☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ५ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग
संध्याकाळी रिव्हर क्रूजमधून फेरफटका मारला. फोंटांका नदीच्या एका कॅनॉल मधून सुरू झालेली क्रूज, मोइका नदीतून, विंटर कॅनॉलमधून नीवा नदीमध्ये गेली आणि पुन्हा फोंटांकाच्या एका कालव्यात शिरून आम्ही किनार्याला उतरलो. क्रूज सहलीमध्ये दुतर्फा दिसलेल्या इमारती आता ओळखीच्या झाल्या होत्या. क्रूजमधील प्रवासाने सुंदर पीटर्सबर्गचा निरोप घेतला.
जिंकलेल्या प्रदेशातील उत्तमोत्तम गोष्टींचा विध्वंस करण्याची जेत्यांची प्रवृत्ती जगभर आढळते. पीटर्सबर्गमधील अनेकानेक कला प्रकार, प्रासाद शत्रूंनी नष्ट केले. पण आज ते ऐश्वर्य पुन्हा जसेच्या तसे दिमाखात उभे आहे. याची कारणे अनेक आहेत. पीटर दी ग्रेटपासून अशी पद्धत होती की, जी जी कलाकृती, पेंटिंग निर्माण होईल त्याचा छोटा नमुना व त्याची साद्यंत माहिती म्हणजे वापरलेले मटेरियल, त्याची रचना, मोजमाप वगैरे आर्काइव्हज मध्ये जतन करून ठेवण्यात येत असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीटर्सबर्गमध्ये जशा अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, सायन्स इंस्टिट्यूशन्स आहेत तशीच एक रिस्टोरेशन युनिव्हर्सिटी आहे. वेळेअभावी आम्ही ती पाहू शकलो नाही. पण नष्ट झालेल्या कलाकृतींचे पुनर्निर्माण आणि असलेल्या वस्तू आणि वास्तू सुस्थितीत ठेवण्यासाठी तिथे खास शिक्षण दिले जाते. याशिवाय राज्यकर्त्यांचा दृष्टिकोण आणि आर्थिक पाठबळ हेही महत्त्वाचे!
या पार्श्वभूमीवर आपल्याकडे काय परिस्थिती आहे? आपल्याकडेही अनेक नामवंत, उत्तमोत्तम चित्रकार, शिल्पकार, काष्ठ कलाकार आहेत. सर्वश्री बाबुराव सडवेलकर,व्ही. एस. गुर्जर,ज. द. गोंधळेकर, जाधव, शिंदे, शिल्पकार करमरकर,स.ल.हळदणकर,राजा रविवर्मा, रावबहादूर धुरंधर,एम.आर.आचरेकर, गोपाळराव देऊसकर, विश्वनाथ नागेशकर, भैय्यासाहेब ओंकार, डी. जी. कुलकर्णी, संभाजी कदम अशी असंख्य नावे आहेत. काही वर्षांपूर्वी नामवंत चित्रकार सुहास बहुलकर यांचा लेख एका दिवाळी अंकात वाचला होता. दिवंगत नामवंत कलाकारांच्या कलाकृती मिळवून, त्याचे पुनर्लेपन,वॉर्निशिंग, माउंटिंग करून त्यांचे प्रदर्शन भरविणे व त्यायोगे कलाकाराच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळवून देणे अशा उद्देशाने त्यांनी अनेक कलाकारांच्या, माळ्यावर धूळ खात पडलेल्या कलाकृती मोठ्या कष्टाने मिळविल्या. त्यावेळी त्यांना आलेले अनुभव मन विषण्ण करणारे, निराशाजनक होते. वर्तमानपत्रातून जे.जे. महाविद्यालयातील चित्रांची, पुतळ्यांची हेळसांड, बेपर्वा वृत्ती, राजकारण हे सारे वाचून वाईट वाटते. हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे. कलाकारांना आर्थिक काळजीतून मुक्त ठेवणे हे समाजाचे, सरकारचे काम आहे. या चित्रांचा, कलाकृतींचा सांभाळ, डागडुजी,पुनर्लेपन, वॉर्निशिंग,जपणूक, यासाठी शास्त्रोक्त शिक्षण आवश्यक आहे. हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. राजकारण विरहीत राजकीय इच्छाशक्ती, आर्थिक पाठिंबा व सामान्य नागरिकांचा सहभाग असेल तरच हे सांस्कृतिक वैभव सांभाळले जाईल. आपला भारत हा सुद्धा ‘ऐश्वर्यसंपन्न’ देश आहे. प्रत्येकाने हे ऐश्वर्य सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ४ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग✈️
पीटर्सबर्गजवळील पीटरहॉप हे एक अतिशय रम्य, भव्य आणि देखणे ठिकाण आहे. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे इसवी सन १७०५ मध्ये पीटर दि ग्रेटने या जागेचा विकास करण्याचे ठरवले. दीडशे हेक्टरहून अधिक जागा व्यापलेल्या या भव्य परिसरामध्ये राजवाड्यासारख्या एक डझनाहून अधिक इमारती आहेत. ११ भव्य व सुंदर बगीचे झाडा फुलांनी, शेकडो सुंदर पुतळ्यांनी नटलेले आहेत. या बगिच्यातून २०० हून अधिक, तर्हेतर्हेची कारंजी आहेत. अप्पर गार्डन आणि लोअर पार्क यांच्या मध्यावर ग्रेट पॅलेसची वास्तु उभी आहे. पीटरहॉपपासून वीस किलोमीटर दूर असलेल्या उंच टेकड्यांवरील नैसर्गिक झऱ्यांचे पाणी अप्पर गार्डनमधील तीन-चार मोठ्या तलावात साठविले आहे. तिथून पाईपलाईन बांधून लोअर पार्कमधील कारंज्यांमध्ये पाणी खेळविले आहे. अप्पर गार्डन लोअर पार्कपेक्षा साठ फूट अधिक उंचीवर आहे. सर्व कारंजी इलेक्ट्रिक पंपाशिवाय फक्त गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर चालतात. या वॉटर सिस्टिमचे सर्व डिझायनिंग पीटर दि ग्रेटने स्वतः केले होते. अप्पर गार्डन व लोअर पार्क यांच्या मध्यावरील ग्रेट पॅलेसच्या पुढ्यात अतिशय भव्य असा ‘ग्रेट कास्केड’ आहे. या ग्रेट कास्केडपर्यंत पोहोचण्यासाठी दोन बाजूंना उतरती हिरवळ आणि दोन्हीकडे सतरा पायऱ्यांची उतरण आहे . पायर्यांवरुन झुळझुळ पाणी वाहत असते. पायर्यांच्या कडेला अतिशय सुंदर अशा ४० शिल्पाकृती आहेत. दोन्हीकडील पायर्यांच्या मधोमध, एका मोठ्या पॉऺ॑डमध्ये, ग्रॅनाईटच्या खडकावर उंच उसळणाऱा पांढराशुभ्र जलस्तंभ आहे. त्याच्या मागे, तसेच उसळणारे पण थोडेसे लहान फवारे आहेत.ग्रॅनाइट खडकाच्या चारही बाजूला सिंह, घोडा यांच्या तोंडाच्या शिल्पाकृती आहेत .त्यातून पाण्याचे फवारे उडत असतात. पॉ॑डला जोडून असलेला कॅनाल,सी कॅनालने, गल्फ ऑफ फिनलॅ॑डला जोडलेला आहे.पॉ॑डमधून उतरत जाणाऱ्या कॅनालच्या दोन्ही बाजूंना गोलाकार दगडी बशांमधून कारंज्यांच्या अर्धकमानी उसळत असतात. ग्रेट पॅलेसच्या पुढ्यात उभे राहिले की कारंजी,बागा, पुतळे आणि गल्फ ऑफ फिनलॅ॑डपर्यंत गेलेला कॅनाल व त्यापुढे दिसणारा निळा समुद्र हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.
ग्रेट कॅस्केड’च्या उजव्या बाजूच्या भव्य बागेत एका किलवरसारख्या आकाराच्या पॉ॑डमध्ये, शक्तीचे प्रतीक असलेल्या सॅमसन याचा पिळदार अंगाचा सोनेरी उभा पुतळा आहे. सॅमसन हाताने सिंहाचा जबडा फाडत आहे व त्या सिंहमुखातुन वीस मीटर उंच, पांढरा स्वच्छ, मोठा फवारा वेगाने उसळत आहे हे दृश्य नजर खिळवून ठेवते. रशियाने स्वीडनवर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून हा पुतळा उभारण्यात आला.
ग्रेट कास्केडच्या चौथऱ्यावरील व पायऱ्यांवरील सोनेरी पुतळे तसेच सॅमसन व सिंह यांचे सोनेरी पुतळे हे प्रथम शिशामध्ये बनविण्यात आले व नंतर त्यांना सोन्याचा मुलामा देण्यात आला.१८०१ मध्ये या सर्व पुतळ्यांचे जसेच्या तसे पुनर्निर्माण करण्यात आले. त्यावेळी ब्राँझवर सोन्याचा मुलामा देण्यात आला. बागांमधून व कारंज्यांजवळ असलेले संगमरवरी अपोलो, व्हिनस, नेपच्यून या देवतांचे पुतळे , तसेच स्नान करणाऱ्या स्त्रिया, पुरुष,मुले यांचे पुतळे अतिशय देखणे आहेत. जांभळ्या, पिवळ्या, लाल रंगाच्या फुलांनी नेटक्या राखलेल्या बागा व त्यामागील घनदाट वृक्षराजी या पार्श्वभूमीवर कारंजी, पुतळे अगदी शोभून दिसत होते.
गल्फच्या किनाऱ्यावर एका बाजूला एक मजली सुंदर पॅलेस आहे. राजवाड्याचा मधला भाग तंबूसारखा उंच तर दोन्ही बाजूला असलेल्या लांब गॅलऱ्या लहान-लहान विटांनी बांधलेल्या आहेत. पीटर दि ग्रेटची लायब्ररी व त्याने युरोपातून आणलेल्या पेंटिंग्जची आर्ट गॅलरी तिथे आहे. दुसऱ्या बाजूला अलेक्झांड्रिया इस्टेट ही गॉथिक शैलीतली छोटी सुबक इमारत आहे. या दोन्ही इमारतींच्या पुढील बाजूला पाच-सहा भव्य बागा आहेत. इथे ३०० प्रकारची ३०,००० लहान मोठी झाडे आहेत. रंगीत पानाफुलांची नेटकी कापलेली ही झाडे खूप सुंदर दिसतात. या बागांमधून हरतऱ्हेची कारंजी उडत असतात. त्यातील ‘सन’ हे कारंजे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या मध्यावर ब्रांझचे दोन अर्धगोल एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्या कडांना असलेल्या बारीक छिद्रातून सूर्यकिरणांसारखे पाण्याचे फवारे उडतात. विशेष म्हणजे सूर्य जसा फिरेल तसे हे ब्राँझचे मध्यवर्ती गोल फिरतात.
५०५ उसळत्या धारा असलेले पिरॅमिडसारखे एक भव्य कारंजे एका पायऱ्या-पायऱ्यांच्या चौथऱ्यावर आहे.एके ठिकाणी चौथर्यावर रोमन शैलीतील फवारे असलेले कारंजे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. एके ठिकाणी हात पंख्याच्या आकाराच्या मोठ्या कमानीसारख्या जलधारा कोसळत होत्या. छत्रीच्या आकाराच्या एका कारंज्याभोवती अनेकांनी गर्दी केली होती. पांढऱ्या शुभ्र संगमरवरी गोल खांबावर, छत्रीच्या आकाराचे छप्पर होते. त्याला कनातीसारखे लाल हिरवे डिझाईन होते. त्या छपराला असलेल्या लहान- लहान भोकातून पावसासारख्या अखंड धारा पडत होत्या. त्या पावसामध्ये भिजण्यासाठी गर्दी झाली होती.
या बागेत कारंज्यांचा एक सुंदर खेळ बघायला व अनुभवायला मिळाला. दुपारी दोन वाजण्याच्या आधी गाइडने सर्वांना दुतर्फा झाडी असलेल्या एका रस्त्यावर कडेला उभे राहायला सांगितले. बरोबर दोन वाजता त्या फुटपाथच्या कडेला असलेल्या भोकांतून पाण्याच्या कमानी उसळल्या.त्या रस्त्यावर पाण्याची एकमेकात गुंफलेल्या धारांची कमान झाली.जेमतेम तीन मिनिटांच्या या खेळात सर्वजण चिंब भिजून गेले.
उतरत्या छपरासारखेअसलेले एक कारंजे होते. त्याच्या गच्चीचा भाग हा बुद्धिबळाच्या पटासारखा काळ्यापांढर्या ग्रॅनाईटने बनविला आहे. त्यावरील झुळझुळत्या कारंज्याच्या कडेला सुंदर शिल्पाकृती आहेत. दोन्ही बाजूच्या सुंदर पायर्या चढून वरपर्यंत जाता येते. परतताना जवळच तीन वादक अत्यंत सुरेल अशा रचना झायलोफोनवर वाजवीत होते. सभोवताली रंगीबेरंगी फुले, पाण्याचा मंद आवाज आणि त्यामध्ये एकरूप झालेले हे सूर वेगळ्या जगात घेऊन गेले.
अप्पर गार्डन मध्ये मोठमोठे तलाव, वृक्ष व फळझाडे आहेत. अप्पर गार्डनमधील पाच रिझर्वायर्समधून लोअर गार्डनमधील सर्व कारंज्यांना पाणीपुरवठा होतो. अप्पर गार्डनच्या मध्यभागी उंच चौथऱ्यावर नेपच्यून फाउंटन आहे. नेपच्यूनचा ब्राँझचा पुतळा, त्याखालील चौथऱ्यावर स्त्री-पुरुषांची, लहान मुलांची शिल्पे आहेत. सिंह मुखातून, लहान मुलांच्या तोंडातून पाण्याचा फवारे उडतात. तिथेच कडेला नेपच्यूनचा ब्रांझमधील घोड्याचा रथ आहे.
हिरव्या नानाविध छटांच्या पार्श्वभूमीवर कल्पकतेने उभारलेली ही कारंजी म्हणजे अभिजात सौंदर्यदृष्टीचे अनुपम दर्शन होते. इतकी वैविध्यपूर्ण कारंजी( शिवाय सर्व चालू स्थितीत) पाहून शरीर आणि मन त्या कारंज्यांच्या तुषारांसारखेच प्रसन्न झाले.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर उभारलेले सेंट आयझॅक कॅथेड्रल म्हणजे वास्तुशास्त्र आणि इंजीनियरिंग यांचा अजोड संगम आहे. कास्ट आयर्नच्या मुख्य घुमटाभोवती चार छोटे डोम आहेत. या सर्वांना सोन्याचा मुलामा दिला आहे. त्यासाठी ४०० किलोहून अधिक सोने वापरण्यात आले आहे. बाहेरील भव्य खांबांवर कमळे, सुंदर पुतळे, पुराणकथांची शिल्पे खूप सुंदर आहेत. बसमधून फिरताना शहरातील सुंदर बागा,पॉपलार,ओक,बर्च यांचे भरदार उंच वृक्ष, कारंजी, शैक्षणिक संस्था नाट्यगृहे, लायब्ररी,बॅ॑का यांच्या भव्य इमारतींवरील देखणे पुतळे लक्ष वेधून घेतात.
पहिला पीटर म्हणजे पीटर दि ग्रेट याने १७०२ मध्ये स्वीडनचा पराभव करून नीवा नदीच्या मुखावरील रशियाचा किल्ला परत जिंकून घेतला. नीवा नदी बाल्टिक समुद्राला मिळते. त्यामुळे रशियाचा बाल्टिक समुद्रामधून युरोपीयन देशांशी व्यापार चालू राहिला. आरमारी वर्चस्व कायम राहिले. पीटर दि ग्रेटने पीटर्सबर्ग या सुंदर शहराचा पाया घातला. कित्येक वर्षं पीटर्सबर्ग हेच राजधानीचे ठिकाण होते. मध्यंतरी काही काळ या शहराला लेनिनग्राड असे संबोधण्यात येत असे. आता पूर्वीचे पीटर्सबर्ग हेच नाव आहे व राजधानी मास्को झाली आहे.
पीटर्सबर्गचे उपनगर असलेल्या पुष्किन या ठिकाणी गेलो. अलेक्झांडर पुष्किन या महान रशियन कवीचे नाव या गावाला दिले आहे. वाटेत प्रेसिडेंट पॅलेस लागला. देशामध्ये आलेल्या राजनैतिक पाहुण्यांची इथे व्यवस्था करतात.इथेच ‘जी-८’राष्ट्रांची (त्यापैकी एक भारत) परिषद भरली होती.
रशियामध्ये साहित्यिक, कवी, कलावंत यांच्याविषयी नितांत आदर आहे. अलेक्झांडर पुष्किन, टॉलस्टॉय, मॅक्सिम गॉर्की यासारखे दिग्गज साहित्यिक व कवी यांनी उत्तमोत्तम साहित्य निर्मिती केली आहे. ‘वॉर अँड पीस’,अॅना कॅरोनिना, डॉक्टर झिवॅगो, क्राइम अँड पनिशमेंट सारख्या अजरामर साहित्यकृती निर्माण झाल्या. रशियन राज्यक्रांतीनंतर कलावंत, साहित्यिक, विद्वान व कवींना अतोनात छळाला सामोरे जावे लागले. किंवा देहदंडही झाला. पण साऱ्यांनीच छळ सोसून आपले अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपले. आज त्यांच्या कलाकृतींना, साहित्याला सन्मानपूर्वक जपले जाते. इथल्या भव्य हिरव्यागार बागेत तळहातावर डोके ठेवलेल्या स्थितीतील पुष्किन यांचा सुंदर पुतळा आहे.
तिथून जवळच कॅथरीन पॅलेस आहे.मोठमोठ्या हॉलमध्ये सुंदर व भव्य पेंटिंग्ज आहेत.कॅथरीन दी ग्रेटचे घोड्यावर बसलेले,पुरूषी वेश केलेले पेंटिंग आहे. ग्रीन डायनिंग रूममध्ये पडद्यापासून कटलरी पर्यंत शेवाळी रंगाची सुंदर रंगसंगती साधली आहे तर ब्ल्यू रूममध्ये इंग्लंडच्या फॅक्टरीत तयार झालेले निळे सिरॅमिक्स वापरले आहे. सुवर्ण महालातील जमिनीवरचे डिझाईन व भिंतीवरील डिझाईन एकसारखे आहे. भिंतीवरील, छतावरील भव्य पेंटिंग्ज जिवंत वाटतात. पूर्णाकृती स्त्रिया,बाळे, योद्धे, देवदूत पऱ्या ही सारी शिल्पे लिंडेन या लाकडाचा वापर करून बनवलेली आहेत व त्यावर पूर्ण सोन्याचा मुलामा दिला आहे. दोन डोळ्यांनी पाहू तेवढे थोडेच!
या पॅलेसमधील जगप्रसिद्ध अॅ॑बर (Amber) रूम दुसऱ्या महायुद्धात जर्मन नाझींनी नष्ट करून टाकली होती. १९५७ मध्ये पुनर्निर्माणाचे काम सुरू करण्यात आले. आणि आज अॅ॑बर रूम पूर्वीच्याच दिमाखात, वैभवात उभी आहे.पृथ्वीवरील भूकंप किंवा इतर नैसर्गिक घडामोडीत, जंगलेच्या जंगले गाडली जातात. अनेकानेक वर्षानंतर ऑरगॅनिक प्रक्रियेमध्ये पृथ्वीच्या पोटात विविध रंगाची अमूल्य रत्ने माणके तयार होतात. अॅ॑बर हे नैसर्गिक बदामी व तपकिरी आणि पिवळट रंगाचे पातळ असे कपचे असतात. ते जोडून अप्रतिम डिझाईन्सच्या भिंती, फोटोफ्रेम, दिव्यांच्या शेडस्, फुलदाण्या बनविण्यात आल्या आहेत. रूममधील नैसर्गिक प्रकाश परिवर्तनाने आपल्याला एका वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटते.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग
या हर्मिटेजमध्ये असंख्य प्रकारची घड्याळे आहेत. हिरे जडविलेली, लहान, गोंडस बाळांच्या हातात असलेली,होडीच़्या आकारातील, पऱ्यांनी हातात धरलेली, खांबांवर बसविलेली अशा अनेक तऱ्हा. या साऱ्यांमध्ये मोराचे घड्याळ अप्रतिम आहे. सोन्याचा मुलामा दिलेल्या एका गजांच्या पिंजऱ्यासारख्या घरामध्ये, सोनेरी मोर आपला निळा जांभळा रत्नजडित पिसारा फुलवून उभा आहे. त्याच्या पायाशी एका बाजूला एक मोठा लाल सोनेरी कोंबडा आहे. दुसऱ्या बाजूला खारुताईच्या डोक्यावर एक छोटा गोल आहे. कोंबड्याचा पोटात असलेली किल्ली फिरवून ठेवली की दर एक तासाने कोंबडा आरवे. कोंबडा आरवला की खारुताईच्या डोक्यावरील गोल पिंजरा फिरू लागे व त्याच्या घंटा मंजुळ वाजू लागत. घंटा वाजायला लागल्यावर मोर पिसारा फुलवे. तांब्यावर सुवर्ण मुलामा दिलेली ही कलाकृती, त्यातील नाजूक यंत्रणेमुळे आता चालविण्यात येत नाही.
पण नजाकतीने पिसारा उभारलेला मोर मनामध्ये कोरला जातो. मोराच्या पिंजऱ्यापासून जवळ मोझॅक टाइल्समध्ये काढलेली माणसांची, पक्षी-प्राण्यांची अप्रतिम चित्रे आहेत. तर जवळच्या एका चहा टेबलाची षटकोनी नक्षीही मोझॅक टाइल्समधील आहे. पाणी भरायला आलेल्या दोन स्त्रिया आपल्या उंच, उभ्या हंड्यांवर हात ठेवून, एकमेकींशी कुजबुजंत गप्पा मारत (स्त्रियांच्या गॉसिपिंगचा ऐतिहासिक पुरावा) उभ्या असलेले शिल्प नेहमीच्या परिचयाचे वाटल्याने लक्षात राहिले.
संध्याकाळी थोडे चालत, थोडे बसने जाऊन पॅलेस थिएटरला गेलो. हे दिवस ‘पांढर्या रात्रीं’चे म्हणजे व्हाईट नाईटसचे होते. रात्री उशिरापर्यंत चांगला उजेड असतो. रस्त्यांवरून मित्र-मैत्रिणी मजा करत हिंडत होती. दुकाने, मॉल्स, हॉटेल्स खच्चून भरली होती. एकदा का कडाक्याची थंडी सुरु झाली की घराबाहेर पडणे मुश्कील होते. रस्त्यावर झेंडू व लाल पिवळ्या फुलांची सुंदर सजावट केली होती. अधून मधून हिरवळीचे गालिचे होते. आम्हाला बघून रस्त्यावरची लोकं ,’इंडिया, इंडिया’ असे म्हणत व लगेच राज कपूरच्या सिनेमातील आणि लता मंगेशकरची गाणी म्हणायला सुरुवात करीत.’ मेरा जूता है जपानी’ तर फारच लोकप्रिय होतं. लोक उंचनींच, धिप्पाड, नाकेले आणि लालसर गोरे होते. तरुणाई युरोपियन फॅशनमध्ये होती. फॅशनेबल ड्रेसेस, त्यांचे रंग पेन्सिलसारख्या टाचा असलेले बूट सारे त्यांना शोभून दिसत होते. सारे पाहात भव्य युरोपा हॉटेलवरून इटालियन स्ट्रीटवर पोहोचलो. आम्ही ग्रँड पॅलेस थिएटरची ‘स्वान लेक’ या बॅलेची तिकिटे काढलेली होती. आमच्यासारखेच इतर देशातील प्रेक्षक लगबगीने आत शिरत होते. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट सोकोलाव्ह यांनी १७९९ मध्ये हे सुंदर वास्तुशिल्प उभारले. थिएटरचे देखणेपण कसोशीने जपले आहे. मार्बलच्या अर्धवर्तुळाकार रूंद जिन्याने पहिल्या मजल्यावर गेलो. या जिन्याच्या कठड्याला पंख असलेल्या, कुरळ्या केसांच्या, छोट्या गोंडस बाळांचे शिल्प अनेक ठिकाणी बसवीले आहेत. प्रवेशद्वारापाशी, देखणे सौष्ठव असलेल्या आईच्या मांडीवर निवांत पहुडलेल्या बाळाचे सुंदर शिल्प आहे. जिन्याच्या व प्रवेशद्वाराच्या भिंती सुंदर पेंटिंग्जनी,दिव्याचे आकर्षक खांब यांनी सजविल्या आहेत. मोठ्या हॉलच्या प्रवेशद्वारावर सोनेरी रंगाची वेलबुट्टी आहे. त्याच्या पुढील पिवळट रंगाच्या ड्रॉइंगरूममध्ये सोव्हिनियर्स, बॅले ड्रेसमधील नर्तिका अशा वस्तूंची विक्री चालू होती. पुढे छोटा ग्रीन हॉल व बुफे रूम अशी रशियन क्लासिकल स्टाइल अंतर्गत सजावट आहे.
राजघराण्याच्या करमणुकीसाठी म्हणून १७४० मध्ये ‘इंपीरियल स्कूल ऑफ बॅले’ची पीटर्सबर्गमध्ये स्थापना झाली. रशियाच्या संपन्न परंपरेचे राष्ट्रीय लोकनृत्य म्हणजे बॅले. राज्यकर्त्यांनी ही कला टिकावी, वाढावी म्हणून आर्थिक पाठिंबा व प्रोत्साहन दिले. महान रशियन कवी अलेक्झांडर पुष्किन यांनी ‘जीव ओतून केलेले, नजाकतीने सादर केलेले भावपूर्ण नृत्य म्हणजे बॅले’ असे बॅलेचे वर्णन केले आहे. (flight performed by the soul). किरॉव्ह बॅले कंपनी व बोलशाय बॅले कंपनी या दोन जगप्रसिद्ध बॅले कंपनी आहेत.किरॉव्हच्या परंपरेतील कोरियोग्राफी या ‘स्वान लेक’ला लाभली आहे. थिएटरमध्ये थोडीशी अर्धवर्तुळाकार अशी खुर्च्यांची रचना होती. आम्ही बसलो होतो त्याच्या थोड्या उंचीवर, भिंतीच्या दोन्ही कडांना तीन-तीन खुर्च्यांचे छोटे,तिरके बॉक्स होते. आपल्या अॉपेरा हाउस थिएटरमध्ये होते तसे!वर अर्धवर्तुळाकार लाकडी बाके असलेली गॅलरी होती. याला पॅराडाइज गॅलरी म्हणतात. वैशिष्ट्य म्हणजे लाइव्ह सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. स्टेजच्या पुढील बाजूस वाद्यवृंद बसला होता.
बरोबर आठला पडदा बाजूला झाला. कमनीय, लवचिक देहाच्या बारा पऱ्या, स्वच्छ पांढऱ्या पिसासारख्या फ्रिलचा ड्रेस घालून चवड्यावर शरीर तोलत, कधी स्वतःभोवती गिरक्या घेत होत्या तर कधी जोडीदाराच्या हातावर चढून शरीराचा तोल सांभाळत नृत्य करीत होत्या. ही एका राजपुत्राची गोष्ट होती. राजपुत्र वयात येतो. किल्ल्याजवळील बागेत मित्रांबरोबर खाणेपिणे, नाच सुरू असते. राजमाता अचानक येते. पार्टीतील वाइन वगैरे बघून नाराज होते. मित्र गेल्यानंतर राजपुत्र बागेत फिरत असताना त्याला राजहंसांचा थवा दिसतो. शिकारीसाठी म्हणून तो त्यांच्या मागे बाण सरसावून जातो. त्याला दिसते की ते राजहंस जंगलाच्या मध्यभागी सरोवरात पोहत असतात. ते राजहंस म्हणजे सुंदर तरुणींचे जादूगाराने केलेले रूपांतर असते .त्या तरुणी फक्त रात्री मनुष्यदेह धारण करू शकतात. त्यातील राजकन्या राजपुत्राच्या प्रेमात पडते. पण तिला जादूगाराची भीती वाटत असते. राजपुत्र तिला स्वतःच्या प्रेमाची, निष्ठेची ग्वाही देतो. तेव्हा हाच आपली दुष्ट जादूगाराच्या तावडीतून सुटका करू शकेल अशी तिला खात्री वाटते. राजमहालात परतल्यानंतर राजपुत्राच्या आईने त्याच्यासाठी देशोदेशीच्या अनेक राजकन्या पसंतीसाठी आणलेल्या असतात. त्यांच्याबरोबर राजपुत्राला नृत्य करावे लागते. त्यावेळी जादूगार आपल्या मुलीला राजहंसाच्या रूपातील राजकन्येसारखे बनवतो. राजकुमार फसतो. तो जादूगाराच्या मुलीची निवड करणार एवढ्यात त्याला किल्ल्याच्या खिडकीमध्ये खरी राजकन्या दिसते. सारे तिथेच सोडून तो तिच्यामागे धावत जंगलातील सरोवरामध्ये जातो. राजकन्येचा गैरसमज दूर करतो व तिथे आलेल्या जादूगाराचे पंख छाटून त्याला मारून टाकतो. राजकन्या व तिच्या सख्यांची सुटका होते. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात राजकन्या व तिच्या सख्या आनंदाने नाचू लागतात. अर्थातच राजपुत्र व राजकन्या यांचा विवाह होऊन ते सुखाने नांदू लागतात अशी गोष्ट होती. अतिशय लयदार, शिस्तबद्ध, कधी हवेत तरंगत केल्यासारखे वाटणारे सांघिक हालचालींचे हे समूह नृत्य व त्यातून सादर केलेल्या गोष्टीने आम्हाला एक तासभर खुर्च्यांवर जणू बांधून ठेवले होते. सुंदर प्रकाशयोजना व संगीत संयोजन यामुळे बॅले रंगतदार झाला होता.
आपल्याकडेही असे अनेक राजहंस आहेत. समूह नृत्य प्रकारातून ऐतिहासिक व पौराणिक कथा अतिशय कौशल्याने, सांघिक हालचालीने सादर केल्या जातात. श्री शिवरायांच्या जीवनावरील ‘जाणता राजा’ ,अशोक हांडे यांचे ‘मराठी बाणा’, किंवा गोव्याच्या कलाकारांनी सादर केलेले श्रीकृष्णाच्या जीवनावरील ‘संभवामी युगे युगे’ अशी अनेक सुंदर नृत्य नाट्ये सादर होतात. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातही असे सुंदर सामूहिक नृत्य प्रकार आहेत. ही कला टिकविण्यासाठी आपण अशा कार्यक्रमांना सक्रीय पाठिंबा देऊन, कलाकारांना, निर्मात्यांना शाबासकीची थाप दिली पाहिजे.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- १२ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ ऐश्वर्यसंपन्न पीटर्सबर्ग ✈️
राजधानी मॉस्कोनंतर रशियातील महत्त्वाचे शहर म्हणजे सेंट पीटर्सबर्ग. पीटर्सबर्गला आलो तेंव्हा सूर्य मावळायला बराच वेळ होता. आमची गाईड नादिया हिच्याबरोबर छोट्या बसने शहराचा फेरफटका मारायला निघालो. पीटर्सबर्गच्या वायव्येला लादोगा या नावाचे युरोपमधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवरातून नीवा नदीचा उगम होतो. या नदीवर जवळजवळ चारशे ब्रिज बांधलेले आहेत.नीवा,मोइका आणि फोंटांका अशा तीन नद्या पीटर्सबर्ग मधून वाहतात. त्यांच्या कालव्यांनी पीटर्सबर्ग शहर आपल्या कवेत घेतले आहे.
कालव्यांवरील पूल ओलांडून बस जात होती. सहा पदरी स्वच्छ रस्ते व दोन्ही बाजूला पंधरा-पंधरा फुटांचे सुरेख दगडी फुटपाथ होते. दुतर्फा एकाला एक लागून दगडी, सलग तीन चार मजल्यांच्या इमारती होत्या. लाल, पिवळ्या,निळसर रंगांच्या त्या इमारतींना मध्येमध्ये नाजूक जाळीदार गॅलेऱ्या होत्या. बऱ्याच इमारतींच्या खांबांवर तगड्या दाढीधारी पुरुषांचे शिल्प दोन्ही हात पसरून जणू इमारतींना आधार देत होते. तर काही ठिकाणी काळ्या रंगातील पऱ्यांची देवदूत आंचे शिल्प होती निवा नदीच्या एका काठावर उतरलो. नदीच्या काठावर खूप उंच दीपगृह उभारले आहे. त्याच्या मधोमध चारही बाजूंना सिरॅमिक्सच्या मोठ्या पणत्या आहेत. चौथऱ्याच्या चारी बाजूंना सुंदर शिल्पे कोरलेली आहेत. त्यातील एक नीवा नदीचे प्रतीक आहे. रस्त्यांवर दोन्ही बाजूला अतिशय सुंदर, कलात्मक आणि वेगवेगळ्या आकाराचे मोठे लॅऺ॑प पोस्ट उभारले आहेत. प्रत्येक दिव्याचा खांब वेगळा. कधी तो छोट्या देवदूतांनी हातात धरलेला तर कधी सिंहासारखा पण पंख असलेल्या प्राण्याच्या शेपटीतून उभारलेला. त्रिकोणात मोठे गोल दिवे तर कधी षटकोनी दिवे कारंज्यासारखे दांडीवर बसविलेले होते. शंभर-दीडशे वर्षांपूर्वींचे शहराच्या रस्त्यांचे नियोजन आणि स्वच्छता कौतुक करण्यासारखे वाटले. मोइका आणि फोंटांका या नद्या जिथे एकमेकींना मिळतात त्यावरील अॅनिकॉव्ह ब्रिज अत्यंत देखणा आहे. त्याच्या मध्यवर्ती चौकातून चारही दिशांना सरळसोट मोठे रस्ते गेले आहेत. चौकाच्या चार कोपऱ्यांवर लालसर काळ्या ब्रांझमधील उमद्या घोड्यांचे सुंदर शिल्प आहे. प्रत्येक शिल्पाजवळ त्या घोड्याला माणसाळवण्यासाठी शिक्षण देणारे ट्रेनर्स वेगवेगळ्या पोझमध्ये आहेत. घोड्यांची आक्रमकता आणि ट्रेनर्सच्या चेहर्यावरील भाव लक्षवेधी आहेत.पिटर क्लॉड या सुप्रसिद्ध शिल्पकाराची ही देखणी शिल्पे आहेत.
दुसऱ्या दिवशी सकाळी ‘हर्मिटेज’ हा जगन्मान्य उत्तम दर्जाचा म्युझियम बघायला गेलो. हर्मिटेज या फ्रेंच शब्दाचा अर्थ खाजगी जागा. ‘कॅथरीन द ग्रेट’ हिचा हा वैयक्तिक संग्रह आहे. १९१७ च्या रशियन राज्यक्रांतीनंतर हे म्युझियम सर्वांसाठी खुले करण्यात आले. कला, सौंदर्य आणि ऐश्वर्य यांचा संगम म्हणजे हे हर्मिटेज म्युझियम! पहिल्या महायुद्धामध्ये जर्मन सैन्याचा वेढा पीटर्सबर्ग भोवती ९०० दिवस होता. लाखो लोक उपासमारीने मेले. त्यावेळी हर्मिटेजची देखभाल करणारे खास प्रशिक्षित क्युरेटर्स, विद्वान पंडित, नोकरवर्ग वगैरे सारे, हे हर्मिटेज ज्या पिटर दि ग्रेटच्या राजवाड्यात आहे, त्याच्या तळघरात गुप्तपणे राहीले. धोका पत्करून अनेक मौल्यवान कलाकृती त्यांनी बाहेरगावी रवाना केल्या. हा खजिना वाचविण्यासाठी जिवाची पर्वा न करता त्यांनी मोठ्या परिश्रमाने कलाकृतींची तपशीलवार नोंद केली. मोजदाद केली. या कलाकृतींमध्ये लिओनार्दो- दा- विंची, पिकासो, देगा, रॅफेल, रेम्ब्रा, गॉ॑ग,व्हॅनगो,सिझॅन अशा जगप्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती आहेत. जीवावर उदार होऊन जपलेल्या या कलाकृती म्हणजे रशियाचे वैभव आहे.
विंटर पॅलेस मधील ही हर्मिटेजची बिल्डिंग तीन मजली आहे. बाहेरूनच इमारतीच्या शंभराहून अधिक उंच खिडक्या आणि इमारतींचे सरळसोट उभे, कवेत न मावणारे मार्बलचे नक्षीदार खांब लक्ष वेधून घेतात. पांढऱ्या व गडद शेवाळी रंगातील या इमारतीच्या प्रवेशद्वारात कलात्मक सुंदर पुतळे आहेत. इटालियन पद्धतीच्या भव्य हॉलमधील खिडक्यांमधून नीवा आणि मोइका या नद्यांना जोडणारा विंटर कॅनॉल दिसतो. अंतर्गत सजावट तर आपल्याला चक्रावून टाकते.प्रत्येक पुढचे प्रत्येक दालन अधिक भव्य, सरस आणि संपन्न वाटते .१८३७ मध्ये लागलेल्या आगीत याचे लाकडी फ्लोअरिंग व बरीच अंतर्गत सजावट जळून गेली होती. पण १८५८ पर्यंत पुन्हा सारे नव्याने उभारण्यात आले. यावेळी धातू व मार्बल यांचा वापर करण्यात आला. तऱ्हेतऱ्हेची प्रचंड झुंबरे, कलात्मक पुतळे, गालिचे, राजसिंहासन, दरबार हॉल, अर्धवर्तुळाकार उतरते होत जाणारे अॅ॑फी थिएटर, गुलाबी, पिवळट, हिरवट ग्रॅनाईट वापरून उभारलेले भव्य खांब, वक्राकार जिने, मौल्यवान रत्ने,माणके,हिरे यांची अप्रतिम कारागिरी, लाकूड व काचकाम, पोर्सेलिनच्या सुंदर वस्तू ,सोनेरी नक्षीच्या चौकटीत बसविलेले वीस- वीस फूट उंचीचे आरसे होते .पाहुण्यांसाठीच्या खोल्या, डान्सचा हॉल, नाश्त्याच्या, जेवणाच्या खोल्या अतिशय सुंदर सजवलेल्या होत्या. तेथील रेशमी पडदे ,सोफा सेट, नक्षीदार लाकडी कपाटे, अभ्यासाची जागा, लायब्ररी, लहान मुलांचे व स्त्री-पुरुषांचे उत्तम फॅशनचे कपडे,ज्युवेलरी, डिनर सेट, हॉलच्या एका कोपऱ्यात असलेल्या फायरप्लेस सभोवती सिरॅमिक्सची नक्षी सारेच उच्च अभिरुचीचे आणि कलात्मक आहे. डान्स हॉलमधील आरसे आणि सोन्याचा मुलामा दिलेले नक्षीदार खांब यांनी डोळे विस्फारले जात होते. या म्युझियममध्ये तीस लाखांहून अधिक कलाकृतींचा संग्रह आहे. चायना, जपान, ब्रिटन, फ्रान्स येथून आणलेल्या हरतऱ्हेच्या अमूल्य वस्तू आहेत. तीस फूट उंच छत आणि त्यावरील ३०फूट×४०फूट लांबी रुंदीची, पूर्ण छतभर असलेली पेंटिंग्ज डोळ्यांचे पारणे फेडतात. खालच्या मजल्यावरील लांबलचक रूंद गॅलेरीच्या दोन्ही भिंतींवर छतापर्यंत भव्य पेंटिंग्ज आहेत. तत्कालीन युद्धाचे देखावे, नीवाचा किनारा, त्यावेळचे रीतीरिवाज, गप्पा मारत एकीकडे विणकाम, भरतकाम करणाऱ्या तरुण, सुंदर मुली चितारल्या होत्या. गुलाबाची फुले व वेली अशा रंगविल्या होत्या की त्या छतावरून खाली लोंबत आहेत असे वाटावे. इथे असलेले रती आणि मदन( सायको आणि क्युपिड) यांचे पुतळे अतिशय देखणे, प्रमाणबद्ध आणि चेहर्यावर विलक्षण उत्कटता, प्रेमभाव दाखविणारे होते. हर्मिटेजमधील या प्रकारचे अनेक पुतळे नग्न असूनही अश्लील वाटत नव्हते. .सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सार्या वैभवाची अत्यंत कसोशीने, काळजीपूर्वक निगुतीने सतत देखभाल केली जाते.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- ११ – भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
‘भीषण सुंदर’ सुंदरी आणि चंद्रमुखी??
दुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्पच्या शेजारी असलेलं म्युझियम पाहिलं. त्यात वाघ, इतर वन्य प्राणी, मगरी, पक्षी, फुलपाखरं, वेगवेगळ्या जातीची तिवरं, त्यांचे उपयोग असं दाखवलं होतं. तिथून खाली दिसणार्या मोठ्या तळ्यात मगर पार्क केलं होतं .सुंदरबनच्या बेटसमूहांचा मोठा कॉ॑क्रीटमधला नकाशा फुलापानांनी सजलेल्या बागेत होता. आज सुंदरबनातून परतीचा प्रवास होता. येताना काळोखात न दिसलेली अनेक राहती हिरवी बेटं, त्यावरील कौलारु घरं, शाळा,नारळी- केळीच्या बागा आणि भातशेतीच्या कामात गढलेली माणसं दिसत होती. खाडीचं खारं पाणी आत येऊ नये म्हणून प्रत्येक गावाला उंच बंधारे बांधले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात हॅमिल्टन नावाच्या गोऱ्या साहेबानं गोसाबा या बेटावर स्थानिकांनी तिथे रहावं म्हणून शेतीवाडी, शिक्षण, हॉस्पिटल, रस्ते या कामात मदत केली. तो स्वतःही तिथे रहात होता. या बेटावरील त्याचा जुना, पडका बंगलाही पाहायला मिळाला. रवींद्रनाथ ठाकूर यांनी दोन दिवस वास्तव्य केलेली, छान ठेवलेली एक बंगलीही होती. गोसाबा बेटावरचे हे गाव चांगलं मोठं, नांदतं होतं. तिथलं पॉवर हाउस म्हणजे जंगली लाकडाचे मोठे ठोकळे वापरून, मोठ्या भट्टीत बॉयलरवर पाणी उकळवतात व त्यापासून औष्णिक वीज तयार केली जाते. त्यातून त्या गावाची विजेची गरज भागते.
जिम कार्बेट, कान्हा, काझीरंगा, रणथंबोर, थेकडी, सुंदरबन अशा अनेक अरण्यांना भेटी देऊन झाल्या पण वाघाची व आमची दृष्टभेट नाही. आम्हाला फक्त हरीणे, पक्षी, हत्ती, रानम्हशी वगैरेंचं दर्शन झालं. सुंदरबन कॅ॑पमध्ये रात्री आम्हाला एका मोठ्या हॉलमध्ये वाघावरची फिल्म दाखवली. तिथे अजून २७६ वाघ आहेत. परंपरागत मासेमारीसाठी, मध व औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी स्थानिक लोक जीव धोक्यात घालून या वनात खोलवर जातात. लांबट होडीतून सात-आठ जण एकत्र जातात. त्यांच्या चेहऱ्याच्या मागच्या बाजूला माणसाचा मुखवटा वाघाची फसगत करण्यासाठी बांधलेला असतो. अजूनही दरवर्षी चाळीस- पन्नास माणसं वाघाचे भक्ष होतात. कधी सरपण गोळा करायला गेलेली मुलं, म्हातारी माणसं तर कधी मासेमारीसाठी गेलेले कोळी. भक्षावर झेपावणारं ते सळसळतं, सोनेरी ‘भीषण सौंदर्य’ पडद्यावर पाहतानासुद्धा थरथरायला होत होतं! चित्रफितीच्या शेवटी एका लांबट, मजबुत होडीतून सात- आठ जण दहा- पंधरा दिवसांनी मासेमारी करून, जंगल संपत्ती घेऊन घरी परत येत आहेत असं दाखवलं होतं. होडीच्या स्वागतासाठी किनार्यावर त्यांचे सारे कुटुंबीय हजर होते. घरधनी सुखरूप परत आल्याचं पाहून एका सावळ्या, गोल चेहऱ्याच्या, टपोऱ्या डोळ्यांच्या, गोल मोठं कुंकू आणि भांगात सिंदूर भरलेल्या ‘चंद्रमुखी’च्या चेहराभर हसू पसरलं. इतकं आंतरिक समाधानाचं, निर्व्याज, मनापासूनचं हसू खूप खूप दिसांनी बघायला मिळालं.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- ९ – जगदलपूर ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
बोरा केव्हज् पाहून आम्ही बसने आरकू व्हॅली इथे मुक्कामासाठी निघालो. खरं म्हणजे विशाखापट्टणम ते छत्तीसगडमधील जगदलपूर हा आमचा प्रवास किरंडूल एक्स्प्रेसने होणार होता. ही किरंडूल एक्सप्रेस पूर्व घाटाच्या श्रीमंत पर्वतराजीतून, घनदाट जंगलातून, ५४ बोगद्यांमधून प्रवास करीत जाते म्हणून त्या प्रवासाचे अप्रूप वाटत होते. पण नुकत्याच पडलेल्या धुवांधार पावसामुळे एका बोगद्याच्या तोंडावर डोंगरातली मोठी शिळा गडगडत येऊन मार्ग अडवून बसली होती. म्हणून हा प्रवास आम्हाला या डोंगर-दर्या शेजारून काढलेल्या रस्त्याने करावा लागला. हा प्रवासही आनंददायी होता. रूळांवरील अडथळे दूर सारून नुकत्याच सुरू झालेल्या मालगाडीचे दर्शन अधूनमधून या बस प्रवासात होत होते. प्रवासी गाडी मात्र अजून सुरू झाली नव्हती. अनंतगिरी पर्वतरांगातील लावण्याच्या रेशमी छटा डोळ्यांना सुखवीत होत्या.भाताची पोपटी, सोनसळी शेते, तिळाच्या पिवळ्याधमक नाजूक फुलांची शेती आणि मोहरीच्या शेतातील हळदी रंगाचा झुलणारा गालिचा, कॉफीच्या काळपट हिरव्या पानांचे मळे आणि डोंगर कपारीतून उड्या घेत धावणारे शुभ्र तुषारांचे जलप्रपात रंगाची उधळण करीत होते.
गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांचे कळप चरायला नेणारे आदिवासी पुरुष, लाकूड-फाटा आणि मध, डिंक, चिंचा, आवळे, सीताफळे असा रानमेवा गोळा करून पसरट चौकोनी टोपल्यातून डोक्यावरून घेऊन जाणाऱ्या आदिवासी स्त्रिया मधून मधून दिसत होत्या. या स्त्रिया कानावर एका बाजूला उंच अंबाडा बांधतात. त्यावर रंगीबेरंगी फुलांच्या, मण्यांच्या माळा घालतात. घट्ट साडी नेसलेल्या, पायात वाळे आणि नाकात नथणी घातलेल्या तुकतुकीत काळ्या रंगाच्या या स्त्रिया भोवतालच्या निसर्गचित्राचा भव्य कॅनव्हास जिवंत करीत होत्या. आरकू म्हणजे लाल माती.आरकू व्हॅली व परिसरातील आदिवासींना, वनसंपत्तीला संरक्षण देणारे विशेष कायदे आंध्र प्रदेश सरकारने केले आहेत. व्हॅलीतील सुखद,शीतल वास्तव्य अनुभवून आम्ही छत्तीसगडमधील जगदलपूर इथे जाण्यासाठी निघालो.
जगदलपूर हे बस्तर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. बस्तरच्या खाणाखुणा पाषाण युगापर्यंत जातात. प्राचीन दंडकारण्याचा हा महत्वपूर्ण भूखंड आहे. हा सर्व भाग घनदाट जंगलसंपत्तीने, खनिजांनी समृद्ध आहे.साग आणि साल वृक्ष, बांबूची दाट बने, पळस यांचे वृक्ष तसेच चिरोंजी, तेंदूपत्ता,सियारी म्हणजे पळस, आंबा, तिखूर सालबीज, फुलझाडूचे गवत, रातांबा आणि कित्येक औषधी वनस्पतींनी श्रीमंत असं हे जंगल आहे. या पूर्व घाटातील बैलाडीला या पर्वतरांगांमध्ये अतिशय उच्च प्रतीच्या लोहखनिजाचे प्रचंड साठे आहेत. ब्रिटिशांनी दुर्गम प्रदेशातील या खनिजसंपत्तीचा शोध लावला. बस्तर संस्थानच्या भंजदेव राजाला फितवून त्यांना हैदराबाद प्रमाणेच हे संस्थान स्वतंत्र ठेवायचे होते. भारताची आणखी मनसोक्त लूट करायची होती. पण पोलादी पुरुष सरदार वल्लभाई यांनी १९४८साली बस्तर संस्थान खालसा केले. विशाखापट्टणम ते जगदलपुर ही पूर्व घाटातून ५४ बोगदे खणून बांधलेली रेल्वे जपानने बांधून दिली. १९६० साली जपानबरोबर ४० वर्षांहूनही अधिक वर्षांचा करार करण्यात आला. बैलाडीलातील समृद्ध लोहखनिज खाणीतून काढून कित्येक किलोमीटर लांबीच्या सरकत्या पट्ट्यांवरून मालगाड्यात भरले जाते. तिथून ते विशाखापट्टणमला येते आणि थेट जपानला रवाना होते. कारणे काहीही असोत पण जपानबरोबरचा हा करार अजूनही चालूच आहे. ब्रिटिशांच्या, जपान्यांच्या बुद्धिमत्तेचे, चिकाटीचे, संशोधक वृत्तीचे कौतुक करावे की वर्षानुवर्षे त्यांनी आपल्या देशाची केलेली लूट पाहून विषाद मानावा अशी संभ्रमित मनस्थिती होते.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- ८ – सिंहगिरीचे शिल्प काव्य ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
विशाखापट्टणम हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर आहे. या नैसर्गिक बंदरातून दररोज लक्षावधी टन मालाची आयात- निर्यात होते. जहाज बांधणीचा अवाढव्य कारखाना इथे आहे. विशाखापट्टणम हे ईस्टर्न नेव्हल कमांडचे मुख्यालय आहे.
आम्ही इथल्या ऋषिकोंडा बीचवरील आंध्रप्रदेश टुरिझमच्या ‘पुन्नामी बीच रिसॉर्ट’ मध्ये राहिलो होतो. ऋषिकोंडा बीच ते भिमुलीपटनम असा हा सलग बत्तीस किलोमीटर लांबीचा अर्धचंद्राकृती स्वच्छ समुद्र किनारा आहे. निळ्या हिरव्या उसळणाऱ्या लाटा गळ्यात पांढर्याशुभ्र फेसाचा मफलर घालून किनाऱ्यावरील सोनेरी वाळूकडे झेपावत होत्या. किनाऱ्यावरील हिरवळीने नटलेल्या, फुलांनी बहरलेल्या बागेत नेव्हल कमांडच्या बॅण्डचे सूर तरंगत होते. समुद्र किनार्यावरच पाणबुडीतले आगळे संग्रहालय बघायला मिळाले.’ आय एन एस कुरसुरा’ ही रशियन बनावटीची पाणबुडी १९७२ च्या पाकिस्तानी युद्धात कामगिरीवर होती. ९० मीटर लांब आणि ४ मीटर रुंद असलेल्या या पाणबुडीचे आता संग्रहालय केले आहे. आतल्या एवढ्याश्या जागेत पाणबुडीच्या सगळ्या भिंती निरनिराळे पाईप्स, केबल्स यांनी व्यापून गेल्या होत्या. छोट्या-छोट्या केबिन्समध्ये दोघांची झोपायची सोय होती. कॅप्टनची केबीन, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह सारे सुसज्ज होते. क्षेपणास्त्रे होती. बघायला मनोरंजक वाटत होतं पण महिनोन् महिने खोल पाण्याखाली राहून शत्रुपक्षाचा वेध घेत सतर्क राहायचं हे काम धाडसाचं आहे. अशा या शूरविरांच्या जीवावरच आपण निर्धास्तपणे आपलं सामान्य जीवन जगू शकतो या सत्याची जाणीव आदराने मनात बाळगायला हवी. विशाखापट्टणममधील सिंहगिरी पर्वतावरील सिंहाचलम मंदिर म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे ‘श्री लक्ष्मी वराह नृसिंह मंदिर’ चालुक्य ते विजयनगर या राजवटीत म्हणजे जवळजवळ ६०० वर्षांच्या कालावधीत बांधले गेले. दगडी रथाच्या आकाराच्या या मंदिरात कल्याणमंडप, नर्तक, वादक, रक्षक, पशुपक्षी, देवता यांच्या असंख्य सुबक मूर्ती कोरल्या आहेत. वराह नृसिंहाची मूर्ती चंदनाच्या लेपाने झाकलेली असते.
एका डोंगरावरील कैलासगिरी बागेमध्ये शंकरपार्वतीचे शुभ्र, भव्य शिल्प आहे. तिथल्या व्ह्यू पॉइंटवरून अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा व त्यात दूरवर दिसणाऱ्या बोटी न्याहळता आल्या. इथल्या बागांमध्ये स्टीलचे मोठे- मोठे डबे, सतरंज्या घेऊन लोकं सहकुटुंब सहपरिवार सहलीसाठी आले होते.
विशाखापट्टणमहून आम्ही बसने बोरा केव्हज बघायला निघालो. वाटेत त्याडा इथले जंगल रिझॉर्ट पाहिले. थंडगार, घनदाट जंगलात नैसर्गिक वातावरणाला साजेशी बांबूची, लाकडाची छोटी झोपडीसारखी घरे राहण्यासाठी, पक्षी व वन्यप्राणी निरीक्षणासाठी बांधली आहेत. तिथे मोठ्या चिंचेच्या पारावर चहापाणी घेऊन बोरा केव्हजकडे निघालो. डांबरी रस्त्यावरून आमची बस वेगात चालली होती. रस्त्याच्या दुतर्फा साग, चिंच, पळस, आवळा असे मोठमोठे वृक्ष होते. त्यांच्या पलीकडे अनंतगिरी पर्वतरांगांच्या पायथ्यापर्यंत भाताची,तिळाची,मोहरीची शेती डुलत होती. कॉफीचे मळे होते. पर्वतरांगा हिरव्या पोपटी वनराईने प्रसन्न हसत होत्या. जिथे पर्वतांवर वनराई न्हवती तिथली लालचुटूक माती खुणावत होती.बोरा केव्हज् पाहण्यासाठी एका नैसर्गिक गुहेच्या तोंडाशी आलो. लांब-रुंद ८०-८५ पायऱ्या बाजूच्या कठड्याला धरून उतरलो. जवळजवळ सव्वाशे फूट खाली पोहोचलो होतो. गाईडच्या मोठ्या बॅटरीच्या मार्गदर्शनात गुहेच्या भिंती, छत न्याहाळू लागलो. निसर्गवैभवाचा अद्भुत खजिनाच समोर उलगडत गेला. कित्येक फूट घेराचे, शेकडो फूट उंचीचे, लवण(क्षार) स्तंभ लोंबकळत होते. या विशाल जलशिलांना निसर्गतःच विविध आकार प्राप्त झाले आहेत. कुठे गुहेच्या छतावर सुंदर झुंबरे लटकली आहेत तर कुठे देवळांच्या छतावर कमळे कोरलेली असतात तसा कमळांचा आकार आहे. खाली खडकांवर मानवी मेंदूची प्रतिकृती आहे. भिंतीवर मक्याचे मोठे कणीस व मशरूम आहे. तर एकीकडे आई मुलाला घेऊन उभी आहे. दुसरीकडे म्हैस, माकडे, गेंडा,साप अशी शिल्पे तयार झाली आहेत. जरा पुढे गेल्यावर गुहेच्या भिंतीवर वडाच्या पारंब्यांचा विस्तार आहे. कुठे दाढीधारी ऋषी दिसतात तर कुठे शिवपार्वती गणेश! गुहेच्या सुरुवातीला शिवलिंग तयार झाले आहे. या गुहेत पन्नास- साठ पायर्या चढून गेलं की मोठ्ठं शिवलिंग दिसतं.प्रकृतीचा हा अद्भुत आविष्कार आपण निरखून पाहू तेवढा थोडा.हा भूखंड प्राचीन दंडकारण्याचा भाग समजला जातो.
बोरा केव्हज् मधील निसर्गाचे हे अद्भूत शिल्पकाव्य दहा लाख वर्षांपूर्वीचे आहे. १८०७ साली सर विल्यम किंग यांना तिचा शोध योगायोगाने लागला. गोस्तानी नदी वाहताना अनंतगिरी पर्वतातील सिलिका, मायका, मार्बल, ग्रॅनाईट यासारखा न विरघळणारा भाग शिल्लक राहून प्रचंड मोठी गुहा तयार झाली. एका वेळी एक हजार माणसे मावू शकतात एवढी मोठी ही गुहा आहे.गुहेमध्ये वरून ठिबकणारे पाणी क्षार ( कॅल्साइट) मिश्रित होते. थेंब थेंब पाणी खाली पडल्यावर त्यातील थोडे सुकून गेले आणि राहिलेल्या क्षाराचे स्तंभ बनले. याच वेळी छतावरून ठिबकणारे थोडे थोडे पाणी सुकून छतावरून लोंबकळणारे क्षारस्तंभ तयार झाले. स्तंभाची एक सेंटीमीटर लांबी तयार व्हायला एक हजार वर्षे लागतात. यावरून या गुहेची प्राचीनता लक्षात येते.
अजूनही गुहेत ठिकठिकाणी पाणी ठिबकणे व ते सुकणे ही प्रक्रिया चालूच आहे. चाळीस हजार वर्षांपूर्वी या गुहेत आदिमानव राहात होता असे पुरावे सापडले आहेत. आंध्र प्रदेश पर्यटन महामंडळाने या गुहेची उत्तम व्यवस्था ठेवली आहे. आवश्यक त्या ठिकाणी प्रखर झोतांचे दिवे सोडले आहेत. गुहेत स्वच्छता आहे. प्रशिक्षित मार्गदर्शक आहेत. हा प्राचीन अनमोल ठेवा चांगल्या तऱ्हेने जतन केला आहे.
अनंतगिरी वरील मानवनिर्मित शिल्प काव्य आणि निसर्गाने उभे केलेले शिल्पकाव्य मनावर कायमचे कोरले गेले.
☆ मी प्रवासिनी क्रमांक- ७ – क्रोएशियाचे समुद्र संगीत ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
क्रोएशियाला एड्रियाटिक सागराचा ११०० मैल समुद्र किनारा लाभला आहे. दुब्रावनिक या दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावरील शहरात पोहोचताना उजवीकडे सतत निळाशार समुद्र दिसत होता. त्यात अनेक हिरवीगार बेटे होती. क्रोएशियाच्या हद्दीत लहान-मोठी हजारांपेक्षा जास्त बेटे आहेत. त्यातील फार थोड्या बेटांवर मनुष्यवस्ती आहे. काही बेटांवरील फिकट पिवळ्या रंगाची, गडद लाल रंगाच्या कौलांची टुमदार घरे चित्रातल्यासारखी दिसत होती. समुद्रात छोट्या कयाकपासून प्रचंड मोठ्या मालवाहू बोटी होत्या. डाव्या बाजूच्या डोंगरउतारावर दगडी तटबंदीच्या आत लालचुटुक कौलांची घरे डोकावत होती.
गाइडबरोबर केबलकारने एका उंच मनोऱ्यावर गेलो. तिथून निळ्याभोर एड्रियाटिक सागराचे मनसोक्त दर्शन घेतले. गार, भन्नाट वारा अंगावर घ्यायला मजा वाटली. तिथून जुने शहर बघायला गेलो. जुन्या शहराभोवती भक्कम दगडी भिंत आहे. दोन किलोमीटर लांब व सहा मीटर रुंद असलेल्या या खूप उंच भिंतीवरून चालत अनेक प्रवासी शहर दर्शन करीत होते.
दगडी पेव्हर ब्लॉक्सच्या रस्त्यावर एका बाजूला चर्च व त्यासमोर ओनोफ्रिओ फाउंटन आहे. रोमन काळात दूरवरून पाणी आणण्यासाठी खांबांवर उभारलेल्या पन्हळीमधून उंचावरून येणारे पाणी गावात नळाने पुरवत असत. तसेच ते ओनोफ्रिओ फाउंटनमधूनही पुरवण्याची व्यवस्था होती. आजही आधुनिक पद्धतीने या फाऊंटनमधून प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.
रस्त्याच्या एका बाजूला सोळाव्या शतकातील एक फार्मसी आहे. वेगवेगळ्या रंगांच्या बाटल्या, औषधी कुटण्यासाठीचे खलबत्ते, औषधी पावडरी मोजण्याचे छोटे तराजू, औषधांचे फाॅर्म्युले, रुग्णांच्या याद्या असे सारे काचेच्या कपाटात प्रवाशांना बघण्यासाठी ठेवले आहे. मुख्य म्हणजे आजही या ठिकाणी आधुनिक फार्मसीचे दुकान चालू आहे. मुख्य रस्त्याच्या शेवटी १६ व्या शतकातले कस्टम हाऊस आहे. तिथे राजकीय मौल्यवान कागदपत्रे, वस्तू ठेवल्या जात.
‘गेम ऑफ थ्रोन (Game of Throne)’ ही वेब आणि टीव्ही सिरीयल जगभर लोकप्रिय झाली. त्यातील एका राजघराण्याचे शूटिंग दुब्रावनिक येथे झाले आहे. हे शूटिंग ज्या ज्या ठिकाणी झाले त्याची ‘गेम ऑफ थ्रोन वॉकिंग टूर’ तरुणाईचे आकर्षण आहे. ‘गेम ऑफ थ्रोन’ असे लिहिलेले टी-शर्ट, बॅग, मग्स, सोव्हिनियर्स दुप्पट किमतीला जोरात खपत होते. दुब्रावनिकच्या नितळ निळ्याभोर समुद्रातून लहान-मोठ्या बोटीने काॅर्चुला,स्प्लिट, बुडवा, व्हार अशा निसर्गरम्य, ऐतिहासिक बेटांची सफर करता येते. ताज्या सी-फूडचा आस्वाद घ्यायला मिळतो.व्हार खाडीतून फार पूर्वीपासून क्रोएशिया व इटली यांचे व्यापारी संबंध होते. त्यामुळे इथे थोडी इटालियन संस्कृतीची झलक दिसते. पास्ता, पिझ्झा, वाइन, आईस्क्रीम यासाठी दुब्रावनिक प्रसिद्ध आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यांवर वाळू नाही तर चपटे, गोल गुळगुळीत छोटे छोटे दगड (पेबल्स) आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर लव्हेंडर, रोजमेरीसारख्या साधारण मोगऱ्याच्या जातीच्या फुलांचा सुवासिक दरवळ पसरलेला असतो. नितळ, निळ्याशार, स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांवर अनेक जण पोहोण्याचा पोटभर आनंद घेतात. स्वच्छ समुद्रकिनारा आणि सुंदर हवामान यामुळे क्रोएशियाकडे प्रवाशांचा वाढता ओघ आहे. इंग्लंड, फ्रान्स, इटली येथील लोकांना दोन तासांच्या विमान प्रवासावर हे ठिकाण असल्याने त्यांची इथे गर्दी असते. स्थानिक लोक स्लाव्हिक भाषेप्रमाणे इंग्लिश, फ्रेंच भाषा उत्तम बोलू शकतात.
राजधानी झाग्रेब आणि दुब्रावनिक यांच्या साधारण मध्यावर झाडर नावाचे शहर एड्रियाटिक सागराकाठी आहे. हॉटेलमधून चालत चालत समुद्रकाठी पोहोचलो. समोर अथांग निळा सागर उसळत होता. झळझळीत निळ्या आकाशाची कड क्षितिजावर टेकली होती. लांब कुठे डोंगररांगा आणि हिरव्या बेटांचे ठिपके दिसत होते. दूरवर एखादी बोट दिसत होती. आणि या भव्य रंगमंचावर अलौकिक स्वरांची बरसात होत होती. प्रत्यक्ष समुद्रदेवाने वाजविलेल्या पियानोच्या स्वरांनी आसमंत भारून गेले होते.
या समुद्र काठाला दहा मीटर लांबीच्या सात रुंद पायर्या आहेत. विशिष्ट प्रकारे बांधलेल्या या पायर्यांना पियानोच्या कीज् सारखी आयताकृती छिद्रे आहेत. सर्वात वरच्या पायरीवर, ठरावीक अंतरावर छोटी छोटी गोलाकार वर्तुळे आहेत. या वेगवेगळ्या उंचीवरच्या समुद्रात उतरणाऱ्या पायर्यांच्या आतून ३५ वेगवेगळ्या लांबी-रुंदीचे पाईप्स बसविले आहेत. संगीत वाद्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेले हे पाईप म्हणजे समुद्र देवांचा पियानो आहे. किनाऱ्यावर आपटणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे या पाईप्समधील हवा ढकलली जाते. लाटांच्या आवेगानुसार, भरती- ओहोटीनुसार या पाईप्समधून सुरेल सुरावटी निनादत असतात. उतरत्या पायऱ्या, त्याच्या आतील रचना आणि वाऱ्याचा, लाटांचा आवेग यामुळे हे स्वरसंगित ऐकता येते. आम्ही सर्वात वरच्या पायरीवरील गोल भोकांना कान लावून या संगीत मैफलीचा आनंद घेतला. पायर्या उतरून गार गार निळ्या पाण्यात पाय बुडवले. ज्ञानदेवांची ओवी आठवली..
निळीये रजनी वाहे मोतिया सारणी
निळेपणी खाणी सापडली..
आकाश आणि समुद्राच्या या निळ्या खाणीमध्ये स्वर्गीय सुरांचा खजिना सापडला होता.
झाडर या प्राचीन शहराने मंगोल आक्रमणापासून दुसऱ्या महायुद्धापर्यंत अनेक लढाया पाहिल्या. दुसऱ्या महायुद्धामध्ये तर झाडर हे नाझी सैन्याचे मुख्यालय होते. अमेरिका आणि ब्रिटनच्या बॉम्बवर्षावाने झाडर भाजून निघाले, उध्वस्त झाले. युद्धानंतर विद्रूप झालेल्या शहराची, समुद्रकिनार्याची पुनर्रचना करण्यात आली. सरकारने जगप्रसिद्ध स्थापत्यविशारद निकोल बेसिक यांच्याकडे या समुद्रकिनाऱ्याच्या सुशोभीकरणाचे काम सोपविले. त्यांच्या कल्पकतेतून हे अलौकिक सागर संगीत निर्माण झाले आहे. त्यांना ‘सर्वोत्कृष्ट युरोपियन पब्लिक स्पेस’ सन्मान या कलाकृतीसाठी 2006 साली मिळाला.
निकोल बेसिक यांनी इथे ‘दी ग्रीटिंग टू दी सन’ हे आणखी एक आगळे स्मारक सूर्यदेवांना समर्पित केले आहे. त्यांनी या समुद्रकिनार्यावर आहे त्यांनी या समुद्रकिनाऱ्यावर २२ मीटर परिघाचे आणि ३०० पदरी काचांचे वर्तुळ बांधले. या वर्तुळात सौरऊर्जा शोषणाऱ्या पट्ट्या बसविल्या. या पट्ट्या दिवसभर सूर्याची ऊर्जा साठवितात आणि काळोख पडला की त्या वर्तुळातून रंगांची उधळण होते. त्यावर बसविलेली ग्रहमालासुद्धा उजळून निघते. किनारपट्टीवर लावलेल्या सौरऊर्जेच्या दिव्यांनी किनारा रत्नासारखा चमकू लागतो.
सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा समोर दिसत होता. आकाशातल्या केशरी रंगांची उधळण समुद्राच्या लाटांवर हिंदकळत होती. आकाश आणि सागराच्या निळ्या शिंपल्यामध्ये सूर्य बिंबाचा गुलाबी मोती विसावला होता. दूरवरून एखादी चांदणी चमचमत होती. पु.शी. रेगे यांची कविता आठवली,
आकाश निळे तो हरि
अन् एक चांदणी राधा
श्रीकृष्णासारखी ती असीम, सर्वव्यापी निळाई आणि त्यातून उमटणारे ते पियानोचे- बासरीचे अखंड अपूर्व संगीत! निसर्ग आणि मानव यांच्या विलोभनीय मैत्रीचा साक्षात्कार अनुभवून मन तृप्त झाले.सौंदर्य आणि संगीत यांचा मधुघट काठोकाठ भरला.
☆ मी प्रवासिनी क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
टर्की एअरलाइन्सने ऑस्ट्रिया इथे पोहोचलो. ऑस्ट्रियाहून बसप्रवास करून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे गेलो. क्रोएशिया हा मध्य युरोपमधील एक छोटासा, सौंदर्यसंपन्न देश आहे. झाग्रेब हे त्याच्या राजधानीचे शहर सावा नदीच्या काठी एका डोंगररांगांच्या पायथ्याशी वसले आहे.
रोमन काळापासून हे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. गाईड बरोबर जुन्या शहराचा फेरफटका केला. एका मोठ्या चौकाच्या सभोवताली असलेल्या आकर्षक दुकानांतून लोकांची खरेदी चालली होती. खाण्यापिण्याचा आनंद घेणाऱ्यांची गर्दी उसळली होती. पुढील चौकात झाग्रेब शहराचा तेरा चौरस मीटर लांब रुंद असलेला मिश्रधातूमध्ये बनविलेला नकाशा बघायला मिळाला. एका दगडी वेशीच्या कमानदार,उंच दरवाजातून आत गेल्यावर चौदाव्या शतकात बांधलेले सेंट मार्क चर्च दिसले. याचे उतरते छप्पर अतिशय देखणे आहे. छपरावर छोट्या छोट्या लाल व हिरवट टाईल्स चौकटीमध्ये बसविलेल्या आहेत. उजव्या बाजूला लाल-पांढऱ्या टाइल्सचे सोंगट्यांच्या पटासारखे डिझाईन आहे. यापुढे हिरवट रंगाच्या टाईल्स वर तीन सिंह लाल टाइल्स मध्ये आहेत. चर्चच्या सभोवतालच्या उंच कोनाड्यात बारा धर्मगुरू दगडावर कोरलेले आहेत. हिरव्या सोनेरी रंगाच्या टाईल्सचा बेल टॉवर शोभिवंत दिसतो. एकोणिसाव्या शतकात इथे मोठा भूकंप झाला पण सुदैवाने बेल टॉवर अबाधित राहिले.
‘मार्शल टिटो स्क्वेअर’हा झाग्रेबमधील सर्वात मोठा चौक आहे.रुंद रस्ते, पुतळे, कारंजी, रेस्टॉरंटस्, मॉल्स रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या छोट्या बागा यामुळे हा चौक शोभिवंत दिसतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानातून क्रोशाचे विणकाम असलेल्या सुंदर लेस, रुमाल, ड्रेस नजाकतीने मांडले होते. तऱ्हेतऱ्हेचे टाय होते. गाईडने सांगितले की नेकटाय आणि फुटबॉल यांची सुरुवात क्रोएशियाने केली.
झाग्रेबपासून साधारण दोन तासांवर ‘प्लिटविक लेक्स नॅशनल पार्क’ आहे. अनेक डोंगर, दर्या, नद्या, धबधबे, सरोवरे असलेला हा एक खूप मोठा नैसर्गिक विभाग आहे. २९५ चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेला प्लिटविक लेक्स परिसर फार प्राचीन काळापासून म्हणजे हिमयुगानंतर अस्तित्वात आला असे शास्त्रज्ञ म्हणतात. हा संपूर्ण विभाग चुनखडीच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. या खडकांची सतत झीज होत असते. त्यामुळे डोंगर उतारावर अनेक घळी तयार झाल्या आहेत. त्यातून जलधारा कोसळत असतात. त्यांचे अनेक लहान-मोठे तलाव तयार झाले आहेत. निळ्या-हिरव्या रंगाचं गहिरं पाणी आणि त्यात तरंगणारी पांढऱ्या स्वच्छ कापसाच्या ढगांची प्रतिबिंबे मोहक दिसतात.
गाईड बरोबर जंगलातील थोडी पायवाट चालून एका छोट्या दोन डब्यांच्या रेल्वेत बसलो. दोन्ही बाजूंना बर्च, पाइन, ओक अशा सूचिपर्णी वृक्षांचे घनदाट जंगल होते. पाच मिनिटात गाडीतून उतरून परत चालायला सुरुवात केली. अनेक पायर्यांची चढ-उतर केली. छोट्या जंगलवाटेमधून ठिकठिकाणी निळ्या हिरव्या रंगांचे तलाव आणि त्यात अनेकांगांनी उड्या मारणारे असंख्य धबधबे यांचे नेत्रसुखद दर्शन होत होते. निसर्गाला अजिबात धक्का न लावता हे पायी चालण्याचे मार्ग तयार केले आहेत. वर्षानुवर्षे या चुनखडीच्या डोंगरांमधील कॅल्शिअम विरघळल्यामुळे ते सच्छिद्र झाले आहेत. या सातत्याने होणार्या प्रक्रियेमुळे या डोंगरातून येणारे झरे, धबधबे यांचा प्रवाह बदलत राहतो. वाहून गेलेल्या कॅल्शिअमचे पुन्हा लहान-मोठे दगड, बंधारे बनतात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा ओघ बदलत राहतो. मोठे धबधबे निर्माण होतात. इथल्या लहान-मोठ्या सोळा सरोवरांपैकी एका सरोवरातून यांत्रिक बोटीतून फेरफटका मारला. किनाऱ्याजवळील मातकट रंगाच्या पाण्यातून बोट निळसर हिरव्या नितळ पाण्यात शिरली. किनाऱ्यावरील उंच, हिरव्या वृक्षांची छाया त्यात हिंदकळू लागली. गार गार वाऱ्याने शिरशिरी भरली होती. चालून चालून पाय दमले होते पण डोळे आणि मन तृप्त झाले होते.
घनदाट सूचिपर्ण वृक्षराजी आणि अनेक प्रकारच्या ऑर्किड्सनी समृद्ध अशा इथल्या जंगल दऱ्यांमध्ये जैवसमृद्धी आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, विविध पक्षी, वटवाघळे, तपकिरी अस्वल आणि अन्य वन्य प्राणी यांच्या नैसर्गिक सहजीवनाचे अस्तित्व कसोशीने जपलेले आहे वृक्षांच्या जुन्या ओंडक्यांचा उपयोग करुन त्यापासून लाकडी बाके, कडेचे लाकडी कंपाउंड, उपहारगृहांचे लाकडी बांधकाम, पाय वाटेवरून घसरू नये म्हणून बसविलेल्या लाकडाच्या गोल चकत्या सारं तिथल्या निसर्गाशी एकरूप होणारं आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, केबल कार,बोट रोईंग अशा अनेक प्रकारांनी धाडसी तरुणाई इथल्या निसर्ग वैभवाचा मुक्त आनंद घेत होती. प्लिटविक लेक्स नॅशनल पार्कला युनेस्कोने १९७९ साली वर्ल्ड नॅचरल हेरिटेज…. जागतिक नैसर्गिक वारसा संपत्ती असा दर्जा दिला आहे .
क्रोएशियाला शास्त्रीय संशोधनाची महान परंपरा आहे. आज दैनंदिन व्यवहारात आपण अनेक गोष्टींचा सहजतेने वापर करतो त्यातील कितीतरी महत्त्वाचे शोध येथील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ( Nikola Tesla १८५६–१९४३) यांनी लावले आहेत. त्यांची प्रयोगशाळा व ऑफिस असलेली इमारत झाग्रेब इथे बघायला मिळाली.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीमध्ये डायरेक्ट करंटचा (DC ) शोध लावला त्याच वेळी निकोला टेस्ला यांनी अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक करंटचा (AC ) शोध लावला. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या वापरामध्ये सुरक्षितता, सहज वहन व किमतीमध्ये बचत झाली. नुसते बटण दाबून इलेक्ट्रिकचे दिवे लावताना आपण निकोला टेस्ला यांची आठवण ठेवली पाहिजे. टीव्ही चॅनल्स बदलताना, एसी लावताना आपण रिमोट कंट्रोलचा वापर करतो त्याचे संशोधन निकोला टेस्ला यांचेच. फ्रीज, मिक्सर, वाशिंग मशीन, हेअर ड्रायर अशा अनेक वस्तू ज्यावर चालतात त्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध टेस्ला यांनीच लावला. रेडिओचा शोध प्रथम मार्कोनी यांच्या नावावर होता. पण हा शोध टेस्ला यांनीच प्रथम लावल्याचे सिद्ध होऊन १९४ ३ साली त्यांना या संशोधनाचे पेटंट देण्यात आले. थर्मास, गॅस लायटर हेही त्यांचेच संशोधन!
त्यांच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक कारला टेस्ला असे नाव देण्यात आले आहे.
विसाव्या शतकापासून क्रोएशिया उद्योगधंदे, व्यापार, शैक्षणिक संस्था, दळणवळणाची साधने यांतही आघाडीवर राहिले आहे .मोठ्या पुलांची बांधणी, सस्पेन्शन ब्रिज, टर्बाइन्स, पॅरॅशूट जम्पिंग, आपण वापरत असलेले चष्मे हे संशोधन क्रोएशियातील शास्त्रज्ञांचे आहे. टीव्हीची सॅटॅलाइट डिश, असे अनेक महत्त्वाचे शोध लावले फाउंटन पेन चा शोध लावणारे पिकाला मास्टरयांच्या नावाची पेन फॅक्टरी अजूनही झाग्रेब मध्ये आहे .एमपी थ्री चा शोध इथलाच. क्रोएशियाच्या नवीन पिढीनेही हा वारसा पुढे नेला आहे. कार पार्किंग बाय टेक्स्ट मेसेज, सोलर पाॅवरवर चालणारा मोबाईल चार्जर बनविले आहेत. फेरारी, पोर्शे अशा कंपन्यांशी स्पर्धा करणारी इलेक्ट्रिक कार कंपनी झाग्रेब पासून जवळच आहे. केवळ 45 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे.