मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द व्हावे सारथी… भाग-1 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ 📘शब्द व्हावे सारथी… भाग-1 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

‘‘लंगडीच राह्य़चंय का तुला आयुष्यभर?’’ डॉ. बेडेकर मला विचारीत होते.

‘‘आयुष्यभर म्हणजे?’’ मी विचारलं.

‘‘आईएवढी, माझ्याएवढी झालीस तरी!’’

‘‘नाही नाही. मला धावायचंय, पळायचंय. सायकल चालवायचीय.’’

‘‘मग साठ इंजेक्शने घ्यावी लागतील न रडता. मुंगी चावल्यागत वाटेल.’’

माझे वय साडेपाच वर्षांचे होते. आधी वर्षभर माझ्या पायात मांडीपासून टाचेपर्यंत बूट होता. आईने वाचायला शिकविले होते नि मला न हसणारे, न चिडवणारे दोस्त आणून दिले होते- पुस्तकं! तेव्हापासून मला साथ देणारे माझे जिवाभावाचे सोबती.

‘‘मी घेईन. न रडता घेईन.’’

अशी साठ इंजेक्शने या बारक्या, काटकुळ्या पोरीने शूरपणे घेतली, न रडता आणि ती दोन पायांवर उभी राहिली. आईचा हात धरून सातव्या वर्षी एकदम दुसरीच्या वर्गात बसली नि ‘हुश्शार’ म्हणून गोडांबेबाईंची लाडुकली झाली. ती मी. विजया नरसिंह दातीर. माझे बाबा वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी गेले. मी केवळ अकरा वर्षांची होते. बाबा पुण्याचे सिटी मॅजिस्ट्रेट होते. डॉ. अमीन कलेक्टर होते. ते म्हणाले, ‘‘मिसेस दातीर, तुम्हाला पाच मुलं. गृहिणी आहात. दातीरांना पेन्शन बसणार नाही. मी दोन्ही मुलांना नोकरी लावून देतो. घर स्वाभिमानाने चालेल.’’

असे दादा, नाना, बाबांचं तेरावं करून नोकरीवर रुजू झाले. दादाला जेलर म्हणून येरवडय़ाला क्वार्टर्स मिळाल्या. दोन्ही बहिणींनी लग्ने केली सहा महिन्यांत. नाना राहुरीस होता. घर फक्त तिघांचं. मी, दादा, आई. माझ्यात नि भावंडांत फार अंतर होते. आठ, नऊ, तेरा वर्षांचे; पण दादा माझा बाप झाला नि माझे जीवन त्याच्यामुळे फार सुकर झाले.

‘‘कोणी विचारले, बाबा काय करतात तर रडायचे नाही. सांगायचे, जेलर आहेत.’’ इतुके प्रेम-इतुकी माया. माझे बीएस्सीपर्यंतचे शिक्षण, लग्न, बाळंतपण सारे सारे दादा, नाना यांनी केले. आक्काही जबाबदारी उचले.

पण तेव्हा ना, अतिमध्यम परिस्थितीचे काही वाटायचे नाही. आई मला कॉलेजात जाताना स्कर्ट घालू देई, पण घरी आल्यावर साडीच! केमिस्ट्री प्रॅक्टिकल्सला कपडय़ांना भोके पडतात म्हणून स्कर्ट हो! के.जे. सोमैय्यांतून मी बीएस्सी होता होता टेबल टेनिस, बुद्धीबळ या स्पर्धात आंतरकॉलेज स्पर्धात नि बुद्धीबळमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. मला ‘बेस्ट गर्ल स्टुडंट’चा गौरव ज्युनिअर बीएस्सीला मिळाला; पण या नादात माझा फर्स्ट क्लास गेला. ‘‘आता लग्न करा.’’ आईने आदेश दिला. मी रेल्वे क्लबवर  ‘टे टे’ खेळायला जायची. तिथला माझा मित्र दोन दिवस मला घरी सोडायला आला. तेव्हा आईने त्याला दम भरला, ‘‘मी रोज गणपतीला जाते. मला कोणी घरी पोचवायला येत नाही. कळलं का? विजूला सोडायला यायचं नाही. ती फक्त लग्न ज्याच्याशी करेल.. त्याच्याबरोबरच येईल- जाईल.’’ तो इतका घाबरला. मला दुसऱ्या दिवशी म्हणाला, ‘‘बाप रे! तुझा भाऊ जेलर नि आई जगदंबा.’’ पण मला त्याच्याबद्दल काही मृदू वाटत होते. आमचे पासपोर्ट साइज फोटो आम्ही एकमेकांस दिले होते, पण बस्! त्या कोवळिकीचे अ‍ॅबॉर्शन हो! रेल्वे क्लब बंद.. बंद!

लग्न ठरले. कॅप्टन विजयकुमार वाडांना मी म्हटलं.. ‘‘असं प्रेम जडलं होतं.’’

‘‘आता नाही ना?’’

‘‘छे हो!’’

‘‘अगं, काफ लव्ह ते. तो फोटो टाकून दे. माझा ठेव.’’

संपलं. ओझंच उतरलं.

मला एका गोष्टीचे फार दु:ख होई, की माझा नवरा मला बॉर्डरवर नेत नाही. ‘‘मला पीस पोस्टिंग नाही. फिल्ड पोस्टिंगला कसे नेणार?’’ या उत्तराने माझे कधीही समाधान झाले नाही; पण मग दोघी मुलींनी जन्म घेतला चौदा महिन्यांच्या अंतराने आणि मी आयुष्यातला सर्वोच्च आनंद उपभोगला. मुली बापासारख्या नाकेल्या नि सुरेख निपजल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  ‘मुलगा हवा’ असे ना सासू-सासऱ्यांनी म्हटले ना पतीने. मला पंचविशीत करियर करायची होती, शिकायचे होते, लिहायचे होते. निशूच्या (निशिगंधा वाड) जन्मासोबत माझी पहिली कादंबरी ‘मेनका प्रकाशन’ने प्रकाशित केली होती. ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ नि रविवार पुरवण्या यांत माझे लेख जसे येऊ लागले तसे ‘विजया वाड’ या नावाला लोक ओळखू लागले.

अनेक वर्तमानपत्रांच्या संपादकांनी मला सातत्याने लिहायला दिले. लेखन प्रसिद्ध केले. एका वर्तमानपत्रात तर सलग साडेपाच वर्षे मी लिहीत होते. ‘आकाशवाणी’वर मी तेरा तेरा भागांच्या पंधरा बालमालिका लिहिल्या, तर ‘दूरदर्शन’वर आबा देशपांडे यांच्याकडे शालेय चित्रवाणी सतत अकरा वर्षे नि ‘ज्ञानदीप’चे कार्यक्रम खूप केले. एक दिवस अशोक (‘डिंपल प्रकाशन’चा) माझ्याकडे दिलीप वामन काळे यांना घेऊन आला नि सुरू झाला दर चार-पाच महिन्यांनी एका पुस्तकाचा सिलसिला. दिलीपने माझी ३१ पुस्तके दहा-बारा वर्षांत काढली. १२४ पुस्तकांची आई आहे. अजूनही लिहितेच आहे..

क्रमशः…

लेखिका – डॉ. विजया वाड 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाळ वांगं – लेखिका – सुश्री कस्तुरी ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? मनमंजुषेतून ?

☆ डाळ वांगं – लेखिका – सुश्री कस्तुरी ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

“उद्या डाळ वांगं खाणार का? “–हा प्रश्न किमान ५ व्यांदा आईने विचारला. मी नेहमीप्रमाणे चिडून बोलण्यापेक्षा फक्त हो म्हणणं पसंत केलं.

परवा भेंडी खाणार का हा प्रश्न सकाळी ३ एक वेळा तरी तिने विचारला त्यावर मी वसकन बोलल्यावर अर्थात वातावरण तापलं.

‘नाही रहात आमच्या लक्षात, त्यात काय एवढं ? म्हणायचं तू– खायची आहे म्हणून ‘ इतकं साधं तिचं argument होतं.

त्याच्यावरून धडा घेऊन आज प्रत्येक वेळी मी ‘ हो हो हो ‘असंच उत्तर दिलं. मग माझ्या लक्षात आलं तिला माझ्याकडून फक्त response हवा आहे. तिची बोलण्याची भूक आहे. तिला संवाद कायम सुरू रहावा असं वाटतं  पण दुर्दैवाने ते होत नाही. असं नाही की संवाद नसतो. पण बऱ्याचदा एक तर मी बाहेर असते आणि घरात आल्यावर मोबाईलमध्ये अथवा माझ्या विचारात किंवा लिखाण, डान्स, or साधना. ती तुटके दुवे सांधण्याचा प्रयत्न चालू ठेवते.

भेंडी खाणार का, डाळ करू का? भात खाणार का?भाकरी टाकू का? आज काय करणार आहे? आज कोर्टात काय आहे? डान्स क्लासला जाणार का? हे आणि असे तेच तेच  प्रश्न १०० वेळा जरी आले तरी त्याला न चुकता हो म्हणायला शिकलं पाहिजे हे मला कळून चुकलंय.

संपूर्ण आयुष्य बोलण्यात गेलेल्या मागच्या पिढीला मोबाईलमध्ये रुतून बसलेली नव्या पिढीची शांतता नाही सोसवत. ते त्रागा करत राहतात. त्यांना चीड येते. त्यांना संवाद हवा असतो.  तो unfortunately तुमच्या माझ्याकडून जास्त घडत नाही. मुद्दामून आपण करत नाही तरीही दरी पडतेच. यावर विचार झाला पाहिजे.

तुमच्या आईने, वडिलांनी एकच प्रश्न १० वेळा विचारला तरी प्लीज त्यांच्यावर वसकन बोलू नका. नाहीतर नंतर या आठवणींची  आठवण कायम आपल्याला रक्तबंबाळ करत राहील. आणि तिथे अश्रू पुसायला कोणीही येणार नाही !

ले.  कस्तुरी 

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्मृतीगंध…लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ स्मृतीगंध… लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

मला आठवतंय,…

खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो ! 

सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा !– भरपूर उपभोगलं त्यामुळे. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची…

आता तसं नाही……. लहानपणीच खूप मोठी होतात मुलं ! — खूप महाग झालंय बालपण !

पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती. —-फुल टाईम ‘आईच’ असायची तेव्हा ती !

आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची.

आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय —-जॉबला जाते ती हल्ली. फक्त संडेलाच अव्हेलेबल असते ! 

मामाचे गाव तर राहिलंच नाही ….मामाने सर्वाना मामाच बनवलं ….प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….आधी मामा भाच्यांची वाट पहायचे ….आता सर्वाना कोणी नकोसे झालेत …..हा परिस्थितीचा दोष आहे …

मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा ! हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी ! 

आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते —–” डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”— मैत्री बरीच महाग झालीय आता. 

हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते ! सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती. 

घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ ! इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे !

ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं—– फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची. वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची. 

आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय – ऑनलाईन शिक्षणही परवडत नाही आज !

एवढंच काय, तेव्हाचे आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले. शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो. सकाळी फोडणीचाभात किंवा पोळी आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड ! रात्री गरम खिचडी, की झाला संसार— ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची. 

आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं ! 

Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय– मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत— सगळं जगणंच महाग झालेलं ! 

कालपरवापर्यंत मरण तरी स्वस्त होतं. पण आता तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय.

——म्हणून म्हणतोय आहोत तोवर आठवत रहायचं. नाहीतर आठवणीत ठेवायलाही कोणी नसणार, ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल……म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा ….आणि हो — फक्त आपली जीभ हीच माणसे जोडू शकते हे ही लक्षात ठेवा …….. 

नाहीतरी ह्या स्मृतीगंधाशिवाय आहे काय आपल्याजवळ !

नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”गरज” – डॉ. कुलदीप शिवराम यादव ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? मनमंजुषेतून ?

☆ ”गरज” – डॉ. कुलदीप शिवराम यादव ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

एका मैत्रिणीच्या आईचे परवा 95 व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. 65 वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी 100 माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान…पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रांत मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली !

आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच !!

कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, 100 माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही…असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले, आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली !!!

या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा व ताण मुलांना सोसावा लागला. या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली. ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सांगतांना ‘ती’ मैत्रीण खरेच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाली होती.

यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे…

१) गरजा कमी हीच आनंदाची हमी.

२) घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.

३) आपल्यासाठी वस्तू, वस्तूंसाठी आपण नाही…नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात व वस्तू राखण्यात जाते.

४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.

५) जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.

६) विकत घ्यायच्या आधी ‘का ?’ चा शोध लावावा.

७) साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.

८) दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.

९) आजचा संचय उद्याची अडगळ.

१०) दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.

११) जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते, माणसे शांत व समाधानी असतात, मानसिक विकार व नैराश्य येत नाही.

१२) सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच.

हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.

१३) किमान गरजा ही जीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.

१४) शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘समाधान’ नावाच्या गावातूनच असतो.

ले. ~ डॉ. कुलदीप शिवराम यादव.

प्रस्तुती : मीनाक्षी सरदेसाई 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जाहिरात : “हरवला आहे” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ जाहिरात : “हरवला आहे” – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

मी पेपर उघडला !!

त्यात मीच दिलेली

जाहिरात होती —-

 

हरवला आहे .. “आनंद”

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …

 

रंग …  दिसेल तो

उंची …भासेल ती

कपडे सुखाचे

बटण दुःखाचे  !!

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून शोधून !!

 

“आनंदा” परत ये

कुणीही तुझ्यावर रागावणार नाही

तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय, वाढून ठेवलंय आशेचं  ताट

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम

मग म्हटलं आपणच करावं हे काम !!

 

आणि काय आश्चर्य .. सापडला की गुलाम ….

 

एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड….

एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड ….

आठवणींच्या मोरपिसात ….

अगरबत्तीच्या मंद वासात ….

मोगऱ्याच्या मखमली स्पर्शात ….

अवेळी येणाऱ्या पावसात ….

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा– जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा ..

मी म्हटलं अरे इथेच होतास उगाच दिली मी जाहिरात..

 

तो म्हणाला वेडी असता तुम्ही माणसं ..

मला बाहेर शोधता …पण मी तर असतो तुमच्याच मनात … !

 

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ संग्रहालयाच्या बुरुजावरून ☆ श्री रमेश जावीर ☆

??

☆ संग्रहालयाच्या बुरुजावरून ☘️ श्री रमेश जावीर 

सन १९९३ ते १९९७ पर्यंत मी रयत शिक्षण संस्थेच्या ठक्कर बाप्पा विद्यालय, गांधी टेकडी, मारूल हवेली, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे सहाय्यक शिक्षक म्हणून होतो. तेव्हा माझा होलिया काव्यसंग्रह व  वाजप कथासंग्रह प्रकाशित झाला होता .आणि मला काष्ट शिल्प निर्मितीचा छंद जडला होता. मी भाग शाळा, दिवशी मध्ये कार्यरत होतो. भाग शाळा दिवशीमध्ये मला पाठवण्याचे कारण कवी संमेलन, तसेच सामाजिक चळवळीत मी वरचेवर जात असे आणि माझ्या तिथल्या उपस्थितीबाबत वर्तमानपत्रातून बातम्या येत असत. ते आमच्या तत्कालीन मुख्याध्यापकांना आवडत नव्हते. भाग शाळा दिवशी ही ढेबेवाडीच्या खोऱ्यात होती. नागमोडी घाट, सागाची उंचच्या उंच झाडे, ग्रामीण भागात जनावरे राखणारी माणसे, विहरणारे पक्षी, दऱ्याखोऱ्यातून वाड्याबस्यातून शिक्षणासाठी आलेली मुले, हे वातावरण पाहून अध्यापन करायला मजा येत असे. माझा मुख्य विषय इंग्रजी असला तरी मला चित्रकला, शिल्पकला, अक्षरलेखन, भाषण, कथाकथन,काव्यवाचन, इत्यादी कला अवगत असल्यामुळे मी विद्यार्थ्यांमध्ये प्रिय होतो. विद्यार्थ्यांशी हितगुज साधत मी अध्यापन करीत असे. त्यामुळे शनिवारी रविवारी,आणि  सुट्टीच्या दिवशीसुद्धा विद्यार्थी माझ्यासोबत घुटमळत असत. दिवशीच्या हायस्कूलजवळ रस्त्यालगत एक सागाचे वठलेले खोड होते. मी चार-पाच विद्यार्थ्यांना सोबत घेतले आणि ते खोड हलवून उताराला ढकलून दिले. नको असलेल्या मुळ्या विद्यार्थ्यांकडून मागून घेतलेल्या कुऱ्हाडीच्या साह्याने तोडल्या .आणि थोडे संस्कारीत केले. आणि काय आश्चर्य…  त्यामध्ये उतरलेला गरुड….. बैठक म्हणजे दोन पंख बैठकीला, चार मुळ्या मान, डोके, चोच….. गरुडाचा हुबेहूब आकार मिळाला. या काष्ट- शिल्प निर्मितीसाठी दोन महिने राबत होतो.  त्याचे वजन अंदाजे 25 किलो असून काष्ट-शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना निर्माण झाला आहे.  या काष्ट- शिल्पाचे प्रदर्शन वाघोली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, देवापुर, तालुका मान, जिल्हा सातारा ,अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर ,मरवडे, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, आटपाडी, जिल्हा सांगली, इत्यादी ठिकाणी झाले आहे. याचे सविस्तर वर्णन मी माझ्या ‘क्षमताधिष्ठित सप्तरंगी कला ‘ या ललित लेख संग्रहामध्ये केले आहे. या ललित लेख संग्रहाला ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक पुरस्कार‘ प्राप्त झाला आहे. ३४ वर्षे सेवा कालावधीमध्ये मला माझा द्वेष करणाऱ्या व्यक्ती भेटल्या, तशाच तितक्याच सन्मानाने वागणूक देणाऱ्यासुद्धा भेटल्या. अशा आंबट गोड आशयाचे प्रसंग सांगण्यासारखे भरपूर आहेत.

 

© श्री रमेश जावीर 

खरसुंडी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ श्रावणसरी ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

??

☆ श्रावणसरी ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

वालचंदनगर म्हटलं की बालपणीच्या आठवणी जागवतात. बालपणीचा पाऊस तर मनाला चिंब भिजवतो…. आपलं बालपण जपत..!आखिव -रेखीव असं हे निमशहरी गाव. माझं बालपण ,शालेय शिक्षण इथेच झालं. आमची शाळा घरापासून बरीच लांब. पावसाळ्यात छत्री असे पण ,कधी मुद्दाम विसरलेली ,पावसात चिंब भिजण्यासाठी.! पावसाळ्यात बऱ्याच वेळा शाळेला सुट्टीच असायची. नीरा नदीला पूरही येत असे. तो पहायला जाण्यात एक वेगळच थ्रिल असायचं. पाण्याच्या उंचच उंच लाटा, नदीवरचा मोठा पूल पाण्याखाली बुडालेला, हे सगळं पाहताना सारंच तेव्हा आश्चर्यजनक वाटायचं. पावसानं थोडी विश्रांती घेतली की सुट्टीच्या दिवशी शेजारपाजारचे सगळे मिळून नदीकाठच्या देवीला दर्शनासाठी जायचं. तेव्हा एकच बैलगाडी करायची त्यात जेवणाचे डबे अन चिल्लीपिल्ली कंपनी असायची . देवीचे दर्शन घेऊन जेवणाची पंगत बसायची .घारग्या, मटकीची उसळ ,तिखट मिठाच्या पुऱ्या,  शेंगदाण्याची चटणी , तांदळाची खिचडी आणि दही या मस्त बेताची छान अंगत पंगत व्हायची. जेवणानंतर नदीकिनारी एक फेरफटका व्हायचा नंतर मुलांची पतंगांची काटाकाटी नदीकाठी चालायची. पुरुष मंडळी ही त्यात सहभागी व्हायची. नाहीतर पत्त्यांचा डाव रंगायचा .बायका आणि मुली देवीची,पंचमीची गाणी म्हणायच्या. आम्ही मुली आणि मुलं पावसाची गाणी, कविता म्हणायचो. खूप मजा यायची .त्यातच एखादी श्रावण सर आली की इंद्रधनुष्य फार सुरेख दिसायचं. मग श्रावणसर अंगावर घेतच घाईघाईनेच घराकडे प्रयाण. खरंच श्रावणातलं पर्जन्यरूप किती सुंदर आणि वेगळच ..! जाई जुईचे झेले हातात घेऊन सुवास घ्यावा असे.. ऊन पावसाचा लपंडाव खेळणारा हा श्रावण..

त्यावेळी अगदी घरोघरी श्री सत्यनारायण ,जिवतीची पूजा असे. मंगळागौर तर नव्या नवरीला उत्सवच वाटायचा . सकाळी सकाळी फुलं ,पत्री, दुर्वा ,आघाडा,गोळा करायला जायचं .कुणाच्या दारातल्या फुलांवर डल्ला मारायचा.  कुणी मनानेच हौसेने फुलं द्यायचेही .त्याचा आनंद आजच्या फुलपुडीत कुठला?

श्रावण म्हटलं की आठवतो दारातल्या निंबाच्या झाडाला दादांनी बांधलेला दोरांचा झोका ..मैत्रिणींबरोबर घेतलेले उंचच उंच झोके ,मंगळागौरीचे खेळ, नागपंचमीची फेर धरून म्हटलेली गाणी,माईच्या हातची पुरणाची दिंड, नारळी पौर्णिमा- राखी पौर्णिमा, भावांना बांधलेली राखी ,गोकुळाष्टमीचे किर्तन. ..!

लग्नानंतर दौंडला आम्ही बंगल्यासमोर छान बाग जोपासली. आता सगळ्याच आठवणीत रंगताना दारातली बागच नजरेसमोर उभी राहिलीय…. कंपाऊंडच्या भिंतीलगत अबोली ,कर्दळीचे विविध प्रकारचे ताटवे ,प्राजक्ताचा सडा, टपोऱ्या विविधरंगी गुलाबांची झाडं, जाई- जुईचे फुलांनी डवरलेला वेल, वाऱ्यावर डोलणारा कृष्णकमळाचा वेल अन् फुलं, वृंदावनातील तुळशीच्या पानाफुलांचा सुगंधी दरवळ, दारातील झाडाला टांगलेल्या झोपाळ्यावर मैत्रिणींबरोबर झुलणारी माझी फुलराणी झालेली फुलवेडी लेक..!

– आता किती काळ गेला आयुष्य॔ बदललं .आताही श्रावण येतो, ऊन पावसाचा खेळ खेळतो .आणि मनांतला श्रावण मनांत पिंगा घालतो. मग…. आठवांच्या सरीवर सरी डोळ्यांतल्या श्रावणसरींबरोबर अलगद बरसू लागतात. …!

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आजची परिस्थिती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ आजची परिस्थिती… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

निवडणुकीपर्यंत रोज  तेच ते … 

रोजची भाषणं , रोजची आश्वासनं 

तोच अत्याचार, नेहमीचा भ्रष्टाचार 

माझा तो बाबू, दुसऱ्याचा तो बाब्या 

मी आहे साधा, दुसरा तो सोद्या —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

नेहमीचे रस्ते, मोठाले खड्डे 

तुफान पाऊस, तुंबलेले पाणी 

संपावर कामगार, कचऱ्यांचे आगार 

आजारांना आमंत्रण, औषधांची वणवण —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

स्वतःची कमाई, दुसऱ्याची भरपाई 

खरे गुन्हेगार, खोटे साक्षीदार 

मोठी आशा, छोटी मदत 

नोकरीची कमी, बेकारीची हमी —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

माझे ते कायदेशीर, तुझे ते बेकायदा 

माझे ते खरे, तुझ्या त्या थापा 

मी प्रामाणिक, दुसरा मात्र चीटर 

माझी समाजसेवा, तुझे ते राजकारण—- 

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते … 

मंदिर मस्जिद वाद, धर्म सगळ्या आड 

पाण्याची कमतरता, योजनांचा भडीमार 

सरकारी मदत, हातात नाही पडत 

महागाईचा भस्मासूर, संप मोर्चांचा आसूड —–

 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते…..

आमचे ते आमदार, फुटले ते गद्दार

करोडोची कमाई, ईडीची कारवाई 

सरकारी घोटाळे, मतदारांचे वाटोळे 

बातम्यांची वटवट, जनतेला कटकट 

निवडणुकीपर्यंत रोज तेच ते …..

 

निवडणुकीनंतरही रोज तेच ते …..

तेच ते —–

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

१०-०७-२०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंध राखीचे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ बंध राखीचे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रक्षाबंधन निमित्ताने विवेकची…माझ्या भावाची आठवण येते. सण साजरा होतो.

भावाला प्रेमाने नारळीभात, मिठाई खायला घालतो.त्याला ओवाळतो. भाऊही भेटवस्तू देऊन

बहिणीला खूश करतो.राखी पौर्णिमा साजरी होते !

पण मला आठवतो तो दिवस, जेव्हा विवेकने माझे खरोखरच रक्षण केले होते! त्याच्या विश्वासावर मी भरलेला ओढा पार करून गेले होते!

जवळपास ४०/४५ वर्षांपूर्वीची गोष्ट! मी तेव्हा हाॅस्टेलवर शिकायला होते.आणि माझा भाऊ नुकताच इंजिनिअर होऊन एस् टी मध्ये नोकरीला लागला होता.मी तेव्हा सांगलीत रहात होते आणि तो कोल्हापूरला होता.आई-वडील तेव्हा मराठवाड्यात नांदेड जवळील एका लहान गावात नोकरी निमित्ताने रहात होते.वडिलांची प्रमोशनवर बदली रत्नागिरीहून नांदेडला झाली आणि युनिव्हर्सिटी बदल नको म्हणून मी सांगलीलाच होते.दिवाळीच्या सुट्टीत घरी जायला मिळत असे.

त्या वर्षी नेहमी प्रमाणे मला सुट्टीसाठी नांदेडला पोचवायला विवेक येणार होता. तेव्हा एस् टी च्या गाड्याही फारशा नव्हत्या. संध्याकाळी कोल्हापूर -नांदेड अशी सात वाजता बस असे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी

९-३०/१० पर्यंत नांदेडला जाई. अर्थात वाटेत काही प्राॅब्लेम नाही आला तर! त्यावर्षीचा तो प्रसंग मी कधीच विसरत नाही. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यासाठी मी आणि माझा भाऊ सांगलीहून एस् टीत बसलो तेव्हा पाऊस होताच. कदाचित मिरजेच्या पुढे ओढ्याला पाणी असण्याची शक्यता होती. त्या मोठ्या ओढ्याचं नाव होतं हातीदचा ओढा! विवेक एसटीत असल्याने त्याला हे सर्व माहीत होते, पण नंतर वेळ नसल्यामुळे ‘आपण निघूया तरी’ असे त्याने ठरवले. मिरजेच्या स्टॅण्डवर त्याने ब्रेड, बिस्किटे,फरसाण असा काही खाऊ बरोबर घेतला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. शिरढोणच्या दरम्यान ओढा भरभरून वाहत होता. रात्रीचे नऊ वाजले होते. बाहेर धुवाधार पाऊस! रात्रभर आम्ही ओढ्याच्या एका तीरावर एस् टी मध्ये बसून होतो. पावसामुळे बाहेरचे वातावरण आणखीनच भयाण वाटत होते. कधी एकदा सकाळ होईल असं वाटत होतं!

एकदाची सकाळ झाली. गाडीतून खाली उतरून बाहेर पाहिले तर दोन्ही तीरावर भरपूर गाड्या अडकून पडल्या होत्या. कंडक्टरने सांगून टाकले की पाणी थोडं कमी झाले आहे, आपापल्या जबाबदारीवर पलीकडे जा आणि तिकडच्या एस टी.त  बसा! एक एक करत लोक ओढा पार करत होते. सामान डोक्यावर घेऊन चालले होते. माझे तर काही धाडसच होत नव्हते! भाऊ म्हणाला, ‘आपण जर असेच बसलो तर पलीकडे जाऊ नाही शकणार!’ आणि ओढा क्रॉस करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शेवटी तो स्वतः एकदा ओढा पार करून  पाणी कितपत आहे ते पाहून आला. विवेक चांगला पोहणारा होता आणि मला तर अजिबात पोहता येत नव्हते. पाण्याची भीती वाटत होती, पण त्याने मला धीर दिला. मला म्हणाला, ‘ मी हात घट्ट पकडतो, पण तू चल .’ आणि खरंच, त्याने एका हातात सामान आणि दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट धरून ओढ्यापलीकडे मला न्यायला सुरुवात केली. ओढ्यामध्ये काटेरी झुडपे, लव्हाळी यात पाय आणि साडी अडकत होते.. माझी उंची कमी असल्याने अधूनमधून पाण्यात पूर्णडोके खाली जाई, आणि गुदमरल्यासारखं होई. पण मला धीर देत आणि माझं मनगट घट्ट धरून विवेक मला नेत होता. कसेबसे आम्ही ओढ्यापलीकडे गेलो. नंतर बॅगमधील सुके कपडे आडोशाला बदलून दुसऱ्या गाडीत बसलो. आणि पुढचा प्रवास पार पडला! आयुष्याच्या प्रवासात असा एखादा आठवणींचा प्रवास माणसाला अंतर्मुख करतो. भावाचं नातं आणखीनच दृढ करतो… इतकी वर्षे झाली तरी मला तो दिवस तेवढाच आठवतो!

आणि भावाने बहिणीचे संरक्षण करायचं असतं ते कृतीने दाखवणारा माझा भाऊ डोळ्यासमोर उभा राहतो.. आता विवेक पंचाहत्तरीकडे वाटचाल करत आहे. पण अजूनही आमचे भाऊ बहिणीचे नाते तितकेच घट्ट आहे! ….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लेडीज फर्स्ट — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? जीवनरंग ?

☆ लेडीज फर्स्ट — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

(बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती. ) इथून पुढे —–

जवळजवळ पाच ते सहा भाषणं झाल्यावर रोहितचा नंबर आला. त्याने मात्र स्वतःच भाषण तयार केलं होतं , कारण शोभनाला तेच अपेक्षित होतं.

“व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांत प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा ! मी असे का म्हणतोय ते तुम्हाला माझे बोलणे ऐकून झाल्यावर समजेलच.

बाबा मला अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात. मी आपणासमोर काही प्रसंग सांगणार आहे. 

पहिली गोष्ट बाबांनी शिकवली ती म्हणजे, स्त्रीचा सन्मान. पण सन्मान म्हणजे नुसती पूजा नव्हे तर सक्षम बनवणं, संधी उपलब्ध करून देणे. बाबांनी जे शिकवले, तसंच ते स्वतः ही वागले.  

माझी आई जेव्हा लग्न होऊन घरी आली त्यावेळेस ती फक्त बारावी झालेली होती. घरात अगदी पुराणमतवादी वातावरण होते, पण बाबांनी सगळ्यांशी विरोध पत्करून आईला शिकवायचे ठरवले. तिला कॉलेजला अॅडमिशन घेऊन दिली आणि तिला स्वतःची स्कुटर दिली व ते स्वतः बसने जात. ते आईला म्हणत ‘ तुला घरातली सर्व कामं करून कॉलेजला जावे लागते खूप दमछाक होते तुझी. ‘ आणि  अश्याप्रकारे, आपल्या शाळेला लाभलेल्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका साकारल्या.

एवढंच नाही तर तीन वर्षांपूवी बाबांना बँकेमार्फत फोर व्हिलर गाडी मिळाली, त्यावेळेस देखील बाबा आईला म्हटले ‘ तू गाडी वापरत जा, मी जाईन स्कुटरने. हे बघ तू शिक्षिका आहेस, शिक्षकांनी शाळेत कसं भरपूर ऊर्जेने जायला हवं, कारण तुम्ही शिक्षक लोक पिढ्या घडवायचं काम करता, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असणार तेवढं मुलांना चांगलं शिकायला मिळेल.’  

दुसरी गोष्ट सांगतो, त्यांनी नेहमी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला शिकवले. घरी येणारा कोणीही कष्टकरी असो, त्याला प्रेमाने वागवायचे असे ते सांगत. कधीही छोट्या छोट्या व्यावसायिकाबरोबर पैशाची घासाघीस करू देत नसत. 

अगदी रस्त्यावरून जातांना एखादा ढकलगाडीवाला जरी जात असेल, तर ते त्याला आधी जाऊ देतात . ते म्हणतात,

 ‘ आपल्याला गाडीवर जायचं असतं, पण त्याला एवढं वजन स्वतः ढकलत न्यायचं असतं.’

त्यांनी शिकवलेली अजून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे तो एक प्रसंग होता. माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी आईला, पहाटे लवकर उठवायला सांगून झोपलो होतो, पण तिने उठवले नाही आणि मग मला उशिराने जाग आल्यावर जोरात भोंगा पसरवला. घरात मोठाच गोंधळ निर्माण झाला. मी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, तेव्हा बाबा आले आणि मला बाजूला नेऊन म्हणाले, ‘ मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग ठरव, रडायचं की काय करायचं. हे बघ बाळा दुसरी मुलं अभ्यास करायला लागतो म्हणून रडतात.  पण आमचा मुलगा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून रडतो , किती भाग्यवान आहोत आम्ही. आणि दुसरं एक सांगतो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःख आणि सुख या सर्व गोष्टींना आपण स्वतःच जबाबदार असलं पाहिजे. असं असेल तरच आपल्याला त्यातून मार्ग काढायला सुचतं. दुसऱ्याला जबाबदार धरलं तर कधीही तो प्रश्न सुटत नाही. आता तूच ठरव, जे झालं त्याला कोण जबाबदार?’

बाबाचं म्हणणं ऐकून मला एकदम काहीतरी सुचलं, रडणं बिडणं कुठेच पळून गेलं. दुसऱ्या दिवसापासून मी घड्याळामध्ये अपेक्षित वेळेचा गजर लावून झोपू लागलो आणि तेव्हापासून अगदी वेळेवर, कुणीही न उठवता देखील उठतो.

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. 

तर अशाप्रकारे बाबांनी मला बरीच अमूल्य अशी मूल्ये शिकवली. आईने शरीराचं संगोपन केलं तर बाबांनी संवेदनशील मन जोपासलं. 

आई ही हिऱ्याची खाण असेल तर बाबा त्यातला हिऱ्यांना पैलू पडणारे जवाहीर आहेत. 

आणि म्हणून माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. आई तर प्रिय आहेच, परंतु आईपेक्षाही बाबा माझ्यासाठी माझे हिरो आहेत. माझे बाबा इज द ग्रेट..!

सर्वाना नमस्कार, जय हिंद !”

रोहितचं भाषण संपल्यावर सगळे उभे राहिले आणि बराच वेळ टाळ्या सुरू होत्या. 

बक्षीस अर्थात रोहितलाच मिळाले. बक्षीस वाटपाच्या वेळेस त्याच्या आई आणि बाबांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस वाटप होते. शोभनाला आज आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा खूप अभिमान वाटला.

विजयला तर जणू  जगण्याची नवी उमेद मिळाली, आणि रोहित– रोहितच्या आनंदाचे खरे कारण तर फक्त त्यालाच माहीत होते. 

बक्षीस वाटपाच्या वेळी विजय सर्वात मागे उभा होता तेव्हा कुलगुरू म्हटले, “विजयराव पुढे या .”

तेव्हा विजय नम्रपणे म्हणाला , “नाही सर,  लेडीज फर्स्ट.. !”

—  समाप्त —

लेखक : अज्ञात. 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares