगांवकर नाही.

‘अहो,त्याला ठार मारु नका हा. तुरुंगात जाल. मोडून ठेवा फत. आधीच या कार्टीची मला काळजी लागली. त्या पोराबरोबर पळून जात होती. आता हीची शाळा बंद. मुंबईला ताईकडे पाठविते हिला आणि लग्न करुन देते.’

मिराशींच्या घरात पण जोरात चर्चा सुरु होती. मिराशी बायकोला सांगत होते.

‘त्या साळगांवकराचा पॉर लय चालू आसा. तेच्या बापाशीक मी सांगलेलय ह्या कोणाकोणाबरोबर फिरत असता. तेचा लवकर लगीन लावन टाक पण झाला ता बरा झाला. साळगांवकरनीचो तोरो जरा कमी होतोलो. नाहीतरी चेअरमनांच्या संगतीत हीका वाटा होता सगळी शाळा आपल्या खिशात.’

एवढ्यात भयभीत झालेली पाटणकरांची बायकोवनिता आपल्या मुलाला कमरेवर मारुन आली. मिराशींना म्हणाली. ‘भावोजी, शाळेकडे माणसा जमली आसत. पाटणकरांका मोडून ठेवतलव असा बडबडतत. माका भीती वाटता. ’

‘वहिनी घाबरु नकात . मी कसा काय ता बघतयं. मी पण शाळेकडे जातय.’ अस म्हणून मिराशी आपल्या स्कूटरवर बसून शाळेकडे गेले. घाबरलेल्या वनिताने आपल्या भावाला कनेडीत फोन केला आणि त्याला ही बातमी सांगितली आणि साळगांवकरच्या वाडीतले लोक पाटणकरांना मारण्याची भाषा बोलत आहेत अशी बातमी दिली. भाऊ म्हणाला, वनिता घाबरू नकोस. मी दहा मिनिटात गाडी घेऊन निघतय.

रात्रौ अडीच वाजता सहलीची बस शाळेकडे पोहोचली. मुलांचे पालक शाळेकडे उभे होतेच. मुल पटापट उतरली आणि आपल्या पालकांकडे गेली. पाटणकर, चव्हाण बाई उतरले. बस पाठोपाठ साळगांवकरांची गाडी आली. दारु पिऊन टाईट झालेल्या साळगावकराने कमरेचा पट्टा काढला आणि तो पाटणकरांना बडवू लागला. सर्व पालक पाटणकर पट्टयाचा मार कसा खातात याची मजा घेत होते. एवढ्यात मिराशी पुढे आले आणि साळगावकरांनी उगारलेला पट्टा त्यांनी हवेतच हातात पकडला आणि खेचून घेतला. मिराशी ओरडून म्हणाला, ‘हरामखोर साळगांवकरा, या गरीब मास्तराक मारतस? तुझ्या पोरीन शेण खाल्ल्यान आणि त्या मास्तराक जबाबदार धरतस?’

‘मग? त्याने मुलांना बीचवर का सोडल? आणि मग पोलिस तक्रार का केली?’

‘अरे, मुलं सहलीला गेली होती ना? मनासारखं फिरु दे त्यांना म्हणून सोडली. बाकीची वीस मुलं वेळेत गाडीत आली. तुझा चेडू आणि तो फर्नाडिसाचो झील तेवढे पळाले ह्या दोघांका मी देवळाच्या पाठीमागे कितीवेळा बघलय. तुका सांगलेलय ह्या चडवार लक्ष ठेव. आता पाटणकरांवर हात उचलशीत तर मुळासकट उपटून टाकीन लक्षात ठेव.’

साळगांवकर जळफळत होता. पाटणकरांना आई-बहिणीवरुन शिव्या देत होता. एवढ्यात कनेडीहून पाटणकरांचा मेहूणा दोन गाड्या भरुन माणसे घेऊन आला. पटापट दरवाजे उघडले गेले आणि हातात दांडे घेतलेले दहा जण बाहेर आलेत. पाटणकरांच्या मेहुण्याने हातात सुरा घेतला आणि पट्टा हातात घेतलेल्या साळगांवकराच्या मानेवर लावला.

‘वा रे मुडद्या, या गरीब शिक्षकावर हात टाकतस? कित्या तो शिक्षण सेवक आसा म्हणून? पैशानं गरीब आसा म्हणून? भानगडी केल्यान तुझ्या चेडवान आणि या पट्टयान मारतस या मास्तरास. थांब तुझो कोथळो बाहेर काढतय.’

पाटणकरांच्या मेहुण्याने सुरा पोटावर लावताच साळगांवकर रडू लागला. हातापाया पडू लागला. साळगांवकरांची मित्रमंडळी एवढी सगळी  दांडे हातात घेतलेली माणसे बघून पळू लागली. मिराशी पुढे झाले आणि त्यांनी मेहुण्याला थांबविले. ‘रक्तपात करु नको बाबा. पोलिस मागे लागतले. एकवेळ सोड तेका.’

मेहुण्याने सुरा बाजूला केल्या आणि साळगांवकरांच्या दोन थोबाडीत दिल्या. बरोबरीच्या साथीदारानी दांड्यानी त्याच्या पाठीवर मारले. साळगांवकर गुरासारखा ओरडू लागला. मिराशीनी दोघांना दूर केले. मग मेव्हण्याने साळगांवकरांच्या मानेला धरले आणि उचलून पाटणकरांच्या पायावर घातले. पाया पड तेंच्या. अरे डबल ग्रॅज्युएट माणूस आसा तो. शिक्षण सेवक झालो म्हणून तुमका तेंची किंमत नाय. साळगावकर लंगडत लंगडत बाजूला झाला. मग मेहुणा पाटणकरांकडे वळला. पाटणकरांची पाठ, मान, दंड रक्ताने माखले होते.

‘चला भावोजी, तुमका डॉटरकडे नेऊन मलमपट्टी करुक होयी आणि आजपासून ह्या गाव आणि ही शिक्षण सेवकाची नोकरी सोडायची. तुम्ही कितीही हुशार असलात कितीही शिक्षण घेतलात तरी तुम्ही शिक्षण सेवक झालात की तुमची किंमत शून्य. ही असली नोकरी करण्यापेक्षा मी तुमका धंदो काढून देतय.’

मेहुण्याने पाटणकरांना गाडीत घेतले. वाटेत बहिणीच्या घरी जाऊन घरातील सर्व सामान आणि बहिणीला आणि तिच्या मुलाला घेऊन कणकवली गाठली.

पंधरा दिवसांनी कणकवलीत ‘पाटणकर हेअर कटींग सलून एसी’ सुरु झाला. पाटणकरांच्या मेहुण्याने आपला अनुभवी कारागिर सोबत दिला. हळूहळू पाटणकरांनी सर्व शिकून घेतले. दोन महिन्यांनी ते सलून मध्ये व्यवस्थित काम करु लागले. पाटणकर हेअर कटींग सलूनला लोकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका वर्षात दुसरे सलून कणकवली स्टेशनजवळ काढले.

आता पाटणकर मजेत आहेत. व्यवसायात चांगले पैसे मिळवत आहे. बायको -मुलगा खूष आहेत. तरीपण पाटणकरांच्या झोपेत आर्किमिडीज, न्यूटन येतो. स्पेट्रम थिअरी येते. सरफेस टेंशन येते आणि मग अजून आपण शिक्षण सेवक असल्याचे त्यांच्या स्वप्नात येते आणि ते घाबरतात. मग जाग आल्यावर आपण पाटणकर हेअर कटींग सलून चे मालक असल्याचे तेंच्या लक्षात येते आणि ते कुशीवर वळतात आणि ते गाढ झोपी जातात.

 – समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग  ३ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

(मागील  भागात आपण पहिले –  पाटणकरांच्या लक्षात आले. आपले दोन सहकारी आहेत. सावंत आणि जांभळे. दोघेही परमनंट आहेत शिवाय जांभळेंची बायको शिक्षिका आहे. म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. – आता इथून पुढे)

दुसर्‍या दिवशी त्यांनी सावंत सरांना गाठले. सावंत सरांना भेटताना त्यांच्या लक्षात आले, हे सर आता रिटायरमेंटला आले म्हणजे यांचा पगार एक लाखाच्या आजूबाजूला असणार. आपल्याला फत पाच हजाराची गरज आहे.

‘सावंत सर, माझं एक काम होतं. ’

‘होय काय. पैशाचे सोडून काही काम असेल तर सांगा.’

‘पैशाचेच होते. फत पाच हजार हवे होते. ’

‘‘नाय ओ. मीच कर्ज घेतलयं. त्याचे हप्ते भरतय आणि तुमच्या या सहा हजारात तुम्ही पैसे परत कशे करणार बाबा? नाही जमायचे.’

हिरमुसले होत पाटणकर बाहेर पडले. आता जांभळे सर म्हणजे नवरा बायकोचा पगार. म्हणजे किमान दीड लाख रुपये. हे नाही म्हणणार नाहीत असा पाटणकरांचा अंदाज होता.

‘जांभळे सर, थोडं काम होत. ’

‘बोला पाटणकर. ’

‘फत पाच हजाराची गरज होती. पगार झाला की तुमचे पैसे निश्चित देणार’

जांभळे सर खो-खो हसत म्हणाले, ‘पाटणकर शिक्षण सेवक कधी कुणाचे उधार घेतलेले पैसे देतो काय हो? तुमचे महिन्याचे मानधन वेळेत मिळत नाही म्हणजे तुम्ही अनेकांकडून पैसे उधार घेतलेले असणार. मग माझे देणार कसे? मी कधीच कुणाला पैसे देत नाही. पैसे कमवण्यास घाम गाळावा लागतो. पैसे काय झाडाला लागतात?’

‘‘हो सर, बरोबर आहे तुमचं.’ असं म्हणून पडेल चेहर्‍याने पाटणकर बाहेर आलेत. बाहेर पडता पडता शाळेचा प्यून मोहन ने त्यांना पाहिले. मोहनला पहिल्यादिवसापासून पाटणकरांची दया येत होती. गरीबीतून हा मुलगा नोकरीस लागला तो शिक्षण सेवक म्हणून. चार वर्षे आधी शिक्षण पुरे केले असते. तर एव्हाना साठ-सत्तर हजार मिळवले असते. मोहन ने पाटणकरांना बाजूला घेतले. ‘सर, काय प्रॉब्लेम होतो?’

‘काही नाही ओ. असंच. ’

‘असंच नाही. माझ्या कानात शब्द पडलेत. या जांभळ्याकडे पैशे मागूक गेलात. अहो जांभळो म्हणजे एक नंबर चिकटो.’ किती पैसे हवेत? मी देतलय. अहो माका चाळीस हजार रुपये पगार आसा माका खर्च कसलो? किती व्हयेत सांगा. उद्या आणून देतलय.

‘कसं सांगणार तुम्हाला. पण पाच हजाराची गरज होती. ’

‘उद्या तुमका पाच हजार रुपये मिळतले. ’

आणि खरोखरच मोहन ने पाटणकरांना पाच हजार रुपये दिले आणि वर सांगितल पाटणकर हे पैसे परत करु नकात आणि तुम्ही दिलात तरी मी घेवचय नाय.

‘पण मोहनराव असा कसा?’

मोहन तेथून दुसरीकडे निघून गेला होता. पाटणकरांचे मन भरुन आले. आपले पैसे मिळाले की मोहन चे पैसे परत करायचे हे त्यांनी मनोमन ठरविले.

पाटणकरांची बायको खुश झाली. या लग्नासाठी साड्या, ब्लाऊज, मुलासाठी कपडे आणि बळेबळे नवर्‍याला पण पॅन्ट-शर्ट घ्यायला लावले.

जानेवारी महिना उजाडला आणि अकरावी-बारावी ची सहल काढण्याच टूम निघाली. या वर्षी गोव्याला जायचे ठरले. एकंदर बावीस मुला-मुलींनी सहलीला येण्याची तयारी दाखविली. सोबत शिक्षक म्हणून पाटणकर आणि खालच्या वर्गात शिकवणार्‍या चव्हाण मॅडम जाणार होत्या. सकाळी सहा ला बस मधून जायचे आणि संध्याकाळपर्यंत परत यायचे असा कार्यक्रम ठरला. कणकवलीतून बस येणार होती. एकंदर बारा मुलगे, दहा मुली, दोन शिक्षक असे चोवीस जण सहलीला निघाले.     

पाटणकरांनी सहलीचा कार्यक्रम निश्चित केला आणि तसे ड्रायव्हरला सांगितले. गाडी साडे सहाला निघाली. गोव्यातील ओल्ड चर्च, शांतादुर्गा, मंगेशी देवस्थाने तसेच पणजी करत दुपारी तीन च्या सुमारास कळंगुट बीच वर आले. पाटणकरांनी आणि चव्हाण मॅडमनी मुलांना येथे एक तास दिला. समुद्रावरुन फिरुन चार वाजता पुन्हा बसकडे या. चार वाजता बस सुटेल असे निक्षून सांगितले. मुल-मुली खुशीत समुद्रावर धावली. पावणेचार झाले तसे पाटणकर आणि चव्हाण मॅडम बसकडे आले. चारला पाच मिनिटे असताना मुल-मुली गाडीकडे येऊ लागली. चार वाजले तसा ड्रायव्हर येऊन बसला. चव्हाण मॅडमनी मुल-मुली मोजली तर वीस मुल भरली. म्हणजे दोन मुल आली नव्हती. अजून पाच दहा मिनीटे थांबून पुन्हा पाटणकर खालीपर्यंत पाहून आले. दोन मुल आली नव्हती. कोण नाही आली याची चौकशी केली तर बारावीतील एक मुलगा आणि अकरावीतील एक मुलगी आली नव्हती. पाटणकर घाबरले. पाटणकरांनी मुलांकडे आणि चव्हाण बाईंनी मुलींकडे चौकशी केली तर मुल एकमेकांकडे बघून खुसुखुसु हसत राहिली. चव्हाण बाई पाटणकरांना म्हणाल्या, काहीतरी गडबड आहे. ही मुलं गेली कुठे? शेवटी जबाबदारी पाटकरांची होती. त्यांनी आपल्या जबाबदारीवर मुलांना एक तासा करिता सोडल होत. म्हणता म्हणता साडेचार वाजले तरी या दोन मुलांचा पत्ता नाही. पाटणकरांच्या घशाला कोरड पडली . काय कराव हे कळेना. त्यांनी शाळेत फोन केला आणि मुख्याध्यापकांना ही बातमी सांगितली. जोंधळे चिडले. ‘तुम्हाला मुलांना समुद्रावर मोकळ सोडायला कोणी सांगितल होत? आता काय जबाब देणार पालकांना? आता तेथल्या पोलिसांना तक्रार द्या. दुसरा काही उपाय दिसत नाही मला.’ अस म्हणून जोंधळेंनी खाड्कन फोन आपटला.

– क्रमश: भाग ३ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग २ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

मागील भागात आपण पहिले –  ह्या बघा आमचो मांगर आसा. बंद असता. तुमका जमला तर रवा.

पण भाडा?

ह्या पगारात भाडा काय देतालात ओ? भाडा नको. फत माझो झील आसा आठवीत तेच्या अभ्यासार लक्ष ठेवा. ‘ –  आता इथून पुढे )

हो. हो. निश्चित. पण पाण्याची सोय वगैरे ?

विहीर आसा. भरपूर पाणी. मांगरात एक मोरी आसा. विठू, मास्तरांका मांगर उघडून  दाखव. दुकानदार मिराशी चा नोकर विठू पुढे चालू लागला तसे मास्तर तेच्या मागून गेले. पाटणकरांनी मांगर पाहिला. जागा बरी होती. बाहेर एक खोली आत एक. त्याखोलीत मोरी. मांगराला मागचे दार होते. थोड्या अंतरावर विहीर होती. विहीरीवरुन बायका पाणी नेत होत्या. म्हणजे बायकोला वनिताला सोबतीण मिळणार. पाटणकरांना जागा बरी वाटली. त्यांनी दुकानदार मिराशींना सांगून टाकले. रविवारी सामान घेवून येतो. मिराशी म्हणाले, भाडा नको. पण लाईट बिल तेवढा भरा. पाटणकर घरी जायला निघाले. त्यांचे लक्ष परत त्या छोट्याशा सलून कडे गेले. आता सलून मध्ये कुणीतरी दाढी करायला बसला होता. ह्या व्यवसायामुळे आपली भावंडे, आई-वडिल दोन घास जेवतात. ह्या सलूनाचा पाटणकरांना आधार वाटला.

रविवारी सकाळी पाटणकरांची बायको वनिता आपल्या दोन वर्षाच्या मुलासह एस.टी ने आली. त्याच्या आधी पाटणकर येवून पोचले होते. मिराशींच्या दुकानातील झाडूने त्यांनी मांगर स्वच्छ केला आणि सोबत आणलेल्या कळशीने दोन बादली पाणी भरुन ठेवले. मिराशींच्या बायकोने चूल पेटवायला म्हणून सोडणे, झावळ्या, थोडी लाकडे दिली. वनिता ने सोबत आणलेल्या तांदळाची पेज आणि मिराशींच्या वाट्यावर चटणी वाटली. मिराशींच्या दुभत्या म्हशी होत्या, त्यामुळे दुधाचा प्रश्न मिटला. आणि पाटणकरांचा संसार या नवीन गावात सुरु झाला.

दुसर्‍या दिवशी पाटणकर शाळेत हजर झाले. अकरावी साठी फिजिक्स शिकवायला वर्गात गेले. मुला-मुलींची ओळख करुन घेताना त्यांच्या लक्षात आले की मुल त्यामानाने मोठी आहेत. बहुतेकजण अठरावर्षापेक्षा जास्त वयाची होती. चौकशी करताना समजले, हुशार मुलं दुसरीकडे शिकायला गेली आणि ज्या मुलांना पुढे शिकायच नव्हत ती मुलं या शाळेत येत होती. पाटणकरांनी फिजिक्स मधल सरफेस टेंशन हा धडा शिकवायला सुरुवात केली. त्यांनी फळ्यावर डायग्राम काढून थोड इंग्रजीत, थोड मराठीत शिकवायला सुरुवात केली. काही वेळा नंतर शिकवलेल्या अभ्यासाच्या नोटस् लिहायला घातल्या. सहजच, ते खाली उतरुन विद्यार्थ्यांच्या वह्या बघायला गेले तर त्यांना आश्चर्य वाटले. बहुतेक मुलांनी काहीही वहीत लिहीले नव्हते. मुलांचे म्हणणे त्यांना इंग्रजी लिपी व्यवस्थित येत नाही. त्यांनी एका मुलीला उठविले. अगं, मी घातलेले तु का लिहीत नाहीस?

सर, आमका इंग्रजी येना नाय. मराठी येता. मराठीत अभ्यास घाला.

अगं, पण परिक्षा इंग्रजीत असते. सर्व सायन्स इंग्रजीत शिकावे लागते.

पण आमका इंग्रजीची भिती वाटता.

मग दहावीत पास कसे झालात तुम्ही?

एक मुलगा मागून ओरडला. कॉपी करुन.

म्हणजे?

आमचे इंग्रजी चे शिक्षक चाळीस मार्काचा सगळ्यांका सांगत. म्हणून आम्ही पास झालो.

मग तुम्ही सायन्स ला का अ‍ॅडमिशन घेतलीत?

आमका पुढे नर्सिंग करुचा आसा. बारावी सायन्स झालव की नर्सिंग मध्ये अ‍ॅडमिशन गावतली.

मग बारावी पास व्हायला लागेल ना?

दहावी पास झालव तसे बारावी पास होतोलव.

पाटणकरांनी डोयाला हात लावला. लेचर संपल्यानंतर त्यांना केमिस्ट्री शिकवणारे सावंत सर भेटले. सावंत सर, गेली दहा वर्षे म्हणजे सुरुवातीपासून येथे केमिस्ट्री शिकवत होते.

‘सावंत सर, मी आता अकरावी वर फिजिक्स शिकवण्याचा प्रयत्न केला, पण मुलांना साधं एबीसीडी येत नाही. त्यामुळे मी नोटस् घालत होतो ती कोणी लिहून पण घेतली नाहीत.’

‘त्यात नवीन ते काय? मी गेली दहा वर्षे इथे शिकवतोय. अशीच मुले आहेत या ठिकाणी.’

‘मग, ती बारावी पास कशी होणार?’

‘नाही होईनात. आपल्याला पगार मिळण्याशी मतलब. मी परमनंट शिक्षक आहे. माझ कोणी काही करु शकत नाही आणि  मॅनेजमेंट ने जास्त गडबड केली तर आमची युनियन आहे. मी घाबरत नाही कोणाला. तुझ काय ते बघ कारण तु शिक्षण सेवक.’

‘होय ना, सावंत सर. मी शिक्षण सेवक आहे. मला मॅनेजमेंट विचारत राहणार.’

‘हे बघ पाटणकर, तुला इथे टिकायचे असेल तर सांगतो. तु शिकवण्याचे काम करतो. प्रॅटीकल्स घे. सर्व चाचणी परिक्षेत मुलांना पास कर. अकरावीत सर्वांना पास कर कारण ते तुझ्या हातात आहे. बारावीत बघू, त्यांच्या काय नशिबात असेल ते. दोन वर्षांनी दुसरीकडे नोकरी बघ.’

पाटणकर गप्प झाले. शांतपणे फिजिक्स शिकवू लागले. प्रॅटीकल्स घेऊ लागलेत. चाचणी परिक्षेत मुलांना पास करु लागले.

पाटणकरांची बायको वनिताने आजूबाजूच्या बायकांबरोबर ओळख वाढविली. मिराशींच्या घरी तिचे जाणे येणे होतेच. काही हवे असले तर मिराशींची बायको तिला द्यायची.

संस्थेने पहिले दोन महिने पाटकरांना सहा हजार रुपयाप्रमाणे मानधन दिले. तिसरा महिना संपला चौथ्या महिन्याची दहा तारीख आली तरी पैशाचा पत्ता नाही. वनिता नवर्‍याकडे एकसारखी पैसे मागत होती. घर सामानाला पैसे हवे होते. मिराशींची उधारी चालू होती. भाजीला पैसे हवे होते. दुधाचे पैसे  द्यायचे होते. चौथ्या महिन्याची पंधरा तारीख आली तसे पाटणकर क्लार्क कोळंबकर ना भेटायला गेले.

‘कोळंबकर, अहो माझा पगार नाही दिला. आज पंधरा तारीख. मी माझा संसार कसा चालवू?’

‘अहो, पाटणकर. ह्यो सरकारचो पगार न्हय. एक तारखेक गावणारो. हेका मानधन म्हणतत. मुला जेव्हा फीचे पैसे भरतली त्यातून तुमचा मानधन.’

‘पण केव्हा मिळेल.?’

‘तुम्ही चेअरमनांका विचारा मी काय सांगू?’

दुसर्‍या दिवशी शाळा सुटल्यावर पाटणकर चेअरमनांच्या घरी गेले. तर चेअरमन सोसायटीत गेले होते. पाटणकर चौकशी करत सोसायटीत गेले. चेअरमन दोस्तांसमवेत गप्पा मारत बसले होते. पाटणकरांनी त्यांना नमस्कार केला.

‘हा काय पाटणकर इकडे कसो काय?’

‘साहेब, मागील महिन्यात पगार नाही झाला. पंधरा तारीख आली म्हणून आलो होतो.’

‘हे बघ पाटणकर, शिक्षक सेवकांचो पगार म्हणजे मानधन. एक तारखेक मिळात हेची गॅरंटी नाय. या आधी जे होते तेंका पण वेळेत कधी पैसे मिळाक नाय. मुलांकडून जसे पैसे जमतीत तसे पैसे देणार. संस्थेकडे पैसे नाहीत बाबा. नोकरी स्विकारताना विचार करायला हवा होतास तु. ’

‘पण साहेब, माझ कुटुंब…’

‘हे बघ मी काही करु शकत नाही. तु जा. ’

पाटणकर निराश मनाने बाहेर पडले. घरी येऊन वनिताला सर्व परिस्थिती सांगितली. वनिता दुसर्‍या दिवशी भावाकडे कनेडीला गेली. तिच्या भावाचे कनेडीत आणि कणकवलीत दोन सलून होती. तिने भावाला सर्व परिस्थिती सांगितली.

‘वनिता, भावोजींका सांग. तुमका पगार देनत नाय तर नोकरी सोडा आणि बर्‍यापैकी सलून घाला. मी मदत करतय. अगो, आमच्या धंद्यात काय कमी नाय. दाढी करुक आम्ही चाळीस रुपये घेतो आणि केस कापूक शंभर रुपये. एसी सलून घातला तर केस काळे करुक पाचशे रुपये घेतो आणि लोक आनंदान देतत. दिवसाचो खर्च वजा करुन दीड दोन हजार रुपये खय गेले नाय. ’

‘सांगतय मी तेंका. पण तेंनी शिक्षण घेतला ना. डबल ग्रॅज्युएट आसत. सासर्‍यानी मोठ्या अपेक्षेन एका झीलाक कोल्हापुराक पाठवून शिकवल्यानी. तेंका काय वाटात? वनिताच्या भावाने दोन हजार रुपये दिले आणि वहिनीने तांदूळ, गहू, शेंगदाणे, कुळीथ वगैरे दिले. वनिताला खर म्हणजे भावाकडे मागणे कमीपणाचे वाटत होते. पण नवर्‍याचा पगार सुरु झाला की दादाचे पैसे परत करु असे तिने ठरविले.

संस्थेकडून पगाराचे असेच सुरु होते. दोन महिन्यानी सहा हजार मिळाले पुन्हा दोन महिने नाही. कसा तरी संसाराचा गाडा पाटणकर आणि वनिता ओढत होते. सरकारचे धोरण बदलेल आणि आपणास परमनंट शिक्षकाचा पगार मिळेल या आशेवर ते होते. हळू हळू दसरा, दिवाळी जवळ आली आणि वनिता च्या चुलत बहिणीचे लग्न ठरले. पाटणकरांच्या मावस भावाचे लग्न ठरले. ही तर घरातली लग्ने. लग्नाला जायला हवेच. वनिता नवर्‍याला म्हणाली, ‘आता दिवाळीत दोन लग्ना आसत. घरचीच लग्ना. दागिने जावंदे, खोटे दागिने घालूक येतत. पण कपडे तरी हवेत. माझे साडये जुने झालेत. दोन साड्या, ब्लाऊज, शाम्याक  दोन ड्रेस आणि लग्नाक अहेर करुक होयो. तेनी आपल्या लग्नात अहेर केल्यानी. पैशाची सोय करुक होयी. मागे  दादान पैसे दिल्यान, आता तेच्याकडे परत पैसे कशे मागतले?’

‘नको, आता दादाकडे मागू नको. मी बघतय कोणाकडे तरी.’

पाटणकरांच्या लक्षात आले. आपले दोन सहकारी आहेत. सावंत आणि जांभळे. दोघेही परमनंट आहेत शिवाय जांभळेंची बायको शिक्षिका आहे. म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नाही.

– क्रमश: भाग २

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ ‘शिक्षक सेवक…’- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

गुड मॉर्निंग सर !

गुड मॉर्निंग ! या पाटणकर. कुठल्या गावाहून आलात?

‘कोकिजरे , तालुका – वैभववाडी’.

‘हा. म्हणजे सह्याद्री पट्टा. शिक्षण कोठे झाल?’

‘शाळा कोकिजरे, बी.एस.सी कणकवली कॉलेज, एम.एस.सी, कोल्हापूर, बी.एड.-गारगोटी’

ठीक. म्हणजे शिवाजी विद्यापीठ, तुमच एम.एस.सी ला फिजिक्स विषय होता ना?

’हो सर.’

‘नाही, विचारण्याच कारण म्हणजे आमच्या शाळेत फिजिक्सची व्हेकन्सी आहे आणि तुम्ही केमेस्ट्रि नायतर बायोलॉजी मध्ये एम.एस.सी केलं असेल.

‘नाही सर! मी फिजिक्स मध्ये एम.एस.सी केलय.’

‘शिकवण्याचा काही अनुभव? तेथे उपस्थित असलेल्या साळगांवकर मॅडम ने विचारले.

‘मॅडम, मी दोन वर्षे कणकवलीत एका क्लासमध्ये शिकवत होतो.’

‘मग तेथला जॉब का सोडला?’

‘पैसे फार मिळत नव्हते म्हणून….’ पाटणकर हळूच म्हणाले.

आमच्याकडे सुद्धा शिक्षण सेवक म्हणूनच जागा आहे बरं का. सरकारी ग्रॅण्ट नाही. त्यामुळे …. काय तो विचार करा.

पण पुढे मागे सरकारी ग्रॅण्ड मिळेल ना मॅडम.

हा आमचे प्रयत्न सुरुच असतात. पण सरकारचे नियम दिवसाला बदलतात. ग्रॅण्ट मिळाली तर तुमचा फायदा होईल.

हो सर.

अकरावी- बारावी  फिजिक्स बरोबर प्रॅक्टिकल पण घ्यावा लागेल. शिवाय खेडेगावातील शाळा आहे. इथे प्रायव्हेट क्लास वगैरे नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी तसेच सुट्टीत जादा तास घ्यावे लागतील.

हो सर. माझी तयारी आहे.

मग ठीक आहे. मुख्याध्यापक जोंधळे आहेत. त्यांना भेटा . तुमची सर्टिफिकेट्स जमा करा आणि १० जून पासून वर्ग सुरु होतील. तेव्हा हजर व्हा.

पण सर, पगार किती मिळेल?

ते तुम्हाला, कोळंबकर नावाचे क्लार्क आहेत, ते सांगतील.

अशारितीने पाटणकरांचा इंटरव्ह्यू पार पडला. एम.एस.सी झाल्यानंतर दोन वर्षे नोकरीसाठी शोधाशोध करुन शेवटी या गावातील शाळेत अकरावी- बारावी साठी फिजिक्स शिक्षकाची जागा खाली आहे. हे पेपर मध्ये वाचल्यानंतर पाटणकरांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली.

चेअरमनांच्या ऑफिसमधून बाहेर पडुन पाटणकर मुख्याध्यापक जोंधळे सरांना शोधायला निघाले. जोंधळे सर त्यांच्या ऑफिसमध्ये मोबाईल मध्ये रंगात आले होते. दोन मिनिटे त्यांचे आपल्याकडे लक्ष जाते काय, हे पाटणकर पाहत राहिले. पण जोंधळे कसलासा सिनेमा पाहण्यात दंग होते. शेवटी पाटणकर त्यांच्या टेबलासमोर उभे राहिले.

सर, नमस्कार! मी नारायण पाटणकर. जोंधळे दचकले. मग सावरत म्हणाले, ‘बरं मग, मी काय करु?’

‘सर, मी हायर सेकंडरी मध्ये फिजिक्स विषयासाठी अर्ज केला होता. आताच चेअरमन साहेबांनी माझा इंटरव्ह्यू  घेतला. त्यांनी तुम्हाला भेटायला सांगितले. ’

असं होय. इंटरव्ह्यू दिला काय आणि न्हाई दिला काय. तुम्हीच शिलेट होणार. का सांगा?

का?

कारण ह्या खेडेगावात सहा हजार रुपड्यात यांना कोण मास्तर भेटणार?

किती ? सहा हजार फत ?

मग, सहा लाख वाटले की काय? हा आता मला दीड लाख पगार हाय. सातवा आयोग बरं का.

पण, चेअरमन नी तुम्हाला भेटायला सांगितलय.

हा. भेटलात म्हणून सांगा. त्यो कोलंबकर क्लार्क हाय का बघा. त्याचेकडं सर्टिफिकेट जमा करा आणि नऊ तारखेला या. कारण आदल्या दिवशी मिटींग असते. मॅनेजमेंट आणि शिक्षक यांची.

पाटणकर बाहेर पडले आणि क्लार्क कोळंबकरला शोधू लागले. कोळंबकर मोबाईल मध्ये रमी लावत बसला होता. पाटणकर त्याच्या समोर उभे राहिले.

‘कोळंबकर मी पाटणकर.’ कोळंबकर रमीत व्यत्यय आला म्हणून वैतागला. त्याने चिडून विचारले, काय काम आहे? 

इथं या शाळेत फिजिक्स शिकवण्यासाठी मी १० तारीख पासून येणार आहे. मुख्याध्यापकांनी तुम्हाला भेटायला सांगितले.

होय काय. बरा बरा. हेंका नवीन नवीन बकरो बरो गावता.

‘बकरो? ’

नायतर काय. सहा हजारात या खेडेगावात कोण येतलो? बरा ता जावंदे. तुमची सर्टिफिकेटा घेवन येवा. पाटणकर नोकरीस हजर होण्याआधीच हैराण झाला. बायकोला काय सांगणार? तिला काल म्हटले, फिजिक्स च्या शिक्षकाची नोकरी आहे. ति खूश.  ती शिक्षकांचे हल्ली लाखात पगार ऐकून होती. तिला शिक्षण सेवक हा मधला प्रकार माहित नव्हता.

मोडक्या एम.एटी वर बसून फूर फूर करत पाटणकर आपल्या गावी निघाला. या गावाहून आपले गाव चाळीस किलोमीटर म्हणजे याच गावात बिर्‍हाड करावे लागणार. बिर्‍हाड केले की खर्च वाढणार. गावी चार माणसांत दोन माणसे खपून जात होती. आता खोलीचे भाडे, इलेट्रीसिटी, मुलासाठी दूध, सर्वच विकत. आणि हे सर्व सहा हजार रुपयात भागवायचे कसे? शाळेतून बाहेर पडल्यावर काही अंतरावर त्यांना लहानशी बाजारपेठ दिसली. पाटणकरांनी  फटफटी थांबविली. एक किराणा दुकान, एक लहानसे चहाचे हॉटेल, एक पानपट्टी आणि एक लाकडी खुर्चीचे सलून. सलून पाहताच पाटणकर पुढे गेले. खरंतर हा आपला पारंपारिक धंदा. आजोबा, काका वडिलांनी हाच व्यवसाय केला. पण वडिलांनी एकतरी मुलगा शिकावा म्हणून पोटाला चिमटा घेऊन आपल्याला कोल्हापूरात शिकायला पाठवले. आपला मुलगा डबल ग्रॅज्युएट झाला म्हणून वडिलांना कृतकृत्य वाटले. ज्याला त्याला मुलाची हुशारी सांगत सुटले. त्यांना वाटलं ‘आपलो झील कॉलेजात शिकवतोलो. फाड फाड इंग्रजी बोलतोलो. चार चाकी गाडीतून फिरतोलो.’ पण आपण झालो शिक्षण सेवक.

पाटणकर त्यातल्या त्यात मोठ्या असलेल्या किराणा दुकानदाराकडे गेला. हा नवीनच माणूस दिसतोय म्हणून किराणा दुकानदाराने चौकशी सुरु केली.

‘खयसुन ईलात?’

‘मी पाटणकर. गांव कोकिसरे. ह्या शाळेत शिक्षक म्हणून ईलय.’

‘खयचो विषय?’

‘फिजिस. अकरावी -बारावी साठी.’

‘अरे बापरे! म्हणजे तुम्ही डबल ग्रॅज्युएट शिकला असतालात. आणि हय शिक्षण सेवक? सहा-सात हजारात गुंडाळतले.’

काय करतले. नोकरी खय गावता?

चेअरमन भेटलो की नाय? आणि दुसरा ता बायलमाणूस. साळगावकरीन. तेची मैत्रिण ती.

असेल. चेअरमन होते आणि त्या बाई पण होत्या. आणि हेडमास्तर जोंधळो जागो होतो का झोपलेला?े.

होते ना.

एक नंबर चिकट माणूस. पाच रुपये खर्च करुचो नाय. लाखाच्या वर पगार घेता. सगळो पैसो गावात धाडता. तिकडे लातूर काय उस्मानाबाद तिकडचो आसा तो. तिकडे बंगलो बांधल्यान. शेती घेतल्यान. पण आमच्या दुकानाची उधारी देना नाय. पण तुम्ही कोकिसर्‍यातून जावन येवन करतालात? खूप लांब पडताला.

हय रवाचाच लागताला ओ. क्लास  वगैरे पण घेवक हवे असा चेअरमनांनी सांगितल्यानी.

सहा हजार रुपयात दिवसभर शिकवायचा आणि शनिवारी- रविवारी क्लास घ्यायचे. अरे मेल्यानू ह्या मास्तरांका २५ हजार पगार तरी देवा. तुम्ही रात्रीच्या पार्टेक आठ-दहा हजार घालवतात. बरा मास्तर, जागा खय बघितलास काय?

नाय, ओ. ताच विचारुक ईल्लय.

ह्या बघा आमचो मांगर आसा. बंद असता. तुमका जमला तर रवा.

पण भाडा?

– क्रमश: भाग १ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मुलाखत… लेखिका – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ मुलाखत… लेखिका – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री सुनिता गद्रे ☆

डॉ हंसा दीप

आसमंतात धुरळा उडवत — कच्च्या रस्त्यावर धडधडत एक मळकट बस त्या गावाच्या थांब्यावर येऊन गचकन् थांबली .

त्या वैराण गावात  ‘ तिला ‘ उतरताना पाहून त्या बसच्या ड्रायव्हर, कंडक्टरच्याच काय पण प्रवाशांच्याही चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले . —–

ही मुलगी ह्या असल्या गावात उतरून काय करणार ?

हसत हसत ती खाली उतरली. रस्त्याकडेला असणाऱ्या एका पडक्या चौथऱ्यावर बसलेल्या एका पोरग्याला तिनं खुणावत बोलावलं.

” काय रे , हे रतनपुरच आहे ना  ? ” तिने विचारले .

” व्हय जी !!”तो अवघडून उद्गारला .

” अरे , इथं तर काही वस्तीही दिसत नाहीय .” तिनं आश्चर्य व्यक्त केलं .”

” या गावची वस्ती ह्याच सडकेवर हाय  …  वाईच थोड्या अंतरावर ,एक होवाळ हाय, त्याच्या पल्ल्याड हाय बघा  धा पंदरा घराची वस्ती .”

त्या मुलाच्या इशाऱ्यावरुन तिनं आपली नजर टाकली . मात्र तिथं कुठलीच वस्ती असल्याचा मागमूसही दिसत नव्हता .

त्या नजरेला नजरेनंच वाचत पोरगा उत्तरला ,

” ताय,  वाईच चालावं लागेल .

चा पिणार तवर? पेशल चा? त्या पोराच्या चतुराईवर खुश होऊन तिने होकार भरला. सूर्य उतरणीला लागला होता. दूरवर पसरलेली विरळ झाडी, थोडी हिरवळ, क्वचित काही मोठे वृक्ष…. एकाच नजरेतून तिने टिपून घेतले. मधूनच धुरळा उडवत जाणारी एखादीच गाडी… बाकी सगळं सामसुमच! खेडेगावात असणारं हे नेहमीचंच दृश्य! इतक्यात पोरगा वाफाळलेला शुद्ध दुधाचा कडक गोड चहा घेऊन आला. नेहमी शहरात फिकट चहा पिणाऱ्या तिला हा दुधाचा दाट गोड चहा पिताना काही वेगळंच स्वादिष्ट पेय पीत असल्याचा ‘फील’आला. तिचा तो आनंदित चेहरा निरखत पोरानं प्रश्न केला, “ताय फोटू काढाय आलाय व्हय? “?

” हो तुला काढायचाय्?” या प्रश्नावर लाजलेला तो आपल्या चिकट तेलकट वाऱ्याने विस्कटलेल्या केसांना बळेबळे चापून बसवत म्हणाला,”व्हय जी  मला फोटू काढून घ्याया लय आवडतं.”

“नाही ,नाही….. इथं नको, तुझ्या चहाच्या टपरीवर काढू या… चहा करतानाचा”… तिनं त्याला सुचवलं. खुष होत त्यानं घाईघाईनं किटली झाकणावर दणका देत बंद केली. आणि फोटोसाठी निघाला सुद्धा. चहाचे पैसे घ्यायलाही तो संकोचू लागला. त्याच्या मागोमाग पाऊलवाटेवरून चालत ती दोघं टपरीवर पोहोचली. बाजूलाच काही गाई चरत होत्या, तर काही जवळच्या पाणवठ्यावर पाणी पीत होत्या. तिथंच जरा वरच्या अंगाला म्हशी पाण्यात डुंबत होत्या. हे निरखतच ती झरकन् पुढे झाली, जिथं पाच सात उघडी, मळकी पोरं खेळत होती. धुळीने भरलेली विस्कटलेल्या केसांची…. तिनं गोड आवाजात त्यांना आपल्याजवळ बोलवून आपल्या बॅगेतली काही चॉकलेट्स बाहेर काढली आणि प्रत्येकाच्या हातावर ठेवली.. आणि आपापल्या आयांना बोलवून आणायला सांगितलं. तशी ती पोरंही हातातल्या चॉकलेट कडे बघत, मागे वळून बघत, काहीशी लाजत, संकोचत  आईला घेऊन यायला निघाली. आणि ही परत त्या वस्तीच्या राहणीचाअंदाज घेऊ लागली.

दिवसभर तर इथले पुरुष कामानिमित्त घराबाहेरच शेतीच्या कामात व्यग्र राहत असतील.शहरी वातावरणापासून अगदी अलिप्त असे हे छोटसं गाव!

..पिवळ्या मातीने बनवलेली कौलारू, छोटेखानी, झोपडीवजा घरं,… बाहेर बसाउठायला बांधलेले ओबडधोबड चबुतरे… वारली किंवा तत्सम ग्रामीण शैलीत चितारलेल्या घराच्या भिंती… ती हे सगळं निरखत राहिली, अगदी अभ्यासू दृष्टीनं! काही घरांच्या भिंतीचे तर ती मुलं येईपर्यंत फोटोग्राफ्स देखील घेऊन झाले. मनोमन ती सुखावली.

इतक्यात काहीशा गोंधळाच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. हातात चॉकलेटं जशीच्या तशी ठेवून आयांना सोबत घेऊन ती मुलं तिच्या दिशेने येत होती. त्या बायकाही तरातरा जरा राग मिश्रित हातवारे करत तिच्या दिशेने येत होत्या. अभावीतपणे नमस्कारासाठी तिचेहात

जुळतात न जुळतात तोच,

“काय वो, ही चॉकलेटं तुम्हीच दिलीसा  नव्हं?”असा बोचरा प्रश्न तिने ऐकला.

“हो.”

“कशाला दिलीसा?”

“सहजच.. काही कारण नाही!”

“धनी घरात नाय, म्हणूनशान आमच्या पोरांस्नी फसवून, पळवून नेतेस व्हय गं बये?”

नीट  अर्थ लागला नसला तरी त्या बायकांच्या अविर्भावामुळे  परिस्थितीचे गंभीर ओळखून ती म्हणाली,

” नाही हो, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा.”

“न्हाय कसं? ही थोरली माय बराबर बोलतीया…. तुमी मोठ्या शेहेर गावातली मानसं असाल… पर आम्हास्नी येडंखुळं नगा समजू!” एकापेक्षा एक जळजळीत नजरेनं त्या बायका तिला न्याहाळू लागल्या. हा  उपेक्षेनं भरलेला आरोप तिला सहन होईना.

“अरे माझ्यावर विश्वास तरी ठेवा. एका खास कामानिमित्त मी तुमच्या गावी आलेय्.”

” वाईच आईकलं काय गं बायांनोऽऽऽ, ही शेर गावची बया हितं खेड्यात कामापायी आलीया म्हनं! वाईच खरं वाटंल असं तरी बोलावं म्हंते मी!”

क्षणभरासाठी तिला वाटलं,’ ती खरंच कोणी अट्टल चोर आहे आणि पोलिसांनी तिला रंगे हात पकडलंय् .खरंच इथपर्यंत आपण मोठ्या सहजतेने पोहोचलो. वाटलं मुलाखतीचंच  तर काम आहे, होईल चुटकी सरशी! आत्ता कुठे कळलं कि… हे शहरातलं आणि खेड्यातलं अंतर एखाद्या खोल दरीसारखं आहे, कधीच न सांधता येणारं!’

 भेदरल्यामुळे कोरड्या पडत चाललेल्या शुष्क ओठावरून तिनं हलकेच जीभ फिरवली.. आणि अजीजीनं तिनं मन मोकळं करण्याचा प्रयत्न सुरू केला,….” हे पहा माझ्या बाबतीत तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका

मी तर तुमची लोकगीतं, जी तुम्ही लग्न आणि इतर विशेष कार्यक्रमात गाता.. ती मिळवण्यासाठी इथं आलेय्.   “ए चला गं बायांनो आपापल्या  वाटेनं, लई कामं पडलेती घरात! हितं आमची गाणी ऐकूनशान् तू शेहेरात बक्कळ पैसा कमणार हैस नं ?” हा खरखरीत आवाज त्यांच्यापैकीच एखाद्या प्रौढ स्त्रीचा असावा.

 “नाही हो मावशीबाई, ह्या अशा पारंपारिक लोकगीतावर एक पुस्तक लिहितेय मी.” आपला विचार चांगला असल्याचे पटवण्याचा ती परोपरीनं प्रयत्न करत होती

 “काय करणार हाईस त्या पुस्तकाचं?”

 ” मी कॉलेजमध्ये शिकवते. पुढच्या अभ्यासासाठी मला हे पुस्तक लिहायचंय्.”

 ” मास्तरणी हाएस जणू?”

 ” हो “

ते  ऐकताच रागाने त्यांच्या नाकपुड्या फुरफुरू लागल्या बहुतेक मास्तर या शब्दाची त्यांना घृणा असावी. इतक्या वेळेपर्यंत दाबून ठेवलेला त्या साऱ्याजणींचा राग उफाळून बाहेर आला. दातओठ खात त्या म्हणाल्या,” म्हंजे पोरास्नी शाळंत शिकवणारी बाई हैस तू?”

 “नाही…. मी मोठ्या मुला- मुलींना शिकवते.”

एखाद्या विजेचा करंट लागल्याप्रमाणे त्या चित्कारल्या, “संग संग बसवून ?”

“होय” तिनं हामी भरली. काहीतरी घोरपातक हातून घडल्यासारखं साऱ्याजणी  तिच्याकडे रोखून बघू लागल्या. आता पूर्ण शरीरभर त्या बायकांची नजर फिरू लागली. तिची राहणी, देहबोलीतून काही जाणून घेण्याचा प्रयत्न त्या करू लागल्या. तिची फॅशनेबल केसांची रचना, तिचा पंजाबी ड्रेस, मनगटावरचे नाजूक घड्याळ, इतकंच् काय पण नखावरचं नेल पॉलिशही त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. घाबरं घुबरं होत, काहीसं संकोचत ती आपली ओढणी सावरू लागली. एका यशस्वी प्रोफेसरला मास्तरीण म्हणणं आणि त्यांचं ते न्याहाळून बघणं…. तिला कसंनुसं करून गेलं. चक्क घामाघूम झाली ती! इकडे त्या बायका कधी तिला न्याहाळत, तर कधी आपापसात खाणाखुणा करत होत्या. मुलांची  मात्र चॉकलेट्स हातात असूनही ती मनमुराद खाता येत नसल्यामुळे पंचाईत झाली होती. आतापर्यंत लाळ गळायचीच काय ती बाकी राहिली होती.

इतक्यात एक आगाऊ प्रश्न तिच्या कानावर आदळला ,

“ए बाय ,लगिन झालंया नव्हं  तुजं?”

“हो, बारा वर्षें झालीत माझ्या लग्नाला.”

“बारा वरीस ?”

सगळ्याजण परत एकदा आपादमस्तक न्याहाळत  तिचा अंदाज काढू लागल्या.

“पोरगा हाय न्हवं तुला ?”

 “नाही… मुली आहेत दोन… एक नऊ वर्षाची आणि दुसरी सहा वर्षाची!”

… त्यांच्या डोळ्यातला बदललेला भाव तिला जाणवला. त्यातलीच एक आपुलकीनं म्हणाली,”घाबरू नको पोरी, आताच्या खेपंला पोरगाच होईल.”

ते आधार युक्त आणि काळजीने भरलेले शब्द ऐकताच ती नव्या नवरी सारखी सुखावली…. लाजली देखील!

” पाणी पेणार?”

घशाला पडलेली कोरड जाणवत  तिने होकार दिला. तिने पाणी पिताच इकडे जणू पोरांनाही चॉकलेट खाण्याचा परवानाच मिळाला. त्या खेडवळ बायकांनी तिला स्वीकारल्याचा तो संकेतच होता. इकडे बायकाही आनंदात एका पाठोपाठ एक पारंपरिक गीते गाऊ लागल्या. एकमेकांच्या ग्रामीण आणि शहरी संस्कृती अशा काही एक- जीव झाल्या की जणू काही त्या कधी वेगळ्या नव्हत्याच. दोन नद्यांच्या संगमासारख्या ! गावाकडे आली तेव्हा एक शहरी बाई असलेली ती  थोड्या वेळा नंतर शहराकडे परत जाताना  “शहरातली ताई” बनली. नक्की परत येण्याच्या एकमेकांत आणाभाका घेत ती आली तशीच गेलीही…. बसनंच…..  तिच्याबरोबर होतं, ‘एक मुलाखत ‘यशस्वी झाल्याचं विजयाचं अन् समाधानाचं हास्य!

हिंदी कथा – इंटरव्यू – लेखिका डॉ हंसा दीप

मराठी भावानुवाद-  सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत… भाग-2 … श्री श्रीपाद  सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किंमत… भाग – 2 … श्री श्रीपाद  सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

(आधी नुसता फेरफटका मारू, मग ठरवू काय करायचं ते, असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली. ) इथून पुढे —-

तंद्रीत अचानक ती स्विमिंग पूलच्या समोर येऊन उभी राहिली. तिथे तीन चार जण पाण्यात डुंबत होते. ती गडबडीने मागे फिरणार तेव्हढ्यात तिला हाक ऐकायला आली,

” ए मुली, लाजू नको. ये इकडे….”

पन्नास वयाची अट असताना इथे मुलगी कशी काय आली? हे पाहण्यासाठी तिने मान वळवली. नऊवारी साडीतल्या एक आजी स्विमिंग पूलमधून बाहेर येता येता तिलाच हाक मारत होत्या. पन्नाशी उलटलेली मुलगी ! तिला गंमत वाटली. तोपर्यंत आजी तिच्याजवळ पोहोचल्या होत्या. तिला शेकहॅंड करत त्या म्हणाल्या,

” मी अरुणा प्रधान. तुला पोहता येत नसलं तरी नुसतं डुंबायला येऊ शकतेस. अगं, पाण्यात शिरलं ना, की तन आणि मन आपोआप हलकं होऊन जातं. जगाचा विसर पडतो, षडरिपू गळून पडतात. मला तर आईला भेटल्यासारखं वाटतं.”

पाण्याला आईची उपमा दिलेली पाहून ती हळवी झाली. बराच वेळ त्या दोघी पाण्यात खेळत राहिल्या. खेळताना मध्येच ती प्रधान आजींना म्हणाली,

” मला तुमच्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल.”

“आधी जेवूया मग झाडाखाली बसून गप्पा मारू.”

जेवण झाल्यावर एक छानशी जागा बघून तिथे ऐसपैस बसल्यावर आजी म्हणाल्या,

” माझ्याबद्दल मी तुला सांगते. तूही मनमोकळेपणाने स्वतः बद्दल सांग. आधी तू बोलत्येस की मी बोलू?”

“आधी मी बोलते.”

असं म्हणून तिने सकाळी घडलेला किस्सा सांगितला आणि म्हणाली,.. ” तीस वर्षं व्रतवैकल्यं केली,उपासतापास केले. जे केलं ते नक्की कोणासाठी केलं? असं आताशा माझ्या मनात यायला लागलं आहे. कारण जे काही मी करते ते मला वाटतं म्हणून करते, असा सर्वांचा भाव असतो. माझ्या राबण्याला, माझ्या भावनांना किंमत नाही असं आताशा वाटू लागलंय. पण आता बास झालं असं मी ठरवलं आणि इथे येण्याचा निर्णय घेतला. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती….. आमच्या संसाराला तीस वर्षं झाली. आतापर्यंत नातं परिपक्व व्हायला हवं होतं नाही? पण, काहीतरी ‘मिसिंग’ आहे, असं उलटंच वाटायला लागलंय. ‘अपूर्णतेतंच खरा आनंद आहे ‘, ‘ भिन्नतेतच गंमत आहे ‘, वगैरे विचार डोक्यात येतात, पण हे सर्व भंपक आहे असंही वाटतं. तीस वर्षांनंतरही पावलोपावली मतभिन्नता?  खरं तर आम्ही नाटक-सिनेमाला जातो, हॉटेलिंग करतो, वर्षांतून दोन तीन ट्रीप असतात. पण आता हेही सर्व रूटीन झाल्यासारखं वाटतं. सगळं निरस होत चाललंय. नवरा वाईट नाही, पण टिपीकल पुरुषी मनोवृत्ती आहे. सध्या मी गोंधळलेली आहे. मला नेमकं काय हवंय ते कळत नाहीये. पण खात्री आहे की कधीतरी सापडेल. तोपर्यंत शोध घ्यायचाय. त्याचाच भाग म्हणून मी इथे आल्येय.” .. दीर्घ श्वास घेऊन ती थांबली. आता आपण बोलायचं आहे हे ओळखून, प्रधान आजींनी डोळे मिचकावत तिला विचारलं,

” हं…. तर काय जाणून घ्यायचंय माझ्याबद्दल…..?”

” किती छान आहात‌ तुम्ही. खरं तर स्वतः विषयी जे जे सांगाल ते सर्व ऐकण्याची उत्सुकता आहे.”

ह्या तिच्या वक्तव्यावर प्रधान आजी हसून म्हणाल्या,

” मी अरुणा प्रधान, वय वर्षे शहात्तर. एक मुलगा आहे, ऑस्ट्रेलियात असतो. पस्तीस वर्षं अर्धांगिनी होऊन संसार केला, आता गेली पंधरा वर्षं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते. नाही… नाही…. गैरसमज करून घेऊ नकोस. नवरा तोच आहे. माझ्यापुरतं मी स्टेटस बदललंय. आता मी अर्धांगिनी नाही आणि वामांगीही नाही. संसारात राहूनही अलिप्त झाल्येय. गरज असेल तेव्हा आम्ही एकमेकांना जमेल तेवढी मदत करत असतो. पण एकमेकांवर अवलंबून नाही, उत्तरदायी नाही. आम्ही एकमेकांना मोकळं केलं आहे.” 

” म्हणजे एका वेगळ्याच प्रकारे तुम्ही वानप्रस्थाश्रम एन्जॉय करताय….” ती हसत हसत म्हणाली.

” अगदी बरोबर ! अगं, पंधरा वर्षांपूर्वी माझ्या स्टोरीत नवऱ्याची, मुलाची, सुनेची, नातवंडांची स्टोरी इतकी मिसळलेली होती की ती फक्त माझी स्टोरी नसायची. आता मात्र तसं नाहीये. माझी स्टोरी ही फक्त माझीच स्टोरी आहे. ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ असं पाडगांवकरांनी म्हटलंय. पण असं प्रेम करण्यासाठी आपल्याला नोकरी-व्यवसाय करताना, संसाराचा गाडा ओढताना वेळ कुठे मिळतो? आणि म्हणूनच आपल्यासारख्यांच्या आयुष्यात, वानप्रस्थाश्रम महत्त्वाचा टप्पा ठरतो. सहजीवनातील प्रेम, आदर, मैत्री आणि सहवासाची गरज उतार वयातही असते. पण सहजीवनाच्या बरोबरीने स्वजीवनही असतंच की…. आणि म्हणूनच स्वजीवनाचा आनंद घेण्यासाठी मी स्वतःला बंधनातून मोकळं केलंय.”

” प्रधान साहेबांचं काय मत आहे? “

तिने उत्सुकतेने विचारलं.

” तुला काय वाटतं, तूच कल्पना करून सांग.”

प्रधान आजींच्या प्रश्नाने ती भांबावली. तिचा चेहरा पाहून त्या खळखळून हसल्या आणि म्हणाल्या,

“अगं, माझा नवरा जगावेगळा आहे. त्याचं म्हणणं असं आहे, की आपला संसार कसा असावा, आपलं नातं कसं असावं ह्याचा विचार समाजाच्या अदृष्य दडपणाखाली बरीचशी जोडपी ठरवत असतात. संसारातील गोडी टिकवायची असेल तर, प्रत्येक जोडप्याने दर दहा वर्षांनी किमान सहा महिन्यांसाठी वेगळं रहायला हवं. माझ्या नवऱ्याची अशी मतं असल्यामुळे मला निर्णय घेणं खूपच सोपं गेलं. ‘ लिव्ह इन रिलेशनशिप ‘ ही कल्पना त्याला बेहद्द आवडली. खरं सांगू, बंधन नसल्यामुळे आता आम्ही एकमेकांना उलट जास्तच समजून घेतो.”

तिचा गंभीर चेहरा पाहून आजींनी तिला जवळ घेतलं. तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत त्या म्हणाल्या, ” नको काळजी करू एवढी. उद्या रात्रीपर्यंत इतकी धमाल कर, की घरी जाताना एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. अधूनमधून इथे येत जा. वर्षातून एकदोनदा, दहा पंधरा दिवसांची सोलो ट्रीप कर. बघ तुझ्यात कसा आमूलाग्र बदल होतो की नाही ! शेवटी एकच कानमंत्र देते, जी गोष्ट सहज प्राप्य असते तिची किंमत नसते.”

समाप्त  

लेखक – श्री श्रीपाद सप्रे

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत… भाग-1 … श्री श्रीपाद सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

🌸 जीवनरंग 🌸

☆ किंमत… भाग – 1 … श्री श्रीपाद  सप्रे ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

‘चला, उद्या महिन्यातला दुसरा शनिवार ! सुट्टी आहे,  जरा आरामात उठलं तरी चालेल.’ असा विचार करत त्याने अंथरूणावर अंग टाकलं. तिला मात्र बराच वेळ झोप नव्हती. ‘आपल्याला हे सर्व जमेल ना? सर्व नीट सुरळीत व्हायला हवं…. जमेल, न जमायला काय झालं? नव्हे…. नव्हे….जमायलाच हवं.’ विचार करता करता  कधीतरी उशिरा तिला झोप लागली.

ती सकाळी जेव्हा उठली तेव्हा नवरा, मुलगा आणि सून डाराडूर झोपलेले होते. ती चहा नाश्त्याच्या तयारीला लागली. हळूहळू सर्व जण डायनिंग टेबलवर जमले. चार जणांच्या डिश बघून नवरा म्हणाला,

“आज वटपौर्णिमेचा उपास करणार नाहीस का?”

नवऱ्याचा प्रश्न साधा सरळ असला तरी तिला प्रश्नातला खवचटपणा लक्षात आला होता.

“नाही, आज एका रिसॉर्टवर जात्येय. उद्या रात्री जेऊनच येईन. मला यायला उशीर झाला तरी तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे किल्ली आहे. मी दार उघडून येईन. तुमची झोपमोड होऊ देणार नाही.”

…. अशी कशी काय ही अचानक जात्येय या विचाराने तिघांच्या तोंडातला घास तसाच राहिला होता.

आपल्या टायमिंगवर ती बेहद्द खूष झाली. नवऱ्याने अडकलेला घास पाण्याच्या घोटाबरोबर आत ढकलला. मुलाने चेहरा शक्य तितका भावनारहित ठेवला होता. ‘ ठीक आहे, हा तुमचा निर्णय आहे ‘ असं दर्शवत सुनेने किंचित खांदे उडवले.

“अगं, कुठे जाणार आहेस, काय करणार आहेस, कोणाबरोबर जाणार आहेस, काही सांगशील की नाही.” 

आवाजावर नियंत्रण ठेवत नवऱ्याने विचारलं.

” पन्नासच्यावर वय असलेल्या व्यक्तींची ‘मुक्त छंद’ नावाची संस्था आहे. मी ह्या ग्रुपबद्दल कोणाकडून तरी ऐकलं होतं. हा ग्रुप महिन्यातून दोन दिवस एक रिसॉर्ट बुक करतो. ते दोन दिवस, तिथे जमलेले सर्वजण एकमेकांशी गप्पा मारतात, चर्चा करतात. अगदी वैवाहिक जीवनापासून ते साहित्य, संगीत, व्यावसायिक करिअर अशा कोणत्याही विषयावर गप्पा होतात. विषयाचे बंधन नाही. तुम्ही तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर समविचारी पार्टनरसोबत गप्पा मारायच्या. कंटाळा आला की खायचं, प्यायचं, आराम करायचा, गाणी गायची. थोडक्यात, तुमचं मन जे म्हणेल ते करायचं. तिथे दोन सिंगल बेड असलेली बरीच कॉटेजेस आहेत. शिवाय एक दोन डॉर्मेटरीज आहेत. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ आहेत. लायब्ररी आहे. स्विमिंग पूल, रेन डान्स, कराओके असं बरंच काही आहे.”

“समजा कॉटेजमध्ये झोपण्याचा निर्णय घेतलास आणि कोणी महिला पार्टनर मिळाली नाही तर?”

आपली अस्वस्थता लपवत नवऱ्याने विचारलं.

” तर…. खरं म्हणजे, तसा विचार केला नाही, पण अगदीच वाटलं तर डॉर्मेटरी आहेच. एवढा घाबरू नकोस रे…. तुझ्या बायकोची पन्नाशी उलटल्येय. आता कोणी उचलून पळवून नेणार नाही तिला.”

…. आपल्यात इतका व्रात्यपणा अचानक कुठून आला हे तिला कळत नव्हतं. तिची सून तर अवाक् होऊन पहात होतीच, पण तिच्या उत्तराने मुलाच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.

“आणि मीही तुझ्याबरोबर आलो तर?”

कित्येक वर्षांनी आपला नवरा इतका पझेसिव्ह झाला आहे, हे बघून तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

” काहीच हरकत नाही. फक्त दोन दिवस तू तुझे पार्टनर शोधून त्यांच्यासोबत रहायचं आहे. तशी त्या संस्थेची अटच आहे.”

” बाबा, तुम्ही आधी नीट विचार करा आणि निर्णय घ्या. कारण दोन दिवस अनोळखी व्यक्तींसोबत रहाणं, तुम्ही एंजॉय कराल का?”

मुलाने वास्तवाची कल्पना दिल्यावरही तो म्हणाला, ” तिथे टीव्ही असेलच ना, मी टीव्ही बघत बसेन.”

मुलाने आणि सुनेने एकाच वेळी हैराण होऊन त्याच्याकडे पाहिले. ती मात्र खाली मान घालून नाश्ता संपविण्यात मग्न होती.

“तू मजा करायला चाललीस, आमच्या जेवणा-खाण्याचे काय?” चिरक्या आवाजात नवऱ्याने अंतिम अस्त्र काढलं. तिने उत्तर न देता शांतपणे सुनेकडे पाहिले. त्या थंडगार नजरेचा सुनेने ह्यापूर्वी कधी अनुभव घेतलेला नव्हता. ती गडबडीने म्हणाली .. ” बाबा, मी आहे ना. आपण मॅनेज करू काही तरी.” 

कपडे, आवडती एक दोन पुस्तकं आणि आणखी किरकोळ वस्तू भरून तिने बॅकपॅक खांद्यावर टाकली. पायात स्पोर्ट्स शूज घातले. डोळ्यावर गॉगल चढवला. घराबाहेर पाऊल टाकताना तिने विवंचना घरातच सोडल्या होत्या.

सोनचाफ्याचं फूल, पेन-नोटपॅड, कॉटेजची किल्ली देऊन सर्वांचं रिसॉर्टवर स्वागत करण्यात येत होतं. कॉटेजमध्ये बॅग ठेवून ती चहा प्यायला गेली. एका मोठ्या आमराईत चहा कॉफीची व्यवस्था करण्यात आली होती. एखाद्या झाडाखाली बसून चहा पिण्याचं सुख ह्यापूर्वी तिने कधीच अनुभवलं नव्हतं. चहापान झाल्यावर एका हॉलमध्ये सर्वांना बोलावण्यात आलं. छोट्याश्या स्टेजवर सत्तरीचे गृहस्थ आणि साधारण त्याच वयाच्या बाई उभ्या होत्या…..  

” ‘मुक्त छंद’ ह्या उपक्रमात आम्ही तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. पुढचा दीड दिवस हा फक्त आणि फक्त तुमचा आहे. ह्या दीड दिवसात काय करायचं  ते तुम्ही ठरवायचं आहे. जे कराल त्यातून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा. समविचारी मित्र मैत्रिणी शोधा. अर्थात, तसा आग्रह अजिबात नाही हं…. कारण तुम्हीच स्वतःचे ‘प्रथम मित्र’ आहात. खूप धमाल करा…..आणि बरं का, एंजॉयमेंटचंही अजीर्ण होतंय असं वाटलं तर ह्या विस्तीर्ण आमराईत कुठेही जाऊन ध्यानस्थ व्हा. वाटलं तर एखाद्या झाडाखालच्या पारावर अंग सैलावलंत तरी चालेल.”

…. आधी नुसता फेरफटका मारू, मग ठरवू काय करायचं ते, असा विचार करून तिने निरुद्देश चालायला सुरुवात केली. 

— क्रमशः भाग पहिला…  

लेखक – श्री श्रीपाद सप्रे

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print