मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

अन्नपूर्णेमध्ये पहिली देवी  आपली आई!

आज जेव्हा आपण वयस्कर व्हायला लागलो, तेव्हा कळतं की आईने आपल्याला बिनतक्रार, किती कष्ट करून, रांधून खाऊ घातलं! घरात माणसं भरपूर. एकत्र कुटुंबपद्धती. येणारा पैसा तुटपुंजा. पण त्याही परिस्थितीत तिने सगळ्याची सांगड घालून आपल्याला चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, भाकरी- पोळी असे रोजचे सुग्रास जेवण दिले. त्याकाळी इडली- वडे नव्हते. पण त्यातल्या त्यात जे नवनवीन करता येईल ,—-कधी सांजा, कधी उपीट, कधी गोडाचा शिरा, कधी थालीपीठ, धपाटी, डाळफळ, उपवासाची खिचडी भात, तांदळाची खिचडी, पोह्याचे पापड, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, भरली मिरची, लोणच्याचे अनेक प्रकार, चिवडा, लाडू, साध्या पिठाचे लाडू….. किती सुंदर करत होती ते!

कोणतीही गोष्ट  तिने वाया घालविली नाही. दुधाचे साईचे पातेले स्वच्छ धुऊन ते कणकेत मिसळले. बेरी काढून, त्यातच कणीक भाजून, साखर घालून त्याचे लाडू केले. भाकरीच्या उरलेल्या छोट्याशा पिठात थोडेसे डाळीचे पीठ घालून शेवटचे धिरडे म्हणजे पर्वणी असायची. त्याशिवाय सणावाराला होणारे वेगवेगळे पदार्थ, चारीठाव स्वयंपाक, गरमागरम पुरणपोळ्या, आटीव बासुंदी, श्रीखंड– घरच्या चक्क्याचे–, खरवसाच्या वड्या–, कणसाची उसळ, वाटल्या डाळीची उसळ…. आपण केलेल्या भोंडल्यासाठी केलेले दहा दिवसाचे विविध प्रसादाचे पदार्थ… हे सगळं करताना तिच्याजवळ श्रीमंती नव्हती. पण कोंड्याचा मांडा करण्याची युक्ती मात्र होती आणि मनामध्ये इच्छाशक्ती होती. कोणताही पदार्थ बाहेरून मागवल्याचे कधी आठवत नाही. कारळ, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या सदैव डबा भरून घरात असत.भरली मिरची, कांद्याचे सांडगे, कोंड्याच्या पापड्या… किती पदार्थाने घरातले डबे भरलेले असायचे!

खरंच या सर्व माउलींनी आपलं सगळं आयुष्य घराला जपण्यात घालवलं. त्या सगळ्या अन्नपूर्णांना आज साष्टांग दंडवत ! त्यामुळे आपण सुदृढ, उत्तम विचारांचे, बळकट मनाचे झालो. अगदी टोपलीभर भांडी आणि बादलीभर धुणं पडलं तरी चिंता न करता खसाखसा घासून मोकळे होणारी, कधीही कुठेही न अडू  देणारी सुदृढ पिढी झालो, ही त्या माऊलींची पुण्याई आहे!

अन्नपूर्णांनो, तुम्ही होतात, म्हणून आम्ही अंतर्बाह्य सुदृढ झालो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत!

लेखिका :अज्ञात

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समाधान… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ समाधान… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

नोकरी करणाऱ्याला वाटतं- धंदा बरा.

व्यवसाय करणाऱ्याला वाटतं – नोकरी बरी.

घरी राहणाऱ्याला वाटतं-  काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं.

 

एकत्र राहणाऱ्याला वाटतं- वेगळा राहण्यात मजाआहे.

वेगळा राहतो त्याला वाटतं- एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही.

 

गावात राहणाऱ्याला वाटतं- शहरात मजा आहे.

शहरातला म्हणतो- गावातलं आयुष्य साधं, सरळ,सोपं आहे.

 

देशात राहतात त्यांना वाटतं- परदेशी जावं,

परदेशात राहणाऱ्याना वाटतं – आपण इथे खूप तडजोड करतो.

 

केस सरळ असणारी म्हणते- कुरळे किती छान.

कुरळे केसवाली म्हणते –  किती हा गुंता.

 

प्रेम ज्याला मिळते त्याला किंमत नसते व काही माणसे  प्रेम मिळावे म्हणुन जंग जंग पछाडतात . 

 

एक मूल असतं, त्याला वाटतं- दोन असती तर…

दोन असणाऱ्याला वाटतं – एकवाला मजेत..

 

मुलगी असली की वाटतं-

मुलगा हवा होता,

मुलगा असला की वाटतं-मुलीला माया असते.

ज्याला मूल नसतं तो म्हणतो- काहीही चालेल.

 

नावे ठेवणारे रामातही दोष बघतात,

कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात.

 

मिळून काय ?

नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणाला कळत नाही.

मी बरोबर आहे, पण सुखी नाही. दुसरा मात्र पक्का आहे,  तरी मजेत आहे.

 

किती गोंधळ रे देवा, हा?

 

म्हणून जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा.आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगता आले पाहिजे.

 

म्हणून, तुकाराम महाराज म्हणतात,

ठेविले अनंते तैसेची रहावे

चित्ती असू द्यावे समाधान…!

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“चिटी  चावल  ले  चली,

बीच  में  मिल  गई  दाल।

कहे  कबीर  दो  ना  मिले,

इक ले , इक डाल॥”

अर्थात :

मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है  देवा! तू भाताची सोय केलीच होतीस , आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.

तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’

तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.

माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.

साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं!’

विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण,शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.

ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’  अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांसाठी हाकायला खूप सोपी पडतात.

पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तूही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते. (आणि ऐपतही नव्हती.)

आज असंख्य विकल्पांनी, वस्तूंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तूही भंगारात टाकू लागले आहेत.

भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.

देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.

म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो.

कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.

चला तर मग आनंदी जगूया.  

लेखक :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शशी नाडकर्णी- नाईक   

फोन  नं. 8425933533

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पावसाचं वय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ पावसाचं वय… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम 

काल मी पावसाला विचारलं

तुझं वय काय?

पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,

जर तू पावसात सैरावैरा

आनंदात धावतअसशील

तर माझं वय १०

 

जर तू पावसात

कविता लिहित असशील

तर माझं वय १६

 

जर तुला पावसात

विरह जाणवत असेल

तर माझं वय १८

 

जर तुला पावसात

ट्रेकिंगला जावंसं वाटत

असेल,

तर माझं वय २४

 

जर तुला पावसात

गजरा घ्यावासा वाटत असेल

तर माझं वय ३०

 

जर तुला मित्रांसोबत

पावसात भिजत भजी

खावी, असं वाटत असेल

तर माझं वय ४०

 

जर तुला पावसात

छत्री घ्यावी लागली,

तर माझं वय ५०

 

मग मी पावसाला म्हणालो

“अरे, एक काय ते वय सांग,

 शब्दात गुंतवू नकोस!”

 

स्मितहास्य देऊन म्हणाला पाऊस,

 तू जसे अनुभवशील

तेच माझे वय!

 

पावसाळ्याच्या  ओल्याचिंब शुभेच्छा!

लेखक :अज्ञात

संग्राहिका : सौ. दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शरिरी वसे रामायण – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ शरीरी वसे रामायण – लेखक : कवी ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

जाणतो ना काही आपण

शरीरी आपुल्या वसे रामायण || धृ ||

*

आत्मा म्हणजे रामच केवळ,

मन म्हणजे हो सीता निर्मळ !

जागरुकता हा तर लक्ष्मण,

शरीरी आपुल्या वसे रामायण ||१||

*

श्वास, प्राण हा मारुतराया,

फिरतो जगवित आपुली काया |

या आत्म्याचे करीतो रक्षण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||२||

*

नील जाम्बुवंत रक्त नसा या,

फिरती शोधत जनक तनया

गर्वच म्हणजे असतो रावण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||३||

*

रक्तपेशी त्या सुग्रीव, वानर,

भाव भावना त्यातील वावर

मोहांधता करी आरोग्य भक्षण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||४||

*

नखे केस त्वचा शरीरावरती,

शरीर नगरीचे रक्षण करती

बंधु खरे हे करती राखण

शरीरी आपुल्या वसे रामायण ||५||

*

क्रोध म्हणजे कुंभकर्ण तो,

शांत असता घोरत पडतो

डिवचताच त्या करी रणक्रंदन

शरीरी आपुल्या वसे रामायण ||६||

*

गर्वे हरले सौख्य मनाचे

कासावीस हो जीवन आमुचे

संकटी येई शरीर एकवटून

शरीरी आपुल्या वसे रामायण ||७||

*

मनन करता भगवंताचे,

रक्षण होईल आरोग्याचे

रामजपाचे अखंड चिंतन

शरीरी आपुल्या वसे रामायण ||८||

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उसाच्या मुलांची लग्नं – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ उसाच्या मुलांची लग्नं – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

उसाला झाली दोन दोन पोरं,

मोठा मुलगा ‘गूळ’  अन्

धाकटी मुलगी ‘साखर’

 

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,

गूळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर

 

साखर तशी स्वभावाला गोड,

तिच्यात उणेपणा शोधणं अवघड

 

गुळ मात्र स्वभावाला चिकट,

समोर दिसला की इतरांना वाटे संकट

 

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळून जाई,

गूळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही

 

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,

गूळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता ओबडधोबड

 

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,

बापाने लगेच दोघांचे लग्नच लावून टाकले

 

तिला झाला एक मुलगा

दिसायला होता तो गोरागोरा,

यथावकाश बारसे झाले, नाव ठेवले ‘शिरा’

 

उसाला आता काळजी वाटू लागली गुळाची,

त्याच्यासाठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची?

 

उसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रूप ना रंग,

सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग

 

बर्‍याच मुली पाहिल्या, कोणी त्याला पसंत करीना,

काळजी वाटे उसाला

रात्री झोप येईना

 

उसाला मित्र एक होता, नाव त्याचे तूप

त्याने प्रयत्न केले खूप,

अन् उसाला आला हुरूप

 

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,

जी दिसायला होती बेताची

 

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,

होते उसाच्या तोलामोलाचे,

ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे

 

अंगाने ती होती लठ्ठ नि जाडजूड,

रूपाला साजेसे, नांंव होते तिचे ‘भरड’

 

गव्हाला मुलीच्या रूपाची होती कल्पना,

तो कशाला करतो नसत्या वल्गना ?

 

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,

लग्न जमले अन् सारे तयारीला लागले

 

किचन ओटा झाला,

लग्नासाठी बुक,

स्वयंपाकघर पण सजविले खूप

 

‘भरड’ला तूप कढईत घेऊन गेले,

तेथेच तिचे खरपूस मेकअप पण केले

 

भरपूर लाजली ‘भरड’, अन् झाली गुलाबी,

गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली ‘शराबी’

 

लग्नाची तयारी पहायला आलेले दूधसुद्धा कढईत शिरले,

अन् हळूच त्याने गुळाला कढईत पाचारीले

 

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश

 

मनाने दगड असलेल्या भावनाशून्य गुळाला,

‘भरडी’ चे रुप पाहून, वेळ नाही लागला पाघळायला

 

काजू बदाम किसमिसच्या पडल्या अक्षता,

कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता

 

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,

थाटामाटात बारसे झाले,

नाव ठेवले ‘लापशी’

 

आवडली ना

   शिरा आणि लापशी?

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

स्त्रियांना कधी कामं करताना पहाल, तर दिसेल की , त्या फिरत गरगरत कामं करतात, सतत उठताना बसताना दिसतात. कारण कामं चहूदिशेला असतात.एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं, तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात.म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही. दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि इतरांच्या यशात असणारा, पण न दिसणारा वाटा,  हेच यश असतं. प्रत्येक खोलीत गेलं की कामं बोलवत असतात आणि स्वयंपाकघरातली कामं तर कधी संपतच नाहीत.

टाईम झोन अनुसार किंवा नैसर्गिक स्त्रीप्रकृतीचा विचार करता स्त्रीतत्त्व मुळात शांत आणि रिलॅक्सड प्रवृत्तीचं आहे. स्त्रीची कामं करण्याची पध्दत आक्रमकपणे फडशा पाडण्याची नसून आनंद घेत निर्मिती करण्याची आहे, पण आजच्या जीवनशैलीमुळे ती सतत अस्वस्थ धावताना दिसते. आतला न्यूनगंड भरुन काढण्यासाठी घरातल्यांना काही देत राहते. स्वतःलाच शिक्षा केल्यासारखी कामात बुडून राहते, स्वतःवरचं कमी झालेलं प्रेम तिला आणखी दु:ख देतं आणि त्या वेदनांपासून, त्या भावनांपासून पळण्यासाठी ती आणखी कामं करत बसते.

शांत बसलं की माणसाच्या मनातल्या भावनांची वादळं वर येतात. विश्रांतीची गरज आहे, स्वतःला वेळ द्यायचाय, स्वतःकडे लक्ष द्यायचंय अशी ओरड आतून येते, खरंतर त्याकडे लक्ष देऊन त्या वेदना हील करणं सोडून ती कामात बर्न आऊट होत रहाते, थकते दमते आणि तक्रार करते. या तक्रारींमुळे इतर आणखी लांब जातात. तिला टाळतात. मग ती आणखी एकटी पडते.

टाईम मॅनेजमेंट हा विषय स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळा आहे आणि तो वेगवेगळया पध्दतीनेच रिझल्ट देणारा आहे. स्त्रीची कार्यक्षमता आणि एकूण दिनक्रम याचा संबंध विश्रांतीशी आहे.  स्त्रियांच्या विश्रांतीला आळस समजणं म्हणजे अक्षरशः अज्ञान आहे. निसर्ग संतुलन साधत असतो, यशासाठी जितकी धावपळ,गडबड,पळापळ गरजेची असते,तितकीच शांतता आणि विश्रांतीसुध्दा.

एक उपाय सुचवत आहे. अनेक घरात असेलही. पण ज्यांना माहीत नाही त्यांनी हा प्रयोग करुन पहा. आपल्या घरातल्या सगळया स्त्रिया जिथे जास्त वेळ उभ्याने काम करतात, जिथे जास्त वेळ घालवतात, तिथे एक लहानसा स्टूल बसण्यासाठी ठेवा. पटकन बसता येईल, टेकता येईल असा एक स्टूल ओट्यापाशी हवाच. चहा, दूध गरम होईपर्यंत, भाजी चिरताना, निवडताना ओट्यापाशी पटकन विसावता येईल.

स्टूल फार मोठा जागा व्यापणारा, अडचणीचा नको, लहानसा, हलका !

कोणी म्हणेल आमच्या किचनमधे डायनिंग टेबल आहे, पण कामात ती खुर्ची पटकन घेतली जात नाही. बायका उभ्यानेच खातात, चहा पितात आणि तासनतास बसत नाहीत. मग पाठदुखी कंबरदुखी मागं लागते.

हे स्टूल प्रतीक म्हणून काम करेल, विश्रांतीची आठवण करुन देणारं प्रतीक!

‘बस जरा. कामं पळून जात नाहीत. दोन मिनिटं शांत बस. पाणी पी,’

हे सगळं बोलणारं कुणी असायची गरज नाही. हे स्टूल बोलेल.

या क्षणभर विश्रांतीनं थकवा 50% कमी होईल. सगळं संपल्यावर एकदम कोसळायला होणार नाही आणि मनालाही शांतता मिळेल. किचनमधला असा हा कृष्णसखा क्षणभर विश्रांती देऊन कशी मदत करतो, हे खरंतर सवयीनं अनुभवण्याची गोष्ट आहे, बघा प्रयोग करुन!

लेखिका : श्रीमती कांचन दीक्षित

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘कोणी नसे कुणाचे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री शिवकुमार कर्णिक ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘कोणी नसे कुणाचे’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री शिवकुमार कर्णिक ☆

प्रत्यक्ष वेळ येता

कोणी नसे कुणाचे ।।धृ ||

*

कन्या स्नुषा नृपांची, प्रत्यक्ष रामभार्या ।

पिचली क्षणाक्षणाला, कारुण्यरुपी सीता ।

कामी तिच्या न आले, सामर्थ्य राघवांचे….

प्रत्यक्ष वेळ येता,

 कोणी नसे कुणाचे  ll १ ll

*

त्यागून सूर्यपुत्रा,

 कुंती पुन्हा कुमारी ।

कर्णास अनुज माता, सारेच जन्म वैरी ।

कौतुक का करावे,

 त्या रक्तबंधनाचे ….

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कुणाचे  ll २ ll

*

केली द्यूतात उभी,

साक्षात कृष्णभगिनी ।

सम्राट पांडवांची, रानावनात राणी ।

पति पाच देवबंधू ,

तरी भोग हे तियेचे…….

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कुणाचे  ll३ll

*

ठेवू नको अपेक्षा,

असल्या जगाकडूनी ।

निरपेक्ष आचरी तू,

कर्तव्य प्रेम दोन्ही,

मग चालूदे सुखाने, अव्हेरणे जगाचे 

प्रत्यक्ष वेळ येता,

कोणी नसे कोणाचे..||४||

कवी:अज्ञात

प्रस्तुती: श्री. शिवकुमार कर्णिक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘अनासायेन मरणं’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् , देहि मे परमेश्वर:।।

माझे सासरे रोज पुजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधीकधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुधा एकच असते. मला पण छान वाटतं. असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते.

त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

अनायासेन मरणं :

मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा तर अनायासेन – सहज.

विनादैन्येन जीवनं :

जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:

मृत्यूनंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा तुझेच’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

 

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना. रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कारवर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड तोच विषय आमचापण होता.

हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, “आता काय गं आपली मुलं मोठी झाली. संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे, आता ती घडली. आता परिवर्तन होणार नाही.”

मला तेव्हा सांगावंस वाटलं तिला, ‘संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीधर असं नाही गं.

आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही, असं नसतं.

संस्कार तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते. ‘

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे. पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील.

आज कदाचित त्याचं महत्त्व तिला कळणार नाही. पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरुवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल, त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडताना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार’ मानणे, ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती. 

आपल्या जीवनाची  ‘जबाबदारी’ जोपर्यंत आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध शक्ती’सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेतो त्याक्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

लेखक  :अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “चहा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “चहा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

चहाला सोडा लागत नाही..

Tonic water लागत नाही..

प्रिंगल्स , खारवलेले काजू  , शेजवान , चकल्या लागत नाहीत…

साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं !

crystal glass चे फालतु खर्च नाहीत..

गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…

आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात..

देव्हाऱ्यासमोर / देवळासमोर / देवळामागे / मार्गशीर्षात / गुरुवारी / शनिवारी / तीर्थक्षेत्री / चतुर्थी कधीही , कुठेही पिऊ शकतो..

कितीही महागाचा घेतलात तरी ६० ml चा जास्तीत जास्त खर्च ३०-४० रुपयेसुद्धा होणार नाही. 

” आत्ताच पिऊन आलो, ” असं न घाबरता तोंड वर करून सांगता येतं.

perfume मारावा लागत नाही.

centre fresh खावा लागत नाही.

१२० ml पिऊनसुद्धा कप खाली ठेवल्या ठेवल्या स्टिअरिंग हातात घेऊन बेफाम गाडी चालवू शकता.

Traffic police अडवत नाही.

चार मित्र मिळून प्यायला बसलात, तर मधेच उठून कुणी कुणाला मिठ्या मारत नाही, किंवा एकाएकी इंग्लिशही बोलत नाही.

चहामुळे कुणाला अद्याप जुन्या खटल्यांची आठवण येऊन, धाय मोकलून रडत, गजल आणि breakup songs लावल्याचं पहाण्यात नाही…

चहाचा कच्चा माल टेनेसी किंवा स्कॉटलंड किंवा रशियावरून यायची गरज नसते…

आसाम, दार्जिलिंग, केरळ वगैरे देशी ठिकाणी तयार होतो.

देशसेवासुद्धा होते.

काळ्या पिशव्यांची गरज नसते.

लाकूड तोडून त्याचे बॅरल्स लागत नाही..

गॅसशेगडी, म्हशीचं  ताजं दूध, चहाची पत्ती नि साखर एवढंच पुरतं.

असा हा निरागस, पण तितकाच चैतन्यदायी चहा, तुम्हाला आजन्म मिळत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

सोबत उत्तम गरम गरम चहा करून, हातात आणून देणारा/देणारी मिळाली तर चहात वेलची !

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares