मराठी साहित्य – विविधा ☆ ते सुंदर दृश्य…..!! ☆ सौ. सुजाता काळे

सौ. सुजाता काळे

☆ विविधा ☆ ते सुंदर दृश्य…..!! ☆ सौ. सुजाता काळे ☆

त्यादिवशी संध्याकाळी नेहमी प्रमाणे 6.10 ची ट्रेन पकडली. एकाद तासात मी माझ्या डेस्टीनेशन पोहचणार होते. हा माझा नित्यक्रम. सकाळी 8.05 च्या ट्रेनने निघायचे व संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर 6.10 ची ट्रेन गाठायची. स्टेशनवरून घरी तासाभरात पोहोचायचे. जवळपासच्या स्टेशनवर उतरायचे म्हणून टी. सी. कधीच आमची अडवणूक करत नसे. जिथे जागा मिळेल तिथे बसायचे.

हे गेलं 25 वर्षे सुरू आहे.

गेल्या 25 वर्षात जाता येता कित्येक माणसे पाहिली. वेगवेगळ्या धर्माची, जातीची, आचार -विचाराची, पेहरावाची, संस्कृतीची व रंगाची…..

आजही मी गडबडीत एस-4 डब्यात शिरले. मधल्या एका बर्थवर बसले. माझ्या समोरच्या बर्थवर एक जोडपे बसले होते. तिच्या मांडीवर एक 5-6 महिन्याचे बाळ होते. बाळ झोपलेले होते. त्याच्या अंगावर पांघरून घेतले होते.

त्यांच्याकडे बघून जरा आश्चर्यच वाटले.

तो गोरापान. कपड्यांच्या निवडीवरून शिकलेला वाटत होता. भाषा थोडी फार गावाची. ती थोडी काळी, म्हणजे जरा जास्तच काळी. कपाळावर भली मोठी टिकली. पुढचे दात किचिंतसे बाहेर. मुलाकडे स्वतःकडे तिचे लक्ष नसेल. केसांचा भला मोठा आंबाडा. चेह-यावर केसांच्या बटा. बाळाला थोपटत थोपटत कोणतं तरी गाणं बडबडत होती. भाषा अगदीचं गावंढळ. .. ‘ दुदु गाईच्या गोट्यामंदी, दुदु बाळाच्या वाटीमंदी….’ पण तो तिच्या या गाणं गाण्याने भयंकर चिडला होता. तिच्यापासून लांब बसला होता. त्याच्या चेह-यावरचा भाव पाहून मला थोडे विचित्र वाटले. त्याने तिला गप्प बसायची खूण केली पण तिचं पालुपद चालूच राहीले. मग त्याने न राहवून तिला बडबड करायला सुरुवात केली….. तुला केव्हांच सांगतोय गप्प बस म्हणून. कशाला एवढ्या भसाड्या आवाजात गातीस? डब्यातले लोक बघतायेत. तुझ्या बरोबर कुठं पण जायची लाज वाटते. कुठं कसं वागायचं ते कळतंच नाही. तरीच हजारदा आण्णांना म्हणालो होतो की नका लावू हिच्याशी लग्न. पण त्यांनी नाही ऐकलं. मला मरण्याची धमकी दिली. मित्राला दिलेला शब्द, लेकापेक्षा जास्त मोठा होता. लेकाचा विचारच केला नाही. ना रंग ना रूप… ना शिक्षण ना, ना वागायचं भान. उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.

शिक्षण म्हणे काय तर पाचवी पास..!! त्याची बडबड सुरु तर हिची गाणं सुरू. मी न राहवून त्याला सांगितले की ती बाळाला झोपतेय. आम्हाला काहीही त्रास होत नाही. त्याच्याशी बोलताना कळलं की तो पदवीधर आहे. चांगली नोकरी आहे. वडिलांनी जोर धरून त्याचे लग्न त्यांच्या मित्रांच्या मुलीबरोबर लावून दिले. तो म्हणाला, अहो मॅडम हिला चार चौघात घेवून जायला आवडत नाही. शिक्षणाचे राहू द्या, पण कमीत कमी दिसायला तरी बरी हवी. माझे मित्र माझ्यावर हसतात. माझी मस्करी करतात. हिला कुठे काय करावे ते कळतं नाही. त्याच्या बोलण्यात खंत होती.

मी पण नकळत कधी दोघांची तुलना करू लागले, मला कळालेच नाही. खरंच तो दिसायला देखना. गोरा, नाकी डोळी छान. शिकलेला. शिष्टाचार पाळणारा. आणि ती काळी, दात पुढे असणारी , कमी शिकलेली. गावात वाढलेली. मला तिचे एक कौतुक वाटले की तो तिला चार चौघात टोचून बोलला पण तिने तोंडातून अवाक्षर ही काढला नाही. निमूटपणे ऐकून घेत होती. प्रत्युत्तर दिले नाही. मी नकळत त्याच्या बाजूने विचार करत होते. मी पण मनाला समजावले की ही मलाही आवडली नाही. मी उगाचचं रागाने तिच्याकडे पाहिले.

एवढ्यात तिच्या मांडीवर झोपलेले तिचे बाळ रडत उठले. मी पाहिले की तिचे बाळं वडिलांसारखे सुंदर आहे. गोंडस आहे. रडण्या-या बाळाला त्याने पटकन उचलले. तो शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. पण बाळ काही शांत होईना.

त्याने उगी उगी करत चार इंग्रजी शब्द पण झाडले. माय डियर, कीप क्वायट. बेबी… बेबी… बी क्वायट… तरीही बाळ रडायचे थांबेना. तिने चार पाच वेळा बाळाला घेण्याच्या प्रयत्न केला पण त्याने दुर्लक्ष केले. थोड्या वेळानं कंटाळून त्याने बाळ तिच्याकडे दिले.

बाळ जवळ घेताना तिला स्वर्ग मिळाल्याचा आनंद झाला. तिने बाळाला जवळ घेतले. आपला पदर त्याच्या डोक्यावर पांघरून ती दूध पाजू लागली. बाळाला दूध पाजताना तिच्या चेह-यावर मातृत्वाच जे भाव होते, जे समाधान होते ते पाहून मला माझी लाज वाटली. कारण हिच्यावर थोड्या वेळा पूर्वी तिच्या बद्दल मनात राग धरला होता.

तिच्या चेह-यावर अप्रतिम आनंद होता. आई आपल्या मुलाला अमृतपान करवते हे दृश्य माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर दृश्य होते. याची तुलना मी कशाशीही करू शकत नव्हते. त्यावेळी ती विश्वातील सर्वात सुंदर स्त्री असते…!!

आई गोरी आहे की काळी! आई शिक्षित की अशिक्षीत! ती…. ती सुंदर आहे की असुंदर ! आई ती आईच असते….नऊ महिने त्रास सोसून, वेदना सोसून बाळाला जन्म देणारी आई सगळयात सुंदर असते…. स्वतःच्या बाळाची भूक शमवणारी आई…!! त्यादिवशी ते जगातील सर्वात सुंदर दृश्य मी पाहिले….!!

 

© सुजाता काळे

पाचगणी, महाराष्ट्र, मोबाईल 9975577684

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्पर्श ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ स्पर्श ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

स्पर्श म्हणले की किती प्रकारचे स्पर्श मनाला स्पर्शून जातात नाही? प्रेमाचा, आपुलकीचा, हक्काचा, आश्वासनाचा, धीर देणारा, हवा हवासा वाटणारा, नको वाटणारा.

जेव्हा शुभमंगल होऊन हक्काचा जोडीदार येतो आणि सप्तपदी च्या वेळी  हातात हात घेतो तेव्हा जाणवतो, तो त्याच्या सोबतीचा स्पर्श.  त्याचा हळुवार लाडिक स्पर्श प्रेमात पाडतो तर प्रोत्साहित स्पर्शाने दहा हत्तींचे बळ देऊन जातो, आणि सारे अडथळे कसे चुटकी सरशी दूर करतो त्याच्या मिठीत तर स्वर्ग सुख ही ठेंगणे भासते आणि सारे सुख दुःख विरघळून जाते.

आपल्याला स्पर्शाची ओळख अगदी आईच्या गर्भात असल्या पासून होऊ लागते. किंबहुना असं ही म्हणता येईल की, आईला बाळाच्या स्पर्शाची ओळख आपलं बाळ उदरात असल्या पासून होत असते. तो अनोखा, हवा हवासा वाटणारा, आनंद देणारा स्पर्श. त्या मारलेल्या पहिल्या लाथेच्या स्पर्शाने आई सुखावून जाते, आणि मन वाट पाहू लागते की कधी एकदा आपले बाळ आपल्या कुशीत येतय आणि त्याच्या कोमल हाताने आपल्याला स्पर्श करतय.

आणि जेव्हा आपले नवजात बालक आपल्याला पहिल्यांदा स्पर्श करते तेव्हा ते तर, स्वर्ग सुख!!! मग आई आपला चेहरा  मुद्दामून त्याच्या हाता जवळ नेते जेणेकरून त्याने आपले मऊ हात फिरवावेत. त्या नवजात बालकाला कुशीत घेतल्यावर तरी अस वाटतय जणू सारे सुख आपल्या मिठीत सामावलेले आहे.

कालांतराने मुलं मोठी होतात आणि नोकरीला जाऊ लागतात तेव्हा वडीलांनी पाठीवरून फिरवलेला, हिंम्मत देणारा स्पर्श, हे सांगणारा की हो पुढे मी आहे.

आईच्या स्पर्शात तरी माया, वात्सल्य, कौतुक, विश्वास, आधार सारे काही सामावलेले असते.

वृद्धापकाळात सुखावून जातो आपल्या नातवंडांचा जादूवाला स्पर्श. जर नातवंडांनी आजीच्या गुडघ्याला तेल लावून मालीश केले तर ती सुखावलेली आजी दहा मैल चालून येते. मुलांनी किंवा मुलींनी प्रेमाने फिरवलेला पाठीवरून प्रेमाचा स्पर्श आपण एकटे नाही आहोत ह्याची जाणीव करून जाते.

स्पर्शात अनेक आजार बरे करण्याची शक्ति आहे म्हणून तर खूप महत्व आहे स्पर्श थेरपीला. मसाज केल्यानंतर जे सुख मिळते ते खूप सुखावणारे असते, आराम देणारे असते व दाह कमी करणारे असते..

असे अनेक स्पर्श आहेत जे आपल्या स्मरणात राहतात, जसे शाळेत गेल्यावर बाईंनी कौतुकाने फिरवलेला कींवा बाई ओरडल्या नंतर आपल्या मैत्रिंणीने किंवा मित्राने हळूच आपला हात हातात घेतल्यावरचा आधाराचा स्पर्श.  महाविद्यालयात नकळत झालेला पण मग तो हवाहवासा वाटणारा मोहरून टाकणारा किंवा नको असलेले तिटकारा येणारा स्पर्श. दाह कमी करणारा किंवा दाह देणारा स्पर्श.

थोडक्यात इतकंच म्हणता येईल की स्पर्शात लाख मोलांचे बळ असते, जे आजारी माणसाला निरोगी बनवतो, निराधारा व्यक्तीला आधार देऊन जातो. एखाद्याला प्रोत्साहन तर एखाद्याचा आधार बनुन जातो. एखाद्याला प्रेम जिव्हाळा देऊन जातो. एक सुखाची झप्पी जणू.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुंकर ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ फुंकर ☆ श्री अरविंद लिमये☆

कोणत्याही जखमेची वेदना कमी करायला एक हळूवार फुंकरही पुरेशी असते. मग ती जखम शरीरावरची असो वा मनावरची. तत्परतेने केलेली मलमपट्टी जखम लवकर भरुन येण्यासाठी आवश्यकअसते. एरवी जखम चिघळत जाते. हे चिघळणं वेदनादायीच असतं. जखम झालेल्याइतकंच जखम करणाऱ्यासाठीही. म्हणूनच जखम झालीच तर ती चिघळू न देण्याची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.

चिघळणं म्हणजे विकोपाला जाणं. चिघळलेल्या जखमा कालांतराने बऱ्या झाल्या, तरी जखमेचा कोरला गेलेला व्रण मात्र जखमेच्या जन्मखूणेसारखा कायम रहातो.

मनावरील जखमा बऱ्या झाल्यानंतरचे हे असे व्रण मात्र जखम बरी झाली तरी त्या जखमेच्या वेदनेसारखे दीर्घकाळ ठसठसतच रहातात. नात्यातलं आपलेपण मग हळूहळू विरु लागतं

नाती रक्ताची असोत, वा जुळलेली किंवा जोडलेली असोत, वा निखळ मैत्रीची असोत ती अलवारपणे जपणं महत्त्वाचं. जपणं म्हणजे जखमा होऊ न देणं आणि झाल्याच तर त्या चिघळू न देणं. यासाठी गरज असते ती परस्पर सामंजस्याची.

व्यक्ति तितक्या प्रकृती हे मुलभूत तत्त्व हाच कोणत्याही नात्याचा पाया असायला हवा. मग परस्पर सामंजस्य आपसूकच आकार घेईल, आणि नात्यानाही सुबक आकार येत जाईल.

परस्पर सामंजस्य म्हणजे वेगळं कांही नसतंच.  दुसऱ्यालाही आपल्यासारखंच मन असतं आणि मतही हे कधीच न विसरणं म्हणजेच परस्पर सामंजस्य. कधीकधी असूही शकतो दुसऱ्याचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा पूर्णत: वेगळा तरीही कदाचित तोच बरोबरसुध्दा हे मनोमन एकदा स्विकारलं की मतभेद कायम राहिले तरी मनभेदाला तिथे थारा नसेल.  मनभेद नसले तर मनावर नकळत ओरखडे ओढलेच जाणार नाहीत.  दुखावलेपणाच्या जखमाच नसतील तर मग त्या चिघळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. तरीही नकळत,  अनवधानाने दुखावलं गेलंच कुणी कधी, तरीही त्या दु:खावर फक्त आपुलकीच्या स्पर्शाची एक हळूवार फुंकरही दु:ख नाहीसं व्हायला पुरेशी ठरेल.

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

☆  विविधा ☆ ऊंच माझा झोका ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

सरस्वती आमच्या साक्षरता वर्गात रोज यायची.

ऊंच, सडसडीत, अनवाणी, विस्कटलेले केस, ठिकठिकाणी जोड लावून शिवलेलं मळकट लुगडं. पण डोळ्यात विलक्षण चमक. काम करून करून घट्टे पडलेले हात पण ओंजळीत ओली स्वप्नं!!

तांबापुरा झोपडपट्टीत राहण्यार्‍या, मोलमजुरी करणार्‍या महिलांना, कित्येकवेळा आमच्या वर्गात येण्यासाठी, विनवण्या कराव्या लागायच्या.. शिकाल तर वाचाल.. हे जीव तोडून पटवून द्यावं लागायचं..

त्यांची न येण्याची कारणंही खूप होती. दारु पिण्यार्‍या नवर्‍याचा धाक, मारझोड. वस्तीतल्याच लोकांकडून मिळणारे टोमणे… संशय… एक ना अनेक.

पण सरस्वती मात्र या सगळ्यांवर मात करून, धावत पळत आमच्या क्लासला यायची…. पाटीवर छान अक्षरं गिरवायची… धडे वाचायची.. कविता म्हणायची.

समजलं नाही तर प्रश्न विचारायची… तिची जिद्द पाहून मीही थक्क व्हायचे…  लहान असतानाच एका बिजवराशी तिचं लग्न लावलं गेलं… सुख म्हणजे काय असतं हे कधी कळलंच नाही… ना माहेरी ना सासरी.. जीवन म्हणजे नुसता चिखल….

एक दिवस ती मला म्हणाली, “ताई मला यातून सुटायचंय्.. मला माझ्या जगण्याचा अधिकार मिळवायचाय्… मला तर एक चांगलं आयुष्य जगायचच आहे आणि जमेल तेव्हढं माझ्यासारख्यांनाही मला बरोबर घेऊन चालायच्ंय्….”

आमच्या साक्षरता वर्गातून तिच्या स्वप्नांना एक पायरी मिळाली फक्त.. पण तिचा प्रवास खूप लांबचा होता. खाचखळग्यांचा दगड गोट्यांचा होता… पण तिची पावलं घट्टं होती… मधून मधून ती मला भेटायला यायची…

ग्राम पंचायतची निवडणुक तिने लढवली… ती जिंकली… सरपंच झाली. महिला सरपंचाचा मान तिला मिळाला… तिने हे सरपंचपद नाकारावं म्हणून तिला अनेक धमक्यांना सामोरं जावं लागलं… पण ती ढळली नाही…. तिने अत्याचारित महिलांसाठी अल्पबचत गट तयार केले… बँकांकडून सहाय्य मिळवलं…  अनेकांच्या गुणांचं संकलन करून या माध्यमातून तिने त्यांना सक्षम बनवण्याचा विडा ऊचलला… अंगणवाडीतही तिचा महत्वपूर्ण सहभाग  होता…

बघता बघता सरस्वतीच्या स्वप्नांचा आलेख ऊंच ऊंच होत गेला…. आता ती सरस्वती बाई झाली होती…

ती एका गळीत समाजाची आधारभूत बनली होती…. “माय” माऊली संबोधली जाऊ लागली….. मी टीव्ही लावला…. ऊंच माझा झोका या कार्यक्रमात तिचा सत्कार होणार होता…. पुरस्कार चिह्न हातात घेऊन आपलं मनोगत व्यक्त करणार्‍या  सरस्वतीच्या डोळ्यात आजही तीच चमक होती….. मी ऐकत नव्हतेच एक ऊंच गेलेला झोका पाहत होते…. फक्त…. पाहता पाहता डोळे भरले… या झोक्याला मी फक्त एक हलका धक्का दिला होता……!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

१९/०१/२०२१

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “ते” होते म्हणून – “निवेदिता” भाग-3☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

☆ विविधा ☆ “ते” होते म्हणून – “निवेदिता” भाग-3 ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे 

सिंध प्रांतात जन्मलेले पाकिस्तानी नागरिक पण मनानं, विचारानं पक्के भारतीय असणारे “तारिक फतेह” यांची मुलाखत बघत होते. एके ठिकाणी ते म्हणाले, “आपली संस्कृती केवढी महान आहे याची जाणीव भारतीयांनाच नसेल, तर दुसरा कुणी काय इलाज करणार यावर?”

हे ऐकून मला भगिनी निवेदितांची आठवण आली. मूळच्या आयरिश, पण इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या नोबल कुटुंबातील मुलगी “मार्गारेट नोबल” विवेकानंदांची व्याख्यानं ऐकून त्यांच्या कार्यात सहभागी व्हायला भारतात आली आणि “भगिनी निवेदिता” झाली हे बहुधा सगळ्यांना माहीत असतं. पण त्यांच्या कार्याची व्याप्ती इतिहासाचं पाठ्यपुस्तक आपल्याला सांगत नाही. निवेदता मुळात एका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या त्यामुळे भारतात त्यांनी विवेकानंदांच्या सांगण्यावरून प्रथम मुलींसाठी शाळा सुरू केली. स्त्रीशिक्षणाचं हे कार्य अवघडच होतं आणि निराशा पदरात टाकणारं. पण त्यांनी ते मोठ्या उत्साहाने केले.. वाढवले. कलकत्त्यात प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी “Do’s” and “Don’t s” चे पोस्टर्स बंगालीत ठिकठिकाणी लावले. घरोघरी जाऊन, रस्त्यावर स्वतः स्वच्छता केली, औषधफवारणी केली. वाड्यावस्त्यांमधून हिंडून लोकांची शुश्रुषा केली.

सशस्त्र क्रांतीकारकांच्या त्या आश्रयस्थान होत्या; ज्या क्रांतीकारकांमधे विवेकानंदांचे भाऊही होते. त्या काळी नुकत्याच सुरू झालेल्या “रामकृष्ण मिशन” ला सरकारचा रोष ओढवून घेणं परवडणारं नव्हतं कारण कार्य थांबून चालणार नव्हतं. म्हणून रामकृष्ण मिशन ने अधिकृतपणे निवेदितांचा मिशनशी काही संबंध नाही असं पत्रक काढलं. पण मिशनच्या संन्यस्त कार्यकर्त्यांनी त्यांना व्यक्तिगत आयुष्यात सदैव साथच दिली आणि निवेदितांनी विवेकानंदांच्या आईला अखेरपर्यंत सांभाळले.

त्यांना चित्रकलेची उत्तम जाण होती. अनेक नामवंत चित्रकार त्यांना मानत. निवेदितांचा सदैव आग्रह असे, की भारतीय कलाकारांनी आपलं भारतीयत्व सोडू नये. मग ती कला चित्रकला असो, संगीत असो, साहित्य असो…. या सर्व क्षेत्रात भारतीय संस्कृती इतकी समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे, की इतरांचं अनुकरण करण्याची भारतीयांना गरज नाही. फक्त कलाकारांनी नव्हे, तर एकूणच भारतीयांनी आपली संस्कृती सोडू नये. पाश्चिमात्यांचं आंधळं अनुकरण करू नये हा त्यांचा आग्रह होता. चित्रकलेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान मोठं होतं. (प्रत्यक्ष चित्रांच्या स्वरुपात नाही.. तर अनेक नामवंत चित्रकारांना केलेल्या मार्गदर्शनाच्या स्वरूपात)

इंग्लंडच्या पार्लमेंटमधे भारताबद्दल माहिती देऊन इंग्रजांकडून त्याच्यावर अन्याय होतोय हे निवेदितांच्या व्याख्यानांमुळंच लोकांना कळलं.

आयुष्याच्या संध्याकाळी त्या काहीशा एकट्या पडलेल्या होत्या. अंतकाळचे त्यांचे शब्द होते, “बोट बुडतेय.. पण मला सूर्योदय होताना दिसतोय”

भारताला स्वातंत्र्य मिळालं.. पण भारतीयांमध्ये स्वत:च्या संस्कृतीबद्दल अभिमान असावा हे त्यांचं पोटतिडकीने सांगणं कितपत यशस्वी झालं…. कुणास ठाऊक!

कारण संस्कृती म्हणजे फक्त नऊवारी साडी आणि नथ किंवा धोतर नव्हे.. देवदेवतांसाठी किंवा महापुरुषांसाठी, सणवारांच्या निमित्ताने काढलेल्या उन्मादी रॅल्या नव्हेत.. जी पिढ्यानपिढ्या रक्तातून सळसळते आणि विचार, विवेकाच्या काठांमधून वाहते ती संस्कृती निवेदितांना अभिप्रेत होती.

काही वर्षांपूर्वी कोलकत्याला गेले, तेव्हा पूर्ण शहरात निवेदितांच्या खुणा शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केला. कालौघात हे शहर, हा देश त्यांना विसरणं स्वाभाविकच आहे… हे समजून घेतोच की आपण! मीही घेतलं.

© सुश्री राजलक्ष्मी देशपांडे

मो – 7499729209

(लेखात व्यक्त केलेली मते लेखकाची वैयक्तिक मत आहेत.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  दुध हळद ते गोल्डन मिल्क ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

☆ विविधा ☆  दुध हळद ते गोल्डन मिल्क ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

हळदीचा उल्लेख चारशे वर्षा पुर्वी वेदिक काळात मसाला  म्हणून केला गेला आहे .धार्मिक कार्यात व विवाह सोहळ्यात ही मांगल्या चे प्रतिक म्हणून हळदीचा वापर केला जातो.हळदीचा भारतीय केशर किव्हा दैवी वनस्पती म्हणून ओळखले जाते. शुश्रुत संहिता चरक संहिताअशा विविध आयुर्वेदिक ग्रंथात हळदीच्या उपयुक्ततेचा उल्लेख आहे. हळदीला आयुर्वेदा मध्ये हरिद्रा म्हणतात व जयंती मांगल्य वर्णदात्री इंडियन सॅफरॉन ह्या नावांनीही ओळखले जाते. इंग्रजीत हळदीला टर्मरिक म्हणतात व त्याचे पारिवारिक नाव झिंजिबर आहे.

भारत हा हळद उत्पादन करणारा जगातील सर्वांत मोठा देश आहे. जगाच्या एकूण उत्पादनाच्या सु. ८०% उत्पादन एकट्या भारतात होते. आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हळद भारतीय वनस्पति आहे.ही आल्या च्या प्रजाति ची ५-६ फुट वाढणारा रोप आहे. याच्या मूळ्यांच्या गाठीत हळद मिलते. भारतामध्ये हळदीच्या मुख्यतः दोन जातींची लागवड करतात. त्यांपैकी एका जातीची हळकुंडे (कुरकुमा लोंगा), कठीण व भडक पिवळ्या रंगाची असून तिचा रंगासाठी उपयोग करतात. ती ‘लोखंडी हळद’ म्हणून महाराष्ट्रात ओळखलीजाते. दुसऱ्या जातीची हळकुंडे जरा मोठी (कुरकुमा लोंगा), कमी कठीण व सौम्यपिवळ्या रंगाची असतात. त्यांचा उपयोग मुख्यतः मसाल्याचा पदार्थम्हणून होतो. तिसरी जाती रानहळद (कुरकुमा. ॲरोमॅटिका) असून भारतातती जंगली अवस्थेत वाढताना आढळते. चौथी जाती आंबेहळद (कुरकुमा आमडा) असून तिच्या हळकुंडांना आंब्याच्या कैरीसारखा वास असतो. पश्चिम बंगाल, तमिळनाडू व कोकण या ठिकाणी जंगलीअवस्थेत (wild variety) ती आढळते. पाचवी जाती पूर्व भारतीय हळद (कुरकुमा. अंगुस्तीफोलिया) असून तिची हळकुंडे बारीक व पांढरट रंगाची असतात.

हळदी ला आयुर्वेदात प्राचीन काळापासून ही एक चमत्कारिक द्रव्य च्या रूपात मान्यता मिळाली आहे.

हळदी मध्ये ओलेओरेसींन, करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो. करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. हळदी मध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके, तंतू, क्याल्शिअम, फॉस्फोरोस, पोटॅशियम, सोडियम,  लोह,  अ, बी , बी २ जीवनसत्वे, नियासिन, ऍस्कॉर्बिक ऍसिड व तैल सुगंधी हे घटक असतात.

संशोधनानुसार आपल्या आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते. काही संशोधनानुसार या घटकामुळे ताण तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. हळदीतील जंतूनाशक गुणधर्मा मुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. हळदीमुळे  एखादी जखम देखील लवकर भरते. हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून देखील आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते. हळदीचा उपयोग खाद्य पदार्थ व सौन्दर्य प्रसाधनात मध्ये ही खूप प्रमाणात केला जातो.

पी हळद हो गोरी ते वि को टरमेरिक आयुर्वेदिक क्रीम ते गोल्डेन मिल्क असा हळदीचा प्रवास.

त्याचे स्वरूप जरी बदलले असले तरी त्याच्या उपयुक्ततेत  किंतू ही बदल झाला नाही .किंबहुना त्याचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

संपर्क –साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी,  पुणे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तमसो मा ज्योतिर्गमय… ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी

☆विविधा ☆ तमसो मा ज्योतिर्गमय… ☆ सौ ज्योती विलास जोशी

तमसो मा ज्योतिर्गमय

ज्योत दिव्याची मंद तेवते

देवघरातील देवापाशी.

सात्विक ज्योतीचं हे आल्हाददायक असं रूप! दीप हे त्यातल्या ज्योतीसह अग्निचं एक मोहक असं रूप आहे. तितकच ते सुबकही आहे. तृप्ती देणारं आहे.

नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गेला तेजोमय करण्याचं पावित्र्य या ज्योतीत आहे. इंद्रधनुषी रंगाने काढलेल्या रांगोळ्या अधिक प्रकाशमय होतात ते त्यावर ठेवलेल्या पणत्या आणि त्यातील ज्योतीने !हा त्या पणती सह ज्योतीचा सन्मान आहे.

सर्वांना एकाच धाग्यात बांधून ठेवणारा दीपोत्सव अशा असंख्य ज्योतीने प्रकाशमय होतो.हा दीपोत्सव हातात जणू उद्दिष्टांचे दिवे घेऊन येतो आणि सर्वांना स्वप्नपूर्तीचा ध्यास देतो.

लक्ष्मीपूजनादिवशी असंख्य दीपज्योतीनी लक्ष्मीदेवीची अर्चना होते .असं म्हणतात की जिथे ज्योती तिथे लक्ष्मी!

आज झाले मी बिजली ,

घरे मंदिरे लखलखली!

असंच जणू ही दिव्याची ज्योत सांगते.

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी, मंगल प्रसंगी दीपप्रज्वलन हे गृहीतच आहे. कौटुंबिक आनंदाच्या प्रसंगी औक्षण ओघानं आलंच. ज्योतीचं अस्तित्व सर्व प्रसंग उजळून टाकतात.

मंत्र, अभंग, ओव्या, भारुडं ,निरूपणं यांचे दीपही या ज्योतीने उजळले आहेत आणि भक्तीचे तेज पसरवलं आहे. ही ज्योती ज्वाला होऊ शकते.फुंकरीने विझवू पाहणाऱ्यांसाठी ती आव्हान देखील आहे.

शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई यांना ‘क्रांतीज्योती’हा बहुमान दिला आहे. या क्रांतीज्योतीने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवली.

शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मशालीची ज्योत पेटवून वीरश्री मिळवली.

आज घरोघरी हंड्या, झुंबरे एलईडी बल्बने सुशोभित झाली आहेत.हा काळाचा महिमा आहे, टेक्नॉलॉजी चा चमत्कार आहे.कालाय तस्मै नमः!

ज्योतीचे हे दिव्य स्वरूप आज स्वतःची परंपरा टिकवून आहे. दिवाळीच्या या निमित्ताने आपणही हा अनमोल दुवा राखायचा प्रयत्न करूया. हा परंपरेचा एक नाजूक धागा संभाळून ठेवूया.दिवटी पासून ते पंचारती ,निरंजन , समई , कंदील ,पलीते ,पणती या सर्वातून ती आपल्या भेटीला आली. तेजःपुंज ज्योत बनून राहिली.

औक्षण करताना तेजाळणारा भावाचा चेहरा, जसा काही ‘ज्योतीने तेजाची आरती’ म्हणावा असाच! सुवासिनींचे औक्षण करताना सौभाग्य कुमकुमाचा रक्तवर्ण जसा लक्ष्मीच्या पाऊलखुणा!! लक्ष्मीची अनेक रूपे जशी धान्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी गृहलक्ष्मी राजलक्ष्मी वीरलक्ष्मी …..या सर्वांचं औक्षण या ज्योतीने होते. या सर्व लक्ष्मीची प्रसन्नता ही मानवाला सुख-समृद्धी देणारी आहे.धन्वंतरीची ज्योतीने आरती उत्तमआरोग्यधनसंपदा देते.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याजागी दिवा ठेवतात.आत्म्याचे प्रतीक, आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात, कारण दहा दिवस आत्मा घराबाहेरच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. आत्म्याला पुढील वाट दाखवावी असंही या ज्योतीचे उद्दिष्ट असतं असं म्हणतात.

ज्योत से ज्योत जगाते चलो

प्रेम की गंगा बहाते चलो

इवलुश्या मिणमिणत्या ज्योतीच्या केवढ्या विधायक संदेश देणाऱ्या या ओळी!! ज्योतीचा महिमा सुंदर आनंदी आणि तृप्ती देणारा आहे. त्याचा अर्थ आत्मसात करूया .तेव्हाच या आत्ताच्या बेचैन आणि अस्वस्थ परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल…..

गतिमान काळात अंधारक्षण येणारच! म्हणूनच तर ही तेजस्विनी सांभाळायची…..समाज बांधणीची समाज उभारणीची एकात्मतेची ज्योत तेवत ठेवायची. कारण ही ज्योत मानवाचे भविष्य तेजाळणारी आहे.

ही ज्योती नक्कीच एक तेजस्वी साफल्य आपल्या हाती पडण्यास मदत करेल असा विश्वास बाळगूया.

ज्योतीचा महिमा इतका सुरेख आणि आनंदी की तिच्या पुढे नतमस्तक होऊन म्हणावेसे वाटते,

दीपज्योती नमोस्तुते!

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

मो 9822553857

[email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हाय क्लास ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

 ☆ विविधा ☆ हाय क्लास ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

काय आल डोळ्यासमोर ??

पांढरा शुभ्र सदरा, काळी पँट, दोन्हीही कडक इस्त्री मधे, वरती टाय आणि कडक सुट बूट घातलेले रूबाबदार व्यक्तिमत्व? बरोबर आहे ना? मोठ्या कंपनी मधे मोठ्या पोस्ट वर असलेली, सो कॉल्ड उच्चभ्रू वर्ग मधे प्रचंड मान सन्मान, प्रचंड पैसा असलेली,  थोडक्यात वजनदार व्यक्ति.

आपल्या समाजात अश्या व्यक्तिंना खूप मान सन्मान दिला जातो, खूप महत्व दिल जात विनाकारण, आणि त्यामुळे खरच ही माणस स्वतःला खूप वजनदार समजू लागतात. खूप पैसा जमवलेला असतो, मग तो कश्या तर्‍हेने हे महत्वाचे नसतेच मुळात. पैसा, सत्ता, नोकर चाकर जी हुजूर करायला, आणि हाताखाली गडी माणस, मुजरा करायला. आणि ऑर्डर सोडली की त्यांचा प्रतेक शब्द झेलायला.

थोडक्यात गुर्मी, मस्ती आणि पैसा हे हातात हात घालून असतात ह्यांच्या जवळ. बुद्धी असेलच असे नाही. ह्यांचा असा मग एक वेगळा क्लास तयार होतो आणि त्यांच्यातच मग सुरू होते चढाओढ आणि आपल्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यासाठी, ठेवल्या जातात जंगी पार्टी. अन्नाची नासाडी आणि पैश्यांची  उधळपट्टी एवढाच ध्येय. आणि मी तुझ्यापेक्षा किती मोठा हे दाखवण्याची चुरस.

एरवीसुद्धा ही लोक कुठे गेली आणि त्यांना कोणी कप भर चहा दिला तरी त्यातला निम्मा वगळतात जस्ट फॉर स्टेटस सिम्बॉल.

पण हाय क्लास म्हणले, की माझ्या डोळ्यासमोर मात्र येतात त्या सुधा मूर्ती. अतिशय नम्र, बुद्धिमान आणि मान सन्मान असलेल्या. आता सुधा मूर्ती म्हणले की त्यांच्या बरोबर लंडन विमानतळावर घडलेली घटना आपल्याला आठवतेच, नाही का?  त्यांच्या पेहेराव्या वरुन त्यांचा क्लास ठरवण्यात आला होता आणि कॅटल क्लासची उपमा देण्यात आली होती. त्यांना हे ही सांगण्यात आले होते की ही विमानाची ओळ बिझनेस क्लास साठी आहे आणि ह्याचे भाडे इकॉनॉमिक क्लास पेक्षा तिप्पट आहे. आणि चुकून त्या इथे उभ्या असतिल अस समजून त्यांना इकॉनॉमिक क्लासची ओळही दाखवण्यात आली होती. हे सगळ कश्या वरुन ठरवण्यात आले? तर फक्त त्यांच्या साध्या पेहेरावा वरून. त्या दिवशी त्यांनी साधी सुती साडी परिधान केली होती आणि त्या आपल्या मातृभाषेत बोलत होत्या म्हणून?

दुसरे उदाहरण म्हणजे बाबा आमटे. आपल सर्व आयुष्य वाहिले त्यांनी कुष्ट रोग्यांसाठी. तसच बाबासाहेब आंबेडकर हे अजून एक असे व्यक्तिमत्त्व आहे ज्यानी आपले आयुष्य देशासाठी वाहिले. ही आहेत खरी क्लासी माणसे.

एखाद्या माणसाचा क्लास त्याच्या पेहरावावरुन त्याच्या साधेपणा वरुन कसा काय ठरू शकतो??खरतर माणसाचा क्लास ठरतो तो त्याच्या विचारांवरुन  कर्तुत्वा वरुन.  केवळ पैसा आहे म्हणुन तो उडवणे हा  त्यांचा ध्येय कधीच नसतो . त्यांचा ध्येय आपल्या बरोबर आपल्या समाजाला समृद्ध बनवणे, तसच गरजवंताला मदत करणे असतो. ह्याला म्हणायचे क्लासी माणस आणि ह्यांच्या मुळे बनतो हाय क्लास.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अवलिया ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ विविधा ☆ अवलिया ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

थंडी वाढत चाललीय. गारठाही. काकडायला होतय. माणसं पशू, पक्षी, प्राणी सगळेच गारठलेत. व्हरांड्यात छोट्या चार वर्षाच्या प्रणवला स्वेटर घालत होते. आमच्या  घरासमोर रेन ट्रीचं झाड आहे. समोर खूप मोकळी जागा आहे. तिथे भोवतीनं अंतरा-अंतरावर रेन ट्रीची झाडं उभी आहेत. खूप लोक त्यांना शिरीषाची झाडं असंही म्हणतात. झाडं खूप मोठी आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी लावलेली असणार. थंडी सुरू झाली  की पानगळ सुरू होते.

स्वेटर घालून घेता घेता, समोरच्या झाडाकडे बघत प्रणव म्हणाला, `आई, ती पानं खाली पडताहेत बघ! म्हणजे झाडांना जास्तच थंडी वाजत असेल ना!’ त्याच्या बोलण्याचं मला हसूच आलं. `खरंच की!’  मी म्हंटलं. पण त्याच्या बोलण्यामुळे माझं लक्ष अभावितपणे समोरच्या झाडाकडे गेलं. एरवी झाड पानांनी अगदी भरगच्च दिसतं. आता मात्र त्याच्या माथ्यावरची हिरवी छत्री विरविरित झालीय. नुसती विरविरितच नाही, तर आता त्या छत्रीला खूपशी भोकंसुद्धा पडलीत. त्या  भोकातून आभाळाची धुरकट निळाई दिसतीय. इतक्यात एक करड्या रंगाचा पक्षी तिथे आला आणि एका फांदीवर बसला. बराच वेळ दिसत राहिला. एरवी झाडांच्या गच्च गर्दीत छान छपून राहतो तो. आज मात्र तो माझ्या बल्कनीतून अगदी स्पष्ट दिसतोय. मनात आलं, काय वाटत असेल बरं त्या पक्षाला? आपण आसरा घ्यायला या झाडाच्या घरात आलो खरे, पण त्याने तर आपल्याला लपवून ठेवण्याऐवजी, आपल्या घराच्या भिंतींच्या, पानांच्या वीटाच काढून घेतल्या. आता आपण सहजपणे घास होऊ शकू, एखाद्या शिकारी पक्षाचा, किंवा मग एखाद्या शिकार्‍याच्या मर्मभेदी बाणाचा.

माझं लक्ष पुन्हा तिथल्या झाडांकडे गेलं. सर्वच झाडांची पानगळ होते आहे. तिकडे बघता बघता एकदमच एक गोष्ट जाणवली. एरवी पानांची घनदाट घुमटी सावरत मिरवणारी ही झाडं सगळी एकसारखीच वाटायची. पण आता पानगळीमुळे ही झाडं आकसलीत. आता त्यांच्या आकृत्या, रूप-स्वरूप नीट दिसतय. त्यांच्य रुपाचं वेगळेपण जाणवय. प्रत्येकाचं वेगवेगळं व्यक्तिमत्व लक्षात येतय.

झाडांकडे पाहता पाहता, मला एक कविता सुचली. `अवलिया’.

`ओलांडुनिया पाचही पर्वत एक अवलिया आला कोणी भणंग,  भटका, लक्तरलेला, तुटकी झोळी हाती घेऊनी’

हा अवलिया म्हणजे शिशिर ऋतू. पाच ऋतुंचे पाच पर्वत ओलांडून तो या भूमीवर आलाय. आता दोन महिने या भूमीवर त्याचेच साम्राज्य, पण तो सम्राटासारखा कुठे दिसतोय? तो तर दिसतोय भणंग भिकार्‍यासारखा. जीर्ण-शीर्ण, मलीन-उदासीन. त्याची झोळीही विरविरित, फाटकी-तुटकी, धुक्याची. तो थंडी-गारठा घेऊन आलाय. त्याच्या येण्याने जमिनीला भेगा पडल्याहेत. माणसाच्याही हाता-पायांना कात्रे पडलेत. ओठ फुटलेत॰ गाल खडबडीत झालेत. अवघं शरीरच कसं रुक्ष-शुष्क झालय. जमिनीप्रमाणेच.

पावसाळ्यात दुथडी भरून वाहणार्‍या नद्या आता आटल्या आहेत. आकसल्या आहेत. जणू त्यांच्या थेंबांचे मोती-दाणे त्या फकिराने झोळीत भरून घेतलेत. फुलांच्या पाकळ्या, झाडांची पानेही त्याने ओरबाडून घेतलीत. आपल्या झोळीत टाकलीत. त्यामुळे जमिनीप्रमाणे वृक्षांच्या सावल्याही सुकल्या आहेत. त्याची झोळी भरली. आता तो पुन्हा निघून चाललाय आपल्या देशात. इथे सृष्टी मात्र बापुडवाणी होऊन बसलीय. पण ही स्थिती कायम थोडीच राहणार आहे? फाल्गुन सरता सरता नव्हे, फाल्गून लागता लागताच पुन्हा चमत्कार होणार आहे. त्यावेळी झाडे निष्पर्ण झाली असली, तरी गुलमोहर, पळस, पांगारा, शेवरी आपल्या माथ्यावर रत्नमाणकांची फुले मिरवणार आहेत.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

पत्ता – द्वारा, अमोल केळकर,  सेक्टर-5, सी-5, बिल्डिंग नं. 33, 0-2पंचरत्न असोसिएशन, सी.बी.डी. – नवी मुंबई पिन- 400614

मो. – 9403310170

e- id- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सांजवेळ … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆  विविधा ☆ सांजवेळ … ☆ सौ. उज्ज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

ही अशी सांजवेळ आली की मन थोडं अस्थिरच होते! सकाळची उभारी माध्यान्हीपर्यंत राहते आणि नंतर तिला कुठून कलाटणी मिळते ते कळत नाही,

मन उतरणीला लागतं! दिवस आणि रात्रीला जोडणारी ही सांजवेळ! जणू काळजाचा तुकडाच असते ती! सूर्योदयापासून आपण आपल्या उद्योगात इतके मग्न असतो की ही सांजवेळ इतकी लवकर डोकावेल याचे भानच नसते.

बालपणीची कोवळीक घेऊन सूर्य उगवतो, त्याआधी आभाळभर पसरलेला असतो तो त्याचा लाल, केशरी गालीचा! त्यावर लडिवाळपणे खेळत असतो तो बाल सूर्य! त्याच्या तप्त किरणांची शस्त्रे त्याने घरीच ठेवलेली असतात जणू!  जसजसे आकाशाचे अंगण त्याला खेळायला मुक्त मिळत जाते तसतसा  तो सर्वांगाने तेजस्वी होतो. त्याचे हे रूप कधी सौंम्य तर कधी दाहक असते. जेव्हा त्याची ही मस्ती कमी होऊ लागते, तेव्हा पुन्हा तो क्षितिजाशी दोस्ती करायला जातो. आपल्या सौम्य झालेल्या बिंबाची दाहकता कमी करत निशेला भेटायला! मधल्या या अदलाबदली च्या काळात ही सांजवेळ येते!

निसर्गाचे हे रूप मनामध्ये स्वप्नवत गुंतून राहते! मिटल्या डोळ्यासमोर अनेक सूर्यास्त उभे राहतात! समुद्रामध्ये बुडत जाणारे लाल केशरी सूर्यबिंब तर कधी डोंगराचा रांगात, झाडाझुडपात हळूहळू उतरणारे सूर्याचे ते लाल-केशरी रूप! आभाळ भर रंगांची उधळण असते म्हणून निसर्गाची ही ओढ मनाला खूपच जाणवते, जेव्हा आपलं मुक्त फिरणं बंद होतं तेव्हा! उगवती आणि मावळती या सूर्याच्या दोन वेळांच्या मध्ये असताना दिवस बाहेरच्या व्यापात कसाही जात असतोच. वेळ काही कोणासाठी थांबत नाही, पण ही सांजवेळ मात्र मनाला स्पर्शून जाते!

आयुष्याच्या उतरणीचा काळ असाच वेगाने जात असतो. जन्मापासूनचे बालरूप बदलत बदलत मनुष्य तरुण होतो, कर्तव्यतत्पर होत जातो. आयुष्याच्या माध्यांनीला तळपत्या सूर्याप्रमाणे तो कार्यरत असतो. जमेल तितक्या जास्त तेजाने तळपत असतो,तेव्हा कळत नाही की नंतर येणारी उतरण ही अधिक तीव्र स्वरूपाची असणार आहे! सध्यातरी मला या उतरणीची खूप जाणीव होते! आयुष्याची चढण कधी संपली कळलंच नाही आणि ह्या उतरणीच्या  सांजवेळे ला मी आता सामोरे जात आहे! कोरोनाच्या काळात एक नवीन धडा शिकलोय घरात बसायचा! जो अगदी संयमाने आपण पाळलाय! आता वाट पहातोय ती नवीन दिवसांची! ही हूरहूर लावणारी सांजवेळ संपून रात्री ची चाहूल लागली आहे.आनंद इतकाच आहे की आता नवीन दिवस उजाडणार आहे!

गेल्या कित्येक महिन्यांपासून आपण जी निराशादायी सांजवेळ अनुभवत होतो, ती संपून नवीन आरोग्यदायी आशेची पहाट उगवू लागली आहे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares