मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बदक की गरुड ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बदक की गरुड ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी  गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की

बदक की गरुड

तुमचे तुम्हीच ठरवा.

दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट, वर टाय.

ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला.  आणि बोलला,

” माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जोपर्यंत मी तुमचे सामान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे, सर.”

त्या कार्ड वर लिहिले होते,

जॉन चे मिशन

माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.

मी भारावून गेलो होतो.

गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती.

जॉनने मला विचारले.

“आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?”

मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. “नाही, मला ज्यूस हवा आहे.”

तात्काळ जॉन उत्तरला…

“काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे.”

तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत.

जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता.

मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण

पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण  स्वरात विचारले. “सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?” त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ?

न राहवून मी त्याला विचारले,

” तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?”

त्यावर तो उत्तरला, “नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे.  आणि असमाधानी राहत असे. पण एकदा एका डॉक्टरकडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले.

त्यांनी एक पुस्तक लिहिले होते.  त्याचे नाव होते. ” तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो” ज्यात  पुढे लिहिले होते.  जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत, तर खरेच तसेच होईल.  तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.

बदक बनू नका

गरुड बना

बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.

आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे.

म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले.

मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.

मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो.

आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे.

तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी  अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालकाद्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो.

जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लिमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे.  जॉनने  बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे.  आणि गरुडासारखी भरारी मारायला सुरुवात केली आहे.

तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि  कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.

तुम्ही काय ठरवले आहे ?

बदकासारखे सतत आवाज करत (रडत), तक्रार करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर उडण्याचे ?

लक्षात ठेवा….

निर्णय तुमचा आहे

हे कुलूप फक्त आतून उघडते….

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पु.ल. आणि वारा…” लेखिका :सौ. मंगला गोडबोले ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

पु.ल. आणि वारा…” लेखिका :सौ. मंगला गोडबोले ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

 पुलंचा हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता किती अफाट होती ह्याची एक झलक…

1960-61च्या आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती.त्यातील संवाद पाहा:

वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता. हीच ‘वरात’ तुम्ही आता ‘वाऱ्यावर’ सोडली आहे, हे खरं आहे काय?

पुलं : “वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो…”

“भावगीत गायक झालो तो काळ ‘वारा फोफावला’ चा होता…!”

“नट झालो नसतो तर ‘वारावर’ जेवायची पाळी आली असती…”

“शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा ‘वारा प्यायलो’ होतो…”

“संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत ‘वारा भरून’ सूर काढत होतो…”

“नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार ‘आ-वारा’ होतो…”

“प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा ‘वारा अंगावरून गेला’ होता…”

“पटकथा लिहिल्या त्या ‘वाऱ्यावर उडून’ गेल्या…”

“नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी ‘वाऱ्याला उभं नसतं राहिलं…!”

“ही सर्व सोंगं करतांना फक्त एकच खबरदारी घेतली. ती म्हणजे ‘कानात वारं शिरू न देण्याची…!

“आयुष्यात अनेक प्रकारच्या ‘वाऱ्यांतून हिंडलो.’ त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्यांची आता ‘वरात’ काढली…!”

“लोक हसतात… माझ्या डोळ्यात आतल्या आत कृतज्ञतेचं पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा ‘वारा लागत’ नाही!”

🙏🙏🙏 वा राव !

पुलंना उभा महाराष्ट्र

साष्टांग दंडवत घालतो

ते उगीच नाही!

(सौ.मंगला गोडबोले यांच्या – ‘पुलं… चांदणे तुझ्या स्मरणाचे’ या पुस्तकातून).

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जपावं… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

जपावं… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

   पाय जपावा

   वळण्याआधी

   तोल जपावा

   ढळण्याआधी

   अन्न जपावे

   विटण्याआधी

   नाते जपावे

   तुटण्याआधी

   शब्द जपावा

   बोलण्याआधी

   अर्थ जपावा

   मांडण्याआधी

   रंग जपावे

   उडण्याआधी

   मन जपावे

   मोडण्याआधी

   वार जपावा

   जखमेआधी

   अश्रू जपावे

   हसण्याआधी

   श्वास जपावा

   पळण्याआधी

   वस्त्र जपावे

   मळण्याआधी

   द्रव्य जपावे

   सांडण्याआधी

   हात जपावे

   मागण्याआधी

   भेद जपावा

   खुलण्याआधी

   राग जपावा

   भांडणाआधी

   मित्र जपावा

   रुसण्याआधी

   मैत्री जपावी

   तुटण्याआधी!

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

    प्रस्तुती :श्री. कमलाकर नाईक

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

आज अनिताकडे  पार्टी आहे . तिच्या आणि अजयच्या  ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत . त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे .

पहिल्यांदाच सर्वांना  घरी  बोलविण्याचा  बेत तिने ठरविला . नाहीतर महिन्यातून एकदा सर्व  मित्र  बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा टप्पा मारतात , आणि  रिचार्ज होऊन घरी येतात . हॉटेल असेच शोधतात जेथे  मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल.••••

या सर्व कार्यक्रमात आजी-आजोबा घरीच राहतात , त्यांना रात्रीचे बाहेर जाणं , उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही .. यावेळेस अनिता-अजयने घरीच बोलविण्याचा  प्लान ठरविला. ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले .

सर्वांच्या सोयीनुसार  दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला. आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी ,असं तिच्या मनात होतं .

घरचे जेष्ठ ,Retired from work जरी असले तरी They are  not retired from fun,

असं तिचं मत आहे . नेहमी आपण बाहेर जातो ,ते काहीही तक्रार न करता घरी राहतात . येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम  आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात .

त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे . बदल, change प्रत्येकाला आवडतोच .

आपण आपल्या  पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल .हा विचार अनिताच्या मनात होताच.

खरंतर दोन चार दिवसांपूर्वी  घडलेल्या एका घटनेनं   हा बदल करण्याचा विचार तिच्या मनात आलेला अजून  दृढ झाला.

परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले, तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला . हे अस वागणं बरोबर नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना  हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे  एवढ करणं तरी  नक्कीच अपेक्षित होतं .

बरं !  आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही .ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही .

मुलांना आपल्यापेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित  वागता आलं पाहिजे . थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .

तेव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले .

जेव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला ,तेव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही . वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या .•••••

“अग ! ते खूप बोलतात . आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही .” “त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते . आपला अर्धा वेळ त्यातच जाईल .”  “मग रोजच्या सारखंच होणार ना , बदल कुठे झाला ?” “त्यांना लवकर जेवायचे असते . रात्रीचे झेपत नाही” वगैरे वगैरे .

अनिता म्हणाली  “अग!  आपण थोडा बदल करून तर बघू . माझ्या घरी सुरुवात करू .अग!  जमेल सर्व .मी करते तयारी . त्यांना ही बरं वाटेल . मुलांनाही मदतीला घेऊ.”

रश्मी कशीबशी या प्लॅनसाठी तयार झाली.

आज देशपांडे आजी आजोबा , कुलकर्णी आजी आजोबा ,जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते .आणि आश्चर्य चकितही  होते.

मुलांबरोबर लग्नाला जाणे , एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते . उत्साह  तर होता, बरोबर थोडं टेंशन ही होतं.

पार्टी छान झाली . सर्वांनी enjoy केलं . लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली .आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले .

सिनीयर्सची आपापसात छान ओळख झाली . गप्पा झाल्या .यंग जनरेशनच्या मनसोक्त गप्पा रंगल्या . हॉटेलपेक्षा हे option छान आहे . छान  हातपाय  पसरून  गप्पा मारता येतात, हे सर्वांना पटलं .

फॅमिली गेटटूगेदर छान रंगलं.

दुपारच्या चहानंतर अंताक्षरीचा कार्यक्रम झाला. तरुण वर्ग, बच्चा पार्टी आणि आजीआजोबा ग्रुप असे तीन गट होते . सर्वांनी  धमाल केली .आजी आजोबांनी जुनी गाणी छान म्हटली .

अगदी अंगाई गीत ,मंगलाष्टक तर

*जा मूली  जा दिल्या घरी तू सुखी रहा .

*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर

*घट डोईवर ,घट कमरेवर •••

शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले .गाणं होतं ••••

*घरात हसरे तारे असता ,मी पाहू कशाला नभाकडे.•••*

शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले ,”धन्यवाद मुलांनो, आज  तुमच्यात सामील केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली . आम्ही  दहा वर्षांनी लहान झालो.

Hope ,We have not troubled you.”

प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याचं तर खूपच कौतुक झालं .

अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले , त्याची सुरुवात  योग्य दिशेने  झाली आहे हे तिच्या लक्षात आले.

म्हणतात ना •••

समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात.

माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे,परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.

लेखिका :सुश्री.संध्या बेडेकर

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सारथी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सारथी… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

दोन दिवसांनी तो घरी आलेला. दहा बाय बाराचं त्याचं घर. बायको, लेक आणि तो.

त्याच्या खोलीबाहेरची ती गॅलरी. दरवाजाला लागून गॅलरीत आडवी पडलेली कॉट. कॉटवरचा त्याचा म्हातारा बाप. आयुष्यभर हातगाडी खेचत रस्ता मागे ढकलला त्यानं. थकला तो आता.. पायातलं त्राणच गेलंय त्याच्या आता. खुरडत खुरडत रांगत जातो तो.. अगदीच परावलंबी नाही तो… जरी असता तरी काळजी नव्हती. त्याचा खूप जीव होता बापावर.

त्याच्यासाठी वाट्टेल ते केलं असतं त्यानं.

त्याची बायकोही त्याच्यासारखीच.

सासरा नाही माझा बापच आहे असं समजणारी.

म्हातारा बिचारा कॉटवर बसलेला असायचा दिवसभर.

नातीला गोष्ट सांगायचा..

 

बापानं काबाडकष्ट केले म्हणून..

तो बारावी सायन्स तरी झाला.

पुढचं शिक्षण नाही झेपलं त्याला. आणि

तसा डोक्यानं मध्यम.

 

नोकरी नाही म्हणून घरी बसला नाही. पेपरची लाईन टाकायला सुरवात केली.

साहेब….

खरं तर साहेब त्याच्यापेक्षा वयानं फार मोठे नाहीत. फार फार चाळीस. पण प्रचंड हुश्शार. फार्माचा धंदा.जोरात चाललेला. फार्मा लेनमधे भलंमोठ्ठं ऑफीस.

एक दिवस साहेबांनी थांबवलं त्याला.

‘किती दिवस पेपर टाकणार आहेस अजून ?

ड्रायव्हिंग शिकून घे. मी पैसे देतो. गाडी चालवायला लागलास की, माझ्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचं. उपकार वगैरे करत नाहीये मी.

तुझ्या पगारातून कापून घेईन मी.”

जमलं.अगदी सहज.

सहज गाडी चालवायला शिकला.

साहेबांकडे कामालाही लागला.

साहेबांना माणसाची चांगली पारख.

साहेब सांगतील तसं…

तो कधीच नाही म्हणायचा नाही.

साहेबांचे दौरे असायचे.

सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर, बेळगाव…

चार चार दिवस टूर चालायची.

त्याची काहीच तक्रार नसायची.

हातगाडीवाल्याचा पोरगा

आता ड्रायव्हर..

प्रमोशनच की….. आता बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. झोपडपट्टीतून चाळीची एक खोली. पक्क्या भिंती, पक्कं छत. छान संसार सुरू झाला.

काही महिन्यांनी साहेबांनी एक दिवस पुन्हा बोलावलं.

“किती दिवस ड्रायव्हरची नोकरी करणार आहेस ?

यापुढे तुझी ड्युटी फक्त सकाळी आणि संध्याकाळी.

सहा ते दहा.

मधल्या वेळेत कॉलेज करायचं.

डी फार्मसी करून टाक.

फी मी भरीन. पण हे बघ… पुढच्या पगारातून कापून घेईन..”

साहेबांनी सांगितलं ना..

मग करायचंच.

तीन वर्ष फार ओढाताणीची गेली..

अभ्यास, नोकरी आणि संसार…..

जमवलं कसंबसं.

आणि तो “डी फार्म” झाला.

साहेबांकडची ड्रायव्हरची नोकरी चालू होतीच. रिझल्ट लागला. साहेबांना पेढे नेऊन दिले. साहेब खूष.

“गाडीची किल्ली दे इकडे. उद्यापासून मला ड्रायव्हरची गरज नाही. सिटी हॉस्पीटलमधलं मेडीकल आपण चालवायला घेतलंय. आपला माणूस आहे तिथं..

दोन तीन महिन्यात सगळं शिकून घे. नंतर मात्र तुलाच सगळं सांभाळायचंय..

तीन महिन्यानंतर तुला चांगले पैसे मिळायला लागतील.

आजच सुप्रभा बिल्डरकडे जायचं.

गंगापुररोडला स्कीम होत्येय त्यांची.

मी बोललोय त्यांच्याशी. तिथं एक वन बीएचके बुक करायचा.

असे किती दिवस भाड्याच्या घरात रहायचं ?

हफ्ता तुझ्या पगारातून कट होईल.”

ठरलं तर.

साहेबांनी सांगितलं तसंच होणार.

‘बरं..’

नेहमी तो एवढंच म्हणायचा. आणि चालू लागायचा. आज मात्र तिथंच घुटमळला.

“साहेब,

मी तुमची गाडी चालवली.

तुमी माझ्या जीवनाच्या गाडीला, चांगल्या रस्त्याला लावली.

मी कसं आभार मानू तुमचं ?”

साहेब पहिल्यांदा दिलखुलास हसले…

“म्हणजे मला पण तू ड्रायव्हर करून टाकलंस की.

हरकत नाही..

अरे सगळ्यात मोठा ड्रायव्हर तो श्रीकृष्ण.

मी आपली त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करतो.

ते जाऊ दे. उपकाराची परतफेड कशी करणार ?

तू पण कुणाचा तरी ‘ड्रायव्हर’ हो.

तूही चांगला प्रामाणिक माणूस शोध.

त्याला योग्य रस्ता दाखव.

त्याची गाडी मार्गी लाव.

आणि आपल्या कंपनीच्या परिवारात सामील करून घे.”

हे अनमोल मार्गदर्शन ऐकून, सागरापेक्षा मोठा धबधबा डोळ्यात अडवून, तो घरी निघून गेला.

साहेबही निघाले. आज एका सेमिनारला जायचं होतं त्यांना. नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करणार होते साहेब. विषय होता…

“धंद्यासाठी चांगली विश्वासू माणसं कशी जोडावीत ?”

साहेब नुसतेच हसले आणि निघाले.

इतकी वर्ष साहेबांनी तेच तर केलं होतं…

“धंदे का राज” साहेब आज बिनदिक्कत सांगणार होते…

 जीवनात सारथी व्हा …!!!

… कुणाचे तरी..!!

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्री… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ मैत्री…  ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

ठाम रहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही,

स्वतःवर विश्वास असला की,

जीवनाची सुरूवात कुठूनही करता येते.

 

कोणतेही नाते निभावताना,

समोरच्याच्या मनातील,

आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते.

विनाकारण भावूक होण्यात अर्थ नसतो.

नाही तर आपण नाते फुलवत राहतो,

आणि समोरचा आपल्याला झुलवत राहतो.

 

दरवळ महत्त्वाची…

कारण दरवळ अविस्मरणीय असते,

मग ती फुलांची असो,

वा माणसांची…

 

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलंसं वाटत असतं,

केव्हा कोण जाणे,

मनात घर करुन राहत असतं.

 

ते जोपर्यंत जवळ आहे.

त्याला फुलासारखं जपायचं

असतं,

दूर गेल्यावरही आठवण

म्हणून,

मनात साठवायचं असतं,

याचंच तर नांव,

“मैत्री”असं असतं..!!

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कावळा— लेखक :पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

कावळालेखक :पु. ल. देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.

पाळीव नसूनसुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत, असा ‘कावळा’ हा एकच पक्षी कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो.

आमच्या एका मित्राची आजी एकदा (एकदा म्हणजे एकदाचीच) वारली.

आता तिच्या पिंडाला न शिवायचं कावळ्याला काहीही कारण नव्हतं. अहो, चांगले नव्वद वर्षे पाहून म्हातारीने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली.

तुझ्या मुला-बाळांची काळजी घेऊ म्हणावं, तर मुलगाच बावीस वर्षे पोस्टातून पेन्शन घेऊन अजून बावीस वर्षे जगेल इतका टुणटुणीत. जगो बुवा! आपल्याला त्याचं काही नाही.पण लेकी होत्या, सुना, नातू , पणतू..

सगळं काही अगदी यथासांग होतं.

मग कोणीतरी उठलं आणि म्हणालं- ” आजीबाई, एक मोठ्ठी लोणच्याची बरणी आणि चार कपबशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला. “

.

.

.

पटकन् कावळा शिवला…

कावळा हा पक्षी कौटुंबिक गोष्टीत इतका बारकाईने लक्ष घालत असेल याची कल्पना नव्हती मला…

लेखक :पु. ल. देशपांडे

(‘पाळीव पक्षी’)

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “श्री लिहायला…” – कवयित्री सुजाता साठे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “श्री लिहायला…” – कवयित्री सुजाता साठे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

श्री लिहायला घरात आता

हिशोबाची वहीच नाही

ऑनलाइन पेमेंटच्या नव्या युगात

तांदूळ साखरेच्या डब्यात

लपवायलाच काही नाही

 

फाटलेले कपडे शिवून

पुन्हा वापरायची पद्धत नाही

सुई दोरा घेऊन शिवायला

मुळात कोणाकडे वेळच नाही

 

युज अँड थ्रो चा जमाना आहे

माळे उगीच भरायचे नाही

जुन्या गोष्टींमध्ये उगीच

मन असे गुंतवायचे नाही

 

मॉलच्या राशी तर आहेतच

आमिषाना भुलायचं नाही

असं म्हटलं तरीही

प्रत्यक्षात तसं होतच नाही

 

आता तर रेलचेल ऑनलाइन ची

ॲमेझॉन ची गळ मोडवत नाही

परस्पर होतो हिशोब सारा

पुन्हा, मी तर कुठे जातच नाही

 

जुनी हिशोबाची वही वाचताना

डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही

तेव्हा बावळट का आता शहाणे

या वादात मला पडायचं नाही

 

जुन्या आठवणी घेऊनच

पुढे पुढे जायचं असतं

काळाबरोबर आनंदाने

आपणही बदलायचं असतं

 

कवयित्री :सौ. सुजाता साठे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घाई…कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ घाई…कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

फार घाई होते हल्ली…

प्रत्येक क्षणावर कशाची तरी मोहर उमटलीच पाहिजे म्हणून घाई…

क्षण फुकट वाया गेला म्हणून

लगेच गळे काढायची पण घाई…

 

माझ्याजवळ काही आलंय की जे अजून मलाही नीट नाही उमगलंय…

ते पटकन जगाला दाखवायची घाई….

जगापर्यंत ते पोहचलंय की नाही हे आजमावायची घाई…

पोहचलं असेल तर त्याचे निकष जाणून घ्यायची घाई….

 

गर्भातल्या श्वासांना डोळे भरुन बघायची घाई….

व्हेंटिलेटरवरच्या श्वासांना निरोप द्यायची घाई….

 

Quality मुखातून पडलेला शब्द अवकाशात विरायच्या आधी पकडायची घाई…

 

विचारांना अविचाराने बाजूला सारायची घाई….

 

नजरेत दृश्य येताक्षणी कॅमेऱ्यात बंद करायची घाई…

विचाराचा कोंब फुटताक्षणी,कृतीत उतरायची घाई…

फळाफुलांना हंगामाआधी पिकवण्याची घाई….

बोन्सायच्या टोपीखाली निसर्ग दडवायची घाई….

मेमधला गोडवा जानेवारीतच चाखायची घाई….

 

बोबड्या बोलांना इंग्रजीत ठासून बसवायची घाई…!

चिमखड्या आवाजांना लता/किशोर व्हायची घाई.

बालांना किशोर व्हायची घाई…

किशोरांना यौवनाची चव चाखायची घाई तर..

काल उंबरा ओलांडून आलेल्या मुलीला सगळे अधिकार हातात घ्यायची घाई….

 

तिन्हीसांजेच्या परवच्याला नृत्य/लावणीची घाई…

दिवसभराच्या बुलेटिनला जगाच्या घडामोडी कानावर ओतायची घाई…

 

प्रसंग टेकताक्षणी शुभेच्छा द्यायची घाई…

श्वास थांबता क्षणी श्रद्धांजली वाहायचीसुद्धा घाई…!

 

मुक्कामाला पोहचायची घाई….

कामावरुन निघायची घाई…

 

सिग्नल संपायची घाई….

पेट्रोल/डिझेलच्या रांगेतली अस्वस्थ घाई…

 

सगळंच पटकन उरकायची घाई…

आणि स्वातंत्र्यावर थिरकायची घाई…

 

आठ दिवसांत वजन कमी करायची घाई…

महिनाभरात वजन वाढवायची देखील घाई….!

पाच मिनिटांत गोरं व्हायची घाई…

पंधरा मिनिटांत केस लांब व्हायची घाई…

 एक मिनिटात वेदना शमवायची घाई…

एनर्जी ड्रिंक पिवून वडीलधाऱ्यांना दमवायची घाई…

 

साऱ्या या घाईघाईने जीव बिचारा दमून जाई…

भवतालचा काळ/निसर्ग गालात हसत राही….

मिश्कीलपणे माणसाच्या बुद्धीला सलामी देई…!!!

 

घाईघाईने मारलेल्या उड्या

कमी कर रे माणसा थोड्या

बुद्धी पेक्षा ही आहे काळ मोठा

कधीतरी जाण वेड्या…

 

कवयित्री : सौ. विदुला जोगळेकर

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माणसाला शेपूट येईल का ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ माणसाला शेपूट येईल का ? ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

माणसाने माणसाशी

संवाद तोडला आहे

म्हणून तो घराघरात

एकटा पडला आहे

 

येत्या काळात ही समस्या

अक्राळविक्राळ होईल

तेव्हा आपल्या हातातून

वेळ निघून जाईल

 

कदाचित माणूस विसरेल

संवाद साधण्याची कला

याच्यामुळे येऊ शकते

मुकं होण्याची बला

 

पूर्वी माणसं एकमेकांशी

भरभरून बोलायची

पत्रसुद्धा लांबलचक

दोन चार पानं लिहायची

 

त्यामुळे माणसाचं मन

मोकळं  व्हायचं

हसणं काय, रडणं काय

खळखळून यायचं

 

म्हणून तेव्हा हार्ट मध्ये

ब्लॉकेज फारसे नव्हते

राग असो लोभ असो

मोकळेचोकळे होते

 

पाहुणे रावळे गाठीभेटी

सतत चालू असायचं

त्याच्यामुळे प्रत्येक माणूस

टवटवीत दिसायचं

 

आता मात्र माणसाच्या

भेटीच झाल्या कमी

चुकून भेट झालीच तर

आधी बोलायचं कुणी ?

 

ओळख असते नातं असतं

पण बोलत नाहीत

काय झालंय कुणास ठाऊक

त्यांचं त्यांनाच माहीत

 

घुम्यावाणी बसून राहतो

करून पुंगट तोंड

दिसतो असा जसा काही

निवडुंगाचं  बोंड

 

Whatsapp वर प्रत्येकाचेच

भरपूर ग्रुप असतात

बहुतांश सदस्य तर

नुसते येड्यावणी बघतात

 

त्यांनी मेसेज वाचल्याच्या

दिसतात निळ्या खुणा

पण रिप्लाय साठी सुटत नाही

शब्दांचा पान्हा

 

नवीन नवीन Whatsapp वर

चांगलं बोलत होते

दोनचार शब्द तरी

Type करत होते

 

आता मात्र बऱ्याच गोष्टी

इमोजीवरच भागवतात

कधी कधी तर्कटी करून

इमोजीनेच रागवतात

 

म्हणून इतर प्राण्यांसारखी

माणसं मुकी होतील का ?

भावना दाबून धरल्या म्हणून

माणसाला शिंगं येतील का ?

 

काय सांगावं नियती म्हणेल,

लावा याला शेपटी

वाचा देऊन बोलत नाही

फारच दिसतो कपटी

 

हसण्यावर नेऊ नका

खरंच शेपूट येईल

पाठीत बुक्का मारून मग

कुणीही पिळून जाईल

 

म्हणून म्हणतो बोलत चला

काय सोबत येणार

नसता तुमची वाचा जाऊन

फुकट शेपूट येणार

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares