मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिलं – या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला. आता इथून पुढे)

त्याला पहिलंबक्षीस तर मिळालंच, पण त्यानंतर जो घरी येईल, त्याच्या पुढे मिहीरचा कीर्तनाचा लाईव्ह शो सुरू झाला. त्याच्या महेश मामानी जेव्हा हा शो पाहिला, तेव्हा त्याच्या मनात आलं, यंदा मे महिन्याच्या सुट्टीत पोराकडून अध्र्या-पाउण तासाचं कीर्तन बसवून घेतलं पाहिजे. पण मग हा कार्यक्रम ठरला, मग मामाला वाटलं,  या कार्यक्रमासाठीच त्याचं कीर्तन बसवून घ्यावं. कार्यक्रमात एक वेगळेपणा.

महेश,  मालतीचे वडील काळेबुवा प्रख्यात कीर्तनकार. त्यांचे घराणेच कीर्तनकाराचे. गावोगावी कीर्तन करत ते फिरायचे. घरची थोडी शेतीही होती. उत्सव, जत्रा-यात्रांच्या वेळी त्यांना कीर्तनासाठी खूप निमंत्रणे यायची.

काळेबुवांना पाच मुले. चार मुली आणि महेश एकटाच मुलगा. तो बारावी पास झाला आणि त्याने डी.एड. केलं. मग गावातल्याच प्राथमिक शाळेत नोकरीला लागला.  शाळेत नोकरी करत करत त्याने गावातल्या शेतीतही लक्ष घातले आणि घराण्याची कीर्तनाची परंपराही जपली. त्याने वडलांसारखं पूर्ण वेळ कीर्तनाला वाहून घेतलं नसलं, तरी अनेक वेळा, अनेक निमित्ताने तो कीर्तन करी. याशिवाय गावात असेल तेव्हा दररोज रात्री सात ते आठ या वेळात कीर्तन करी. कीर्तनाची जुनी परंपरा त्याने जपली असली,  तरी त्याने कीर्तनाचा बाज मात्र बदलला होता. अर्थात् कीर्तनातील रसवत्ता त्याने कायम ठेवली होती. त्याच्या कीर्तनाचे विषय आधुनिक असतात. अंध:श्रद्धा निर्मूलन,  पर्यावरण, राष्ट्रीय समस्या,  सामाजिक प्रश्न इ. विषयांवर तो कीर्तन करतअसे. आपल्या भाच्याची,  मिहीरची गायन आणि वक्तृत्वातील गती पाहून त्याने त्याला या कलेत तरबेज करायचे ठरवले. मालती भावंडात सगळ्यात लहान. उत्तम गुणाची पण सुमार रुपाची. मोठ्या तिन्ही बहिणींची लग्ने झाली. बेताच्या रुपामुळे तिच्या लग्नात, म्हणजे पसंत पडण्यातच अडचणी येत होत्या. मोठ्या बहिणींची लग्ने झालेली. घरचं सगळं तीच बघायची. घरचं संभाळून शाळेतही जात होती. ती एस. एस. सी. ला बसली आणि कुणा मध्यस्थाने मनोहरचं स्थळ सांगितलं. मुलगा कापडाचा व्यापार करतो, असं त्यांना कळलं. मालतीला त्यांनी होकार दिला. मग काळेबुवांनी मुलाची फारशी चौकशी केली नाही. तिची परीक्षा झाली आणि त्यांनी तिचं लग्न करून टाकलं. मुलीच्या जबाबदारीतून ते रिकामे झाले. यात्रा-जत्रा करायला  मोकळे  झाले.

मालतीचं लग्न म्हणजे एक प्रकारची तडजोड होती. मनोहर दिसायला सुरेख,  म्हणून तर त्याचं नाव मनोहर ठेवलं. त्याला तीन भाऊ आणि दोन बहिणी. तो भावंडात मोठा. बाकीची भावंड त्याला आप्पा म्हणत. मग बाकीचेही त्या आप्पाच म्हणत. बाकीचे भाऊ चांगले शिकले, पण मनोहर मात्र फारसा शिकला नाही. स्वभावाने गरीब. लोकं सांगतील ती कामं करायचा. इतरांच्या मदतीला धावायचा. पण शालेय शिक्षणात मात्र त्याला गती नव्हती. बाकीचे भाऊ शिकेशिकेपर्यंत वडील गेले. पुढे ती भावंड नोकरीला लागली. आपापल्या नोकरीच्या गावी निघून गेली. त्यांची लग्न-कार्य झाली. मनोहर काहीच मिळवत नव्हता. घरची इस्टेटही नव्हती. मग याचं लग्नं कसं करायचं? तोपर्यंत कुणी तरी त्याला एका कापड विक्रेत्याकडे नोकरी मिळवून दिली. त्याने बाजारच्या दिवशी रस्त्यावर याला कापड व तयार कपडे विकायला बसवलं. विक्री होईल, तसे पैसे. जवळपासच्या ज्या गावचा बाजार असेल, तिथे तो कपड्यांची गाठोडी घेऊन जायचा आणि बाजारात विकायला बसायचा. आता अशा मुलाला मुलगी तरी कोण देणार? काळेबुवांच्या कीर्तनाला येणार्‍या एका कापड व्यापार्‍याने त्यांना मनोहरचं स्थळ सांगितलं. मालती त्यावेळी एस. एस. सी. ला बसली होती. मनोहरच्या आईला वाटलं, मुलगी सुमार रुपाची असेना का, एस. एस. सी. होईल. नोकरी करेल. मुलाचा संसार मार्गी लागेल. त्यांनी सामान्य रुपाची मालती पसंत केली आणिमनोहरचं लग्न लावून दिलं. पण त्यांची मनिषा काही पूर्ण झाली नाही. मालती पास झाली नाही. पुन्हा आक्टोबर, पुन्हा मार्च ती परीक्षेला बसली,  पण गणित, इंग्रजीनं तिच्या यशाचा मार्ग रोखून धरला, तो धरलाच. इंदूतार्इंचा हिरमोड झाला. आता त्यांना प्रत्येक कामात मालतीच्या चुका दिसू लागल्या. त्या` ‘वेंधळी’  म्हणूनच तिला हाक मारत. त्या आरडा-ओरडा करायला लागल्या,  की ती आणखीनच गोंधळून जाई. खरं तर लग्नाच्या आधीही घरात ती सगळं करायची. पण इंदूतार्इंना तिचं काहीच पसंत पडत नसे. नावडतीचं मीठ आळणी म्हणतात ना! मनोहरची कमाई खात्रीची नव्हती. एक दिवस इंदूतार्इंनी दोघांना घराच्या बाहेर काढलं. `तुमचं तुम्ही मिळवा आणि तुमचं तुम्ही खा.’ त्या म्हणाल्या.

`पण आई आम्ही जायचं कुठे?’ मनोहर म्हणाला.

`कुठेही जा. दाही दिशा मोकळ्या आहेत तुम्हाला. नाहीच कुठे थारा मिळाला तर मष्णात जा.’  मालतीच्याबाबतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला होता. त्याचं वैफल्य जहरी शब्द घेऊन बाहेर पडत होतं. `साधं एस.एस.सी. होता नाही आलं तुला.’

आता मात्र मालतीदेखील चिडली. शब्दाने शब्द वाढले. वादाचं भांडणात रुपांतर झालं.

मालती म्हणाली, `मी एस. एस. सी. पर्यंत तरी आले.  तुमच्या मुलाला सातवीच्या पुढे ही जायला जमलं नाही. मुलगा व्यापार करतो,  म्हणालात. रस्त्यावर बसतो, नाही म्हणालात. फसवलंत तुम्ही आम्हाला.’

`आणि एक दिवस…’ मिहीरचं निरुपण चालू होतं. वसूची कथा तो आख्यानातून ऐकवत होता. `एक दिवस त्या महामायेने,  त्या कडकलक्ष्मीने, वसूच्या सासूने, वसुंधरेला हाताला धरून घरातून बाहेर काढलं…. पण वसू डगमगली नाही. भावाला जेव्हा हे कळलं,  तेव्हा तो वसूला म्हणाला, `घरी चल. अर्धी, तिथे चतकर भाकरी खाऊ, पण एकमेकांना धरून राहू.’  त्यावर वसू म्हणाली, `भाऊराया, मला माहीतआहे,  मला ठेच लागली,  की तुझ्या डोळ्यात पाणी येतं. पण अरे,  माहेर किती  दिवसांचं? ‘ वसू पुढे म्हणाली, `असं माहेर ग माझं गाढ सुखाची सावली’… माहेर सुखाचं खरं, पण किती काळ? `क्षणभरी पहुडाया अनंताने हंतरली.’  बरं का श्रोते हो, एक अहिराणी ओवी आहे. माहेर कशासाठी? .. तर… `पावलीनी चोळी, एक रातना विसावा…’

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ तृप्त मी, कृतार्थ मी…. भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिल  – `मुळीच नाही. आणखी पाच वर्षांनी आपण तुमचा अमृत महोत्सव साजरा करू. दहा वर्षांनी तुमच्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव नि त्याच्या पुढल्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन.’ इती सुखदा. मालतीची लाडकी सून. आता इथून पुढे -)

आप्पा-मार्इंसाठी ते आता रहस्य राहिलं नव्हतं. मालती म्हणाली, `मी चार सहा जणींना ताखीली घेऊन स्वैपाक करते. पुरणपोळ्या करू.?’

`काहीतरीच काय आई! तू म्हणजे कमाल करतेस हं! म्हणजे तुला हवा तर पुरणपोळ्यांचा बेत करू, पण तू काहीही करायचं नाहीस. येणारे-जाणारे तुला भेटायला येणार! तू आणि आप्पांनी एकदम  फ्री राहिलं पाहिजे.’

 रोज काही तरी नवीन सुचत होतं. फोनवरून आमंत्रणं दिली जात होती. त्या दिवशी सकाळी नाश्त्याला काय, जेवायला काय, मेन्यू ठरत होते. बदलत होते. सकाळपासून काय काय करायचं, कार्यक्रम ठरत होते. बदलत होते.

अखेर तो वीक एंड आला. सुहास कुटुंबीय आदल्या दिवशीच फार्म हाऊसवर रहायला गेले होते. सकाळचे  साडे नऊ वाजले. नातेवाईक, निमंत्रित जमू लागले. इडली-वडा, सँडवीच असा नाश्त्याचा प्रबंध होता. नाश्ता झाल्यावर बागेतून, फुलांच्या ताटव्यातून, गप्पा मारत,  हिंडत-फिरत मोठ्यांनी त्या सगळ्या वातावरणाचा आनंद घेतला. मुले खेळत,  उड्या मारत, उंडारत होती.

बरोबर साडे दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. हॉलमध्ये एका भिंतीवर रेशमी निळा पडदा लावला होता. त्यावर थर्मोकोलची `जीवेत्शरद: शतम्’ अशी मोठी अक्षरे त्याखाली, मनोहर (आप्पा), मालती (माई) अशी नावे. बाकीचा पडदा छोट्या छोट्या फुलांनी सजवलेला. उत्वमूर्तींसाठी मखमलीने वेढलेल्या बसायच्या खुर्च्या सगळा माहोल काहीसा भारदस्त आणि भारावलेलाही. नेपथ्य प्रकाशचे. त्याने फार्मचीही खूप काळजी घेतलेली दिसत होती. मीरा आणि तिची मामेबहीण शोभा यांनी भरतनाट्यातून गणेशवंदना सादर केली. गेली दोन वर्षे त्या नृत्य शिकताहेत. त्या इतक्या सुरेख नाचल्या, की बघणार्‍याना आपल्या डोळ्यांचं पारण फिटलं, असं वाटलं. त्या नंतर सुहासने स्वागत केलं. सगळी जमली,  म्हणून आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, `आज मी जो काही आहे, तो केवळ माझ्या माई-आप्पांमुळे आहे. त्यांनी सोसलेल्या अपार कष्टातून माझं हे वैभव उभं राहीलं आहे.’ त्यानंतर त्याला इतकं  भरून आलं,  की त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. शेवटी त्याच्या महेश मामाने त्याला धरून खुर्चीवर बसवलं. नंतर अनेक जण आप्पा मार्इंबद्दल बोलले. विशेषत: मार्इंचा कष्टाळूणा, त्यांची दूरदृष्टी,  त्यांचा लोकसंग्रह,  दुसर्‍याच्या  उपयोगी पडण्याची वृत्ती,  असं खूप काही…नंतर कुणी गाणी म्हंटली. कुणी विनोद संगितले.   

सगळ्यात शेवटी मिहिर कीर्तन करायला उभा राहिला. कीर्तनाच्या पारंपारिक वेषभुषेतील या बालकीर्तनकाराने सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तो म्हणाला, `प्रथम जगदीश्वर,  नंतर माझे जनक-जननी आणि माझे पितामह व मातामह यांना वंदन करून मी माझ्या कीर्तनाला प्रारंभ करतो. ‘ त्याने आपल्या आई-वडलांकडे अणि नंतर आप्पाआणिमार्इंकडे पाहून हातजोडला आणि नमनाच्या श्लोकाला सुरुवात केली. 

`वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा’

एरवीच्या कीर्तन परंपरेतल्या श्लोकांपेक्षा हा श्लोक जरा हटकेच होता. तसंच त्याचं कर्तनदेखील नेहमीच्या कीर्तन परंपरेतल्या कीर्तनापेक्षा जरा हटकेच होतं. त्यानंतर त्याने श्रोत्यांची आळवणी केली. एकाग्रतेने, सावध चित्ताने आख्यान ऐकायची विनवणी केली. `तुम्ही लक्षपूर्वक, शांत चित्ताने कीर्तन ऐका,  म्हणजे या कथेत तुम्हाला गोडी वाटेल…’ तो म्हणाला आणि त्याने भजनाला सुरुवात केली, `जय जय राम कृष्ण हारी…. जय जय राम कृष्ण हारी…. ‘  त्याने सर्वांनाच आपल्याबरोबर भजन म्हणायला सांगितले. सगळेच भजनात एकरूप झाले, तशी त्याने दोन्हीहात बाजूला नेऊन श्रोत्यांना थांबण्याची खूणकेलीआणि निरुपणाचा अभंग गायला सुरुवातकेली. आजचा निरुपणाचा अभंग चोखोबांचा होता, `ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। काय भुललासी वरलिया रंगा। वरलिया रंगा।।’

मिहीरचा आवाज सुरेलआणिखडा होता. तो गायलालागला, की मालतीला आपले वडीलच गाताहेतसं वाटायचं. त्याचं वक्तृत्वही अस्खल्लि तहोतं. वक्तृत्व आणि गायनात गेली तीन-चार वर्षं तो शालेय आणि आंतरशालेय स्पर्धेत बक्षिसे मिळवत होता. यंदा तो सातवीत आहे. सुहास अधूनमधून म्हणतोदेखील, ‘आता गाणं-बोलणं पुरे. थोडा थोडा अभ्यासही करा.’  त्यावर मालती म्हणते, `पुरे झालं तुझं! तू एक पुस्तकातला किडा होतास. त्याला नको बनवूस तसं. सगळ्यातला आनंद घेऊ दे त्याला. मोठा झाल्यावर आहेच,  अभ्यास… अभ्यास… आणि अभ्यास…’

आज मिहीरच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठरवला, त्यालाही एक स्पर्धाच कारणीभूत झाली होती. शाळेत फॅन्सी ड्रेस स्पर्धा होती. काय करावं? कोणती वेशभूषा करावी, यावर बोलता बोलता,  माई एकदम म्हणाली, `तू र्कीतनकार हो! तिने नमनाच्या अभंगाच्या दोनओळी  व चार-पाच वाक्याचं निरुपण त्याच्याकडून  बसवून घेतलं. एका दिवसात कीर्तनकाराची वेशभूषा शिवून तयार केली. या स्पर्धेत मिहीरचा कीर्तनकार सगळ्यांना प्रभावित करून गेला.

क्रमश:….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तडजोड – भाग -2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? जीवनरंग ❤️

☆ तडजोड – भाग – 2 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

भाईसाहेबांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“”विकीदादा,निरज,–तुम्ही दोघांनी हे मान्य केलेत याचा खुप आनंद झाला.निरज,कारखान्यात  तुमची जबाबदारी वाढली ,आता घराकडे लक्ष द्यायला होणार नाही.अन् सुप्रियाची जबाबदारी तुमच्यावरच आहे.त्यांच्या लग्नाचा  विचार केंव्हा करणार?”

त्याचबरोबर, सुप्रिया आणि भाईसाहेबांनी चमकुन एकमेकांकडे पाहिले. वहिनीसाहेबांच्या नजरेने ते बरोबर हेरले.२,३ वर्षे त्या दोघांचे सुरु असलेले प्रकरण त्यांना समजले होते.

 नवर्‍याचे वयाने एवढ्या लहान मुलीबरोबर संबंध —-त्या पार कोलमडल्या होत्या.अगदी जीव द्यायचेही मनात आले.

पण मुळ स्वभाव विचारी असल्याने त्यांनी मनाचा तोल अजिबात ढळु दिला नाही.आपल्या जीव देण्याने ,बंटी पोरका होईल.आपल्या वैयक्तिक सुखदःखासाठी त्याचे आयुष्य वाया घालवणे योग्य नाही.

उच्चशिक्षण घेतले नसले तरी व्यावहारिक अनुभव ,आणि साधकबाधक विचार प्रवृती होती.त्यांची निर्णयक्षमता जेवढी जबरदस्त,,नियोजनही तेवढेच प्रभावी होते.त्यामुळे निर्णयाच्या याबाबत कोणाच्याही मनात शंका नसे..

किंचित हसुन ,””निरज,तुम्ही करु नका निष्कारण विचार.आम्ही केला आहे त्याला हो म्हणा.”

सगळेच त्यांच्याकडे बघु लागले.

भाईसाहेबांना रहावेना ,””काय ठरवलेत ?निरजला न विचारता?'”

वहिनीसाहेब शांतपणे,””हो,ज्यात सगळ्यांचेच हित आहे असेच ठरवले. निरज, विकीदादांना तुम्ही जवळुन पाहता,.त्यांच्यावर आलेल्या संकटातुन बाहेर काढण्यासाठी तुम्ही खुप मदत केलीत.तुमच्या मनात  त्यांच्याविषयी चांगल्या भावना आहेत.म्हणुनच, विकीदादांच्या साठी आम्ही सुप्रियाचा हात मागतो.—“

त्यांचे बोलणे ऐकुन एवढा वेळ शांत बसलेले विकीदादा,””पण,वहिनी —-तुम्हाला माहित—-नाही”.

वहिनीसाहेब,हात दाखवुन ,विकीदादांचे बोलणे थांबवून ,धीम्या पण करारी आवाजात,” हो ,आम्हाला सगळ माहित आहे.निरज हे लग्न होणार,.अगदी लवकर चांगला मुहुर्त बघुया,.कारखान्याची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहेच.विकीदादा आणि सुप्रिया, —दोघेजण शेताची,गावाकडची पुर्ण जबाबदारी घेतील,पण त्याआधी ,शेती संबंधी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी दोघेही,२ ,वर्षे परदेशात रहातील .आम्ही त्यासंबंधी चौकशी केली आहे.”

सुप्रियाला कड्यावरून ढकलून दिल्यासारखे वाटले, शब्द तोंडातच थिजले तर डोळ्यातले पाणी लपवणे अवघड झाले.

भाईसाहेबांची अवस्था तर काहीही बोलण्याच्या पलिकडे गेली.”सौदामिनी,एवढे घाई कशाला? त्यांना जरा विचार करु दे”. हे तोंडाशी आलेले शब्द त्यांनी मुकाटपणे गिळले.

   एवढा वेळ जाणूनबुजून दुर्लक्षित केलेल्या सुप्रियाचा हात हातात धरुन “”चला,आपण खाली जाऊया,तुम्ही पण सर्व खाली देवघरात या”.वहिनीसाहेब. देवासमोर तिला बसवुन ,चांगली भारीतली साडी ,अन् सोन्याचा नेकलेस देऊन ,पाच फळांनी ओटी भरली, तिच्या डोळ्यातले पाणी पुसत, 

“”हे सर्व ठरवणे आम्हालाही सोपे नव्हते.पण पुढील वाताहात टाळण्यासाठी —-  हा निर्णय घेतला. लहान वयामुळे तुम्हाला आता मान्य होत नसेल पण स्विकारावे लागेल. –आयुष्याशी करावी लागणारी तडजोड समजुन.”

*  समाप्त  *

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तडजोड – भाग -1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर

सुश्री गायत्री हेर्लेकर

? जीवनरंग ❤️

☆ तडजोड – भाग -1 ☆ सुश्री गायत्री हेर्लेकर ☆

सोमवारी सकाळी घरी येऊन भेटण्याचा निरोप वहिनीसाहेबांकडुन आला.तेंव्हापासून सुप्रिया काहीशी धास्तावली होती.देसाईसर आणि आपल्याविषयी समजले असेल का त्यांना?

निरजदादाला सांगावे का? त्याच्याशिवाय आपल्याला दुसरे आहे तरी कोण?पण त्याला सांगायचे तरी कसे,? नकोच.त्यालाही हे पटणारे नाहीच.देसाईसरांना किती मान देतो तो.आईबाबांच्या अपघाती मृत्युनंतर काकाकाकुंनी सांभाळले आपल्या दोघांना,पण आता त्यांचे छत्रही गेले.

सोमवारी निरजच्या कारखान्याला सुटी.तो घरीच असणार असे वाटले,पण तो तिच्याआधीच आवरून बाहेर पडला.आधीच देखणी आणि नेहमी व्यवस्थित रहाणारी सुप्रिया, आज मात्र मन थार्‍यावर नसल्याने कशीबशी आवरून बाहेर पडली.

देसाईंचा “साफल्य ” बंगला शोधायला फारसा वेळ लागला नाही.अपेक्षेपेक्षा खुपच सुंदर होता.आत गेल्यावर,””वहिनीसाहेब पुजा करत आहेत,तुम्हाला बसायला सांगितले “म्हणुन कावेरीने सांगितले.

बंगल्याची आतली सजावटही उच्च अभिरुची दाखवत होती.तिला वाटले देसाईसरांचीच निवड असणार सगळी.वाट बघण्याची ती ५,७मिनीटे– मनातील धाकधुक आणखीनच वाढवून गेली.

दारातून  वहिनीसाहेब—सौ. सौदामिनी देसाई आल्या.तसा रंग ऊजळ असला तरी रुप सुमारच, आणि चणही पुरुषी.डोळ्यात करारीपणा,जरब.पण पोकळ डामडौल नाही तर कर्तृत्वाची जोड ,त्यामुळे आत्मविश्वास .

बर्‍यापैकी भारी माहेश्वरी साडी,मोजकेच पण छान  दागिने. कुठेही भपकेबाजपणा नव्हता.

तशी सुप्रियाची आणि त्यांची २,४वेळा भेट झाली होती .पण बाहेरच आणि तशी घाईघाईतच.२४,२५ वयातील सुप्रियाला आपल्या देखण्या रुपाचा थोडा अभिमान होता.पण चाळीशीतल्या एखाद्या बाईचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी असु शकते हे वहिनीसाहेबांकडे निरखून बघितल्यावर तिला समजले.

तेवढ्यात समोरच्या जिन्यातून — देसाईसर खाली आले.४५ कडे झुकले तरी देखणे ,रुबाबदार व्यक्तिमत्व.तिच्यादृष्टीने देसाईसर तरी सर्वजण भाईसाहेब म्हणत.तसे पिढीजात श्रीमंत,भरपुर शेती,मोठा कारखाना.शिवाय प्रतिथयश C.A.म्हणुन चांगली प्रॅक्टिस.

अनेक संस्थांचे कार्याधिकारी. त्यातील एका शिक्षणसंस्थेशी जास्त जवळीक,हौस म्हणुन तिथे शिकवत .तिथेच MBAकरणार्या सुप्रियाशी २,३वर्षांपुर्वी भेट झाली.

नकळत बंध जुळले.आणि वेगळेच वळण घेऊन नाते निर्माण झाले.

सुप्रियाला तिथे बघुन त्यांना आश्चर्य वाटले,आणि गोंधळात पडले.

“या, निरज, तुमचीच वाट पहात आहोत,” या वहिनीसाहेबांच्या शब्दांनी आता सुप्रियाही चांगलीच गोंधळली.

वहिनीसाहेब ,” चला ,आपण वरच्या हॉलमध्ये जाऊया,कावेरी,विकीदादांनावर पाठव”.

विकीदादा—विक्रम देसाई,भाऊसाहेबांचा लहान भाऊ.तसे वयात जरा जास्त अंतर,परदेशात शिकुन आलेले पण लाडावलेले ,म्हणुन मध्यंतरी बहकले.एका पोरीच्या प्रेमात असतांनाच ,तिच्या खुनाच्या आरोपात अडकले. वहिनीसाहेबांमुळे सहीसलामत बाहेर पडले पण अजुन बिथरलेलेच म्हणुन ना कारखान्याकडे लक्ष ना शेती बघणे.ना ईतर कोणत्या कामात रस.

देसाई कुटुंबाच्या सर्वेसर्वा तशा वहिनीसाहेबच. भाईसाहेबांना मुळातच कौटुंबिक बाबतीत स्वारस्य कमी.वहिनीसाहेब नात्यातल्याच. त्यामुळे घरचे रितीरिवाजांची त्यांना लग्नाच्या आधीपासूनच माहिती.वहिनीसाहेबांच्या कर्तेपणाचा अनेक वेळा अनुभव आल्यामुळे ते कशातच हस्तक्षेप करत नव्हते.विक्रम आणि आपला मुलगा बंटी —यांची जबाबदारी पण वहिनीसाहेबांनी समर्थपणे पेलली.त्यातुन अडचण आलीच तर  ,त्या भाईसाहेबांना सल्ला विचारीत.दोघांमध्ये चर्चा होई,पण शेवटी,”सौदामिनी  तुम्हीच काय योग्य वाटेल तसे ठरवा.” म्हणुन भाईसाहेब सुत्र त्यांच्या हातात देऊन मोकळे होत.

आताही,विक्रमचे कारखान्याकडे लक्ष नाही हे त्यांच्या लक्षात आले.म्हणुन कारखान्याची जबाबदारी कोणावर तरी सोपवावी हा विचार त्यांनी केला.

निरज,व्यवस्थापक म्हणुन अतिशय उत्तम काम करत होता.पण शेवटी तो पगारी नोकर .त्याला भागीदार करुन घेतले तर ,तो अधिक लक्ष घालुन काम करेल हा विचार करुन त्यांनी आज सगळ्यांना बोलावले होते.अर्थात ,आधी भाईसाहेबांच्या संमतीनेच.त्यांचा हा निर्णय ऐकुन ,निरज,सुप्रिया,आनंदले,पण विक्रमलाही आपली जबाबदारी कमी होणार याचा आनंद झाला.

निरजची भांडवलाची अडचणही त्याने सांगितली.पण ,त्याकडे  वहिनीसाहेबांनी जरा दुर्लक्षच केले.

भाईसाहेब मात्र अजुन संभ्रमात होते.वहिनीसाहेबांच्या चेहर्‍यावरून त्याच्या मनात आणखी काहीतरी नक्कीच आहे असे त्यांना वाटत होते.

“हं, सौदामिनी, आता झाले ना तुमच्या मनासारखे, सगळ्यांचे तोंड गोड करा. चालु देत तुमच्या गप्पा .मला जरा बाहेर जायचे, निघतो मी.’ भाईसाहेब.

किंचित विचार करीत,वहिनीसाहेब,

“नाही, थांबा जरा. अजुनही महत्वाचे सांगायचेच.”

क्रमशः….

©  सुश्री गायत्री हेर्लेकर

201, अवनीश अपार्टमेंट, कोथरुड, पुणे.

दुरध्वनी – 9403862565

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 3 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ मी, माझी मैत्रीण आणि…. साठीची ताकद – भाग 1 ☆ शब्दांकन….श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

(मागील भागात आपण पहिले – . ” मनात मी खुश झालो होतो पण साठीच्या ताकदीने मनातली ख़ुशी काही मी चेहऱ्यावर न आणता चंदाला “भेटू ८.३० वाजता” असे बोलून बाय केले. इथून पुढे )

ठीक ८.३० वाजता मी एकदम टकाटक होऊन, अंगावर परफ्युम मारून चंदाच्या रूमच्या बाहेर उभा ठाकलो. तोंडात माऊथ फ्रेशनर मारला. आज साठीची ताकद जाणवत होती. जुन्या मैत्रिणीला हॉटेलमधल्या एका रूममध्ये भेटायचं आणि ते पण बायकोच्या परमिशनने. एकदम भारी वाटत होते. सरिताचा माझ्यावरचा विश्वासच आज माझी आणि चंदाची भेट करून देत होता. चंदाच्या रूमची बेल मारली आणि चंदाने लगेच दरवाजाही उघडला. आत गेलो तर जरा हिरमुसला झालो. मला वाटले होते चंदा एकटी असेल पण रूममध्ये तो पण होता. तो…पवन राठी. टकल्या… पवन राठी. मी आत मध्ये गेलो तसा तो उठला आणि बाहेर जायला निघाला. चंदाने त्याला थांबवायचा खोटा आग्रह केला पण त्यानेही त्याची कोणीतरी वाट बघतंय असे सांगितले आणि तो बाहेर पडला. चंदाने आमच्या ड्रिंक्सची मस्त तयारी करून ठेवली होती. तिनेच सराईतासारखे दोन ग्लास भरले आणि आम्ही चिअर्स केले. नंतर जवळ जवळ अर्धा तास आमच्या शाळेतल्या आठवणी काढत गप्पा रंगल्या होत्या. गप्पांच्या आणि शाळेतल्या मित्र मैत्रिणींच्या आठवणी काढत चंदाने भरलेला दुसरा पेग मी कधी संपवला मलाही कळले नाही. चंदा आणि मी मुक्तपणे, हसत खिदळत जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. ‘ हम तुम एक कमरेमे बंद हो, और चाबी खो जाये ‘ हे गाणे आम्ही खूप वर्षांनी परत एकदा गायलो. एक तासाने म्हणजे ९.३० ला चंदाने मला सांगितले, ” चल…. आता आपण तुझ्या रुमवर जाऊया. सरिता बिचारी एकटी असेल तिलाही आपल्या गप्पांमध्ये सामील करूया.”  चंदाचा असा यु टर्न मला अनपेक्षित होता.   “अग सरिता आता झोपली असेल. तिला लवकर झोपायची सवय आहे. नको उगाच तिला आता उठवायला” असे मी बोलत असतानाच अजून मला काही बोलायची संधी न  देता माझा हात धरून ती मला तिच्या रूमच्या बाहेर घेऊन आली. पुढच्या दुसऱ्या मिनिटाला आम्ही माझ्या आणि सरिताच्या रूमच्या बाहेर उभे होतो. अजूनही  मी चंदाला समजावत होतो ” अग नको उठवूया तिला. झोपेतून उठवलेले तिला नाही आवडत.” मी बोलेपर्यंत माझ्या शर्टच्या खिशातले डोअर कार्ड काढून तिने आमच्या रूमचा दरवाजा उघडला आम्ही आत मध्ये गेलो आणि ……

आणि मी बघतच राहिलो. तो ….. तो  चंदाचा मित्र पवन …टकल्या पवन राठी. तो आणि सरिता हसत खिदळत गप्पा मारत होते. त्यांचेही ग्लास भरलेले होती. हे काय चालले आहे ते मला काही कळत नव्हतं. आता  त्यांच्यात  चंदाही सामील होऊन ते तिघे जोर जोरात हसत होते आणि मी नुसता  वेड्यासारखा त्यांच्याकडे बघत होतो.

सरिता, चंदा आणि पवन हे तिघेही एकाच कॉलेजचे. पवन आणि सरिता हे एकाच बॅचचे. पवन गुप्ते आणि चंदा ह्यांचे लव्ह मॅरेज झाले. गेल्या महिन्यात त्यांच्या कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचे  रियुनिअन होऊन जेंव्हा ते तिघे एकमेकांना भेटले तेव्हा चंदा आणि सरिताच्या बोलण्यातून सरिताला समजले की मी माझी चंदा, शाळेतल्या मैत्रिणीचा जो उल्लेख करतो ती हिच चंदा आहे आणि तिघांनी मिळून ही आजच्या भेटीची आखणी केली  आणि माझा पोपट केला.  हे सगळे समजल्यावर मलाच माझे हसू आले आणि माझ्या संयमी स्वभावानेच आज माझी साठीची ताकद शाबूत ठेवली ह्याची जाणीव झाली.

हो आणि एक खरं सांगू का….. शाळेत असताना चंदाने मला तिचा बेस्ट फ्रेंड म्हणून निवडले असले तरी माझी बेस्ट फ्रेंड ती पल्लू … पल्लवी कामत होती…. तिचा काही तपास लागतो का बघायला पाहिजे.

चला आता परत एक ग्लास भरून चिअर्स करून माझ्या बायकोच्या त्या टकल्या मित्र आणि जाड्या मैत्रिणी बरोबर डिनरला जायला लागेल.

समाप्त 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-5 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-5 ☆ श्री आनंदहरी 

पोलिसांना रखमाचा तपास लागलाच नाही. या साऱ्या प्रकणात कितीतरी वेळा सदाला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या.  त्याला कामावर जाता आले नव्हते. या साऱ्यामुळे त्याची नोकरी सुटली होती.. पोराची जबाबदारी पडू नये म्हणून रखमाच्या भावाने, आईने कधीच पाठ फिरवली होती. सदा दिवसभर  हताश, उदास, विचारात गढून गेलेल्या अवस्थेत आढ्याकडे बघत बसून राहू लागला होता. बायजाला त्याची ही अवस्था पाहवत नव्हती.. ती त्याला सांगायची, समजवायची…  त्याच्या पोटाला दोन घास करून घालायची ..तान्ह्या पोराला सांभाळायची.. पोर संगती घेऊन भाजीपाला विकायला जायची. गल्लीतला प्रत्येकजण सदाची अवस्था पाहून हळहळत होता.

शेजाऱ्या-पाजाऱ्यांची सहानुभूती हळूहळू ओसरत गेली होती. शेवटी प्रत्येकाचे हातावर पोट होतं.. स्वतःसाठीही बसून राहणे परवडणार नव्हते.. प्रत्येकाची दिनचर्या पूर्ववत सुरू झाली होती.. बायजाम्हातारी, नात्याची ना गोत्याची पण मागल्या जन्मीचे काहीतरी सोयर असल्यासारखी सदाची, त्याच्या पोराची काळजी घेत होती. सदाला या साऱ्यातून बाहेर काढायला हवं, सावरायला हवं असे तिला वाटायचे.. सदाला सांगून -समजावून ती  स्वतःबरोबर भाजी विकायला बाजारात घेऊन जाऊ लागली होती. चार लोकांत वावरत राहिल्याने सदामध्ये बदल होईल असे बायजाला वाटत होते.. तसाच बदल सदामध्ये होऊ लागला होता. 

काळ कधी कुणासाठी, कशासाठी थांबत नाही.. तो पुढे सरकतच असतो आणि काळ हेच सगळ्यावरचे औषध असते. सदाचे पोर काळाबरोबर बायजाच्या मायेत वाढत होते. सदा पूर्ण सावरून घरातली बरीचशी कामे करू लागला होता. बायजाम्हातारीबरोबर बाजारात बसून व्यापारात तयार झाला होता. पोटापूरते मिळत होते. दुःखावर खपली धरली होती.  सदाचा कामात बदल एवढे एक सोडलं तर सारे पूर्ववत चाललंय असे वाटत होते.

रखमा जणू काळाच्या पडद्यावरून पुसून गेली होती. लोकांच्या विस्मरणात गेली होती. सदाही तिला विसरून गेला असेल असे लोकांना वाटू लागले असावे.

‘असे एकट्याने कसं जगता ईल ? त्यात लहान पोर आहे.. संसाराचा गाडा सांभाळायला कुणीतरी बाईमाणूस पाहिजेच ‘ कुणीतरी सदाच्या लग्नाचा विषय बायजाजवळ काढला होता. खरेतर बायजाच्याही मनात अधून मधून हाच विचार येत होता पण तिने सदाजवळ कधी विषय काढला नव्हता.  हळू हळू कुणी थेट, कुणी आडून आडून सदाला सुचवू लागले.

” पोरा, तुझं काय वय झाल्याले न्हाय, परपंचाचा गाडा  कुठंवर एकटा वडशील. पोटाला पोर हाय तुझ्या. वरीस झालं.. आता तरी लगीन करायचा इचार कर. “

एके दिवशी रात्रीची जेवणं झाल्यावर बायजाने सदाला लग्नाबद्दल सांगितलेच. सदा आधी काहीच बोलला नाही. नंतर म्हणाला,

“आज्जे, समद्यांनी पाठ फिरीवली पर तू आई हून हुबा ऱ्हायलीस ..पयल्या दिसापासनं पोराला पोटाशी धरलंस…माज्या पोटाला करून घातलंस.. “

“आरं, माजे म्हातारीचं आसं किस्तं दिस ऱ्हायल्यात पोरा. आरं, मी काय जन्माला पुरणार हाय व्हय ? “

” कोण कुणाच्या जन्माला पुरतं आज्जे ? माझी रखमी कुठं पुरली  ? “

” आरं, पोरा, जाउंदेल , सोड त्यो इशय..”

” कसा सोडू ? माणूस मेल्याव ‘मेलं ‘ म्हणून रडून मोकळं हुता येतं..त्यो कुठं गेलाय हे ठावं असतं.. गेलेला आता कवाच माघारी येणार न्हाय ह्येबी ठावं असतं. पर रखमी ?  रखमी हाय.. पर कुठं , कशी ? काय बी ठावं न्हाय ? आज्जे, ती हात धरून कुणासंगं पळून जाणाऱ्यातली बाय न्हाय ही ठावं हाय मला. मग ती गेली कुठं ? पोटच्या तान्ह्या पोराला टाकून जाईलच कशी ती ?  ती कुठं गेली न्हाय मग मला सांग.. माझ्या रखमाचे काय झालं ? “

सदाच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागले होते.. साचलेला बांध फुटला होता. बापाला रडताना पाहून पोर घाबरून बायजाज्जीला बिलगले होते. त्याला घट्ट जवळ घेऊन बायजाने डोळ्यांना पदर लावला..

सदाच्या, बायजाच्या डोळ्यांतील एकेक थेंब जणू अवघ्या भवतालाला, ज्याचे उत्तर मिळत नव्हतं असा एकच प्रश्न विचारत होता..

‘ रखमाचं काय झालं … ?’

‘रखमाचं काय झालं…?’

‘रखमाचं काय झालं…?

समाप्त 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-4 ☆ श्री आनंदहरी 

रखमाचा काहीच मागमूस लागला नव्हता. रात्रभर सदाचा डोळा लागला नव्हता. मनातील शंका -कुशंका थांबत नव्हत्या. मनात उलट-सुलट नाना विचार येत होते पण नुसता विचारांचा गोंधळ होत होता. पहाटे दूध तापवून, झोपलेल्या तान्ह्या बाळाला घरात एकटं टाकून, घराचे दार नुसते ओढून घेऊन रखमा कुठे आणि का गेली असेल ? ती स्वतःहून कशी जाईल ? मग..तिला कुणी  जबरदस्तीने नेली  असेल  का ? पण कुणी आणि का ? जर कुणी तिला जबरदस्तीने नेले असे म्हणावे तर त्यावेळी तिने आरडाओरडा का केला नाही ?

पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला सदा गेला. तिथेही याच निरुत्तर करणाऱ्या प्रश्नानंतर पोलिसांचा सदालाच प्रश्न… ‘ रखमा ला का मारलेस ? ”  पोलिसी खाक्याने सदाला सारे विचारून झाले. आधीच रखमाच्या  जाण्याने गलितगात्र झालेल्या सदाला मरणप्राय वेदना झाल्या.  अनेक लोक, अनेक पावसाळे पाहिलेली बायजाआज्जी सोबत आली होती ती सदाचा पुन्हा एकदा आधार झाली होती.

पोलिसांच्या समोर संशयित म्हणून एकमेव नाव होतं ते सदाचे.. त्या दिशेने तपास सुरू झाला.. घराची झडती घेतली, काना- कोपरा तपासला, वस्तू न वस्तू विस्कटून पाहिली.. हाती काहीच लागले नाही.  घरा पासून जाणारा रस्ता चौकात जाणारा.. जवळचा सीसीटीव्ही म्हणजे चौकातला.. त्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये रखमा एकटी किंवा कुणासोबत कुठे जाताना दिसत नव्हती.चौकातून रात्रीपासून सकाळपर्यंत फार तुरळक वाहने जाता-येताना दिसत होती पण त्यात संशयास्पद असे  पोलिसांना काहीही आठळले नव्हते. सदावरचा संशय आता जास्तच दृढ होत होता… पण त्याने रखमाला मारल्याचा कोणताही पुरावा सापडत नव्हता…रखमाचा मृतदेहही सापडत नव्हता..  पोलिसांनी अनेकवेळा  त्यांच्या पद्धतीने सदाची चौकशीही केली पण सदाचे एकच उत्तर होते.. आणि ते खरेही होते.. सदाला रखमाबद्दल काहीही माहिती नव्हते. तो संध्याकाळी सहा वाजता डबा घेऊन रात्रपाळीला कामावर गेला होता व सकाळी आठ च्या दरम्यान परतला होता.

चौकातल्या तसेच त्याच्या कामावर जाण्याच्या मार्गावरच्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये तो जाताना , येताना दिसत होता. त्याच्या कामाच्या ठिकाणच्या कॅमेऱ्याचे  फुटेजही पोलिसांनी तपासले होते. त्यात ही तो रात्रभर कामावर असल्याचे दिसत होते.. दोन -चार मिनीटाहून जास्त तो कॅमेऱ्याच्या बाहेरही नव्हता.. किंवा आवर्जून कॅमेऱ्यात राहण्याचा प्रयत्नही करत असल्याचेही जाणवत नव्हते.. त्याचे फोन रेकॉर्ड तपासायला त्याच्याकडे फोनच नव्हता. पोलिसांनी त्याच्या विषयी गल्लीत, मित्रपरिवारात, कामाच्या ठिकाणी चौकशीही केली..  सदा सरळ, साधा, कष्टाळू, आपण बरे आपले काम बरे अशा वृत्तीचा होता.  जसजशी सदाबद्दलची माहिती मिळत गेली तसतसा सदा पोलिसांच्या संशयितांच्या यादीतून मुक्त होत गेला. सदाने काहीही केलेले नाही याची पोलिसांना खात्री पटली आणि… रखमाचे नेमकं काय झाले ? हा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच राहिला..

रखमा जणू हवेत अदृश्यच झाली होती.. पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूनी कसोशीने तपास करून पाहिला होता. गल्लीत अनेकच्याकडे चौकशी केली होती..तपास केला होता.   पोलिसांनी अगदी रखमाच्या माहेरीं जाऊन, तिच्या लग्नाआधीपासूनचा तिचा भूतकाळ आणि लग्नानंतरचा भूत आणि वर्तमानकाळ अगदी बारकाव्याने, कसोशीने तपासून पाहिला. त्यांना रखमाबद्दल कुठेही वावगा शब्द ऐकायला मिळाला नाही की कुठे कधी शंकास्पद आढळले नाही. पोलिसही चक्रावून गेले होते.. एक व्यक्ती अशी गायब झाली होती की जणू ती कधी अस्तित्वातच नसावी.. कुठलाच मागमूस नव्हता.. कुठलेच धागे-दोरे गवसत नव्हते.. रखमा होती आणि ती गायब झाली होती हे आणि एवढंच मात्र अगदी खरे होते.. पण ती गायब झाली ते नेमके कधी ? नेमकी  कशी ? नेमकी  कुठे ? दिशा गवसत नव्हती.. नेमकेपणाने काही कळत नव्हते.. सांगताही येत नव्हते.. तपासाचा प्रवास जिथून सुरु होत होता तिथंच येऊन थांबत होता… प्रत्येकवेळी.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-3 ☆ श्री आनंदहरी 

सदा दिवसभर पायाला भिंगरी लावल्यासारखा रखमाचा शोध घेत फिरत होता.. सगळ्या पाहुण्या-पै कडे,  परिचितांकडे चौकशी करून झाली.. रखमाच्या माहेरी चौकशी करताच तिची आई आणि भाऊ लगोलग घरी आले होते.  फिरून फिरून दमला – भागलेला सदा हताश होऊन घरी परतला तेव्हा दारात सगळी गल्ली गोळा झालेली होती.. प्रत्येकजण दुसऱ्याजवळ  कुजबुजत होता.. सदाने दारात पाऊल टाकले तशी त्याची सासु रडत ओरडत त्याच्याकडे धावली.. ‘ या मुडद्यानंच माझ्या लेकीचं कायतरी बरं वाईट केलं असणार.. माझी गुणाची ती लेक.. ह्येनं.. ह्येनंच मारली असणार तिला.. ‘  बायजा तिला अडवायला, थांबवायला  पुढे सरसावली तोवर रखमाचा भाऊ पुढं झाला होता आणि त्याने आईला थोपवायचे सोडून तिचीच वाक्ये म्हणत सदाला बडवायला सुरवात केली होती.. सदा आधीच रखमाच्या अचानक गायब होण्याने गांगरून गेला होता.. त्याला नेमकं कोण काय म्हणतेय ते ही समजत नव्हते.. या अचानक हल्ल्याने  तो पुरता गोंधळून गेला होता.. बायजाने सदाच्या सासूला मागे ओढली.. गल्लीतलेच कुणीतरी मध्ये पडून रखमाच्या भावाला सदापासून दूर नेऊन सदाची सुटका केली होती.

” काय बोलतायसा पावनीबाय ? त्यो कशाला करील आसं ?.. अवो, त्यो गेलावता रातपाळीला.. सकाळच्या पारी घरला आला तवा त्येला समाजलं.. रखमा न्हाई ती. “

बायजा रखमाच्या आईची समजूत काढू लागली होती. वातावरण एकदमच बिघडून गेलं होते.. बाहेर चर्चेला वेगवेगळे धुमारे फुटायला लागले होते. लोकांना चघळायला आणखी एक विषय मिळाला होता..

 ” व्हय रे सदाने मारली आसंल रखमाला ? मला तर  ही काय पटत न्हाय बाबा ..”

 ” तेच्यात न पटण्याजोगं काय हाय ? “

 ” आरे, सदा गरीब हाय.. मुंगीबी मारायचा न्हाय कवा.. आन वाईच सदाकडं बग तरी… रखमा सकाळधरनं न्हाय तर पार कोलमडून गेलाय ? “

” आरं, ही समदं दाखवायचं दात असत्यात..  आरं, रखमीची आयच म्हंतीया.. भाव बी म्हंतुय म्हंजी कायतरीं आतली धुसफूस ठावं असणारच त्यासनी.. उगा कोनबी जावाय पावण्याला असे म्हनल का चार लोकांत..? “

” आरं पर त्यो तर रातपाळीला कामाव हुता न्हवका  ? “

” आरं तकडं हजरीं लावून मदनंच येऊन मारलं आसंल..बॉडी कुटंतरी दिली आसंल टाकून..आन गेला आसंल पुन्यांदा कामाव.. आरं, पोलीसांस्नी अशी लय घावल्यात.. कामाव असूनबी खून केल्याली..मी तर म्हंतो,  तसंच असणार .. न्हायतर मला सांगा सदा आजूनबी पोलिसात का ग्येला न्हाई ? “

” आरं, पर कशापायी मारंल त्यो ? कवा भांडान बी न्हाई ऐकू आले तेच्यातलं.. आरं, त्येंचा तर लय जीव हुता एकमेकाव.. छया s छयाss उगा आसलं कायबी बोलण्यात अर्थ न्हाय..”

रखमा गेली कुठं ? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या मनानुसार आखाडे बांधून शोधत होता.. आपल्याला वाटतंय तेच खरं आहे असे वाटून दुसऱ्याला ठासून सांगून पटवण्याचा प्रयत्न करत होता.. तेच वाक्य मीठ-मिरची लावून एकाकडून दुसऱ्याकडे जात होते..  चर्चेचे, अंदाजांचे, अफवांचे पेव फुटले होते. त्यातल्या कुणालाच रखमाच्या जाण्याचे दुःख नव्हते की सदाबद्दल, त्याच्या लेकराबद्दल दया, आपुलकी नव्हती.  सदाची सासरची मंडळी पण तशीच.. सदाला दोष देऊन रिकामी झाली होती.. सदा हताश झाला होता.. फक्त बायजा म्हातारी एकीकडे पोराला सांभाळत होती.. दुसरीकडे सदाला धीर देत होती.. त्याच्या पाठीशी खंबीर उभी होती.. रात्र झाली तरी रखमाचा पत्ता नव्हता..ती आलीही नव्हती आणि तिचा कुठे मागमूसही लागला नव्हता.. सदा पार कोलमडून गेला होता.. नेमके काय झाले असावे..? काहीच समजत नव्हते. तर्क-वितर्क सुरूच होते.. निरागस पोर दूध पिऊन झोपले होते. सदा शून्यात नजर लावून बसून होता.. बायजाने आग्रह करूनही त्याने दोन घास खाल्ले नव्हते.  थकलेली बायजा तिथंच पोराजवळ कलंडली पण मनात प्रश्न खदखदत होते..’रखमा अशी अचानक गायब कशी आणि का झाली असेल ? तिच्याबाबतीत नेमकं काय झाले असावे ? ती कुठं असेल ? कशी असेल ? तिला कुणी कशी आणि का नेली आसंल ?’

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-2 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-2 ☆ श्री आनंदहरी 

बायजा म्हातारी एकीकडे पोराच्या मायेने भिजत होती, दुसरीकडे भाजी विकायचा खोळंबा झाल्याने मनातल्या मनात चरफडत होती. मधूनच तिला रखमाचा, सदाचा राग येत होता तर कधी मनात त्यांच्याबद्दल नाना शंका-कुशंका येऊन काळीज कुरतडून निघत होते. ती पोराजवळ बसून त्याला थोपटत असली तरी तिची नजर दारातून बाहेर दूरपर्यंत रेंगाळत होती .. दूरवर कुणी दिसले की तो सदाच असणार किंवा रखमाच असणार असे वाटून  मनात आशा पल्लवित होत होत्या.. दुसऱ्याच क्षणी ते दुसरेच कुणीतरी आहे याची जाणीव झाली की मन कोंबडीवानी खुडूक होत होते. तिची नजर रस्त्यावरून वळून पोराकडे जात होती अन तिथेच थबकत होती.

पोराकडे पाहिले की मनातले सारे विचार क्षणकाळासाठी का होईना गळून पडत होते आणि मुलावरची माया मन भरून टाकत होती.. मायेने पोराला थोपटत असतानाच अचानक तिची नजर दरवाज्यातून बाहेर गेली.. दूरवर सदासारखाच कुणीतरी येताना दिसला..  तिची नजर त्याच व्यक्तीवर खिळून राहिली होती.. ती व्यक्ती काही अंतर पुढे आल्यावर तिला तो सदाच असल्याची खात्रीं पटताच बायजाची नजर त्याच्या अवतीभवती रखमाला शोधू लागली.. रखमा काही दिसेना..

‘ संगं रखमा न्हाई.. सदा एकलाच हाय..काय झालंय पोरीला कुणाला ठावं.. ? आजारली आसंल म्हणून दवाखान्यात तर ठेवली नसंल..? पर तसं आसतं तर पोराला एकल्याला घरात सोडून नसती गेली दवाखान्यात.. संगती नेलं असतं.. दवाखान्यात न्हाय तर मग रखमा हाय कुठं ?.. ‘ मनात नाना विचार येऊन गेले..

सदा दारात आला. हातात जेवणाच्या डब्याची पिशवी पाहून बायजा काहीशी चक्रावलीच.. ‘ म्हंजी.. सदा रातपाळी करून आलाय कामावनं..  मग रखमा कुठं हाय ? ‘ 

” बायजाज्जी तू ? येरवाळचा बाजार सोडून तू कशी इथं ?   पोराला बरं न्हाय काय ? आन रखमा कुठं गेलीया .. औशिद आणाय गेलीया व्हय ? काय झालंय पोराला.. सांच्यापारी तर ब्येस खेळत हुता.”

बायजाला बाजार सोडून पोराजवळ थांबलेलं बघून काळजी वाटून सदाने विचारले.. पटकन हातातली डब्याची पिशवी तिथंच खिळ्याला अडकवून  तो  पोराजवळ बसला. बायजाला काय उत्तर द्यायचं आणि कसे उत्तर द्यायचं ते क्षणभर समजेचना..

” उगा नगं काळजी करू.. पोरगं बरं हाय .  थांब वाईच पाणी आणून देते. हातपाय तोंड धू… “

तिने आतून पाण्याची कासांडी आणून दिली.

” पर रखमा हाय कुठं ?”

त्याच्या प्रश्नाला उत्तर न देताच ती झटकन आत गेली आणि तिने चहाचे आदण ठेवले. सदाला पिण्यासाठी तांब्याभर पाणी आणून बाहेर ठेवले. आणि चांगला कप कपभर चहा घेऊन बाहेर आली. 

  ” आज्जे , पर रखमा …?

” च्या पे आदी.. गार हुईल ?”

 चहा पिऊन झाल्यावर तिने विचारले,

” सदा, काल तुझं न तिचं भांडान झालंवंतं काय रं ? “

” न्हाय.. पर अशी का ईचारतीयास ? “

“आरं, येरवाळच्यानं रखमा घरात न्हाई.. मी बाजारला जाया निघालेवते, पोराचं रडणं ऐकाय आलं.. रखमाला दोनचार हाळ्या मारल्या.. एक न्हाय न दोन न्हाय.. इवून बघतीया तर दार निस्तं फुड केलेलं…”

बायजाने सदाला सुरवातीपासूनचे सगळे सांगितले तसे त्याला रखमाची जास्त काळजी वाटू लागली. विचार करकरून डोके फुटायची वेळ आली. मनात येणारा एकेक विचार मनच रद्द करीत होते.. एवढ्याशा पोराला घरात एकटे टाकून कोणतीही माऊली कुठे जाईलच कशी ?  मग रखमा कुठे गेली ? कशी गेली ?कधी गेली ? आणि सर्वात महत्वाचे का गेली ? सारे निरुत्तर करणारे प्रश्न.. मनात खदखदत असताना, कुठल्याच प्रश्नाचे उत्तर मिळत नसताना बायजाच्या मनात प्रश्न आला.. ‘ रखमाला कुणी पळवून तर न्हेलं नसंल न्हवं ? ‘ 

मनात प्रश्न आला आणि बायजा अस्वस्थ झाली. मनातली शंका सदाजवळ व्यक्त करावी की नको अशी तिची द्विधा मनस्थिती झाली. तिचे मन स्वतःशीच मनातील कुशंका पडताळून पाहू लागले. रखमा तरुण होती, देखणी होती.. पण एका तान्हुल्याची आई होती.. पण एखादा नजर ठेवून पळवून न्हेणारा असेल तर.. त्याला तान्हुल्याशी काय देणं घेणं असणार म्हणा.. पण कुणी पळवून नेत असताना रखमाने आरडा-ओरडा केला असता .. सगळी गल्ली गोळा केली असती.. मग ती स्वतःहूनच गेली असेल काय ?  बायजाच्या मनात आलेली, ‘ ती स्वतःहून पळून जाण्याची शंका’  तिने स्वतःच धुडकावून लावली. ती रखमाला चांगलेच ओळखत होती… मनात नाना शंका – कुशंका येत होत्या आणि त्या चुकीच्या वाटून रद्दही होत होत्या.. पण एक अनुत्तरित प्रश्न मात्र मन पोखरत होता, मग नेमके तिचे झालंय काय ?

बायजा स्वतःच्या विचारांच्या नादात असतानाच अचानक तिचे सदाकडे लक्ष गेले..  तो काहीच न सुचून,  गुडघ्यात तोंड खुपसून हताश होऊन रडत होता. बायजा उठली . त्याच्या पाठीवर हात ठेवून धीर देत म्हणाली,

” आरं , असे बसून कसे चालंल.. रखमाचा तपास कराय नगं..? ती कायतरी कारणाने म्हायेराला गेली हाय का ते बगाय पायजेल.. उठ..  असा बसून नगं ऱ्हाऊस.. मी हाय पोरापाशी “

माहेरी जाण्याचा मुद्दा बायजाला स्वतःलाच पटला नव्हता तरी तिने त्याला हताशपणातून बाहेर काढण्यासाठी उगाचच त्याला सांगितला होता…

त्याच्या मनात आशेचा काजवा टिमटीमला असावा.. तो झटक्यात उठला आणि बाहेर पडला.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रखमाचं काय झालं ? – भाग-1 ☆ श्री आनंदहरी

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ रखमाचं काय झालं ? – भाग-1 ☆ श्री आनंदहरी 

बायजा म्हातारी सकाळीच हातगाड्यावर भाजीची पहिली पाटी ठेवत असतानाच तिला सदाच्या घरातून त्याच्या पोराच्या रडण्याचा आवाज आला पण सगळ्या पाट्या ठेवून हातगाडी सकाळी लवकरच मंडईच्या कोपऱ्यावर उभी केली तरच भाजीचा खप चांगला होत असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले . शिवाय लहान पोर झोपेतून उठल्यावर जवळ आई नाही म्हणल्यावर रडायचंच ,असाही तिने विचार केला होता. ,घरातल्या बाईची सकाळी किती तारांबळ उडते हे तिला ठाऊकच होते.. आणि रखमा, सदाची बायको त्याच तारांबळीत असणार हे ही ती जाणून होती.

हातगाडीवर भाजीच्या सगळ्या पाट्या, कोथिंबिरीचं पोतं, वजनकाटा सारं व्यवस्थित ठेवेपर्यंत नाही म्हणलं तरी अर्ध्या तासाहून जास्त वेळ गेलाच.. त्या गडबडीत पोराचं रडणे थांबले – नाही थांबले याकडे तिचे लक्षही नव्हते पण जसे सारे आवरले आणि मंडईत जाण्यासाठी ती हातगाडी ढकलणार इतक्यात सदाचं पोर अजूनही रडत असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिला आश्चर्य वाटले. तिने हातगाडी ढकलायची म्हणून काढून हातगाडीवरच ठेवलेली चाकाची घूण्याची दगडे परत चाकांना लावली आणि ‘ रखमा s ए रखमा ss !’ अशी हाळी मारत सदाच्या घराकडे निघाली. पुढे लोटलेले दार उघडून ती आत आली तर वाकळंवर पोर रडत होते. घरात कुणाचीच चाहूल लागेना. तिने बाहेर येऊन रखमाला हाका मारल्या..  सदालाही हाका मारल्या. पण कुणाचेच प्रत्युत्तर आले नाही तशी  बायजा म्हातारी परत घरात गेली. पोराला उचलले. पोर भुकेलेलं आहे हे जाणवताच तिने चुलीकडे पाहिले. चुलीपुढे निखाऱ्यावर दुधाचे पातेले होते. अजून दूध जरासे कोमटच आहे हे लक्षात येताच तिने वाटीत दूध काढले आणि पोराला मांडीवर घेऊन चमच्याने पाजायला सुरवात केली. दूध पोटात जाऊ लागले तसे पोर रडायचे थांबले. तिने त्याला पोटभर दूध पाजताच पोर पूर्ण शांत झाले.. तिने त्याला परत वाकळंवर ठेवताच पोर हातपाय हलवत खेळू लागले. तिने वाटी-चमचा चुलीजवळ ठेवला. पोर शांत झाले तसे तिच्या मनात परत रखमाचा, सदाचा विचार आला..

‘ येवढ्याशा पोराला घरात ठिवून दोगंबी कुणीकडं गेलं आस्तिली ? ‘

तिच्या मनात प्रश्नाचे, विचारांचे आणि काळजीचं वादळ उगाचंच भिरभिरु लागले होते.  तिने पोराकडे नजर टाकली. पोर आपल्याच नादात खेळत होते. ती दाराशी आली अन तिची नजर तिच्या भाजीच्या गाड्याकडे गेली तशी तिच्या काळजीत आणखीनच भर पडली. ‘आधीच भाजी विकायला जायला उशीर झाला होता.. आणखी उशीर झाला तर भाजी विकली जाणार नव्हती.. पालेभाजी नाशवंत माल.. विकली गेली नाही तर त्याचे पैसे अंगावर पडणार होते.  आधीच भाजी विकून कशीतरी हाता-तोंडाची गाठ पडत होती.. त्यात भाजीचे पैसे अंगावर पडले तर मग काही बोलायलाच नको.. ‘ तिच्या मनात विचार आला. तिला भाजी विकायला जावेच लागणार होते पण पोराला एकटं टाकून ती जाऊ शकत नव्हती..  त्यात रखमाचा, सदाचा पत्ताच नव्हता.. पोराला असे एकटं टाकून तिचा पायच निघाला नसता. वस्तीतील शेजारपाजारच्या घरातील बाया-माणसे येरवाळीच कामाला जात असल्याने घरांना कुलपंच होती.. एखादं -दुसरे पोर गल्लीत खेळत असले तरी पोरा-ठोरांच्या ताब्यात इवल्याशा पोराला देऊन ती जाऊ शकत नव्हती..गल्लीत टोकाच्या घरात एक म्हातारा होता पण तो स्वतःलाच सांभाळू शकत नव्हता. तो त्या इवल्याशा पोराला काय सांभाळणार ?

मनातल्या मनात ती वस्तीतल्या सगळ्या घरातून डोकावून, घर न् घर पाहून आली होती. काय करावे ते तिला सुचेनासे झाले होते.. ‘ आत्ता रखमा येईल, सदा येईल ,ते आले की आपण जाऊ.. भाजी कमी विकली जाईल पण जेवढी विकली जाईल तेवढंच नुकसान कमी..तेवढाच डोईवरला बोजा कमी.. ‘ असा विचार तिच्या मनात येत होता.. ती आतुरतेने रखमाची, सदाची वाट पहात होती. हळूहळू तिची सहनशक्ती कमी होत चालली होती..

” येवढ्या येरवाळचं कुनीकडं उलथलीत दोगंबी..? येवंडंसं प्वार घरात ठेवलंय..आय-बा हायती का कोण ? आसं कोण प्वार घरात ठिवून जातं व्हय ? कुणीकडं जायाचं हुतं तर पोराला संगं न्ह्याचं.. “

बायजा म्हातारी स्वतःशीच बडबडत अस्वस्थतेने आत-बाहेर फेऱ्या घालत होती. खेळता खेळता पोर परत झोपी गेले होते..

‘प्वार झोपलंय, दार वडून घिऊन जावं का बाजारात ? ‘

तिच्या मनात विचार आला..

‘ बायजे, येवड्याश्या पोराला येकलं टाकून जायाचा इचार करतीस, माणूस हायस का कोन ? प्वार पुन्यानदा उठलं म्हंजी ? ‘

‘आगं, पर आज भाजी न्हाय इकली तर नासुन जाईल, त्येचा पैसा अंगावं पडंल.. समदी नुक्सानीच की..’

‘ व्हय पर माणुसकी हाय का न्हाय काय ? आन तशीबी दोन दिस उपाशी ऱ्हायलीस तर काय मरत न्हाईस .. ‘

ती अस्वस्थतेत स्वतःशीच बोलत होती.. इतक्यात पोराची झोप चाळवल्याचे तिला जाणवले.

” प्वार उठतंय का काय ? “

ती पोराजवळ वाकळंवर येऊन बसली.. आणि त्याला थोपटू लागली..

‘ रखमा-सदाचं काय वाईट-वंगाळ तर झालं नसंल न्हवका ? ‘

पोराला थोपटता थोपटता मनात आलेल्या विचाराने ती दचकली.

क्रमशः ….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares