जपानला येऊन एकच आठवडा उलटला होता. कॉलेज सुरू न झालेली आम्ही रिकामटेकडी मंडळी ‘जपान फिरूया’ म्हणून सकाळी दोन तासांचा प्रवास करून क्योतो स्टेशन वर पोहोचलो. क्योतोला फार मोठा इतिहास आहे. टोकयो आधी तब्बल हजार वर्षे क्योतो जपानची राजधानी होती. त्यामुळे साहजिकच राजांचे राजवाडे, मंदिरे, जुनी घरे, बगीचे, स्तूप, इमारती यांनी क्योतो नटलेलं आहे. क्योतोच्या प्रत्येक गल्लीत, तिथल्या प्रत्येक जुन्या घरावर जपानी संस्कृतीची छाप पडलेली दिसते.
पोहोचल्या पोहोचल्या आमचा मोर्चा वळला तो ‘फुशिमी इनारी’ पाहायला. इनारी ही ‘भाताची’ देवता. ‘फुशिमी इनारी’ हे इनारी देवतेचं मुख्य मंदीर. जपानमध्ये भाताचं उत्पादन अमाप असल्यामुळे या देवावर लोकांची विशेष श्रद्धा आहे. जपानमध्ये ‘शिंतो’ नावाचा तिथेच उदयाला आलेला एक धर्म आहे. या धर्मात निसर्गातल्या प्रतिकांचं पूजन केलं जातं. ‘इनारी’ देवता हे त्यातलंच एक प्रतीक आणि कोल्हा हा त्याचा दूत. भाताच्या शेतातून मार्ग काढत हा दूत इनारीचे संदेश पोहोचवतो. मंदिराच्या द्वाराशी प्रचंड कमान आहे. मुख्य मंदीर डोंगरमाथ्यावर आहे. मंदीराकडे जाणारा पायरी रस्ता जंगलातून तर कधी डोंगरकड्यावरून क्योतो शहराचं विलोभनीय दृश्य दाखवत पुढे पुढे जातो. संपूर्ण डोंगराची प्रदक्षिणा या पायवाटेवरून चालल्यावर घडते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या संपूर्ण वाटेवर उभ्या असलेल्या केशरी कमानी. त्यांची संख्या जवळजवळ दहा हजार आहे. रस्त्यावरून चालताना सूर्यप्रकाशात केशरी कमानींचा रंग फार अप्रतिम भासतो.
या मंदिराच्या सुंदरतेमुळे येथे नेहेमीच गर्दी असते. त्यात परदेशी पर्यटकांची संख्या जास्त. त्या गर्दीत किमोनो घातलेली जपानी स्त्री आणि केशरी कमानींसोबत तिचे फोटो काढणारा जपानी माणूस हमखास आढळतात. ‘फुशिमी इनारी’ हे जपानी माणसाच्या हृदयाशी आहे. येथील वातावरण आणि सुंदरता आपल्यालाही मोहात पाडतात.
☆ विविधा ☆ जन्मकुंडली आणि विवाहयोग ☆ श्री उद्धव भयवाळ ☆
ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक या नात्याने “जन्मकुंडली आणि विवाहयोग” यासंबंधीची माहिती मी खाली देत आहे.
कोणत्याही युवा व्यक्तीच्या जीवनात विवाहसंस्कार हा सर्व संस्कारात श्रेष्ठ आणि आवश्यक असतो. वैवाहिक जीवनाची सफलता पतीपत्नीच्या एकमेकांवरील विश्वासावर आणि वचनबद्धतेवर अवलंबून असते. प्रत्येकाला आपले वैवाहिक जीवन सुखी, समाधानी, समृद्ध आणि सफल असावेसे वाटते आणि त्यात गैर काहीच नाही. भावी जोडीदारासोबत आपले वैवाहिक जीवन कसे असेल याची प्रत्येकाने विवाहापूर्वीच दोघांच्या कुंडलीद्वारे माहिती करून घेतली तर वैवाहिक जीवन नक्कीच सफल होईल. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातसुद्धा ज्योतिषशास्त्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याद्वारे व्यक्तीच्या सुखद, सुसंस्कृत आणि सफल वैवाहिक जीवनाच्या शक्यतांचे आकलन होते. जेणेकरून भावी जीवनाविषयीचा अंदाज बांधता येतो.
खरे तर ज्योतिषीय दृष्टीकोनाचा अंगीकार करूनच आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम, सौहार्द, संस्कार आणि संवेदनशीलता निर्माण होण्याची आशा आपण करू शकतो.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनास प्रभावित करणाऱ्या ग्रहांची दिशा आणि दशा यावरूनच विवाहयोग जुळून येतील किंवा नाही हे समजू शकते. जन्म तिथि, जन्म वेळ आणि जन्म स्थान यावर आधारित कुंडलीचे गुणमेलन करूनच वैवाहिक जीवनातील सफलतेविषयी माहिती मिळते.
पुष्कळदा असे पहावयास मिळते की, एखादी मुलगी सर्वगुणसंपन्न असूनसुद्धा तिचा विवाह जमण्यात खूप अडथळे येतात किंवा विवाहास विलंब होतो किंवा अनुरूप जीवनसाथी मिळत नाही. काही लोक तर असे पहावयास मिळतात की त्यांच्या करिअरमध्ये ते खूप यशस्वी असले तरी वैवाहिक जीवनात मात्र असफल होतात किंवा त्याच्या जीवनात लवकरच वैवाहिक संबंध तोडण्याची वेळ येते. पुष्कळदा करीअरच्या बाबतीत यशोशिखरावर पोचलेल्या लोकांनासुद्धा अविवाहित राहण्याची पाळी येते. अशा वेळी वैदिक ज्योतिषानुसार बनलेल्या कुंडलीतील सकारात्मक प्रभाव असणाऱ्या ग्रहांची गतिशीलता ओळखून नकारात्मक प्रभाव असणाऱ्या ग्रहांचा दोष दूर करणे भाग पडते.
ज्योतिष शास्त्रानुसार उत्तमविवाहयोगासाठी कुंडलीच्या दुसऱ्या, पाचव्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरातील ग्रहांच्या स्थितीवर ध्यान द्यावे लागते. यामध्ये विशेषत: मंगळ, शनी, सूर्य, राहू आणि केतु या ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करावा लागतो. या आधारावरच विवाहासाठीची योग्य वेळ ठरवणे सोपे जाते. कारण विवाहाचे योग तर पंचांगात अनेकदा दिसतात. पण प्रत्यक्ष विवाह केव्हा होईल हे पाहणे महत्त्वाचे असते. पुरुषासाठी विवाहाचा कारक ग्रह शुक्र आहे तर स्त्रीसाठी गुरू हा कारक ग्रह आहे. हे कारक ग्रहच दुसऱ्या ग्रहांच्या प्रभावाखाली येऊन विवाहासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल स्थिती निर्माण करतात.
स्त्रीच्या कुंडलीतील आठवे स्थान तिच्या भाग्याचे निदर्शक आहे तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्या कुंडलीतील बारावे स्थान सुखद वैवाहिक जीवनाचे अर्थात यौनसंबंधाचे निदर्शक आहे. यानुसारच पतीपत्नीच्या मनात एकमेकांविषयीचे आकर्षण निर्माण करणारी भावना जागृत होते.
कुणीही व्यक्ती स्वत:च्या कुंडलीतील सातव्या स्थानावरील ग्रहस्थिती पाहून आपला आयुष्याचा जोडीदार कसा असेल आणि आपले वैवाहिक जीवन कसे राहिल याचा अंदाज घेऊ शकते. सातव्या स्थानाचा कारक ग्रह शुक्र आहे. पण या स्थानात शनि बलवान असेल आणि गुरू कमजोर असेल तर उत्तम विवाहयोगसुद्धा प्रभावित होऊन अनिष्ट फळे मिळू शकतात. सातव्या स्थानात रवी असल्यास घटस्फोटाची स्थिती निर्माण होऊ शकते. जर सातव्या स्थानात मंगळ असेल तर मांगलिक योग बनतो. मंगळाची कुंडली किंवा मांगलिक योग म्हणजे काय तर कुंडलीमधील प्रथम स्थानी, चतुर्थ स्थानी, सप्तम स्थानी, अष्टम स्थानी किंवा द्वादश स्थानी म्हणजेच बाराव्या घरात मंगळ असल्यास तो मंगळ सदोष असतो आणि ती मंगळाची कुंडली समजली जाते. या स्थानातील मंगळामुळे विवाहास विलंब होणे, वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत कलह किंवा घटस्फोट होण्याइतकी स्थिती बिघडणे असे प्रकार घडू शकतात. ज्या व्यक्तीची कुंडली मंगळाची आहे, त्या व्यक्तीचा विवाह साधारणपणे वयाच्या २७, २९, ३१, ३३, ३५ किंवा ३७ व्या वर्षी होण्याची शक्यता असते.
पण कुंडलीत प्रथमदर्शनी सदोष दिसणारा मंगळ विशिष्ट ग्रहस्थितीमध्ये निर्बली होतो आणि ती कुंडली मंगळाची गणली जात नाही. हेसुद्धा लक्षपूर्वक पाहणे जरुरीचे ठरते. मंगळाची कुंडली असलेल्या व्यक्तीस मांगलिक योग असलेलाच जोडीदार पाहिजे असे मात्र नाही. जोडीदाराच्या कुंडलीत सदोष मंगळ नसला तरी विशिष्ट ग्रहस्थिती असेल तर ती कुंडली मंगळाच्या कुंडलीशी जमते. याव्यतिरिक्त सातव्या स्थानावर बुध निर्बली होऊन जातो. पती आणि पत्नी या दोघांच्या कुंडलीत सातव्या स्थानी जर राहू किंवा केतू असेल तर विवाहानंतर वर्षभरातच घटस्फोटासारखी स्थिती उत्पन्न होते. सातव्या स्थानातील राहूच्या उपस्थितीमुळे जीवनसाथीपासून विभक्त होण्याची इच्छा किंवा विरक्तीचे भाव निर्माण होतात आणि दोघांमधील दुरावा वाढत जातो. त्याचप्रमाणे तिथे केतू असल्यास पतीपत्नी आयुष्यभर अलग अलग राहण्यासाठी विवश होतात. अशा स्थितीमध्ये दोघांमधील वैचारिक मतभेदही खूप वाढत जातात. वास्तविक काही धार्मिक विधी करून अनिष्ट ग्रहांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाय योजता येतात हेही तेवढेच खरे.
कुंडलीमध्ये सातव्या स्थानाचा स्वामी जर सातव्या स्थानातच असेल तर अशी व्यक्ती सफल वैवाहिक जीवन व्यतीत करते. त्या व्यक्तीच्या उन्नतीमध्ये कुठलीही बाधा येत नाही. तसेच पतीपत्नीचे संबंध अगदी मधुर बनलेले असतात. याचप्रकारे कुंडलीतील सातव्या घरात जर शुक्र असेल तर अशा व्यक्तीच्या विवाहाचा योग लवकर येतो.
विवाहास विलंब होण्याचे मुख्य कारण म्हणजे कुंडलीत मंगळ षष्ठस्थानी असणे. विवाहासाठी गुणमेलन करण्याआधी स्त्रीच्या कुंडलीत गुरू आणि पुरुषाच्या कुंडलीत रवि यांची स्थिती पाहणे गरजेचे आहे. याशिवाय सुखी आणि समृद्ध वैवाहिक जीवनाचे विश्लेषण करण्यासाठी चतुर्थ स्थानाचे अध्ययन केले जाते. अर्थात विवाहाचा संपूर्ण निर्णय हा कुंडलीतील सातव्या स्थानाव्यतिरिक्त चौथ्या, पाचव्या आणि अकराव्या स्थानातील ग्रहांच्या स्थितीवर घेतला जातो.
सावली शब्द जिव्हाळ्याचा मायेचा, ममतेचा. मनाला सुखावणारा. आपुलकीन जवळ घेणारा. आधार देणारा. आत्मियतेचा. त्याच्या उच्चारानेच काळीज पाघळून जातं. सगळ्याना सलगीचा वाटतो तो. पण….
सावलीच अस्तित्व मात्र परावलंबी. जोवर प्रकाश आहे तोवरच तिची संगतसोबत. प्रकाश संपलाकी ती कुठे गायब होते कळत नाही. कोण करत तिला लंपास.कुठे होते गडप. मनाच हे कोडं काही सूटतच नही.
ऊन्हात ती हवी हवीशी वाटते. पायात घुटमळते. पाठसोडत नाही. माणसान माणसाची सावली सारखी सोबत करावी अस म्हणतात.
खर आहे ते? पण मग अंधारात ती सोबत सोडून जाते कुठं आणि का? तिचं परावलंबीत्व हेच एकमेव कारण असाव. मग महत्व प्रकाशाच की सावलीच. हा ही एक प्रश्न. निरूत्तरीत. किती विश्वास असतो सावलीवर माणसाचा प्रकाश असताना. तिच्याच आधारान मिळते श्रमिकाना विश्रांती. पण प्रकाशाच वेड घेवून धावणारांचा ती गतीरोधक होते. थांब. घे विश्रांती म्हणते. का करते ती आस? खरतर प्रकाशाच तिच अतूट नात. पण दोघांची तोंड विरूद्ध दिशेला. प्रकाश पूर्वेला तेंव्हा ही पश्चिमेला. प्रकाश माथ्यावर तेव्हा ही पायातळी. प्रकाश पश्चिमे ला ही पूर्व गामिनी. प्रकाश संपला की ही गायब. गंमतच आहे मोठी!
थोडा विचार केला. आणखी एक यक्ष प्रश्न समोर उभा. ती सावली. तो प्रकाश. परस्पराना आकर्षित करणारी ही दोन टोक. इथे ही परस्पर विरूद्ध का. या दोन विभिन्न लिंगानी तर विश्व निर्माणाच काम केलय. एकत्र येवून संसार थाटला. उच्च कोटीचे संस्कार निर्माण केले. पुढच्या पिढ्यातून ते संक्रमित केले. समृद्धी वाढवली. त्या सोबत आली सुखलोलूपता. हे झाल ते एकरूपतेन. मग या दोघातच हा विरोध का. विरोध तर कुठं टोकाचा आहे. बघा ना दोघेही एकाच वेळी निघून जातात.माणसाला तिमिराच्या डोहात लोटून. त्या वेळी ते दोघे कोठे असतात बर. घ्या. पुन्हा एक नवाप्रश्न. आपण विचार करत जाऊ तितक बधिर होत जाऊ.परमेश्वरान जे निर्माण केलय ते शिरोधार्य मानू आणि गप्प बसू. नाहीतर दुसर काय करू शकतो आपण?
ठेविले अनंते तैसेची रहावे. पण प्रकाश आणि सावली दोन्ही ही हवीतच आपल्याला. प्रगतिला आणि विश्रांतीला.
माझ्या समोर खिडकीत आंब्याचं झाड आहे. ३५/४० वर्षे जुनं. इतकी वर्षे त्याला मी बघते आहे. त्याची सारी भाषा मला कळते. मी तेंव्हा दोन रोपं लावली.. शेजारी शेजारी!
एकाच वाफ्यात बरं.. हेतू हा की एक तरी जगावं. मला वाटलं मी खूप शहाणी….! एक जगेल.. एक मरेल …? कदाचित…
अहो ते काय माणूस आहे विश्वासघात करायला…? झाडं जास्त शहाणी निघाली. त्यांनी माझी फजिती केली. दोन्ही बिया रूजल्या. कोण आनंद झाला मला….!
तशी मी निसर्ग वेडीच आहे.. सारा निसर्गच माझ्याशी बोलतो.
अंगणात खूप फुलझाडं लावली होती मी.. दोन्ही कोया फुटल्या. लाल चुटूक पाने वर बघू लागली. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.दिसामासी मी त्याच्याकडे बघत असे. ती बिचारी निसर्ग नियमाने वाढत होती. एकाच वाफ्यात दोन कोया ! खरंतर मी त्यांच्यावर अन्यायचं केला होता.
शेजारी शेजारी दोन झाडे जोमात कशी वाढतील ? माझ्याकडून चूक झाली होती.
मग एक जोमात नि एक हळूहळू वाढू लागले. मोठे डेरेदार… नि छाटे बारकुटले…!
मध्येच मला वाटले, शेजारीच तर आहेत, बांधून टाकू.. एकजीव होतील. मनात यायचा अवकाश नि घेतली दोरी नि टाकले बांधून… पण ते कसले वस्ताद.. !
बागेत झेंडू खूऽऽऽऽऽऽप बहरला होता… कमरे एवढे एक एक झाडं… पिवळ्या लाल फुलांनी मुसमुसणारे…नजरेचे पारणं फिटावं असा कधी न पाहिलेला झेंडूचा बहार… लोक यायचे नि चकित व्हायचे…
हं तर काय…? आंबे ना ? बांधले होते… पण….? त्यांनी स्वतंत्र अस्तित्व ठेवलं… ठीक आहे, वाढा बाबांनो तुम्हाला पाहिजे तसे… मोठे झाले पण… आंबे काही येईनात… पुन्हा माझ्या जीवाची घालमेल….! आणि एका हिवाळ्यात मोहोर आलाच.. झाडे म्हणजे साधू संतच.. सर्व ताप सहन करून जगाची चिंता करणारे…ब्र न काढता सोसणारे जटाधारी साधूच…! माणसांची व झाडांची दिसामासी वाढ होते. संस्कारांचे खतपाणी माणसांनाही मिळतेच.. पण किती माणसात ते मुरते..? आणि कितीकांत विरून जाते…!
पण झाडांना द्या न द्या..त्यांची देण्याची वृत्ती अभूतपूर्व.. अनाकलनीय आहे. मारा.. तोडा.. छाटा… देतांना सर्वांना न्याय सारखांच… दात्याला नि दुष्टाला सारखाच न्याय… सारखीच सावली…खरेच, रोज आपल्या बरोबरीनेच वाढणाऱ्या झाडांचा गुण आपण घेतला तर……..!
हं… तर.. मोहोरा बरोबर फांद्यांना…?
अहो..घोसच्या घोस लागले…खरंच घोस लटकले…हिरवेगार आंबे वाढू लागले पण पिवळे काही होईनात…? साईजही छोटी गावठी आंब्याचीच.. अंदाजाने उतरवले. खूप गोड नव्हते..ते घोस पाहूनच एव्हढी खूष होते की मला काही वाटले नाही… हळू हळू समज वाढत गेली. काय करावे ?
हं… कलम करावे कां… झाले.. मनात विचार आला नि कार्यवाही सुरू.. माझा भाचा योगेश कृषी खात्यात नोकरीला आहे..
बोलावले… योगेश कलम करायचे का झाडांवर… ? योगेशने हापूस, सिंधू. रत्ना केसर च्या काड्या आणून कलम करायचे ठरवले… पण त्या साठी आपण हाता पायाची नखं काढतो , केस कापतो तसे काही छाटणीचे संस्कार करावे लागणार होते ते केले… म्हणाला, आता डिऱ्या फुटतील, करंगळी एवढ्या जाड झाल्या की कलम बांधू… मी पहात होते.. डिऱ्या फुटल्या.. जाड झाल्या नि मग एक कलम तज्ञ बोलवून दोन्ही झाडांवर कलमं बांधली… मोठे मजेशिर दिसत होते दोघे… पट्ट्या लावलेले जखमेबहादूर… मग ठरल्या प्रमाणे निवडक काड्यांची ती कलमे रूजली काही मेली पण ८० टक्के जगली…सर्जरी यशस्वी झाली…!
आता मात्र दोघेही जोमात…बरोबरीनेच वाढू लागले..डेरेदार भरगच्च.. नि हिरवीगार.. व्वा.. आणि तुम्हाला खरं सांगते… माझ्या आंब्या सारखा मधूर,रसाळ आंबा बाजारात मिळत नाही.. एक एक आंबा अर्धा किलोचा.. एका किलोत फक्त तीनचं….जून मध्ये मोजकेच १००/२०० आंबे निघतात. पहिला पाड पडला की मी उतरवून घेते नि… माझे नातलग, नोकर चाकर सर्वांना वानवळा पाठवते… पक्षी पोपट वटवाधळेही आंबे खातात नि मी तृप्त मनाने त्यांच्याकडे बघते. हो.. पहिला वाटा त्यांचाच.. मग आपला.. पूर्ण जून जुलै आमची आमरस पुरणपोळी पुऱ्यांची मेजवानी चालते..दररोज चपाती बरोबर खातोच… मी तर लहानपणी खाल्लेल्या रस शेवयाच खाते… अहाहा…काय मजा येते नुसत्या गिळायला… एकदा खाऊन पहाच.. मग कळेल मी काय म्हणते ते… उन्हाळयात आंबे नातवंडांवर सावली धरून असतात.. मुले मनसोक्त अंगणात खेळतात… किती कृतज्ञता व्यक्त करावी त्यांच्या विषयी…! मला नेहमी वाटतं आपण झाडां सारखं वागायचं ठरवलं तर…… जगात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही… नक्कीच… हो ना… तुम्हालाही असंच वाटतं ना….
लहानपणापासून मी इतकेदा हा शब्दप्रयोग ऐकलाय की माझी समजूत होती तो एक बहुमानच आहे.
साधारण ५ वीत असताना मी एका वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. झकास पाठांतर केले होते. पण नेमके स्पर्धेच्या दिवशी इतका ताप आला की घरी झोपूनच रहावे लागले. संध्याकाळी जागी झाले तर आई कुणाला तरी सांगत होती “तापामध्ये सगळे भाषण म्हणत होती. हौस फेडून घेतली.”
गॅदरिंग च्या नाचामध्ये भाग घ्यायची कोण हौस ! पण माझ्या उंची आणि जाडीमुळं सोळा जणींच्या ग्रुप डान्समध्ये सोळावा नंबर माझा. बहुदा मला नाचही नीट येत नसावा. पण हौस ना! नाच झाल्यावर बाई म्हणाल्या, ” नाचायची हौस फिटली ना एकदा छान झाले. ”
कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र मी एकदम चिडीचूप झाले. मोठी मुलं मुली पाहून घाबरूनच होते. मात्र स्टडीटूर मुळे माझी फिरण्या ची हौस भागली. किटकशास्त्र विषय असल्यामुळे जंगलामध्ये रात्रीच्या वेळी फिरून किडे गोळा करायला फिरायला मिळाले. मुख्य काम मुलेच करायची. आम्ही मुली दबकत दबकत एकमेकींचा हात धरून टॉर्चच्या उजेडामध्ये भटकंती केली आणि हौस भागवून घेतली.
लग्न झाल्यानंतर स्वप्नांचा हौसेचा झोका डळमळीत झाला. पण अशी कच खाणारी नव्हते मुळी मी. काही वर्षांनी ट्यूशन घेण्याची माझी हौस भागवायला मी सुरु केली. दोनचार मुले आली तरीत्यांना शिकवायचेच असा चंग बांधला. बारावीचे दोन भाऊ जीवशास्त्र शिकण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले. मी मनापासून ज्ञानदानाचे काम करत होते. अचानक दोघांचे येणे थांबले. १५ दिवसांनी माझे स्टुडण्टस् हजर! इतके दिवस न येण्याचे कारणमी विचारले. ” मॅडम, आजी, बाबांची आई गेली. ”
त्यानंतर काही दिवसांनी मुलांचे वडिल अभ्यासाची चवकशी करायला आले. मी सांगितले “मध्यंतरी पंधरा दिवस गेलेना, आता करतील”. ते म्हणाले, ” कसले १५ दिवस गेले?” .. मी म्हंटले, “अहो, मुलांची आजी गेली म्हणून त्यांनी सांगितल” ताडकन उठत आश्चर्याने आणि संतापाने ते म्हणाले, ” काय सांगता? माझ्या आईला घालवलं कार्ट्यांनी ? चांगलं फोडूनच काढतो आता ss” म्हणून रागाने निघून गेले. एकूण माझ्या ट्यूशनची हौस फिटली.
आता मात्र मी घरीच असते. साठी बुद्धी नाठी न होऊ देता मस्त रहाते. कोरोनाने तर आता घरीच बसवले आहे. तरी माझी एक हौस मी फेडून घेते आहे. कशाची? प्रश्न पडला ना? सांगते! रोज काहीना काही खमंग ‘चमचमीत’ गरमागरम पदार्थ करायचा अन् यथेच्छ ताव मारायचा एकदा तिखट एकदा गोड ! त्याचा परिणाम मला परवा दिसला. परवा सहज घराच्या पुढच्या दाराशी उभी होते. तर मला जाणवलं, मी आख्खी या दारामधून बाहेर जाऊ शकत नाही. आतामात्र माझी खाण्याची हौस फिटली हं !
प्रेम हा अडीच अक्षरी शब्द. किती आपला, हवा हवासा वाटणारा.
ही एक अशी गोष्ट आहे जी केव्हाही, कुठेही आणि कोणाबरोबरही होऊ शकते. हा थांबा जरा, आता प्रेम म्हणलं की तिथे मुलगा आणि मुलगीच असली पाहिजेच अस काही नाही बरका. म्हणजे थोडक्यात प्रियकर आणि प्रेयसीच असली पाहिजे अस नाही.
माणूस जन्माला आल्यावर त्याच्यावर जर कोणी निस्वारथी पणे प्रेम करत असेल तर ती आई. या इवल्याश्या जीवाला ती प्रेम करायला शिकवते. वात्सल्याने भरलेली ही माता आपल्या पिलाला जिवापाड जपते, प्रेम करते. रडणार्या तान्ह्या मुलालाही जवळ घेतले, गोंजारले की ते शांत बसते मायेचा स्पर्श त्यालाही कळतो. आईचे प्रेम म्हणजे काय नुसते लाड करणे, गोंजारणे का ? अजिबात नाही.
त्याला चुकल्यावर कधी धपाटा घालून, कधी समजावून, कधी कठोर शिक्षा करणे म्हणजे ही प्रेमच की. आपला मुलगा चुकू नये म्हणून जेव्हा आई त्याला शिक्षा करत असते तेव्हा ती जणू स्वतः ला शिक्षा करत असते.
पुढे मुलं शाळेत जाऊ लागतात, आणि त्यांचे शाळेशी एक अतुट नाते निर्माण होते. शाळा म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय. शाळा जणू त्यांचे विश्व होऊन जाते. तिथे अनेकांशी प्रेमाचे नाते जुळते, आपल्या वर्ग शिक्षिका, शिपाई मामा, मित्र मैत्रिणी सारे आपले वाटू लागतात.
शिक्षक आणि विद्यार्थी हे नाते तरी विश्वासाच्या सुरेख धाग्यात गुंफले जाते. शिक्षक प्रेमाने, आपुलकीने, आत्मियतेने विद्यार्थ्यांना घडवतात. एक सुजाण नागरिक बनवतात.
जसे जसे मोठ्या इयत्तेत जाऊ तसे आपला असा एक वेगळा ग्रुप तयार व्हायला लागतो. आणि त्यांच्यात एक खास नाते तयार होते. मैत्रीचे नाते स्वच्छ सळसळणारी नदी म्हणजे मैत्रीचे नाते.
महाविद्यालयात गेल्यावर आपल्याला एखादी व्यक्ति विशेष आवडायला लागते. आणि त्याला एक विशेष जागा निर्माण होते हृदयात. आपल्याला मन आता फुलपाखरा प्रमाणे भासु लागते. आपण आपले उरतच नाही. ह्या प्रेमाच्या
महासागरात माणूस मात्र अखंड बुडून जातो.
खूप सुंदर नातं असत हे. खूप क्वचित जणांनाच हे मिळत ही गोष्ट वेगळी.
माझ्या वर कोणीतरी प्रेम करत ही भावनाच सुखावून जाते, बळ देऊन जाते. मग ती व्यक्ती कोणी असो आई, बाबा, मित्र, मैत्रीणी, सहचारिणी एखादी जिवलग सखी कोणीही. माझं कोणी आहे ह्याची जाणीव होते त्याने. आपलेही अस्तित्व आहे ह्याची जाणीव करून देते प्रेम. आपण ही कोणाला हवे आहोत ही भावनाच किती सुंदर असते.
सुंदर, निखळ, स्वच्छ मनाचा झरा म्हणजे प्रेम.
जिथे हक्कानी आपण काहीही बोलू शकतो, सांगू शकतो म्हणजे प्रेम.
काही वेळेला कोणतेच नात्याचे लेबल नसते लावलेले, तरीही एक आपुलकी वाटत असते एकमेकांबद्दल तेही प्रेमच की, मग तिथे ते प्रियकर असतीलच असे नाही, तरीही हे दोन जीव मनानी बांधले गेले असतात, शरीराने नाही, ना त्यांना त्याची गरज असते.
कोणीतरी आपल्यावर प्रेम करते, आपण कोणाला तरी हवे आहोत ही जाणीव जगण्याला बळ देऊन जाते.
निशब्द मायेची ऊब म्हणजे प्रेम,
विचारांवर आणि मनावर अधिराज्य करते ते प्रेम.
ज्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवतो ते प्रेम. रणरणत्या उन्हांत मिळालेली सावली म्हणजे प्रेम.
गेट वाजलं. मुलांचा आवाज ऐकू येऊ लागला. आत्ता भरदुपारी कोण आलं आहे असं मनात म्हटलं आणि दार उघडले. मुलांसह तिला पाहून लगेच ओळखलं. दारातच पार्वती मला नमस्कार करायला खाली वाकली आणि पाठोपाठ मुलं सुद्धा. मला आवडलं पण ही अशी अचानक भेट.
तिच्या चेहऱ्यावर हसू होतं पण पापण्या ओल्या पाहून लगेच मी तिला माझ्या जवळ बसवलं. दोन मिनिटे झाली आम्ही निःशब्दच.
मुलं अंगणात पळाली होती.तिने हातात घेतलेले माझे हात अलगद कधी सुटले होते मलाच कळले नाही.
घोटभर पाणी पिताना तिच्या मनात काय तरी चालू आहे हे लक्षात यायला मला वेळ लागला नाही.ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तिला मनमोकळ्या गप्पा मारताना पहिल्यांदा मी अनुभवत होते.
तीन वर्षांपूर्वी अशीच एकदा रात्री ती घरी एकटी आली होती. डोळे सुजलेले, ओठ सुकलेले, चेहऱ्यावर तीव्र व्रण, तिची पार रयाच गेली होती. काय घडलं असावं याचा मला अंदाज आलाच. तिची समजूत काढली आणि तिला धीर देऊन काय केले पाहिजे या विषयी सुचवले. प्रयत्नांती परमेश्वर म्हणत मी तिची ओटी भरली होती.
तिच्या चांगल्या संसाराला नवऱ्याच्या वाईट व्यसनांचे गालबोट लागले होते. तिने पतीस समुपदेशन केंद्रावर नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. तिच्या तपस्येला उशीरा का होईना पण चांगले फळ लाभले होते.”देर है लेकीन दुरुस्त है” अशा उक्तीला सार्थ ठरवत नवऱ्याने तिला बचतगट स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले होते.त्यामुळे तिला स्वतःची अशी एक खास ओळख त्या गावात
आईबापाविना असणाऱ्या या मुलीचा संसार उद्धवस्त होण्यापूर्वीच सावरला होता. मोठ्या समाधानाने सासरी जाणाऱ्या या माझ्या मानसकन्येला निरोप देताना माझेच डोळे भरून आले होते.
लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत, ठाणे वैभव अश्या अनेक नामांकित वृत्तपत्रात लेखन प्रसिद्, आध्यात्मिक लेख ही प्रसिद्ध
कोकण मराठी साहित्य परिषद-ठाणे शाखा, आचार्य अत्रे कट्टा– ठाणे या संस्थेच्या कार्यकारिणीवर कार्यरत तसेच
कोकण मराठी साहित्य परिषद-ठाणे तर्फे लेखिका म्हणून जेष्ठ नाटककार लेखक नाट्यदिग्दर्शक नाट्यअभिनेते श्री अशोक समेळ यांच्या हस्ते सत्कार २०१९ , अनेक सन्मान
☆ विविधा ☆ मी आणि पाऊस ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
पावसात मला भिजायला आवडतंच. बेभान होऊन पाऊस अंगभर गोंदवून घेण्यासाठी तर मी वेडीपिशी होते पण हव्या त्या वेळी हव्या त्या ठिकाणी आणि हव्या त्या आपल्या माणसासोबत धुँवाधार पावसात भिजण्याची माझी अनावर इच्छा प्रत्येकवेळी पूर्ण होतेच असं नाही. माझी आणि माझीच वेडावणाऱ्या पावसाची गोष्ट…
माझ्या आयुष्यातला पहिला पाऊस पहिला पावसाळा मी बघितला माझ्या इवल्या नाजूक डोळ्यांनी पण दुसऱ्या पावसाळ्यात मात्रं पावसाचे टपोरे थेंब अंगावर घेण्यापासून कुणीही रोखू शकलं नाही मला.. पावसातलं माझं रूप बघून सगळ्यांना कोण आनंद झाला. कित्येक पावसाळे आले आणि गेले …रांगायला,चालायला लागलेली असताना कुतूहल म्हणून माझं पावसात भिजणं हळूहळू मागे पडत गेलं. पाऊस आला की ” सर आली धावून मडके गेले वाहून ” हे म्हणायला शिकलेल्या शाळकरी वयात फक्त माहीत होतं. दप्तर न भिजवता एका हाताने छत्री धरून दुसऱ्या हाताने गणवेश सावरत वाटेत आडव्या येणा-या खड्डयात थुईथुई नाचत घर गाठणं. मुसळधार पावसात कपडे, दप्तर भिजण्याची पर्वा न करता सायकल दामटवत रस्त्यावरून बेफिकीरपणे जाण्याचं मला नेहेमीचं माझचं कौतुक वाटत राहायचं. खिडकीच्या गजातून हात बाहेर काढून तळहातावर पाऊसथेंब झेलण्यावरचं मला बऱ्याचवेळा समाधान मानावं लागलं. मैत्रींणींसोबत मजा म्हणून पावसात भिजल्यानंतर मिळालेला आईचा ओरडा , खाल्लेला मार आणि पुढे चार दिवस गळणारं नाक मला आजही विसरता आलेलं नाहीय…
खऱ्या अर्थानं मला पाऊस आपलासा वाटला मी स्त्री असण्याची सगळी बंधन झुगारून पाऊस रोमारोमात भरून घ्यावासा वाटला जेव्हा माझ्यात ऋतूबदल झाला तेव्हा..एक नवाचं पाऊसबहर माझ्या मुक्कामाला आला. आणि पाऊस मला माझा
जीवलगसखा प्रियकर वाटायला लागला. मी डोळ्यांत पाऊस आणून पावसाची वाट पाहायला लागली आणि तो येण्याच्या नुसत्या चाहुलीनेही कावरीबावरी होऊ लागली. पाऊस मला खुणवायचा हातवारे करायचा तेव्हा मी मनोमन लाजायची, खट्याळ हसायची. माझ्यातल्या कोवळ्या वृत्ती तरारून यायच्या. मी आंतर्बाह्य पावसाळी होऊन जायची. मग सगळी बंधनं झुगारून एका अधिर उत्कटतेने प्रत्येक भेटीवेळी त्याच्या बाहुपाशात शिरून रीती व्हायची पण तरीही प्रत्येकवेळी नव्याने भेटणारा तो पाऊस मात्र मला अजूनही परिपूर्ण वाटत नव्हताच. चिंब भिजल्यावरही माझ्या मनाचा एक कोपरा कोरडाच असायचा. काहीतरी चुकल्यासारखं वाटत राहायचं….मला काहीतरी गवसलंय पण… अजून जे खूप मौलिक आहे पण ते हवं होतं. माझ्या नजरेला कशाची तरी ओढ होती .. कुणाची तरी आस होती. . पण कशाची आस, कुणाची ओढ?
आणि मग अशाच एका मुसळधार पावसात मला तो भेटला. भर पावसात छत्री असूनही ती न उघडता हात पसरून पाऊस कवेत घेणारा.. पावसाइतकाच प्रिय वाटणारा माझा प्रियकर. “पाऊस ओढ” हा आम्हां दोघांमधला सामाईक दुवा ..अजून काय हवं होतं मग..!
मला पावसाइतकीच त्याचीही ओढ वाटायला लागली. ” ये बारीश का मौसम है मितवा, ना अब दिल पे काबू है मितवा” असंच काहीसं मी गुणगुणायला लागलेली. आभाळ भरून आलं की अंगात वारं भरल्यासारखी मी त्याला भेटायला जायची. तेव्हा तो म्हणायचा, ” जब तू हसती है, बारीश होती है ” तेव्हा माझा उभा देह पाऊस होऊन जायचा मला त्याच्यासोबत पावसात भिजायचं असायचं. त्याचा हात हातात घेऊन त्याला बिलगून धो धो कोसळणारा पाऊस मनात , देहात साठवून घ्यायची मी.. माझ्या ओल्या केसातून ओघळणारे पाऊसथेंब तो तळहातावर घ्यायचा आणि पिऊन टाकायचा तेव्हा तर भर पावसात माझे भरून आलेले डोळे तो त्याच ओल्या तळहाताने पुसायचा. तेव्हा ती म्हणायची, ” आपल्या घराचं नावही आपण पाऊसच ठेवायचं.” पावसाचे काही थेंब वरच्या वर अलगद झेलून तो माझ्या ओंजळीत द्यायचा.
असे कितीतरी प्रेमपावसाळे आम्ही अनुभवले. जगण्याचा उत्सव केला. माझ्या मनातला एक कोरडा असलेला कोपरा चिंब चिंब भिजून गेला होता. माझ्यातल्या अपूर्णत्वाची जागा पूर्णत्वाने घेतली होती. नदी दुथडी भरून वाहत होती. मनातल्या समुद्राला भरती आली होती. “आकंठ” या शब्दांची अनुभूती मी साक्षात जगत होती. माझ्या मनात ढोलताशे वाजत राहायचे. त्याने माझ्या आत दडून बसलेला मनमोर शोधून द्यायला मदत केली होती. मी तो मनमोर प्राणपणाने जपला त्याच्यासोबतीनं.. मनमोराचे पिसारा फुलवून नाचणे हे मी आतल्या आत अनुभवत राहिली.
पण मग एक दिवस खूपच मोठा अवकाळी पाऊस आला. मी आणि माझ्या प्रियकरानं भर पावसात पावसाच्या साक्षीनं हातात हात घेऊन रंगवलेली सगळी स्वप्नं एका क्षणात माझ्या नजरेच्या टप्प्यापासून फार दूरवर वाहून गेली. पाऊस झेलून परतताना त्यानं मला दिलेलं आणि मी खिडकीवर टांगून ठेवलेलं चिमणीचं घरटंही उडून खाली पडलं. खिडकीचे गज हातात घट्ट पकडून मी पुढचे कित्येक दिवस बाहेरच्या पावसाकडे मुद्दाम दुर्लक्ष करत माझ्या डोळ्यातूनचं पाऊस सांडत राहिली. आणि तो पुन्हा कधीच पावसात भिजणार नसल्याचा निरोप माझ्या जवळ ठेऊन गेला.
माझं अवखळ ,अल्लडपण मागे पडलं, माझं गावं बदललं , घर बदललं घरातली माणसं बदलली पण पाऊस मात्रं होता तसाचं राहिला माझा पहिला वहिला प्रियकर…
मला आजही त्याच्या आठवणीत नखशिखांत पावसात भिजावसं वाटतं. आता मी पावसात माझा पाऊसवेडा प्रियकर पाहते.
माझ्या बदललेल्या जगात मला हवाहवासा पाऊस सतत माझा पदर धरून असतोही. पण आता मात्रं निर्बंधांच्या साखळ्या अधिक मजबूत झालेल्या आहेत.
आकाशात काळे ढग दाटून आले की स्वतःची पावसात भिजण्याची इच्छा बाजूला ठेऊन दोरीवर वाळत घातलेले कपडे भिजू नयेत याची मला काळजी घ्यायची असते. घरात पाऊस येऊ नये म्हणून दारं खिडक्या गच्च लावून घ्यायच्या असतात.. घ्याव्या लागतात. घरातल्यांच्या “अद्रकवाली चाय” च्या व “गरमागरम कांदाभजीच्या” फर्माईशी पुऱ्या करायच्या असतात. खिडकीतून दिसणारा पाऊस बघत बघत कपात चहा ओतताना प्रियकरासोबत पावसात भिजलेली , मनात पुन्हा पुन्हा उसळी मारून वर येणाऱ्या त्या ” ओल्या आठवणी'” डोळ्यांच्या तळ्यातून डोकं वर काढून बाहेर येऊ नयेत म्हणून जिवाचा आटापिटा करायचा असतो. केलेला असतो.. साडीचा पदर कमरेला खोचून पावसात भिजून आलेल्या त्याच्या ‘ “टाॕवेल दे ”, शर्ट दे'” सारख्या मागण्याही पूर्ण करायच्या असतात. शाळेतून भिजून आलेल्या मुलांची दप्तरं सुकवायची असतात. या सगळ्या धावपळीत मला माझा पाऊस सतत खुणावत असतो, प्रेमाने हात पुढे करत असतो. मला मिठीत घेण्यासाठी आसुसलेला असतो पण मला त्याच्याकडे एक साधा कटाक्ष टाकायलाही आताशा उसंत मिळत नाही…
माझी धांदल संपत आलेली असते. तेव्हा पाऊस वेड्यासारखा धुँवाधार बरसून निघून गेलेला असतो. खिडकीचे गज धरून पुढचा कितीतरी वेळ मी डोळ्यातून अखंड पाऊस सांडत राहते पाठमोऱ्या पावसाकडे बघत….
☆ विविधा ☆ लॉकडाऊन चार नंतर भेटलेल्या मैत्रिणी ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
अनलॉक ४ नंतर भेटलेल्या मैत्रिणी
(जूना लेख नवीन बदलांसह)
ठिकाण: लोणावळा
??????
अरे अजून कशी आली नाही ही स्वारगेट ‘हिरकणी‘ एव्हान यायला पाहिजे होती. माझी तर आता निघायची वेळ झाली असे विचार बोरिवली शिवनेरीच्या मनात येत असतानाच लोणावळा एक्झीट मधून अर्ध गोलाकार वळण घेत धापा टाकत. ठाणे – स्वारगेट हिरकणी अवतरली.
अग हो, हो, जरा हळू,
उशीर झाला म्हणून एवढं जोरात यायचं? लागलं असतं की तुलाच.. शिवनेरी जरा काळजीच्या भावनेने म्हणाली..
ए शिवनेरी Sorry हं, जरा उशीरच झाला मला, आता नेहमी सारख्या गप्पा नाही जमणार गडबड होईल इती – हिरकणी
‘अगं असू दे ‘ गप्पा काय संध्याकाळी परत येताना करु, तू आधी ३० रुपयाचा नाष्टा करुन ये. उपमा घे आज. मस्त आहे गरम. पण त्या आधी हे घे आधी सॅनिटायझर. स्वच्छ हात धू. कोण कोण असतं गाडीत देव जाणे. आपणच आपली काळजी घ्यायची
हो गं, किती वाईट दिवस होते मागचे. डेपोत नुसते पडून होतो. एक दोन दिवसात आपले मेकॅनिक मामा येऊन फक्त आपल्याला चालू करुन जायचे आपण कायमचे बंद पडू नये म्हणून खूप आठवण यायची सगळ्यांची
अग जातीयस ना नाष्ट्याला
नको ग, अजून काही दिवस बाहेरचे नको. घरुनच डबा आणलाय मी. स्वारगेटला पोहोचले की खाईन.
अगं पण एवढा घाट चढून आलीयस. दमली असशील की निदान चहा तरी घे.
नको गं शिवनेरी, सध्या नुसते गरम पाणी. तो बघ थर्मास भरुन ठेवलाय. निघताना घेईन पाणी.
शिवनेरी, घाटावरुन आठवलं,मला तर बाई या आपल्या कोकणातल्या मैत्रिणींच नवल वाटत. कशा एकदम फीट ना. ती अशोक लेल्यांची सून माहित आहे ना.
‘हो ना गं’ किती ते मोठे घाट असतात ना कोकणात. या आपल्या कोकणातल्या मैत्रीणी एकदम बिंधास्त. मी मात्रफारशी त्या मार्गावर जातच नाही
आपला हा पुणे-मुंबई बोर घाटच बरा.
हो ना, नाहीतर आपण. अमृतांजन पाँईंट ला केंव्हा टाटा करतो असं होऊन जातं आपल्याला.
हिरकणी , तो बघ ‘अश्वमेध‘ येतोय, दादर – पुणे स्टेशन, बोलायचं का त्याच्याशी
“काही नको ग”, तो कुठं आपल्याशी बोलतो ग्रुप वर. तो फक्त पुणे – दादर – पुणे शिवनेरींशींच बोलतो. आपला ग्रुप त्यानेच बनवून दिला अन एकंदरीत पुणे – दादर – पुणे ची मक्तेदारी आपण सगळ्या ग्रुप मध्ये आल्यामुळे मोडली गेलीय ना , त्याचे त्यांना दुःख आहे ग , लक्ष देऊ नकोस तू . आणि मुख्य म्हणजे तो दोन्हीकडच्या कंटॅन्मेंट झोन मधून येतो. येतोय तो, मास्क घाल निट. आणि मगाच पासून सारखं खालीवर का करतीयस हा मास्क. अजिबात असे करायचे नाही हं
हो ग बाई, अजून नीट सवय झाली नाही ना गं. पण घेईन काळजी
ए आपली
‘परळ – सातारा’ ती नाही ग दिसली ब-याच दिवसात नेहमीच्या वेळेला इथे
अग गणपती असतो ना तिच्याकडे साता -याला. मला म्हणलेली एक दिवस पुणे – सांगली रूट करून ये दर्शनाला . पण नाही ग जमलं . उद्या परत जॉईन होतीय ती परळ डेपोत.
तिने गणपती विसर्जनाचे फोटो पाठवलेले की . नाही पाहिलेस ग्रुपवर ?
नाही ग , राहून गेलं . पण ही परळ खूप सरळ हो . किती दमते बिचारी. आपण पुण्यापर्यतच जातो ग बिचारीला साता-या पर्यत जाऊन रात्री उशीरा पर्यत परत परळला यावे लागते. खूपच हेक्टिक काम आहे तिचे.
हो ना. कुणाला कधी नाही म्हणत नाही. ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त टोल पार्टी देणारी म्हणून तिचे सगळेच कौतुक करतात. आता उद्या मुद्दाम जरा जास्त थाबते लोणावळ्याला अन कंदी पेढ्याचा प्रसाद. तिच्याकडून घेऊनच निघेन म्हणते
शिवनेरी, ती बघ ‘यशवंती‘ .हाक मारतीय आपल्याला
यशवंती, ये चहा घेऊन जा ..
अग नको अजून चार चकरा मारायच्या आहेत लोणावळा ते कार्ला आणि मी अजून बाहेरचे काहीच खात नाही सध्या. भेटू परत केंव्हातरी
कमाल आहे ना या मुलीची. केव्हा ही बघा ही आँन लाईन असतेच. जवळच्यांची खूप काळजी घेते, मैत्रीण असावी तर हीच्या सारखी
खरंय ग
ए शिवनेरी, तो बघ तुझा राजा हिंदुस्तानी आला ‘
“आले का सगळे का कोण राहिलय”
या आवाजाने मला जाग आली तेंव्हा ही शिवनेरी आणी समोरची हिरकणी माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतायत असा भास मला झाला
तरीही त्यांचा संवाद संपत नव्हता:-
हो हो , चल आज खूप वेळ झाला, आता बोरिवलीला केव्हा पोचणार देव जाणे
नीट जा ग , सायन पासून पुढे बांद्रया पर्यत प्रत्येक ९ मिटरवर खोल खडडे आहेत. कंबरडं मोडून जाईल
हजारो वर्षांपासून बाहुली आस्तित्वात आहे. अगदी मोहेंजोदडो, हडप्पा सारख्या प्राचीन उत्खननातसुद्धा बाहुल्या सापडलेल्या आहेत. जगातल्या प्रत्येक देशात वेगवेगळ्या रुपात बाहुली पहायला मिळते. मुलीला कळायला लागल की तिला पहिल खेळण आणल जात ते म्हणजे बाहुली. मुलींच्या भावविडात बाहुलीला फार मोठ स्थान आहे. अगदी मुली क्रिकेट, कुस्ती किंवा बॉयिसंग खेळू लागल्या तरीही. इतिहासात खोलवर डोकावल तर इसवीसनापूर्वीदेखील बाहुल्या असल्याची माहिती मिळते. ‘‘लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. घारे डोळे फिरवीते, नकटे नाक उडविते’’अस सुंदर वर्णनाच गाण प्रसिद्ध आहे. पूर्वी लाकडी ठोकळ्याला नाकडोळे काढलेल्या ओबडधोबड बाहुल्या असत. त्याना ठकी म्हणत. त्यानंतर चिंध्याच्या बाहुल्या आल्या. मग प्लॅस्टिकच्या बाहुल्या आल्या. आज डोळे फिरविणार्या, बाटलीतून दूध पिणार्या अगदी खर्या बाळासारख्या दिसणार्या बाहुल्या मिळतात. किी दिल्यावर नाच करणारी बाहुली, छत्री आणि पंखा घेतलेली किमोनो घातलेली जपानी डॉल, लांबडे हातपाय आणि लांब वेण्या घातलेली सँडी आणि या सर्वांवर कळस म्हणजे सोनेरी केसांची, तरुणीच्या रुपातली बांधेसूद बार्बी. आता बार्बीबरोबर तिचे कंगवे, तिचे कपड्यांचे सेट, तिच मेकअप किट, तिच रंगीबेरंगी टुमदार घरसुद्धा मिळत. इंटरनेटवर तिच्या हेअरस्टाईलचे वेगवेगळे प्रकार दाखविले जातात. आपली ऐडर्या रॉय बार्बीच्या रुपात पहायला मिळते. अनेक शहरात बाहुल्यांची संग्रहालये आहेत . त्यात देशोदेशीच्या बाहुल्या पहायला मिळतात. बाहुला बाहुलीचे लग्न हा बालपणीचा एक आवडीचा खेळ असतो. चुरमुर्याच्या मुंडावळ्या आणि हार, वाजंत्री, मंगलाष्टक आणि वरात सुद्धा या खेळात असते. पूर्वीच्या राजकन्यांच्या बाहुलीच्या लग्नाच्या रम्य आणि सुरस कथा वाचायला मिळतात. लाडयया लेकीच्या लग्नानंतर कपाटातल्या तिच्या बाहुलीकडे पाहून तिच्या आठवणीत रमलेले आईबाबा पहायला मिळतात. ‘‘सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी किंवा गुडिया हमसे रूठी रहोगी कबतक ना हँसोगी’ यासारखी गाणी प्रसिद्ध आहेत. ‘‘जहाँ मैं चली जाती हूं वहीं चले आते हो ह्या किंवा बोल रे कठपुतली बोले या गाण्यावरचा पपेट डान्स खूप छान आहे.
परदेशात पपेट शो असतात. राजस्थानात दोर्यांच्या सहायाने बाहुल्या नाचवून कथा सांगितल्या जातात. रामदास पाध्यांच्या बोलयया बाहुल्या प्रसिद्ध आहेत. त्यांचे अर्धवटराव आणि आवडाबाई कोण विसरेल?तसाच त्यानी तयार केलेला तात्या विंचू हा भयानक बाहुला. त्यांच्या कुटुंबान बाहुल्यांच्या खेळासाठी, शब्दभ्रम ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य वेचल आहे. बाहुली फ्क्त खेळातच असते अस नाही. कपड्यांच्या, दागिन्यांच्या दुकानात मॉडेल म्हणून तिचे वेगळे स्थान आहे. घराला, वाहनाना दृष्ट लागू नये म्हणून काळी बाहुली बांधतात. जादूटोण्यासाठी कापडी बाहुल्या वापरतात. अनेक सिनेमात किंवा टीव्ही सिरिल्समधे बाहुली हे स्वतंत्र पात्र आहे. रहस्य निर्माण करण्यासाठी किंवा ते उलगडण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. एखादी व्यक्ती दुसर्याच्या तालावर नाचत असेल, दुसर्याच्या सांगण्यानुसार वागत असेल तर तिला कळसुत्री बाहुली म्हणतात. छान दिसणार्या मुलीला बाहुलीसारखी गोड ठेंगणी ठुसकी आहे अस म्हणतात. नुसतीच नटून बसलेल्या मुलीला बाहुलीसारखी बसू नको काम कर अस म्हणतात. आणखी एक बाहुली प्रसिद्ध आहे ती म्हणजे फिल्मफेअरची. तिच्यासाठी नटनट्या जीव तोडून प्रयत्न करत असतात. ऑस्करच्या बाहुलीसाठी तर सगळ्या जगात चढाओढ सुरू असते. ***