मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गंधलहरी ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ गंधलहरी ☆ श्री आनंदहरी ☆ 

ऊन चांगलंच रणरणत होतं.. तो पाय ओढत चालत होता. पायात अंगठा तुटलेली जुनाट चप्पल.. तळ झिजलेला,अगदी आहे म्हणायला असणारा.. रस्ता म्हणजे मातीचा नुसता फुफाटा.. डोक्यावर मुंडासं आणि त्यावर घातलेली त्याच्यासारखीच म्हातारपणाच्या सुरकुत्या ल्यालेली मोरपिसांची टोपी..दोन्ही खांद्याला अडकवलेल्या दोन झोळ्या. एका  हातात आधारासाठी घेतलेली त्याच्या कानापेक्षा थोडीशी उंच अशी चिव्याची काठी. तिला वरच्या टोकाला बांधलेली घुंगरं कधी वाजायची तर कधी नाही. दुसऱ्या हातात शरीराचा जणू अवयवच असावा असं वाटाव्यात अशा दोन बोटांत अडकवलेल्या चिपळ्या. आधीच मंद झालेली चाल उन्हाच्या तकाट्यानं आणखी मंद झाली असली तरी त्याच्या मनाच्या चालण्याचा वेग मात्र तरुणाईलाही लाजवेल असा होता.. मनाने तो कधीच शिवेवरच्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत पोहोचला होता..

फोंडया माळावर असणारं ते एकमेव झाड.. बाकी नजरेच्या टप्प्यात चिटपाखरूही न दिसणारा तो माळ..

घशाला कोरड पडली होती पण तरीही घोटभर पाणी पिण्यासाठी तो थांबला नाही..रस्त्यावरुन वळून पायवाटेने तो माळावर निघाला आणि शेवटी आंब्याचं झाड दिसलं तसा सावलीत आल्यासारखा तो मनोमन सुखावला आणि त्याच्याही नकळत त्याच्या चालण्याचा वेग वाढला.

आंब्याच्या सावलीत तो पोहोचला. त्याने हातातल्या चिपळ्या, काठी ,खांद्याच्या दोन्ही झोळ्या खाली ठेवल्या आणि खाली बसता बसता घाम पुसत त्यानं झाडाच्या जरासे पलीकडे असणाऱ्या खोपटाकडे नजर टाकली..

“किस्ना ss !”

एका झोळीतून पाण्याची बाटली काढत त्यानं हाळी मारली. त्याच्या आवाजानं चित्तवृत्ती फुललेला किस्ना खुरडत खुरडत खोपटातनं बाहेर आला.  किस्नाला पाहताच त्याचा चेहरा खुलला. किस्ना तसाच त्याच्याजवळ आला. दोन घोट पाणी पिऊन त्यानं ती बाटली किस्नाकडे दिली. किस्नानं बोटं झडलेल्या हातात कशीबशी बाटली धरली आणि दोन-चार घोट पाणी पिऊन, त्याच्या येण्याने आधीच थंडावलेल्या जीवाला आणखी थंड केलं. त्यानं झोळीतून कुणी कुणी कागदात गुंडाळून दिलेला भाकरतुकडा बाहेर काढला.  त्यातील दोन गुंडाळ्या उलगडून पाहिल्या. एकात अर्धी भाकरी-चटणी होती, दुसऱ्यात झुणका भाकरी होती.. त्याने त्या किस्नापुढं ठेवल्या.

“खा..”

“देवा, तू ?”

भुकेली नजर भाकरीवरून त्याच्याकडं वळवत किस्नानं विचारलं.

त्यानं त्या झोळीतून कागदाच्या  आणखी काही गुंडाळ्या, पुड्या बाहेर काढल्या. त्यातली चटणी- भाकरी एका कागदावर घेतली. दोन तीन कागदातली भाकरी,चपाती,चटणी,भाजी काही शिळं काही ताजं.. जणू गोपाळ काला करावा तसं सारे एकत्र केले आणि एका पुडीत बांधून बाजूला ठेवत म्हणाला,

“सांच्याला खा. “

उरलेल्या पुड्या, गुंडाळ्या परत झोळीत टाकल्या.

“घ्ये देवाचं नाव. “

असे किस्नाला म्हणून त्यानं भाकरीचा तुकडा मोडला.

भाकरी खाऊन झाल्यावर तो किस्नासाठीची भाकरी आणि झोळीतून चारपाच पाण्याच्या बाटल्या काढून घेऊन खोपटात गेला. तिथं भाकरी ठेवून, पाण्याच्या बाटल्या तिथल्या  मटक्यात रिकाम्या करून परत आला. पारभर सावलीत किस्नासंगं बोलत बसला. काही वेळ गप्पांत गेल्यावर लेक,सून,नातवंडं असणाऱ्या गोकुळात परतायला पाहिजे..आधीच रोजच्या पेक्षा जरा जास्तच उशीर झालाय हे जाणवून निघण्यासाठी उठता उठता तो किस्नाला म्हणाला,

“भाकरी हाय खोपटात…सांच्याला खा बरं का ? घरला जाया पायजेल आता.”

त्यानं रिकाम्या बाटल्या झोळीत टाकल्या, मोरपिसांची टोपी मुंडाशावर ठेवली, दोन्ही झोळ्या खांद्याला अडकवून काठी हातात घेत ‘येतो रं किस्ना ‘ म्हणत तो काहीशा धीम्या गतीनं चालू लागला.

त्याला जाताना पाहून किस्नानं त्याच्याशी नकळत पाणावलेले डोळे आपल्या थोट्या हाताने पुसता पुसता किस्नाला आठवलं.

हाता-पायाची बोटं झडायला लागल्यावर पोटच्या पोरांनी, बायकोनं घराबाहेर हाकललं.. आणि कोण कुठला तो.. एकदा सावलीला म्हणून झाडाखाली आला.. आणि या शापित आयुष्याची सावली झाला.. त्यानंच नाव दिलं..’ किस्ना ‘

पाठमोऱ्या त्याच्याकडे पाहत असणाऱ्या किस्नाला ते सारे आठवलं आणि त्यानं ‘ देवाs !’ म्हणून आपले थोटे हात जोडून नमस्कार केला.

आपल्या मोहराला त्याच्या मनाचा गंध ल्यावा, यावा असे आंब्याच्या झाडालाही वाटू लागलं.

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आनंदाचे गुपीत ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – आनंदाचे गुपीत ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

बायकोच्या किटी-पार्टीवर नेहेमीच नाराज असणारी आई, आज इतक्या आनंदात असलेली पाहून, ‘आज काही जादू वगैरे झाली आहे की काय?‘ असा चेहेऱ्यावर दिसणारा प्रश्न सौरभने शेवटी आपल्या बायकोला विचारलाच

…” प्रेरणा, आज हे असं नेहमीपेक्षा उलटच कसं झालंय? तुझी किटी पार्टी, आणि आईच्या चेहेऱ्यावरची नाराजी, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय असल्या-सारख्या आहेत खरं तर. पण आज तर आई फारच खुशीत दिसते आहे. बोलण्यातही एक वेगळाच नवा उत्साह जाणवतो आहे. याआधी अनेक वेळा आणि अनेक प्रकारे मी तिला समजावून पाहिलं. पण अशा पार्टी वगैरेच्या विरोधातच तिने पूर्वीपासून जोपासलेल्या मानसिकतेतून ती कधीच बाहेर पडू शकली नाही. त्यामुळे आज हा खरोखरच एक चमत्कार वाटतो आहे मला. आज तू अशी कोणती जादू केली आहेस तिच्यावर? ”

यावर प्रेरणाने हसतच उत्तर दिलं…” सौरभ, ही माझ्या मैत्रिणींची कमाल आहे. आज त्यांनी आईंना अगदी आर्जव केल्यासारख सांगितलं की….. “काकू तुम्ही एकट्या आतल्या खोलीत बसून रहाता, ते आम्हाला चांगलं वाटत नाही. तुम्हीही आमच्याबरोबर बाहेर येऊन बसा ना”…..आणि त्यांना हाताला धरून त्या बाहेर घेऊन आल्या. सगळ्यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. इतकंच नाही, तर ती लव्हली आहे ना, ती आधी पाया तर पडलीच, पण नंतर त्यांना मिठी मारत सगळ्यांना उद्देशून म्हणाली की,

“मी जेव्हा जेव्हा इथे येते ना, तेव्हा काकू माझ्याशी खूप प्रेमाने वागतात. मला काय काय छान गोष्टी सांगतात. म्हणूनच आजपासून काकू म्हणजे माझी सगळ्यात ‘बेस्टफ्रेंड‘ असणार आहे”…..आणि जेव्हापासून ती हे बोलली आहे, तेव्हापासून…….”.

 

मूळ हिंदी कथा : सुश्री मीरा जैन

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खारीचा वाटा ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ जीवनरंग ☆ खारीचा वाटा ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆ 

अनघा , तिच्या सासूबाई आणि सासरेतिघं चहा-ब्रेकफास्ट घेत होते, तेवढ्यात नवरा आणि मुलगा पण आले. लॉक डाउन मूळे हे एक बरे झाले होतेकी सगळेएकत्र जमून चहा-ब्रेकफास्ट घेत होते.” अनघा , आज सकाळी लवकर उठून तु भराभर सगळे आवरलेस, एकदम खुश दिसते आहेस ! ” इति सासरे. हो बाबा आज पासून माझी शाळा ऑनलाईन सुरू होणार आहे तेव्हा मला बरेच दिवसाने विद्यार्थ्यांचे यस मॅम, थेंक्यु मॅम, सॉरी मॅम असे शब्द कानावर पडणार आहे.” अनधा उत्तरली.

“पण अनु तुला ते ऑनलाईन वगैरे जमणार आहे का?” नवरा गुरगुरला.

“हो न जमायला काय झालं मी एक होउ घातलेल्या आइ-टी इंजिनियर ची आई आहे. अमेय ने मला सगळे निट समजावले आहे.”

“ऑनलाईन शिक्षण म्हणे …! नसते टाईम पास उद्योग … !” नवरा पुटपुटला.

“नाही हो बाबा मी तर म्हणेन जसे सध्याचा काळात आपण डॉक्टर, नर्स, पोलिस ह्याचे कौतुक करतो तसे शिक्षकांचे पण करायला हवे ते सगळे सुद्धा नुसते अभ्यास घेण्याचे काम नाही करत, ते आपल्या विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या निगेटीव्ह वातावरणातून पॉझिटीव्ह एक्टिवीटत बिझी ठेवतात. मला तर अभिमान वाटतो माझ्या आईचा त्यात खारीचा वाटा आहे.” लेकाने केलेले कौतुक एकून अनधा सुखावली. “अनघा तु तुझे कामाचे बघ,मी पोळ्या करेन.” सासूबाई म्हणाल्या.

“हो मी पण भाजी निवडून देतो तेवढाच आमचा सुद्धाखारीच्या घरच्यां चा वाटा….” सासरे हसत म्हणाले.

 

© सौ. स्मिता माहुलीकर

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुसाट वेग ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ जीवनरंग ☆ सुसाट वेग ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

एका दुपारी मी बागेतल्या झोपाळ्यावर बसून व.पुं. ची ” वहिदा” वाचत गुंग झाले होते. व. पु. वाचायचे म्हणजे रम्य तेवढेच गंभीर, खुसखुशीत अन् टचकन डोळ्यात पाणी आणणारे , खिळवून ठेवणारे. थोडक्यात काय भान हरपून जायचे. मी त्या दुनियेत पूर्णपणे हरवून गेले होते अन् तेवढ्यात कर्णकर्कश्य आवाज करत सुसाट मोटर सायकल वरून एक तरुण मुलगा आला. हा रस्ता बहुदा त्याला नवखा होता.कारण स्पीड ब्रेकर चा अंदाज न आल्याने तो आमच्या गेट समोर गाडी सकट सपशेल आडवा झाला. बापरे!पुस्तक बाजूला ठेवून मी पटकन गेटपाशी आले. खरंतर मी मी ती मोटर सायकल उचलू शकणार नव्हते की त्याला उठवू शकणार नव्हते. पण म्हणतात ना, ॲक्शन ला रियाक्शन! तशी माझी झटकन रिएक्शन झाली. तेवढ्यात समोर चे काका आले आणि त्यांनी त्या मुलाला उठायला मदत केली. उठल्या उठल्या झटकन त्याने गाडी उभी केली आणि त्या काकांचे आभारही न मानता सुसाट निघूनही गेला. काका माझ्याकडे पाहून हसले आणि आपल्या घरी निघून गेले. आमच्या दारासमोर काचांचा चुरा पडला होता. बहुदा त्याच्या गाडीचा दिवा आरसा जोरदार आपटल्याने आकार बदलून विखुरले होते.

शाळेतून आल्यावर मुलं आत येताना त्यांच्या बुटान बरोबर त्या काळाचा आत यायला नकोत म्हणून मी झाडू आणि केराची सुपली आणून गोळा केल्या. सहज माझे लक्ष त्या सु पली कडे गेले.  त्या आरशांच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये माझा चेहरा मला दिसायला लागला. मला ‘मुगले आझम’ ची आठवण झाली आणि त्या सुटली मध्ये मला ‘प्यार किया तो डरना क्या?’ हे गाणे दिसायला लागले. कदाचित वपुंची वहिदा वाचत असण्याचा तो परिणाम असावा.त्या काचा मी केराच्या बादलीत टाकून आले, पण ते गाणं काही डोक्यातून जाईना.’ प्यार किया तो डरना क्या’ माझं मलाच हसू आलं.मी आता प्यार का करणार होते? मन म्हणाले का नाही? प्रेम काय फक्त प्रियकर-प्रेयसी मध्येच असते? माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे, बागेतल्या या झाडांवर प्रेम आहे, झाडाला इवलीशी कळी आली तरी अत्यानंद होतो मला.मग ती रोज थोडी थोडी मोठी होत उमलायला लागेपर्यंत माझी घालमेल सुरू असते.तिचे पूर्ण फूल उमलले की इतका आनंद होतो म्हणून सांगू. मग, आहेच माझ्या झाडांवर खूप खूप प्रेम.

क्षणात त्या सुसाट मुलाची मला आठवण झाली. त्याच्या आईचे हीत्याच्यावर खूप प्रेम असणारच ना. बाबांची मायाअसणारच ना? त्याला काही झाले असते तर? मीच कासावीस झाले. इतकी कशी बेछूट बेदरकार वागतात ही मुलं? काही विचारच करत नाहीत. एवढी महागडी गाडी घेऊन देणे सहजासहजी का जमले असणार त्याच्या पालकांना? पण मुलावरील प्रेमाखातरच  आपल्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवून मुलाची आकांक्षा इच्छापूर्ण केली असेल त्यांनी. पण त्याला त्याची काही जाणीव नको का? आता माझे मन सुसाट धावायला लागले.

शांतपणे मी पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसले. माझ्या मनात आलं, त्या मुलाला नाव ठेवायचा मला काय अधिकार आहे? माझ्या विचारांची मोटर सायकल अशीच बेफाम सुटली होती. काही कारण नसताना त्या मुलाचा मी राग राग करत होते. कदाचित काहीतरी तसेच महत्त्वाचे कारण असेल, कोणी दवाखान्यात असेल, कोणाला शाळेतून आणायचे असेल किंवा कोणाला तरी भेटायचे असेल त्याला. मी माझ्या विचारांच्या मोटर सायकलला करकचून ब्रेक लावला, एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा व. पुं.च्या ‘ वहिदा ‘मध्ये समरस झाले.

 

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ शिवा ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे

सौ. प्रियदर्शिनी तगारे

 ☆ जीवनरंग ☆ शिवा ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆ 

भर दुपारची टळटळीत वेळ ! वैशाखाचं ऊन रणरणत होतं. लॉकडाऊन मुळं रस्त्यांवर शुकशुकाट होता. उन्हाच्या झळा कमी व्हाव्यात म्हणून मी खिडक्यांचे पडदे ओढून घेत होते. तोच गेट बाहेरुन कुणाच्यातरी हाका ऐकू आल्या ,” काकू ,ओ, काकू ”

मी थोडं दुर्लक्ष केलं. करोनाच्या जीवघेण्या धास्तीमुळं कुणाचं स्वागत करायला मन धजावत नव्हतं. तरी बराच वेळ हाका ऐकू येत राहिल्या.नाईलाजानं मी दार उघडून बाहेर गेले. व्हरांड्यात उभी राहून सुरक्षित अंतरावरुन ओरडले ,”कोण आहे ?”

गेट उघडून एक तेराचौदा वर्षांचा मुलगा आत आला.”काय रे, का आला आहेस ?”

“काकू , काम आहे ?”

“म्हणजे ?”

“कायतर काम द्या ना. बाग साफ करू?”

खरंतर लॉकडाऊनमुळं कुणीच कामाला येत नव्हतं.बागेत खूप कचरा साठला होता.पालापाचोळा अस्ताव्यस्त उडला होता. तरीही कुठल्या परक्या मुलाला……… मी विचारात पडले.

तोच तो केविलवाण्या आवाजात म्हणाला,” सध्याच्याला वडलांचा  धंदा बंद हाय. कालपास्नं घरात काही नाही.”

“काय करतात वडील तुझे ?”

” भंगाराचा धंदा हाय. पन …….

म्हैन्यापास्नं समदं बंद हाय. पैलं होतं तंवर भागलं. पन आता….”

माझी मन:स्थिती द्विधा झाली.

” हे बघ कामाचं राहूदे, तुला मदत म्हणून तसेच थोडे पैसे देते.” माझ्या डोक्यात कोविड व्हायरस थैमान घालत होता. कधी एकदा याला बाहेर काढते असं झालेलं.

“नगं नगं ,काम न करता कायच नगं. मी बागंतलं लोटून काडतो ना ! जवळ येत न्हाई ”

त्याची काकुळती बघून मला दया आली.

“बागेत मागच्या बाजूला कचऱ्याची बादली आणि झाडू आहे तो घे आणि कर काम.”

मी दार लावून घेतलं. तो काम करताना खिडकीतून दिसत होता.

आमची जेवणाची वेळ झाली. बाहेर ते पोर उपाशी काम करतंय या विचारानं पोटात तुटलं.

“इकडं ये रे, थोडं खाऊन मग कर काम ” मी खिडकीतून ओरडले.

“नगं काकू. भूक न्हाई.”

त्याच्या आवाजातील ठामपणानं मी गप्प झाले.

तासाभरानं त्यानं बेल वाजवली.

“झालं बघा समदं ,काकू ,एक बार बघून घ्या.”

त्यानं खरंच सगळं स्वच्छ केलं होतं. न सांगताच गाडी सुध्दा लखलखीत पुसली होती.. मी खुष होऊन पैसे  घेऊन आले. ते बघून तो थबकला . केविलवाण्या सुरात म्हणाला ,” काकू, पैशापरीस डाळ -तांदळ देता? रातीपास्नं धाकली भन डाळ भातासाटी रडतीया. आन् आता दुकानं बंद झालीत ”

माझ्या काळजात कळ उमटली. पुढच्या काळजीनं मी हावरटपणानं चार सहा महिन्यांचा किराणा भरुन ठेवला होता. ते तुडुंब भरलेले डबे डोळ्यासमोर आले. अपराधी भावनेनं आत आले.

डाळ, तांदूळ ,साखर प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरलं.

पायरीवर ठेवलेल्या पिशव्या बघून त्यानं शर्टाच्या बाहीनं डोळे पुसले. कृतज्ञ नजरेनं  माझ्याकडं बघत म्हणाला ,” आंगन लोटाया  यिऊ रोज ? ”

नकळत माझ्या तोंडून गेलं, “ये.अरे,पण नाव काय तुझं ?”

“शिवा”

डाळ तांदूळाच्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडं बघताना मी नकळत डोळे पुसले.

 

© © सौ.प्रियदर्शिनी तगारे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जगन्माता ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

 ☆ जीवनरंग ☆ जगन्माता ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

“मॅडम अनाथ मुलांच्या आई झाल्या.”

“ज्यांना कोणी वाली नव्हता, अशा मुलांवर यांनी मायेची पाखर घातली.”

“पोरक्या मुलांचा आत्मविश्वास जागा करून त्यांना सन्मानाने उभं राहायला साहाय्य केलं.”

“आपलं उभं आयुष्य यांनी या व्रताला समर्पित केलं.”

“खरं तर हा जगन्माता  पुरस्कार मॅडमना यापूर्वीच द्यायला  हवा होता.”

जगन्माता पुरस्कारप्रदान सोहळ्यातलं कौतुक अजूनही तिच्या कानात घुमत होतं. इतक्या   वर्षांच्या परिश्रमांचं चीज झालं होतं.

घराची बेल वाजवताच मुलाने येऊन दार उघडलं आणि पाठ फिरवून तो तरातरा चालायलाच लागला.

‘विसरला असेल समारंभाचं,’ असं वाटून ती त्याच्या मागोमाग गेली.

“जगन्माता म्हणे !पोटच्या पोराला तर वाऱ्यावरच  सोडलं होतं.  अनाथासारखा वाढलो मी,” तो बायकोला सांगत होता.

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

फोन नं. 9820206306.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – चतुर मंत्री ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – चतुर मंत्री ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा २. चतुर मंत्री

धारानगरीत एक राजा होता. राजेलोकांना वेगवेगळे छंद असतात. तसे या राजाला ज्योतीष्यांशी चर्चा करण्याचा नाद होता. त्याच्याकडे दररोज एक ज्योतिषी येत असे. त्याच्याकडे येणारे सगळेच ज्योतिषी तज्ञ असत असे नाही.

एक दिवस त्याने एका ज्योतिष्याला “मी किती वर्षे जगणार?” असे विचारले. ज्योतिषी उत्तरला, “महाराज, आपण यापुढे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगणार नाही.” हे ऐकून राजा खूपच चिंताग्रस्त झाला. मृत्यूचे भय कोणाला नसते?

राजाची अवस्था पाहून जवळच बसलेल्या त्याच्या मंत्र्याला खूप दुःख झाले. मंत्री ज्योतिष्याला म्हणाला, “महाराज दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगणार नाहीत हे आपण सांगितले. पण तुम्ही स्वतः यापुढे किती काळ जगणार हे सांगू शकता का?” “ मी यापुढे अजून वीस वर्षे जगू शकतो” असे तो ज्योतिषी उत्तरला. तेव्हा मंत्र्याने आपली तलवार उपसून त्या ज्योतिष्याचा शिरच्छेद केला. मग तो मंत्री राजाला म्हणाला, “महाराज, याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण घाबरून जाऊ नका. स्वतःचा मरणकाळ जाणू न शकणारा ज्योतिषी इतरांचा मृत्युकाळ कसा बरे जाणू शकेल? तेव्हा आपण चिंतामुक्त व्हावे.” मंत्र्याच्या ह्या बोलण्याने राजा निर्धास्त तर झालाच, शिवाय मंत्र्याच्या चातुर्याने खूष होऊन त्याला भरपूर पारितोषिकेही दिली.

तात्पर्य – ज्योतीष्याचे वचन विश्वासार्ह नसते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

 ≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – ऑनलाईन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ अनुवादित लघुकथा – ऑनलाईन ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

“हॅलो”…

“हॅलो, नमस्कार. मी ऑनलाईन गिफ्ट सर्व्हिस मधून बोलतो आहे. सांगा मी तुमची काय सेवा करू शकतो?”

“मला माझ्या मुलाला देण्यासाठी एखादं चांगलं गिफ्ट सुचवाल का ?”

“हो हो, नक्कीच. काय वय आहे तुमच्या मुलाचं?”

“अठ्ठावीस वर्ष”

“ओ.के. गुड. सॉरी मॅडम, पण तुम्हाला गिफ्ट किती रुपयांपर्यंत घ्यायचं आहे ते सांगता का ?”

“साधारण ४०० ते ५०० रुपयांपर्यंत.”

“ठीक आहे. मग तुम्ही त्यांना एखादा चांगला बॉडी स्प्रे भेट देऊ शकता मॅडम.”

“नको. तो स्प्रे वापरत नाही. आणखी काही सुचवाल का?”

“हो नक्कीच मॅडम. भेट देता येतील अशा पुष्कळ वस्तू आहेत आमच्याकडे. तुम्ही त्यांना एखादा चांगला गॉगल देऊ शकता. चालेल का?”

“आणखी काय काय आहे ?”

“वॉलेट देण्याची कल्पना कशी वाटते तुम्हाला?”

“नाही. ते पण नाही चालणार त्याला.”

“हरकत नाही. मग एखादा चांगला शर्ट घ्या मॅडम त्यांच्यासाठी.”

“हो हो, शर्ट चालेल.”

“ओ. के. गुड. साधारण कोणता रंग आवडेल तुम्हाला ?”

“असं करा, तुम्हाला जो रंग चांगला वाटेल, त्या रंगाचाच शर्ट पॅक करून पाठवून द्या.”

“ठीक आहे मॅडम. तुमचा पत्ता सांगता का ?”

“हो सांगते… मि. संजय मित्रा, 304 रेव्हेन्यू स्ट्रीट, लोधी सर्कल, कोलकाता.”

“आई …. तू ?”

“हो, मीच. बाळा, घरी तू माझ्याशी कधीच इतकं गोड बोलत नाहीस. आणि त्यासाठी माझं आईचं मन तळमळत होतं. म्हणून मग विचार केला की फोनवरून तुझ्याशी असं बोलावं. आता मनाला खूप छान, शांत वाटतंय बाळा. Thank you …..”.

 

मूळ हिंदी कथा : डॉ. लता अग्रवाल

अनुवाद :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सरला वहिनी ☆ सौ अंजली गोखले

 ☆ जीवनरंग ☆ सरलावहिनी ☆ सौ अंजली गोखले  ☆

सरला वहिनी, आमच्या गल्ली मधले एक धमाल व्यक्तिमत्व ! गोऱ्या गोऱ्या पान अन् वजनदार. चालताना थुलथुलीत दंड हलायचे. चार पावले चालल्या की दम लागायचा. पण त्याही अवस्थेत बोलायची हौस दांडगी. बोलण्यातून, वागण्यातून सहज घडणारा विनोद त्यांच्या लक्षातही येत नसे.

एकदा सकाळी उठल्या बरोबर घरातली साखर संपल्याचे लक्षात आले. पिशवी अन् पर्स घेऊन दुकानाकडे धावल्या. दुकानाची पायरी चढता चढता दम लागलेल्या आवाजात दुकानदाराला म्हणाल्या, “लांबूनच पाहिलं मी तुम्ही उघडे आहात ते. बर झालं बाई तुम्ही उघडे आहात.” दुकानदाराला हसावे की रडावे समजेना. तेवढ्यात तिथली एक मुलगी म्हणाली,” काकू, तुम्हाला दुकान उघडे आहे असे म्हणायचेय ना?” “तेच ते! द्याहो मला साखर लवकर. चहा झाला नाही अजून”. सरलावहिनी म्हणाल्या. आपल्या बोलण्याने घडलेल्या विनोदाकडे साफ दुर्लक्ष्य केलं त्यांनी.

असेच एकदा सरलावहिनींचे मिस्टर बाहेर गेले असताना मिस्टरांचे एक मित्र आले. सरला वहिनींना काय बोलायला कोणीही चालतं. गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने च हा करण्याचे त्यांच्या लक्षात आले. “बसा हं. पटकन चहा करते.” म्हणत त्यांच्या स्पीडने उठल्या आणि त्यांच्याच स्पीडने चहाची कपबशी घेऊन आल्या. गंमत म्हणजे खुर्चित बसून आपणच तो गरमागरम चहा घेतला. समीरचे मित्र गालातल्या गालात हसत म्हणाले,”वहिनी, आता माझा मित्र आल्यावर मलाही चहा करा” “अग्गो बाई, तुम्हाला दिलाच नाही का मी चहा? खरच, हे आल्यावर करते हं” इति वहिनीबाई !

बायकांना काही ठराविक वयानंतर स्वयंपाक, खाणीपिणी, कप बशा विसळणे अगदी नको वाटते. सर ला वहिनींचे तसेच झाले. यातून सुटका मिळणार कशी? दोन्ही मुली आपल्या सासरी रमलेल्या. त्यांना आईची आठवण कामापुरती ! यांना विश्रांती – बदल कसा मिळणार? अखेर सरला वहिनींनीच एक युक्ति – काढली. “अहो, हल्ली मला खूप दमल्या सारखं होतय. छातीत धडधडतं. मी डॉक्टरांकडे जाऊन येते”. “हो का? अग इतका त्रास होतोय तर बोलली का नाही?” त्यांचेमिस्टर म्हणाले “उद्या जाऊ आपण. आज मित्राकडे जमणार आहोत आम्ही”. सरलावहिनी पटकन ठसक्यात म्हणाल्या, “उद्या नको. माझी मी आजच जाऊन येते.”

रात्री मिस्टर आल्यावर म्हणाल्या, “जाऊन आले ह. B.P. वाढलय खूप माझे. डॉक्टरांनी ८-१० दिवस बेडरेस्ट सांगितली आहे. आपण दोन वेळचा डबा लावूया.” मिस्टरांनी मान हालवली. नेमके दुसऱ्या दिवशी सकाळी फिरून येताना डॉक्टर भेटले त्यांना. डॉक्टरांकडे त्यानी सरला वहिनीच्या तब्येतीची चवकशी केली. डॉक्टर म्हणाले, “अहो, कित्येक दिवसात वहिनी आल्याच नाहीत”.

घरी आल्यावर सरला वहिनींना बोलावून मिस्टर म्हणाले, “अग आत्ताच डॉक्टर भेटले होते. तुला BPचा नाही, जास्त वजनाचा problem आहे म्हणाले. व्यायाम झटून काम आणि खाणे कमी करायला सांगितलेय.”

बिचाऱ्या सरला वहिनी. औषध गोळ्या न घेताच त्यांचे तोंड कडू कडू झाले.

©️ सौ अंजली गोखले 

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जंगलच्या राजाची प्रार्थना ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते

☆ जीवनरंग ☆ जंगलच्या राजाची प्रार्थना ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆

एक चिमणी उडत उडत जंगलात गेली .सोबत कावळेदादा होता.त्यांना घाई गडबडीने जाताना पाहून माकडदादा उड्यामारत  त्यांचा मागे गेले.पोपट,घार, बुलबुल, त्यांच्यात सामील झाले.

जंगलच्या राजा समोर उभे ठाकले.

शहरात वावरणाऱ्या या पक्ष्यांची,प्रांण्याची झुंड बघून

सिंहराजे म्हणाले “आज शहरातील मंडळींना जंगलाची आठवण कशी झाली?”

“महाराज मोठा अनर्थ झाला आहे.शहरातील रस्ते सुनसान झाले आहेत.लोक रस्त्यावर येत नाहीत.सार कसं शांत शांत आहे.”चिमणीने खुलासा केला.

तसा कावळेदादा म्हणाला “हे काहिच नाही महाराज,रस्त्यावर गाड्या नाहीत ,फटफटी नाहीत,सायकली नाहीत,ट्रक नाहीत,जरा सुध्दा कसला आवाज म्हणून नाही.लय भारी वाटतंय.लॅकडाऊन आहे म्हणे तीन महिने मोठी महामारी आली आहे.”

“म्हणून तर आताआमचे मंजूळ आवाज त्यांच्या कानी पडायला लागले.आम्ही शहरात असतो हे आता त्यांना कळतोय.”कोकीळेने आपलं म्हणे मांडले.” मी तर हवे तिथे उड्या मारु शकतो.कुठे ही कसा ही हिंडू शकतो.कोण मला अडवत नाही.मी राजा हे शहराचा माझ्या कुटुंबाला घेऊन जावू शकतो.मी स्वंतत्र आहे आणि माणसे घरात बंद”वाकुल्या दाखवत माकडाने माहिती पुरवली

“महाराज,मी बघतोय,भाजीपाला घेण्यासाठी,दूध घेण्यासाठी,औषधे घेण्यासाठी माणस तोंडाला फडकी बांधून जीवमूठीत घेवून येतात आणि अगाऊपणा करत मोटरीवरून हिंडणाऱ्याच्या गांडीवर पोलिसांच्या काठ्या पडतात.जाम खुश हाय मी.मला काळ्या काळ्या म्हणूण चिडवत्यात चांगली खोडमोडली “कावळेदादा  तिखट मीठ लावून घटना सांग होते.बुलबुल म्हणाले “रस्त्यावर प्लस्टिक कचरा नाही,गुटक्यांची,वेफर्सची,कुरकुऱ्याची रिकामी रॅपर नाहीत,पाण्याच्या, कोल्ड ड्रिंक्स च्या बाटल्या नाहीत,रस्ते कसे स्वच्छ आहेत.माणसे किती कचरा करतात प्रदूषण वाढवतात.या लाॅकडाऊनमूळे प्रदूषण तरी कमी झाले शुध्द शाश्वस घेता येतो.’

प्रत्येकाने काही ना काही सांगीतले सिंह महाराजांनी सारं शांतपणे ऐकून घेतले.मग आपले म्हणने मांडले”या साऱ्या घटनांची कल्पना मला आहे.मानवाला कोरोना विषाणूंची बाधा झाली आहे.याला ते स्वत: कारणीभूत आहेत.मी या संदर्भात विचारपूस केली तेव्हा समजले माणसाचे वर्तन निसर्ग नियमांच्या विरूद्ध आहे.तो स्वत:च्या बुध्दीच्या जोरावर निसर्गाला आपल्या कवेत घेवू पहात आहे पण हे शक्य नाही.मनुष्य हा देखिल प्राणीच आहे त्यांने आपल्या मर्यादा ओलांडल्या तर त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागणार.निसर्गाचा नियम काय आहे.प्रत्येक विषाणू, जीवाणू निसर्गात सहजीवनाने राहतो.एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो.हि साखळी खंडित करण्यांचे काम मानवाकडून होत आहे.त्यांची शिक्षा त्याला मिळणार”

“करतो कोण आणि भोगतो कोण.अस झालं आहे महाराज एका देशातील मानवाच्या चूकीच्या वर्तनाची शिक्षा समस्त मानवजातीला भोगावी लागत आहे.मी तर त्यांचा अंगणातच असते.आज माझे अस्तित्व धोक्यात आले आहे.पण सगळे मानव असे नाहीत.आपल्या गोष्टी ऐकत हे मोठे होतात. आपण काही तरी केलं पाहिजे ते आपलेच आहेत.”डोळ्यात पाणी आणून चिमणी सांगत होती.

“आपण त्यांचे वैरी नाही.पण गुहेतील वटवाघळे किचनमध्ये आणू खायला कुणी सांगितले यांना, जे त्यांच अन्न नाही ते खावं कशाला? आता त्या वटवाघळाला दोष द्यायला हे समस्त मानव रिकामे.निसर्गा पुढे कुणाचे चालत नाही.निसर्गात घडणाऱ्या सगळ्या   घटनांचे आकलन होत नसते.निसर्ग स्वत:च्या नियमाने वागतो.प्रत्येक गोष्टीत संतुलन करतो.जी गोष्ट जास्त होते ती नष्ट करतो.नष्ट झालेली पुन्हा निर्माण करतो.संतुलन हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणावा लागेल.तो अनभिज्ञ आहे.आपण सारे सजीव सृष्टीचे भाग आहोत.म्हणून आज तरी आपण काहीच करू शकत नाही.

लवकरात लवकर या स्थितीतून संपूर्ण मानव जात बाहेर पडू दे अशी प्रार्थना विश्वकर्मा जवळ करू शकतो इतकंच.”

“खरे महाराज तुमचे.या घटनेतून आपण केलेल्या चूकांची जाणीव  मानवजातीला व्हावी आणि त्यातून बोध घेऊन पुन्हा अशी चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.ही इच्छा.देव त्यांना सद्बुद्धी देवो.हीच प्रर्थना करु.मला माझ्या घरी गेलं पाहिजे माझी लेकरं वाट बघत असतील.”

 

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print