ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ९ फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?फेब्रुवारी – संपादकीय  ?

मुरलीधर देवीदास आमटे तथा बाबा आमटे.

बाबा आमटे हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येते एक समाजसेवकाचे व्यक्तिमत्व. पण बाबा हे कायद्याचे पदवीधर होते आणि वकीली करत होते।

हे अनेकांना माहित नसावे. आयुष्याला कलाटणी देणा-या प्रसंगामुळे ते कुष्ठरोग पिडीतांचे ‘मसिहा’ बनले हे जरी खरे असले तरी त्यांचे अन्य कार्य पाहता समाजसेवा हा त्यांचा अंगभूत गुण होता हे दिसून येते. त्यांनी 1942 च्या लढ्यात भाग घेतला होता. शिवाय नर्मदा बचाओ आंदोलन, भारत छोडो आंदोलन, वन्य जीवन संरक्षण अशा अनेक उपक्रमात ते सक्रीय होते.

चंद्रपूर येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी स्थापन केलेला ‘आनंदवन’ हा आश्रम त्यांच्या कार्याचे सर्वोच्च  शिखर आहे.

अशा या भावनाशील समाजसेवकाकडून काव्य निर्मिती होणे अगदी स्वाभाविक आहे .’ज्वाला आणि फुले ‘  आणि ‘उज्वल उद्यासाठी’ हे त्यांचे दोन काव्य संग्रह त्यांच्या  विचारांचे दर्शन घडवतात.

त्यांच्या उत्तुंग सामाजिक कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण, मॅगसेस पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार, जमनालाल बजाज, घनश्यामदास बिर्ला, गांधी शांति पुरस्कार अशा अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. शिवाय अनेक विद्यापिठांनी त्यांना डाॅक्टरेट दिली आहे.

अशा या कर्मयोग्याचा आज स्मृतीदिन आहे.

‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा ‘

या उक्तीला सार्थ ठरवणा-या या महामानवास आदरपूर्वक वंदन.

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ८ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? ८ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

यशवंत नरसिंह केळकर

यशवंत नरसिंह केळकर हे न. चिं केळकर यांचे धाकटे चिरंजीव. त्यांनी इतिहास विषयक लेखन विपुल केले. अर्थात इतरही लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांचा जन्म १९ जुलै १९०२चा. इ.स. १९२२ मध्ये त्यांनी टिळक विद्यापीठाची वाङ्मय विशारद ही पदवी मिळवली.

१९४७ मधे इतिहास विषयाला वाहिलेले ‘पराग’ मासिक सुरू केले. इतिहास विषयक निबंध, स्थल, कथा, इतिहास क्षेत्रातील बातम्या अशा स्वरूपाचे लेखन यात प्रसिद्ध  होई.

य. न. केळकर यांचे साहित्य –

१. इतिहासातील सहली, २.ऐतिहासिक शब्दकोश २ भाग, ३.होळकरांची कैफियत, ४. चित्रमय शिवाजी भाग १, अशी अनेक ऐतिहासिक पुस्तके त्यांनी लिहिली.

इतर – तंत कवी तथा शाहीर , जुन्या अप्रसिद्ध लावण्या, अंधारातील लावण्या, गीत गुंफा, विनोद लहरी, न. चिं केळकर यांचा खाजगी पत्रव्यवहार अशी इतरही पुस्तके त्यांनी लिहिली. ८ फेब्रुवारी १९९४ ला ते निधन पावले.

या थोर इतिहासकाराल आज विनम्र श्रद्धांजली.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २ फेब्रुवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २ फेब्रुवारी –  संपादकीय  ? 

2 डिसेंबर १९११ साली जन्मलेले अनंत वामन वर्टी व्यवसायाने डॉक्टर पण साहित्याची अतिशय आवड असलेले.  विनोदी लेखक म्हणून साहित्य क्षेत्रात मान्यता पावले. नाशिक येथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यांना साहित्याप्रमाणेच बॅडमिंटन आणि ब्रीज खेळण्याचीही आवड होती.

१९५३ साली गावकरी प्रकाशनतर्फे ‘अमृत ‘ मासिक काढायचे ठरले, तेव्हा वर्टींनी संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर ११९६० मध्ये ‘अमृत ‘ च्याच धरतीवर त्यांनी ‘श्रीयुत’ हे मासिक सुरू केले. चंद्रहास  नावाची प्रकाशन संस्थाही त्यांनी सुरू केली. त्यांचे बरेच कथासंग्रह या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झाले आहेत. नाशिक सार्वजनिक वाचनालयाशी त्यांचा जवळचा संबंध होता. या वाचंनालयातर्फे ते जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करत.  

त्यांच्या कथात विविधता आहे. मानवी स्वभावाचे मार्मिक चित्रण त्यांनी केले आहे. कथेचा चमत्कारपूर्ण शेवट ही त्यांच्या लेखनाची खासियत होती. वर्टींनी ५०० पेक्षा जास्त काथा लिहिल्या आहत. त्यांचे २१ पेक्षा जास्त कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांनी नाटके आणि कादंबर्‍याही लिहिल्या आहेत.

त्यांनी लिहिलेले ‘राणीचा बाग’ हे नाटक खूप गाजले. सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकाला  मिळाला.  १९५७ साली राज्य नाट्यस्पर्धेच्या वेळी  मराठी , गुजराती आणि कन्नड आशा तीन भाषातून एकाच वेळी हे नाटक सादर करण्यात आले.

वर्टींचे काही कथासंग्रह – १. अकरावा गडी २.अखेरचा आघात ३.गुलबदन, ४. दांतकथा,        ५. पोलिसी खाक्या, ६.मंत्र्यांचा मंत्री, ७. सायराबानू आणि इतर विनोदी कथा इ.  

  वर्टींच्या काही कादंबर्‍या – अभिनय, नवा धर्म, काठपुतळ्या, हेरंब, वाघीण, तिसरी इच्छा, सुलूचा रामा-इडली डोसा 

पुरस्कार –  वर्टींच्या ‘टॉमी’ या कथेस १९३७मधे किर्लोस्कर मासिकाच्या लघुकथा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले होते. ‘समीक्षक’ या मासिकाच्या कथास्पर्धेत ‘मुमताज या कथेला प्रथम पारितोषिक मिळाले होते.

 नाशिकमध्ये त्यांच्या सन्मानार्थ  एका रस्त्याला डॉ. अ. वा. वर्टी हे नाव दिले आहे.

नाशिक सार्वजनिक वाचंनालयातर्फे दर वर्षी एका कथालेखकास अ. वा. वर्टी पुरस्कार दिला जातो.

२०१० साली डॉ. अ. वा. वर्टी व्यक्ति आणि वाङ्मय तसेच नाटककार वर्टी- एक शोध हे २ शोध निबंध प्रकाशित झाले.

☆☆☆☆☆

वा.गो.आपटे म्हंटलं की डोळ्यासमोर येतं आनंद मासिक. एके काळी या मासिकाने मुलांना खूप भुरळ घातली होती. वा.गो.आपटे त्याचे संस्थापक आणि संपादक. १९०६ साली त्यांनी ते सुरू केले. हे मासिक त्यांच्या हयातीनंतरही अनेक वर्षे चालू होते. ते मराठीतील लेखक, भाषांतरकार, पत्रकार होते, निबंधकार, कोशकारही होते.  बंगाली कादंबर्‍यांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे.

वा.गो.आपटे यांचा जन्म खांदेशातील धरणगाव येथे झाला .’अशोक अथवा आर्यावर्तातील पहिला चक्रवर्ती राजा हे त्यांचे पहिले पुस्तक. त्यांनी १९०५ साली लिहिले. बौद्धपर्व अथवा . बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांनी लिहिला. अलाहाबाद येथील ‘मॉडर्न रिव्ह्यू’मध्ये मराठी पुस्तकांचे परीक्षण ते करीत.

वा.गो.आपटे यांचे बरेचसे लेखन अनुवादीत वा रूपांतरित आहे. मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, लेखन कला आणि लेखन व्यवसाय, मराठी शब्द रत्नाकर, मराठी शब्दार्थ चंद्रिका, मराठी-बंगाली शिक्षक, सौंदर्य आणि ललित कला,इ. त्यांची विविध विषयांवर २४-२५ पुस्तके आहेत. लहान  मुलांसाठी त्यांनी ३० -३२ पुस्तके लिहिली॰ त्यांचे बालवाङ्मय रंजक व उद्बोधक आहे. बांकीमचंद्र यांचे संपूर्ण कादंबरी वङ्मय त्यांनी मराठीत ४ खंडात आणले.

मराठी शब्द रत्नाकर आणि मराठी शब्दकोश यांचे लेखन हे त्यांचे महत्वाचे वाङ्मईन कार्य.

इतर – वा.गो. आपटे : व्यक्ति आणि वाङ्मय या नावाचा त्यांच्यावरचा ग्रंथ राणे जाधवांनी लिहिला आहे. 

मराठी साहित्य परिषद येथील ग्रंथालयाला वा.गो. आपटे हे नाव दिले आहे.

आज  वा.गो. आपटे यांचा स्मृतिदिन (२ फेब्रुवारी १९३७). त्याचप्रमाणे डॉ. अ. वर्टींचाही आज स्मृतिदिन. मराठीतल्या या दोन्ही दिग्गजांना विनम्र श्रद्धांजली. 

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ १ फेब्रुवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?फेब्रुवारी – संपादकीय  ?

मोतीराम गजानन रांगणेकर (मो. ग. रांगणेकर)

हे मो.ग.रांगणेकर या नावाने प्रसिध्द असलेले मराठी नाटककार.ते केवळ नाटककार नव्हते तर चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकारही होते.तसेच त्यांनी गीत लेखनही केले आहे.त्यांच्या नाट्यक्षेत्रातील  योगदानाबद्द्ल त्यांना 1982 चा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देण्यात आला होता.

त्यांची साहित्यसंपदा   : – 

नाटके— आले  देवाजीच्या मना,संगीत एक होता म्हातारा,कन्यादान, कोणे एके काळी,घर माहेर,हिमालयाची बायको,संगीत अमृत,संगीत कुलवधु,सं .कोणे एके काळी,संगीत वहिनी इ.

दिग्दर्शन केलेली नाटके :- अपूर्व बंगाल,तो मी नव्हेच,देवाघरची माणसं,पठ्ठे बापूराव,भूमीकन्या सीता,मीरा मधुरा,लेकरे उदंड जाहली इ. कुबेर चित्रपट

गाजलेली गीते.:- नदी किनारी,नदी किनारी ग, पाखरा जा त्यजुनिया, बोला अमृत बोला, मनरमणा मधुसूदना, क्षण आला भाग्याचा इ.

रांगणेकरांचा आज स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ ३१ जानेवारी २०२२ – संपादकीय – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी)

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? संपादकीय ३१ जानेवारी २०२२  ?

प्रा.श्री. श्रीनिवास रघुनाथ कावळे

आज ३१ जानेवारीखात्रीशीर आधार असल्याशिवाय मोघम विधाने करायची नाहीत, या शिस्तीचे काटेकोर पालन करणारे लेखक प्रा.श्री. श्रीनिवास रघुनाथ कावळे यांचा आज स्मृतिदिन. ( १३/९/१९३० – ३१/१/१९९० ). 

पुण्याच्या स.प.महाविद्यालयात तत्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री. कावळे यांनी, ‘ सुगम तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पद्धती ‘, सामाजिक मानसशास्त्र ‘, तर्कशास्त्र ‘, ‘ पंडित जवाहरलाल नेहरूंचे तत्त्वचिंतन ‘, यासारखे वाचकाला विचार-प्रवृत्त करणारे ग्रंथ लिहिलेले आहेत. 

“ डॉ. श्री. र. कावळे : व्यक्ती आणि विचार “ या स्मृतिग्रंथात असलेल्या एकूण तीस लेखांपैकी एकवीस लेख श्री. कावळे यांनी लिहिलेले आहेत, ज्यातून त्यांची चिंतनपद्धती, तात्विक भूमिका आणि लेखनशैली स्पष्टपणे लक्षात येते. उरलेले नऊ लेख त्यांच्या स्मरणार्थ लिहिलेले आहेत. 

त्यांचे वैशिष्ट्य हे की, “ मलावरोध : प्रतिबंधक उपाय “, “ निसर्गोपचारातील आहार आणि उपवास“, “ योग आणि मानसिक उपाय “,  यासारखे त्यांचे लेखन म्हणजे, एका तत्वज्ञाच्या पठडीत न बसणारे साधे विषयही तात्विक पातळीवर कसे हाताळता येतात, याचे उत्तम उदाहरण आहे.

त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रणे —- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद, डॉ. पु.ग. सहस्रबुद्धे, प्राचार्य प्र. रा. दामले . याखेरीज, ‘ गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्य ‘, आणि ‘ M.N.Roy and J.P. on social Change ‘, ही पुस्तके: आणि, ‘ श्री समर्थांचे मनाचे श्लोक ‘, गुरुदेव रानडे : ग्रंथ परिचय ‘, ज्ञानेश्वरीतील अध्यात्म ‘, ‘ शैक्षणिक प्रबोधन आणि स्थानिक स्वराज्य संस्था ‘ अशी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांना आदरांजली वहाणारीही नऊ-दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

देवमाणूस “ म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या श्री. श्रीनिवास कांबळे यांना विनम्र अभिवादन. 

☆ ☆ ☆ ☆ ☆

कवी श्री. नारायण रामचंद्र मोरे उर्फ कवी अशोक

कवितेस प्रणयपत्रिका “ या आगळ्यावेगळ्या विषयावरची कविता ‘ कवी ‘ म्हणून ज्यांना ओळख देऊन गेली, ते कवी श्री. नारायण रामचंद्र मोरे उर्फ कवी अशोक यांचाही आज स्मृतिदिन. त्यानंतर अनेक मासिकांमधून त्यांच्या कविता, अनेक लघुकथा आणि कितीतरी स्फुटलेख प्रसिद्ध झाले होते. ‘ मनोरंजन ‘ मासिकाचे सहसंपादक, मग कार्यकारी संपादक, असणारे श्री. मोरे यांनी ‘ नवजीवन ‘, आणि सुवर्ण ‘, ही स्वतःची मासिके अनेक वर्षे यशस्वीपणे चालवली. वयाच्या केवळ विसाव्या वर्षी त्यांनी मुरारबाजी देशपांडे यांच्यावर “ संग्रामसिंह “ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर “ शिवशार्दूल “ ही चारचारशे पानांची दोन खंडकाव्ये लिहिली होती. शिवाजीमहाराजांचे संपूर्ण चरित्र काव्यरुपात लिहिण्याचा ध्यास घेऊन, त्यासाठी चौदा वर्षे अथक परिश्रम घेऊन, त्यांनी ‘ चंद्रकांता ‘ वृत्तात “ शिवायन “ हे महाकाव्य लिहिले, ज्यातील काव्यांची संख्या ८२७६ एवढी आहे. हे त्यांचे सहजसुंदर आणि ओघवत्या भाषेतले काव्य आचार्य अत्रे यांना अतिशय आवडले, आणि त्यांनी श्री. मोरे यांना ‘ महाकवी ‘ असे म्हणायला सुरुवात केली. या महाकाव्यातील बऱ्याच काव्यांना स्नेहल भाटकर यांनी सुंदर चाली लावल्या आहेत. 

ज्यांच्या या महान कामगिरीबद्दल  “ शिवायन म्हणजे मोरे, आणि मोरे म्हणजे शिवायन “ अशी अत्रे यांनी जणू व्याख्याच करून टाकली, अशा कवी नारायण मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.  

☆ ☆ ☆ ☆ ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २७ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २७ जानेवारी –  संपादकीय  ? 

पू. वा. बहरे ऊर्फ राजाभाऊ बेहरे

पू. वा. बहरे ऊर्फ राजाभाऊ बेहरे यांचा जन्म ११ जून १९३९मध्ये झाला. त्यांनी मराठी नियतकालिक काढायचे ठरवले, तेव्हा त्यांना निश्चित उत्पन्न देणारी सरकारी नोकरी सोडावी लागली. त्यावेळी विलक्षण जिद्द, आणि आपल्याला  काय करायचे आहे, याचे नक्की भान या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नव्हते. या काळात त्यांची पत्नी सुमनताईंनी त्यांना मोलाची साथ दिली.

१९५९ साली  मुंबईहून मेनका मासिक प्रसिद्ध झाले. मेनकाच्या पाहिल्याच अंकावर आचार्य अत्रे यांनी टीका केली. नावावरून हे मासिक काही तरी भयंकर असणार असे वाटे. कृष्णराव मराठे यांनीही त्यांच्यावर खटला भरला. त्याचा भरपूर मनस्ताप बेहरे दांपत्याला झाला. पण या खटल्याचा फायदाही झाला. त्यामुळे मासिकावर चर्चा खूप झाली. आणि त्यामुळे मासिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पहिल्या अंकापासून वाचकांनी हात दिला.

मेनका प्रकाशित झाल्यावर  राजाभाऊ पुण्याला आले. मग मेनकाच्या जोडीने माहेर इ .सन १९६३ व जत्रा इ. सन १९६५ ही नियतकालिके त्यांनी प्रकाशित केली. पु. भा. भावे, ग.दी. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर , जयवंत दळवी, श्री. ज. जोशी वसुंधरा पटवर्धन, ज्योत्स्ना, देवधर अशा अनेक दर्जेदार लेखन करणार्‍या लेखकांची भक्कम फळी त्यांनी उभारली.

बेहरे मोठे कल्पक होते. एकाच कादंबरीची विविध प्रकरणे विविध लेखकांना लिहायला सांगून कादंबरी पूर्ण करायाची, एकाच कथा देऊन चार पाच लेखक लेखिकांची नावे द्यायची व कथा कुणाची हे वाचकांना सांगायला सांगायचं, अशा अनेक कल्पना आपल्या मासिकाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी राबवल्या. त्यामुळे वाचकांचा सहभाग मिळत गेला.  पुढे राजाभाऊंनी ‘मेनका प्रकाशन’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे व. पु. काळे, मालती कारवारकर, प्रवीण दवणे, मंगला गोडबोले यांची पुस्तके प्रकाशित झाली.

पुरस्कार – १९८५ सालापासून ‘मेनका प्रकाशन ‘पु.भा. भावे’ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ५०००  रु. चा पुरस्कार देते. राजाभाऊंच्या निधनानंतर  म्हणजे २००० सालापसून सुमनताई बेहरे मासिकाच्या संपादिका होत्या. त्यांच्यानंतर आज ही मासिके अभय कुलकर्णी बघताहेत. त्यांच्या संपादकत्वाखाली मासिकांची लोकप्रीयता पहिल्यासारखीच टिकून आहे.

आज पु.वा. बहरे यांचा स्मृतीदिन. (२३ जानेवारी २०००) त्यानिमित्त या कल्पक प्रकाशकाला आदरांजली  

☆☆☆☆☆

दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी

 दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी हे आधुनिक मराठी साहित्याचे विख्यात समीक्षक आणि ललीत निबंधकार. त्यांचा जन्म २५ जुलै १९३४ चा. ते नागपूर विद्यापीठाचे पीएच. डी. होते, तसेच विदर्भ साहित्य संघाचे साहित्य वाचस्पती होते. डी. लिटच्या समकक्ष अशी ही पदवी आहे. नागपूर, पुणे, उस्मानाबाद विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक ग्रंथांचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश आहे. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध चर्चासत्रात आणि परिसंवादात भाग घेतला होता. काही वर्ष त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील मराठी साहित्य  विषयाचे तज्ज्ञ म्हणूनही काम केले. त्यांनी १९६४ ते १९९४ पर्यन्त ३१ वर्षे मराठीचे अध्यापन केले. अनेक उत्तम विद्यार्थी त्यांनी घडवले. प्राचीन ते अर्वाचीन आशा दीर्घ पटावर पसरलेल्या वाङ्मय प्रवाहाचे मर्मज्ञ , विचारवंत, भाष्यकार, मराठीभाषा व साहित्याचे व्रतस्थ निष्ठावंत अध्यापक, वाङ्मय विश्वातील नवागतांचे मार्गदर्शक ,नितांत सुंदर वक्ते म्हणूनही ते विख्यात होते.

स्वामी, गारंबीचा बापू, चक्र यांच्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केल्या.  आचार्य अत्रे, आनंदीबाई शिर्के, माधवी देसाई यांच्या आत्मचरित्रावर लिहिताना, आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराचे नवे आकलन स्पष्ट केले.

द.भिंची अनेक पुस्तके आहेत. त्यापैकी निवडक पुस्तके

१.अनन्यता मर्ढेकरांची, २. अपार्थिवाचा यात्री, ३. अपार्थिवाचे चांदणे, ( आठवणी ) ४. जी. एंची महाकथा, ५. कादंबरी _ स्वरूप आणि समीक्षा ६. तिसर्‍यांदा रणांगण ७. जुने दिवे नवे दिवे ८. देवदास आणि कोसला , ९. पस्तुरी १० पोएट बोरकर ११. मराठी वाङ्मयाचा इतिहास ( ४खंड) 

द. भिंना मिळालेले पुरस्कार – १. न्यूयॉर्क हेरॉल्ड ट्रीब्यूनचा उत्कृष्ट कथा पुरस्कार (१९५३) २. विदर्भ साहित्य संघातर्फे ‘साहित्य वाचस्पती’. ही पदवी डी.लिट.च्या समकक्ष आहे. ३. महाराष्ट राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार (१९९१ ) ४ कादंबरी स्वरूप आणि समीक्षा- म.सा. प. ज्येष्ठता ग्रंथ पुरस्कर ५. पु. भा. भावे पुरस्कार (२००७ ) ६ अंतरीक्ष फिरलो – महाराष्ट्र शासनाचा  उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार .

 गौरव, सन्मान –  मराठी प्राध्यापक परीषदेचे अध्यक्षपद

द. भिंना ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या विद्यार्थ्यांनी ‘समकालीन मराठी साहित्य प्रवृत्ती आणि प्रवाह’ हा अभिनंदनपर ग्रंथ संपादित केला.

श्यामला मुजूमदार यांनी ’समीक्षेची क्षितिजे’ नावाचा द. भी. कुलकर्णी गौरव ग्रंथ लिहिला.  

द. भी. कुलकर्णी यांचा जन्म २५ जुलै १९३४ चा. स्मृतीदिन आज २७ जानेवारी २०१६ चा

द. भिं च्या विद्वत्तेला सादर ,विनम्र आदरांजली.

☆☆☆☆☆

सदाशिव अनंत शुक्ल

सदाशिव अनंत शुक्ल  हे मराठीतील कवी, ध्येयवादी नाटककार, याशिवाय त्यांनी काही लघुकथा, चित्रपट कथा, गाणी, मुलांसाठी विविध प्रकारचे लेखन केले.  केवळ लेखनावर उपजीविका करणार्‍या मोजक्या साहीत्यिकांमध्ये ते होते. त्यांनी कुमुदबांधव या नावानेही काही लेखन केले. जन्मतारीख – १९०२. ते १२०वर्षे जगले. आज त्यांचा स्मृतीदिन.

 स. अ. शुक्ल यांच्या गाण्यांपैकी काही लोकप्रिय गाणी –

 १. अति गोड गोड ललकारी, २.आला हा जणू चंद्रमा, ३. कुठला मधु झाकार, ४. जादूगर नयन तुझे ५. ,दे चरणी आसरा, ६. नाचती ओठांवरी हे गीत माझे ७. बोल सख्या मधुबोल, ८.रमला कुठे ग कान्हा  

आपल्या गाण्यांनी एके काळी श्रोत्यांना वेध लावणार्‍या या प्रतिभावंताच्या प्रतिभेला सादर प्रणाम.     

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २५ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २५ जानेवारी –  संपादकीय  ? 

प्राचार्य मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर

प्राचार्य मधुकर दत्तात्रय हातकणंगलेकर हे मुळचे हातकणंगल्याचे. हे मराठीतील नावाजलेले समीक्षक होते. त्यांचा जन्म १फेब्रुवारी १९२७ला हातकणंगले येथे झाला. सांगली ही त्यांची कर्मभूमी. त्यांचे अध्यान आणि अध्यापन दोन्हीही सांगलीत झाले. त्यांनी पुढच्या काळात अनेक लेखक घडवले. विश्वास पाटील, राजन गवस, दादासाहेब मोरे , ही त्यातील काही महत्वाची नावे. त्यावेळी नवोदित असणारी, नामदेव माळी, दिलीप शिंदे, चैतन्य माने दयासगर बन्ने अशा अनेक नवोदितांना लिहिते केले.

मराठीतील अक्षर वाङ्मय इंग्रजीत अनुवादीत करून त्यांनी मराठीचे स्थान देशात आणि जागतिक पातळीवर उंचावायचे काम केले. महाराष्ट्राच्या बाहेरच्या भारताला आणि जागतिक विश्वाला मराठीतील कसदार लेखन पोचवण्याची त्यांची कामगिरी मोलाची आहे.

हातकणंगलेकर वास्तविक इंग्रजीचे प्राध्यापक पण त्यांचा मराठी व्यासंग दांडगा. त्यातूनच त्यांच्या ललित लेखनाला प्रारंभ झाला. पुढे ते समीक्षात्मक लेखन करू लागले. नवभारत, वसंत, वीणा, महाद्वार इ. नियतकालिकातून त्यांचे लेखन गाजू लागले. सुप्रसिद्धा लेखक जी. ए. कुलकर्णी यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. पुढच्या काळात त्यांच्याशी जी. एंचा झालेला पत्रव्यवहार ४ खंडात  त्यांनी प्रकाशित केला आहे. 

नंतर त्यांनी अनेक इंग्रजी कथांचा मराठीत अनुवाद केला. तर गो. नि. दांडेकर यांच्या ‘माचीवरील बुधा’ व व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘सती’ या कादंबर्यांंचे इंग्रजीत अनुवाद  केले.

त्यांनी समीक्षा केलेल्या अनेक कादंबर्यां आणि साहित्याबद्दल त्यांनी मांडलेली मते ठाम आणि परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्या समीक्षेला मराठी साहित्यात चांगले वजन प्राप्त झाले.

म. द. हातकणंगलेकर यांनी  साहित्य संस्कृतिक मंडळ तसेच विश्वकोश मंडळावर अनेक वर्षे  काम केले..

म. द. हातकणंगलेकर यांचे   प्रकाशित साहित्य —

समीक्षा – १. साहित्यातील अधोरेखिते  २. मराठी साहित्य प्रेरणा आणि प्रवाह  ३. निवडक मराठी समीक्षा ४. मराठी कथा रूप आणि परिसर  ५. साहित्य विवेक

ललित – १. आठवणीतील माणसं, २. भाषणे आणि परीक्षणे, ३. उघड झाप (आत्मचरित्र ) ४. विष्णु सखाराम खांडेकर

संपादन – १. जी. एंची निवडक पत्रे ( १-४ खंड), २. वाङ्मयीन शैली आणि तंत्र,  ३. निवडक ललित शिफारस

गौरव – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन -८१ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फेब्रुवारी (२००८)

या प्रसगी केलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाली होते, ‘या साहित्य संमेलनाचे वेळी विद्रोही अगर समांतर संमेलनाचा विषय गाजतो, होणारे संमेलन हे सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक असावे. विद्रोही साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. मराठी साहित्यातील अनेक चुकीच्या प्रथांवर व चुकीच्या परंपरांवर त्यांनी प्रहार केला.

२. ‘सांगली भूषण’ पुरस्कार  ( ३१ डिसेंबर २०१४ )

आज म. द. हातकणंगलेकर यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या विद्त्तेला सादर वंदन

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २४ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २४ जानेवारी –  संपादकीय  ? 

आनंद विनायक जातेगावकर

आनंद विनायक जातेगावकर हे कथा लेखक आणि कादंबरीकार होते. त्यांच्या कथा प्रामुख्याने ‘सत्यकथा’ आणि ‘मौज’ दिवाळी अंकामध्ये मध्ये येत. या नियतकालिकांमधून ७० ते ८० च्या दशकात ज्या कथा प्रसिद्ध झाल्या, त्यांचा ‘मुखवटे’ हा संग्रह प्रसिद्ध झाला.  हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह.

पंजाबराव कृषी विद्यापीठात अ‍ॅग्रिकल्चर मॅथमॅटिक्स या विषयाचे त्यांनी अध्यापन केले. त्यांना त्याबद्दल आदर्श शिक्षक हा पुरस्कारही मिळाला होता.

आनंद जतेगावकर यांची प्रकाशित पुस्तके

कादंबर्‍या – १. अस्वस्थ वर्तमान, २ . ज्याचा त्याचा विठोबा, 3. डॉ. मयंक आर्णव, ४. मी मी उर्फ सेल्फी, ५. श्रीमंत गोपिकाबाईंची बखर ६. कैफियत – फ्रांज काफ्का यांच्या ‘ट्रायल’  या कादंबरीवर आधारित 

७. कथासंग्रह – – मुखवटे  

८.बाहू उभारून दोन  – नाटक

९. ललित – व्यासांचा वारसा

–पुरस्कार

  • मुखवटे कथासंग्रहाला महराष्ट्र शासनाचा पुरस्कार (१९७५)
  • कैफियत या कादंबरीला महराष्ट्र शासनाचा राम गणेश गडकरी पुरस्कार (२०११)
  • अस्वस्थ वर्तमान या कादंबरीला मॅजिस्टिक प्रकाशनाचा जयवंत दळवी पुरस्कार.

जातेगावकर यांचा जन्मदिन ६ जून १९४५ तर स्मृतिदिन २४ जानेवारी २०१६  आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे आदरपूर्वक स्मरण

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २३ जानेवारी – संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? २३ जानेवारी –  संपादकीय  ?

२६ मे- कवी गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरींचा आज जन्मदिन - MH20 News : Aurangabad Latest News | Live News | Happenings

राम गणेश गडकरी :

कविवर्य गोविंदाग्रज, विनोदी लेखन करणारे बाळकराम आणि लोकप्रिय नाट्यलेखक राम गणेश गडकरी यांना तुम्ही ओळखता का असे कुणी विचारले तर बिनधास्तपणे तिघांनाही ओळखतो म्हणून सांगावे.कारण हे तिघेही एकच आहेत.

रा.ग.गडकरी यांनी गोविंदाग्रज या टोपणनावाने काव्यलेखन केले तर बाळकराम या नावाने विनोद लेखन केले.गडकरी या नावाने नाट्यलेखन केले असले तरी नाट्यसृष्टीत ते गडकरीमास्तर या नावाने ओळखले जात होते.

गडकरी यांच्या लहानपणीच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले.त्यांचा गोविंद हा लहान भाऊही गेला.त्यानंतर ते पुण्याला आले.न्यू इंग्लिश स्कूल व नंतर फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले.त्याच वेळेला त्यांचा किर्लोस्कर नाटक मंडळीशी संबंध आला.ते त्यांच्या’ रंगभूमी ‘ या मासिकात लेखन करू लागले.तसेच शि.म.परांजपे यांचा ‘काळ’ व ह.ना.आपटे यांच्या ‘करमणूक’या मासिकातून लेख,कविता लिहू लागले.त्याच वेळी त्यांचे नाट्यलेखनही चालू होते.

एकच प्याला,गर्वहरण,पुण्यप्रभाव,प्रेमसंन्यास, भावबंधन,राजसंन्यास,वेड्याचा बाजार या गडक-यांच्या नाट्यकृती. एकच प्याला व भावबंधन ही नाटके अत्यंत लोकप्रिय ठरली.या नाटकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक सर्व नावे पाच अक्षरी आहेत.

केवळ नाटकेच नव्हे तर एकच प्याला मधील सुधाकर,तळीराम,सिंधु आणि भावबंधन मधील घनश्याम आणि लतिका ही पात्रे आजही लोकप्रिय आहेत.उत्कृष्ट संवाद हे या नाटकांचे आणखी एक वैशिष्ट्य . गडकरी हे मराठीचे शेक्सपियर होते असे  म्हणतात ते योग्यच आहे.

वाग्वैजयंती हा गोविंदाग्रजांचा एकमेव कविता संग्रह.मात्र यात छंदोबद्ध कवितांपासून मुक्तछंदातील कवितेपर्यंत सर्व प्रकार वाचावयास मिळतात.तसेच अगदी लहान म्हणजे चार ओळींच्या कविताही आहेत आणि प्रदीर्घ कविताही आहेत.

बाळकराम यांनी नाट्यछटा,संवाद,विडंबन यातून विनोदी लेखन केले आहे .हे सर्व लेखन उच्च अभिरुची संपन्न आहे.संपूर्ण बाळकराम हे पुस्तक याचे द्योतक आहे.

याशिवाय गडकरींनी स्फुट लेखन केले आहे.तसेच चिमुकली इसापनीती हे जोडाक्षर विरहीत छोटेसे पुस्तकही लिहीले आहे.

आचार्य अत्रे,वि.स.खांडेकर,ना.सि.फडके,रा.शं.वाळिंबे, भवानीशंकर पंडित,प्रवीण दवणे अशा अनेक नामवंत साहित्यिकांनी गडकरी यांचे जीवन व साहित्य यावर विपुल लेखन केले आहे.त्यांच्या नावे नाट्य स्पर्धाही घेतल्या जातात. महाराष्ट्र शासनातर्फे दिवंगत नाट्य कलाकाराच्या पत्नीला पुरस्कार दिला जातो.तो गडकरी यांच्या पत्नी रमाबाई गडकरी यांच्या नावे दिला जातो.

साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा निर्माण करणारा हा महान साहित्यिक वयाच्या अवघ्या चौतिसाव्या वर्षी स्वर्गवासी झाला.

आज त्यांचा स्मृतीदिन.त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम.!! 

☆☆☆☆☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ: विकीपीडिया

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ २१ जानेवारी – संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? २१ जानेवारी –  संपादकीय  ? 

माधव भास्कर आचवल

माधव भास्कर आचवल हे वास्तुशास्त्रज्ञ होते, तसेच मराठीतले एक चांगले लेखकही होते. ते काही काळ महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ बडोदा येथे प्राध्यापक होते. त्यांचे ललित लेखन सत्यकथा मध्ये सुरुवातीला छापून आले. निसर्गातील, तसेच मानवनिर्मित कलाकृतींचा आस्वाद घेणारे रसिक मन त्यांच्यापाशी होते. जगण्यातील चैतन्यशीलता कवेत घेणारी संवेदनशीलता त्यांच्यापाशी होती.  सौंदर्यासक्त, आनंदी वृत्तीचा प्रत्यय त्यांच्या ललित लेखनातून येतो.  उत्कटता, सळसळता उत्साह, यांच्यासह जगण्याची उर्मी, प्रसंन्नता, निरागस खेळकरपणाहे गुण त्यांच्या ललित लेखनात दिसतात. चिंतनशीलता, कठोर विश्लेषण, जगण्यातील मार्दव, कारुण्य यांची जोपासना आशा दोन अंगांनी झालेला विकास त्यांच्या लेखनातून दिसून येतो. त्यांचा जन्म ३ नोहेंबर १९३६चावाङ्मय आणि कला या त्यांच्या पुस्तकात. त्या वेळची विश्राम बेडेकर यांची गाजलेली कादंबरी रणांगणआणि ताजमहाल या जगप्रसिद्ध वास्तुशिल्पाचे रसग्रहण आहे. जास्वंद या त्यांच्या समीक्षेच्या पुस्तकात गंगाधर गाडगीळ, इंदिरा संत, पु. शि. रेगे, चिं. त्र्यं. खानोलकर, जी.ए.कुलकर्णी यांच्या साहित्य कृतींवर केलेली समीक्षा प्रसिद्ध आहे.

मर्ढेकरांच्या नंतरच्या काळात नवसमीक्षेच्या प्रवाहातील समीक्षक म्हणून माधव आचवल यांचे नाव आदराने घेतले जाते.

माधव  आचवल यांचे प्रकाशित साहित्य-

१. पत्र, २. रसास्वाद: वाङ्मय आणि कला, ३. डार्करूम आणि इतर एकांकिका, ५. चिता आणि इतर एकांकिका, ६. अमेरिकन चित्रकला (अनुवादीत)

कीमया आणि प्रदक्षिणा- भाग २ ( मराठी साहित्याचा इतिहास ) या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले.

आज त्यांचा स्मृतिदिन.  (२१ जानेवारी १९८०)  या निमित्याने माधव आचवल या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वास मन:पूर्वक श्रद्धांजली.

☆☆☆☆☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : शिक्षण मंडळ कर्‍हाड: शताब्दी दैनंदिनी, इंटरनेट    

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print