श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “आनंदी जीवनाचे ७ पैलू” – लेखक : श्री सुनीत पाटील ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : आनंदी जीवनाचे ७ पैलू
लेखक : सुनीत पाटील
प्रकाशक “ माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे
पृष्ठे: १६०
मूल्य: १९०₹
माणसाचं जीवन अनेक पैलूंनी व्यापलेलं आहे आणि मानवी जीवन आनंदी बनविण्यात या पैलूंचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. थोडक्यात काय, आनंद मिळवणं आणि आनंदी जीवन जगणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे. नाही का? आणि मग आनंद मिळवणं हेच जर जीवनाचं रहस्य असेल किंवा अंतिम उद्दिष्ट असेल तर त्यामागच्या विविध घटकांचाही तितक्याच बारकाईने अभ्यास झाला पाहिजे. आपण असंही म्हणू की, प्रत्येकाचा आनंद मिळण्याचा मार्ग आणि व्याख्याही वेगवेगळी आहे. कोणाला गायन केल्याने आनंद मिळत असेल तर कोणाला गायन ऐकल्याने, श्रवण केल्याने आनंद मिळत असेल. कोणाला मित्रांमध्ये बसून गप्पा मारल्याने आनंद मिळत असेल. पण बघा हं गंमत, प्रत्येकाची व्याख्या आणि मार्ग जरी वेगवेगळे असले तरीसुद्धा सर्वांना मिळवायचा आहे तो आनंदच !
एकूणात काय, तर आनंद मिळवणं हेच तर जीवनाचं उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट आपण एकाच प्रकारच्या ढाच्यात राहून साध्य करू शकत नाही. पण तरीही अशा काही सर्वमान्य व सर्वसमावेशक गोष्टी आहेतच, ज्यांचा योग्य पद्धतीने विचार व अंगीकार करून आपण आनंद मिळवू शकतो.
आपल्या प्रत्येकाच्या, अगदी प्रत्येकाच्या जीवनात असे काही टप्पे असतात की, ते आपण टाळू तर शकतच नाही पण त्याच्याशिवाय पुढेही जाता येत नाही. जसं की, एज्युकेशन म्हणजे शिक्षण हा तर प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.
शिक्षणाशिवाय आपण प्रत्येक जण अपूर्ण आहोत. प्रत्येकाला शिक्षण हे घेतलंच पाहिजे, नाही का? अर्थात ते कसं आणि कोणतं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण शिक्षणाशिवाय आपण आनंदी जीवनाची शिडी चढू शकत नाही, हे मात्र खरं. म्हणजेच असे काही टप्पे आहेतच जे कोणालाच, अगदी कोणालाच टाळता येणार नाहीत.
हां, आता त्याचा विचार प्रत्येक जण कसा करतो यावर पुढील जीवनाचा प्रवास निर्भर आहे ; मग तो प्रवास आनंदाचा असेल किंवा कमी आनंदाचा असेल.
आपण जेव्हा एखाद्या आनंदी माणसाकडे पाहतो तेव्हा प्रत्येकाला हा प्रश्न कधीतरी पडलाच असेल की, ती व्यक्ती इतकी आनंदी का आहे. तेव्हा वाटतं की, ती व्यक्ती इतरांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं करत असावी. तर मग त्याच वेगळेपणाचा आपण थोड्याशा ढोबळ अर्थाने विचार तर करून बघू, जेणेकरून आपल्याला आपल्याबरोबर सर्वांचंच जीवन आनंदी बनवता येईल.
या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण शिक्षण (एज्युकेशन), ज्ञान, (नॉलेज), कारकीर्द (करिअर), आर्थिक स्वातंत्र्य (फायनान्शिअल फ्रिडम), नातेसंबंध (रिलेशनशिप), विवाह (मॅरेज), आरोग्य (हेल्थ) या पैलूंचा प्रकर्षाने विचार करणार आहोत. हे टप्पे कोणालाच टाळता येत नाहीत, पण त्यातच जेव्हा आपण जगरहाटीला विसरून थोडा वेगळा विचार करतो किंवा त्यांचा खराखुरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असं लक्षात येतं की, अरेच्चा हे काहीतरी वेगळंच होतं आणि आपण खूपच वेगळा विचार करत होतो. खरंतर सर्वच एका विशिष्ट सिस्टिमचा भाग होतं का? असाही विचार होणं साहजिकच आहे.
हे पुस्तक वाचावं कोणी ? खरंतर हे सर्वांसाठीच आहे. परंतु तरीही, ज्यांचं जीवन जगून झालेलं आहे त्यांनी येणाऱ्या पुढील पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी वाचावं, जी पिढी आत्ता आपल्या जीवनाला सुरुवात करत आहे त्यांनीही वाचावं. जे जीवनाच्या नव्हे, तर आनंदी जीवनाच्या वाटा शोधत आहेत अशा सर्वच मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या भरकटलेल्या जीवनाला कलाटणी देण्यासाठी व स्वतःच्या जीवनाला आनंदी वाटेवर आणण्यासाठी वाचावं. आपल्या सर्वांना आनंदी जीवनाच्या प्रवासाच्या शुभेच्छा…..
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈