माणगाव, सिंधुदुर्ग येथे वास्तव्य आणि वैद्यकीय व्यवसाय.
लेखन व वाचनाची आवड. अनेक नियतकालिके, मासिके, दिवाळीअंक यामधून वेगवेगळ्या विषयांवर लेखन! ललीतलेखन हा अधिक आवडता लेखनप्रकार! विनोदी लेखनाची आवड! काही कविता, कथा आणि व्यक्तीचित्रणे वेगवेगळ्या अंकातून, इ- अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
☆ विविधा ☆ बंद दरवाजा ☆ डाॅ. मेधा फणसळकर ☆
दोन दिवस या माझ्या स्मार्ट भ्रमणध्वनीने हैराण केले बाई !मी आपली सारखी उचलून उचलून त्याला अंजारुन गोंजारुन इंटरनेटशी सख्य करायला सांगत होते, तो बिचारा माझा सोनूला पण दहा दहा वेळा विनवणी करुन त्याला आपल्या कवेत घ्यायला विनवत होता.पण आज भारत संचार निगमच्या नेटमहाराजानी संप पुकारला होता.बाकीचे नेटकर पण जरा तोऱ्यात असल्याने आखडून दाखवत होते. त्यामुळे माझे कायप्पा (WAP) आणि मुखपुस्तक (fb) पण बिचारे हवालदिल झाले होते. त्यांचे सर्वच दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून मैत्रिणींबरोबर चिवचिवाट, हळूच एकमेकींना private मेसेज टाकून दुसऱ्या एखादीबद्दल गॉसिप करायला न मिळाल्याने आणि सख्यांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला न मिळाल्याने माझ्या जीवाची नुसती घालमेल होत होती. रोज सकाळी पुन्हा पुन्हा मी त्या भारत संचार ची विनवणी करत होते, पण पठ्ठ्या काही दाद देत नव्हता. शेवटी मनावर दगड ठेवून त्या माझ्या भ्रमणसोन्याला हातातून बाजूला ठेवले आणि ‛आलीया भोगासी’ असे म्हणून कणिक तिंबायला घेतली. सगळा राग तिच्यावर असा काढला की प्रत्येक पोळी तव्यावर टम्म फुगली. त्यावर मुलांचे बाबा म्हणतात कसे, “ चला रे मुलांनो, पट्कन जेवायला बसा. आज आपल्यावर कायप्पा आणि मुखपुस्तकाने कृपा केलीय. गरगरीत पोळी आणि झणझणीत रस्सा खाऊन टाका बरे! परत कधी नशिबात असेल सांगता येणार नाही. ”मला जरा रागच आला. त्याच रागात दणादणा भांडी घासली, खसाखसा ओटा पुसला आणि लख्ख केला. ती टमटमीत पोळी आणि झणझणीत रस्सा रागारागाने गिळला. मग बराच वेळ एकट्या पडलेल्या त्या माझ्या भ्रमणसोन्याला पुन्हा प्रेमाने हातात घेतले. चांगले अंजारले-गोंजारले आणि नेटमहाराजांची आराधना करायला सुरुवात केली .
श्वास रोखून बघत राहिले तर काय आश्चर्य? चक्क नेटमहाराज प्रसन्न झाले आणि सर्व बंद दरवाजे उघडले गेले आणि कायप्पा धबधब्यासारखा कोसळू लागला. मुखपुस्तकाच्या संदेशानी इनबॉक्स भरुन गेला आणि त्या वर्षावात मी चिंबचिंब भिजून गेले.
रण रण त ऊन! मे महिन्याचा रखरखीत उन्हाळा! धरती तप्त ! उन्हामध्ये आंबा घाटामध्ये, एक पांढरी शुभ्र आली शान गाडी थांबली. गाडी मधून सहा सात बहिण भाऊ उतरले अन् त्यांची मनं जणू काही फुलपाखरं बनली . घाटामधल्या वृक्षांनी आपली सळसळ करून त्यांचं स्वागत केलं . हिरवी काळी टपोरी करवंदं म्हणाली,” या रेया ‘ बाळांनो, आम्ही तुमचीच वाट पहात होतो . तुमच्याच साठी आम्ही या उन्हातही आमच्या तला गोड रस टिकवून ठेवलाय”.
बऱ्याच वर्षांनी एकत्र आलेल्या या बहिण – भावंडांना खूप आनंद झाला होता . आंबा घाटातला हिरवागार निसर्गही त्यांच्याच साठी फुलला होता . सगळीकडे रखरखत ऊन असलं, तरी झाडाच्या मुळांनी खोलवर जाऊन आपल्या खोडासाठी, पानां साठी, पाणी आणलं होतं . पानाचा रसरशीतपणा, तजेलदार पणा टिकवून ठेवला होता . मध्येच एखाद्या झाडाला, नाजूक नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचे झुबके लागले होते . वाऱ्या बरोबर डोलत डोलत, ते झुबके यांचे स्वागत करत होते . अंतरा अंतरावर लाल चुटुक गुलमोहोर बहरला होता .
अशा या रम्य आणि अवखळ निसर्गाच्या सानिध्यात ही भावंडं आपली वय विसरली, आपल्या कामाचा ताण विसरली, ऑफीस मधल्या कामाचे डोंगर विसरली, पैशाचे व्यवहार विसरली आणि आपल्या मुलांच्या वयाएवढी पुनः एकदा लहान झाली . आपल्या बालपणात रमली.
अधून मधून एखाद्याचा मोबाईल वास्तवा मध्ये आणण्याचा प्रयत्न करत होता पण आज मोबाईल वरुनही मस्ती तच उत्तर जात होते . उन्हामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आनंदाचं चांदणं बरसत होतं . आपल्या नाजूक, रंगबेरंगी फुलपाखरी पंखांनी हे सगळे घाटातमध्ये इकडून तिकडे, तिकडून इकडे छानपैकी फिरत होते मधूनच एखादा क्षण कॅमेऱ्यात टिपला जात होता .
आज कुणाला कुणाकडून का S ही नको होत . निखळ आनंदाचा पाऊसच जणूकाही बरसत होता.
आंबा घाटाचा हा अविस्मरणीय दौरा, पन्हाळ्यावर झेललेलं गार गार वारं, हेच यांना उरलेले वर्षातले दिवस मजेत घालवायला पुरणार होतं . आनंदाचा हा ठेवा, सगळ्यांनी भरभरून मनातल्या कुपीमध्ये जपून ठेवला.
खरच, भाऊ बहिणीचं प्रेम किती निखळ, निरागस आणि पवित्र असतं. साठीनंतर भेटले तरी सगळे बालपणात रमतात. त्या गोड आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलतात.” तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा” म्हणत डुलतात . त्यांच्याकडे आठवणींच्या रेशमाच्या मऊमऊ लडी असतात, शिंपल्यातल्या मोत्यांप्रमाणे दुर्मिळ प्रेमाचे क्षण असतात , रमणीय सुखांचे तुषार असतात आणि धो धो पावसा प्रमाणे धोधो प्रसंग असतात. कधीतरी अशी मैफल जमली की आनंदाचा शिडकावा होत असतो, हास्यांची बहार फुलत असते . या स्मृतिगंधाच्या फुलांमुळेच बहिण भावाचे नाते पक्के विणले जाते आणि किती जरी एकमेकांपासून दूर गेले तरी या रेशिम गाठी घट्ट च रहातात . त्याचमुळे उन्हाळ्यातही त्या सर्वाना प्रेमाचा गारवा अनुभवता येतो आणि आपुलकीची ऊब ही मिळते.
साहित्य – ‘अकल्पित’ कथासंग्रह आणि ‘श्रावणसर’ कविता संग्रह प्रकाशित.
विजयन्त, विपुलश्री,दै.केसरी, सत्यवेध, उत्तमकथा, ऋतुपर्ण, आभाळमाया यासारख्या मासिके, दिवाळी अंकात,पेपरमधून कथा, कविता, विविध लेख प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्र सेविका समितीच्या हस्तलिखितात ६-७ वर्षे कथा , कविता लेखन समाविष्ट. अनेक आनलाईन संमेलनात कविता वाचन केले.
सांगली आकाशवाणी वरून अनेक कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण.
‘ओवी ते अंगाई’ या सांस्कृतिक कार्यक्रमास लेखन सहाय्य व सादरीकरण.अंदाजे ७५ प्रयोग केले.
satsangdhara.net या आध्यत्मिक साईटसाठी श्रीमत भागवत पुराण आणि श्रीदेवी भागवत या ग्रंथाचे भावार्थ वाचन केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात(सांगली) कविता सादरीकरण आणि संमेलनाच्या कथासंग्रहात कथा प्रकाशित.
साहित्य भूषण (कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक), साहित्य भूषण(नाशिक) चा ‘गोदामाता’ पुरस्कार’ , कथालेखन,कथावाचन, चारोळी पुरस्कार.
? विविधा: वृक्षसखी – सौ.ज्योत्स्ना तानवडे ?
“वसुधा, खूप छान वाटलं बघ तुला अशी पारावर निवांत बसलेली पाहून.अशीच आनंदात रहा. अग,तुझ्यामुळेच माझे आजचे हे रूप आहे. वसुधाने चमकून वर पाहिले. तिच्या डोक्यावरचा गुलमोहर बोलत होता.
“अगदी खरे आहे हे वसुधा,” शेजारचा बहावा बोलला.वसुधा त्याला निरखू लागली. पिवळ्या घोसांनी पूर्ण लगडला होता.ती नाजूक झुंबरे वाऱ्यावर डोलत होती.
तो म्हणत होता,”आमच्या दोघांचे सुरवातीचे रूप आठवते ना? मोठ्या धुमधडाक्यात या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण झाले. या दोन खड्ड्यात माझी आणि या गुलमोहराची स्थापना झाली. हार-तुरे- फोटो- भाषणे- गर्दी सगळे सोपस्कार झाले.पण पुढे काय? पुढे कोणी आमच्याकडे फिरकले सुध्दा नाही.आमच्या बाजूच्या रोपांनी सुकून माना टाकल्या. अधून-मधून पडणाऱ्या पावसाने आम्ही कशीबशी तग धरून होतो. तेव्हा तू आमच्या मदतीला धावलीस. आमची किती काळजी घेतलीस. म्हणूनच आज आम्हाला दोघांनाही हे देखणे रूप प्राप्त झाले आहे.”
वसुधाला सर्व आठवत होते. मुळातच वसुधा म्हणजे झाडाझुडपांची, फळाफुलांची प्रचंड आवड असणारी एक निसर्ग वेडी होती. तिने आपल्या बंगल्याच्या दारापुढची बाग लहान मुलाला जपावे तशी सांभाळलेली होती. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे,फळझाडे नीट आखणी करून लावली होती. योग्य खत-पाणी, वेळच्यावेळी छाटणी करून त्यांना छान आकार दिला होता. ती बागेला खूप जपत असे. त्यातच वृक्षारोपणात गेटजवळ लावलेल्या दोन रोपांनी तिचे लक्ष वेधून घेतले. त्यांची परवड बघून तिला खूप वाईट वाटले.ती त्या रोपांची पण आता नीट काळजी घेऊ लागली. हळूहळू जोम धरून त्यांनाही बाळसे येऊ लागले.
वसुधाने घरावरील छतावर पडून वाहणारे पावसाचे पाणी एका मोठ्या टाकीत साठवायला सुरुवात केली.त्यातून वाहणारे जास्तीचे पाणी बोअर जवळ पाझरखड्डा करून त्यात सोडले.बागेच्या पाण्याची सोय झाली. बागेच्या एका कोपर्यात खड्डा काढून त्यात घरातला ओला कचरा, बागेतले गवत, पालापाचोळा टाकायला सुरुवात केली. छान खत तयार होऊ लागले. घरचे खतपाणी मिळाल्याने झाडे फुलाफळांनी लगडली. दारापुढची गुलमोहर बहवा जोडी सुद्धा लाल पिवळ्या फुलांनी बहरून रंगांची उधळण करू लागली. वसुधाने या दोन्ही झाडांना छोटे-छोटे पार बांधले. येणारे-जाणारे त्यावर विसावू लागले.वसुधाच्या बागेत वेगवेगळे पक्षी, फुलपाखरे भिरभिरू लागली.
वसुधाला निसर्गाची खूप ओढ होती.त्यामुळे वायु प्रदूषण, जल प्रदूषण, वृक्षतोड, लागणारे वणवे यांच्या बातम्यांनी तिला खूप वाईट वाटे. निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो मग आपण त्याची तितकीच जपणूक केली पाहिजे. प्रत्येकाने घराबरोबरच घराबाहेरचा परिसर स्वच्छ राखला पाहिजे. आपल्या मुला-बाळां प्रमाणेच झाडांची, नदी-नाल्यांची, प्राणिमात्रांची काळजी घेतली पाहिजे. ते सुद्धा आपले जिवलग आहेत अशी तिची भावना होती. तिच्या घरा पुढील रस्ता वृक्षतोडीमुळे उघडा बोडका रूक्ष झाला होता.त्यामुळेच तिच्या घरापुढची सुंदर फुललेली बाग एखाद्या ‘ओअॅसिस’ सारखी होती. येणाऱ्या-जाणाऱ्याचे पाय आपोआप तिथे रेंगाळत. कौतुकाने बाग न्याहाळत. लाल-पिवळ्या वैभवाने बहरलेली दारापुढची जोडगोळी तर रस्त्याचे आकर्षण बनून गेली होती.
अशी ही वृक्षवेडी वसुधा.बागेत छान रमायची. आपले प्रत्येक सुखदुःख त्या झाडांशी बोलायची. त्यांचा सहवास तिला मोठी सोबत वाटायची.’ वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे प्रत्यक्षात जगणाऱ्या वसुधाचा ध्यास प्रत्येकाला लागायला हवा. आता तर पाऊसही पडतो आहे. ओली माती नवीन रोपांच्या प्रतीक्षेत आहे. मग काय मंडळी, कामाला लागू या ना !
माझ्या मनात एक विचार आला असे वाटले की आज मला जर पंख असते तर?? मी छान नभाची सैर करून आले असते. तोडल्या असत्या ह्या सगळया साखळ्या आणि उंच भरारी घेतली असती आकाशात.
ह्या माझ्या विचारांना खिजवायला की काय कोण जाणे माझ्या समोरून एक मस्त फुलपाखरू उडत गेल, आपल्याच दुनियेत जणू हरवले होते . रंगबिरंगी त्यांचे रंगीत पंख बघून अगदी हेवाच वाटला मला त्यांचा. असे वाटू लागते की आपल्याला पण हवे होते असे नाजूक सुंदर पंख. मग आपण ही जाऊ शकलो असतो कुठे ही क्षणभरात. मस्त फुलांच्या परागांवर बसुन मध चाखला असता आणि मनसोक्त बागडलो ही असतो हा विचार मनातून जात नाही तोवर,
पक्ष्यांचा थवा उंच नभात उडताना पहिला. अगदी छान आपल्याच धुंदीत मस्त उडत होते सारे. मग मला वाटले जर आपण पक्षी झालो असतो तर कित्ती छान झाले असते. आसमंतात निळ्या आकाशात उंच भरारी घेतली असती. वरती जाऊन हिरव्यागार शालू मधे, नटलेली धरती पहिली असती. मस्त डोंगरावर बसुन वाऱ्याशी हितगुज केले असते.छान झाडाच्या फांदी वर बसुन उंच झोके घेतले असते.
मनानी झोके घेतच होते की तो वर एकदम जोरात आवाज ऐकू आला, वर पाहिले तर भव्य वीमान दिसले. ते तर जवळ जवळ गगनाला भिडले होते. अस वाटले की हातच लावते आहे आकाशाला.
मग काय माझ्या मनात आले, आपण विमानच झालो असतो तर?? मनात येईल तेव्हा रात्रीच्या वेळी चंद्र चांदण्यांनांची भेट घेता येईल.
आता मात्र स्वतः वरच हसू आले असे वाटले की पंख नसताना पण आपले मन किती ठिकाणी उंच भरारी घेऊन आले.
फुलपाखरू होऊन फुलांमधला मध चाखला, तर पक्षी बनुन झाडावर बसुन उंच झोके घेतले, विमान बनून आकाशातले तारे ही तोडले.
आता मला सांगा नक्की उंच भरारी घेतली तरी कोणी??
फुलपाखरांनी, पक्ष्यांनी, विमानांनी, की माणसाच्या मनानी.
कुठून आली, कशी आली आहे कोण जाणे, पण एक चांगली मोठी झालेली मांजरी घरात आली.सगळ्यांच्या मागे मागे करायला लागली.जणू काय ते आमच्याच घरातली आहे की काय असे वाटावे.रुपाने अगदी सुंदर.वा वा म्हणण्यासारखी.पिवळा, पांढरा, काळा सगळे रंग तिच्यामध्ये आलेले होते.तिचं नामकरण झालं “सुंदरी”.
आता ती आमच्या घरातली झाली.आठ-दहा दिवसात तिचं पोट मोठे दिसायला लागलं.आता हिला पिल्लू होणार याची खात्री झाली.यथावकाश एके सकाळी माळ्यावरील अडगळीतून खाली आली.पोट दिसत नव्हते.वरती धुळीत पिल्ले असणार हे पक्क.सुंदरी साठी एक मोठ्या खोक्यात अगदी मऊ अंथरूण तयार केले.अडचणीतून अलगत पिल्लांना उचलून खोक्यात ठेवून तो खोका आमच्या बेडरूम मध्ये अगदी सुरक्षित ठेवला.सुंदरीची तिन्ही पिल्ले वेगवेगळ्या रंगाची नाजूक आणि छान होती.सुंदरीला खोके पसंत पडले.त्यामुळे पिलांसह त्यात ती छान राहत होती.तिच्यासाठी खोलीचे दार किलकिले ठेवत होतो.दहा दिवसांनी पिल्लांचे डोळे उघडायला लागले.आता त्यांचं रुपडं आणखीनच गोजिरवाणा दिसायला लागलं.एके दिवशी सकाळी उठून पहातो तो पिल्ले आणि सुंदरी सगळेच गायब!खोकं मोकळं पाहून धस्स झालं.दुपारी खाण्यासाठी घरात आली.परत जाताना कोठे जाते लक्ष ठेवलं.जवळच असलेल्या हॉस्पिटलच्या गॅलरी च्या बाहेर अडचणीत ती पिलांना घेऊन गेली होती.एक पिल्लू पत्र्याच्या खोल अडचणीत अडकले होते.ते अखंड ओरडत होते.आणि सुंदरी पावसात पत्र्यावर बसून आक्रोश करत होती.बाकी दोन दोन पिल्लांकडे पुन्हा पुन्हा ही जात होती.खाण्यासाठी घरी येत होती.तिच्या पत्र्या कडच्या काकुळतीच्या येरझाऱ्या आता मात्र पहावत नव्हत्या.अडकलेल्या पिलासाठी ती कासावीस झाली होती.पिल्लु ही भुकेने व्याकुळ झाली होते.राहुल आणि स्वप्नील दोघेही पत्र्यावर चढले.खूप प्रयत्न केला पण पिलापर्यंत हात पोचत नव्हता.सुंदरीची घालमेल बघवत नव्हती डोळ्याने ती काकुळतीला येऊन जणू सांगत होती “माझ्या बाळाला लवकर काढा रेss”.रायगडावरून बाळासाठी जीव टाकलेल्या हिरकणीची ची आठवण झाली.काय करावे ते काही सुचत नव्हते संध्याकाळ व्हायला लागली.रात्र झाली तर अंधारात काहीच करता येणार नव्हते.पिलाला लवकर काढले तर ठीक नाहीतर ते मरणार असे वाटायला लागले.गडबड केली.पत्रा काढण्यासाठी डॉक्टरांची ची परवानगी घेतली.नट बोल्ट काढून पत्रा सरकवला पिल्लू बारीक झाले होते.जणू नजरेने काकुळतीने “मला माझ्या आई कडे पोचवा” म्हणत होते. सुंदरीची त्याला भेटण्याची गडबड चालू झाली.पिलाला घरात आणले.तिला आपल्या पिलाला किती चाटू आणि किती नको असे झाले होते.भुकेला जीव आईला चुपूचुपू प्यायला लागलि.एक जीव वाचवला याचा सर्वांना आनंद झाला.जीवदान मिळाले पिलाला बाकी दोन पिल्लांनाही घरात आणले.
तीनही पिल्ले सुंदरी सह मजेत आनंदात रहायला लागली.त्यांचे खेळ अगदी बघत रहावेत असे.कुस्तीचे सर्व प्रकारचे डाव जणू! दोन पिल्ले अगदी जड मनाने चांगल्या घरी दिली.जीवदान मिळालेले पिल्लू तिचे निरर्थक नाव ‘टिल्ली’.ते मात्र आमच्याच घरात सुंदरी बरोबर आणि आमच्या दोन कुत्र्यांबरोबर खेळण्यात दंग असते.मजेत आणि खुषीत आहे.त्याच्याकडे पाहताना त्याला जीवदान दिल्याचे समाधान आणि आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.सुंदरी आणि टिल्ली दोघांचेही ही चेहरे आणि डोळे आमच्याशी बोलतात “गॉड ब्लेस यु”.
युनियन बॅंक ऑफ़ इंडिया मधून चीफ मॅनेजर पदावरुन निवृत्त. लेखन हा मनापासून जोपासलेला व्यासंग. कथा, नाट्य ललित लेखन. स्वत:च्या कथांचे कथाकथन.
तीन कथासंग्रह प्रकाशित.अनेक कथा कन्नडमधे भाषांतरीत.कथांना अनेक लेखनपुरस्कार.विविध एकांकिका,नाटकांना नाट्यलेखन पुरस्कार व प्रयोगाना वैयक्तिक व सांघिक पुरस्कार.
☆ विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये ☆
सावर रे…! अधीरता ही एक मनोवस्था.
तान्हया वयात ऐकण्यापाहण्यातून बाळ शिकत असते.सगळं शिकायची,हाताळून पहायची,परिणामांचा अंदाजच नसल्याने तेजाळ ज्योतीलाही बोट लावून पहाण्याची अस़ोशी
हे सगळं या अधीरतेपोटीच निर्माण झालेलं असतं.ती अधीरता आतुर,उत्सुक,उत्कंठित,अशा सकारात्मक अर्थछटा ल्यालेली असल्याने घरच्या मोठ्यांच्या कौतुकाचाच विषय असते.
त्या वयातले अधीरतेपोटी केले जाणारे हट्टही बालहट्ट म्हणून हौसेने पुरवले जात असतात. तसेच या अधीरतेमुळे बाळाला इजा होऊ नये म्हणून एरवी लाड करणारी घरची वडिलधारी माणसे बाळाची निगराणीही करीत असतात.
वय वाढत जातं तसं ही निगराणी स्वत:च स्वत: करणे अपेक्षित असते. कारण अधीरता ही या वयातही एक मनोवस्था असली, तरी तिच्या अर्थछटा बदललेल्या असतात. पूर्वीची उत्सुकता आता उतावीळणा ठरायची शक्यता असते. बेचैनी,तहानलेला,भुकेला अशा अर्थछटाही त्यात मिसळलेल्या असतात.अशावेळी केवळ उत्सुकता, उतावीळपणाने घेतलेले निर्णय अडचणीत आणायला निमित्त ठरु शकतात.अधीरतेतला अविचारी उतावीळपणा कमी करण्यासाठी समतोल विचारच बालपणातल्या घरच्या मोठ्यानी केलेल्या निगराणीची जबाबदारी तेवढयाच आत्मियतेने स्विकारणारा एकमेव पर्याय असतात.एवढा समंजसपणा असेल तर मात्र मनातली अधीरता वैचारीकतेचं अधिष्ठान लाभल्यामुळे भरकटणारी नसते.हुरहूर,उत्सुकता,क्षणिक अस्वस्थता,ओढ,या सगळ्या अधीरतेच्या सावल्या मग मनाला काळवंडून टाकणार्या अंधार्या सावल्या नव्हे तर त्या त्या क्षणी हळूवार मायेने सावरणार्या सांजसावल्या होऊन सोबत करतात.अविचारी उतावीळ अधीरतेने घेतलेले निर्णय संकटांच्या गर्तेत लोटून अख्खं आयुष्य उध्वस्त करणारे ठरल्याची असंख्य उदाहरणं जशी आजुबाजूला आपण पहातो,तशीच जीवघेण्या संकटातही खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारी धीरोदात्त माणसंही आपल्या बघण्यात असतात.
अधीरतेच्या लाटेत वहावत जायचं की अधीरतेला संयमाने भरकटण्यापासून रोखायचं हे ज्याच्या त्याच्या वैचारीक परिपक्वतेवर अवलंबून असते हे ओघाने आलेच.
मी त्याच्यासाठी वेडी झाले होते, वेडी आहे आणि राहीन. त्याला मी प्रथम पाहिल तेंव्हा तो मुक्या माणसाच्या भूमिकेत होता पण त्याचे डोळे माझ्याशी बोलले. मग ‘‘देखा न हाय रे सोचा न हाय रे’’अस म्हणत आपले उंचच उंच पाय त्यान नाचवले आणि त्याचा खट्याळपणा मला फार भावला. मग वेगवेगळ्या रुपात ‘‘विजय’’या एकाच नावान तो मला सतत भेटत राहिला. डोळ्यात अंगार पेटवून त्वेषान ‘‘है कोई माईका लाल ’’अस त्यान विचारताच माझही रक्त उसळल.‘‘ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं’ ’अस म्हणत त्यानं खूर्ची उलटवून टाकली तेंव्हा त्याची तडफ पाहून मी सुखावले.‘‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’’ अस त्यान ठणकावल तेंव्हा त्याचा स्वाभिमान पाहून मी भारावले.आपल्या हातावर गोंदलेल्या ‘‘मेरा बाप चोर है’’या गोंदणाकड त्यान करूण नजरेन पाहिल तेंव्हा माझा गळा दाटून आला.‘‘मैं बहुत थक गया हूं माँ’’अस म्हणून त्यान आईच्या मांडीवर हताशपणे डोक टेकवल तेंव्हा माझाही शक्तीपात झाल्यासारख वाटल.तो अन्यायाविरुद्ध नेहमी पेटून उठायचा.सगळ्या जगाशी लढायचा.शर्टाच्या दोन्ही टोकांची गाठ मारून एक खांदा झुकवून डायनामाईट लावून तो धुरातून मोठ्या डौलात बाहेर यायचा पण तोपर्यंत इकडे माझ्या नाडीचे ठोके थांबलेले असायचे. कधीकधी तो प्रेमान ‘‘मै अपने बच्चे के लिए पालना लाया हूं सुधा’’ अस म्हणायचा तेंव्हा त्याच्या नजरेत मला कोवळा बाप दिसायचा .‘‘तुझे थामे कई हाथों से, मिलूंगा मदभरी रातों से ’’अस म्हणत कधी तो प्रियकर प्रेमळ पती व्हायचा. कधी प्रेयसीला ‘‘हे सखी’’ अशी साद घालायचा. त्याच हे प्रेम करणं मला त्याच्या पेटून उठण्याइतकच वेड लावायच. त्यानं ‘‘इंतहा हो गई इंतजार की’’ अस म्हटल तेंव्हा त्याच्याबरोबरच मीही जिवाच्या आकांतानं वाट पाहिली .‘‘इसके आगे की अब दास्ताँ मुझसे सुन सुनके तेरी नजर डबडबा जाएगी ’’अस तो म्हणाला आणि खरच माझे डोळे भरून आले. ‘‘डॉक्तरानीजी बेहोश मत कीजिए मुझे. मैं होश में दर्द सहना जानता हूं’’ अस म्हणत आपला जखमी हात टाके घालण्यासाठी त्यान पुढ केला तेंव्हा त्याच्या मनातल वादळ माझ्याही मनात उसळल. माऊथ ऑर्गनच्या करूण स्वरातून त्यान आपल विधवेवरच अबोल प्रेम व्यक्त केल. आपल्याला डाकूंच्या हाती सोपवणार्या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी बापाकडं त्यान निश्चयानं पाठ फिरवली. त्याच्या प्रेमभंगाची आणि दु:खाची झळ मला पोहोचली.‘‘कल अगर न रोशनी के काफिले हुए?’’ या प्रेयसीच्या प्रश्नावर ‘‘प्यार के हजार दीप है जले हुए ’’अस म्हणत हात पसरून उभ्या असलेल्या त्यान मलाही एक आधाराच आश्वासन दिल. कधीतरी कोणी ‘‘मोहब्बत बडे कामकी चीज है’’ अस म्हटल्यावर ‘‘ये बेकार बेदाम की चीज है’’ अस तो तोडून टाकायचा. पण मी मात्र ‘‘सब कहते है तूने मेरा दिल लिया, मैं कहती हूं मैंने तुझको दिल दिया’ अशी दीवानी झाले होते. शेकडो माणस आजूबाजूला वावरत असूनही पडदाभर फक्त तो आणि तोच असायचा. पहाणार्याची नजर त्याच्यावरून जराही इकडतिकड होऊच शकायची नाही. त्याच प्रेम, त्याची हाणामारी, त्याचा राग ,त्याचा त्वेष या सगळ्यासाठी, त्याच्या आवाजासाठी, त्याच्या डोळ्यातल्या अनामिक आकर्षणासाठी मी खरच वेडी होते आणि आहे. ‘‘भाईयों और बहनों, देवियों और सज्जनों हम और आप खेलने जा रहे है यह अदभुत खेल कौन बनेगा करोडपती’’ परत तोच रुबाब, तोच धीर गंभीर आवाज ,प्रौढत्वाला न्याय देणारा अप्रतीम रंगसंगतीचा पोषाख ,सर्वाना समजून घेणारे डोळे आणि तेच भारावून टाकणं. साठी उलटून घेली तरी माझ त्याच्याबद्दलच वेड काही कमी होत नाही. येस आय अॅम क्रेझी फॉर माय अँग्री यंग मॅन!
मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या अगोबाई! तुम्ही सगळे ऐकताय होय? माझे हे घर पहाताय होय? बर बर .
लांबू न कशाला डोकावताय ? या, मीच दाखवते हे घर म्हणजे बंगला !
हा मोठा हॉल , इथलं फर्निचर पॉश आहे ना? . ही मुलीची , पिंकीची खोली हे बेडरूम, ही गेस्टरूम आणि हे किचन – स्वयंपाक घर .
सकाळी ९ ते ६ या बंगल्यावर माझच राज्य असत. या घराचे मालक म्हणजे आमचे साहेब आणि आमच्या वहिनी बाई मी आल्यावर ऑफिसला जातात. सकाळीच पिंकी शाळेला गेलेली असते. ९ नंतर हा बंगला माझा असतो.
इथली स्वच्छता, स्वयंपाक, वॉशिंग मशिन लावणं सगळ सगळं मी करते. १२ वाजता डबा न्यायला, डबेवाला येतो. साहेबांचा आणि बाई साहेबांचा डबा मी भरून देते. पिंकी आली की तिला वाढते. तिच्याशी गप्पा मारते आणिमग माझं जेवण करते. दुपारचं आवरून झालं की मी आणि पिंकी टि.व्ही . बघतो . तिचं कार्टून, मध्ये माझी सिरीयल, तिथं जाहिराती लागल्या की पुनः कार्टून ! तीपण खूष मीपण खूष!
हा पण दुपारी 3 वा – मी तिला अभ्यासाला बसवते. आणि मी जरारेस्ट घेते. झोपते नाही म्हणायचं रेस्ट घेते. दिवसभर हा बंगला मीच वापरते. छान स्वच्छ ठेवते. या कामासाठी दरमहिना मला पंधरा हजार रु पगार मिळतो.
माझ्या संसाराला खूप मदत होते. मी शिकले नाही म्हणून हे काम करते. पण माझ्या मुलाला मी खूप शिकवणार आहे. कलेक्टर करणार आहे. म्हणून तर हा सगळा खटाटोप !
दिवस सगळा कामात जातो. पण संध्याकाळ झाली की मला माझी झोपडी आठवते. कधी एकदा घरीजाते आणि भाकऱ्या थापते असे मला होते. हा बंगला, इथले हे ऐश्वर्य माझ्यासाठी बुडबुडा आह . माझी झोपडी, राबणारा नवरा , माझं लेकरू, माझी गरीबी हीच माझ्यासाठी खरी श्रीमंती आहे.
‘देवा तुझ्या द्वारी आलो’ (www.kelkaramol.blogspot.com), ‘माझे ‘टुकार ई-चार’ (www.poetrymazi.blogspot.com) या दोन अनुदिनीवर ( ब्लाॅग) नियमित लेखन
जोतिष शास्त्र अभ्यास
☆ विविधा : इकडचे – तिकडचे “ज्ञानविस्तार” – श्री अमोल अनंत केळकर ☆
‘जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे
विचारे इकडे, तिकडे शोधुनी पाहे’
खरं म्हणजे मंडळी हा विषय तसा काही नवीन नाही . पण जरा वेगळ्या पध्द्तीने मांडतोय एवढंच.
आता तुम्हाला हे माहीतच आहे की पारंपारिक शिक्षण आपले हे शिशु ( सुसु )वर्गापासून सुरु होऊन पुढे लौकिकार्थाने पदवीपर्यंत पूर्ण होते. ज्याला आपण पाठयपुस्तकी शिक्षण म्हणू. जे आपण बाल मंदिर, शाळा , महाविद्यालये इथून पूर्ण करतो. या सगळ्या संस्थेचे ध्येय एकच असते
चिरा चिरा हा घडवावा , कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे
वेगवेगळ्या टप्प्यात आपण हे शिक्षण घेत असताना आपले मार्गही बदलतात जसे मराठी मिडीयम , इंग्रजी मिडीयम हिंदी -संस्कृत किंवा पुढे कला -विज्ञान- वाणिज्य , मग त्याहीपुढे इंजिनिअरींग, वैद्यकीय, व्यवस्थापन किंवा अशा अनेक वाटा .
एक मार्ग स्वीकारल्यावर शेवटच्या ठरलेले स्टेशन आले की प्रवास संपला पाहिजे पण असे होत नाही. बघा ना, रेल्वे बजेट मध्ये गेली काही वर्ष अमुक गाडयांचा मार्ग विस्तारीत केला आहे असे आपण वाचतो. म्हणजे एखादी गाडी मिरजेपर्यतच जाते पण आता ती बेळगाव पर्यत जाईल हा झाला त्या गाडीचा विस्तार . ज्ञान घेण्याबाबतीत तसा विस्तार आपण ही करतो मग तो आपल्या आपल्या नोकरी/व्यवसायास/प्रोफेशनला पूरक म्हणून असेल किंवा निव्वळ आवड छंद म्हणून असेल
‘अपारंपारिक शिक्षण’ किंवा ‘ज्ञान – विस्ताराची’ सुरुवात तशी लहानपणापासून नकळत झालेलीच असते. आई – बाबा हे आपले पहिले गुरु . नियमित अभ्यासक्रमात नसलेल्या अनेक गोष्टी (संस्कार/आचरण इ इ) शिकवायला त्यांनी सुरवात केलेली असते . नंतर येतात ते आपले शाळेतील , आजूबाजूचे सवंगडी
मग हळूहळू आपली ओळख होते पेपर , रेडिओ , दूरदर्शन (टीव्ही) या माध्यमांची. ज्ञान विस्ताराच्या या मार्गात वयाच्या एका टप्प्यावर आपला संबंध वाचनालयाशी येतो . इथेही अनेक गोष्टी कळतात, आपल्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तारते. पुढे संगणक शिक्षण झाल्यावर वेगवेगळी संकेतस्थळे आपले ज्ञान विस्ताराचे मार्ग बनतात आणि आज काल तर सोशल – मीडिया ( त्यातही फेसबुक , व्हाटसप ) हा तर ज्ञान विस्ताराचा जणू एक्स्प्रेस हायवेच झालाय. आता यात येणा-या किती गोष्टी ख-या असतात , अफवा असतात किंवा दिलेले संदर्भ किती बरोबर – चूक असतात हे ओळखणे ही एक ‘ कलाच ‘ आहे. यात उतरलेल्यांना कले, कले ने ते समजत जातेही पण सध्यातरी ज्ञान – विस्ताराचा हा ‘ राज ‘ मार्ग ठरला आहे यात शंका नाही
यात ही दोन प्रकार आहेत बरं का. जस शाळेत आपण मुलांचे वर्गीकरण मिळणा-या गुणांनुसार प्रामुख्याने दोन प्रकारे करतो १) हुशार २ ) मध्यम ( इथे ‘ ढ ‘ वगैरे प्रकार मला मान्य नाही ) तर व्हायचं काय की मुख्यतः दहावी बोर्डाच्या परीक्षेत वगैरे एका ‘ मध्यम’ मुलाकडे एखाद्या विषयाचे दुसरे पुस्तक असायचे , किंवा काही तरी त्याला पुण्या-मुंबई कडच्या नातेवाईकांकडून काही नोट्स वगैरे मिळायचे. ही बातमी हळूहळू सगळीकडे जायची. ज्याच्याकडे त्या नोट्स किंवा काही वेगळे पुस्तक असायचे त्याबद्दल त्याला काही फार वाटायचे नाही . पण जी हुशार मुले असायची त्यांची मात्र प्रचंड घालमेल व्हायची. अरे आपल्याकडे कसं नाही, काय असेल त्यात ? कसेही करून ते आपल्याला पाहिजे इ इ मग ते पुस्तक / नोट्स त्या ‘मध्यम’ मुलाकडून मिळवल्या जायच्या. तो ही सहज द्यायचा , त्याला काही वाटायचे नाही. त्याच्यासाठी सामान्य अभ्यासक्रमच खूप असल्याने हे अतिरिक्त पुस्तक वाचले काय नाही वाचले काय फारसा फरक पडायचा नाही. तो आपलं सगळ्यांना देत रहायचा
आज हीच ‘ मध्यम ‘ मुले सोशल मीडियावर आपल्याकडे आलेले ज्ञान पुढे ढकलतात आणि हुश्शार मुले त्यावर अभ्यासाचा ‘ किस ‘ पाडतात ?
माफ करा थोडं विषयांतर झालं . पण मंडळी लहाणपणापासून सुरु असलेली ‘ ज्ञान – विस्ताराची ‘ माणसाची उर्मी कायम राहील यात शंका नाही. पण यातही पारंपारिक शिक्षणाबरोबरच अपारंपारिक शिक्षण असलेले
‘व्यवहार ज्ञान’ घेणे हे ही महत्वाचे नाही का ?
एखादवेळी गणितात थोडे कच्चे असले तरी चालेल पण माणसाने शब्दाला पक्के पाहिजे. हे
‘व्यवहार ज्ञान’ एकदा आत्मसात झाले की भले अक्षांश – रेखांशांच्या परिणामात गडबड झाली तरी तुमचा जगण्याचा आलेख ( ग्राफ ) हा वर जाणाराच असेल यात शंका नाही ?
छान बंगला ‘मृदगंध अभिरुचीपूर्ण बांधणीची साक्ष पटवणारा . त्याच्या पाठी मागच्या बाजूला माईंची खोली होती. त्या खोलीतून अधून-मधून रडन्याचा आवाज ऐकू येत होता माईंच्या समोर त्यांची नातसून पाठमोरी उभी होती. सुरेखा स्वयंपाक घरात होती. नव्या सुनेला जेऊ घालावं म्हणून काजू कतली बनवत होती .सुरेख a ला माईंच्या खोलीतली बोलणी नीट ऐकू येत नव्हती .तिच्या कपाळाला त्यामुळे आठी पडली होती. काय सांगत असणार आहेत माझ्या कागाळ्या लग्नातलं पुन्हा दुसरं काय सासूच्या बाबतीत सुरेखाच्या मनाची पाटी कोरी नव्हती. लोक तोंडावर बोलत नाहीत पण यांच्या फाटक्या तोंडामुळे सासूबाईंच्या नादाला ही लागत नाहीत लग्न होऊन या घरात आल्यापासून हेच सुरु आहे .आता रेवाला जर काही म्हणत असतील तर मात्र मी शांत बसणार नाही .सुरेखा तरातरा माईंच्या खोलीत गेली. पहिल्यांदाच रागावून बोलली. पानावर या मगाशीच बोलला मी त्या नवीन आलेल्या मुलीला वेळेवर चार घास गरमागरम खाऊ देत माझ्या कागाळ्या जर चालू असतील ना तर तुमच्याबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे पण खूप आहे. मी तोंड मिथुन राहिले राहिले ना सांगा सांगा ना.. दोघींना कळेचना सुरेखाला काय झालं आपल्या माणसांची साथ आयुष्यभराची असते ती हवी आहे ग मला हे हवे होते हे सोडून गेले .टपटपणार या डोळ्यांमधली ताकद संपल्यासारखे त्यांचे डोळे दिसू लागले .त्यांचे ते डोळे बघून सुरेखा स्वयंपाक घरात आली.
माईंना भूक लागली असणार या स्वयंपाकाच्या नादात जेवणाची वेळ चांगलीच पुढे गेली म्हणत तिने पानात पोळी वाढली . कोकणातलं माहेर असलेल्या सुरेखाला गरम भात पहिल्यांदा खवासा वाटायचा पण एक चपाती आणि असेल ती भाजी खाल्ल्या शिवाय सुरेखाला त्या भात खाऊ द्यायच्या नाहीत. नवीन आलेल्या सुनेला तशीच सक्ती करतील म्हणून सुरेखा विचारायला गेली होती. अस्मिता तुला पहिल्यांदा गरम गरम…… भात वाढू …..?सुरेखाच्या कानावर माईंचा आवाज येत होता.,
सुनबाई तुला सांगते मी या घरात आले तेव्हा इथला स्वयंपाक मला आवडत नव्हता मला हिरवी मिरची ,खोबरं सगळं घालून केलेला चमचमीत स्वयंपाक आवडायचा पण मी इथे मनाला मुरड घातली .सासूबाईंच्या शिकले .तुझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडीप्रमाणे राल तर त्याच्या पोटाचे हाल होणार नाहीत. घरचे जेवण व्यवस्थित असते की पुरुषांची तब्येत चांगली राहते. त्यांची तब्येत चांगली राहते जग जिंकता येईल. सुरेखाला भात आवडतो हे मला माहीत आहे पण आमटी-भात, दहीभात त्यामुळे त्यात तिचे कसे होणार…..! दिवसभर स्टॅमिना राहायला नको……? मी यासाठी तिच्याशी अशी वागते होते ग ….!. जिव्हाळा होता त्यामागे. सगळंच फोडून नाही सांगता येत आमच्या वयाच्या माणसांना ….माझं काही चुकलं का सांग बरं बाळा… सासु झालेल्या सुरे आला आता माईन मधला आईचा ओलावा हवा हवासा वाटला. नव्या नवरीची आई व्हायला निघालो आहोत आपण, त्यासाठी इतकी वर्ष आपल्या संसाराची सावली झालेल्या माईंचा आशीर्वाद घ्यायलाच हवा.
सुरेखा झटकन बाहेर आली. माईंच्या पायाशी नम्रपणे वाकली. आपल्या त्याची क्षमा मागण्यासाठी…, माईंनी तिला पोटाशी उचलून धरले. नव्या सुनेला तिच्या आईच्या प्रतिबिंबाची कवडसा मृदगंध बंगल्यात दिसू लागला होता. त्याकडे बघत असल्याने पानात अगोदर आमटी-भात वाढण्याचा प्रश्न विचारण्याचा संभ्रम संपला होता.