मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परत येण्याची वेळ ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ परत येण्याची वेळ ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

आपण आयुष्याचे 40/50 वर्षे पुर्ण केली असल्यास, “परत फिरण्याची” तयारी सुरू करा….आपल्याकडे असलेल्या, जमा केलेल्या सर्व गोष्टी आपल्यासाठी निरुपयोगी होण्याअगोदर ! 

‘ का आणि कुठे परत फिरावे आणि कसे परत फिरावे ?’ —-

जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी, आणि परत जाण्याचा निर्णय घेण्यासाठी मला टॉलस्टॉयची प्रसिद्ध कथा आठवते—

* परत येणे ….. कधीच सोपे नसते *

एक माणूस राजाकडे गेला. म्हणाला “ मी गरीब आहे, माझ्याकडे काहीही नाही, मला मदतीची आवश्यकता आहे. “   

राजा दयाळू होता. त्याने विचारले:” कोणत्या मदतीची आवश्यकता आहे?”

माणूस म्हणाला:” कसायला थोडी जमीन द्या.” 

राजा म्हणाला: “ उद्या सकाळी सूर्योदयानंतर ये. तू चालू शकशील, धावू  शकशील तो संपूर्ण प्लॉट तुझा होईल. पण  लक्षात ठेव, जिथुन धावणे सुरू करशील तिथेच सूर्यास्तापर्यॅत तुला परत यावे लागेल, अन्यथा काहीही मिळणार नाही ! “ 

माणूस खूश झाला. तो सूर्योदय होताच पळायला लागला — पळत राहिला. सूर्य माथ्यावर चढला होता—पण माणूस धावायचं थांबला नाही—अजून थोडी मेहनत– मग संपूर्ण आयुष्यभर विश्रांती ! 

संध्याकाळ होणार होती आणि त्या माणसाला आठवलं, त्याला परत यावं लागेल, नाहीतर त्याला काही मिळणार नाही ! त्याने पाहिले की तो खूप दूर आला आहे— आता परत यायचे होते– सूर्य पश्चिमेकडे वळला होता– तो थकला होता. परत पोहोचायचे होते–पण वेळ वेगाने निघून जात होती —अजून थोडी मेहनत–न थांबता तो पूर्ण वेगाने धावू लागला –पण आता श्वास घेणं कठीण झालं होतं. तो खाली पडला— आणि अखेर त्याने शेवटचा श्वास सोडला ! 

राजा हे सर्व पहात होता. तो त्याच्या सहकाऱ्यांसह तिथे पोहोचला. त्याने काळजीपूर्वक त्या मृतदेहाकडे पाहिले आणि म्हणाला:—-

* याला फक्त सात फुट जमीन हवी होती. बिचारा काही कारण नसताना  इतका पळत होता ! *

—–आता आपण त्या माणसाच्या जागी स्वत:ला ठेवून विचार करा. आपण तीच चूक करीत नाही ना ? आपल्या गरजा मर्यादित आहेत, परंतु आपल्या इच्छा असीम आहेत ! आम्ही जास्त मिळवण्याच्या मोहात परत येण्याची तयारी करत नाही. आणि जेव्हा आम्ही ती करतो तेव्हा खूप उशीर झालेला असतो—-मग आपल्याकडे काहीही शिल्लक राहत नाही.

मी जीवनाच्या शर्यतीत सामील होतो..आजपर्यंत मी कुठे पोचलो? मला कुठे जायचे आहे आणि मला किती दिवसात पोहोचायचे आहे? जर मी असेच चालत राहिलो तर मी कोठे व किती काळात पोहोचेन?  हे सगळे प्रश्न एकदा निवांतपणे स्वत:ला विचारुन बघा! 

सूर्यास्ताची वेळ लक्षात घेतल्याशिवाय आपण सर्व जण पळत आहोत. अभिमन्यूलाही परत जाण्याविषयी माहिती नव्हती. आम्ही सर्व अभिमन्यूच आहोत. आम्हालाही कसे परत फिरावे  हे माहित नाही—- 

थोडं थांबा, आजूबाजूला पहा. धावता धावता प्रवासाचा आनंद लुटायचा राहून गेलाय. किमान आज या एका क्षणापुरतं तरी खूश व्हा. 

काळजी घ्या—आनंदी रहा—सुरक्षित रहा. 

 

संग्राहक : – सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गूगल मॅप ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य? 

☆ गूगल मॅप ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आपण कार चालवत असताना गुगल मॅप वापरतो. गुगल मॅपने चालताना जर ड्रायव्हर मॅपप्रमाणे वळण न घेता पुढे गेला, तर गुगल मॅपचा निवेदक रागवत नाही. चुकीवर बोलत बसत नाही.  तर मॅप  “रिरुट”  करतो.  पुन्हा योग्य आणि जवळचा मार्ग गुगल मॅप सांगतो.

जीवनातील असंच एखादं वळण चुकलं, तर त्याची चूक काढत बसण्यापेक्षा 

आपणही स्वतःला किंवा आपल्या संपर्कातील लोकांना  “रिरुट”  करायला शांतपणे आणि सहजपणे “भाग” पाडले पाहिजे.

 झालेल्या चुकांवर भर देऊन निराशाजनक वातावरण तयार करण्यापेक्षा 

“रिरूट ” करून आशादायी वातावरण तयार करणे कधीही चांगले…

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भुलभुलैया… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ भुलभुलैया… ☆ संग्राहक – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

१३ ऑक्टोबर.. !

इतिहासातल्या ज्या ज्या घटनांनी जग बदललं, त्यातली एक घटना 1846 साली या दिवशी घडली होती.   

अनॅस्थेशीयाच्या शोधाअगोदर कोणतीही शस्त्रक्रिया करायची असेल तर एकतर त्या रुग्णाला चार दणकट माणसं धरुन ठेवत किंवा त्याच्या डोक्यात मारून त्याला बेशुद्ध केलं जाई. किंवा त्याला भरपूर दारू/अफू/मँड्रेक दिलं जाई.. पण हा सगळा मामला बेभरवशाचा असे. मध्येच शुद्धीवर येऊन रुग्ण गुरासारखा ओरडत असे. भुलीची अशी ‘खौफनाक’ परिस्थिती असल्याने त्याकाळी ऑपरेशन्स पण मर्यादित होत असत. अगदी जीवावर बेतल्याशिवाय कोणीही स्वतःवर सर्जरी करून घेत नव्हतं.. पण इतिहासातल्या या दिवशी ही परिस्थिती बदलली..

होरॅस वेल्स यांच्यानंतर ‘विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन’ असं लांबलचक नाव असलेल्या एका माणसानं तब्बल दोन वर्षे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर मॅसेच्युसेटच्या जनरल हॉस्पिटलमध्यल्या बुल्फिन्च अँफीथिएटरमध्ये जाहीर डेमोन्स्ट्रेशन ठेवलं. ( त्याकाळी ऑपरेशन्स जाहीररित्या अँफी थिएटरमध्ये होत असत. म्हणून त्याला तेव्हा ‘ऑपरेशन थिएटर’ असं म्हणलं जात असे. तेव्हापासून आजतागायत ऑपरेशनच्या खोलीला ‘ऑपरेशन थिएटर’च म्हटलं जातं). त्या दिवशीचा तो भुलेचा जाहीर प्रयोग यशस्वी झाला.. तो दिवस होता १६ ऑक्टोबर १८४६…. आणि या दिवसापासून वैद्यकशास्त्रातील या नव्या पर्वाला सुरुवात झाली. We have conquered pain ! अशा अर्थाच्या हेडलाईन्सनी दुसऱ्या दिवशीचे सगळे न्यूजपेपर भरून गेले.. नंतर लंडन, पॅरिस, बर्लिन, पीटर्सबर्ग अशा अनेक ठिकाणी ‘इथर’ वापरून शस्त्रक्रिया झाल्या, आणि अनॅस्थेशियाच्या शोधावर शिक्कामोर्तब झाले.  

आणि मानवाने वेदनेवर विजय मिळवला !!

पुढे जसजसा खात्रीलायक भुलेच्या औषधांचा शोध लागला आणि हे शास्त्र विकसित होत गेलं, तसतशी सर्जरीने पण गरुडझेप घेतली.. आज अत्यंत गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया लीलया पार पडतात याचे श्रेय निश्चितच, खात्रीलायक असलेल्या आणि जास्तीत जास्त अचूकतेकडे गेलेल्या अनेस्थेशीयाला आहे..

भूलतज्ञ होण्यासाठी MBBS नंतर 3 वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (MD) आहे. यात रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये आणल्यापासून ते बाहेर काढेपर्यंत त्याच्या हृदयाचे ठोके कमी जास्त करणे, त्याचा बीपी कंट्रोल करणे, त्याचे मेंदू/किडनी/लिव्हर यांच्या कामाचे रेकॉर्ड ठेवणे, सगळ्या सिस्टिम्सची काळजी घेणे आणि त्यांचे कार्य कंट्रोलमध्ये ठेवणे, याचं अत्यंत क्लिष्ट शिक्षण अंतर्भूत आहे. त्यात Critical care आणि Pain management ही आहे.. 

रुग्णाच्या बेशुद्धावस्थेत त्याचा श्वास बंद पडलेला असतो, तेव्हा भूलतज्ञच कृत्रिम श्वास देऊन त्याच्या जीवनरथाचा सारथी बनलेला असतो. आणि रुग्णाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी झगडत असतो. पण रुग्णांच्या लेखी तो ‘गुमनाम’च असतो.. कित्येकांना आपलं ऑपरेशन कोणत्या डॉक्टरनं केलं त्यांचं नाव तर माहीत असतं, पण भूल कोणत्या डॉक्टरांनी दिली होती, हे मात्र बऱ्याच जणांना सांगता येत नाही.. मला सांगा, किती जणांना आपल्या भूलतज्ञाचं नाव माहिती आहे.?  आणि ऑपरेशननंतर कितीसे पेशंट ” मला ऑपरेशनच्या वेदना जाणवू न देणाऱ्या भूलतज्ञाचे आभार ” अशा शब्दांत भावना व्यक्त करतात बरं.?! 

आपण आपल्यासाठी अन्न निर्माण करणाऱ्या बळीराजाबद्दल कृतज्ञ असतो, सीमेवर आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल हळवे असतो, पण आपल्याला ऑपरेशनदरम्यानच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानायचे असतात, याबाबतीत मात्र एकंदरीत समाजातच उदासीनता दिसून येते.. यावर वर्तमानपत्रात ना कुणाचे लेख येतात.. ना कुठे भूलतज्ञाचा सत्कार होतो.. ना इतर डॉक्टरांसारखी प्रसिद्धी कोणा भूलतज्ञाच्या नशिबी असते..

मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा देखील भूलशास्त्र विषय घेण्याकडे ओढा तसा कमीच असतो. कारण एकतर प्रसिद्धी मिळत नाही, त्यामानाने मोबदलाही मिळत नाही, पण उलट रिस्कचे आणि स्वतःवर येणाऱ्या स्ट्रेसचे प्रमाण खूपच जास्त असते !!

पण काहीही असलं तरी एक मात्र खरं की, इतर सगळे डॉक्टर्स हे जरी पेशंटला ‘ आजारातून बरं करणारे ‘ असले तरी, – भुलेदरम्यान जगण्या- मरण्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या पेशंटला सहजगत्या ठीक ठेवणारे– वेळ आली तर पेशंटला मरणाच्या दारातून खेचून आणू शकणारे.. आणि पदोपदी पेशंटच्या आणि साक्षात यमाच्यामध्ये उभे राहणारे मात्र, फक्त आणि फक्त ‘ भूलतज्ञ ‘च असतात.. 

अशा या पडद्यामागच्या हिरोंचे आभार मानण्याचा आणि त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे..

या जागतिक भूलदिनाच्या सर्व मानवजातीला शुभेच्छा !!

 

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा.….किशोर अभ्यंकर ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा.….किशोर अभ्यंकर ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

(सांजवात ….एक अनुभव)

नमस्कार,

साधारण २५ वर्षापूर्वी मी आणि माझे पती पवई येथील चिन्मयानंद स्वामींच्या आश्रमात गेलो होतो . तेथील शंकर मंदिराच्या आवारात आम्ही बसलो असता ..तेथे बाजूला बसलेल्या एका अमराठी हिंदी भाषिक वयस्कर काकांनी पण आमच्या गप्पात भाग घेतला. त्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली ती अशी—–

काका: आपण सर्वजण संध्याकाळी देवाला दिवा लावतो.

आम्ही : हो बहुतेक सर्व हिंदू लोकं.

काका : का लावतो?

आम्ही : पूर्व परंपरा, घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते !

काका : वेळ कोणती ?

आम्ही : सूर्यास्तानंतर घरच्या गृहिणीच्या सवडीनुसार !

काका : असे का ?

मी: घरातल्या पुरुषवर्गांनी आम्हाला दिलेला हा एकमेव अधिकार.  

काका: आता मी काय सांगतो ऐका… योग्य वाटल्यास त्याचे आचरण करा.. त्याची अनुभूती किंवा प्रचीती आल्यास इतरांना सांगा 

काका: दिवा नेहमी संध्याकाळी ७.३७ मिनिटांनी लावावा.

आम्ही: ७.३७ च का? सर्वांची घड्याळे सारखी नसतात … मग त्याचे काय?

काका : असे सांगितले जाते की जगाची जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात तेजोवात अखंड तेवत असते  परंतू  तेथेही एक सांजवात  संध्याकाळी ७.३७ वाजता लावली  जाते. ती सांजवात सूक्ष्म रूपाने अखंड भारत वर्षात घरोघर जाऊन जेथे जेथे दिवा लागला असेल त्या घराचे क्षेम कुशल विचारून पुन्हा जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या  मंदिरात तेवत असलेल्या तेजोवातीमध्ये विलीन होते.  त्या घराची, घरधन्याची सुख-दुःखे सांगते. आई कामाक्षी देवी त्याप्रमाणे सर्व अमंगल, अडचणी दूर करते.

आम्ही: ह्या विज्ञान युगात हे खरे कोण मानणार. ह्यावर कोण विश्वास ठेवणार?

काका : तुम्ही तर ठेवाल ना ? तुम्हाला अनुभव आल्यावर इतरांना सांगा किंवा मी नेहमी येथेच असतो मला येऊन सांगा !

आम्ही त्याप्रमाणे दररोज संध्याकाळी ७.३७ ला दिवा लावणे सुरु केले. खरं सांगू  का? काही दिवसाच्या आत आमच्या घरात, आमच्या आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. हा अनुभव आम्ही इतरांना सांगितला …त्यानाही खूप चांगला अनुभव आला … तुम्हालाही असा अनुभव येवो ही इच्छा!

हा आमचा अनुभव ऐकायला ते काका त्या दिवसापासून तेथे आजतागायत दिसले नाहीत.

आई कामाक्षी देवी तुम्हा सर्वांचे भले करो !!!

 – किशोर अभ्यंकर

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

(रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस  मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी ! ) इथून पुढे —-

निजामाने  संयुक्त राष्ट्रसंघाकडे भारताच्या  संभाव्य हस्तक्षेपाबद्दल तक्रार नोंदवली. परिस्थिती ओळखून 9 सप्टेंबर 1948 रोजी श्री. वल्लभभाई पटेल व पंडित नेहरू यांनी सशस्त्र दलाच्या कारवाईचा निर्णय घेतला . रझाकारांची  दहशत आणि जुलूम मोडून काढण्यासाठी ‘कबड्डी ‘, ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर 13 सप्टेंबर 1948 ला पहाटे चार वाजता जनरल राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांनी ‘ पोलो ‘ नावाने सैनिकी अँक्शन सुरु केली.  संस्थानच्या तिन्ही बाजूंनी सैन्याने प्रवेश सुरू केला. दोन तासात नळदुर्ग व  तुळजापूर आणि संध्याकाळपर्यंत दौलताबाद काबीज केले. औरंगाबादकडून मेजर जनरल डी. एस. बार यांनी चढाई सुरू केली. तुंगभद्रेवरचा पूल ताब्यात घेतला. तेरणा नदीवरचा पूल उडवला. वरंगळ व बिदरच्या विमानतळावर बाँबफेक केली. 14 सप्टेंबरला जालना, उस्मानाबाद ,येरमाळा, कर्नूल येथील रझाकारांचा  प्रतिकार मोडून काढला.  हुमणाबाद आणि शहागडचा पूल ताब्यात घेतला. 15 सप्टेंबरला औरंगाबाद फत्ते झालं. निजामाचे सैनिक आणि रझाकार मिळून बाराशे जण मारले गेले. भारताचे दहा जवान धारातीर्थी पडले .निजाम सेनेचे प्रमुख अल इद्रिसने 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती पत्करली. कासिम रझवी पाकिस्तानात गेला. अटक टाळण्यासाठी निजाम उर्फ मीर उस्मान अली खान याने हैदराबाद रेडिओवरून शरणागती जाहीर केली. लगेच २० सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाकडे केलेली तक्रार मागे घेतली. ” निजामाच्या राजवटीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला तर लक्षावधी मुस्लीम प्रतिकारासाठी उतरतील ” अशी धमकी दिली होती. योगायोग असा की कारवाई झाली, त्याच दिवशी जिना यांचं निधन झालं. प्रत्यक्षात हैदराबादचं विलीनीकरण सहजपणे झालं. हैदराबादला  तिरंगा मोठ्या डौलाने फडकायला  लागला. लोक  निजामाच्या जाचातून मुक्त झाले. हैद्राबाद संस्थान, देशाचा अविभाज्य भाग झाला. लोक आनंदोत्सव साजरा करू लागले. हैदराबाद मुक्त झालं तरी, अन्याय्य समाजव्यवस्था मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांचा सशस्त्र मुक्ती-लढा चालू ठेवणं आवश्यक आहे, असं म्हणून कम्युनिस्टांनी 1951 पर्यंत आपला लढा चालू ठेवला. 21 ऑक्टोबर 1951 ला देशातील मोठा सशस्त्र लढा संपुष्टात आला. दोनशे वर्षांची इस्लामी राजवट संपुष्टात आली. संपूर्ण भारताचं स्वप्न साकार झालं.

रोज सूर्य उगवतच होता.  पण 15 ऑगस्ट 1947 दिवशी उगवणारा सूर्य वेगळा होता. स्वातंत्र्याची एक रम्य पहाट घेऊन तो उगवला होता. कवी वसंत बापट यांना तेव्हा इतके छान शब्द सुचले होते—-

“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट.

नव अरुणाचे होऊ आम्ही प्रतिभाशाली भाट “

यावर्षी, भारताच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्षी, म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षी, सर्वांनी मिळून  नव अरुणाची  स्तुतिसुमने गाऊया. आणि पुढील शताब्दी महोत्सवापर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करू या.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

(न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.) इथून पुढे —

निजामाने आंदोलने, चळवळी यावर दडपशाही आणि सैन्य दलाचा वापर सुरू केला. त्यासाठी त्यांनी, ‘ इत्तेहादुल मुस्लिमिन ‘ ही राजकीय संघटना, आणि ‘रझाकार ‘ हे सशस्त्र स्वयंसेवक दल स्थापन केले. आणि दहशत माजवायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. रझाकार यांचा आक्रमक व क्रूर नेता ,लातूरचा ‘कासीम रिजवी’ याला हाताशी धरून, सांप्रदायिक भावनेला खतपाणी घालणाऱ्या वृत्तीला उत्तेजन दिलं. शेतातील उभी पिके कापणे, गोठ्यातील जनावरे पळवून नेणे, स्त्रियांना पळवून नेणे, बलात्कार करणे, पुढाऱ्यांचे खून करणे, किती किती म्हणून अमानुष अत्याचार चालले होते. 1946 ते 48  अशी 2 वर्षे जनतेने भीतीदायक वातावरणात  काळरात्रीसारखी काढली .संस्थानात स्त्रियांचे स्थान बालविवाह ,बालविधवा, अज्ञान, निरक्षरता ,दारिद्र्य, अंधश्रद्धा यांनी बरबटलेले होते. अशा परिस्थितीतही ,अनेक कर्तबगार स्त्रियांनी या सत्याग्रहात उडी घेतली होती. दगडाबाई शेळके, वाघमारे ,कुँवर ,पोटेचा, वैशंपायन ,सुशिलाबाई दिवाण यांनी केलेला कामातील सहकार खूपच महत्वपूर्ण ठरला. पत्रके वाटणे ,ग्रंथालयाचे काम, सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती ,अशी कामे त्या करत. “हैदराबाद मुक्ती संग्रामातील महिलांचे योगदान” हा एक स्वतंत्र संग्राम म्हणून ओळखला जातो. मला अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की त्या काळी स्त्रीशिक्षणाच्या तळमळीने, सुशिलाबाई दिवाण यांनी लातूरला मुलींची शाळा सुरू केली. त्या माझ्या मैत्रिणीच्या आई होत. त्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या समारंभात, त्यावेळचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांनी व्यासपीठावरून उतरून, त्यांना नमस्कार करून, सत्कार करून, त्यांच्या कार्याची पोचपावती दिली .

कासीम रझवीचा  हैदोस चालू होता. जवळा हे गावच्या गाव जाळून टाकलं. अनेक कुटुंबांनी स्थलांतर केलं. निजाम हा रेडिओ, वृत्तपत्रं, भाषणं, आदिद्वारे भारत विरोधी प्रचार करून, स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा पुनरुच्चार करीत असल्याचं स्पष्ट झालं .माऊंटबॅटननेही  पुढाकार घेतला. पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले .अखेर सैनिकी कारवाईचा गांभीर्याने विचार होऊ लागला. ही बातमी निजामाला समजली. त्याने अगोदरच, पोर्तुगाल आणि पाकिस्तानकडून हवाईमार्गाने, तीस लाख  पौंड किमतीची शस्त्रास्त्रे खरेदी करून ठेवली होती. 29 नोव्हेंबर 1947 रोजी त्याच्यासोबत ‘ जैसे थे ‘ करार केला होता. ( भारताशी पूर्ववत् संबंध व संस्थानात शांतता राखावी .) तो करार धुडकावून ,त्याने पाकिस्तानकडे मदत मागितली. कराचीमध्ये आपल्या संस्थानाच्या प्रतिनिधीची नेमणूक केली. भारताचे 20 कोटीचे कर्जरोखे पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी वापरले.

अखेरचा उपाय म्हणून 9 सप्टेंबर 1948 रोजी गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला. आता प्रत्यक्ष लढाई सुरू होणार होती .त्याच दरम्यान, मला माझ्या आईवडिलांनी घेतलेल्या अनुभवाचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो. त्यावेळी मिरज लातूर रेल्वेमार्गावर ढोकी नावाचे स्टेशन होते. निजाम संस्थान, आणि भारताच्या सरहद्दीवरचे ते स्टेशन. माझे वडील तात्या तेथे स्टेशन मास्तर म्हणून रुजू होते. स्टेशनच्या संरक्षणासाठी इब्राहिम, रसूल आणि महंमद हे रखवालदार होते. अनेक स्टेशन मास्तरांनी, आपल्या कुटुंबांना गावी पाठवले होते. अपवाद माझी आई.! स्टेशन मध्ये रोज खुनाच्या, अंदाधुंदीच्या नवनवीन बातम्या यायच्या. गावचा पाटील किशनदास गरड साडी नेसून चुलीजवळ जाऊन बसला. रझाकारांनी ओढत त्याला बाहेर आणले. आणि त्याच वेषात  खच्च केले. रेल्वे स्टेशनमध्ये आप्पा पोर्टरचा खून झाला. तात्या ‘नको नको रे ‘ म्हणत असता “आता तुम्हालाही फुंकून टाकू. गप्प बसा ” ,शब्द ऐकायला येऊ लागले. मुसलमान स्त्रिया बाळांना दूध मागण्यासाठी मागच्या अंगणात आल्या. जात धर्म न पाहता तंग वातावरणातही  आईने माणुसकी जपली. म्हैस व्यालेली होती .लहान बाळांना  का जात धर्म असतो ? असं म्हणून बाळांसाठी दूध  देऊन त्यांना परत पाठवून दिलं .तात्याही गावकऱ्यांना शक्य होईल ती मदत करत होते. रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस  मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी !

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट” हे गाणं मनावर रुंजी घालत होतं. आणि तेव्हाच ‘स्वातंत्र्याची गाथा’, मला डोळ्यासमोर दिसायला लागली. यावर्षी आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. अमृत महोत्सव साजरा होत आहे.गेल्या 75 वर्षांचा लेखाजोखा पहाण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यासाठी कित्येकजण आपल्या संसारावरच काय,पण आयुष्यावरही तुळशीपत्र ठेवून मृत्यूला सामोरे गेले आहेत. इंग्रजी सत्ता संपुष्टात आणण्यात यश मिळालं, पण तरीही पूर्णविराम झालाच नव्हता.

1947 पर्यंत 600 पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थाने भारतात होती. त्यांना मर्यादित स्वायत्तता असली तरी, सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. महात्मा गांधींची भूमिका, स्वातंत्र्याबरोबरच सरंजामशाही संपुष्टात आणून,खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होऊन, अखंड भारत व्हायला हवा, अशी होती. त्यावेळेचे गृहमंत्री श्री वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांशी बोलणे करून, त्यांना पटवून, भारतात विलीन करून घेतले. शेवटी काश्मीर 27 ऑक्टोबर 1947 ला,आणि जुनागढ 20 फेब्रुवारी 1948 ला विलीन झाले. शेवटी राहिले ते हैदराबाद संस्थान. 1900 साली एका करारान्वये,ब्रिटिशांचे संरक्षित राज्य म्हणून दर्जा असलेले हैदराबाद संस्थान, लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे होते. शिवाय दक्षिण- उत्तर भारताच्या मध्ये, म्हणजे भारताच्या ह्रदय स्थानावर असल्याने,  व्यवस्थापनाच्या दृष्टीने अवघड होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणाचे भाग मिळून हे संस्थान होते.तीनही भाषा तेथे बोलल्या जात होत्या. 85 टक्के लोक हिंदू होते. उरलेले मुसलमान, ख्रिश्चन, अशी विभागणी होती. वल्लभभाई पटेल यांची वर्षभर निजामाबरोबर बोलणी चालू होती. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. स्वातंत्र्यप्राप्तीच्यापूर्वीच 11 जून 1947 रोजी निजामाने, ” आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही”,अशी घोषणा केली. ‘आपल्या संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळू शकतो ‘, अशी स्वप्ने तो पहात होता. हैदराबादला समुद्रकिनारा नसल्याने, पोर्तुगीजांकडून गोवा आपण विकत घ्यावे व बंदर वापरण्याचे अधिकार मिळवावेत, असे त्याचे प्रयत्न सुरू झाले.

निजाम उल मुल्क म्हणजे जगाचा प्रशासक. ती एक पदवी होती.सात निजामांनी मिळून, दोनशे वर्षे हैदराबादवर राज्य केले. हा शेवटचा निजाम म्हणजे, उस्मान अली खान.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती !. त्याकाळात त्याची संपत्ती 250 अरब अमेरिकी डॉलर, शिवाय सोने, आणि आभूषणांची भांडार होती.स्वतःला तो अहम समजत होता. राज्यकारभारात अल्पसंख्य मुस्लिमांना प्राधान्य देऊन, हैदराबाद इस्लामी संस्कृतीचे केंद्र बनावे,यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्या काळात लोकमान्य टिळकांनी शाली बंडा येथे गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि पुढे याची व्याप्ती वाढत गेली.त्यामुळे जनतेत चेतना निर्माण झाली. हैदराबादची  जनता भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा  हा एक भाग समजत होती. राज्यात तिरंगा फडकवता  येत नव्हता. मुल्ला अब्दुल कयूम खानानेही  स्वदेशी आंदोलनात भाग घेतला. इतकेच नाही तर,त्याने गणेशोत्सवालाही पाठिंबा दिला होता. रँड खून खटल्यातील चाफेकर यांना सहा महिने हैदराबादला लोकांनी लपवून ठेवले होते. अखेर निजामाच्या पोलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. न जुमानणाऱ्या ‘ शौकत उल इस्लाम ’ सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी सुरू झाली. १८८५ च्या काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जनमत त्यांच्या बाजूनेच होते.पण निजामाने त्यांच्याविरोधात जायला सुरुवात केली. वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. प्रत्यक्ष भूभागातील 40 टक्के भाग जमीनदारांचा, आणि 60 टक्के निजामाचा. प्रत्यक्ष कारभार असा होता. बेहिशोबी सारावसुली, वेठबिगारी पद्धती, राबवून घेणं, शेतकऱ्यांकडून सक्तीने कामे करून घेणं, जुलूम जबरदस्ती, कर्जफेड न झाल्यास जमिनी बळकावून त्यांना भूमिहीन करणे, हे प्रकार चालू होते. असह्य होऊन अखेर जनता असंतोषाने पेटली. 1946 मध्येच सरंजामशाही विरोधात चळवळ सुरू झाली.  चितल्या ऐलम्मा या नावाच्या एका कर्तबगार स्त्रीने आंदोलनाला सुरुवात केली. आणि ते नंतर 4000 खेड्यात पसरले. दलित समाजानेही संघटित होऊन चळवळ सुरू केली. जनतेने विलीनीकरणासाठी सशस्त्र आंदोलन व सत्याग्रह करायला सुरुवात केली. स्वामी रामानंद तीर्थ,  गोविंद भाई श्रॉफ, नारायण रेड्डी,बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली,जीवाची पर्वा न करता, संग्राम सुरु केला, व संस्थानच्या कानाकोपऱ्यापर्यंत पिंजून काढला. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.

क्रमशः....

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पेडोंगी ☆ संग्राहक – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

★★★ पेडोंगी (१९६२ – ९८) ★★★

पेडोंगी नाव वाचून आपण बुचकळ्यात पडू. पेडोंगी हे नाव एका खेचराचं आहे. खरे तर माणसांची किंमत नसणाऱ्यांना ह्या खेचराच्या नावाचा गंधही नसेलच. पण ही कोणी साधीसुधी खेचर नाही, तर भारताच्या संरक्षणात आपलं आयुष्य तिने वेचलेलं आहे. भारतीय सेनेचा एक अविभाज्य भाग म्हणजेच खेचरं. सद्यस्थितीला भारतीय सेनेत ६००० पेक्षा जास्ती खेचरं काम करत आहेत. भारताची सरहद्द उत्तरेत हिमालयाच्या उंच शिखरांनी वेढलेली आहे. समुद्रसपाटीपासून १७,००० फुटापर्यंत जाणाऱ्या शिखरांवर भारतीय सैनिक डोळ्यात तेल घालून भारताच्या सरहद्दीचं संरक्षण करतो. भारतीय सेनेच्या अनेक पोस्ट ह्या अश्या ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी कोणतंच वाहन आजही जाऊ शकत नाही.  जिकडे स्वतःचा जीव वाचवणं कसरत असते, तिकडे दारुगोळा, रसद आणि इंधन अश्या गोष्टी वाहून नेणं किती कठीण असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. ह्याच कठीण काळात भारतीय सेनेच्या मदतीला आजतागायत धावून आली आहेत ती खेचरं. अतिउंचावरील अतिशय थंड आणि विरळ हवेत ही खेचरं काम करू शकतात. अतिशय खडकाळ आणि निसरड्या वाटेवरून मार्गक्रमण करू शकतात.  ह्या पलीकडे खेचरं अतिशय प्रामाणिक असतात. त्यामुळेच आजही भारतीय सेनेचा कणा बनून भारताच्या रक्षणात आपला सहभाग देत आहेत.

पेडोंगीचं खरं सैनिकी नाव होतं Hoof Number 15328. १९६२ साली पेडोंगी भारतीय सैन्यात दाखल झाली. त्या काळात आधुनिक संपर्कप्रणाली आणि प्रगत वाहनं  नसताना भारतीय सैन्याची सगळी दारोमदार खेचरांवर अवलंबून होती. बॉम्बच्या स्फोटात, गोळ्यांच्या वर्षावात, निसर्गाच्या प्रकोपाला न जुमानता पेडोंगी आणि तिच्या सहकाऱ्यांनी भारतीय सैन्याला रसद पुरवण्याचं आपलं काम इमाने इतबारे पार पाडलं. १९७१ साल उजाडलं. भारत- पाकिस्तान युद्ध सुरु झालं. भारतीय सेनेला रसद पुरवताना पेडोंगीला पाकिस्तानी सैन्यानी पकडलं आणि आपल्या पोस्टवर बंदी बनवून, तिला पाकिस्तानी सैन्याला मदत करण्यासाठी जुंपलं. कोण म्हणतं प्राण्यांना भावना नसतात? भारताच्या सरहद्दीच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात टाकणारी पेडोंगी संधी मिळताच पाकिस्तानी सैन्याला गुंगारा देऊन आपल्या पाठीवर असणाऱ्या मिडीयम मशीन गन आणि दोन बॉक्स गोळ्यांसकट निसटली. आपल्या जिवाची पर्वा न करता गोळ्यांच्या वर्षावात जवळपास २५ किलोमीटरचं अंतर कापून (२५ किलोमीटर अंतर १७,००० फुटांवर — पाठीवर एक मशिनगन आणि दोन बॉक्स गोळ्यांचं वजन घेऊन धावणं, ते ही शत्रूच्या प्रदेशात– काय असेल ह्याचा आपण विचारही करू शकत नाही.) भारतीय हद्दीत प्रवेश करून तिने भारतीय पोस्टवर आपली हजेरी नोंदवली.

तिचे आपल्या देशाप्रत असलेले प्रामाणिक  प्रेम बघून भारताच्या त्या पोस्टवरील बटालीयन कमांडरने आपल्या वरिष्ठ ऑफिसरना पेडोंगीच्या पराक्रमाची दखल घेण्याची शिफारस केली. १९८७ ला पेडोंगी भारतीय सेनेच्या 853 AT Company ASC मध्ये काम करत होती. २९ वर्षाची असणारी पेडोंगी सर्वात वयोवृद्ध खेचर होती.  पण त्या वयातही आपल्या पाठीवरचं सामान जवळपास १७,००० फूट उंचीवर वाहून नेत होती. ह्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर मेजर चुनीलाल शर्मा ह्यांनी पेडोंगीच्या पराक्रमाची नोंद घेताना तिला सामान वाहण्यापासून मुक्त केलं. तिची ऑफिशियल नियुक्ती 53 AT Company ASC कंपनीची (देवदूत) ताईत म्हणून केली. ह्या युनिट च्या १९८९-९० च्या ग्रीटिंग कार्डवरही पेडोंगीला तिच्या सेवेसाठी स्थान दिलं गेलं. ह्याच युनिटसोबत तिची नियुक्ती बरेली, उत्तर प्रदेश इकडे नंतर झाली. इथल्या खूप मोठ्या परिसरात पेडोंगीने आपला काळ आरामात व्यतीत केला.

१९९२ ला पेडोंगीला एका खास कार्यक्रमासाठी दिल्लीला नेण्यात आलं. तिकडे २२३ व्या कॉर्प्स दिवसाच्या कार्यक्रमात पेडोंगीला तिच्या पराक्रमासाठी, देश सेवेसाठी, कर्नल गिरधारी सिंग ह्यांच्या हस्ते मखमली निळ्या घोंगडीने सन्मानित करण्यात आलं. त्याच वेळेस तिला तिचं नावं ‘पेडोंगी’ हे देण्यात आलं. उत्तर सिक्कीममध्ये असलेल्या पेडोंग ह्या युद्धभूमीच्या नावावरून तिचं नामकरण करण्यात आलं. भारतीय सेनेत अतुलनीय शौर्य, सेवा देणाऱ्या घोडयांना आजवर नाव देण्याचा सन्मान मिळालेला होता.  पण पेडोंगी ही पहिली खेचर होती, जिला हा सन्मान देण्यात आला.

 ह्यानंतरचा काळ पेडोंगीने बरेलीतच व्यतीत केला. १९९७ ला पेडोंगीच्या सेवेची नोंद ‘ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ‘ने घेताना “ जगातील कोणत्याही सेनेसाठी सर्वात जास्त कालावधीसाठी सेवा देणारी खेचर “ असं तिचं नाव सुवर्णअक्षरांनी कायमच नोंदवलं. २५ मार्च १९९८ ला पेडोंगीने अतिशय समाधानाने अखेरचा श्वास घेतला आणि एका युगाचा अंत झाला.

असं म्हणतात की खेचराला एकदा रस्ता दाखवला की पुढल्या आख्या आयुष्यात, तो तुम्हाला रस्ता दाखवेल. पण पेडोंगीचा पराक्रम अभूतपूर्व असा होता. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखताना संपूर्ण आयुष्य तिने १७,००० फुटांवर भारतीय सरहद्दीचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी वेचलं. ही पण एक प्रकारची देशभक्तीच आहे. कोणी म्हणेल की पेडोंगीला रस्ता माहीत होता म्हणून ती परत आली. पण मग एकटी तीच का? तिच्यासोबत पकडलेली इतर खेचरं  आली नाहीत.  पण ती जिवावर उदार होऊन परत आली. पेडोंगीला आज जाऊन २२ वर्षाचा कालावधी झाला.  पण आपलं जीवन भारतासाठी समर्पित करणारी पेडोंगी भारतीयांच्या मनात आजही उपेक्षित आहे ही एक खंत आहे. तिचा भीमपराक्रम, देशभक्ती, आणि कार्य हे शब्दांपलीकडचं आहे. 

देशासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या पेडोंगीला माझा कडक सॅल्यूट, आणि तिच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मी आहे तुझाच…. ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

? इंद्रधनुष्य ?

☆ मी आहे तुझाच….☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

काही वर्षांनी पुन्हा तो आयुष्यात डोकावला,

माझ्याविना आयुष्य कसं वाटतंय ? कानाशी पुटपुटला… ठीक चाललं आहे…. मी म्हटलं 

 

संसाराच्या गाड्यात सहाजिकच तुझं थोडं विस्मरण झालं..

अस्तित्वावर बोट ठेवायला पुन्हा का येणं केलंस ?

 

रोजच्या धावपळीत स्वतःलाच विसरले होते..

चाकोरीत फिरताना नकळत  तुझे बोट सोडले होते..

 

शाळा कॉलेजमध्ये तू सोबत होतास म्हणून

अशक्य ते शक्य झालं,

मेहनतीने का असेना यशाचं शिखर गाठता आलं…

 

आता संसारात सगळ्यांसाठी तडजोड करावी लागते, कधी मनही मारावं लागतं…

एवढं करूनही हिला काही येत नाही असं त्यांना वाटतं…

 

दोन पुस्तकं शिकून मुलं शहाणी होतात..

पहिला गुरु आई,

हेच नेमकं विसरतात..

 

नवऱ्याच्या पाठीशी बायको

खंबीरपणे उभी रहाते,

पण कौतुक सोडून,

‘वेंधळीच आहेस बघ’ हेच ऐकायची सवय होते…

 

मी मात्र मागे राहिले..

स्वतःसाठीचं जगायचं विसरले…

मित्रा आता घे परत हातात हात, पूर्वीसारखी असू दे तुझी कायम साथ..

 

तो म्हणाला, मिळवण्यासाठी मला कणखर व्हावं लागतं,

नवा दिवस उगवण्यासाठी तर पृथ्वीलाच सूर्याभोवती फिरावं लागतं…

 

हसून विचारलं त्याला आहेस कोण एवढा खास ?

तो ही हसला.. म्हणाला,

ओळखलं नाहीस अजून..?

मी आहे तुझाच….

आत्मविश्वास

संग्राहक :– कालिंदी नवाथे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मावशी बरोबरचं नातं खरंच खूप छान असतं . हे नातं भावनिक पातळीवर खूप आनंद देणारं असतं.

मावशी भरभरून प्रेम देते…

आपल्या जन्माआधीच, म्हणजे अगदी आपण आईच्या पोटात असतानाच मावशीची आणि आपली एक वेगळीच अदृश्य नाळ जोडलेली असते…

आपल्या जन्माने तिला झालेला आनंद अवर्णनीय असतो.

खरंच मावशी नेमकी कोण असते हो ???

आई नसताना तुमच्यासाठी तुमची हक्काची माया देणारी ,

मावशी.. ही तुमची प्रेमळ हाक ऐकताच तुम्हाला भरभरून प्रेम देणारी…

आपल्या आवडीचं , लपवून ठेवलेलं  खाऊ घालणारी…

आपल्या लहानपणाची साक्षीदार , आपल्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्ण होत नाहीत…

तिचं वाढणारं वय आणि त्यामुळे वाढणार्‍या जबाबदार्‍या आपल्याला तिच्यापासून दूर करतात , पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं , तुमच्याही नकळत…

‘तू अगदी तुझ्या मावशी वर गेलायेस’… असं कोणी म्हटलं तर एक वेगळंच स्मित हसू आपल्या चेहर्‍यावर उमटतं…

अगदी आजही मावशीसाठी आपण कोण असतो ???

आपल्या जन्मापूर्वीपर्यंत तिला कदाचित लहान मुलं अजिबात आवडत नसावीत…!!!

पण , तरीही तुम्हाला पहिल्यावर तिच्या पोटात मायेचे झरे लोटतातच कसे ??? का कुणास ठाऊक…!!!

आपल्या लहानपणी तुमची केअरटेकर , तुमच्या आईची हक्काची असिस्टंट अशा जबाबदार्‍या तिने यथार्थ पार पाडलेल्या असतात…

आपल्यासाठी एखादं म्हणून गिफ्ट घ्यायला ती जाते … आणि  प्रत्यक्षात … जे जे आवडेल ते ते तुमच्यासाठी ती घेऊन येते , अगदी सहज…

तुमची आवडनिवड मनापासून जपते अन् दर वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देते…

सर्वात महत्वाचं म्हणजे… तुमच्याप्रती तिची माया आटतंच नाही, तिचे स्वतःचे मूल  झाल्यावरही…

आईएवढेच तुमचे लाड करणारी , कशाचीही अपेक्षा न ठेवणारी , तुमच्या आई-वडिलांची ती सावली असते…

 

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares