मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नकोशी…☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

नकोशी ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

गार वारं अंगावरनं गेलं तसं तिने पांघरूण अधिकच लपेटून घेतलं. वरतून वारं तर खाली दगडी फरशी गार गार. देवळाच्या ओट्यावर निजण्याचा आज सातवा दिवस. डोक्याखाली उशी म्हणून घेतलेलं गाठोडं तिनं तेवढ्यातही चाचपून घेतलं. तिच्याकडे होतं तरी काय? एक राखाडी रंगाची साडी अंगावर तर दुसरी फिकट बदामी रंगाची गाठोड्यात, तीही विरलेली. एक पेला पितळी व अल्युमिनियमची ताटली व हातात नेहेमी असलेली छोटीशी जपमाळ. ऐवज म्हणावा तर असा. गार वाऱ्यानं एक काम केलं. तिचा डोळा लागला पुन्हा तो पहाटे भजन म्हणत जाणारा जथा जवळून गेला तोपर्यंत.

पहाट झाल्याचे जाणवल्यावर ती लगबगीने उठली. तशी कुंभनगरीत रात्रंदिवस लगबग ही कुठे ना कुठे चालूच. माणसांचा अव्याहत राबता. सर्वांची पाऊले संगमाकडे जात असलेली सतत. तिनेही गाठोडं बगलेत धरत संगमाची वाट धरली. पहाटे बाहेर जरी गारवा असलातरी नदीत पाणी तसं कोमटच असतं हे लहानपणापासून ठाऊक असलेलं. गावी असलेली नदी तशी छोटीच होती पण ती नदी असो वा हा संगम पाण्याचा गुणधर्म सारखाच. त्यामुळे पहाटेचं स्नान गेल्या सात दिवसात तिने चुकवलं नव्हतं. एरवी दिवसभरात ही तिने कितीवेळा डुबकी मारली हे तिनं मोजणंच सोडून दिलेलं. साताजन्माचं पाप एका मेळ्यातच नाहिसं करायचं का? या विचाराने तिचं तिलाच हसू आलं.

आंघोळ आटपून तिनं कपाळावर पांढरं गोपीचंदन रेखाटून घेतलं. भाळीचं कुंकू सात वर्षांपूर्वीच पुसलं गेलं होतं. मग गावातल्या रीतिरिवाजानुसार गोपीचंदन जवळ केलं. खेडोपाडी असलेल्या कर्मठ प्रथा पाळल्याविना गत्यंतर नव्हतं. गावाहून आल्याला आठवडा उलटला पण सवयीनुसार कपाळावर गोपीचंदन उमटलंच.

पूर्वेला तांबडा सूर्य वर येत असताना तिनं आपसूक हात जोडून नमस्कार केला. हाताचा टेका घेत ती हलकेच उठली. आंघोळीमुळे टवटवी आलेली पण आताशाने तिच्या हालचाली मंदावत चाललेल्या. चालताना गुडघे एकमेकांवर आपटत असलेले. पाठीला जरी वाक आला नव्हता तरी संधी मिळाली की टेकून बसत असे. थोडं चालणं झालं की थांबणं आलंच. तशी कुंभनगरी डावी उजवी, पुढे मागे अवाढव्य पसरलेली. तंबू रहाट्यांची माळच माळ. त्यात अखंड धुनी लावून बसलेले साधू बैरागी. पहाटेपासूनच रहाट्यांवर लावलेले कर्णे वाजू लागायचे. कुठे अखंड नामसंकीर्तन, तर कुठे भागवत कथा, कुठे शिवमहापुराण तर कुठे उपनिषदांवर चर्चा. हे सर्व पाहण्या ऐकण्यात वेळ कसा निघून जातो ते कळत नसे. तिला केवळ नामसंकीर्तनात गोडी वाटायची. बाकीचे उपदेश डोक्यावरून जायचे.

आपल्या संथ चालीने ती कुंभनगरी न्याहाळत होती. दालबाटी, मालपुवा, मिठायांचे जेवण अखाड्यांमधून मिळून रहायचं. शिवाय यात्रेसाठी आलेले भाविक दानपुण्य कमावण्यासाठी काही ना काही पदरात टाकत असे. ती ते आनंदाने घेई. फळफळावळ, क्वचित सुकामेवा ही मिळायचा. मात्र तिने कधीही हात पसरला नव्हता वा कुणाकडे काही मागितलं नव्हतं. पैशाला तर हातच लावायचा नाही हे तिने ठरवूनच घेतलं होतं. देणारे देत होते तर ही ठामपणे नकार द्यायची. काहीजण आदराने माई म्हणून पायाही पडायचे व पैशे घेण्याचा आग्रह ही करायचे. पैसे गोळा केले असते तर सात दिवसात मालामाल झाली असती, पण नकोच ती माया! तिचं मन सांगत असे!! 

‘चलो तुम्हें थानेदारने थानेपे बुलाया है!’ खाकी वर्दीतील हवालदारने हाळी दिली तशी ती चपापली. अगदी चारच दिवसांपूर्वीच तर चौकीत जाणं झालं होतं. थानेदारने तेव्हा तू कोण, कुठली, नाव, गाव सगळं विचारलं होतं. सुरूवातीस आस्थेवाईकपणाने नंतर जरबेने, पण ती बधली नव्हती. तोंडून चकार शब्द ही काढला नव्हती. तरणाबांड थानेदार तसा सालस वाटत होता, पण त्याचे डोळ्यातून आरपार पाहणं अस्वस्थ करणारंच, पण तिनेही दाद दिली नव्हती. आज पुन्हा चौकीत पाऊल टाकलं तशी ती दचकलीच. समोर लच्छीराम, पोटचा गोळा. तिला ब्रह्मांडच आठवलं. गेला महिनाभर तो व त्याची बायको, “चल आई तुला कुंभमेळ्यात स्नानाला नेतो!” म्हणून आग्रह करत कुंभनगरीत आणलं होतं! तेव्हा किती बरं वाटलं होतं. गेली सात वर्षे हे गेल्यापासून जणू वनवासच नशिबी आला होता.. स्वतःच्या राहत्या घरात परक्यांसारखं जिणं. जीव तर तसा आयुष्यभर सर्वांनाच लावला होता. अगदी नातवंडांवर ही जीवापलिकडची माया केली होती. तीही आता मोठी झालेली. सगळ्यांना सांभाळत संसाराचा गाडा हाकला होता. तीच माणसं असं मेळ्यात आणून सोडून निघून जातील असं स्वप्नीही वाटलं नव्हतं. पहिलं स्नान घडलं तसं मुलगा सून गायब. दोन दिवस वाटलं येतील शोधत, घेऊन जातील, पण लक्षात यायला तसा वेळ लागलाच नाही. गावातही जाऊन सांगितलं असेल सर्वांना ‘मैया कुंभमें खो गयी!!’ दिवसभर रडणं झालं होतं. अश्रू नकळत सुकले गेले, डोळे कोरडेठाक. जणू कुंभ रिता होऊन राहिलेला. घरच्यां बरोबरचं नातं संपलेलं. तसं ते कधीचंच संपलं होतं. वेड्या आशेनं चिकटून होतो. आतातर ती आशा संगमात विरघळून गेलेली. आता स्वतःचं असं काहीच उरलेलं नव्हतं. सोडावं लागतं काहीतरी मेळ्यात आल्यावर! रोज समोर नागा साधू, तसेच बैरागी, नावाच्या शेवटी, आनंद, पुरी, गिरी लावून घेणारे संन्यासी हे सर्वसंगपरित्याग करून मोक्षाच्या मार्गाला लागलेले हे ती पहात आलेली.

समोर ठाणेदार, लच्छीरामची खरडपट्टी काढत असलेला. तिला आठवलं, चारच दिवसापूर्वी कुठल्यातरी यंत्रावर अंगठा दाबून घेतला होता थानेदारने व आधारकार्डावर लच्छीरामचा फोन नंबर. थानेदारने तिला खुर्चीत बसवत तिची कुंडलीच उघड केली. “नाम: गेहनाबाई, गांव: ठकराहा, जिला: चंपारण बिहार. देखो माई, कुंभमें आके मांबाप को छोडकर जाना, ये हमारे लिए नया नहीं है। हम आपके उपर सीसीटीव्ही कॅमरेसे नजर रखे हुए थे। अब आपका बेटा आपके सामने है। जाईये उसके साथ। उसे समझाया है।”

तिनं शांतपणे ऐकून घेतलं. हातातील जपमाळ कपाळी लावली. मग निग्रहाने म्हटलं, “हा जरी माझा मुलगा असला तरी मी त्याच्याबरोबर जाणार नाही. त्याने आपली बायको व अपत्यांबरोबर सुखेनैव संसार करावा. कुंभमेळ्यात आल्यावर तर माझे भागच खुल गये. हे विश्वची माझे घर. नकोच मला ती तकलादू माया!!” 

ठाणेदार व खजील झालेला लच्छीराम अवाक् होऊन गेहनाबाईकडे पाहत होते. दूर कुठल्यातरी राहुटीतून शंखनाद होत होता.

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपल्या पायावर उभी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आपल्या पायावर उभी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(कल्याणीने चांगले मार्क्स मिळवले आणि डीएड ला प्रवेश मिळवला. तिने कुठेही, अनुकंपा असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग न करता प्रवेश मिळवला.) – इथून पुढे-

तिच्या कोणत्याही मैत्रिणींना माहीत नव्हतं कल्याणीचा डावा पाय पूर्ण कृत्रिम आहे. सतत साडी नेसून येत असलेल्या कल्याणीला मुली म्हणत. “ कल्याणी, कधीतरी ड्रेस घाल की आमच्या सारखा. किती छान फिगर आहे तुझी ग. ”.. कल्याणी हसून सोडून देई. कशी घालणार होती ती ड्रेस?

कल्याणी आता दुसऱ्या वर्षात गेली. शाळेच्या वेळा आता बदलल्या.

अचानक शाळा सकाळी साडेसात ते अडीच अशी झाली. कल्याणी धावपळ करत रोज कशीतरी वेळेवर पोचायचा प्रयत्न करी पण तरीही दोन जिने चढून वर यायला तिला रोज उशीर व्हायला लागला. कल्याणी सततच अर्धा तास उशिरा येते हे बघून तिला प्रिन्सिपल बाईंच्या ऑफिस मधून बोलावणे आले. खाली मान घालून कल्याणी उभी राहिली. ”काय ग कल्याणी, रोज कसा उशीर होतो तुला? शिक्षक होणार ना तुम्ही मुली? तुम्हालाच जर शिस्त नसेल तर बाकीची मुलं काय शिकणार तुमच्याकडून? इतकी हुशार मुलगी आहेस तू, रोज असा उशीर मला चालणार नाही. मग बाकीच्या मुलीही असाच उशीर करायला लागतील. ” 

…. बाई ताड ताड बोलत होत्या. कल्याणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ”आता आणखी रडून दाखवू नकोस. बस झालं. शिस्त म्हणजे शिस्त. ” कल्याणी उभीच होती.

तेवढ्यात आपला तास संपवून सानेबाई ऑफिस मध्ये डोकावल्या. कल्याणी आणि हेडबाईंचं संभाषण त्यांच्या कानावर पडलं.

“ बाई, काय झालं? का रागावताय एवढ्या?”

“ अहो बघा ना. रोज रोज ही मुलगी उशिरा येतेय. असं कसं चालेल? वर काही बोलत पण नाहीये. उभी आहे नुसती मगापासून. ” बाई आणखीच चिडल्या. ,

साने बाई कल्याणीजवळ गेल्या… “ बाळा, इकडे ये बेटा. जरा साडी वर करून दाखव आपल्या बाईना. ”

“ नको नको बाई. मी उद्यापासून नक्की लवकर येईन बाई. ”

साने बाईनी तिचे डोळे पुसले. शांतपणे हळूच तिची साडी गुडघ्या पर्यंत वर केली. प्रिंसिपल बाईना दिसला तो बेल्टने बांधलेला कल्याणीचा कृत्रिम पाय. त्या हादरून गेल्या आणि कल्याणीला मिठीत घेऊन स्वतःच रडायला लागल्या.

“अग कल्याणी, मला आधीच नाही का ग सांगायचं? किती बोलणी खाल्लीस माझी बाई? मला माफ कर ग बाळा. माझी फार मोठी चूक झाली. मला आणि कोणालाच हे माहीत नाही. आणि मी वचन देते तुला, हे माहीत होणारही नाही. मला शरम वाटतेय माझीच. कशी सहन करत आलीस इतके वर्ष? आणि हे अवघड जिने दिवसातून चार वेळा कसे ग चढतेस उतरतेस बाळ? असं नको करू. माझं खूप चुकलं. साने बाई, तुम्ही तरी कल्पना द्यायची ना मला. काय ग जिद्दीची तू कल्याणी. ”

बाई गहिवरल्या. “ कल्याणी, जा आता हो तू. माफ कर मला. ” 

सानेबाई म्हणाल्या, ”हिची आई जिथे काम करते ती माझी मैत्रीण आहे. फार सोसलं हो या कुटुंबानं. या पोरीच्या सहनशक्तीला तर तोड नाही हो बाई. ” साने बाईंच्या डोळ्यात अश्रू आले.

डीएड चे रिझल्ट लागले. फार उत्तम गुणांनी कल्याणी पहिल्या दोन नंबरात येऊन उच्च श्रेणीत पास झाली.

सगळ्यात जास्त आनंद प्रिंसिपल बाईना झाला. त्यांनी तिला घरी बोलावलं. कल्याणी बाईंच्या घरी आपल्या आईला घेऊन गेली. बाईनी दोघींचं छान स्वागत केलं., तिच्या आईचंही फार कौतुक वाटलं त्यांना.

“ कल्याणी, मी खूप रागावले ते मनात ठेवू नकोस हं”. बाई मनापासून म्हणाल्या.

”नाही हो बाई, तुमच्याच घालून दिलेल्या आदर्शाच्या वाटेवर आम्ही भावी शिक्षिका चालणार आहोत. मी कशी रागावू माझ्या लाडक्या बाईंवर?”

बाईंनी कल्याणीला सोन्याची चेन दिली. “ ही सतत घाल म्हणजे माझी आठवण राहील तुला. ” 

आणि तिच्या मनगटावर उत्तम घड्याळ बांधले. “ हेही वेळ दाखवील तुला बघ. ” दोघींचे डोळे भरून आले. नमस्कार करून त्या मायलेकी घरी गेल्या.

कल्याणीला पुण्यातल्या अत्यंत नावाजलेल्या शाळेत लगेचच नोकरी मिळाली.

दरम्यान खूप खूप वर्षे गेली. बाई रिटायर झाल्या. त्यांची दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झाली होती.

बाई एकट्या पडल्या. प्रकृती त्यांना साथ देईना. वृद्धपणाचे आजार त्यांना आणखी विकल करू लागले.

नाईलाजाने मुलांनी बाईना एका अत्यंत उत्तम वृद्धाश्रमात दाखल केले. अतिशय समजूतदारपणाने हेही वास्तव बाईनी स्वीकारले. बाईनी आता वयाची पंच्याऐशी गाठली. अजूनही त्यांची तब्बेत बरी होती आणि बुद्धी खणखणीत.

त्या दिवशी बाईना शिपाई बोलवायला आला. ” बाई, तुम्हाला भेटायला कोणीतरी पाहुणे आलेत पाठवू का त्यांना?” बाई म्हणाल्या “ पाठव ना. ”

कोण आलं असेल? मुलगे तर नुकतेच भेटून गेलेत दोन महिन्यापूर्वी.

दारावर टकटक झाली. ” या ना. आत या “

दारात एक बाई त्यांच्याबरोबर दोन पुरुष होते.

“बाई, ओळखलं का मला?” बाईनी किलकिले डोळे करून बघितलं.

”कल्याणी ना तू? 81 ची बॅच?”

कल्याणी बाईंच्याजवळ बसली. “हो बाई. मीच ती. किती वर्षे गेली मध्ये हो. एक दिवस असा गेला नाही की तुमची आठवण मला आली नाही. हा माझा मुलगा…अमित. डॉक्टर होतोय आता. आणि हे माझे मिस्टर सुरेंद्र. बाई, मीही आता पुण्यातल्या शाळेची प्रिंसिपल झाले. मी पास झाले तेव्हाचे हे घड्याळ. तुम्हीच दिलेलं. मी हेच वापरते अजूनही… माझ्यासारख्या एक पाय नसलेल्या मुलीला स्वीकारणारा आणि माझा कायम आदर करणारा हा माझा नवरा. बाई, स्वप्नात नव्हतं वाटलं की माझं लग्न होईल, मला मूल होईल.

या देव माणसाने प्रेम केलं माझ्यावर. आणि या माझ्या पायासकट मला स्वीकारलं. ”

ते दोघे बाईंच्या जवळ बसले. बाईनी प्रेमाने दोघांचे हात हातात घेतले.

“फार गुणी बायको मिळाली तुम्हाला आणि अमित, अशी आई मिळायला भाग्य लागतं बरं. संभाळ हो नीट तिला. ”

बाई दमून गेल्या. कल्याणीने बाईना पाणी दिलं. हातात त्यांची आवडती अंजीर बर्फी ठेवली. बाई हसल्या.

“अजूनही माझी आवड लक्षात आहे हो तुझ्या? अग आता नको वाटतं सगळं ग. एक तुकडा दे आणि बाकी घरी ने ग बाळा. ” कल्याणीच्या डोळ्यात पाणी आलं….. आपले उंची सँडल्स टकटक वाजवत शाळेत येणाऱ्या, कानात हिऱ्याच्या कुड्या घालणाऱ्या, उंची साड्या नेसणाऱ्या आणि कायम शाळेसाठी झटणाऱ्या करारी बाई तिला आठवल्या.

एवढीशी शरीराची जुडी करून बेड वर कोपऱ्यात बसलेल्या बाई बघून तिला रडू आवरेना.

“ बाई, माझं खूप चुकलं. मी आधी यायला हवं होतं हो. पण माझे व्याप, शाळा संसार यातून सवड मिळेना. मला साने बाईंकडून समजलं, तुम्ही इथे असता… बाई, येता का माझ्या घरी रहायला? कायमच्या? मी नीट संभाळीन तुम्हाला. खात्री आहे ना माझी?”

बाईनी तिला जवळ घेतलं. “नको ग बाळा. इथे चांगलं आहे सगळं ग. छान घेतात काळजी इथले लोक. नको आता माझी हलवाहलव ग. थोडे दिवस उरले. येत जा अशीच भेटायला. ” 

.. कल्याणी आणि सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला आणि ते जड पावलांनी तिथून गेले.

त्यानंतर काहीच दिवसात बाई गेल्याची बातमी कल्याणीने वाचली.

एक आदर्श आयुष्य अनंतात विलीन झालं.

समाप्त

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपल्या पायावर उभी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ आपल्या पायावर उभी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

कल्याणी घाईघाईने क्लासला निघाली होती. तिचे हे खूप महत्त्वाचं वर्ष. गरीब परिस्थिति असताना देखील जिद्दीने छान मार्क्स मिळवून डॉक्टर व्हायची जिद्द होती तिची. कल्याणी दिसायला तर सुरेख होतीच पण गरीब परिस्थितीत असतानाही आईला सगळी मदत करून मगच ती शाळेत जात असे.

आज तिची मैत्रीण कल्पना आणि ती दोघीही निघाल्या होत्या शाळेत. अकरावी बारावी नुकतेच त्यांच्या शाळेत सुरू झाले होते. आणि यांना छान मार्क्स असल्याने शाळेने फ्रीशिप दिली म्हणून त्यांनी शाळेतच प्रवेश घेतला.

कल्पना आणि कल्याणीची घरची परिस्थिती तर वाईटच होती. कल्पनाच्या वडिलांची वडापावची गाडी होती. कसेतरी भागत असायचं त्यांचं. कल्याणीचे वडील एका ऑफिसमध्ये शिपाई होते तर आई घरकाम करायला जायची. मुलगी शिकायचं म्हणते, हुशार आहे म्हणून तिची शाळा चालू राहिली.

कल्याणीला शिकण्याची फार हौस होती. आपण शिकावं आई जिथे काम करते, त्या बाईंसारखी नोकरी करावी असं वाटायचं तिला.

त्या दिवशी कल्पना आणि कल्याणी घाईघाईने चालल्या होत्या.. , अचानक समोरून टेम्पो आला. त्याचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालकाचा कंट्रोलच गेला. या दोघी मुली रस्ता क्रॉस करत असताना अचानकच दोघीना टेम्पोची जोरात धडक बसली. कल्पना फेकली गेली आणि कल्याणी टेम्पोखाली आली. आरडा ओरडा झाला. मुली चिरडल्या, मुली चिरडल्या. कल्याणी बेशुद्ध होती. तिचे पाय टेम्पोखाली अडकलेले होते. लोकांनी तिला बाहेर काढले. रक्तबंबाळ अवस्थेत लोकांनी तिला ससून हॉस्पिटलला नेले. कल्पना फेकली गेली म्हणून ती बचावली. हाताचे हाड फ्रॅक्चर झाले पण ती घरचा पत्ता सांगू शकली. तिने लोकांना कल्याणीचं घर दाखवलं.

घडलेली हकीगत समजताच तिच्या आईवडिलांनी ससूनला धाव घेतली. कल्याणीच्या एका पायावरून टेम्पोचे चाक गेले होते. , डॉक्टर म्हणाले, दोन दिवस बघूया. पण सुधारणा नसली तर मात्र मांडी पासून पाय कापावा लागेल. नाहीतर गॅंगरीन होईल. बिचारे आईवडील घाबरून गेले. दोन दिवसानंतर कल्याणाचा पाय काळानिळा पडला, तिला अत्यंत वेदना होऊ लागल्या. त्या पायाचा रक्तप्रवाह थांबला होता आणि गॅंगरीनची सुरवात झाली होती. नाईलाजाने आईवडिलांच्या सह्या घेऊन कल्याणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

कल्याणी चा डावा पाय गुढघ्याच्यावर मांडीपर्यंत कापावा लागला. आईवडिलांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. एक तर गरीबी, आणि आता ही अशी मुलगी.. तिचे भविष्य त्यांना भेडसावू लागले.

कल्याणी शुद्धीवर आली. बँडेज असल्याने तिला हे काहीच समजलं नाही. गुंगीत होती कल्याणी तीन दिवस.

आई तिच्याजवळ बसून होती.

” बाळा, आता बरं वाटतंय ना ? “ मायेने डोक्यावरून हात फिरवून आई म्हणाली.

चौथ्या दिवशी तिला अंथरुणातून उठवल्यावर कल्याणीला समजलं, मांडीखाली काहीच नाहीये. तिने किंकाळी फोडली. ”आई ग, आई, हे काय? माझा पाय? मला समजत कसं नाहीये काहीच?” आईने डॉक्टरांना बोलावून आणलं. अतिशय कनवाळू सहृदय तरुण डॉक्टर होते ते.

शांतपणे ते तिच्याजवळ बसले आणि म्हणाले, ”बाळा, तू वाचलीस ही देवाची कृपा. तुझा पाय आम्हाला कापावा लागला. पार सडला होता तो. तुला मग गॅंगरीन झाला असता. अजिबात रडू नकोस. सगळं आयुष्य उभं आहे तुझ्यासमोर. काय रडायचं ते आत्ता रडून घे. पण नंतर हे अश्रू पुसूनच तुला उभं रहायचं आहे खंबीरपणे. ” तिला थोपटून धीर देऊन डॉक्टर निघून गेले.

कल्याणी हमसून हमसून रडायला लागली. ” मला नाही जगायचं. मी जीव देणार आता. ”.. म्हणत ती उठून उभी रहायला लागली आणि धाडकन पडलीच कॉटवर. आपला आधाराचा पाय आपण गमावला आहे हे चरचरीत सत्य लक्षात आलं तिच्या. पंधरा दिवसांनी तिला डिस्चार्ज मिळाला. पायाची जखम अजून ओली होती.

कल्याणीला क्रचेस घेऊन चालायची सवय करावी लागली. सगळा भार एकाच धड पायावर येऊन तो अतोनात दुखायचा. काखेत क्रचेस घेऊन खांद्याला रग लागायची.

कोवळं वय कल्याणीचं. आई वडिलांना अत्यंत दुःख होई की हे काय नशिबी आलं आपल्याच मुलीच्या.

कल्याणीची आई जिथे काम करायची त्या बाई पुण्याच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल हॉस्पिटल मध्ये नर्स होत्या. कल्याणीला त्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या. हॉस्पिटलचा, अशा युद्धात झालेल्या अपघातात, अवयव गमावलेल्या सैनिकांसाठी वेगळा सुसज्ज विभाग आहे. सगळा स्टाफ या सुंदर तरुण मुलीला बघून हळहळला.

तिथल्या सिनिअर डॉक्टर म्हणाल्या, “काळजी नको करू. आपण तुला नवीन पाय देऊ. तुला इथे रहावे लागेल निदान सहा महिने. किंवा एक वर्षदेखील. ” 

कल्याणी म्हणाली ” मी राहीन मॅडम. मला पुढे शिकायचे आहे आणि या एकाच पायावर उभे रहायचे आहे. ”

ते दिवस खरोखरच परीक्षेचे होते तिच्या. त्या वेड्या वाकड्या तुटलेल्या पायावर पुन्हा तीनवेळा शस्त्रक्रिया केल्या. मग तिला आधी हलक्या ठोकळ्यावर चालायला शिकवलं. मग चार महिन्याने मापे घेऊन तिला अतिशय हलका पायलॉनचा मांडी पासून खाली कृत्रिम पाय दिला गेला. लहान मूल चाचपडत चालतं तशी कल्याणी पहिले काही दिवस अंदाज येई पर्यंत पडत, अडखळत चालली. पण नंतर सवय झाल्यावर तिला आणखी चांगला हलका मांडीपासून पावलापर्यंत नवीन पाय दिला.

… ज्या दिवशी कल्याणी त्याची सवय करून घेऊन सफाईने चालू लागली तो दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा होता तिच्यासाठी. तिला अत्यंत कष्ट झाले हे करण्यात. तिचा काहीही दोष नसताना. ,

रोज मरणयातना सोसून फिजिओथेरपी घेणे, त्या उरलेल्या थोट्या जखमेतून रक्त येई. पुन्हा पुन्हा नवीन जखमा होत. कल्याणीने एका जिद्दीने ते सहन केले. या जवळजवळ सात आठ महिन्यात ती घरीही गेली नाही. उरलेल्या मांडीच्या भागावर बेल्टने पायलॉन बांधून कृत्रिम पावलात बूट घालायला ती शिकली. त्या पायाची रोजची साफसफाई तिला तिथल्या डॉक्टर्सनी आपुलकीने शिकवली. आता मात्र तिला हा कृत्रिम पाय आहे हे कोणाच्या लक्षात सुद्धा न येण्याइतकी कल्याणी सफाईने पाय वापरायला शिकली.

हॉस्पिटलच्या सर्जन आणि कृत्रिम विभागाच्या डॉक्टर्सना म्हणाली, ” तुमचे उपकार कसे फेडू मी?

माझ्या गरीब आईवडिलांना कोणताही खर्च झेपला नसता हो. तुम्ही माझी स्पेशल केस म्हणून सगळी फी माफ केलीत. सर, मी इथेच रहाते. मला इथेच नोकरी द्या. मला त्या कृत्रिम जगात जायचेच नाही. , इथे मला खरे जगायला शिकवलं तुम्ही सगळ्यांनी. इथे उपचार घेणाऱ्या माझ्या सैनिक भाऊ मामा काका यांनी. ”

डॉक्टर म्हणाले, ” तू आता छान बरी झालीस. आता घरी जा. नवीन पायाची काळजी घ्यायला तुला आम्ही शिकवलं आहे. दर सहा महिन्यांनी तुला इथे तपासणीसाठी यावं लागेल. आता नवीन आयुष्य सुरू कर बाळा. मनासारखं शिक्षण घे. ”

कल्याणी घरी परतली. जग एक वर्षात खूप पुढे गेलं होतं. तिच्यासाठी थांबायला कोणाला वेळ होता?

कल्पना येऊन तिला भेटून गेली. आपली मैत्रीण पुन्हा आपल्या पायावर उभी राहिलेली बघून कल्पनाला अतिशय आनंद झाला. कल्याणीने आपली स्वप्नं बाजूला ठेवली. तिने बारावीची परीक्षा दिली आणि डीएड व्हायचं ठरवलं. तिला ते झेपणारं आणि लगेच नोकरी देणारं क्षेत्र होतं…

कल्याणीने चांगले मार्क्स मिळवले आणि डीएड ला प्रवेश मिळवला. तिने कुठेही, अनुकंपा असलेल्या राखीव कोट्याचा उपयोग न करता प्रवेश मिळवला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिटर्न गिफ्ट… – अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? जीवनरंग ?

☆ रिटर्न गिफ्ट… – अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माझ्या नातवाने मला आज निरूत्तर केले. दररोज रात्री तो कितीही उशीरा घरी आला तरी माझ्या जवळ १०-१५ मिनिटे शांतपणे बसल्याशिवाय तो जेवत नाही. माझा मुलगा आणि सुनबाई ह्या बाबतीत माझ्याकडे सतत तक्रार करताना म्हणतात की मी त्याला लाडावून ठेवलं आहे. आता तर त्याचं लग्न देखील झालं आहे. घरी आल्यावर लवकर जेवून त्याने त्याच्या बायकोसमवेत वेळ घालवला पाहिजे. पण तसं होत नाही. आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंती देखील केली. पण त्याचं उत्तर ऐकून मला गहिवरून आलं. मी निरूत्तर झालो. त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाळून धरलं. माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडून मी मनसोक्तपणे रडलो. पण माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून मी सुखावलो देखील.

माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मला म्हणाला, ” आबा, रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तुम्ही म्हणालात ते आजचं आणि शेवटचंच. ह्या बाबतीत मी काय करायचे ते माझे मलाच ठरवू दे प्लीज. तुम्ही आईबाबांचं नका ऐकू. तुमचं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नसून त्यात बऱ्याच आठवणी दाटीवाटीने बसलेल्या आहेत.

माझी आठवण जिथं पर्यंत मागे जाते तेंव्हापासून तुम्ही माझ्या सोबत आहात. अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळ्या स्वतंत्र खोलीत झोपावे. मला तेव्हा एकटं झोपायला खूप भिती वाटायची. पण मी डोळे मिटेस्तोवर तू मला कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचास. तुझा तो रेशमी स्पर्श झाला की किती बरं वाटायचं. त्यानंतर शाळेला जाताना बसस्टॉपवर तू मला सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला यायचास. घरी आल्यावर शाळेतील मजा माझ्या तोंडून ऐकताना तू रंगून जायचास. मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तू तोच राहिलास. मोठ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग तू येतच राहिलास घरचा प्रतिनिधी म्हणून.

पुढे काॅलेज ऍडमिशन साठी फाॅर्म च्या लाईनीत उभा राहिलास. काॅलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यासोबत फोटो काढून घेतलास. माझी फायनल एक्झॅम असताना माझ्यासाठी रात्र रात्र जागून सोबत केलीस. डोळ्यांवरची पेंग जाण्यासाठी मला काॅफी बनवून द्यायचास. दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी मी परदेशी जायचं ठरवलं. मी तुझ्यापासून लांब रहाणार ही कल्पना सहन न झाल्याने एक दिवस तू स्वतःला खोलीत कोंडून घेतलंस. मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत हसत निरोप दिलास पण हट्टाने मला विमानतळावर सोडायला आलास. तिथे तू मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार.

आबा लहानपणी जेव्हा भिती वाटायची तेव्हा तू सोबत केलीस, माझ्या शैक्षणिक कालखंडातील प्रत्येक टप्प्यावर तू हिमालयासारखा माझ्या मागे उभा राहिलास. जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तू खंबीरपणे उभा राहिलास. परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी आल्यावर हक्काने मला घेऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केलीस. आठवायचं म्हटलं तर कितीतरी गोष्टी आठवतील. तू खरंच सावली सारखी सोबत केलीस माझी. मी कमी वेळात आज जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतोय ह्याच्या मागे तुझाच आधार आणि आशिर्वाद होता रे. म्हणूनच नोकरी सुरू झाली त्या दिवशीच मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला. रोज घरी आल्यावर न चुकता तुझी विचारपूस करण्यासाठी तुला भेटायचेच. उशीर झाला तरी हरकत नाही. तुला झोप लागली असली तरी सुद्धा तुझ्या बेडजवळ थोडा वेळ बसून जायचं. माझी आणि केतकीची पहिली भेट झाली तेव्हा मी तुझ्या बद्दल सगळं सांगितलं तिला. मग तिनेच हट्ट केला म्हणून एक दिवस तुला बाहेर हाॅटेलात घेऊन गेलो तिच्यासाठी. आज आमचं लग्न झालं असलं तरीसुद्धा मी तुला आल्यावर भेटायला पाहिजे असा तिचा देखील आग्रह असतो.

आबा आजवर तु माझ्यासाठी जे जे केलंस त्याबदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुला रोज भेटतो. तुझी विचारपूस करतो. तुझ्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचा थकवा आणि टेन्शन क्षणांत दूर होतं. म्हणूनच मी शेवटपर्यंत भेटतच रहाणार. तू आई बाबांचं ऐकून मला तुला भेटण्यापासून परावृत्त करू नकोस प्लीज.

आबा तु माझा श्वास आहेस. तुझ्या शिवाय जगणं ही कल्पनाच मी करु शकत नाही. तुझ्या आजारपणात तू खूप थकला आहेस. उलट आता तर मी आणखी थोडा वेळ तुझ्या सोबत घालवयचा विचार करतो आहे. म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे तुला की माझ्या रिटर्न गिफ्टचा तू आनंदाने स्विकार करावास आणि मला एका ऋणातून मुक्त होण्यासाठी मदत करावीस “.

खरंच गेल्या जन्मीची पुण्याई म्हणून की काय असा नातू माझा जीव की प्राण बनला आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण त्याने दिलेली रिटर्न गिफ्ट स्विकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.

” राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे ” त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरुन मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्याने माझ्या कपाळावर त्याचे ओठ अलगद ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोलीबाहेर पडला.

लेखक : अज्ञात (अर्थात आपल्यातलाच कोणीतरी एक) 

लेखिका : सुश्री प्राची गडकरी

मो.  ९९८७५६८७५०

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – २” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“भारतीय सेनेतील योद्धा धन्वंतरी… – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(”हम सभी सहीसलामत वापस आयेंगे… और यहीपर फिर एक फोटो लेंगे!” पण या वाक्यातील सत्यता सर्वजण जाणून होते… लढाई होती ती.. खेळ नव्हे!  दुर्दैवाने यांमधील काही जण परतले नाहीत… त्यात शेरशहा होते !) – इथून पुढे — 

या संपूर्ण मोहिमेत डॉक्टर आढाव सैन्यासोबत अगदी काही मीटर्स अंतरावर वर होते. पंधरा सोळा हजारांपेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या युद्धभूमीवर जखमी झालेल्या जवानांना तेथून खाली रुग्णालयात आणणे केवळ अशक्यच होते. हेलिकॉप्टरचा उपयोग नव्हता… एकच उपाय होता तो म्हणजे जखमीला पाठीवर किंवा स्ट्रेचरवर घालून खाली घेऊन येणे… आणि त्यावेळी गोळीबार तर सुरूच असणार होता. अशा भयावह परिस्थितीमध्ये डॉक्टर जर काही मीटर्सवर उपलब्ध असेल तर? आणि डॉक्टर राजेश आढाव साहेब नेमके तेथेच आणि लगेच उपलब्ध होते! महा भयावह थंडी, त्यात अंधार. उजेड दिसेल असे काही करण्याची अनुमती नव्हती. कारण रात्रीच्या अंधारात या दिसणा-या प्रकाशाच्या दिशेने गोळीबार होण्याची शक्यता अधिक होती. आणि तसे होतही होते. जीवघेण्या थंडीमुळे सलाईनच्या नळ्या, त्यातील द्रव गोठून जात होते. मग त्यासाठी एखाद्या खडकावर अंगातले कोट टाकून आडोसा करायचा… त्याखाली स्टोव पेटवून सलाईन गरम करून पातळ करायची… त्याच अंधारात सैनिकांच्या गोठून गेलेल्या शरीरांत रक्तवाहिन्या शोधायच्या आणि त्यांत सलाईन लावायचे… जखमा शिवायच्या…. सैनिकांना… ”मैं हूं ना!” म्हणत धीर द्यायचा… वरून गोळीबार सुरु आहे.. बॉम्ब फुटत आहेत…. आणि इथे डॉक्टर प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत… आणि त्यात यांना भरपूर यशही मिळते आहे…. एकदा तर असेच उपचार करीत असताना राजेश साहेबांच्या हाताला शत्रूने डागलेल्या बॉम्बगोळ्याने जखम झाली.. रक्त वाहू लागले… डॉक्टर साहेबांनी स्वत:च आपल्या हाताला बँडेज बांधले… आणि इतरांवर उपचार सुरूच ठेवले… एक अप्रतिम इतिहास घडत होता!

कॅप्टन विक्रम बात्रा हे तर जणू डॉक्टर राजेश यांचे जिवलग मित्रच बनले होते. काहीवेळा पूर्वीच एका जवानाने बात्रा साहेबांचा निरोप आणला होता… ते पुढे वरच्या बाजूला सुमारे पंचवीस मीटर्सवर दबा धरून बसलेले होते… काही वेळातच वर चढत जाऊन शत्रूवर हल्ला करायचा होता… बात्रा साहेबांचे डोके दुखू लागले होते.. तेथील हवामानात प्राणवायू कमी असल्याने असे होत असते. डॉक्टर साहेबांनी प्रत्येक सैनिकाकडे आणीबाणीच्या प्रसंगी वापरायची औषधे दिली होती… बात्रा साहेबांनी तेथूनच ओरडून विचारले… ”डॉक्टरसाहब.. कौन सी गोली चलेगी!” डॉक्टर साहेबांनी तेथूनच ओरडून सांगितले… ”विटामिन सी काम करेगी!” आणि बात्रा साहेबांना खरेच आराम पडला.

पहाटेचे चार वाजले असतील. कॅप्टन नवीन नागप्पा साहेब बात्रा साहेबांच्या समवेत लढत होते.. त्यांच्या दोन्ही पायांच्या बरोबर मध्ये एक बॉम्बगोळा पडून फुटला… त्यांचे दोन्ही पाय प्रचंड निकामी झाले…. त्यांना पाहून बात्रा साहेबांनी धाव घेतली त्या तसल्या गोळीबारात… जखमी झालेल्या नवीन नागप्पा साहेबांना त्यांनी उचलून खांद्यावर घेतले… म्हणाले… ”तुम शादीशुदा हो.. family वाले हो… तुम्हारा बचना जरुरी है! असे म्हणून त्यांनी नवीन यांना सुरक्षित जागी आणून ठेवले… आणि स्वत: लढायला पुढे गेले!

काही वेळाने एका जवानाने नवीन साहेबांना खांद्यावर लादून डॉक्टर साहेबांकडे आणले… नवीन साहेब मोठ-मोठ्याने हुंदके देत देत रडत होते… डॉक्टरसाहेबांना खूप आश्चर्य वाटले… जखमा तर मी व्यवस्थित बांधल्या आहेत… वेदनाशामक इंजेक्शनही दिले आहे.. मग तरीही हा अधिकारी एवढा तळमळतो का आहे? मग त्यांच्या लक्षात आलं… हे शरीराच्या वेदनांचे दु:ख नव्हते.. काळजाचे दु:ख होते…. ”डॉक्टर साहेब… आपला शेरशहा आपण गमावला…!” हे ऐकताच, नवीन त्यांना तुम्ही जाऊ नका… तेथे धोका आहे… गोळीबार सुरु आहे”. असे सांगत असतानाही डॉक्टरसाहेब त्या जागेपर्यंत पळत गेलेच…. त्यांनी बात्रा साहेबांना उचलण्यासाठी त्यांच्या पाठीखाली हात घातला… तिथे फक्त एक पोकळी होती.. रक्तमाखली! सिंह निघून गेला होता… पण त्याच्या चेह-यावर मोठे हास्य होते!

सैनिक म्हणाले… त्यांनी आमचा सिंह मारला… आता आम्हांलाही जगण्याचा अधिकार नाही… दुस-याच दिवशी बात्रा साहेबांच्या बलिदानाचा प्रतिशोध घेण्यासाठी आपल्या सैन्याने पुन्हा एकदा जोरदार प्रतिहल्ला चढवला.. तो ही दिवसा उजेडी… पाकड्यांना असा दिवसा हल्ला केला जाईल याची कल्पनाच नव्हती… ते मस्त स्वयंपाक करत होते, आराम फर्मावत होते… भारतीय सैनिक त्यांच्यावर चालून गेले…. तेथे होते तेवढ्या शत्रूला त्यांनी कंठस्नान घातले.. आणि ते शिखर ताब्यात घेतले…. कित्येक पाकिस्तानी मारले गेले… डॉक्टरसाहेब सैनिकांसोबत होतेच. त्यांच्य मनात तर डरपोक पाकिस्तानी सैन्याबद्दल प्रचंड राग होता… त्यांनी त्यांच्या हातात असलेली एके-४७ रायफल सज्ज करून तिच्यातून मृत पाक सैनिकांच्या देहांवर गोळ्या डागल्या… !

इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देशासाठी प्राण पणाला लावणा-या सैनिकांचे डॉक्टरसाहेबांना अतिशय कौतुक वाटे. यातला कुणीही मरणाला घाबरत नव्हता. एरव्ही डॉक्टर साहेबांना प्रेमाने आणि आग्रहाने खाऊ घालणारा जवान, बास्केट बॉलचा निष्णात कोच असे एरव्ही अन्य भूमिकांत असणारे अनेक जण आज अचानक लढवय्ये बनून शत्रूवर चाल करून निघाले होते.

रात्रीच्या अंधारात एका खडकावर आपला उजवा जखमी हात डाव्या हाताने धरून एक जवान बसला होता… डॉक्टर साहेब त्याच्यापर्यंत पोहोचले… त्याचा आपला एकच प्रश्न.. ”डॉक्टरसाब… मेरा हात फिरसे जुड जायेगा ना? नहीं तो मुझे वापस घर जानाही नहीं है!” डॉक्टर साहेबांनी पाहिले… केवळ कातडीच्या आधारे त्याचा तो हात लटकत होता… तरीही त्यांनी त्याला धीर दिला… ”क्यों नहीं… जरूर ठीक हो जायेगा.. और जुडेगा जरूर!

आणि त्यानंतर तो सैनिक काहीसा ग्लानीत गेला. डॉक्टरांनी मोठ्या कौशल्याने त्याच्या जखमा बांधल्या… रक्तस्राव बंद केला…. त्याला जरूर ती औषधे दिली… आज तो जवान एके ठिकाणी बास्केट बॉल प्रशिक्षक आहे. जेंव्हा केंव्हा त्याची भेट होते.. तेंव्हा तो म्हणतो… ”डॉक्टर साहब, आप सब से बुरे डॉक्टर हों! अगर उस दिन आप मुझसे झूठ नहीं बोलते तो मै उस दिन जिंदाही नहीं रहता!” अर्थात हे सर्व बोलणे त्याचा जीव वाचवल्याबद्दल केलेले कृतज्ञतेचे बोल होते.

एक असाच जखमी सैनिक आला.. पण स्वत:च्या पायाने चालत आला होता… म्हणाला… ”साब, सर में गोली लगी है!” डॉक्टर त्यावेळी आणखी दोन केसेस पहात होते…. ते म्हणाले… ”आप बैठो… आपका तीसरा नंबर… आपके नाम में राम है.. आपको कुछ नहीं होगा!” त्याला वाटलं ज्या अर्थी डॉक्टर मला तिस-या क्रमांकावर बसवताहेत.. याचा अर्थ माझ्या जखमा गंभीर नाहीत… मी उगाच घाबरून गेलो होतो ! खरंच तसंच झालं होतं…. त्याच्या डोक्याला एक गोळी चाटून गेली होती ! डॉक्टरसाहेबांनी त्याला धीर नसता दिला तर तो कदाचित घाबरल्याने आणखीन गंभीर झाला असता!

– क्रमशः भाग दुसरा

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उल्हास… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ उल्हास… ☆ श्री सुनील शिरवाडकर

दरवर्षी उल्हास ठरवायचा.. पुढच्या वर्षी नक्की दिंडी बोलवायची.. पण मग वर्ष असंच निघून जायचं.. गावात दिंड्या यायच्या.. मुक्काम करायच्या.. एक दिवस थांबून त्र्यंबकेश्वरकडे निघून जायच्या.. उल्हासचं स्वप्न तसंच राहून जायचं.

नासिकपासून पंचवीस तीस किलोमीटर उल्हासचं गाव होतं. उल्हासला नाशिकमध्ये स्थायिक होऊनही पंचवीस वर्षे झाली होती. पण लहानपणीच्या आठवणी मनात रुतुन बसलेल्या असतातच ना!त्याचे वडील वारकरी.. घरात एकादशीचं व्रत.. एकादशीला त्यांचे बाबा पहाटे लवकर उठायचे.. दिड तास त्यांची पुजा चालायची.. त्यांच्या देवघरात एक शाळीग्राम होता.. त्यावर अभिषेक पात्रातुन संततधार चालायची.. उल्हासच्या मनावर ते दृश्य.. ती पुरुषसूक्ताची आवर्तने कायमची कोरली गेली होती.. बाबांची वद्य एकादशीची निवृत्तीनाथांची वारी कधीच चुकली नाही.. ते संस्कार मनात रुजलेले.

पौष महिन्यात त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथांची यात्रा असते. गावागावातुन दिंड्या निघतात.. त्यांच्या गावातुनही दिंडी निघायची.. त्याचं पुढारीपण असायचं उल्हासच्या बाबांकडेच. गावातुन दिंडी निघाली की पहिला मुक्काम असायचा नाशिकमध्ये.

आता बाबा नाही.. पण दिंडी निघते.. नासिकला एक दिवस मुक्काम करते.. उल्हासला वाटायचं.. आपल्या गावची दिंडी नासिकमध्ये आली की ती एखाद्या वर्षी आपल्या सोसायटीत एक दिवस रहावी.. पण हे जमणार कसं?तशी दिंडी काही फार मोठी नसायची.. जेमतेम साठ सत्तर माणसं.. पण एवढी माणसं रहाणार कुठं.. कशी?

डिसेंबरमध्ये उल्हासने सोसायटीच्या चेअरमनशी हा विषय काढला. एक रात्र आपल्या सोसायटीत कार्यक्रम करायचा का?चेअरमनने मिटींग बोलावली.. उल्हासचं म्हणणं मांडलं.. कोणी हो म्हणाले.. कोणी विरोध दर्शवला.. पण हो.. ना करता करता ठरलं..

यावर्षी दिंडी बोलवायची.

उल्हास लगेच पुढच्या रविवारी गावी गेला. दिंडी आयोजित करणारी गावची जी मुख्य माणसं होती.. त्यांना रितसर आमंत्रण दिलं. किती माणसं असणार.. त्यात स्त्रिया किती.. पुरुष किती.. गाड्या किती असणार.. किती वाजता येणार.. परत किती वाजता निघणार.. ही सगळी माहिती जाणून घेतली.

नासिकला आल्यावर पुन्हा एकदा सोसायटीची मिटींग झाली.. कार्यक्रमाची आखणी झाली.. जबाबदार्यांचं वाटप झालं..

पण..

.. उल्हास निश्चिंत झाला नव्हता.. त्याने हा सगळा घाट घातला होता.. दिंडी पण त्याच्या गावची होती.. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित पार पडेपर्यंत त्याला चैन पडणार नव्हतं.. एक प्रकारचं दडपण त्याला जाणवत होतं.

उल्हासच्या घरी हे सगळं अजिबात पसंत नव्हतं.. कुणी सांगितलेय नसते उद्योग करायला असंच सुषमा वहीनींचं म्हणणं होतं. पण आता नवर्यानी ठरवलंच आहे तर मदत करणं भाग होतं.

सोसायटीच्या आवारात मांडव घालण्यात आला.. केटररशी बोलुन झालं.. मेनू ठरवला.. आणि तो दिवस उजाडला ‌

उल्हासनं गावी फोन लावला.. दिंडी निघाली होती.. संध्याकाळी पाच पर्यंत पोहोचणार होती.. उल्हास ची धावपळ सुरू झाली.. खरंतर आठ दिवसांपासूनच ही धावपळ चालू होती.. दिंडी अजुन यायची होती.. पण तो आत्ताच थकला होता.. नाही म्हटलं तरी त्याची पन्नाशी उलटली होती.

पाच पर्यंत पोहोचणारी दिंडी प्रत्यक्षात सहा वाजता आली.

दुरुनच ज्ञानोबा तुकाराम.. ज्ञानोबा तुकाराम असा आवाज यायला सुरुवात झाली… टाळांचे आवाज कानावर पडुन लागले.. आणि मग उल्हासचा थकवा गायब झाला.

ढगळ पॅन्ट.. आणि चेक्सचा लांब बाह्यांचा शर्ट हा उल्हासचा वेष.. मुलीनं त्याला सुचवलं होतं..

“बाबा तुम्ही मस्त नाडीचं धोतर आणा.. आणि वर लांब कुर्ता.. छानसा फेटापण बांधा.. दिंडीत असतीलच कुणीतरी फेटा बांधणारे. “

पण उल्हासनं ते उडवून लावलं.. त्याला स्वतःला असला शो ऑफ अजिबात पसंत नव्हता. त्याचा आपला नेहमीचाच ड्रेस.. आणि पायात साधी चप्पल.

गेटवर दिंडीचं स्वागत झालं. सत्तर ऐंशी जण होते.. त्यात वीस पंचवीस महिला. मांडवात जाड जाजम अंथरलं होतं.. त्यावर सगळेजण विसावले. स्टीलचा धर्मास, आणि कागदी कप घेऊन चायवाला फिरु लागला.. गेटपाशी माऊलींचा मानाचा घोडा बांधला होता.. त्याच्या पुढ्यात चारा टाकला.

एका लहान ट्रॅक्टरला गाडी जोडली होती.. त्यावर भगव्या पताका फडकत होत्या. ती गाडी सोडवुन आत आणली.. त्यात पालखी होती. पालखीत चांदीच्या पादुका होत्या.. सोसायटीतील लोक जाता येता पादुकांना हात लावून नमस्कार करत होते.. डोके टेकवत होते.

चहापाणी झालं.. किर्तनाची तयारी सुरु झाली.. उल्हासचा पाय एका जागी ठैरत नव्हता.

.. उल्हासभाऊ त्या पाण्याच्या बाटल्या कुठं ठेवल्या?

.. भाऊ तो स्पिकरवाला अजुन आला नाही 

.. भाऊ तो केटरर म्हणतोय.. पुर्या तळुन ठेवलेल्या चालतील का?

जबाबदार्या वाटल्या होत्या.. तरीसुद्धा उल्हासचं लक्ष सगळ्या गोष्टीत होतं..

सात वाजता किर्तन सुरू झालं.. गावातल्या वारकरी शिक्षण संस्थेतील पंधरा बाल वारकरी मागे ओळीत उभे राहिले.. पुंडलिक बुवा म्हणजे गावातले ज्येष्ठ किर्तनकार.. सुंदरसा पांढरा शुभ्र फेटा.. स्वच्छ सदरा उपरणं.. कपाळी विष्णु गंध.. त्यांनी हातात वीणा घेतला.. सुरांवर लावला.. पखवाजावर थाप पडली..

‘जय जय राम कृष्ण हरी’.. मागे उभ्या असलेल्या बाल वारकऱ्यांनी टाळ्यांची साथ दिली..

“नामसंकीर्तन साधन पै सोपे.. जळतील पापे जन्मांतरीची.. “

बुवा निरुपण करता करता रंगुन गेले.. सोसायटीची पंढरी झाली.. अवघं वातावरण विठ्ठलमय झालं..

उल्हासला किर्तन एंजॉय करायचं होतं.. पण असं एका जागी बसून कसं चालेल?पुढची जेवणाची तयारी करायची होती.. साडेआठला कीर्तन झालं.. मग टाळ मृदुंगाच्या तालावर सगळ्यांनी फेर धरला.. काही बायका फुगड्या खेळु लागल्या.. कुणी दोन्ही कान पकडून उड्या मारु लागले..

तोवर पत्रावळी मांडल्या गेल्या.. उल्हास ने तरुण मुलांवर ही जबाबदारी सोपवली होती.. पहीली पंगत वारकऱ्यांची झाली.. मग सोसायटीतले.. रात्री दहा वाजता आपापल्या पथार्या सोडून हळूहळू सगळे झोपी गेले.

पहाटे पाच वाजता दिंडीला जाग आली.. एवढ्या लोकांचं प्रातर्विधी.. स्नान.. आवरणं व्यवस्थित झालं पाहिजे.. लाकडाच्या काटक्या गोळा करून शेगडी पेटवली.. त्यावर मोठी कढई.. कढईत पाणी गरम करून छोट्या छोट्या बादल्यांमध्ये घेऊन कुणी बाथरूममध्ये.. कुणी बाहेरच उभ्या उभ्या डोक्यावरून पाणी घेऊ लागले.

चहाचा थर्मास फिरत होता.. पहाटेच्या गुलाबी थंडीत.. स्पिकरवरुन येणार्या भजनाच्या निनादात वारकरी चहा घेत होते.. सगळा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडला होता. बांधाबांध झाली.. कानावर टोप्या चढल्या.. मफलरची गाठ घट्ट झाली.. पालखी मधील पादुकांचे पूजन झाले..

एकामागून एक गाड्या निघाल्या..

‘हेची दान देगा देवा.. तुझा विसर न व्हावा’

ट्रॅक्टरवर असलेल्या दोन स्पिकरमधुन येणारा आवाज दुर दुर जाऊ लागला.. त्या भगव्या पताका… पाठमोरे वारकरी नजरेआड होत गेले.. उल्हासनं पाहीलेलं एक छोटंसं स्वप्न पुरं झालं होतं..

आपल्या बाबांच्या आठवणीने त्याला एकदम गलबलून आलं.. वर आकाशाकडे पाहत त्याने हात जोडले.. भरल्या डोळ्यांनी तो घराकडे वळला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन डे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “हॅप्पी व्हॅलेंटाईन डे …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

” अगं नातवाचं लग्न ठरलं खुश आहेस ना.. मग आता घे तुला एखादी चांगली पैठणी”

” अगोबाई माझ्यासाठी एकदम पैठणी.. आज राजा बराच उदार झालेला दिसतोय”

“तसं नाही ग.. एक जुनी गोष्ट आठवली. कुणाचंही लग्न असलं की बरीच वर्षे तु तो लग्नातला शालूच नेसत होतीस… त्यावरून कोणीतरी तुला बोललं होत…. तर घरी येऊन किती रडली होतीस. माझ्या ते कायम लक्षात आहे.”

“जाऊदे हो.. पूर्वीच ते सगळं विसरले. तेव्हा नव्हती आपली ऐपत.. आहे त्यात भागवत होतो… आपल्याला कुठे नव्या साडीचा खर्च झेपणार होता?”

” हो ग साध्या दोन खुर्च्या घ्यायच्या म्हटलं तरी किती विचार करत होतो आपण..”

” ओव्हरटाईम करून त्या पैशातून अचानक तुम्ही स्टीलच्या एक डझन मोठ्या प्लेट आणल्या होत्या. भिशीला मी त्या काढल्या तेव्हा सगळ्याजणी चकित झाल्या होत्या”

” तुझ्या अजून ते आठवणीत आहे…. त्या प्लेट घेऊन घरी येताना त्या बघून तू किती खुश होशील हेच माझ्या मनात होतं”

“आता ती गरिबी वाटते. पण तेव्हा त्याचं काही वाटायचं नाही. आहे त्यात भागवत आपण आपला संसार हसतंखेळतं सुखाचा केला…”

” पहिल्यांदाच आपण केलेली हाॅटेलात रहायची अशी तीन दिवसांची कोकणातली ट्रीप आठवते का? समुद्र बघून तुला किती आनंद झाला होता….”

” हो तर… माझ्या सगळं लक्षात आहे नंतर परदेशातही जाऊन आलो. पोरं शिकली भरून पावलो….”

त्या सुखद आठवणीनी डोळे डबडबलेच… आजकाल असंच व्हायचं…

जरा काही जुन्या आठवणी आल्या की रडूच यायचं…..

” तू पहिल्यांदा इडली केलीस आणि कुकरला शिट्टी तशीच राहिली त्या कडक इडल्या आठवतात का?”

यावर मात्र रडता रडता ती हसायला लागली…

” तरी म्हटलं बाबा अजून बोलला कसा नाही… अहो नंतर शिकले की सगळं. हॉटेल सारखे डोसे करून घातले. पिझ्झा बर्गर पण शिकले. ते बरं आठवत नाही…..”

नाही म्हटलं तरी आवाज जरा तापलाच तिचा….

” अगं जरा थट्टा केली तुझी… लगेच काय चंडीकेचं रूप धारण करायला नको……”

” मी पण गंमत केली हो तुमची…. अहो उद्या तर काय म्हणे तो प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे आहे”

” अग तू हे एकदम व्हॅलेंटाईन डे वगैरे सांगतेस मला आश्चर्यच वाटते आहे”

” अहो पेपरात त्याचं बातम्या आहेत. गुलाब खूप महाग झाले आहेत असं पण लिहिलं आहे”.

” अग आपल्याला हे असे प्रेमाचे दिवस साजरे करावेच लागले नाही. एकमेकांची काळजी, माया, मनाची जपणूक, समजून घेणं, एकमेकांचा आदर करणे.. हीच आपली प्रेमाची व्याख्या होती.”

“हो… हे मात्र खरं…. कितीतरी वेळा तुम्ही मला सांभाळून घेतलंत.. आधार दिलात… संकटप्रसंगी माझ्यामागे खंबीर उभे राहिलात… आपल्या वेळेस असे गुलाब नव्हते. कधीतरी ऑफिसातून येताना तुम्ही गजरा आणला तरी पण मन मोहरून जायचं… खरं सांगू का म्हणूनच मी आत्ता शांत आहे..”

बोलता बोलता तिचे डोळे भरूनच आले…

तेवढ्यात मुलगा आला म्हणाला,

” अग आई झालं का विष्णू सहस्त्रनाम म्हणून? रात्र झाली आता.. झोप ना..”

” अरे हो का… बराच वेळ झाला कळलंच नाही रे झोपते”

बेडरूममध्ये आल्यानंतर मुलगा बायकोला म्हणाला,

” हल्ली आईचं काय झालंय कळत नाही खूप वेळ रात्री देवाचं म्हणतं बसते”

” हो ना… पूर्वी दिवसा म्हणत असत.. बाबा गेल्यानंतर आता हे रात्री स्तोत्र म्हणणं का सुरू केलं आहे… हे कळत नाही…”

मुलांना कधीच ते कळणारही नव्हते.

ती आज थोडी हळवी झाली होती. पण नवऱ्याशी खूप वेळ गप्पा झाल्याने तृप्त समाधानी होती.

त्यानी बोललेले शब्द हे नुसते हवेत विरलेले नव्हते… ते अंतःकरणापासून म्हटलेले निखळ.. सच्चे होते. त्यात सहज असं प्रेम होतं. त्यामुळेच हृदयाच्या खोल कप्प्यात तिने ते शब्द जपून ठेवले होते. अशीच कधीतरी आठवण काढून ती त्याचा पुनःपुन्हा आनंद घ्यायची…

 त्याच्यावरच तर ती जगत होती…

नाहीतरी भाळणं काही दिवसांचं असतं सांभाळणं मात्र आयुष्यभरासाठी असतं…..

म्हणूनच लांब गेला तरी तीच्या जवळच होता ना तो……. अगदी आत्ताही….

असाही असतो कधीही साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “लोखंड्या…” ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ लोखंड्या… ☆ प्रा. भरत खैरकर 

लोखंड्या, आपल्या गल्लीमध्ये, गळपु-यात कधीच चोरी करायचा नाही.. तो कुणाच्या धाकदपटशाला ऐकणारा नव्हता. तो पक्का चोर होता. पण चोरी आपल्या एरियात काही करायची नाही. रिस्पेक्टफुल राहायचा, मानाधनाने राहायचा.. गावातले सारे त्याला लोखंड्या म्हणायचे! पंधरा सोळाव्या वर्षांपासून चोरी केल्यामुळे पोलिसांनी पकडून पकडून त्याला कित्येकदा मारमार मारले होते. पण तो लोखंडासारखा मजबूत आणि निगरगट्ट झाला होता. पोलिसांनी मारून मारून त्याचे समोरचे दात पाडून टाकले होते. इतका तो मार खायचा! त्याचं नाव एरियामध्ये लोखंड्या असंच पडलं होतं.. वास्तविक त्याचं नाव अशोक होतं. पण पुढे जाऊन त्याला ‘असक्या’ किंवा अटक होते म्हणून ‘अटक्या’ असेही त्याला म्हणायचे..

असक्याची अंगकाठी दादा कोंडके सारखी होती.. तो दिसायलाही बराचसा तसाच होता.. त्याची कटिंग अगदी दादासारखीच.. चेहरा मात्र थोडासा रुंद होता.

आजीच्या घराला लागूनच त्याचं घर होतं.. आजीच्या घराच्या जाळीच्या खिडकीतून लोखंड्याचं घर आरपार दिसायचं. पण उलट्या बाजूने बघितल्यावर मात्र काहीही दिसायचं नाही. फक्त कोणीतरी उभा आहेस वाटायचं. त्यामुळे लोखंड्याच्या घरी काय चाललं आहे? हे सगळं दिसत होतं.. पण आजी खिडकीत उभे राहू द्यायची नाही. ‘काय त्या चोराचं घर बघायचं?’ म्हणून ती रागवायची! आमच्या खिडकीतून.. त्याची खिडकी आणि पुढचं भलं मोठा अंगण.. असं सगळं आरपार घर दिसायचं!

ज्या दिवशी त्या अंगणात गहू सुकायला टाकले.. त्यादिवशी समजायचं याने रात्री कुणाच्यातरी गव्हावर हात मारला, जेव्हा केव्हा तुरी पसरलेल्या दिसल्या तर समजायचं लोखंड्यानं रात्री कुठेतरी डाळ शिजवली!

आजूबाजूचे शेजारी असक्याकडून हा माल विकत घ्यायचे.. कमी किमतीत हा माल मिळायचा. आणि लोखंड्याही तो साठवून ठेवणे परवडायचं नाही!

कंट्रोलचे गहू घेण्यापेक्षा किंवा ते दुसरीकडे विकून असक्याकडून हे धान्य घ्यायला शेजाऱ्यांनाही परवडायचं!

खिडकीतून पलीकडचं सगळं दिसायचं.. पण आजी खिडकीमध्ये जावू द्यायची नाही. चुकून जर आजीला दिसलो की आपण पलीकडे असक्याच्या घरात बघत आहो तर आपली शामत आली म्हणून समजायची!

तो घराला वर्षातून कितीदा पेंट करायचा माहिती नाही.. कुठून बिचारा एवढे पेंट आणायचा माहित नाही.. दर महिन्याला त्याच्या घराला नवीन रंग दिलेला असायचा.. घर एवढं टापटीप असायचं की कोणीही हे चोराचं घर आहे असं म्हणणार नाही. येऊन जाऊन तो घराला सारखा पेंट करायचा.. घर अगदी चकचक दिसायचं.. महिना दोन महिन्यात घराचा रंग बदललेला असायचा..

त्याच्या घराच्या आतील जिना वेडावाकडा होता म्हणे.. जेणेकरून पोलीस आल्यानंतर त्यांना चकमा देऊन त्याला पळता यावं! त्याने तो स्पेशली बनवून घेतला होता. एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पोलिसांनी त्याला सर्व मोह्हल्यामध्ये वरात काढून चांगला फोडून काढला होता! गावात काहीही झालं तरी पहिला टारगेट लोखंड्याच असायचा!

मात्र तोही इतका अट्टल गुन्हेगार होता की सगळ्या वस्तू तो जागच्या जागी रफादफा करायचा.. ह्या कानाची त्या कानाला खबर नाही लागू द्यायचा.. मात्र एरियातील लोकांना माहिती होतं.. ते बऱ्याच वेळा दहशती खाली राहायचे.. कारण हा शेतातीलही उभं पिक रात्री बेरात्री जाऊन कापून आणायचा. त्याच्या भीतीने काहीही कारण नसताना लोक शेतावर जागलीसाठी जायचे! तो अट्टल चोर होता.. रात्री त्याची सायकल वाजली.. की आजी म्हणायची, ” निघाला असक्या ड्युटीवर!”

रात्री चोरून आणलेल्या कोणत्याही मशीन, सायकली, शेतावरचे मोटर पंप, इत्यादी रात्रीच खोल खोल करून रफा दफा करण्यामध्ये लोखंड्याचा हातखंडा होता. कुऱ्हाडी, फावडे, सब्बल, लोखंडी सळ्या, मिळेल तो भंगार त्यातलं काहीही त्याला चालायचं.. रात्रभर त्याच्या घरामध्ये खुळ खुळ खुळ खुळ असा आवाज यायचा. रात्री बारा एक वाजता आणलेला माल पहाटेपर्यंत तोडताड करून व्यवस्थित विल्हेवाट लावण्याचे काम चालायचे.

तो कधीकधी रात्र- रात्रभर लाकडं तोडत राहायचा.. आरा मशीन वरून चोरलेले मोठमोठे लाकडाचे ओंडके.. तो छोट्या छोट्या तुकड्यात तोडून सरपण म्हणून भरून ठेवायचा ! त्याच्या घराच्या टीनावर भरपूर सारा माल पडलेला असायचा.. जोवर विकायचा जुगाड जुळत नाही.. तोवर त्या वस्तू त्याच्या गच्चीवर पडलेल्या असायच्या.. त्याही फक्त तीन-चार दिवस!

रात्री एकेक वाजता तो टेम्पो बोलावून लाकडं आणि त्या वस्तू रफादफा करायचा.. कुठे पाठवायचा माहित नाही.. पण त्याचा ठरलेला टेम्पोवाला होता.. मागील पंधरा-वीस वर्षापासून त्याचा हाच व्यवसाय होता. आजी त्याच्या आईला म्हणायची “लहानपणी याचे कान टोचले असते, तर असा असक्या निपजला नसता.. “पण आता उपयोग नव्हता. “लहाणपणी वस्तू चोरून आला होता तेव्हा तू मारलं नाही आता रडून काय उपयोग ?असं आजी त्याच्या आईला समजावायची.. पण चोरीच्या भरोशावर त्याने आपल्या बहिणीचं लग्न केलं.. स्वतःचं लग्न केलं.. घर चालवतो म्हटल्यावर त्याची आई पण त्याला काही बोलायचे नाही…

त्याच्या घरी कोणी आल्यावर असं म्हणणारच नाही की ‘हे चोराच घर आहे. ‘इतकं सुंदर घर त्याने ठेवलं होतं. घर जुनच होतं वडिलोपार्जित.. पण इतका चकाचक ठेवायचा की आपण कल्पना करू शकत नाही.

कोणत्याही लग्न समारंभात गेल्यानंतर इतका अपटूडेट आणि खाटखूट जायचा.. की कोणी संशय घेऊ शकणार नाही.. दाढी, कटिंग एकदम खटाखट, एकदम पॉश आणि टॉप टीप असे त्याचे कपडे असायचे. तो जेवण बी करायचा आणि हात बी मारायचा! पण त्याच्या पेहरावावरून कोणीही त्याच्यावर आरोप करू शकत नव्हते.. हे सर्व कार्यक्रम तो शेजारच्या गावांमध्ये करायचा.. आजी बरोबर ओळखायची की “आज असक्यान कुठेतरी डाव मारला!”

आता लोखंड्या थकला आहे.. नातू पणतू झाले आहेत त्याला.. ईवाया -जावयाचा झाला आहे तो. शरीरही आता त्याला साथ देत नाही.. आणि आता तसली कामही त्याला शोभत नाही.. अलिकडे दिवस-रात्र तो चंडीकेच्या मंदिरात पडलेला असतो.. आयुष्यभर केलेल्या चुकांची माफी देवीच्या दारात मागत असतो आणि तिच्यात पायऱ्यांवर आपला जीव जावा अशी त्याची इच्छा आहे..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तृप्ती ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆

सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

? जीवनरंग ?

☆ तृप्ती ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

“आजी हे घे पटकन चटका बसतोय मला “ म्हणत चिमणीने आपल्या इवल्याश्या तळहातावर आणलेले गरम दोन भजे झेलत झेलत आजीच्या शॉलमधून आत टाकले आणि आजीने ते शॉल डोक्यावर घेत मुटूमुटू खाऊन घेतले,.. आजीचा मघाचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यात एकदम बदल जाणवला आणि हे सगळं बघितलेलं रमाबाई हसून म्हणाल्या, “आजी भाज्यांनी काय औषधांच काम केलं का,.. ?”तिच्या या प्रश्नावर तिला हळू बोल असे दटवत आजी खुसफूस करत म्हणाली, “रमे वीट आला आहे त्या कडूझर औषधांचा आणि त्या मिळमिळीत जेवणाचा,.. जिभेला असं थोडंस चमचमीत किंवा आवडीचं खावे वाटतं ग,.. पण इथे तर काळजीच्या नावाखाली पार तोंड बंद केलं आहे आमचं,.. बोललं तर राग येईल ह्या लोकांना,.. आता 80 वर्षाची मी मला ह्यांच्या संसारात काही जागा नाही,.. एरवी अडगळ होऊन जगते,.. मग खाऊन मेले मी तर बिघडलं कुठे पण ही लोकं औषध देऊन आणि ते आळणी अन्न खाऊ घालून बळजबरी जगवत ठेवत आहेत मला,.. त्यांचा अगदीच जीव नाही असं नाही ग पण वीस वर्षांपूर्वी रक्तातात साखर काय सापडली,.. सगळ्यांनी माझी पुरणपोळी बंद केली,.. अग मी चालून फिरून करत होते की सगळं मेंटेन पण उगाच बाऊ करून सूनबाईंनी माझ्या गोडावर बंधनं घातली,.. आधी वाटलं काळजी आहे त्यांना पण प्रत्येकवेळी नको त्रास होईल ह्या भीतीने घास काढून घेतला,.. हळूहळू मी मान्य करत गेले पण वय वाढायला लागलं आणि माझ्यातल लहान मुल जाग झालं,.. तिकडे भजे, समोसे तळले की इकडे तोंडाला पाणी सुटत ग,.. वासना वाईटच ग पण माणूस जोडलाच आहे ना वासनेशी,.. मग कसं जमवायचं सगळं,.. बर माझ्याच घरात आहे का असं तर नाही माझ्या मैत्रिणी तेच सांगतात,.. परवा त्या जोशीचा फोन आला,.. तिच्या नवऱ्याला आंब्याचं फार वेड,.. आंबा सिझन आला की रसाशिवाय जेवण करत नव्हता,.. पण ह्या चार वर्षात पॅरॅलीसिस ने अंथरुणावर पडला,.. मग सून आणि मुलांनी काही आंबा खाऊ दिला नाही,.. तुम्हाला त्रास होईल म्हणे,.. बिचारा मरताना आंबा हा शब्द उच्चारत गेला ग,.. मी म्हणते दिला असता अर्धी वाटी रस तर काय बिघडलं असत का,.. ?शेवटी हगण मूतं करायला माणूसच लावलाय ना,.. झाले असते दोन जुलाब जास्त,.. दोन हगीज जास्तीचे गेले असते,.. पण तृष्णा तर पूर्ण झाली असती ना,.. मी मात्र आता चिमणीला धरलं आहे हाताशी,.. आणि अति खाऊ नाही हे मलाही कळतंय की पण,.. त्या चावट जिभेला कोणी सांगावं,.. ती म्हातारी झाल्यावर जास्त त्रास देते बहुतेक,.. आणि तिला हे नाक साथ देत ना ग,.. आता मला सांग आयुष्य गेलं त्या स्वयंपाक घरात,.. तिखट, मसाले, अश्या अनेक चवीने स्वयंपाक केला,.. खाल्ला, खाऊ घातला त्या अन्नातून एवढ्या सहज मन कसं बाहेर पडेल,.. बरं खायचं काही खुप नसतं उगाच त्या वासाने चाळवळलेल्या भुकेला शमवायचं असतं बस,.. पण ही लोकं मऊ भात, खिचडी आणून देतात ना त्यावर लोणचं ना काही,.. आणि बाऊ एवढा,.. त्यांची तब्येत बिघडेल,.. मला तर अस्सा राग येतो पण आता चिमणी आली ना कामी मग मी ही झाले आता लबाड,.. हा हा म्हणत आजीने आपलं बिनदाताच बोळकं पसरवलं आणि चिमणीला टाळी दिली,.. चिमणी हसली आणि म्हणाली, ” चल बाय अज्जू अभ्यास आहे मला,.. आणि पळाली,.. “

आजी मग औषध घेऊन अलगद आपली खाली सरकून झोपली,.. रमाबाईने त्यांच्या अंगावरची शाल नीट केली,.. ते करताना रमाबाईला एकदम गहिवरून आलं,.. मागच्या पौर्णिमेला घरात कुळाचार झाला होता,.. आजी आपल्याला म्हणत होती रमा पुरणाच्या पोळीचा तुकडा आणून दे ग चोरून,.. पण आपण नाहीच म्हणालो,.. “सुनांना मागितलं तर सुनांनी लगेच कांगावा केला,.. लेकही अंगावर धावले,.. बिचारी आजी गप्प बसली,.. चिमणी नेमकी ट्रीपला गेली होती,.. आजीला पुरणपोळी खुप आवडते असं नेहमी म्हणतात त्या,.. हे सगळं आठवून रमा गहिवरली होती,.. दुसऱ्या दिवशी रमा छोट्या डबीत काहितरी घेऊनच आली होती,.. आजीची खोली झाडेपर्यंत दार लावते म्हणत तिने आजीला पटकन डबीतून अर्धी पोळी आणि त्यावर तूप असं खायला दिलं,.. आजीला आंनद गगनात मावेना,.. किती किलोच पुरण घालायचे ग मी,.. सगळयांना वाटायचे,.. एवढं म्हणत आजीला रडू फुटलं,.. रमाने डोक्यावर हात फिरवला,.. रडू नका,.. घ्या खाऊन,.. आजी एक एक घास खाताना डोळे बंद करून अगदी तृप्तपणे खात बसली होती,.. रमाला मनातून आंनद झाला,..

दुसऱ्या दिवशी रमा आली तर सूनबाईची तणतण सुरू होती आजीला,.. “जरा दम धरायचा ना पातळ खराब केलं ना,.. आजी अगदी अपराधी होऊन ऐकत होती,.. पण रमाने सावरलं,.. “असू द्या मॅडम मी आवरते सगळं,.. जा तुम्ही,.. आजीचे डोळे भरून आले म्हणाली, “माझ्या हवरट पणाचा रमा तुला त्रास ग”,.. रमा म्हणाली, “आजी काही वाईट वाटून घेऊ नका,.. ह्याचेच पैसे घेतो आम्ही,.. त्यात कसला त्रास… उद्या तुम्हाला आवडणारे मुगाचे लाडू आणते नक्की,.. “

आजी म्हणाली, “आता आवड निवड अशी नाही ग पण काय माहित ह्या जीवाला कशी ही अन्नाची तृष्णा लागते,.. फार नाही पण अगदी घासभर का होईना खाव वाटतं.. रमाबाई निघाली,.. आजी म्हणाली, “रमा, ह्याला तू हवरटपणा समज की काहिही पण तू असे वयस्कर लोकांना सांभाळायचे काम करते म्हणून सांगते,.. जे आमच्यासारखे अगदी जाण्यासारखे आहेत,.. त्यांना खाण्यासाठी तरसु देऊ नकोस ग,.. ह्या देहाचे हे खेळ कळत नाही कधी कधी त्या वासनेत जीव अडकून बसतो ग,.. जा बाई अंधार पडलाय ये उद्या,.. “

रमा निघाली रात्री झोपेत आजी स्वप्नात आली,.. “मुगाचा लाडू आणते म्हंटली ह्याने सुद्धा जीव तृप्त झाला ग रमे,.. “रमा दचकून उठली पहाटेचे पाच वाजले होते,.. तेवढयात मोबाईलवर रिंग वाजली,.. आजीच्या घरून फोन,.. तिने पटकन उचलला,.. आजीची सुनबाई रडत बोलत होती,.. आजी गेल्या रमाबाई,.. जरा मदतीला या लवकर म्हणत फोन ठेवला.. रमाला गहिवरून आलं,.. रात्री ओट्यावर काचेच्या बरणीत बांधून ठेवलेले लाडू देखील रडत होते,.. जणू काही तृप्ती राहिली हे सांगत होते,.. पण स्वप्नातलं आजीचं वाक्य रमाला आठवलं,.. तृप्ती झाली ग रमे… हे सगळं आठवून रमाला अधिकच रडू फुटलं,.. “

© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)

फक्त व्हाट्सअप संपर्क +91 93252 63233

औरंगाबाद

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सातारकरची शाळा – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सातारकरची शाळा – भाग-३  ☆ श्री प्रदीप केळूसकर

(या भागातील सुद्धा अनेक तरुण लांबच्या गावात जाऊन तिचे तमाशे पाहत होते. माधवी पाटील हिचा तमाशा गावात होणार म्हणून गावात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते.) – इथून पुढे —

शेवटी जत्रा जवळ आली. देऊळ माणसांनी भरले होते. लांब लांब चे नातेवाईक या गावात आले होते. छोटी छोटी अनेक दुकाने देवळा भोवती लागली होती. देवीच्या देवळात मोठी गडबड होती. देवीचे मानकरी नवीन कपडे घालून मिरवत होते. तरुण आणि वृद्ध लोक सर्वच माधवी पाटीलच्या तमाशासाठी आसुसले होते.

जत्रा सुरू झाली, देवीची पालखी घरोघरी गेली. बाया बाप्याने देवीची ओटी भरली. रात्री देवळासमोरच्या पटांगणात माधवी पाटील तमाशा सुरू झाला.

“कोन्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डोलात,

खुदु खुदु हसतंय गालात ‘.

गावकरी बेभान झाले होते, फेटे उडवीत होते. टोप्या फेकत होते. तमाशा कार्यक्रम हाउसफुल्ल होता.

जत्रा संपली, तरी माधवी पाटीलच्या तमाशाची चर्चा घरोघरी सुरू होती. यावर्षी जत्रा कमिटीला पाच लाखापेक्षा जास्त नफा झाल्याचे बोलले जात होते.

सातारकर ना पण समजले, यावर्षी जत्रा कमिटीला पाच लाखापेक्षा जास्त रक्कम मिळाली, ही रक्कम आपल्या शाळेसाठी मिळाली तर, वरच्या वर्गातील मुलांच्या हातात टॅब देण्याचे आपले जे स्वप्न आहे ते पुरे होऊ शकेल. पण हे पैसे मिळवायचे कसे?

सातारकरांचे सौदागर काकांशी आणि यशोदेच्या आईशी याबाबत बोलणे झाले.

सौदागर काका – जत्रा कमिटी तसे ते पैसे देणार नाही. कारण या पैशातून त्यांना अख्या गावाला मटन आणि दारूचे जेवण द्यायचे असते. शिवाय पुढच्या वर्षीच्या तमाशाची पण तजवीज करायची असते. त्यांना मुलांची एवढी काळजी कुठे?

सातारकर – यासाठी आपण एक वेगळी आयडिया करूया. वहिनी, तुम्ही ग्रामपंचायतीतर्फे हळदी कुंकू कार्यक्रम घ्या. गावातील सर्व महिलांना या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी बोलवा. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौदागर काकांना बोलवा. सौदागर काका आपल्या भाषणात आपल्या गावातील शाळेतील वरच्या वर्गातील मुलांसाठी कॉम्प्युटर शिक्षण अत्यंत आवश्यक आहे हे पटवून सांगतील. आणि त्यासाठी यावेळी पासून मुलांना टॅब देण्याची गरज असल्याचे बायकांना पटवतील. यासाठी सुमारे चार लाख रुपये ची गरज असल्याचे सांगतील. आणि महिलांना सांगतील हे चार लाख रुपये जत्रा कमिटीकडे जमा असलेल्या पैशातून जर मिळाले तर हे शक्य होईल. प्रत्येक बाईने जर आपल्या घरात आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट धरला, तर हे पैसे आपल्याला मिळू शकतात. सौदागर काकांना ही कल्पना आवडली. यशोदेच्या आईने ग्रामपंचायतीतर्फे हळदीकुंकू आयोजित केले. गावातील प्रत्येक घरात जाऊन आमंत्रण दिले. गावातील सर्व स्त्रिया नटून थटून हळदीकुंकवासाठी आल्या. हळदीकुंकू दिल्यानंतर प्रमुख पाहुणे सौदागर काका बोलू लागले ” या गावातील माझ्या बहिणींनो, गेली चार-पाच वर्षे सातारकर नावाचे शिक्षक आपल्या शाळेत आल्यापासून आपल्या शाळेची प्रगती तुम्ही पाहत आहात. त्यावेळी शाळेत दहा मुले होती ती आता 600 च्या वर मुले गेली. स्कॉलरशिप परीक्षेत आपली मुले उत्तीर्ण झाली. ड्रॉइंग परीक्षेत आपली मुले चांगले यश मिळवीत आहेत. आपल्या शाळेसाठी नवीन इमारत उभी राहत आहे. आजूबाजूच्या गावातील सुद्धा अनेक मुले आपल्या गावातील शाळेत येत आहेत. सध्या सातवीपर्यंत वर्ग आहेत, पुढील वर्ष आठवीचा पण वर्ग सुरू होणार आहे. नवीन नवीन शिक्षक या शाळेत येणार आहेत. आता काळानुसार मुलांना कॉम्प्युटर शिक्षण आवश्यक झाले आहे. तुम्ही शहरात गेल्यावर पाहिला असाल बँकेत पोस्टात सर्व ठिकाणी आता कॉम्प्युटर शिवाय काम होत नाही. म्हणून आपल्या मुलांनी एवढ्या पासूनच कॉम्प्युटर शिकणे आवश्यक आहे. पुढच्या काळात कॉम्प्युटरमुळेच नोकऱ्या मिळणार आहेत. आपल्या मुलांनी शहरातल्या मुलांपेक्षा मागे पडता नये असे तुम्हाला वाटत असेल, तर आपल्या मुलांच्या हातात टॅब असणे आवश्यक आहे. ‘

काकांनी आपल्या घरातला टॅब हळदी कुंकवासाठी आलेल्या बायकांना दाखवला.

“हा असा टॅबो मुलांच्या हातात असला, म्हणजे मुले दिल्लीतील मुंबईतील सुद्धा क्लास करू शकतात. या गावातून देशा प्रदेशातील तज्ञांची बोलू शकतात. शेती विषयी सुद्धा माहिती मिळू शकतात. याकरता यावेळी पासून या मुलांना टॅब मिळणे आवश्यक आहे. याकरता सुमारे चार लाखाची गरज आहे. आपल्या गावातील जत्रा कमिटीला यंदाच्या तमाशातून सुमारे पाच लाख रुपये मिळाले आहेत. त्यातील जर चार लाख शाळा कमिटीला मिळाले तर मुलांसाठी टॅब घेणे सोपे जाईल. याकरता माझ्या बहिणींनो, तुम्ही प्रत्येकाने आपल्या नवऱ्याच्या मागे हट्ट करायचा की जत्रेमध्ये मिळालेले पैसे शाळा समितीकडे द्या. मला खात्री आहे तुम्ही हट्ट केला म्हणजे तुमचे नवरे तुमच्या हट्ट पेक्षा लांब जाऊ शकत नाही. आणि आपले टॅब घेण्याचे काम होईल. ‘

सर्व बायका आपापल्या घरी गेल्या. गावातील सुनंदाताई आपल्या नवऱ्याशी वाद घालू लागल्या “एवढं पैस जमा झालया, द्या की ते पोरांसाठी, का अजून बाई नाचोंवायची हाय ‘.

सुमनताई नवऱ्यासमोर कडाडल्या ” बाईला नाचवून पैस जमा केल्या न्हवं, न्हाई शाळ साठी दिल तर माझ्याशी गाठ हाय ‘.

यमुनाताई टोमणेच मारत होत्या ” सातारकर गुरुजी शालसाठी एवढं रबत्यात, त्याच हाय काय जीवाला, पैस जमीवलं ते दारू मटण खण्यासाठी, पोरांसाठी करा की खर्च’. सगळा पुरुष वर्ग वैतागला,

सर्वांच्या घरात तीच परिस्थिती, जो तो बायकोला तोंड देता देता कंटाळला. शेवटी गावातले सगळे पुरुष एकत्र आले आणि शाळा कमिटीकडे चार लाख रुपये देण्याचे ठरवले. सौदागर काकांकडे चार लाख रुपये आले. शहरातील एका कंपनीकडे पंचवीस टॅब ची ऑर्डर दिली गेली, आणि मुलांच्या हातात टॅब आले. मुलांना कॉम्प्युटर शिकवायला शेख बाई होत्याच.

सातारकरांच्या मनात आले, आपण या गावात आलो तेव्हा शाळेचे वर्ग म्हशीच्या गोठ्यात भरत होते. 10 11 मुले जेमतेम होती. आता शाळेसाठी स्वतंत्र बिल्डिंग तयार होते आहे. आठ वर्ग बांधून होत आहेत, गरज पडली तर अजूनही बांधण्याची तयारी आहे, आपण आलो तेव्हा एक एकच शिक्षक होतो, आता सहा शिक्षक आले आहेत, सर्व शिक्षक आपल्या हाताखाली तयार झाले आहे. सौदागर काकांचे त्यांना मार्गदर्शन आहे. स्वतः सौदागर काका आणि काकू शाळेत काही तास घेत आहेत. मुलांची प्रगती आहे. आता या शाळेची अशीच प्रगती होत राहणार. यापुढे या शाळेतील मुले एसएससी परीक्षेत चांगले यश मिळणार. आपले आता इथले काम संपले. आपण आता दुसऱ्या गावात जावे. जिथे आपली गरज असेल तेथे जावे.

सातारकर शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. सातारकरांवर शिक्षणाधिकारी खुश होतेच. मुलांच्या हातात टॅब देणारी पहिली शाळा होती सातारकरांची. शिक्षणाधिकारी सातारकराना म्हणाले ” आठवीच्या मुलांच्या हातात टॅब देणारी ही पहिली सरकारी शाळा आहे, जिचा नावलौकिक देशात नव्हे परदेशात सुद्धा वाजू लागला आहे. लवकरच या शाळेला परदेशी शिक्षण तज्ञ सुद्धा भेट देणार आहेत. या शाळेला परदेशातून सुद्धा मोठ्या मोठ्या देणग्या मिळतील.

“हो सर, मला कल्पना आहे या शाळेचे भवितव्य उज्वल आहे. पण माझी आता या शाळेला गरज नाही. जेथे माझी गरज आहे तेथे माझी बदली करावी. असे गाव शोधावे येथील मुले अजूनही शाळेत जात नाहीत, पालकांना मुलाच्या अभ्यासाबद्दल काही वाटत नाही, तेथे मला नवीन आव्हान घ्यावयास आवडेल.

शिक्षणाधिकाऱ्यांनी सातारकरांच्या विनंतीचा मान ठेवला, 50 किलोमीटर वरील दुसऱ्या तालुक्यातील टोकाच्या गावात त्यांची बदली केली.

सातारकरांची बदली झाली हे गावात कळले, गावातील पालक त्यांना विनंती करू लागले, हे गाव आणि ही शाळा सोडून जाऊ नका म्हणून. पण सातारकर ठाम राहिले, पालकांनी सौदागर काकांना त्यांची समजूत व घालायला सांगितले. पण सौदागर काका म्हणाले ” सातारकरांचे बरोबर आहे, जेथे गरज आहे तेथे त्यांना जाऊ दे, त्यांचा सारखा शिक्षक ज्या गावात जाईल, तेथे विद्यार्थी जमतील, शाळेची आणि शिक्षणाची भरभराट होईल ‘. आपल्या गावचे नशीब सातारकर आपल्या गावात पाच सहा वर्षे राहिले याचे. ‘

सर्वांचा निरोप घेऊन सातारकर निघाले, त्यांना निरोप देण्यासाठी अख्खे गाव एसटी स्टँडवर हजर होते. शाळेतील सहाशे मुले आठ शिक्षक आणि गावातील लहान-मोठे सर्वजण. बायका डोळ्याला पदर लावत होत्या, पुरुष मंडळी डोळे हळूच पुसत होते. स्वतः सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पण हजर होते.

सर्वांना एकदा नमस्कार करून आणि सौदागर काकांच्या पायांना नमस्कार करून पाच वर्षांपूर्वी आणलेल्या दोन पिशव्या घेऊन सातारकर एसटी चढले.

— समाप्त — 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares