स्वातंत्र्य दोन प्रकारचे असते . १) शारिरीक २) मानसिक.
आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या मगरमिठीतून मायभू, आपली माती मुक्त झाली. १५० वर्षे आपण त्यांचे गुलाम होतो.
त्यांच्या तालावर नाचत होतो.. नाचणे भाग होते, त्याला पर्याय नव्हता. ते आपले मालक व आपण त्यांचे गुलाम होतो. त्यांची प्रत्येक आज्ञा आपल्याला इच्छा असो वा नसो पाळावी लागत होती. इतक्या वर्षात ते सारे आपल्या अंगवळणी पडले होते.
सवईचे झाले होते, आपल्या नसानसात , मनात मुरले होते.
ते देश सोडून.. ही भूमी सोडून गेले .. पण त्यांच्या काळात जी मनोभूमी, आमची तयार झाली होती .. तिचे काय..? ती इतक्या सहजा सहजी जाणार होती काय ..? नाही. ही मानसिक गुलामगिरी.. सवयी इतक्या सहजासहजी जात नसतात. ते गेल्या नंतर त्यांनी जी व्यवस्था किंवा घडी बसवली होती तिच चांगली होती.. त्यांचे राज्य चांगले होते असे म्हणणारे लोक खूप होते. कारण स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जादूची कांडी फिरावी तशी लगेच सुव्यवस्था निर्माण होईल अशी लोकांची अपेक्षा होती .. ते एवढ्या मोठ्या देशात लगेच कसे शक्य होते? दारिद्र्य, अज्ञान, जुन्या रूढी परंपरा हे आमचे मोठे शत्रू होते, अजूनही आहेत .. ते लगेच जाणे शक्य नव्हते.
शिवाय त्यांनी मुरवलेले मानसिक अंपगत्व होतेच .म्हणजे बघा .. भूमी स्वतंत्र झाली होती. पण आमची मानसिक गुलामगिरी तशीच होती नि आहे. देशाने आम्हाला आचार, विचार, लेखन स्वातंत्र्य दिले आहे तरी आम्ही त्या मानसिक अवस्थेतून पूर्ण बाहेर पडलो आहोत का? आमची अवस्था आजही “.. ना .. घरका ना.. घाटका “अशी आहे. एकच उदा. इंग्रजी भाषा. इंग्रजी काय किंवा इतर कोणत्याही भाषा… जास्त भाषा बोलता आल्या तर उत्तमच. पण आपली मातृभाषा हीच सर्वश्रेष्ठ भाषा असते ह्या विषयी कुणाचे ही दुमत असू नये.इंग्रजी एक भाषा म्हणून शिकायला हवीच पण .. इतर देश पहा .. आपलीच मातृभाषा वापरतात.
आपल्याला मात्र इतक्या वर्षांनंतरही नक्की काय करावे सुचत नाही .. टिळक, गांधी काय इंग्रजी माध्यामात शिकले होते? हेच ते मानसिक अंपगत्व आहे. त्यांचे सूट, बूट, टाय..
अहो, अतिशय थंड प्रदेशातून ते आले होते. आम्ही भर उन्हाळ्यात लग्नकार्यात सूट घालून घामाघूम होत मिरवतो हेच ते मानसिक अपंगत्व .. आजकाल आम्हाला जमिनीवर बसताच येत नाही .. सवयी घेतल्या .. गुलाम झालो. म्हणून स्वातंत्र्य मिळाले तरी आम्ही अजून स्वतंत्र झालो आहोत का?
ह्याचा प्रत्येक भारतीयाने विचार करणे गरजेचे आहे.
या विषयावर खूप काही बोलता व लिहिता येईल पण तरी माझ्या मतांशी सहमत व्हावेच याची गरज नाही.कदाचित माझे लिखाण विषयाला सोडून झाले असे वाटल्यास ते मुक्त चिंतन समजावे ही विनंती …
☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग दुसरा ☆ सौ. दीपा नारायण पुजारी☆
आपण प्रत्यक्ष लढाईत, सशस्त्र चळवळीत महिलांनी घेतलेला सहभाग बघितला. अहिंसक चळवळीतही हजारो स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. सशस्त्र क्रांतिकारक गटामध्ये प्रचारपत्रके वाटणे, भूमिगतांना खाणे पुरवणे अशी कामे त्या करीत. यात बंगाली मुलींच्या साहसकथा रोमाहर्षक आहेत.
‘शांती घोष ‘ आणि ‘सुनीती चौधरी ‘ या दोन तरुण मुलींनी टीपर जिल्हा मॅजिस्ट्रेट स्टिफन्स याची गोळ्या झाडून हत्या केली. हा बंगाली मुलींवर अत्याचार करत होता..
६ फेब्रुवारी १९३२ . . कलकत्ता विद्यापीठात दिक्षान्त समारंभात भाषण करणाऱ्या सर स्टॅनली जॅक्सन यांच्यावर ‘बीना दास’ हिने गोळी झाडली. हे पिस्तुल ‘कल्पना दास’ हिने अन्य मुलींच्या कडून पैसे गोळा करून खरेदी केलं होतं.
‘कल्पना दास ‘आणि ‘प्रीतीलता वाडेदार’ बालपणीच्या मैत्रिणी. ‘ ईश्वर आणि राष्ट्र’ यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचं व्रत त्यांनी घेतलं होतं. २४ सप्टेंबर १९३२ ‘प्रीतीने’ पहाडताली क्लबवर हल्ला केला.इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून सायनाईड प्राशन केले. प्रीतीलता गेली, परंतु स्रियांची ताकद लोकांना समजली.स्री बदलत गेली. स्वतः तून बाहेर पडली. प्रगतीच्या पथावर पुढे जात राहिली.
महाराष्ट्र ही मागे नव्हता.नरगुंद नावाच्या एका छोट्या संस्थानातील राण्यांनीही ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उचलले व त्या शहीद झाल्या.इ. स. १८८५ मध्ये कॉंग्रेस ची स्थापना झाली. त्यानंतर काही वर्षांनी महिला कॉंग्रेसच्या अधिवेशनाला जाऊ लागल्या. ‘श्रीमती कादंबिनी गांगुली’ हिने प्रथम व्यासपीठावर जाऊन बोलण्याचे धाडस केले. ” महिला म्हणजे कचकड्याच्या बाहुल्या नाहीत. आम्ही पुतळे बनून राहणार नाही” या बोलामुळे स्रियांची अबोल भावना बोलकी झाली. हळूहळू त्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात आपले विचार मांडू लागल्या.
महाराष्ट्रातील नाशिक शहरात स्वदेशीची शिकवण देणारी एक महिला सभा होती. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या वहिनी ‘येसूवहिनी’ सभेच्या संस्थापिका होत्या. सावरकर बंधू अंदमानच्या काळकोठडीत शिक्षा भोगत होते. अभिनव भारत या संघटनेतील बहुतेक कार्यकर्ते तुरुंगात होते. त्यांच्या बायकांना बंडखोरांच्या बायका म्हणून पोलिस त्रास देत. सासरची व माहेरची माणसं ही त्यांना सरकारी भयामुळं जवळ करीत नव्हती. ‘येसू वहिनींनी’ ‘आत्मनिष्ठ युवती संघ’ नावाची संघटना स्थापन केली. या स्रियांनी स्वदेशी चे व्रत घेतले आणि त्याचा प्रसार केला. त्याच काळात
काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी हातात काचेच्या बांगड्या घालण्याचे सोडले! साखर परदेशी म्हणून ती ही सोडली. ‘कवी विनायक’ यांच्या देशभक्तीपर कवितांवर सरकारने बंदी घातली होती. त्यांचा तोंडी प्रसार केला. ‘यमुनाबाई सावरकर’ ऊर्फ ‘माई सावरकर,’ वि. दा. सावरकर यांच्या पत्नी, या देखील आपल्या घरातील वातावरणाला
साजेशा काम करीत होत्या. त्या रत्नागिरी येथे सावरकरांच्या समाज सुधारक कार्यक्रमात सहभागी होत. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हळदीकुंकू सारखे कार्यक्रम आयोजित करत. स्पृश्य अस्पृश्य भेद मानीत नसत.
विसाव्या शतकात पहिली जगप्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक ‘भिकाईजी रुस्तुम कामा.’ मादाम कामांनी झोपडपट्टी पासून समाजसेवेला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी घर सोडले. फ्रान्स मध्ये राहून भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्याचे काम त्यांनी केले.
‘कुमारी बलियाम्माने’ दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहात भाग घेण्यासाठी स्त्रियांचे पथक तयार केले.लाहोरच्या ‘राणी झुत्शीने’ दारुच्या दुकानांवर निदर्शने केली. परदेशी कपड्यांच्या होळ्या पेटवल्या.
म. गांधींनी भारतीय महिलांना तिच्या शक्तीची जाणीव करून दिली. गांधीजींच्या विचारांनी भारुन ‘अवन्तिकाबाई गोखले’ यांनी चंपारण्यात सत्याग्रह केला. हिंद महिला समाजाची स्थापना करुन महिलांना कॉंग्रेसच्या विधायक कामासाठी संघटित केले. एक जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी ‘सरलादेवी चौधरी’ यांनी ‘वंदेमातरम’ ची घोषणा करुन नववर्ष साजरे केले. ‘हंसा मेहता’ यांनी सायमन कमिशनला विरोध केला. ‘Poet Nightingale of India’, म्हणजेच ‘सरोजिनी नायडू’ दांडीयात्रेत सहभागी झाल्या. त्या पहिल्या महिला राज्यपाल होत.
बारुआ, अरुणा असावी, उषा मेहता, पद्मजा नायडू, अशी अगणित नावं!! भारतीय इतिहासाच्या आभाळातील या स्वयंप्रकाशीत तारका आहेत. आजही त्या आदर्श ठरतात.
या सर्व हसत हसत आत्मसमर्पण करणाऱ्या माऊलींनी एक तेजस्वी पथ आपल्या साठी तयार केला. कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळींनी या तेजस्विनींना आदरांजली द्यावीशी वाटते.
परवा टोकियो आॅलींपीक मधे मैदानावर सुवर्णपदक विजेत्या, पाठीवर अभिमानाने आपला तिरंगा मिरवत आलेल्या नीरज चोप्राला बघितले आणि ऊर अभिमानाने, आनंदाने भरून आला…
खरं म्हणजे कधीही ऊंचावर, डौलाने फडकणारा भारताचा तिरंगी झेंडा पाहून ज्याचे मन ऊचंबळत नाही तो भारतीयच नाही…
अमेरिकेत असताना, एका इंडीअन स्टोअरवर फडकणारा तिरंगा पाहिल्यावर माझी नात चटकन् म्हणाली आज्जी look at the Indian flag.
त्या क्षणीच्या माझ्या भावना शब्दातीत आहेत. माझ्या अमेरिकन नातीच्या डोळ्यातली चमक पाहून मला जाणवले ते तिच्यातलं टिकून असलेलं भारतियत्व…
अशा आपल्या तिरंगी झेंड्याला निश्चीतच एक अभिमानास्पद इतिहास आहे. त्यांतील तीन रंगांनाही भरीव अर्थ आहे.
आज दिसणारा तिरंगा ध्वज येण्यापूर्वी पाच वेगवेगळ्या पद्धतीचे ध्वज पहायला मिळाले.
१९०६ सालचा पाहिला ध्वज, ज्यात लाल पिवळा हिरवा असे तिरंगी पट्टे होते आणि मधे वंदे मातरम् ही अक्षरे होती. लाल पट्ट्यावर चंद्र, सूर्य आणि हिरव्या पट्ट्यावर कमळे होती.
मादाम कामाने १९३६ साली आणलेल्या ध्वजावर हिरवा पिवळा केशरी असे पट्टे होते केशरी पट्ट्यावर चंद्र, सूर्य तर हिरव्या पट्यावर आठ तारे होते.मधल्या पट्यावर वंदे मातरम् अक्षरे होती.
होमरुल चळवळीच्या वेळी लो.टिळक आणि अॅनी बेझंट यांनी पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एकामागे एक ठेवले व त्यातआठ कमळांऐवजी सप्तर्षींप्रमाणे सात तारे होते..
आंध्र प्रदेशीय पिंगली व्यंकय्या याने हिंदु आणि मुसलमान या दोन धर्मांचे प्रतीक म्हणून लाल व हिरवा असे दोनच पट्टे ठेवले..मात्र गांधीजींनी पांढर्या रंगाचा पट्टा त्यात समाविष्ट केला आणि प्रगती चिन्ह म्हणून चरख्याचे चित्र टाकले…१९३१ साली काँग्रेसने या झेंड्यास मान्यता दिली. मात्र १९४७ साली चरख्याच्या ऐवजी अशोकस्तंभावर असलेले धर्मचक्र आले. केशरी पांढरा हिरवा आणि मधे चोवीस आर्यांचं धर्मचक्र असा हा तिरंगी ध्वज १५आॅगस्ट १९४७ साली दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ,स्वातंत्र्याची ग्वाही देत अभिमानाने फडकला.
पहिला केशरी रंग म्हणजे त्याग, बलीदान समर्पण यांचे प्रतीक.
पांढरा रंग म्हणजे मांगल्य, पावित्र्य, शुचीता शांतीचे प्रतीक.
हिरवा रंग म्हणजे सुजल, सफल समृद्धीचे प्रतीक मधले धर्मचक्र म्हणजे गती, प्रगतीचे चिन्ह..
भारताचा हा तिरंगा म्हणजे भारताची शान अभिमान.
त्याचा वापर कपडे, वेशभूषा, सांप्रदायिक कामासाठी होउ नये. तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावा. पाणी व जमिनीचा स्पर्श त्यास होऊ नये. हा ध्वज खादीचा, सुती अथवा रेशमी असावा.
सरकारी कार्यालये, घर कचेर्या यावर आरोहण, त्याचा मान आणि शान सांभाळून करावे. राष्ट्रध्वजापेक्षा ऊंच कुठलीही पताका नसावी. फक्त शहीद हुतात्म्यांच्याच शवाभोवती हा तिरंगा लपेटला जातो व त्यास मानवंदना दिली जाते…एखादी माननीय राजकीय व्यक्तीच्या निधनानंतर शासनाच्या परवानगीनेच तो अर्ध्यावर उतरवला जातो. हे सारे नियम घटनेत नमूद आहेत.
गेली ७४ वर्षे आपण अतिशय अभिमानाने जन गण मन या शब्दबद्ध सुरांच्या लयीत १५आॅगस्ट आणि २६ जानेवारीला ध्वजारोहण करुन, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्यांना स्मृतीवंदना आदरांजली अर्पण करतो… तेव्हां
झंडा उँचा रहे हमारा।विजयी विश्व तिरंगा प्यारा।।
हे गीत भारतीयांच्या अंत:प्रवाहात उसळत राहते…
आजकाल हा तिरंगा अंतर्देशीय खेळांच्या सामन्यात ,प्रेक्षकांकडून मिरवला जातो. राष्ट्रीय सणांच्या दिवशी त्याची प्रतीके रस्तोरस्ती विकली जातात.देशप्रेमाची एक झलक म्हणून स्तुत्य आहे परंतु नंतर या प्रतीकांचं काय होत.? दुसर्या दिवशी कचर्यात दिसतात…ही अवहेलना असह्य आहे .यावर शासनाने बंदी आणावी..
आमच्या लहानपणी शाळेत सफेद कपडे घालून भल्या सकाळी उठून ध्वजारोहणासाठी जाण्याची प्रचंड उत्सुकता असायची, त्याचबरोबर एक कर्तव्यबुद्धी असायची. पण आताच्या पीढीतली उदासीनता पाहून मन खंतावते. एका रक्तरंजीत, अभिमानाच्या इतिहासाशी आजचे युवक कसे कनेक्ट होतील हा विचार मनात येतो..
असो, मात्र हा प्यारा तिरंगा असाच विजयाने, शानदारपणे सदैव फडकत राहो आणि भारतीयत्वाची आन बान शान राखो….!!
☆ नऊ आगस्ट आणि पंधरा आगस्टच्या निमीत्ताने….. ☆सौ. राधिका भांडारकर☆
महिना आला की इतिहासाची पाने ऊलगडतात.
इतिहास शौर्याचा.इतिहास अभिमानाचा. आमच्या पीढीसाठी तर तो ह्रदयात भिनलेला.मनावर स्वार झालेला.पाठ्यपुस्तकातून घोकलेलाही. आवेशाने लिहीलेली प्रश्नांची परिक्षेतली उत्तरेही..इतिहासाच्या पानापानावरची ती घटनांची चित्रे आजही तशीच्या तशी दिसतात…
नऊ अॉगस्ट आणि पंधरा अॉगस्ट या कॅलेंडरवरच्या ठळक तारखा.
तसं म्हटलं तर दोनशे वर्षाच्या ब्रिटीश गुलामगिरीच्या काळात १८५७ पासून स्वातंत्र्यासाठी अनेक लढे,अंदोलने झाली.मात्र दुसर्या महायुद्धानंतर भारताला तात्काळ स्वातंत्र्य देण्यासाठी, ब्रिटीश शासनाच्या विरुद्ध ९अॉगस्ट १९४२ रोजी अहिंसक, साविनय अवज्ञा अंदोलन पुकारले गेले. क्रिप्स मिशन करारातले ब्रिटीशांनी नमूद केलेले मुद्दे अत्यंत असमाधानकारक होते. परिणामी, अखिल भारतीय काँग्रेस कमीटीच्या नऊ अॉगस्ट १९४२ रोजी, गवालिया टँक मुंबई येथे भरलेल्या अधिवेशनात “छोडो भारत” (quit India) अंदोलनाची हाक महात्मा गांधी यांनी दिली. तेव्हांपासून अॉगस्ट क्रांती मैदान अशी ऐतिहासिक ओळख या ठिकाणाला मिळाली. आणि या दिवसाची क्रांती दिन म्हणून नोंद झाली. या अंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनअंदोलनात सामील झाले. युवकांचा सहभाग अधिक होता. करेंगे या मरेंगे हा मंत्र, ही गर्जना, घोषवाक्य हजारो तरुणांच्या नसानसात भिनले.!! इंग्रजांना ही परिस्थिती हाताळताना नाकी नउ आले. त्यांनी लाठीहल्ला, गोळीबार केला. काही नेत्यांना गुप्त ठिकाणी हलवण्यात आले.अंदोलनाला हिंसक वळणही लागले. गांधीजींनाही अटक झाली.मात्र अरुणा असफ अलीचे नेतृत्व या अंदोलनास लाभले. गांधीजींनी या वेळी युवकांना आवाहन केले होते की “नुसतेच कार्यकर्ते नका बनू ,नेते व्हा…”
हे अंदोलन फसले नाही पण सफलही झाले नाही. कदाचित नियोजनाच्या अभावामुळे असेल.. पण बलीदान व्यर्थ गेले नाही. या अंदोलनामुळे प्रचंड उद्रेक झाला. स्वातंत्र्याची पहाट उगवली..
ई.स.वि. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
विसाव्या शतकात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधी यांनी “चले जाव.” अंदोलन पुकारले.
आणि दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटीशांच्या लक्षात आले, आता आपल्याला भारतावरचे राज्य, युद्ध सांभाळता येणार नाही. क्रांतीकारक उसळले होते.
ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जुन १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. त्यावेळी माउंटबेटन हे व्हाॅइसरॉय होते. मात्र मुस्लीम लीगचा प्रभाव, मतभेद, जीना विचारसरणीचा उदय या संधीचा फायदा घेउन ब्रिटीशांनी Devide and रूल ची अंडर करंट पाॅलीसी वापरलीच. अखेर १५आॅगस्ट १९४७रोजी भारत स्वतंत्र झाला. युनीअन जॅक उतरला आणि भारताचा तिरंगा फडफडला. तो अविस्मरणीय आनंदाचा ऐतिहासिक क्षण गुलामगिरीचे जोखड उतरल्यामुळे भारतीयांनी प्रचंड जल्लोषात साजरा केला. पण त्यावेळीच भारताचे पाकिस्तान आणि भारत असे तुकडे झाले.
पाकीस्तानात रहाणार्या अनेक पंजाबी सिंधींना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक यात मारलेही गेले. प्रचंड हिंसा, कत्तली झाल्या. याचे पडसाद अजुनही पुसले गेले नाहीत. या विभाजनानेच काश्मीरचा प्रश्नही पुढे आला, जो आजही सतावत आहे…
Tryst with destiny हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु यांचे स्वातंत्र्य दिवशी दिलेले भाषण..ते म्हणाले होते, “स्वातंत्र्य आणि सत्ता मिळाल्या नंतर* जबाबदारी वाढते.
आतां खूप कष्ट घ्यायचे आहेत .we have hard work ahead. आराम हराम है। जोपर्यंत आपण देशासाठी घेतलेली शपथ पूर्ण करीत नाही…..”
यावर्षीचा हा ७४वा स्वांतंत्र्यदिन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिल्ली येथे लालकिला लाहोरी गेटवर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, जन गण मन ची धुन वाजेल. देशाला उद्देशून पंतप्रधानांचे भाषण होईल.
क्रांतीची धगधगती मशाल हातात घेउन, देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी प्राणाहुती दिली अशा अमर हुत्म्यांचे स्मृतीदिन म्हणून या दोनही दिवशी आपण त्यांना मानवंदना देतो.आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो. पंधरा आॉगस्ट हा राष्ट्रीय सण मानतो….. मात्र इतिहासाकडे मागे वळून पाहता, मनांत येते, स्वातंत्र्यपूर्व काळीतील ती पीढी , अंशत:च उरली असेल. आणि स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासत घडलेली पीढीही आयुष्याच्या उतरंडीवरच.. या अभिमानाच्या इतिहासाला पुढची पीढी कशी बघेल…स्फुरेल का काही त्यांच्याही नसांतून…वर्षानुवर्षे उभी राहिलेली स्मारके, पुतळे यांच्याशी त्यांचा नेमका काय संवाद साधेल..?? इतिहासाची ही सुवर्णपाने अखंड राहतील की वितळून जातील,..? हरताल,उपोषण असहकार अंदोलन या शब्दांच्या व्याख्या त्यांच्यासाठी नक्की काय असतील…? पूर्वजांनी देशाची तळी ऊचलून, रक्तरंजीत भंडारा उधळून घेतलेल्या शपथेशी आजच्या पीढीची काय बांधीलकी असेल ?असेल की नसेल?
प्रश्न असंख्य आहेत…. चालू समस्यांची बीजे भूतकाळातच शोधत बसणार ,दोषांचा भार टाकून मोकळे होणार की उपायासाठी नवा अभ्यास करणार…??
काळच ठरवेल… बाकी या दिवशी मिळणारी सुट्टीच महत्वाची… पंधरा आॉगस्टला कॅलेंडरवर रविवार नाही ना याचेच समाधान…!!! असो…
हिंदुस्थान- भारत गेल्या अनेक शतकांपासून परकीय साम्राज्याच्या राजवटीखाली होता. आदिलशाही, निजामशाही, पातशाही, इंग्रज , अशा अनेक राजवटींनी भारतावर राज्य केलं. भारतातील काही प्रदेशांवर फ्रेंच, पोर्तुगीजांनी राज्य केलं. तेव्हा पासून या देशातल्या प्रजेवर, रयतेवर, आणि एकूणच सामान्य जनतेवर सक्ती, दडपशाही, त्यांच्या धर्माची पायमल्ली, स्त्रियांवर अत्याचार ह्याचे वर्णन इतिहासात आढळते.
नंतर या पारतंत्र्याला, अत्याचाराला विरोध करणारी, जनतेच्या मनात स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग फुलवणारी, ठिणगी पेटवणारी , परकीयांच्या जोखडातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी बलिदान देणारी अनेक अनेक थोर स्त्री पुरूष व्यक्तिमत्वे आपल्या देशात होऊन गेली. आपल्या इतिहासाचे प्रत्येक पान त्यांचे जीवन, आणि बलिदान ह्याची आपल्याला जाणीव करून देते.
जाणीव करून देते मानवता धर्माची, स्वराज्याची आणि सुराज्याची.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची विचारधारा स्वातंत्र्याबरोबर स्वराज्याची होती. सत्य, अहिंसा, स्वावलंबन, आत्मनिर्भरता अशा मूलभूत तत्वांवर आधारित सुराज्याची होती.
गांधीजींनी स्त्रियांना सीतेसारखे चारित्र्य, शील यांचा आदर्श घेण्याचा उपदेशच केला नाही तर त्यांच्यातल्या सीतेच्या अंशाची, स्त्री शक्ती ची जाणीव करून दिली. जगातील प्रत्येक स्त्रीने स्वतःतील स्त्री शक्तीला जागृत केले तर ती स्वतः, तिचा परिवार, समाज आणि राष्ट्र या सर्वांचीच प्रगती झपाट्याने होऊ शकते ह्या विचारांचे बीज त्यांनी समाजात पेरले.
परकीयांची सत्ता उखडून टाकण्यासाठी, मातृभूमीचे साखळदंड तोडण्यासाठी स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता यांचे आचरण आवश्यक आहे. हे त्यांनी निक्षून सांगितले व त्याचाच आग्रह धरला.
इंग्रज राजवटीला उलथून टाकण्याच्या लढ्यात अनेकांनी दिलेले बलिदान आज स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्षी ही तितकेच जिवंत आहे. 15 ऑगस्ट हा वार्षिक दिवस येतो तेव्हाच ही सर्व चरित्रे, प्रसंग, घटना परत समोर येतात. स्वातंत्र्य दिन अशा विभूतींच्या स्मरणार्थ ध्वजवंदन करून, राष्ट्रगीते गाऊन, त्यावरचे चित्रपट प्रदर्शित करून साजरा केला जातो.
पण हे करत असताना प्रत्येक सूज्ञ भारतीयाच्या मनात सतत एक विचार डोकावत असला पाहिजे कि, 1857 पासून 1947 पर्यंत 90 वर्षे म्हणजे जवळ जवळ एक शतक आपल्या असंख्य पूर्वजांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी लढ्यात आपल्या सर्वस्वाची आहुती दिली, त्यांना 74 वर्षानंतर आजच्या दिवशी वंदन करण्यासाठी तरी आपण लायक आहोत का? पात्र आहोत का?
ज्या इंग्रजांना ‘ चले जाव ‘ म्हणून हाकलून लावले, त्यांचेच अनुकरण आपल्याला आदर्श वाटते. भारतीय संस्कृती, भारतीय एकात्मता आणि भारतीय असल्याचा अभिमान ह्या विचारांकडे आपण सोयिस्करपणे डोळेझाक करत आहोत.
‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार आत्मसात करताना आपल्या देशहिताकडे दुर्लक्ष होते आहे, ही जाणीव राज्यकर्त्यांनी, समाजधुरीणांनी युवा पिढीला करून द्यावी, ही अपेक्षा सर्व भारतीयांची आहे. सध्याच्या युवा पिढीच्या मनात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने परत एकदा स्फुल्लिंग जागृत केले आहे, ही आश्वासक, समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
म्हणूनच प्रत्येक भारतीयाने
” राष्ट्र – प्रथम ” हा शब्द मनात धरून जीवन विकास करणे अत्यावश्यक आहे.
देशातील प्रत्येक क्षेत्र शैक्षणिक, औद्योगिक, शेती, वित्त, बॅकिंग, अनुशासन, सहकार, वैद्यकीय सेवा, औषध उत्पादन, सेवा क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान (Science & Technology), संशोधन ( Research) , digital globalization अशा विविध क्षेत्रात काम करताना ‘ राष्ट्र- प्रथम ‘ हाच मंत्र अनुसरला , कार्यपद्धतीत लागू केला तर नकळतच अनेक विकासात्मक गोष्टी साध्य होतील.
धर्म, जात, वर्ण, राखीवता या गुंत्यातून बाहेर पडून मानवता , भारतीय एकात्मता आणि भारतीय संस्कृती ह्या त्रिसूत्रीवर आधारित असा ‘ पूर्ण विकसित ‘ देश साकारणे हेच आपले ध्येय ठेवू या.
शालेय वयात अभ्यासलेल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे महत्त्व, राष्ट्रगीताचे महत्त्व पुढच्या प्रत्येक अभ्यासक्रमात सामील करणे अत्यावश्यक केले तर विस्मरण होणार नाही. प्रत्येक भारतीयाने आपले कर्तव्य सचोटीने निभावले तरच हक्क मिळवण्याची अपेक्षा ठेवणं रास्त आहे.
” वेदमंत्राहून आम्हां वंद्य वंदे मातरम् ” ही गदिमांनी दिलेली उक्ती जर आचरणात आणली तर राष्ट्राच्या विकासाबरोबर स्वतःची प्रगती ही अढळ असेल.
‘बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो ‘
हे स्वप्न साकारणे आपल्याच हातात आहे. त्यासाठी एकच लक्षात ठेवू या,
” देश हा देव असे माझा अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा “.??????
☆ स्वातंत्र्य संग्रामात भारतीय स्त्रियांचे योगदान – भाग पहिला ☆ सौ. दीपा नारायण पुजारी☆
स्वातंत्र्यापूर्वी भारतीय स्त्रियांवर अनेक बंधने होती. तरीही भारतीय स्री त्याकाळी घराबाहेर पडली.देशासाठी योगदान द्यायला ती मागं राहिली नाही. काही मोजकी उदाहरणं सोडली तर क्रांतीकारकांच्या विजयगाथेत या वीरांगनांच नाव झळकलेलं दिसत नाही.
तो काळ स्त्रियांच्या दृष्टीनं अत्यंत कठीण काळ होता.असुरक्षितता,अराजकता यामुळं पाळण्यात सुध्दा मुलींची लग्नं ठरवली जात असत. मुलींचे आणि स्त्रियांचे आयुष्य हजारो बंधनात जखडलेले होते.स्रियांना शिक्षण मिळत नसे, स्वातंत्र्य नव्हतेच. आवड निवड, इच्छा, मत यापासून त्या कोसो मैल दूर होत्या. सार्वजनिक जीवनात स्थान, मान आणि संधी तर नाहीच, पण समाजात मिसळण्याची परवानगीही नव्हती. परंतु पुढील लहानशा कालखंडात तिनं प्रगतीचा टप्पा गाठलेला दिसतो. भारतीय इतिहासाच्या पुस्तकात स्त्रीच्या कर्तृत्वाचा ठसा दिसतो. आजच्या वर्तमानाचा आणि भविष्याचा पाया तिथं नक्की दिसतो.
भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम १८५७ मध्ये सुरू झाला. अर्थातच त्या बरोबर आठवते ती ‘राणी लक्ष्मीबाई.’ त्यांनी स्त्रियांना युध्दकलेचे शिक्षण दिले. घोड्यावर बसणे, बंदुका आणि तोफा चालवणे, तलवार चालवणे, पोहणे असे शिक्षण देऊन त्यांची पलटण बनवली. त्यांच्या ‘काशी’आणि ‘सुंदर’ या दोन दासी युध्दकलेत प्रवीण होत्या.’फुलकारी’ नावाची एक महिला गस्त घालणे, गवंडी काम करणे यात प्रवीण होती. ‘मोतीबाई’ नावाची अत्यंत बुद्धिमान आणि मुत्सद्दी महिला लढाईचा आराखडा करण्यात वाकबगार होती. सैन्याचा व्यूह रचण्यात तिचाच सल्ला महत्त्वाचा असे. ‘अझीझन’ नावाची कलावंतीण ब्रिटिशांच्या सैन्यातून बातम्या काढून आणण्याचे काम करे.
दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जाफर याची पत्नी ‘बेगम झोनतने’ मतभेद मिटवून एक होण्याचे आवाहन केले.
अवधचा नवाब वाजिरअली शहा, राज्य खालसा झाल्यावर, इंग्रजांनी दिलेल्या ठिकाणी गेला. परंतु त्याची बेगम ‘ हसरत महलने’ अवधवर ताबा ठेवून इंग्रजांबरोबर लढणे पसंत केले. या राण्यांचे बलिदान आपण विसरु शकत नाही.
उत्तरेसारखेच दक्षिणेकडे महिला इंग्रजांविरुद्ध लढण्यास तयार होत्या. मद्रास प्रांतात शिवगंगा नावाचं छोटंसं संस्थान होतं. या राज्याची राणी ‘वेलुंचीयार’ हिनं ब्रिटिशांना आपल्या युध्दकौशल्यानं हैराण केलं होतं. १८५७ च्या अंधकारमय युगात राणीनं स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली होती.
सन १८१७ मध्ये होळकरांचा पराभव झाला. या लढाईचे नेतृत्व ‘राणी भीमाबाईने’ केले. इंग्रजांच्या वेढ्यातून राणी घोडा फेकत बाहेर आली. ती इंग्रजांच्या हाताला लागली नाही.
कित्तुर हे कर्नाटकातील एक लहान पण श्रीमंत संस्थान. या संस्थानची ‘राणी चेन्नमा’ हिने इंग्रजांचा धुव्वा उडवला. कानडी लोकगीतात राणीची शौर्यगाथा वर्णिली आहे.
☆ एका टिंबाचा फरक… भाग -2 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
नावामागे जास्त डिग्र्या आहेत, एवढ्याचमुळे स्वतःला “ सु “ शिक्षित म्हणवून घेणाऱ्यांना तरी, नात्यातलं अंतर वाढवणाऱ्या या लहानशा टिंबाची अनावश्यक लुडबूड जाणवायला हवी, अशी अपेक्षा करावी की नाही हा संभ्रम पडतो. प्रत्यक्षात मनातच नसलेली जवळीक लोकांना दाखवण्यासाठी, हल्ली सासूला “ ए आई “ अशी हाक मारतांना दिसतात बऱ्याच जणी. बहुतेकवेळा सासूच तसा आग्रह धरत असणार, कारण ती एकेरी हाक सासूला खूप हवीहवीशी वाटते — त्या “ए” मध्ये, तिची सासरी गेलेली, किंवा फक्त स्वप्नातच पाहिलेली मुलगी भेटल्यासारखे मनापासून वाटते तिला. पण—” मला माझी आई आहे. दुसऱ्या कुणाला आई म्हणण्याची काय गरज? “ असं सुनेला स्वाभाविक वाटू शकतं. म्हणूनच त्या “ई ”मध्ये दडलेल्या टिंबाचं मनातलं स्थान अढळ कसं राहील, याची खबरदारी सूनही, नकळत का होईना, घेतच असावी, असंही बरेचदा जाणवतं.
आणि मग नकळतपणेच विचार येतो की, आयुष्यभरासाठी म्हणून नव्याने जुळलेल्या / जुळवलेल्या या नात्यामुळे लावलं जाणारं, आईमधल्या “ ई “ वरचं हे इवलंसं टिंब मनातून आधीच कायमचं बेदखल करणं दोघींसाठीही खरंच इतकं अवघड असतं का? या प्रश्नाचं उत्तर “ खरं तर नाही “ हेच असायला हवं. पण यासाठी टाळी एका हाताने वाजत नाही, हा त्रिकालाबाधित नियम दोघींनीही जाणीवपूर्वक लक्षात घ्यायला हवा. “ते टिंब कशाला हवंय आमच्यात लुडबुड करायला? “ असं दोघींनाही मनापासून वाटायला हवं. त्याचा मनापासून तिरस्कार करण्याची दोघींचीही मानसिकता असायला हवी — मानसिकता बदलता येते असा विश्वास हवा.आई हे फक्त एका नात्याचे नाव नाही, तर ते एक ‘तत्त्व’ आहे हे समजायला हवं. म्हटलं तर फारसं अवघड नाही हे —नव्या सुनेने सासरी येतांना –” बाप रे, आता सासूबरोबर किती काय ऍडजस्ट करावं लागणार आहे कोण जाणे “ असा नकारात्मक विचार डोक्यात पेरूनच माप ओलांडण्यापेक्षा, “ चला, आता इथेही एक छान आई असणार आहे माझ्यासाठी “– असा विश्वास बाळगत, आनंदात माप ओलांडायला हवं. आणि नव्या सासूनेही — “ आता जन्मभर आमच्या घरात हिने आमच्या पद्धतीनेच राहायला -वागायला पाहिजे “ हा धादांत अव्यवहार्य विचार, सुनेने माप ओलांडण्याआधीच मनातून कायमसाठी पुसून टाकायला हवा. — ते टिंब पुसण्याची ही पहिली पायरी ओलांडताना, स्वतःची सासरी गेलेली मुलगी आठवायला हवी, आणि स्वतःला मुलगीच नसेल तर सुनेच्या रूपात मला माझी मुलगी मिळाली असं मनापासून म्हणत आनंदी व्हायला हवं.आता या “ आनंद “ शब्दातलं टिंब मात्र कमालीचं सकारात्मक आहे– नाही का? ते पुसायचा प्रयत्न केला तर काय उरणार? -’आ -नद’—वेगळ्या शब्दात — “ आ बैल मुझे मार “सारखी अवस्था. त्यामुळे हे टिंब मात्र प्रत्येकाने सतत जपायलाच हवं असं.
पण माणूस, आणि “ तशाच दुसऱ्या माणसामुळे त्याला मिळू शकणारा “ आनंद “ यात अडथळा निर्माण करणारी जी “एकमेव “ गोष्ट असते, ती म्हणजेही एक टिंबच. दोन माणसांमधल्या कुठल्याही नात्यात आडमुठेपणाने आड येण्याइतकं ते समर्थ असतं. स्नेहभावाचा, आपुलकीचा, प्रेमाचा हात आधी कुणी पुढे करायचा— हा म्हटलं तर अगदीच निरर्थक, नगण्य ठरवता येण्यासारखा — किंबहुना पडूच नये असा प्रश्न, प्रत्येकाला, अशा प्रत्येकवेळी हमखास पडतो, ज्याला कारणही एक टिंबच असतं — आणि ते म्हणजे — “ अहंकार” या शब्दाला जन्म देणाऱ्या “ अहं “ ची मिजास, विनाकारण कुठेही वाढवणारं “ ह “वरचं टिंब. हे टिंब जर कायमचं पुसता आलं— म्हणजे ते पुसून टाकणं आवश्यक आहे की नाही, या प्रश्नाचं “हो “ असं उत्तर आधी स्वतःचं स्वतःला खात्रीपूर्वक सापडलं, तर मग प्रश्नच संपतो –मुळात मग तो पडतच नाही. रांगोळीतलं जास्तीचं टिंब ज्या सहजतेने पुसता येतं, त्या सहजतेने हे टिंब पुसायला नाही जमणार कदाचित — पण एखादी गोष्ट करण्याचा ठाम निश्चय केला, की मग अवघड अशक्य असं कुठे काय असतं? इतर प्राण्यांपेक्षा अगदी वेगळेपणाने माणसाला मिळालेली हीच तर ईश्वरी देणगी आहे. त्यापुढे त्या इवलुश्या टिंबाची काय मजाल? “ह”वरचं ते टिंब चिमटीने अलगद उचलायचं, आणि आनंदामध्ये पूर्णपणे मिसळून टाकायचं, की झालं — मिळालं त्या टिंबाला मौल्यवान आणि हवंसं अढळ स्थान.पटतंय ना?
☆ एका टिंबाचा फरक… भाग -1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
घरात गुढी उभारण्याची गडबड चालू असतांना एकदम लक्षात आलं की दारात रांगोळी काढायची राहिली आहे. मग घाईने रांगोळीचा डबा घेऊन दाराशी गेले. सात आडवे सात उभे ठिपके काढून रेषा जुळवायला लागले. पण काहीतरी चुकत होतं. काढलेल्या रेषा पुसत होते, पुन्हा ठिपके जोडत होते– पण नाहीच. बऱ्याच वेळाने लक्षात आलं की एकदा ठिपके मोजून पहावेत — तर एका ओळीत मी सातच्याऐवजी चुकून आठ ठिपके काढले होते. मग झटकन ते जास्तीचं टिंब पुसून टाकलं, आणि मनासारखी रांगोळी जमून आली. नंतर कितीतरी वेळ घरातल्या कामात बुडून गेले खरी, पण रांगोळीतलं ते पुसलेलं टिंब काही मनातून जाईना. जरा निवांत झाल्यावर तर त्या टिंबाभोवतीच मन फिरायला लागलं —–
गणितातलं काय किंवा अक्षरलिपीतलं काय,’ टिंब ‘ हे सगळ्यात लहान चिन्ह. पण “ मूर्ती लहान पण कीर्ती महान “ या क्याट्यागिरीत चपखल बसणारं. चुकून जरी याची जागा चुकली, तरी एका लाखाचे दहा लाख किंवा दहा लाखाचे एक लाख व्हायला क्षणाचाही वेळ लागत नाही. आणि वर्तुळाच्या केंद्रस्थानी असणारं टिंब नजर चुकवून जरासं जरी हललं, तर त्या वर्तुळाचं वाटोळं का झालं हे कळायला मात्र वेळ लागतोच. म्हणूनच गणित म्हणजे आपल्या हातचा मळ आहे म्हणत कॉलर ताठ करणाऱ्यांना हा एक छोटासा जीव कसा कधी चितपट करेल, सांगता येत नाही. एका टिंबावरूनही ज्ञानाची परीक्षा करता येते ती अशी — शितावरून भाताची व्हावी तशी.
अक्षरलिपी वापरत असतांनाही एक टिंब खूप उलथापालथ करू शकतं. म्हणजे योग्य ठिकाणी पडलं तर त्या मजकुराची, त्याच्या अर्थाची परिपूर्णता — आणि चुकीच्या जागी पडलं तर लगेच अर्थाचा अनर्थ. — आणि नाहीच कुठे पडलं, तर रुळावरून घसरलेल्या आगगाडीसारखी मजकुराची फरपट. बघा ना –त्या टिंबाचा जीव तो केवढा — आणि त्याची ताकद किती मोठी. उदाहरण म्हणून मंदिरातल्या म वरचं टिंब काढून बघा की.
टिंबाचं असणं किंवा नसणं प्रकर्षाने जाणवावं, अशी माणसामाणसातली काही खास वैशिष्ट्यपूर्ण नातीही असतात. त्यातलं आवर्जून जाणवणारं नातं म्हणजे –” आई – मुलगी — कायद्याने आई “ यांचं. ‘यात काय आहे सांगण्यासारखं ‘ असं वाटेल. पण खरंतर टिंबाचं महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हावं, असं या नात्यात अनेकदा आणि जागोजागी घडत असतं. म्हणजे — आईने केलेली जी एखादी गोष्ट खूप छान वाटते, तीच गोष्ट “ आईंनी “ अगदी तशीच केली तर नाक नकळतच मुरडलं जातं. इथे आईच्या आणि आ’ईं’च्या करण्यात तसूभरही नसलेला फरक, केवळ त्या एका टिंबामुळे जाणवतो – टोचतो -नाक मुरडायला लावतो. तिच्या आईने तिला माहेरपणाला बोलावलं की ती आनंदाने फुलून जाते. पण आ’ईं ‘नी त्यांच्या मुलीला माहेरपणाला बोलावलं तर मात्र तिचा चेहेरा रागाने फुलतो. — “ अगं जरा नीट कपडे घाल. हे असे कपडे शोभत नाहीत आता “, असं आईने म्हटलं, तर नुसती मान उडवून हसत तिथून निघून जाणं, किंवा लाडाने आईला मिठी मारणं,एवढ्यावर तो विषय संपतो. पण हेच जर आ’ईं ‘नी, अगदी “ बोलू की नको “ असा विचार करत चाचरत सांगितलं, तरी क्षणात आकाश- पाताळ एक होतं — पार लग्न केल्याचाच पश्चात्ताप व्हायला लागतो — नवऱ्याची ‘शाळा’ घेतली जाते. आणि मग… ‘ नको बाई, आपल्यामुळे या दोघांमध्ये भांडण नको ‘ म्हणत समजूतदार आ’ईं ‘ना ( विशेषतः हल्लीच्या काळातल्या ) असले विषय काढायचेच नाहीत असा कायमचा निर्णय घेत, डोळे – कान बंद करावे लागतात.अर्थात ही फक्त काही उदाहरणे. पूर्वीच्या काळीही या एका इवल्याशा टिंबामुळे त्या कायमसाठी जोडल्या गेलेल्या नात्यांचे अर्थ – जाणिवा, बदलत असणारच हे नक्की. पण आता मात्र “ आधुनिक जीवनशैली “ या नावाखाली, सगळंच चव्हाट्यावर आणण्याचा अट्टाहास हा एक छंद समजला जायला लागलाय अशी शंका येते. आणि त्यामुळे, खरंतर अनावश्यक असणारं ते टिंबही प्रकर्षाने जाणवायला लागलंय –आणि या नात्यांमधली त्याची लुडबुडही जास्तच जाणवायला लागली आहे.
(हृदयस्पर्शी अनुभव ) –जन्माला न आलेल्या मुलीचं बाबांना पत्र… !!!
मी असं ऐकलंय, की भातुकलीचा डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतो… आपला हा पण खेळ आता अर्ध्यावरच मोडेल ना बाबा….?
बोला ना बाबा, गप्प का?
बाबा, तुम्ही आणि आई मला देवाघरी रहायला पाठवणार आहात ना?
का? मी मुलगी आहे म्हणुन…?
मुलगी असणं दोष आहे का बाबा?
तुमची आई, पण एक मुलगीच आहे ना…!
बाबा, देवाचं घर कसं असतं हो…?
तीथं आई-बाबा पण असतात की आईबाबांना नको असणा-या माझ्यासारख्या सर्व मुलीच असतात…..?
सांगा ना बाबा, तुम्ही गप्प का?
बाबा, मला तुम्ही देवाच्या घरी रहायला का पाठवताय? आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का?
मी ना बाबा, आपल्या मनीमाऊ सारखी काॕटखाली झोपून राहीन एकटीच, तुम्हाला आणि आईला मी कध्धी कध्धी त्रास देणार नाही बाबा…. मला नका ना पाठवू देवाघरी…. प्लीज बाबु…!
बाबा, आपली आई कशी दिसते हो? मी तर तिला पाहिलं पण नाही…. आणि आता देवाघरी गेले तर पाहू पण शकणार नाही….
खरं सांगू बाबा, मी खूप स्वप्नं पाहिली होती, पण यातलं एकही खरं होणार नाहीये.
मला आभाळात उंच भरारी घ्यायची होती हो, पण मला काय माहित… जन्माला येण्याआधीच तुम्ही मला आभाळात पाठवणार आहात ते, कायमचं!
आज मी बोलतीये बाबा, पण उद्या मी नसणार आहे.
आजची रात्र तरी तुमच्या आणि आईच्या कुशीत झोपू द्याल मला बाबा….?
पाठीवर थोपटून एकदा तरी जवळ घ्याल मला बाबा??
फक्त एकदाच लाडानं कपाळावरुन हात फिरवाल बाबा…???
बोला ना बाबा, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे…. रात्र संपत चालली आहे…. बोला ना बाबा… बोला ना…
बापरे…. बोलता बोलता सकाळ झाली…. तुम्ही आणि आई हॉस्पिटलमध्ये निघालात सुद्धा…???
आता कुंडीतून गुलाबाचं रोपटं उचकटून फेकून द्यावं तसं डॉक्टर काका आईच्या कुशीतून मला उचकटून फेकून देतील…
तुम्ही हे बघू शकाल का बाबा?
फुलासारख्या नाजूक तुमच्या ठमाकाकुला आईच्या पोटातून ओढून बाहेर फेकून देणार आहेत डाॕक्टर काका… बाबा तुम्ही सहन करू शकाल हे…?
बाबा, हे डाॕक्टर काका, मला आणि आईला घेवुन कुठे चालले आहेत…?
कसले कसले आवाज येताहेत इथं बाबा… मला भिती वाटत्येय… आईला थांबवा ना… या डाॕक्टर काकांना थांबवा ना… बाबा थांबवा ना यांना प्लीज…
डाॕक्टरकाका, तुम्ही तरी ऐका… मी माझी बाहुली देते तुम्हाला… हवं तर माझ्याकडची सर्व चाॕकलेट्स देते… पण आईबाबांपासुन दूर नका ना करु मला काका….
बाबा, तुम्ही माझा हात नका ना सोडु… प्लीज बाबु… सांगा ना या डाॕक्टरकाकांना… आई, तू तरी सांग ना… तू गप्प का…?
असह्य वेदना होत आहेत बाबा मला….
बाबा मला वाचवा…. बाबा मला वाचवा…. बाबा…. बाबा… बाबु…. बाबड्या…!
….. बाबा रडताहात तुम्ही?
आता नका रडु… गेले मी केव्हाच तुमच्यामधुन…
तुमचे डोळे पुसणारे इवलेसे हात आता अस्तित्वात नाहीत, तुमच्या डोक्याला आता मी बामही नाही लावू शकणार, लपाछपीच्या डावात आता मी तुम्हाला कध्धी कध्धीच सापडणार नाही बाबा, दारामागुन आता तुम्हाला भ्भ्वाँव करायलासुद्धा मी येवु शकणार नाही… आणि हो, लंगडीच्या खेळात पण आता तुम्हाला मी कध्धीच हरवायला येणार नाही बाबा… तुम्ही जिंकलात बाबा कायमचे!
तुमची चिमणी आता खूप दूर उडून गेली आहे, आभाळात…. तुम्हालाही तेच हवं होतं ना…?
जाऊदे बाबा, आता मला कसलाही त्रास होत नाहीय, कसली ही वेदना नाही, संवेदना सुद्धा नाही…. मी या पलीकडे गेले आहे.
सारं कसं शांत शांत झालंय बाबा…
आता शेवटचा… अगदी शेवटचा एक हट्ट पुरवाल….?
आता फक्त एकदा एकदाच कुशीत घेउन मला ठमाकाकू ठमाकाकू म्हणून चिडवाल???
चिडवा ना बाबा…प्लीज…. शेवटचं… मी नाही रागावणार तुमच्यावर…!
देवाघरी गेलेल्यांना रागावण्याचा हक्क असतोच कुठे म्हणा…!
नोकरी – व्यवसाय 2012 मधे VRS घेवून RBI मधून निवृत्त !
साहित्य निर्मिती –
RBI मधे असतांना बँकेच्या हाऊस मॅगझीन मधून (Without Reserve) इंग्रजी कविता प्रसिद्ध.
RBI मधील ‘मराठी वांग्मय मंडळाच्या’ बोर्डवर त्या त्या वेळच्या चालू घडामोडीवर विनोदी टीका टिप्पणी करणारे लेखन. RBI स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित एकांकिका लेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक.
RBI मधून निवृत्त झाल्यावर सुमारे दोनशेच्या वर कविता, चारोळ्या, ललीत लेख व विनोदी प्रहसन यांचे लेखन.
“सिंगापूर मराठी मंडळाच्या” अंकातून कविता प्रसिद्ध. तसेच त्यानी आयोजित केलेल्या कविता स्पर्धेत कवितेची निवड आणि त्याचा मधुराणी प्रभुलकर आयोजित “कवितेचे पान – सिंगापूर !” या web series मधे छोटया मुलाखतीसह समावेश !
विविधा
??? बैठक !????श्री प्रमोद वामन वर्तक
मी तरुण असतांना (अर्थात वयाने !) जे काही शब्द प्रचलित होते, त्यातील “बैठक” हा शब्द, सांप्रतकाळी नामशेष झाल्यात जमा आहे !
“अहो जोशी काकू, तुम्ही तो नवीन आणलेला फ्लॉवर पॉट द्याल का आज संध्याकाळी, थोडा वेळासाठी ?” “हो न्या की, त्यात काय विचारायचं मेलं ? आज काही खास आहे वाटत घरी ?” “अहो, आमच्या सुमीच्या लग्नाची ‘बैठक’ आहे संध्याकाळी !”
असे संवाद त्या काळी, लग्न सराईत म्हणजे लग्नाच्या सीझन मध्ये चाळी चाळीतून ऐकायला मिळत असतं ! या संवादात फक्त फ्लॉवर पॉटची जागा दुसऱ्याकडच्या, दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूने घेतलेली असायची, एवढाच काय तो फरक ! आणि हो त्या काळी लग्नाचा सीझन असायचा बरं का ! आत्ता सारखे दोन्ही पक्षांना सोयीचा मुहूर्त काढून, लग्न उरकण्याचा प्रकार तेव्हा अस्तित्वातच नव्हता !
लग्न जमल्यावर, म्हणजे रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम होऊन, एकमेकांची पसंती झाल्यावर, लग्नाची ही “बैठक” साधारणपणे मुलीच्या घरी एखाद्या रविवारच्या सकाळी होत असे ! ही बैठक एकदाची यशस्वी झाली, की त्याच संध्याकाळी भावी जोडपे फिरायला जायला मोकळे ! या अशा लग्नापूर्वीच्या महत्वाच्या टप्प्यापर्यंत पोचलेल्या “बैठकी” पर्यंत, एकदा जमणाऱ्या लग्नाची गाडी आली, की भावी वधूपित्याला अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटत असे ! कारण नंतर कुठल्याच कारणाने असे “बैठकी” पर्यंत जमत आलेलं लग्न, देण्या घेण्यावरून मोडल्याची उदाहरण हातावर मोजण्या एवढी सुद्धा नसायची !
“ताई, उद्या माझी रजा हाय !” आमच्या कामवाल्या बाईने, सौ.ला एका सुप्रभाती आल्या आल्या, काम सुरु करायच्या आधीच, हसऱ्या चेहऱ्याने ही ललकारी दिली ! ते ऐकून सौ ने पण तिच्या इतक्याच, पण त्रासिक चेहऱ्याने तिला विचारलं, “अग मालू उद्या मधेच गं कसली तुझी रजा ?” यावर तिने लगेच हातातले भांडे हातातच ठेवून, नमस्कार केला आणि उत्तरली “उद्या आमच्या ‘तिरकाल न्यानी बाबांची बैठक’ हाय !” “बैठक म्हणजे ? तुझ्या त्या बाबांचं लग्न बिग्न ठरलं की काय ?” सौ ने हसत हसत पण खोडकरपणे विचारलं ! “काही तरीच काय ताई, आमचे बाबा अखंड ब्रमचारी हायत म्हटलं !” “अग मग बैठक कसली ते सांगशील का नाही ?” “अवो बाबांची ‘बैठक’ म्हणजे ते परवचन देनार आनी आमी समदी बगत मंडली, ते खाली बैठकीवर बसून ऐकनार !”
तर मंडळी, मालूच्या त्या उच्चारलेल्या वाक्यातील “बैठक” या शब्दाच्या, मला समजलेल्या नव्या अर्थाने, माझ्या शब्दांच्या ज्ञानाची बैठक थोडी विस्तारली !
“आजच्या ‘बैठकीत’ बुवांचा आवाज जरा कणसूरच लागला, नाही ?” शास्त्रीय संगीताची खाजगी बैठक संपल्यावर बाहेर पडतांना, असे संवाद कधी कधी कानावर येतात ! यात कणसूर म्हणजे नक्की काय, हे माझ्या सारख्या कान सम्राटाला, तीच बुवांची बैठक खूपच आवडल्यामुळे कळतंच नाही ! कदाचित माझी शास्त्रीय संगीताच्या जाणकारीची बैठक, फक्त कानापूर्ती मर्यादित असल्यामुळे असं झालं असावं ! असो !
हल्ली अनेक संघटनांच्या, राजकीय पक्षांच्या चिंतन “बैठका” होण्याचं प्रमाण वाढलं आहे ! अशा चिंतन बैठका मध्ये कसलं चिंतन होतं, ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना त्या बैठकामधे प्रवेश नसाल्यामुळे कधीच कळू शकत नाही ! हे बरंच आहे ! त्यांच चिंतन त्यांना लखलाभ !
फडावरची लावणी आणि “बैठकीची” लावणी असे दोन प्रकार असतात, असं ऐकून होतो ! हे दोन्ही प्रकार जरी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही, तरी अनेक मराठी तमाशा चित्रपटांनी माझी ही इच्छा पूर्ण केली, हा भाग निराळा ! फडावरच्या लावणीत नृत्यांगना बोर्डावर नाचत नाचत लावणी म्हणते आणि बैठकीच्या लावणीत, ती एकाच जागी बसून हाताची अदा, डोळ्याचे विभ्रम इत्यादी करून लावणी सादर करते !
या दोन्ही प्रकारात मला एक फरक जाणवला तो असा, की ही बैठकीची लावणी सादर करणारी नटी, फडावरील लावणी सादर करणाऱ्या नटी पेक्षा अंगाने थोडी जाडजुडच असते ! किंबहुना माझं आता असं स्पष्ट मत बनलं आहे की, उतारवयात शरीर थोडं स्थूल झालेल्या आणि स्वानुभवातून आलेल्या बौद्धिक बैठकीतून एखाद्या अशा नटीनेच, हा बैठकीच्या लावणीचा प्रकार शोधून काढला असावा ! असली तमाशा बहाद्दरच यावर जास्त प्रकाश टाकू शकतील असं मला वाटत !
पूर्वीचे खवय्ये (का खादाड ?) लग्नात जेवण झाल्यावर, त्याच बैठकीत ताटभर जिलब्या किंवा परातभर लाडू संपवत असत, असं मी फक्त ऐकलंय ! असा प्रयोग स्वतःच्या डोळ्यांनी बघण्याचे भाग्य या पुढे कोणाला बघायला मिळणे दुरापास्त आहे, यात दुमत नसावे !
तसेच एखाद्या पैलवानाने एकाच सत्रात पाच हजार जोर, दंड बैठका काढल्या, ही पण माझी ऐकीव बातमी बरं का ! उगाच खोटं बोलून मी आपल्यातील संवादाची बैठक कशाला मोडू ?
“मग काय राजाभाऊ, येत्या शनिवारी रात्री कुणाच्या घरी ‘बैठक’ ठरली आहे ?” या गजाभाऊंनी विचारलेल्या प्रश्नातील “बैठक” या शब्दात नानाविध अर्थ अभिप्रेत आहेत, हे आपल्या सारख्यांना वेगळे सांगायलाच नको ! ज्याने त्याने, आपापल्या बुद्धिमतेच्या बैठकीप्रमाणे त्याचे अर्थ लावावेत आणि आपली बुद्धिमत्तेची बैठक त्या शब्दाच्या मिळणाऱ्या नवनवीन अर्थाने विस्तारावी, ही विनंती !
एखाद्या पुस्तकाची समीक्षा करतांना, साक्षेपी समीक्षक (म्हणजे नक्की कोण ?) त्यात “पुस्तक चांगले उतरले आहे, भाषा चांगली आहे, पण लेखकाच्या विचारांची ‘बैठक’ नक्की कोणत्या दिशेने वाटचाल करत्ये, (आता बैठक म्हटल्यावर ती वाटचाल कशी करेल, हे मला न उलगडलेलं कोडं बरं का !) हे शेवट पर्यंत वाचकाला कळतच नाही ! लेखकाच्या स्वतःच्या बौद्धिक विचारांचा, त्याच्या स्वतःच्याच डोक्यात गोंधळ उडालेला दिसतो, हे पुस्तक वाचतांना कळते आणि त्याचे प्रत्यन्तर पुस्तकात पाना पानांत प्रत्ययास येते !” अशी सामान्य माणसाच्या बुद्धीच्या बैठकीचा कस पाहणारी बोजड वाक्य हमखास लिहून, हे साक्षेपी समीक्षक वाचकांच्या डोक्यातील गोंधळ आणखी वाढवतात, एवढं मात्र खरं !
“बैठक” या शब्दाचे आणखी बरेच अर्थ जे तुम्हांला ठाऊक असावेत पण मला ठाऊक नाहीत, ही शक्यता आहेच ! तरी आपण ते अर्थ मला योग्य वेळ येताच कळवाल, अशी आशा मनी बाळगतो !
शेवटी, आपली सर्वांची बौद्धिक बैठक, या ना त्या कारणाने नेहमीच उत्तरोत्तर विस्तारत राहो, हीच त्या जगदीशाच्या चरणी माझी प्रार्थना !