एकदा एका मंदिरात पूजेला एक राजा येणार आहे असे त्या पुजार्याला कळले… त्याने सहा हजार रुपयांचे कर्ज काढले आणि देऊळ चांगले सजवले रंगवले.
*
राजा पूजेला आला आणि त्याने दक्षिणा म्हणून चार आणे ठेवले. पुजार्याला तिथेच घाम फुटला. आपण सहा हजार कर्ज काढून मंदीर रंगवले आणि राजाने फक्त चार आणे दक्षिणा ठेवली… आता या चवन्नी छाप राजाला अद्दल घडवायचीच.
*
पुजारी हुशार होता… राजा गेल्यावर पुजार्याने ते चार आणे मुठीत घेतले आणि सगळ्यांना सांगू लागला…
“राजाने मंदिरात दान केलेली एक वस्तू आहे. ती मला झेपणार नाही. म्हणून मी तिचा लिलाव करतोय. आपापली बोली लावा.”
आता राजाने वस्तू ठेवलीय म्हणल्यावर साधी ठेवली असेल का… ? पहिलीच बोली दहा हजार पासून… सुरु झाली. पुजारी डोके हालवूनच ‘नाही परवडत’ असे म्हणत होता. लिलावातील बोली वाढत वाढत पन्नास हजारावर पोचली.
*
तिकडे राजाला पहारेकरी म्हणाला, “महाराज, पुजाऱ्याने आपण मंदीरात दान केलेल्या वस्तूचा लिलाव सुरु केला आहे आणि ती वस्तू तो दाखवतही नाही आणि सांगतही नाही, मुठीत ठेवलीय…”
*
राजाला घाम फुटला. तो पळत पळत आला आणि पुजाऱ्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाला, “हे माझ्या बाप्पा, सव्वालाख देतो पण कुणाला ती वस्तू दाखवू नको….”
*
तेव्हा पासून ही म्हण रुजू झाली….
*….झाकली मूठ सव्वालाखाची….*
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ संत एकनाथ महाराज षष्ठी… ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (१५३३-१५९९) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते… त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत…..
एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते… हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या…..
नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला… एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित झाला. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरि पंडितांनी नाथांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत…..
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला… ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे…..
’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे… ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिलेल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनीच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले…..
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला… फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस ‘ एकनाथ षष्ठी ‘ म्हणून ओळखला जातो.
संग्राहिका : वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला आवडलेली बोधकथा… भाग -2 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
(आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.” )
इथून पुढे —
“मी ताबडतोब ती औषधी घेतली. कारण त्याच्यामागे फक्त आपल्याला काही पैसे देणे हा उद्देश होता. परंतु आपण पैसे घेण्याला नकार दिला. ‘बस, ठीक आहे’ म्हणालात. जेव्हा मी आग्रह केला तेव्हा आपण म्हणालात की ‘ आजचे खाते बंद झाले आहे.’ मला काहीच समजले नाही. परंतू या दरम्यान आपल्याकडे एक व्यक्ती आला. त्याने आपली चर्चा ऐकून मला सांगितले की, “ आजचे खाते बंद झाले म्हणजे वैद्य महाराजांना आजच्या दिवसाची घरेलू खर्चासाठी लागणारी राशी, जी त्यांनी भगवंताला मागितली होती, तेवढी भगवंताने त्यांना रोग्यांमार्फत दिली आहे. त्याशिवाय ते अधिक पैसे कुणाकडूनही घेत नाही. “
मी काहीसा परेशान झालो कारण मी माझ्या मनानेच लज्जित झालो. माझे विचार किती निम्न होते आणि हा सरलचित्त वैद्य किती महान आहे. मी जेव्हा घरी जाऊन पत्नीला औषधि दाखवली आणि सारा प्रसंग तिच्यासमोर उभा केला तेव्हा तिला भगवतदर्शनाचा आनंद झाला, तिच्या डोळ्यातून पाणी आले, मन भरून आले, आणि ती म्हणाली “ ते वैद्य म्हणजे कुणी व्यक्ती-माणूस नसून माझ्यासाठी तो देवतारूप माध्यम बनून आला आहे. आजवर एवढी सारी औषधी घेतली, एवढे वैद्य, हकीम, डॉक्टर झाले, आज मला माझ्या मनीची इच्छा पूर्ण करणारा भगवंत या वैद्याच्या रूपाने, या औषधी स्वरूपाने भेटला आहे. हे औषध माझ्या संततीसुखाचे कारण आहे, आपण दोघेही श्रद्धेने हे औषध घेऊ यात. “
कृष्णलाल वैद्याला पुढे सांगू लागला, “ आज माझ्या घरी दोन फूले उमलली आहेत. आम्ही दोघे पति-पत्नी हरघडीला आपल्यासाठी प्रार्थना करत असतो. इतक्या वर्षात व्यवसायामुळे मला वेळच मिळत नव्हता की स्वतः येऊन आपल्याला धन्यवादाचे दोन शब्द बोलावे म्हणून. इतक्या वर्षांनी आज भारतात आलो आहे आणि कार केवळ आणि मुद्दाम इथेच थांबवली आहे.”
“ वैद्यजी आमचा सारा परिवार इंग्लंडमध्ये सेटल झाला आहे. केवळ माझी एक विधवा बहीण आणि तिची मुलगी इथे भारतात असते. आमच्या त्या भाच्चीचे लग्न या महिन्याच्या २१ तारखेला होणार आहे. का कोण जाणे जेव्हा-जेव्हा मी आपल्या भाच्चीसाठी काही सामान खरेदी केले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आपली ती छोटीशी मुलगी यायची, आणि मग प्रत्येक सामान मी डबल खरेदी करायचो. मी आपल्या विचारांना, तत्वाला, मूल्यांना जाणत होतो, की संभवतः आपण हे सामान न घेवोत, परंतू असे वाटत होते की माझ्या सख्ख्या भाच्चीच्याबरोबर मला नेहमी जो चेहरा दिसत आहे, ती पण माझी भाच्चीच तर आहे. माझे तिच्याशी एक नाते त्या भगवंताने असे जोडले आहे, आणि म्हणून आपण त्या नात्याला नकार देणार नाही, कारण माझ्या भाच्चीबरोबर या भाच्चीचा ‘भात भरण्याची’ माझी ज़िम्मेदारी त्याने मला दिली आहे.”
वैद्याचे डोळे आश्चर्याने उघडेच्या उघडेच राहिले आणि सौम्य आवाजात म्हणाले, ” कृष्णलालजी, आपण जे काही म्हणत आहात ते मला काहीच समजेनासे झाले आहे, ईश्वराची काय माया आहे हे त्याचे तोच जाणे. आपण माझ्या ‘श्रीमती’च्या हाताने लिहिलेली ही चिठ्ठीबघा ” असे म्हणून वैद्यांनी ती चिठ्ठी कृष्णलालजींना दिली. —– तिथे उपस्थित सारे ती चिठ्ठी बघून हैराण झाले, कारण ” लग्नाचे सामान” याच्यासमोर लिहिले होते ”हे काम परमेश्वराचे आहे, त्याचे तोच जाणे “
कंपित आवाजात वैद्य म्हणतात, ” कृष्णलालजी, विश्वास करा की, आजपावेतो कधीही असे झाले नाही की पत्नीने चिठ्ठीवर आवश्यकता लिहिली आहे आणि भगवंताने त्याची व्यवस्था केली नाही. आपण सांगितलेली संपूर्ण हकीकत ऐकून असे वाटते की भगवंताला माहित होते की, कोणत्या दिवशी माझी श्रीमती काय लिहिणार आहे. अन्यथा आपल्याकडून इतक्या दिवस आधीपासून या सामान खरेदीचा आरंभ परमात्म्याने कसा करवून घेतला असता?–वाह रे भगवंता, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी खरंच हैराण आहे की, तो कसे आपले रंग दाखवतो आहे.”
चातकाची तहान किती | तृप्ति करूनि निववी क्षिती ||१||
पक्कान्न सेवुं नेणती बाळें | माता मुखीं घालीं बळें ||३||
एका जनार्दनीं बोले | एकपण माझें नेलें ||४||
वैद्यजी पुढे म्हणतात, ” जेव्हापासून मला समजू लागले, केवळ एकच पाठ मी वाचला आहे. सकाळी उठून तुझी भक्ती करण्यासाठी मी अजून जिवंत आहे, म्हणून त्या परमात्म्याचे आभार मानायचे, संध्याकाळी आजचा दिवस चांगला गेला म्हणून त्याचे आभार मानायचे, खाताना, झोपताना, श्वास घेताना, असा हरघडीला त्याचे स्मरण करायचे, त्याचे आभार मानायचे.
दळिता कांडिता | तुज गाईन अनंता ||१||
न विसंबे क्षणभरी | तुझे नाम गा मुरारी ||२||
नित्य हाचि कारभार | मुखी हरि निरंतर ||३||
मायबाप बंधुबहिणी | तू बा सखा चक्रपाणि ||४||
*लक्ष लागले चरणासी | म्हणे नामयाची दासी |५||
— समाप्त —
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला आवडलेली बोधकथा… भाग -1 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆
एका जुन्या इमारतीत त्या वैद्याचे घर होते. घराच्या मागच्या भागात त्याने संसार थाटला होता आणि पुढच्या भागात दवाखाना. त्याच्या पत्नीची सवय होती कि, दवाखाना उघडण्यापूर्वी संसाराला लागणारी, त्या दिवसाच्या सामानाची एक चिठ्ठी, ती दवाखान्यात ठेवत असे. पूजाअर्चा करून वैद्य महाराज दवाखान्यात येत आणि भगवंताचे नाव घेऊन ती चिठ्ठी उघडत. पत्नीने ज्या गोष्टी त्यात लिहिल्या आहेत, त्यांच्यासमोर ते त्या वस्तूंचे भाव लिहीत असत आणि त्याचा हिशेब करत असत.
नंतर मग परमात्म्याची प्रार्थना करून म्हणत, “हे दयाघना भगवंता, मी केवळ तुझ्याच आदेशानुसार, तुझी भक्ती सोडून, इथे या दुनियादारीच्या चक्रात येऊन बसलो आहे.” वैद्यजी कधीच आपल्या तोंडाने रोग्याला फ़ी मागत नसत. कुणी द्यायचे तर कुणी नाही, परंतु एक बाब निश्चित होती, कि त्या दिवसाच्या सामानाचा लावलेल्या हिशेबाची रक्कम पूर्ण झाली की, नंतर आलेल्यांकडून ते काहीच फी घेत नसत, मग तो येणारा रोगी कितीही पात्र आणि श्रीमंत असो.
एक दिवस वैद्याने दवाखाना उघडला. गादीवर बसून परमात्म्याचे स्मरण करून पैशाचा हिशेब लावण्यासाठी चिठ्ठी उघडली आणि ते अवाक झाले, एकटक बघतच राहिले. काही क्षण त्यांचे मन भरकटले, डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानी आपल्या मनावर नियंत्रण मिळवले. गव्हाचे पीठ, तेल-तूप-मीठ, तांदूळ-डाळ या सामानानंतर पत्नीने शेवटी लिहिले होते, “मुलीचे लग्न येत्या २० तारखेला आहे, तिच्या लग्नाला, हुंड्याला लागणारे सामान”.
काही वेळ विचार करून बाकी सगळ्या सामानांची किंमत लिहून लग्नाला लागणाऱ्या सामानासमोर त्यांनी लिहिले, “हे काम भगवंताचे आहे, तो जाणे आणि त्याचे काम जाणे.”
नेहेमीप्रमाणे काही रोगी आले, त्यांना वैद्यांनी औषधी दिली. या दरम्यान एक मोठीशी कार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्यांनी काही खास लक्ष दिले नाही, कित्येक कार त्यांच्याकडे येत असत. आधी आलेले रोगी औषधी घेऊन चालले, गेले. तो सूटा-बुटातला साहेब कारमधून बाहेर आला आणि नमस्कार म्हणत बेंचवर बसला. वैद्य म्हणाले, “आपल्याला जर औषधी पाहिजे असेल तर आपण इकडे स्टूल वर या म्हणजे मी आपली नाड़ी परीक्षा करू शकेन आणि कुणा इतरांसाठी औषधी हवी असेल तर रोगाचे, स्थितीचे वर्णन करा.”
ते साहेब म्हणू लागले, ” वैद्यजी, तुम्ही मला ओळखले नाही का? माझे नाव कृष्णलाल आहे. आणि आपण तरी कसे ओळखणार, कारण मी १५-१६ वर्षानंतर आपल्याकडे आलो आहे. आपल्याला मी आपल्या मागच्या मुलाखतीबद्दल सांगतो, म्हणजे सारे काही समजून येईल. जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा मी स्वतःहून आलो नव्हतो, खरे तर ती ईश्वरी योजनाच होती. ईश्वराला माझ्यावर कृपा करण्याची इच्छा झाली होती, कारण त्याला माझे घर आबाद करायचे होते, माझ्या जीवनात भरभरून सुख आणायचे होते. आणि आपली ती पहिली भेट आठवली की, आज देखील ईश्वराच्या त्या साहजिक कृपेच्या प्रसंग आठवणीने, मी विनम्र होतो, नतमस्तक होतो, नि:शब्द होतो. “
“ झाले असे होते की, मी आपल्या पैतृकांच्या घरी जात होतो. अगदी आपल्या दवाखान्याच्या समोर माझी कार पंक्चर झाली. ड्रायव्हर कारचे चाक काढून पंक्चर काढायला गेला. आपण बघितले की, मी उन्हामध्ये कारजवळ उभा आहे. आपण माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याकडे बोट दाखवून आत यायला विनंती केली, इथे खुर्चीमध्ये सावलीत बस म्हणून म्हणालात. आंधळ्याला काय दोन डोळेच पाहिजे असतात, मी खुर्चीमध्ये येऊन बसलो. आपण मला यथोचित गूळ-पाणी देऊन तृप्त केले. का कोण जाणे पण ड्रायव्हरने देखील काही जास्तच वेळ घेतला होता. दुपार झाली होती. एक छोटीशी मुलगी आपल्या गादीपाशी उभी होती आणि म्हणत होती, “चला ना बाबा, मला भूक लागली आहे.” आपण तिला म्हणत होता, ‘ बाळा थोडा धीर धर,, जाऊयातच आपण. ‘ “
“ मी हा विचार केला की इतक्या वेळचा आपल्याजवळ बसलो आहे आणि माझ्यामुळे आपण जेवायला देखील जाऊ शकत नाहीत. म्हणून काहीतरी औषधी विकत घेऊन टाकू, म्हणजे माझ्या बसण्याचा भार हलका होईल, काही उद्देश प्राप्त होईल. मी आपल्याला बोलता बोलता म्हणालो, “वैद्य महाराज, मागच्या ५ – ६ वर्षांपासून मी इंग्लंडमध्ये राहतो, व्यवसाय करतो तिथे. इंग्लंडला जाण्यापूर्वीच माझे लग्न झाले आहे, पण संतती-सुखापासून मात्र अजून वंचित आहे. इथे भारतात देखील बरेच इलाज केले, तिथे इंग्लंडमध्ये देखील दाखवले, पण पदरी निराशाच पडली आहे. “
“आपण म्हणालात, ” भगवंतापासून निराश होऊ नका, तो अत्यंत दयाळू आहे, तो खूप मोठा दाता आहे. आपण म्हणालात, लक्षात ठेवा त्याच्या कोषागारात कशाचीही कमी नाही. कशाचीही आस तो पूर्ण करतो. संतती, धन-दौलत, इज्जत, सुख-दुःख, जीवन-मृत्यु, सारे काही त्याच्याच हातात आहे. ते कुणा वैद्य किंवा डॉक्टरच्या हातात नसते. ते कोणत्या औषधाने मिळत नाही. जे काही व्हायचे असते ते सारे भगवंताच्या आदेशाने होत असते. संतती जरी द्यायची असेल तरी दाता तोच आहे.” – आजदेखील तो प्रसंग जशाच्या तसाच माझ्या नजरेसमोर आहे. माझ्याशी हे सारे बोलत असताना, आपण एकीकडे औषधाच्या पुड्या बांधत होतात. सगळ्या औषधी आपण दोन भागात विभाजित करून, दोन वेगवेगळ्या पाकिटात टाकल्या, आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.”
– क्रमशः भाग पहिला.
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
पूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती पद्धत म्हणजे दुकानातून घरात वापरायची कोणतीही भांडी आणली की ती दुकानातून आणतांना त्यावर नावे घालून आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नांव हे असलेच पाहिजे. समजा बायको सोबत नसतांना नवरा एकटा दुकानात गेला व गरजेचे भांडे घेतले व घरी आला की गृहिणी भांडे नंतर पहायची. आधी त्यावर नांव काय घातले आहे की नाही ते पहात असे. त्या भांड्यावर तिला तिचे नांव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे. नांव जर दिसले नाही तर मात्र काही खरे नसे, ती आल्या पावली नवऱ्याला परत दुकानात पाठवून त्यावर नांव घालून आणा असे सांगत असे किंवा स्वत: जाऊन नांव घालून आणून मगच ते वापरायला सुरवात करीत असे. आजही तुमच्या घरात नांव घातलेली खूप भांडी असतील पहा.
लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे, नांव घातलेली व नांव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देण्या घेण्यासाठी वापरली जात असत. अशी ही नांव नसलेली भांडी या हातातून त्या हातात, या घरातून त्या घरात नुसती फिरत रहायची, उपयोग काहीच नाही.
असो हे सारे आले कशावरुन तर नांवावरुन. आता ती भांडी जरा घडीभर बाजूला ठेवा व विचार करा. आपला देह हे एक पंचमहाभूतांनी बनलेले भांडेच आहे. ते जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नव्हते. ते असेच फिरत फिरत आपल्या घरात आले, मग त्या देहाला नांव दिले जाते ते मरेपर्यंत रहाते. पण देह संपला- नांव संपले – व बिना नावाचा आत्मा पुन्हा योनी योनीतून फ़िरायला जातो.
आता ही पळापळ थांबायला उपाय काय सांगितला आहे..? आपल्या संत, सत्पुरुष, गुरु, सद्गुरु, समर्थांनी सांगितले आहे की, ‘ जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नाव घे. म्हणजे काय होईल ? देह पडला तरी देवाचे नाव तुझ्यासोबत येईल. ते नांव देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नाव आहे, याला माझ्या घरात पाठवा. ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना पाठवून द्या या घरातून त्या घरात – म्हणजे या योनीतून त्या योनीत फ़िरायला.’
आपले काय होते माहिती आहे का ? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नांव घे, नाम घे असे सांगितले आहे. झाले– आपण पळवाट शोधण्यात पटाईत. आपण म्हणतो जमेल तसे ना ! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार. मग देव म्हणतो– हरकत नाही मग रहा फिरत निवांत घरोघरी, या योनीतून त्या योनीत…..
नाम घे असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींना म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांना दिले आहे व ते काम ही मंडळी चोख करतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नांव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे व नांव नसेल तर पुढील प्रवासाला पाठवणे.
बघा – वाचा – व विचार करा.
लेखक – अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈